Home Blog Page 293

अजितदादांच्या पक्षानंतर आता शिंदे गटाच्या मंत्र्याच्या मुलावर विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळाचे आरोप

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने शारीरिक व मानसिक छळाचे गंभीर आरोप केलेत. या प्रकरणी पीडितेने सिद्धांत शिरसाट यांना कायदेशीर नोटीस बजावत त्यांच्यावर मानसिक व शारीरिक छळासह हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.दरम्यान,या प्रकरणी सिद्धांत शिरसाट यांनी या नोटीशीची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगत आपले हात वर केले आहेत .

पीडित महिलेचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धांत शिरसाट यांनी चेंबूर येथील त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्ये पीडित महिलेशी लग्न केले. दोन वर्षे ते चांगले राहिले. पण नंतर तिसऱ्याच मुलीशी त्यांचे अफेअर सुरू झाले. यामुळे त्यांनी पीडितेकडे दुर्लक्ष करत तिचा मानसिक छळ सुरू केला. तिने कुठे तक्रार दाखल करू नये म्हणून सिद्धांत शिरसाटने स्वत:च्या डोक्याला बंदूक लावत तिला धमकावले.

वकील चंद्रकांत ठोंबरे म्हणाले की, सिद्धांत शिरसाट यांनी पीडितेला छत्रपती संभाजीनगरलाही येऊ दिले नाही. तू तिकडे आलीस तर तुझे तंगडे तोडू अशी धमकी त्यांनी तिला दिली. त्यामुळे आम्ही त्यांना यासंबंधी नोटीस पाठवून पीडितेला 7 दिवसांच्या आत नांदण्यास घेऊन जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी पीडितेला नांदण्यास नेले नाही तर आम्ही महिला अत्याचार प्रतिबंधक काद्यांतर्गत त्यांच्यावर 3 केस दाखल करणार आहोत.

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. सदर महिलेने सिद्धांत यांना कायदेशीर नोटीस बजावून त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची 2018 मध्ये सोशल मीडियावरून सिद्धांत शिरसाट यांच्याशी ओळख झाली. काही दिवसांतच हे नाते चेंबूर येथील एका फ्लॅटमध्ये शारीरिक संबंधांपर्यंत पोहोचले. या संबंधानंतर सिद्धांतने आत्महत्येच्या धमक्या देत तिला भावनिक ब्लॅकमेल केले. त्याचबरोबर लग्नासाठी दबाव आणला.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, सिद्धांतच्या सततच्या भावनिक आश्वासनांवर विश्वास ठेवून तिने त्याच्याशी विवाह केला. मात्र या नात्याचा शेवटही वेदनादायक ठरला. महिलेला गर्भधारणाही झाली होती, पण सिद्धांतने जबरदस्तीने तिचा गर्भपात करवून घेतल्याचा उल्लेख तिने नोटीसीमध्ये केला आहे. संजय शिरसाट हे राज्याचे सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यामुळे पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई न करता हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

इस्कॉन पुणेद्वारे जगातील सर्वात मोठी मूल्य शिक्षण स्पर्धा संपन्न 

इस्रो येथे राष्ट्रीय बक्षिस वितरण समारंभ :  इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे कौतुक

पुणे : विज्ञान आणि अध्यात्म याचे प्रगटीकरण करीत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) बेंगळुरू येथील मुख्यालयात इस्कॉन पुणे द्वारे दरवर्षी आयोजित केली जाणारी जगातील सर्वात मोठी मूल्य शिक्षण स्पर्धेचा राष्ट्रीय बक्षिस वितरण समारंभ पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद इस्रोचे माजी अध्यक्ष आणि चांद्रयान-३ मोहिमेचे प्रमुख व्यक्ती डॉ. एस. सोमनाथ यांनी भूषवले. डॉ. सोमनाथ यांनी देशभरातील ६० राष्ट्रीय अव्वल दर्जाच्या विद्यार्थ्यांचा वैयक्तिकरित्या सत्कार केला, त्यांना मेडल, भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या तरुण यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना इस्कॉनच्या या उपक्रमातून शिकलेल्या शाश्वत नैतिक आणि आध्यात्मिक मूल्यांचे पालन करण्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

दरवर्षी डिसेंबरमध्ये आयोजित केली जाणारी ही मूल्यशिक्षण स्पर्धा संपूर्ण भारतातील २० जिल्ह्यांतील १.५ लाखांहून अधिक शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते, ज्यांच्या परीक्षा ऑनलाइन घेतल्या जातात. जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना फेब्रुवारीमध्ये स्थानिक पातळीवर बक्षीस दिले जातात, तर राष्ट्रीय विजेते एप्रिल – मे मध्ये होणाऱ्या ग्रँड फिनालेसाठी बेंगलोरमध्ये एकत्रित होतात. गेल्या काही वर्षांत, १२ लाखांहून अधिक मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. ज्यामुळे हा जगातील सर्वात मोठा मूल्यशिक्षण उपक्रम बनला आहे.

डॉ. एस. सोमनाथ म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्ये रुजवण्याचा दूरदर्शी प्रयत्न इस्काॅन करत आहे. तंत्रज्ञान मानवी सुख सुविधा वाढवण्याचे काम करत असताना आत्मचिंतन आणि चारित्र्य मजबूत करण्यास देखील प्रेरित केले पाहिजे. भगवद्गीता आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यात इस्कॉनचे संस्थापक श्री़ प्रभुपाद यांचे योगदान असामान्य आहे असे गौरवोउद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमात डॉ. सोमनाथ यांच्या हस्ते त्यांच्या आगामी महाभारत पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले. या समारंभात फिनोलेक्स, मोटो व्होल्ट, अॅव्हॉन सायकल्स, फ्लेअर पेन्स, न्यूट्रिशियस चिक्की, बोरोसिल, ड्यूक टी-शर्ट्स आणि अँम्ब्रेन वॉचेस यासारख्या महत्त्वपूर्ण कॉर्पोरेट प्रायोजकांच्या प्रतिनिधींनीही हजेरी लावली. 

शुभ विलास प्रभू यांनी आधुनिक काळात मूल्य-आधारित शिक्षणाची गरज, प्रभाव आणि परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. इस्रोचे वरिष्ठ अधिकारी हरे कृष्णन , गणेश पिल्लई यांनी या उपक्रमाबद्दल कौतुक व्यक्त केले. राष्ट्रीय विजेते विद्यार्थी आणि इस्रो अध्यक्ष यांच्यातील व्यक्तिगत संवादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

पुणे इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष श्रीमान राधेश्याम प्रभू यांचे मार्गदर्शन मिळाले. पुणे इस्कॉन मंदिराचे वरिष्ठ प्रचारक श्रीमान वरदराज प्रभू या कार्यक्रमाचे समन्वयक आहेत.

‘ऑपरेशन सिंदूर’वर निवृत्त ले. जनरल राजेंद्र निंभोरकर आणि ले. जनरल विनायक पाटणकर यांची प्रकट मुलाखत

कोथरुडकर अनुभवणार ‘नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार’

पुणे:ऑपरेशन सिंदूर’च्या यशाची सर्व देशवासियांना माहिती व्हावी, यासाठी असीम फाऊंडेशन आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून ‘ऑपरेशन सिंदूर- नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार’ हा कार्यक्रम कोथरूडमध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ले. जनरल राजेंद्र निंभोरकर (नि.) आणि ले. जनरल विनायक पाटणकर (नि.) यांची प्रकट मुलाखत होणार आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने दिनांक ६ आणि ७ मे २०२५ रोजी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून आपल्या अचाट सामर्थ्याचे दर्शन संपूर्ण जगाला घडवत, दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्धवस्त केले. अन् दहशतवादाला मातीत मिळविण्याची भारताची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये प्रचंड आनंद व्यक्त करण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ‘जशास तसे’ उत्तर मिळाले. तसेच, यामुळे भारतीय सैन्य दलाच्या अचाट आणि अचंबित करणाऱ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला झाले.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्विततेची माहिती सर्वांना व्हावी; यासाठी असीम फाऊंडेशन आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून ‘ऑपरेशन सिंदूर- नव्या भारताचा सामर्थ्यविष्कार’ हा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमात ले. जनरल राजेंद्र निंभोरकर (नि.) आणि ले. जनरल विनायक पाटणकर यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार डॉ . उदय निरगुडकर संवाद साधणार आहेत. दिनांक ३० मे २०२५ रोजी सायं. ६.०० ते ८.३० वेळेत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रमहोणार आहे.

या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री माधुरी ताई मिसाळ हे देखील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

अभिनेता सोनूसूदने हिमाचलमध्ये-हेल्मेटविना चालवली बाईक :नालाही ओलांडला

हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पिती येथे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हेल्मेटविना कपडे काढून बाईक चालवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत अनेक बाईकर्स दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सोनू सूद दुचाकीवरून धोकादायक नाला ओलांडताना दिसत आहे. यानंतर तो समोर उभ्या असलेल्या चाहत्यांजवळ थांबतो आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करतो.

व्हिडिओ २०२३ सालचा

सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी या व्हिडिओमध्ये हिमाचल प्रदेश पोलिसांना टॅग केले आहे आणि वाहतूक नियमांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, लाहौल-स्पिती पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास डीएसपीकडे सोपवला आहे. पोलिसांनी त्यांच्या प्रेस नोटमध्ये असेही म्हटले आहे की, प्राथमिक माहितीनुसार, हा व्हिडिओ २०२३ सालचा असल्याचे दिसते. उर्वरित तपास सुरू आहे आणि नियमांनुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
५२ सेकंदांचा व्हिडिओ: सुमारे ५२ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये, बॉलिवूड स्टार सोनू सूद हेल्मेटविना बाईक चालवताना दिसत आहे. त्याने चड्डी आणि गडद चष्मा घातला आहे. त्याच्या मागे अनेक दुचाकीस्वार आहेत, ज्यांनी हेल्मेट घातले आहे.
उभे राहून बाईक चालवली: व्हिडिओमध्ये सोनू चालत्या बाईकवर उभा राहतो असे दिसते. यानंतर, तो कपडे आणि हेल्मेट दोन्ही घालून बाईक चालवताना दिसतो.
बाईक नाल्यात अडकली: सोनू इतर बाईकस्वारांसह धोकादायक नाला ओलांडतो. रस्त्याच्या खराब स्थितीमुळे त्याची बाईक नाल्याच्या मध्यभागी अडकते. मग इतर बाईकस्वार त्याला मदत करतात.
चाहत्यांसोबत फोटोशूट: नाला ओलांडल्यानंतर, सोनू थोडे अंतर चालतो आणि त्याचे हेल्मेट काढतो आणि थांबतो. तिथे उभे असलेले लोक त्यांचे फोटो काढण्यासाठी त्याच्या जवळ जातात. सोनू एक एक करून सर्वांशी हस्तांदोलन करतो आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतो. मग तो सर्वांसोबत फोटो काढतो.वाहतूक नियमांचे उल्लंघन: लाहौल-स्पितीच्या एसपी कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे की सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक बॉलिवूड अभिनेता लाहौल-स्पिती जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा व्हिडिओ २०२३ सालचा असल्याचे दिसून येत आहे.
केलाँग डीएसपीकडे तपास सोपवण्यात आला: निवेदनात म्हटले आहे की, व्हिडिओची सत्यता शोधण्यासाठी, तपास केलाँग डीएसपी रश्मी शर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल.
पर्यटकांना आवाहन: या प्रेस नोटद्वारे, लाहौल-स्पिती पोलिस सर्व लोकांना आणि पर्यटकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि शिस्तबद्ध आणि जबाबदार वर्तन स्वीकारण्याचे आवाहन करतात.

मिठी नदी घोटाळ्यात डिनो मोरियाची चौकशी

‘द रॉयल्स’ या मालिकेमुळे सध्या चर्चेत असलेल्या डिनो मोरियाची अलीकडेच EOW (इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग) ने चौकशी केली आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता ते आपले म्हणणे नोंदवण्यासाठी कार्यालयात पोहोचले. मिठी नदी घोटाळ्यातील मुख्य आरोपी केतन कदमच्या कॉल रेकॉर्डमधून डिनो मोरियाचे नाव समोर आले आहे.

फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, ईओडब्ल्यूमधील सूत्रांनी सांगितले की, डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅन्टीनो यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मिठी नदी घोटाळ्यातील आरोपी केतनशी डिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँटिनो यांचे अनेक फोन कॉल्स झाल्याचे आरोप आहेत. चौकशीदरम्यान, तपास अधिकाऱ्याने त्याच्या संपर्क तपशीलांशी संबंधित प्रश्न विचारले.

खरंतर, मिठी नदीची स्वच्छता मुंबई महानगरपालिकेने केली होती. यासाठी, गाळ पुशर्स आणि ड्रेजिंग मशीन वापरण्यात आल्या आहेत. कोची येथील कंपनी मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून मोठ्या रकमेला ही मशीन्स खरेदी करण्यात आली होती.

या प्रकरणाच्या चौकशीत असे दिसून आले की केतन कदम आणि जय जोशी यांनी मॅटप्रॉप कंपनीचे अधिकारी आणि बीएमसीच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून स्वच्छतेच्या नावाखाली ६५ कोटी रुपयांचा घोटाळा केला.

घोटाळ्यातील मुख्य आरोपी केतन कदम यांच्या कॉल रेकॉर्डची चौकशी केली असता, अभिनेता डिनो मोरिया आणि त्याच्या भावाची नावे समोर आली. त्या दोघांनीही केतन कदमशी अनेक वेळा बोलले होते. तपास अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, डिनो मोरिया आणि केतन हे केवळ मित्र नाहीत तर त्यांच्यात आर्थिक व्यवहार देखील असू शकतात. यामुळेच तपासाच्या कक्षेत डिनोची चौकशी केली जात आहे.

नेटफ्लिक्सवरील ‘द रॉयल्स’ या मालिकेत नवाब सलाउद्दीनच्या भूमिकेमुळे डिनो मोरिया चर्चेत आहे. येत्या काळात तो मल्टीस्टारर चित्रपट ‘हाऊसफुल ५’ मध्ये दिसणार आहे. डिनो मोरियाने १९९९ मध्ये आलेल्या ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, जरी त्याला २००० मध्ये आलेल्या ‘राज’ या चित्रपटातून ओळख मिळाली.

आज पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

0

आज दिनांक 27/05/2025 रोजी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून अहमदनगर, कोल्हापूर, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, परभणी, पुणे , सांगली, सातारा, ठाणे या जिल्ह्यातपुढील ३ तासांत जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहावे.

पाऊस ; दि.27/05/2025
आजचा पाऊस / एकुण
यवत. 25•00 / 331.00
केडगाव.35•00/ 345.00
पाटस. 38•00/ 336.00
दौड. = 49•00/ 371•00
रावण गांव =50•00 / 286•00
बोरीबेल = 32.00 / 265.00
भिगवण = 20•00 / 288•00
पळसदेव=49•00/ 256.00
शेटफळ=48•00/ 736.00
इदापूर =46•00/ 356.00

पाऊस
दिनांक 27/5/25

(1जुन 24 पासुन)*
भाटघर :———-02.(1600)
निरादेवघर:——26.(2946)
विर:——————19.(870)
गुंजवणी :——–65.(3250)
पिंपरा (निरा) :–32.(1110)
वडगाव:———–04.(1106)
मानप्पा वस्ती:—00.(1023)
पणदरे बंगला:—–20.(908)
मळेगाव कॉलनी:-15.(933)
बारामती:———28.(1779)
सनसर:———–23.(1058)
अंथुर्णे:————–39.(670)
निमगाव :———-57.(821)
बावडा:————-45.(610)

यंदा अवकाळी पावसाने मान्सूनच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेस मोठा दिलासा मिळणार असून पाणीकपातीचे संकट टळणार आहे. पहिल्याच दिवशी या चारही धरणांमध्ये २८ एमएलडी पाण्याची वाढ झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

पाणलोट क्षेत्रात रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. खडकवासला १६ मिमी, पानशेत ९९ मिमी, वरसगाव ९२ मिमी तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पुढील काही दिवस पावसाचा जोरही वाढणार आहे. शहराला खडकवासला धरणासाखळी प्रकल्पातील वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला धरणातून पाणी पुरवठा केला जातो.

या चारही धरणांची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता २९.५० टीएमसी आहे. या धरणातून शहरासह, जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना आणि सिंचना योजनांसाठी पाणी दिले जाते. मागील वर्षी ही चारही धरणे १०० टक्के भरली असली तरी यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात उन्हाचा कडका वाढल्याने शहरात पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे हा पाणीसाठा साडेपाच टीएमसीपर्यंत खाली आला होता. त्यामुळे मागील काही वर्षांप्रमाणेच जून महिन्यातच कपात ओढावण्याची शक्यता होती. मात्र, यंदा मे महिन्यातच पाणी वाढण्यास सुरुवात झाली.

शहरात तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी मे महिन्यात पूर्वमोसमी पाऊस होत असला तरी, उन्हाळ्यामुळे जमीन तापल्याने तसेच पावसाचे प्रमाण कमी असल्याने प्रत्यक्षात मान्सूनच्या आगमनानंतरच धरणांमधे पाणीसाठ्यास सुरुवात होते. सर्वसाधरणपणे जूनच्या अखेरीस पाणीसाठा वाढण्यास सुरुवात होते.

मात्र, यंदा मे महिन्यातच या चारही धरणांत १५० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने २६ मे पासूनच पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी सायंकाळी या चारही धरणांचा पाणीसाठा ५.६६ टीएमसी होता. तर दिवसभरात महापालिकेचा शहराचा पाणी पुरवठा तसेच कालव्यातून दिवसभर पाणी सोडण्यात आल्यानंतरही हा पाणीसाठा ५.७० टीएमसी झाला आहे. त्यामुळे आता या पुढे धरणात येणारे पाणी वाढतच जाणार आहे.

पुण्यात मराठा समाजाच्या नेत्यांचा मोठ्ठा निर्णय:हुंडा घेणाऱ्या आणि महिलांचा छळ करणाऱ्या कुटुंबांवर बहिष्कारबाबत आचारसंहिता ठरवणार

पुणे- वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे मराठा समाजाच्या नेत्यांनी मोठी चळवळ सुरु केली आहे . या प्रकरणाने खळबळ माजली आहे. यानिमित्ताने लग्नात ज्या अनिष्ट प्रथा सुरु झाल्या, त्या बंद करण्याबाबतची चर्चा आणि काही निर्णय सोमवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या एका बैठकीत झाले आहे. आगामी काळात पुणे शहरापुरती एक कार्यकारिणी निर्माण करुन व्यासपीठ तयार करण्याचे बैठकीत ठरवले गेले आहे.

शांताई हॉटेल मध्ये झालेल्या बैठकीत शहरातील प्रमुख लोकांनी कोणत्या अनिष्ट प्रथा दूर करण्याचे ठरवले आहे. हुंडासारखे प्रकार दिसले आणि महिलेचा छळ झाला तर संबंधित कुटुंबासोबत रोटी-बेटी व्यवहार बंद केला जावा .ज्या घरात अशा पध्दतीने लग्न होतात व मुलींना त्रास होतो त्याठिकाणी लग्न न करण्याचे ठरवण्यात येणार आहे. वेळेत लग्न लावणे, मान्यवर सत्कार रद्द करणे, लग्नात मान्यवर हे नवरदेव किंवा इतर पाहुणे यांना सोन्याची चैन, अंगठी, वाहनाच्या चाव्या देणार नाही. मर्यादीत लोकात, कमी खर्चात आणि वेळेत लग्न समारंभ पुढील काळात पार पाडणे आदी गोष्टीवर भर दिला जाणार आहे.यावेळी आमदार चेतन तुपे,अंकुश काकडे,राजलक्ष्मी भोसले,दत्ता धनकवडे, अरविंद शिंदे,माजी आमदार सुनील टिंगरे, प्रशांत जगताप, श्रीकांत शिरोळे, दत्ता बहिरट, कमल व्यवहारे,संजय बालगुडे ,विकास पासलकर ,राजेंद्र कोंढरे शाम मानकर उपस्थित होते.
बैठकीत अनेक वक्त्यांनी मते व्यक्त केली. शहरातील अनेक मातब्बर घराणी आहे त्यांना सोबत घेऊन समाजातील ज्या अनिष्ट प्रथा आहे त्या दूर करणे प्रयत्न करण्यात येतील. पुणे शहराला ऐतिहासिक वारसा आहे. पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. पुणे शहराने नेतृत्व करुन मराठा समाजासोबत इतर समाजातील अनिष्ट प्रथा दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी अनेक दिवस पुढील काळात प्रयत्न करण्यात येतील.

समाजाच्या भितीपोटी लोक लग्न झालेल्या मुलींना पुन्हा माहेरी आणत नाही, परंतु आता समाज लग्न झालेल्या मुलींच्या पाठीशी राहील. मराठा समाजावर ज्याप्रकारे चिखलफेक केली जात आहे, ती चुकीची आहे. लग्नात जो बडेजावपणा केला जात आहे, तो बंद करण्यासाठी आज समाजाने पुढाकार घेतला आहे. राजेंद्र हगवणे कुटुंबात जे घडले त्याचे समर्थन कधी केले जाणार नाही. सुसंस्कृत समाजाला दिशा देण्याचे काम करुन चुकीच्या रुढी, परंपरा यांना छेद दिला जाईल. यापुढील काळात देखील वारंवार बैठका घेऊन नवीन आचारसंहिता तयार केली जाईल.

पालखी सोहळ्यासाठी उत्कृष्ट नियोजन करा; पदाधिकाऱ्यांच्या सूचना विचारात घ्या- अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी

पुणे, दि. २६: आगामी आषाढी एकादशी यात्रा पालखी यात्रा सोहळ्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी पाणी, स्वच्छता, शौचालये, वारकऱ्यांसाठी आरोग्यव्यवस्था, औषधसाठा आदींची उत्कृष्ट व्यवस्था करावी; तसेच पालखी सोहळा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून आवश्यक कामे तातडीने करावीत, अशा सूचना पुणे महसूल विभागाच्या अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी दिल्या.

विधानभवन येथे आयोजित आषाढी एकादशी यात्रा पालखी यात्रा पूर्वतयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पिंपरी चिंचवडचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पुणे पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त महेश पाटील उपस्तित होते. तर दूरदृष्य प्रणालीद्वारे सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी तसेच विविध पालखी सोहळ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यंदा पावसाचे प्रमाण पाहता पालखीला जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याचे सांगून श्रीमती द्विवेदी म्हणाल्या, एकत्रित नियंत्रण कक्ष समन्वयाने सुरू राहील, सर्व अधिकारी परस्परांच्या संपर्कात राहतील असे नियोजन करावे. पालखी सोहळ्याला होणारी अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने पालखी मार्गावर गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग करावा. आवश्यक तेथे निरीक्षण मनोरे उभे करावेत. साखळी चोरीच्या (चेन स्नॅचिंग) घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक ते मनुष्यबळ पुरवावे. पार्किंगची व्यवस्था पुरेशी असेल याकडे लक्ष द्यावे.

गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्य मार्गांच्या दुरुस्तीबरोबरच पालखी मार्गाला जोडले जाणारे कच्च्या रस्त्यांची दुरुस्ती करणे, रस्त्यांची कामे सुरू आहेत असलेल्या ठिकाणचा रस्त्यावरील राडारोडा काढणे, मुरुमीकरण करणे आदी उपाययोजना कराव्यात.

वारकऱ्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी टँकर भरण्यात येणाऱ्या स्रोतांची तपासणी करावी आणि निर्जंतुकीकरणासाठी टीसीएलची व्यवस्था करावी. ते वापरासाठी वैध कालावधीतील असल्याची खात्री करावी. पालखी मार्गावरील दुकानातील खाद्यपदार्थांचे, पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करावी. वारकऱ्यांच्या जेवणानंतर उरणारे अन्नाचे व्यवस्थित विल्हेवाट लागेल जेणेकरून रोगराई पसरणार नाही हे पहावे.

यंदा मोबाईल स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्यात आली असून त्यांच्या स्वच्छतेसाठी पुरेसे कर्मचारी नेमावेत. त्यांची जेट स्प्रे द्वारे नियमित स्वच्छता व्हावी. त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सतत उपलब्ध असतील याची दक्षता घ्यावी. स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याचे टँकर, नियंत्रणकक्ष, भोजनव्यवस्था आदी सोयी- सुविधांची माहिती वारकऱ्यांना व्हावी यासाठी दिशादर्शक फलक (सायनेजेस) लावण्यात यावेत. पालखी काळात वाहतुकीसाठी रस्ते बंद केल्यास पर्यायी रस्त्यांची माहिती जनतेपर्यंत प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जाईल असे नियोजन करावे, आदी सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती देण्यात आली.

सोलापूर जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद म्हणाले, गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व सीसीटिव्ही कॅमेरांचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी काही ॲपही विकसित करण्यात येणार आहेत. एकात्मिक नियंत्रण कक्ष उभा करण्यात येणार असून कक्षातील सर्व विभागांच्या प्रमुखांना वॉकी टॉकी देऊन संवाद व्यवस्था बळकट करण्यात येणार आहे. अपघात मुक्त वारी करण्यासाठी नियोजन केले आहे. पावसाचे प्रमाण पाहता दिंड्यांना वॉटरप्रुफ तंबू देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

सातारा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले. खासगी कुटुंबांनी वारकऱ्यांसाठी आपली शौचालये वापरास देण्याची इच्छा दर्शवली आहे अशा घरांवर पांढरे झेंडे लाऊन पालखी सोहळ्यात माहिती देण्यात येणार आहे. रस्ते दुरुस्ती, फिरत्या शौचालयांची दुरुस्ती, पाण्याचे टँकरची व्यवस्था आदी माहितीही त्यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले, पुणे जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर पालखीसाठी १ हजार ८०० टँकर, संत तुकाराम महाराज पालखीसाठी १ हजार २०० तर संत सोपानदेव महाराज पालखीसाठी २०० टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे. पालखी मुक्कामी आरोग्य पथक, नियंत्रण कक्ष, हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात येणार असून रुग्णवाहिका सोबत असणार आहेत. सार्वजनिक उद्घोषणा कक्षाची व्यवस्था करण्यात येणार आहे. वारकऱ्यांसाठी ३ हजार पालखी मेडिसीन किट पालखी सोहळा प्रमुखांकडे देण्यात येणार आहे. पोलीस विभागाला गर्दी वा वाहतूक नियंत्रणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ड्रोन कॅमेरे देण्याबाबतचे नियोजन होईल, असेही ते म्हणाले.

पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था, गर्दी नियंत्रण, पर्यायी वाहतूक मार्ग, वाहतूक कोंडीवरील उपाययोजना आदींविषयी माहिती दिली.

यावेळी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिचंवड महानगरपालिका, महावितरण, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांनी आपल्या तयारीची माहिती दिली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान ट्रस्ट, श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड, श्री संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर जिल्हा जळगाव, श्री संत एकनाथ महाराज संस्थान पैठण, श्री संत चांगावटेश्वर महाराज संस्थान सासवड आदींचे प्रतिनिधींनी विविध सूचना केल्या.
0000

देशात सर्वाधिक हेलिकॉप्टर पुण्यात असल्याने,शहरात स्वतंत्र हेलिपोर्ट तयार करणार – मुरलीधर मोहोळ

पुणे-देशात सर्वाधिक हेलिकॉप्टर पुण्यात असल्याने, शहरात स्वतंत्र हेलिपोर्ट तयार करण्याचा विचार सुरू असून, त्यासाठी एका ठिकाणी जागेची पाहिली आहे. याशिवाय, देशातील सर्वात मोठी एव्हिएशन गॅलरी देखील पुण्यात उभारण्यात येणार, असल्याची माहिती केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी (दि. २६) पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,’पुण्याची हवाई वाहतूक क्षेत्रातील वाढती भूमिका लक्षात घेऊन आम्ही अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर काम करत आहोत. पुण्यात देशात सर्वाधिक हेलिकॉप्टर असल्याने येथे स्वतंत्र हेलिपोर्टची नितांत गरज आहे, ज्यावर आम्ही काम सुरू केले आहे. त्याचबरोबर, देशातील सर्वात मोठी एव्हिएशन गॅलरी पुण्यात तयार करून आम्ही हवाई वाहतूक क्षेत्रातील भारताची प्रगती आणि भविष्यातील शक्यता दर्शवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मोहोळ यांनी काय काय सांगितले….

नवी मुंबई विमानतळ:- नवी मुंबई विमानतळ ऑगस्ट अखेरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत सुरू होईल.

पीएमपीएमएल बस: – पीएमपीसाठी १,००० बस मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, राज्य शासनाकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. पी एम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत लवकरात लवकर बस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

पुणे विमानतळ धावपट्टी विस्तारीकरण :- पुणे विमानतळावरील धावपट्टी विस्तारीकरणासाठी ओएलएस सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यानुसार भूसंपादन करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात येणार असून, यासाठी सुमारे महिनाभर लागेल. धावपट्टी विस्तारीकरणानंतर पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा वाढवण्यात येईल.

‘उडान यात्रा कॅफे’:- पुणे विमानतळावर सुरू करण्यात आलेल्या ‘उडान यात्रा कॅफे’ला चांगला प्रतिसाद मिळाल्याने, मुंबईतील विमानतळावर देखील हा कॅफे सुरू करण्यात येणार आहे.

लहान विमानतळांचा विकास:- सोलापूर, अकोला, शिर्डी यांसारख्या छोट्या विमानतळांचा विकास करून ‘उडान’ योजनेअंतर्गत विमानसेवा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

नाशिक कुंभमेळा:- नाशिक कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक येणार असल्याने, त्या पार्श्वभूमीवर देखील विमानोड्डानांचे नियोजन करण्यात येणार आहे.

मुळशीमधील नेरे दत्तवाडीमध्ये कोसळलेले ३ वीजखांब उभारून वीजपुरवठा सुरळीत

पुणे, दि. २६ मे २०२५: मुळशी तालुक्यातील नेरे दत्तवाडीमध्ये वादळ व मुसळधार पावसामुळे गुरुवारी (दि. २२) महावितरणचे तीन वीजखांब कोसळले होते. त्यामुळे १८ वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. पावसाची संततधार सुरूच राहिल्याने परिसरात चिखल व शेतात पाणी साचले. त्यामुळे वीजखांब उभारण्यास व इतर दुरुस्ती कामांना विलंब झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी तीन वीजखांब उभारून रविवारी सकाळी (दि. २५) १८ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू केला. मात्र त्यापैकी तीन वीजग्राहकांकडील सर्व्हीस केबलमध्ये बिघाड झाला असून भर पावसात जनमित्रांकडून आज सायंकाळी उशिरापर्यंत दुरुस्ती सुरू होती. तासाभरात या तीन ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात येईल.

निःस्वार्थी प्रेमाचे सर्वोच्च प्रतिक… आईवडील ! – पद्मश्री डॉ तात्याराव लहाने

आदर्श आई-वडील पुरस्काराने मराठवाड्यातील रत्नांचे माता – पिता सन्मानित

पुणे / हडपसर : माणूस कर्तृत्वाने आणि वयाने कितीही मोठा झाला तरी तो आई वडिलांसमोर लेकरूच असते. प्राणी जीवनात निःस्वार्थी प्रेमाचे सर्वोच्च प्रतिक आईवडील असल्याने त्यांना वाईट वाटेल असे कोणतेही कृत्य मुलांनी आणि त्यांच्या बायकांनी करू नये. गरिबी, प्रतिकूल परिस्थिती आणि मर्यादित संसाधनांमध्येही आपल्या मुलांचे शिक्षण, संस्कार, आणि समृद्ध व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्यांनी दिलेला त्याग व समर्पण स्तुत्य आहे. त्यांनी केवळ आपल्या मुलांना नव्हे, तर इतरांनाही योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला. कोणी डॉक्टर, कोणी उद्योजक, कोणी अधिकारी, तर कोणी समाजसेवक बनून समाजाचे ऋण फेडत आहे असल्याचे मत पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले.

मराठवाडा मित्रपरिवार आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान आयोजित मराठवाड्यातील रत्नांचा स्नेहमेळावा आणि आदर्श माता पिता पुरस्कार सोहळा उर्मिलाताई कराड सभागृह एमआयटी काॅलेज लोणीकाळभोर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. प्रतिकुल परिस्थितीतून ज्यांनी कष्टाने आपल्या कुटुंबात सुसंस्कृत, जबाबदार आणि कर्तव्यदक्ष मुलांना घडविणाऱ्या मराठवाड्यातील रत्नांच्या माता-पित्यांना पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्या हस्ते आदर्श माता पिता पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस, अल्युमिनियम मॅन भरत गिते,
आयुक्त देविदास जाधव, कारागृह अधिक्षक राणी भोसले, पोलीस उप आयुक्त श्रीकांत डीसले, सहयोगी संपादक विलास बडे, स्नेहवन चे अशोक देशमाने, उद्योजक श्रीकांत शेळके, लक्ष्मण सावळकर, रमेश आगवणे, संजय माने, विकास भोसले संयोजक रवी पाटील, महेश टेळेपाटील आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात श्री व सौ अंजनाबाई शिवाजीराव जाधव, राजश्री हनुमंत शिकारे, मंदाकिनी औदुंबर डीसले, जमुनाबाई माणिकराव बढे, सत्यभामा बाबाराव देशमाने, शिलाबाई चंद्रकांत शेळके, सागरबाई अशोकराव सावळकर, सीताबाई जनार्दन आगवणे, वनमाला ज्योतीराम भोसले, मीना कर्ण पाटील, शोभा दत्तात्रय टेळेपाटील श्रीमती कुशावर्ता केशवराव गीते आणि श्रीमती मथुराबाई राम माने या दांपत्याला “आदर्श माता-पिता” म्हणून गौरविण्यात आले. त्यांच्या समर्पित पालकत्वामुळे त्यांच्या मुलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्यांचे कुटुंब हे अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.

मराठवाडा मित्रपरिवार आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. यंदा पुरस्काराचे हे पाचवे वर्ष होते. कार्यक्रमासाठी राजेद्रं नारायणपुरे, दत्ता भाडवलकर , रणजीत गोदमगावे, चारुदत्त पाटील,दत्ताञय राठोडे, किशोर पाटील, मुरली पवार आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी बोलताना श्रीपाल सबनीस यांनी आई-वडिलांच्या भूमिकेचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले आणि असे पुरस्कार प्रेरणादायी ठरत असल्याचे मत व्यक्त केले. उपस्थित सर्वांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन प्रा दिगंबर ढोकळे यांनी केले तर आभार रविराज पाटील यांनी मानले.

वीज कोसळली:भामा आसखेड धरणाच्या कडेला मासेमारी करणाऱ्या युवकाचा मृत्यू

पुणे -जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून साेमवारी दुपारी अडीच वाजता भामा आसखेड धरणाच्या परिसरात पाईट राैंधळवाडी येथे मासेमारी करणाऱ्या तरुणाच्या अंगावर वीज काेसळून ताे मयत झाल्याची घटना घडली आहे. संताेष गुलाब खांडवे (वय- २८) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ताे राैंधळवाडी ग्रामपंचायत हद्दीत माैजे वेताळे याठिकाणचा रहिवासी आहे.

या घटनेत संताेष खांडवे याचा माेबाईलसह अंगावरचे कपडे वीज पडल्याने जळाल्याचा प्रकार घडला आहे. खांडवे याच्या शरीराची उजवी एक बाजू डाेक्यापासून पायापर्यंत जळालेल्या अवस्थेत मिळून आली आहे. त्याच्या अंगावर वीज पडल्यानंतर त्याला त्याच्या मित्रांनी तातडीने प्राथमिक आराेग्य केंद्र पाईट याठिकाणी तपासणीसाठी आणले परंतु त्याचा मृत्यु उपचारापूर्वीच झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. त्यामुळे त्याला पुढील कार्यवाहीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेचा तात्काळ पंचनामा पाईट मंडल अधिकारी एस.एस.सुतार, ग्राममहसुल अधिकारी एम.जी.क्षीरसागर, ग्रामपंचायत अधिकारी पाईट ए.एन.फुलपगर, जयसिंग दरेकर उपस्थित हाेते. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी तसेच पाईट याठिकाणी कमीत कमी पाच किलाेमीटर अंतरापर्यंत रेंज असणाऱ्या वीज प्रतिबंधक टाॅवर बसण्याची मागणी जयसिंग दरेकर यांनी केली आहे.

मंत्रालय पाण्याखाली ही नैसर्गिक आपत्ती नव्हे तर चेतावनी:पुण्यातल्या पुरामागे बिल्डर लॉबीचं कारस्थान

राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य पण महाभ्रष्ट युती सरकार मात्र अमित शहांच्या दौऱ्यात मग्न.

पुण्यातल्या पुरामागे बिल्डर लॉबीचे कारस्थान, पालकमंत्री अजित पवारांना जनतेशी काही देणंघेणं नाही..उपमुख्यमंत्री अजित पवार अनेक वर्षं पुण्याचे पालकमंत्री आहेत तरीही शहरात असा पूर येतो की नद्या रस्त्यांवरून वाहतात, हे निष्काळजी नियोजन नाही, तर बिल्डर लॉबीसोबतच्या संगनमताचं फलित आहे. यांना जनतेशी काही देणंघेणं नाही, यामुळेच आज राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य पहायला मिळत आहे. आज एकीकडे पुराने राज्याला वेढले आहे, एकीकडे शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त झाली आहे आणि दुसरीकडे अमित शहांच्या दौऱ्याची जय्यत तयारी नांदेड मध्ये सुरू आहे. याचाच अर्थ यांना जनतेच्या मतावर ऐशोआराम करायचा आहे असा आरोप पटोले यांनी केला आहे.

मुंबई, दि. २६ मे २०२५

राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे फक्त पावसाचं नव्हे, तर सरकारच्या उदासीनतेचं दर्शन आहे. निसर्ग स्वतःच सरकारला सावध करत आहे. महायुती सरकार हे भ्रष्टाचारी असून फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही, चांगले रस्ते करू शकत नाही, ड्रेनेज सिस्टिम सुधारू शकत नाही. नद्यांमधील कचरा काढण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपये लुटले जातात हे विदारक दृश्य आहे. हा सरकारचा बेशिस्त कारभार आहे असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

युती सरकारच्या कारभारावर तोफ डागत पटोले पुढे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, धान आणि फळबागांचे भयानक नुकसान झालं आहे. मात्र सरकारकडून फक्त आकडेवारी वाचली जाते, मदतीचा एक थेंबही शेतकऱ्याच्या डोळ्यांतले अश्रू थोपवू शकलेला नाही. मागच्या वर्षीच्या नुकसानीची भरपाई अजूनही हवेत लोंबकळतेय, आणि शेतकरी मात्र आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे.

शेतकऱ्याला निवडणुकांच्या वेळी “राजा” म्हणणारेच आज त्याच्या दुःखाकडे पाठ फिरवत आहेत आणि म्हणूनच, मंत्रालय पाण्याखाली जाणं ही नुसती नैसर्गिक आपत्ती नाही तर ती एक चेतावनी आहे.
गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने घेतल्या नाहीत. माननीय सुप्रीम कोर्टाला सरकारला चार महिन्यात निवडणुका घ्यायला सांगावे लागते तरीही या सरकारची निवडणूक घेण्याची इच्छा नाही. प्रशासक आणि सरकारच्या माध्यमातून जनतेची लूट सुरू आहे.

राहुल गांधी ओबीसींसाठी आवाज उठवणारे खरे नेते .-जातीनिहाय जनगणनेबाबत राहुल गांधी यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिक आहे. तेलंगणाप्रमाणे संपूर्ण देशात ही जनगणना झालीच पाहिजे हीच आमची भूमिका आहे.आपल्या शूर सैनिकांनी केलेल्या त्यागाला सलाम करण्याऐवजी मीच युद्ध जिंकले आहे असे भासवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत. आपली पाठ आपल्या हाताने थोपटण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. ज्या भगिनींचे कुंकू पुसण्याचे पाप दहशतवाद्यांनी केलं ते दहशतवादी कुठे आहेत? त्याबद्दल काय भूमिका आहे? ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे सुरक्षा का पुरवण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न आहेत, म्हणून मिलिटरीचे कपडे घालून स्वतःच स्वतःची पाठ थोपटायची भूमिका पंतप्रधान मोदींनी घेतली आहे तिचा आम्ही निषेध करतो असे पटोले म्हणाले.

आम्ही विद्यार्थ्यांचे केवळ ज्ञानच नव्हे तर संस्कार, कौशल्य आणि स्वप्न देखील घडवतो – डॉ.भाग्यश्री पाटील

डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ (डीपीयु) पिंपरी, पुणे येथे 16 वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात संपन्न

पिंपरी/पुणे, 26 मे 2025: डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयू ), (अभिमत विद्यापीठ) पिंपरी, पुणे येथे 26 मे 2025 रोजी विद्यापीठाच्या सभागृह्यामध्ये 16 वा पदवीप्रदान समारंभ विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला.

या समारंभाला तेलंगणा अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) महेश मुरलीधर भागवत, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयु) पिंपरी, पुणे चे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, डॉ. डी. वाय. पाटील ज्ञान प्रसाद विद्यापीठ, पिंपरी, पुणे चे प्र-कुलपती डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयु) पिंपरी, पुणे च्या प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव, आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी, पुणे चे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ” पदवीप्रदान समारंभ हा आत्मपरीक्षण आणि नवचैतन्याचा क्षण असतो. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची स्थापना या विश्वासावर झाली की शिक्षण हे सशक्त आणि प्रगत समाजाचे भक्कम पायाभूत तत्व आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे, प्राध्यापकांचे आणि शैक्षणिक नेतृत्वाचे समर्पण या दृष्टीला वास्तवात उतरवत आहे. आजही आमचा उद्देश स्पष्ट आहे— अशा ज्ञानसमृद्ध व्यक्ती घडवणे जे प्रत्येक टप्प्यावर ज्ञान, सामाजिक हीत हा उद्देश घेऊन पुढे जातील.”

महेश मुरलीधर भागवत, अतिरिक्त महासंचालक, पोलीस (कायदा व सुव्यवस्था), तेलंगणा राज्य यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (ऑनोरिस कौसा) ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संबोधन केले. त्यांनी म्हटले,”तुमची खरी वाटचाल आता सुरू होते. सदैव शिकण्याची वृत्ती ठेवा आणि तुम्हाला घडवणाऱ्या मुळांबद्दल व नात्यांबद्दल कधीही विसरू नका. जीवनात मार्गदर्शक पाच तत्व म्हणून चारित्र्य, धैर्य, विनय, बांधिलकी, आणि श्रद्धा यांवर विश्वास ठेवा. मला आशा आहे की तुम्हाला तुमचा हेतू सापडेल आणि तुम्ही तो उत्कृष्टतेने पूर्ण कराल.”

डॉ. भाग्यश्री पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (डीपीयू), पिंपरी, पुणे यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना संबोधित करताना म्हटले, “शिक्षण म्हणजे केवळ पदवी प्राप्त करणे नाही, तर जीवन, समाज आणि संपूर्ण राष्ट्राचे परिवर्तन घडवण्याची प्रक्रिया आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात आम्ही विद्यार्थ्यांचे केवळ ज्ञानच नव्हे तर संस्कार, कौशल्य आणि स्वप्न देखील घडवतो. आज जेव्हा आमचे विद्यार्थी जगाच्या दिशेने वाटचाल करत आहेत, तेव्हा मी त्यांना सांगू इच्छिते की, सहवेदना, धैर्य आणि सद्गुणांचा वारसा अभिमानाने पुढे नेत राहा. तुमची वाटचाल केवळ यशाकडेच नव्हे, तर सेवा, सन्मान आणि समाजकल्याणाकडे असावी. आजचा पदवीप्रदान समारंभ हा केवळ एक औपचारिकता नाही, तर एका महान जबाबदारीच्या सुरुवातीचे प्रतीक आहे आणि आपले नेतृत्व भविष्य घडविण्याचे आदर्श उदाहरण आहे.”

या समारंभात विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 31 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात येईल. विविध विद्याशाखेतील 12244 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येत असून यामध्ये 73 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 10884 पदव्युत्तर पदवी, 1276 पदवी व 11 पदविका या अशा एकूण 8 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत तसेच विद्यापीठ गीताने झाली. त्यानंतर विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर समारंभाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले आणि डॉ. एन. जे. पवार, कुलगुरू यांनी विद्यापीठाचा प्रगती अहवाल सादर केला, ज्यामध्ये विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे विवरण करण्यात आले.

अंगावर भिंत कोसळून महिलेचा मृत्यू


पुणे – दौंड शहरात पावसाचा पहिला बळी गेला आहे. पावसामुळे भिंत कोसळून येथील ताराबाई विश्वचंद आहिर नामक एका 75 वर्षीय महिलेचा बळी गेला आहे. ही महिला दुकानात बसली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात पावसाने पहिला बळी घेतला आहे. पावसामुळे अंगावर घराची भिंत पडून एका 75 वर्षीय वृद्ध मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ताराबाई विश्वचंद आहिर असे मृत महिलेचे नाव आहे. ताराबाई एका दुकानात बसल्या होत्या. तेव्हा त्यांच्या अंगावर जुन्या बांधकामाची भिंत कोसळली. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

दरम्यान, मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.