Home Blog Page 2986

अरेरे ..कर्णबधिर आंदोलकांवर लाठीचार्ज-पुण्यात घडले लाजिरवाणे कृत्य ..(व्हिडीओ)

0

पुणे-विविध मागण्यांसाठी पुणे येथील समाजकल्याण आयुक्तालयावर मोर्चा घेऊन आलेल्या कर्णबधिरांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या लाठीचार्जमध्ये काही कर्णबधीर विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता.

पोलिसांच्या लाठीचार्जमुळे संतापलेल्या कर्णबधीर आंदोलकांनी आक्रमक धोरण स्वीकारले असून सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

आम्ही शांततेत मोर्चा काढत होतो. पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी आता आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहेत. अजूनही आयुक्तालयासमोर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी आहे. पोलिसांनी लाठीचार्ज झाला नसल्याचे म्हटले आहे. आम्ही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात प्रयत्न केला. पण ते काय सांगत आहेत, ते आम्हाला कळत नव्हते आणि आम्ही काय सांगतोय ते त्यांना समजत नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे..

१)शेख शकील शेख साबीर, (वय-३१,रा.दर्गा मोहल्‍ला, वसमत)
२) प्रशांत धुमाळे (वय २४, रा. देगलूर, नांदेड)
३) सिद्धनाथ लष्करे (वय २३, रा. लातूर)
४) कोंडिबा खरात (वय ३४, मानखुर्द, मुंबई)
५) किरण राजपूत (वय ४२, रा. नवापूर, नंदूरबार)
६) दिलीप गट (वय ३०, रा. पारनेर, अहमदनगर)
७) प्रमोद सुर्वे (वय ४०, रा. शिरगाव, सांगली)
८) हनिफ खारियत (वय ३२, दोंडाईचा, धुळे)
९) अमित कुमार सिंह (वय २९, देहूरोड, पुणे)
१०) बाबू शेख (वय ५२, रा. देहूरोड, गांधीनगर)
११) नागेश भंडारे (वय ३४, रा. मालेगाव)
१२) कृष्णा शिवाजी कदम (वय १९)

नांगरे पाटील,तेजस्वी सातपुतेसह राज्यातील 18 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0

मुंबई- पुण्याच्या वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासह राज्यातील 18 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकार्‍यांना मंत्रालयातून बदलीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आल्याचे समजते.

बदली झालेल्या अधिकार्‍यांमध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांचाही समावेश आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे नाशिक पोलिस आयुक्तपदीची नवी जबाबदारी देण्यात आली आहे. नांगरे पाटील यांच्याजागी मुंबई दहशवादी विरोधी पथकातील पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांची कोल्हापूर विशेष पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, नाशिकचे आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंघल यांची औरंगाबादला बदली करण्यात आली आहे.

या अधिकार्‍यांना मिळाले बदलीचे आदेश..
– तेजस्वी सातपुते (पोलिस उपायुक्त, पुणे शहर ते पोलिस अधीक्षक, सातारा)
– दत्ता शिंदे (पोलिस अधीक्षक, जळगाव ते पोलिस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई)

– इशू सिंधू (निवासी उपायुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली ते पोलिस अधीक्षक, अहमदनगर)

– रंजनकुमार शर्मा (पोलिस अधीक्षक, अहमदनगर ते पोलिस अधीक्षक, CID, नागपूर)

– पी. व्ही. उगले (SP, ACB, नाशिक ते पोलिस अधीक्षक जळगाव)

– विनिता साहू (पोलिस अधीक्षक, भंडारा ते पोलिस अधीक्षक, गोंदिया)

– हरिष बैजल (पोलिस अधीक्षक, गोंदिया ते समदेशक, SRPF, गट क्रमांक 6, धुळे)

– अरविंद साळवे (पोलिस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई ते पोलिस अधीक्षक, भंडारा)

– जयंत मीना (अप्पर पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण ते अप्पर पोलिस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण)

– पंकज देशमुख (पोलिस अधीक्षक, सातारा ते, पोलिस उपायुक्त, पुणे शहर)

 

गोवा टुरिमझतर्फे अश्वेम समुद्रकिनारा विकास, पार्किंग सुविधांचे उद्घाटन

0

मँड्रेम– गोवा टुरिझमच्या कोस्टल सर्किट विकास प्रकल्पाअंतर्गत मँड्रेममधील प्रसिद्ध अश्वेम समुद्रकिनारा त्याला देण्यात आलेल्या नव्या रुपामुळे प्रकाशझोतात आला आहे.पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांनी आज अश्वेम समुद्रकिनाऱ्यावर करण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन केले. यावेळेस माननीय अध्यक्ष दयानंद सोपटे,  प्रदीप हडफडकर, सरपंच व्ही. पी. मँड्रेम, डेनिस ब्रिट्टो, उपसरपंच व्ही. पी. मँड्रेम, व्ही. पी. पंच सदस्य, गोवा टुरिझमचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्य विकासकाम हे १४४४ चौरस मीटर्स जागेवर उभारण्यात आलेल्या पार्किंग सुविधेसाठी २.२६ कोटी रुपये खर्चून करण्यात आले आहे. या परिसराचा विकास करण्यात आला असून आता त्यात ५० दुचाकी आणि अंदाजे १५ चारचाकी गाड्यांना पार्किंग सुविधा, एसटीपीसह टॉयलेट, लँडस्केपिंग, प्रकाशयोजना, सुरक्षा भिंत आणि सुरक्षा केबिन तसेच सीसीटीव्ही सुविधेचा समावेश करण्यात आला आहे.

कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग कॉलेजने पटकावली  अलॅक्रिटीची चॅम्पियनशीप.

0
पुणे-ए.आय.एस.एस.एम.एस.आय.ओ.आय.टीमहाविद्यालयात सांस्कृतिक,तांत्रिक आणि क्रीडा अश्या विविध स्पर्धांचा संगम असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील  इव्हेंट  “अलॅक्रिटी” ची  आज सांगता झाली.ह्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बीएमसी सॉफ्टवेअर,इंडिया  चे प्रमुख कार्यकारी अधिकारी  तरुण शर्मा हे उपस्थित होते .  आपल्या भाषणातून त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात येणाऱ्या आव्हानांना  सामोरे जाण्यासाठी नवनिर्मितीचा मार्ग अवलंबवण्याविषयी मार्गदर्शन केले.. ह्या “अलॅक्रिटी”चे प्रमुख आकर्षण ठरली ती मराठी  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी .विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी  “पी” च्या त्रिसूत्री बद्दल  म्हणजे पेशन्स,पॅशन्,प्रॅक्टिसवर भर दिला. सोनाली कुलकर्णी यांच्या उत्स्फूर्त संवादाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या  राष्ट्रस्तरीय फेस्टमध्ये   १९ ते २२ फेब्रुवारी २०१९ दरम्यान ६० हून अधिक स्पर्धां झाल्या ,ह्याच दिवशी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व अलॅक्रिटीतील विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.अलक्रिटी ची  चॅम्पियनशीप हयावर्षी कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिरिंग  ने पटकावली .ह्या  भव्य कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या संस्थेचे सचिव श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती यांनी प्रोत्साहन दिले. यावेळी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या संस्थेचे  सह सचिव सुरेश प्रताप शिंदे ,खजिनदार अजय पाटील,नियमन मंडळाचे सदस्य भगवानराव साळुंखे  व निखिल खणसे व श्रीकांत मोझे हे उपस्थित होते. महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलनातील  सांस्कृतिक कार्यक्रमाचाही विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला.  अलॅक्रिटीचे हे १० वे  वर्ष असून  यामध्ये केवळ इंजिनीरिंगचेच नाही तर कला,वाणिज्य,विज्ञान,एम.बी.ए,फार्मसी,विधी अश्या पुणे आणि शहराबाहेरील १२० हून अधिक महाविद्यालयातून स्पर्धक सहभागी झाले.या फेस्टीव्हलसाठी  प्राचार्य डॉ.पी.बी.माने  यांचे मार्गदर्शन लाभले.या फेस्टीव्हलचे देवेंद्र इटोळे,कुणाल रणवीर,विकास देसाई हे समन्वयक होते. “अलॅक्रिटी” कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी  सरचिटणीस ऋतुराज बोकील  याने केले.

संकलनासाठी प्रभागात कायमस्वरूपी ई वेस्ट बकेट ची सोय करणार – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर.

0
पुणे-ई कचरा संकलन आणि त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे हे अत्यावश्यक असून ई वेस्ट चा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे यासाठी मी प्रभाग १३ मधील सर्व प्रमुख वस्ती व सोसायटी भागात कायमस्वरूपी ई कचरा संकलनासाठी बकेटस ची व्यवस्था करत असून नागरिकांनी त्यात आपल्या कडील ई कचरा साठवावा असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.त्याचे नियमित पणे संकलन करुन शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारली असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्यांच्या पुढाकाराने आयोजित ई कचरा संकलन मोहीमेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सौ मंजुश्री खर्डेकर बोलत होत्या. पुणे महानगरपालिकेचे कर्वेनगर वारजे क्षेत्रीय कार्यालय,क्रिएटिव्ह फौंडेशन,श्री रिसायकलर्स आणि कमींस इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित अभियानात ३०० किलो ई कचरा संकलन करण्यात आले.यावेळी क्रिएटिव्ह फौंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,श्री रिसायकलर्स चे श्री. विनीत बियाणी,वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री गणेश खिरीड,आरोग्य निरीक्षक फकीर शेख,राहुल शेळके व किरण गुरव इ उपस्थित होते.
प्रभाग १३ मधील स्वप्नशिल्प सोसायटी,तारा टॉवर्स,आनंद रेसीडेंसी,पॅलॅडियम,चिंतामणी हेवन,पिनाक फेज १ व फेज २,अर्चनानगर,करिष्मा सोसायटी येथे आज हे अभियान राबविण्यात आले.
संयोजन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले तर सूत्रसंचालन व नियोजन डी एस आय खिरीड यांनी केले.

फ़ॅशन शोमध्ये सूर्यदत्ताच्या विद्यार्थ्यांच्या इनोव्हेटिव्ह कॉस्च्युम डिझाइन्सचे सादरीकरण

0
पुणे : सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेकनॉलॉजीतर्फे आयोजित ‘ल क्लासे’ फ़ॅशन शो नुकताच पार पडला. विद्यार्थ्यांनी बनवलेली आकर्षक आणि कलात्मक डिझाइन्स आणि मॉडेल्सनी केलेले त्याचे मनमोहक सादरीकरण यामुळे ‘ल क्लासे’ फ़ॅशन शोने उपस्थितांची मने जिंकली. फॅशन शोचे हे आठवे वर्ष होते. फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वैविध्यपूर्ण डिझाईन्स आणि त्यांच्या कलेचे सादरीकरण व्हावे, या उद्देशाने हा फॅशन शो आयोजिला जातो. यावेळी अभिनेत्री दिगंगना सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोषाखांचे डिझाईन्स कौतुकास्पद असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून आयोजिला जाणारा हा फ़ॅशन शो विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट डिझाईनर शोधण्यासाठी उपयुक्त आहे. व्यावसायिक स्वरुपाच्या फॅशन शोप्रमाणे त्याचे आयोजन केले होते. फॅशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कपड्यांच्या, दागिन्यांच्या डिझाईन्स परिधान करुन अनेक प्रसिद्ध मॉडेल्सनी रॅम्प वॉक केला. यंदा विद्यार्थ्यांनी ‘न्यू स्टाईल इनोव्हेशन’ या संकल्पनेवर काम केले होते. द रेज ऑफ रॅफल्स, ड्रॅमॅटिक डिझास्टर, मिस्ट्रीयस क्रिएशन्स, द आफ्रिकन वार्डरोब, द इरा ऑफ १९४५, ग्लोरी गर्ल्स, ऍक्वाटिक ड्रीम्स, द डेनिम हँगओव्हर, बंजारा- द वन्डरिंग सोल्स या नऊ संकल्पनांवर हे सादरीकरण झाले.
संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये झालेल्या या शोवेळी अभिनेत्री दिगंगना सुर्यवंशी, बँकर सुरी शांडिलिया, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सिद्धांत चोरडिया, सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्रमुख आणि फ़ॅशन शोच्या समन्वयिका प्रा. रेणुका घोसपूरकर आदी उपस्थित होते. फ़ॅशन डिझाईनर संदेश नवलाखा, शलाका घैसास आणि गीता कस्तुरी यांनी ज्युरी म्हणून काम पहिले. ‘ड्रॅमॅटिक डिझास्टर’ला प्रथम क्रमांकाचे, तर ‘डेंनीम हँगओव्हर’ला द्वितीय क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचे पारितोषिक मिळाले.
द रेज ऑफ रॅफल्समध्ये प्राजक्ता शिंदे, बरखा सिंग, अखिशा विभुते, ड्रॅमॅटिक डिझास्टरमध्ये प्रियांका मंत्री व निकिता सातव, मिस्ट्रीयस क्रिएशन्समध्ये मित्तल बारवाडिया, निकिता वोरा, निकिता साळुंके, प्रतीक्षा पाटील, संतोष शहा, लावीना अनवाडिया, द आफ्रिकन वार्डरोबमध्ये राही मोहिते, श्रुती अगरवाल, मयुरी टेकाळे, द इरा ऑफ १९४५ मध्ये कीर्ती भोपे, सिमरन चंकेश्वरा, कोमल घोडके, ग्लोरी गर्ल्समध्ये दीक्षिता बोकाडिया, तृप्ती वलसलवार, सुकन्या म्हात्रे, ऍक्वाटिक ड्रीम्समध्ये रुपाली भोगल, देवश्री वलसलवार, सोनाली कराड, द डेनिम हँगओव्हरमध्ये अपूर्वा दोषी, स्नेहा नायर, रेणुका नेटके, बंजारा- द वन्डरिंग सोल्समध्ये प्रतीक्षा गवळी, सदिच्छा राऊत,स्वप्नाली देशपांडे यांनी कास्च्युमचे डिझाइन्स केले होते.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थी जे शिकतात, अनुभवतात, त्याचे प्रत्यक्ष सादरीकरण करून त्यांना प्रोत्साहित करावे, हा या फ़ॅशन शोच्या आयोजनामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आभूषणांच्या, कपड्यांच्या डिझाइन्सचे दर्शन व्यावसायिक मॉडेल्स घडवितात. यातून डिझाईनर्सना अनेक संधी उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या क्षेत्रात चांगले करिअर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
प्रा. घोसपुरकर म्हणाल्या, “आदिवासी, आफ्रिकन आणि बंजारा संस्कृतीवर विद्यार्थ्यांनी भर दिला आहे. त्यासाठी डेनिम, कॅनकॅन फॅब्रिक, खण फॅब्रिक अशा प्रकारांचा यात वापर केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर फ़ॅशन क्षेत्रात होत असलेले बदल आणि ट्रेंड्सही या निमित्ताने विद्यार्थ्यांना समजतात.” नुपूर पिट्टी यांनी फ़ॅशन शोचे निवेदन केले. 

अग्निशमन दलाच्या पहिल्या प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन

0
पुणे- चांदणी चौकाजवळ अग्निशामक  केंद्राबरोबर अग्निशमनचे काम करणाऱ्या जवानांना प्रशिक्षण देणारे पहिले केंद्र सव्वा दोन कोटी रुपये खर्च करून उभारले जाते असून काल या केंद्राच्या इमारतीच्या आणि संपूर्ण प्रकल्पाच्या कामाचे  भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे केले.यावेळी या केंद्राबाबत आणि प्रशिक्षण केंद्राबद्दल ची माहिती ,या कामासाठी पुढाकार घेणारे नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून  दिली . पालक मंत्री ,तसेच महापौर मुक्ता टिळक ,आमदार भीमराव तापकीर,नगरसेवक अल्पना वर्पे,श्रद्धा प्रभुणे ,किरण दगडे पा. मुरलीधर मोहोळ आणि आयोजक वेडे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सुमारे दीड एकर जागेत हा प्रकल्प येथे होत असून ,हि जागा उपलब्धी साठी २ वर्षाचा अवधी लागला. गेल्यावर्षी याकामासाठी अवघ्या १ लाख ६५ हजाराचे टेंडर काढण्यात आले नंतर ते रद्द करण्यात आले . अखेर या वर्षी भरीव तरतूद करण्यात आली .अग्निशमनाचे काम करणाऱ्या ५ गाड्यांचे येथे केंद्र असेल आणि २लाख ६५ हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी येथे उभारली जाईल . या शिवाय प्रशिक्षण केंद्र , गाड्या दुरुस्ती केंद्र , व्यायाम शाळा ,स्टोर रूम,निवास आणि भोजन व्यवस्था यांचा समावेश या प्रकल्पात असेल दीड एकर जागेत अवघा १७ टक्के चटइ क्षेत्र बांधकामासाठी वापरून ते उभारले जाईल .अशी माहिती यावेळी दिलीप वेडे पाटील यांनी दिली .

समाजप्रबोधनासाठी साहित्यिकांनी क्रांतिकारक व्हावे-निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत

0
सातव्या सम्यक साहित्य संमेलनाचा समारोप
पुणे : “सध्याची परिस्थिती बदलण्यासाठी समाजप्रबोधन होणे गरजेचे असून, ते प्रबोधन करण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. ही जबाबदारी पार पाडताना साहित्यिकानीं क्रांतिकारक व्हायला हवे. समाजात बदल घडवायला हवेत. शब्द, शास्त्र वापरून समतेवर, बंधुत्वावर आधारलेला संविधानिक समाज निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. केवळ माणुसकीच्या निकषावर तपासून जगणार धर्म आणायचा आहे. तरच आपण आणि जगही वाचेल,” असे मत माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी सावंत बोलत होते. संविधाननगरी, बालगंधर्व रंगमंदिरात गंगाधर पानतावणे विचारमंचावर झालेल्या या कार्यक्रमावेळी संमेलनाध्यक्ष जी. के. ऐनापुरे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, प्रकाशक प्रा. विलास वाघ, डॉ. अनिल सपकाळ प्रमुख संयोजक परशुराम वाडेकर, डॉ. विजय खरे, प्रा किरण सुरवसे, दीपक म्हस्के, अमरनाथ सिंग, धर्मराज निमसरकर, संजय सोनवणी आदी उपस्थित होते.
पी. बी. सावंत म्हणाले, “समाजाची मानसिकता शेकडो वर्षे निरनिराळ्या विषाने भरली आहे. जातीअंधता, धर्मांधता, गुलामगिरी या सर्वांच्या मुळाशी स्वार्थ, असहिष्णूता, द्वेष अशा विषाणूंची गर्दी आहे. साहित्यिक या विषाणूंचा नायनाट करू शकतील. पूर्वजांच्या चुकांची ओझी पुढे नेण्याची जबाबदारी नसली, तरी ते दुरुस्त करणे हे कर्तव्य आहे. त्यासाठी बंडखोर व्हावे लागेल, रोष स्वीकारावे लागेल. पण जे हे व्रत पळतील तेच हे कार्य करू शकतील. हे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे कार्य आहे. ते स्वीकारण्याची तयारी दाखवावी. मन जेवढं निर्भय, विशाल होत पण जेवढं संकुचित करू तेवढं संकुचित होता. त्याची मशागत आपणच करायला हवे. मन समृद्ध करायला हवे. म्हणजे जीवन प्रवास सुखकर आणि समृध्द होईल. सामाजिक, राजकीय सुधारक ही फक्त आपल्या जमातीचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम करतात. यामुळे देश व साहित्याचे नुकसान झाले. नवोदित लोक प्रस्तापितांचा आदर्श ठेऊन त्यांचेच अनुकरण करतात. ही मानसिक, बौद्धिक गुलामगिरी आहे, जागृती नाही. आता स्वतंत्र बुद्धीने विश्लेषण करून उपाय शोधायला हवे. तरच समाजाला जे मार्गदर्शन हवे ते मिळेल तरच क्रांती होऊ शकेल. साहित्यिकाला जागतिक परिस्थितीचेही निरीक्षण करायला हवे.”
“सध्याची राजवट संविधान मानत नाही, सपशेल विरोधी धोरण आहे. धर्मनिरपेक्षता ऐवजी मनुवाद हवा आहे. लोकशाही ऐवजी दडपशाही सुरू आहे. मनुवादी धर्माचा जो प्रचार उघड उघड सुरू आहे ते भयंकर आहे. संविधानाने सांगितलेला जो समाज आहे , तो निर्माण करण्याची आपण अनेक वर्षांपूर्वी प्रतिज्ञा केली पण त्याला सुरुवातच नाही. ८०% समस्या अर्थव्यवस्थेतून आहेत. हे बदलत नाही तोवर आपल्याला हवा असणारा समाज निर्माण होणार नाही. प्रत्येकाला जोवर त्याचे मूलभूत मानवी अधिकार मिळत नाही तोवर शांती नंदणार नाही. सगळे देशाची प्रगती पैशात मोजतात, पण कोणीही अस म्हणत नाही की मानवी हक्क देऊन मानव म्हणून सबळ करण्याने देश मोठा करू. मानवमुल्य केंद्र ठेऊन प्रगतीची व्याख्या केले जात नाही हे दुर्दैव आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
ऐनापुरे म्हणाले, “स्पष्टपणे बोलण्याची आवश्यकता आहे. देशाच्या सध्या परिस्थिती ने काहूर माजले आहे. कधी नव्हती तेवढी अशांतता आहे. आता संविधानाची जास्त गरज आहे. भारतीय तत्वज्ञानात विषमतेचे समर्थन आहे. हेच वैशिष्ट्य आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शेवट केला. आता त्याला शह देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. हीच चिंतेची बाब आहे. आपल्याला आता नव्याने हा लढा उभा करण्याची वेळ आली असून धोकादायक परिस्थिती कशी दूर करायची हा प्रश्न आहे. ईश्वर, पाप, पुण्य, आत्मा आशा अनेक काल्पनिक गोष्टी उभी करून सर्वसामान्य माणसाला गुंतवून ठेवले आहे. आशा परिस्थितीत आशा संमेलनाची आवश्यकता आहे. जुनी मनूच्या काळातील स्थिती येऊ नये अशी आशा करू. आता खरी समतेची लढाई सुरू झाली असे म्हणायला हरकत नाही. स्वाभिमान आणि अस्तित्वाची लढाई आहे.”
डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले, “आजची मतदान व्यवस्था केवळ सरकार बदलू शकते. पण मूलभूत परिस्थिती कोणीही बदलवू शकत नाही. व्यवस्था परिवर्तनाचा विचार असायला हवा. साहित्याची ठोस चर्चा करण्यासाठी त्याला समाजव्यवस्थेचा आधार हवा. समाजप्रमाणे विचार निर्माण होतात, विचाराप्रमाणे समाज नाही. पण यासाठी रक्तरंजित क्रांतीची गरज नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने दिलेला संदेशाची अंमलबजावणी केली तरी क्रांती घडेल. कुणावर खून पडतायेत त्यामुळे साहित्यिक घाबरतात, विचारवंत गप्प बसतात. करण संपूर्ण देशात अराजकता आहे. आंबेडकरांचा विचार कोणीही खासदार मांडत नाही. सगळे दुबळे आहेत. जगात साहित्यिकांकडून कधीच क्रांती घडत नाही. पण खरा साहित्यिक जे समूह व्यवस्था बदलासाठी रस्त्यावर उतरले असतात त्यांना पाठबळ, पाठिंबा देऊन प्रोत्साहन देऊ शकतात. विचारवंत, साहित्यिकांचे हे काम आहे की जो विचार समोर येत आहे त्याचा दुरोगामी परिणाम काय होईल याची चर्चा करायला हवी. धर्म मोडण्यासाठी जात मोडावी लागते. साहित्यातील वाद हे समाज व्यवस्थेतील, छुप्या राजकारणाचे वाद असतात. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोघांचेही चरित्र नीट लिहीलं नाही.”
प्रा. विलास वाघ, डॉ. अनिल सपकाळ यांनीही आपले विचार मांडले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. परशुराम वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजय खरे यांनी आभार मानले.

लक्ष्मीबाईंनी माझ्यासारखा ‘पँथर’ घडवला- रामदास आठवले

0
लक्ष्मीबाई वाडेकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार व ग्रंथतुला 
पुणे : “आपल्या जीवनात आईचे स्थान मोलाचे आहे. आपण कायम तिच्याप्रती कृतज्ञ असले पाहिजे. लक्ष्मीबाई वाडेकर यांच्या परशुरामसारखे हजारो कार्यकर्ते माझ्या पाठीशी असल्यानेच माझ्यासारखा ‘पँथर’ घडला. संघर्षमय जीवन जगत लक्ष्मीबाई यांनी परशुराम वाडेकर यांच्यासह इतर मुलांना वाढवले, मोठे केले. त्यांच्या जगण्यातून संघर्षाशी दोन हात करण्याची आणि कुटुंबाला घडविण्याची प्रेरणा अनेक मातांना मिळेल. त्यांच्यासारख्या आई प्रत्येकाला मिळावी. लक्ष्मीबाईनी आनंदात वयाची शंभरी पूर्ण करावी,” अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
निमित्त होते, रिपब्लिकन पक्षाचे नेते परशुराम वाडेकर यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई बाळकृष्ण वाडेकर यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराचे. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कौटुंबिक सोहळ्यात लक्ष्मीबाई यांची ग्रंथतुलाही करण्यात आली. तसेच त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त संघर्षातून आयुष्य घडवलेल्या विजयाबाई सोनकांबळे, सावित्रीबाई म्हस्के, नजमा काझी, अलका खरे व तृप्ता द्विवेदी या मातांचाही सन्मान करण्यात आला.
या हृद्य सोहळ्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे, अल्पसंख्याक आघाडीचे अॅड. आयुब शेख, शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेविका सुनीता वाडेकर, महिला आघाडीच्या चंद्रकांता सोनकांबळे, संगीता आठवले, युवक अध्यक्ष शैलेश चव्हाण, गायक आनंद शिंदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी लक्ष्मीबाई वाडेकर यांचे अभिष्टचिंतन करीत उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.
परशुराम वाडेकर म्हणाले, “माझ्या जडणघडणीत आईचा वाटा खूप मोठा आहे. तिने दिलेल्या संस्कारांमुळेच आंबेडकरी, दलित आणि पँथर चळवळीत वाढलो. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, या भावनेतून हा सत्कार सोहळा आयोजिला आहे. गेल्या वर्षीच हा सोहळा करण्याचा मानस होता. परंतु, भीमा कोरेगावच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तो यंदा करत आहे. प्रत्येकाने आपल्या आईला आदराचे स्थान दिले पाहिजे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.”
लक्ष्मीबाई वाडेकर यांनीही आपल्या भावना व्यक्त करीत उपस्थितांना शुभाशीर्वाद दिले. प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई यांनीही शुभचिंतन केले. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.

विमानतळे पूर्ण सुरक्षित : टी सी . सजीत

0
पुणे :महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस आयोजित ‘ चेकमेट २०१९ ‘ : आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन हॉटेल अरोरा टॉवर्स येथे  बंगळुरू विमानतळाचे मनुष्य बळ विकास विभागाचे  मुख्यधिकारी टी  सी . सजीत यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार अध्यक्षस्थानी होते . अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस ‘चे संचालक आर . गणेसन यांनी स्वागत केले . सामाजिक योगदानाबद्दल एस . मुरलीधरन यांना ‘जीवनगौरव ‘पुरस्कार देण्यात आला .परिषदेचे हे ११ वे वर्ष होते . 
परिषदेत सादर करण्यात आलेल्या शोधनिबंधांचे प्रकाशन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  करण्यात आले . 
 
 टी  सी . सजीत म्हणाले ,’भारतीय विमानतळाची सुरक्षा डोळ्यात तेल घालून ,पूर्ण जबाबदारीने  राखली जात आहे .विमानतळे पूर्ण सुरक्षित आहेत . प्रत्येक प्रवेशावर नजर ठेवली जाते . सुरक्षिततेचे नियम कडक करण्यात आले आहेत .  त्यासाठी मानवी सुरक्षेबरोबर अत्याधुनिक तंत्राचा अवलंब केला जात आहे . सध्या ६ विमानतळांची जबाबदारी खासगीकरणातून देण्यात आली आहे . भावी काळात १४० विमानतळे खासगी होणार आहेत . दोन हजार विमाने देशात पुढील सात वर्षात उपलब्ध होत आहेत . अत्याधुनिक व्यवस्थापन तंत्रे पाहता व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांना कारकिर्दीच्या संधी उपलब्ध होत असून व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने तयारी करावी ‘
डॉ . पी . ए इनामदार म्हणाले ,’गेल्या पाच हजार वर्षात झाली नव्हती इतकी प्रगती स्वातंत्र्योत्तर काळात झाली आहे . त्याबाबत न्यूनगंड बाळगण्यासारखी वस्तुस्थिती नाही . व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन घेऊन जगात नवी आव्हाने पेलली पाहिजेत . ‘
उद्योग जगतातील अनेक मान्यवर ,संशोधक ,व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी ,प्राध्यापक या परिषदेत सहभागी झाले होते . 

रोटरी क्लबतर्फे २७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान पुण्यात’जलोत्सव २०१९’ चे आयोजन

0
पुणे :रोटरी क्लब पुणे ,डिस्ट्रीक्ट ३१३१ तर्फे ‘जलोत्सव २०१९’ चे आयोजन दिनांक २ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान  पुण्यात करण्यात आले आहे .
 पाण्याविषयी ,पाणी वापर ,बचत ,पुनर्वापर याविषयी जागरूकता,जलसाक्षरता निर्माण करण्यासाठी हा जलोत्सव आयोजित करण्यात येत असून या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जल क्षेत्रात असलेल्या कारकिर्दीच्या संधींवर मार्गदर्शन करण्यावर यावर्षी भर देण्यात येत आहे .
रोटरी क्लब पुणे ,डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या वॉटर कमिटी चे अध्यक्ष सतीश खाडे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .  
 २७ फेब्रुवारी रोजी आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत ‘जलक्षेत्रातील कारकिर्दीच्या संधी ‘ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . नितीन करमळकर ,भूजल शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे ,वनस्पतीशात्रज्ञ डॉ . सचिन पुणेकर त्यात सहभागी होतील .रोटरी क्लब कोथरूड ,रोटरी क्लब अमनोरा यांनी संयोजन केले आहे .   
 या जलोत्सवादरम्यान विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे . यात डॉ अरविंद नातू ,उमेश मुंडले ,व्ही एम देसाई ,ओ . मणीवान्ना ,प्रदीप पुरंदरे ,उपेंद्र धोंडे ,कृष्णा लव्हेकर ,डॉ . सुनील गोरंटीवार ,डॉ श्रीकांत गबाले ,रवींद्र उलंघिवार ,संजय इनामदार ,प्रभात रंजन यांची व्याख्याने होणार आहेत . रोटरी वॉटर ऑलिम्पियाड स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ही या जलोत्सवात २ मार्च रोजी होणार आहे
 
 दरम्यान ,रोटरी जलोत्सवच्या वतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च – (आयसर ,पाषाण ) येथे २३ फेब्रुवारी रोजी आयसर (पाषाण )संस्थेत प्रदीप लोखंडे ,डॉ . अरविंद नातू ,अशोक रुपनर यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या‘रोटरी वॉटर ऑलिम्पियाड’ ही  प्रश्नमंजुषा स्पर्धा  आणि  पारितोषिक वितरण समारंभ याठिकाणी आयोजित करण्यात आला होता  .  रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड ,पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांनी संयोजन केले  . 

सेना-भाजपने मित्रपक्षांचा सन्मान करावा- रामदास आठवले

0

दक्षिण मध्य, ईशान्य मुंबईची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्याची सूचना

पुणे: “भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांची युती झाली ही चांगली बाब आहे. त्यासाठी मीही प्रयत्न करीत होतोच. परंतु, युती झाल्यावर सेना-भाजपने मित्र पक्षांना डावलले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या मदतीशिवाय युतीला यश मिळणार नाही. माझ्यामागे समाजातील मोठी ताकद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. याचा अर्थ सेना-भाजपने आम्हाला वाऱ्यावर सोडून द्यावे, असा नाही. आम्हाला दुर्लक्षित कराल, तर आम्ही तुम्हाला दुर्लक्षित करू. त्यामुळे सेना-भाजपने सामंजस्याची भूमिका घेत मित्र पक्षांचा सन्मान करावा,” अशी सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिक पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.
नवीन विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे, अल्पसंख्याक आघाडीचे अॅड. आयुब शेख, शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, महिला आघाडीच्या चंद्रकांता सोनकांबळे, संगीता आठवले, युवक अध्यक्ष शैलेश चव्हाण यांच्यासह शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “आम्ही बरोबर असूनही आम्हाला विचारात न घेणे योग्य नाही. देशहितासाठी मोदींच्या पाठीशी राहणे ही आमची भूमिका आहे. पण सगळ्या गोष्टी परस्पर होत असतील, तर आम्हाला विचार करावा लागेल. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आम्ही मागणी करीत आहोत. ईशान्य मुंबईही चालेल. पण युतीने आम्हाला लोकसभेसाठी किमान एक आणि विधानसभेसाठी सात-आठ जागा सोडाव्यात. गेली साडेचार वर्ष शिवसेना भाजपविरोधात वक्तव्य करीत आहे. तरीदेखील भाजपने त्यांना जवळ केले. आम्ही वेळोवेळी साथ देऊनही आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीत होणाऱ्या रिपब्लिकन मेळाव्यात आमची ताकद दाखवून देऊ. तसेच महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे यांची भेट घेऊन मित्र पक्षांसाठी जागा मागणार आहोत. त्यासाठी अमित शहा यांचीही भेट घेणार आहोत.”
मी सरळमनाचा माणूस असल्याचे सांगून आठवले म्हणाले, “माझ्याशी कुणी वाकडे वागले, तर मीही वाकडा आहे. शरद पवार यांचा मी चांगला मित्र होतो. पण आता मी नरेंद्र मोदी यांचा मित्र आहे. शरद पवार, छगन भुजबळ यांच्याकडून भेटीचे निमंत्रणे येत आहेत. पण भाजप मित्रपक्षांना न्याय देईल, असे वाटते. राज्यातील अनेक मतदार संघात आमची ताकद आहे. तेथे युतीला फायदा होऊ शकतो. त्यामुळे सेना भाजपने वाकड्यात न घुसत आम्हाला सन्मान द्यावा. रिपब्लिकन पक्षाची ताकद मागे उभी केली, तर देशात आणि राज्यात युतीचे सरकार निश्चितपणे येईल.”
पुलवामा हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांनी अशापद्धतीची शंका घेणे योग्य नाही. दहशतवाद आणि पाकिस्तानशी लढा देऊन देशाचे रक्षण करणे महत्वाचे आहे. माझी महार बटालियन सीमेवर जाऊन लढायला तयार आहे. हार्टअटक येऊन मरण येण्यापेक्षा वीरमरण येणे कधीही चांगले आहे. वेळप्रसंगी युद्ध करून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेतला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. तसेच दहशतवादी अड्डे उध्वस्त केले पाहिजे, असेही आठवले यांनी नमूद केले.
२२ मार्चला रिपब्लिकन पक्षाचा मेळावा
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचा मेळावा पिंपरीतील एचए मैदानावर होणार आहे. हा मेळावा २२ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून, निवडणुकीतील पुढची दिशा ठरविण्यासाठी यामध्ये चर्चा होणार आहे, असेही आठवले यांनी नमूद केले.

चळवळ भक्कम होण्यासाठी आंबेडकर डोक्यात भिनावेत- राजन खान

0
पुणे : “आंबेडकर पूर्णपणे डोक्यात भिनल्याशिवाय व कृतीत उतरल्याशिवाय आंबेडकरी चळवळ भक्कम होणार नाही. नेत्यांनी व चळवळीतील कार्यकर्त्यांनी दुटप्पीपणा सोडून कट्टर आंबेडकरी विचार आणि त्याप्रमाणे आचरण होणे येथे अपेक्षित आहे,” असे परखड मत साहित्यिक राजन खान यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डिपार्टमेंट ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित सातव्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनातील ‘समकालीन साहित्य चळवळी आणि बांधिलकी’ या परिसंवादात राजन खान बोलत होते. संविधाननागरी बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या परिसंवादात लेखिका प्रा. वंदना महाजन, ग्रामीण साहित्यिक प्रा. गणेश देशमुख, विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते सुबोध मोरे, अनमोल शेंडे सहभागी झाले होते. ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले अध्यक्षस्थानी होते.
राजन खान म्हणाले, “चळवळींच्या मांडणीच्या सुरुवातीलाच केंद्रस्थानी आंबेडकर आहेत. त्यांनी दिलेली ध्येय, धोरणे यावरच चळवळी उभ्या राहतात. देशाचा खरा झगडा हा डाव्या-उजव्याचा आहे. अडीच हजार वर्षांचा इतिहास पहिला तर नेहमी उजवी चळवळ यशस्वी होत आली. मात्र डावी चळवळ उगवते आणि विझते. ब्राह्मणी चळवळी नेहमी चालत राहतात. डावे सहिष्णू, सम्यक विचार मांडणारे आणि बहुसंख्य असले तरी उजवे असहिष्णू त्यांच्यावर सत्ता गाजवतात. कारण डाव्यांत एकोपा, एकवाक्यता नाही. त्यांच्यात नेहमीच काही फटी असतात आणि तेथून उजवे लोभ व लाभाचे विचार घेऊन शिरकाव करतात. शोषक आणि शोषित या दोघांनाही माणूस बनवणारा आंबेडकरी विचार आहे, पण आपण तो सोयीनुसार घेतो. हा विचार एकांगी, एककल्ली नाही. त्याचे तंतोतंत पालन करत कणखर आणि भक्कमपणे उभे राहणाऱ्यांची गरज आहे.”
नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले, “वर्तमान परिस्थितीत लेखक काय भूमिका घेतात हे महत्वाचे आहे. आजची परिस्थिती निषेधार्य आहे; परंतु सामान्य माणसाला जोवर ते भिडत नाही, तोवर त्याचा उपयोग नाही. आणीबाणीत लोक सुरुवातीला घाबरले. नंतर हळूहळू सामान्य माणूस जागृत झाला, उभा राहू लागला. आता प्रश्न हा आहे की सामान्य माणसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मोल किती वाटते. लेखक त्याचेच प्रतिनिधित्व करत असतो. सामान्य माणूस जोवर उभा राहत नाही तोवर बदल होत नाही. जागतिकीकरणाच्या काळात अनेक चळवळी संपल्या. जेंव्हा चळवळी सुरू असतात तेंव्हा साहित्य चळवळीलाही बळ मिळते. जागतिकीकरणातून मुख्य बदल जो झाला तो म्हणजे समाज बाजारात उभा झाला. विद्वान, मीडिया विकला जात आहे. त्यामुळे या काळात सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि मानवी मूल्य दिसत नाहीत. हे गंभीर आहे.”
वंदना महाजन म्हणाल्या, “संघाने संस्कृतिक चळवळीचा चेहरा घेऊन राजकीय चळवळ सुरू केली आणि सूत्र हाती घेतली. सगळी वाटचाल हिंदू राष्ट्र निर्मितीकडे आहे. साहित्य चळवळी या सामाजिक चळवळींशी निगडित आहेत. आजची परिस्थिती फार निराशाजनक आहे. फुले, शाहू, आंबेडकरांनी दिलेली वाट चालण्यास आपण अपयशी आहोत. जातीच्या वेगवेगळ्या समुदयातून साहित्याचे वेगवेगळे समुदाय तयार होत आहेत.”
अनमोल शेंडे म्हणाले, “लेखक संवेदनशील असतो, तोच खऱ्या अर्थाने माणुसकीची बाजू मांडतो. आजवर अनेक प्रश्नांचा मूलभूत पातळीवरून विचार झालेला नाही. साहित्य चळवळीचा जन्म सहज होत नाही. लेखन भूमिकेच्या अनुषंगाने असावे लागते. भूमिका तेंव्हाच येते जेंव्हा विचार बांधिलकी मानणारे असतात.”
गणेश देशमुख म्हणाले, “कोणताही माणूस निःपक्षपाती नसतो. फक्त ज्या पक्षाकडून आहे त्याच्याशी बांधिलकी बाळगणे आवश्यक आहे. बांधिलकी म्हणजे कोणत्यातरी विचाराशी बांधले जाणे. विचारांचा खुलेपणा फार आवश्यक असतो. शेतकऱ्यांशी बांधिलकी ठेवत अनेक साहित्य येते आणि अजूनही येणे आवश्यक आहे.”
सुबोध मोरे म्हणले, “धर्मांध राजकारण प्रखर झाले आहे. त्याला दलित, ग्रामीण साहित्याने जेवढ्या क्षमतेने विरोध करायला हवा तेवढा केलेला नाही. या राजकारणाने जसे पाय पसरले, घुसखोरी केली ते समजण्यास आपण अपयशी ठरलो आहोत. देशातील वातावरण झुंडशाही आणि तुमची अभिव्यक्ती दडपणारे आहे. आज आणीबाणी नसली तरी आणीबाणी सदृश परिस्थिती आहे.”

नृत्याद्वारे उलगडल्या वसंत ऋतूच्या विविध छटा

0
पुणे : ‘बांगीया संस्कृती संसद’ च्या वतीने ‘बसंत उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम २०१९’ साजरा झाला. नृत्य आणि गायनाद्वारे एम्प्रेस गार्डन च्या निसर्गरम्य आणि खुल्या आकाशात सादर झालेल्या कार्यक्रमात वातावरण वसंत ऋतूमय झाले होते. जणू हा उत्सव पश्चिम बंगाल येथील शांतिनिकेतनमध्ये साजरा होत असल्याचा सुंदर अनुभव रसिकांनी अनुभवला.
हा कार्यक्रम रविवार, दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी एम्प्रेस गार्डन येथे झाला. बसंत उत्सवाचे १४ वे वर्ष होते.
कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे सुरेश पिंगळे (विश्वस्त मंडळ प्रमुख ,एम्प्रेस गार्डन) ,श्रीमती पिंगळे, सास्वती गुहा ठाकुर (दूरदर्शन बंगालीच्या पहिल्या निवेदक व अभिनेत्री) आणि त्यांची कन्या श्रेया गुहा ठाकूर यांच्या हस्ते झाले. उदघाटन प्रसंगी पुलवामामधील शहीद अमर जवानांना १ मिनिट स्तब्धता राखून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी आयोजन समितीचे सुजाता पॉल, मधुमिता घोष, अरुण चट्टोपाध्याय, सुबसीस बगल, राखी चटर्जी, बिरेस्वर मित्रा, शिवाजी मुखर्जी, स्वप्नकुमार लाहिरी उपस्थित होते.
हिवाळ्याचे दिवस संपून हवेत नावीन्य आल्याची चाहूल देणारा हा बसंतोत्सव असतो. ‘बांगिया संस्कृती संसद’ ही  पुण्यातील ५३ वर्षांची सामाजिक-सांस्कृतिक संस्था आहे. या संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून बंगाली संस्कृती आणि साहित्याचा प्रसार केला जातो.
रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक गाण्यावर आधारित ‘बसंत गीती’ या समर्पित कार्यक्रमात वसंत ऋतूतील रम्य सकाळच्या छटांचे विविध पैलू नृत्याद्वारे उलगडण्यात आले. नबीन -गीतनाटिकेतील रवींद्र संगीतातून सुंदर  संगीत नृत्याची सांगड घालून वसंत ऋतूचे दर्शन या सांस्कृतिक कार्यक्रमातून घडविण्यात आले, अशी माहिती बांगीया संस्कृती संसदच्या उपाध्यक्ष मधुमिता घोष यांनी दिली.
सास्वती गुहा ठाकुर आणि श्रेया गुहा ठाकूर यांनी एकत्रित ‘तुमी माता तुमी कन्या’ कार्यक्रमातून ‘रबिन्द्र संगीत’ सादर करून वातावरण संगीतमय केले. त्यांना तबल्यावर श्रेष्ठ कलाकार बिप्लाब मोंडल आणि सिन्थेसायझरवर सुब्रता मुखर्जी यांनी साथ सांगत केली. रवींद्रनाथ टागोरांच्या निवडलेल्या गाण्यांवर आधारित हा कार्यक्रम होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपंकर मुझुमदार यांनी केले. आभार सुबसिस बागल यांनी मानले.
बसंतोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांचे मूळ गुरुदेव रवींद्रनाथ टागोरच्या जन्मस्थानी शांतीनिकेत आहे. ज्यामध्ये लोकांना एकत्र आणून विविध रंग रुपी आनंद आणि प्रेम देते, असे या कार्यक्रमाबद्दल बोलताना सुजाता पॉल म्हणाल्या.

कर्तृत्वावर लक्ष केंद्रित करण्याची बहुमोल शिकवण

0

‘आय पेरेंट्स’ सत्रांअंतर्गत सायली गोडबोले यांचा पालकांशी संवाद

पुणे:-माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे जिजाबाई राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. जिजाऊंनी महाराजांना खऱ्या अर्थाने मातृभूमीसाठी,स्वराज्यासाठी जगायला शिकवले. त्याचबरोबर कर्तृत्वावर लक्ष केंद्रित करण्याची बहुमोल शिकवणही त्यांनी दिली. अशीच शिकवण आपण आपल्या येणाऱ्या पिढीयांना देणे आवशयक आहे.असे मत लेखिका सायली गोडबोले-जोशी यांनी व्यक्त केले.

बावधन मधील गंगा लेजंड येथे गोयल गंगा फौंडेशनच्या वतीने जीजीआयएस अथ अंतर्गत ‘आय पेरेंट्स’ या सत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या कि, मनात सकारात्मकता, खंबीरता,धौर्यशीलता असे गुण अंगीकारल्यास अशक्य असे काही नाही.जिजाऊप्रमाणे आपल्या मुलांमध्ये परोपकार,आत्मविश्वास, शौर्य, न्याय, राष्ट्र प्रेम या सर्वांचे धडे देण्याचे सामर्थ्य प्रत्येक आईमध्ये असते. प्रत्येक स्त्रीने आपली शक्ती ओळखून आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजे.

यावेळी बावधन मधील जीजीआयएस अथ शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता सोमा तसेच समस्त शिक्षक, विद्यार्थी आणि पालकही उपस्थित होते.