Home Blog Page 2608

महाराष्ट्रात पुण्यासह 14 रेड झोन

0

नवी दिल्ली – गृहमंत्रालयाने जारी केलेल्या नव्या यादीनुसार महाराष्ट्रात पुण्यासह 14 रेड झोन जाहीर केले आहेत. या यादीत पुण्यासह मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगरांचा समावेश आहे.

ऑरेंज झोनमध्ये रायगड, अमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार,कोल्हापूर, हिंगोली,रत्नागिरी, जालना,नांदेड,चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, बुलढाणा, बीड, या जिल्ह्यांचा समावेश आहे. ग्रीन झोन मध्ये उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
रेड झोन’मध्ये लॉक डाऊन पूर्वीप्रमाणेच कडक राहण्याची शक्यता आहे. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही व्यवहार सुरू करता येणार आहेत.

केंद्र सरकारची मोठी घोषणा, 17 मे पर्यंत लॉकडाउनमध्ये वाढ

नवी दिल्ली –

देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. या लॉकडाउन दरम्यान रेड झोनमधील कोणत्याही भागांना सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सर्व राज्यांमधील करोनाग्रस्तांची माहिती आणि त्याची समिक्षा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी १४ एप्रिल रोजी पूर्ण झाला होता. त्यानंतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला होता. त्यावेळी सर्व राज्यांकडून त्यांनी माहिती घेतली होती. तसंच काही अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात यावा अशी विनंतीही केली होती. त्यानंतर लॉकडाउनच्या कालावधीत ३ मे पर्यंत यात वाढ करण्यात आली होती. आता दोन पुन्हा एकदा दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. ४ मेपासून पुढील दोन आठवडे हा लॉकडाउन लागू असणार आहे. या काळात विमान आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार नसल्याचेही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा केली होती. परंतु आता केंद्रीय गृहमंत्रालयानं पत्रक काढून लॉकडाउनचा कालावधी वाढवणार असल्याची घोषणा केली.

दरम्यान, हा लॉकडाउन लागू करताना सरकारनं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त काही  सवलती देण्यात येतील. परंतु रेड झोनमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्ससाठी नव्या गृहमत्रालयानं काही नव्या गाईडलाइन्सही जारी केल्या आहेत. ग्रीन झोन्समध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही किंवा २१ दिवसांमध्ये करोनाचा एक नवा रुग्ण सापडला नाही, अशा भागांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच ज्या जिल्ह्यांचा समावेश रेड किंवा ग्रीन झोनमध्ये नसेल ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामिल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनेच लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना इच्छित स्थळी जाता येणार – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची माहिती

 

पुणे दि 1: लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचे पत्र असेल तरच अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाईल. यानंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल. कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नसलेल्यांनाच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
जिल्ह्यातील अडकलेल्या कामगारांची व व्यक्तींची माहिती घेऊन स्थलांतरणासाठी इच्छुकांची यादी तयार केली जाईल. राज्य शासनामार्फत संबंधित राज्याशी संपर्क साधून त्यांना त्या-त्या राज्याची परवानगी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरु होईल. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचे पत्र असेल तरच अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाईल. यानंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल. कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नसलेल्यांनाच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाईल.
ज्यांना परत जावयाचे आहे, त्या व्यक्तींना वाहनांची व्यवस्था स्वत: करावी लागेल. या प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा निश्चित मार्ग व कालावधी नमूद असलेला ट्रान्झीट पास वाहनांकडे सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्यात सर्व प्रवाशांची नावे व इतर माहिती असणे आवश्यक आहे. प्रथम वाहतुकीला वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे निर्जंतुकीकरण केले जाईल. तसेच वाहनात देखील सोशल डिस्टंन्सिंग पाळूनच नागरिकांची बसण्याची व्यवस्था केली जाईल. महाराष्ट्र राज्या बाहेर अडकलेल्या नागरिकांना जिल्हयात प्रवेश देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त समन्वय ठेवून निर्णय घेतील. परराज्यातून प्रवेश करणाऱ्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईन कालावधीत राहावे लागेल.
सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. यानंतर सबंधित जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार या नागरिकांना घरी किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल, असेही विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले आहे.

नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी माहिती पाठविण्याचे आवाहन

 

पुणे दि. 01 : पुणे शहर तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील एरंडवणा, येरवडा, औंध, बोपोडी (खडकी), पर्वती (सहकारनगर, मुंकुदनगर), दत्तवाडी, वानवडी, घोरपडी पेठ, कोरेगाव पार्क, मुंढवा, केशव नगर, शिवाजीनगर, गोखले नगर, वडारवाडी, बिबवेवाडी (मार्केटयार्ड, गुलटेकडी) पुणे शहर व सर्व पेठा. या भागातील नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जायचे आहे. त्यांनी त्यांची माहिती tahasildarpunecity@gmail.com या Email id वर पाठवावी. तसेच हवेली कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील बाणेर, कोंढवा, धनकवडी, बालाजी नगर, सिंहगड रोड, धायरी, विश्रांतवाडी चंदननगर, हडपसर, मांजरी, कोथरूड, बालेवाडी, इत्यादी भागातील नागरिकांनी त्यांची माहिती tahasildarhavelipune@gmail.com या Email id वर पाठवावी.
तसेच मुळशी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील पाषाण, सुस, वाकड हिंजवडी, बावधन इत्यादी भागातील नागरिकांनी त्यांची माहिती tahasildarmulshi@gmail.com या Email id वर पाठवावी.
माहिती पाठविताना संपूर्ण नाव , सध्याचा पत्ता, मोबाईल नंबर व्यवसाय –विद्यार्थी/ कामगार/नोकरी/अन्य- त्याचा पत्ता, मूळ गावचा पत्ता- गाव, तालुका, जिल्हा, राज्य, प्रवास कसा करणार आहात- स्वत:चे वाहन/सार्वजनिक वाहन, किती लोक प्रवास करणार याबाबतची माहिती देणे आवश्यक आहे. असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
00000

पुण्यातील आज 1 मे ची कोरोनाची स्थिती

नवीन कोरोना विषाणू सद्य :स्थिती व उपाययोजना
दि.01/05/2020
(संध्या 4.00 वाजेपर्यत)

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1783 झाली आहे. 309 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1375 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकुण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणा खाली आहेत.
विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1986 झाली आहे.विभागातील 358 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1519 आहे.विभागात कोरोनाबाधीत एकुण 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 77 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 19989 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 19096 चा अहवाल प्राप्त आहे. 1048 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 17058 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1986 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागामधील 66,01,329 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2,55,47,352 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1452 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

मंगळवार पेठेत मोबाईल टॉवर कोसळला,कोरोनाग्रस्त शहराला पावसाने झोडपले ..(व्हिडीओ)

0
पुणे शहरात आज दुपारी झालेल्या जोरदार वादळी पावसा दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्याने मंगळवार पेठ परिसरात मोबाईल टॉवर कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत सजीव हानी झाली नसल्याचे समजत आहे.

कोरोनाच्या संकटकाळात अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या घटकांना वेगवेगळ्या पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. पोलिसांना ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता लॉक डाऊन चा बंदोबस्त करावा लागतोय ,तर पत्रकार आणि छायाचित्रकार देखील वार्तांकन करताना दिसतात. बंद केलेल्या रस्त्यावर उन्हात उभे राहण्या ऐवजी तात्पुरते छत लावून बंदोबस्ताला बसणाऱ्या पोलिसांची   आज पावसाने आणि वादळाने मोठी तारांबळ उडविली ,पावसात विश्रामबागवाड्यासमोर दिसलेलं या व्हिडीओतील दुसरे  चित्र ….

शिवाजीनगर संचेती हॉस्पिटल परिसरात मार्गावरील दिशादर्शक कमान सोसाट्याच्या वाऱ्याने पडली असून कमानीचे सांगाडा हटवण्याचे काम सुरु झाले आहे. लॉकडाऊनमुळे रस्ता निर्मनुष्य असल्याने कोणतीही हानी झाली नाही.

 

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

0

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या निर्देशांचे पालन करून तसेच दोन व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर राखून आणि चेहऱ्यावर मास्क धारण करून अत्यंत साधेपणाने हा सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईक, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) विकास गजरे यांच्यासह मोजके वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लॉकडाऊन कालावधीत १७ हजार व्यक्तींना अटक; ३ कोटी १० लाखांचा दंड

0

मुंबई, दि. १ : राज्यात सर्वत्र  सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ८७ हजार ३९१  गुन्हे दाखल झाले असून १७ हजार ६३२ व्यक्तींना अटक करण्यात आली.तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी १०लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबरवर ८१ हजार ६१५ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ६२८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२४० वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.व ५० हजार ८२७ वाहने जप्त करण्यात आली .

परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांवर हल्ला प्रकरणे

या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १६७ घटनांची नोंद  झाली असून  यात ६२७  आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्दैवाने ३० पोलीस अधिकारी व १९७ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत. त्यापैकी ८ पोलीस अधिकारी व २२ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या २२ पोलीस अधिकारी व १७२ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने ३ पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन झाले.

शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ त्वरीत मिळणे आवश्यक – पालकमंत्री जयंत पाटील

0
  • कोणत्याही परिस्थितीत कृषि पंपांच्या प्रलंबित विद्युत जोडण्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा
  • पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वंचित शेतकऱ्यांना त्वरीत द्या                                                           सांगली, दि. 01 : गोपीनाथ मुंडेशेतकरी अपघात विमा योजनेचे  लाभ मिळण्यात विलंब होत असल्याचे आढळून येत आहे. याची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याच्या वारसांना तातडीची मदत व्हावी यासाठी कृषि विभागाने शेतकऱ्याच्या अपघातानंतर कुटुंबियांकडून त्वरीत कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. तसेच विमा कंपन्यांकडून सदरचे क्लेम संबंधितांना मिळवून देईपर्यंत डेडीकेटेड पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

    खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, महावितरणचे प्रभारी अधिक्षक अभियंता पराग बापट, कृषि उपसंचालक सुरेश मगदूम आदि उपस्थित होते.

  • कोणत्याही परिस्थितीत कृषि पंपांच्या प्रलंबित विद्युत जोडण्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा…

    कृषि पंपांच्या विद्युत जोडणीसाठी अनामत रक्कम भरूनही महावितरणकडे सुमारे १० हजार विद्युत जोडण्या प्रलंबित आहेत. याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सद्या ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे सदर विद्युत जोडणीचे काम आहे त्याचे काम समाधानकारक नाही त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अतिरीक्त मनुष्यबळ देऊन पावसाळ्यापूर्वी प्रलंबित असणाऱ्या संपूर्ण विद्युत जोडण्या पूर्ण कराव्यात. जिल्ह्यातला बराचसा भाग दुष्काळी असल्याने त्यांना पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कृषि पंपांच्या विद्युत जोडणीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश महावितरणच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

    पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना त्वरीत द्या…

    सांगली जिल्ह्यात सन 2019 मध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या कृषि क्षेत्रासाठी शासनाकडून नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झालेली आहे. तथापी जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांपर्यंत सदरची रक्कम पोहोचली नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेतला. यावेळी बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सीस बँक व फेडरल बँक यांच्याकडील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या न आल्याने रक्कम शेतकऱ्यांच्या खाती वर्ग होऊ शकली नाही, असे यावेळी सांगण्यात आले. यावर संबंधितांकडून त्वरीत याद्या प्राप्त करून घेऊन रक्कम तात्काळ शेतकऱ्यांची खाती वर्ग करा, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक यांना दिले.

    या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी हवामान आधारीत फळपीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, द्राक्ष व डाळींब पिकासाठी अंश तपासणी प्रयोगशाळा आदि सर्व विषयांवर सविस्तर चर्चा केली.

सर्व देवस्थानांचा पैसा ताब्यात घ्या अन बिनव्याजी वापरा,पण दारू विक्रीला परवानगी देऊ नका -आबा बागुल

पुणे- राज्यात मद्य विक्रीला परवानगी देण्यापेक्षा विविध धर्मांच्या सर्व देवस्थानांच्या तिजोरितील रक्कम बिनव्याजी वापरावी, अशी मागणी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक ,माजी उपमहापौर आबा बागुल यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, या मागणी संदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाला पत्र पाठविण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यलयातर्फे कळविण्यात आले आहे.

याबाबत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्वच देवस्थानांना आवाहन केले तर आपल्याला इतका निधी मिळेल जो केवळ मद्य विक्री नाहीतर वर्षभरात मिळणाऱ्या महसुलापेक्षा अधिक असेल. त्यासाठी जनतेने देवाला घातलेल्या साकडे पोटी दानपेटीत जमा झालेली ८० टक्के रक्कम बिनव्याजी देवस्थानांनी द्यावी.

सरकार ती रक्कम नंतर परत करेल, असा करारनामा करणे उचित ठरेल. अन्यथा आज गरीब जनता अन्नासाठी देवाचा धावा करत असताना जर मद्यविक्रीला परवानगी दिली, तर लोकांच्या घरी अन्नासाठी असलेले पैसे राहणार नाहीत. कौटुंबिक हिंसाचार वाढेल, शिवाय मद्यविक्री अनेक संकटाना निमंत्रण देणारी ठरेल.

राज्यातील जनतेची वर्गवारी पाहिल्यास त्याचा मोठा फटका बसेल. त्यामुळे मद्यविक्री परवानगीपेक्षा जनतेने विविध देवस्थानांना दिलेल्या देणगीरुपी रकमेचा विनियोग या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कसा करून घेता येईल, याला आपण प्राधान्य द्यावे.

हजारो कोटी रुपये जनतेनेच देवांना दानपेटीत अर्पण केलेले आहेत. ते तिजोरीत तसेच पडून राहण्यापेक्षा देवस्थानांशी लेखी करार करून बिनव्याजी ते वापरावेत आणि ते पुन्हा त्यांना परत करावेत. आज देवाचा धावा करणाऱ्या जनतेला देवस्थानांकडे जनतेनेच दिलेल्या दानाचा आधार मिळावा, असेही बागुल यांनी म्हटले आहे

कोरोनाविरोधातील लढ्यात गणेश मंडळ कार्यकर्तेही देणार साथ

पुणे-शहरातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, सामाजिक भान जपत शहरातील २०० गणेश मंडळांचे कार्यकर्ते महापालिका, पोलीस यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सध्याची नेमकी गरज, कामाचे स्वरूप आणि सुरक्षिततेच्या उपायाबाबत चर्चा झाली.
शहराच्या पूर्व भागातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असताना पालिका आणि पोलिस प्रशासनावर ताण वाढला होता. यावेळी गणेश मंडळाचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे पुढे येत कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासनाला मदत करण्यासाठी, रेडझोन परिसरातील संचारबंदी च्या अंमलबजावणीसाठी, रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरत नागरिकांना विश्वासात घेऊन काम करणार आहेत. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना गरज असेल त्या ठिकाणी त्यांच्याकडून मदत घेतली जाणार आहे .
यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, अप्पर पोलिस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, मंडळाचे पदाधिकारी प्रताप परदेशी, सुनील रहाटणे, पुनीत बालन, शिरीष मोहिते, निखिल पंडित, डॉ मिलिंद भोई, उदय जगताप, राजाभाऊ तिकार, पीयूष शहा, प्रशांत पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

‘लॉकडाऊन’ मुळे शेतमाल विक्रीचे तंत्र शिकलो

0

जळगाव जिल्ह्यात शेतकरी गटांमार्फत १७ हजार क्विंटल भाजीपाला व फळांची विक्री, सुमारे ३१ कोटी रुपयांची उलाढाल

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊनचा काळ हा आमच्यासाठी बंदी नाही तर संधी म्हणून लाभला आहे, कृषि विभागाच्या मार्गदर्शनाने लॉकडाऊनमध्ये आम्ही शेतमाल विकीचे तंत्र शिकलो. अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पिंपळगांव हरेश्वर, ता. पाचोरा, जि. जळगाव येथील मोसंबी उत्पादक शेतकरी शरद पाटील यांनी…

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात वाढू लागला आणि देशभरात लॉकडाऊन घोषित आला. हा काळ नेमका फळपिकांच्या काढणीचा काळ असल्याने हवालदिल झालो होतो. वर्षभर जपलेले पीक मातीमोल होणार या भितीने अंगावर काटाच आला होता. परंतु कृषि विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, कृषि उपसंचालक अनिल भोकरे आणि आत्माचे प्रकल्प उपसंचालक संजय पवार यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे शेतकरी ते ग्राहक या उपक्रमातंर्गत जिल्ह्यात 45 लाख रुपयांची 150 टन मोसंबी थेट ग्राहकांना विकता आल्याने होणारे नुकसान तर टळलेच शिवाय ग्राहकांनाही माफक दरात ताजी फळे देता आल्याचे समाधान वेगळेच आहे.

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व फळे यांची कमतरता भासू नये अशा सूचना  जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी याकरिता जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. आणि मग जिल्ह्यातील नागरिकांना भाजीपाला व फळे थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन कृषि विभागाने केले.

कृषि विभागामार्फत शेतकरी, शेतकरी गट, आत्मा गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी केलेली आहे. भाजी मंडईमध्ये गर्दी होऊ नये तसेच शेतकऱ्यांना सुरक्षितपणे आपला भाजीपाला विकता यावा, यादृष्टीने कृषी विभागाने शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम सुरु केला आहे. याकरिता शेतकरी गटांशी चर्चा करुन शेतातील भाजीपाला, फळे ग्राहकाच्या दारापर्यंत देण्याचे निश्चित करण्यात आले. आणि बघता बघता 27 मार्चपासून आजपर्यंत 883 गटांच्या व उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 17 हजार क्विंटल भाजीपाला व फळांचे वितरण करण्यात आले. यामध्ये 31 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याने शेतकऱ्यांना मोठे सहाय्य मिळाले. तर जनतेलाही घरबसल्या योग्य दरात ताजा भाजीपाला मिळाल्याने मोठा दिलासा मिळाल्याचे श्री. ठाकूर यांनी सांगितले.

या उपक्रमातंर्गत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  14 कोटी 25 लाख रुपयांची 9500 क्विंटल फळे तर  16 कोटी 75 लाख रुपयांचा 7500 क्विंटल भाजीपाला विक्री केला आहे. यामध्ये शिरसोली येथील शेतकरी चंद्रशेखर झुरकाळे यांनी कांदा, उमाळा येथील शेतकरी विजय चौधरी, अनिल खडसे यांनी टरबूज, पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा येथील शेतकरी शरद पाटील व श्रीकांत पाटील यांनी मोसंबी, बावटे येथील शेतकरी कमलेश पाटील यांनी खरबुज, अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर येथील शेतकरी विनोद तराळ यांनी केळी, तर आव्हाणे येथील शेतकरी समाधान पाटील यांनी कलर शिमला मिरची, टोमॅटो, वांगे, भेंडी विक्रीत महत्वाचा वाटा असल्याचे कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले.

शेतक-यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत या उपक्रमातून शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यामार्फत ग्राहकांना थेट त्यांच्या दारात भाजीपाला व फळे पुरवली जात असल्यानें ग्राहकांच्या आवडीनिवडी तसेच मालाची विक्री करताना ग्राहकांशी होणारी चर्चा यामधून आम्ही आमचा शेतमाल विक्रीचे तंत्र अवगत केले असे या शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच या उपक्रमात अनेक शेतकरी रोज नव्याने सहभागी होत आहे. शेतमाल विकताना गर्दी होऊ नये व फळे भाजीपाला घरपोच मिळावा हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यासाठी या शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची ठिकाणे ठरवून देण्यात आली त्या दृष्टिकोनातून काटेकोर नियोजन केल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

भाजीपाला व फळे विक्रीच्या ठिकाणी लॉकडाऊनचे उल्लंघन होणार नाही. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली असून कोरोना संसर्गापासून संरक्षण करण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी माल विक्री करताना तसेच तालुक्यातून गावात येत असताना काय दक्षता घ्यावी, यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. यामध्ये सहभागी शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सदस्यांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

लॉकडाऊनच्या काळात उमाळा येथील शेतकरी विजय चौधरी, अनिल खडसे यांनी 12 लाख रुपयांच्या  टरबुजांची विक्री केली तर पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा येथील शेतकरी शरद पाटील व श्रीकांत पाटील यांनी 45 लाख रुपयांची मोसंबी, बावटे येथील शेतकरी कमलेश पाटील यांनी 40 लाख रुपयांच्या खरबूज विक्री केल्याने लॉकडाऊन हे आमच्यासाठी बंदी नाही तर संधी म्हणून उपलब्ध झाल्याचे या शेतकऱ्यांनी आनंदाने सांगितले.

विलास बोडके

जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

कर्वे समाज सेवा संस्थेच्यावतीने रेड लाईट एरियामधील महिला तसेच गरीब व गरजूंना धान्यवाटप

पुणे: पुणे शहरामधील रेड लाईट एरियामध्ये शरीरविक्रय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला तसेच शहराच्या विविध भागातील वस्त्यांमध्ये राहणारे गोर- गरीब व गरजूंना महिनाभर पुरेल असे धान्यवाटप करण्याचा उपक्रम संस्थेने हाती घेतला असून पुढील काही दिवस शहरातील विविध वस्त्यांमधील नागरिकांना या उपक्रमांतर्गत धान्यपुरवठा करणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक व प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी दिली.

कर्वे समाज सेवा संस्थेच्या वतीने माझगाव डॉक शिप बिल्डर्स मुंबई, सुदर्शन केमिकल्स रोहा, एस एल के ग्लोबल सोलुशन आणि कमिन्स इंडिया यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यातील काही आदिवासी विभागांमध्ये व पुणे शहरातील विविध वस्त्यांमध्ये धान्य कीट वाटप उपक्रम सुरु असून ठाणेजिल्ह्यातील शहापूर, रायगड जिल्ह्यातील रोहा व पुणे जिल्ह्यातील मावळ व मुळशी तालुक्यातील सुमारे ६९० आदिवासी – कातकरी कुटुंबाना या किटचे वितरण करण्यात आलेले आहे. तसेच पुणे शहरातील सम्राट अशोक विद्यामंदिर व अनुसयाबाई खिलारे विद्यालय येथे पुणे महानगरपालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या लेबर रिलीफ कॅम्पमधील सुमारे १५० मजुरांना दररोज तीन वेळचे चहा, नाश्ता व जेवण पुरविण्यात येत असून अशा कॅम्पमध्ये राहणाऱ्या मजुरांचे मानसिक समुपदेशन देखील करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी सांगितले.

कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर, प्रा. चेतन दिवाण, व्यवस्थापन समिती समन्वयक प्रसाद कोल्हटकर, सदस्य बालाजी तेलकर यांच्या वतीने तसेच पुणे शहरामधील रेड लाईट एरियामध्ये वास्तव्यास असलेल्या सुमारे ५० महिला व तृतीयपंथीयांना एक महिना पुरेल अशा धान्याच्या किटचे वाटप या परिसरामध्ये काम करणाऱ्या काही संस्था व स्वयंसेवकांच्या पुढाकाराने करण्यात आले. शहरातील विविध भागांमध्ये जाऊन तेथील गरीब वस्त्यांमधील गरीब व गरजू नागरिकांना देखील धान्याच्या किटचे वाटप करण्यात आलेले असून कर्वे समाज सेवा संस्था, महारष्ट्र राज्य शासनाचे दिव्यांग कल्याण आयुक्तालय आणि आदिवासी विभाग यांच्यामार्फत चालविण्यात येत असलेल्या हेल्पलाईनवर फोन करून अन्नधान्यासाठी विनंती करणाऱ्या गरजू नागरिकांना व शहरातील इतर गरजू नागरिकांना देखील गरजेनुसार धान्याच्या किटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती या हेल्पलाईनचे प्रमुख प्रा. चेतन दिवाण यांनी दिली

टाळेबंदीसंदर्भात ३ मे नंतर सतर्कता बाळगून मोकळीक देण्याचा प्रयत्न

0

अतिशय सावधतेने पावले टाकणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली असून टाळेबंदीसंदर्भात 3 मे नंतर काय करायचे याचा निर्णय परिस्थिती पाहून अतिशय सावधतेने, सतर्कता बाळगून करावा लागणार आहे. रेड झोन मध्ये आता मोकळीक देणे राज्याच्या हिताचे नाही. रेड झोन मधील नियम अधिक कडकपणे पाळावे लागतील परंतु ऑरेंज झोन मध्ये बाधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणचे तसेच ग्रीन झोनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

आज मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.

https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/232522101312909/

शब्दातीत भावना

मुंबई ही हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला मिळाली असून आज त्या सर्व हुताम्यांचे स्मरण होते, मी त्यांना विनम्र अभिवादन करतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, हा महाराष्ट्र लढवैय्या महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा कित्येक शतकांची आहे. अनेक राज्यकर्ते, क्रांतीकारक, समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे. रुढी, परंपरा मोडून आधुनिकतेकडे जाणारा हा महाराष्ट्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, जोतिबा फुले, शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. अशा पराक्रमी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे भाग्य आपल्याला लाभले याचा आनंद आहे. ही भावना आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आज महाराष्ट्राचा 60 वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्ताने हुतात्म्यांना मुख्यमंत्री म्हणून वंदन करताना, त्यांना अभिवादन करताना अंगावर रोमांच उभे राहिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी  सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी दिला आठवणींना उजाळा

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव धूमधडाक्यात साजरा करावयाचा होता परंतु आजच्या परिस्थितीत ते शक्य नसल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, आजोबा प्रबोधनकार ठाकरे, वडील बाळासाहेब ठाकरे,  काका यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभाग घेतला होता. आज त्यांची, सेनापती बापट, शाहीर अमर शेख यांची आठवण होते, आज मला माझ्या आईची ‘माँ’ ची देखील आठवण येते.

ज्या गिरणी कामगारांनी पराक्रमाची शर्थ करून मुंबई मिळवली त्या सर्व ज्ञान-अज्ञात कामगारांना आपण मानाचा मुजरा करतो. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 50 व्या वर्धापनदिनी वांद्रा कुर्ला संकुलातील कार्यक्रमाला लता मंगेशकर यांनी गायिलेल्या  “बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा! या गाण्याची आज आठवण येते, मी लतादीदींना नमस्कार करून आशीर्वाद मागतो असे म्हणताना आज याच वांद्रा-कुर्ला संकुलात कोविड रुग्णांसाठी रुग्णालय सुरु होत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

परराज्यातील लोकांना पाठवण्याची शिस्तबद्ध योजनागर्दी नको

परराज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात अडकले त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी शासनामार्फत  शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे. संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. राज्या-राज्यांमधील समन्वयातून या सर्व बांधवांना त्यांच्या राज्यात पाठवले जाईल व त्याच पद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही महाराष्ट्रात परत आणले जाईल, परंतु त्यासाठी गर्दी करू नका, झुंडीने  जमा होऊ नका हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांनाही जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांचीही त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतीचे काम आणि शेतमाल वाहतूक सुरुच. बियाण्यांची कमी नाही

शेती आणि शेतीसंबंधीचे व्यवहार, कृषी माल वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक यावर कोणतेही बंधन नाही, शेतकऱ्यांना बि-बियाण्यांची कमी पडणार नाही. हळूहळू यावरची बंधने आपण उठवली आहेत पण झुंबड झाली तर बंधने टाकावी लागतील असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

जनता हीच राज्य आणि राष्ट्राची खरी संपत्ती

महाराष्ट्राच्या  पराक्रमाची गाथा कित्येक शतकांची आहे.  महाराष्ट्रात कुठेच कमी नाही, आजही महाराष्ट्र कोरोनाशी लढतो आणि महाराष्ट्रच यात जिंकणार आहे. या विषाणूमुळे राज्य संकटात आले आहे, आर्थिक चाक रुतले आहे, रोजगार कमी झाला आहे, अडचणी वाढल्या आहेत, हे काही प्रमाणात खरे असले तरी प्रत्येक राज्य आणि राष्ट्राची खरी संपत्ती ही त्या राज्याची आणि राष्ट्राची जनताच असते.  ही जनता, हे सैनिक वाचले तर त्यांच्या सहकार्याने या अडचणीवर आपण नक्कीच मात करू शकतो आणि करू असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

लक्षणे दिसताच उपचार करून घ्या

लॉकडाऊनमुळे कोराना विषाणूचा गुणाकार रोखण्यात नक्कीच यश आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, अलीकडच्या काळात काही भागात कोरोना रुग्णांचे आकडे वाढलेले दिसत आहेत. परंतु पहिल्या रुग्णाशी संपर्कात आलेले, त्यांचे निकटवर्तीय यांची देखील आपण तपासणी करत आहोत. त्यामुळे हे आकडे वाढलेले दिसत आहेत. कोरोना झाला की सगळे संपले, व्हेंटिलेटर लागले की संपले असे अजिबात नाही. सहा महिन्याच्या बाळापासून 85 वर्षांच्या आजीपर्यंत सगळ्यांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे कोरानाच्या दहशतीतून मोकळे व्हा. वेळेत योग्य उपचार घेतला तर रुग्ण बरा होऊन सुखरूप घरी जातो हे दिसून आले आहे त्यामुळे कोरोनाची लक्षणे दिसताच घरच्या घरी उपाय करू नका. तात्काळ फिव्हर रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईत घरोघरी जाऊन 2 लाखाहून अधिक तपासण्या

आजही 75 ते 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य, अतिसौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणेच दिसत नाहीत. असे असले तरी आपण या सर्वांना विलगीकरण कक्षात दाखल करत आहोत. मुंबई महापालिका  ऑक्सिमीटरच्या सहाय्याने घरोघरी जाऊन तपासण्या करत आहे. आतापर्यंत २ लाखाहून अधिक तपासण्या झाल्या, ज्यात 272 लोकांमध्ये ऑक्सिजनची कमी आणि इतर विकार असलेले रुग्ण सापडले. महापालिका आता त्यांच्यावर उपचार करत आहे. कोरोनासंदर्भात जे जे काही नवीन चांगलं घडत आहे ते करण्यास महाराष्ट्र कुठेही कमी पडत नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

10 हजार जणांना प्रशिक्षण

कोविड योद्धा होऊन शासनासोबत काम करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळपास 20 हजार लोकांनी इच्छा व्यक्त केली तर 10 हजार लोकांनी प्रत्यक्षात तयारी दाखवली, त्यांना आपण आता प्रशिक्षण देत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्यात यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतेय

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला. या दोघी परिचारिका असून त्या या आपत्कालीन परिस्थितीत सेवा देण्यास पुढे आल्याचे ते म्हणाले. याप्रमाणेच खासगी डॉक्टर्सनेही पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.   आयुष मंत्रालयाची, होमियोपॅथीची मदत घेत असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्समधील डॉक्टर्स इतर डॉक्टरांना मार्गदर्शन करत आहेत, त्यातून उपचाराची दिशा निश्चित होत आहे, संपूर्ण राज्यात यंत्रणा अतिशय चांगल्यापद्धतीने काम करत आहे अशी माहितीही त्यांनी दिली. डॉक्टर, नर्सेस, पोलीस हे आपल्यासाठी देव आहेत, त्यांच्यावरचा ताण न वाढवता त्यांना आतापर्यंत दिले तसेच पुढेही सहकार्य करा असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा

मुंबई दि 1 : महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाले असून या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्प वाहून अभिवादन केले.

या ध्वजारोहण समारंभाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,आमदार भाई गिरकर, मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे,  महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल  तसेच वरिष्ठ शासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अतिशय काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग चे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे प्रथमच मंत्रालयात झालेला हा ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने पण उत्साहात झाला.

मुख्यमंत्री हे स्वतः वाहन चालवित हुतात्मा  स्मारक व मंत्रालयातल्या कार्यक्रमासाठी पोहोचले.