डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “एका विद्यार्थीप्रिय शिक्षकाचा सत्कार करताना मला आनंद होतो आहे. शिक्षकाच्या हस्ते शिक्षकाचा सत्कार हे केवळ पुण्यातच शक्य आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्राणवायू असतो, हे डॉ. अभ्यंकरांनी सिद्ध केले आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक केवळ अभियांत्रिकी शिक्षकांपर्यंतच मर्यादित नाही. प्रत्येक शिक्षक, प्राध्यापकांसाठी हे पुस्तक आहे. प्राध्यापक कसा असावा त्याच्या बदलाच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी या पुस्तकांत मांडल्या आहेत. आयुष्यात प्राध्यापक होताना या छोट्या छोट्या गोष्टीही मोठ्या वाटायला लागतात. उत्तम शिक्षक घडवणे हे अभ्यंकरांचे स्वप्न आहे.”
डॉ. दीपक टिळक म्हणाले, “ज्या शिक्षकाने आपल्या जीवनात चांगले ७५ शिक्षक बनवले तो शिक्षक या जगात सगळ्यात उत्तम शिक्षक असतो. ते काम अभ्यंकर सरांनी करून दाखवले आहे. शिक्षकांचेही मार्गदर्शक असलेल्या अभ्यंकरांनी आपल्या पुस्तकात व्यक्तिगत आणि कौशल्य अशी विभागणी केली आहे. शिक्षकाने कसे असावे, काय करावे व करू नये, स्त्री-पुरुष समानता, जेष्ठ व लहानांनी कसे वागावे, अशा छोट्या छोट्या गोष्टींवर भर दिला आहे. पण आयुष्यात ही खूप मोठी शिकवण आहे. संस्थेच्या उत्कर्षासाठी धडपड करा, तुमचा उत्कर्ष आपोआप होईल, असा संदेश त्यांनी दिला आहे.”
बाळासाहेब वाघ म्हणाले, “एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे उत्तम उदहारण अभ्यंकर सर आहेत. शिक्षकांबद्दल स्पष्ट मत मांडण्याचे आणि लिहिण्याचे धाडस त्यांनी केले आहे. शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी या पुस्तकाचा निश्चित उपायोग होईल. माझ्या अडचणीच्या काळात अभ्यंकरांनी मला खुप मदत केली. एक उत्कृष्ट सल्लागार त्यांच्या रूपाने मला मिळाला आहे.”
परिमल चौधरी यांनी आकाशवाणीमुळे डॉ. अभ्यंकरांची ओळख झाल्याचे सांगून केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर शिक्षकांनाही घडविणारा शिक्षक मला त्यांच्यात दिसला. शिक्षकांसाठी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकासाठी आपण मदत करायची हे ठरवले. शिक्षकांनाही इंडस्ट्रीज ट्रेनींग महत्वाचे आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.



