Home Blog Page 2907

वीजयंत्रणेवरील खाजगी केबलच्या जाळ्यांमुळे वीज अपघाताची शक्यता

0

बेकायदेशीर केबल काढून टाकण्याचे आवाहन

पुणे : महावितरणच्या लघु व उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांशी समांतर व वीजखांबांच्या आधारे टाकलेल्या अनधिकृत खाजगी केबलमुळे विद्युत अपघाताची शक्यता आहे. केबल ऑपरेटरर्सनी केबल्स तात्काळ काढून टाकाव्यात असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसेच अशा अनधिकृत केबल्स आढळून आल्यास त्या विनाविलंब हटविण्याची जबाबदारी संबंधित अभियंते व जनमित्रांवर देण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेतील वीजखांब, वीजवाहिन्या, रोहित्र आदी ठिकाणी केबल टाकणे बेकायदेशीर आहे. या केबल्समुळे वीजपुरवठ्यात अडथळा येणे, विद्युत अपघातांची शक्यता असल्याने वीज कर्मचारी किंवा नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होणे तसेच महावितरणच्या वीजयंत्रणेचे किंवा आर्थिक नुकसान होणे या बाबींचा विचार करून मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने सन 2006 मध्ये महावितरणच्या यंत्रणेवरील अनधिकृत केबलचे जाळे हटविण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याप्रमाणे वीजयंत्रणेवरील केबल हटविण्यासाठी महावितरणकडून कारवाई सुरु आहे. फक्त ‘महानेट’ या ग्रामीण इंटरनेट जोडणी प्रकल्पाच्या केबल जिथे उपरी मार्गाद्वारे नेल्या आहेत अशा ठिकाणी महावितरणचे वीजखांब व संबंधीत पायाभूत सुविधा वापरास शासनाने परवानगी दिली आहे.

मात्र वीजयंत्रणेवरील अनधिकृत केबलमुळे विद्युत अपघात झाल्याचे प्रकार दिसून आल्याने महावितरणने संबंधीत शाखा अभियंता व जनमित्रांवर केबल काढून टाकण्याची जबाबदारी निश्चित केली आहे. याशिवाय अनधिकृत केबल टाकणे किंवा त्यामुळे जिवितहानी, मालमत्तेचे नुकसान झाल्यास केबल ऑपरेटर विरोधात फौजदारी तक्रार करण्यासोबतच नुकसानभरपाईचा दावा देखील करण्यात येणार आहे. केबल हटविण्यासंदर्भात उपविभाग व विभाग प्रमुख अभियंत्यांवर तपासणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तपासणी दरम्यान वीजयंत्रणेवर केबल आढळून आल्यास संबंधित शाखा अभियंता व जनमित्रांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.

उर्जामंत्री बावनकुळे साहेब ….जागे व्हा ..परीस्थीती नीट पहा ..तरच खुर्चीवर रहा ..

0

गजब..गजब ..

रहिवाश्यांचा संताप ,ना फिरकले लोकप्रतिनिधी ,ना बडे अधिकारी ..

पुण्यातील एका भागात तब्बल 15 तास बत्ती गुल …

‘माय मराठी’ कडून महावितरण चा धिक्कार ,दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

पुणे- पुणे तिथे काय उणे म्हणतात खरे ..पण वेळ आली कि काय ,काय नाही तर बरेच काही उणे असल्याची प्रचीती आल्या शिवाय राहत नाही,काल पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन झाले . सारे पुणेकर ,राजकारणी ,कार्यकर्ते पालख्यांच्या दर्शनासाठी ,वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावले …आणि इकडे सातारा रस्त्यावरील चव्हाण नगर कमानी जवळच्या पंचवटी सोसायटी आणि परिसरात कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय तब्बल 15 तास विद्युत पुरवठा खंडित करून महावितरण ने येथील रहिवाश्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहत जोरदार धक्का दिला ,संतप्त नागरिक जिथे दुरुस्तीचे काम सुरु होते तिथे आपला उद्रेक शब्दातून व्यक्त करू लागताच ,महावितरणच्या चलाख अधिकाऱ्यांनी मोने नामक एका महिला अधिकाऱ्याला त्यांचा सामना करायला पुढे केले . सकाळी सात वाजता गेलेली लाईट रात्री 11 वाजताही आली नाही म्हणून अखेरीस येथील कॉंग्रेसचे कार्यकर्ते सतीश पवार यांनी ‘आता लोक तोडफोड करतील याची जाणीव ठेवा ‘ असा सज्जड दम भरला ,आणि रात्री १२ वाजता अखेरीस विद्युत पुरवठा सुरळीत झाला .

या भागातील उदय जगताप आणि अन्य कार्यकर्ते यांनी दुरुस्तीच्या ठिकाणी कित्येक तास उभे राहून अधिकाऱ्यांना फैलावर घेण्याचा प्रयत्न केला .पण पालखीत अडकलेले लोकप्रतिनिधी ,आणि वरिष्ठ अधिकारी ,माध्यम प्रतिनिधी या परिस्थितीचा फायदा संबधित काम करणाऱ्या ठेकेदाराने घेतला . सकाळी ७ वाजता बत्ती गुल केल्या नंतर संबधित यंत्रणेकडून तब्बल सायंकाळी ४ वाजेपर्यंत कामाबाबत टंगळमंगळ सुरु होती .

सकाळी 7 वाजता अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला, 10 वाजता लोकांनी विचारणा केल्यावर ट्रांसफार्मर चे काम सुरु असून 2 तासात विद्युतपुरवठा सुरु होईल असे सांगण्यात आले.पण प्रत्यक्षात तो सुरु झाला नाही म्हणून पुन्हा दुपारी 1 वाजता विचारणा केली तेव्हा 3 वाजेपर्यंत काम होईल असे सांगण्यात आले.नंतर पावुस झाल्याचे कारण देवून 6 वाजता विद्युत पुरवठा सुरु होईल असे सांगितले गेले पन प्रत्यक्ष रात्री 8 वाजता ही विद्युत पुरवठा सुरु झाला नव्हता,आणि 8 वाजता पंचवटी सह सम्पूर्ण चव्हाण नगर चा विद्युत पुरवठा बंद झाला होता रात्री साडेदहा वाजता देखील दुरुस्ती सुरुच होती आणि पंच वटी परिसराचा विद्युत पुरवठा सुरु झाला नव्हता.यावेळी नागरिक प्रत्यक्षात दुरुस्तीच्या कामाच्या ठिकाणी येवून शिव्यांची लाखोली वाहू लागले . आणि शेवटी १२ वाजता विद्युत पुरवठा सुरु झाला .

माय मराठी डॉट नेट चे प्रसारण बंद

आईस्क्रीम पार्लर सह अनेक व्यवसायिकांचे नुकसान

या परिसरात निवृत्त ,वृद्ध व्यक्तींची मोठी संख्या त्यामुळे घरात पडून असलेल्या वृद्ध आजरी व्यक्तीच्या हाल अपेष्टांमध्ये भर

गोयलगंगा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा वारीमध्ये स्वच्छतेचा नारा

0

पुणे :-  टाळ मृदुंगाचा गजर आणि ‘माऊली माऊली’ चा जयघोषात गोयल गंगा फाऊंडेशनतर्फे  पंढरपूरला जाणाऱ्या पालखी सोहळ्यात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल मधील २५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्वच्छतेचा नारा दिला. तसेच सामाजिक बांधिलकी, पर्यावरण रक्षण, वृक्ष संवर्धन,प्लास्टिक बंदी याबद्दलही जनजागृती केली.खाद्यपदार्थांच्या दुकानांजवळील कचरा गोळा केला.वारकऱ्यांना खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात देखील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. मागच्या ४ वर्षापासून वारीच्या काळात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलचे ९वी ते १२वीचे  विद्यार्थी महानगरपालिकेच्या  स्वच्छता विभागासोबत काम करून वारीतील प्रत्येक वारकऱ्याला वारीत स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न वाटावे यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. यावेळी देखील विद्यार्थी  उत्साहात यात सहभागी झाले .

मोठया आनंदमयी भक्तीमय वातावरणात विद्यार्थ्यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळयात सहभागी झाले यावेळी शाळेच्या विश्वस्त सोनू गुप्ता ,मुख्याध्यापिका भारती भागवाणी, तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

वारीच्या या सुंदर यात्रेच्या आठवणी सतत आपल्या स्मरणात राहण्यासाठी ऑडियो आणि व्हीडीओ डॉक्युमेंटरी करण्याच्या उद्देशाने वारीमधील काही चित्रफिती, छायाचित्र तसेच महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या मुलाखती विद्यार्थ्यांनी घेतल्या.सोनू गुप्ता म्हणाल्या कि, वारीची परंपरा फक्त एकमेकांना जोडत नाही तर ती आपल्या मुळांना एकत्र ठेवते. वारी मधून माणुसकीचे आणि एकात्मतेचे दर्शन घडत असते हा अनुभव येणाऱ्या पिढीने घ्यावा या हाच या उपक्रमागचा हेतू आहे.

वारी हा देवाला भेटण्याचा राजमार्ग – ह.भ.प. बबनराव पाचपुते

0

पुणे, २५ जून: “ वारीमुळे काया, वाचा, मन आणि बुध्दी शुध्द होते. त्यामुळे आपण देवाशी एकरूप होतो. हे सर्व संत संगतीने घडल्याने आपण सर्व प्रापंचिक विवंचना विसरून जातो. त्यामुळे देवाला भेटण्याचा तो खरा राजमार्ग.”असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री ह.भ.प.बबनराव पाचपुते यांनी केले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्‍वरूप दर्शन मंच, श्री क्षेत्र आळंदी येथे पालखी सोहळा प्रस्थानाच्या निमित्ताने युनेस्को अध्यासन अंतर्गत लोकशाही, मानवाधिकार, शांती व सहिष्णुतेसाठीचा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रमाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी कांग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, सौ. उर्मिला विश्‍वनाथ कराड, सौ. उषा विश्‍वनाथ कराड, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अरूण जामकर, पं. उध्दवबापू आपेगावकर, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीच्या समन्वयक प्रा. स्वाती कराड-चाटे, ह.भ.प.श्री. तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा दैठणकर, ह.भ.प. डॉ.सुदाम महाराज पानेगावकर, ह.भ.प. शालीग्राम खंदारे आणि ह.भ.प. नलावडे महाराज हे उपस्थित होते.
ह.भ.प.बबनराव पाचपुते म्हणाले,“ या सृष्टीवरील सर्वश्रेष्ठ सत्य हे मृत्यू असल्याने घाबरू नका, ते आज नाही तर उद्या येणारच आहे. अशावेळेस संतांच्या संगतीत राहून सत्कर्म करीत रहा. हे शरीर परोपकारासाठी आहे हे ही विसरू नका. वारकर्‍याने आचार, विचार, आहार आणि विहार शुध्द ठेवल्यास परमार्थ लवकरच मिळतो. मानसाच मन हे लोखंडासारखा झाल आहे. जो पर्यंत त्याला वैराग्याने तापविणार नाही तो पर्यंत त्याला आकार देता येणार नाही. ईश्‍वराकडे जाण्यासाठी मन मोकळे ठेवावे लागते.”
ह.भ.प. तुकाराम महाराज गरूड ठाकुरबुवा दैठणकर म्हणाले,“ संत सदैव आत्मसुख देऊन दुखःचे निवारण करतात. संतांचे सौदर्य हे त्यांच्या चरणी असते. त्यामुळे वारकर्‍यांनी संतांच्या चरणी शरण जावे, संतांच्या विचारांची सेवा करावी, त्यांच्या विचारांना आचरणात आणावे, संत जो मार्ग दाखविले त्यावर चालावे, वारकर्‍यांनी साधनेसाठी दृढ व्हावे आणि संतांप्रमाणे परोपकारी व्हावे. सर्व वारकर्‍यांना आळंदीला येण्याचे कारण हेच आहे की येथे माऊलीची ऊर्जा मिळते. तसेच वारकर्‍यांनी संताच्या ऐवजी विठोबाचे मंदिर बांधा आणि संतांना ग्रंथात शोधा.”
उल्हास पवार म्हणाले,“आपल्यातील अहंकार कमी करण्यासाठी सर्वांनी वारी ही केलीच पाहिजे. यामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्तीचा संगम होतांना दिसून येतो. तसेच, यातून अध्यात्माची आणि तत्वज्ञानाची अनुभूती मिळते.”
यानंतर वै.ह.भ.प. दादामहाराज साखरे फडाचे प्रमुख व ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक ह.भ.प. किसन महाराज साखरे यांचे कीर्तन झाले. त्यानंतर संजीव मेहेंदळे, ऋषिकेश बडवे आणि संपदा थिटे व सहकारी यांनी राजा परांजपे प्रतिष्ठान निर्मित अभंगरंग हा कार्यक्रम सादर केला.
प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ह.भ.प. डॉ.सुदाम महाराज पानेगावकर यांनी केले. ह.भ.प. शालीग्राम खंदारे यांनी आभार मानले.
वरील कार्यक्रमाचा इंद्रायणीच्या दोन्हीही तीरावरील लाखो वारकर्‍यांनी अध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घेतला.

संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल

0

पुणे-टाळ मृदंगच्या गजरात आणि वरूण राजाच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मंगळवारी उद्योग नगरी पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाला. यावेळी महापौर आणि पदाधिकारी यांच्याकडून मुख्य दिंडीतील शेकडो वारकऱ्याना मृदंग भेट देण्यात आला. त्यांनी स्व:खर्चातून ही भेट दिली आहे. ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने अवघी उद्योग नगरी दुमदुमून निघाली होती. यावेळी महापौर राहुल जाधव हे संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेत पाहायला मिळाले. त्यांनी मुख्य रथाचे सारथ्य देखील केले.

संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. मुख्य मंदिराला प्रदक्षणा घातल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात झाला. मंगळवारी सकाळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने मार्गस्थ झाली. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी पालखी शहरात दाखल झाली. त्यापूर्वी परिसरात जोरदार पाऊस झाला. पाऊस सुरू असताना देखील वारकरी स्थिरावले नाहीत. त्यांची पाऊलं पंढरीच्या दिशेने अखंडपणे पडत होती.

पालखी सोहळ्यामुळे सर्व परिसर भक्तिमय झाल्याचं पहायला मिळाले. यावेळी शहरातील अनेक नागरिक संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी आले होते, सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार गौतम चाबुकस्वार उपस्थित होते.

पुर्वी भावेच्या अंतर्नाद ह्या डान्स सीरिजमधले रिलीज झाले ‘भज गणपती’ गाणे

0

अभिनेत्री पुर्वी भावे नवीन डान्स सीरिज घेऊन आली आहे. ह्या अंतर्नाद सीरिजमधले पहिले ‘भज गणपती’ हे भरतानाट्यम नृत्यशैलीतले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. ह्या अल्बमचे वैशिष्ठ्य म्हणजे ‘भज गणपती’ गाण्याला पुर्वी भावेच्या आई सुप्रसिध्द शास्त्रीय गायिका वर्षा भावे ह्यांनी संगीत दिले आहे.

अभिनेत्री आणि नृत्यांगना पुर्वी भावे म्हणते, “कोणत्याही शुभकार्याची सुरूवात आपण गणेश आरधनेने आणि वंदनेने करतो. त्यामुळे सीरिजची सुरूवात ‘भज गणपती’ ह्या गणेशवंदनेने झाली आहे. लहानपणापासून मी भरतनाट्यम शिकत आलीय. त्यामूळे सीरिज सुरू करताना पहिले गाणे भरतनाट्यम शैलीचे असावे असे मला वाटले. आणि त्यापध्दतीचे गाणे आईने कंपोज केले. आता ह्यापूढील गाण्यामधून तुम्हांला वेगवेगळ्या नृत्यशैली पाहायला मिळतील.”

‘भज गणपती’ गाणे सिन्नरमधल्या गुंदेश्वर मंदिरात चित्रीत झाले आहे. ह्या गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभव सांगताना पुर्वी म्हणते, “आम्ही ह्या गाण्याचे चित्रीकरण मे महिन्यात केले. तेव्हा ह्या मंदिराच्या परिसरातली जमीन एवढी तापायची की, अनवाणी चालणेही कठीण व्हायचे. तसेच ती जमीनही ओबडधोबड होती. त्यामुळे डान्स करणे कठीण जात होते. पण आम्हांला खुप कमी वेळाची परवानगी होती. त्यामुळे हे आव्हानही स्विकारावं लागलं. वेळेच्या अभावामूळे अनेक शॉट वेनटेक चित्रीत झालेत. पण आता ह्या आव्हानात्मक गाण्याच्या चित्रीकरणाचा रिझल्ट चांगला आहे. आणि आता युट्यूबवरून गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटतेय. ”

मुंबई विद्यापीठात साकारणार ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस ऍन्ड कल्चरल सेंटर’

0

– उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या पुढाकारातून कलिना येथीर सांस्कृतिक भवन येथे साकारणार गॅलरी

– गॅलरीसाठी वित्त विभागाने मंजुर केले ८ कोटी ६० लाख इतका निधी.

– जहांगिर आर्टस गॅलरीच्या धर्तीवर पण त्याहून आधुनिक तंत्रज्ञान समावेशाचा गॅलरीत समावेश

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे असलेल्या सांस्कृतिक भवनात उभारण्यात येणार्‍या ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस ऍन्ड कल्चरल सेंटर’साठी वित्त विभागाने रुपये ८ कोटी ६० लाख इतका निधी मंजुर केला आहे. उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी यासाठी घेतलेल्या पुढाकारा मुळे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दिलेल्या मंजुरीमुळे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत याची घोषणा केली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे कला, संस्कृती आणि साहित्याचे केवळ प्रणेते नव्हते तर सिद्धहस्त प्रतिभाशाली कलावंत होते. शिवसेनाप्रमुखांचे समाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रांतील योगदान बहुमूल्य असून सर्वच जनसामान्यांची त्यांच्याप्रती आजही आदराची भूमिका आहे. व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कंचुल्यातून समाजातिल विविध अनिष्ट प्रथांवर त्यांनी आसुड ओढले आहेत.‘मार्मिक’ सारख्या व्यंगचित्र साप्ताहिकामधून संयुक्त महाराष्ट्राच्या लढयाला प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठात उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक संकुलास ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आर्टस ऍण्ड कल्चरल सेंटर’ असे नाव देण्याची सुचनाही वायकर यांनी या अगोदरच विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिली आहे.
फोटॅ येथील जहांगिर आर्टस गॅलरीमध्ये प्रदर्शन भरविण्यासाठी चित्रकारांना वर्षानुवर्षे वाट पहावी लागते. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातील चित्रकारांना आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवता यावे यासाठी विद्यापीठाचे सांस्कृतिक भवनात ‘बाळासाहेब ठाकरे आर्टस गॅलरी’ उभारण्यासाठी राज्यमंत्री वायकर यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंसमवेत बैठका घेतल्या. जहांगिर आर्टस गॅलरीच्या धर्तीवरच परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असणारी भव्य गॅलरी येथे उभारण्यात येणार आहे. कलिना येथील या सांस्कृतिक भवनात लोककला अकादमी, संगीत अकादमी, शाहीर अमरशेख अध्यासन, लोकशाहीर पठ्ठे बापुराव कलादालनही प्रस्तावित आहे. या सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्ती, नुतनीकरण, सौंदर्यीकरण, आर्टस आणि कल्चरल सेंटर स्थापित करण्यासाठी विद्यापीठाच्या मदतीने प्रस्ताव तयार करुन तो वित्त विभागाकडे पाठविण्यात आला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्यात आली होती. त्यांनीही या कामासाठी आवश्यक रुपये ८ कोटी ५९ लाख ४७ हजार ४५५ इतक्या निधीला मंजुर दिली. त्यानुसार वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देताना ‘मा. बाळासाहेब ठाकरे आर्टस गॅलरी’ उभारण्याबरोबरच अन्य कामांसाठीच्या आवश्यक निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती विधानसभेत दिली. या गॅलरीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य असे कलादालन उभारण्यात येणार असून चित्रकारांना प्रदर्शन भरविण्यासाठी भव्य दालन तयार करण्यात येणार असल्याची माहिती, राज्यमंत्री वायकर यांनी दिली.

मिशन-ऍडमिशन (लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

0

‘खूप खूप थँक्स! सांगते मी निकिताला. अगं हो गं, ती बहुतेक ऑनलाईन ऍडमिशनचा फॉर्म भरत असेल, म्हणून तुझा फोन घेतला नाही. मीही आता रजा घेणारच आहे गं ऍडमिशनसाठी. नंतर मग येऊच की पेढे द्यायला.’ – ट्रेनमध्ये बाजूला बसलेली महिला फोनवर कुणाशी तरी बोलत होती.

फोन ठेवताच शेजारी बसलेल्या तिच्या मैत्रिणीनेही प्रश्नांची सरबत्ती चालू केलीच. ‘अगं, कधीपासून रजेवर आहेस? ऍडमिशन म्हणजे एक मिशनच आहे. मनासारखे कॉलेज मिळायला हवे ना…’ १० वीचे रिझल्ट लागले की या अशा प्रकारचे संवाद घरीदारी कुठे ना कुठे तरी कानावर पडतातच; आणि ज्यांच्या कुणाच्या घरी रिझल्ट लागलेला आहे तिकडे तर युद्धावर निघाल्यासारखी जय्यत तयारी सुरू असते ऍडमिशनची.

“आम्ही नाही का कॉलेजात गेलो. आमच्या वेळी नव्हते हे असले काही. ऍडमिशन होत होत्या ना, फॉर्म भरला की झालं. हे काय नवीनच सगळं काही. किती त्या कॉलेजेसची नावं टाकायची.” …अशाच एका पालकाची प्रतिक्रिया. ऑनलाईन ऍडमिशनची प्रक्रियाच तशी थोडीफार किचकट, पटकन न कळणारी. दहावीची परीक्षा संपली की ऑनलाईन ऍडमिशनची पुस्तिका (जी शाळेतून दिली जाते) उघडली जाते. घरातले सर्व सदस्य मिळूनच ऍडमिशनच्या अभ्यासाला लागतात. (सीरिअल बघताना जसे सर्व एकत्र बसून एन्जॉय करतात तसाच काहीसा हा सीन असतो.) एखाद्या रिकाम्या वहीची भराभरा पाने काढली जातात, जिचा जास्त काही उपयोग झालेला नसतो. आपल्याच विभागातील कॉलेजेसची नावं बघून तर आश्चर्यच वाटते…अरे ही एवढी कॉलेजेस आहेत, कधी न ऐकलेली वा बघितलेली! कॉलेजेसची ही भरमसाठ नावं असतात. मग अरे त्या हिला किंवा ह्याला विचार…गेल्याच वर्षी तो दहावी झाला ना, त्याला माहीत असतीलच की…उगाच नको आपल्याला पायपीट करायला, असं घरातील वरिष्ठ सांगतात. कुठल्या कॉलेजला प्राधान्य द्यायचे त्याप्रमाणे लिस्ट काढायला घरात गोलमेज परिषद भरते. त्यात स्पर्धाही असते. अमुकअमुकला हे चांगलं कॉलेज मिळालं म्हणजे आपल्या मुलाला / मुलीला ते मिळायलाच हवं. मग टक्केवारी चांगली असो वा नसो. हल्ली तर टक्केही सगळ्यांना चांगलेच मिळतात. बहुतेक ९०% च्या वरच ऐकायला येतात, एखाद कुणास ६०-७० टक्के मिळाल्याचे कानावर पडते. आता परिस्थिती उलट आहे. पूर्वी ९०% च्या वर टक्के मिळणाऱ्यांची संख्या फार कमी होती. मग असे टक्के ऐकले की डोळे विस्फारले जायचे. आता मात्र ६०-७० टक्के कुणाला मिळाले की कान टवकारले जातात, डोळे विस्फारले जातात (जमाना बदल गया हे बाबू…!).

बरं, नक्की कुठल्या स्ट्रीममध्ये ऍडमिशन ते बऱ्याच जणांना ठाऊक नसतं किंवा ठरलेलंही नसतं. मानसी, प्रथम आर्टस् घेणार आहेत मग मीही आर्टस् घेते…कारण तिकडे गणित नाही आणि सकाळ-संध्याकाळ क्लाससुद्धा नाहीत सायन्ससारखे…इति श्वेता, आईला सांगत होती. तर मयंकचं काही वेगळंच होतं…काहीही चालेल- आर्टस्, कॉमर्स, सायन्स. कॉलेजचा क्राऊड चांगला हवा आणि कॅम्पससुद्धा. क्लासरूममध्ये बसायचं आहे कुणाला? प्रायव्हेट क्लासेस लावायचे आहेत, असं बाबांना आधीच सांगून टाकलं आहे. काही  जणांचा तर ‘तो जातोय म्हणून मी पण जाणार’ असं म्हणण्याकडे कल असतो. काही जणांना घराजवळच कॉलेज, नावाजलेलं कॉलेज, कॉलेजचा क्राऊड, कॉलेजचा कॅम्पस आणि टिचिंग स्टाफ…सगळं म्हणजे सगळंच हवं असतं. (जोडी जुळवताना जसं ३६ गुण संपन्न आहेत का ते बघितलं जातं, तसंच काहीसं!) लग्न ठरविताना जशी आजूबाजूला चौकशी केली जाते, तशीच कॉलेजची माहिती काढली जाते; आपल्या पाल्याला किती टक्के मिळाले आहेत, हे नंतर. त्यात गेल्या वर्षीची त्या त्या कॉलेजची ‘कट ऑफ लिस्ट’ चेक केली जाते. ‘दहावीनंतर पुढे काय?…’ यासाठी बऱ्याच संस्था किंवा क्लासेस फ्री(?) सेमिनारसुद्धा आयोजित करतात. किमान दोनचार सेमिनारना नक्कीच हजेरी लावली जाते आणि त्यानंतर घरी चर्चासत्र. एकदाचं, घरच्यांचं व ज्याला ऍडमिशन हवं आहे त्याचं संगनमत होऊन फॉर्म भरला जातो आणि ‘पहिली लिस्ट’ कधी लागतेय, याची आतुरतेने वाट बघत ‘मिशन ऍडमिशन’ सुरू होतं.

 

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे यांची धडक कारवाई

0

पुणे- येथील जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे आणि त्‍यांच्‍या पथकाने दौंड तालुक्‍यातील मौजे नारायण बेट येथे वाळू उत्‍खनन पात्रामध्ये अनधिकृत वाळू उत्‍खनन आणि वाहतूक करतांना तीन ट्रक एल पी,  एक जेसीबी त्यापैकी एक ट्रक ४ ब्रास वाळूने भरलेला,  दोन ट्रक रिकामे,  एक जेसीबी १५ ब्रास वाळू साठा जप्त करुन दंडात्मक कारवाईसाठी सुपूर्द केले.

….. लागला टकळा पंढरीचा !!

0

आळंदी-अंगामध्ये पांढरे शुभ्र वस्त्र , डोक्यावर फेटा किंवा टोपी , कपाळी केसरी गंध,गळ्यात तुळशीची माळ असा पेहराव असलेल्या लाखो वैष्णवांच्या आगमनाने अलंकापुरी गजबजून गेली होती . राज्यभरातून आलेल्या सुमारे साडेचारशेहून अधिक दिंड्यातील लाखो वारकरी माउलींच्या पालखीचे प्रस्थान सोहळ्यासाठी दाखल झाले होते . दिंड्या दिंड्यातील भजन , कीर्तन व प्रवचनाने अलंकापुरी भक्तिरसात चिंब झाली होती .
टाळ मृदुंगाचा गजर , विठ्ठल नामाचा जयघोष करीत भागवत धर्माची पताका उंचावत देश विदेशातून आलेल्या लाखो वैष्णवांसह कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलीनी आज ( मंगळवार ) सायंकाळी आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले .

मंगळवारी पहाटे सव्वा दोन वाजता माउलींच्या समाधी मंदिरात काकडा आरती,पवमान अभिषेक झाल्यानंतर पहाटे चार ते बारा वाजेपर्यंत माउलींचे समाधी दर्शन भाविकांना खुले ठेवण्यात आले होते . दरम्यानच्या काळात सकाळी नउ वाजेपर्यंत भाविकांच्या महापूजा करण्यात आल्या . नउ ते अकरा वीणा मंडपात किर्तनाची सेवा झाली . दुपारी बारा ते साडे बारा यावेळेत माउलींच्या नैवद्यासाठी दर्शनबारी बंद ठेवून समाधी मंदिराचा गाभारा स्वच्छ करुन महानैवद्य दाखविण्यात आला . दुपारी साडे बारा ते दोन माउलींच्या समाधीचे दर्शन सुरू ठेवण्यात आले होते . दुपारी एकनंतर मुख्य प्रस्थान कार्यक्रमासाठी देवूळवाड्याची स्वच्छता करण्यात आली . दुपारी दोन ते साडेतिनच्या सुमारास रथापुढील आणि रथामागील मानाच्या ४७ दिंड्यांना देवूळवाड्यात प्रवेश देण्यात आला . यावेळी एकेक करून चोपदार व पोलिसांच्या मदतीने दिंड्या देवूळवाड्यात सोडण्यात आल्या . दरम्यानच्या काळात माउलींच्या समाधीवर ब्रम्हवृंदाच्यावतीने पोशाख चढविण्यात आला . पोशाखानंतर गुरू हैबतबाबांच्यावतीने राजाभाऊ आरफळकर यांनी माउलींच्या समाधीची आरती केली . त्यानंतर संस्थानच्यावतीने प्रमुख विश्वस्थ ॲड विकास ढगे पाटील यांनी माऊलीची आरती केली . संस्थानच्या वतीने वीणामंडपातील उपस्थीत मानक-यांना नारळप्रसाद देण्यात आला .
आता लाखो वारकऱ्यांना माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याची ओढ लागली होती . सर्वांच्या नजरा कळसाकडे लागल्या होत्या . देउळवाड्यात टाळ मृदुंगाच्या साथीने वैष्णव माऊली नामात दंग झाले होते . दिंड्या दिंड्यात विविध खेळ रंगले होते आणि त्याच वेळी समाधी मंदिरात ” पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ” नामाचा जयघोष झाला कळस हलला , कळस हलला असा एकच गलका झाला आणि सायंकाळी साडेपाच वाजता माउलींच्या पादुकांचे आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान झाले . प्रमुख विश्वस्थ ॲड विकास ढगे पाटील व सोहळा प्रमुख योगेश देसाई यांनी माऊलींच्या पादुका प्रस्थानासाठी वीणा मंडपात ठेवलेल्या पालखीत स्थानापन्न केल्या .यावेळी संस्थानतर्फे मानक-यांना पागोटे वाटप करण्यात आले . दिंडी प्रमुखांना गुरू हैबतबाबांच्यावतीने व माउलींच्या समाधीजवळ संस्थानतर्फे नारळ प्रसाद देण्यात आला .

माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यासाठी आलेल्या आळंदीकरांनी फुलांनी सजविलेल्या व माउली विराजमान झालेल्या पालखीला खांदा दिला आणि ” माऊली माऊली ” नामाचा जयघोष करीत पालखी वीणामंडपात अष्टदिशांना फिरविली . सायंकाळी ७ च्या सुमारास देवूळवाड्यातून ती बाहेर आणण्यात आली .पालखी देवूळवाड्यातून बाहेर पडल्यानंतर सोहळ्याच्या अग्रभागी माऊलीचा मोती अश्व व मागे स्वाराचा हिरा अश्व पुढे चालु लागले . त्यामागे २७ दिंड्या , पालखीत विराजमान झालेली व माहेरच्या ओढीने निघालेली माऊली व त्यामागे सुमारे ४०० दिंड्या अशा वैभवी लवाजम्यासह नगरप्रदक्षिणा करून रात्री आजोळघरी माऊली विसावली . आजोळघरी समाज आरती झाल्यानंतर जागर झाला . रात्रभर हजारो भाविकांनी माऊलीचे दर्शन घेतले .

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील , जिल्हा न्यायाधीश श्रीनिवास अगरवाल ,श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार , मालक बाळासाहेब आरफळकर , प्रमुख विश्वस्थ ॲड विकास ढगे पाटील , सोहळा प्रमुख योगेश देसाई , अभय टिळक ,डॉ अजित कुलकर्णी , माजी मंत्री बबनराव पाचपुते , खा संजय जाधव , नगराध्यक्षा वैजयंताताई उमरगेकर , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत भारती , माजी आ उल्हास पवार , श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ ज्ञानेश्वर माऊली जळगावकर , ॲड माधवी निगडे , संभाजीराजे शिंदे , संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र पाटील ,व्यवस्थापक माऊली वीर यांच्या मानकरी , दिंडीकरी , फडकरी उपस्थित होते .

पाच लाखाचा धनादेश
आज प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता दुष्काळ निधीसाठी पाच लाखाचा धनादेश सोहळा प्रमुख योगेश देसाई यांचे हस्ते ना चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला .

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयास प्रारंभ

0

आषाढी वारीत सहभागी वारकरी बांधवांना सर्वतोपरी सोईसुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबध्द – पालकमंत्री चंद्रकांत (दादा)

पुणे, दि. 25 : पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी राज्यभरातून पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत, या वारीत सहभागी वारकरी बांधवांना आवश्यक त्या साईसुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आज येथे केले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा शुभारंभ महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या उपस्थितीत आज श्री क्षेत्र आळंदी येथे झाला. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई,  विश्वस्त  डॉ.अजित कुलकर्णी,  अभय टिळक आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, आषाढी वारी मार्गावर राष्ट्रीय सेवा योजनेचे 35 हजारावर विद्यार्थी वृक्षारोपन करणार आहेत, वारकरी बांधवांना जेवणासाठी 50 लाखावर पत्रावळयांचे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच वारी मार्गावर एक हजार आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिराच्या माध्यमातून आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. रेनकोट, स्वच्छतागृहासोबतच आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

आध्यात्मिक ठिकाणाच्या माध्यमातून आध्यात्मिक समाधान मिळते, ही समाधानाची बाब असल्याचे सांगून या आध्यात्मिक ठिकाणाच्या माध्यमातून मदतीचेही कार्य विस्तारले जावे, शेगाव संस्थानच्या धर्तीवर काम उभे राहावे, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केली.

संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पाच लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री श्री. पाटील यांच्याकडे यावेळी देण्यात आला.

पालखी प्रस्थानानंतर, श्री क्षेत्र आळंदी येथील गांधी वाडयात पालखीचा मुक्काम राहणार असून त्यानंतर पुढील प्रवासासाठी पालखी मार्गस्थ होणार असल्याची माहिती यावेळी विश्वस्तांनी दिली.  या सोहळयास वारकरी, नागरीक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवक उपस्थित

विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांची निवड

0
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने ९ ऑगस्टला साताऱ्यात होणार संमेलन

पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या सहाव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन सातारा येथे ९ ऑगस्ट २०१९ रोजी होणार आहे, अशी माहिती बंधुता साहित्य 
परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी दिली.
 
या एकदिवसीय साहित्य संमेलनामध्ये उदघाटन, कविसंमेलन, प्रकट मुलाखत आणि समारोपावेळी पुरस्कार वितरण असे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील आणि सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे यांनाही या संमेलनासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे.
 
आपले लेखन, काव्यरचना सादर करण्याची संधी विद्यार्थी व शिक्षकांना या संमेलनात मिळणार आहे. त्याचबरोबर मान्यवर साहित्यिकांची मनोगतेही ऐकायला मिळणार आहेत. संपूर्ण दिवसभर शिक्षण-साहित्याचा मेळा साताऱ्यात भरणार असल्याचे प्रकाश रोकडे म्हणाले.

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा एकतर्फी विजय

0
पुणे, 25 जुन 2019 पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत  कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाने विपार स्पिडिंग चिताज संघाचा 48-26 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला 
 
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीच्या सामन्यात कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाने  विपार स्पिडिंग चिताज संघाचा  48-26 असा एकतर्फी पराभव केला.  कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाकडून नील केळकर, आरुष मिश्रा, मृणाल शेळके, अनमोल नागपुरे, रुमा गायकवारी, प्रणव इंगोळे, रियान मुजगुले, समीहन देशमुख, स्वर्णीम येवलेकर, डेलिशा रामघट्टा, अथर्व जोशी यांनी सुरेख कामगिरी बजावली. तर,  विपार स्पिडिंग चिताजकडून नमिश हूड, सलोनी परिदा, केयूर म्हेत्रे, अदनान लोखंडवाला यांनी विजय मिळवला.   
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:  
कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स वि.वि.विपार स्पिडिंग चिताज 48-26(एकेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: श्रावि देवरे पराभूत वि. नमिश हूड 0-4; 10वर्षाखालील मुले: नील केळकर वि.वि.वेद मोघे 4-0; 10वर्षाखालील मुली: मृणाल शेळके वि.वि.ध्रुवी अद्यांता 4-1; 12वर्षाखालील मुले: आरुष मिश्रा वि.वि.अर्चित धूत 6-0; 12वर्षाखालील मुली: रितिका मोरे पराभूत वि.सलोनी परिदा 1-6; 14वर्षाखालील मुले: अनमोल नागपुरे वि.वि. ईशान देगमवार 6-0; 14वर्षाखालील मुली: रुमा गायकवारी वि.वि.अलिना शेख 6-0; कुमार दुहेरी गट: प्रणव इंगोळे/रियान मुजगुले वि.वि.ऐतरेत्या राव/वेदांग काळे 6-2; 14वर्षाखालील दुहेरी गट: अर्जुन अभ्यंकर/ऋषिकेश बर्वे पराभूत वि. केयूर म्हेत्रे/अदनान लोखंडवाला (4)5-6; 10वर्षाखालील दुहेरी गट: समीहन देशमुख/स्वर्णीम येवलेकर वि.वि.रियान माळी/क्रिशांक जोशी 4-2; मिश्र दुहेरी: डेलिशा रामघट्टा/अथर्व जोशी वि.वि.नाव्या भामिदिप्ती/विश्वजित सणस 6-5(6)).   

 

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ला मोठा प्रतिसाद पुणे परिमंडलात 15970 वीजग्राहकांची नोंदणी

0

पुणे: प्रामुख्याने पर्यावरण रक्षणासाठी तसेच वीजग्राहकांसाठी वार्षिक 120 रुपयांची बचत करणाऱ्या ‘गो-ग्रीन’ योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून पुणे परिमंडलात आतापर्यंत 15,970 वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत.

दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत 6915 वीजग्राहकांनी गो-ग्रीनच्या माध्यमातून वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’चा पर्याय निवडला आहे. यासोबतच महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केल्यानंतर वीजबिलासह इतर विविध माहितीचा ‘एसएमएस’ वीजग्राहकांना निशुल्क दिला जात आहे.

महावितरणने छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’चा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना 1 डिसेंबर 2018 पासून प्रतिबिलात 10 रुपये सवलत जाहीर केली आहे. पर्यावरणपुरक या योजनेमुळे वीजग्राहकांचे देखील वार्षिक 120 रुपयांची बचत होणार आहे. याशिवाय वीजबिल दरमहा ‘ई-मेल’ तसेच ‘एसएमएस’द्वारे मिळणार असल्याने ते लगेचच ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय उपलब्ध होत आहे. ज्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त बिल किंवा महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर असलेले वीजबिल डाऊनलोड व प्रिंट करण्याची सोय आहे. विशेष म्हणजे ही वीजबिले मूळ स्वरुपात उपलब्ध आहेत व ते रंगीत स्वरुपात देखील प्रिंट केले जाऊ शकते.

पुणे परिमंडलातील मार्च अखेरपर्यंत 9055 वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभाग नोंदविला होता. त्यानंतर तीन महिन्यांत या योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांची संख्या 15970 वर गेली आहे. यामध्ये पुणे शहरात 8959, पिंपरी चिंचवड शहरात 4531 आणि मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे तालुक्यातील 2480 वीजग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ला पसंती दिली आहे.

पुणे परिमंडलात सुमारे 27 लाख 49 हजार वीजग्राहकांना ‘एसएमएस’ द्वारे बिलाची रक्कम, देय दिनांक आदींचा तपशील, दरमहा वीजबिलाचा व वीजबिल भरण्याच्या मुदतीचा तपशील, मीटर रिडींग घेण्याची तारीख व कालावधी, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर आदींसह विविध स्वरुपाची माहिती निशुल्क दिली जात आहे. यासोबतच वीजबिलासाठी ग्राहकांनी छापील कागदाऐवजी ईमेलचा पर्याय निवडल्यास त्यांचा पर्यावरण रक्षणासाठी हातभार लागणार आहे व वीजबिलात दरवर्षी 120 रुपयांची बचत होणार आहे. तसेच वीजबिलांचे सॉफ्टकॉपीमध्ये जतन करणे सोयीचे होणार आहे. ‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडण्यासाठी वीजग्राहकांनी वीजबिलावरील गो-ग्रीन क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर उपलब्थ आहे. वीजग्राहकांनी महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते पुजन

0

पुणे :- संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहु येथील इनामदार वाडा येथे आज महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते  पुजन करण्यात आले. इनामदार वाडा येथून मुक्काम हलवून पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ झाली. यावेळी वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले होते.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के. पदमनाभन आदींसह संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.