Home Blog Page 28

कथित पत्रकाराकडून वृंदावन लॉज येथे विवाहितेवर अत्याचार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल!


पुणे -हात उसने देऊन अडकलेले पैसे काढून देतो असे सांगत कथित पत्रकाराने महिलेला शीतपेयातून गुंगीची औषध पाजून लॉजवर नेत जबरदस्तीने शारीरिक संभोग केल्याची घटना हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील वृंदावन लॉज येथे घडली आहे .
याप्रकरणी ४१ वर्षे वयाच्या विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून हनुमंत राजकुमार सुरवसे वय २९ रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा4 प्रकार ३ मे रोजी रात्री नऊ वाजल्यापासून ते ४ मे २०२५ रोजी पहाटे ५ वाजण्याचे दरम्यान घडला आहे. पिडीतेने कानिफ जगदाळे यांचे मध्यस्थीने एका इसमाला वीस हजार रुपये उसने दिले होते, परंतु ते पैसे कानिफ जगदाळे यांनी परत न दिल्याने त्यांच्या मध्ये वाद झाले होते.

फेब्रुवारी २०२५ मध्ये हनुमंत सुरवसे यांनी एका हॉस्पिटलमध्ये शिबिर आयोजित केले होते. त्याने आपण पत्रकार असलेचे सांगत शिबिरामध्ये काढलेले फोटो पाठविण्यासाठी पीडीतेचा मोबाईल क्रमांक घेतला व सर्व फोटो तिच्या व्हाट्सअप वर पाठविले, त्यानंतर सुरवसे या पिडीतेशी मोबाईल व्हाट्सअप कॉलवर बोलत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता . दोघांची ओळख झाल्याने तिने त्यास हात उसने दिलेल्या रकमे संदर्भात सांगितले, यावर त्याने ३ मे रोजी रात्री नऊ वाजण्याचे सुमारास उसने दिलेले पैसे काढून देतो असे सांगून, फिर्यादीला त्याच्या गाडीमध्ये बसवले, तिला शीतपेयातून काहीतरी गुंगीचे औषध देऊन थेऊर येथील वृंदावन लॉजवर नेत तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संभोग केला.

जबरदस्तीने मोबाईल मध्ये विवस्त्र फोटो काढले ते फोटो वायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे ३ लाखाची मागणी करत ३२ हजार रुपये घेतले, उर्वरित पैसे न दिल्यास फोटो व रेकॉर्डिंग व्हायरल करीन, याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला आमच्या बायका आणून मारत पोलीस स्टेशनला घेऊन जाईल अशी धमकी दिली. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून हनुमान सुरवसे याच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव हे करत आहेत.

खंडूराज गायकवाड यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर

0

मुंबई : लोककला क्षेत्रातील भरीव आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने मंत्रालयातील ज्येष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार–सन 2024 जाहीर केला आहे.

गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ लोककलावंतांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने कार्य करणारे गायकवाड हे लोककला व तमाशा परंपरेचे अभ्यासक म्हणूनही ओळखले जातात. प्रयोगात्मक कलेतील त्यांच्या योगदानाबद्दल सांस्कृतिक कार्य विभागाने त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.

तमाशा सम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यासाठी त्यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. तसेच राज्यातील लोककलावंत अनुदान शिफारस समितीवर त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे.

गायकवाड हे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे दीर्घकाळ सदस्य राहिले असून मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या कार्यकारिणीवर सध्या ते सक्रियपणे काम करीत आहे. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा वर्षानुवर्षे कार्यसंबंध आहे

रोहिणी हट्टंगडी आता टेलिव्हिजन मालिकांमध्ये का काम करणार नाहीत..

TV मालिका:कलाकारांची शारीरिक,मानसिक,आर्थिक पिळवणूक करण्यात आघाडीवर असल्याचे मानले जाते स्ट्रगलर युवा पिढीला इथे खूप काही सोसावे लागते. , बड्या प्रस्थापित कलाकारांची यातून सुटका झालेली असते पण तरीही चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांनी आता त्यांच्या अभिनयासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.ज्यामुळे या विषयाच्या चर्चेला आता पुन्हा सूर लाभू लागला आहे.

रोहिणी हट्टंगडी आता टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करणार नाहीत, याबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. फ्री प्रेस जर्नलशी साधलेल्या संवादात रोहिणी हट्टंगडी यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम न करण्याच्या निर्णयाबद्दल मोठा खुलासा केला.

मालिका न करण्यामागचं कारण काय?

त्या म्हणाल्या, “मी तरुण असताना जिम्स क्वचितच अस्तित्वात होत्या. आमचं काम हा एक प्रकारे व्यायाम असायचा, पण टेलिव्हिजनसाठी खूप मेहनत आणि वेळ द्यावा लागतो. सकाळी लवकर बाहेर पडायचं, रात्री उशिरापर्यंत शूटिंग करायचं, रात्री ११ वाजता घरी परत यायचं आणि दुसऱ्या शिफ्टसाठी पुन्हा सकाळी ६ वाजता उठावं लागायचं. माझ्या लक्षात आलं की मला व्यायाम करायला, आराम करायला किंवा श्वास घेण्यासाठीही वेळ मिळत नव्हता. त्यामुळे मी कामाचा वेग कमी केला आणि म्हणूनच मी टीव्ही मालिकांमध्ये काम करणे थांबवले.”या संदर्भात बोलताना त्यांनी मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील निराशाही व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खूपच गोंधळ झाला आहे. अनेकदा, काम करण्यास उपलब्ध नसल्याचे स्पष्टपणे सांगितल्यानंतरही कलाकारांना शेवटच्या क्षणी फोन येतात. जर त्यांनी अचानक एखादा सीन शूटिंगसाठी बसवला, तर त्वरित सेटवर येण्यासाठी कलाकारावर दबाव आणला जातो. यामुळे मला खूप त्रास झाला. त्यामुळेच मी ठरवले की, मी यापुढे अशा पद्धतीने काम करू शकत नाही.”

अशाप्रकारे रोहिणी हट्टंगडींनी यापुढे मालिकेत काम का करणार नाही, याबद्दल खुलासा केला. रोहिणी हट्टंगडींनी जी कारणं दिली त्यामुळे सर्वांनी त्यांच्या निर्णयाचा आदर केला. याशिवाय मराठी मालिकांमधील अनियोजित कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोहिणी यांची काहीच महिन्यांपूर्वी पूर्णा आजीच्या भूमिकेत ‘ठरलं तर मग’ मालिकेत एन्ट्री झाली होती.

श्री दत्त जयंती 4 डिसेंबर रोजी…

0

गुरुदेव दत्त महाराजांच्या जयंतीचा सोहळा प्रत्येक दत्त भक्तासाठी पावन दिवस असतो. यादिवशी दत्तात्रय महाराजांच्या मूर्तीची किंवा पादुकांची पूजा केली जाते. सायंकाळी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो.यंदा दत्त जयंती 4 डिसेंबर 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. दत्तजयंतीचे अनन्यसाधारण महत्त्व पुराणातही सांगण्यात आले आहे. दत्त जयंतीच्या आधी भक्त दत्त परिक्रमा पूर्ण करतात. पण दत्त परिक्रमा म्हणजे काय आणि ती कशी पूर्ण करतात?यात कोणत्या मंदिराचा समावेश असतो? सविस्तरपणे जाणून घेऊयात.

श्री दत्त परिक्रमा

वाट चुकलेल्या भक्ताला योग्य मार्ग दाखवण्याचे काम गुरु करतो आणि श्री दत्त महाराजांना गुरु मानले जाते. भक्तांना जीवनाचा अर्थ त्यांनी समजावून सांगितलेला आहे. भारतभर त्यांची अनेक मंदिरे आहेत. त्यांपैकी 24 स्थाने अशी आहेत ज्यांची परिक्रमा पूर्ण करण्याला महत्त्व आहे. 24 स्थानांपैकी 15 ठिकाणे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील अशा 24 दत्तस्थानांना भेट देताना एकूण 600 किमीचा प्रवास करावा लागतो. या परिक्रमेची सुरुवात श्री शंकर महाराज समाधी मंदिरापासून केली जाते.

दत्त स्थाने –

दत्त जयंती तारीख –

दत्त गुरुंचा जन्म हा संध्याकाळी प्रदोष काळात झाला. त्यामुळे हा उत्सव सायंकाळी पाळणा हलवून साजरा केला जातो.

उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबरला असेल. त्यामुळे यंदा 2025 मध्ये दत्त जयंती गुरुवार 4 डिसेंबर रोजी साजरी होईल. हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवाच्या आराधनासाठी समर्पित करण्यात आला आहे. गुरुवारी दत्त महाराजांची उपासना केली जाते. यंदा गुरुवारच्या दिवशी दत्त जयंतीचा योग जुळून आला आहे.

महायुतीचे रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष-केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची खंत

पुणे: महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सध्या सर्वत्र विजय मिळवत आहे. या विजयात रिपब्लिकन पक्षाचे महत्त्वाचे योगदान आहे. मात्र राज्यात महायुतीकडून भारतीय रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी खंत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, असित गांगुर्डे, अशोक कांबळे, अशोक गायकवाड, सुनिल सर्वांगोड,  महेंद्र कांबळे, महिला शहराध्यक्ष हिमाली कांबळे, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले, विनोद टोपे,  संघमित्रा गायकवाड, जयदेव रंधवे, विशाल शेवाळे, बाबुराव घाडगे, मोहन जगताप, विरेन साठे, अनिल कांबळे, हकीम शेख, आसिफ सय्यद, चिंतामण जगताप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली. महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविल्या जाव्यात आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य जागा मिळाव्या. मुंबई महापालिकेत 17 ते 18 तर पुणे महापालिकेत 20 जागा मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे, असे आठवले यांनी स्पष्ट केले. महायुतीच्या, विशेषतः आमची नैसर्गिक युती असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या स्थानिक नेत्यांशी निवडणुकी संदर्भात चर्चा करावी आणि योग्य प्रतिनिधित्व द्यावे, असेही आठवले म्हणाले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे महापालिकेसाठी विस प्रभागांची यादी पक्षाने तयार केली असून ती भारतीय जनता पक्षाकडे सोपविण्यात आली आहे. ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ही यादी देण्यात आली आहे, असे आठवले यांनी सांगितले.

दीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळे या निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि बंडखोरीचे प्रमाणही अधिक आहे. अनेक ठिकाणी महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र, या निवडणुकांच्या युती, आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले गेले असले तरी देखील प्रचारादरम्यान महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होईल अशी विधाने घटक पक्षांच्या स्थानिक अथवा प्रदेश पातळीवरील नेत्यांनी करू नयेत, असे आवाहनही आठवले यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मियांना प्राधान्य देत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असला तरी देखील या आरोपात कोणतेही तथ्य नाही. मुस्लिम बोहरा, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख अशा सर्व धर्मीय समाजाच्या हिताचे निर्णय मोदी यांनी घेतले आहेत. मोदी हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे, असा दावा आठवले यांनी केला.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही मृतावस्थेत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपात कोणतेही तथ्य नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेवर असताना भारतीय अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावर होती. ती आता चौथ्या क्रमांकावर आली आहे. लवकरच की तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. याचे श्रेय निश्चितपणे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे आहे, असेही आठवले म्हणाले.

सध्याच्या निवडणुका पैशाच्या आधारावर लढवल्या जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. या आरोपाचा आठवले यांनी समाचार घेतला. गोरगरिबांना उपयुक्त ठरणाऱ्या योजना राबवणे हा आमचा अधिकार आहे आणि ते आमचे कर्तव्य देखील आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांकडे सत्ता असताना त्यांना अशा योजना राबवता आल्या नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या मतांमध्ये वाढ करण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महार वतनाच्या जमिनीची सद्यस्थिती तपासून पहा

अमेडिया कंपनीकडून मुंडवा येथील महार वतनाची जमीन हडपण्याच्या प्रकाराबद्दल आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महार वतनाच्या जमिनी विकण्याचा अथवा विकत घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. तरीदेखील राज्यभरात महार वतनाच्या अनेक जमिनी हडप करण्यात आले आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमावी. या समितीने एका महिन्यात आपला अहवाल द्यावा. राज्य सरकारने स्थानिकांच्या हिताचा निर्णय या जमिनींबाबत घ्यावा. यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार आहोत, असेही आठवले यांनी सांगितले.

एचएनडी आंदोलनाची ऐतिहासिक विजयगाथा — पुण्यात भव्य “अभिनंदन, पीछी परिवर्तन व धर्मोदय वर्षायोग कलश निष्ठापन सोहळा” संपन्न

पुणे —
जैन समाजाची एच.एन.डी. जैन बोर्डिंग, पुणे परत समाजाला मिळवून देण्यासाठी झालेल्या सेव एचएनडी आंदोलनाला मिळालेल्या भव्य व ऐतिहासिक यशानिमित्त आज पुण्यात अत्यंत मंगलमय वातावरणात
“सेव एचएनडी अभिनंदन सोहळा, पीछी परिवर्तन आणि धर्मोदय वर्षायोग कलश निष्ठापन समारोह”
संपन्न झाला.

जैन समाजातर्फे आचार्य गुप्तिनंदिजी गुरुदेवांना “क्रांतिकारी राष्ट्रसंत” ही मानाची उपाधी समजा तर्फे प्रदान करण्यात आली.
त्यांच्या धैर्य, दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांमुळे समाजाला मिळालेला हा विजय ऐतिहासिक ठरला.
त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाने एकजूट दाखवत जैन विद्यार्थ्यांसाठीची ही धरोहर परत मिळवली.
सेव एचएनडी आंदोलनात साथ देणाऱ्या पत्रकारांचा सत्कार
पुण्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया मधील पत्रकारांनी आंदोलनाची बाजू निर्भीडपणे मांडली, प्रसारमाध्यमांद्वारे ही हकिगत प्रशासनापर्यंत पोहोचवली आणि समाजाच्या आवाजाला बळ दिले.
या सर्व पत्रकारांचा जैन समाजातर्फे सन्मानचिन्ह व अभिनंदनपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शांतीलाल मुथा, विजयकांत कोठारी, ऍड एसके जैन, शोभा धारीवाल, अचल जैन, विलास राठोड, लक्ष्मीकांत खाबिया, बाळासाहेब धोका, सीए अशोक पगारिया, डॉ. कल्याण गंगवाल आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सेव एचएनडी चळवळीच्या कोर टीमचा गौरव
आंदोलनाची सुरुवात करून, संघर्षाचा प्रत्येक टप्पा पार करत आणि प्रत्येक परिस्थितीत ठामपणे उभे राहून विजय मिळवून देणाऱ्या अक्षय जैन, सीए आनंद कांकरिया, ऍड योगेश पांडे, स्वप्निल बाफना, स्वप्नील गंगवाल, अण्णा पाटील, चंद्रकात पाटील, सुकौशल जिंतूरकर, महावीर चौगुले यांचा प्रामुख्याने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष जैन, महावीर शहा, वीरेंद्र शाह, सुजाता शहा, मिलिंद फडे, देवेंद्र बाकलीवाल, स्वप्निल पाटणी शीतल लोहाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
प्राइड ग्रुपचे अरविंद जैन, एस.पी. जैन, संजोग शहा हे या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक होते.

समाजातील वरिष्ठांचे मार्गदर्शन
युवा व महिला सहभागाची लक्षणीय उपस्थिती
कार्यक्रमाचा समारोप शांतिपाठाने झाला.
जैन समाजाने भविष्यात विद्यार्थीहित, समाजहित व धर्मसंवर्धनाच्या कार्यात अशीच एकजूट ठेवण्याचा संकल्प केला.

गंगाधाममागे,सहा लाखाच्या MD अंमली पदार्थाची विक्री कार्याला आलेल्या रिक्षा चालकाला पकडले

पुणे- गंगाधाममागे, सहा लाखाच्या मेफेड्रोन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करायला आलेल्या रिक्षा चालकाला पुणे पोलिसांनी पकडले.
दि. २९/११/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच बिबवेवाडी पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार बिबवेवाडी पोलीस ठाणेचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना गंगाधाम चौकाकडून पासलकर चौकाकडे येणा-या रोडवर महावीर मोर्टस् समोर रोडवर एक रिक्षा चालक त्याची रिक्षा पार्क करून सतत खाली उतरून इकडेतिकडे संशयीत रित्या कोणाची तरी वाट पहात असल्याचे दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांचे दिशेने पोलीस अधिकारी व स्टाफ जात असताना ते तेथुन पळुन जावु लागले. त्यानंतर पोलीस अधिकारी व स्टाफ यांनी अत्यंत शिताफीने त्या रिक्षा चालकास पकडले त्याचेकडे विचारपुस करता त्याने त्याचे नाव अदिल करीम बागवान वय ३५ वर्ष रा पानसरेनगर, गल्ली नं.२, फ्लॅट नं. ३०१, एस अपार्टमेट येवलेवाडी, पुणे असे असल्याचे सांगितले त्याची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात एकुण ७,२८,०००/-रु.कि.चा त्यामध्ये ६,१८,०००/-रु.कि.चा ३० ग्रॅम ९० मिलीग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, सदरचा गुन्हा करण्यासाठी वापरलेली १,००,०००/-रु.कि. ची अॅटो रिक्षा व.१०,०००/-रु.कि.चा एक विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला.
या आरोपीने सदरचा मेफेड्रॉन एम.डी हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २८३/२०२५, एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे निखील पिंगळे, सहा पो आयुक्त, गुन्हे १ विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, पोलीस अंमलदार, संदिप शिर्के, अमोल सरडे, सचिन मावळे, दया तेलंगे पाटील, विठ्ठल साळुंखे, निलेश जाधव, रिहान पठाण, आशा भिंगारे व बिबवेवाडी पोलीस ठाणेकडील सपोनिरी श्रीमती विद्या सावंत व पोलीस अंमलदार गायकवाड, येवले यांनी केली आहे.

पाक संविधानातील बदलामुळे आसीम मुनीरना अमर्याद शक्ती,संयुक्त राष्ट्र चिंतित,म्हटले.यामुळे सैन्य अनियंत्रित अन् न्यायालय कमकुवत होईल

0

राष्ट्रपती​ केवळ नाममात्र सर्वोच्च कमांडर

न्यूयॉर्क-पाकिस्तानमध्ये झालेल्या संविधान दुरुस्तीबाबत संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. यूएन मानवाधिकार एजन्सी (UNHR) चे उच्चायुक्त वोल्कर टर्क यांनी इशारा दिला आहे की, २७ वी संविधान दुरुस्ती न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याला कमकुवत करू शकते.टर्क यांनी शुक्रवारी निवेदन जारी करत म्हटले की, हा बदल त्या आवश्यक कायदेशीर नियमांना (रूल ऑफ लॉ) देखील कमकुवत करू शकतो, ज्यामुळे देशात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहते.

पाकिस्तानमध्ये १२ नोव्हेंबर रोजी संसदेने लष्कराचे अधिकार वाढवणारे आणि सर्वोच्च न्यायालयाची ताकद कमी करणारे २७ वे संवैधानिक दुरुस्ती विधेयक मंजूर केले होते. यादरम्यान संविधानाच्या ४८ अनुच्छेदांमध्ये बदल करण्यात आले होते.
‘न्यायालयावर राजकारणाचा प्रभाव वाढेल’टर्क यांनी चिंता व्यक्त केली की, संविधान दुरुस्ती गेल्या वर्षी मंजूर झालेल्या २६व्या संविधान दुरुस्तीप्रमाणे आवश्यक चर्चेविनाच मंजूर करण्यात आली आहे. ते म्हणाले की, हे बदल व्यवस्थेत इतके मोठे फेरबदल करतात की, न्यायालयांवर राजकारणाचा प्रभाव पडण्याचा धोका वाढतो.

टर्क म्हणाले की, न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचे एक मुख्य माप हे आहे की त्यावर सरकारचा हस्तक्षेप नसावा. जर हे संरक्षण संपले, तर न्यायालये मानवाधिकारांचे रक्षण करू शकणार नाहीत आणि कायद्याची सर्वांवर समान अंमलबजावणी करू शकणार नाहीत.टर्क यांनी दुरुस्तीमध्ये समाविष्ट असलेल्या त्या तरतुदीबद्दलही चिंता व्यक्त केली, ज्यात राष्ट्रपती आणि सर्वोच्च लष्करी नेतृत्वाला आजीवन फौजदारी प्रकरणातून सूट देण्यात आली आहे. ते म्हणाले की, ही बाब जबाबदारीच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे.

टर्कने पाकिस्तानला सांगितले की, त्यांनी या दुरुस्तीचे पुनरावलोकन करावे आणि असे बदल करावेत ज्यामुळे देशाच्या संस्था मजबूत होतील, कमकुवत होणार नाहीत. संयुक्त राष्ट्रांची ही चिंता अशा वेळी आली आहे जेव्हा पाकिस्तानच्या सैन्यात मोठे बदल होत आहेत.सेनाप्रमुख आसिम मुनीर यांनी 27 नोव्हेंबर रोजी देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस (CDF) म्हणून पदभार स्वीकारला आहे. हे नवीन पदही याच घटनादुरुस्ती अंतर्गत तयार करण्यात आले आहे.

सैन्याच्या हातात अणु कमांड

27व्या घटनादुरुस्तीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे नॅशनल स्ट्रॅटेजिक कमांड (NSC) ची स्थापना. ही कमांड पाकिस्तानच्या अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्र प्रणालीचे निरीक्षण आणि नियंत्रण करेल.आतापर्यंत ही जबाबदारी नॅशनल कमांड अथॉरिटी (NCA) कडे होती, ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान होते, परंतु आतापासून NSC कडे ही जबाबदारी असेल.NSC चा कमांडर पंतप्रधानांच्या मंजुरीने नियुक्त केला जाईल, परंतु ही नियुक्ती सेनाप्रमुख (CDF) च्या शिफारशीनुसारच होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पद केवळ लष्करी अधिकाऱ्यालाच दिले जाईल.यामुळे देशातील अणुशस्त्रांचे नियंत्रण आता पूर्णपणे सैन्याच्या हातात जाईल.

10 मुख्य दुरुस्त्या…

सेनाप्रमुखांना चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेसची जबाबदारी मिळेल
जर एखाद्या अधिकाऱ्याला फील्ड मार्शल, मार्शल ऑफ द एअर फोर्स किंवा ॲडमिरल ऑफ द फ्लीटचा दर्जा दिला जातो, तर हा दर्जा आजीवन राहील.
फील्ड मार्शलला राष्ट्रपतींसारखी सुरक्षा, सरकारच्या परवानगीशिवाय कोणताही फौजदारी खटला चालवता येणार नाही.
वर्तमान मुख्य न्यायाधीश त्यांचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत सरन्यायाधीश राहतील.
फेडरल कॉन्स्टिट्यूशन कोर्टची स्थापना होईल.
याचिकांवर सुओ मोटो (स्वतःहून दखल) घेण्याचा अधिकार.
कायदेशीर नियुक्त्यांमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची महत्त्वाची भूमिका राहील.
राष्ट्रपतींना कार्यकाळानंतर कोणतेही सार्वजनिक पद घेण्यावर मर्यादित सूट.
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदल्या न्यायिक आयोग ठरवेल.
बदल्यांवरील आक्षेप सुप्रीम ज्युडिशियल कौन्सिल पाहिल.
न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती सरकारच्या हातात

या विधेयकात आठ नवीन सुधारणा जोडण्यात आल्या आहेत, ज्या सिनेटने यापूर्वी मंजूर केलेल्या आवृत्तीचा भाग नव्हत्या. सर्वात मोठा बदल न्यायव्यवस्थेशी संबंधित आहे. आता सर्व संवैधानिक प्रकरणे सर्वोच्च न्यायालयातून काढून ‘फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट’मध्ये हस्तांतरित केली जातील, ज्यांच्या न्यायाधीशांची नियुक्ती सरकार करेल.

गेल्या काही वर्षांत सर्वोच्च न्यायालयाने अनेक सरकारी धोरणांना स्थगिती दिली होती आणि पंतप्रधानांना पदावरून हटवले होते, हे लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.

राष्ट्रपती​ केवळ नाममात्र सर्वोच्च कमांडर राहतील.

आतापर्यंत CJCSC तिन्ही सेनांमध्ये समन्वय साधण्याचे काम करत होती. तर खरी ताकद लष्करप्रमुखांकडे होती, पण आता दोन्ही गोष्टी CDF कडे असतील.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या अहवालात तज्ज्ञांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, यामुळे देशात सेना आणखी शक्तिशाली होईल. तज्ज्ञांनी सांगितले की, संविधानात होणारी सुधारणा सैन्याच्या अधिकारांना कायमस्वरूपी संविधानात नोंदवून ठेवेल.

म्हणजेच, पुढे कोणतीही नागरिक सरकार हे बदल सहजपणे रद्द करू शकणार नाही. म्हणजेच, व्यवहारात ‘राष्ट्रपतींच्या सर्वोच्च कमांडर’ची भूमिका केवळ औपचारिक राहील.

पंतप्रधान म्हणाले – हे राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने एक पाऊल

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या सुधारणेला सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने एक पाऊल म्हटले. शरीफ म्हणाले, “जर आम्ही आज याला संविधानाचा भाग बनवले आहे, तर हे केवळ लष्करप्रमुखांबद्दल नाही.”त्यांनी पुढे सांगितले की, यात वायुसेना आणि नौदलालाही मान्यता देण्यात आली आहे. त्यांनी अध्यक्षांना विचारले, “यात चुकीचे काय आहे? देश आपल्या नायकांचा सन्मान करतात. आम्हाला माहीत आहे की, आपल्या नायकांप्रती आदर कसा दाखवावा.”

सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवाला धोका:असीम सरोदे; तब्बल 1000 कोटींची जमीन हडपल्याचे प्रकरण

0

पुणे-भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा सुप्रसिद्ध विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांनी सुरेश धस यांच्या एका कथित 1000 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा दाखला देत हा दावा केला आहे. त्यांच्या आरोपामुळे बीड जिल्ह्यातील कथित गुन्हेगारी व तेथील पुढाऱ्यांच्या कथित काळ्या कारनाम्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

असीम सरोदे यांनी शनिवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यात त्यांनी वरील दावा केला. ते म्हणाले, राम खाडे यांनी सुरेश यांचे 1000 कोटींची जमीन हडप केल्याचे प्रकरण काढले होते. हे प्रकरण माझ्याकडे होते. मी काही दिवसांपूर्वीच राम खाडे यांना काळजी घेण्यासी सूचना केली होती. त्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. आत्ता सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवालाही धोकाही आहे. राम खाडे यांच्यावरील हल्ल्यानंतर त्यांच्या जवळच्या लोकांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 1000 कोटींचा भूखंड घोटाळा काढल्यामुळेच रामवर हल्ला झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. सध्या राम यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. तिथे त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे कळते.

असीम सरोदे म्हणाले, सुरेश धस यांच्या मदतीने व पुढाकाराने देवस्थानची हजारो एकर जमीन खासगी मालमत्ता असल्यासारख्या वळवून घेण्यात आल्या. त्यानंतर त्याच्यावर प्लॉट पाडण्यात आले. त्यांची विक्री करण्यात आली. असा एक खूप मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचे राम खाडे यांचे म्हणणे होते. त्यांनी माहितीच्या अधिकारात याविषयीची खूप मोठी माहिती काढली होती. हे सर्व बीडमधील प्रकरण आहे. मुख्यतः देवस्थानाच्या जमिनी हडप करणे ते ही भाजपच्या आमदाराने हे फार गंभीर प्रकरण म्हणून पुढे आले होते.

राम खाडे यांनी याविषयी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नव्हती. त्यामुळे आम्ही राम खाडे यांच्या मार्फत मुंबईच्या ईडी कार्यालयात तक्रार केली होती. माझ्या माहितीनुसार, या तक्रारीसोबत जवळपास 200-300 कागदपत्रे लावण्यात आली होती. सुरेश धस यांनी 1000 कोटींचा भूखंड घोटाळा केल्याचे धडधडीत पुरावे दिसत होते. त्यामुळे आता सुरेश धस यांच्याकडून माझ्याही जीवाला धोका आहे, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे सुरेश धस हे भाजपचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे व त्यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांच्याविरोधात जोरदार टीका केली होती. त्यानंतर मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर वाल्मीक कराडलाही अटकेला सामोरे जावे लागले होते. धस यांनी पीक विमा प्रकरणातही स्वतःच्याच महायुती सरकारला धारेवर धरून त्यासंबंधीच्या घोटाळ्याची विस्तृत चौकशी करण्याची मागणी केली होती. या दोन्ही प्रकरणांत त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे महाराष्ट्रभर कौतुक झाले होते. पण आता त्यांच्यावरच असीम सरोदे यांनी वरील आरोप केले आहेत. त्यावर सुरेश धस व भाजप कोणती भूमिका घेते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आरोग्य, शिक्षण व समाजकल्याण विभागांच्या समन्वयातून आत्महत्या रोखण्यात यश मिळेल : डॉ. दलबीर सिंह

कनेक्टिंग ट्रस्टतर्फे आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत मानसिक आरोग्यावर विचारमंथन

पुणे: “सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणि समाजकल्याण विभागाचा यांच्यात योग्य समन्वय साधला, त्याला सामाजिक जनजागृतीची आणि संवेदनशील हाताळणीची जोड मिळाली, तर समाजातील आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यात यश मिळेल,” असे प्रतिपादन पॉलिसी मेकर्स फोरम फाॅर मेंटल हेल्थचे अध्यक्ष, तसेच टाटा ट्रस्टचे वरिष्ठ सल्लागार डाॅ. दलबीरसिंह यांनी केले.

आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत कनेक्टिंग ट्रस्टच्या वतीने २० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून, आयोजित तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्यासाठी नवीन दृष्टीकोन’ यावरील विशेष संवादसत्रात डाॅ. दलबीरसिंह यांचे ‘जर्नी ऑफ द फोरम अँड पॉलिसी चेंजेस’ या विषयावर बीजभाषण झाले. यावेळी राज्यसभेच्या माजी खासदार ऍड. वंदना चव्हाण, युवा कार्यकर्ते अनीश गावंडे, जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्या डाॅ. लक्ष्मी विजयकुमार यांनी विचार मांडले.

डाॅ. दलबीर सिंह म्हणाले, “मानसिक आरोग्यविषयक सुविधा शहरांपुरती मर्यादित न राहता, जिल्हा व तालुका स्तरावर पोहोचली पाहिजे. एखादी व्यक्ती, विद्यार्थी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे, हे ओळखून, त्याला त्वरित आवश्यक ती मदत, दिलासा, समुपदेशन सुविधा उपलब्ध होणे आणि दिवसातील सर्वाधिक काळ विद्यार्थी ज्या शाळेत, कॉलेजमध्ये, विद्यापीठात वावरतात, तिथेच जाणीवजागृती करणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य हे सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय घटकांशी जोडलेले असते, हे जागतिक आरोग्य संघटनेकडूनही मान्य करण्यात आले आहे. आत्महत्या प्रतिबंधासाठी सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी यंत्रणा, संस्था, व्यक्ती यांनी परस्पर समन्वय ठेवत, समुपदेशन आणि जाणीवजागृती करायला हवी.”

ॲड. वंदना चव्हाण म्हणाल्या, “आत्महत्येसारख्या टोकाच्या कृतीशी अनेकदा सामाजिक, आर्थिक घटक निगडीत असतात. आपल्याकडे आत्महत्या प्रतिबंधाचे धोरण आहे, प्रतिबंधाचा कायदा आहे आणि नव्याने निर्माण केलेली स्ट्रॅटेजीही आहे. मात्र, त्यामधील माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आपली यंत्रणा कमी पडते. युवा पिढीसमोरची नव्या काळातील नवी आव्हाने, जीवघेणी स्पर्धा, गतिमान जगण्यातून आलेले ताण-तणाव, दडपण, अपयश स्वीकारण्याची तयारी, बेरोजगारी असे अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत, पण शारीरिक दुखापतीकडे ज्या गांभीर्याने बघितले जाते, तेवढे लक्ष मानसिक दुखापतींकडे दिले जात नाही.”

डाॅ. लक्ष्मी विजयकुमार म्हणाल्या, “आत्महत्या हे वैयक्तिक अपयश न राहता, संबंधित व्यक्तीच्या कुटुंबिय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि भवतालाचेही अपयश ठरते. आत्महत्येला प्रवृत्त करणारे घटक नेमके कोणते, हाही मुद्दा कळीचा असतो. अनेकदा सामाजिक ढाचा गुन्हेगार असू शकतो. विद्यार्थ्याला कशाची तरी भीती वाटत असते. त्यातून त्याची देहबोली बदलते, पण ती ओळखण्याचे प्रशिक्षण आपल्या शिक्षक, पालकांना नसते. यंत्रणांचे एकत्रित प्रयत्न, संवेदनशील हाताळणी, जबाबदारीची भावना आणि सातत्याने दिलेला पाठिंबा, यातून आत्महत्येचे प्रमाण कमी होईल.”

अनीश गावंडे यांनी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे या परिसरात विद्यार्थ्यांना व्यसनाधीन करणार्या घटकांच्या उपस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. शाळकरी विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या वेदनादायी आहेत. व्यसन म्हणजे काय, हेही माहिती नसलेले विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी जाऊन टोकाचे पाऊल उचलतात, हे रोखण्यासाठी विद्यार्थ्यांशी सतत संवाद हवा, असे ते म्हणाले. ट्रस्टचे सल्लागार मंडळाचे सदस्य वीरेन राजपूत यांनी स्वागत केले. डाॅ. सुकीर्ती चौहान यांनी समायोजन केले.

ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंची वॉटर पोलो स्पर्धांमध्ये सोनेरी कामगिरी

पुणे – ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदेच्या वॉटर पोलो खेळाडूंनी विभागीय व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी करून शाळेची शान उंचावली आहे.

या खेळाडूंनी जिल्हास्तरीय  वॉटर पोलो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर विभागीय स्तरावरील उत्कृष्ट खेळ करीत कांस्यपदक मिळवत पुन्हा एकदा आपली कामगिरी सिद्ध केली.  या संघामध्ये द्रोणा बेंदळे, श्लोक चिलेकर, श्रीहरी सचिन निकम, पार्थ पोटे, अद्विक प्रसाद भालेकर, आयुष शैलेश नाशी, खुष मुंदडा, सोहम बारी, सुमेध गौरिश पानसे, यश रेवतकर, इशान मंत्री आणि शर्विल जंगम या खेळाडूंचा समावेश होता. सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट संघभावना, सहनशक्ती आणि खेळाडूवृत्ती दाखवीत हे यश संपादन केले. या संघाला  प्रशिक्षक श्री. कपिलेश हरणे आणि श्री. अनिकेत सरदार यांचे  मार्गदर्शन लाभले..
या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी व प्राचार्य संगीता राऊतजी यांनी सर्व खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

दिव्यांग नागरिकांसाठी सलग ६ व्या वर्षी पुणे जिल्हास्तरीय पॅरा नेमबाजी स्पर्धेचे आयोजन

पुणे-दिव्यांग नागरिकांमध्ये नेमबाजी या खेळाची जनजागृती प्रचार, प्रसार व आवड निर्माण होवून त्यांनी नेमबाजी या खेळाचे प्रशिक्षण घेऊन विविध स्तरांवरील स्पर्धेत सहभागी होवून त्यांनी पदके जिंकून आपल्या शहराचे राज्याचे देशाचे नाव उज्ज्वल करावेत यासाठी पॅरा शुटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने पुणे महानगरपालिका व पॅरा टार्गेट शुटिंग असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सलग ६ व्या वर्षी पुणे जिल्हास्तरीय पॅरा नेमबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पुणे महानगरपालिका व पॅरा टार्गेट शुटिंग असोसिएशन पुणे फक्त स्पर्धेचे आयोजन न करता गेल्या ३ वर्षात पुणे शहरातील २१ दिव्यांग खेळाडूंची निवड करून आकाश कुंभार यांनी मोफत प्रशिक्षण दिले आहे. नेमबाजीसाठी लागणाय्रा साहित्यसाठी पुणे महानगरपालिका यांनी मदत केली आहे. आज पुणे महानगरपालिका व पॅरा टार्गेट शुटिंग असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ६ व्या पुणे जिल्हास्तरीय पॅरा नेमबाजी स्पर्धेचे उद्घाटन पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथील नेमबाजी स्टेडियम मध्ये झाले यावेळी रफीक खान, अभिनेत्री रश्मीता शहापूरकर, महानगरपालिका उपआयुक्त संदीप खलाटे , गोविंद दांगट सहाय्यक आयुक्त ,मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण, राजेंद्र मोरे, संस्थापक व प्रशिक्षक आकाश कुंभार उपस्थित होते यावेळी पुणे शहरातील १२८ दिव्यांग खेळाडूंनी सहभागी नोंदविला आहे त्यातील विविध गटातील विजेत्या खेळाडूंना एकूण ५५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे तसेच शहरातील १० खेळाडूंची निवड करून राष्ट्रीय स्तरावर पोहचे पर्यंत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

पुणे महापालिकेने ज्येष्ठ नागरिक संघांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी – संदीप खर्डेकर.

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध ज्येष्ठ नागरिक संघ , हास्यक्लब व इतरांसाठी खुर्च्या भेट – सौ.मंजुश्री खर्डेकर.

पुणे- महापालिकेने ज्येष्ठ नागरिक संघ, हास्यक्लब, योग केंद्रासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी आयुक्त नवलकिशोर राम यांच्या कडे केली आहे. ज्येष्ठ नागरिक हे शहराचे भूषण असून त्यांचा आयुष्याचा उत्तरार्ध आनंदात जावा हे पाहणे शहरवासियांचे कर्तव्य असून त्यासाठी मनपा प्रशासनाने येत्या अर्थसंकल्पात तरतूद करावी असेही ते म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने विविध संघांना खुर्च्या, स्पीकर सेट, खेळाचे साहित्य इ भेट देण्याच्या विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विश्वस्त सतीश कोंडाळकर, राजेंद्र गादिया व इतर मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड मनपा ने ज्येष्ठ नागरिकांना टी. व्ही, कपाट, खुर्च्या इ साहित्य भेट देण्यासाठी तरतूद केली होती त्याची आठवण ही संदीप खर्डेकर यांनी करून दिली. मनपा च्या अनेक तरतुदी अनावश्यक असून करदात्या नागरिकांना त्याचा कोणताही लाभ होत नाही. त्यामुळे आयुक्तांनी गांभीर्याने ह्या मागणीचा विचार करावा असेही खर्डेकर म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांसोबत आता काही प्रमाणात युवा वर्ग देखील अश्या संघांच्या दैनंदिन उपक्रमात सहभागी होत आहे, अश्या परिस्थितीत खुर्च्या, सतरंजी, खेळाचे साहित्य ( कॅरम बोर्ड व इतर ) कपाट, टीव्ही सेट अश्या वस्तू उपलब्ध कराव्यात असेही खर्डेकर म्हणाले.
क्रिएटिव्ह फौंडेशन सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन आपल्या परीने साहित्य भेट देत असतं मात्र शहराची व्याप्ती बघता मोफत उपक्रम राबविणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघ, दैनंदिन योगाभ्यास करणारे केंद्र, हास्य संघ अश्यांना सहाय्य केले जावे अशी अपेक्षा माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केली.डहाणूकर कॉलनीतील कै. बाळासाहेब ठाकरे उद्यानात नवचैतन्य हास्ययोग परिवारास खुर्च्या भेट देण्यात आल्या त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी सुधीर देशपांडे,सौ. शैलजा देशपांडे, अशोक पुजारी, सौ. सरोजिनी कांबळे, श्रीमती सरिता कर्वे, सौ. शुभदा कुलकर्णी, संजय फडके इ मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांचे भरभरून प्रेम, दैनंदिन जनसंपर्क आणि कामकाज ग्रुप्स च्या माध्यमातून 48 तासात नागरी समस्या सोडविण्याची हातोटी हीच आमच्या साठी जमेची बाजू असून राजकारणापेक्षा समाजकारण जास्त समाधान देते असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
लॉ कॉलेज रस्त्यावरील शांतिशीला सोसायटी येथे श्री.हेमंत येरवडेकर, अध्यक्ष,
श्री शेखर जोशी सेक्रेटरी,
श्रीमती मंजुषा कुलकर्णी,
कार्यकारिणी सदस्य,
श्री अनिल देशपांडे,रोहित जोशी
ओमकार अग्निहोत्री,
आरोही करमरकर, अश्विनी सप्रे,जुई खांबेटे,पर्णाली जगताप,सोनल आराध्ये,वासंती पुरोहित,सौ सुप्रिया जोशी,क्षमा देशपांडे,रत्नप्रभा वैद्य,डॉ.इरा जमेनीस,
लता प्रभावळकर,
भावना मोटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
तर देवेंद्र सोसायटी परिसरातील दत्त मंदिर येथे श्री. प्रमोद रायकर, रामचंद्र टांकसाळे,सौ. शिल्पा वैद्य, सौ. दीपा सभापती, अप्पा कुरे, सौ. सुधा कुरे,यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती.
एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघास स्पीकर सेट भेट देण्यात आला. यावेळी मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते डॉ. अलकनंदा भानू, श्री. प्रमोद शेजवलकर व इतर मान्यवर उपस्थित होते. संजय गांधी वसाहतीतील वीर चि. संजय गांधी तरुण मंडळ श्री गणेश मंडळास क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने विश्वस्त सौ. मंजुश्री खर्डेकर यांच्या तर्फे स्पीकर सेट भेट देण्यात आला.यावेळी जयंतराव भावे, मंदारजी बलकवडे,संतोषजी लांडे, केतकीताई कुलकर्णी, राजेंद्र येडे, शंतनू खिलारे,संगीताताई शेवडे,मनोज बलकवडे, वसाहतीतील नागरिक व इतर प्रमुख उपस्थित होते.
क्रिएटिव्ह फाउंडेशन ने पुढील 5 वर्षांचे नियोजन केले असून विविध संस्थांना उपयुक्त वस्तू भेट देण्याचा उपक्रम निरंतर सुरु राहणार असल्याचे ही मंजुश्री खर्डेकर यांनी जाहीर केले.

भटकी कुत्री व रस्त्यावरच्या प्राण्यासंदर्भातील निकालाचा सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करावा.

0

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन, पदाधिकारी व प्राणीमित्रांची सर्वोच्च न्यायालयाला हजारो पत्रे.

मुंबई, दि. २९ नोव्हेंबर २०२५

भटकी कुत्री व रस्त्यावरच्या प्राण्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन अपेक्षित आहे परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा मानव व प्राणी यांच्या सहजीवनामध्ये अनावश्यक दरी निर्माण करू शकतो. न्यायालयाने आपल्या आदेशाची अंमलबजावणी स्थगित करून संविधान पीठासमोर नव्याने व सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन पुनर्विचार करावा असे मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ७ नोव्हेंबर रोजी भटक्या कुत्र्यांबाबत दिलेल्या निकालाचा पुनर्विचार करावा म्हणून देशभरातील प्राणीप्रेमींनी हजारोंच्या संख्येने सर्वोच्च न्यायालयाला पत्रे पाठवली आहेत. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन व युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांनी याच विषयावर पत्रं पाठवली आहेत. शनिवारी दुपारी झीनत शबरीन आपल्या सहका-यांसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचल्या, त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्रं पाठवली.
सर्वोच्च न्यायालयाला पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय वैज्ञानिक, वैद्यकीय आणि व्यावहारिक दृष्टीनेही अंमलात आणणे कठिण आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी करण्याची जबाबदारी असणा-या संस्थांकडे त्यासाठी लागणा-या निधीची तरतूद नाही, पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. भटक्या प्राण्यांना आपली वेदना, भीती किंवा हक्क व्यक्त करता येत नाही, त्यामुळे त्यांच्याशी संवेदनशील आणि न्याय्य वर्तन करणे हीच खऱ्या अर्थाने मानवी जबाबदारी आहे. करुणा, मानवता आणि जबाबदारी ही आपल्या समाजाची मूलभूत मूल्ये आहेत, आणि त्यांचे रक्षण आपण सर्वांनी एकत्रितपणे करायला हवे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांवर कारवाई सुरू झाली असली, तरी हा आदेश अत्यंत विस्तृत आणि अंमलबजावणीसाठी विशिष्ट अटींसह आहे. अशा कारवाईपूर्वी योग्य शेल्टर, वैद्यकीय सुविधा, दत्तक प्रोत्साहन यंत्रणा आणि ABC (Animal Birth Control) केंद्रे तयार करणे आवश्यक आहे. परंतु या पर्यायी व्यवस्था उभ्या न करता थेट कारवाई करणे हे केवळ अमानवी आणि अविचारी नाही, तर नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे, त्यामुळे न्यायालयाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा.

यावेळी पंकज चौधरी, अजय मिश्रा, अमनदीप सैनी, आसिफ खान, तेजस चांदूरकर, शेखर जगताप, प्रज्ञा ढवळे, निखिल रुपारेल यांच्यासह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

अभिनेत्री तनुजा आणि काजोल या मायलेकींच्याआणि रेणुका शहाणेंच्या उपस्थितीत लाँच झाला ‘उत्तर’चा ट्रेलर !

आता उत्सुकता १२ डिसेंबरला होणाऱ्या रिलीजची!

सध्या ‘आईला माहीत असतं!’ या वाक्याने आणि ‘हो आई!’ या गाण्याने सगळीकडे चर्चेत असलेल्या ‘उत्तर’ या सिनेमाचा अप्रतिम ट्रेलर लॉन्च सोहळा सुप्रसिद्ध अभिनेत्री तनुजा आणि काजोल या मायलेकींच्या उपस्थितीत नुकताच पार पडला आणि सिनेमाबद्दलच्या अपेक्षा आणखी उंचावल्या. आई आणि मुलाच्या नात्याची आजच्या काळातील गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या प्रसंगी काजोल आणि तनुजा यांनी प्रेक्षकांना ‘आईसोबत’ किंवा ‘आईसाठी’ हा सिनेमा पाहण्याचं प्रेमळ आवाहन सुद्धा केलं.

उत्तर चित्रपटाच्या या ट्रेलरचं मुख्य वैशिष्ट्य आहे ते प्रत्येक आई आणि मुलाला लागू होतील असे खुमासदार संवाद.
यासोबतीनेच सुंदर चित्रीकरण आणि साउंडवर केलेली विशेष मेहनत ह्या सगळ्यानेच सिनेमाच्या ट्रेलरचा परिणाम अतिशय गहिरा झाला आणि प्रत्येकाचं मन आईबद्दलच्या सुंदर भावनांनी भरून गेलेलं दिसलं.

‘उत्तर’मध्ये रेणुका शहाणे आईच्या तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत ऋता दुर्गुळे आणि एका खास भूमिकेत निर्मिती सावंत सुद्धा दिसणार आहेत, या शिवाय पहिल्यांदाच ‘अनमिस’नावाचं एक एआय पात्र सुद्धा यात झळकणार आहे. ‘डबलसीट’, ‘फास्टर फेणे’ या सारखे महत्वाचे चित्रपट आणि ‘दोन स्पेशल’, ‘भूमिका’ सारखी क्लासिक नाटकं देणाऱ्या क्षितिज पटवर्धन यांनी उत्तरमध्ये कथा, पटकथा लिखाणासोबत पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा ट्रेलरचे कौतुक करताना म्हणाल्या, ‘’या चित्रपटाचे नावच खूप महत्त्वाचे आहे. आईकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात. हा ट्रेलर खूपच सुंदर झाला असून तो मनाला स्पर्श करणारा आहे. ट्रेलरमधून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली असून हा चित्रपट मी नक्कीच बघणार आहे.’’
अभिनेत्री काजोल म्हणाल्या, ‘’ मला ट्रेलर खूप आवडला. आई आणि मुलाच्या सुंदर नात्यावर आधारित हा चित्रपट असला तरी त्याला आजच्या काळातील तंत्रज्ञानाचीही जोड आहे. तंत्रज्ञानाचा नात्यावर कसा परिणाम होतो, याचे भावनिक चित्रण यात दिसतेय. खूप छान विषय यात हाताळण्यात आला आहे. मी आईसोबत लवकरात लवकर हा चित्रपट पाहाणार आहे.’’

ट्रेलरला मिळालेल्या अप्रतिम प्रतिसादाबद्दल क्षितिज पटवर्धन म्हणाले की, “हा सिनेमा माझंच नाही तर मराठी सिनेमाचं अनेक प्रश्नांना, शंकांना दिलेलं उत्तर आहे! आणि आईच्या प्रेमाला दिलेलं एक छोटीसं रिटर्न गिफ्ट आहे!”

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की, “क्षितिजने जेव्हा या चित्रपटाची गोष्ट मला ऐकवली तेव्हा क्षणाचाही विलंब न करता आपण ही गोष्ट करतोय हे मी त्याला सांगितलं. आपण कायमच म्हणतो की मराठी चित्रपटाची गोष्ट हीच त्याचा हिरो असतो. इथे गोष्टीसोबतच आई ही या चित्रपटाचा हिरो आहे आणि रेणुका शहाणे यांनी नेहमीप्रमाणे यातील आईची ही भूमिका सुंदरपणे साकारली आहे. हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकाला आवडेल असा विश्वास आम्हाला आहे.”

झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर तसेच जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून १२ डिसेंबरला ‘उत्तर’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.