फार्मसी अध्यापनात रुची वाढविण्यासाठी नव तंत्रज्ञानाचा वापर उपयुक्त : डॉ. विनोद मोहितकर
पुणे महानगर क्षेत्रात उद्योजकांना कुठलीच सूट नाही;
पूर्वीचीच स्थिती कायम राहील
– विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे दि.21 : – कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच काही औद्योगिक क्षेत्रांकरीता शिथिलता दिली आहे. परंतु पुण्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे ही शिथिलता पुणे महानगर क्षेत्रामध्ये म्हणजेच पुणे, पिंपरी-चिंचवड,पुणे ग्रामीण तसेच एमआयडीसी क्षेत्रामध्ये रद्द करण्यात आलेली आहे. येथे कोणतीच सवलत देण्यात आलेली नाही. त्यामुळे दि.17 एप्रिल पूर्वीचीच परिस्थिती कायम राहील, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
त्यानुसार या क्षेत्रामध्ये फक्त मेडीसीन, एलपीजी अशा सारख्याच अत्यावश्यक सेवांना ज्यांना दि.17 एप्रिल पूर्वी परवानगी देण्यात आली आहे. त्याच सेवा आता चालू राहतील. परंतु या उद्योगांच्या व्यवस्थापनाने त्यांच्या कामगारांना लॉकडाऊनच्या कालवधीमध्ये त्या उद्योगाच्या ठिकाणीच निवासाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना इतर ठिकाणी जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर यांनी म्हटले आहे.
*नागरिकांना आवाहन*
त्याचप्रमाणे त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, कोवीड प्रार्दुभावापासून आपल्या व कुटूंबाच्या संरक्षणाकरीता प्रशासन, पोलीस विभाग,महसूल विभाग व इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. तसेच अनेक सामाजिक संस्थाही याकरीता समाजपयोगी काम करीत आहे. पुणे महानगर क्षेत्रामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आपल्या व कुटूंबियांच्या हिताकरिता आपण घराबाहेर पडू नका. कुटूंबातील ज्येष्ठ सदस्याला मधुमेह, रक्तदाब, किडणी विकार, ह्दयरोग इ. आजार असल्यास तसेच त्यांना किंवा इतर सदस्यांना फ्लू सदृक्ष आजाराची लक्षणे दिसल्यास त्याची ताबडतोब वैद्यकीय तपासणी करावी. आपणास आवश्यकता वाटेल तेव्हां तात्काळ वैद्यकीय अधिका-यांशी किंवा 108 क्रमांकावर रुग्णवाहीकेला संपर्क करावा. तसेच नियमीतपणे मास्कचा वापर करावा. बाहेरुन आल्यास एकदम कुटूंबांतील सदस्यांशी थेट संपर्क टाळावा,कोणत्याही परिस्थितीमध्ये घराबाहेर पडू नये. आपण प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे सांगून प्रशासनास सहकार्य केल्यास आपण निश्चितच या संकटावर मात करु शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0 0 0 0
नगरसेवक नाना भानगिरे यांच्यावतीने डॉक्टरांना पीपीई किटचे वाटप
पुणे- : वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची पर्वा न बाळगता रात्रंदिवस जनतेची अहोरात्र सेवा करणारे आपले पोलिस बांधव, डॉक्टर, नर्सेस, फायर ब्रिगेडचे जवान, स्वच्छता कर्मचारी, अधिकारी यांना हडपसर येथील नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या माध्यमातून व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
तसेच नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांच्या निधीतून प्रभाग क्र २६ मध्ये घनकचरासाठी घंटा गाडीचे लोकार्पणही यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नाना भानगिरे यांनी चौका -चौकात उभारलेल्या सॅनिटायजर फवारणी रूम ची पाहणी करून नाना तू देवदूता सारखा नागरिकांसाठी धावत आहे, असे गौरवोद्गार आढळराव पाटील यांनी काढले .या प्रसंगी नानांनी नागरिकांना सोशल डिस्टेनिंग चे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच अति महत्वाचे काम असेन तरच बाहेर एकानेच पडावे व जास्तीत जास्त घरातच बसण्याचा नागरिकांना सल्ला दिला तसेच पोलिस बांधवाना डॉक्टर तसेच पत्रकार पुणे महानगरपालिका चे कर्मचारी, मेडिकल स्टोअ, यांचे विशेष कौतुक केले. यांना सर्वांना सहकार्य करावे अशी नागरिकांना विनंती केली.
मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर मंगेश वाघ तसेच त्यांची डॉक्टर मित्र परिवार ,पुणे महानगरपालिका चे कर्मचारी अधिकारी, फायर ब्रिगेड चे अधिकारी पोलीस कर्मचारी, ऑफिसर सुहास यादव, नगरसेविका प्राची आल्हाट,अभिमन्यू भानगिरे,गणेश वाडकर ,योगेंद्र गायकवाड, योगेश सातव ,विकास शेवाळे, तुषार पवार ,नाना भानगिरे आयोजक टीम उपस्थित होते.
‘डॉक्टर, तुमच्या रुपात देव भेटला…’ या भावना समाधान आणि ऊर्जा देतात!
औरंगाबाद जिल्हा रुग्णालय, चिकलठाणा (मिनी घाटी) हे कोवीड १९ रुग्णालय असून येथे आज २७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आम्ही सर्व वैद्यकीय अधिकारी आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर कोरोना संशयितांची तपासणी करत आहोत. सुरवातीला सगळे अहवाल निगेटिव्ह येत असल्याने आम्हाला चांगलं वाटत होतं. पण दि. ३० मार्च रोजी पहिला पॉझिटिव्ह पेशंट आमच्या येथे दाखल झाला आणि त्या दिवसापासून कोरोना युद्धाचा आमचा लढा जास्त खबरदारीने सुरु झाला आहे.
आज घडीला आमच्या रुग्णालयात २४ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असून त्या प्रत्येकाला आम्हाला बरं करुन घरी पाठवण्याची इच्छा आहे. आमच्या रुग्णालयातील पहिली पॉझिटिव्ह पेशंट खूप जास्त गंभीर परिस्थितीत दाखल झाली होती. तिच्यावर तातडीने सर्व उपचार करुन तिला मानसिक आधार देत बरं करायचं आव्हान आमच्या येथील सर्व डॉक्टर्स, नर्सेस, आमचे आरोग्य सेवक आम्ही सगळ्यांनी स्वीकारले होते.
आमच्या प्रयत्नांना,धावपळीला यश आले आणि पाच दिवसांपूर्वी ती रुग्ण बरी होऊन घरी गेली. ही रुग्ण बरी झाली याचा तिच्या कुटुंबियांइतकाच आनंद आम्हाला आहे. कारण चौदा दिवस रुग्ण पूर्णपणे आमच्या सहवासात असतो. त्याच्या कुटुंबापासून दूर त्याला शारीरिक, मानसिक आधार देताना आमच्याही नकळत आम्ही त्याच्याशी भावनिकदृष्ट्या जोडले जातो. त्यातून तो बरा होऊन घरी जाताना निश्चितच आम्हा सगळ्यांना आनंद होणे स्वाभाविक आहेच, पण जेव्हा रुग्ण, त्याचे नातेवाईक घरी जाताना आम्हाला डॉक्टर तुमच्या रुपाने देव भेटला, तुम्ही आता आमच्या कुटुंबाचाच एक भाग आहात, आमच्या प्रयत्नांची ,धावपळीची दखल घेत आपलेपणा व्यक्त करतो, तो क्षण खरोखर खूप समाधानाचा आणि ऊर्जा देणारा असतो, अशा शब्दांत कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठीच्या लढाईतील एक डॉक्टर पद्मजा अजय सराफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
औरंगाबाद सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येच्या आधारे रेड झोन मध्ये असून त्या पार्श्वभूमीवर येथे आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय अधिकारी, त्यांचे सर्व डॉक्टर्स,नर्सिंग स्टाफ,आरोग्य सेवक आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत सेवाभावाने रुग्णांची काळजी घेत आहेत.
कोरोनाला रोखण्यात सर्वात जास्त महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत, ते डॉक्टर आणि त्यांचे सर्व सहकारी म्हणूनच मुख्यमंत्र्यांनीदेखील त्यांच्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन सैनिक म्हणून त्यांचा गौरव केला आहे.या सैनिकांची लढाई ही तितकीच अटीतटीची आणि जीवावर बेतणारी आहे,कारण कोरोना हा संसर्गजन्य विषाणू आहे. पण आज घडीला सर्व डॉक्टर आणि त्यांचा नर्सिंग स्टाफ,आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकजण रुग्णाला बरं करण्यासाठी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता झोकून देत काम करत आहे.
विशेष म्हणजे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करून संचारबंदीचा आदेश देऊन सर्वांना घरात राहण्याचे आवाहन शासन प्रशासन करत आहे. तर दुसऱ्या बाजूला आपल्या सेवेप्रति कृतीशील निष्ठा ठेवत आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर,नर्सिंग स्टाफ हे संसर्गाच्या धोकादायक परिस्थितीत ही प्रत्यक्ष रुग्णांच्या थेट संपर्कात राहून त्यांच्यावर उपचार करण्याचे, काळजी घेण्याचे आपले कतर्व्य बजावत आहे. हे करत असताना त्यांना मनापासून रुग्णाला बरं करण्याचा प्रयत्न असतो त्यासोबत आपल्या घरी जाताना एक सुप्त ताणही त्यांच्या मनावर असतो तो म्हणजे आपल्यामुळे घरच्यांना तर काही होणार नाही ना ही, स्वाभाविक काळजी त्यांना वाटत असते.पण या लढवय्यांचे कुटुंबीय तसेच त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणारे आहेत.
डॉ.सराफ म्हणाल्या,कोरोना संसर्गाची भीती तुम्हा आम्हा सगळ्यांनाच वाटते आहे. आम्ही तर थेट पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासात 24 तास ड्युटी करुन घरी जातो त्यामुळे आम्हाला आणि आमच्या घरच्यांनाही भीती, काळजी ही आहेच, पण तरीही कोरोनाला हरवण्यासाठी आम्ही बाहेर पडलंच पाहिजे हे ही आमचे कुटुंबीय जाणून आहेत आणि त्यांच्या भावनिक पाठिंबा आणि समंजस सहकार्यामुळेच तर इतक्या चिंताजनक परिस्थितीतही आम्ही दवाखान्यात राहून रुग्णांना व्यवस्थितपणे योग्य उपचार देऊ शकत आहे. यामध्ये आमच्या कुटंबियांची भूमिका आणि सहकार्य विशेष आहे हे डॉ.सराफ यांनी आर्वजून सांगितले.
दोन वर्षापासून मिनी घाटी म्हणजेच जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ.सराफ एम.डी.मेडिसीन असून यापूर्वी त्यांना स्वाईन फ्लू या आरोग्य आपत्तीला हाताळण्याचा अनुभव आहे.आपल्या हातून रुग्ण बरा होण्याच्या भावनेतून त्याला उपचार करताना आपोआप मनात एक सकारात्मकता निर्माण होत जाते.त्यातून आपल्याला काम करत राहण्याची क्षमता वाढते.
सुरवातीला काही दिवस आमच्या येथे कोरोना चाचणी करताना स्वॅब घेण्यासाठीचा तणाव होता पण जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली खूप कमी काळात आमच्या टीमने मनातील भीतीवर मात करत कामाचा भाग म्हणून या सर्व जोखमीच्या गोष्टी सहजेतेने हाताळायला सुरवात केली.शिप्टमध्ये आम्ही सर्वजण २४ तास काम करुन येथे दाखल रुग्णांची योग्य पद्धतीने काळजी घेत आहोत. यामध्ये आमचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी,डॉ.अर्चना भोसले, डॉ.पी.एम.कुलकर्णी, डॉ.प्रेमचंद कांबळे,डॉ.सुनील गायकवाड, डॉ.जावेद, डॉ.बकाल, डॉ.अश्वीन पाटील, डॉ.गोफणे, डॉ.वराडे यांच्यासह आमच्या येथील सर्व नर्सिंग स्टाफ,आरोग्य सेवक यांच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून आम्ही आता पर्यंत तेरा रुग्णांना चांगले करुन डिस्चार्ज दिला आहे.
आता रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचार करुन त्यांना चांगले करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.ते करत असताना रुग्णांसोबत निर्माण होत जाणारा ऋणानुबंध आणि त्यांच्या तब्बेतीत होणारी सुधारणा हीच आमच्या साठी मोठी गोष्ट असते.समाजात मध्यंतरी डॉक्टरांबद्दल राग व्यक्त करणारे जरासे असुरक्षिततेचे वातावरण होते.त्यानंतर आता या संकट वेळी सर्वत्र शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर,आरोग्य यंत्रणेबद्दल विश्वासाची आपुलकीची भावना अनुभवायला मिळते आहे, हा निश्चितच चांगला सुखावणारा बदल आहे, अशा भावना डॉ.सराफ यांनी व्यक्त केल्या.
कोरोनाच्या युद्धाचे प्रत्यक्ष रणांगण असलेल्या दवाखान्यांमध्ये योगदान देणाऱ्या सर्वांची ही प्रातिनिधीक भावना आहे.या युद्धाला जिंकण्यात मोलाचे योगदान देणा-या सर्व डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाच्या प्रयत्नाला यश मिळो…..
शब्दांकन
- वंदना आर.थोरात, औरंगाबाद
सिंम्बायोसिस हॉस्पिटलमधून आज १५ रुग्णांना सुटी देण्यात आली.
• तीन वर्षाच्या मुलापासून ते ९२ वर्षाची कोरोनाबाधित महिला बरी होऊन घरी गेली.
जीवन दान मिळाले, यापेक्षा दुसरा कोणता आनंद असू शकतो…
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आम्ही भयभीत झालो होतो. जेव्हा आमची चाचणी करण्यात आली, तेव्हा अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले. आमचं कसं होणार, आयुष्याचं काही खरं नाही, अशी चिंता लागली होती, परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे आम्ही बरे झालो, अशी भावना पुणे स्टेशन परिसरातील एका कुटुंबाने व्यक्त केली.
या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य कृतज्ञतापूर्व भावना व्यक्त करताना म्हणतात, सुरुवातीला आमच्या वडिलांना न्यूमोनिया झाला. नंतर आम्ही त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले, पण कोणी दाखल करुन घेतले नाही. अखेर पुणे महानगरपालिकेच्या नायडू इस्पितळात नेले, मात्र त्यांनी ससून रुग्णालयात पाठविले, त्यांना कोरोनाची लागण झाल्याने स्वतंत्र वार्डात ठेवण्यात आले. व्हेंटीलेटरवर ठेवून उपचार करण्यात आले. परंतु न्युमोनिया आजार असल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
पुन्हा आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आमचे कुटुंब व नातेवाईक मिळून जवळपास २० जणांना कोरोनाची बाधा झाली. सर्व जण घाबरलो, २० पैकी ८ जण आम्ही एकाच कुटुबांतील होतो. आम्हाला लवळे येथील सिम्बॉयोसिस रुग्णालयात उपचारार्थ आयसोलेशनसाठी ठेवण्यात आले होते. खरं तर फार चिंतेत होतो, अख्खं कुटुंब कोरोनाबाधित झालं. पण सुदैवाने आम्ही बरे झालो. या १५ दिवसात तणाव होता, परंतु डॉक्टर्स, नर्स आणि रुग्णालयातील सर्व सदस्य एवढ्या आपुलकीने वागत होते की, जणू काही आम्ही त्यांच्याच कुटुंबातील सदस्य आहोत. खूप आपुलकीची भावना निर्माण झाली या निमित्ताने नागरिकांना आम्ही असे आवाहन करतो की, घाबरु नका, पण काळजी घ्या. शासन आपल्यासाठी खूप काही करीत आहे. सर्दी, ताप, खोकला झाल्यास बिनधास्त दवाखान्यात जा, उपचार करुन घ्या. कोरोनाची लागण झाली तरी हिमतीने सामोरे जा… आपल्यासाठी सर्व यंत्रणा राबते आहे. आपल्याला फक्त हिंमत द्यायची असते.
सिंम्बायोसिस रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नटराजन म्हणाले, आमच्या लवळे येथील सिंम्बायोसिस रुग्णालयात १५५ रुग्ण दाखल आहेत. आज बरे होऊन घरी गेलेले १५ रुग्ण ८ एप्रिल २०२० रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. १४ दिवस उपचारार्थ ठेवण्यात आल्यानंतर जेव्हा त्यांचे सॅम्पल निगेटिव्ह आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत होता. ९२ वर्षाच्या आजीबरोबर त्यांच्याच कुटुंबातील ३ वर्षांची मुलगी व एक पोलिओग्रस्त रुग्ण होता.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने सिंम्बायोसिस रुग्णालय व भारती रुग्णालयाबरोबर करार केला असल्याची माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. भविष्यात रुग्ण वाढले तर तयारी असावी या हेतूने आमचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
संदिप राठोड,
विभागीय माहिती कार्यालय, पुणे
पुणे विभागात कोरोना बाधित 890 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे दि.21 :- विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 890 झाली असून विभागात 115 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 717 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 20 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 890 बाधित रुग्ण असून 58 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 813 बाधीत रुग्ण असून 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 16 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 25 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 9 बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 10 हजार 37 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 9 हजार 511 चा अहवाल प्राप्त आहे. 526 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 8 हजार 573 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 890 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 44 लाख 5 हजार 369 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत 1 कोटी 67 लाख 77 हजार 649 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 828 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांना रसद प्रोटीनयुक्त आहाराची (व्हिडीओ)
कंत्राटी कामगारांना देखील सुरक्षा कवच द्या – धीरज घाटे (व्हिडीओ)
पुणे- वाहन चालक असो ,शिपाई असो, सफाई सेवक असो ,सुरक्षा रक्षक असो अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना च्या पार्श्वभूमीवरील सुरक्षा कवच मिळावे अशी मागणी करत ज्यांचे पगार थकीत आहेत त्यांनाही पगार दिले जावेत अशी मागणी आज महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे महापालिकेतील सभागृहनेते धीरज घाटे यांनी केली आहे ..पहा याबाबत नेमके त्यांनी काय म्हटले आहे.
दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी-हेमंत रासने
पुणे-कोरोनाच्या संकटात दवाखाने पूर्ण वेळ अथवा अर्धा वेळ बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुणे शहराच्या विविध भागांमध्ये काही छोट्या दवाखान्यांमध्ये बाह्यरुग्ण विभाग आणि डिस्पेंन्सरी निर्धारित वेळेत कार्यरत नसतात, अशा तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय सेवा ही आपत्ती व्यवस्थापन आणि साथ, रोग कायद्यांतर्गत अत्यावश्यक सेवा आहे. ती बंद असणे गंभीर बाब आहे.
त्यामुळे जे वैद्यकीय व्यावसायिक आपले दवाखाने पूर्ण अथवा अर्ध वेळ बंद ठेवतील त्यांच्यावर कारवाई व्हावी. तसेच संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, असे रासने यांनी निवेदनात म्हटले आहे.
मिळकतकरावरील सवलतीच्या मुदतीत जूनपर्यंत वाढ-
कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेला लॉकडाऊन आणि अन्य बाबी लक्षात घेऊन वार्षिक मिळकतकरावर मिळणाऱ्या सवलतीची मुदत जून अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
दरवर्षी मिळकत कर एप्रिल, मे या महिन्यांमध्ये भरल्यास त्यावर पाच ते दहा टक्के सवलत करदात्यांना मिळते. यंदा एप्रिलमध्ये लॉकडाऊन लागू आहे. त्यामुळे करदात्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन करावरील सवलतीची मुदत जून अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीतही घेण्यात आला आहे.
पुणे महापालिका हद्दीत सुमारे दहा लाख मिळकतधारक आहेत. महापालिका भवन, महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये येथे मिळकत कर भरण्यासाठी सोय आहे. काही सहकारी बँकांमध्येही महापालिकेचा मिळकत कर भरण्याची सेवा उपलब्ध आहे. तसेच ऑनलाइन सेवाही उपलब्ध आहे.
अनेक करदाते अशा सेवांमार्फत महापालिकेचा मिळकत कर भरतात. एप्रिल, मे महिन्यात मिळकत कर भरल्यास त्यावर पाच ते दहा टक्के सूट मिळते. त्यामुळे दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात मिळकत कराचा भरणा मोठ्या प्रमाणात होतो. यंदा लॉकडाऊनमुळे कर भरणा प्रमाण अत्यल्प आहे. पालिकेत कर्मचारी कमी असल्यामुळे कराची चलने सगळ्या मिळकतधारकांना पाठविणेही शक्य झालेले नाही. काही करदात्यांनी ऑनलाईन पद्धतीने कर भरणा केला आहे.
पुनीत बालन ग्रुपच्या वतीने दीडशेहून अधिक पत्रकारांची कोरोना पूर्व चाचणी
पुणे-कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही सामान्य नागरिकांपर्यंत योग्य आणि अधिकृत माहिती पोहचवण्याचे काम शहरातील पत्रकार करत आहेत. प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या पत्रकारांना स्वॅब टेस्टिंगची गरज आहे किंवा नाही हे सांगणारी कोरोना पूर्व चाचणी पुनीत बालन ग्रुपच्या वतीने घेण्यात आली, यामध्ये दीडशेहून अधिक पत्रकारांची तपासणी करण्यात आली.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून पुनीत बालन ग्रुप आणि मेट्रो मेडिकल फाउंडेशनच्या वतीने या कोरोना पूर्व चाचणीचे विनामूल्य आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे, खजिनदार सुनील जगताप, विनोद सातव, मेट्रो मेडिकल फाऊंडेशनचे डॉ. रणजीत निकम, डॉ. शैलेंद्र माने, डॉ. राजेंद्रसिंह राजपुरोहित, सचिन गुळवे, कॅलिडस मीडिया अकॅडमीचे पंकज इंगोले आदी उपस्थित होते.
बेजबाबदार वागून स्वत:चा, कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नका – उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन
कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे, हा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खोटा ठरवूया-उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 21 :- ‘कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे’, हा जागतिक आरोग्य संघटना प्रमुखांनी दिलेला इशारा खोटा ठरवायचा असेल, तर नागरिकांनी तो गांभीर्यानं घेऊन सावध व्हावं. यापुढचे काही दिवस घराबाहेर न पडता टाळेबंदी नियमांचं पालन करावं. नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये, घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊन स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात, मालेगावसारख्या शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यानं चिंता वाढली आहे. मुंबईत कालच्या एका दिवसात साडेचारशेहून अधिक रुग्ण वाढले. राज्यातील रुग्णांची संख्या साडेचार हजारांवर गेली आहे. 24 मार्चच्या आधीपासून टाळेबंदी जाहीर करुनही झालेली वाढ गंभीर आहे. मुंबईतील 53 पत्रकार बांधवांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे, यातून कोरोनानं हातपाय कुठपर्यंत पसरले आहेत हे लक्षात येतं. तरीही शहरात रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये नागरिक विनाकारण गर्दी करत आहेत. यातून ते स्वत:च्या, कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत, हे थांबलं पाहिजे. घरातली व्यक्ती घराबाहेर जाणार नाही ही जबाबदारी आता कुटुंबातील महिलांनी, मुलांनी घेतली पाहिजे. घराबाहेर जाण्यापासून सर्वांना रोखलं पाहिजे, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आपले डॉक्टर, आपले पोलिस, या सर्वांनी आपल्याला घराबाहेर न पडण्याचं, घरातच थांबण्याचं, गर्दी न करण्याचं, सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या आवाहनानुसार आम्हीदेखील सामाजिक अंतराचं भान राखून, सुरक्षितता बाळगून कर्तव्ये पार पाडत आहोत. किमान अधिकारी व सहकाऱ्यांना सोबत घेऊन, बैठका घेऊन विषय मार्गी लावत आहोत. केंद्र व राज्य सरकार, सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील प्रत्येक जण जोखीम पत्करुन आज कर्तव्य पार पाडत आहेत. नागरिकांनी घरातच थांबून साथ द्यावी, ही त्यांची अपेक्षा आहे. नागरिकांनी दाखवलेला संयम, सहकार्यामुळेच राज्यातील काही जिल्हे आजही कोरोनामुक्त आहेत. नांदेड, सांगलीसारखे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्यापासून बोध घेऊन आपला जिल्हाही कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करुया. आपण सर्वांनी पुढचे काही दिवस घरातच थांबण्याचा निर्धार केल्यास कोरोनाच्या लढाईत विजय नक्की आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यात, मालेगावसारख्या शहरात पुढचे काही दिवस टाळेबंदी नियमांचं मनापासून, स्वयंशिस्तीने काटेकोर पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत जात-पात, भाषा-प्रांत, धर्म-पंथ विसरुन एकजूट होऊन साथ देण्याची गरज आहे. कोरोनाचा लढा हा मानवतेच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे. तो संपेपर्यंत कुठल्याही प्रकारचा वाद-विवाद-विसंवाद टाळला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले चौकीपाडा येथे झालेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी, निषेधार्ह असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरु झाली असून शंभरहून अधिक आरोपींना अटक केली आहे. सर्व दोषींना कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा नक्की होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ६० हजार गुन्हे दाखल
१३ हजार व्यक्तींना अटक; ४१ हजार वाहने जप्त
मुंबई, दि. २१ : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २० एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ६० हजार ५ गुन्हे दाखल झाले आहेत तर १३ हजार ३८१ व्यक्तींना अटक करण्यात आली असून ४१ हजार ७६८ वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबर वर ७५ हजार ११५ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ५८९ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १०६२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.
या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी २कोटी ३० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलिसांवर हल्ला
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस कर्मचारी अधिकारी दिवस-रात्र कार्यरत आहेत. मात्र दुर्दैवाने या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १२१ घटनांची नोंद झाली असून यात ४११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गरजू रुग्णांसाठी’मोबाईल डीस्पेन्सरी’ची पेठांमध्ये वैद्यकीय सेवा
ज्योती लॅब्जतर्फे मार्गो हँड सॅनिटायझर लाँच
ब्रँडतर्फे शिखात सहज मावणारी 40 मिलीची एसकेयू बाटली केवळी 20 रुपयांना
मुंबई – भारतातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या ज्योती लॅब्ज लिमिटेड (जेएलएल) कंपनीने आज मार्गो या ब्रँड नावाअंतर्गत हँड सॅनिटायझर लाँच केला आहे. कंपनीने नुकताच याच ब्रँडअंतर्गत हँड वॉश क्षेत्रात प्रवेश केला होता.
सध्या सुरू असलेल्या साथीच्या वातावरणात साबण आणि पाणी उपलब्ध नसल्यास हँड सॅनिटायझर अतिशय महत्त्वाचे झाले आहे, कारण त्यामुळे सर्वाधिक सुरक्षा मिळते. मार्गो हँड सॅनिटायझर अल्कोहोल बेस्ड असून त्यात कडुनिंबाचा अर्क मिसळण्यात आला आहे, जो 99.99 टक्के जंतूंचा नाश करतो. हे सॅनिटायझर 40 मिलीच्या एसकेयू बाटलीत उपलब्ध करण्यात आले असून त्याची किंमत 20 रुपये आहे. खिशात सहज मावणाऱ्या या बाटलीला फ्लिप ओपन कॅप असल्यामुळे तो जवळ बाळगणे आणखी सोपे आहे.
या लाँचविषयी ज्योती लॅब्ज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती ज्योती एमआर म्हणाल्या, ‘सध्या देशासमोर असलेल्या संकटामुळे आमच्या क्षेत्राला नवी उत्पादने तयार करण्याची प्रेरणा मिळाली असून त्यामुळे आरोग्य व स्वच्छता क्षेत्रातील वाढती मागणी पूर्ण करणे शक्य होईल. हे उत्पादन परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करणे ही आमच्यासाठी समाजाची सेवा करण्याची ही सर्वात अनोखी संधी आहे. आम्ही अतिशय कमी कालावधीत मार्गो हँड सॅनिटायझर तयार केले असून त्याद्वारे कोव्हिड- 19 विरोधातल्या लढ्यासाठी अर्थपूर्ण योगदान देणे शक्य झाले आहे.’
कोव्हिड- 19 विरोधात लढताना स्वच्छता राखण्यासाठी साबण व पाणी उपलब्ध नसल्यास हँड सॅनिटायझरचा सातत्याने वापर करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. मार्गो हँड सॅनिटायझर लाँच करून कंपनीने सध्याच्या कठीण परिस्थितीत समाजाला मदत करण्यासाठी योगदान देण्याचे ध्येय ठेवले आहे.
मार्गो हँड सॅनिटायझर हे मार्गोच्या इतर उत्पादन श्रेणीतील सर्वात अद्यावत उत्पादन असून या श्रेणीमध्ये मार्गो ओरिजनल नीमचा समावेश आहे, ज्यात असलेला 1000 कडुनिंबाच्या पानांचा अर्क आणि आर्द्रतेसाठीच्या ई जीवनसत्वावर गेल्या 100 वर्षांपासून विश्वास ठेवला जात आहे. त्याशिवाय मार्गो ग्लिसरीन या अनोख्या त्वचा क्लीन्झरमध्ये कडुनिंबाची 1000 पाने व शुद्ध ग्लिसरीनचा मेळ घालण्यात आला आहे. मार्गो फेस वॉश हा भारतातील पहिला कडुनिंबाच्या पेस्टपासून बनवलेला फेसवॉश असून त्यासाठी हाताने खुडलेली व बारीक केलेली कडुनिंबाची पाने वापरण्यात आली आहेत. हा फेसवॉश त्वचेच्या नैसर्गिक आर्द्रतेचा समतोल राखतो. या श्रेणीमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या मार्गो हँडवॉशचा समावेश झाला असून या नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल हँडवॉशमध्ये 99.99 जंतूंचा नाश करणाऱ्या 1000 कडुनिंबाच्या पानांचा वापर करण्यात आला आहे.
ज्योथी लॅबोरेटरीजबद्दल
श्री. एमपी रामचंद्रन यांनी १९८३ मध्ये ज्योथी लॅबोरेटरीज लि. या ही वेगाने विकसित होणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तूच्या कंपनीची स्थापना केली होती. इतक्या वर्षांत कंपनीने एका ब्रँडच्या प्रोप्रायटरी कंपनीचे मल्टी ब्रँड, बीएसई आणि एनएसई नोंदणीकृत कंपनीमध्ये रुपांतर केले आहे. या कार्यकाळात कंपनी फॅब्रिक केयर, मस्किटो रिपेलंट, सरफेस क्लिनिंग, वैयक्तिक सेवा आणि सुगंधी अगरबत्ती क्षेत्रातील उत्पादन आणि विपणन क्षेत्रांत कार्यरत आहे.
कंपनीचे दहा ब्रँड कार्यरत असून त्यात उजाला, मॅक्सो, एक्सो, प्रिल, मार्गो, नीम, चेक आणि श्री. व्हाइट यांचा समावेश असून हे सर्व ब्रँड्स त्यांच्या विभागात सुप्रसिद्ध आणि प्रस्थापित आहेत.
कंपनी संघटित लाँड्री क्षेत्रातील सेवा विभागातही कार्यरत असून ती ज्योथी फॅब्रिकेयर सर्व्हिसेस लिमिटेड या आपल्या उपकंपनीद्वारे ‘जागतिक दर्जाची लाँड्री सेवा, परवडणाऱ्या दरांत आणि घरपोच’ उपलब्ध करून देते.
