Home Blog Page 2887

परदेशात फरार होणाऱ्या आर्थिक घोटाळेबाजांवर कारवाईसाठी सरकारचे कठोर निर्देश

0

नवी दिल्ली-आर्थिक घोटाळे करून परदेशात फरार होणाऱ्या किंवा जाणीवपूर्वक बँकांची कर्जे थकवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने कठोर निर्देश जारी केले आहेत. यासाठी एका अधिकृत मूलस्रोताकडून म्हणजे भारत सरकारच्या उपसचिव यांच्या दर्जाचा  किंवा राज्य सरकारचा संयुक्त सचिव यांच्या दर्जाचा किंवा जिल्हा दंडाधिकारी किंवा पोलिस अधीक्षक किंवा विविध कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या सुरक्षा संस्थांनी नामांकित केलेला किंवा इंटरपोलचा नामांकित अधिकारी किंवा सार्वजनिक बँकेचा अध्यक्ष/ व्यवस्थापकीय संचालक/ मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या विनंतीच्या आधारे किंवा भारतातील कोणत्याही फौजदारी न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या आधारे भारतीय नागरिक आणि परदेशी व्यक्तींसंदर्भात ब्युरो ऑफ इमिग्रेशन( स्थलांतर विभाग) लुक आऊट परिपत्रक जारी करू शकेल.

ज्या व्यक्तीविरोधात एलओसी म्हणजे लुक आऊट परिपत्रक जारी झाले आहे अशा जाणीवपूर्वक कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीसह कोणत्याही व्यक्तीला इमिग्रेशनचे अधिकारी भारत सोडून जाण्यापासून प्रतिबंध करू शकतात किंवा स्थानबद्ध करू शकतात. बँकाच्या सूचनेवरून इमिग्रेशन विभागाने आतापर्यंत अशी 83 एलओसी जारी केली आहेत.

भारतीय अधिकारक्षेत्रातून पलायन करणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी फरार आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 लागू करण्यात आला आहे. फरार आर्थिक गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करण्याची आणि त्यांना कोणताही दिवाणी खटला लढवायला प्रतिबंध करण्याची त्यात तरतूद आहे. त्याशिवाय 50 कोटी रुपये किंवा त्याहून जास्त रकमेचे कर्ज घेणाऱे प्रवर्तक/ संचालक आणि इतर कंपन्यांचे अधिकृत स्वाक्षरीकर्ते यांच्या पासपोर्टच्या प्रमाणित प्रती जमा करण्याची सूचना सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना केली आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

मनोरा आमदार निवासाच्या नव्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्रातील संसदीय कार्यप्रणाली ही वैभवशाली आहे. या वैभवात भर घालणारी मनोरा आमदार निवासाची इमारत उभी राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

नवीन आमदार निवासाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मनोरा आमदार निवास येथील जागेत आज झाले. त्यानंतर विधानभवनात झालेल्या समारंभात ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष विजय औटी, विधिमंडळातील प्रतोद राज पुरोहित, विधिमंडळाचे सचिव (कार्यभार) जितेंद्र भोळे, वास्तुविशारद शशी प्रभू, यांच्यासह मंत्री, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, मनोरा आमदार निवास ही वास्तू अनेक इतिहासाची साक्षीदार होती. अनेकांच्या चांगल्या-वाईट आठवणी याच्याशी जोडल्या गेल्या होत्या. परंतु या आमदार निवासात वारंवार होणाऱ्या छोट्या अपघातामुळे नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. आवश्यक गोष्टींचा विचार करून नवीन इमारतीचा सुंदर आराखडा शशी प्रभू यांनी बनविला आहे. यामध्ये 800 पेक्षा जास्त रूम असणार आहेत. आमदार, माजी आमदार यांच्याबरोबर विधानमंडळ येथे येणाऱ्या शिष्टमंडळासाठीही व्यवस्था इथे होणार आहे. एनबीसीसीने कमीत कमी वेळेत आधुनिक तंत्रज्ञान वापरून ही इमारत पूर्ण करावी. याबरोबरच मॅजेस्टिक आमदार निवासाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्याकडेही लक्ष द्यावे.

मनोरा आमदार निवासातील आठवणी सांगून सभापती श्री. रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, नवीन आमदार निवासाची इमारत अतिशय चांगली होईल. या इमारतीची देखभाल ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. तसेच या माध्यमातून आमदारांना चांगली सेवा देता येईल. या इमारतीत आमदारांकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांचीही सोय व्हावी.

विधानसभा अध्यक्ष श्री. बागडे म्हणाले, मनोरा आमदार निवासाची सुसज्ज वास्तू उभी राहत आहे. आमदारांची सध्या पाच वेगवेगळ्या ठिकाणी निवासव्यवस्था होत होती. या इमारतीमध्ये आता सर्वांची एकाच ठिकाणी व्यवस्था होईल.

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रास्ताविक केले. तर उपाध्यक्ष विजय औटी यांनी आभार मानले.

नव्या आमदार निवासाची रचना

एकूण 34 मजली टॉवर असणार

एकूण बांधकाम 7.72 लाख चौरस फूट

सभागृह आसन क्षमता 240

वाहनतळ, दवाखाना, बँक, दुकाने, भोजन कक्ष, योगा कक्ष, वाचनालय, छोटे थिएटर व उपहारगृहाचा समावेश

आमदारांसाठी व अभ्यागतांसाठी वेगवेगळे कक्ष

वंचितमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानेंनी केली नव्या पक्षाची घोषणा

0

पुणे-प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानेंनी वेगळी चूल मांडली आहे. त्यांनी आज आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. “महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी” असे त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मानेंनी नव्या पक्षाची स्थापना केल्याने वंचित बहुजन आघाडीची चांगीलीच गोची केली आहे. येत्या 29 जुलैला पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आघाडीचा पहिला निर्धार मेळावा पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी न्यायमूर्ती पीबी सावंत यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होईल.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या विचारांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. विधानसभेला डाव्या आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचेही लक्ष्मण मानेंनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतील चूक आता करायची नाही. भाजपचा पराभव करण्याऐवजी त्यांच्याच 12-12 जागा निवडून आल्या, त्यामुळे मला अपराधीपणा वाटत होता. जातीयवादी आणि धार्मिक संघटना बरोबर आम्ही जाणार नाही. भाजप युतीला हरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मातंग, धनगर, रिपब्लिकन ओबीसी संघटनांबरोबर आमची चर्चा सुरू असल्याचेही माने म्हणाले.

किरकोळ स्वार्थसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार विक्रीला काढणार नाही. बाबासाहेबांचे आम्ही सारेच वारसदार असल्याचे माने म्हणाले. मुस्लीम बांधवांना जय श्री राम म्हणून मारहाण केली जाते ही आराजकता आहे. उद्या तुमचीही घरे पेटल्याशिवाय राहणार नाहीत, उद्या ही वेळ तुमच्यावर येऊ शकते, असा इशारा मानेंनी दिला.

अब्दुल रहमान अंजरिया यांच्या अब्रूनुकसानीच्या दाव्यावर बोलताना, मानेंनी वकिलांशी बोलून नोटीसला उत्तर देणार असल्याचे म्हटले. माझे विधान राजकीय असून त्यांचा आणि माझा वैयक्तिक वाद नाही, ते काळे की गोरे हेही मला माहीत नाही. राजकीय आरोप होतात, मी वैयक्तिक टीका, चारित्र्यहनन केले नाही. त्यांच्या फोटोवरुन मी विधान केले आहे, वकिलांशी बोलून नोटीसला उत्तर देईल, असे माने म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांच्या काँग्रेससोबत जाण्याच्या भूमिकेवरही मानेंनी टीका केली. ते म्हणाले, हा बाळासाहेबांचा डावपेचाचा भाग आहे. काँग्रेस कधीच मान्य करणार नाही, अशी मागणी करायची आणि बोलने तोडून टाकायचे, हा विचारसरणीचा नाहीतर डावपेचाचा भाग आहे. वंचित आघाडी भाजपाची बी टीम असल्याचे त्यांच्या वर्तनाने सिद्ध केले आहे. लोकसभेत आमची एकही जागा निवडून आली नाही, याउलट काँग्रेसलाही फायदा झाला नाही, फायदा हा भाजपचा झालाय. त्यामुळे लोक बी टीम म्हणाले तर राग यायचे कारण नाही. आकडे सांगतात की तुम्ही तिकडे मदत केली, असेही माने म्हणाले.

फी भरण्यासाठी पैसे नसल्याने सोलापूरात विद्यार्थिनीने किटकनाशक प्राशन करुन संपवले जीवन, पात्रता परिक्षेत मिळाले होते 89 टक्के गुण

0

मोहोळ- मला कॉलेजला जाता येईल का नाही? या भीतीने 17 वर्षीय विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज(24 जुलै)पहाटे मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील वाळूज या गावी घडली. रुपाली रामकृष्ण पवार असे मृत मुलीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील देगाव येथील रुपाली पवार या विद्यार्थिनीला सीईटीच्या पात्रता परीक्षेत 89 टक्के गुण मिळाले होते. तिने लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी जालिंदर, पंजाबमध्ये बी.टेक.साठी प्रवेश घेण्याचे ठरवल होते. या अकादमीत दहा हजार भरून प्रवेशही निश्चित केला होता. मात्र उर्वरित एक लाख रुपयांची रक्कम भरावी लागणार होती. त्याची शेवटची मुदत 20 जुलैपर्यंत होती. सातत्याने तीच्या वडिलांनी रक्कम जमवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी स्वतःची तीन एकर असलेली कोरडवाहू शेतजमीन ही विकायला काढली होती. मात्र त्या जमिनीची किंमत कवडीमोल भावाने होत होती. तिच्या बी.टेक च्या प्रवेश प्रक्रियेला पैसे भरण्यासाठी परिस्थिती आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने राहिलेले 1 लाख रुपये भरणे शक्य झाले नाही.

मी एवढी हुशार असूनही माझा काय उपयोग? अशी ती म्हणायची त्यातुनाच माझ्या मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे तिचे वडील रामकृष्ण पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तिने आज(24 जुलै)पहाटे मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी आत्महत्या केली. तिला तात्काळ उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात आणले असता तिची परिस्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविले होते, पण तिथे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी सोलापूर तालुका पोलिस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या पश्चात आई, वडील, तीन विवाहित बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे.

देगाव सारख्या ग्रामीण भागातील रुपाली पवार या विद्यार्थिनीने उच्च शिक्षणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सीईटीच्या परीक्षेत चांगले गुण घेतले. मात्र पुढील शिक्षणासाठी आर्थिक ओढाताण होऊ लागली. आणि त्यातूनच तिने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला या संपूर्ण घटनेमुळे मोहोळ तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आर्मी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘एमएचआरडी-एआयसीटीई रिजनल मेन्टॉरिंग’

0
पुणे : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय (एमएचआरडी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ (एआयसीटीई) यांच्या सहकार्याने दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एआयटी) नवकल्पनांच्या आढाव्यासाठी (प्रुफ ऑफ कॉन्सेप्ट) ‘एमएचआरडी-एआयसीटीई रिजनल मेन्टॉरिंग’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल 2.0’ आणि ‘अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स (एआरआयआयए) 2020’ या विषयावर हे मार्गदर्शन सत्र होणार आहे.

येत्या शुक्रवारी (ता. 26) एआयटीच्या कॅम्पसमध्ये होत असलेल्या या एकदिवसीय मार्गदर्शन सत्राचे उद्घाटन सकाळी 9.45 वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनुष्यबळ विकास मंत्रालयातील मुख्य इनोव्हेशन अधिकारी डॉ. अभय जेरे, ‘एआयसीटीई’ स्टार्टअप कमिटीचे चेअरमन संजय इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. इनोव्हेशनवरील या मार्गदर्शन सत्रासाठी महाराष्ट्र व गोवा विभागातील 150 हून अधिक विद्यार्थी, तर 100 पेक्षा अधिक शिक्षक सहभागी होणार आहेत.

दिवसभराच्या या सत्रात इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलचे राष्ट्रीय समन्वयक दिपान साहू, विभागीय समन्वयक पंकज पांडे, मनुष्यबळ विकास मंत्रालयातील इनोव्हेशन अधिकारी सरिम मोईन यांच्यासह एंटरप्रेन्युअरशीप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. सत्या रंजन आचार्य मार्गदर्शन करणार आहेत. इनोव्हेशन आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘एआयसीटीई’मध्ये ‘एमएचआरडी इनोव्हेशन सेल’ची स्थापना केलेली आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन, नॅशनल स्टुडंट पॉलिसी, अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्ससह इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

विवेकानंदांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे : विजय कुवळेकर

0
पुणे :विवेकानंद केंद्राचे राष्ट्रीय अध्यक्ष पी . परमेश्वरन लिखित ‘हिंदू राष्ट्राची हृदय स्पंदने ‘ या मराठी अनुवादित ग्रंथसंचाचे  ज्येष्ठ  पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते    प्रकाशन झालेे .   राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख डॉ . अनिरुद्ध देशपांडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .
पुणे  श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात २४ जुलै ,बुधवार,सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम झाला  . विवेकानंद केंद्र(कन्याकुमारी ) या संस्थेचे महाराष्ट्र प्रांत संचालक किरण कीर्तने ,विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर उपस्थित होते.डॉ. निरुपमा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
 पी .परमेश्वरन यांच्या गेल्या ५० वर्षातील साहित्याचा संपादित ग्रंथसंग्रह ‘हार्ट बीट्स ऑफ हिंदू नेशन ‘या नावाने इंग्रजीत  प्रकाशित झाला  असून हा ग्रंथ मराठीत 3 खंडात आला असून दत्ता पंचवाघ ,अरुण करमरकर ,भगवान दातार यांनी   3 खंडांचा भावानुवाद केला आहे . हिंदू राष्ट्राची हृदय स्पंदने ‘हा भावानुवाद म्हणजे 3 खंडांचा संच आहे
विजय कुवळेकर म्हणाले, ‘पी. परमेश्वरन यांच्या ५० वर्षांचे साधनेचे प्रतिबिंब या ग्रंथसंचात पडलेले आहे. आपण हिंदू आहोत, म्हणजे काय आहोत, याची ओळख या ग्रंथसंचातून होते. शास्त्रशुद्ध पद्धतीने अनेक मोठया गोष्टींचे परिशीलन परमेश्वरन यांनी केले आहे. हिंदू संस्कृतीचा प्रवाह हजारो वर्ष अखंड का राहिला, हे सहजपणे त्यांनी मांडले आहे.
जगातील अनेक चांगल्या विचारधारांचा, विचारवंताचा , त्यांच्या विचारांचा आढावाही परमेश्वरन यांनी घेतला आहे. आपला प्रकाश विसरुन परप्रकाशित होण्यातील धोके त्यांनी मांडले आहेत. हे खंड सर्व शिक्षण संस्थांमध्ये, युवकांपर्यंत पोहोचले पाहिजेत.
 इंग्रजांची शिक्षणपद्धती आपण स्वीकारलेली असली तरी भारतातील शिक्षण पध्दतीत भारतीयत्व, हिंदुत्व मांडण्याची गरज आहे. हिंदुत्व म्हटल्यावर मनं आक्रसण्याची गरज नाही. प्रतिगामी आणी पुरोगामी या शिक्क्यांच्या मध्ये आपण अडकलो आहोत. कृतक पुरोगामीपणा आपण रुजवला आहे. त्यापलिकडे जाऊन समाजाने पाहिले पाहिजे.
विवेकानंदांचे विचार आपण समाजापर्यंत पोहोचविण्यात आपण कमी पडलो का , हेही तपासले पाहिजे.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रा. अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, ‘ परमेश्वर यांची पुस्तके ही वैचारिक देणगी आहे. हिंदुत्वाचे विचार एक पक्षीय आहेत, असे मानण्याची सवय आतापर्यंत होती.आजही पाश्चात्यांच्या चिंतनावरील आपले प्रेम कमी झालेले नाही. हिंदुत्व ही स्वाभाविक स्वयंसिद्ध अभिव्यक्ती आहे. कितीही अभारतीय चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही. संघर्षाच्या उंबरठ्यावरील जगाला संदेश देण्याची क्षमता हिंदू तत्वज्ञानात आहे. त्यावर टीका करण्यात खूप वेळ गेला. आता हे तत्वज्ञान आत्मसात करण्याची वेळ आहे. त्यासाठी ही पुस्तके उपयुक्त ठरतील या पुस्तकांमधील  सर्व चिंतन  परमेश्वरन यांनी  समाजात राहून केले आहे.
विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले. शैलेंद्र बोरकर यांनी आभार मानले.

लोकांकडे जाऊन कामे करणारे लोकप्रतिनिधी फक्त भाजपचेच – योगेश सागर

0

पुणे – पुणे शहराने खासदार, आमदरा, नगरसेवक मोठ्या संख्येने देऊन भारतीय जनता पक्षाला समृद्ध केले आहे. लोकप्रतिनिधी हा पक्षाचा चेहरा असतो. विजय काळे आठ वर्षे लोकप्रतिनिधी नसतानाही त्यानंतर 2014 मध्ये लोकांनी त्यांना आमदार म्हणून निवडून देऊन स्वीकारले. त्यांची मतदारांशी असलेली नाळ जीवंत आहे. यातूनच स्पष्ट होते की लोकांमध्ये जाऊन, लोकांच्या घरी जाऊन त्यांची कामे करणारे लोकप्रतिनिधी फक्त भाजपमध्ये आहेत, असे नगरविकास राज्य मंत्री योगेश सागर यांनी आज येथे सांगितले.

शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार विजय काळे यांच्या पाच वर्षाच्या कार्य अहवालाचे प्रकाशन राज्यमंत्री सागर यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले होते. कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि निवृत्त आयपीएस अधिकारी वसंत  कोरेगावकर पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष सतीश बहिरट, खडकीचे अध्यक्ष चिंतन शहा, महिला आघाडीच्या अध्यक्षा भावना शेळके, युवामोर्चाचे अध्यक्ष सौरभ कुंडलिक, आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कांबळे, उपाध्यक्ष कमलेश चासकर, निलमाताई खाडे, सोनालीताई लांडगे, सुनिताताई वाडेकर, आदित्य माळवे, प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, अर्चनाताई मुसळे, आदी नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात घरेलू महिला कामगारांच्या नेत्या मेधा थत्ते, टेल्को एम्प्लॉइज युनियनच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल संतोष दळवी यांचा सत्कार योगेश सागर यांच्या हस्ते करण्यात आला. आमदार निधीतून विजय काळे यांनी ग्रंथालयासाठी प्रत्येकी पन्नास हजार रूपयांची पुस्तके घेतली आहेत. या पुस्तकांच्या संचाचे नऊ ग्रंथालयांना वितरण गोगावले, गोयल आणि कोरेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

योगेश सागर म्हणाले, भाजपच्या सर्वच ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पुणेकरांनी गेल्या पाच वर्षात निवडले आहे. लोकप्रतिनिधी हा पक्षाचा चेहरा असतो. हे लोकप्रतिनिधी पुणेकरांनी दिलेल्या पाठिंब्याची परतफेड त्यांच्या कामातून करतच आहेत. या पुणे शहराला अधिकपटीने जर कोणी दिले असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. पुण्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे कामच त्यांनी सुरू केले असल्याचे सध्या शहरात फिरताना दिसते. विधानसभेत प्रश्न मांडताना विजयरावांच्या प्रश्नांना मत्र्यांना उत्तरे द्यावीच लागतात. त्यांच्या प्रश्न मांडण्याचा सचोटीमुळे अनेकदा मुख्यमंत्रीच स्वत: त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतात याचा मी साक्षिदार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, गेल्या पाच वर्षात सबका साथ सबका विकास या धेय्याने आम्ही काम करत आहोत. या मागची आमची भूमिका आता मतदारांनी तपासावी, त्यासाठीच हा कार्य अहवाल आहे. अशा प्रकारे आपण केलेल्या कामाची महिती देणारे अहवाल फक्त भाजपचेच लोकप्रतिनिधी काढतात. मेट्रोच्या कामाच्या प्रगतीचा अनुभव सगळेच घेत आहेत. कारण आमचं राज्यातील आणि केंद्रातील सरकार हे कमी बोलून काम करणारं सरकार आहे. आम्ही सांगितलेला कार्यक्रम राबवणारं सरकार आहे.

कृष्णमार गोयल म्हणाले, ज्या मेट्रोची चर्चा फक्त पुणेकर ऐकत होते त्या मेट्रोचं का या सरकारमुळे सुरू झालेलं बघायला मिळालं आहे. यापेक्षाही गुरूजनांचा त्यांच्या घरी जाऊन कृतज्ञता पूर्वक गौरव करणारे आमदार विजय काळे मला जास्त महत्वाचे वाटतात. वसंत कोरेगावकर म्हणाले, मी माझ्या पोलिस खात्यातील कारकिर्दीत अनेक आमदार, खासदार मंत्री बघितले, त्यांचे स्वभाव, कॅरेक्टर बघितलं, पण प्रगल्भ विचारांचा अन ठाम निर्णय घेणारा विजयरावां इतका साधा आमदार पहिल्यांदाच बघितला. त्यांनी मला त्यांचा मतदार म्हणून त्यांच्या कार्य अहवाल प्रकाशनासाठी बोलावले याचा मला अभिमान आहे.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना आमदार काळे म्हणाले,  या मतदार संघात शिवाजीनगर, विद्यापीठ चौक, बोपोडीचौक अशा प्रमुख रस्त्यांवर असलेली वाहतुकीची समस्या सोडवली नाही तर पुन्हा मत मागायला येणार नाही असं मी 2014 साली सांगितले होते. पण गेल्या पाच वर्षात नगरसेवक, नागरीकांच्या मदतीने या सर्व वाहतुकीच्या प्रश्नांवर उपाय योजना सुरू करू शकलो  आहे. या शिवाय हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो, आयटीआय, चतुशृंगीची पाण्याची टाकी, भांबुर्डा वनउद्यान अशा विविध विकास कामांचा आढावा घेऊन आता याचे मूल्यमापन व परिक्षण मतदारांनी करावे असे आवाहन केले. प्रारंभी मतदारसंघाचे अध्यक्ष बहिरट यांनी सर्वांचे स्वागत केले तर खडकीचे अध्यक्ष चिंतन शहा यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. वर्षा डोमल यांनी केले. कार्यक्रमात मन:शक्ती केंद्राच्यावतीने मान्यवरांना पुस्तके भेट देण्यात आली.

पोलिसांची कृती गोरगरिबांच्या पोटावर पाय देणारी ..रविवारी जुना बाजार भरणारच ..विक्रेत्यांचा इशारा (व्हिडीओ)

0

पुणे- कोणतीही पूर्व सूचना न देता ,पर्यायी जागा न देता ,पुनर्वसन न करता वाहतूक कोंडीच्या नावाखाली पोलिसांनी जुना बाजार बंद केलेली कृती हि गरिबांच्या पोटावर पाय देणारी असून … आज आम्ही त्यांच्या आदेशाचा सन्मान ठेवून बाजार बंद ठेवला पण रविवारी मात्र आम्ही इथे बाजार भरवणार ,उपजीविकेचा व्यवसाय पुन्हा उभारणार असा इशारा जुन्या बाजारातील विक्रेत्यांच्या संघटनेने दिला आहे . माजी नगरसेवक मुक्तार शेख यांनी या विक्रेत्यांच्या भावना ‘माय मराठी ‘पुढे मांडल्या.

पुण्यातील जुना बाजार हा आठवडे बाजाराच्या धर्तीवर वसलेला पेश्वेकालापासून चालत आलेला बाजार आहे. त्याचे अनेक वेळा स्थलांतर झाले. आणि वाढत्या शहरीकरानामुळे त्यास मान्यता देत विक्रेत्यांनी ते स्वीकारले . पण या पूर्वी कधी कोणाच्या पोटावर पाय देवून हा बाजार बंद कोणी केला नाही . इंग्रजांनी देखील ते केले नाही उलट त्यांनी रविवारी देखील बाजार भरवणे सुरु केले . आता मात्र थेट पोलिसी खाक्या दाखवून हा बाजार कोणतीही पूर्व सूचना न देटा बंद करण्यात आला आहे . या बाजारावर हजार कुटुंबाची उपजीविका चालते . पोलिसांनी अगोदर पर्यायी जागा मिळवून द्यावी नंतर आम्ही तिथे जावू . आज पोलिसी आदेशाचा आम्ही मान ठेवला पण रविवारी मात्र पुन्हा आम्ही इथेच बाजार भरवू असे यावेळी सांगण्यात आले . याबरोबरच या सर्व विक्रेत्यांना नायडू रूग्णालया जवळील जागा द्यावी तेथे पुनर्वसन करावे नंतर पोलिसांनी हा रस्ता वाहतुकीस शंभर टक्के मोकळा करावा अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली .

या सर्व पार्श्वभूमीवर एकीकडे पोलिसी आदेश दुसरीकडे व्यवसाय बंद झाल्याने हतबल झालेले दुकानदार अशा परिस्थितीत येथे असंतोष निर्माण होतो आहे .

 

भाजप आमदाराने धंदा बंद झालेल्या जुना बाजार दुकानदारांना दिला ‘आखाड पार्टी ‘चा सल्ला

0

पुणे – वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या नावाखाली पोलिसांनी आपल्या अधिकारात ,पोलीस बंदोबस्तात जुना बाजार कोणतीही नोटीस न देता अचानक बंद केल्यानंतर आज शेकडो दुकानदारांची दुकाने बंद झाली अचानक पोटावर पाय पडलेल्या या दुकानदारांनी येथे गर्दी केली यावेळी येथे दुकानदारांची सहानुभूती मिळवायला गेलेले माजी राज्यमंत्री आमदार दिलीप कांबळे यांनी मोठे दुटप्पी वाटेल असे भाषण करून …जावू द्यात आज बंद केलाय बाजार ना .. आज आखाड पार्टी करा .. रविवारी मात्र दुकाने आपण सुरु करू ,माझा भाऊ महापालिकेत स्थायी समितीचा अध्यक्ष आहे पैशाची चिंता करू नका अशी विधाने केली ,तर तत्पूर्वी शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर झालाय गाड्या फार वाढल्यात असे हि सांगून पोलीस आपल्याबरोबरच आहेत असे अजब विधान हि केले
पुणे शहरात अनेक वर्षांपासून बुधवार आणि रविवार या दोन दिवशी मंगळवार पेठेतल्या शाहीर अमर शेख चौक ते कुंभार वेस पर्यंत जुना बाजार भरवला जातो. रस्त्याची एक बाजू बंद करुन भरवण्यात येणाऱ्या या बाजारामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असते. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने थेट बाजारच बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मात्र, याला विक्रेत्यांनी विरोध केला असून त्यांनी बाजाराच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांची समजूत घालण्यासाठी आंदोलनस्थळी दाखल झालेल्या आमदार दिलीप कांबळे यांनी पुढच्या रविवारी बाजार भरवण्याची व्यवस्था केल्याचे सांगत आज बाजार बंद ठेवावा लागल्याने सर्वांनी आखाड साजरा करावा, असा सल्ला आंदोलकांना दिला.

जुना बाजाराच्या दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी. या दृष्टीने महिनाभर प्रायोगीक तत्वावर जुना बाजार बंद ठेवण्याचे आदेश पोलीस सहआयुक्त राजेंद्र शिसवे यांनी काल (मंगळवारी) काढले. या आदेशानुसार आज (बुधवार) जुना बाजार भरवण्यास मनाई करण्यात आल्याने जुना बाजारातील विक्रेत्यांनी सकाळी नऊ वाजल्यापासून रस्त्यावर ठिय्या मांडला. यावेळी पुणे महापालिका अतिक्रमण अधिकारी माधव जगताप, नगरसेवक योगेश समेळ, जुना बाजार संघटनेचे सल्लागार विलास वाडेकर आणि पोलीस कर्मचारी हे उपस्थित होते. आंदोलन सुरु झाल्याची बातमी कळताच माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार दिलीप कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व विक्रेत्यांशी तासाभर चर्चा केली.

यावेळी कांबळे म्हणाले, पुणे शहरातल्या अनेक भागातील आणि जिल्ह्यातील नागरिक जुन्या बाजारात खरेदीसाठी येत असतात. या ठिकाणी विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने दुकाने रस्त्यावर लावली जातात. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊनच पोलीस आणि महापालिका प्रशासनाने जुना बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, येत्या रविवारी बाजार भरवला जाईल तसेच अनेक वर्षांपासूनचा बाजारासाठीच्या इमारतीच्या मागणीचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

विद्यमान आमदाराची स्वकीय कार्यकर्त्यांकडूनच नाचक्की

0

पुणे-भाजपा च्या एका आमदाराच्या या कार्य अहवाल प्रकाशन कार्यक्रमा दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनीचत्यांच्या निषेधाच्या घोषणा देत ..या आमदाराची लायकी काढली आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत सभागृहात पत्रके उडवली.
या आमदाराच करायच काय, खाली डोक वर पाय, निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणार्या आमदाराचा निषेध असो, अशा घोषणा देत नगर विकास राज्यमंत्री योगेश सागर यांच्या समोरच राडा घातला. अखेर शहराध्यक्ष गोगावले यांनी मध्यस्थी करत कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचेही न एेकता घोषणाबाजी करत कार्यकर्ते सभागृहाबाहेर निघून गेले.

बांधकाम व्यावसायिकावर महापालिकेची मेहरनजर-विरोधी पक्षनेते बराटेंचा आरोप

0

पुणे-शहरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकावर महापालिकेची मेहरनजर झाली असून, या व्यावसायिकाच्या ‘आयटी’ कंपन्यांचे ४६ कोटी ६१ लाख रुपयांचे बांधकाम शुल्क कमी करण्यात आले आहे. हा प्रकार लेखा परीक्षण विभागाच्या लक्षात आल्यावर या व्यावसायिकाला मदत करण्यासाठी काही नगरसेवकांनी धाव घेतली असून, ‘ऑडिट समिती’त या शुल्कात सवलत देण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या व्यावसायिकाचा मिळकत कर कमी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच या कराची वसुली तत्काळ करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली आहे. बालेवाडी सर्व्हे नंबर २०, बाणेर सर्व्हे नंबर १०९ (पा), ११४ (पा) आणि खराडी येथील ‘आयटी’ कंपन्यांचे सुमारे ४६ कोटी ६१ लाख रुपयांचे बांधकाम शुल्क कमी करण्यात आल्याचा ठपका लेखा परीक्षण विभागाने ठेवला आहे. यात खराडी येथील कंपनीचे १२ कोटी २४ लाख रुपये बांधकाम विकास शुल्कापोटी, तर चार कोटी ७५ लाख रुपये आयटी प्रीमियमपोटी वसूल करावेत, अशी सूचना लेखा परीक्षण विभागाने स्थायी समितीला सादर केलेल्या अहवालात दिली आहे. बालेवाडी आणि बाणेर येथील कंपनीचे तब्बल २९ कोटी ६२ लाख रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक रक्कम ही जीना, पॅसेज, लॉबी, लिफ्ट, लिफ्ट मशिन रुम प्रीमियमपोटी सर्वाधिक २२ कोटी १४ लाख वसूल करणे अपेक्षित आहे. याबरोबरच नकाशा तपासणी फी, जमीन विकास शुल्क, बांधकाम विकास शुल्क, पँट्री प्रीमियम, एएचयू प्रीमियम, टॉयलेट प्रीमियम, राडारोडा चार्जेस, वॉटर लाइन डेव्हलपमेंट चार्जेस, कामगार कल्याण निधी उपकर आणि स्थानिक संस्था करापोटी उर्वरित रक्कम वसूल करण्याची सूचना लेखा परीक्षण विभागाचे प्रमुख अंबरीश गालिंदे यांनी केली आहे.अशीमाहिती बराटे यांनी दिली .

पुण्यातील जुना बाजार आजपासून बंद करण्यासाठी पोलिसांची अधिसूचना जारी .. ..

0

पुणे- पुण्यातील जुना बाजार हा रस्त्यावर भरू नये आणि येथील रस्त्यावर पार्किंग देखील होवू नये या अनुषंगाने आज पोलिसांनी महत्वाची पावले उचलली असून प्रायोगिक  तत्वावर महिनाभराच्या कालावधीसाठी अधिसूचना आज काढली आहे.

शाहीर अमरवेस चौक ते कुंभार वेस दरम्यान च्या  मंगळवार पेठेतील रस्त्यावर दर रविवारी आणि बुधवारी जुना बाजार रस्त्यावर भरतो .या रस्त्याच्या एका बाजूला  न्यायालय ,महापालिका ,शनवार वाडा,शिवाजी नगर बस स्थानक ,रेल्वे स्थानक आहे तर दुसऱ्या बाजूस ससून हॉस्पिटल ,जिल्हाधिकारी कार्यालय ,सेन्ट्रल बिल्डींग ,विधान भवन ,पुणे स्टेशन , आर टी ओ ,जिल्हा परिषद ,विधान भवन अशी कार्यालये आहेत . दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहने वाढत आहेत आणि एकूणच पुण्यातील वाहतूक समस्या जिकिरीची होत आहे .शाहीर अमरवेस चौक ते कुंभार वेस दरम्यान वाहतुकीचा मोठा खोळंबा रस्त्यावर भरणारी दुकाने आणि पार्किंग मुळे होतो . याबाबत अनेक तक्रारी येतात असे या अधिसूचनेत म्हटले आहे .वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी वाहतूक नियमना साठी सुधारित अधिसूचना सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी काढली आहे .२४ जुलै पासून ती लागू करण्यात येत असून या नुसार प्रायोगिक तत्वावर या रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग झोन आणि रस्त्यावर दुकाने लावण्यास बंदी घालण्यात येते आहे . रिक्षा थांबे , अम्ब्युलंस, पोलीस आणि अग्निशामक दल आणि कर्तव्यावर असलेली शासकीय वाहने यांना यातून वगळण्यात येते आहे . असे या अधिसूचनेत म्हटले आहे .

मेट्रो प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी बाधित झोपडपट्टीधारकांच्या पुर्नवसनाचे काम लवकर सुरु करा

0

पुणे  : मेट्रो प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी महा मेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रो मुळे बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकांच्या पुर्नवसनाचे काम लवकर सुरु करावे, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले.

मेट्रो बाधित झोपडपट्टी धारकांच्या पुर्नवसनाबाबत आज डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले.
बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रमकुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर, महा मेट्रोचे अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अमोल मोहळकर, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र मुठे, झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरणाचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, महा मेट्रो मार्ग १ आणि २ तसेच पीएमआरडीए मेट्रो मार्ग ३ मध्ये बाधित होणाऱ्या झोपडपट्टीधारकांचे एकत्रित पुर्नवसन करण्याच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. या विषयी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बाधित झोपडपट्टीधारकांच्या प्रतिनिधींसोबत येत्या पंधरा दिवसांत बैठक घेऊन त्यानंतर पुढील कार्यवाही करावी, असेही डॉ. म्हैसेकर यांनी बैठकीत सांगितले.
महामेट्रो, पीएमआरडीए, पुणे महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पुर्नवसनाबाबतची कार्यवाही समन्वय ठेवून पूर्ण करावी, असेही डॉ. म्हैसेकर म्हणाले.

मेट्रो मार्गातील झोपडपट्ट्यांच्या सर्वेक्षणाबाबत तसेच पुनर्वसन करता येणाऱ्या जागांबाबत जिल्हाधिकारी श्री. राम यांनी माहिती दिली.

बैठकीला संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

महसूल व पोलीस विभागातील अधिकारी यांची दोन दिवसीय कार्यशाळा

0

पुणे – पुणे महसूल विभागातील जिल्‍हाधिकारी, अपर जिल्‍हाधिकारी, उपजिल्‍हाधिकारी व पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्‍त यांच्‍या दिनांक २५ व २६ जुलै २०१९ या दोन दिवसांच्‍या कार्यशाळेचे आयोजन जिल्‍हाधिकारी कार्यालयातील ५ वा मजला येथे करण्‍यात आले आहे.

या कार्यशाळेत दिनांक २५ जुलै २०१९ रोजी सकाळी १० ते १०.२० वाजता पुणे महसूलचे उपायुक्‍त उपस्थितांचे स्‍वागत व प्रस्‍ताविक करणार आहेत. सकाळी १०.२० ते १०.४५ वाजता कार्यशाळेत मार्गदर्शन विभागीय आयुक्‍त करणार असून सकाळी १०.४५ ते दुपारी १२ वाजता सामान्‍य प्रशासनचे उपायुक्‍त संजयसिंह चव्‍हाण हे महाराष्ट्र पोलिस अधिनियम अंतर्गत कलम ५५,५६,५७ प्रमाणे हद्दपार प्रकरणांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी १२ ते दुपारी १ वाजता सेवानिवृत्‍त अधिकारी पी.ई. गायकवाड यांचे हद्दपार विषयक कामकाजाबाबत मार्गदर्शन. दुपारी १ ते दुपारी २ वाजता कोल्‍हापूरचे जिल्‍हाधिकारी दौलत देसाई हे आपत्ती व्‍यवसथापन अधिनियम २००५ बाबत मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.४५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत सोलापूरचे जिल्‍हाधिकारी राजेंद्र भोसले हे सन २०१४ ते २०१९ राज्‍य शासनाकडुन MLRC,Tenancy अंतर्गत करण्‍यात आलेल्‍या सुधारणा, धोरण, निर्णय याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ३.४५ ते दुपारी ५ वाजेपर्यंत केंद्रशासनाचे कृषि व पशुसंवर्धनविषयक धोरण व कृषि उत्‍पन्‍न वाढ या चर्चासत्रात कृषी आयुक्‍त सुहास दिवसे, सांगलीचे जिल्‍हाधिकारी अभिजीत चौधरी, साताराचे जिल्‍हाधिकारी श्‍वेता सिंघल यांचा सहभाग असणार आहे.

दिनांक २६ जुलै २०१९ रोजी सकाळी ९३० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत पुणे नगररचानाचे सहसंचालक अविनाश पाटील हे प्रादेशिक आराखडयाचे अनुषंगाने महसूल अधिका-यांचे कामकाजाविषयी चर्चा करणार आहेत. सकाळी १०.३० ते दुपारी ११.३० वाजेपर्यंत साखर आयुक्‍त शेखर गायकवाड हे महसूल अधिकारी यांचे समोरील अर्धन्‍यायिक कामकाज, कार्यपध्‍दती व भूमिका या विषयी माहिती देणार आहेत. दुपारी ११.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत७/१२ संगणकीकरण, ओडीसी/ १५५/डी-४ संगणकीकरणाचे अनुषंगाने झालेल्‍या बदलामुळे तलाठी/ सं.अ.दप्‍तर तपासणी बाबतची कार्यपध्‍दती यामध्‍ये पुणे जमाबंदी आयुक्‍त एस चोक्‍कलिंगम, राज्‍य समन्‍वयक रामदास जगताप, जमाबंदी आयुक्‍त कार्यालयाचे रा.भु.आ.आ.का यांचा सहभाग असणार आहे. दुपारी१ ते दुपारी २ वाजेपर्यंत Art of Writing of Judgement (TNC Act, Ceiting Act, MLRC 36A,Devasthan etc.) उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्‍या निर्णयांचे निरीक्षण या विषयी न्‍यायिक सदस्‍य व्‍ही.बी. कुलकर्णी हे माहिती देणार आहेत. दुपारी २.३० ते ३.१५ वाजेपर्यंत प्रशासकीय कार्यामध्‍ये संवाद कौशल्‍याचे महत्‍व नाशिक विभागाचे महसूल उपायुक्‍त दिलीप स्‍वामी हे माहिती देणार आहेत. दुपारी ३.१५ ते ३.४५ वाजेपर्यंत जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम हे प्रधानमंत्री आवास योजना नागरी व ग्रामीण या विषयी माहिती देणार आहेत. दुपारी ३.४५ ते दुपारी ४ पर्यंत चर्चा, प्रश्‍नोत्‍तरे होणार असून कार्यशाळेचा समारोप दुपारी ४ ते दुपारी ४.१५ वाजता होणार आहे.

८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

0

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेल्या ८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली. दोघांनी या सर्व उमेदवारांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

परिवहन विभागाने सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदाच्या भरतीसाठी सेवा प्रवेश नियमात काही बदल केले होते. त्या बदलानुसार या पदाची जाहिरात काढून भरती प्रक्रिया करण्यात आली होती. पण काहीजणांनी सेवा प्रवेशातील बदलास तसेच त्यानुसार झालेल्या भरती प्रक्रियेस न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आदेश देताना परिवहन विभागाने सेवा प्रवेश नियमात केलेले बदल योग्य असल्याचे सांगितले. त्यानुसार भरती प्रक्रियाही योग्य असल्याचा निकाल दिला. त्यामुळे सुमारे २ वर्षापासून रखडलेल्या ८३२ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना परिवहनमंत्री श्री. रावते म्हणाले, तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाने नेहमीच भरतीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच सहायक मोटार वाहन निरीक्षक भरतीतील किचकट नियम रद्द करुन ही प्रकिया सुटसुटीत करण्यात आली होती. याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने नुकताच यासंदर्भात निकाल देताना राज्य शासनाच्या परिवहन विभागाने सेवा प्रवेश नियमात केलेले बदल तसेच त्यानुसार करण्यात आलेली भरती योग्य असल्याचा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. आता नियुक्त झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्ती पत्रे देण्यात येतील. परिवहन विभागाला त्याबाबत आदेश दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.