Home Blog Page 29

“जागतिक पातळीवर मराठी उद्योजकतेस नवी चालना- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”

पुणे : मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चर – पुणे कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मराठी उद्योजकांना जागतिक पातळीवर मजबूत व्यासपीठ मिळावे, परदेशातील मराठी समुदायाशी दृढ संबंध जोडले जावेत आणि शासन–उद्योजक यांच्यात समन्वय वाढावा, याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.

कार्यक्रमात मराठी ग्लोबल चेंबर ऑफ कॉमर्सचे सेक्रेटरी शिरीष फडतरे यांनी चेंबरच्या कार्याचा, उद्दिष्टांचा परिचय करून दिला. उद्घाटन सोहळा फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया परिसरातील चेंबर कार्यालयात झाला.

यावेळी आपल्या भाषणात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, विधिमंडळातर्फे परदेशातील मराठी मंडळींशी तसेच उद्योजकांशी संवादाचे विविध कार्यक्रम सातत्याने होत असतात. “फक्त संसदीय भेटी किंवा वैधानिक कामांपुरते आमचे दौरे मर्यादित नसतात. परदेशातील मराठी समुदायाच्या संस्कृती, रोजगार, स्थलांतरितांच्या अडचणी आणि उद्योजकतेच्या संधी यावर आम्ही प्रत्यक्ष चर्चा करतो,” असे त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या की, जपान, युरोप, अमेरिका या देशांमध्ये भेटीदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे समोर आली. “इतर राज्यांचे उद्योजक परदेशात सक्रियपणे करार करून सहकार्य वाढवत आहेत. महाराष्ट्रातूनही अशीच चळवळ गतिमान करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स मोठ्या प्रमाणावर चालू असतानाही त्यांची माहिती सादर करणारी ‘नॉलेज बँक’ अद्याप प्रभावीपणे तयार केलेली नाही,” असा मुद्दा डॉ. गोऱ्हे यांनी मांडला.

स्त्री सुरक्षितता आणि स्थलांतरित महिलांच्या प्रश्नांवर डॉ. गोऱ्हे यांनी विशेष भर दिला. परदेशात काही महिलांचे पासपोर्ट काढून घेणे, भाषेची अडचण, निवासाची समस्या अशा अनेक तक्रारी समोर येतात. “आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांसाठी एक सुरक्षित ‘विंडो’ निर्माण करण्याबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर आहे. प्रोटोकॉल विभागात नवीन पदे निर्माण झाली असून लवकरच यावर व्यापक चर्चा होणार आहे,” असे त्यांनी नमूद केले.

उद्योग–धोरणांच्या अंमलबजावणीबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे जे उद्योग विषयक महिला धोरण राबवत आहे. यामुळे महिला उद्योजकांसाठी मोठ्या संधी निर्माण होत आहेत. पर्यटन क्षेत्रालाही उद्योगाचा दर्जा दिल्याने महाराष्ट्र नवीन दिशा मिळवत आहे.”

परदेशातील तंत्रज्ञान, कचरा व्यवस्थापन, शेतीसंबंधित प्रकल्प, इंडस्ट्री विस्तार, आणि परदेशात स्थायिक झालेल्या मराठी युवा–व्यावसायिकांच्या संधी यावरही त्यांनी प्रकाश टाकला. “परदेशातील अनेक कंपन्या महाराष्ट्रात युनिट्स सुरू करू इच्छितात, पण पायाभूत सुविधांच्या अडचणींमुळे प्रकल्प पुढे जात नाहीत. यावर संयुक्त प्रयत्नांची गरज आहे,” असे त्या म्हणाल्या.

मराठी संस्कृती, साहित्य आणि भाषेच्या पोहोचविषयी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “जगभर मराठी साहित्य संमेलने होतात, परंतु त्यांचे निष्कर्ष, माहिती एकत्रित करून पुढील वाटचालीसाठी देवाणघेवाण होणे आवश्यक आहे. मराठी भाषेची नाळ परदेशातील तरुण पिढीशी मजबूत ठेवण्यासाठी उद्योजक आणि सांस्कृतिक मंडळींनी एकत्रित कृती करणे गरजेचे आहे.”

शेवटी, ग्लोबल मराठी फोरम्सचे फेडरेशन तयार करून सामूहिक पातळीवर काम करण्याचा प्रस्ताव डॉ. गोऱ्हे यांनी मांडला. “महाराष्ट्र आणि मराठी विश्व जागतिक स्तरावर पुढे जाण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी आपली भूमिका मजबूत, सर्वसमावेशक आणि सातत्यपूर्ण असली पाहिजे,” असे सांगत त्यांनी सर्व उपस्थितांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

निवडणुकीत मतांची खरेदी हा लोकशाहीचे धिंडवडे काढणारा प्रकार; मंत्र्यांच्या कबुलीने मतचोरीवर शिक्कामोर्तब: हर्षवर्धन सपकाळ

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत मविआत नाराजी नाही; सर्वच पक्षांचा स्वबळाचा निर्णय; कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करावा.

नाशिकमध्ये साधुंसाठी झाडांची कत्तल हा एक बहाणा; साधुग्रामच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यासाठी सत्ताधारी पक्षांची धडपड.

मुंबई/बुलढाणा, दि. २९ नोव्हेंबर २०२५

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी पक्षाचे मंत्रीच ‘कोणाचेही पैसे घ्या, पण मतं मात्र आम्हालाच द्या’, असे जाहीरपणे सांगतात हा लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचा प्रकार आहे. भाजपा महायुतीचे काम ‘पैसा फेक तमाशा देख’ असा असून मंत्रीच जाहीरपणे कबुली देतात याचा अर्थ काँग्रेस व राहुल गांधी यांनी उघड केलेल्या मतचोरीवर शिक्कामोर्तबच आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांनी या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी केलेली आहे त्याचा आदर ठेवून काँग्रेस व महाविकास आघाडीतील पक्ष निवडणुका लढवत आहेत. काही ठिकाणी आघाडी झालेली आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर लढाई होत आहे. शरद पवार व उद्धव ठाकरे यांना याची कल्पना दिलेली होती, यामुळे आघाडीत कोणी नाराज असण्याचा प्रश्नच नाही. जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही, त्यावर नंतर निर्णय घेतला जाईल.

महायुती सत्तेसाठी लाचार….
महायुतीतील अंतर्गत वादावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महायुतीतील ट्रिपल इंजिन सरकार हे सत्तेशिवाय राहु शकत नाही, भाजपा, शिंदेसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेसाठी लाचार आहेत, त्यामुळे महायुतीत कितीही धुसफूस असली तरी सत्तेसाठी ते जुळवून घेतील असे सपकाळ म्हणाले..

तपोवनातील झाडांची कत्तल पैसे खाण्यासाठी…
कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनमधील १८०० झाडं तोडण्याच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, साधु हे दऱ्या खोऱ्या, डोंगर, हिमालय तसेच निसर्गाच्या सानिध्यात राहतात, ही अध्यात्माची परंपरा आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे. पण पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन होत नसेल तर ते कोणालाही परवडणारे नाही. झाडांची कत्तल केली नाही तर पैसे कसे लाटता येतील. मोठ्या प्रमाणावर झाडं तोडणे हे एक निमित्त आहे, खरे कारण झाडं तोडून मैदान माकळं करायचे व त्यातून खिसे भरायचे असा प्रकार आहे असे सपकाळ म्हणाले.

फडणविसांनी मला ओळखावे हा अट्टाहास नाही…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ते मला ओळखत नाहीत असे म्हणत असतील तर काही हरकत नाही, आम्ही दोघे विदर्भातील आहोत ते मुख्यमंत्री असताना मी ५ वर्षे विधानसभेत विविध प्रश्न मांडले त्याची उत्तरे त्यांनी दिलेली आहेत. मला ओळखावे हा माझा अट्टाहास नाही व ओळखावे यासाठी जे प्रोफाईल हवे तसा मी भ्रष्टाचार केलेला नाही, पक्ष बदललेले नाहीत, ईडीची प्रकरणे नाहीत, संस्था माझ्याकडे नाहीत. मी एका सर्व साधारण कुटंबातील आहे. फडणवीस यांची बुद्धी तल्लख आहे असे वाटत होते. ओळखीचे त्यांचे निकष काय आहेत ते माहीत नाही परंतु त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने मात्र विसरू नयेत. महाराष्ट्राचे वाट्टोळे करणारे गुंड कोण आहेत, त्यांना तरी ओळखा व धडा शिकवा असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

म्हणून फडणविसांना गजनी म्हणालो…
मुख्यमंत्र्यांना गजनी म्हटले त्यामागे त्यांना त्यांच्या विधानांचा विसर पडला आहे म्हणून बोललो. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही असे ते म्हणाले होते पण त्यांनी लग्न केले. अजित पवारांना चक्की पिसिंग करायला लावू, राष्ट्रवादी काँग्रेसशी कधीच युती करणार नाही असे म्हणाले पण युती केली व अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. सरकार येताच पहिली सही धनगर आरक्षणाच्या फाईलवर करू म्हटले होते. नांदेडमध्ये २०१४ पर्यंत विकासच झाला नाही असेही ते म्हणाले, त्यांच्या लक्षात काहीच रहात नाही म्हणून गजनी म्हणालो असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त सेवा,कर्तव्य,त्याग सप्ताह, सपकाळांच्या हस्ते २ डिसेंबरला उदघाटन

0

पुणे : काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह दिनांक २ ते ९ डिसेंबर या कालावधीत आयोजित केला असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते दिनांक २ डिसेंबर रोजी एस.एम.जोशी सभागृह येथे सायंकाळी पाच वाजता उदघाटन होईल, अशी माहिती सप्ताहाचे संयोजक, माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

सोनियाजींनी पंतप्रधान पदाचा त्याग करून भारतीय लोकशाहीत आपला वेगळा ठसा उमटवला. या निमित्ताने २००४पासून सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताह आयोजित केला जातो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यश मिळवलेल्या कष्टकरी पालक आणि पाल्य यांचा फिनिक्स पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. तसेच आरोग्य, महिलांचे सक्षमीकरण, पर्यावरण, रोजगार मेळावा या विषयांवरील भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामध्ये मेगा आरोग्य शिबीर, नित्योपयोगी वस्तू वाटप, अन्नदान, दिव्यांगांना साहित्याचे वाटप, ज्येष्ठ नागरिक गरीब योजना कार्डाचे वितरण, ५०० मुलींना सुकन्या समृद्धी कार्डाचे वाटप, वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, दोन दिवसीय भव्य रोजगार मेळावा, ग्रंथ जागृती कार्यक्रम, विविध क्रीडा स्पर्धा, महिला बचतगट मेळावा आणि मार्गदर्शन अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. ‘सोनिया नारी शक्ती पुरस्कारा’चे वितरण समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हास्तरीय फूटबॉल स्पर्धा आयोजित केली असून त्यात ३२ संघ सहभागी होणार आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुलजी गांधी यांनी ‘व्होट चोरी’चे सादरीकरण केले होते, त्यावर आधारित माहितीपर प्रदर्शन उपक्रम राबविला जाणार आहे. मल्टिमीडियाच्या आधारे मतदार याद्यातील फेरफार, संशयास्पद मतदार डेटा यातील राहुल गांधी यांनी मांडलेल्या तथ्यांचे सादरीकरण करण्यात येईल. ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांची ‘भारतीय संविधान’ विषयावरील व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य, आजचे संवैधानिक धोके, लोकशाहीवर ओढवलेले संकट असे विषय व्याख्यानात मांडले जातील. सप्ताहातील कार्यक्रमांना माजी मुख्य मंत्री सुशीलकुमारजी शिंदे, पृथ्वीराजजी चव्हाण, ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सतेजजी पाटील, यशोमती ठाकूर, विश्वजितजी कदम, ज्येष्ठ नेते उल्हास पवार उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी यांनी दिली.

समताभूमीवर ओबीसी योद्धे प्रा.लक्ष्मण हाके यांचे हस्ते जातीअंताचे क्रांतिकारी खंड 1 चे प्रकाशन सोहळा संपन्न !!!

पुणे : ओबीसी सेवा संघ ,ओबीसी राजकीय आघाडी व माळी विकास मिशन म.राज्य मा.सुनील खोब्रागडे आणि प्रा.श्रावण देवरे यांचे ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष ,जाती अंताचे क्रांतिकारी पर्व खंड 1 चे प्रकाशन समता भूमी येथे थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या 135 व्या स्मृतिदिनानिमित दि.28 नोव्हेंबर २०२५ रोजी (समतादिनी) दु.1 वाजता ओबीसी तरुण योद्धे प्रा.लक्ष्मण हाके यांचे व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी समता भूमीवरील सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले यांच्या व स्री शिक्षणाचे आध्यप्रनेत्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास कार्यक्रमाचे सुरुवातीला पुष्पहार आर्पण करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माळी मिशनचे कार्यकर्ते संजयबाबा करपे ,डॉ.बी.के.यादव , समता परिषद चे आबा भोंगळे ,लहू अनारसे,मंगेश गोरे उपस्थित होते.

याप्रसंगी प्रा.लक्ष्मण हाके यांनी प्रतिपादन केले की माननीय सुनील खोब्रागडे आणि प्रा.श्रावण देवरे यांनी एकत्र येऊन “ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष ,जाती अंताचे क्रांतिकारी पर्व खंड 1 या नावाचा महाग्रंथ साकार केला त्यामध्ये भाग 1 प्रा.देवरे यांनी डॉ.आंबेडकरानी ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्यांना का नाकारले व भाग 3 संविधानाचा व न्यायालायाचा अवमान टाळण्यासाठी जात बदलून देणारा जी.आर.रद्द झालाच पाहिजे आणि भाग 2 कुणबी मराठा जातीच्या संबधाचा इतिहास प्रा.सुनील खोब्रागडे यांनी विस्तृत माहितीपूर्ण लिखाण केले असून ह्या ग्रंथ निर्मितीचे मुख्य कारण म्हणजे 2 सप्टेंबरचा काळा जी.आर.होय. दुसरे असे की देवरे सरांनी आपली तब्बेत बरी नसताना देखील आजच्या समतादिनी ओबीसी बांधवाना एकजुटीत आणणारा हा महाग्रंथ माझे हस्ते प्रकाशित केला आहे हे मी माझे भाग्य समजतो.देवरे सरांनी ओबीसी समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून ओबीसी मंडल आयोगापासून आज पर्यंत अनेक अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित केले असून त्या ग्रंथाचे आधारावरच आम्ही आमच्या ओबीसी आरक्षणाच्या लढया लढत आहोत असे म्हणत सर्व बांधवानी आपल्या संग्रही हा ग्रंथ आवर्जून ठेवावे असे देखील आवाहन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविकमध्ये रघुनाथ ढोक यांनी माहिती देताना सांगितले की हा महाग्रंथ लेखक व प्रकाशकांनी ओबीसी तरुण योद्धे प्रा.लक्ष्मण हाके ,नवनाथ वाघमारे ,मंगेश ससाणे,भरत निचिते ,रविंद्र टोंगे,रामभाऊ पेरकर,प्रा.विठ्ठल तळेकर आणि प्रल्हाद कीर्तने या लढवय्यांना व त्यांच्या साथीदारांना सविनय अपर्ण केला असून हा ग्रंथ लेखक देवरे सरांनी आजारी असताना देखील प्रथमावृत्ती 28 नोव्हेंबर 25 म्हणून त्याच दिवशी प्रकाशितचा आग्रह धरला आणि तो ग्रंथ देखील प्रा. लक्ष्मण हाके यांचे हस्ते प्रकाशित झाला हे देखील तेवढेच महत्वाचे आहे असे म्हंटले.कार्यक्रमाचे आयोजन प्रकाशक अमृतराव काळोखे ,माळी विकास मिशन आणि सूत्रसंचालन व आभार संजय करपे यांनी मानले.

समता दिनी सार्वजनिक सत्यधर्मीय 2026 दिनदर्शिकेचे फुले वाड्यात प्रकाशन सोहळा संपन्न!!!

पुणे : सत्यशोधक समाज संघ निर्मित सार्वजनिक सत्यधर्मीय सन 2026 दिनदर्शिके चे प्रकाशन समता भूमी येथे सामाजिक क्रांतीकारक सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा जोतीराव फुले यांच्या 135 व्या स्मृतिदिनानिमित सत्यशोधक केशवराव जेधे यांचे नातू व श्री.शिवाजी मराठा संस्थेचे खजिनदार मा.जगदीश जेधे यांचे व महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती चे सदस्य रघुनाथ ढोक यांचे शुभहस्ते प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी समता भूमीवरील सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले यांच्या व स्री शिक्षणाचे आद्यप्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास कार्यक्रमाचे सुरुवातीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक अजय खेडेकर ,संदीप लडकत सामाजिक कार्यकर्ते डॉ.बी.के .यादव ,संजयबाबा करपे , रामराज्य बँकेचे संचालक बाळासाहेब रायकर समता परिषद चे राजेंद्र शेलवन्ते, आबा भोंगळे उपस्थित होते.
याप्रसंगी जगदीश जेधे यांनी प्रतिपादन केले की या दिनदर्शिकेचे हे पाचवे वर्ष असून फुले दांपत्य यांचे महत्वाचे कार्याविषयी तसेच इतर सत्यशोधक महापुरुषांच्या महत्वपूर्ण घटना कार्याविषयी अत्यंत मौलिक उपयुक्त माहिती दिल्याने समाजाला आपल्या महापुरुषांनी केलेल्या अलौकिक कार्याची सहज महती उपलब्ध होत आहे. तरूणापासून मोठ्या व्यक्ती व महिलांना या माहितीपूर्ण दिनदर्शिके मुळे एक प्रेरणा मिळत असते. प्रत्येक घराघरात ही दिनदर्शिका दर्शनी भागात लावली गेली पाहिजे असे सांगून सत्यशोधक केशवराव जेधे व दिनकरराव जवळकर यांनी फुले दांम्प्त्याचे सत्यशोधक कार्य पुढे नेले त्याच प्रमाणे आपण सर्वांनी कृतीशील कार्य करू या हीच खरी त्यांना आदरांजली होईल असे देखील म्हंटले.
कार्यक्रमाचे आयोजन सत्यशोधक समाज संघाने केले तर संयोजन व कार्यक्रमाची सांगता सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गाऊन उपस्थितांकडून पाठीमागे म्हणून घेतले तर लहू अनारसे यांनी आभार मानले.

राहुल गांधींविरोधातील खटल्यात सावरकरांच्या वकिलाची बोबडी वळली:पुराव्यांची CD निघाली ब्लँक

0

पुणे-स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा कथित अवमान केल्याप्रकरणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात सादर करण्यात आलेली पुराव्यांची सीडी ब्लँक निघाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. हा प्रकार गुरुवारच्या सुनावणीत घडला. पण तो आज समोर आला. याराहुल गांधी यांनी 2019 मध्ये लंडनमध्ये दिलेल्या एका मुलाखतीत विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी एक कथित वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी सावरकरांचे पणतू सत्यकी सावरकर यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यांनी राहुल यांच्या भाषणाचे रेकॉर्डिंग असलेली एक सीडी सीलबंद लिफाफ्यात कोर्टात सादर केली होती. याच सीडीच्या आधारावर कोर्टाने राहुल गांधी यांच्याविरोधात समन्स जारी केला होता. गुरुवारी न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्यापुढे सत्यकी सावरकर यांची मुख्य उलटतपासणी सुरू होती. त्यात ही सीडी मुख्य पुरावा म्हणून सादर करण्यात आली.यावेळी कोर्टाने ही सीडी चालवून पाहण्याचे आदेश दिले. त्यानुसार ती उघडून चालवण्याचा प्रयत्न झाला. पण त्यात कोणताही डेटा नसल्याचे निष्पन्न झाले. यामुळे कोर्टरूममध्ये उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सीडी कोरी निघाल्याचे पाहून सत्यकी सावरकरांचे वकील संग्राम कोल्हटकर यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी कोर्टाला आठवण करून दिली की, याच सीडीच्या आधारावर कोर्टाने राहुल गांधींविोरधात कारवाई सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी कोर्टाला यूट्यूबवर राहुल गांधींचे ते कथित भाषण लावण्याची परवानगी मागितली. पण कोर्टाने त्यांची विनंती साफ फेटाळून लावली.

यूट्यूबवर भाषण लावण्यास कोर्टाचा नकार

न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे या प्रकरणी म्हणाले, ही यूआरएल भारतीय पुरावा अधिनियम कलम 65-ब अंतर्गत आवश्यक असलेल्या प्रमाणपत्रांसह सादर करण्यात आला नाही. त्यामुळे तो पुरावा म्हणून स्वीकारार्ह नाही. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पुरावा म्हणून कोर्टात ग्राह्य धरण्यासाठी कलम 65 ब नुसार प्रमाणीकरण प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यानतंर वकील कोल्हटकर यांनी आणखी 2 अतिरिक्त सीडी सादर करून कोर्टाला त्या तपासण्याची विनंती केली. पण राहुल गांधी यांच्या वकिलांनी त्याला कडाडून विरोध केला. त्यावर कोर्ट म्हणाले की, रेकॉर्डमध्ये अशा कोणत्याही अतिरिक्त सीडीचा उल्लेख नाही. त्यामुळे कोल्हटकर यांचा अतिरिक्त सीडी चालवण्याचा अर्जही नामंजूर करण्यात आला.

त्यावर कोल्हटकर यांनी कोऱ्या सीडीच्या रहस्याची न्यायिक चौकशी करण्याची मागणी करत सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली. त्यानुसार कोर्टाने ही सुनावणी काही काळासाठी स्थगित केली. दरम्यान, प्रस्तुत प्रकरणात महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर करण्यात आलेली सीडी ब्लँक निघाल्यामुळे तथा यूट्यूब लिंक व अतिरिक्त सीडी चालवण्याची मागणी फेटाळल्यामुळे राहुल गांधी यांना कोर्टात खेचण्याचा सत्यकी सावरकर यांना जोरदार झटका बसला आहे.

पुणे महापालिका निवडणूक 15 डिसेंबरदरम्यान आचारसंहिता..


पुणे:पुणे महापालिकेने ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे पालन केलेले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी कोणतीही अडचण नाही. असे उपायुक्त, निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितल्याने महापालिका निवडणुकीसाठीची
आचारसंहिता साधारणतः १५ डिसेंबरदरम्यान लागू होण्याची शक्यता आहे, तर जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता डिसेंबरच्या मध्यावधीत आचारसंहिता जाहीर होऊन जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे, यास महापालिका अधिकाऱ्यांनी देखील दुजोरा दिला आहे.

महापालिकेने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रारंभी प्रभाग रचना जाहीर केली. त्यानंतर प्रभागनिहाय आरक्षण जाहीर केले. त्यापाठोपाठ प्रारूप मतदार यादीही जाहीर केली. तसेच, हरकती-सूचना घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता निवडणुकीचा कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो यामुळे इच्छुक आणि ज्यांना खरोखर लढायचे आहेच त्यांना प्रचार प्रारंभ करावाच लागणार आहे.


17 दिवसांत भाडे नाकारणाऱ्या 138 रिक्षाचालकासह 1038 रिक्षांवर पोलिसी कारवाई

0

पुणे :दिनांक: 28 नोव्हेंबर 2025

पुणे शहर वाहतूक पोलीस विभागाकडून दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून अवैधपणे चालणाऱ्या रिक्षावर कारवाई करण्यासाठी 1 अधिकारी व 4 अंमलदार यांचे विशेष कारवाई पथक तयार करण्यात आले. दिनांक 10 नोव्हेंबर 2025 ते दिनांक 26 नोव्हेंबर 2025 दरम्यान सदर पथकाने एकूण 1087 अवैधपणे चालणारे रिक्षावर कायदेशीर कारवाई केलेली आहे.
हेड प्रमाणे केलेली कारवाईची माहिती पुढीलप्रमाणे:
क्षमते पेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे – 234
नो पार्किंग (वाहतुकीस अडथळा) – 92
फ्रंट सीट – 36
विद्याउट युनिफॉर्म – 424
कागदपत्रे जवळ न बाळगणे – 16
सिग्नल उल्लंघन – 16
अनधिकृत रिक्षा थांबा वर रिक्षा लावणे – 38
रॉंग साईड – 36
भाडे नाकारणे – 138
इतर विविध कारवाई -57 याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

पुणे शहर वाहतूक विभागाकडून सर्व रिक्षा चालकांना आवाहन करण्यात आले आहे की, शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

🔸 निर्धारित रिक्षा स्टँडवरच थांबावे
🔸 रस्त्यावर अनधिकृत पार्किंग टाळावे
🔸 सिग्नल व लेन शिस्त पाळावी
🔸 प्रवाशांशी नम्रपणे आणि प्रामाणिकपणे वागावे
🔸 भाडे मीटरप्रमाणेच आकारावे.

आपले सहकार्य हेच सुरक्षित आणि सुव्यवस्थित वाहतुकीची गुरुकिल्ली आहे.असे सांगत पुणे शहर वाहतूक विभागाच्या वतीने सर्व रिक्षा चालकांना विनम्र आवाहन करण्यात आले आहे.

गजा मारणेला ‘ फिर्यादीच्या प्रतिज्ञापत्रामुळेच” मिळाला जामीन: पोलीस तोंडघशी ?


मोक्का लावताना पोलिसांनी निकष पाळले नसल्याचा ठोंबरे पाटलांचा आरोप
पुणे:पुण्यातील गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाने जामीन मंजूर करताच पुणे शहरात पुन्हा एकदा या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोथरूडमध्ये शिवजयंती दिनी अभियंता देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी मारणे आणि त्याच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला होता
पुणे पोलिसांनी त्याला टोळी प्रमुख म्हणून अटक केली होती . मात्र फिर्यादी देवेंद्र जोग यांनी न्यायालयात हजर राहून कुणीही चिथावणी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. विशेष न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात-मूचलक्यावर जामीन मंजूर केला.
जेलमधून जामिनावर सुटका होताच गजानन मारणे थेट पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल झाला आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त यांच्या समोर हजेरी लावली. पोलिसांनी मात्र त्याला पुणे शहरात थांबण्यास मनाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर गजानन मारणेचा वकिल विजयसिंह ठोंबरे यांनी मोक्का लावताना लागणारे कायदेशीर निकष पोलिसांनी पाळलेच नसल्याचा आरोप त्यांनी केला. ‘हे प्रकरण पूर्णपणे बनावट आहे. रस्त्यावर भांडण झाले, पण आम्ही कुठेही काही सांगितले नव्हते. तपासात आम्ही पूर्ण सहकार्य केले, ते कधीही फरार नव्हते आणि स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर राहिले,’ असे ठोंबरे यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील गुन्हेगारीच्या जगतात ‘गजा मारणे’ हे नाव वेगळ्या धाकाने उच्चारले जाते. अमोल बधे आणि पप्पू गावडे या दोघांच्या खुनाप्रकरणी त्याला अटक झाली आणि त्यानंतर तब्बल तीन वर्षे तो येरवडा कारागृहात होता. या खटल्यांनंतर त्याची प्रतिमा ‘मारणे टोळीचा म्होरक्या’ म्हणून अधिक बळकट झाली. त्याच्यावर सहापेक्षा जास्त खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील एका व्यावसायिकाकडून तब्बल २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणीही कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. जामीनानंतर काढलेली त्याची रॅली शहरभर चर्चेचा विषय ठरली होती. पुणे पोलिसांनी एकदा त्याची ‘धिंड’ काढत त्याला गुडघ्यावर बसवले होते. उद्देश होता की त्याच्या दहशतीला चाप बसावा. पण काही काळानंतर याच गजा मारणे सोबत काही पोलिसांनी पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आणि पाच पोलिस निलंबित झाले होते.

प्रकरण नेमके कसे, का लावला मोक्का ?

कोथरूडमधील आयटी अभियंता तरुण १९ फेब्रुवारी रोजी दुपारी दुचाकीवरून घरी निघाला होता. वाटेत भेलकेनगर परिसरात रस्त्यावर गर्दी होती. या गर्दीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना तिघांनी त्या तरुणाला बेदम मारहाण केली. याबाबत अभियंता तरुणाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय-३५), किरण कोंडिबा पडवळ (वय-३१) अमोल विनायक तापकीर (वय-३५, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) या तिघांना अटक केली होती. या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी श्रीकांत संभाजी पवार पसार झाला होता. तपासात आरोपी मारणे टोळीशी संबंधित असल्याचे समोर आले.त्यानुसार पोलिसांनी ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय-३५), किरण कोंडिबा पडवळ (वय-३१) अमोल विनायक तापकीर (वय-३५, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) या तिघांना अटक केली होती. या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी श्रीकांत संभाजी पवार पसार झाला होता. तपासात आरोपी मारणे टोळीशी संबंधित असल्याचे समोर आले.
या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. पोलिस डोळे बंद करून बसले आहेत का?’ या भाषेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींसह टोळीप्रमुख गजानन मारणे, त्याचा भाचा रूपेश मारणे याच्यावर मकोका कायद्यान्वये कारवाई केली.

“महात्मा फुले यांच्या विचारांना कृतीतून आदरांजली; समतेचा दीप अखंड प्रज्वलित ठेवण्याची प्रतिज्ञा” — डॉ. नीलम गोऱ्हे

0

महात्मा जोतीराव फुले यांच्या १३५व्या स्मृतिदिनानिमित्त संविधानातून सामाजिक बांधिलकीचा संकल्प

पुणे, दि. २८ नोव्हेंबर २०२५ : फुलेवाडा येथे महात्मा जोतीराव फुले यांच्या १३५व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे वाचन, सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि फुले विचारांचा पुनःस्मरण असा अर्थपूर्ण उपक्रम पार पडला. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महात्मा फुले यांनी समानतेचा मार्ग दाखवला. त्यांच्या स्मृतिदिनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून लोकशाहीच्या मूल्यांची पुनःजाणीव करून देत आहोत.” त्यांनी सांगितले की २५ नोव्हेंबरपासून सुरू केलेली ‘शाखा—तिथे संविधान’ मोहीम वर्षभर राबवण्यात येणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम अधिक बळकट झाला आहे.

महिला सुरक्षा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आणि तळागाळातील प्रश्नांना निवडणुकीत आवाज देणे हे शिवसेनेचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी व्यक्त केले. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाच्या अंतिम टप्प्यातील कामाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख निलेश गिरमे यांनी केले. महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर, शिवसेना प्रवक्ते किरण सोनवणे, युवा सेना सचिव किरण साळी, महिला संपर्काप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, युवासेना पदाधिकारी निलेश घारे, जिल्हा प्रमुख सोमनाथ कुटे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि महिला आघाडीतील कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे वाचन करून लोकशाहीचा संदेश देण्यात आला. दलित समाजाच्या जमिनी, महिलांची सुरक्षा, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि सामाजिक विषमतेविरुद्ध आगामी अधिवेशनात ठोस आवाज उठवण्याची बांधिलकी डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केली.

“घर-घर तिथे संविधान; सामाजिक समता, महिला सुरक्षितता आणि शिवशक्ती–भीमशक्ती ऐक्याचा संदेश” – डॉ. नीलम गोऱ्हे

संविधान हे सर्वांचे; मतपेटीपलीकडे जाऊन समाजासाठी काम करा” – डॉ. गोऱ्हे

पुणे, दि. २८ नोव्हेंबर २०२५ : शिवसेना भवन, सारसबाग येथे झालेल्या ‘शाखा तिथे संविधान’ अभियानात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संविधान दिनानिमित्त मार्गदर्शन केले. भारतीय संविधानातील सामाजिक न्याय, आरक्षणाचे मूलभूत उद्दिष्ट आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आजची गरज यावर त्यांनी थोडक्यात पण स्पष्ट भाष्य केले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, “संविधान हे एका समाजाचे नसून सर्व नागरिकांचे आहे. सामाजिक समता प्रस्थापित होईपर्यंत शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण आवश्यक आहे.” सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा अधोरेखित केलेली ५०% आरक्षण मर्यादा, बाबासाहेबांनी मांडलेले तत्त्व आणि इतिहासातील संघर्ष त्यांनी उपस्थितांसमोर मांडले.

शिवसेनेची शिवशक्ती–भीमशक्ती परंपरा, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ आणि दलित–बहुजन समाजाच्या राजकीय सहभागाबाबत शिवसेनेची भूमिका यावरही त्यांनी उल्लेख केला. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त फुले–आंबेडकर विचारांची आजची उपयुक्तता त्यांनी सांगितली.

महिला सुरक्षिततेबद्दल बोलताना अलीकडील गंभीर घटनांचा संदर्भ देत प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “केवळ राजकारणापुरते न थांबता समाजासाठी काम करा,” असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

कार्यक्रमात प्रत्येक शाखेत संविधान प्रस्तावना लावणे, ६ डिसेंबरला विशेष स्टेटस ठेवणे, संविधान आणि राज्यशास्त्रावरील साप्ताहिक व्याख्यानमाला सुरू करण्याची सूचना देण्यात आली.

अभियानाचे प्रमुख संयोजक व प्रवक्ते किरण सोनावणे म्हणाले, “शिवसेनेच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसेना शाखेत संविधानाची प्रस्ताविका व प्रत ठेवून संविधानिक मूल्यांचा व्यापक प्रसार केला जाईल. एक शायर म्हणतो, ‘दोस्त, कभी फुरसत मिले तो मुझे पढ़ना, मुझमें तेरे हर उलझनों का समाधान है… मैं कोई और नहीं, तेरे देश का संविधान हूँ’.”

शिवसेना भवनात झालेल्या या कार्यक्रमात मिलिंद अहिरे, अनुसूचित जाती शिवसेना पुणे शहर प्रमुख, शिवसेना प्रवक्ते आणि पत्रकार किरण सोनवणे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच, पुणे शहर सह संपर्कप्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, शहर प्रमुख पूजा रावेतकर, महानगर प्रमुख कल्पना थोरवे, संदीप शिंदे शहर सचिव, नितीन पवार कोथरूड विधानसभा प्रमुख , सुनील जाधव, गौरव साईनकर, सुधीर जोशीं, संदिप शिंदे , एकनाथ ढोले, आणि अन्य प्रमुखांचाही या प्रसंगी विशेष सहभाग होता. सर्व पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये १ नोव्हेंबरपुर्वी दाखल प्रकरणावर कार्यवाही करण्यात येणार-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

पुणे, दि.२८: आगामी राष्ट्रीय लोकअदालत होणाऱ्या १३ डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयामध्ये होणारी संभाव्य गर्दी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता १ नोव्हेंबर २०२५ रोजी पुर्वी न्यायालयात दाखल असलेल्या ज्या प्रकरणांमध्ये लोकअदालतीची नोटीस काढण्यात आली आहे, केवळ अशीच प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेली आहेत.

इतर सर्व नागरिकांना व वाहनधारकांना सुचित करण्यात येते की, इतर कोणाचीही मोटार वाहन प्रकरणे लोकअदालतीत ठेवण्यात आलेली नाहीत. तसेच ज्यांना १३ सप्टेंबर २०२५ रोजीच्या लोकअदालतीच्या दिवशी टोकन मिळाली आहेत त्यांची देखील प्रकरणे या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेली नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, पुणे शहर वाहतुक विभाग, पिंपरी-चिंचवड वाहतुक विभाग तसेच महामार्ग वाहतूक विभाग पुणेयांच्यातर्फे करण्यात येत आहे.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

0

· पुरस्कारप्राप्त कलाकरांचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि.28 – कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय, वाद्यनिर्मिती, झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार, नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ, संगीत संयोजन, व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

ज्येष्ठ पुरस्कार तीन लाख रुपये, युवा पुरस्कार एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. हे सर्व पुरस्कार लवकरच मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. पुरस्कारर्थींची नावे पुढील प्रमाणे.

ज्येष्ठ पुरस्कार :-

नाटक – अरुण कदम (2025), कंठसंगीत – धनंजय जोशी (2025), वाद्यसंगीत – विजय चव्हाण (2025), मराठी चित्रपट – शिवाजी लोटन पाटील (2025), उपशास्त्रीय संगीत- उदय भवाळकर (2025), किर्तन/समाजप्रबोधन- गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (2025), तमाशा- कोंडीराम आवळे (2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- श्रीमती रंजना फडके (2025), लोककला- हरिभाऊ वेरुळकर (2025), आदिवासी गिरीजन – रायसिंग हिरा पाडवी (2025), कलादान- चंद्रकांत घरोटे (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- प्रा. आनंद गिरी (2024), संजीव भागवत (2025), लोकनृत्य- सुभाष नकाशे (2024), अरविंद राजपूत (2025), लावणी संगीतबारी- श्रीमती शकुंतला नगरकर (2024), श्रीमती कल्पना जावळीकर ( 2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- श्रीमती पदमजा कुलकर्णी (2024), श्रीमती गोदावरी मुंडे (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- युसुफ घडूलाल मुल्ला (2024), भालेराव नागोराव दडांजे (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- रामदास चौधरी (2024), बुधा भलावी (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- ओमप्रकाश यशवंत चव्हाण (2024), भानुदास शंभा सावंत (2025), दुर्मिळ प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- धर्मा कांबळे (2024), श्रीमती साखराबाई टेकाळे (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट (2025), तांबवेश्वर शाहिरी कलापथक (तुकाराम ठोंबरे), बीड (2024), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- अविनाश ओक (2024), महेश अंबेरकर (2025), संगीत संयोजन- अमर हळदीपूर (2024), कमलेश भडकमकर (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- अंबरीश मिश्र (2024), उदय सबनीस (2025)

युवा पुरस्कार :-

नाटक – तेजश्री प्रधान (2024), भूषण कडू (2025), कंठसंगीत- धनंजय म्हसकर (2024), मयुर सुकाळे (2025), वाद्यसंगीत- ऋषिकेश जगताप (2024), वरद कठापूरकर (2025), मराठी चित्रपट- मधुरा वेलणकर (2024), शंतनु रोडे (2025), उपशास्त्रीय संगीत- राहुल देशपांडे (2024), भाग्येश मराठे (2025), किर्तन/समाजप्रबोधन- जयवंत बोधले (2024), ज्ञानेश्वर माऊली कदम ( 2025), तमाशा- नितीन बनसोडे (2024), अमृता थोरात (2025) शाहिरी- शाहिर आझाद नाईकवडी (2024) शाहिरा अनिता खरात (2025), नृत्य- वृषाली दाबके (2024), संतोष भांगरे (2025), लोककला- संदिप पाल महाराज (2024), चेतन बेले (2025), आदिवासी गिरीजन- साबूलाल बाबूलाल दहिकर (2024), गंगुबाई चांगो भगत (2025) कलादान- श्रीमती कस्तुरी देशपांडे (2024), सिध्देश कलिंगण (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- खंडुराज गायकवाड (2024), तेजस्विनी आचरेकर (2025), लोकनृत्य- दिपक बीडकर (2024), गणेश कांबळे (2025), लावणी संगीतबारी- प्रमिला लोदगेकर ( 2024), वैशाली वाफळेकर (2025), भारुड/विधीनाट्य/गौळण- हमीद सय्यद (2024), रामानंद उगले (2025), वाद्यनिर्मिती करणारे कलाकार- उमा शंकर दाते (2024), सर्वजीत विष्णू पोळ (2025), झाडीपट्टी/दंडार/खडीगंमत- मुकेश देशमुख (2024), दुधराम परसराम कावळे (2025), दशावतार/नमन खेळ/वहीगायन- लक्ष्मीकांत नाईक (2024), रामकृष्ण कैलास घुळे (2025), दुर्मिल प्रयोगात्मक कला व मौखिक परंपरा जपणारे व त्यांचे जतन, संवर्धन करणाऱ्या व्यक्ती/संस्था- रेणुका शेंडगे जेजूरीकर (2024), प्रसाद गरुड (2025), प्रयोगात्मक कलेशी संबंधित संग्रहालय/संस्था- सव्यसाची गुरुकुलम लखन जाधव (2024), इतिहासाचे अबोल साक्षिदार बहुउद्देशिय ट्रस्ट (निलेश सकट) (2025), ध्वनीतंत्रज्ञ संकलक/पुरस्कार- प्रणाम पानसरे (2024), विराज भोसले (2025), संगीत संयोजन- अनुराग गोडबोले (2024), अमित पाध्ये (2025), व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट/निवेदन- मेघना एरंडे (2024), समिरा गुजर(2025).

सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.

0000

राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव

0

मुंबई, दि. 28 : सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार हे येत्या 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून राजेश अग्रवाल त्यांच्याकडून 30 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारतील.

राजेश अग्रवाल यांचा अल्प परिचय

राजेश अग्रवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र कॅडरचे 1989 चे अधिकारी असून त्यांचे मूळ गाव पंजाबमधील जालंधर हे आहे. त्यांनी कॉम्प्युटर सिस्टिम विषयामध्ये बी.टेक केले आहे.

राजेश अग्रवाल यांनी सेवाकाळात सहायक जिल्हाधिकारी रत्नागिरी, जिल्हा परिषद जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला येथे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे उप विशेष आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, भारत निवडणूक आयुक्त कार्यालयात संचालक, मंत्रालय मुंबई येथे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव, इंटर्नल एक्स्चेंज ऑफ इंडिया नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मंत्रालय मुंबई येथे कृषी आणि मत्स्यव्यवसाय विभागात सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागात सचिव (अतिरिक्त कार्यभार), वित्त विभागात सचिव, सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), वित्त विभागात लेखा व कोषागारे विभागात सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार, वित्त विभागात सचिव (लेखा व कोषागारे)(व्यय – अतिरिक्त कार्यभार), केंद्र सरकारच्या वित्त सेवा विभागात सह सचिव, केंद्र सरकारच्या आदिवासी विकास विभागात सह सचिव, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास विभागाचे महासंचालक (प्रशिक्षण), पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस विभागात अतिरिक्त सचिव आणि वित्त सल्लागार, केंद्र सरकारच्या कौशल्य विकास विभागात सचिव, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागात सचिव, मंत्रालय मुंबई येथे सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे.

००००

इम्रान खान जिवंत आहेत की नाही, मुलाने मागितला पुरावा:पाकिस्तानात 4 दिवसांपासून निदर्शने

0

इस्लामाबाद-पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे पुत्र कासिम खान यांनी गुरुवारी तुरुंगात असलेल्या आपल्या वडिलांच्या जिवंत असल्याचा पुरावा मागितला आहे. त्यांनी सांगितले की, इम्रान जिवंत आहेत की नाहीत हे कोणालाही माहीत नाही.

कासिम यांनी X वर लिहिले की, त्यांच्या वडिलांना 845 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. गेल्या 6 आठवड्यांपासून त्यांना एकाकी ‘डेथ सेल’मध्ये ठेवण्यात आले आहे. कोणालाही त्यांना भेटू दिले नाही, तसेच कोणताही फोन कॉल किंवा मेसेज दिला नाही.कासिमने सांगितले की, त्यांच्या आत्यांनाही त्यांच्या भावाला भेटू दिले जात नाहीये. हे सर्व कोणत्याही सुरक्षा नियमामुळे नाही, तर जाणूनबुजून केलेली कारवाई आहे. सरकार त्यांच्या वडिलांची खरी स्थिती लपवत आहे.दुसरीकडे, इम्रान खान यांना पाठिंबा देण्यासाठी रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात पोहोचलेले खैबर-पख्तूनख्वा (KP) राज्याचे मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांना पोलिसांनी गुरुवारी रस्त्यावर पाडून मारहाण केली.मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीएम सोहेल आफ्रिदी यांच्यावरील हल्ल्याची कारवाई लष्कराच्या आदेशानुसार करण्यात आली. आफ्रिदी गुरुवारी ज्यावेळी तुरुंगात पोहोचले, त्यावेळी तिथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती आणि पीटीआय समर्थकांची गर्दी सतत वाढत होती. त्यांच्या पोहोचण्याने परिस्थिती आणखी बिघडली.

पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या नेत्यांना पुढे जाण्यापासून रोखले. धक्काबुक्कीदरम्यान, पोलिसांनी सीएमना लाथा-बुक्क्यांनी मारले आणि जमिनीवर पाडले. पीटीआयने या घटनेला लोकशाही हक्कांवरील हल्ला म्हटले आहे.सुहैल आफ्रिदी यांचे म्हणणे आहे की, सरकारने इम्रान खान यांच्या आरोग्याबाबत आणि सुरक्षेबाबत उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे द्यावी लागतील. जर असे केले नाही तर ते जनतेसोबत रस्त्यावर उतरण्यास भाग पडतील.

आफ्रिदींनी आरोप केला की सरकार इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल योग्य माहिती देत नाहीये. त्यांनी इशारा दिला की जर इम्रान खान यांना काही झाले तर त्याच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी सध्याच्या सरकारवर असेल.

त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्यावर टीका करत म्हटले की देशातील बिघडलेल्या परिस्थितीसाठी तेच जबाबदार आहेत. आफ्रिदींचे म्हणणे आहे की इम्रान खान यांच्यापर्यंत पोहोचण्यास प्रतिबंध करणे आणि त्यांच्या आरोग्याची माहिती लपवणे हे जनतेच्या विश्वासाशी खेळण्यासारखे आहे.