Home Blog Page 2616

स्तनपान विशेषत: सांसर्गिक रोगांविरुध्द परिणामकारक

0

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणा सर्वच स्तरावर प्रत्येक नागरिकाची काळजी घेत आहे. यातील एक घटक म्हणजे स्तनदा माता आणि नवजात शिशू..या काळात यांची काळजी कशी घ्यायची, नवजात शिशू आणि बालकाचा आहार काय असावा याविषयी सार्वजनिक आरोग्य विभागानेही काही मार्गदर्शक सूचना प्रसिध्द केल्या आहेत. काय आहेत या सूचना पाहू या..  या लेखाद्वारे…

जन्मापासून पहिल्या तासात बाळाला स्तनपानास सुरुवात करावी तसेच सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध द्यावे. स्तनपान केल्यामुळे नवजात शिशूचे इतर संभावित आजारापासून संरक्षण होते.  स्तनपान हे नवजात शिशूंना त्यांच्या संपूर्ण शिशूवस्थेतील आजारापासून संरक्षण देते. स्तनपान विशेषत: सांसर्गिक रोगांविरुध्द परिणामकारक आहे. कारण स्तनपानामुळे बाळाला मातेकडून जीवनावश्यक प्रतिद्रव्य (अँटीबॉडीज) मिळतात व त्यांची रोगप्रतिकारक क्षमता बळकट होते.

संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती सतर्कता बाळगून स्तनपान सुरु ठेवा.

स्तनपान करणाऱ्या मातेला ताप, खोकला अथवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर..

•  तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत.

• खोकताना आणि शिंकताना तोंड आणि नाक रुमालाने झाकावे.

•  आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

• स्तनपान किंवा इतर कारणांसाठी बाळाला स्पर्श करण्यापूर्वी आणि नंतर साबण आणि पाण्याने हात ४० सेंकदापर्यंत धुवावेत.

• बाळ जवळ असताना मास्कचा वापर करावा.

• मातेचा स्पर्श झालेली कोणतीही गोष्ट अथवा जागा ही नियमितपणे साबण आणि पाण्याने किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने निर्जंतूक करावी.

जर माता आजारपणामुळे स्तनपान करु शकत नसेल तर एका स्वच्छ भांड्यात दूध काढावे. नंतर स्वच्छ कपात दूध घेऊन चमच्याने ते बाळाला पाजावे.

दूध काढण्यापूर्वी –

• साबण आणि पाण्याने हात ४० सेंकदांपर्यंत धुवावेत.

• दूधासाठीचा कप किंवा भांडे साबण आणि पाण्याने योग्य पद्धतीने धुवावेत.

काढलेले दूध पाजताना-

• मास्क घालावा.

• काढलेले दूध योग्य पद्धतीने स्वच्छ केलेल्या कप आणि चमच्याने पाजावे.

जर माता अतिआजारपणामुळे स्तनपान करु शकत नसेल आणि दूध पिळून काढणे शक्य नसेल तर पुढील पर्यायांचा विचार करावा-

• स्तनपानाची पुन्हा सुरुवात (बंद केलेले स्तनपान काही काळाने पुन्हा सुरु करणे).

• दुसऱ्या मातेचे स्तनपान (दुसऱ्या मातेने स्तनपान करणे किंवा सुश्रूषा करणे).

जर कुणी अर्भक किंवा लहान बालक कोविड – १९ चा संभाव्य बाधित असेल तर किंवा त्याला/तिला त्याचा संसर्ग झाला असेल तरीही मातेने स्तनपान चालू ठेवावे.

बाळाची जलद गतीने वाढ आणि मेंदूचा विकास व्हावा यासाठी, सहा महिन्यानंतर त्यांची काळजी घेणाऱ्यांनी :

• स्तनपान चालू ठेवून पूरक आहाराची सुरुवात करावी.

• आहारातील विविधतेसाठी डाळ, दूध आणि दूग्धजन्य पदार्थ, पिवळ्या, नारंगी आणि हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करावा.

• जर ताजी फळे उपलब्ध होत नसतील तर इतर आरोग्यदायी मार्ग शोधा, परंतु प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळा,कारण त्यात संतृप्त तेल, जास्तीची साखर, मिठाचा वापर केलेला असतो.

• गोड पेय टाळावे.

• स्वयंपाकापूर्वी, स्तनपानापूर्वी आणि जेवणापूर्वी साबण व पाण्याने हात धुवावेत.

• जेवण बनविण्याची जागा साबण व पाण्याने स्वच्छ धुवावी.

• बाळाला भरविण्यापूर्वी बाळाचे हात साबण व पाण्याने धुवावेत.

• बाळाला भरविण्यासाठी स्वतंत्र, वेगळ्या थाळीचा उपयोग करावा.

• बाळाला भरविण्यासाठी योग्य पद्धतीने स्वच्छ केलेली वाटी व चमचा यांचा वापर करावा.

• आजारी बालकास अधिकाधिक पोषक आहार आणि पेय द्यावे.

पूरक आहाराची उशिराने सुरुवात केल्याने बाळाच्या शारीरिक आणि मेंदूच्या विकासावर विपरित परिणाम होतो आणि कुपोषणाची सुरुवात होण्याची जोखीम वाढते.

माता किंवा बालक कोविड-19 संभाव्य बाधित अथवा संसर्ग झालेली व्यक्ती असेल किंवा नसेल तरीही आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांनी खालील बाबींची खात्री करावी –

• लहान बालकांना आहार देण्याच्या मार्गदर्शक आहार-संहितेनुसारच आहार देण्यात यावा आणि स्वच्छतेच्या बाबतीत योग्य ती खबरदारी घ्यावी.

• स्तनपानाबाबत समुपदेशन, मूलभूत मानसिक आधार आणि गरोदर स्त्रिया, स्तनदा मातांना प्रत्यक्ष लहान बालकांना आहार भरविण्यासाठी आधार द्यावा.

• बाळाच्या जन्मानंतर माता व नवजात बालक यांनी एकमेकांबरोबर राहिले पाहिजे, एकमेकांचा सहवास वाढविला पाहिजे.

• आईच्या दूधाला पर्यायी पेय, दूधाची बाटली, कृत्रिम स्तनाग्रे, चोखणी यास संस्था किंवा कर्मचाऱ्यांकडून प्रोत्साहन दिले जाऊ नये.

अशा प्रकारे कोविड-१९ दरम्यान नवजात शिशू व बालक यांच्या आहाराबद्दल जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ, वर्ल्ड बँक, पिरामल फाऊंडेशन, अलाईव अँड थ्राईव आणि न्यूट्रिशन इंटरनॅशनल या सर्वांनी मिळून ही माहिती तयार केली आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटना (WHO) ईएमआरओ, २३ मार्च २०२० कोविड-१९ च्या संसर्गा दरम्यान स्तनपान चालू ठेवण्याचा सल्ला याबाबतही संदर्भ घेण्यात आला आहे.

या लेखात दिलेल्या माहितीचा उपयोग निश्चितच स्तनदा मातांना निश्चित होईल आणि नवजात शिशू व बालके आईच्या पौष्टिक दूधापासून मुकणार नाहीत, असा विश्वास वाटतो…!

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग

लॉकडाऊनबाबत ३ मे नंतर योग्य निर्णय घेणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

राष्ट्र कर्तव्य आणि संयमाबद्दल सर्वधर्मियांचे कौतुक

मुंबई, दि. २६ : ३ मे नंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. उद्या (सोमवारी) पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्वधर्मियांनी देशाप्रती कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळला तसाच तो पुढे देखील पाळला तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चित जिंकूत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

ते आज दुपारी लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला अक्षयतृतीयेच्या, मुस्लिम बांधवांना रमझानच्या शुभेच्छा दिल्या. महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने त्यांनी अभिवादनही केले.

कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात २० एप्रिल -नंतर शासनाने काही व्यवहार सुरु करण्याला अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. राज्यात शेतीची कामे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच आहे. कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. फळवाहतूक सुरु आहे. फळे घरपोच देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या  सीमा बंद आहेत, त्या उघडणार नाहीत पण  काही जिल्ह्यांमधील परिस्थितीचा अभ्यास करून तिथे ३ मे नंतर काही मोकळीक देता येईल का याचा निर्णय नंतर घेण्यात येईल.

घरातच प्रार्थना करण्याचे आवाहन

राज्यात सर्व धर्मियांनी देशकर्तव्य आणि  माणुसकीच्या भावनेला प्राधान्य दिले असून  सगळे सण घरीच साधेपणाने साजरे केले आहेत, याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो असे  सांगतांना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना रमझानच्या काळात रस्त्यावर, मशिदीत एकत्र प्रार्थना (नमाज) न करता ती घरातल्या घरात करण्याचे आवाहन केले.

आजच्या परिस्थितीत संयम हीच आपली शक्ती आहे तर आपल्या स्वास्थ्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार पोलीस हेच आपले देव आहेत, त्यांचा आदर ठेवणे हीच आपल्यासाठी देवभक्ती असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

नितीन गडकरी यांना धन्यवाद

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणतेही राजकारण न करता महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणयाचे आवाहन केले होते त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्री.गडकरी यांना धन्यवाद दिले. इतर राज्यातील कामगार-मजूर  महाराष्ट्रात  अडकले आहेत, लॉकडाऊनमुळे ट्रेन सुरु होणार नसल्या तरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानंतर आणि मान्यतेनंतर त्यांना त्यांच्या घरी सुखरुप पाठविण्याची व्यवस्था केली जाईल याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला.

मदतीच्या हातांचे आभार

मुख्यमंत्र्यानी टाटा, रिलायन्स, विप्रो, महेंद्र ॲण्ड महेंद्र, बिर्ला या आणि यासारख्या मोठ्या उद्योजकांनी आपली प्रतिष्ठा बाजूला ठेऊन राज्याला खूप मदत केल्याचा आवर्जुन उल्लेख केला व त्या सर्वांना धन्यवाद दिले. राज्यातील काही विद्यार्थी  राजस्थान येथे कोट्यात अडकले आहेत त्यांनाही आणण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

केंद्राचे पथक आठवडाभरापासून राज्यात असून त्यांना त्रयस्थपणे निरिक्षण करण्याचे तसेच उणिवा असल्यास त्या सांगण्याचे आवाहन आपण केले आहे, त्यांच्या सुचनांचे पालन करण्याच्या सुचनाही आपण प्रशासनाला दिल्या आहेत असे श्री.ठाकरे म्हणाले.

मुंबई – पुण्यातील वर्दळ परवडणारी नाही

मुंबई आणि पुण्यात लोकांची वर्दळ परवडणारी नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले. विषाणू घातक असून आपण गाफील राहून चालणार नाही असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी ८० टक्के लोकांमध्ये विषाणूची लक्षणे दिसून येत नसल्याचे स्पष्ट केले. एकमेकांपासून दूर राहणे गरजेचे आहे -समाजातील अंतर वाढवणे नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. २० टक्के लोकांमध्ये हायरिस्क रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

लॉकडाऊनमुळे विषाणूचा गुणाकार रोखण्यात यश

परिस्थिती कधी बदलणार, लॉकडाऊन कधी संपणार अशी विचारणा होत आहे पण लॉकडाऊनमुळेच आपण विषाणूच्या गुणाकाराचा वेग रोखण्यात यशस्वी झालो आहोत, रुग्णांची वाढ आपण नियंत्रणात ठेवली आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की यासंदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, जगभरातील घटना घडामोडींवर लक्ष, संशोधनावर आपण लक्ष ठेऊन आहोत, यासंदर्भातील एका सुद्धा विषयाकडे आपले दुर्लक्ष नाही. जगभरात आपल्या देशाचे कौतुक होत आहे, आपल्या देशाने धैर्य, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संकटाचा सामना केला आहे. सर्वांची खबरदारी, संयम अतुलनीय असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले

मृत पोलिसांच्या कुटुंबाना सर्व मदत

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी तसेच उपचारांची पराकाष्ठा करण्यात येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एखादी घटना घडली तर पोलीस काय करतात असा सवाल केला जातो. परंतू आज हेच पोलीस दिवसरात्र सेवा देत आहेत, दुर्देवाने दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, शासन पोलिसांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिलच, त्यांना सर्व मदतही देईल पण कोणावरही पटकन शंका घेऊ नका कारण पोलीस असतील, डॉक्टर, नर्सेस  असतील आरोग्य कर्मचारी असतील हे सर्वजण आपल्या स्वास्थ्यासाठी अत्यंत तणावाखाली काम करत आहेत.

आरोग्य सुविधांमध्ये वाढ

राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आल्याच्या, रुग्णांच्या अलगीकरण आणि विलगीकरणासाठी मोठ्याप्रमाणात व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हॉटस्पॉटची तसेच कंटेनमेंट झोन्सची संख्या कमी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय पथकाने वरळी कोळी वाड्याच्या कोरोना मुक्तीच्या प्रवासाचे कौतुक केल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख ८ हजार ९७२ चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी १ लाख १  हजार १६२ लोकांचे कोरोना नमुने निगेटिव्ह आले. ३२३ जणांचा दुर्देवाने मृत्यू झाला.   राज्यात प्लाझ्मा थेरपीला परवानगी मिळाल्याचे ते म्हणाले . राज्यात दररोज एक लाखाहून अधिक शिवभोजन थाळीच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. साडे पाच ते सहा लाख स्थलांतरीत मजूर आणि कामगारांची व्यवस्था निवारा केंद्राच्या माध्यमातून केली गेली आहे त्यांना एक वेळेसचा नाश्ता आणि दोन वेळचे जेवण आपण देत आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोना झाला म्हणजे गेला असं अजिबात नाही

कोरोना झाला म्हणजे गेला असे अजिबात नाही. ६ महिन्याच्या बाळापासून ८० वर्षांच्या लोकांपर्यंत रुग्ण कोरोना मुक्त होत आहेत.  त्यामुळे लक्षणे दिसल्याबरोबर घरीच उपचार न करता फिव्हर रुग्णालयात दाखल व्हा, अंगावर दुखणे काढू नका अशी कळकळीची विनंती ही मुख्यमंत्र्यांनी केली. नॉन कोविड रुग्णांसाठी खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु करावेत, शासन त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

चिमणपाखरू येती घरा…( लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

0

उठा उठा चिऊताई

सारीकडे उजाडले

डोळे तरी मिटलेले

अजूनही, अजूनही…

कुसुमाग्रजांच्या कवितेतील ह्या ओळी आजकाल रोज सकाळी प्रत्यक्षात अनुभवायला येताहेत. उजाडायची खोटी की चिऊताई चिवचिवाट करत ग्यालरीतल्या ग्रिलवर येऊन बसते. खूप वर्षांनी हे दृश्य नजरेस पडत आहे. माझ्या ओळखीतल्या श्रद्धा शिंदेनी सांगितले की, आता चिमण्या केवळ अंगणातच नाही तर खिडकीतून घरातही येऊ लागल्या आहेत. गंमत म्हणून लगबगीने चिमण्यांचा एक फोटोही त्यांनी पाठवून दिला. तसेच वाशीचा प्रेमानंद बिराजदार चिऊताईसाठी घरटे बनवून ती कधी राहायला येतेय याची प्रतीक्षा करतोय.

 लॉकडाऊनमुळे माणसं घरात बसली आहेत आणि निसर्गाचं अधिराज्य सुरू झालं आहे. पक्ष्यांचा किलबिलाट तर नित्य ऐकू येतोच आहे पण आपल्या सगळ्यांचीच बालपणाची एक खूण म्हणजे चिऊताईंचं दर्शन रोज घडत आहे. इतके दिवस कुठे लपून बसली होती देव जाणे!

मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या ‘चिऊताई चिऊताई, चिऊताई दार उघड’ या कवितेत चिऊला आर्जव केलंय-

वारा आत यायलाच हवा,

मोकळा श्वास घ्यायलाच हवा !

दार उघड, दार उघड,

चिऊताई, चिऊताई दार उघड !

खरंच, लपून बसलेली चिऊताई आता घरट्याचं दार उघडून बाहेर आली आहे आणि रोज तिचा चिवचिवाट मनात रुंजी घालतोय. जणू काही, आपल्या बालपणीच्या चिऊ-काऊच्या आठवणी सांगत ती आपल्याशी बोलतेय, असाच भास होतोय. आताच्या पिढीला काऊ-चिऊच्या गोष्टीची आठवण करून देते- एक असतो काऊ. एक असते चिऊ. काऊचं घर असतं शेणाचं. चिऊचं घर असतं मेणाचं. एकदा किनई खूप मोठा पाऊस येतो आणि मग…चिऊ-काऊची गोष्ट लहानपणी ऐकली नाही असा एकही बाळ सापडायचा नाही. चिमणी…माणसाच्या अगदी हातभर अंतरावर बागडणारा हा पक्षी भारत तसेच पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंकेसह इतर अनेक देशांतही आढळतो. चिमण्यांचे आयुष्य साधारणतः सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते. चिमण्या सहसा ताशी 24 मैलांच्या वेगाने उड्डाण करतात. आवश्यक असल्यास (धोक्याच्या बाबतीत) त्या ताशी 31 मैलापर्यंत वेग वाढवून उडू शकतात. इवल्याशा या पक्ष्याबद्दलची ही माहिती थक्क करणारी आहे.

गवत, कापूस, पिसे अशा मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, अडगळीची जागा,  झाडांवर असे कुठेही घरटे बांधणारा हा पक्षी कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न असे सर्व प्रकारचे खाद्य खातो. पूर्वी घरात चिमण्या असल्या की पाली, कातिणींचे जाळे, किडे, किटक, अळ्या फारसे दिसायचे नाही. ही घाण चिऊताईच स्वच्छ करायची. जुन्या चाळी, घरं जाऊन चकचकीत ब्लॉक्स आले आणि त्यासोबत ग्रीलच्या विंडोही. अहो, चिऊताईला आपणच आपल्या घराची दारं बंद करून टाकली.

पूर्वी लहानग्यांना घरातील मोठी माणसं जेवण भरवताना चिऊ-काऊचा घास भरवायचे. आता चिऊ-काऊ जाऊन त्यांची जागा कार्टूनमधल्या शिनचॅन, डोरेमॉनने घेतली आहे; काही घरांत ‘मी तुला हवं तर मोबाईलवर देते खेळायला, ते खेळत खेळत जेव हं’ असेही सांगितले जाते. सगळी परिस्थितीच आमूलाग्र बदलून गेली. पूर्वी घरांना मोठ्या नसल्या तरी दोन दारं असलेल्या मोकळ्याढाकळ्या खिडक्या असायच्या. स्वयंपाक झाला की आई किंवा आजी खिडकीजवळ पोळीचा तुकडा, भात आठवणीने ठेवायच्या. काऊ-चिऊ नेमके येऊन बसायचे ते खायला. मग त्यांच्यासोबत लहान मुलांचेही जेवण व्हायचे. आता ब्लॉकच्या खिडक्या…खरं तर विंडो असतातच मुळी ग्रिल किंवा जाळीने बंदिस्त. त्यात कुठे ठेवणार पोळीचा तुकडा नी भात. नकळत आपणच काऊ-चिऊला आपल्यापासून दूर केलं आणि त्यांचं अस्तित्व हळूहळू कमी होऊ लागलं.

चिऊताईला हवी तशी इकोफ्रेंडली घरे नाहीत आणि पोषक वातावरणही नाही. पूर्वी सर्वत्र आढळणारी ही चिऊताई सध्या दुर्मिळ पक्षी बनली आहे. त्यांच्या पक्षीसंख्येला धोका निर्माण झाला आहे. चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. २० मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून पाळला जातो. हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो.

चिऊ हळूहळू दिसेनाशीच झाल्यावर चिमण्यांसाठी दाणे असलेले दाणेपात्र, पाणीपात्र इत्यादी आवर्जून गॅलरी, घरातील एखादे मोठे झाड, गच्चीवर ठेवली जाऊ लागली…परंतु, रागावलेली  चिऊताई एवढ्या सहजपणे या पात्रांकडेच नव्हे तर पाणी पिण्यासाठीही येईनाशी झाली.

त्यांच्यासाठी कृत्रिम घरटी काहींनी विकत घेतली असून अशी घरटी विकणारेही रस्त्यांवर उभे दिसताहेत. मात्र चिऊ ही ऐतखाऊ नाही. तिला स्वत:च्या परिश्रमाने काड्या, धांड्यांपासून विणलेले हक्काचे घरटे हवे, असे प्रांजळ मत पक्षीप्रेमींनी व्यक्त केले आहे.

आता बघा, लॉकडाऊनमुळे समस्त मानवजात घरात बंदिस्त झाल्यावर कुठे तरी दडून बसलेली चिऊताई मात्र बाहेर पडली आहे. पूर्वी सारखाच मुक्त संचार आणि चिवचिवाट आसमंतात घुमतो आहे, निनादतो आहे. ती बघ चिऊ…चिऊ आली…चिऊ आली…लहान मुलांना चिऊ बघण्याचं भाग्य लाभत आहे. चिऊ-काऊची गोष्ट पुन्हा नव्याने सांगितली जातेय. दारात येणाऱ्या चिमण्या चिवचिवाटाने आपल्याशी पुन्हा सवांद साधताहेत.

गीतकार शंकर रामाणी यांनी त्याच्या गीतात वर्णन केल्याप्रमाणे-

माझिया दारात चिमण्या आल्या

अबोल काहीसे बोलून गेल्या…

© पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

उद्योगाच्या अडचणी सोडविण्यासाठी निश्चित पाठपुरावा केला जाईल- पालकमंत्री डॉ. नितीन राऊत.

0

नागपूर, दि. 25 :   लॉकडाऊनमुळे उद्योग व  व्यापार क्षेत्राला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या लढाईत सर्वांचे योगदान महत्त्वाचे शासनाने उद्योग व व्यापार सुरू करण्यास काही प्रतिबंधात्मक उपायानंतर परवानगी दिली आहे. उद्योगाच्या अडचणी सोडविण्यासाठी  निश्चित पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. नितीन राऊन यांनी दिली.

चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडच्या सदस्यांशी  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, उद्योग सहसंचालक अशोक धर्माधिकारी, सीएएमआयटी अध्यक्ष दिपेन अग्रवाल, महासचिव निकुंज तुराखिया व राज्याच्या विविध जिल्ह्यातून सीएएमआयटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

वीजेचे दर, कामगारांचे पगार, उद्योगाला सवलत, छोट्या व्यापाऱ्यांना पॅकेज, खेळते भांडवल, बँकेचे हप्ते व विमा संरक्षण हे आजच्या चर्चेतील महत्त्वाचे प्रश्न असून यातील 20 टक्के राज्य शासन तर 80 टक्के प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारितील आहेत. आपल्या अनेक मागण्यासंदर्भात राज्य शासन गंभीर असून या मागण्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, उद्योगमंत्री व पणनमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. लॉकडाऊन नंतरच्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी व धोरण ठरवण्यासाठी सरकारने समिती बनविली आहे. या बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने आपल्या सूचनांचा यात समावेश करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असे ते म्हणाले.

बँकांचे हप्ते, एनपीए, जीएसटी आदी धोरणाबाबत केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा असे सांगून राऊत म्हणाले की, आपल्या भावना केंद्र सरकारपर्यत पोहोचविल्या जातील. 15 एप्रिल रोजी जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार उद्योग सुरू करण्यात यावेत. कामगारांचे समुपदेशन करून विश्वास संपादन करावा असे ते म्हणाले. कामगारांच्या सुरक्षेबाबत खबरदारी घेण्यात यावी. रेड झोन बाहेर उद्योग व्यापाऱ्यांला अधिकच्या सवलती देण्यावर शासन विचार करेल, असे ते म्हणाले. उद्योग व्यापार सुरू केल्यास आर्थिक परिस्थिती पूर्व पदावर येण्यास हातभार लागणार आहे. महत्त्वाचे उद्योग लवकर सुरू व्हावेत अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. या चर्चेत त्यांनी उद्योग, व्यापार व लघु उद्योजकांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

देशभरात न लॉकडाऊन असल्यामुळे उद्योग व्यापार पूर्णपणे बंद आहेत. अशा परिस्थितीत उद्योग, व्यापारी, कामगार व मजूर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा कठिण प्रसंगी शासनाने उद्योगासोबत संवादाची व सहकाऱ्याची भूमिका घेतली आहे. अनेक दिवसांपासून उद्योग ठप्प असल्यामुळे खेळते भांडवल कसे उभारावे व बँकेचा हप्ता कसा भरावा या  मोठ्या समस्या उद्योगांसमोर आहेत. अशा वेळी शासनाने उद्योगांना सवलती देणे अपेक्षित आहे. पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश कारावा. कामगारांना येजा करण्यासाठी पासेस द्यावेत, वीज दरात सवलत द्यावी अशा सूचना सीएएमआयटी सदस्यांनी केल्या.

राज्यात आज ८११ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण संख्या ७६२८ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0

मुंबई, दि. २५ : आज राज्यात कोरोनाबाधीत ८११ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ७६२८ झाली आहे. आज ११९ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १०७६ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६२२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८ हजार ९७२ नमुन्यांपैकी १ लाख १ हजार १६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ७६२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १लाख २५ हजार ३९३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ८,१२४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात २२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ३२३ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील १३, पुणे महानगरपालिका येथे ४ तर मालेगाव येथे १, पुणे ग्रामीणमध्ये १, पिंपरी चिंचवडमध्ये १, धुळे येथे १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर ६ महिला आहेत. आज झालेल्या २२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ११ रुग्ण आहेत तर ८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ रुग्ण ४० वर्षांखालील आहे. या २२ मृत्यूंपैकी १३ रुग्णांमध्ये (५९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ५०४९ (१९१)

ठाणे: ७१७ (१५)

पालघर: १३९ (४)

रायगड: ५६ (१)

मुंबई मंडळ एकूण: ५९६१ (२११)

नाशिक: १३१ (१२)

अहमदनगर: ३५ (२)

धुळे: २५ (३)

जळगाव: १३ (२)

नंदूरबार: ११ (१)

नाशिक मंडळ एकूण: २१५ (२०)

पुणे: १०३० (७३)

सोलापूर: ४६ (४)

सातारा: २९ (२)

पुणे मंडळ एकूण: ११०५ (७९)

कोल्हापूर: १०

सांगली: २६ (१)

सिंधुदुर्ग: १

रत्नागिरी: ८ (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४५ (२)

औरंगाबाद: ५० (५)

जालना: २

हिंगोली: ७

परभणी: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ६१ (५)

लातूर: ९

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: १

लातूर मंडळ एकूण: १४

अकोला: २३ (१)

अमरावती: १९ (१)

यवतमाळ: २८

बुलढाणा: २१ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: ९२ (३)

नागपूर: १०७ (१)

वर्धा: ०

भंडारा: ०

गोंदिया: १

चंद्रपूर: २

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: ११० (१)

इतर राज्ये: २५ (२)

एकूण: ७६२८  (३२३)

(टीप – या तक्त्यातील रुग्ण संख्या  रुग्णाने दिलेल्या पत्यानुसार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आय सी एम आर संकेतस्थळावरील माहिती जिल्हावार उपलब्ध असल्याने ती जिल्हावार सादर करण्यात आलेली आहे.)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ५५५ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ८१९४ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ३१.४३ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

 

स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचे वितरण सुरु ; तक्रार प्राप्त होताच दुकानांची तपासणी करणार- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे दि.25: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत पुणे जिल्हयातील 13 तालुक्यात अन्नधान्य पुरवठा करण्यात येत आहे.  पुणे जिल्हा (ग्रामीण)  मधील 1815 स्वस्त धान्य दुकानांमधून अन्न्‍धान्याचे वितरण सुरळीतपणे सुरु असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

एप्रिल महिन्याचे अन्नधान्य एकूण 5 लाख 48 हजार 418 कार्डधारकांपैकी दिनांक 25 एप्रिल 2020 अखेर एकूण 5 लाख 45 हजार 263 कार्डधारकांना वाटप पूर्ण केलेले आहे.  वाटपाची टक्केवारी 99.42 टक्के आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रति महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला 5  किलो अतिरिक्त तांदूळ प्रत्येक पात्र रेशनकार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर दि. 10 एप्रिल 2020 पासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. प्रधानमंत्री गरिबकल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदूळाची एफसीआय मधून 13 हजार 377 मे.टन संपूर्ण तांदूळाची प्रत्यक्षात उचल करण्यात आलेली आहे व 24 एप्रिल 2020 अखेर 5 लाख 10 हजार 287 कार्डधारकांना 12,188.366 मे.टन धान्य प्रत्यक्षात वाटप केलेले आहे. वाटपाची टक्केवारी 93.04 टक्के इतकी आहे.

अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश नसलेल्या 2 लाख 88 हजार 292 केशरी कार्डधारकांच्या 13 लाख 76 हजार 497 लाभार्थी संख्येस एकूण 6883 मे.टन धान्याचे दिनांक 16 एप्रिल 2020 रोजी अन्नधान्य मंजूर करण्यात आले आहे त्यापैकी 4341 मे.टन धान्य उचल करण्यात आले असून उर्वरीत धान्याची उचल 25 एप्रिल 2020 पर्यंत करण्यात येवून दि. 26 एप्रिल 2020 पासून माहे 5 मे 2020 या कालावधीमध्ये ए.पी.एल. केशरी शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरीत करण्यात येणार आहे. सदरचे धान्य पावतीव्दारे रजिस्टरवर नोंद करुन वाटप करण्यात येईल. त्यासाठी शिधापत्रिका धारकाचा मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक देणे आवश्यक आहे. ज्यांच्या केशरी शिधापत्रिका नाहीत त्यांना अन्नधान्य या योजनेतून देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ए.पी.एल.केशरी शिधापत्रिका एका ठराविक रास्तभाव दुकानांना जोडलेले असल्याने त्या शिधापत्रिकाधारकांना ज्या स्वस्त धान्य दुकानास जोडलेले आहे त्याच स्वस्त धान्य दुकानातून या योजनेचा लाभ मिळेल. अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थ्यांमधून संगणक प्रणालीव्दारे ज्या लाभार्थ्यांनी अन्नधान्य घेतलेले आहे त्यांना वगळून इतर केशरी शिधापत्रिकाधारक धान्य मिळण्यास पात्र असतील. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होऊ नये यादृष्टीने अन्नधान्य घ्यावयास आलेल्या सदस्याची स्वाक्षरी अथवा डाव्या हाताचा ठसा न घेता त्याऐवजी सदर शिधापत्रिकेतील कुटुंबप्रमुखाचा अथवा अन्य सदस्याचा आधार क्रमांक घेऊन धान्य वितरीत करण्यात येईल.

पुणे ग्रामीणमधील 13 तालुक्यात एकूण 60 शिवभोजन केंद्र दिनांक 25 एप्रिल 2020 अखेर कार्यान्वित आहेत. 7 हजार 150 थाळयांचे उदिदष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी दिनांक 25 एप्रिल 2020 रोजी 5 हजार 667 थाळयांचे वाटप करण्यात आले  असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

पुणे जिल्हा (ग्रामीण) मध्ये जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही टंचाई नाही.  मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर धान्याचा अपहार व अनियमिततेबाबत अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत त्याअनुषंगाने पुणे जिल्हा (ग्रामीण) मधील सर्व तहसीलदारांना तक्रारींच्या अनुषंगाने स्वस्त धान्य दुकानांच्या तपासण्या करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच प्रत्येक दुकानामध्ये प्राथमिक शिक्षकांची नेमणूक करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार स्वस्त धान्य  दुकानांच्या तपासण्या करण्यात आल्या असून एकूण 19 स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 4 परवाने रद्य, 3 परवाने प्रकरणी दंडनीय कारवाई, 11 परवाने निलंबित व धान्याच्या तफावतीची रक्क्म शासनजमा करण्याचे आदेश व 1 परवान्याची 100 टक्के अनामत रक्कम जप्त करुन सक्त ताकीद देण्यात आलेली आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी कळविले .

चोंदलेले नाक साफ करणारा नवा वनौषधीयुक्त फवारा मास्कवर मारला तर जीव घुसमटण्यापासून संरक्षण मिळू शकते

0

नवी दिल्‍ली, 25 एप्रिल 2020

देशभरात सध्या पसरलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी चेहेऱ्यावर मास्क लावावा असा सल्ला आरोग्य अधिकारी अत्यंत गांभीर्याने  देत आहेत. मात्र, त्याच वेळी, दीर्घ कालावधीसाठी मास्क लावल्यामुळे वापरकर्त्यांना श्वास घेण्यास त्रास तसेच श्वसन संस्थेच्या कार्यात अडथळा निर्माण होण्यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लखनौच्या एनबीआरआय अर्थात राष्ट्रीय वनस्पतीशास्त्र संशोधन संस्थेने अनेक वनौषधी द्रव्यांच्या मिश्रणातून चोंदलेले नाक मोकळे करणारा फवारा विकसित केला आहे. आयुष मंत्रालयाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या फवाऱ्याची निर्मिती करण्यात आली आहे.

“दीर्घकाळ मास्क वापरल्याने मास्कच्या आतील बाजूला मोठ्या प्रमाणात कार्बन-डाय-ऑक्साईड तसेच आर्द्रता जमा होते. मास्कधारक व्यक्तीने पुन्हा श्वास घेतल्यानंतर या दोन्ही गोष्टी त्या व्यक्तीच्या फुफ्फुसात प्रवेश करतात. हीच क्रिया वारंवार घडल्याने, काही कालावधीनंतर त्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो आणि नाक चोंदले जाऊन अस्वस्थता वाटते. मात्र, एनबीआरआयच्या संशोधकांनी विकसित केलेल्या वनौषधी फवाऱ्यात चार वनस्पतींचे तैलार्क विशिष्ट प्रमाणात एकत्र केले आहेत. मास्कवर हा फवारा मारल्यानंतर  वायुनलिका स्वच्छ होते आणि यातील तेलांच्या औषधी गुणधर्मामुळे श्वसनमार्गातील श्लेष्मा किंवा कफ नष्ट होतो. श्वसनमार्ग स्वच्छ झाल्यामुळे मास्कधारी व्यक्तीची श्वासोच्छवास प्रक्रिया सुलभ होते. दीर्घकाळ मास्क वापरावा लागल्यामुळे निर्माण होणारा ताण आणि घुसमट देखील या फवाऱ्याच्या वापराने दूर होते.” अशी माहिती सीएसआयआर – एनबीआरआय चे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि हा फवारा विकसित करणाऱ्या संशोधकांच्या गटाचे नेतृत्व करणारे डॉ.शरद श्रीवास्तव यांनी दिली आहे.

एनबीआरआयने या फवाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची योजना आखली आहे. त्यानंतर कोविड-19 शी लढा देण्यासाठी पहिल्या फळीत काम करणाऱ्या सर्वांना हे उत्पादन पुरविता येईल.

[यासंदर्भातील अधिक माहितीसाठी

डॉ.शरद श्रीवास्तव, सीएसआयआर – एनबीआरआय,

लखनौ यांच्याशी खालील ई मेल आय डी वर संपर्क साधावा :

ई मेल आयडी :  sharad@nbri.res.in,sharad_ks2003@yahoo.com]

गंभीर आजारी रुग्णांसाठी ‘रुग्ण सहायता कक्ष’कार्यान्वित!

0

उपचारांसाठी कक्षाशी दूरध्वनीव्दारे संपर्क साधण्याचे आवाहन

बारामती दि. 26: ‘कोराना’चा प्रसार रोखण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून राज्यासह देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. या टाळेबंदीचा परिणाम इतर गंभीर आजारांशी सामना करणाऱ्या रुग्णांवर होवू नये यासाठी ‘रुग्ण सहायता कक्षा’शी संपर्क साधण्याचे अवाहन कक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनाखाली रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ आणि मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या इमारतीत ‘रुग्ण सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या टाळेबंदीच्या कठीण काळात गंभीर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांना या ‘रुग्ण सहायता कक्षा’चा मोठा उपयोग होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

              राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्यामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांच्या गंभीर आजारांवर उपचार केले जातात. मात्र या योजनांची माहिती, तसेच यासाठी कोणाकडे पाठपुरावा करायचा? ही  माहिती तसेच त्यासाठीचा वेळही रुग्णांच्या नातेवाईकांच्याकडे नसतो. त्यामुळे अनेकजण या योजनेपासून वंचित राहू शकतात, ही बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रुग्णांना शासनाच्या योजनांची एकत्रित माहिती मिळावी आणि रुग्णांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेत ‘रुग्ण सहाय्यता कक्ष’ स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर दि. 26 जानेवारी 2020 रोजी जिल्हा परिषदेच्या इमारतीत या कक्षाची स्थापना करुन कामाची सुरुवात करण्यात आली.

कसे चालते रुग्ण साहय्यता कक्षाचे काम…

            एक वैद्यकीय अधिकारी, एक अधिक्षक, एक संगणक चालक, एक पर्यवेक्षक आणि एक अटेंडन्स अशा पाच जणांच्या स्टाफवर या रुग्ण सहायता कक्षाचे काम चालते. रुग्ण सहायता कक्षात रुग्ण अथवा त्यांचे नातेवाईक आल्यानंतर पहिल्यांदा त्यांचे समुदेशन केले जाते. रुग्णाचा आजार, त्याची आर्थिक परिस्थिती समजावून घेतली जाते. पहिल्यांदा रुग्णाला राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ देण्याचा प्रयत्न केला जातो. या योजनेच्या माध्यमातून उपचार करणारे कोणते रुग्णालय त्याला सोईचे आणि जवळचे आहे, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात याची माहिती दिली जाते. या योजनेचा लाभ संबंधित रुग्णाला मिळवून देण्यासाठी रुग्णालयात पाठपुरावा केला जातो.

             त्याच प्रमाणे रुग्णांना ‘आयुष्यमान भारत’ योजनेतून लाभ देण्याचा प्रयत्न केला जातो. काही आजार या योजनेत बसत नसतील अथवा रुग्ण या योजनेचा लाभार्थी होताना काही तांत्रिक अडचणी असतील तर धर्मादाय आयुक्त यांच्याकडून संबंधित रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्याच बरोबर ऱ्हदय, किडणी, कॅन्सर या आजारांसाठी जिल्हा परिषदेची ‘दुर्धर आजार योजना’ आहे. या अंतर्गत रुग्णाला 15 हजारांची मदत देण्यासाठी प्रयत्न केला जातो. या व्यतिरिक्त काही अत्यावश्यक उपचारांची गरज असल्यास सिव्हिल हॉस्पिटल अथवा ससूनमध्ये रुग्णावर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्यात येते. यासाठी संबंधित रुग्णाची माहिती सिव्हिल हॉस्पिटल अथवा ससूनच्या संबंधित तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्याला दिली जाते. रुग्ण बरा होईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जातो.

टाळेबंदीच्या काळात असे चालते काम…

           सध्या एक महिन्यापासून राज्यात टाळेबंदी असल्याने नागरिकांना बाहेर पडण्यावर बंधने आहेत. या काळात प्रत्यक्ष रुग्ण अथवा रुग्णाचा नातेवाईक रुग्ण सहायता कक्षात येण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळे दूरध्वनीवर संपर्क साधला तरी संबंधित रुग्णाची माहिती घेवून त्याला योग्य ते मार्गदर्शन केले जाते. त्याच्यावर उपचार होवून तो बरा होईल, त्याला योजनेचा लाभ होईल याची काळजी घेतली जाते. या टाळेबंदीच्या कालावधीत गंभीर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांसाठी हा रुग्ण सहायता कक्ष अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त ठरत आहे. फोनवरुन कोणी रुग्णाची माहिती दिल्यास संबंधित रुग्णाला कक्षामार्फत फोनव्दारे संपर्क साधला जातो, त्याची सर्व माहिती घेवून त्याला मदत दिली जाते.

कक्षाव्दारे चालविला जातो व्हॉटस् ॲप ग्रुप…

           या रुग्ण सहायता कक्षाव्दारे एक व्हॉटस् ॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक, सहधर्मदाय आयुक्त, सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकारी, ससूनचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, आरोग्य मित्र यांचा समावेश आहे. या ग्रुपवर नव्याने येणाऱ्या रुग्णांची माहिती टाकली जाते. त्यानुसार संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याचे मार्गदर्शन घेऊन त्या रुग्णावर उपचार होईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला जातो.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मार्गदर्शन…

              त्याचबरोबर रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीकडून मदत मिळवून देण्यासाठी सुध्दा या कक्षाकडून मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी त्यांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचे फॉर्म, त्याला आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी दिली जाते. तसेच सिध्दी विनायक ट्रस्ट यांसारख्या इतर माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठीही मार्गदर्शन केले जाते.

बारामतीमधील महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालये

  • निरामय हॉस्पिटल
  • गिरीराज हॉस्पिटल
  • बारामती हॉस्पिटल
  • भंडारे हॉस्पिटल
  • मेहता हॉस्पिटल
  • सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल
  • वुमन हॉस्पिटल

(संपूर्ण पुणे जिल्ह्यात इतर खाजगी आणि शासकीय रुग्णालयातही ही योजना कार्यान्वित आहेत.)

कक्षाच्या माध्यमातून या योजनेतून मिळवून दिली जाते मदत…

  • महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना
  • आयुष्यमान भारत योजना
  • धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मदत
  • पुणे जिल्हा परिषदेची दुर्धर आजार योजना
  • मुख्यमंत्री सहायता कक्ष
  • श्री सिध्दी विनायक ट्रस्ट

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार आणि मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेला ‘रुग्ण सहायता कक्ष’ नवीन जिल्हा परिषद इमारत पुणे येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी उपमुख्यमंत्री महोदयांचे स्वीय सहायक सुनिल मुसळे (संपर्क क्रमांक – 9820181821), रुग्ण सहायता कक्षाचे समन्वयक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत अष्टीकर (संपर्क क्रमांक- 9422267338) यांच्याशी संपर्क साधावा.

खाजगी रुग्णालये ,शैक्षणिक संस्था व हॉटेलचे अधिग्रहण करावे -उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

0

पुणे,दि. 25- पुणे शहराची कोरोना संदर्भातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. प्रशासनाने गाफील न राहता पूर्वतयारी म्हणून शहरातील खाजगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाबद्दल त्यांनी मागील आढावा बैठकीत चिंता व्यक्त करून आठ दिवस लॉकडाऊन कडक करण्याचे आदेश दिले होते. आज पुन्हा त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात बैठक घेतली.
पुणे व पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचा आढावा घेतला. या बैठकीत कोविड-19 बद्दल जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच दोन्ही महानगरपालिका करीत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली.
या बैठकीत केंद्रशासनाने मॉल्स व्यतीरिक्त इतर दुकाने सुरु ठेवण्याबाबत जो निर्णय घेतला आहे, त्याअनुषंगाने राज्य शासनस्तरावर जे धोरण निश्चित करण्यात येईल, त्याप्रमाणे निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले.
क्वारंटाईन सेंटर्स किंवा विलगीकरण सुविधा नव्याने तयार करण्यासाठी खाजगी हॉस्पिटल किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांची अथवा खाजगी हॉटेलची गरज भासल्यास एपिडिमिक ॲक्ट खाली जिल्हाधिकारी यांना अधिग्रहित करण्याबाबतचे अधिकार आहेत, त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी.
ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाबद्दल अतीरिक्त 55 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ती कामे लवकरात लवकर पूर्ण करुन येत्या दोन महिन्यात 8 वा, 9 वा आणि 10 वा मजला कार्यरत होण्याच्या दृष्टीने काम करावे,असे आदेश त्यांनी दिले.
पुणे महानगरपालिकेमार्फत प्रामुख्याने झोपडपट्टी किंवा ज्या ठिकाणी नागरिकांना राहण्यासाठी छोटी घरे आहेत, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित राहत आहेत. त्यांच्याकरिता वेगवेगळ्या सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याठिकाणी या भागातील नागरिक जाऊन थांबू शकतील. परिणामी सामाजिक अंतराचे पालन होऊन, परिणामी कोरोना विषाणूपासून बचाव होण्यास मदत होईल.
ज्या नागरिकांना मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, किडनीविकार किंवा अस्थमाचा आजार असेल ,अशा नागरिकांनी स्वतःच्या तब्येतीची अधिक काळजी घ्यावी. त्यांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये. अशावेळी कोणताही कोरोनाबाधित रुग्ण आपल्या संपर्कात आल्यास आपणास कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. तो टाळावा, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. नागरिकांच्या राहण्याच्या अडचणीबाबत पुणे किंवा पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत उपलब्ध केलेल्या जागेत राहण्यासाठी जाता येईल,असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते

पुण्यातील 15 हजार डॉक्टरना फेसशिल्ड

0
पुणे:
कोरोना विषाणू विरूद्ध लढण्यात जोमाने पुढे असणारया डॉक्टर समुदायाला मदत करण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे वतीने पुण्यातील १५ हजार डॉक्टरना फेसशिल्ड देण्यात येणार आहे.हा अनौपचारिक कार्यक्रम रविवारी 26 एप्रिल २०२० रोजी सकाळी ११ वाजता साई स्नेह हॉस्पिटल(कात्रज) येथे होणार आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलचे पुणे शहराध्यक्ष डॉ.सुनील जगताप यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.आमदार चेतन तुपे,आमदार सुनील टिंगरे, पालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली  धुमाळ तसेच राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.

पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार,खा.सुप्रिया सुळे,डॉक्टर सेल प्रदेश अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट तर्फे राज्यात  दीड लाख फेसशिल्डचे वितरण आरोग्य व्यवस्थामधील डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांना केले जात आहे.
‘कोरोना विषाणूच्या संकट काळामध्ये वैद्यकीय सेवा ही आपली युद्धभूमी समजून धैर्याने सेवा देत आहेत अशा सर्व डॉक्टरांना फेस शिल्ड देण्यात येत आहे.पुण्यात १६ वैद्यकीय संघटनामार्फत फेसशिल्ड चे वितरण करण्यात येणार आहे,’ असे डॉ.सुनील जगताप यांनी सांगितले.

पुणे विभागात कोरोना बाधित 1200 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

0

पुणे दि.25 :- विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1200 झाली असून विभागात 184 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 939 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 42 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 1200 बाधित रुग्ण असून 77 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1094 बाधीत रुग्ण असून 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 26 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 42 बाधीत रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 28 बाधीत रुग्ण असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 13 हजार 693 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 13 हजार 70 चा अहवाल प्राप्त आहे. 623 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 11 हजार 812 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 200 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 51 लाख 36 हजार 845 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्या अंतर्गत 1 कोटी 98 लाख 14 हजार 639 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1067 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
0000

अंबिल ओढा पूरग्रस्तांच्या हक्काची १० हजार रुपये बाकी असलेली रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी- नगरसेविका अश्विनी कदम

0

शहर तहसीलदारांकडे मागणी.

पुणे : मागील वर्षी २५ सप्टेंबर रोजी शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. शहरातील सर्वात मोठ्या आंबील ओढ्याचे त्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाले होते. या ओढ्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. यामध्ये जीवित आणि मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. पूरग्रस्तांना अद्यापही शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत पुरेशा प्रमाणात मिळालेली नाही. त्यामुळे या पूरग्रस्त नागरिकांना शासनाने जाहीर केलेली १५ हजारांची आर्थिक मदत पूर्णपणे मिळावी अशी मागणी नगरसेविका आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम यांनी पुणे शहर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्याकडे केली आहे. पुरग्रस्तांच्या हक्काच्या आर्थिक मदतीची उर्वरित राहिलेली रक्कम ऑनलाईनद्वारे बँकेत जमा होण्याकरिता, कदम मागील काही दिवसांपासून तहसीलदार कोलते यांच्याशी संपर्क ठेवून आहेत.

याबाबत कदम यांनी सांगितले की, ‘पुरग्रस्तांच्या हक्काची शिल्लक असलेली “आर्थिक मदत” त्यांच्यापर्यंत आताच पोहचली, तर मोलाची मदत ठरेल. ही मदत यशस्वीरीत्या त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची तयारी कदम यांनी दर्शविली आहे. या कोरोनाच्या कठीण संकटकाळात लोकप्रतिनिधी असल्याने ६ महिन्यांपूर्वी इतिहासात पहिल्यांदा नैसर्गिक आपत्ती म्हणून घडलेल्या आंबिल ओढा महापूराची सातत्याने आठवण होत राहते. पर्वती मतदारसंघातील अनेक भागांमधील घरे, वसाहती, सोसायट्या व बंगले यांमधील नागरिकांना (कुटुंबांना) मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. अशा ह्या सर्व पूरग्रस्त भागातील नागरिक आता कुठेतरी उभारी घेत असताना मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोना सारख्या महाभयंकर विश्वव्यापी संकटामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करावा लागला व संपूर्ण देश थांबला. तब्बल हा लॉकडाऊन ४० दिवसांच्या वर व अजून पुढे किती जाईल माहीत नाही? असेही कदम म्हणाल्या.

यावर कोलते यांनी , एकूण ४६५५ कुटुंबांपैकी आतापर्यंत २७४६ कुटुंबांना संपूर्ण १५ हजार रुपये चेक स्वरूपात वाटप करण्यात आले असून, उर्वरित १९०९ कुटुंबांपैकी काही कुटुंबांना १० हजार रुपये, तर काहींना १५ हजार रुपये द्यायचे शिल्लक आहेत. पण सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही मदत चेक स्वरूपात पोहचविण्यासाठी मोठी अडचण येत आहे. यातील काही जणांनी बँक खात्याची माहिती दिली असली तरी रक्कम ऑनलाईन अदा करण्यासाठी अपूरी असल्यामुळ रक्कम ऑनलाइन अदा करण्यास अडचणीचे ठरत आहे, तरी आपल्या मार्फत नागरिकांना आवाहन करावे की, खालील Whatsapp नंबर वर बँक खात्यांची माहिती पुन्हा पाठविण्यात यावी, असे कोलते यांनी कदम यांना सांगितले.

या परिस्थितीमध्ये लवकरच संबंधित पूरग्रस्तांची बँक खात्यांची माहिती मागविण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे काम चालू असून त्यांच्या बँक खात्यांमध्ये ऑनलाईन रक्कम अदा करण्यात येईल व आपणही सहकार्य करावे असे कोलते यांनी आश्वासित केले.
खालील Whatsapp नंबर वर पूरग्रस्तांची बँक खात्याची माहिती मागविली आहे. तरी लाभार्थी सर्वांनी योग्यरीत्या माहिती पाठवावी व कर्तव्य म्हणून इतरांनाही व्हाट्सअप्प, फेसबुक व फोन करून सांगावे.
■ सध्याच्या या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात रक्कमेचे चेक प्रत्यक्षात मिळू किंवा देऊ शकत नसल्या कारणाने,
■ ज्यांच्या नावाने कुटुंब प्रमुख म्हणून फॉर्म भरला अशांचे (अगोदरचे ज्यांच्या नावाने चेक मिळाले त्यांचे) चालू बचत खाते असलेल्या बँकेच्या पासबुकचा (मुखपृष्टवरील) एकदम व्यवस्थित फोटो.
■ म्हणजेच ठळक सर्व माहिती दिसेल असा फोटो, Clear Image photocopy-
● Account Name
● Saving Account No. (All digit)
● IFSC Code
● Branch Name
* या संपूर्ण माहिती सहित खालील व्हाट्सअप्प (Whatsapp) नंबर वर सेंड करायचा आहे.*
* प्रज्ञा पंडित-तलाठी
9604436032
* सजाउद्दीन शेख-सहाय्यक
9860121184

अशी माहिती नगरसेविका आणि स्थायी समिति च्या माजी अध्यक्षा सौ. अश्र्विनी नितीन कदम यांनी प्रसिद्धी साठी कळविली आहे.

सहा महिन्यांच्या कोरोना मुक्त बालकाला डिस्चार्ज-रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्यावर

0

रत्नागिरी दि. 25: सहा महिन्यांचा चिमुकला आपल्या आईच्या कडेवर बसून लिफ्टमधून बाहेर येताच रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय सहाय्यक स्टाफ आणि इतरांनी टाळ्यांचा गजर करीत या बालकाच्या कोरोनामुक्तीचे स्वागत केले.  15 दिवसांच्या उपचार व तपासणीनंतर साखरतर येथील या बालकाचा कोरोनावरील विजय हा संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा विजय ठरला आहे.

कोरोना अर्थात कोविड-१९ विषाणूचा पहिला रुग जिल्ह्यात आढळला आणि आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली. कोरोनाचा फैलाव रोखणे ही प्राथमिकता ठेवून त्याची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करणे हे आगळे कोरोना युध्दच जणू सुरु झाले.

वेगवेगळया पातळ्यांवर वेगवेगळी कामे करीत कोरोना योद्धे यात उतरले. देशपातळीवर टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली यानंतर सर्वच ठिकाणांवर संचारबंदी आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजण्यासाठी प्रारंभ झाला.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण गुहागर तालुक्यात आढळला. त्याचा विदेश प्रवासाचा इतिहास होता. या रुग्णाच्या परिसरास 20 मार्च 2020 रोजी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यावेळेपासून अहोरात्र कोरोना रोखण्यासाठी सर्वच जण कार्य करीत आहेत.

जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्यांची तपासणी करणे व त्यांना होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करणे. सोबतच आरोग्य यत्रंणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुविधा आदिंची युद्धपातळीवर सुरुवात झाली.

साखरतर हे शहरानजीकचे गाव. या गावात कोणताही प्रवास इतिहास नसताना एका महिलेस कोरोना झाल्याचे निदर्शनास आले. त्यापाठोपाठ त्याच घरातील अन्य एका महिलेसह या सहा महिन्यांच्या चिमुकल्यास देखील कोरोना बाधा झाली होती.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णांवर उपचार करण्यात आले. रुग्णालयाचे डॉ. प्रकाश जांभुळकर यांची कोरोना उपचारासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी व इतर डॉक्टर आणि नर्स यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे कोरोना रुग्णांवर योग्य उपचार होऊन त बरे झाले आहेत असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितले.

पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सोबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधाचे विविध उपाय योजण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाने जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद ठेवल्या आहेत.

महसूल यंत्रणा तसेच ग्रामविकास विभागाची यंत्रणा आपल्या ग्राम कृती दलाच्या माध्यमातून जिल्ह्यात कोरोना मुक्तीसाठी मेहनत घेत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनीही लॉकडाऊन काळात घरातच राहून शासन निर्णयांचे पालन करुन  यात आपला मोलाचा वाटा उचलला आहे. हेल्पिंग हँडच्या माध्यमातून  एकत्र आलेल्या सामाजिक सेवा देणाऱ्या संस्था, संघटना आदिंचाही यात वाटा आहे. या सर्वांच्या बळावर जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यात यश आले .

यापुढील काळात हीच स्थिती कायम राखणे आणि जिल्हा कोरोनामुक्त राखणे हे जिल्ह्यासमोर मोठे आव्हान आहे आणि त्यासाठी प्रत्येकजण कटिबध्द आहे याचीच प्रचिती आज या बालकाच्या डिस्चार्जप्रसंगी आली.

आजवर सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. मात्र हे कायम राखण्यासाठी सर्वांनी असेच सहकार्य करावे या शब्दात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

.तर उद्धव ठाकरे पुन्हा शपथ घेतील; छगन भुजबळ यांनी सांगितला दुसरा पर्याय

0

राज्य सध्या करोनाचा मुकाबला करत आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी यंत्रंणा राबत असताना राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होते की काय याविषयीची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे. राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. जर वेळेत हा निर्णय झाला नाही, तर काय? असा प्रश्न सध्या चर्चेत आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दुसरा एक पर्याय सुचवला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीवर भाष्य केलं. या संवादादरम्यान भुजबळ यांना मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषदेवरील नियुक्ती संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळ यांनी भूमिका मांडली. “उद्धव ठाकरे यांची नियुक्ती राज्यपालांनी करायला हवी, असं आम्हाला वाटतं. कारण तसा ठरावं मंत्रिमंडळानं केला आहे. मंत्रिमंडळानं केलेल्या ठरावावर राज्यपालांनी कार्यवाही करणं बंधनकारक आहे. राज्यपाल कोट्यातील जागा कला, साहित्य आदी क्षेत्रातील लोकांसाठी असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. त्या निकषातही उद्धव ठाकरे बसतात. उद्धव ठाकरे स्वतः मोठे छायाचित्रकार आहेत. सामनाचे संपादक होते. पण, करोनाच्या लढाईत सरकार गुंतले असताना अशा रीतीनं राज्य अस्थिर करणं योग्य होणार नाही. त्यामुळे मला खात्री आहे की, राज्यपाल लवकरात लवकर निर्णय घेतील,” असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांच्यासमोर दुसरा पर्याय काय?

याविषयी बोलताना भुजबळ म्हणाले,” राज्यपालांकडून असा निर्णय घेण्यात आला नाही. तर दुसरा मार्ग हाच आहे की, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. परत आम्ही त्यांना आमचा नेता म्हणून निवडू. परत सगळं मंत्रिमंडळ शपथ घेईल आणि आपलं काम सुरू करेलं. पण, ही वेळ येऊ नये म्हणून राज्यपालांनी निर्णय घेणं गरजेचं आहे, असं मला वाटतं,” अशी आशा भुजबळ यांनी व्यक्त केली.

पुणे कंटेंटमेंट परिसरात टाळेबंदीचे निर्बंध कडक राबवा – उपमुख्यमंत्री

0

पुणे, दि. २५ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदीचे निर्बंध कडकपणे राबवावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे दिले.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ.अर्चना पाटील आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांकडून  केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत माहिती जाणून घेतली. तसेच योग्य ते उपाय सुचवून त्यांची गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या व मृत्यू दर कमी करणे आवश्यक आहे. या भागात गर्दी होऊ नये, यासाठी येथील शॉपिंग मॉल कोणत्याही परिस्थितीत सुरु करण्यात येऊ नयेत, असे निर्देश त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक ती मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल. कंटेंटमेंट भागात लॉक डाऊनचे धोरण पोलीस प्रशासनाने कडक अवलंबून  कोणत्याही परिस्थितीत कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक आहे. यापूर्वी क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना वेळेत व चांगल्या दर्जाचे भोजन पुरवावे. शहरातील रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी झोपडपट्टी भागातील कुटुंबियांचे संस्थात्मक क्वारंटाईन करुन त्यांना अन्नधान्य व अत्यावश्यक साहित्याचा पुरवठा करण्याबाबत नियोजन करावे. प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेले निर्बंध पाळून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

कोरोना प्रतिबंध उपाययोजना राबविण्यासाठी आरोग्यसेवा तत्पर आणि सक्षम होण्यासाठी ससून रुग्णालयाच्या नवीन अकरा मजली इमारतीची उर्वरित कामे गतीने पूर्ण करावीत, असे सांगून रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास त्यांच्यावर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने काटेकोर नियोजन करावे. गरज भासल्यास शिवछत्रपती क्रीडा संकुलाची इमारत व शैक्षणिक संस्थांच्या इमारतीमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देता येईल.

अन्य जिल्ह्यातील मजुरांच्या स्थलांतराबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधात विविध विभाग चांगले काम करत असल्याबद्दल कौतुक करुन या कामी कार्यरत शासनाच्या कोणत्याही विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोना प्रादुर्भावामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत देण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाली आहे, असे सांगून याबाबत योग्य तो निर्णय होईल, असे ते म्हणाले. पोलिसांच्या आरोग्याची तपासणी, एन-95 मास्क, वैद्यकीय किट व आवश्यक ती साधने उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी विभागातील कोरोना परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यासाठी संबंधित वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांसोबत बैठका घेऊन नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ससून रुग्णालयाला आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येत असल्याची माहिती दिली.

कंटेंटमेंट भागात महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारी स्वच्छेतेची खबरदारी व अत्यावश्यक साधनसामुग्री पुरवण्यासाठी करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. कोरोना उपचारात सक्रिय खासगी रुग्णालयांना प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने आवश्यक ती वैद्यकीय साधनसामग्री पुरवण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे, असे सांगितले. तसेच कोरोना संसर्गाने आतापर्यंत जिल्ह्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी व त्याअनुषंगाने माहिती दिली.

पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोयी व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. तसेच अन्य अधिकाऱ्यांनी देखील सविस्तर माहिती दिली.

00000000