Home Blog Page 26

शास्त्रीय संगीताच्या वास्तूत ’सुगम’चा सन्मान गौरवास्पद : प्रा. प्रकाश भोंडे

गांधर्व महाविद्यालय, पुणे तर्फे प्रा. प्रकाश भोंडे, विदुषी शैला दातार यांचा पंडित विनायकराव पटवर्धन स्मृती संगीत जीवन पुरस्काराने सन्मान

पुणे : पुण्यातील गांधर्व महाविद्यालयाच्या पवित्र वास्तूत अनेकदा संगीत मैफली ऐकण्यास आलो आहे. या वास्तूत सुगम संगीत क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीच्या कार्याचा सन्मान होणे कौतुकास्पद आहे. शास्त्रीय संगीताच्या संस्थेने सुगम संगीताच्या संस्थेचा केलेला हा मोठा गौरव आहे, अशा भावना स्वरानंद प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रा. प्रकाश भोंडे यांनी व्यक्त केल्या.

भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि गांधर्व महाविद्यालय नॉर्थ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘परंपरा’ संगीत महोत्सवात आज (दि. ३०) प्रा. प्रकाश भोंडे आणि सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी शैला दातार यांचा पंडित विनायकराव पटवर्धन स्मृती संगीत जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्या वेळी प्रा. भोंडे बोलत होते. इन्कमटॅक्सचे प्रिंसिपल कमिशनर अभिनय कुंभार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गांधर्व महाविद्यालय, पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे, लेखापाल मृदुला दाबके-जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. मानपत्र, शाल, श्रीफळ आणि २१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

प्रा. भोंडे पुढे म्हणाले, गांधर्व महाविद्यालयाने सर्व संगीत प्रकारांवर प्रेम केले आहे. पुणे हे पुरस्कारांचे घर असले तरी कुठल्या संस्थेने, कोणत्या व्यक्तीचा, संस्थेचा सन्मान केला याला महत्त्व आहे. हा पुरस्कार मी माझ्या संस्थेचे विश्वस्त, सहकारी, कुटुंबिय तसेच रसिकांचा गौरव आहे, असे मानतो.

गांधर्व महाविद्यालयासंदर्भातील आठवणींना उजाळा देऊन शैला दातार म्हणाल्या, पंडित विनायकबुवा पटवर्धन या ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वाच्या नावे मिळालेला पुरस्कार ही माझ्याकरिता आनंदाची गोष्ट असून त्या मागे माझ्या आई-वडिलांची मोठी पुण्याई आहे.

अभिनय कुंभार म्हणाले, संगीत, कला, साहित्य, नृत्य यांना वाहिलेल्या गांधर्व महाविद्यालय, पुणेचे कार्य मोठे असून त्यांच्या मार्फत भारतीय कला परंपरेचे जतन, संवर्धन व प्रचार होत आहे. भारतीय संस्कृतीचे शतकानुशतकाचे संचित संस्थेच्या माध्यमातून प्रवाहित करणे हे महान कार्य आहे.

पुरस्काराविषयीची भूमिका पंडित प्रमोद मराठे यांनी विशद केली. मानपत्राचे लेखन जयश्री बोकील यांचे होते तर मानपत्राचे वाचन निरजा आपटे यांनी केले.  

समाज हा विश्ववंद्य आणि विश्वगुरू व्हावा हा सेवेचा उद्देश-विनय पत्राळे

स्व-रूपवर्धिनीला यंदाचा संपदा समाजकल्याण पुरस्कार प्रदान ; संपदा सहकारी बँक लि. तर्फे आयोजन
पुणे : ईश्वराने मला दिले, ते मी समाजाला दिले नाही तर ते सडून जाईल. आवश्यकता तिथे सेवा आणि समस्या समजून सेवा करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण गंगेच्या पाण्यातून पाणी घेऊन तिथेच अर्घ्य देतो. त्याप्रमाणे समाजातून निर्माण झालेला पैसा समाजासाठी खर्च करायचा असतो. समाज हा विश्ववंद्य आणि विश्वगुरू व्हावा, हा सेवेचा उद्देश असायला हवा, असे मत भारत-भारतीचे संस्थापक अध्यक्ष विनय पत्राळे यांनी व्यक्त केले.

सेवाभावी संस्थांच्या कार्याचा सन्मान करून ते महत्कार्य समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने संपदा सहकारी बँक लि. तर्फे यंदाचा संपदा समाजकल्याण पुरस्कार स्व-रूपवर्धिनी संस्थेला प्रदान करण्यात आला. स.प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे आयोजित कार्यक्रमात स्व-रूपवर्धिनी चे शिरीष पटवर्धन आणि सहकाऱ्यांनी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रुपये ५१ हजार, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदा दुसरे वर्ष होते.

कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळ अध्यक्ष ऍड.एस.के.जैन, संपदा सहकारी बँकेचे अध्यक्ष सी.ई.अश्विनीकुमार उपाध्ये, उपाध्यक्ष सी.ए. महेश लेले, मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सरदेशपांडे, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष मुकुंद भालेराव यांसह संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित होते. अनेक दशके पुण्यातील वंचित समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल  स्व-रूपवर्धिनी संस्थेला पुरस्काराने गौरविण्यात आले.

ऍड.एस.के.जैन म्हणाले, बँकेकडून कर्ज मिळते, तर कर्ज घ्यावे आणि नंतर कर्जमुक्ती मागावी, हा ट्रेंड झाला आहे. सहकारी बँका चालविणे किती कठीण आहे, हे माहीत आहे. बँकेची वृद्धी कमी जास्त झाली, तरी देखील समाजासाठी काम होणे महत्वाचे आहे. त्याकरिता वस्त्यांमध्ये आर्थिक साक्षरता होणे गरजेचे आहे.

पुरस्काराला उत्तर देताना शिरीष पटवर्धन म्हणाले, सामान्य माणसाला अर्थ संचय करण्यासाठी संकलन, संवर्धन आणि संरक्षणाची सुविधा बँक देते. तसेच  बचतीला बळ देण्याचे कामही केले जाते. संपदा सहकारी बँकेप्रमाणेच स्व-रूपवर्धिनीचे कार्य सुरु असून समाजातील बुद्धिवंतांना शोधून त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संस्था करीत आहे.

सी.ई.अश्विनीकुमार उपाध्ये म्हणाले, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यंदा अर्थसाक्षरता विषय घेऊन वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. तसेच बँकिंग सोबत पुरग्रस्ताना मदत देखील मोठ्या प्रमाणात देण्यात आली. बँकेला अ ऑडिट वर्ग मिळाला असून सर्व प्रकारच्या डिजिटल सेवा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. शैलेश परांजपे यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश सरदेशपांडे यांनी आभार मानले.

रसिकांनी अनुभवले लतादीदी, कवी ग्रेस यांचे दुर्मिळ स्मरणरंजन!

‘दीनायन कलापर्व’तून उलगडले हृदयनाथ मंगेशकरांविषयी ‘ह्रद्गत कौतुकोद्गारांचे’; २० वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ ध्वनिचित्रफीतीचे सादरीकरण

पुणे: विश्वविख्यात गायिका असणाऱ्या आपल्या ज्येष्ठ भगिनीकडून, आणि सर्वांत आवडत्या कवीकडून स्वतःविषयीचे भावनोत्कट कौतुकोद्गार ऐकताना स्वतः भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांना पाहण्याचा योग रसिकांनी अनुभवला. आपल्या बंधुंविषयी बोलताना लतादीदींकडून त्यांच्या निर्मळ आवाजातील काही रचना, गाणी, गजल, श्लोक, ज्ञानदेवांच्या रचना, चित्रपटगीते यांचे गुणगुणणेही एक वेगळा अनुभव देणारे ठरले.

पं. हृदययनाथ मंगेशकर यांच्या नुकत्याच झालेल्या ८९ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्येष्ठ निर्माते अरुण काकतकर ‘दीनायन कलापर्व’तर्फे या ध्वनिचित्रफिती रसिकांसमोर आणल्या आणि पं. हृदयनाथ यांच्या बालपणापासूनच्या आठवणींपासूनचा हृद्य प्रवास खुद्द लतादीदींकडून समोर आला. गायिका मनीषा निश्चल्स महक यांच्यातर्फे कार्यक्रमाचे संयोजन केले होते. याप्रसंगी भारती हृदयनाथ मंगेशकर, पं. सत्यशील देशपांडे, निवेदक सुधीर गाडगीळ, अरुण नूलकर, अरुण काकतकर तसेच मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डाॅ. धनंजय केळकर उपस्थित होते. चित्रफीत निर्माते काकतकर यांनी हृदयनाथांना मिठी मारताच दोघेही गलबलून गेले. या दोन महाविभूतींना कॅमेरात कैद करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य असल्याचे भावोद्गार काकतकर यांनी काढले. या दुर्मिळ कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल डॉ. धनंजय केळकर यांनी अरुण काकतकर आणि मनीषा निश्चल यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

बाळने वेगळी शैली घडवली: लतादीदी
हृदयनाथ अर्थात बाळच्या बालपणाविषयी आणि त्यांच्या अपघाताविषयीची माहिती सांगून लतादीदी म्हणाल्या, आमच्या बाबांनी, दीनानाथांनी त्यांच्या काळात प्रचलीत आणि लोकप्रिय असणारी गायनशैली न अंगिकारता, स्वतःची निराळी गायनशैली शोधली, प्रतिभेने वाढवली आणि मग सादर केली, ती लोकप्रिय केली. याबाबतीत बाळने बाबांचाच आदर्श घेऊन काम केले. स्वतःची पूर्णपणे वेगळी, सुंदर, पण गायला कठीण अशी शैली विकसित केली आणि ती आता लोकप्रिय झाल्याचे आपण पाहात आहोत. बाळचे वाचन अफाट आहे. प्रतिभेचे देणे तर आहेच, आवाजही उत्तम आहे. साधनेने त्याने गायन सजवले आहे. तो एकपाठी आहे, त्याचे पाठांतर आश्चर्यकारक आहे. आम्ही मिळून केलेले ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, मीरा, गालिब, शिवकल्याण राजा, सावरकरांची गीते, कोळीगीते सर्वच संगीतप्रकल्प यशस्वी झाले. संगीतकार म्हणून त्याने आता बहिणींपेक्षा निराळे, आणि नवे आवाज शोधावेत, वापरावेत, असे मला वाटते, असा सल्लाही लतादीदींनी या ध्वनिचित्रफितीमध्ये बोलून दाखवला आहे.

एकमेवाद्वितीय स्वरपुरुष: कवी ग्रेस
सुरवातीचे ध्वनिचित्रमुद्रित मनोगत कवी ग्रेस यांचे होते. पं. हृदयनाथ यांच्याविषयी भरभरून बोलताना ग्रेस यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत मांडणी केली. ज्यांना काव्यातले संगीत कळते आणि संगीतातले काव्य आकळते, असे एकमेवाद्वितीय स्वरपुरुष म्हणजे हृदयनाथ आहेत, असे ग्रेस म्हणाले. कवितेतील स्वरानुभूती वाचण्याचा प्रयत्न हृदयनाथ करतात, काव्यानुभूतीतून स्रवणाऱ्या संगीताची आत्ममग्न छाया त्यांच्या सांगीतिक प्रतिभेवर पडल्याचे जाणवते. हेवा करावा, अशी प्रतिभा त्यांना लाभली आहे. माझ्या कवितांच्या माध्यमातून हा स्वरपुरुष मला लाभला, असे ग्रेस म्हणाले.  

डाॅ. धनंजय केळकर म्हणाले, मंगेशकर रुग्णालयाची प्रेरणा लतादीदींची असली तरी प्रत्यक्षातले व्यावहारिक कार्य हृदयनाथ यांनीच पेलले आणि माईंचे स्वप्न पूर्ण केले. पुस्तकातले कवी त्यांनी हृदयस्थ केले. त्यांची विलक्षण प्रतिभा संगीतापुरती नसून, ती आध्यात्मिक पातळीवरील आहे. त्यामुळे त्यांच्या रचना संगीतापलीकडे रसिकाला घेऊन जातात. त्यांच्या भिनलेले भारतीयत्व प्रेरणादायी आहे. त्यांची चिकित्सक पण अभ्यासू वृत्ती अनुकरणीय आहे.

एकलव्य विद्या संकुलास राघवेंद्र बाप्पु मानकर मित्र परिवाराकडून मदतीचा हात

पुणे-वंचित विद्यार्थ्यांसाठी कार्यरत एकलव्य विद्या संकुल या आश्रमशाळेस राघवेंद्र बाप्पु मानकर मित्र परिवाराच्या वतीने मदत देण्यात आली. ५०० ब्लॅंकेट, २०० किलो धान्य व २५ हजार रोख मदत देण्यात आली.

राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू म्हणून थंडीसाठी उपयोगी कपडे आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून शेकडो ब्लॅंकेट जमा झाले होते. याचे वस्तूंचे गरजूंना वाटप करण्याच्या उपक्रमाला आज सुरुवात करण्यात आली. यमगरवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील वंचित विकास प्रतिष्ठान संचलित एकलव्य विद्या संकुल या संस्थेस मदत ५०० ब्लॅंकेट, २०० किलो धान्य, २५ हजार रुपये रोख मदत देण्यात आली. तुळजापूर येथील संस्थेच्या संकुलात हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी राघवेंद्र बाप्पु मानकर म्हणाले,विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समर्पण भावनेने काम करणाऱ्या संस्थांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढेही या संस्थेच्या पाठीशी कायम उभे राहू.

या यमगरवाडी प्रकल्पाचे समन्वयक राजेंद्र कुलकर्णी म्हणाले, बाप्पु मानकर यांचे या उपक्रमाचे अनुकरण सर्वांनी करावे, आपला वाढदिवस अथवा इतर आठवणींच्या दिवशी संस्थेच्या मुलांसाठी मदत केल्यास हे कार्य अधिक जोमाने पुढे जाईल.

यावेळी यमगरवाडी प्रकल्पाचे पुणे येथील समन्वयक राजेंद्रजी कुलकर्णी, रा. स्व. संघाच्या समर्थ भारतचे विनोद खरे, एकलव्य विद्या संकुल आश्रमशाळेचे मुख्याध्यापक कोल्हटकर सर, वसतिगृह समन्वयक फुलाजी ताटीकुंडलवार, विद्यार्थी, सहकारी व राघवेंद्र बाप्पु मानकर मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

यमगरवाडी प्रकल्पाविषयी

एकलव्य विद्या संकुल हे यमगरवाडी प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते. यमगरवाडी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकलव्य विद्या संकुल चालवले जाते. येथील आश्रमशाळेत चालणारे कार्य आणि त्यासाठी घेतले जाणारे परिश्रम मोलाचे आहेत. समर्पित भावनेने केले जाणारे कार्य समाजात किती मोठा बदल घडवू शकते याची प्रचिती येथे भेटीदरम्यान येते.

१९९३ साली लातूर भूकंपाच्या काळात सेवाकार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी भटक्या-विमुक्त समाजाची परिस्थिती पाहून, संघपरिवाराच्या माध्यमातून या संस्थेची वाटचाल सुरू केली. मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या या भटक्या समाजाच्या कुटुंबातील विद्यार्थ्यांचे जीवनमान शिक्षणाच्या माध्यमातून उंचावण्याचा संकल्प संस्थेने केला. सुरुवातीला हे विद्यार्थी शिकण्यासाठी तयार होणेही अवघड असताना, अवघ्या २४ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली संस्था आज ४०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे.

भटक्या-विमुक्त समाजातील ५२ पैकी ३८ जनजातींचे हजारो विद्यार्थी येथे शिकून, समाजात सन्मानाची नोकरी करीत आहेत. अनेक विद्यार्थी आज सरकारी अधिकारी, अभियंते आणि डॉक्टर बनले आहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर येथे विशेष लक्ष दिले जाते. येथील शेकडो विद्यार्थी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये देशपातळीवर विजयी झाले आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे, दि. १ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचे नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास दिनांक ८ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

परीक्षेचे शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे अर्ज http://www.mscepune.in या संकेतस्थळावर विलंब शुल्कासह ९ ते १५ डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबरपर्यंत तसेच अतिविशेष विलंब शुल्कासह २४ ते ३१ डिसेंबरपर्यंत सादर करता येतील. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन आवेदनपत्र भरता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

मानवाची आध्यात्मिक भूक भागविण्यासाठी वेद, गीतेकडे परतण्याची गरज – राज्यपाल

वेदश्री तपोवन मोशी येथे गीता जयंती महोत्सवाला राज्यपाल आचार्य देवव्रत यांची उपस्थिती

पुणे, दि. १: समरसता, बंधुभाव, एकता राखणे ही वेदांची शिकवण असून संघटन ही एक ताकद असल्याचा वेदांचा उपदेश आपल्या जीवनात अंगीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. मानवाची आध्यात्मिक भूक भागविण्यासाठी आपल्याला वेद, गीता, उपनिषदांकडे पुन्हा जावे लागेल, असेही ते यावेळी म्हणाले.

वेदश्री तपोवन, मोशी येथे वेदश्री तपोवन कार्य समिती, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, संत ज्ञानेश्वर गुरुकुल, गीता परिवार, श्री कृष्ण सेवा निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गीता जयंती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी शांतीब्रम्ह ह. भ. प. मारुती महाराज कुरेकर यांना संत ज्ञानेश्वर पुरस्कार, श्री चिलकूर बालाजी वेंकटेश्वर स्वामी मंदिर, हैदराबादचे अर्चक व विश्वस्त सी. एस. रंगनाथन यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार तसेच संत साहित्य अभ्यासक डॉ. मुकुंद दातार यांना समाज सेवा क्षेत्रात निरपेक्ष भावनेने काम केल्याबद्दल मानचिन्ह, पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी अयोध्या येथील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र प्रतिष्ठान अयोध्याचे कोषाध्यक्ष तथा श्रीकृष्ण जन्मभूमी मथुराचे उपाध्यक्ष गोविंद गिरी महाराज, गीता जयंती महोत्सवाचे स्वागताध्यक्ष अभय सुरेशकुमार भुतडा, गीता परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी आदी उपस्थित होते.

स्वामी गोविंद गिरी यांनी वेदांपासून उपनिषदांपर्यंत भारतीय ऋषी मुनींचे ज्ञान येणाऱ्या पिढ्यांच्या माध्यमातून संपूर्ण मानवतेसाठी प्रसारित करण्याची चालविलेली मोहीम महत्वपूर्ण असल्याचे सांगून राज्यपाल देवव्रत म्हणाले, गीता परिवार, तपोवन वेदश्री तसेच देशभरात सुमारे ५० वेद विद्यालयाच्या, गुरुकुलांच्या माध्यमातून गोविंदगिरी महाराज करत असलेले वेद, गीता शिक्षणाचे काम अत्यंत अभिमानाचे आहे. गोविंद गिरी यांनी वेदांची महती पुनरुज्जीवत करण्याचे काम केले. वेद केवळ भारत आणि भारतीयांचाच नव्हे तर विश्वाचा महान वारसा आहे. वेदांचा सार उपनिषदे असून उपनिषदांचा सार गीता आहे, असेही ते म्हणाले.

राज्यपाल पुढे म्हणाले, महाराष्ट्र ही संत महात्म्यांची भूमी राहिली असून छत्रपती शिवाजी महाराज यांनी भारतीय जीवनमूल्यांच्या स्थापनेसाठी मोठे अभियान चालविले तसेच सर्वांना प्रेरित केले. कुरुक्षेत्रावर भगवान कृष्णांनी अर्जुनाच्या माध्यमातून जगाला संस्कृत भाषेत सांगितली. संपूर्ण समाजाने अध्यात्मिक, सामाजिक, भौतिक जीवन कसे जगले पाहिजे याचे मार्गदर्शन गीतेने केले. ही गीता संत ज्ञानेश्वर यांनी प्राकृत भाषेत पोहोचवली. हे ज्ञान हजारो बालकांपर्यंत पोहोचवण्याचे काम कुरेकर महाराज यांनी केले तसेच चिलकूर बालाजी मंदिराचे दरवाजे सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी काम केल्याबद्दल सी. रंगनाथन यांचे अभिनंदन केले.

आचार्य देवव्रत यांनी पुढे नमूद केले, पाच हजार वर्षांपूर्वीपासून गीतेचे ज्ञान मानवतेचे अध्यात्म, कर्म, योग, भक्ती आदी क्षेत्रात मार्गदर्शन करत असून मानवाच्या जीवनातील कोणताही अडथळा, दु:खाचे निवारण नाही ज्यावर गीतेमध्ये उपाय नाही. हा आपल्या भारतीय संस्कृतीचा वारसा जो वेदांतून प्रवाहित झाला, उपनिषदातून वाढला आणि गीतेतून प्रवाहित झाला. आज युवकांना गीतेचे ज्ञान दिल्यास ते भोगवादापासून, व्यसनांपासून दूर राहतील, असेही मत त्यांनी मांडले.

ते पुढे म्हणाले, एका काळी जगातील सर्व देशातील विद्यार्थी भारतातील गुरुकुलातील आचार्यांकडून शिक्षण घेत होते. येथे जगात मोठ्या प्रमाणात व्यापार होत असल्याने देश समृद्ध होता. आज आपल्या भाषा, संस्कृतीवर अभिमान करत नसताना आपली वेश भूषा आणि खान पान गुलामीच्या काळाप्रमाणे प्रभावित झालेली असताना आज पुन्हा गोविंद गिरी ह. भ.प. कुरेकर, सी. रंगराजन यांच्यासारख्या व्यक्ती भारतीय संस्कृतीचा गौरव वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले.

गोविंद गिरी म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी गीतेला प्राकृत भाषेत भाषांतरीत करून सामान्यांपर्यंत गीतेचे ज्ञान पोहोचवण्याचे काम केले. त्यांनी आळंदीतून हे काम केल्यामुळे गीता जयंती महोत्सव आणि गीतेचा मराठी भाषेत अभ्यास खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणे योग्य आहे. देशातील सर्व घटकांना गीतेने मार्गदर्शन केले आहे. क्रांतीकारकांनीही गीतेचा प्रचार व अभ्यास केला, असेही ते म्हणाले.

यावेळी ह. भ. प. कुरेकर तसेच रंगनाथन यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी श्लोकांची अंताक्षरी, गीतेतील श्लोकांकावरून श्लोकाचे गायन आदींचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. वेद विद्यालय, गुरुकुल, वारकरी विद्यालय आदी ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या आणि गीता अभ्यासाच्या अनुषंगाने आयोजित विविध स्पर्धात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी पुरस्कार देण्यात आले.

राज्यपालांची वेदश्री तपोवन वेद विद्यालयाला भेट
तत्पूर्वी राज्यपालांनी वेदश्री तपोवन येथील वेद विद्यालयाला भेट दिली. या ठिकाणी वेदाचे अध्यापन करण्यात येते. येथे वेद, उपनिषदे आदींच्या अभ्यासासाठी सुसज्ज ग्रंथालय असून ई- लायब्ररी आहे. प्राचीन ग्रंथ स्कॅन करून ठेवण्याचे काम येथे सुरू आहे, अशी माहिती यावेळी राज्यपालांना देण्यात आली.

पार्थ पवार आणि मंत्री मुरलीधर मोहोळांवर गुन्हे कधी दाखल करणार?

देशासाठी त्याग व बलिदानाची परंपरा असलेल्या गांधी घराण्यावर राजकीय सुडबुद्धीने गुन्हा…

मुंबई, दि. १ डिसेंबर २०२५..नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गुन्हे दाखल करणारे मोदी शाह यांचे सरकार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे का दाखल करत नाही, असा सवालही सपकाळ यांनी केला आहे.राज्यातील २४६ नगरपालिका ४२ नगरपंचायतींचे मतदान एक दिवसावर आले असताना २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आश्चर्यकारक व अनाकलनीय आहे. कोर्टाच्या निकालाने या निवडणुका पुढे ढकलल्या असे जर सांगितले जात असेल तर हा निकाल २२ नोव्हेंबरला आला होता मग ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे ८ दिवस निवडणूक आयोग काय झोपा काढत होते काय? असा संतप्त सवाल करून निवडणूक आयोग स्वत:चे नियम पाळू शकत नाही. आयोगाचा भोंगळ कारभार सुरु आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार राजकीय सुडबुद्धीतून केलेला आहे. नरेंद्र मोदी व अमित शाह हे विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेता गैरवापर करत आहेत. नॅशनल हेरॉल्डचे प्रकरण निराधार व कपोल कल्पित आहे. यामध्ये अनेक चौकशा करण्यात आल्या पण काहीही ठोस नाही तरिही केवळ गांधी कुटुंबाला बदनाम करणे त्यांचा नाहक त्रास देणे यासाठी मोदी शाह सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचे राजकारण करत आहेत. गांधी कुटुंबाचे देशासाठी मोठे योगदान आहे, त्याग व बलिदानाची परंपरा आहे. मोदी शाह यांच्या दडपशाहीविरोधात लोकशाही व संविधान वाचवण्याचे काम राहुलजी करत असल्याने अशी कारवाई केली जात आहे. काँग्रेस अशा कारवायांना भिक घालत नाही. मोदी शाह यांच्या सुडाच्या राजकारणाचा आम्ही धिक्कार करतो, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास १० वर्षानंतर होत आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात मात्र त्यातही गोंधळ निर्माण करण्यात आला. आधी अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट केली, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ करण्यात आले. दुबार/तिबार नावे मतदार यादीत दाखवली, निवडणुका जाहीर झाल्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर कोर्टाने निर्देश दिल्याने अनेक नगरपंचायतीमधील भवितव्य टांगणीला लागले आहे आणि आता तर २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका स्थगित करून त्यांचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ३ तारखेच्या निकालाचा या निवडणुकावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे ३ तारखेचा निकालही २० तारखेच्या मतदानानंतरच जाहीर करावा. आपलेच नियमही आयोगाला पाळता येत नाहीत हा कसला आयोग? निवडणुका या निष्पक्ष, पारदर्शक पद्धतीने पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे पण निवडणूक आयोगाचा मागील काही वर्षांतील कारभार पाहता आयोगाला निवडणुकाही व्यवस्थित घेता येत नाहीत, हे खेदाने म्हणावे लागते.

पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे भव्य उद्घाटन

पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे शहर आणि पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेला भवानी पेठ येथील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममध्ये भव्य सुरुवात झाली. ही स्पर्धा १४ वर्षाखालील मुले, १९ वर्षाखालील मुले तसेच १९ वर्षाखालील मुली या गटांसाठी २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष मा. आमदार गौतम चाबुकस्वार आणि ज्येष्ठ बॉक्सिंग प्रशिक्षक सिलोन अँड्र्यूज यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे उपस्थित होते.

या प्रसंगी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे महासचिव भरतकुमार व्हावळ, क्रीडा अधिकारी सौ. अश्विनी हत्तरगे, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे सचिव व महाराष्ट्र रेफ्री व जज कमिशनचे सचिव अभिमन्यू सूर्यवंशी, पंच अभिमन्यू सूर्यवंशी, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष सुरेश गायकवाड, जीवनलाल निंदाने, तसेच स्पर्धेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत शिंदे उपस्थित होते. ज्येष्ठ प्रशिक्षक उमेश जगदाळे हे उपस्थित होते

सर्व मान्यवरांचे स्वागत पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव व महाराष्ट्र कोचेस कमिशनचे अध्यक्ष विजय गुजर यांनी केले.

उत्कृष्ट रिंग ऑफिशियलची नियुक्ती

स्पर्धेचे वेळापत्रक

१४ वर्षाखालील मुले : २९ नोव्हेंबर

१९ वर्षाखालील मुले : ३० नोव्हेंबर

१९ वर्षाखालील मुली : १ डिसेंबर २०२५

पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, अहिल्यानगर जिल्हा, अहिल्यानगर शहर, सोलापूर जिल्हा आणि सोलापूर शहर या संघांमधील एकूण १९५ बॉक्सर स्पर्धेत सहभागी झाले असून स्पर्धेला उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे.

१४ वर्षाखालील विभागीय शालेय गट – फायनल निकाल

वजन गट 28–30 किलो
विजेता : पृथ्वी खामकर (पिंपरी चिंचवड)
पराभूत : हार्दिक वेरूळकर (पुणे शहर)

वजन गट 30–32 किलो
विजेता : प्रणव शिंदे (पुणे जिल्हा)
पराभूत : पठाण अबरार (अहिल्यानगर)

वजन गट 32–34 किलो
विजेता : साई गायकवाड (पिंपरी चिंचवड)
पराभूत : आर्यन बनसोडे (पुणे जिल्हा)
वजन गट 34–36 किलो
विजेता : पियुष चौधरी (पुणे शहर)
पराभूत : आर्यन रुपनवर (सोलापूर जिल्हा)

वजन गट 36–38 किलो
विजेता : स्वराज शिंदे (पिंपरी चिंचवड)
पराभूत : युग शर्मा (पुणे शहर)

वजन गट 38–40 किलो
विजेता : समर्थ सोनवणे (पुणे शहर)
पराभूत : प्रणव पाटील (पिंपरी चिंचवड)

वजन गट 40–42 किलो
विजेता : श्रीजी पवार (पुणे शहर)
पराभूत : यश इंगळे (सोलापूर जिल्हा)

वजन गट 42–44 किलो
विजेता : सुवर्ण वेदांत (पिंपरी चिंचवड)
पराभूत : संपादन गाडेराव (पुणे शहर)

वजन गट 44–46 किलो
विजेता : आदित्य उत्वळ (पिंपरी चिंचवड)
पराभूत : चिन्मय महाजन (पुणे शहर)

वजन गट 46–48 किलो
विजेता : अर्णव लोखंडे (पिंपरी चिंचवड)
पराभूत : अंकित राज (अहिल्यानगर)

वजन गट 48–50 किलो
विजेता : साई भंडारी (पुणे शहर)
पराभूत : विरेन हरगुडे (पिंपरी चिंचवड)

सायली पवार यांची रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या शहर सरचिटणीस पदी नियुक्ती

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे शहर महिला आघाडीच्या शहर सरचिटणीस पदी सायली विजय पवार यांची नियुक्ती शहराध्यक्ष हिमाली कांबळे यांच्या हस्ते करण्यात आली.
सायली पवार यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, प्रभारी शैलेंद्र चव्हाण, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, असित गांगुर्डे, अशोक कांबळे , महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सायली पवार या गेल्या दहा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत. शहरातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये नागरी सुविधांचे प्रश्न, शालेय साहित्य वाटप, महिला बचत गट, तरुणांना रोजगार मिळवून देणे अशा विविध कार्य त्यांनी केले आहे. त्या पदवीधर असून महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे त्यांच्या निवडीमुळे शिवाजीनगर मतदार संघामध्ये उत्साहाचे वातावरण आहे रिपब्लिकन पक्षाच्या वाढीसाठी त्यांचा निश्चित उपयोग होईल असा विश्वास पुणे शहर महिला अध्यक्ष हिमाली कांबळे यांनी व्यक्त केला.

अमित शहाच शिंदे गटाचा कोथळा काढतील:ठाकरे गटाचे तोफखाना प्रमुख संजय राऊत आजारपणानंतर पुन्हा मैदानात

शिंदेंचे 35 आमदार फुटतील-शिंदे गटाची गुलाबो म्हणत हेटाळणी
मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत आजारपणानंतर आज पुन्हा पत्रकारांना सामोरे गेले. त्यात त्यांनी भाजपसह शिंदे गटावर सडकून टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच एकेदिवशी शिंदे गटाचा कोथळा बाहेर काढतील असा दावा केला. यावेळी त्यांनी आपल्या प्रकृतीवरही भाष्य केले. माझी तब्येत सुधारत आहे. उपचार कठोर असतात. आजापेक्षा उपचार भयंकर असतात, असे ते म्हणालेत.

संजय राऊत आजारपणामुळे गत काही दिवसांपासून सार्वजनिक जिवनापासून दूर होते. बऱ्याच दिवसाच्या कालखंडानंतर आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी सत्ताधारी महायुतीवर चौफेर हल्ला चढवला. मी एकनाथ शिंदेंची शिवसेना असे म्हणण्यास तयार नाही. एकदिवस अमित शहाच शिंदेसेनेचा कोथळा बाहेर काढतील हे लिहून घ्या. त्यांनी आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही बाहेर पडलो. पण त्यांच्या स्वभावानुसार, कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढला जाईल.

शिंदेचे 35 आमदार फुटतील. ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेसोबत केले, अगदी त्याच पद्धतीने शिंदेंचे आमदार फोडण्याचे काम व्यवस्थितपणे सुरू आहे. रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची नेमणूक त्यासाठीच करण्यात आली आहे. आपण हे राजकारण समजून घेतले पाहिजे. यांना (शिंदे) वाटत असेल की दिल्लीचे 2 नेते आमच्या पाठीशी आहेत, पण ते कुणाचेही नाहीत, ते कुणाच्याही पाठिशी नाहीत. त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसताना मागेपुढे पाहिले नाही, मग हे शिंदे कोण? शिंदे तर त्यांनीच पाळलेले आहे.

शिंदे यांचा पक्ष आधीच फुटलेला आहे. हा अमित शहा यांनी निर्माण केलेला गट आहे, हा अमित शहांचा पक्ष आहे, शिंदेंचा पक्ष नाही. यांनी (शिंदे) कधी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्यात? हे कधी शिवसेनेसाठी तुरूंगात गेले? कधी आंदोलने केली? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती राऊत यांनी या प्रकरणी केली.

संजय राऊत यांनी यावेळी ठाकरे बंधूंच्या भेटीवरही भाष्य केले. तसेच मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसलाही धारेवर धरले. ते म्हणाले, राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांची एक भेट झाली. त्यात राज यांनी उद्धव यांना एक प्रेझेंटेशन दाखवले. त्यांचे जे काही चालले आहे ते अतिशय उत्तम चालले आहे. राज ठाकरे सोबत आल्यामुळे भाजपचा पराभव होईल. भाजप हा मुंबईचा एक नंबरचा शत्रू आहे. मुंबई अदानींच्या घशात घातली जात आहे. हे थांबवायचे असेल तर राज ठाकरे यांना सोबत घेणे आवश्यक आहे.

या प्रकरणी एकनाथ शिंदे काय म्हणतात ते महत्त्वाचे नाही. काँग्रेसने आमच्यासोबत असणे ही आमची भूमिका आहे. पण बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला असेल, तर त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्यात आमची हरकत नाही, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी यावेळी आपल्या तब्येतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, मी एका महिन्याहूनही अधिक काळापासून कैदखान्यात आहे. घरच्या व रुग्णालयाच्या. उद्धव ठाकरे यांचेही माझ्यावर बारीक लक्ष आहे. मी कुठे बाहेर पडतोय का? हे ते पाहतात. आत्ताही त्यांची परवानगी नाही. पण माझ्या तब्बेतीत हळूहळू सुधारणा होत आहे. अजूनही सुधारणा होईल. उपचार कठोर असतात. आजारापेक्षा उपचार भयंकर असतात. डिसेंबरनंतर मी पूर्णपणे बराई होऊन येईन. ते निश्चितच होईल. रेडिएशनचा भाग संपला आहे. डॉक्टरांची टीम चांगले काम करत आहे. प्रकृती हळूहळू सुधारत आहे. तुरुंगात असतानाच हा आजार सुरू झाला. मी बरा असतो तर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरलो असतो.

संजय राऊत यांनी यावेळी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवडणुकीत होणाऱ्या लक्ष्मीदर्शनाच्या विधानाचाही समाचार घेतला. या प्रकरणी त्यांनी शिंदे गटाचा उल्लेख गुलाबो गँग म्हणून केला. ते म्हणाले, शिंदे गटाच्या गुलाबो गँगने 1 डिसेंबरला लक्ष्मीदर्शन होणार असल्याचे सांगितले आहे. निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे. काही ठिकाणी एका मतासाठी 10 ते 15 हजार असे लक्ष्मीदर्शन होत आहे. नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांत पैशांचा एवढा खेळी कधीही झाला नव्हता. राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार या निवडणुका लढवतच नव्हते.

स्थानिक पातळीवर या निवडणुका होत होत्या. पण आता 5-6 हेलिकॉप्टर्स, खासगी विमाने हे सर्वकाही पहावयास मिळत आहे. आम्ही या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांवर सोडल्या आहेत. लोक म्हणतात विरोधक निस्तेज आहेत. तसे मुळीच नाही. या राज्याची निवडणूक संस्कृती उद्ध्वस्त झाली आहे. मागच्या 405 वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे घडले आहे. सध्याच्या घडीला तू मोठा की मी मोठा अशी स्पर्धा तीन सत्ताधारी पक्षांत सुरू झाली आहे, असे संजय राऊत म्हणाले.

मोदी, शिंदे, फडणवीसांकडून तब्येतीची चौकशी-संजय राऊत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आदी सर्वांनी आपल्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहितीही यावेळी दिली. मी आजारी असताना देवेंद्र फडणवीस यांनी माझी चौकशी केली. मदतीचे आश्वासन दिले. नरेंद्र मोदींनीही माझी चौकशी केली. मला फोन आला होता. एकनाथ शिंदेंनीही फोन केला होता. कारण, राजकारणापलिकडे नाती जपायची असतात, असे ते म्हणाले.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीत होणाऱ्या सुधारणेवर आनंद व्यक्त केला आहे. संजय राऊत बरे झाले याचा मला आनंद आहे. त्यांनी त्यांचे काम करावे. आम्ही आमचे काम करतो. संजय राऊत रोज काय बोलतात त्याला उत्तर देणे मी महत्त्वाचे समजत नाही, असे ते म्हणाले.

निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय चुकीचा:मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयोगावर आगपाखड

शिंदेंची भेट टाळली…आयोग कुणाचा सल्ला घेत आहे याची कल्पना नाही
छत्रपती संभाजीनगर- राज्य निडवणूक आयोगाचा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय अतिशय चुकीचा असल्याचा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. आयोग कोणता कायदा काढतंय किंवा तो कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. पण एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणूकच पुढे ढकलायची हे अतिशय चुकीचे आहे, असे ते म्हणालेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट टाळली. तसेच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर झालेल्या छापेमारीवरही भाष्य केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रचारसभेला जाण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी निवडणुका लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावरून निवडणूक आयोगावर निशाणा साधला. ते म्हणाले, माझ्या मते निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. या निवडणुका रद्द करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा पद्धतीने तर प्रत्येकवेळी कुणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणुका पोस्टपाँड होतील. असे आजवर कधीच झाले नाही.

फडणवीस म्हणाले, निवडणूक आयोग कुठला कायदा काढतंय किंवा आयोग कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही. पण मी जो कायदा पाहिला, जेवढा माझा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशीही बोललो, या सर्वांचे मत आहे की, अशा पद्धतीने या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून पुढे ढकलता येत नाहीत. हे अतिशय चुकीचे आहे. पण निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यांना निवडणूक घेण्याचा अधिकार आहे. पण माझे मत आहे की, निवडणूक आयोगाने निवडणुका लांबणीवर टाकलेला निर्णय अतिशय चुकीचा आहे. प्रामाणिकपणे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांवर झालेला हा अन्याय आहे. उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही ती लांबणीवर टाकता, यामुळे त्यांचे श्रम व मेहनत वाया गेली. आता 15 – 20 दिवस त्यांनी पुन्हा प्रचार करायचा. सरकार या प्रकरणी निवडणूक आयोगापुढे सादरीकरण करून हा निर्णय चुकीचा आहे हे सांगेन, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दोघेही छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. पण तिथेही या दोन्ही नेत्यांची भेट झाली नाही. पत्रकारांनी याविषयी फडणवीसांना छेडले असता मी रात्री लवकर आलो व सकाळी लवकर जात असल्यामुळे आमची भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले. माध्यमांना आता दिवसभरासाठी खाद्य मिळाले आहे. पण मी रात्री उशिरा आलो. आज सकाळी 1 तास लवकर जात आहे. कारण, मी माहिती घेतली त्यांची सभा माझ्या सभेनंतर 1 तास नंतर आहे. त्यामुळे भेट झाली नाही. उद्या होईल, त्याला काय? शेवटी आम्ही दोघेही प्रचारात मग्न आहोत.

आमचे फोनवर रोजच बोलणे होते. त्यामुळे आता भेट झाली किंवा न झाली हा विषय नाही. ते अजून तयार व्हायचेत. मला लवकर निघायचे आहेत. कारण माझ्या सभा लवकर ठेवल्यात. यात कोणती मोठी गोष्ट आहे. तुम्ही चालवा दिवसभर झाली नाही भेट म्हणून, असे फडणवीस हसत म्हणाले.

निवडणुका स्थगितीबाबत आयोगाने स्पष्टीकरण द्यावे अन्यथा… गोपाळदादा तिवारी

पुणे:

राज्यातील कोणत्याही जागां वरील निवडणुका स्थगित करावयाच्या आहेत वा कसे व कोणत्या कारणासाठी(?)याचे स्पष्टीकरण *राज्य निवडणूक आयोगाने.. ‘पत्रकार परिषद’ घेऊनच,निर्णय जाहीर करावा… मोघम सर्क्युलर काढून करू नये अशी मागणी काँग्रेस ने केली आहेअन्यथा होणाऱ्या गोंधळास व लोकशाही’च्या हत्येस,
निवडणूक आयोग जबाबदार राहील असा सक्त इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी रविवार दि ३० नोव्हें रोजी ऊशीरा दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे.
ते पुढे म्हणाले की, आमचे माहीती नुसार
राज्यातील काही नगर परीषदा व नगराध्यक्ष पदाच्याच निवडणुका स्थगित वा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात असून.. निवडणूक आयोगाचा २९ नोव्हेंबर चा निर्णय आज ३० नोव्हें रोजी देखील स्पष्टपणे जाहीर होत नसुन,
“राज्य निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांचे दबावाखाली” काम करत असून,
सत्ताधाऱ्यांचे हातचे बाहुले बनत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.

स्वच्छता मोहीम हा एक अनोखा उत्सव : नवल किशोर राम

पुणे: महानगरपालिका- घनकचरा व पर्यावरण विभाग यांच्या वतीने आज नदी महोत्सव २०२५- स्वच्छ नदी, सुंदर पुणे कार्यक्रमांतर्गत २६३ टन राडारोडा, 11 टन गवत व २o टन कचरा गोळा करण्यात आला.या महोत्सवात नदी स्वच्छता मोहिमेसोबत, ४ पथनाट्य, ड्रम-सर्कल्स, ७ स्टेज सांस्कृतिक कार्यक्रम, नदी संवर्धनाबाबत जनजागृती रॅली, १२ स्वयंसेवी संस्थांचे आणि ५ महानगरपालिकेच्या विभागांचे पर्यावरण विषयक जनजागृती स्टॉल्स, पर्यावरण प्रदर्शने, उद्यान विभागा मार्फत रोपांचे मोफत वाटप व नागरिक सहभागासाठी बुथ अशा प्रकारे पर्यावरणीय बांधिलकीला बळकटी देण्यासाठी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला होता. अशा या अनोख्या कार्यक्रमात नागरिकांनी उत्साहवर्धक वातावरणात श्रमदान करून ‘नदी महोत्सव २०२५- स्वच्छ, नदी सुंदर पुणे’ मध्ये मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन सदैव तत्पर आहेच परंतु पुणे शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग व सहकार्य देखील अतिशय महत्वाचे आहे असा संदेश पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला.

नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा हा River Week म्हणून आणि २ डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील स्वच्छता करणेसाठी “नदी महोत्सव २०२५- स्वच्छ, नदी सुंदर पुणे” कार्यक्रम आज दि. 30 नोव्हेंबर २०२५ रोजी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व पर्यावरण विभागामार्फत आयोजित करण्यात आला. महापालिका आयुक्तांनी सांगितले प्रमाणे ही स्वच्छता मोहीम केवळ स्वच्छता मोहीम नसून एक अनोख्या प्रकारचा महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला ज्यामध्ये नागरिकांना स्वच्छता मोहीमसोबतच एक मुक्त व्यासपीठ देवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

पर्यावरण विभाग उपआयुक्त किशोरी तोडमल- शिंदे यांनी सांगितले की,हा नदी महोत्सव पुणे महानगरपालिका, युवा फॉर अॅक्शन, इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशन आणि जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन व इतर स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सकाळी ७.०० ते १०.०० भिडे पूलापासून ते म्हात्रे पूल पर्यंत स्वच्छता मोहीमद्वारे साजरा केला गेला. या मोहिमेत सुमारे ३००० लोक सहभागी झाले यामध्ये शाळा महाविद्यालयाचे विद्याथी, नागरिक, स्वयंसेवीसंस्था, कॉर्पोरेट कंपनीचे कर्मचारी, बँक कर्मचारी, हेल्थ केअर कंपनी, उत्पादक कंपनी, महापालिकेचे अधिकारी कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून २६३ टन राडारोडा, 11 टन गवत व २o टन कचरा गोळा करण्यात आला. नदी स्वच्छतेच्या कामाकरिता ५ JCB, ८ घंटागाडी, ६ कटिंगगाडी, ३ कंटेनर, २ हायवा, १ जटायू, ६ छोटा हत्ती, ५ टिपर, १५ आदर पूनावाला गाडी, ४ ग्लटर इत्यादी यंत्रणा वापरण्यात आली. नदी स्वच्छता कामामध्ये पुणे महानगरपालिकेचे विविध विभाग जसे कि, भवन, उद्यान, मलनिस्सारण, घनकचरा, पर्यावरण, नदी सुधार प्रकल्प, विद्युत, सोशल मिडीया, आरोग्य, रोड, ट्राफिक, सुरक्षा, स्मार्टसिटी, अग्निशामक, जनसंपर्क कार्यालय, वारजे कर्वेनगर, घोले रोड, कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय, परिमंडळ २ इत्यादींच्या मार्फत सहकार्य देण्यात आले. Red FM यांनी नदी महोत्सव २०२५ या कार्यक्रमाची प्रसिद्धी देण्यासाठी सहयोग दिला.

या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, सचिन्द्र प्रताप सिंग, शिक्षण आयुक्त, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, संदीप गिल, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण तसेच पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), पृथ्वीराज बी पी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ), ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि), प्रशांत वाघमारे, शहर अभियंता पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेचे घनकचरा विभागाचे उप आयुक्त अविनाश सकपाळ, पर्यावरण विभागाच्या किशोरी शिदे, परिमंडळ २ चे संतोष वारूळे व महापालिकेचे सर्व विभाग प्रमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

                    

शब्द पाळल्याचे, समस्या सोडवल्याचे समाधान, खूप आनंद देणारे – मुरलीधर मोहोळ

सलग चौदावे खासदार जनसंपर्क सेवा अभियान यशस्वी

पुणे —  पुणेकरांनी खासदार म्हणून मला जबाबदारीने, अपेक्षेने निवडून दिले आहे. खासदार म्हणून नागरिकांच्या संपर्कात राहीन, असा शब्द मी दिला होता. खासदार झाल्यानंतर चौदा जनता दरबार यशस्वीरित्या पार पडले असून मी माझा शब्द पाळला आहे, असे पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी सांगितले. या दरबारांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या एकाच छताखाली सोडवता आल्याचे समाधान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मोहोळ यांचे चौदावे खासदार जनसंपर्क सेवा अभियान रविवारी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात पार पडले. रास्ता पेठेतील रवींद्र नाईक चौकात झालेल्या या अभियानावेळी खासदार मोहोळ यांच्यासह आमदार सुनील कांबळे, भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख गणेश बीडकर उपस्थित होते. तसेच पुणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस दल, कॅन्टोन्मेंट बोर्ड, रेल्वे, नागरी विमान वाहतूक, सहकार आदी शासकीय यंत्रणांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

‘​खासदार झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात खासदार जनसंपर्क सेवा अभियान नावाने मी जनता दरबार सुरू केला. पुणे लोकसभेअंतर्गत येणाऱ्या विधानसभांपैकी एका विधानसभा मतदारसंघात आमचे आमदार व इतर पदाधिकाऱ्यांसह दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा दरबार घेतला जातो. त्याप्रमाणे सलग चौदा महिन्यात चौदा जनता दरबार पार पडले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन फेऱ्या पार पडल्या असून, तीन विधानसभेत तिसरी फेरीही पार पडल्याचे समाधान आहे,’ असे मोहोळ म्हणाले.

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाची वैशिष्ट्ये

  • सर्व शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
  • कोणतीही नागरी अथवा वैयक्तिक समस्या थेट मांडण्याची संधी.
  • सर्व शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन व मदत
  • निम्म्याहून अधिक तक्रारींचा तत्काळ निपटारा.
  • उर्वरित समस्यांबाबत अखेरपर्यंत यशस्वी पाठपुरावा.

“​नागरिकांना आवश्यक सेवासुविधा, योजना, समस्यांसाठी एकाच छताखाली सेवा मिळावी, हा या अभियानाचा उद्देश आहे. नागरिकांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळत असून खासदार जनसंपर्क सेवा अभियानात आपली समस्या नक्की सुटेल, याची खात्री पुणेकरांना पटली आहे.”

मुरलीधर मोहोळ
केंद्रीय राज्यमंत्री
खासदार, पुणे

खेळाडूनी अधिकाधिक पदके महाराष्ट्राला मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील राहावे-हणुमंत पाटील

राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धा बारामती येथे संपन्न

पुणे, दि. 30 : खेळाडुंनी उत्तम खेळ करून राष्ट्रीय स्पर्धेत अधिकाधिक पदके महाराष्ट्राला मिळतील याकरिता प्रयत्नशील रहावे, खेळाडूनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्पर्धा खेळाव्यात. अतिशय उत्साहाने स्पर्धेला सामोरे जावे. खेळाच्या अनुषंगाने बारामती येथे खेळाडूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. सॉफ्ट टेनिस या खेळाचा आशियाई खेळामध्ये समावेश करण्यात आला आहे. शासनस्तरावर ५ टक्के आरक्षण देखील असल्याने या खेळात अलीकडच्या काळात चुरस निर्माण झाल्याचे दिसून येते, असे मत बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेच्या उद्धाटनप्रसंगी केले. क्रीडा युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल पुणे बारामती येथे २७ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री जगन्नाथ लकडे, तालुका क्रीडा अधिकारी, बारामती महेश चावले, बारामती तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोमणे, महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे उपाध्यक्ष दिपक अरडे, पुणे जिल्हा सॉफ्ट टेनिसचे सचिव विल्सन अँड्रूस,प्रो कबड्डी खेळाडू दादा आव्हाड आदी उपस्थित होते.

श्री. विल्सन अँड्रूस यांनी खेळात झालेले बदलाविषयी माहिती दिली. खेळाडूंनी संघभावनेने खेळ खेळावे, जिल्हा, राज्य आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन श्री. अँड्रूस यां म्हणाले.

श्री. लकडे यांनी प्रास्ताविकात राज्याच्या आठ विभागातून ३०० खेळाडूं, प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडू हे १० ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत देवास मध्यप्रदेश येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा निवड होणारा संघ सहभागी होणार आहे. यावेळी निवड समिती म्हणून विल्सन अँड्रूस, प्रशांत रणदिवे, विजय पळसकर यांनी काम पाहिले, असेही श्री. लकडे म्हणाले.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय सॉफ्ट टेनिस खेळाडू आयेशा इंगवले या खेळाडूंला सन्मानित करण्यात आले.