Home Blog Page 3

महापालिकेच्या २३ सेवकांना,वारसांना समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेचे सव्वादोन कोटी रुपयांचे वाटप

पुणे- महापालिकेच्या कायम आस्थापनेवरील अधिकारी,कर्मचारी यांचेसाठी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना मे. महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर सन २०१६ पासून पुणे महानगरपालिकेत राबविण्यात येत असून सदर योजने अंतर्गत कामगार कल्याण विभागामार्फत आजअखेर २३ सेवकांना,वारसांना रक्कम रुपये २,२४,६०,०००/- रक्कम आदा करण्यात आले आहेत.

अग्रिशमन विभागाकडील फायरमन सेवक कै. प्रताप सयाजी फणसे यांचा दि.२१/७/२०२४ रोजी अपघाती मृत्यू झाला होता. तसेच आरोग्य विभागाकडील बिगारी सेवक कै. समीर शिवाजी जाधव यांचा दि. २०/८/२०२४ रोजी अपघाती मृत्यू झाला होता.

शुक्रवार दि.१२/१२/२०२५ रोजी श्रीमती पवनीत कौर (अतिरिक्त महापालिका आयुक्त – जनरल) यांचे हस्ते सदर सेवकांच्या वारस पत्नी श्रीमती विद्या प्रताप फणसे व श्रीमती रेखा समीर जाधव यांना प्रत्येकी रक्कम रुपये १५ लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी कामगार कल्याण विभागाचे खाते प्रमुख श्री. नितीन केंजळे (मुख्य कामगार अधिकारी), श्री.मंगेश जाधव (लिपीक टंकलेखक) हे उपस्थित होते.
याबाबत संबंधित सेवकांच्या वारसांनी या आर्थिक मदतीबद्दल पुणे महानगरपालिकेचे आभार मानले.

गिरीश महाजन यांना मस्ती आली, त्यांना राजकारणातून बाहेर फेका:अंजली दमानिया यांचा थेट हल्ला

0

मुंबई- नाशिकमधील तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोड प्रकरणावरून राज्यभरात वातावरण तापले असताना, या प्रकरणाचा विस्तार आता राजकीय पातळीवर पोहोचला आहे. शहरातील चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी जवळपास साडेबाराशे झाडे तोडण्यात आल्याचे नाशिक महापालिकेने जाहीर केल्यानंतर पर्यावरणप्रेमींसह विविध सामाजिक संस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला आहे. शहरात आधीच तपोवन परिसरातील साधूग्राम प्रकल्पामुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीवरून विरोध तीव्र होत असताना, महापालिकेच्या नव्या खुलास्याने चर्चा अधिक चिघळली आहे.

अंजली दमानिया यांनी आपल्या वक्तव्यात सरकार आणि स्थानिक प्रशासनावर तीव्र टीका करताना गिरीश महाजन यांना थेट लक्ष्य केले. राज्यभरातून विरोध होत असूनही, नाशिकमधील झाडे तोडण्याची गिरीश महाजन यांना इतकी मस्ती आली आहे की लोकांनी आंदोलन केलं, तरी काही फरक पडत नाही, असे दमानिया यांनी कठोर शब्दात म्हटले. त्यांनी नागरिकांना आवाहन करत अशा वृत्तीनं वागणाऱ्या नेत्यांना राजकारणातून बाहेर फेका, अशी हाक दिली. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून पर्यावरणीय प्रश्नांवरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले जात आहे. नाशिकच्या नागरिकांमध्येही या प्रकरणाबद्दल असंतोष मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

दरम्यान, महापालिकेने सादर केलेल्या अहवालानुसार पंचक, चेहडी, आगार टाकळी आणि तपोवन येथील चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी एकूण 1,728 झाडे तोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्यातील 458 झाडे वाचविण्यात महापालिकेला यश आले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. उर्वरित 270 झाडांची तोड करण्यात आली असून, या बदल्यात मनपाच्या मलनिस्सारण विभागाने 1 कोटी 76 लाख रुपयांचा पर्यावरणीय भरपाई निधी जमा केला आहे. हा निधी पुढील पर्यावरण संवर्धन प्रकल्पांसाठी वापरण्यात येईल, असे मनपाने स्पष्ट केले. तसेच फाशीच्या डोंगर परिसरात 17,680 झाडांची नव्याने लागवड केल्याचेही सांगण्यात आले असून, या रोपांमध्ये स्थानिक प्रजातींचा समावेश असल्याचा दावा मनपाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

याशिवाय तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे सुमारे 1,800 झाडे तोडली जाण्याची शक्यता असल्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याची घोषणा केली आहे. गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण भारतातील राजमुद्री येथे जाऊन विशेष झाडांची निवड केली होती. त्यानुसार जवळपास 15 फूट उंचीची 15 हजार देशी प्रजातींची झाडे ज्यात वड, पिंपळ, निंब, जांभूळ आणि आंबा यांसारख्या प्रजातींतील झाडे टप्प्याटप्प्याने नाशिकमध्ये दाखल होऊ लागली आहेत. पहिला ट्रक नुकताच शहरात दाखल झाला असून या झाडांच्या देखभालीसाठी ठिबक सिंचन प्रणालीपासून ते जैविक खतांपर्यंत विस्तृत व्यवस्था करण्यात आल्याचे उद्यान विभागाने सांगितले.

सोमवारपासून गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वृक्षलागवडीच्या या विशेष मोहिमेला औपचारिक सुरुवात होत आहे. तथापि, एका बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि दुसऱ्या बाजूला झाडांची लागवड, या दोन्ही गोष्टींनी शहरात द्वंद्व निर्माण झाले आहे. पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे की लागवड महत्त्वाची असली तरी प्रौढ झाडांची तोड पर्यावरणीय दृष्टीने मोठा तोटा आहे. दमानिया यांच्या आक्रमक प्रतिक्रियेमुळे हा विषय अधिक तीव्र झाला असून पुढील काही दिवसांत या वादाचा राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर आणखी विस्तार होण्याची चिन्हे आहेत. नाशिकच्या हरित वारशासमोर उभ्या राहिलेल्या या प्रश्‍नाला नागरिक, कार्यकर्ते आणि सरकार यांच्यातील संघर्षाची नवी दिशा लाभण्याची शक्यता आहे.

तपोवन वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाची (NGT) 15 जानेवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती

0

नाशिक- तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) 15 जानेवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती जारी केली आहे. या ठिकाणी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा वाढता विरोध, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन आणि अखेर मनसेने दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर आज लवादाने महत्त्वपूर्ण निर्णय देत सर्व प्रकारच्या तोडीवर स्थगिती दिली आहे. यामुळे तपोवनातील हरितपट्टा उद्ध्वस्त होणार की संरक्षित राहणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. लवादासमोर सुनावणीदरम्यान वृक्षतोडीमागील परवानग्या, उद्देश आणि पर्यावरणीय आघाताशी संबंधित अनेक मुद्द्यांची दखल घेण्यात आली आणि अंतिम निर्णय येईपर्यंत तातडीची स्थगिती देणे आवश्यक असल्याचे NGT ने नमूद केले.

मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी दाखल केलेल्या याचिकेत तपोवनातील झाडांची होणारी मोठ्या प्रमाणातील तोड थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. याचिकेनुसार, या परिसरातील झाडे नाशिकच्या पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यांची तोड झाल्यास संपूर्ण परिसराचा जैवविविधतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच, वृक्षतोड करून त्या जागी बांधकाम करण्याची शक्यता व्यक्त करत याला ठोस विरोध नोंदवण्यात आला होता. या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेत NGT ने प्रशासनाकडून संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया, परवानग्यांची नोंद आणि वृक्षतोडीमागील प्रत्यक्ष गरज याबाबत सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे.

NGT च्या आदेशामुळे प्रशासनात अचानक हलचल सुरू झाली आहे. वृक्षतोड थांबवावी लागणार असल्याने संबंधित विभागांनी प्रस्तावित कामकाजावर पुनर्विचार सुरू केला आहे. विशेष म्हणजे, नाशिकमधील तपोवन परिसर शहराच्या फुफ्फुसांसारखा मानला जातो. अनेक धार्मिक स्थळे, गोदाकाठचा प्रदेश, नैसर्गिक जलस्रोत आणि समृद्ध वृक्षसंपदा यामुळे हा भाग पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे येथे होणारी कोणतीही प्रकल्पगत हस्तक्षेप प्रक्रिया अधिक सावधगिरीने हाताळण्याची गरज असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. NGT च्या आदेशानंतर आता प्रशासनावर संपूर्ण प्रकल्पाची पर्यावरणीय शाश्वततेच्या दृष्टीने नव्याने मांडणी करण्याचा दबाव वाढला आहे.

दरम्यान, याचिका दाखल करणारे मनसेचे नितीन पंडित यांनी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले आहे. तपोवन परिसरातील झाडे तोडली गेली तर नाशिकच्या हवामानावर आणि भविष्यातील शहरी नियोजनावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतील, असे त्यांनी सांगितले. तसेच, प्रशासनाने जनतेचे म्हणणे ऐकून प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, पर्यायी उपाय शोधावेत आणि हरित पट्ट्यांचे संरक्षण करण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक नागरिकांमध्येही दिलासा व्यक्त केला जात असून सोशल मीडियावर ‘सेव्ह तपोवन’ मोहीम पुन्हा जोर धरताना दिसत आहे.

NGT ची अंतरिम स्थगिती मिळाल्याने तपोवनातील झाडांसमोर तातडीचा ‘धोका’ टळला असला, तरी पुढील सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद महत्त्वाचे ठरणार आहेत. 15 जानेवारीपर्यंत सर्व संबंधित कागदपत्रांचे परीक्षण, प्रशासनाची बाजू आणि याचिकाकर्त्यांचा पर्यावरणीय आधार असलेला दृष्टिकोन यावर लवाद अंतिम निर्णय घेणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे नाशिककरांसाठी निर्णायक ठरणार असून तपोवनचा हिरवा पट्टा वाचणार की विकासकामांसाठी मार्ग मोकळा होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे

विधी सल्लागार नेमणुकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. १२ : सैनिक कल्याण विभाग पुणे येथे करार पद्धतीने कंत्राटी अशासकीय स्वरुपात विधी सल्लागार पॅनलची नेमणूक करण्यात येणार असून त्याकरिता २२ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज व सिलबंद दरपत्रके सादर करावीत, असे आवाहन सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दीपक ठोंगे (निवृत्त) यांनी केले आहे.

सैनिक कल्याण विभाग, पुणे तसेच सर्व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी व अवलंबीतांची विविध प्रकारची न्यायालयीन प्रकरणे उच्च न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, खंडपीठ मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर तसेच आर्म्ड फोर्सेस ट्रॅब्यूनल खंडपीठ मुंबई, औद्योगिक, कामगार न्यायालय, जिल्हा सत्र, दिवाणी व इतर न्यायालयांमध्ये असतात. या प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यासाठी या पदाच्या नेमणुकीसाठी विधी सल्लागार पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या अनुभवी कर्मचारी, अधिकारी अथवा विधीची पदव्युत्तर पदवी धारण केलेली आणि प्रत्यक्ष वकिलीचा १० वर्षाचा अनुभव व पात्रता आवश्यक राहील. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी संचालक, सैनिक कल्याण विभाग, रायगड इमारत, राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, घोरपडी, पुणे- ४११००१ अथवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६३०२६०३ वर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
0000

हिवाळी अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभिर्य नाही, विदर्भ कराराचा अनादर, जनतेच्या प्रश्नांवर चर्चा नाही: हर्षवर्धन सपकाळ

सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष नेते पद जाहीर करण्याचा राजधर्म पाळत नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने काम रेटण्याची फडणविसांची पद्धत.

नागपूर/मुंबई, दि १२ डिसेंबर २०२५

नागपूरचे हिवाळी अधिवेशन अवघे एक आठवड्याचे घेऊन भाजपा महायुती सरकारने विदर्भ कराराचा अनादरच केला आहे. शेतकरी, कामगार, बेरोजगार, कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार महिला सुरक्षा यासारखे असंख्य प्रश्न असताना अधिवेशनात त्यावर चर्चा होत नाही आणि कुठे कुत्री पकडा, बिबटे सोडा यावर चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्षाला अधिवेशनाचे काही गांभिर्यच राहिलेले नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

नागपूर विधान भवनात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज भ्रष्टाचाराची एक एक प्रकरणे उघड होत आहेत. पैशांचा सुळसुळाट सुरु आहे. भ्रष्टाचार हेच सरकारचे ब्रिद वाक्य़ आहे. ‘न खाऊंगा, न खाने दुंगा’, पासून झालेली सुरुवात आता ‘मिल बाट के खायेंगे’ पर्यंत आली आहे. राज्यातील भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका काढून त्यावर चर्चा झाली पाहिजे पण सत्ताधारी पक्षच सभागृहाचे कामकाज सुरुळीत चालू देत नाहीत. गंभीर विषय सुरु असताना सत्ताधारी पक्षाचे सदस्य़ विनोद करत असतात. लोकशाहीचा कटेलोट होताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षातीलच काही सदस्य भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, सरकारने आतातरी डोळे उघडावे, असे सपकाळ म्हणाले.

विरोधी पक्ष नेते पदाबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदासाठी १० टक्के सदस्यसंख्येचा दाखला दिला जात आहे, असे असेल तर वरच्या सभागृहात १० टक्के सदस्यसंख्या आहे व सरकारला प्रस्तावही दिलेला आहे. मग तेथे विरोधी पक्षनेत्य़ाचा निर्णय का घेतला जात नाही? लोकशाही व्यवस्थेत काही प्रथा, परंपरा व संकेत पाळले जातात, दोन्ही सभागृहाचे प्रस्ताव आहेत पण सरकारला संविधानानुसार कामकाज करायचे नाही, हम करोसे कायदा पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामकाज रेटत आहेत. फडणविसांनी लोकशाहीची बूज राखली पाहिजे. ते एवढा आव आणत असतात पण हा आव आणत असताना त्यांनी संकेत, निय़म पाळले पाहिजेत. विरोधी पक्षनेतेपद देणे हा राजधर्म आहे पण फडणवीस त्यापासून पळ काढत आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

लडाख फेस्टिव्हल आणि कारगिल गौरव राष्ट्रीय पुरस्कार समारोह रविवारी:लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्तांच्या उपस्थितीत

0

पुणे, १२ डिसेंबर २०२५ :

सीमावर्ती भागांमध्ये शांतता, एकात्मता आणि मानवीय राष्ट्रनिर्मितीसाठी कार्यरत असलेली पुणेस्थित सरहद संस्था रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता, पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना, पुणे ४ येथील कम्युनिटी हॉलमध्ये लडाख फेस्टिव्हल आणि कारगिल गौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२५ आयोजित करीत आहे.

भारताच्या भौगोलिक सीमांचे संरक्षण सैन्य करते; मात्र देशाची भावनिक आणि मानसिक एकात्मता ही लोकसहभाग, शिक्षण, संस्कृती आणि कृतज्ञतेतून दृढ होते, या सरहद संस्थेच्या मूलभूत संकल्पनेचे हे आयोजन प्रतीक आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सरहद संस्था लडाख, कारगिल आणि काश्मीर या संघर्षग्रस्त भागांत सातत्याने कार्यरत असून, त्या प्रदेशांना संधी, सन्मान आणि राष्ट्रीय आपुलकीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. याची माहिती सरहद संस्थेचे विश्वस्त श्री. अनुज नहार आणि समन्वयक श्री. लेशपाल जवळगे यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

या कार्यक्रमाला लडाखचे माननीय नायब राज्यपाल श्री. कविंदर गुप्ता हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते लडाख फेस्टिव्हलचे उद्घाटन तसेच कारगिल गौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयएएस, विभागीय आयुक्त, पुणे, हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, संरक्षण, सामाजिक, सांस्कृतिक आणि नागरी क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

लडाख फेस्टिव्हल

लडाख फेस्टिव्हल हा महाराष्ट्र आणि लडाख यांच्यातील सांस्कृतिक सेतू म्हणून संकल्पित करण्यात आला आहे. विशेषतः हिवाळ्यात, जेव्हा लडाख काही काळासाठी भौगोलिकदृष्ट्या अलिप्त राहतो, त्या काळात कला, संस्कृती आणि सामायिक अनुभवांच्या माध्यमातून हा उत्सव एक प्रभावी संदेश देतो —
रस्ते बंद असले, तरी भारताची नाती कधीच तुटत नाहीत.

कारगिल गौरव राष्ट्रीय पुरस्कार

दरवर्षी प्रदान करण्यात येणारे कारगिल गौरव राष्ट्रीय पुरस्कार हे राष्ट्रसेवा, सामाजिक बांधिलकी आणि सीमावर्ती भागांसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करतात. विशेषतः १९९९ च्या कारगिल युद्धाच्या काळात देशासाठी आणि सैन्यासोबत उभे राहिलेल्या नागरी योगदानकर्त्यांची दखल घेत, सीमावर्ती समाजाला भारताची “पाचवी संरक्षणरेषा” म्हणून अधोरेखित करणारा हा पुरस्कार आहे.

कारगिल गौरव राष्ट्रीय पुरस्कारार्थी – २०२५

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक (संस्थात्मक पुरस्कार)
१९०६ साली स्थापन झालेली कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक विश्वास, पारदर्शकता आणि सामाजिक सेवेची परंपरा जपत सहकारी बँकिंग, आर्थिक समावेशन, तांत्रिक नवोन्मेष आणि सामाजिक उत्तरदायित्वातून पिढ्यान्‌पिढ्यांना सक्षम करत आहे.

एअर व्हाइस मार्शल नितीन वैद्य (नि.)
भारतीय वायुसेनेतील प्रतिष्ठित अधिकारी म्हणून एव्हीएम नितीन वैद्य यांनी उत्कृष्ट नेतृत्व आणि समर्पणाने राष्ट्रसेवा केली असून, निवृत्तीनंतरही संरक्षण क्षेत्रातील उमेदवारांचे मार्गदर्शन व माजी सैनिक कल्याणासाठी सक्रिय योगदान देत आहेत.

हाजी अनायत अली
कारगिल येथील ज्येष्ठ नेते हाजी अनायत अली यांनी १९९९ च्या कारगिल संघर्षकाळात भारतीय सेनेला मोलाचे सहकार्य केले, नागरी समाज आणि सैन्य यांच्यात सेतूची भूमिका बजावली आणि संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पित केले.

राजीव साबडे
ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांनी चार दशकांहून अधिक काळ भारतातील महत्त्वाच्या राजकीय आणि संघर्षजन्य घटनांचे निर्भीड वार्तांकन करत लोकशाही मूल्ये बळकट केली असून, तरुण पत्रकारांना मार्गदर्शनही केले आहे.

झेलम चौबळ
पर्यटन क्षेत्रातील अग्रणी नेत्या झेलम चौबल यांनी महिला-केंद्रित आणि शिक्षणाधारित पर्यटनाला नवी दिशा दिली असून, कारगिल, काश्मीरसह सीमावर्ती भागांमध्ये कौशल्यविकास व सामाजिक उपक्रमांना सक्रिय पाठबळ दिले आहे.

राज देशमुख
चांगुलपणाची चळवळ आणि WE Citizens यांच्या माध्यमातून नागरिकांना संघटित करणारे सामाजिक कार्यकर्ते राज देशमुख यांनी राष्ट्रीय प्रकल्प, क्रीडा विकास, सामाजिक कार्य व सल्लागार भूमिकांतून नैतिक व सहभागी प्रशासनाला प्रोत्साहन दिले आहे.

आर्किटेक्ट दिलीप जी. काळे
चार दशकांहून अधिक अनुभव असलेले आर्किटेक्ट दिलीप काळे यांनी सामाजिक बांधिलकीतून समुदाय-केंद्रित, शाश्वत वास्तुरचना घडवत वास्तुकलेला सेवाभावाचे प्रभावी माध्यम बनवले आहे.

मागील कारगिल गौरव पुरस्कारार्थी (संक्षिप्त)

लष्करी पुरस्कारार्थी :
लेफ्टनंट जनरल (नि.) मोती धर, लेफ्टनंट जनरल (नि.) रवी दस्ताने, लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निम्भोरकर, लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर, कर्नल (नि.) ललित राय, कर्नल वेम्बू शंकर (शौर्यचक्र), विंग कमांडर (नि.) अशोक कुमार सराफ.

नागरी पुरस्कारार्थी :
नितीन गोखले, सोनम वांगचुक, वीणा पाटील, डॉ. अमित वांचू, राजेश पांडे, शमशेर हलका पूंछी, काचो अहमद खान, डॉ. प्रतापसिंह जाधव, शहनवाझ शाह, डॉ. अली इराणी, पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, शोभा कपूर, इमरान शेख, उमा कुनाल गोसावी, मोहम्मद अमीन (गलवान).

संस्था :
सकाळ रिलिफ फंड, एबीपी न्यूज, होप हॉस्पिटल, पुणे.

भारताचे सीमावर्ती भागांसोबत सरहद पुणे ची बांधिलकी

कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन, सरहद शौर्याथॉन, सीमावर्ती गाव विकास उपक्रम, संघर्षग्रस्त भागांतील मुलांचे शिक्षण आणि सांस्कृतिक दस्तऐवजीकरण अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून सरहद संस्था राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या केवळ संरक्षणापुरती मर्यादित न ठेवता, ती मानवी सहवेदना, संधी आणि समावेशनावर आधारित असल्याचे सातत्याने अधोरेखित करत आहे.

लडाख फेस्टिव्हल आणि कारगिल गौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२५ हे शौर्याचा सन्मान, संस्कृतीचा उत्सव आणि सीमावर्ती समाजाशी असलेल्या भारताच्या अतूट नात्याची सामूहिक अभिव्यक्ती आहेत.

“वाहनांतील पॅनिक बटण आणि प्रवासी भाडे तत्व वाहनांच्या सुरक्षितता प्रणालीची परिणामकारता तपासा; त्रुटी दूर करा — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”

0

नागपूर, दि. १२ डिसेंबर २०२५ : महिलांच्या सुरक्षिततेसाठी बस, कॅब, टॅक्सी आदी वाहनांत बसविण्यात आलेल्या पॅनिक बटण प्रणालीची राज्यभर परिणामकारता तपासून त्यातील सर्व त्रुटी दूर कराव्यात, असे स्पष्ट निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज झालेल्या बैठकीत दिले. प्रत्येक जिल्ह्यात या प्रणालीची नियमित तपासणी करण्यात यावी, तसेच तिची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यावर त्यांनी भर दिला.

राज्यात खासगीरित्या धावणाऱ्या टॅक्सी, कॅब आणि बसमधील आपत्कालीन बटण व्यवस्था अनेक ठिकाणी निष्क्रिय असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात संबंधित विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, वाहतूक पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, कॅब संघटनेचे प्रतिनिधी केशव क्षीरसागर आणि पत्रकार प्रवीण लोणकर यांसह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महिलांच्या आपत्कालीन प्रसंगी त्वरित मदतीसाठी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष परिणाम अपेक्षित प्रमाणात दिसत नाही, असे निरीक्षण डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. त्यामुळे प्रणालीतील सर्व त्रुटी तातडीने दूर करणे, जनजागृती वाढविणे आणि नागरिकांना या सुविधेबाबत माहिती करून देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात दररोज किमान पंधरा तपासण्या करून लाईव्ह ट्रॅकिंगच्या आधारे दुरुस्तीची कारवाई करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

या यंत्रणेबाबत व्यापक जनजागृती व्हावी म्हणून वाहनांत प्रणाली बसविलेल्या ठिकाणी स्पष्ट सूचना लावणे, माहितीपत्रके, जाहिराती आणि विविध माध्यमांतून प्रचार करणे गरजेचे असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही कार्यान्वित करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

राज्यात एकूण एक लक्ष चाळीस हजार पाचशे नव्वद (१,४०,५९९) वाहनांमध्ये पॅनिक बटण प्रणाली बसविण्यात आली असून त्यापैकी एक लक्ष एक हजार शहाऐंशी (१,०१,०८६) वाहनांत ही प्रणाली प्रत्यक्षात कार्यरत आहे. उर्वरित वाहनांत यंत्रणा कार्यरत नसल्याचे किंवा मशिन सदोष असल्याचे आढळले आहे. दोष आढळल्यावर संबंधित वाहनचालकांना सूचना देऊन आवश्यक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती परिवहन आयुक्त श्री. भीमनवार यांनी दिली.

मुंबईतील कमांड अँड कंट्रोल सेंटरला आजवर पॅनिक बटण प्रणालीद्वारे सहा लक्ष तीस हजार दोनशे पंचावन्न (६,३०,२५५) अलर्ट प्राप्त झाले आहेत. प्राप्त तक्रारींवर तत्काळ कार्यवाही होऊन वाहनमालकाला सूचना पाठविली जाते आणि प्रतिसाद नसल्यास ‘११२’ वर माहिती देण्यात येते. फिटनेस प्रमाणपत्रासाठी वाहनांची तपासणी होताना पॅनिक बटण प्रणाली बसविणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

लिफ्टचे अपघात टाळण्यासाठीनवीन नियम लागू करा-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

पुणे : हौसिंग सोसायटीतील इमारतींमधील लिफ्टचे अपघात टाळण्यासाठी नवीन कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज विधानसभेत बोलताना केली.

हौसिंग सोसायटीमधील लिफ्टच्या सुरक्षा आणि देखभालीसाठी शासनाने ठरवलेले सध्याचे नियम हे १९५८ च्या लिफ्ट सुरक्षा धोरणाप्रमाणे निश्चित केलेले आहेत. हे नियम जुने झाले असून त्या मध्ये शासनाने बदल करणे अतिशय गरजेचे आहे, असे आमदार शिरोळे यांनी बोलताना सांगितले. चिंचवडमध्ये एका १२ वर्षाच्या मुलाचा लिफ्टच्या अपघातात मृत्यू झाला. या गंभीर घटनेकडे लक्ष वेधून आमदार शिरोळे यांनी या मागण्या मांडल्या.

१९५८ च्या जुन्या नियमांमध्ये लिफ्टच्या बिघाड किंवा अपघातांच्या बाबतीत स्पष्टता दिसत नाही.
या कालबाह्य नियमांनुसार लिफ्टची आयुर्मर्यादा आणि सुरक्षितता निश्चित करणे शक्य झालेले नाही, ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो. या मुद्द्याकडे शिरोळे यांनी लक्ष वेधले.

२०१७ मध्ये महाराष्ट्र लिफ्ट ॲंड मुव्हिंग वॉकवेज ॲक्ट २०१७ हा सरकार ने पास केला. त्याची अंमलबजावणी झाली नाही. यात काही बदल करण्यात येत आहेत.

नवीन पॉलिसी प्रमाणे लिफ्टमध्ये ब्रेक डाऊन किंवा अपघात नोंदवण्यासाठी मेमरी डिव्हायसेस बंधनकारक रहातील, अशी तरतूद आहे. पण, धोरणाची अंमलबजावणी होण्यासाठी विलंब झाल्यामुळे
आधुनिक सुरक्षा नियम लागू होत नाहीत. याकरिता नवीन नियमांना अंतिम स्वरूप देऊन ते तातडीने लागू करावेत. इमारतींमध्ये रहाणाऱ्या सर्वच रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे आहे, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सभागृहात बोलताना सांगितले.

“गोपीनाथराव मुंडे साहेब” संवेदनशील, कार्यकर्त्यांची जाण असणारे लोकनेते – संदीप खर्डेकर.

0

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे मुंडे साहेबांच्या ७६ व्या जयंती निमित्त लोकोपयोगी साहित्य वाटप.

पुणे- गोपीनाथराव मुंडे साहेब हे अत्यंत संवेदनशील व कर्यकर्त्यांची जाण असलेले महाराष्ट्राचे लोकनेते होते, त्यांच्या अकाली जाण्याने असंख्य कार्यकर्त्यांचे आणि राज्याचे अतोनात नुकसान झाले असे भाजपा चे प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले.
सामान्य नागरिकांच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र झटणारा नेता अशी त्यांची ओळख होती, त्यांचा जीवनप्रवास हा संघर्षाने भरलेला होता असेही खर्डेकर म्हणाले.

गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या ७६ शहात्तर व्या जयंती निमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने विविध संस्थांना लोकोपयोगी साहित्य भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, शनी मारुती मंदिराचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दीपक निकम, प्रभाग २९ च्या भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष संगीताताई आधवडे,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर,अलंकार दत्त मंदिराच्या प्रमुख विश्वस्त रजनी जोशीराव,चंद्रकांत भिसे,रंजिता आरेकर,अरविंद परांजपे,दिलीप शिवणेकर,हनुमंत कट्टीमणी,कानिफनाथ मित्र मंडळाचे गोकुळ काळे, प्रमोद काळे, अमित बारमुख, दीपक कदम,भजनी मंडळाच्या शितल म्हसकर,विद्या ननावरे,इंदुमती गोसावी,पुष्पा पाडेकर,सीमा जाधव,अर्चना ननावरे,शर्मिला जगताप,ममता भारती,मालती चिंचवडे,जिमन,सत्यभा मा बांदल, स्वाती साळुंके,मलिक्का पवार, अनिकेत काळे, बाब्या पेंढारे, संगीता साळुंके इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते खुर्च्या, सतरंजी, स्पीकर सेट व इतर साहित्य भेट देण्यात आले.
गोपीनाथ मुंडे साहेब यांनी राज्यभर भारतीय जनता पार्टीच्या कार्यविस्तारा साठी झोकून देऊन काम केले, सर्व पातळीवर संघर्ष केला आणि त्यामुळेच आज भाजपा ला सोनेरी दिवस बघायला मिळत आहेत असे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
“साहेबांनी” प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला व ते केवळ बहुजनांचे नव्हे तर सर्वच जाती धार्मियांचे नेते होते असे संदीप खर्डेकर म्हणाले.साहेबांच्या निधनाला इतकी वर्ष झाली तरी त्यांच्या आठवणी आणि अस्तित्व पुसलं जात नाहीये असे त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्व होते असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
त्यांच्या जयंती दिनी त्यांनी दाखविलेल्या मार्गाने आम्ही वाटचाल करत असून जास्तीतजास्त लोकांना मदत करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात आणखी वाढ होणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट

0

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात आणखी वाढ होणार आहे. विशेषत: मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, नांदेड आणि लातूर, विदर्भातील गोंदिया व नागपूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शीतलहरीचा फटका बसल्याने सकाळ–संध्याकाळ गारठा प्रचंड वाढला असून नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत आहेत. राज्यातील बहुतांश भागात दिवसा सूर्यप्रकाश दिसत असला तरी त्यात उबदारपणा कमी आहे. हवामान विभागाचा अंदाज स्पष्ट आहे, ही थंडी अजून काही काळ सोबत राहणार आहे.

मुंबई- उत्तर भारतातून येणाऱ्या तीव्र थंड वारा आता महाराष्ट्रात झंझावाती वेगाने प्रवेश करत असून, त्याचा परिणाम राज्यातील तापमानावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान सातत्याने खाली येत असून गुरुवारी रात्रीही राज्यातील अनेक शहरांचा पारा 10 अंशांच्या खाली सरकला. मुंबईचे किमान तापमान 15 अंशांवर तर पर्यटकांच्या आवडीचे माथेरान 17 अंशांवर नोंदले गेले. मात्र यापेक्षा तीव्र गारठा अहिल्यानगरमध्ये जाणवला, जिथे तापमान 6.6 अंशांवर पोहोचले. पुणे व नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक शहरांत पारा 7-8 अंशांदरम्यान स्थिरावला असून नागरिक अक्षरशः थरथरत आहेत. हवामान विभागाने याला पुढे आणखी तीव्रता येण्याचा इशारा दिला आहे.

अहिल्यानगरने सलग तिसऱ्या दिवशीही राज्यातील सर्वात थंड जिल्हा म्हणून नोंद कायम ठेवली आहे. 6.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाने येथील थंडीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही किमान तापमान सातत्याने घसरत आहे. अनेक ठिकाणी रात्रीचा पारा नेहमीच्या सरासरीपेक्षा 4 ते 6 अंशांनी कमी नोंदला जात आहे. हवामान विभागानुसार, उत्तर भारतात तयार झालेली थंड वाऱ्यांची लाट वेगाने दक्षिणेकडे सरकत असून याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. पुढील दोन दिवस राज्यभर गारठा अधिक प्रखर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गारांचा स्पर्श असलेल्या या थंडीत ग्रामीण, शहरी भागात रात्रीचे जीवन जणू थांबले आहे.

अनेक ठिकाणी एक अंकी पारा

गुरुवारी नोंदलेल्या किमान तापमानाच्या आकडेवारीत राज्यातील मोठ्या भागात शीतलहरीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. अहिल्यानगर 6.6, पुणे 7.9, जळगाव 7.0, मालेगाव 8.8, नाशिक 8.2, गोंदिया 8.0, नागपूर 8.1 अशी तापमान–नोंद झाली. महाबळेश्वर 11.1 आणि सांगली 12.3 अंशांवर नोंदले गेले. सोलापूर 13.2 तर कोल्हापूर 14.4 अंशांवर स्थिरावले. वर्धा 9.9, यवतमाळ 10, परभणी 10.4, अकोला 10.0 आणि अमरावती 10.2 अंश नोंदले गेल्याने विदर्भातही गारठा तीव्र असल्याचे दिसले. नाशिक जिल्ह्यातील निफामध्ये पारा थेट 6.1 अंशांवर घसरला, तर धुळे आणि अहमदनगरच्या काही भागांत तापमान 4 अंशांपर्यंत घसरण झाल्याची नोंद आहे. या परस्थितीमुळे मैदानी भागातही सर्वसामान्य नागरिकांनी रात्री घराबाहेर पडणे कमी केले आहे.

राज्यात ऑरेंज-यलो अलर्ट; ला निनो प्रभावामुळे थंडी वाढण्याची चिन्हे

राज्यातील वाढत्या थंडीमुळे हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड परिसरांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, गोंदिया, वर्धा अशा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरेकडील लहरींचा वेग वाढत असल्याने पुढील काही आठवड्यांत तापमानात आणखी मोठी घसरण होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ला निनो, या हवामान प्रक्रियेच्या प्रभावामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने राज्यासाठी सर्वाधिक थंड ठरण्याची शक्यता आहे. हवामान बदलाचा परिणाम राज्याच्या सर्व भागात स्पष्टपणे दिसत असून, शेतकरी आणि सर्वसामान्यांनी सावधगिरी बाळगावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

बिबट्या अखेर पुणे विमानतळावर पकडला….

पुणे-पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून वावर असलेला बिबट्या अखेर पकडण्यात आला आहे. पुणे वनविभाग, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय हवाई दल आणि विमानतळ प्राधिकरणाच्या संयुक्त पथकाने ही मोहीम यशस्वी केली.

हा बिबट्या सर्वप्रथम 28 एप्रिल 2025 रोजी कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसला होता. तेव्हापासून तो विमानतळाच्या भूमिगत बोगदे, दाट झुडपे आणि कमी वर्दळीच्या भागांतून फिरत होता. विमानतळाचा परिसर संवेदनशील आणि विस्तृत असल्याने त्याला पकडणे आव्हानात्मक ठरले होते. अनेक महिने कॅमेरा ट्रॅप, लाइव्ह कॅमेरे आणि पिंजरे लावूनही तो सापळ्यात अडकला नव्हता.4 डिसेंबर रोजी बिबट्या पुन्हा भूमिगत बोगद्यात शिरल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ सर्व बाहेर पडण्याचे मार्ग बंद करून अतिरिक्त कॅमेरे बसवण्यात आले. अखेर 11 डिसेंबर रोजी सुमारे 30 सदस्यांच्या पथकाने नियोजित मोहीम राबवली. बिबट्याला अंदाजे 80 फूट लांब बोगद्यात नियंत्रित करून वन्यजीव वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गौरव मंगला यांनी अरुंद जागेतून यशस्वीपणे डार्ट केले. बिबट्याने यापूर्वी दोन लाइव्ह कॅमेरेही नष्ट केले होते, तरीही पथकाने संयमाने काम करत मोहीम फत्ते केली. पकडलेला बिबट्या सध्या पूर्णपणे स्थिर असून, पुढील वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी बावधन येथील रेस्क्यूच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी या मोहिमेचे कौतुक करत, हे “सामंजस्य आणि सतत तयारीचे उत्तम उदाहरण” असल्याचे म्हटले. रेस्क्यूच्या नेहा पंचमिया यांनी सांगितले की, प्रत्येक प्राणी बचाव मोहीम वेगळी असते आणि त्यासाठी संयम व योग्य रणनीती आवश्यक असते. या यशस्वी मोहिमेमुळे पुणे विमानतळाची सुरक्षा पुन्हा पूर्णपणे सुनिश्चित झाली असून, मानव-वन्यजीव संघर्ष हाताळण्यात भारतीय यंत्रणांची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन:वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0

लातूर-देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे दुःखद निधन झालं आहे. आज पहाटे(शुक्रवार, 12 डिसेंबर) अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते. राजकारणातील अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

राज्यासह देशाच्या राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून शिवराज पाटील चाकूरकर यांची ओळख होती. भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूरमध्ये झाला. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1967-69 या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले. 1980 मध्ये शिवराज पाटील यांनी राष्ट्रीय राजकारणात काम करण्यास सुरवात केली. 1980 मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले. त्यानंतर 1999 पर्यंत सलग सात वेळा त्यांनी निवडणूक जिंकत केंद्रीय राजकारणात आपला दबदबा निर्माण केला.

इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. 1991 ते 1996 या काळात त्यांनी लोकसभा अध्यक्षपद भूषवले. 2004 मध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतरही राज्यसभेतून गृहमंत्रिपद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या. 2004 ते 2008 या काळात त्यांनी केंद्रात गृहमंत्रिपद भूषवले. 2008 मध्ये 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या व्यापक टीकेनंतर शिवराज पाटील यांनी 30 नोव्हेंबर 2008 रोजी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या पश्चात मुलगा शैलेष पाटील चाकूरकर सुन अर्चना पाटील चाकूरकर आणि नातवंडे असा परिवार आहे. आज लातूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

गुन्हा सिद्ध झाला तर गुन्हेगार … तोवर त्याला आम्ही करू शकतो उमेदवार, कारण निवडून येण्याची क्षमता हाच निकष असणार

पुणे- सगळेच राजकीय पक्ष ना कोणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहणार आहेत ना कुणाचे सामाजिक दायित्व , ना कुणाचे देशप्रेम ते फक्त निवडून येण्याची क्षमता हाच एक निकष पाळून प्रभाग प्रभागात उमेदवारी देणार आहेत हे आजवरच्या अनेक निवडणुकांतून दिसून आले आहे . हेच या निवडणुकीत देखील होणार आहेच . अगदी याच पार्श्वभूमीवर गुन्हा सिद्ध झाला तर गुन्हेगार … तोवर त्याला आम्ही करू शकतो उमेदवार अशी भूमिका आता माध्यमांतून आणि पोलीस रेकॉर्ड मधून ज्या आंदेकरांचे नाव कुख्यात गुंड म्हणून घेतले जाते त्यांच्याबाबत देखील काही पक्षांनी घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासंदर्भात अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचं वक्तव्य मोठे सूचक मानले जाते आहे.
पुणे : पुण्यात काही महिन्यांपूर्वी गणेशोत्सवाच्या काळात टोळी युद्धाचा भडका उडालेला बघायला मिळाला होता. बंडू आंदेकर याने स्वत:च्या नातवाचा खून घडवून आणल्याचा आरोप आहे. या प्रकरणात बंडू आंदेकर जेलमध्ये आहे. तसेच त्याचे इतर कुटुंबिय देखील न्यायालयीन कोठडीत आहेत. पण आता आगामी काळात पुणे महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी जेलमध्ये असलेल्या आंदेकर कुटुंबियांनी निवडणुकीसाठी कोर्टाची परवानगी मिळवली आहे. पुण्याच्या विशेष मकोका न्यायालयाने आंदेकर कुटुंबियांना निवडणूक लढण्यासाठी मंजुरी दिल्याची बातमी काल समोर आली होती. यानंतर बंडू आंदेकर वगळता त्याची भावजयी माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सून तथा दिवंगत माजी नगरसेवक वनराज आंदेकरची पत्नी सोनाली आंदेकर या दोघींना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी सकारात्मक असल्याची चर्चा आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षांच्या वक्तव्यावरुनच संबंधित चर्चांना उधाण आलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “बंडू आंदेकर यांच्या व्यतिरिक्त आंदेकर कुटुंबातील इतर कोणत्या व्यक्तीने आमच्याकडे उमेदवारी मागितल्यास आम्ही त्यावर विचार करून निर्णय घेऊ”, असं सुभाष जगताप यांनी सांगितलं.
“बंडू आंदेकर यांना उमेदवारी देणार नाही, यावर आम्ही ठाम आहोत. मात्र त्या व्यतिरिक्त आंदेकर कुटुंबातील कोणतीही व्यक्ती उमेदवारी मागण्यास आली तर यावर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. त्यांना उमेदवारी देणार नाही, असं ठाम सांगू शकत नाही . कारण 2017 ते 2022 या टर्ममध्ये वनराज आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी नगरसेवक म्हणून अत्यंत चांगलं काम केलेलं आहे”, असं सुभाष जगताप म्हणाले आहेत.

“गेल्या 30 वर्षापासून आंदेकर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, असे आपण वाचत आहोत. मात्र तसं असताना सुद्धा त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत”, असं देखील सुभाष जगताप म्हणाले आहेत.
दरम्यान, “लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर, बंडू आंदेकर हे निवडणूक लढणार आहेत. त्याबाबतचा अर्ज आम्ही कोर्टासमोर मांडला होता तो कोर्टाने मान्य केला आहे. कोणत्या पक्षातून आणि कुठून निवडणूक लढवायची हे आता आंदेकर ठरवणार आहे. तसेच लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांच्या जामीनासाठी सुद्धा न्यायालयामध्ये अर्ज केला आहे. दरम्यान आंदेकर अपक्ष लढले आणि निवडून आले तर त्यांचा पाठींबा अर्थात जे सत्तेवर येतील त्यांना मिळणार आहे असेही मानले जाते आहे.

गेल्या 9 महिन्यांत 781 शेतकऱ्यांनी संपवले जीवन

0

नागपूर – राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा गंभीर प्रश्न विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला. जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्यात एकूण ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे, ही बाब मदत व पुनर्वसन विभागाने अंशतः खरी असल्याचे मान्य केले. आमदार सुधाकर आंबले, सचिन अहिर यांच्यासह अनेक आमदारांनी एकत्रितपणे या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

त्यांनी नमूद केले की, सावकारी कर्ज, बँकेचे कर्ज, नापिकी आणि अतिवृष्टीमुळे या नऊ महिन्यांत ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात विदर्भातील नागपूर विभागात २९६ आणि मराठवाडा विभागात २१२ आत्महत्या झाल्या. राष्ट्रीय गुन्हे अहवाल २०२३ नुसार, देशात झालेल्या दर दोन शेतकरी आत्महत्यांपैकी सरासरी एक आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. ही चिंताजनक आकडेवारीही आमदारांनी सभागृहात सादर केली. मदत व पुनर्वसन मंत्री मिरांद जाधव (पाटील) यांनी या प्रश्नावर लेखी उत्तर दिले. नऊ महिन्यांतील ७८१ आत्महत्या आणि एनसीआरबीचा अहवाल “अंशतः खरा आहे’ असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत ७५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांना दिली मंजुरी

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यावर भर देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली. विधानसभेत ७५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या बहुमताने मंजूर करण्यात आल्या. पुरवणी मागण्यांवरील चर्चा पूर्ण झाल्यानंतर अजित पवार बोलत होते.

डिसेंबर २०२५ मध्ये २८६ कोटी पुरवणी मागण्या प्रस्तावित केल्या. यात पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५ हजार कोटी, मुख्यमंत्री बळीराजा ९ हजार कोटी, नाशिक कुंभमेळा ३ हजार कोटी, महात्मा फुले योजनेत ९०० कोटींची तरतूद केली. केंद्राकडून पन्नास वर्षांच्या परतफेडीने ५,६०० कोटींचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. त्यासाठी तरतूद करणार आहे. डिसेंबरमध्ये ७५ हजार कोटींचा आकडा यापूर्वी कधी आलेला नव्हता हे खरे आहे. पहिले ३३ हजार आणि नंतर ११ हजार असे एकूण ४४ हजार कोटी दिले. त्यामुळे आकडा फुगलेला आहे.

मुं

गुटखा विक्री करणा-या हडपसरच्या पती व पत्नीवर गुन्हा दाखल

पुणे- सरार्स गुटखा विक्री करून माया कमाविणाऱ्या हडपसर येथील एका दाम्पत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . या प्रकाराने गल्लोगल्ली ,रस्तोरस्ती चालणाऱ्या पानाच्या टपऱ्या जिथे गुटखा विक्री होते त्या आता केंद्रस्थानी येऊ लागल्याचे दिसते आहे.

दरम्यान या प्रकारची माहिती देताना पोलिसांनी सांगितले कि,’वानवडी पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. उमाकांत महाडिक व पोलीस अंमलदार असे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, बारामती चिकन अॅग्रो चिकन शॉपच्या गल्लीत, रामनगर, छोटी मस्जिदजवळ, रामटेकडी, हडपसर, पुणे येथील घरात इसम नामे गुलफाम अन्सारी व त्याची पत्नी नुरजहाँ गुलफाम अन्सारी हे वेगवेगळ्या कंपनीचा पान मसाला, गुटखा त्यामध्ये मिश्रीत करण्याची तंबाखुजन्य पदार्थ त्यास शासनाने प्रतिबंधित केले असताना देखील व त्याच्या सेवनाने आरोग्याच्या दृष्टीने घातक तसेच मुखाचे कर्करोग व इतर विकार होवुन शारीरीक हानी होते हे माहित असतांनाही विक्री करीत आहेत. सदर बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावून आजूबाजूला पाहिले असता वर नमूद पती व पत्नी वेगवेगळ्या कंपनीचा पान मसाला, गुटखा त्यामध्ये मिश्रीत करण्याची तंबाखुजन्य पदार्थ त्यास शासनाने प्रतिबंधीत केले असताना देखील विक्री करीत होते. सदर रूमची झडती घेतली असता त्यांचे रूममध्ये प्रतिबंधित पान मसाला व तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण १,६२,१८४/-रू. कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर नमुद इसम गुलफाम अन्सारी वय-४५ वर्ष रामनगर, छोटी मजिदजवळ, रामटेकडी, हडपसर, पुणे व त्याची पत्नी नुरजहाँ गुलफाम अन्सारी, वय ४० वर्षे, रा. सदर यांचे विरुध्द वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४९९/२०२५ भा.न्या.सं.क १२३,२२३,२७४,२७५ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा व वितरण यांचे विनीमय) अधिनियम कलम ७ (२) व २० (२) अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६, चे कलम २६ (२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग नम्रता देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस स्टेशन भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वानवडी विजयकुमार डोके यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख तसेच पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, आशिष कांबळे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, बालाजी वाघमारे व महिला पोलीस अंमलदार चैत्राली यादव या पथकाने केली आहे.