Home Blog Page 2582

उद्योग क्षेत्रातील नव्या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा – उद्योग मंत्री सुभाष देसाई

0

मुंबई, दि. १७: संकटासोबत संधी निर्माण होते. कोरोना संकटामुळे उद्योग क्षेत्रांत अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा, याकामी महाराष्ट्र सरकार आपल्याला पाठिशी उभे आहे. मराठमोळ्या हिमतीमुळेच कोरोनाच्या संकटावर आपण मात करून पुढे जाऊ, असा विश्वास उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला. ‘ऑल इंडिया सारस्वत कल्चरल’ संघटनेच्या वतीने आयोजित ‘उद्योग क्षेत्रापुढील आव्हाने’ या विषयावरील वेबिनारमध्ये श्री. देसाई बोलत होते. यावेळी संघटनेचे अजित गुंजीकर, किशोर मासूरकर, नरेंद्र वझे,स्मिती गवाणकर आदी उपस्थित होते.

सध्या संपूर्ण जग एका वेगळ्या संकटाला तोंड देत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे पुढे काय होणार, असा प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. परंतु या संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासन व उद्योग विभाग सज्ज झाला आहे. संकटासोबत संधी मिळते हे हेरून उद्योग विभागाने विविध धोरणं आणि योजना आखल्या आहेत. त्याचा मराठी माणसांनी फायदा घ्यावा व महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या वेगळ्या उंचीवर नेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले.

कोरोनामुळे अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडत आहेत. त्यांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी भूखंड, रस्ते आदी सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. एमआयडीसीने या आणि उद्योग सुरू करा, ही संकल्पना राबविण्यासाठी नवीन उद्योगांसाठी तयार शेड तयार करण्याचाही निर्णय़ घेतला आहे. गुंतवणुकदार यंत्र-सामुग्री आणून थेट उत्पादन सुरू करू शकतील. याशिवाय उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या विविध परवान्यांचा जाच कमी करून महापरवाना पद्धत सुरू केली आहे. शिवाय मोठ्या गुंतवणुकदारांसाठी उद्योगमित्र संकल्पना हाती घेतली आहे. उद्योग विभागाचा एक अधिकारी त्या गुंतवणुकदारांसोबत पहिल्या दिवसांपासून उत्पादन सुरू होईपर्यंत सर्व गोष्टींचा पाठपुरावा करणार आहे. आता गुंतवणुकदारांनी पुढे यावे आणि उद्योग सुरू करावेत, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले.

उद्योगांत कामागारांची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी ‘कामगार विनिमय ब्युरो’ स्थापन केला जाणार आहे. यावर लवकरच बैठक होईल. कामगारांची नोंदणी करून गरजेनुसार उद्योगांना कामगारांचा पुरवठा केला जाईल. यावेळी अल्पकालिन प्रशिक्षण केंद्र देखील सुरू करण्यात येईल. महाराष्ट्रात कामगारांची टंचाई भासणार नाही, याची शासन काळजी घेत आहे. याशिवाय असंघटीत क्षेत्र व कामगारांना शासन मदत करण्यास तयार आहे.

सत्तर हजार उद्योगांना परवाने, आरोग्याला प्राधान्य

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना राज्यात सत्तर हजार उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पन्नास हजार उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. हे करताना प्रत्येकाच्या जीवनाची काळजी घेतली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लोकांच्या जीवनाला व आरोग्याला अधिक प्राधान्य दिले असल्याने उद्योगांत काम करणाऱ्या कामगारांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना दिल्याआहेत.

केंद्राच्या पॅकेजचा सर्व घटकांना फायदा

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये उद्योगांसाठी अनेक सवलतींचा वर्षाव केलेला आहे. सेवा, उत्पादन क्षेत्राला दिलासा आहे. सोबत पर्यटन, वाहतूक आदी उद्योग क्षेत्रासाठी मोठी संधी आहे. याचा बारकाईने अभ्यास केल्यास त्याचे लाभ समजू शकतात. त्यामुळे या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले.

औषध उत्पादन क्षेत्रासाठी लवकरच फार्माधोरण

कोरोना संकटकाळात औषध निर्माण क्षेत्राने मोठे काम केले आहे. आरोग्याशी निगडीत गोष्टी पुरवण्याकामी या क्षेत्राचा मोठा वाटा राहीला आहे. या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी फार्मा पॉलिसी तयार केली जाणार आहे. लवकरच यासाठी बैठक घेतली जाईल. यामध्ये फार्मा क्षेत्रातील उद्योजक, सीईओंना निमंत्रित केले जाईल. याशिवाय एक्सपोर्ट प्रमोशन काऊन्सिलचे प्रतिनिधी असतील. या बैठकीतील चर्चेनंतर फार्मा क्षेत्रासाठी चांगले धोरण तयार केले जाईल.

उद्योगांचे विकेंद्रीकरणासाठी गुंतवणुकदारांनी पुढे यावे

मुंबई, पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक झालेली आहे. कोरोनामुळे या भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी शासनाने उद्योगांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला आहे. गुंतवणुकदारांनी राज्य शासनाचे धोरण समजून घ्यावे. बाहेर जिल्ह्यात आपले प्रकल्प सुरू करावेत, असे आवाहन श्री. देसाई यांनी केले.

शिर्डी संस्थान देशासाठी सरकारला सोनं देण्यास तयार

मुंबई – कोरोनामुळे अडचणीत असलेल्या उद्योगधंदे, नोकरदार, मजूर वर्गाला दिलासा देण्यासाठी त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांची घोषणा ही समाधानाची बाब आहे, आता त्याचा योग्य विनियोग होईल ही अपेक्षा आहे असं सांगितलं. तसेच केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. चव्हाण यांच्या या सूचनेला शिर्डीच्या साई संस्थानने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

शिर्डी हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे देवस्थान मानले जाते. शिर्डी देवस्थानकडे सध्या सुमारे साडेचारशे किलो सोने आहे. भक्तांनी ते विविध प्रकारे दान म्हणून दिलेले आहे. शिर्डी संस्थानचे वार्षिक उत्त्पन्न ७०० कोटी असून विविध प्रकारचा वार्षिक खर्च ६०० कोटी रुपये इतका आहे. लाकडाऊनमुळे संस्थानच्या उत्पन्नात लक्षणीय स्वरुपात घट झाली आहे. मात्र, तरीही संस्थानने एफडी मोडून कर्मचाऱ्यांचा एप्रिल महिन्यातील पगार केला आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होती की, World Gold Concil च्या अंदाजानुसार देशात 1 ट्रिलियन डॉलर (किंवा 76 लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने 1 किंवा 2 टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. कोरोना महामारीमुळे देशावर आलेलं आर्थिक संकट दूर करण्यासाठी देवस्थानच्या सोन्यासंदर्भात चव्हाण यांनी सूचना मांडली होती. चव्हाण यांच्या या सुचनेला अनेकांनी विरोध केला आहे. मात्र, शिर्डी साई संस्थानने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. हावरे यांनी ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना, अशा संकटकाळात हे सोने देशाच्या उपयोगी येत असेल तर आम्हाला व साई भक्तांनाही आनंदच असल्याचे म्हटले. या सूचनेचा केंद्र सरकारने जरूर विचार करावा. मात्र, त्यासाठी एखादी स्कीम देऊन देवस्थानला योग्य मोबदला मिळेल याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी मांडली आहे.

दरम्यान, सध्या विविध कारणांमुळे संस्थानचे विश्वस्थ मंडळ वादात अडकलेले आहे. त्यामुळे मोजकेच विश्वस्थ सध्या उरले असून त्यांचे आर्थिक अधिकारही मर्यादित करण्यात आले आहेत. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना सर्व मोठ्या आणि धोरणात्मक व्यवहारासाठी हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या देवस्थान ट्रस्टमधील सोनं ताब्यात घेण्याच्या विधानानंतर काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतानी मोठा विरोध  केला आहे.

दिड महिन्याचे बाळ झाले कोरोनामुक्त

पिंपरी,१७ मे:-आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कोरोना बाधित दीड महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या ४ वर्षाच्या मोठ्या भावास १४ दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले.ते दोघेही कोरोना पाॅझीटीव्ह होते, ते संभाजीनगर , चिंचवड चे रहिवाशी होते.
मुंबईला डिलिव्हरी ला गेलेली आई १महिन्यांनी पुण्याला परत आली व बाळाला ताप आल्यामुळे वाय.सी.एम.रुग्णालय येथे दाखल केले होते.तेथे तपासणी केली असता बाळ व मोठा भाऊ दोघेही पाॅझिटीव्ह आले, तसेच आजोबा सुद्धा पाॅझिटीव्ह आले होते.तर आईचा अहवाल निगेटीव्ह आला होता .यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील बालरोग विभागात त्यांच्यावर उपचार केले.त्यातून ते संपूर्ण बरे झाले आहेत. या दीड महिन्याच्या बाळासह त्याच्या चार वर्षांच्या भावाला पूर्ण बरे करण्यासाठी वैद्यकिय अधिष्ठाता डाॅ राजेंद्र वाबळे व डाॅ अनिकेत लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली
बालरोग विभाग प्रमुख डॉ.दीपाली अंबिके,वैद्यकीय अधिकारी डाॅ. संध्या हरिभक्त, डॉ.सीमा सोनी, डॉ सूर्यकांत मुंडलोड,डॉ. नुपूर कत्रे, डॉ.शीतल खाडे ,डॉ.प्राजक्ता कदम, डॉ.गौरव शर्मा, डॉ.सबाहत अहमद, डॉ.अभिजीत ब्याले,डॉ. रिजवना सय्यद, डॉ.कोमल बिजारनिया व सर्व परिचारिका यांचे सहकार्य लाभले.

संपूर्ण देशात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन कायम

0

नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी याबद्दलचे आदेश काढले आहेत. लॉकडाऊन लागू असूनही राज्यातील रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मात्र तिसरा लॉकडाऊन संपत असताना राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला आहे. तर, देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ९० हजारांच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे, आता देशात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सकारच्या राष्ट्रीय आपत्ती व व्यवस्थापन विभागाने यासंदर्भातील घोषणा पत्राद्वारे केली आहे. देशातील सर्वच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत देशात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यांसदर्भातील शिथितलेबाबत मार्गदर्शन सूचना आणि नियमावली जाहीर करण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनपूर्वी देशातील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी, देशावासीयांसाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेजी घोषणा मोदींनी केली. देशाच्या जीडीपीच्या १० टक्के एवढ्या रकमचे जगातील सर्वात मोठं आर्थिक पॅकेज असल्याचंही मोदींनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. याच भाषणात, मोदींनी देशवासीयांना ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे संकेत दिले होते. विशेष म्हणजे या लॉकडाऊनसाठी राज्य सरकारला विशेष अधिकार दिल्याचं मोदींनी सांगतिलं. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारने ३१ मे पर्यंतचा लॉकडाऊन घोषित केला. महाराष्ट्रात कोरोनाबाधिताची संख्या ३० हजारांच्या पार गेली आहे. तर, राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्या १८ हजारांहून जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता, देशातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर, आता केंद्र सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानेही देशातील लॉकडाऊ ३१ मेपर्यंत वाढविल्याचे सांगितले आहे.

लॉकडाउनचे पहिले तीन फेज

देशात आतापर्यंत तीन फेजमध्ये 25 मार्च-14 एप्रिल, 15 एप्रिल-3 मे आणि 4 मे-17 मे पर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला होता.

  • पहिली फेज: 25 मार्च-14 एप्रिलपर्यंत, हा 21 दिवसांचा होता. यादरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकानेच उघडण्याची परवानगी होती.
  • दुसरी फेज: 15-3 मे, हा 19 दिवसांचा होता. हॉटस्पॉट (रेड झन)व्यतिरिक्त ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली.
  • तिसरी फेज: 4 म-17 मे, हा 12 दिवसांचा होता. हॉटस्पॉट (रेड झोन)व्यतिरिक्त ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दुकाने उघडण्याची परवानगी होती. याशिवाय प्रवासी मजुरांठी ट्रेन आणि बससेवा सुरू करण्यात आली. वंदे भारत आणि समुद्र सेतू मिशनच्या माध्यमातून दुसऱ्या देशात अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशात आणण्यात आले.

पुणे विभागातून 68 हजार 553 प्रवासी रेल्वेने रवाना

पुणे दि.17:- पुणे विभागातून परप्रांतीयांसाठी 17 मे पर्यंत एकुण 53 रेल्वे रवाना झालेल्या आहेत. यापैकी मध्यप्रदेशासाठी -15, उत्तरप्रदेशासाठी -24 उत्तराखंडासाठी -1, तमिळनाडूसाठी -1, राजस्थानसाठी – 5, बिहारसाठी – 6 व हिमाचल प्रदेशसाठी 1 अशा एकुण 53 रेल्वे रवाना झालेल्या आहेत. यामधून 68 हजार 563 प्रवासी रवाना करण्यात आलेले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

18 मे रोजी पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 1, उत्तरप्रदेशसाठी एकुण 3, तसेच तमिळनाडू, बिहार, झारंखड, छत्तीसगड राज्यांसाठी प्रत्येकी 1, अशा एकूण 8 रेल्वेगाडया नियोजित असून यामध्ये एकुण 10 हजार 955 प्रवासी अपेक्षीत आहेत. यापैकी पुणे स्थानकावरुन उत्तरप्रदेश, तमिळनाडू, बिहार, झारंखड व छत्तीसगड यांच्यासाठी प्रत्येकी एक रेल्वे 6 हजार 984 प्रवाश्यांसह नियोजित आहे. तर सांगली रेल्वे स्थानकावरुन मध्य प्रदेशसाठी 1 हजार 59 प्रवाश्यांसह 1 रेल्वेगाडी नियोजीत आहे. ‍ कोल्हापूर स्थानकावरुन उत्तरप्रदेशसाठी 2 हजार 912 प्रवाशांसह 2 रेल्वेगाडया नियोजित आहेत, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
00000000

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण झाले 2 हजार 146

पुणे विभागातील 2 हजार 218 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

विभागात कोरोना बाधित 4 हजार 593 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे दि. 17 :- पुणे विभागातील 2 हजार 218 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 593 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 146 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 229 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 168 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 4 हजार 1 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 1 हजार 960 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 842 आहे. कोरोनाबाधित एकूण 199 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 157 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रूग्णाच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये पुणे जिल्हयात २८१,सोलापूर जिल्हयात २५ ,कोल्हापूर जिल्हयात ७, सांगली जिल्हयात ६ व सातारा जिल्हयात ३ अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.

  • पुण्यात दिवसभरात नव्या २०१ रुग्णांची भर पडली आहे. तर गेल्या आठवड्यात पुणेकरांच्या आशा वाढविलेल्या कोरोनामुक्तांची संख्या कमी होऊन दिवसभरात ५३ बरे झाले आहेत. तर जवळपास दीडशे रुग्णांची स्थिती गंभीर असून, नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण आणि मृतांचे आकडे  वाढले आहे.

    सध्या रोज दीड हजार लोकांची तपासणी होत असल्याने रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. पण, कोरोनामुक्तांची संख्या  रविवारी कमी झाली असली तरी, एरवी ती  कमी होते आहेत, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

    पुण्यात याआधी सर्वाधिक १६६ आणि त्यानंतर शनिवार २०२ रुग्ण सापडले होते.

सातारा जिल्हयातील 129 कोरोना बाधीत रुग्ण असून 66 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 61 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हयातील 378 कोरोना बाधीत रुग्ण असून 150 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 202 आहे. कोरोना बाधित एकूण 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयातील 50 कोरोना बाधीत रुग्ण असून 32 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हयातील 35 कोरोना बाधीत रुग्ण असून 10 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 24 आहे. कोरोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 49 हजार 27 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 42 हजार 294 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 6 हजार 733 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 37 हजार 866 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 4 हजार 593 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 12 लाख 32 हजार 344 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 81 लाख 15 हजार 524 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 56 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

000000

आषाढी वारी पालखी सोहळा

0

         सध्‍या कोरोना (कोविड-19) विषाणू संसर्गजन्‍य परिस्थिती आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर हे तीन जिल्‍हे रेड झोनमध्‍ये आहेत. ही परिस्थितीही विचारात घेवून आषाढी वारी पालखी सोहळा योग्‍य त्‍या प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांसह पार पाडला जावा, अशीच प्रत्‍येकाची भावना आहे. परंपरेप्रमाणे पालखी सोहळ्यात कोणताही खंड न पडता शासकीय नियमांचे पालन झाले पाहिजे यासाठी कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शासनाच्‍या परवानगीशिवाय कोणतीही  पालखी किंवा दिंडी काढू नये, असेही स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

            आषाढी वारी सोहळ्याच्‍या आयोजनाबाबत राज्याचे उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे सदस्य सचिव विठ्ठल जोशी,  श्री क्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्‍थानचे राजाभाऊ चोपदार, ॲड. विकास ढगे पाटील, अभय टिळक, श्री क्षेत्र देहूच्‍या श्री संत तुकाराम महाराज संस्‍थानचे मधुकर महाराज मोरे, विशाल मोरे, सासवड येथील श्री संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्‍टचे विश्वस्त तथा अध्यक्ष गोपाळ गोसावी, श्रीकांत गोसावी, मनोज रणवरे यांच्‍या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री  बाळासाहेब पाटील व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे बैठकीत सहभाग घेतला.

            आषाढी यात्रा ही सोलापूर जिल्‍ह्यातील पंढरपूर येथे ‘महायात्रा’ म्‍हणूनही ओळखली जाते. या वर्षी म्‍हणजे 2020 मध्‍ये ही यात्रा बुधवार  1 जुलै, 2020 रोजी भरणार आहे. या दिवशी पहाटे 2.20 वाजता राज्याचे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्‍नीक श्रींची शासकीय महापूजा करणार आहेत. आषाढी यात्रा कालावधी हा आषाढ शुद्ध 1 (दिनांक 22 जून 2020) ते आषाढ शुद्ध 15 (दिनांक 5 जुलै 2020) असा राहणार आहे.

            सध्‍या जगभरामध्‍ये कोरोना आजाराने थैमान घातले आहे. पुण्‍यामध्‍येही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. अशा परिस्थितीत या भागातून पंढरपूरमध्‍ये वारकरी पायी चालत येणे हे पालखी मुक्‍कामाच्‍या ठिकाणी व पंढरपूरमध्‍ये संसर्गाचा मोठा धोका निर्माण करणारे ठरु शकते. यात्रेनिमित्‍त मोठ्या संख्‍येने भाविक एकत्र आल्‍यास सामूहिक संसर्गाचा धोका आहे. संसर्ग झालेले भाविक, वारकरी त्‍यांच्‍या भागामध्‍ये परत गेल्‍यानंतर त्‍या भागातही कोरोनाचा संसर्ग वाढण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. या व्‍यतिरिक्त बुक्‍का विक्री, मूर्ती विक्रेते, हार-फूल विक्रेते, तंबोरे, टाळ,वीणा व फोटो विक्रेते यांच्‍यासारखे अनेक लहान-मोठे व्‍यावसायिक यात्रा काळात पंढरपूरमध्‍ये येत असतात. या जनसमुदायांमध्‍ये सामाजिक अंतर (सोशल डिस्‍टन्‍स) राखणे शक्‍य होणार नाही. तसेच सध्‍या पोलीस यंत्रणा, आरोग्‍य यंत्रणा कोरोनाच्‍या मुकाबल्यामध्‍ये व्‍यस्‍त आहेत.  या सर्व गोष्‍टींचा सर्वंकष विचार करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेण्‍यात येणार आहे.

            कोरोनाचे संकट नसते तर प्रदीर्घ परंपरा असलेला हा आषाढी वारी पालखी सोहळा नेहमीच्‍या उत्‍साहात आणि भक्‍तीपूर्ण वातावरणात संपन्‍न झाला असता. या पालखी सोहळ्याबाबतची  माहिती.

            पंढरपूर मंदिरे अधिनियम, १९७३ च्या तरतुदीनुसार पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा कारभार पंढरपूरच्‍या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरकडे शासनामार्फत सोपवण्यात आलेला आहे. या अधिनियमानुसार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडे या मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन आलेले आहे.

           श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडे श्री विठ्ठल रूक्मिणीचे पंढरपूरातील मुख्य मंदिर आणि मंदिरातील ३६ परिवार देवता तसेच पंढरपूर शहर व परिसरातील २८ परिवार देवता यांचे व्यवस्थापन करण्याचे कामकाज आहे. या सर्व देव-देवतांची पूजा-अर्चा इत्‍यादी दररोजचे नित्योपचार, नैमित्तिक उपचार मंदिरात व मंदिराबाहेरील परिवार देवतांच्या मंदिरात साजरे करण्यात येणारे यात्रा व उत्सव, वर्षातून चार वेळा येणाऱ्या आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार मोठ्या यात्रा कालावधीत भाविकांची गर्दी मोठया प्रमाणात असते. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. लाखो वारकऱ्यांच्या श्रध्देचे स्थान व उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या या दैवताच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगना या राज्यातून व देशभरातून वर्षभरात अंदाजे १ कोटीपेक्षा जास्त भाविक भेटी देतात. या यात्रा कालावधीत अंदाजे १५ लाख भाविक  पंढरपूर दर्शनासाठी येतात.

             आषाढी यात्रेचे महत्‍त्‍व –

            आषाढी यात्रा ही पंढरीतील ‘महायात्रा’ म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. भगवंत या एकादशीपासून शयन करतात. आषाढी एकादशीपासून चातुर्मास चालू होतो. चातुर्मासात भक्‍त अधिकाधिक विठ्ठल गुणांचे, रुपाचे श्रवण-कीर्तन करुन विठ्ठल प्राप्तीसाठी प्रयत्न करतात.

            “आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गुज पांडुरंग ।”- आषाढी कार्तिकीला श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन २४ तास चालू असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कोनाकोपऱ्यातून पंढरीकडे श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात. वाखरी येथील संतनगर येथे सर्व संतांच्‍या पालख्या एकत्र होतात. आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या आणि दिंडया एकमेकांना भेटतात. इथून आषाढ शुद्ध दशमीला सकाळी सर्व पालख्या हळूहळू पंढरीकडे जायला निघतात. आषाढीला सारे वारकरी पवित्र चंद्रभागेत स्नान करुन संताच्या पालख्यांसोबत पंढरी प्रदक्षिणा करतात.

            “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “जय जय राम कृष्ण हरी” या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गोपाळकाला होऊन यात्रेची सांगता होते. गोपाळपूर येथे सर्व दिंड्या आणि पालख्या एकत्र होतात. काल्याच्या कीर्तनानंतर सर्वांना गोपाळकाला वाटला जातो व सर्व दिंड्या व पालख्या परतीच्या प्रवासाला सुरूवात करतात आणि यात्रेची सांगता होते.

              आषाढी वारीचे नियोजन-

            दर्शनरांग नियोजन – श्रीच्या मुख व पदस्पर्शदर्शन रांगेत बॅरीकेटींग करणे, मॅटींग टाकणे, पत्राशेड व उड्डाणपूल उभारणे, भाविक काऊन्टींग मशिन उभारणे इत्‍यादी व इतर अनुषंगिक कामे केली जातात.

 दर्शन व्यवस्था-  श्रीचे २४ तास दर्शन उपलब्ध करून देणे, लाईव्ह दर्शन देण्यासाठी संकेतस्थळ, मोबाईल अॅप, एलईडी स्‍क्रीन इत्‍यादीची व्यवस्था करणे, व्हिआयपी व ऑनलाईन बुकींग दर्शन व्यवस्था बंद करणे व इतर अनुषंगिक व्यवस्था केली जाते.  वैद्यकीय सुविधा – मोफत वैद्यकीय व्यवस्थेसाठी स्वयंसेवी संस्थेची मदत घेणे, प्रथमोपचार पेट्या ठेवणे, रूग्णवाहिका उपलब्ध करून देणे. आपत्कालिन व सुरक्षा व्यवस्था-  रेस्क्यू व्हॅन, सिझफायर, अग्निशामक, चंद्रभागा नदीपात्रात जीवरक्षक नियुक्त करणे, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, वायरलेस स्‍कॅनर मशिन, खाजगी सुरक्षा व्यवस्था व इतर अनुषंगिक व्यवस्था करणे. निवास व्यवस्था – समितीच्या वेदांता, व्हिडीओकॉन, एमटीडीसी, श्रीविठल रुक्मिणी इ. भक्तनिवास येथील सर्व रूम्स व डॉरमेटरी भाविकांना व यात्रा कालावधीत बंदोबस्तासाठी आलेल्‍या पोलीस अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना उपलब्ध करून देणे.  विमा पॉलिसी-  भाविकांसाठी अपघात विमा पॉलिसी उपलब्ध करून देणे. दर्शनरांगेतील भाविकांना पिण्याचे पाणी, भोजन, चहा, फराळ भाविकांना मोफत वाटप करणे. भाविकांना श्रीचा प्रसाद म्हणून राजगिरा व बुंदी लाडूप्रसाद तसेच श्रीचे फोटो अल्पदरात उपलब्ध करून देणे.  देणगी व्यवस्थेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून देणे. स्वच्छता व्यवस्थेसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणे. चंद्रभागा नदीपात्रात महिला भाविकांना चेंजिंग रूम उपलब्ध करून देणे.

            भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियमित कर्मचाऱ्या व्यतिरिक्त रोजंदारी कर्मचारी नियुक्त करणे तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत घेणे. मंदिरात फुलांची आरास व लाईटींग डेकोरेशन करणे या सारख्‍या कामांचे नियोजन करण्‍यास सुरुवात झाली असती.

आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या मानाच्या पालख्या

1) श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी, ता. खेड, जि. पुणे.

2) श्री  संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, ता. हवेली, जि. पुणे.

3)श्री संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्‍ट, श्रीक्षेत्र सासवड, ता. पंढरपूर, जि. पुणे.

4) श्री संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर, जि. नाशिक

5) श्री संत मुक्ताबाई देवस्थान, मुक्ताईनगर, जि. जळगांव.

6) श्री संत एकनाथ महाराज देवस्थान संस्थान, श्रीक्षेत्र पैठण, ता. पैठण, जि. औरंगाबाद.

7) श्री संत नामदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर.

        श्री संत गजानन महाराज संस्थान, श्रीक्षेत्र शेगांव, जि. बुलढाणा आणि श्री संत निळोबाराय महाराज संस्थान, श्रीक्षेत्र पिंपळनेर, जि. अहमदनगर तसेच महाराष्ट्रातील इतर अंदाजे १४० विविध संतांच्या पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पायी येत असतात.

      आषाढी यात्रा कालावधीत श्रीचे दर्शन 24 तास असते. याच कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्री पांडुरंगास लोड व श्री रुक्मिणीमातेस तक्‍या  दिला जातो. आषाढी वद्य पंचमी किंवा षष्‍ठीला चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रीची प्रक्षाळपूजा आयोजित केली जाते. 24 तास दर्शन कालावधीत नित्‍यपूजा, महानैवेद्य, लिंबूपाणी हे नित्‍योपचार असतात. मुखदर्शन नामदेव पायरीकडून 24 तास चालू असते.

  आषाढी यात्रा कालावधीत मंदिरात येणाऱ्या पालख्यांची माहिती

            आषाढ शु. पौर्णिमेला आषाढी यात्रेची सांगता होते. या दिवशी (दि.०५/०७/२०२०) स. ६.०० वाजता श्री संत एकनाथ महाराजांची दिंडी काला करण्‍यासाठी मंदिरात येते. त्यानंतर निवृत्तीनाथ, श्री संत सोपान काका, श्री संत मुक्ताबाई, श्री विठ्ठल रूक्मिणी संस्थान कौंडण्‍यपूर, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत नामदेव महाराज या पालख्या मंदिरामध्ये येतात. त्या सर्वांचा यथोचित सत्कार मंदिर समितीमार्फत करण्यात येतो. त्याचप्रमाणे श्री विठ्ठलास संतांच्‍या भेटी झाल्‍यावर पालखी समवेत असलेल्या सर्व भाविकांना श्रींच्या दर्शनासाठी सोडण्यात येते.

      तसेच आषाढ शु. पौर्णिमेला श्री विठ्ठलाच्या पादुकांची विधिवत षोडशोपचार पूजा करून पादुका श्री विठ्ठलाच्या चरणास स्पर्श करून त्याची पूजा करून पालखीमध्ये ठेवून त्याची सवाद्य मिरवणूक प्रदक्षिणा मार्गाने काढण्यात येते व परत पादुका मंदिरात आल्यावर श्री विठ्ठलाच्या पादुकांना स्पर्श करून श्री रूक्मिणी मातेची भेट घडविण्यात येते. त्यानंतर पादुका थोडा वेळ श्री महालक्ष्मी मंदिरात ठेवून या पादुका परत कार्यालयात आणण्यात येतात.

          आषाढ वद्य ५ (दि.१०/०७/२०२०) ते कार्तिक शुध्द ५ (दि.१९/११/२०२०) या कालावधीमध्ये चार्तुमास असतो. आषाढी वद्य १ या दिवशी महाद्वार काल्याने आषाढी यात्रेची सांगता होते.

          पालखी सोहळ्याची माहिती

        श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा–  पालखी सोहळा श्रीक्षेत्र आळंदी, ता.खेड, जि पुणे ते श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर असा प्रवास करतो. सन २०२० मध्ये हा पालखी सोहळा दि.१३/०६/२०२० रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा पुणे, सातारा आणि सोलापूर अशा तीन जिल्हयातून जातो. हा पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात १७ ठिकाणी मुक्काम करतो. यामध्ये पुणे जिल्हयात ७, सातारा जिल्हयात ४ आणि सोलापूर जिल्हयात ६ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळयाचे १२ ठिकाणी विसावे आहेत. या पालखी सोहळयाची उभे/ गोल रिंगण ७ ठिकाणी आहेत. हा पालखी सोहळा आषाढ शु. पौर्णिमा पर्यंत (दि.०५/०७/२०२०) पंढरपूरमध्ये थांबतो. तद्नंतर परतीच्‍या प्रवासात निघतो. याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो. हा पालखी सोहळा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी, ता. खेड, जि. पुणे यांच्या मार्फत संचलित केला जातो.

        श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा– हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र देहू, ता.हवेली, जि. पुणे ते श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर असा प्रवास करतो. सन २०२० मध्ये हा पालखी सोहळा दि.१२/६/२०२० रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा पुणे व सोलापूर अशा दोन जिल्हयातून जातो. हा पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात १७ ठिकाणी मुक्काम करतो. यामध्ये पुणे जिल्ह्यात १२, सोलापूर जिल्हयात ५ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळयाचे १६ ठिकाणी विसावे आहेत. हा पालखी सोहळा आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत (दि.०५/०७/२०२०) पंढरपूरमध्ये थांबतो. तद्नंतर परतीच्‍या प्रवासात निघतो. याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो. या पालखी सोहळयाची उभे/गोल रिंगण ६ ठिकाणी आहेत. हा  पालखी सोहळा श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, ता. हवेली, जि. मार्फत संचलित केला जातो.

             श्री संत सोपानदेव महाराज पालखी सोहळा– हा  पालखी सोहळा श्रीक्षेत्र सासवड, जि. पुणे ते श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर असा प्रवास करतो. सन २०२० मध्ये हा पालखी सोहळा दि.१८/०६/२०२० रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र सासवड ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा पुणे आणि सोलापूर अशा दोन जिल्ह्यातून जातो. हा पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात १२ ठिकाणी मुक्काम करतो. यामध्ये पुणे जिल्ह्यात ६ आणि सोलापूर जिल्ह्यात ६ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळयाचे ११ ठिकाणी विसावे आहेत. हा पालखी सोहळा आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत (दि.०५/०७/२०२०) पंढरपूरमध्ये थांबतो. तद्नंतर परतीचा प्रवासात निघतो. याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो. या पालखी सोहळयाची  रिंगण २ ठिकाणी आहेत. हा पालखी सोहळा श्री संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्ट, श्रीक्षेत्र सासवड, ता. सासवड, जिल्‍हा पुणे यांच्या मार्फत संचलित केला जातो.

            श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा –हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर, जि. नाशिक ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा प्रवास करतो. सन २०२० मध्ये हा पालखी सोहळा दि. ६/६/२०२० रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर अशा तीन जिल्ह्यातून जातो. हा पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात २३ ठिकाणी मुक्काम करतो. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ६, अहमदनगर जिल्हयात ११ आणि सोलापूर जिल्ह्यात ६ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळयाचे २५ ठिकाणी विसावे आहेत. हा पालखी सोहळा आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत (दि.५/७/२०२०) पंढरपूरमध्ये थांबतो. तद्नंतर परतीच्‍या प्रवासात निघतो. याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो. या पालखी सोहळयाची गोल रिंगण २ ठिकाणी आहेत. हा  पालखी सोहळा श्री संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर, जि. नाशिक यांच्यामार्फत संचलित केला जातो.

            श्री संत मुक्ताई पालखी सोहळा– हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र मुक्ताईनगर, जि. जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर असा प्रवास करतो. सन २०२० मध्ये हा पालखी सोहळा दि.२४/५/२०२० रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर अशा सहा जिल्हयातून जातो. हा पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात ३३ ठिकाणी मुक्काम करतो. यामध्ये जळगाव जिल्हयात ६, बुलढाणा जिल्हयात ८, जालना जिल्हयात ५, बीड जिल्हयात ७, उस्मानाबाद जिल्हयात ३ आणि सोलापूर जिल्हयात ४ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळयाचे ३३ ठिकाणी विसावे आहेत. हा पालखी सोहळा आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत (दि.५/७/२०२०) पंढरपूरमध्ये थांबतो. त्‍यानंतर परतीच्‍या प्रवासास निघतो. याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो. हा पालखी सोहळा श्री संत मुक्ताई देवस्थान, मुक्ताईनगर, जि. जळगांव यांच्या मार्फत संचलित केला जातो.

             श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा – हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र पैठण, जि. औरंगाबाद ते श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर असा प्रवास करतो. सन २०२० मध्ये हा पालखी सोहळा दि.१२/६/२०२० रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्‍थान करणार आहे. श्रीक्षेत्र पैठण ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा औरंगाबाद, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद आणि सोलापूर अशा पाच जिल्हयातून जातो. पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात १८ ठिकाणी मुक्काम करतो. यामध्ये औरंगाबाद जिल्हयात ४, बीड जिल्हयात ४, अहमदनगर जिल्हयात ३, उस्मानाबाद जिल्हयात १ आणि सोलापूर जिल्हयात ६ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळयाचे १३ ठिकाणी विसावे आहेत. हा पालखी सोहळा आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत (दि.५/७/२०२०) पंढरपूरमध्ये थांबतो. तद्नंतर परतीचा प्रवास निघतो. याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो. हा पालखी सोहळा श्री संत एकनाथ महाराज देवस्थान संस्थान, श्रीक्षेत्र पैठण, ता. पैठण, जि. औरंगाबाद यांच्यामार्फत संचलित केला जातो.

            श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळा– या पालखी सोहळयाचे मुख्य ठिकाण श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर आहे. हा  पालखी सोहळा श्री संत नामदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर यांच्यामार्फत संचलित केला जातो.

             श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा – हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र शेगांव, जि. बुलढाणा ते श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर असा प्रवास करतो. सन २०२० मध्ये हा पालखी सोहळा दि.२८/५/२०२० रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र शेगांव ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर अशा आठ जिल्ह्यातून जातो. हा पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात ३२ टिकाणी मुक्काम करतो. यामध्ये अकोला जिल्‍ह्यात ६, वाशिम जिल्हयात ४, हिंगोली जिल्हयात २, परभणी जिल्हयात  ५,  बीड जिल्हयात ३, उस्मानाबाद जिल्हयात ६  आणि सोलापूर  जिल्हयात ६ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळयाचे ३० ठिकाणी विसावे आहेत. हा सोहळा आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत (दि.५/०७/२०२०)  पंढरपूरमध्ये थांबतो. तद्नंतर परतीचा प्रवासात निघतो. याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो. हा पालखी सोहळा श्री संत गजानन महाराज संस्थान, श्रीक्षेत्र शेगांव, जि. बुलढाणा यांच्‍यामार्फत संचलित केला जातो.

             श्री संत निळोबाराय महाराज पालखी सोहळा– हा पालखी सोहळा श्रीक्षेत्र पिंपळनेर, जि. अहमदनगर ते श्रीक्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूर असा प्रवास करतो. सन २०२० मध्ये हा पालखी सोहळा दि.१५/६/२०२० रोजी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. श्रीक्षेत्र पिंपळनेर ते श्रीक्षेत्र पंढरपूर यामध्ये हा सोहळा अहमदनगर, पुणे आणि सोलापूर अशा तीन जिल्हयातून जातो. हा पालखी सोहळा आपल्या पायी प्रवासात १४ ठिकाणी मुक्काम करतो. यामध्ये अहमदनगर जिल्हयात ७, पुणे जिल्हयात २ आणि सोलापूर जिल्हयात ६ ठिकाणी मुक्काम असतो. या पालखी सोहळयाचे १४ ठिकाणी विसावे आहेत. हा पालखी सोहळा आषाढ शु. पौर्णिमेपर्यंत (दि.५/०७/२०२०) पंढरपूरमध्ये थांबतो. तद्नंतर परतीचा प्रवासात निघतो. याचा स्वतंत्र असा परतीचा कार्यक्रम असतो. हा पालखी सोहळा श्री संत निळोबाराय महाराज संस्थान, श्रीक्षेत्र पिंपळनेर, जि.  अहमदनगर यांच्या मार्फत संचलित केला जातो.

            सर्व पालखी सोहळे आषाढी शुद्ध दशमीला संध्याकाळी श्रीक्षेत्र पंढरपूरात येतात. आपापल्या स्थानांमध्ये विराजमान होतात. तसेच आषाढी एकादशी या दिवशी सकाळी सर्व पालख्या चंद्रभागा स्नान करून नगरप्रदक्षिणेसाठी प्रस्थान करतात. तसेच दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत श्री खाजगीवाले यांच्‍यामार्फत त्यांच्‍याकडे असलेल्या श्री पांडुरंगाच्या मूर्तीची रथातून नगरप्रदक्षिणांनी मिरवणूक काढली जाते.

            (महत्त्वाची सूचना –  कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर आषाढी वारी पालखी सोहळा निर्णय शासनस्‍तरावर  प्रलंबित आहे. शासनाच्‍या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही दिंडी किंवा पालखी प्रस्‍थान ठेवणार नाही, याची कृपया, नोंद घ्‍यावी)

 

 लेखक-       राजेंद्र सरग, जिल्‍हा माहिती अधिकारी, पुणे

कोविड-19 विरुद्ध लढाईमधील प्रकाशऊर्जा – महावितरण

अवघ्या जगाला व्यापून टाकणारा कोरोना विषाणू म्हणजेच कोविड-19 या संसर्गजन्य आजाराची लढाई आता निर्नायक टप्प्यात आली आहे. प्रत्येक घरातून, प्रत्येक देशात ही लढाई सुरु आहे. या लढाईचे नेतृत्व वैद्यकीय क्षेत्राकडे असले त्यांना पुरक सेवा देणारे अनेक क्षेत्र अत्यावश्यक सेवेसाठी अहोरात्र कार्यरत आहे. त्यापैकी एक महत्वाचे क्षेत्र म्हणजे वीज क्षेत्र. आपले कर्तव्य चोखपणे बजावत कोरोनाविरोधात झुंज देणारे कोविड योद्धा असोत किंवा लॉकडाऊनमुळे घरीच राहणारे नागरिक किंवा घरूनच काम करणारे (वर्क फ्रॉम होम) सर्व क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी यांना सध्या गरज आहे ती अखंडित वीजपुरवठ्याची. ही सेवा देण्यासाठी महावितरणचे सुमारे 40 हजार अभियंते, तांत्रिक कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत.

एरवीही आणि आता प्रामुख्याने कोरोना विरुद्धच्या लढाईत वीजसेवा अत्यावश्यकच आहे. मात्र वीजपुरवठ्याची प्रक्रिया ही संपूर्णतः तांत्रिक स्वरुपाची आहे. विजेच्या एका बटणामागे शेकडो किलोमीटर पसरलेल्या अजस्त्र वीजयंत्रणेची माहिती किंवा जाणीव नसणे तशी स्वाभाविक बाब आहे. या उघड्यावरील वीजयंत्रणेवर उन्हाचा, वादळाचा, पावसाचा आदींचा परिणाम होत असतो.  अशा स्थितीतही वीजयंत्रणेवर तांत्रिक नियंत्रण ठेऊन सुरळीत वीजपुरवठ्यासाठी रात्रंदिवस कार्यरत असणारे महावितरणमधील अभियंता व कर्मचाऱ्यांच्या कामाचे मोल खंडित वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतरच येते. विचार करा, की ज्या कालावधीत विजेची मोठी टंचाई, अतिभारित वीजयंत्रणा आणि विजेचे भारनियमन सुरु असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असता तर…. कल्पनाही करवत नाही ना! त्यावेळच्या कालावधीत कोरोनाविरुद्ध प्रखर झुंज देणे सोडा, लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांना घरात बसून राहणे देखील मुश्कील झाले असते. मात्र आता अशी कोणतीही परिस्थिती नाही. मुबलक वीज आहे. सक्षम वीजयंत्रणा आहे आणि महत्वाचे म्हणजे शहरी व ग्रामीण भागातही विजेचे भारनियमन देखील पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात वीजपुरवठा सुरळीत असल्याने विजेअभावी कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कोणताही व्यत्यय नाही किंवा घरी राहणाऱ्या नागरिकांना आणि घरूनच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरळीत विजेमुळे कोणतीही अडचण नाही.

सुरळीत वीजपुरवठ्यामध्ये इतर अडचण नसली तरी महावितरणच्या राज्यभरातील अभियंते व कर्मचाऱ्यांसाठी उन्हाळ्याचे दिवस तसे अडचणीचे आहेत. साधारणतः मार्चमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरु झाला. उन्हामुळे तापलेल्या वीजयंत्रणेवर पावसाचे दोन-तीन टपोरे थेंब पडले तरी पीन किंवा पोस्ट इन्सूलेटर फूटून वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडतात. एप्रिल-मे मधील वादळ, गारपीट आणि मुसळधार पावसामुळे झाडे, झाडांच्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळतात. वीजयंत्रणा जमीनदोस्त होते. विविध कामांसाठी झालेल्या खोदकामांमुळे महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्यांना तडा गेलेला असतो. पावसाचे पाणी त्यात गेले की वीजवाहिन्या नादुरुस्त होतात व वीजपुरवठा खंडित होतो. उपकेंद्रातील पॉवर ट्रॉन्सफॉर्मर नादुरुस्त होणे, पेट घेणे आदी प्रकारही होतात.

अशा खडतर परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूने महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांची परीक्षा घेतली आहे. गेल्या दीड महिन्यात राज्यामध्ये सर्वदूर भागात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. वादळामुळे राज्यात हजारो वीजखांब वीजवाहिन्यांसह कोसळले आहेत. लॉकडाऊनमुळे मर्यादित मनुष्यबळ उपलब्ध असताना अक्षरशः रात्रंदिवस काम करीत महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी वीजयंत्रणेची मोठी हानी झाली असताना विक्रमी वेळेत वीजपुरवठा सुरळीत केला आहे. वीजयंत्रणेच्या दुरुस्ती कामासाठी गेलेले अभियंते व कर्मचारी 25 ते 30 तासांनंतर वीजयंत्रणेची संपूर्ण दुरुस्ती करूनच घरी परतले आहे. लॉकडाऊनमुळे कोणतीही सोय न झाल्याने उपाशी राहून हे काम त्यांनी पूर्ण केले आहे. अगदी सातारा जिल्ह्यातील सद्याद्री डोंगरदऱ्यातील अतिदुर्गम बामणोली खोऱ्यात वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम असो किंवा शिरुर (जि. पुणे) तालुक्यातील 24 टनी पॉवर ट्रॉन्सफॉर्मर 24 तासांत बदलण्याचे अचाट कामही महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

खरे पाहिले तर वीज हे क्षेत्र इतर अत्यावश्यक सेवेतील सर्वच क्षेत्रांसाठी अत्यंत अत्यावश्यक आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत वैद्यकीय, पोलीस, महसूल, आरोग्य आदी अनेक शासकीय विभाग झुंज देत आहेत. शासनाचाच एक भाग असलेले महावितरणचे अभियंते व कर्मचारी देखील वीजपुरवठा सुरळीत ठेऊन या विभागांना ऊर्जा देत आहेत. ही जाणीव ठेवून पुणे येथील ससून रुग्णालयाच्या नवीन 11 मजली इमारतीला केवळ 36 तासांना 604 केडब्लू वीजभाराची नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणने केले आहे आहे.

अस्मानी किंवा इतर कोणत्याही तांत्रिक बिघाडांच्या संकटामुळे वीजपुरवठा विस्कळीत होण्याचा धोका असताना महावितरणचे प्रकाशदूत अनेक धोके पत्करून सुरळीत वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी कर्तव्य तत्पर आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामध्ये स्वतःच्या अडचणी दूर सारून, एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेत अत्यावश्यक सेवा देण्यासाठी काम करीत आहेत. या प्रकाशदूतांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सर्वसामान्यांच्या घरी ज्या अडचणी आहेत, त्याच अडचणी प्रकाशदूतांच्याही घरी आहे. मात्र या सर्व अडचणींपेक्षा त्यांना जाणीव आहे एकाच कर्तव्याची. सुरळीत वीजपुरवठ्याची. कोरोनावर यशस्वी मात करण्यासाठी लढणाऱ्या विविध यंत्रणांना व त्यासाठी सहकार्य करणाऱ्या नागरिकांना प्रकाशाची ऊर्जा देण्यासाठी महावितरणचे 40 हजार प्रकाशदूत कोविड-19 विरुद्धच्या लढाईत खडतर आव्हानांना सामोरे जात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी भक्कमपणे सज्ज आहेत.

लेखक – निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण, बारामती

मोबाईल क्र. 7875762055

सोलापूर रेल्वे स्टेशनवरुन ११४६ नागरिकांना घेऊन ग्वाल्हेरसाठी श्रमिक विशेष रेल्वे रवाना

0

सोलापूरदि. 17 – रेल्वेच्या प्रत्येक खिडकीतून हात हलत होते आणि प्रत्येक खिडकीतल्या डोळ्यात गावी कधी एकदा पोहोचतो, याचीच आतुरता लागून राहिली होती. सोलापूर रेल्वे स्टेशनवर आज दुपारी असे चित्र होते. लॉकडाऊनमुळे सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या मध्यप्रदेशातील मजूर, विद्यार्थी, पर्यटक इत्यादी  नागरिकांना घेऊन श्रमिक विशेष रेल्वे आज ग्वाल्हेरसाठी सोडण्यात आली.  सोलापूर रेल्वे स्थानकातून दुपारी दोन वाजून वीस मिनटांनी ही रेल्वे सुटली.

नागरिक, विद्यार्थी यांनी अत्यावश्यकच साहित्य सोबत घेतले होते.  थर्मल स्क्रीनिंगने तपासणी केली जात असताना काही लहान मुलांना आपली उत्सुकता लपवता येत नव्हती. त्याचवेळी मात्र मुलांच्या आईची नजर एक क्रमांकच्या प्लॅटफार्मवर उभ्या असलेल्या रेल्वेकड़े लागलेली दिसत होती. एका तरुणाने तर डब्यात चढण्यापूर्वी डब्याच्या पायऱ्यांना वाकून नमस्कार केला. सर्व नागरिकांनी अतिशय शिस्तबद्धरित्या आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून घेतली. त्यानंतर रेल्वे आणि पोलीस कर्मचारी यांनी सांगितलेल्या जागेवर जाऊन बसल्यावर तर चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असा होता.

प्रशासन, रेल्वे विभाग, पोलिस यंत्रणामार्फत उत्तम व्यवस्था करण्यात आली.  एकूण 1314 जणांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र 1146 नागरिकांना घेऊन ग्वाल्हेरसाठी रेल्वे रवाना झाली. सर्व प्रवाशांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.  स्थानक परिसरात नागरिकांचे थर्मल स्क्रीनिंग केले गेले. रेल्वेचे अधिकारी कर्मचारी यांनी नागरिकांना त्यांच्या कोचपर्यंत पोहोचवले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, समन्वय अधिकारी दीपक शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे आदी अधिकारी उपस्थित होते.

या आधी सोलापूर विभागातील पंढरपूर आणि कुर्डूवाडी रेल्वे स्थानकातून दोन रेल्वे रवाना झाल्या आहेत. पंढरपुरातून 9 मे रोजी 981 प्रवाशांना घेऊन रेल्वे तामिळनाडू येथे रवाना झाली होती. त्यानंतर 14 मे रोजी कुर्डूवाडी स्थानकावरुन लखनौसाठी विशेष रेल्वे रवाना झाली आहे. लखनौ, पाटना, हावडा, रांची येथे जाण्यासाठी  प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. संमती मिळताच विशेष रेल्वे सोडण्यात येईल, असे समन्वय अधिकारी दीपक शिंदे यांनी सांगितले.

छायाचित्रकार यशवंत सादूल यांची समयसूचकता

एक महिला बाळाला  घेऊन रेल्वे स्थानकावर उशिरा पोहोचली. महिलेला बाळासहित पळताना पाहून लोकमतचे छायचित्रकार यशवंत सादूल यांनी  बाळाला आपल्या कुशीत घेतलं आणि महिलेला डब्यापर्यंत पोहोचवलं. गाडी सुटताना अवघे काही मिनिटं असताना महिला पोहोचल्याने प्रशासन आणि पोलिसांनीदेखील अधिक वेळ घेत गाडी काही मिनिटांसाठी थांबवली. कागदपत्र तपासणी, थर्मल चेकअप करून महिलेस जागा उपलब्ध करून देण्यात आली.

लक्ष्मी हायड्रोलिक्सस्पेन्कामार्फत फूडपाकीट

रेल्वेतून जाणाऱ्या सर्वांना लक्ष्मी हायड्रोलिक्स, स्पेन्का वॉटर यांच्या मार्फत नाष्टा, जेवण, पाणी यांची व्यवस्था करण्यात आली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अडकलेल्या या नागरिकांनी घरी परतताना समाधान होत असल्याची भावना व्यक्त केली.

31 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाउन…

 

मुंबई, दि. 17- राज्यात कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने शासनाने प्रतिबंधात्मक अत्यावश्यक उपाययोजना करण्यासाठी राज्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत 31 मे 2020 पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. साथरोग कायदा 1897 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत शासनास असलेल्या अधिकारांचा वापर करून राज्याच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य सचिव अजोय मेहता यांनी हे आदेश जारी केले आहेत.

यापूर्वी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची शासनाच्या सर्व विभागांनी या कालावधीत काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच यापूर्वी काढण्यात आलेले सर्व आदेश 31 मे पर्यंत लागू राहतील, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत. विभागनिहाय सूट किंवा लॉकडाऊन उठविण्यासंदर्भात योग्य त्या सूचना वेळोवेळी दिल्या जातील, असेही त्यांनी या आदेशात म्हटले आहे.

यापूर्वी दि. 2 मे 2020 रोजीच्या आदेशानुसार राज्यात 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तसेच त्यात गरजेनुसार वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या.

पुणे : राज्य सरकारने लाॅकडाउनचा चौथा टप्पा हा ३१ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. लाॅकडाउनच्या ४.० ची अंमलबजावणी कशी असणार याचे स्वतंत्र आदेश अद्यापपर्यंत आले नाहीत. राज्य सरकारचे हे आदेश आल्यानंतर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि पोलिस सहआयुक्त डाॅ. रवींद्र शिसवे हे पुणे शहरातील अंमलबजावणीबाबत नव्याने आदेश काढतील. यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये नव्याने फेरबदल अपेक्षित आहेत. सध्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात ज्या ठिकाणी ॲक्टिव्ह रुग्ण नाहीत, अशी ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात येतील. तर प्रतिबंधित क्षेत्राबाहेर ज्या ठिकाणी ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी ठिकाणे, इमारतींना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येईल. याशिवाय खासगी कार्यालये सुरू करण्याबाबत, दुकाने उघडण्याबाबत धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्तांनी आदेश काढल्यानंतर यामध्ये स्पष्टता येणार आहे.

कंटेन्मेंट झोन मध्ये बिबवेवाडीत ९५० रुग्णांची तपासणी

पुणे :
  राष्ट्रवादी काँग्रेस  डॉक्टर सेल आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डॉक्टर आपल्या दारी’ अभियानातील दुसऱ्या दिवशी बिबवेवाडी  कंटेन्मेंट झोन मध्ये शिबीर  शनीवारी दुपारी १२ ते ५ या वेळेत पार पडले.राष्ट्रवादी काँग्रेस  डॉक्टर सेलचे पुणे शहर अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप यांनी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.
 शिबिरासाठी डॉ. पी.आर.बियाणी, डॉ. मनोहर जाधव, डॉ. सिद्धार्थ जाधव यांनी बिबवेवाडी सुपर इंदिरानगर येथील कंटेन्मेंट झोन मध्ये तसेच डॉ. मयुरा टेकवडे, डॉ. अनुपमा गायकवाड, डॉ. प्राजक्ता जाधव या महिला डॉक्टरांनी व डॉ. प्रदीप उरसळ, डॉ. सुनिल धुमाळ, डॉ. संदीप बोरकर, डॉ. सचिन ढमाले यांनी महेश सांस्कृतिक भवन ,अप्पर इंदिरा नगर येथे दोन अँबुलन्स, ४ थर्मल गन्स् , पीपीई किटस्, फेस शिल्ड घालून एकूण ९५० रुग्णांची तपासणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस  डॉक्टर सेलचे पुणे शहर अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप यांच्या  मार्गदर्शनाखाली संयोजन डॉ. हेमंत तुसे, डॉ. शशिकांत कदम, डॉ. तुषार वाघ व तसेच  गणेश मोहिते( पुणे शहर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस)सुहास उभे,  रोहन पायगुडे( पुणे शहर रा.कॉ. युवक सरचिटणीस) यांनी सुद्धा औषध वाटप, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, सॅनिटायझेशन आदी सर्व निकष रुग्णांद्वारे पालन करवून घेऊन अत्यंत शिस्तबद्ध रीतीने दोन्ही ठिकाणच्या शिबिरांचे नियोजन केले.
 ‘डॉक्टर्स आपल्या दारी’ हे अभियान शुक्रवारी सुरु झाले . या द्वारे पुणे शहराच्या कंटेनमेंट वैद्यकीय मदत शिबिरे आयोजित केली जात आहेत.

शुक्रवारी दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पबचत भवन येथे अभियानाचा अनौपचारिक प्रारंभ केला. या अभियानात एकूण १५० डॉक्टर्स मंडळींनी सहभाग नोंदविल्याची  माहिती राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे पुणे शहराध्यक्ष डॉ.सुनील जगताप यांनी दिली.एक महिना हे अभियान चालणार आहे.

पहिल्या दिवशी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल आणि पुणे महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर आपल्या दारी अभियान भवानी पेठ भागात लोहियानगर,फायर ब्रिगेड जवळ तसेच सावधान मंडळ(गंजपेठ,चंदन स्वीटमार्ट जवळ)येथे दुपारी १२ ते ५ या वेळेत घेण्यात आले. २रुग्ण वाहिकांसह १५ डॉक्टर्स सहभागी झाले.७८५ जणांची तपासणी करण्यात आली आणि औषधोपचार करण्यात आले.डॉ राजेश पवार , डॉ संगीता खेनट, डॉ नरेंद्र खेनट, डॉ राहुल सूर्यवंशी, डॉ तुषार वाघ, डॉ.सिद्धार्थ जाधव, डॉ. मोहन ओसवाल, डॉ नितीन पाटील, डॉ सचिन लोंढे, डॉ कपिल जगताप आदींनी सहभाग घेतला.
चेतन तुपे, विनायक हनमघर, गणेश नलावडे, बाबा धुमाळ, सुहास ऊभे यांनी अभियानाला शुभेच्छा दिल्या.

कोरोनाने नाही मानवी प्रवृत्तीने घेतला एक बळी (व्हिडिओ)

पुणे-महामारी आणि लॉक डाउन च्या काळात कशाला झंझट ? अंगावरुन झुरळ झटकावे तसे नियमांची ढाल करत लोकांच्या अडचणी झटकुन टाकायच्या वृत्तीने कंटेन्त एरियातील एका अत्यवस्थ रुग्णाला मदत मिळू शकली नाही, आणि अखेर जीव गमविन्याची वेळ एका वर आल्याचे स्पष्ट झाले आहे.आता चौकशीत देखील अजूनही पुन्हा या प्रकरणी हीच मानवी प्रवृत्ती दिसून येत असून कोणी आपली चूक वा जबाबदारी मान्य करायला पुढे येत नसून, एकमेकांकड़े बोटे दाखविन्याचा खेळ खेळत असल्याचे दिसत आहे. दरम्यान हा सर्व प्रकार सोशल मीडिया त फिरलेल्या एका व्हिडिओ ने उघड़ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यांच्या मृत्युला जबाबदार कोण? पोलिस की रुग्णवाहिका

शहराच्या मध्य वस्तीतील नाना पेठेतील ५४ वर्षीय व्यक्तीला उपचार करण्यास नेण्यासाठी वेळेत अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत अॅम्ब्युलन्स न मिळण्याची वेगवेगळी कारणे देण्यात येत असून, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी या प्रकरणी अॅम्ब्युलन्स सेवा पुरविणाऱ्या संस्थेकडून खुलासा मागविला आहे. या घटनेमुळे शहरात जागोजागी करण्यात आलेले ‘बॅरिकेडिंग’ही डोकेदुखी ठरत असून, मुख्य रस्तेही बंद करून गल्लीबोळांतील रस्ते चालू ठेवण्यात आले आहेत.

नाना पेठेतील ५४ वर्षीय यशूदार मोती फ्रान्सिस यांचा उपचारांअभावी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. फ्रान्सिस यांच्यापर्यंत अॅम्ब्युलन्स का पोहोचू शकली नाही, याचा खुलासा महापालिका आयुक्त गायकवाड यांनी मागवला आहे. फ्रान्सिस यांच्या कुटुंबीयांनी सरकारी हेल्पलाइन क्रमांक १०८; तसेच पोलिस नियंत्रण कक्ष १०० क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली होती. ही मदत त्यांना वेळीच न मिळाल्याने फ्रान्सिस यांचा मृत्यू झाल्याची टीका सर्वत्र होत आहे

बाबांना हदयाचा त्रास असल्यानं आम्ही सगळीजण नेमही त्यांची काळजी घ्यायचो; अगदी रात्री-अपरात्री त्रास जाणवला तरी. आधी हॉस्पिटलमध्ये जायचो, ते बरे व्हायचे. पण गुरुवारी दोन-अडीच तास फोनाफोनी करूनही आम्हाला रुग्णवाहिका न मिळाल्याने वेळेत हॉस्पिटल गाठता आले नाही आणि बाबांना वाचवू शकलो नाही…रुग्णवाहिका आली असती, तर ते बरे होऊन घरी परतले असते…यंत्रणांच्या बेजबाबदारपणाने गुरुवारी रात्री रस्त्यावर अखेरचा श्‍वास घेतलेल्या येशूदास फ्रान्सिस यांचा मुलगा मॅक्‍सने आपल्या वडिलांच्या वाट्याला आलेली वेळ आपल्या भावनेतून उभी केली.नाना पेठेत फुले-हार विक्रीचा व्यवसाय ते करत अचानक गुरुवारी रात्री त्रास वाढल्याने ते हॉस्पिटलमध्ये निघाले; पण रुग्णवाहिका न आल्याने त्यांनी रस्त्यावर अखेरच श्‍वास घेतला. अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला जीव गमावावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी बाधित क्षेत्रांच्या परिसरात म्हणजे मध्यवर्ती भागांतील पेठांभोवती पत्र्यांचे जाळे उभारले गेले आहे. प्रमुख रस्ते आणि चौकही बंद आहेत.

कोरोनाची साथ असूनही काही भागांत साधी रुग्णवाहिका जाईल, इतका रस्ता मोकळा ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णावाहिकाचालकांसह नातेवाइकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्याचाच भाग म्हणून गल्लीबोळ बंद असल्याची कारणे देत रुग्णवाहिका न मिळाल्याने गुरुवारी रात्री एका व्यक्तीला रस्त्यावर आपला जीव गमवावा लागला. यासाठी आरोग्य खात्यासह पोलिस यंत्रणेलाही जबाबदार धरले जात आहे. मात्र, या घटनेशी आपला संबंध नसल्याचा खुलासा संबंधित यंत्रणा करीत असल्या तरी, अशा काळात किमान रुग्णांची सोय व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

पोलीस आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा यांच्यातील समन्वयाअभावी अत्यवस्थ रुग्णाला `गोल्डन अवर`मध्ये उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.

नाना पेठेत, मध्यरात्री रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची वस्तूस्थिती जाणून घेण्या चा प्रयत्न केला असता,. बीव्हीजी 108चे आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे (इएमएस) चिफ ऑपरेटींग ऑफिसर (सीओओ) डॉ. ज्ञानेश्वर शेळके आणि समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम या दोघांच्या बाजू जाणून घेतल्या. त्यातून हे स्पष्ट झाले.

पोलिस संपर्क ,कंट्रोल रूमचा फोन कधी लागतो ? – नेहमीचीच समस्या…108 

108ची रुग्णवाहिका घटनास्थळावर पोचली होती. पण, ज्या पोलिसांनी 108च्या कंट्रोल रूमशी संपर्क साधला होता. त्यांचा फोन लागला नाही. त्यामुळे नाना पेठेत रुग्णाचा नेमका पत्ता सापडला नाही, अशी माहिती 108 रुग्णवाहिकेतर्फे देण्यात आली.

डॉ. शेळके म्हणाले, “पोलिसांनी कॉल केल्यानंतर 108ची रुग्णवाहिका 15 ते 20 मिनीटांमध्ये घटनास्थळावर पोचली. वीस मिनिटे रुग्णवाहिका घटनास्थळावर थांबली होती. पोलिसांनी ज्या फोन नंबरवरून 108 ला रुग्णाची माहिती देणारा फोन केला होता, त्याच्यावर रुग्णवाहिकेच्या चालकाने संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण, पोलिसांशी संपर्क झाला नाही. घटनास्थळावर रुग्ण नेमका कुठे आहे, हे सापडत नसल्याची माहिती रुग्णवाहिकेच्या चालकाने परत कंट्रोल रुमला दिली आणि 20 मिनीटांनंतर नाना पेठ भागातील घटनास्थळ सोडले. या भागात सगळीकडे बॅरिगेटस् टाकून रस्ते बंद केले होते. त्यामुळे रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही. या प्रकरणात पोलिसांशी चर्चा झाली आहे. त्यात पोलिसांनी सांगितले की, या दरम्यान पोलिसांची कामाची वेळ संपल्याने ते तेथून गेले.”कॉल केलेल्या पोलिसांशी संपर्क झाला नाही, या एकाच कारणाने रुग्णाला वैद्यकीय मदत मिळू शकली नाही, असेही त्यांनी सांगितले.

108 ने प्रतिसाद दिला नाही -पोलिसांचा पलटवार
रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसांनी शेवटच्या क्षणापर्यंत कसोशीने प्रयत्न केला. पण, त्याला 108 आपत्कालीन रुग्णवाहिकेने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला.

108च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या मतावर प्रतिक्रिया देताना कदम म्हणाले, “पोलिसांची ड्युटी कधीही रात्री साडेबारा वाजता बदलली जात नाही. 108 ला फोन केलेल्या पोलीसांचा संपर्क होत नसेल तर, रुग्णवाहिकेच्या चालकाने नियंत्रण कक्षाकडे संपर्क का नाही केला.”

कदम म्हणाले, “पोलीस कंट्रोल रूमकडून घटनास्थळी रवाना होण्याचा कॉल मिळाला. मार्शल आणि नाईट राऊड पोलीस ऑफिसर घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्याच वेळी पोलीसांनीही रात्री एक वाजता 108 क्रमांकावर फोन लावला. रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस रुग्णवाहिकेला फोन करत होते.

पोलिस म्हणतात अन्य 2 रुग्णवहिकानी पोलिसांचे ऐकले नाही

पण, कोणतीही रुग्णवाहिका मिळाली नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या दोन रुग्णवाहिका पोलिसांनी थांबविल्या. रग्णाला रुग्णालयात घेऊन चला, अशी विनंती केली. डॉक्टर नाही, म्हणून पहिल्या रुग्णवाहिकेने रुग्णाला घेतले नाही. तर, कॉल असल्याचे सांगत दुसऱ्या रुग्णवाहिकेने रुग्णाला घेण्यात असमर्थता दर्शविली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अखेर रस्त्याने जाणारा छोटा टेंपो अडवला आणि रुग्णाला रुग्णालयात हलविले. साडेचार वाजेपर्यंत पोलीस तेथे होते, असेही त्यांनी सांगितले.

दिल्लीहून विशेष रेल्वेने उद्या पुण्यात परतणार 1345 विद्यार्थी

 

पुणे, दि.१६: दिल्लीहून विशेष रेल्वेने दि. १६ मे रोजी निघालेले महाराष्ट्रातील 1 हजार 345 विद्यार्थी उद्या परतणार असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील 160 विद्यार्थी याठिकाणी पोहोचत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

महाराष्ट्रातील एकूण 1345 विद्यार्थी दिल्लीहून परतत असून भुसावळ, नाशिक, कल्याण व पुणे रेल्वे स्थानकावर हे विद्यार्थी उतरणार आहेत.

पुणे रेल्वे स्थानकावर 489 विद्यार्थी उतरणार असून यापैकी
पुणे जिल्ह्यातील- 160 विद्यार्थी,
सातारा जिल्ह्यातील- 57
सांगली-40
कोल्हापूर- 60
लातूर- 62
उस्मानाबाद-32
सोलापूर-68
सिंधुदुर्ग-2
रत्नागिरी जिल्ह्यातील -8
विद्यार्थी या विशेष रेल्वेने येणार आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले.
000000000

खाजगी रुग्णालयातील अवाजवी बिलांबाबत तक्रार निवारण समिती- जिल्हाधिकारी राम

पुणे, दि. 16-
राज्यात कोरोना विषाणू (कोविड१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाजगी हॉस्पीटलमध्ये जादा बिलासंबंधित प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
जगभरात सर्वत्र पसरत असलेला नवीन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्याच्या संसर्गाने बाधित होणा-या रुग्णांची संख्या लक्षात घेता, जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य विषयक आंतरराष्ट्रीय आपत्ती जाहीर केलेली आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधित उपाययोजनेसाठी जागतिक आरोग्य संघटना व आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून दैनंदिन स्वरुपात सूचना देण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2(अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम, १८९७ हा दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या आटोक्यात ठेवणे, प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे याचा दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. तथापि, वाढती रुग्णसंख्या व भविष्यात उद्भवणारी उद्रेकजन्य परिस्थिती लक्षात घेता, खाजगी रुग्णालये यांच्याकडूनही रुग्णसेवा घेणे अपरिहार्य ठरले आहे. त्या अनुषंगाने खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरु आहे व काही रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या व उपचार घेऊन गेलेल्या बऱ्याच रुग्णांच्या विविध प्रकारच्या मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील प्राप्त अधिकारानुसार जिल्ह्यात प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी
जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आवश्यक असलेल्या सदस्यांची जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत केली आहे.अतिरिक्त आयुक्त, आरोग्य, पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त,आरोग्य, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, पुणे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे जिल्हा हे सदस्य आहेत तर जिल्हा शल्यचिकित्सक हे सदस्य सचिव आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी
सदस्य सचिव या नात्याने सर्व यंत्रणेशी समन्वय साधून प्राप्त होणा-या तक्रारीबाबत समितीचे अध्यक्ष/ सदस्य यांच्याशी समन्वय साधून प्राप्त तक्रारीचे योग्य ते निवारण करण्याच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करावी, असे
जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे
अध्यक्ष नवल किशोर राम यांनी आदेशित केले आहे.

कमला नेहरू पार्क -संकल्पना …नगरसेविका -नावावरून जागृत नागरिक भडकले -आणि अखेर नाव निघाले …

पुणे- संपूर्ण  भाजपचे किंवा अन्य पक्षाचे   नाव खराब होईल असे कृत्य खरेतर कोणी त्या त्या पक्षातील मान्यवरांनी करू नये ,केले तर त्यास पाठीशी घालू नये ,प्रभात रोड वरून कमला नेहरू पार्क कडे जाताना ..हा विषय लोकात रंगलेला दिसत होता , अर्थात लॉक डाऊन असल्याने सारे फोनो फोनीच किंवा सोशल मिडिया वरून चालले आहे असे समजले .नेमके काय प्रकरण आहे ते पाहावे म्हणून काहींना फोन केले ..बहुधा ते फोन वर बोल बोलून वैतागले  असावेत .. त्यांनी घेतले नाही म्हणून म्हटले..आणि शेवटी ज्या जागृत महिलेने या विषयाला वाचा फोडली त्या महिलेला संपर्क करायचा  प्रयत्न केला पण झाला नाही असो पण विषय मात्र गमतीदार होता .. हे इथे खाली टाकलेले दोन्ही फोटो पहा 

 हे फोटो जर नीट पाहिले किंवा दिसले असतील तर सारा प्रकार तुमच्या लक्षात आला असेल . पण हे सारे झाले जागृतता, आणि बेधडक ,निडर पणे घेतलेल्या निर्णयामुळे. 

कमला नेहरू पार्क पुणेकरांना ठाऊक नसेल असां पुणेकर क्वचित असतील . पण प्रत्येक नगरसेविकेचे नाव केवळ काही वार्डातच लोक सांगतील  साऱ्या पुणेकरांना सर्वच नगरसेवक यांची नावे ठाऊक असतील असे काही नाही . 

तर विषय असा आहे आज काल कमानी उभारायच्या आणि संकल्पना नगरसेवक आमुक तमुक असे नाव द्यायचे …एवढेच काय कुठे तरी स्वच्छ पुणे सुंदर पुणे असे भिंतीवरी  जरी रंगविले तरी संकल्पना नगरसेवक आमुक तमुक अशी स्पर्धाच जणू  काही राजकीय मंडळी मध्ये लागलेली असते, तर  पुणे तिथे काय उणे म्हणायचे म्हणा …पण चक्क भाजपच्या या नगरसेविकेने कमला नेहरू पार्क च्या फलकाला .. कमला नेहरू पार्क या नावाखालीच संकल्पना आमुक अमुक नगरसेविका असा फलक रंगविला .. अर्थात हा परिसर कुठला.. आपण कुठे करतो काय याचे जरा भान राखायला नको ? पण झाले भान च हरपले. आणि मग कोणी तरी खवळले ..हे काय ५० वर्षांपूर्वीची बाग हि ..या नगरसेविका..  ताई कशा होतील या बागेच्या संकल्पना राबविणाऱ्या …? असा बेधडक प्रश्न  उपस्थित केला एका जागृत नागरिकाने

जागृत नागरिक ती हि महिला ..सोशल मिडिया वर त्यांनी केला राग व्यक्त … आणि धडाधड त्यावर प्रतिक्रिया हि उमटू लागल्या …आणि त्या सर्वाना साथ मिळाली ती असीम सरोदे यांची … आता असीम काय गप्प बसणार? ..त्यांनी तक्रार केली महापालिका आयुक्तांकडे .. आणि आयुक्त तर काय चूक दिसली, नजरेस आली ,कि धाडकन दुरुस्ती करणार … त्यानुसार अगोदर त्या नगरसेविकेचे नाव निघाले …आणि आता नंतर ते कोणी चूक केली याचा शोध घेणार .. अर्थात नगरसेविकेच्या पतीने म्हणे .. हि ठेकेदाराची चूक आहे असे सांगितलेय ., आता खरे खोटे सारे जाणून आहेतच  ..सारवा सारव होईल .. दुध का दुध ,पाणी का पाणी होईल… पण जागृत नागरिक आणि तत्पर अधिकारी यांनी ठरविले तर बरेच काही होऊ शकते हे सांगणारी हि एक तशी किरकोळ वाटणारी पण महत्वपूर्ण घटना नक्कीच सर्वांनी बोध घ्यावा अशी घडून गेली आहे … तिची दखल माध्यमांनी घेतली  नाही तर नवलच …