परीक्षेसाठी पुस्तकासह परवानगी – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई,: परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त यांची विभागीय परीक्षा आता ऑगस्टमध्ये घेण्यात येणार असून त्यांना परीक्षेसाठी पुस्तकासह परवानगी असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे सदर परीक्षा रद्द करण्याची मागणी राज्यातून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आली होती. त्यावर उपरोक्त निर्णय घेण्यात आला. या वर्षासाठीच्या दोन परीक्षांकरिता पुस्तकांसहित परीक्षेची परवानगी दिली असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.
पोलिस उपअधीक्षक/ सहायक पोलिस आयुक्त (नि:शस्त्र ) या पदावर सरळसेवेने नियुक्त झालेल्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी, त्यांचा परिविक्षाधीन कालावधी संपल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या विभागीय परीक्षेचे आयोजन करण्यात येत असते. सदरील परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. मात्र जुलै २०१३ नंतर आयोगामार्फत अशी विभागीय परीक्षा आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यातील १८२ अधिकारी ही परीक्षा देणे बाकी आहेत. २२ मे २०२०च्या शासन निर्णयान्वये पोलीस अधिकारी (निवडश्रेणी व उच्च श्रेणी) यांच्या विभागीय परीक्षांचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात आला. सदर परीक्षा आता अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) आणि महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे, असेही श्री.देशमुख यांनी स्पष्ट केले.
पुणे विभागातील 18 हजार 824 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 31 हजार 31 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे:-पुणे विभागातील 18 हजार 824 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 31 हजार 31 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 11 हजार 51 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 600 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.66 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.73 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्हयातील 25 हजार 732 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 15 हजार 364 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 560 आहे. कोरोनाबाधित एकूण 808 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 420 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.71 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.14 टक्के इतके आहे. कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 334 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 174, सातारा जिल्ह्यात 43, सोलापूर जिल्ह्यात 86, सांगली जिल्ह्यात 11 तर कोल्हापूर जिल्ह्यात 20 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1188 रुग्ण असून 757 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 383 आहे. कोरोनाबाधित एकूण 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील 2 हजार 813 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 724 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 813 आहे. कोरोना बाधित एकूण 276 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 410 रुग्ण असून 254 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 144 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयातील 888 कोरोना बाधीत रुग्ण असून 725 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 151 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 88 हजार 313 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 84 हजार 160 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 153 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 52 हजार 781 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 31 हजार 31 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
पुणे,: राज्यातील कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत आज घेण्यात आला. राज्य कृषी आणि शिक्षण संशोधन परिषदेची बैठक आज कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखालीझाली यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्यासह कृषी परिषदेचे संचालक उपस्थितहोते. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील काष्टी याठिकाणी कृषी व्यवस्थापन महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. राहुरी कृषी विद्यापीठाच्याअंतर्गत हे महाविद्यालय सुरू होणार आहे तसेच भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये केली होती. त्यानुसार साकोली मध्ये कृषी महाविद्यालय उभारण्याच्या निर्णयाला आज मंजुरी देण्यात आली. अकोला कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरु करण्यात येणार असल्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, राज्यातील कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात येणार होती. परंतू कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचाविचार करुन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे. शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द होणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांना आता गेल्या वर्षभरातील अंतर्गत गुणांचे मूल्यमापन करून तसेच गेल्या दोन वर्षातील गुणांची सरासरी विचारात घेऊन उत्तीर्ण केले जाईल. राज्यातील दोन वर्ष कालावधी व तीन वर्ष कालावधी च्या पदविका अभ्यासक्रम शिकणाऱ्या एकूण दहा हजार विद्यार्थ्यांचा समावेश या निर्णयात होणार आहे. या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षातील अंतर्गत परीक्षेचे गुण आणि गेल्या दोन वर्षातील मिळालेल्या गुणांच्या सरासरी वर आधारित गुण घेऊन उत्तीर्ण केले जाणार आहे. यानिर्णयाचा फायदा राज्यातील 230 कृषी विद्यालयातील दहा हजार विद्यार्थ्यांना होणार आहे, असल्याचे ही कृषी राज्यमंत्री श्री कदम यांनी सांगितले.
पुणे,: पाचगाव पर्वती येथील तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी 13 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात तळजाई वन उद्यान विकास आराखड्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार माधुरी मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, उपवन संरक्षक श्रीलक्ष्मी, नगरसेवक सर्वश्री आबा बागूल, आश्विनी कदम, सुभाष जगताप, माजी नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्याच्या विकास कामांसाठी कोणतीही आडकाठी आणली जाणार नाही, असे स्पष्ट करुन उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, पुणे शहराच्या दृष्टिने चांगल्या गोष्टी व्हाव्यात, या मताचा मी आहे. पाचगाव पर्वती या वनक्षेत्राचा निसर्ग पर्यटन आराखडा तयार करुन त्यास नागपूर येथील महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची मंजुरी घेण्यात आलेली आहे. या आराखड्यासाठी राज्य शासनाच्यावतीने 13 कोटी रुपये उपलबध करुन दिले जातील.
यानंतर बैठकीत सेनापती बापट रोड ते पंचवटी पर्यायी रस्ता, मॉडर्न कॉलेज येथील पर्यायी रस्त्याबाबतही चर्चा झाली. यावेळी आमदार सिध्दार्थ शिरोळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पुणे प्रदेश विकास प्राधीकरणाचे महानगर आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, उपवन संरक्षक श्रीलक्ष्मी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.
पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करा- उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे,: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात कोराना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी टेस्टींग इन्चार्ज म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याची नेमूणक करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध राबवा त्यानुसार मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर,जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड चे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शासनाचे वैद्यकीय सल्लागार, संचालक डॉ. अर्चना पाटील, ससून चे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोविड रुग्णांवर उपचार करतांना नॉन कोविड रुग्णाकडे दुर्लक्ष होता कामा नये, काही रुग्णालयामध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करा, लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यांनतर शहरी भागातील नागरिक ग्रामीण भागात ये-जा करत असल्यामुळे या भागात कोरोनाचा प्रसार होतांना दिसून येत आहे. ग्रामीण भागात विविध समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने कोरोना विषाणूच्या संसर्गावर कसे नियंत्रण मिळवता येईल, यासाठी योजना तयार करा. शहरातून ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांनी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढतांना दिसून येत आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याच्या करीता आवश्यक ती कार्यवाही करावी. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत.त्यामुळे कारखान्यातील कामगारांची गैरसोय होवू नये यासाठी कारखान्याच्या मालकानी कामगाराची राहण्याची करावी. तसेच काम करीत असतांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार कामगारांना मास्क वापरण्यास, हात वारंवार धुण्यास आणि शारिरीक अंतर पाळण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नेमूणक करतांना परिस्थितीनिहाय कामकाजाचे सूक्ष्म वाटप करा. ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती आटोक्यात आण्यासासाठी कम्युनिटी लिडर्सची मदत घ्या. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनातील कोरोनाविषयक भीती घालविण्यासाठी जनजागृतीवर भर द्या, या गोष्टी करतांना प्रतिबंधित क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करा, कोरोना बाधित रुग्ण तात्काळ शोधण्यासाठी आरोग्य पहाण्यांचे चाचण्यांचे प्रमाण वाढवा, त्यांचे तपासणी अहवाल लवकरात लवकर प्राप्त करा, जेणेकरुन सामूहिक संसर्ग पसरणार नाही. एखादा कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची तात्काळ तपासणी करा, कोरोना बाधित रुग्णावर तात्काळ वर्गवारीनुसार उपचार सुरु करा, आरोग्य सेतू ॲप मधील माहितीचा प्रभावीपणे वापर करा, यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राची मदत घ्या. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊन कालावधीत शासनाच्या निर्देशाची कडक अमंलबजावणी करा, अशा स्वरुपाचा सर्वंकष कृती आराखडा तयार करा, अशा महत्त्वपूर्ण सूचना मेहता यांनी केल्या. कोरोना विषाणूविषयक नमुना चाचण्या वेळेत होत आहे किंवा कसे ? याकरीता एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची सूचनाही मेहता यांनी केली. बैठकीच्या प्रारंभी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्याच्या तुलनेत पुणे जिल्ह्याची कोरोना बाबतची सद्यस्थिती सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यामध्ये बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन, आरोग्य सर्व्हेक्षण, मास्क, पीपीई कीट, आयसीयू, ऑक्सीजनयुक्त खाटा आणि श्वसनयंत्रे ( व्हेटिंलेटर) इत्यादी विषयी माहिती दिली. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात आतापर्यंतचे बाधित रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू दर, नमुना चाचण्या वाढविण्यासाठी प्रशासनाचे नियोजन, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा या बाबतची माहिती दिली. कोरोना बाधित रुग्णांचे निदान करण्यासाठी अँटीजेन टेस्ट कीटचा वापर करण्यास सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोना मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या व भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच सहव्याधी (कोमॉर्बीड) नागरिकांचे सर्व्हेक्षण, घेण्यात येणारी दक्षता, प्रतिबंधित क्षेत्रातील उपाययोजना आदींची माहिती दिली. जिल्हा परिषदेमार्फत कॉल सेंटर सुरु करण्यात आले असून त्याद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या वतीने घेण्यात आलेले निर्णय कळविण्यात येतात. त्याची अंमलबजावणी आपापल्या भागात होत आहे किंवा कसे याबाबत माहिती घेण्यात येते, असे सांगितले. पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड व पिंपरी चिंचवड चे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांच्या-त्यांच्या महापालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टिने करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
दिशाभूल केल्यास कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा इशारा
मुंबई,: ‘पतंजली’ने बाजारात आणलेल्या ‘कोरोनील’ औषधाने कोरोना बरा होत नाही. या औषधामुळे कोरोना बरा होतो असा जनतेत संभ्रम निर्माण केल्यास अथवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास गृह विभागाच्या मदतीने औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 नुसार कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.
या औषधामुळे कोरोना बरा होतो असा संभ्रम जनतेमध्ये निर्माण करुन त्यांची दिशाभूल होत आहे. प्रत्यक्षात पतंजलीने तयार केलेले औषध ‘कोरोनील’ हे अश्वगंधा, तुळस व गुळवेल वापरून तयार केलेली गोळी (tablet) असून तिचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होतो. आयुष मंत्रालयाने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अश्वगंधा, तुळस, गुळवेल हे घटक समाविष्ट असल्याने ‘कोरोनील’ची शिफारस केली आहे. प्रत्यक्षात यामुळे कोरोना बरा होत नाही.
कोरोनील हे औषधासाठी दिलेले नाव (कोरोना+नील) व प्रसार माध्यमातून होत असलेल्या जाहिरातीमुळे जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण होत आहे. ‘कोरोनील’चा वापर फक्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून केला जाऊ शकतो. या औषधामुळे कोरोना बरा होत नाही याची नोंद जनतेने घ्यावी, असे आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केले आहे.
मुंबई, दि.२: राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८ हजार १८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. आज सर्वाधिक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळातील असून ७ हजार ३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज सोडण्यात आलेल्या ८ हजार १८ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ७ हजार ३३ (आतापर्यंत एकूण ७२ हजार २८५) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४७७ (आतापर्यंत एकूण १४ हजार ३१५), नाशिक मंडळात ३३२ (आतापर्यंत एकूण ५६०२), औरंगाबाद मंडळ ९३ (आतापर्यंत एकूण ३२१४), कोल्हापूर मंडळ १२ (आतापर्यंत एकूण १५५६), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ७०२), अकोला मंडळ ३१ (आतापर्यंत एकूण १९६४), नागपूर मंडळ ३३ (आतापर्यंत एकूण १५३४) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.
दि. २९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८ हजार ३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा तेवढ्याच विक्रमी संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून दि. १५ जून रोजी एकाच दिवशी ५ हजार ७१, दि.२४ जून रोजी ४ हजार १६१ आणि दि. २५ जून रोजी ३ हजार ६६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जूनमध्ये एकाच महिन्यात १२ हजार ८९३ एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले.
गेल्या काही महिन्यापासून सातत्याने राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे ५१ ते ५३ टक्क्यांच्या आसपास राहिला आहे. राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टिव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
पुणे : कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊन काळात चार महिन्यांपासून हातावर पोट असलेल्या सर्वसामान्यांचे आणि झोपड्पट्टीवासीयांचे अतोनात हाल सुरु आहेत. अशातच महावितरणने चार महिन्यांचे एकत्रित वीजबिल देऊन त्यांच्या अडचणीत भर घातली आहे. कष्टकरी वर्गाला दिलासा देण्यासाठी या चार महिन्याचे वीजबिल सरसकट माफ करावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ‘रिपाइं’ पुणे शहराच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्य अभियंता यांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास ‘रिपाइं’च्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता पेठेतील महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘रिपाइं’ पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष संजय सोनावणे, बसवराज गायकवाड, सचिव बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, महिला अध्यक्ष शशिकला वाघमारे, निलेश आल्हाट, मोहन जगताप, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, संदीप दांडोरे, जयदेव रंधवे, लियाकत शेख, रफिक दफेदार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “मार्चपासून लॉकडाऊन लागू केल्याने हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य व झोपडपट्टी धारकांचे मोठे हाल झाले आहेत. घरकाम करणार्या महिला, रिक्षा व्यवसायिक, मोलमजुरी व फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काम पूर्णपणे बंद असल्याने सर्वसामान्य व झोपडपट्टी धारकांवर हलाखीची परिस्थिती आली आहे. तसेच आजही अनेक भागांमध्ये कंटेनमेंट झोन लागू आहे. महावितरणने चार महिन्यांचे लाईट बिल दिले आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सरकारची वागणूक अन्यायकारक असून, सर्वसामान्य व झोपडपट्टीधारकांना कठोर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लॉकडाउनमधील चार महिन्यांचे वीजबिल सरसकट माफ करावे, झोपडपट्टीधारकांना नवीन वीज कनेक्शन मोफत द्यावे, लॉकडाउनपूर्वीच्या कीत वीजबिल धारकांना दिलेल्या हप्त्यांवर व्याज आकारू नये, परगावी अडकून पडलेल्या सर्वसामान्यांना घर बंद असतानाही आकारण्यात आलेले सरासरी वीज बिल माफ करावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
पुणे-मोदी सरकारने प्रियंका गांधी यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणे हे दुर्देवी आहे. प्रियंका यांनी आपली आजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांचा भयानक मृत्यू पाहिला आहे. आजही गांधी कुटुंबावरील हा धोका टळलेला नसताना सुरक्षा व निवासस्थान काढून घेणे हे भाजपचे हीन राजकारण आहे. प्रियंका गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भेदरलेले भाजप सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे पण अशा कृतींना प्रियंकाजी व काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. यापुढेही जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहू व लोकशाही विरोधी केंद्र सरकारविरोधात आवाज उठवत राहू असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.
सुरक्षा व निवासस्थान काढून घेण्याच्या कृतीवर थोरात यांनी मोदी सरकारचा सडकून समाचार घेतला. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता पाहून केंद्रातील भाजप सरकार घाबरले आहे. राहुल गांधी व प्रियंका गांधी सातत्याने भाजप सरकारच्या चुकीच्या निर्णयाबद्दल जाब विचारत आहेत. त्यामुळे भाजपाची कोंडी होत असून त्यांनी प्रश्न विचारू नयेत म्हणूनच त्यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. सरकारला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत म्हणून अशी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. भाजप सरकारने अशाप्रकारे कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी प्रियंका व राहुल गांधी हे जनतेच्या हितासाठी सरकारला प्रश्न विचारतच राहतील, सामान्य जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करत राहतील असेही थोरात म्हणाले.
सोलापूर, दि.2 : जिल्ह्यातील दहा औद्योगिक कंपन्यातील 1519 रिक्त पदांची भरती करण्यासाठी 6, 7 आणि 8 जुलै रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे बंद झालेले उद्योग अटी व शर्तीवर सुरू झाले आहेत, अशा उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्रता दहावी उत्तीर्ण/अनुतीर्ण, बारावी, डिप्लोमा, पदवीधर, पदवीव्युत्तर पदवी अशी आहे. या मेळाव्यात ट्रेनी, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मिल अटेंडर, शिफ्ट असिस्टंट, कारपेंटर, ड्राफ्टसमन, सेल्स एक्झिक्युटीव्ह, सर्विस इंजिनिअर, टेली कॉलर, संगणक ऑपरेटर, विमा सल्लागार, नर्सिंग फार्मासिस्ट, ड्युटी मेडिकल ऑफिसर, सिक्युरिटी गार्ड, सुपरवायझर, स्विपर, आया या पदांची भरती होणार आहे. उमेदवारांच्या मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स किंवा फोनद्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे,. अधिक माहितीसाठी 0217-2622113 या दूरध्वनीवर किंवा solapurrojgar1@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा,
पुणे विभागातील 17 हजार 911 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 29 हजार 697 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे दि. 2 :- पुणे विभागातील 17 हजार 911 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 29 हजार 697 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 10 हजार 652 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1134 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 537 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.31 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.82 टक्के आहे,अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. यापैकी पुणे जिल्हयातील 24 हजार 558 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 14 हजार 494 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 274 आहे. कोरोनाबाधित एकूण 790 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 405 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 59.02 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.22 टक्के इतके आहे. कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 449 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1237, सातारा जिल्ह्यात 95, सोलापूर जिल्ह्यात 83, सांगली जिल्ह्यात 16 तर कोल्हापूर जिल्ह्यात 18 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 1145 रुग्ण असून 743 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 355 आहे. कोरोनाबाधित एकूण 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयातील 2 हजार 727 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 710 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 744 आहे. कोरोना बाधित एकूण 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 399 रुग्ण असून 239 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 148 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयातील 868 कोरोना बाधीत रुग्ण असून 725 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 131 आहे. कोरोना बाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 83 हजार 798 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 79 हजार 691 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 107 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 49 हजार 652 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 29 हजार 697 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
( टिप :- दि. 2 जुलै 2020 रोजी दुपारी 3.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार ) 0000
पुणे : सारथी संस्थेच्या संदर्भातील सर्व प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे सांगतानाच लवकरच सारथीच्या अडचणीसंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा केली जाईल तसेच मराठा-कुणबी समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कौशल्य विकासविषयक प्रशिक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या आणि रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच यावर्षीच्या अर्थसंकल्पात सारथीसाठी ५० कोटी रूपयांची तरतूद केली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री.वडेट्टीवार यांनी सारथी संस्थेच्या प्रश्नासंदर्भात आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, सामाजिक कार्यकर्ते अतुल लोंढे, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री वडेट्टीवार म्हणाले, केंद्रीय तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षांमध्ये यश मिळविण्यात मराठा तसेच कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी सारथीच्या माध्यमातून यापुढेही व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येतील. कौशल्य विकास विषयक प्रशिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, आवश्यक पदे भरण्यात यावीत तसेच महिलांना प्राधान्य देण्यासोबतच विद्यार्थ्यांना अधिकाधिक नोकऱ्यांच्या उपलब्धतेसाठी संस्थेने प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी सारथीचे आगामी नियोजन तसेच अडचणीबाबत माहिती दिली. यावेळी सारथीचे पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते.
नागपूर,दि.२ जुलै २०२०: लॉकडाऊनच्या काळात महावितरणने ग्राहकांना उत्तम सेवा दिली. तथापि या काळातील वीजबिल भरणा प्रमाण अत्यंत कमी झाल्याने महावितरण आर्थिक संकटात सापडले आहे. याही परिस्थितित वीज ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देणे आवश्यक असून महावितरणला त्यासाठी आर्थिक मदतीची अतिशय गरज आहे. ही गरज लक्षात घेऊन राज्याच्या ऊर्जा विभागाने आज केंद्र सराकारकडे १० हजार रूपये कोटी निधीच्या अनुदानाची मागणी केली आहे. उर्जा विभागातील अधिका-यांशी सलग दोन दिवस चर्चा करून राज्याचे ऊर्जामंत्री ना.डॉ. नितीन राऊत यांनी दि.२ जुलै २०२० रोजीच्या एका पत्राद्वारे केंद्रातील ऊर्जामंत्री मा. आर.के.सिंग यांना निधीची मागणी केली आहे.
लॉकडाऊनच्या काळातील वीजबिलांमध्ये सवलत देण्यात यावी, अशी मागणी विविध संघटना व वीजग्राहकांकडून करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वच उद्योग व व्यावसायिक आस्थापने बंद होती. वीजग्राहकही आर्थिकद्दष्ट्या सक्षम नाहीत. अशाही परिस्थितीत महावितरण ग्राहकांना जास्तीतजास्त चांगली सेवा पुरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे, असे सांगून ऊर्जामंत्री ना.डॉ. नितीन राऊत म्हणाले की, महावितरणच्या एकूण महसुलापैकी सुमारे ६० टक्के महसूल औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांकडून प्राप्त होतो. त्यामुळेच घरगुती आणि कृषीग्राहकांना क्रॉस सबसिडीच्या माध्यमातून वाजवी दराने वीजपुरवठा करण्यात येतो. कोविड -१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चरोजी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे एप्रिल, मे व जून या कालावधीमध्ये महावितरणच्या महसुलावर मोठा परिणाम झाला.
अत्यावश्यक बाबी जसे की, वीज खरेदी, कर्मचाऱ्यांचे पगार, विविध कर, कर्जाचे हप्ते इत्यादींचा खर्च करणे महावितरणला देणे क्रमप्राप्त आहे. परिणामी महावितरण हे अभूतपूर्व आर्थिक संकटरात सापडले असून दैनंदिन कामाकरिता महसुलांची उणिव निर्माण झाली आहे. त्याकरिता चालू भांडवल रू तीन हजार ५०० कोटींचा ओव्हर ड्रॉप घेण्यात आला आहे. विविध पायाभूत प्रकल्पाकरिात ३८ हजार २८२ कोटींचे कर्ज असून त्यापोटी प्रतिमाह ९०० कोटींचा हप्ता व त्यावरील व्याज देणे क्रमप्राप्त आहे,असे ऊर्जामंत्री ना.डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
ऊर्जामंत्री ना.डॉ. नितीन राऊत यांनी पुढे असेही सांगितले की, एप्रिल-२०२० पासून वीजनिर्मिती कंपन्यांचे देणे प्रलंबित असून त्याचा आर्थिक डोंगर निर्माण झाला आहे. महावितरणवर या अभूतपूर्व संकटाचे दूरगामी आर्थिक परिणाम झाले आहेत. महावितरणला यातून उभारी घेण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. तसेच निधी उपलब्धतेबाबत बँक तसेच वित्तिय संस्थांकडून महावितरणला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
केंद्र सरकारने उपलब्ध केलेले ९० हजार कोटी रूपयांच्या पॅकेजचा लाभ देखील महावितरणला मिळाला नाही. या सर्व बाबींचा परिणाम महावितरणच्या ग्राहकांवर होत आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे महावितरणची झालेली गंभीर आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन केंद्र सराकारने १० हजार रू. कोटींची आर्थिक मदत अनुदान स्वरूपात द्यावी, अशी मागणी ऊर्जामंत्री ना.डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे.
असं म्हणतात, ‘देवाची इच्छा असली तरच तुम्हाला त्याचं दर्शन होतं’.. आमच्या बाबतीत हे तंतोतंत खरं ठरलं. ही माझी तशी दुसरी आषाढी वारी… सन २०१८ मध्ये आषाढी निमित्त पंढरपूरातच होतो, पण पुण्यात अचानक तत्कालिन मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असल्याने दशमीच्या रात्रीच पुण्याला परत निघावं लागलं होतं… श्री विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन… पंढरपुरात येऊनही श्रींचं प्रत्यक्ष दर्शन न झाल्याची रुखरुख मनात होतीच…
सध्या कोरोना (कोविड-१९) विषाणू संसर्गजन्य परिस्थिती आहे. संपूर्ण विश्वावर महामारीचं सावट आहे. ही परिस्थिती विचारात घेऊन आषाढी वारी पालखी सोहळा नेहमीप्रमाणं पार पडणं शक्य नव्हतं. अनेकांना इच्छा असूनही वारीमध्ये सहभागी होता आलं नाही. परिस्थितीमुळं घरात राहूनच पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागलं. परंपरेप्रमाणे पालखी सोहळ्यात कोणताही खंड न पडता भक्तीभावानं तथापि, शासकीय नियमांचं पालन करुन साजरा होणार होता. आषाढी यात्रा ही सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे ‘महायात्रा’ म्हणूनही ओळखली जाते. या वर्षी बुधवार १ जुलै, २०२० रोजी पहाटे २.२० वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा करणार असल्यानं शासकीय स्तरावर प्रसिद्धी विषयक कार्यवाही करणं गरजेचं होतं.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रवेशासाठी आरोग्यविषयक सर्वच खबरदारी घेण्यात येत होती. सोलापूरचे जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत आणि पंढरपूर उप माहिती कार्यालयाचे अविनाश गरगडे यांनी आषाढी वारी वृत्तांकनासाठी येणाऱ्या सर्वांची ‘कोरोना’ चाचणी करणे बंधनकारक असल्याचं कळवलं. त्यानुसार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठातांना पत्र पाठवून आमची ‘कोरोना चाचणी’ करण्याची विनंती केली. ‘ससून’चे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी तातडीने कोरोना चाचणी केली. पुण्यामध्ये ९ मार्चपासून कोरोना वृत्तांकन करत असल्यानं आमच्या सर्वांच्या मनात थोडी धाकधूक होतीच, पण सर्वांचीच चाचणी ‘निगेटिव्ह’आली. दरम्यान, पुण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना वाहन प्रवेश पास बाबत विनंती केली, त्यांनीही तातडीने वाहन पास उपलब्ध करुन दिले. आवश्यक ती पूर्वतयारी झाल्यानंतर पुण्याहून दोन पथकं पंढरपूरकडं मार्गस्थ झाली. पथकामध्ये माहिती सहायक संदीप राठोड, विलास कसबे, व्हिडीओ कॅमेरामन संजय गायकवाड, संतोष मोरे, छायाचित्रकार नितीन सोनवणे, चंद्रकांत खंडागळे, सुनील झुंजार, जितेंद्र खंडागळे यांचा समावेश होता. प्रत्येकाला आषाढी वारीचा पूर्वानुभव असल्यानं पंढरपूरपर्यंतचा मोकळा रस्ता पाहून त्यांच्या गप्पांमध्ये वारी वृत्तांकनाच्या जुन्या आठवणींचाच समावेश होता.
ना टाळ-मृदुंगाचा गजर, ना भागवत पताका घेतलेले वारकरी.. ना तुळशी डोक्यावर घेतलेल्या मायमाऊली.. ना विठूनामाचा जयघोष… पूर्वी वारकऱ्यांच्या गर्दीमुळे वैताग वाटायचा, पण आता रस्त्यात कुठेही वारकरी दिसत नाही… टाळ-वीणा-मृदुंगाच्या साथीनं ‘जय जय रामकृष्ण हरी’, ‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय’, असं कानावर पडत रहायचं… भक्तीरसाचा महापूर पाहून आलेला वैताग क्षणात दूर व्हायचा… मन आनंदी, उल्हासित व्हायचं… आज मात्र यापैकी काही अनुभवायला मिळालं नाही… म्हणून त्यांचं मन खट्टू होतं… पण त्याचवेळी ही ‘आगळी-वेगळी वारी’ अनुभवायला मिळत असल्याचा एक वेगळाच आनंद होता… रस्त्यात ठिकठिकाणी पोलीस चौक्या होत्या. मुख्यमंत्री हे वाहनानं येणार असल्यानं योग्य ती दक्षता घेण्यात आली होती. परिसरातून कोणी वारकरी पंढरपुरात येऊ नये, यासाठी प्रत्येक वाहनाची तपासणीही करण्यात येत होती. पोलीस प्रत्येकाशी प्रेमानं आणि समजूतीनं बोलत होते. नेहमी असणारा ताण कोणाच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हता.
दशमीच्या रात्री ८ वाजता आमचं पथक पंढरपुरात पोहोचलं. संचारबंदीमुळं रस्त्यावर सामसूम दिसत होती. चंद्रभागा तीरावरही शुकशुकाट जाणवत होता. संपूर्ण बाजारपेठ बंद होती, पोलिसांचा मात्र कडेकोट बंदोबस्त दिसत होता. ज्या रस्त्यावरुन पायी जायला अर्धा-पाऊण तास लागायचा, त्या रस्त्यावरुन १० मिनिटांत जाता आलं, याचं पथकातील प्रत्येकाला आश्चर्य वाटत होतं. पंढरपूरच्या उप माहिती कार्यालयात पोहोचल्यावर प्रसिद्धी नियोजनाचा आढावा घेतला. आवश्यक ते सर्व नियोजन झालेलं होतं. पथकाची ‘भक्तनिवास’मध्ये निवासाची व्यवस्था होती. एकादशीच्या पहाटे श्रींची महापूजा होणार असल्यानं रात्रीच मंदिरात जावं लागणार होतं. स्नान आणि नंतर भोजन करुन रात्री १० वाजता मंदिरात प्रवेश केला. मंदिरावर रंगीत विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरातही फुलांची सजावट करण्यात आली होती. दरम्यान, सह्याद्री वाहिनीवरुन शासकीय महापुजेचं थेट प्रक्षेपण होणार होतं. त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्यानं तातडीनं पर्यायी व्यवस्था करण्यात आली. रोहन गवळी, विशाल गौड यांनी प्रक्षेपणाची धुरा सांभाळली. अंकुश चव्हाण, सचिन जाधव पत्रकारांशी समन्वय साधून होते. महापुजेपूर्वी मंदिर परिसर दोनदा फवारणी करुन निर्जंतूक करण्यात आला. नित्यपूजा, पाद्यपुजेला उपस्थित राहून दर्शन सोहळा अनुभवायला मिळाला.
पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे तसेच मानाचे वारकरी प्रतिनिधी ठरलेले विणेकरी विठ्ठल ज्ञानोबा बडे, त्यांच्या पत्नी अनुसूया बडे यांच्या उपस्थितीत श्रींची महापूजा संपन्न झाली. परंपरेप्रमाणं विठ्ठल-रुक्मिीणीमातेची भक्तीभावानं पूजा करण्यात आली. फुलांचा आणि तुळशीचा हार अर्पण करण्यात आला. पूजेनंतर मंदिर समितीच्यावतीनं सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते ठाकरे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मानाचे वीणेकरी दाम्पत्याचा सत्कार केला. ‘कोरोना’चं संकट लवकर नष्ट कर, असं साकडं देवाला घातल्याचं त्यांनी सत्कारप्रसंगी सांगितलं. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह नगराध्यक्ष साधना भोसले, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे, शकुंतला नडगिरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र भोसले, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकटामुळं राज्याच्या विविध भागातून पंढरपूरमध्ये वारकरी पायी चालत येणं हे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व पंढरपूरमध्ये संसर्गाचा मोठा धोका निर्माण करणारं ठरु शकत होतं. यात्रेनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक एकत्र आल्यास सामूहिक संसर्गाचा धोकाही होता. संसर्ग झालेले भाविक, वारकरी त्यांच्या भागामध्ये परत गेल्यानंतर त्या भागातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या व्यतिरिक्त बुक्का विक्री, मूर्ती विक्रेते, हार-फूल विक्रेते, तंबोरे, टाळ,वीणा व फोटो विक्रेते यांच्यासारखे अनेक लहान-मोठे व्यावसायिक यात्रा काळात पंढरपूरमध्ये येत असतात. या जनसमुदायांमध्ये शारीरिक अंतर राखणं शक्य होणार नव्हतं. तसंच पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या मुकाबल्यामध्ये व्यस्त आहेत. या सर्व गोष्टींचा सर्वंकष विचार करुन आषाढी वारी पालखी सोहळा निवडक वारकऱ्यांसोबत तेवढ्याच भक्तीभावानं साजरा करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला.
पंढरपूर मंदिरे अधिनियम, १९७३ च्या तरतुदीनुसार पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा कारभार पंढरपुरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपुरकडं शासनामार्फत सोपवण्यात आलेला आहे. या अधिनियमानुसार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडं या मंदिराचं संपूर्ण व्यवस्थापन आलेलं आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडं श्री विठ्ठल रूक्मिणीचं पंढरपूरातील मुख्य मंदिर आणि मंदिरातील ३६ परिवार देवता तसंच पंढरपूर शहर व परिसरातील २८ परिवार देवता यांचं व्यवस्थापन करण्याचं कामकाज आहे. या सर्व देव-देवतांची पूजा-अर्चा इत्यादी दररोजचे नित्योपचार, नैमित्तिक उपचार मंदिरात व मंदिराबाहेरील परिवार देवतांच्या मंदिरात साजरे करण्यात येणारे यात्रा व उत्सव, वर्षातून चार वेळा येणाऱ्या आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री या चार मोठ्या यात्रा कालावधीत भाविकांची गर्दी मोठया प्रमाणात असते. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर हे ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखलं जातं. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचं स्थान व उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या या दैवताच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यातून व देशभरातून वर्षभरात अंदाजे १ कोटीपेक्षा जास्त भाविक भेटी देतात. या यात्रा कालावधीत अंदाजे १५ लाख भाविक पंढरपूर दर्शनासाठी येतात.
यंदाच्या आषाढी वारीसाठी अनेकांची इच्छा असूनही पंढरपूरला येता आलं नाही. आम्हाला मात्र शासकीय कर्तव्याचा भाग म्हणून का होईना पंढरपूरला जाता आलं… श्री विठ्ठल मंदिरात रात्री १० वाजेपासून शासकीय महापूजा झाल्यानंतरही पहाटे साडे पाच पर्यंत श्री विठ्ठल –रुक्मिणीमातेचं डोळे भरुन मनोभावे दर्शन घेता आलं. यापूर्वी न झालेल्या दर्शनाची खंत दूर झाली… आम्ही सारे एक प्रकारे भाग्यवंत ठरलो…
पुणे-:’केंद्र सरकार ने राज्याला भरगोस निधी देऊन ही राज्य सरकार बारा बलुतेदारांना कुठल्याही प्रकारची मदत करत नाही हे अतिशय दुर्दवी आहे सरकार बारा बलुतेदारांना हेतुपुरस्सर डावलत आहे त्या मुळे जो पर्यंत सरकार आर्थिक पॅकेज जाहीर करत नाही तोपर्यंत आंदोलन करणार ‘असल्याचे प्रतिपादन खासदार गिरीश बापट यांनी केले.भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शहराच्या आठही मतदारसंघात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते याचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघाच्या वतीने आज कसबा गणपती मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले बापट पुढे म्हणाले मागील सरकार ने बारा बलुतेदारांना न्याय दिला ती गोष्ट आघाडी सरकारच्या काळात होत नाही बारा बलुतेदारांना या सरकार ने वाऱ्यावर सोडल्याचे चित्र दिसत आहे या सरकार ला जाग आणल्याशिवाय तसेच आर्थिक पॅकेज जाहीर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही ग्वाही बापट यांनी दिली यावेळी खासदार गिरीश बापट भा ज प चे शहराध्यक्ष जगदीश मुळीक ,संघटन सचिव राजेश पांडे महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष स्वरदा बापट सरचिटणीस राजेश येनपुरे गणेश घोष स्थायी समिती चे अध्यक्ष हेमंत रासने सभागृह नेते धीरज घाटे व अन्य नगरसेवक उपस्थित होते या आंदोलनाचे आयोजन संजय देशमुख ,छगन बुलाखे ,राजू परदेशी अमित कंक राजू काकडे गणेश पाचेरकर ,उमेश चव्हाण अजय तांबट भासमराज तिकोने,पुष्कर तुळजापूरकर यांनी केले या वेळी बारा बलुतेदारांचे प्रतिनिधी तसेच तुळशीबाग व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते