Home Blog Page 2914

सावित्रीचा वड…(लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

0

“वहिनी, उद्या वडाची पूजा नाही…परवा आहे ना?” फोन ठेवतच सचिनने विचारलं. “नाही रे, मला काहीच कल्पना नाही.”…माझं उत्तर देऊन मी पुढे निघाले. उद्या वटपौर्णिमा आहे याची परत एकदा आठवण झाली. दुपारी तशी भारतीने आठवण करून दिलीच होती. उद्या तिचीही सुट्टी होती. कारण वड पुजायला जायचे होते आणि त्यात उपवास करायचा असतो ना. खरं तर गेल्या आठवडाभर ती पावलोपावली आठवण करून देत होती. म्हणजे काहीतरी विषय निघायचाच. पूजेसाठी नवीन साडीला फॉल ब्रीडिंग करून झाले, ब्लाउज सुद्धा टेलरने वेळेत शिवून दिला…इति भारती. वाटलं, केवढी ही जय्यत तयारी! त्यात सचिनच्या प्रश्नाने आश्चर्यच वाटले. वडाच्या पूजेची याला चिंता, हा पुजायला जाणार की उपवास करणार?? या वटपौर्णिमेच्या विचारात स्टेशन कधी गाठले ते कळलेच नाही. ज्या कामासाठी आले होते, त्याला थोडा वेळ लागणार होता; मग काही काळ प्लॅटफॉर्मवर वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. २-३ बायका बसल्या होत्या, तिकडे थोडी जागा करून बाकावर बसले. अर्थात तिथेही तेच…उद्याची चर्चा! अगं, बरं झालं…रविवारची वटपौर्णिमा आली. एक रजा वाया गेली असती, नाहीतर हाफ-डेने तरी कामावर जायला लागले असते. दोघींमध्ये चाललेल्या गप्पा ऐकून एकंदरीत वाटायला लागलं…खरंच आम्हा स्त्रियांना वटपौर्णिमेचं महत्त्व उमगलंय की, एक क्रेझ म्हणून आहे हा उपवास. बाजारात सगळीकडे पूजेच्या साहित्याचे वाटे विकायला बसले होते. जांभळं, फणसाचे गरे, रायवळ आंबे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडाच्या फांद्या. त्याही अव्वाच्या सव्वा किमतीत. (दोन दिवसांपूर्वीच भाजीवाल्या विजयाने आठवण करून दिली होती – रायवळ आंबे घेऊन जा, नंतर महाग होतील आणि जांभळं, फणसाचे गरे हवे असतील तर आताच सांगून ठेवा. त्या दिवशी मिळतील की नाही ते सांगू शकत नाही.) तरीही बायका भक्तीभावाने ते खरेदी करत होत्या…कारण वड पूजायचा आहे ना!

काही सोसायटींमध्ये तर ग्रुपने सगळ्या बायका मस्त नटूनथटून पूजेला जातात. इतकेच नाही तर त्यासाठी आधी भटजींकडे वेळही ठरवली जाते. जवळपास कुठे एखादे वडाचे झाड आहे का, याची एक-दोन आठवडे आधी चाचपणी सुरू होते. बाकी ३६४ दिवस त्या वडाच्या झाडाकडे कोणी ढुंकूनही पाहत नसेल; वटपौर्णिमेला मात्र त्या वडाच्या झाडाची भलतीच वट. या वडाच्या झाडाचे एवढेच महत्त्व. झाड नसेल तर वडाची फांदी घरी आणून त्याची साग्रसंगीत पूजा??? पण कुणाच्याच मनात येत नाही की त्यासाठी वृक्षतोड केली जाते. इकडे पाऊस नाही, दुष्काळ पडतोय म्हणून ‘पाणी फाऊंडेशन’ आणि ‘नाम फाऊंडेशन’ त्यासाठी झाडे लावताहेत, नवनवीन उपक्रम करताहेत;  तर इथे या युगातील सावित्री पूजेसाठी झाडाची फांदी घरी आणतेय आणि दुसऱ्या दिवशी ती कचऱ्याच्या डब्यात फेकतेय. केवढा हा त्या वडाचा दैवदुर्विलास! एकीकडे पाऊस पडावा म्हणून वरुण यंत्राचा प्रयोग ग्रामीण भागातील लोकांनी करावा, अशी विनंतीची पोस्ट व्हाट्सअपवर सगळ्या ग्रुपवर फिरत असते; तर दुसरीकडे पूजेसाठी वडाच्या फांद्यांची खरेदी??? किती हा विरोधाभास. याचा विचारच मनाला स्पर्श करत नसावा का…? झाडं वाचवायलाच हवीत. वड म्हणजेच वटवृक्ष जो नैसर्गिक व्हेंटीलेटरचे काम करतो; म्हणजेच वातावरणात मुबलक प्राणवायू सोडण्याचं काम हे झाड करतं. प्रदूषणाच्या वाढत्या समस्येवर ठळक उपाय, असं हे झाड वाचवलं पाहिजे की निव्वळ पूजेसाठी त्याच्या फांद्या तोडल्या पाहिजेत? वडाची पूजा करणाऱ्या प्रत्येक सावित्रीला याची जाणीव व्हायला पाहिजे. भटजींनी फक्त पूजा सांगू नये, तर त्यातून प्रबोधन केले पाहिजे. खऱ्या अर्थाने सावित्रीने हा वड जपायला हवा.

 

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

दिलीप कांबळेंसह सहा मंत्र्यांना डच्चू …विखे, शेलार यांच्यासह १३ नवे मंत्री

0
मुंबई- औरंगाबादेत गुन्हा दाखल झालेल्या ,राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देत महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये १३ नव्या चेहऱ्यांची वर्णी लागली आहे. राजभवनावर पार पडलेल्या विशेष सोहळ्यात राज्यपाल विद्यासागर राव यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. उद्यापासून (सोमवार) राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी हा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार उरकण्यात आला. तीन  महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या असून त्याआधीचा हा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी मुलगा सुजय यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमधून बंड करणारे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज थेट मंत्रिपदाच्या ‘गिफ्ट’सह भाजपात प्रवेश झाला आहे. मुंबईत भाजपची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे अॅड. आशिष शेलार यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. याशिवाय राष्ट्रवादीतून काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेले व बीडच्या राजकारणातील वजनदार नेते मानले जाणारे जयदत्त क्षीरसागर यांचीही कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. शिवसेनेचे विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांच्या गळ्यातही कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली आहे. सावंत हे शिवसेनेचे उस्मानाबाद, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आहेत.
नवे कॅबिनेट मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील
आशिष शेलार
संजय कुटे
सुरेश खाडे
डॉ. अनिल बोंडे
डॉ. अशोक उईके
जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)
तानाजी सावंत (शिवसेना)
नवे राज्यमंत्री
योगेश सागर
अतुल सावे
संजय उर्फ बाळा भेगडे
परिणय फुके
अविनाश महातेकर
दिलीप कांबळे यांच्यासह ‘या’ मंत्र्यांना डच्चू
मुंबईतील एमपी मिल कंपाऊंड गृहनिर्माण प्रकल्पात लोकायुक्तांनी ठपका ठेवल्याने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना मंत्रिपद गमवावं लागलं आहे. याशिवाय आदिवासी विकास मंत्री विष्णू
सवरा, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, राजे अंबरिश अत्राम, दिलीप कांबळे यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे सर्व मंत्री भाजपचे आहेत. या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असून मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारले आहेत.

पुण्यात विधानसभेचे वारे ..शिवसेनेकडून भानुप्रताप बर्गे लढणार ?, भाजप देणार नवे चेहरे ?

0

पुणे- मोदी लाट नसताना लोकसभेसाठी भाजपला मिळालेले अभूतपूर्व यश पाहता विधानसभेला हि तसेच यश मिळेल असे बाहेर बोला ,पण भ्रमात राहू नका अशी भूमिका खुद्द महाराष्ट्राचे भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असल्याचे सांगितले जाते.दरम्यान पुण्यातील हडपसर चे आमदार योगेश टिळेकर , शिवाजीनगर चे विजय काळे यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत आहेत .हडपसर शिवसेनेला सोडायचा आणि शिवाजीनगरला संजय काकडे यांना उमेदवारी द्यायची असा प्रवाह असला तरी शिवाजी नगरवर शिवसेनेने हक्क सांगत तेथून पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे ना उमेदवारी देण्यास उत्सुकता दाखविल्याचे वृत्त आहे. दरम्यान औरंगाबादेत गुन्हा दाखल झालेले राज्यमंत्री असलेले कॅंटोमेंट मतदार संघाचे दिलीप कांबळे,आणि पर्वती मतदार संघाच्या माधुरी मिसाळ आणि खडकवासला येथील भीमराव तापकीर यांच्या जागेवर नवे चेहरे देता येतील काय ? याबाबत चाचपणी केली जाते आहे.

गिरीश बापट खासदार झाल्याने कसबा मतदार संघ आता महापौर मुक्ता टिळकांनी लढवावा अशी निश्चिती झाल्याचा दावा हि होतो आहे . शिवसेनेला बरोबर घ्यायचे असल्याने त्यांना हडपसर मतदार संघ द्यायचे तूर्तास निश्चित मानले जाते . पण शिवसेनेची मागणी 3 मतदार संघ तरी सोडावेत अशी आहे. शिवाजी नगर ला विजय  काळे यांच्या ऐवजी राज्यसभे वर असलेले संजय काकडे यांना उमेदवारी देवून ,पुढे सत्ता आल्यावर त्यांना पालकमंत्री पद देवून पुण्याचा कारभार त्यांच्याकडे सोपविता येईल काय ? याबाबत हि  फडणवीस चाचपणी करत असल्याचे बोलले जाते .पण तत्पूर्वी पुण्यातील आठ हि मतदार संघाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात येईल असे बोलले जात असताना शिवसेनेने शिवाजीनगर मतदार संघावर दावा करत पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांना येथून उमेदवारी देण्यासाठी इच्छया व्यक्त केल्याचे वृत्त आहे. कसबा येथील उमेदवार  टिळक यांना दिली तरी तेथून शिवसेनेचा इच्छुक बंडखोरी करू शकेल असे दिसते आहे. पर्वती मतदार संघातून माधुरी मिसाळ यांनी बरीच वर्षे आमदारकी भूषविली कॉंग्रेसचे आबा बागुल येथून आमदारकीची स्वप्ने उराशी बाळगून आहेत . बागुल रिंगणात उतरल्यास मिसाळ यांचीच मते त्यांना मिळणार आहेत .असे असले तरी बागुलांना नितीन कदम आणि सुभाष जगताप या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे सहाय्य मिळणार नाही हे स्पष्ट आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पर्वती मतदार संघातून महापालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांचा विचार होऊ शकतो अशी स्थिती आहे. पर्वतीतून शिवसेनेचे बाळा ओसवाल हि तगडे  उमेदवार मानले जात आहेत .खडकवासला मतदार संघात भिमराव तापकीर यांना आता थांबवावे असाही मत प्रवाह आहे. नव्या चेहऱ्यांना संधी द्या ,तेच तेच चेहरे आणून भाजपची कॉंग्रेस करू नका असे म्हटले जाते आहे तर दुसरीकडे शिवसेनेला नेमके हडपसर आणि त्या  व्यतरिक्त आणखी कोणते मतदार संघ द्यायचे याबाबत भाजपमध्ये विचार मंथन  होताना दिसते आहे.

हडपसर मध्ये होणार काय ?

0
पुणे-हडपसर विधानसभा मतदार संघाकडे यावेळी अनेकांचे लक्ष लागून आहे . भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर इथे मोदी लाटेत गेल्यावेळी विजयी झाले. नगरसेवक असलेल्या टिळेकर यांनी आमदार झाल्यानंतर कसा कारभार केला याची जंत्री खुद्द हडपसर मतदार संघातून चर्चिली जाते. माहिती अधिकार कार्यकर्ते रवी बराटे आणि मनसे चे इच्छुक उमेदवार असेलेले वसंत मोरे यांनी टिळेकर यांचे कारनामे चव्हाट्यावर मांडले ,जरी टिळेकर यांनी ते नाकारले असले तरी या सर्वाबाबत पक्षाने त्यांना दिलेले अभय लपून राहिलेले नाही .याहून काही किस्से येथील भाजपचे च नगरसेवक सांगता आहेत . खुद्द माळी समाजात देखील त्यांच्याबाबत नाराजी आहे .
हडपसर म्हटले कि माळी आणि मराठा अशा दोन समाजातील नेत्यांची आपसात नेहमी स्पर्धा दिसलीआहे . आता वैशाली बनकर यांना राष्ट्रवादी उमेदवारी देणार अशी अफवा कोणी पेरली आहे ? असा सवाल राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याला याबाबत विचारणा केली असता करण्यात आला आहे. पक्षाने त्यांना महापौर पद दिलेले  आहे , त्याचा वापर त्यांनी कसा केला ? स्वतःच्या नातेवाईकांना हि ओळख न देणाऱ्या महापौर म्हणून माळी समाजातच त्यांचा उल्लेख केला गेला . कॉंग्रेस मध्ये दत्ता बनकर यांचा स्वभाव, आता या पती पत्नीचा स्वभाव यात जमीन असमान चा फरक असल्याचे  माळी समाजातीलच लोक बोलत असल्याचे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते जाणून आहेत . त्यामुळे माळी समाजातील टिळेकर आणि बनकर या दोघांचा ,ते इच्छुक असले तरी ,त्यांचा आपापल्या पक्षात  उमेदवारी रेस मध्ये समावेश होईल असे चित्र सध्या तरी नसेल असा जाणकारांचा व्होरा आहे.
भाजपच्या टिळेकर यांचे कारनामे पाहूनच एकीकडे बदनामी नको म्हणून पक्षाने टिळेकर यांना आजतागायत अभय देत आता हडपसर मतदार संघ शिवसेनेला सोडण्याचा निर्धार पक्षाने केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे . आणि सेनेकडून  इथे विधानसभे साठी नाना भानगिरे सारखा लढवय्या उमेदवार असू शकतो यावर अनेकांचे एकमत होते आहे. महापालिकेत उपमहापौर पद भूषविलेल्या महादेव बाबर यांना आमदार कि ची  संधी पूर्वी देण्यात आली होती .ते माजी आमदार आहेत .ते यावेळी देखील आमदारकी साठी इच्छुक आहेत . पण त्यांच्या ऐवजी नगरसेवक असलेले नाना भानगिरे विधानसभा निवडणुकीत यशाचा रथ सक्षम पणे खेचू शकतील असा विश्वास सेनेच्याच गटातून केला जातोय . मनसे चे तर वसंत मोरे हे येथील प्रबळ आणि निश्चित असे उमेदवार मानले जातात .त्यांच्या कार्यकर्त्यांचा येथे मोठा समूह आहे. राहता राहतो तो राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील उमेदवाराचा प्रश्न . कॉंग्रेस ने जरी येथून उमेदवारी मागितली तरी शिवरकर यांना त्यात यश येईल असे दिसत नाही. माळी समाजातील नेते पदे मिळताच समाजाला हि विसरतात हा हडपसर चा  अनुभव कॉंग्रेस च्या गटात हि चर्चिला जातो .एकंदरीत हडपसर राष्ट्रवादीकडे राहील आणि यावेळी राष्ट्रवादीने हडपसर ला शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून खासदारच माळी समाजाचा अमोल कोल्हे  यांच्या रूपाने दिला आहे .आणि हडपसरच्या माळी समाजाला राष्ट्रवादी कडेच कायम ठेवण्यासाठी विधानसभेच्या प्रचार यंत्रणेत अमोल कोल्हे यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी देवूनच येथील निवडणूक लढविली जाईल असे  दिसते आहे.तरीही माळी समाजातील उमेदवार देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी च्या  गोटातून झाला तर मग योगेश ससाणे शर्यतीत पुढे राहतील असे दिसते आहे . पण या पक्षात उमेदवारी साठी खरी चुरस प्रशांत जगताप आणि चेतन   तुपे पाटील यांच्यात राहील असे दिसते आहे . दोघे हि महापालिकेच्या राजकारणातील तगडे नेते आहेत . चेतन पाटलांचे वडील दिवंगत विठ्ठल पाटील यांना मानणारा वर्ग अजून हि आहे . आणि प्रशांत जगताप यांना महापौर पद दिलेले आहे तसे चेतन पाटलांना विरोधी पक्षनेते , आणि आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद हि दिलेले आहे. पण गेल्या ५ वर्षात भाजपचा येथे आमदार झाल्याने ,तत्पूर्वी शिवसेनाचा आमदार असल्याने कॉंग्रेसच्या ताब्यातून गेलेला हा मतदार संघ आता राष्ट्रवादी खेचून आणणार आहे असा विश्वास पक्षातील जाणकारांना असल्याने या पक्षात उमेदवारी साठी चुरस आहे ज्यात पहिले नाव म्हणजे सर्वात वरच्या क्रमांकावर चेतन पाटलांचे नाव, तर दुसऱ्या क्रमांकावर प्रशांत जगतापाचे नाव घेतले जाते. आणि त्यानंतर 3 नावे तिसऱ्या क्रमांकावर आहेत ,त्यातले एक म्हणजे नगरसेवक  योगेश ससाणे यांचे नाव घेतले जाते .आणि हडपसर मध्ये एकमत होणार नसेल तर कात्रजचे प्रकाश कदम यांना यावेळी संधी द्या ,ते चांगली लढत देवू शकतात असे सांगत ससाणे यांच्या बरोबरीने कदम आणि नगरसेवक बंडू गायकवाड यांचाही शर्यतीत तिसरा क्रमांक सध्या तरी लागतो आहे.
म्हणजे सध्याच्या स्थितीत सांगायचे झाले तर शिवसेनेचे नाना भानगिरे , मनसे चे वसंत मोरे आणि राष्ट्रवादी चे चेतन तुपे यांच्यात हडपसर विधानसभेचा  रणसंग्राम होईल असे सध्या तरी चित्र आहे.

‘फिरोझ अश्रफ हे विस्थापितांच्या वेदनांचे प्रतिनिधी ‘ : अन्वर राजन

0

पुणे :लेखक, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे माजी उपाध्यक्ष फिरोज अश्रफ यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी , शनिवारी – १५ जुन रोजी सभा आयोजित करण्यात आली होती.

शनीवारी संध्याकाळी ६ वाजता, गांधी भवन,( कोथरूड , पुणे ) येथे ही सभा झाली.

अन्वर राजन ( सचिव , महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ), कलीम अजीम ( कार्यकारी संपादक , सत्याग्रही विचारधारा ), संदीप बर्वे ( कार्यवाह, युवक क्रांती दल ) , डॉ. मल्लीका मिस्त्री,आदी मान्यवर सहभागी झाले.

‘ अश्रफ हे दिलदार स्वभावाचे होते. ‘ सुरभी ‘ सारख्या मालिकेचे लेखनाचे वैशिष्टयपूर्ण काम केले.सामाजिक सलोखा, संवादासाठी अश्रफ यांनी आयुष्यभर काम केले. हे काम पुढे नेले पाहिजे ‘, असे संदिप बर्वे म्हणाले.

कलीम अझीम म्हणाले, ‘ पाकिस्ताननामा ‘ सारखे सदर लिहिणारे फिरोज अश्रफ हे अभ्यासू व्यक्तिमत्व होते. भारतीय मुस्लीमांची समाजरचना त्यांनी भारतीय दृष्टीकोणातून केली. धर्मनिरपेक्षता आणि अल्पसंख्य हे दोन शब्द या लोकसभा निवडणुकीत उच्चारण्यातच आले नाहीत.

अशा पाश्र्वभूमीवर दोन समाज संस्कृती, दोन राष्ट्र यांच्यातील संवाद समजून घेण्याचा फिरोझ अश्रफ यांचा विचार आजच्या काळात महत्वाचा ठरणार आहे.

डॉ.मल्लीका मिस्त्री म्हणाल्या , ‘फिरोझ अश्रफ हे फक्त विचारवंत नव्हते, तर,खऱ्या तळागाळात सामान्य माणसांसाठी कार्यरत व्यक्ती होते. आता भोवतालच्या समाजाची जी घसरण चालली आहे, भय वाढले आहे.ती पाहून चिंता वाढते आहे. त्या पार्श्वभूमीवर अश्रफ यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवणारी आहे.

डॉ. अंजली सोमण म्हणाल्या, ‘ अश्रफ यांचे व्यक्तीमत्व वैचारिक आणि सामंजस्य मानणारे होते. समाजापासून न तुटता जगणारा विद्वान कसा असावा, याचे मूर्तीमंत उदाहरण त्यांच्या रुपाने पाहायला मिळाले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना अन्वर राजन म्हणाले, ‘ फिरोझ अश्रफ हे विस्थापितांच्या वेदनांचे प्रतिनिधी होते. फिरोज अश्रफ यांच्या लिखाणात मुस्लीमांच्या वाट्याला आलेल्या अनुभव आणि व्यथांचे विश्लेषण आहे. ते बहुसांस्कृतिक माणसाचे चित्र प्रादेशिक भाषेत मांडत असत. मुंबई दंगलीच्या काळात उपनगरात विस्थापित झाल्यावरही दुःख न मानता त्यांनी सामाजिक काम केले. धर्मनिरपेक्ष, मानवतावादी विचार पुढे नेणारा उमदा विचारवंत आपण गमावलेला आहे. ज्या विचाराच्या आधाराने त्यांनी काम केले, ते काम पुढे नेणे, हीच श्रध्दांजली ठरेल.

शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची – पर्यावरणमंत्री रामदास कदम

0

मुंबई, दि. 15 : वातावरणीय बदलामुळे तापमानात प्रचंड वाढ झाल्याने हवेमध्ये कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची असल्याचे मत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.

हॉटेल ताज पॅलेस येथे आज प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीरी आणि मुंबई फर्स्टतर्फे आयोजित ‘शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक दळणवळण’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

श्री.कदम म्हणाले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवा गुणवत्ता अभ्यासाकरिता नीरी या संस्थेमार्फत राज्यातील निवडक शहरातील हवा प्रदूषणाच्या स्त्रोतांचा विश्लेषणात्मक अभ्‍यास अहवाल तयार केला आहे. त्यात वाहन प्रदूषण हे हवा प्रदूषणाचा प्रमुख स्त्रोत असल्याचे अनुमान काढले आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमानुसार योग्य तो कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. विविध शहरातील एकूण हवा प्रदूषणाच्या अंदाजे 30 टक्के प्रदूषण हे वाहनामुळे होते असे लक्षात आले असून त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होत आहेत.

गेल्या वर्षी प्लास्टिक बंदीबाबतचा निर्णय घेतला. लोकसहभागामुळे तो यशस्वी ठरत आहे. आता हवा शुद्ध राहण्यासाठी प्रदूषणावर कशी मात करायची यासाठी पर्यावरण विभाग वेगवेगळे उपाय करीत आहे. भारतात सर्वात अधिक प्रदूषण दिल्ली शहरात आहे. तेथे रस्त्याच्या प्रमुख ठिकाणी धूलिकण आणि कार्बन डाय ऑक्साईड शोषणारी यंत्रे बसविली आहेत. मुंबई शहरातही अशी यंत्रणा राबविली जाईल, असेही श्री.कदम यांनी सांगितले.

प्रारंभी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांनी प्रास्ताविक केले. मुंबई फर्स्टचे सचिव नंदन मालुसे आणि मुंबई महानगर विकास आयुक्त ए.राजीव यांनी शुद्ध हवा कार्यक्रमावर आपल्या भाषणातून चर्चा केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई.रविंद्रन यांनी आभार मानले.

रेशन कार्डधारक येईल तेव्हा रास्त भाव दुकानदाराने रेशन उपलब्ध करून देणे बंधनकारक

0

मुंबई, दि.15 जून : रेशन कार्डधारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्याकरिता आल्यास त्यास रास्तभाव दुकानदाराने धान्य उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तशा स्वरूपाचे परिपत्रक विभागाकडून निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

ग्रामीण तसेच शहरी भागातील रेशनकार्ड धारकांना रास्तभाव दुकानदार महिन्यातील ठराविक वेळेनंतर रेशन उपलब्ध करून देत नाही. या संदर्भात विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. तसेच विधानसभा सदस्यांनी याबाबतीत सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले होते. याची दखल घेऊन याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नुकतेच शासन परिपत्रक निर्गमित केले आहे. यानुसार रास्त भाव दुकानदारांवर रेशनकार्ड धारकांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी धान्य (रेशन) उपलब्ध करून देण्याची जबादारी निश्चित करण्यात आली आहे, असे मंत्री श्री.रावल यांनी सांगितले. रास्तभाव दुकानदाराने असे न केल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने याबाबत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त( पुरवठा), सर्व उपायुक्त (पुरवठा), सर्व जिल्हाधिकारी, शिधावाटप नियंत्रक, संचालक (नागरी पुरवठा, मुंबई), सर्व जिल्हा पुरवठा आधिकारी यांना परिपत्रकाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.

प्रायोगिक रंगभूमीसाठी राज्य शासनामार्फत वास्तू उभारणार – विनोद तावडे

0

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार प्रदान

मुंबई : राज्य शासन रंगकर्मींच्या नेहमीच पाठीशी राहिले आहे. आगामी काळात राज्य शासनाच्या वतीने प्रायोगिक रंगभूमीची वास्तू उभारण्यात येईल असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृत्यर्थ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित कलावंत मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा काल संध्याकाळी यशवंत नाट्य मंदिर येथे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दिला जाणारा यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती दया डोंगरे यांना जाहीर झाला होता. प्रकृती कारणास्तव ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे उपस्थित राहू शकल्या नाहीत. ज्येष्ठ नाट्य समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांना ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल आणि अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी आणि अखिल भारतील नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या प्रमुख उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

श्री. तावडे या कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाले, ज्येष्ठ नाट्यसमीक्षक नाडकर्णी यांच्या नाट्य समीक्षेने खऱ्या अर्थाने मराठी नाट्यरसिक नाट्यगृहांकडे वळला. मराठी नाटकांची वृत्तपत्रामध्ये अतिशय समर्पक वस्तुनिष्ठ व सडेतोड नाट्य समीक्षेमुळे मराठी रसिकांना मराठी नाटक कळू लागले.

‘ फिल्म स्पेशल २६’ स्टाईल-बोगस आयकर अधिकाऱ्यांची १३ जणांची टोळी पकडली

0

मुंबई – अक्षय कुमार च्या स्पेशल २६ या चित्रपटातील कथेप्रमाणे ; आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून एका व्यापाऱ्याच्या घरातून रोकड व महागडे मोबाईल असा ८० लाख ४० हजारांचा मुद्देमाल घेऊन १३ जणांची टोळी पसार झाली होती. मात्र,  दहिसर पोलिसांनी शिताफीने तपास करून त्या भामट्यांच्या मुसक्या आवळल्या.

दहिसर येथील ओवरी पाडय़ात राहणारे किसन बेलवटे या व्यापाऱ्याच्या घरी ८ जूनच्या पहाटे १३ जणांची टोळी आली होती. आम्ही आयकर अधिकारी आहोत, तुम्ही घरात भरपूर पैसे बेकायदेशीरपणे लपवून ठेवले आहेत. जप्तीसाठी ते पैसे बाहेर काढा आणि कारवाईसाठी तयार रहा असे घाबरवण्यास सुरुवात केली. आरोपींनी ओळखपत्र देखील दाखवल्याने बेलवटे घाबरले. मग त्यांनी घरात ठेवलेली ८० लाख ४० हजारांची रोकड काढून दिली. त्यानंतर त्यांनी आयकर विभागाची कागदपत्रे असल्याचे भासवून त्यावर बेलवटे यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आणि चौकशीसाठी ऑफिसला अशी बतावणी करून निघून गेले. परंतु, त्यांच्या हालचाली बेलवटे यांना खटकल्यामुळे त्यांनी शेजारी राहणाऱ्या दीपक शहा यांना घडलेला प्रकार सांगून दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरच वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पिंगळे, पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, गोरखनाथ घार्गे, उपनिरीक्षक चंद्रकांत घार्गे, श्रीकांत मगर, शिवाजी चोरे, संदीप शेवाळे आदींच्या पथकाने तपास सुरू केला आणि आरोपींची टोळी जेरबंद केली.

बिहारमध्ये मेंदूज्वरने 67 बालकांचा बळी,आरोग्यमंत्री म्हणाले, त्यांचे नशीबच खराब …

0

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वरने चिमुकल्यांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रोगाने शुक्रवारी आणखी 9 मुले दगावली. त्यामुळे, एकूणच मृतांची संख्या 67 झाली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांच्या मृत्यूचे कारण हायपोग्लीसेमिया (मेंदूतील ताप) आहे. या परिस्थितीत मुलांच्या शरीरातील ब्लड शुगर अचानक ढासळतो. इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडते. हा रोग प्रामुख्याने बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये पसरला आहे. याच ठिकाणी दोन सरकारी रुग्णालयांमध्ये सर्व 67 मुलांनी अखेरचा श्वास घेतला. राज्याचे आरोग्य मंत्री मंगल पांडेय यांनी यासाठी नशीबाला जबाबदार धरले आहे. त्यांच्या मते, यासाठी सरकार किंवा प्रशासन जबाबदार नाही. त्या मुलांचे नशीब तसे होते. सोबतच, हवामानाला देखील त्यांनी दोष दिला.

या व्यतिरिक्त मुझफ्फरपूरच्या खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपचार सुरू आहेत. त्यापैकी 9 मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील आरोग्य मंत्र्यांनी शुक्रवारी डॉक्टर आणि आरोग्य अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली. त्यामध्ये पीडित रुग्णांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे आणि रुग्णालयांत अतिरिक्त बेडसह विशेष विभाग स्थापित करण्यास मंजुरी देण्यात आली. राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये या रोगाने डोके वर काढले आहे. त्या सर्वच जिल्ह्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. सोबतच, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संसर्ग पसरलेल्या जिल्ह्यांमध्ये दौरे करण्याचे निर्देश दिले आहेत.

गुजरातमध्ये 7 मजुरांचा सेप्टिक टँकमध्ये गुदमरून मृत्यू

0

वडोदरा – गुजरातच्या एका हॉटेलमध्ये सात मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. हे सर्वच मजूर हॉटेलच्या सेप्टिक टँकमध्ये उतरून सफाई करत होते. त्याच दरम्यान सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी 3 हॉटेलचे कर्मचारी होते. तर उर्वरीत 4 जण मजूर होते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हॉटेल मालक अब्बास भोरानियाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तसेच सर्वच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल मालकाने सेप्टिक टँकच्या सफाईसाठी महेश पतनवाडिया (47), अशोक हरिजन (45), ब्रजेश हरिजन (23), महेश हरिजन (25) या चार मजुरांना बोलावले होते. हे मजूर टँकमध्ये सफाईसाठी उतरले होते. त्यांच्या मदतीसाठी हॉटेलमध्ये काम करणारे विजय चौधरी (22), सहदेव वसावा (22) आणि अजय वसावा (22) हे देखील आत उतरले होते. वेळ निघत गेला आणि कर्मचारी टँकबाहेर आलेच नाही. सुरुवातीला सफाई काम सुरू असल्याचे वाटल्याने संशय आला नाही. परंतु, काहीच हालचाली दिसत नसल्याने हॉटेल व्यवस्थापनाने डाभोई पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाला बोलावले. यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. परंतु, टँकमध्ये विषारी वायूचा दाब वाढल्याने सर्वांचा मृत्यू झाला होता.

तिरुपती बालाजीला वाहिले, सहा किलो सोन्याचे 2.25 कोटी रुपये किमतीचे २ हात

0

तिरुपती – जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान असणाऱ्या तिरुपती बालाजीला भक्तांकडून दरवर्षी सोने, चांदी, हिरे आणि पैशांमध्ये कोट्यावधींचे दान केले जाते. आता त्यात आणखी एका भक्ताने भर घातली आहे. तामिळनाडूचा असलेल्या या भक्ताने चक्क सोन्याचे दोन हात बालाजीला समर्पित केले आहेत. या भक्ताचे नाव थंगा दुराई असून ते एक व्यापारी आहेत. ‘अभय हस्तम’ आणि ‘काति हस्तम’ असे नाव असणाऱ्या या हातांचे वजन प्रत्येकी सहा किलो आहे. सोन्याच्या हातांची किंमत तब्बल 2.25 कोटी रुपये सांगितली जात आहे. तिरुमाला तिरुपती देवदर्शनम (टीटीडी) ने सांगितले की, या हातांना शनिवारी सकाळी पूजा करताना अर्पण केले गेले.

लहानपणी झाला होता दुर्धर आजार, देवाने बरे केले…
तामिळनाडूच्या थेनी जिल्ह्यातील व्यापारी थंगा दुराई यांनी हे दान अर्पण केले आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ते वेंकटेश देवांना लहानपणापासून आपले दैवत मानतात. लहान असताना त्यांना एका आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्यांची वाचण्याची शक्यता कमी होती. पण तिरूपतीला प्रार्थना केल्यानंतर त्यांचा आजार पूर्णपणे बरा झाला. त्यामुळे थंगा यांनी बालाजीला सोन्याचे हात दान करण्याचा निर्णय घेतला.

एमएसआरए 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत सुनयना कुरुविलाचा सान्या वत्सवर विजय

0
  • अभिनव सिन्हा, विकास जांगरा यांचे सनसनाटी विजय   
पुणे: महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस्‌ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसआरए-76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात तामिळनाडूच्या सुनयना कुरुविला हिने दिल्लीच्या सान्या वत्सचा 10-12, 5-11, 11-6, 11-7, 11-7 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर, प्रो कोच गटात महाराष्ट्राच्या अभिनव सिन्हा, राजस्थानच्या विकास जांगरा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय अंतिम फेरीत प्रवेश केला.

अमनोरा मॉल ग्लास कोर्ट, आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस्‌ क्लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत महिला गटात चुरशीच्या झालेल्या लढतीत तिसऱ्या मानांकित तामिळनाडूच्या सुनयना कुरुविलाने कडवी झुंज देत काल महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित उर्वशी जोशीवर सनसनाटी विजय मिळविणाऱ्या सान्या वत्सचा 10-12, 5-11, 11-6, 11-7, 11-7 असा पराभव केला. सामन्यात 2-0अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या सुनयनाने आपले अनुभव व कौशल्याचा सुरेख संगम साधत सान्याविरुद्ध पुढील तीनही गेम जिंकून विजय मिळवला.

प्रो कोच गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत अभिनव सिन्हा याने तिसऱ्या मानांकित पश्चिम बंगालच्या संदीप कुमार यादवचा 11-5, 11-9, 11-4 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. राजस्थानच्या विकास जांगरा याने अव्वल मानांकित कर्नाटकाच्या परमीत सिंगचा 11-8, 11-5, 11-2 असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. पुरुष 45वर्षावरील गटात उपांत्य फेरीच्या लढतीत छत्तीसगडच्या तिसऱ्या मानांकित विकास नायरने दुसऱ्या मानांकित दिल्लीच्या अनिल भगतवर 5-11, 11-4, 11-8, 11-6 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अव्वल मानांकित पश्चिम बंगालच्या दलिप त्रिपाठीने महाराष्ट्राच्या आशुतोष पेडणेकरचा 6-11, 9-11, 11-6, 11-8, 11-3 असा संघर्षपूर्ण पराभव करून आपले आव्हान कायम राखले.
 
पुरुष 35 वर्षावरील गटात उपांत्य फेरीत दिल्लीच्या अव्वल मानांकित अमितपाल कोहलीने आपला शहर सहकारी हरजिंदर सिंगचा 12-10, 11-6, 11-9 असा, तर महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित आदित्य माहेश्वरीने राजस्थानच्या कपिल मुर्जानीचा 11-6, 4-11, 11-5, 11-7 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
 
पुरुष 65 वर्षावरील गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या तिसऱ्या मानांकित किशन लालने दुसऱ्या मानांकित तेलंगणाच्या श्री हरिहर सितारामला 11-4, 8-11, 11-9, 11-5 असा पराभव करून आगेकूच केली.  
.   
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: महिला गट:उपांत्य फेरी:
सुनयना कुरुविला(तामिळनाडू)[3]वि.वि.सान्या वत्स(दिल्ली)[5]10-12, 5-11, 11-6, 11-7, 11-7
 
प्रो कोच: उपांत्य फेरी:
विकास जांगरा(राजस्थान)वि.वि.परमीत सिंग(कर्नाटक)[1]11-8, 11-5, 11-2;
अभिनव सिन्हा(महाराष्ट्र)वि.वि.संदीप कुमार यादव(पश्चिम बंगाल)[3]11-5, 11-9, 11-4;    
 
पुरुष 35 वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
अमितपाल कोहली(दिल्ली)[1]वि.वि.हरजिंदर सिंग(दिल्ली)12-10, 11-6, 11-9;
आदित्य माहेश्वरी(महाराष्ट्र)[2]वि.वि.कपिल मुर्जानी(राजस्थान)11-6, 4-11, 11-5, 11-7;
 
पुरुष 40 वर्षावरील गट: उपांत्य फेरी: 

सौरभ नायर(छत्तीसगड)[1]वि.वि.अमित चिनाय(गुजरात)[3] 10-12, 6-11, 12-10, 11-2, 11-8; 

सचिन जाधव(महाराष्ट्र)[4]वि.वि.अभिक दत्ता(महाराष्ट्र)[5]11-8, 13-11, 11-8;

पुरुष 45वर्षावरील गट: उपांत्य फेरी: 
दलिप त्रिपाठी(पश्चिम बंगाल)[1]वि.वि.आशुतोष पेडणेकर(महाराष्ट्र) 6-11, 9-11, 11-6, 11-8, 11-3;

विकास नायर(छत्तीसगड)[3]वि.वि. अनिल भगत(दिल्ली)[2] 5-11, 11-4, 11-8, 11-6;
 
पुरुष  50 वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
विवान खुबचंद(दिल्ली)[1]वि.वि.समीर खरे(महाराष्ट्र)8-11, 13-11, 10-12, 11-9, 11-7;    
सौरभ देवकुळीयर(कर्नाटक)[6]वि.वि.जॉयसन बोथेलो(महाराष्ट्र)10-12, 9-11, 11-5, 11-1, 14-12;
 
पुरुष 60 वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
रवीकृष्णा बुर्ला(तेलंगणा)[3]वि.वि.शशी गुप्ता(महाराष्ट्र)11-7, 11-5, 11-7;
विजय जैनी(हरियाणा)[2]वि.वि.वामन आपटे(महाराष्ट्र)12-10, 11-5, 9-11, 11-8; 
 
पुरुष 65 वर्षावरील गट: उपांत्य फेरी:
राजीव रेड्डी(तामिळनाडू)[1]वि.वि.प्रविण रत्तन(महाराष्ट्र) 11-4, 11-6, 11-7;  
किशन लाल(महाराष्ट्र)[3]वि.वि.श्री हरिहर सिताराम(तेलंगणा)[2]11-4, 8-11, 11-9, 11-5.  

झीनत अमान यांना ‘आर डी बर्मन जीवन गौरव’

0

मुंबई: अप्रतिम सौंदर्य आणि जुन्या काळातील ‘मॉड’ भूमिकांमुळं सिनेरसिकांची मनं जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांना ‘आर डी बर्मन जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. येत्या २२ जून रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

झीनत अमान यांनी अभिनय केलेल्या सुमारे २४ हिंदी चित्रपटांना आर डी बर्मन यांचे संगीत लाभले. हा एक प्रकारचा विक्रमच मानला जातो. यातील किमान १९ चित्रपट सुपरहीट झाले आणि या यशात झीनत आणि आरडी या दोघांचाही महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे यंदा या पुरस्कारासाठी झीनत यांची निवड झाली आहे. एक लाख रुपये आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. झीनत अमान या कार्यक्रमात पंचमदांच्या आठवणींना उजाळा देतील. ‘स्वरदा कम्युनिकेशन्स अँड इव्हेंट्स’च्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.याआधी संगीतकार दिवंगत यशवंत देव, प्रख्यात निवेदक अमीन सयानी यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागृती दिनानिमित्त कार्यक्रम

0

मुंबई : ज्येष्ठ नागरिक धोरणातील तरतुदीनुसार  15 जून हा दिवस ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवस  म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग  आणि हेल्पेज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन ऑडीटरम हॉल, विद्यालंकार इन्स्ट‍िट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, संगमनगर, वडाळा (पूर्व) येथे सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे.
या चर्चासत्राचे उद्‌घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार राहुल शेवाळे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे,  जनसंपर्क मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण,  समाजकल्याण विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण मुंबई विभागाचे बाळासाहेब सोळंकी, हेल्पेज इंडियाचे प्रकाश बोरगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.