Home Blog Page 30

रोबोटिक सहाय्यीत गुडघे सांधे रोपण शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय औंध येथे यशस्वी

पुणे, दि. २८: सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर तसेच सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनाखाली आज जिल्हा रुग्णालय, औंध पुणे येथे सांधेदुखीने ग्रस्त रुग्णावर अत्याधुनिक रोबोटिक सहाय्यीत गुडघे सांधे रोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आली असून Meril कंपनीतर्फे रोबोटिक प्रणाली, इम्प्लांट्स व तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले.

ही शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागामार्फत पार पाडण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यम्पल्ले (अस्थिरोगतज्ञ) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनिल संतपुरे, डॉ. महेंद्र गरड, डॉ. अनिल विहाडे, डॉ. अमित वनशेळकीकर (अस्थिरोगतज्ञ) या तज्ज्ञांच्या टीमने शस्त्रक्रिया संपन्न केली. शस्त्रक्रियेच्या सुयोग्य पार पाडणीसाठी डॉ. केशव गुट्टे (भुलतज्ञ), डॉ. बालाजी कदम (मुलतज्ञ), डॉ. शोएब शेख (मुलतज्ञ), डॉ. जयश्री मन्नुर (भुलतज्ञ), डॉ. प्राची उत्तरवार (भुलतज्ञ) तसेच शस्त्रक्रियागृहातील परिसेविका सौ. नदा ठोंबरे आणि संपूर्ण स्टाफ यांनी सहकार्य केले.

जिल्हा रुग्णालय औंध, पुणे येथे उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे सांधेदुखी व गुडघे प्रत्यारोपणासाठी आता अधिक परिणामकारक, अचूक आणि सुरक्षित उपचार सुलभ होणार असून रुग्णांना अधिकाधिक लाभ होणार आहे.

जिल्हा क्रीडा पुरस्कारसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि.28 : जिल्ह्याचा गौरव वाढविणारे गुणवंत खेळाडू तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविणारे एक क्रीडा मार्गदर्शक यांना दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्काराद्वारे सन्मानित केले जाते. या पुरस्कारांतर्गत एक मार्गदर्शक, एक महिला खेळाडू, एक पुरुष खेळाडू व एक दिव्यांग खेळाडू अशा चार प्रवर्गातून निवड केली जाणार आहे. पुरस्कारामध्ये रु. दहा हजार व प्रमाणपत्र तसेच सन्मानचिन्ह यांचा समावेश असेल.

पुणे जिल्ह्यातील मार्गदर्शक व खेळाडू यांचेकडून सन 2019-20 ते 2024-25 या वर्षांसाठी अर्ज स्वीकारले जाणार असून विहित नमुन्यातील अर्ज दि. 5 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध राहतील. परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2025अशी आहे.

पुरस्कार अर्जासाठी अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्ष वास्तव्य तसेच पुणे जिल्ह्याचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे. संबंधित खेळाडूने पुरस्कार वर्षासह मागील पाच वर्षांपैकी किमान दोन वर्षे मान्यताप्राप्त अधिकृत क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले असणे आवश्यक आहे. एका जिल्ह्यात पुरस्कार मिळाल्यानंतर उमेदवार राज्यातील अथवा इतर जिल्ह्यातील पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही. तसेच पूर्वी त्याच खेळात किंवा प्रवर्गात जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीस त्याच खेळात पुन्हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार नाही.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स.नं. १९१, विभागीय क्रीडा संकुल, मोझे हायस्कूल समोर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, येरवडा, पुणे, संपर्क क्रमांक श्रीमती शोभा पालवे ८४४६६४६२२८, शिवाजी कोळी ७०२०३३०४८८, अश्विनी हत्तरगे ७३८७८८०४२७, मनिषा माळी ७३९१९६८१९२, मनिषा दिवेकर ९७६४३८५१५२ येथे संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी कळविले आहे.
00000

फसवे ई-चलन मेसेजपासून सावधान प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेचा नागरिकांना इशारा

पुणे दि. 28 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्या नावाने वाहनावर ई-चलन प्रलंबित असल्याचा दावा करणारे खोटे Fake एसएमएस तसेच व्हॉटसअॅप संदेश वाहनधारकांना येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या संदेशांमध्ये नागरिकांकडून ओळख तपासण्याच्या नावाखाली “Vahun Parivahan” किंवा इतर अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले जात असून, हे संदेश पूर्णतः बनावट असल्याचे वाहनधारकांच्या तक्रारीतून समोर आले आहे.

अशा फसवणुकीच्या हेतूने पाठविण्यात आलेल्या मेसेजचा नमुना पुढीलप्रमाणे आढळून येतो

Dear Vehicle Owner/Driver, This is to inform you that you have been issued a traffic challan..
Challan Number: LA21071734311687, To confirm your identity and view the evidence, please install Vahun Parivahan app.The app will provide you with the necessary Regards RTO OFFICE

प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO Pune) ई-चलान संदर्भातील संदेश हे वरील नमुन्यापेक्षा पूर्णतः भिन्न असतात. RTO मार्फत जारी करण्यात येणारा मूळ संदेश पुढीलप्रमाणे

MH12XXXXXX was found in public place with violation of MV Act, 1988.Kindly see the notice https://rtomh.in/print?id=Gka5JFm and pay fine amount.RTO Pune

असा असतो.

तरी नागरिकांनी फसवणूक करणाऱ्या कोणत्याही संदेशातील लिंक उघडू नये अथवा त्यावर क्लिक करू नये. अशा बनावट मेसेजकडे तात्काळ दुर्लक्ष करावे आणि सायबर गैरप्रकाराच्या स्वरूपात तक्रार सायबर पोलीस विभागाकडे नोंदवावी.

नागरिकांनी सत्यापित माहितीचा वापर करावा, अधिकृत संकेतस्थळावरील तपशीलच ग्राह्य धरावेत असे आवाहनही प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी केले आहे.

घरबसल्या आधारमध्ये मोबाइल नंबर बदलता येईल:ॲपवर OTP आणि फेस ऑथेंटिकेशनने अपडेट होईल, कोणत्याही कागदपत्राची गरज नाही

0


लवकरच तुम्ही घरबसल्या आधार कार्डमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलू शकाल. आधारचे नियमन करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन डिजिटल सेवेची घोषणा केली आहे.याद्वारे, वापरकर्ते आधार ॲपवर OTP पडताळणी आणि फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्यांचा मोबाईल नंबर अपडेट करू शकतील. या सेवेमुळे दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सोयीस्कर होईल.

UIDAI नुसार, मोबाईल अपडेट करण्याची प्रक्रिया खूप सोपी ठेवण्यात आली आहे. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची किंवा प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होईल.

सर्वात आधी युजर्सना AADHAAR ॲप डाउनलोड करावे लागेल.
येथे युजर्सना आपला आधार क्रमांक आणि नवीन मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.
OTP व्हेरिफिकेशन होईल, जो जुन्या किंवा नवीन क्रमांकावर पाठवला जाईल.
त्यानंतर स्मार्टफोन कॅमेऱ्याने फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करावे लागेल.
₹50 चे पेमेंट केल्यानंतर फॉर्म सबमिट करावा लागेल. बायोमेट्रिक अपडेटसोबत हे मोफत असेल.
अपडेट स्टेटस तपासण्यासाठी URN क्रमांकाने UIDAI वेबसाइटवर पाहता येईल, जे 2-4 आठवड्यांत दिसेल.

आधार कार्ड ही देशातील सर्वात मोठी ओळख सेवा आहे, ज्यात 130 कोटींहून अधिक लोकांचा डेटा जोडलेला आहे. मोबाईल क्रमांक हा त्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण याचद्वारे OTP च्या माध्यमातून बँक खाते, सरकारी सबसिडी, आयकर पडताळणी आणि डिजीलॉकरसारख्या डिजिटल सेवांपर्यंत पोहोचता येते.

जर क्रमांक जुना झाला किंवा हरवला तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आतापर्यंत तो अपडेट करण्यासाठी नोंदणी केंद्रात जावे लागत होते, जिथे बायोमेट्रिक पडताळणी आणि लांब रांगांचा त्रास होता. पण आता UIDAI डिजिटल पद्धतीने हे सोपे करणार आहे.

एक महिन्यापूर्वी UIDAI ने आधार कार्डचे नवीन मोबाईल ॲप लॉन्च केले होते. यात वापरकर्ता एकाच फोनमध्ये 5 लोकांचे आधार ठेवू शकतो. यात आधारची फक्त तीच माहिती शेअर करण्याचा पर्याय आहे, जी आवश्यक असते.

या ॲपमध्ये तुम्ही UPI मध्ये ज्याप्रमाणे स्कॅन करून पेमेंट करता, त्याचप्रमाणे आधार तपशील शेअर करू शकता. ॲपला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी यात फेस ऑथेंटिकेशनसारखी वैशिष्ट्ये जोडली गेली आहेत.

आधारच्या नवीन ॲपची वैशिष्ट्ये

फोनमध्ये आधार सोबत ठेवा: ई-आधार नेहमी तुमच्यासोबत राहील, कागदी प्रतीची गरज नाही.
फेस स्कॅन शेअरिंग: आयडी शेअर करण्यासाठी फेस स्कॅन करावे लागेल, पिन-ओटीपीप्रमाणे सुरक्षित.
सुरक्षित लॉगिन: बायोमेट्रिक प्रमाणीकरणाने ॲप उघडेल.
मल्टी लँग्वेज सपोर्ट: हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध.
ऑफलाइन वापर: इंटरनेट नसतानाही आधार पाहता येईल.

जुने mAadhaar आणि नवीन आधार ॲपचा उद्देश आधारचा डिजिटल पद्धतीने वापर करणे हा आहे, परंतु लक्ष वेगवेगळे आहे…

PDF डाउनलोड किंवा PVC कार्डसाठी अजूनही mAadhaar वापरा.
व्हर्च्युअल आयडी जनरेट करण्यासाठी किंवा काही अपडेट्ससाठी UIDAI पोर्टल किंवा mAadhaar हेच चांगले.
नवीन ॲप प्रायव्हसी-फर्स्ट आहे, जिथे सिलेक्टिव्ह डिस्क्लोजरमुळे फक्त आवश्यक माहिती शेअर होते.


नवीन ॲपमुळे युजर्सना काय फायदा मिळेल?

हॉटेल चेक-इन, सिम ॲक्टिव्हेशन किंवा बँक KYC जलद होईल.
फॅमिली मॅनेजमेंट सोपे, एका फोनवर सर्वांचे डिटेल्स.
सिलेक्टिव्ह शेअरिंगमुळे पर्सनल डेटा एक्सपोज होणार नाही.
2009 मध्ये आधार सुरू झाला होता.

आधार 2009 मध्ये सुरू झाला होता. आता 1.3 अब्ज म्हणजे 130 कोटींहून अधिक लोकांकडे आधार आहेत. आधी पेपर कार्ड होते, नंतर mAadhaar ॲप आले. आता डिजिटल इंडिया अंतर्गत पूर्णपणे डिजिटल ॲप आणले गेले आहे. प्रत्येक सेवा ऑनलाइन व्हावी, असा सरकारचा प्रयत्न आहे.

मिशो लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 3 डिसेंबर पासून 

0

·         मिशोलिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 105  रुपये  ते प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 111  रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.  

·         प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक मंगळवार, 2 डिसेंबर 2025आहे.

·         बोली/ऑफर बुधवार 3 डिसेंबर 2025रोजी खुली होईल आणि शुक्रवार, 5 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल.

·         बोली किमान 135 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 135 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

·         रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) लिंक: https://investor.meesho.com/ipo-disclosures

राष्ट्रीय, 28 नोव्हेंबर 2025मिशोलिमिटेड (“कंपनी”)ने प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) बुधवार 3 डिसेंबर 2025पासून प्राथमिक समभाग विक्री(“ऑफर”) खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक कार्यालयीन एक दिवस आधी म्हणजेच मंगळवार, 2 डिसेंबर 2025आहे. बोली/ऑफर शुक्रवार, 5 डिसेंबर 2025 रोजी बंद होईल.

प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 105 रुपये  ते प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 111  रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 135 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या 135 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

ऑफरमध्ये 42,500 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू (“Fresh Issue”) आणि काही विद्यमान शेअरधारकांकडून कमाल 105,513,839 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (Offer for Sale) समाविष्ट आहे. यामध्ये विदित आतरे आणि संजीव कुमार (एकत्रितपणे “प्रवर्तक विक्री समभागधारक”) तसेच एलेवेशन कॅपिटल V लिमिटेड, पीक XV पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट्स V, व्हेंचर हायवे सिरीज 1, अ सिरीज ऑफ व्हेंचर हायवे SPVs LLC, गोल्डन समिट लिमिटेड, वाय कॉम्बिनेटर कन्टिन्युइटी होल्डिंग्स I LLC, सॅरिन फॅमिली इंडिया LLC, क्रिम्स्न होल्डिंग्ज LLC,  टायटन पॅट्रिऑट फंड लिमिटेड आणि जेमिनी इन्व्हेस्टमेंट्स L.P. (“एकत्रितपणे कॉर्पोरेट विक्री समभागधारक”) यांचा समावेश आहे. मॅन हे ताम आणि रजुल गर्ग (एकत्रितपणे “वैयक्तिक  विक्री समभागधारक”) आणि प्रवर्तक विक्री समभागधारक व कॉर्पोरेट विक्री समभागधारक यांच्यासह एकत्रितपणे “विक्री समभागधारक”) यांचा समावेश आहे.

ही ऑफर सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रूल्स, 1957 मधील सुधारित नियम 19(2)(b) (“SCRR”) तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2018 मधील सुधारित रेग्युलेशन 31 (“SEBI ICDR Regulations”) यांच्या अनुषंगाने करण्यात येत आहे. ऑफर SEBI ICDR Regulations मधील रेग्युलेशन 6(2) नुसार बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात येत असून यामध्ये SEBI ICDR Regulations मधील रेग्युलेशन 32(2) च्या अन्वये ऑफरच्या किमान 75% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील.

तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“Non-Institutional Portion”) उपलब्ध असेल आणि 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल.

कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. ऑफरच्या उद्दिष्टासाठी NSE हे निर्देशित स्टॉक एक्सचेंज राहील.

बुक रनिंग लीड मॅनेजर्स

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड,जे.पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मॉर्गन स्टँनले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

सोलापूर बसस्थानकावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित!

0

सोलापूर: २८ नोव्हेंबर – आज दि. २८ नोव्हेंबर रोजी (शुक्रवार) परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला पुन्हा एकदा भेट दिली. या भेटी दरम्यान  शौचालय,  पाणपोई सारख्या सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधा कडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या प्रकरणी सोलापूर आगाराचे ‘ आगार व्यवस्थापक ‘ यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

आज दुपारी मध्यवर्ती बसस्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता, तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले.  शौचालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून  शौचालयाची डागडुजी करण्यात आली नव्हती, अनेक ठिकाणी फरशा उखडल्या होत्या. तसेच स्वच्छता देखील ठेवण्यात आली नव्हती. तसेच जवळच असलेल्या पाणपोई परिसरात देखील अत्यंत अस्वच्छता असल्याचे त्यांना आढळून आले.  पाणपोईच्या 5 नळा पैकी केवळ एकच नळ सुरू होता. या बाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक यांना समाधान कारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी  एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना तात्काळ दिले.

विशेष म्हणजे मागील आठवड्यात उपरोक्त त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे  निर्देश आपल्या आकस्मिक पाहणी दौऱ्यात मंत्री सरनाईक यांनी संबंधितांना  दिले होते. याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळी पुनश्च: तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर देखील प्रवासी सुविधा मध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम देखील भरला होता. परंतु सोलापूर बस स्थानकावरील या गैरसोयीबद्दल कोणताही बदल स्थानिक प्रशासनाकडून करण्यात न आल्यामुळे अत्यंत नाईलाजाने संबंधित आगार व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्र्यांना द्यावे लागले आहेत. तथापि, राज्यातील एसटीच्या 251 आगार प्रमुखांनी या घटनेकडे अत्यंत गंभीरपणे पहावे आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये विशेषत: बसस्थानकावरील महिला प्रसाधनगृहाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी यापुढे खपवून घेतली जाणार नाही.असे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिली आहेत.

बुधवार पेठेत 19 वर्षीय तरुणीने आयुष्य संपवलं.. शेवटच्या चिठ्ठीत म्हणाली…

पुणे : पुण्यातील बुधवार पेठ परिसरात काल रात्री घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने हा परिसर हळहळला आहे. अवघ्या १९ वर्षांच्या तरुणीने भाऊ रंगारी मार्गावरील पांडुरंग या पाचमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून तरुणीची ओळख आणि तिच्या मृत्यूचे कारण देखील समोर आले आहे.

समजलेल्या माहितीनुसार, मृत्यू पावलेल्या तरुणीचं नाव मानसी असून ती काही काळापासून याच इमारतीत राहत होती. तिचे नुकतेच लग्न झाले होते. ती मूळची अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी होती.घटनास्थळी तपास करताना पोलिसांना तिची सुसाईड नोट देखील आढळली. त्या नोटमध्ये घरगुती परिस्थिती आणि स्वतःबद्दलचा तिला जाणवलेला न्यूनगंड यांचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुसाईड नोटमध्ये मानसीने, ‘मी घरातल्या लोकांच्या योग्यतेची नाही. मला या कामाचा कंटाळा आल्याने स्वतःहून हे टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करीत आहे’ असे लिहिले असल्याची माहिती आहे. कामाचा ताण आणि मानसिक अस्वस्थता यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मानसी नक्की काय काम करत होती? तिला यासाठी कोणी प्रवृत्त केल का? हे प्रश्न आता समोर आले आहेत.
या प्रकरणाचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे. तरुणीच्या कुटुंबीयांची माहिती, तिच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी, मानसिक स्थिती आणि इतर बाबींचा तपास सुरू असून पुढील माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

मद्यार्काची चोरी व तस्करी:२ टँकर दारू,सातारा–पुणे महामार्गावर हॉटेल चौधरी पॅलेस, राजस्थानी प्युअर व्हेज मागे पकडली

पुणे दि. 28 : राज्य उत्पादन शुल्क विभाग, विभागीय भरारी पथक, पुणे यांनी सापळा रचून टँकरद्वारे मद्यार्काची चोरी व तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत दोन टँकरांसह एकूण रुपये 1 कोटी 19 लाख 4 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 25 नोव्हेंबर २०२५ रोजी भोर तालुका, निगडे गाव हद्दीतील सातारा–पुणे महामार्गावर हॉटेल चौधरी पॅलेस, राजस्थानी प्युअर व्हेज मागील मोकळ्या जागेत करण्यात आली.

ही कारवाई आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त (अं.व.द.) , प्रसाद सुर्वे व विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला असता, अशोक लेलॅण्ड कंपनीचे १६ चाकी टँकर क्र. एमएच-१२ वायबी-९१८६ मधून ३९,८०० लि. मद्यार्क व एमएच-१२ युएम-९८८७ मधून ३९,८०० लि. मद्यार्क हे दोन्ही टँकर संशयास्पदरीत्या थांबले व चालकांनी प्लास्टिक पाईपद्वारे मद्यार्क बाहेर काढण्यास सुरुवात केली. पथकाने तत्काळ छापा टाकताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. योवळी २०० लिटर क्षमतेचे दोन ड्रम – प्रत्येकी १८० लि. मद्यार्क, ३५ लिटर कॅन – ३५ लि. मद्यार्क, २० लिटर प्लास्टिक बादली – २० लि. मद्यार्क, रिकामे ड्रम, कॅन, पाईप, नरसाळे, पक्कड इत्यादी साहित्य असे 79 हजार 600 साहित्यासह एकूण रुपये 1 कोटी 19 लाख 4 हजार 500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी दोन्ही टँकर चालक, टँकर मालक, संबंधित आसवणी व्यवस्थापक तसेच ज्ञात/अज्ञात आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५(अ)(ई), ६७, ८१, ८३, ९० व १०३ अन्वये गु.र.क्र. ५२९/२०२५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

या कारवाईत निरीक्षक नरेंद्र थोरात, दुय्यम निरीक्षक बिराज माने, धीरज सस्ते, एन.जी. निकम, जवान सतिश पांधे, रुतिक कोळपे, शशिकांत भाट, रणजित चव्हाण, संदीप सुर्वे, माधव माडे, राहुल तारळकर तसेच वाहनचालक शशिकांत झिंगळे व अमोल दळवी यांनी सहभाग नोंदविला. पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात करीत आहेत.

ते पुन्हा नुसते येणार नाही.. तर धडाडणार ….

संजय राऊत परत रणांगणात:सोमवारी सकाळी पत्रकार परिषद
मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत सोमवारपासून पुन्हा सक्रिय राजकीय मोहीम उभारणार असून, सकाळी माध्यमांसमोर येऊन ते महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहेत. आजारपणामुळे काही दिवस शांत राहिल्यानंतर राऊत पुन्हा मैदानात उतरत असल्याने सत्ताधाऱ्यांसाठी ही धडकी भरवणारी बाब ठरणार आहे.

शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भांडूप येथील त्यांच्या घरी भेट दिली होती. राऊत यांची तब्येत मागील काही दिवसांपासून बिघडलेली असल्याने त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून अंतर ठेवले आहे. मात्र, या भेटीत राऊत यांचा उत्साह पाहून उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी विनोदी शैलीत सांगितले होते की, आता मी राऊतांना रोज फोन न करता त्यांच्या भावालाच त्यांची खबरबात घेण्यासाठी त्रास देतो. त्यांनी पुढे सांगितले की राऊत आता प्रकृतीच्या अडचणीतून सावरत असून त्यांचे पुनरागमन लवकरच होणार आहे. फक्त परत येणार नाहीत, तर पूर्वीपेक्षा अधिक जोमाने राजकीय रणांगणात उतरणार, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला होता. संजय लवकरच पुन्हा मैदानात दिसतील… आणि या वेळी हातात तलवार घेऊन, अशा शब्दांत त्यांनी राऊतांच्या लढाऊ वृत्तीवर उद्धव ठाकरे यांनी मोहोर मारली होती. ठाकरे यांच्या या विधानामुळे शिवसेना-ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आचारसंहिता आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा तुफान सुरू आहे. अशा परिस्थितीत संजय राऊत यांच्या पुनरागमनाने शिवसेना ठाकरे गटाचा आवाज अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वावर हल्ले, सत्ताधाऱ्यांवर टीका आणि शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर देण्याची संजय राऊत यांची स्टाईल पुन्हा एकदा पहायला मिळेल, अशी पक्षातील सूत्रांची माहिती आहे.

राऊत नेहमीप्रमाणे सरकारवरील टीकेत कोणतीही कुचराई करणार नाहीत, हे निश्चित. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच राजकीय चर्चांना पेट बसणार हेही तितकेच स्पष्ट आहे. त्यांच्या वक्तव्यांवर सत्ताधारी शिंदे-फडणवीस-शिंदे सरकार कशी प्रतिक्रिया देईल? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये राऊतांची भूमिका पुन्हा किती धारदार राहते, हे आगामी दिवसांत समोर येईल.

राज्यातील राजकारणात नेहमीच ठाम भूमिका घेणारे आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या गंभीर समस्यांमुळे घराबाहेर निघू शकले नाहीत. वैद्यकीय तपासणीत त्यांना गंभीर प्रकारचा आजार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले होते. त्यामुळे 31 ऑक्टोबरपासून त्यांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना ब्रेक दिला होता. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची सविस्तर विचारपूस केली होती.

हरविलेले २०९ मोबाईल शोधून पोलिसांनी संबधितांना केले परत

पुणे- हरविलेले एकुण २८,३५,०००/- कि.चे. २०९ मोबाईल चा शोध घेऊन ते हस्तगत करून पोलिसांनी मुल मालकांना ते परत केले .
दिनांक २७/११/२०२५ रोजी ११/०० ते १३/०० वा. दरम्यान येरवडा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर यांचे वतीने नागरीकांचे हरविलेले , गहाळ झालेले हस्तगत मोबाईल वितरण कार्यक्रम आयोजित केला होता .

या कार्यक्रमामध्ये परिमंडळ ४ कार्यक्षेत्रामधील एकूण १० पोलीस स्टेशन यांच्याकडे Central Equipment Identity Register या पोर्टलवरुन प्राप्त तक्रारीमधील, तसेच पुणे शहर पोलीस Lost & Found या पोर्टलवरील तक्रारींमधील हस्तगत एकूण २०९ हरविलेले/गहाळ झालेल्या मोबाईलपैकी अंदाजे २८,३५,०००/- रु कि.चे २०९ मोबाईल हजर असणा-या नागरीकांना अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, यांच्या हस्ते परत करण्यात आले.
उपस्थित नागरिकांनी “मोबाईलच्या किंमतीपेक्षा आमच्या भावना अनमोल आहेत, आमच्या आठवणी याच्याशी निगडीत आहेत, मोबाईल हे आम्हाला आमच्या जवळच्या व्यक्तींकडून भेट म्हणून आलेले आहेत, आमचा महत्वाचा डेटा आमच्या मोबाईलमध्ये होता, हरविलेला मोबाईल परत मिळेल म्हणून आम्हाला अपेक्षा नव्हती, परंतु पोलीसांमुळे आमचे हरविलेले मोबाईल परतमिळाल्यामुळे आमचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास वाढला आहे” अशा भावना व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास अपर पोलीस आयुक्त. मनोज पाटील,.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग विठ्ठल दबडे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग प्रांजली सोनवणे, यांच्या सह परिमंडळ ४ मधील १० पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

हरविलेले १९३ मोबाईल पोलिसांनी शोधून मूळ मालकांना दिले परत

पुणे-पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ कार्यक्षेत्रातील खडक, समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, शिवाजीनगर व डेक्कन पोलीस ठाणे येथे सी.ई. आय. आर. पोर्टल अंतर्गत हरविलेले १९३ मोबाईल पोलिसांनी हस्तगत करून ते संबधित तक्रारदार यांना समारंभपूर्वक परत केलेत.
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ पुणे कार्यक्षेत्रातील खडक, समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, शिवाजीनगर व डेक्कन पोलीस ठाणेमध्ये तक्रारदार यांचे हरविलेले / गहाळ झालेले गोबाईल फोन तक्रारदार यांना परत करणेकरिता पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ पुणे शहर ऋषिकेश रावले, यांचे मार्गदर्शनाखाली दि.२७.११.२०२५ रोजी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृह, नवीन इमारत, मार्डन कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर पुणे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे वेळी खडक पोलीस ठाणेकडील ४० मोबाईल, समर्थ पोलीस ठाणेकडील ५० मोबाईल, फरासखाना पोलीस ठाणेकडील १९ मोबाईल, डेक्कन पोलीस ठाणेकडील ४० मोबाईल, शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील ३० मोबाईल व विश्रामबाग पोलीस ठाणेकडील १४ मोबाईल असे एकुण १९३ मोबाईल हे सी.ई. आर. पोर्टलद्वारे महाराष्ट्रातुन तसेच बाहेर राज्यातुन हस्तगत करून उपस्थित तक्रारदार यांना त्यांचे मोबाईल फोन हे परत करण्यात आले . कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित तक्रारदार यांनी पुणे पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक करून त्यांचे मोबाईल हे परत केल्याबद्दल सर्व उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे आभार मानले.
हा कार्यक्रम पोलीस आयुक्त अमितेश कुमार व पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ ऋषिकेश रावले, यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला कार्यक्रमाकरीता सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अनुजा देशमाने , सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पो.स्टे, उमेश गित्ते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक शशिकांत चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग प्रदीप कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन गिरीषा निंबाळकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) फरासखाना . उत्तम नामवाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजीनगर धनंजय पिंगळे तसेच इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

कसब्यात ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ मोहिमेला सुरुवात

पुणे-प्रभाग २५ मध्ये सुरू झालेली स्वच्छ प्रभाग मोहीम कसब्याच्या स्वच्छता मिशनला बळ देईल. असा विश्वास कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी व्यक्त केला. मतदारसंघातील सर्वांगीण स्वच्छता आणि विकासाला गती देण्यासाठी आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन ९० दिवस’ उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ या मोहिमेचा शुभारंभ आज त्यांच्या शुभहस्ते करण्यात आला. हा उपक्रम राघवेंद्र बाप्पू मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त हाती घेण्यात आला असून, प्रभाग क्र. २५ मधील स्वच्छता कार्य अधिक प्रभावी, नियमित आणि तातडीने पार पाडण्यासाठी हा संकल्प करण्यात आल्याचे राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी सांगितले.

या मोहिमेदरम्यान प्रभागातील विविध भागांत नियमित स्वच्छता करण्यात येणार असून सेवकांकडून ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येईल. तातडीने कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र वाहनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच ५ हजार कचरा पेट्यांचे वितरण केले जाणार आहे. परिसरातील क्रॉनिक स्पॉट्सवर जनजागृती करण्यात येणार असून नागरिकांच्या तक्रारीसाठी स्वच्छता हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तिचा क्रमांक 8381 079 079 असा आहे.

या कार्यक्रमामध्ये अंजुताई माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ‘कचऱ्यात सापडलेली तब्बल 10 लाख रुपये रोखरक्कम असलेली बॅग तिच्या मालकास परत करून प्रामाणिकतेचे उदाहरण घालून दिलेल्या’ पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता सेविका आणि ‘स्वच्छ, सुंदर, विकसित आणि प्रामाणिक कसबा’ उपक्रमाच्या ब्रँड अॅम्बेसिडर अंजुताईंचा रोख 21 हजार रुपयांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक महेंद्र सावंत, आरोग्य निरीक्षक शर्मिला चव्हाण, अतिक सय्यद, नंदकुमार म्हंगरे, तसेच विश्रामबागवाडा आरोग्य कोठी मुकादम राजेंद्र आप्पा मोरे आणि सहाय्यक मुकादम अविनाश आरणे उपस्थित होते. भाजप शहर उपाध्यक्ष मनोज दादा खत्री, भाजप कसबा उत्तर मंडलाचे अध्यक्ष अमितजी कंक, सरचिटणीस निलेशजी कदम व संतोषजी फडतरे, किरणजी जगदाळे, महिला अध्यक्ष मोहनाताई गद्रे, युवा मोर्चा अध्यक्ष श्रेयसजी लेले, भाजप प्रभाग २५ अध्यक्ष सुनीलजी रसाळ, युवा मोर्चा शहर सरचिटणीस प्रणव गंजीवाले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली.

राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी सर्वांचे आभार मानत सांगितले की, नागरिकांच्या सहकार्याने परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार आज करण्यात आला असून, स्वच्छतेच्या माध्यमातून विकासाच्या वाटेने पुढे जाण्याचा मानस आहे.

नगरपरिषद व नगरपचांयतीकरिता १ डिसेंबरपर्यंत प्रचार -२ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. २८: राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान सुरु होणार असून प्रचार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता बंद करण्यात यावे ; प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी, प्रसारण देखील बंद करावे. जिल्ह्यातील उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत पात्र मतदारांना मतदान करता यावे याकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद व नगरपचांयतीच्या मतदार संघात सुट्टी असणार आहे.

मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना मतदारांना देखील लागू राहणार आहे. केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील, येत्या 2 डिसेंबर रोजी पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

युद्ध – आतंक हे कोणत्याही समस्येवरील उपाय नाही-प्रसिद्ध हिंदी सिनेअभिनेते मुकेश खन्ना यांचे विचार

पुणे, २८ नोव्हेंबर २०२५ : “आज संपूर्ण जगात अशांतता माजली आहे. बॉम्बहल्ले, दंगे, आतंकवाद वाढत चालला असून साम्राज्यवादी देशात युद्धाची स्पर्धा अधिकच वाढली आहे.  युद्ध – आतंक हे कोणत्याही समस्येवर उपाय नाही. अहिंसा आणि विश्वशांतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.” असे विचार शक्तिमान आणि महाभारत कार्यक्रमातील भीष्म पितामह फेम व प्रसिद्ध सिनेअभिनेते मुकेश खन्ना यांनी व्यक्त केले. एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, कोथरूड, पुणे आयोजित ३० व्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर व संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. 
यावेळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च(आयसर) चे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू, यशदा या आयएस अकादमीचे संचालक, रंगनाथ नाईकडे, डॉ. बी. एस. नागोबा, दूरदर्शनचे माजी कार्यकारी अधिकारी डॉ. मुकेश शर्मा, डॉ.मिलिंद पात्रे, डॉ. दिपेंद्र शर्मा, डॉ. भरत चौधरी आदी उपस्थित होते.  अध्यक्षस्थानी  विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड हे होते.
मुकेश खन्ना म्हणाले,” आजची मुले  ही  उद्याच्या  भविष्य आहे. मोबाईल च्या आभासी जगात हीच मुले खूप गुंतलेली दिसतात. त्यामुळे ती अधिक अस्वस्थ आहेत. मोबाईलच्या अतिवापर पासून त्यांना दूर ठेवणे हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी नैतिकतेची शिकवण देणारी संस्कृतची शिक्षण व्यवस्था आणायला हवी.”
रंगनाथ नाईकडे म्हणाले, ” संतांचे विचारच आज विश्वबंधुत्वाचे बीज पेरू शकतात. आज लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये संत साहित्य रुजवण्याची गरज असून योगा,  मेडिटेशन, अध्यात्मामुळे आजची मुले सक्षम होतील. उत्तुंग ध्येयाची भरारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देणे हाच उपाय आहे.”
डॉ. अरविंद नातू म्हणाले, ” विज्ञान आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विज्ञान मानवी आरोग्यासाठी कृत्रिम औषध उपचार देते. अध्यात्म हे मेडिटेशन, योगा, ध्यान धारणेच्या माध्यमातून प्राकृतिक आरोग्य उपचार देते. अलीकडे लोकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. सामाजिक व मानसिक स्वास्थ्यासाठी अध्यात्म हाच एकमेव उपाय आहे.”
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ” विश्वशांतीसाठी काम करणाऱ्या सर्वांना एकत्र जोडण्यासाठी ही व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित केली जाते. ज्ञानोबा तुकोबांचा संपूर्ण जगाला जोडणारा विचार  हाच आजच्या विनाशकारी जगात एक आशेचा किरण आहे. केवळ विश्व मानवताच जगात शांती आणू शकते. आपण सर्वजण या मार्गाचे पाईक होऊया.”
प्रा. सचिन गाडेकर सूत्रसंचालन यांनी केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

सनदी लेखापाल ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरचे परिवर्तनशील आर्किटेक्ट 

निर्मल जैन यांचे प्रतिपादन; ‘ग्रुप टू प्रमोट इंडिया अ‍ॅज अकाऊंटिंग जीसीसी’ व ‘आयसीएआय पुणे’ आयोजित चौथ्या जीसीसी समिटचे उद्घाटन 

पुणे : “भारत ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरचे (जीसीसी) जागतिक केंद्र बनत असून, या परिवर्तनाच्या प्रक्रियेत सनदी लेखापाल (सीए) निर्णायक भूमिका बजावतील. ‘जीसीसी’च्या माध्यमातून भारतीय सेवा क्षेत्राला जागतिक स्तरावर मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत,” असे प्रतिपादन अ‍ॅक्सेंचरचे व्यवस्थापकीय संचालक निर्मल जैन यांनी केले.

ग्रुप टू प्रमोट इंडिया अ‍ॅज अकाऊंटिंग जीसीसीज (डीआयटीएस व वर्ल्ड ट्रेंड ऑर्गनायझेशन संचलनालय) आणि दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेतर्फे ‘लेजर ते जागतिक नेतृत्व: ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरला आकार देणारे सीए’ या संकल्पनेवर आयोजित दोन दिवसीय चौथ्या जीसीसी समिटच्या उद्घाटन सोहळ्यात निर्मल जैन बोलत होते.

पुणे स्टेशन येथील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे झालेल्या कार्यक्रमावेळी ग्रुपचे संयोजक सीए संजीब संघी, सहसंयोजक सीए अभय छाजेड, ‘आयसीएआय’चे माजी अध्यक्ष सीए अनिकेत तलाठी, समिटचे संचालक केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए प्रमोद जैन, सीए (डॉ.) एस. बी. झावरे, सीए उमेश शर्मा, सीए दुर्गेश काबरा, आयसीएआय पुणेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, सचिव सीए निलेश येवलेकर, उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, खजिनदार सीए नेहा फडके, विभागीय समिती सदस्य सीए रेखा धामणकर, सीए अभिषेक धामणे, सीए राजेश अग्रवाल, कार्यकारिणी सदस्य सीए सारिका दिंडोकर, सीए प्रितेश मुनोत, सीए नंदकुमार कदम आदी उपस्थित होते. प्रसंगी सीए चंद्रशेखर चितळे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या ‘पुणे पंचायत’ या उपक्रमाचे, तसेच आयसीएआय पुणेच्या अद्ययावत संकेस्थळाचे लोकार्पण झाले.

निर्मल जैन म्हणाले, “जीसीसी आता केवळ बॅक ऑफिसपुरते मर्यादित राहिलेले नाही. आज त्या नवोन्मेष, रणनीती, निर्णयप्रक्रिया आणि मूल्यनिर्मितीच्या जागतिक केंद्रांमध्ये रूपांतरित होत आहेत. डेटा एनालिटिक्स, तंत्रज्ञान, जोखमीचे व्यवस्थापन आणि जागतिक वित्तीय कार्यपद्धती यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रक्रिया आता मोठ्या प्रमाणात सनदी लेखापालांच्या नेतृत्वाखाली होत आहेत. सध्या भारतात १,६०० पेक्षा जास्त जीसीसी कार्यरत आहेत. बंगळुरू, अहमदाबाद, पुणे यांसारख्या शहरात त्यांचे महत्व वाढत आहे.”

“सनदी लेखापालांनी आता लेजर-केंद्रित पारंपरिक भूमिकेपेक्षा डिजिटल टूल्स, ऑटोमेशन, एआय, डेटा इंटेलिजन्स आणि जागतिक व्यापार समजून घेण्याची गरज आहे. येणारा काळ आर्थिक कौशल्यासोबत तंत्रज्ञान-प्रावीण्य आणि धोरणात्मक दृष्टिकोन जोपासणाऱ्या सनदी लेखापालांसाठी मोठ्या संधी देणारा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “जीसीसी क्षेत्रातील उच्च-स्तरीय वित्तीय नेतृत्वासाठी जागतिक कंपन्यांची पहिली पसंती भारताला मिळत आहे. व्यवहारिक कामकाजापासून रणनीती निर्मितीपर्यंत सनदी लेखापालांची भूमिका अधिक व्यापक होत असून, ते जागतिक संस्थांचे ‘सोल्यूशन आर्किटेक्ट्स’ बनत आहेत.”

उपक्रमाबाबत बोलताना सीए संजीब संघी म्हणाले, “अकाऊंटिंग जीसीसीसाठी भारत हा सर्वात विश्वसनीय ठिकाण बनवण्याचे ध्येय आहे. कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, धोरणात्मक पाठबळ आणि उद्योग-सहभागावर आधारित मजबूत परिसंस्था उभारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.”

सीए अभय छाजेड म्हणाले, “डिजिटल फायनान्स, एनालिटिक्स आणि टेक्नॉलॉजी-ट्रान्सफॉर्मेशन याबाबत युवा सनदी लेखापालांना मार्गदर्शन करणे काळाची गरज आहे. या कौशल्यांच्या बळावर भारत जगातील सर्वात विश्वासार्ह जीसीसी टॅलेंट-हब बनेल.”

सीए सचिन मिणियार यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए नेहा फडके यांनी सूत्रसंचालन केले. सीए निलेश येवलेकर यांनी आभार मानले. दोन दिवसीय या समिटमध्ये जीसीसीमधील उदयोन्मुख ट्रेंड्स, डिजिटल फायनान्स, टॅलेंट ट्रान्सफॉर्मेशन, ऑपरेशनल एक्सलन्स, गव्हर्नन्स फ्रेमवर्क आणि भावी नेतृत्व या विषयांवर सत्रे होणार आहेत.