Home Blog Page 295

पुण्यात रस्त्याची नदी झाली अन इनोव्हा वाहून गेली

पुणे-पावसाच्या हाहाकारामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोव्हा कार वाहून गेली. अवकाळी पावसामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्पा झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुसळधार पावसाने स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. या दरम्यान एका ठिकाणी कार वाहून गेल्याची घटना घडली.स्वामी चिंचोली व निंबोडी परिसरातील ओढ्या नाल्यांचे येणारे पाणी स्वामी चिंचोली गावाजवळ तीन वाजण्याच्या सुमारास महामार्गावर आल्याने वाहतूक ठप्प झाली. चिंचोली परिसरात महामार्गाची उंची जमिनी लगत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह आला. यामुळे रस्ता बंद करावा लागला. महामार्ग प्राधिकरणाचे अधिका-यांनी याठिकाणी खबरदारीच्या उपाय योजना न केल्याने अशी परिस्थिती उद्भवल्याचे ग्रामस्थांनी आरोप केला आहे.महामार्ग परिसरातील नाल्यांची व्यवस्थित साफसफाई न केल्याने संततधार पावसाने या ठिकाणी महामार्गावर पाणी तुंबले. यामुळे या ठिकाणी काही काळ ट्राफिक जॅम झाले

जोरदार सुरू झालेल्या पावसाने सोलापूर पुणे महामार्गावर भिगवन जवळ तब्बल पाच किलोमीटर ट्राफिक जाम झाले होते. पुण्याहून भिगवन जवळ रस्त्यावर पाणी आल्याने एक वाहन वाहून गेल्याचे सांगण्यात आले त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी दक्षता म्हणून एक एक करून वाहने सोडली त्यामुळे सफल पाच किलोमीटर रांगा दिसून होत्या.
भिगवन जवळ ढगफुटी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ओढे नाल्यानी रौद्ररूप धारण केल्याचे दिसून आले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पीडित जगदाळे कुटुंबियांची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट

आसावरीच्या यशाचे केले कौतुक, पुनर्वसनासाठी ठोस पाठपुराव्याची ग्वाही

“या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा थांबणार नाही” – डॉ. नीलम गोऱ्हे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली जबाबदारी; शिवसैनिकांकडून तातडीने जगदाळे कुटुंबाला दिलासा

पुणे, दि. २५ मे २०२५ : पहलगाम येथे पीडित जगदाळे कुटुंबाची विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला. या भेटीत त्यांनी आसावरी जगदाळे हिच्या नुकत्याच लागलेल्या निकालाबाबत तिचे अभिनंदन केले. आसावरीने कायदेविषयक डिप्लोमा परीक्षेत गुणवत्तेने यश मिळवले असून, ती सध्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या मॅनेजमेंट अभ्यासक्रमासोबतच लेबर लॉ या क्षेत्रातही शिक्षण पूर्ण करत आहे. तिच्या शैक्षणिक यशाच्या पार्श्वभूमीवर तिच्या कुटुंबाची अपेक्षा आहे की, पुणे शहरातच सरकारी क्षेत्रात तिला रोजगाराची संधी मिळावी, जेणेकरून ती आपल्या आई व कुटुंबासोबत राहू शकेल.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल संपूर्ण जगदाळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शहर प्रमुख नाना भानगिरे आणि शिवसेना कार्यकर्त्यांना जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नाना भानगिरे, सुधीर जोशी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज तातडीने कुटुंबाला भेट दिली. या भेटीत त्यांच्या कायदेशीर आणि पुनर्वसनासंदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. कुटुंबाने दिलेला अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पुणे महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार असून, त्या सर्व बाबींचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली.

भेटीदरम्यान त्यांनी एक भावनिक क्षणही सांगितला की, आज आसावरीचा निकाल लागला तेव्हा तिचे वडील तिच्यासोबत जेवायला असायचे, परंतु या वेळी ते अनुपस्थित होते, ही भावना सर्वांना हेलावून गेली. हा जो घाला भारतावर झालेला आहे, त्याचे उत्तर दोषींना केंद्रसरकारने दिले तरी जोपर्यंत पाकिस्तानी वा ईतर दहशतवाद चालु राहिल तोपर्यंत न्यायासाठी लढाई चालूच राहील त्यात भारताय यश मिळावे , अशी ईश्वरचरणी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.
या प्रकरणाचा न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा थांबणार नाही, असा संकल्पही यावेळी करण्यात आला.

महायुतीमध्ये आमच्या पक्षावर अन्याय, रामदास आठवलेंनी व्यक्त केली खंत

आमच्यावर अन्याय होतोय ही खरी गोष्ट आहे. मला एकट्याला मंत्रिपद मिळाले असले तरी माझ्या कार्यकर्त्यांना देखील सत्तेचा सहभाग मिळायला हवा. शरद पवारांच्या काळात काँग्रेसच्या आघाडी बरोबर असताना आमचे 6 ते 7 जण विधान परिषदेवर होते, 3 ते 4 मंत्री देखील झाले होते. त्यामध्ये मी मंत्री झालो, शेगावकर मंत्री झाले होते, दयानंद म्हस्के मंत्री झाले होते, मुंबईत आमचा महापौर झाला होता. पुण्यात देखील आमचा उपमहापौर झाला होता. त्या काळात आम्हाला अनेक ठिकाणी सत्ता मिळाली. मात्र, आता महायुतीच्या काळात आरपीआयला सत्ता मिळत नाही अशी परिस्थिती असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

मुंबई-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. महायुती सरकारमध्ये आरपीआयला एकही मंत्रिपद न मिळाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळातील अनुभवाची आठवण करून दिली. आता महायुतीच्या काळात आमच्या पक्षाला सत्ता मिळत नाही. मात्र, शरद पवारांच्या काळात काँग्रेसच्या आघाडीबरोबर असताना आमच्या पक्षाला सत्ता मिळायची. आता महायुतीमध्ये आम्ही असूनही आमच्यावर अन्याय होत आहे, असे रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

रामदास आठवले यांनी याआधीही महायुतीकडून होणाऱ्या वागणुकीवर नाराजी दर्शवली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयने दोन जागांची मागणी केली होती, मात्र त्यांना एकही जागा मिळाली नाही. त्याचप्रमाणे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि विधानपरिषदेत देखील आरपीआयला एकही जागा मिळाली नव्हती. तेव्हा देखील आठवले यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती.

आज आमची अडचण अशी आहे की आता मला एक मंत्रिपद मिळालेले आहे. पण माझ्या पक्षाचा एकही खासदार किंवा आमदार नाही. तरीही माझ्या पक्षाची जी काही छोटी-मोठी ताकद आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती आहे. त्यामुळे मला तीन वेळा त्यांनी मंत्रिमंडळात घेतले. मात्र, आमच्या पक्षातील बाकीच्या लोकांना काही मिळत नाही. दिल्लीतही काही पद मिळत नाही आणि महाराष्ट्रात नाही, अशी खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

पुण्याला आणखी पाच नवीन सायबर पोलीस ठाण्यांची गरज -आमदार हेमंत रासने

पुणे-

सायबर गुन्ह्यांमधील वाढती संख्या आणि प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता, पुण्यातील सध्याचे एकमेव सायबर पोलीस ठाणे हे अपुरे पडत असून, पाचही परिमंडळामध्ये प्रत्येकी एक सायबर ठाणे निर्माण करावे अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

पुण्यातून अमेरिकन नागरिकांना “डिजिटल अरेस्ट”च्या बनावट धमक्या देत गिफ्ट कार्डच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या खराडी येथील एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. पुणे शहरातील सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे.
सन 2022 मध्ये 10 हजार 692 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली, 2023 मध्ये ही संख्या 11 हजार 974 होती तर 2024 मध्ये तब्बल 12,954 गुन्ह्यांची नोंद झाली होती. याचाच अर्थ सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापैकी केवळ 6,204 (2022), 7,069 (2023) आणि 1,739 (2024) गुन्ह्यांचाच न्यायालयीन निकाल लागलेला असून उर्वरित प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याकडे रासने यांनी लक्ष वेधले.

त्यासाठी पुण्यातील पाच परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक अशी पाच सायबर पोलीस ठाणी स्थापन केल्यास सायबर गुन्ह्यांची जलद आणि तांत्रिक तपासणी शक्य होईल. तसेच अतिरिक्त पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, ई-ऑफिस प्रणालीद्वारे सायबर पोलीस ठाण्यांचे आधुनिकीकरण करावे, प्रशिक्षित मनुष्यबळाची भरती करावी अशा मागण्याही रासने यांनी आपल्या पत्रात केल्या आहेत.

बाल पुस्तक जत्रेचे मॉडेल राज्यभरनेण्यासाठी शिक्षण विभाग पुढाकार घेणार-शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे

0

पुणे : सध्याच्या मोबाइल आणि एआयचा काळात मातीशी नाळ तुटणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मुलांना पुस्तकांकडे, वाचनाकडे वळवणे महत्त्वाचे आहे. त्या दृृष्टीने बालपुस्तक जत्रा पुण्यापुरती राहू नये. बालपुस्तक जत्रेचे प्रारुप विभाग, जिल्हा, तालुका पातळीवर नेण्यासाठी शिक्षण विभाग पुढाकार घेईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केली.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्यातर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे बालपुस्तक जत्रा कार्यक्रमात भुसे बोलत होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक श्री राजेश पांडे, बालभारतीचे संचालक श्री. कृष्णकुमार पाटील, किशोर मासिकाचे संपादक श्री.किरण केंद्रे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री सागर वैद्य, श्री.प्रसेनजित फडणवीस, संवाद पुणेचे श्री.सुनील महाजन या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात किशोर मासिकाच्या अंकासह साने गुरुजी, श्यामची आई या इंग्रजीत अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन भुसे यांच्या हस्ते झाले.

श्री दादाजी भुसे म्हणाले, पुणे बालपुस्तक जत्रा हा नवीन प्रयोग निर्माण झाला. त्यातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिकायला मिळाले आहे. हे प्रारुप राज्य, जिल्हा पातळीवर नेण्याचा शिक्षण विभाग प्रयत्न करेल. संयुक्त पद्धतीने राज्यभर आयोजन करण्यात येईल. शिक्षण विभाग राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. हसतखेळत शिक्षण, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आताच्या काळात आर्थिक परिस्थिती असलेले पालक मुलांना इंग्रजी, इतर माध्यमांत शिकवतात. दुसरीकडे जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गोरगरीबांची मुले जातात. त्यातून एकप्रकारची दरी निर्माण होत असल्याचे दिसते. मात्र, गोरगरीब मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर व्यापक पातळीवर शिकवला गेला पाहिजे ही मागणी त्यांनी लगेचच मान्य करून तत्काळ अंमलबजावणीचे निर्देशही दिले. तसेच अभिजात दर्जा मिळालेली मराठी इतर माध्यमांत सक्तीची केली पाहिजे अशी मागणी केली. त्यानुसार सीबीएसईने महाराष्ट्रात मराठी शिकवण्याचे निर्देश दिले आहेत. आणखीही काही विषयांत केंद्राचे सहकार्य मिळणार आहे. राज्यात पहिली ते बारावीचे दोन कोटी बारा लाख विद्यार्थी, सात लाख शिक्षक, अनेक संस्था आहेत. शिक्षण हे फार मोठे क्षेत्र आहे. जितके चांगले काम करता येईल त्यासाठी प्रयत्न आहे. येत्या वर्षभरात सकारात्मक बदल दिसतील, असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला.

पुणे बालपुस्तक जत्रेला
२५ हजारांहून अधिक मुलांनी भेट
बालपुस्तक जत्रा हा प्रयोग पहिल्यांदा केला आहे. अशी जत्रा महाराष्ट्रात, देशात कुठेही होत नाही. खेळ, पुस्तके, खाऊ हे सगळे येथे मुलांना एका ठिकाणी उपलब्ध झाले आहे. पुणेकरांनी आणि मुलांनी या जत्रेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. तीन दिवसांत २५ हजारांहून अधिक मुलांनी जत्रेला भेट दिली. त्यामुळे येत्या काळात मुलांच्या भावविश्वाला ही जत्रा आकार देईल असा विश्वास आहे, असे श्री.राजेश पांडे यांनी सांगितले.

ग्रामविकासाचा ‘दळवी पॅटर्न’ अभ्यासक्रमाचा भाग व्हावा-अभिनेता नाना पाटेकर

ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे: “ग्रामविकासाच्या आदर्श पॅटर्नचे चंद्रकांत दळवी यांनी साकारलेले प्रारूप गाव, तालुका, जिल्हा किंवा राज्यापुरते मर्यादित राहू नये. ग्रामविकासाचा हे ‘दळवी पॅटर्न’ सर्वत्र पोहोचावे आणि त्यासाठी हे मॉडेल अभ्यासक्रमाचा भाग व्हावे. त्यातून प्रत्येकाला ग्रामविकासाची प्रेरणा व दिशा मिळावी”, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेता व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांनी केले. चंद्रकांत दळवी नावाच्या व्यक्तीने शून्यातून सुरवात केली. सातत्य, चिकाटी, संयम आणि लोकसहभागाचा मंत्र जपत ग्रामविकासाचे माॅडेल उभे केले. असे समविचारी दळवी मोठ्या संख्येने तयार व्हावेत, असेही पाटेकर म्हणाले.

माजी आयएएस अधिकारी व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वात लोकसहभागातून परिपूर्ण व स्मार्ट व्हिलेज म्हणून नावारुपाला आलेल्या सातारा जिल्ह्यातील निढळ (ता. खटाव) या गावाची प्रगतशील वाटचाल उलगडणार्‍या ‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात नाना पाटेकर बोलत होते. या पुस्तकाला नाना पाटेकर यांनीच प्रस्तावना लिहिली आहे. 

बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील सह्याद्री फॉर्म्सचे विलास शिंदे होते. याप्रसंगी चंद्रकांत दळवी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, पीआरएम सॉफ्ट सोल्यूशन्सचे कार्यकारी संचालक राजेंद्र शिंदे, धर्मेंद्र पवार, अभिषेक दळवी, तबाजी कापसे, संजीव कोलगोड एस. बी. प्रॉडक्शन्सचे शंकर बारवे आदी उपस्थित होते. यावेळी ‘निढळ गाव: परिवर्तनाचा प्रवास’ या माहितीपटाच्या टीझर आणि पोस्टरचे अनावरण झाले. सत्व फाऊंडेशनच्या वतीने माहितीपुस्तिका प्रकाशित करण्यात आली.

नाना पाटेकर म्हणाले, “चंद्रकांत दळवी सातत्याने ४१ वर्षे हे काम करत आहेत. शासकीय सेवेतील महत्त्वाची पदे भूषवत असताना, तथाकथित विकास करणे दळवींना सहज शक्य होते. पण त्यांना अभिप्रेत ग्रामविकासाचे प्रारूप निराळे होते. सामाजिक एकोपा, लोकसहभाग आणि लोकवर्गणी यांच्या माध्यमातून त्यांनी ९० टक्के शासकीय योजनांच्या मदतीनेच ही किमया घडवून आणली आहे. त्यांच्या ग्रामविकासाला सामूहिकतेची जोड आहे. पराकोटीचे सातत्य, संयम, धीर आणि दळवींमधील नेतृत्वगुणांचे हे फलित आहे. समविचारी लोक जमवणे कठीण असते. समृद्धीची प्रत्येकाची कल्पनाही वेगळी असते. अशा परिस्थितीत दळवी यांनी स्वतःपलीकडे जाणाऱ्या समाजसेवेचा प्रत्यय दिला आहे. समाजातील युवकांची ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाणे आवश्यक आहे, त्यासाठी दळवींचे हे पुस्तक अभ्यासक्रमाचा भाग होणे आवश्यक आहे. यापुढे ग्रामविकासामध्ये नाम फाऊंडेशन दळवींच्या माडेलसोबत काम करेल.”

चंद्रकांत दळवी यांनी नाना पाटेकर यांचा ‘ग्रामीण भारतासाठी काम करणारे नायक’ असा उल्लेख करून ते पुढे म्हणाले, “शासकीय सेवेत विविध पदांवर कार्यरत असताना, राज्याची धोरणे ठरविण्याच्या महत्त्वाच्या कामात मला सहभागी होता आले. प्रत्येक पदावर काम करताना राज्याच्या हिताची एक तरी योजना ठरवण्याची संधी मिळाली. पण गावात प्रत्यक्ष काम करणे आव्हानात्मक होते. धोरणे चांगली असतील, तर विकासाचे प्रारूप लोकसहभागातून शक्य होते, याचे उदाहरण आता उभे राहिले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने समाजकार्याचे माडेल उभे राहिले आहे. हे पुस्तक लवकरच इंग्रजी व हिंदी भाषेत उपलब्ध होईल. विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी ग्रामविकासाची अशी माॅडेल्स उपयोगी ठरतील. निढळ गावाच्या विकासाच्या ९० टक्के योजना शासकीय माध्यमातूनच राबविल्या आहेत.”

विलास शिंदे म्हणाले, “ग्रामीण भागात विकासाच्या संधी नाहीत; म्हणून स्थलांतर होते. हे चित्र बदलण्यासाठी व्यवस्थेत बदल अपेक्षित आहेत. हे बदल नेमके कसे आणि कुणी करायचे, याचे उत्तर दळवी यांच्या या पुस्तकातून मिळेल. गावातून बाहेर पडून गावासाठी काम करता येत नाही तर गावातच काम करावे लागते. त्यासाठी आपल्या गावाशी नाळ जुळावी लागते. दळवींनी हेच केले. त्यासाठी झोकून दिले. आता अशी मोजकीच गावे उदाहरणापुरती न राहता, राज्यातील ४२ हजार गावे, २७ हजार ग्रामपंचायती या प्रक्रियेत यावीत, आणि चित्र बदलावे, हीच अपेक्षा आहे.”

गजानन पाटील म्हणाले, “गावासाठी काम करायचे, तर चिकाटी, सातत्य लागते. अनेकांचा गावाशी संपर्कच तुटलेला असतो. दळवींनी हे जाणून गावांशी नाळ जुळवली. सर्वांना एकत्रित करत वर्षानुवर्षे काम केले आणि हे विकसित गावाचे प्रारूप आपल्यासमोर आणले आहे.”

रामशेठ ठाकूर म्हणाले, “दळवी यांचा हा ग्रामविकासाचा पॅटर्न स्वीकारला, तर शहरांकडे धावणारे लोंढे थांबतील. शहरांची कुणाला आठवणही येणार नाही. गाव भौतिक, आर्थिक, भावनिकदृष्ट्या प्रत्येक समाजघटकाला जोडून घेऊन विकास प्रक्रियेत सहभागी होईल. हा आराखडा देशभरात उपयुक्त ठरणारा आहे.”

‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पटर्न’ हे ग्रामविकासाचे उत्तम दस्तऐवजीकरण असून, आगामी काळात ते दिशादर्शक ठरेल, असे पुस्तकाचे लेखक सुनील चव्हाण म्हणाले. कैलास कळमकर, भीमराव माने, मनोज गायकवाड, रामदास माने, संतोष ढोरे पाटील, राजेंद्र शिंदे, शंकर बारवे यांनीही मनोगत मांडले. सुनील जोशी यांनी सूत्रसंचालन केले. संजीव कुलगोड यांनी आभार मानले.

ऑपरेशन सिंदुर म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आणि सैन्यदलांच्या शौर्याचे प्रतीक-निवृत्त एअर मार्शल प्रदीप बापट


पुणे-केशव माधव न्यास च्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर’चे विविध पैलू उलगडून दाखविणाऱ्या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी दिनांक २४ मे रोजी सायंकाळी पटवर्धन बाग येथील ‘सेवा भवन’ सभागृहात करण्यात आले होते. पहलगाम येथील निष्पाप पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदुर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केले.व सुमारे शंभर अतिरेक्यांचा खात्मा केला या ऑपरेशन सिंदुर पराक्रम अभूतपूर्व’या विषयावर अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे अध्यक्ष व परम विशिष्ट सेवा मेडल प्राप्त एअर मार्शल प्रदीप बापट ( निवृत्त ) बोलत होते.ते पुढे म्हणाले,जगातील पहिले टॅक्टिकल युद्ध आपण जिंकले.संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक शस्त्रास्त्रे यांचा योग्य वापर,तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या दहशतवादी तळांवर अचूक हवाईहल्ले केले व आपल्या भारतीय सैन्याचे विराट शौर्य साऱ्या जगाला दाखवून दिले.ते पुढे म्हणाले की”भारताने स्वदेशी शस्त्रांनी दाखविलेली प्रभावी कामगिरी ही या धोरणाची यशोगाथा आहे.ऑपरेशन सिंदुर हे शीर्षक देखील योग्य ठरवले गेले.या मोहिमेत भारताने अत्याधुनिक क्षेपणास्त्रे,लढाऊ विमाने आणि स्वदेशी बनावटीची संरक्षकप्रणाली यांचा प्रभावी वापर केला.पाकिस्तानने वापरलेली चिनी व तुर्की बनावटीची यंत्रणा भारतीय तंत्रज्ञानापुढे टिकू शकली नाही.भारताच्या S 400, आकाश,आकाशतीर,आणि ब्रह्मोस या प्रणालींनी सर्व हल्ले अडवले.आकाशतीर ही भारतात बनलेली,अत्याधुनिक स्वयंचलित सुरक्षाप्रणाली यावेळी विशेष चर्चिली गेली.ह्या तंत्रज्ञानामुळे शत्रूंचे हल्ले थोपविले तसेच संपूर्ण जगाला भारतीय सैन्यदलांच्या शौर्याचे दर्शन घडवले गेले.”
विंग कमांडर अविनाश मुठाळ (निवृत्त) ह्यांनी PPT द्वारे ऑपरेशन सिंदुर ह्याची माहिती प्रभावी शैलीत उलगडून दाखवली व अभ्यासपूर्ण माहिती उपस्थितांना दिली.
विंग कमांडर अविनाश मुठाळ म्हणाले की,”ऑपरेशन सिंदुर जागतिक सर्वोत्तम युद्धांपैकी एक असून आत्मनिर्भर भारत अंतर्गत शस्त्रांची मारक क्षमता सिद्ध करून दाखवली आहे.भारताने ऑपरेशन सिंदुर मार्फत ‘सायकॉलॉजिकल व इन्फॉर्मेशन वॉर फेअर’ चे उत्तम दर्शन घडवले.कर्नल सेफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यामार्फत युद्धाची अद्ययावत माहिती देऊन पाकिस्तानवर दबाव आणला व त्यांचा अजेंडा हाणून पडला.आपली इंटिग्रेटेड डिफेन्स सिस्टीम एकदम मजबूत असल्याने त्यांनी केलेले सर्व हल्ले आपण परतावून लावले.त्यांच्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करून ते उध्वस्त केले तसेच सुमारे शंभर अतिरेक्यांचा खात्मा केला.व पाकिस्तानला नामोहरम केले.यामुळे जागतिक संरक्षण बाजारपेठेमध्ये आपल्या शस्त्रांची मागणी वाढलेली आहे”असेही ते पुढे म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव माधव न्यासचे अध्यक्ष सदानंद भागवत हे होते.
भारतीय सैन्याच्या शौर्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा व्याख्यान आयोजनाचा उद्देश होता.
ह्या व्याख्यानास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगरचे संघचालक उदयन पाठक, अविनाश वजल,डॉ सुनील पुणतांबेकर,बाळकृष्ण काळे,डॉ सतीश जोशी ह्यांच्यासह राज्यातील अनेक पूर्व सैन्याधिकारी,नागरिक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.प्रारंभी केशव माधव न्यासचे सचिव अरविंद देशपांडे ह्यांनी संस्थेच्या केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना
दिली.अध्यक्ष सदानंद भागवत ह्यांचे हस्ते एअर मार्शल प्रदीप बापट यांचा तर अरविंद देशपांडे यांचे हस्ते विंग कमांडर अविनाश मुठाळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.कार्यक्रमाचे सूत्र संचलन केशव माधवचे विश्वस्त योगेश कुलकर्णी यांनी केले.प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.

विवाहितेचा छळ:पुण्यात आणखी २ घटना, एकीचा मृत्यू

पुणे- येथील वैष्णवी हगवणे प्रकरणाची धग अजून निवळलेली नसतानाच, पिंपरी चिंचवडमध्ये हुंडाबळीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या 22 वर्षांच्या विवाहितेने लग्नाच्या अवघ्या पाचव्या महिन्यात सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा पती आणि नणंद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नाही, असा आरोप पूजाच्या कुटुंबीयांनी केला आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही घटना उघडकीस आल्याने, राज्यभरात पुन्हा एकदा हुंडाबळीच्या घटनांबाबत तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी खरेदीसाठी माहेरहून 50 हजार रुपये न आणल्याने सासरच्या मंडळींनी मानसिक दबाव टाकल्याचा आरोप पूजाच्या कुटुंबीयांनी केला आहे. पूजाचा विवाह गजानन निर्वळ याच्याशी काही महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र, लग्नानंतर थोड्याच दिवसांत तिला सासरी त्रास दिला जाऊ लागला. माहेरच्यांनी दुचाकीसाठी पैसे न दिल्यामुळे तिचा मानसिक छळ सुरू केला. अखेर या जाचाला कंटाळून पूजाने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तिच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पती गजानन निर्वळ आणि नणंद राधा यांच्याविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेला आता एक महिना उलटून गेला असतानाही संबंधित आरोपी अजूनही मोकाटच आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असला, तरी कारवाईकडे लक्ष देत नसल्याचा आरोप पूजाच्या कुटुंबीयांनी केला आहे. “ही आत्महत्या नव्हे, तर खून आहे,” असा दावा करत पूजाच्या कुटुंबियांनी पोलिसांवर सहकार्य न करण्याचा आरोप केला आहे. तर पोलिसांना याबाबत विचारले असता या प्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

तुझ्या बापाला गाडी द्यायला सांग अशी मागणी नवरा करत होता, तर तू पांढऱ्या पायाची आहेस, असे म्हणत सासू छळ करत होती. अखेर या जाचाला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील लोहगाव भागात घडली आहे.पीडित महिलेचे लग्न २२ मे २०२२ रोजी अजय पवार याच्याशी झाले होते. लग्नानंतर काही महिन्यातच तिला त्रास देण्यास सुरुवात झाली

सासरच्या त्रासाला कंटाळून 23 वर्षीय विवाहितेने झुरळ मारण्याचे औषध पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात पती अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती अजय यांच्याशी 22 मे 2022 मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या सहा महिन्यानंतर अजय पवार यांनी घरगुती कारणावरून फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर फिर्यादी यांची सासू कमल पवारने फिर्यादी यांना “तु माहेरावरुन काय आणले आहेस, तुझ्या आई बापाला काही मिळत नाही, तुमची काही लायकी नाही” असे म्हणत मानसिक त्रास दिला.

पती अजय पवार याने देखील फिर्यादीचा मानसिक छळ केला. मी तुझ्याशी टाइमपास केला, आता तू मेली तरी चालेल. मला पैशाची गरज आहे. मला चारचाकी गाडी घेऊन देण्यास सांग तुझ्या बापाला, अशी मागणी त्याने केली. यावर पीडित विवाहितेने नकार दिला. तेव्हा पतीने तिचा गळा दाबून मारहाण केली. तसेच दीर मनोज पवार याने देखील पीडित विवाहितेला शिवीगाळ केली.

21 मे रोजी पीडितेच्या सासूने हिणवण्यास सुरुवात केली. पहिल्या सुनेला घराबाहेर काढले तसेच तुलाही बाहेर काढेल, अशी धमकी दिली. तसेच तू पांढऱ्या पायाची आहेस, तुझी नजर चांगली नाही. तू घरात आल्यापासून शांतता नाही, असे म्हणत मानसिक छळ केला. अखेर हा सततचा त्रास सहन न झाल्याने पीडितेने झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आता तिची तब्येत ठीक असल्याचे समजते. विशेष म्हणजे या नंतर पीडितेने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे.

ताम्हीणी घाटामध्ये हायड्रोक्लोरीक ॲसिड असलेला टँकर झाला पलटी

0

पुण्यातून कोकणात जाणाऱ्या व कोकणातून पुढे जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी असतानाच माणगाव ते पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात अॅसिडने भरलेला टँकर उलटल्याने खळबळ उडाली आहे. हा मार्ग तातडीने सुरक्षेच्या उपायोजना म्हणून वाहतुकीसाठी तात्काळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा आहेत. हा मार्ग सुरू होण्यासाठी अजून तीन ते चार तासांचा कालावधी लागेल असे सांगितले जात आहे. घटनास्थळी पुणे जिल्ह्यातील व रायगड जिल्ह्यातील पोलीस व सुरक्षा यंत्रणा दाखल झाले आहेत.ताम्हिणी घाटात डोंगरवाडी गावाजवळ रविवारी (ता. 25) सकाळी हायड्रोक्लोरिक अॅसिड नेणारा टँकर रस्त्याच्या कडेला खाली पलटी झाला. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अॅसिड गळती झाली आणि धूर देखील निघत होता. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी व पोलीस पोहचले त्यांनी खबरदारी घेऊन त्या ठिकाणी नियोजन केले. वाहतूक सुरळीत केली.त्यानंतर सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम त्या ठिकाणी पोहोचली व अॅसिड गळती रोखणे, आजूबाजूचा परिसर सुरक्षित करणे आदी कार्यवाही सुरु झाली आणि टँकर काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, या सगळ्यांसाठी अद्याप काही वेळ लागण्याची शक्यता आहे. रविवारची सुट्टी असल्याने सुट्टी संपून कोकणाकडून पुण्यात जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी आहे तर या वेळेला सुट्ट्यांच्या शेवटच्या टप्प्यात पुण्यातून कोकणात दाखल होणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे.कोकणात रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून पुण्याकडे जाणारा हा सगळ्यात जवळचा मार्ग आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, मंडणगड, गुहागर चिपळूण तालुक्यातील अनेक प्रवासी वाहने या मार्गाचा उपयोग करतात. टँकर पलटी झाला ते डोंगरवाडी परिसरातील घाटातील ठिकाण पुणे जिल्ह्याचे हद्दीत आहे, पुणे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत दरम्यान रायगड जिल्ह्यातील माणगाव पोलीसही घटनास्थळी रवाना झाले आहेत.

MH 04 HD 4530नंबरच्या या टँकर मध्ये अंदाजे 28000 हजार लिटर हायड्रोक्लोरिक ऍसिड होते. महाड ते पुणे असा प्रवास करत हा टँकर मे. बीटा केमिकल महाड MIDC येथून मे. पुणे मार्केटिंग, भेकराई नगर फुरसुंगी यथे जात असतांना गाव -डोंगरवाडी ताम्हिणी घाट जवळ धुके असल्यामुळे रोडचा अंदाज न आल्याने खचलेल्या रोडवरून सदर टँकर पलटी झाला टँकर मधील वाहन चालक अडकलेले होते मागून येणाऱ्या बस चालकाने बस थांबवून अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले चालकाला किरकोळ हातांच्या बोटाला जखम झाली.टँकर मधील ऍसिड हे खाली असलेल्या खोल दरीत वाहत गेले रोड वर वाहनांची वर्दळ असल्यामुळे ये जा करण्याऱ्यांना डोळ्यांची जळजळ होऊ लागली जवळपास 90% टँकर रिकामे झाले आहे सध्या क्रेन च्या साह्याने पलटी झालेले टँकर बाजूला करण्यात आले आहे. या कार्यामधे PMRDA अग्निशमन दल, मुळशी आपत्ती व्यवस्थापन टीम, LCS रिस्पॉस टीम, रायगड रेस्क्यू टीम, पोलीस अधिकारी, कर्मचारी मदतीने घटने ठिकाणी मदतकार्य पूर्ण झाले आहे.अपघातस्थळी कोणत्याही प्रकरची जीवितहानी झालेली नाही.

विजय महाजन -PMRDA

भारत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थशक्ती;पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची ऐतिहासिक घोडदौड-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. 25: “भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर पोहोचली असून, आपला देश आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थशक्ती ठरला आहे, ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आणि आनंदाची आहे. हे यश प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या सक्षम नेतृत्वाचे आणि सातत्याने घेतलेल्या ठोस निर्णयांचे फलित आहे. त्यांनी दिलेल्या ‘विकसित भारत-2047’चे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो,” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, नीती आयोगाच्या बैठकीनंतर भारताच्या आर्थिक स्थितीबाबत नीती आयोगाचे सीईओ बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने जपानला मागे टाकून चौथा क्रमांक पटकावला आहे. आता आपल्यापुढे केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी आहेत. ही केवळ आकड्यांची झेप नाही, तर सक्षम धोरणांची, प्रभावी नेतृत्वाची आणि ठोस अंमलबजावणीची प्रचिती आहे.

भारताला लाभलेली तरुण लोकसंख्या, नीती आयोगासारख्या संस्थांचे मार्गदर्शन आणि राज्य-केंद्र सरकारमधील प्रभावी समन्वयामुळे येत्या अडीच ते तीन वर्षांत भारत तिसऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना आपापल्या पातळीवर विकासाचे दीर्घकालीन व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला महाराष्ट्राने सकारात्मक प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र नक्कीच देशाच्या विकासात आघाडीवर असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय धोरणानुसार, महाराष्ट्र सरकारने सुद्धा ‘महाराष्ट्र 2047’ असे व्हीजन तीन टप्प्यात तयार केले आहे. 100 दिवसांच्या सुशासन, नागरिक केंद्रीत उपाययोजना आणि उत्तरदायित्त्व अशा सूत्रावर एक कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने हाती घेतला आहे. यात विविध विभागांनी 700 हून अधिक उद्दिष्ट साध्य केले. आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात 2047 साठी दीर्घकालिन, महाराष्ट्र आपला अमृत महोत्सव साजरा करेल, त्या कालावधीचे म्हणजे 2035साठी आणि प्रतिवर्षाच्या उद्दिष्टांसह 2029 साठीचे अल्पकालिक 5 वर्षांचे असे व्हीजन तयार करण्यात येत आहे. विद्यमान अर्थव्यवस्था 2030 पर्यंत एक ट्रिलियन डॉलर्स करण्याचे मुख्य उद्देश आहे.

भारताच्या आर्थिक प्रगतीचे श्रेय देशातील सामान्य जनतेच्या कष्टांना, उद्योग जगताच्या योगदानाला आणि केंद्र सरकारच्या निर्णयक्षम, परिणामकारक नेतृत्वाला जाते. हे यश आपल्याला अधिक व्यापक, समावेशक आणि शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देणारे आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करून त्यांचे आभार मानले.

नेहा महाजन यांना सुचेता नातू स्मृती युवा सतारवादक पुरस्कार

गुरुवारी सांगीतिक मैफलीचे आयोजन
नेहा महाजन यांचे सतारवादन तर कैवल्यकुमार गुरव यांची गायन मैफल

पुणे : गानवर्धन संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या विशेष सांगीतिक कार्यक्रमात कै. सुचेता नातू यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या युवा सतारवादक पुरस्काराने नेहा विदुर महाजन यांचा गौरव केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार दि. 29 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता एस. एम. जोशी हॉल, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यरत असलेले सुरेश रानडे व जयश्री रानडे हे या पुरस्काराचे प्रायोजक असून त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. दहा हजार रुपये, शाल, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर नेहा महाजन यांचे सतार वादन होणार आहे. त्या नंतर पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. कलाकारांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), प्रशांत पांडव, विनायक कुडाळकर (तबला) साथसंगत करणार आहेत.
नेहा या पंडित विदुर महाजन यांची कन्या असून त्यांना शाश्वती शहा, रवी गाडगीळ, जुनैन खान यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सतारवादनासह अभिनय आणि मॉडेलिंग या क्षेत्रात सुद्धा त्यांचा नावलौकिक आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

सुरेल बंदिशी, मनमोहक चित्रांतून ‘रामगाना’ची रसानुभूती

भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाउंडेशन व अविष्कार क्रिएशन्सतर्फे ‘रामगान’च्या पहिल्या प्रयोगाचे आयोजन

पुणे: सुरेल बंदिशींना प्रासंगिक चित्रांची जोड, विविध रागांमध्ये गुंफलेल्या बंदिशी, कलाकारांचे कर्णमधुर सादरीकरण, बंदिशींना बोलके करणाऱ्या चित्रांचे दर्शन, या माध्यमातून रसिकांनी रामायणातील विविध प्रसंगांवर आधारित ‘रामागाना’ची रसानुभूती घेतली. राम जन्मापासून ते रावणवध करून प्रभू श्रीराम अयोध्येला परतल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक होईपर्यंत, वनवासावेळी माता शबरीची भेट, अहिल्या उद्धार, सीताहरण, सीतेला शोधतानाचा विरह, राम हनुमान भेट, विजयी पताका व जयघोष असे अनेक शब्दबद्ध व चित्रबद्ध केलेले प्रसंग पाहून रसिक भारावून गेले. 

भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत आविष्कार क्रिएशन्सतर्फे आयोजित ‘रामगान’ या सांगितीक मैफिलीचे आयोजन केले होते. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांच्यासह कला क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. बंदिशकार, गायिका व चित्रकार भाग्यश्री गोडबोले यांनी रामायणातील विविध प्रसंगांवर स्वतः रचलेल्या रागाधारित बंदिशींचे सादरीकरण, तसेच त्यावर आधारित रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन अशा दृक-श्राव्य कार्यक्रमाचा हा पहिलाच प्रयोग रसिकांच्या विशेष पसंतीस पडला. पं. अमोल निसळ, भाग्यश्री गोडबोले, डॉ. सानिका गोरेगावकर, सावनी दातार, श्वेता कुलकर्णी यांचे सुरेल शास्त्रीय गायन, खुमासदार शैलीतील डॉ. सुनील देवधर यांचे निवेदन आणि तबल्यावर अमित जोशी, संवादिनीवर शुभदा आठवले, व्हायोलिनवर अंजली राव-सिंगडे यांची लाभलेली साथसंगत यामुळे मैफलीत रंगत वाढली.

‘रघुनंदन रूप मनोहर’ या भटियार, ललत रागातील बंदिशीने मैफलीची सुरुवात झाली. केदार रागातील ‘प्रकट होत खुद’ ही बंदिश श्वेता कुलकर्णी यांनी, तर मालकंस रागातील ‘कड कड कड नाद’ ही बंदिश अमोल निसळ यांनी सादर केली. वनवासाचे वर्णन करणाऱ्या हिंडोल रागातील ‘राम का हो निर्वासन’ व ललत रागातील ‘गमन करत रामलखन’ या बंदिशी सादर करीत सावनी दातार यांनी वनवासाचा प्रसंग उभा केला. सानिका गोरेगावकर यांनी जनसंमोहिनी या शांतरसाच्या रागात ‘रामचरण स्पर्श होत’, तर भूपेश्वरी रागात अमोल निसळ यांनी ‘शूर्पणखा अति क्रोधित’ बंदिशींतून शूर्पणखेचा संताप व्यक्त केला. सानिका गोरेगावकर यांनी ‘शबरी असीम रामभक्त’ ही मिश्र झिंझोटी व ‘मृग प्यारासा’ ही जौनपुरी रागातील बंदिश सादर केली. जयजयवंती रागातील ‘सीताहरण की बात’ बंदिशीतून श्वेता कुलकर्णी यांनी रावण सीतेचे हरण करत असल्याचा प्रसंग उभारला. सेतू बांधण्यात खारुताईचे योगदानावर भाग्यश्री गोडबोले यांनी सादर केलेली शुद्ध सारंग रागातील बंदिश, मारवा, मधुकंस, सोहोनी रागातील बंदिशींनी अशोक वाटीकेतील सीतेच्या मनातील भावना, हनुमान-सीतामातेची भेट, वानरसेनेने केलेल्या जयघोष असे अनेक प्रसंग उभारले. ‘राम सुमीर करुणाकर’ या भैरवीने मैफलीची सांगता झाली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टाच्या आदेशामुळे:ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार, संजय राऊतांचा दावा

खासदार संजय राऊत म्हणाले की, भुजबळ यांनी मंत्रीपदाबद्दल अमित शहा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले, मात्र अजित पवार यांचे नाव घेतले नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे – भुजबळ आता प्रत्यक्ष भाजपमध्येच आहेत. केवळ तांत्रिकदृष्ट्या वेगळ्या गटात आहेत. त्यांनी आता अमित शहा यांचे नेतृत्व मान्य केले आहे. ज्याचे काम शिवसेनेला तोडण्याचे, त्याचे नेतृत्व भुजबळ करतायत, हे दुर्दैव आहे, असेही राऊत म्हणाले. कधीकाळी सीमाप्रश्नासाठी आणि मराठी माणसासाठी रस्त्यावर उतरणारे भुजबळ, आज मुंबई आणि महाराष्ट्र तोडण्याच्या राजकारणात सहभागी झाले आहेत.

संजय राऊत म्हणाले की, मुंबई ही मराठी माणसाचे हृदय आहे. 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने ही मुंबई आपली झाली. आता मोदी-शहा-फडणवीस यांचा डोळा या शहरावर आहे. मुंबई मराठी माणसाच्या हातातून काढण्यासाठी त्यांच्या पक्षाकडून नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप करत राऊत म्हणाले, भुजबळ आता याच पक्षात आहेत, हे मराठी जनतेने लक्षात ठेवायला हवे.

पुण्यात तिहेरी हत्याकांड? २ चिमुकल्या मुलांसह महिलेचा मृतदेह जळलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ

पुणे – जिल्ह्यातील रांजणगाव खंडाळे परिसरात एका महिलेसह दोन मुलांचा मृतदेह आढळून आला आहे. अहिल्यानगर हायवेजवळ ग्रोवेल कंपनीच्या मागच्या बाजूला तीन मृतदेह आढळल्यानं खळबळ उडालीय. मृतदेह जास्त जळाले असल्यानं त्यांची ओळख पटवणं कठीण आहे.प्राथमिक अंदाजानुसार नवऱ्याने पत्नी आणि मुलांना जाळलं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत.

घटनेची माहिती समजताच रांजणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी तपास सुरू आहे. ही घटना कौटुंबिक वादातून घडली की अन्य कोणते कारण आहे? याचाही तपाक केला जात आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तर घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे.

महिला आणि तिच्या दोन मुलाला जाळून टाकलं असून मृतदेहांची ओळख पटलेली नाही. रांजणगाव खंडाळे हद्दीमध्ये या तिघांना आणण्यात आलं. त्यांच्यावरती पेट्रोल टाकून त्यांना जाळण्यात आलं. मात्र पावसामुळे ते न पेटल्याने तिघांचेही मृतदेह तसेच राहिले असण्याची शक्यता आहे.

मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल:12 दिवस आधीच आगमन…

हवामान विभागाने सांगितले ,’आज 25 मे 2025 रोजी नैऋत्य मान्सून पश्चिममध्य आणि पूर्वमध्य अरबी समुद्राच्या काही भागात, कर्नाटकच्या काही भागात, संपूर्ण गोवा, महाराष्ट्राच्या काही भागात, पश्चिममध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि मिझोरामच्या काही भागात, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात पुढे सरकला आहे.

मान्सूनची उत्तर सीमा 15.5°N/55°E, 15.5°N/60°E, 16°N/65°E, 16.5°N/70°E, देवगड, बेलागावी, हावेरी, मंड्या, धर्मपुरी, चेन्नई, 15°N/83°E, 18°N/87°E, 20°N/89°E, ऐझवाल, कोहिमा, 26.5°N/95°E, 27°N/97°E.

पुढील 3 दिवसांत नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात, कर्नाटकसह बंगळुरू, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिममध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षी राज्यात आणि देशभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा देशात मान्सून 107 टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्यातही समाधानकारक आणि भरघोस पावसाची शक्यता असल्याने कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळू शकतो.

1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यानचा पाऊस मान्सून-मान्सून लवकर किंवा उशिराचा पावसावर परिणाम होत नाही. फक्त 1 जून ते 30 सप्टेंबर दरम्यानचा पाऊस मान्सूनचा म्हणून नोंदवला जातो. गेल्या 50 वर्षांत, मान्सून नियोजित तारखेला म्हणजे 1 जून रोजी फक्त तीनदा दाखल झाला. 25 वेळा तो 1 ते 12 दिवस आधी आला आहे. 22 वेळा तो उशिरा आला आहे. 2009 मध्ये, जेव्हा मान्सून 23 मे रोजी आला तेव्हा फक्त 78% पाऊस पडला. 2009 मध्ये मान्सून 13 जून रोजी आला होता, पण त्या वर्षी 102% पाऊस पडला होता.

राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा- अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे तसेच कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नांदेड, लातूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.