पुणे,दि. 2 : जिल्ह्यात ‘कोविड-19’ आजारातून बरे होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे, नागरिकांना उपचार व समुपदेशनासाठी पुण्यातील दोन्ही जम्बो रुग्णालये, ससून रुग्णालय, बाणेर कोविड रुग्णालय व नायडू रुग्णालय अशा पाच रुग्णालयांत ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
‘कोविड व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
बैठकीच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
बैठकीला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (व्हिसीव्दारे), पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, खासदार वंदना चव्हाण तसेच आमदार अशोक पवार, आमदार राहूल कुल, आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार सुनील कांबळे यांच्यासह पदाधिकारी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, ससून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी एस चोक्कलिंगम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ.सुभाष साळुंखे, आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, जिल्हा टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. डी. बी.कदम तसेच वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे शहर व ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जिल्ह्यातील कोविड आजारातून बरे झालेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास जाणवत असल्यास त्यांना औषधोपचार व समुपदेशन देण्याच्या दृष्टीने ‘पोस्ट कोविड ओपीडी’ लवकर सुरु होणे आवश्यक आहे. शहरातील 5 रुग्णालयात ही ओपीडी सुरु झाल्यानंतर अन्य रुग्णालये व ग्रामीण भागातही टप्प्याटप्प्याने ही सुविधा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगून कोविड रुग्णांवर उपचार करताना आयुष मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचेही पालन करावे. ग्रामीण भागातील रुग्णालयांमधील उपचारासाठीचे दर निश्चित करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील वैद्यकीय उपकरणे दुरुस्ती अभावी बंद राहू नयेत, याची जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी. तसेच कोविड रुग्णांकडून अवाजवी शुल्क आकारणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
कंपन्यांच्या कामगारांमुळे कोरोनाचा फैलाव वाढू नये, यासाठी कंपन्यांमध्ये प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हायला हवे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेच्या अनुषंगाने घरोघरी सर्वेक्षणावर भर देत बाधित रुग्णांवर वेळेत उपचार मिळवून देण्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होईल. शहरात काही नागरिक विना मास्क रस्त्यावर फिरताना आढळतात. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शिस्त पाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, सध्या शहरात बाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे, तथापि, आरटीपीसीआर सह अन्य चाचण्या वाढवणे आवश्यक आहे.खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कोरोनाच्या अनुषंगाने नागरिकांच्या तपासण्यांसाठी रॅपिड अँटीजेन चाचणी बरोबरच अन्य अत्याधुनिक तंत्रांचा वापर व्हायला हवा, असे सांगितले. खासदार वंदना चव्हाण, आमदार सर्वश्री अशोक पवार, राहूल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, अण्णा बनसोडे, सुनील कांबळे, आदी लोकप्रतिनिधींनी सूचना केल्या. सध्या बेडची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांना वेळेत बेड उपलब्ध होत असल्याचे सांगितले. शहराबरोबरच ग्रामीण भागातही रेमडेसीविर औषधसाठा पुरेसा ठेवावा, पोस्ट कोविड सेंटर लवकर सुरु करावेत, सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी घरी उपचार घ्यावेत, यासाठी रुग्णालयांना सूचना देण्याबरोबरच नागरिकांची कोविड आजाराविषयीची भीती कमी होण्यासाठी जनजागृती करावी, शहरातील दराच्या तुलनेत ग्रामीण भागातील उपचारासाठीचे दर कमी व्हावेत, अशा सूचना केल्या.
डॉ.सुभाष साळुंखे म्हणाले, कोरोना आजारातून बरे झालेल्या नागरिकांना सौम्य अथवा गंभीर शारीरिक त्रास जाणवू शकतो, हे गृहीत धरुन ‘पोस्ट कोविड व्यवस्थापन’ आवश्यक आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांचे सहकार्य गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. कोरोना रुग्णांना बेड व आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच कोविड आजारातून बरे झालेल्या नागरिकांना समुपदेशन देण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरी भागातील कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवून घरोघरी सर्व्हेक्षणावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील, जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. डी. बी.कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
कोरोनामुक्त रुग्णांच्या उपचार, समुपदेशनासाठी पुण्यातील पाच रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरु करणार उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व्हेंटीलेटर व ऑक्सिजन पुरवठा साहित्याचे लोकार्पण
पुणे,दि. 2 : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज नगरसेवक हाजी अ. गफुर पठाण यांच्या स्वनिधीतून व्हेंटीलेटर व ऑक्सिजन पुरवठा साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. पुणे महानगरपालिका व नॅशनल हॉस्पिटलच्या सेवेत या सुविधा दाखल होत आहेत.
विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला खा.डॉ.अमोल कोल्हे, आ. चेतन तुपे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
जीतो कोविड सेंटरला मित्तल परिवार, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडतर्फे व्हेंटिलेटर भेट
पुणे : मित्तल परिवार आणि लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंड यांच्या वतीने घोले रस्त्यावरील ‘जीतो’ कोविड सेंटरला व्हेंटिलेटर मशीन भेट देण्यात आले. हॉटेल नंदनवन येथे ‘जीतो’ने कोविड सेंटर उभारले असून, शेकडो रुग्णांवर अद्ययावत उपचार केले जात आहेत. याच कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या मित्तल परिवाराने हे व्हेंटिलेटर मशीन दिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त लायन्स क्लबतर्फे आयोजित सेवा सप्ताहांतर्गत हा कार्यक्रम झाला.
लायन्स क्लब इंटरनॅशनलचे प्रांतपाल लायन अभय शास्त्री, गणेशखिंड क्लबचे अध्यक्ष ज्योतिकुमार अगरवाल व मित्तल परिवारातील सदस्यांच्या हस्ते हे व्हेंटिलेंटर मशीन सुपूर्त करण्यात आले. प्रसंगी ‘जीतो’चे पदाधिकारी विजय भंडारी, कांतीलाल ओसवाल, ओमप्रकाश रांका, राजेश सांकला, ऍड. एस. के. जैन, अचल जैन, लायन्स क्लब ऑफ पूना गणेशखिंडचे अध्यक्ष ज्योतीकुमार अगरवाल, द्वारका जालान, शाम खंडेलवाल, राजेंद्र गोयल, मित्तल परिवारातील सुभाष मित्तल, अनिल मित्तल, राकेश मित्तल, रितेश मित्तल, प्रवीणकुमार अगरवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अभय शास्त्री म्हणाले, “सेवा हेच कर्तव्य मानून ‘जीतो’ने केलेले काम कौतुकास्पद आहे. पुण्यात दोन कोविड सेंटर उभारून ‘जीतो’ शेकडो लोकांना चांगली आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे. मित्तल परिवाराने कृतज्ञतेच्या भावनेतून दिलेले हे व्हेंटिलेटर मशीन गरजूंवर उपचारासाठी उपयुक्त ठरेल.” विजय भंडारी यांनी कोविड सेंटरमधील सोयीसुविधांविषयी सांगितले. यावेळी येथील नियोजन पाहणारे, तसेच डॉक्टर्स यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
समाज शांतीसाठी आध्यात्माच्या मार्गावर चालावे छत्तीसगडच्या राज्यपाल श्रीमती अनुसुईया उइके यांचे आव्हान
- एमआयटी डब्ल्यूपीयूत सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटेच ऑनलाईन उद्घाटन
पुणे, :“ सुंदर समाज निर्मितीसाठी अध्यात्माचा अंध विश्वास आणि विज्ञानाचा उपयोग विनाशासाठी करू नये. अशांती आणि दहशतवादाच्या छायेत असलेल्या समाजाला शांती हवी असेल तर सर्वांना अध्यात्माच्या मार्गावर चालून प्रेम आणि अहिंसेचा आधार घ्यावा.” असे आव्हान छत्तीसगडच्या राज्यपाल श्रीमती अनुसुईया उइके यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे ऑनलाइन जागतिक विज्ञान, धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित सहाव्या वर्ल्ड पार्लमेंटचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
भारताचे परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन आणि जगविख्यात संगणकतज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ.एन.टी.राव, प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे, प्रा.डी.पी. आपटे, प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व पब्लिक पॉलिसीचे वरिष्ठ संचालक रविंद्रनाथ पाटील व वर्ल्ड पीस डोमचे संचालक दर्शन मुंदडा उपस्थित होते.
अनसुईया उइके म्हणाल्या,“ विज्ञान हे बाह्य जगात घेऊन जाते तर अध्यात्म हे अंर्तमनात घेऊन जाते. दोघांचाही मार्ग वेगळा असून विज्ञान हे भौतिक तर अध्यात्म हे अभौतिक आहे. विनोबा भावे यांनी सांगितले होते की धर्म आणि राजकारणाचा मार्ग संपलेला असून आता अध्यात्माच्या मार्गावर चालावे. विज्ञानाच्या युगात विज्ञान आणि अध्यात्माला अधिक जोर दयावा लागेल. तसेच, स्वामी विवेकानंद यांनी सुखाची कल्पना मांडतांना सांगितले की, विज्ञानाबरोबर धर्माचा समन्वय साधावा. हे दोन्ही एकत्र आल्यास मानवतेचे कल्याण होईल.विज्ञान हे समाज कल्याणासाठी कार्य करते तर अध्यात्माच्या आधारे मन स्थिती चांगली होते व त्यातून शरीर उत्तम राहते.”
“कोविड 19 च्या काळात अध्यात्माच्या नियमांचे पालन केल्यास व्यक्ती मनः शांती मिळवू शकतो. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने या संसदेचे आयोजन करून देश व जगाला शांती देण्याचे जे कार्य करीत आहेत ते कौतुकास्पद आहे. वास्तविक शांती ही कोणाच्या हातता किंवा पायात नाही तर ती मनात असते. त्यामुळे मनातून अशांतीचे विचार बाजूला सारून शांती निर्माण करावी.”
व्ही.मुरलीधरन म्हणाले,“राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे बंधुत्व, अहिंसा आणि शांतीचे तत्व युवकांना सांगून त्यांना प्रेरित करणे गरजेचे आहे. वसुधैव कुटुम्बकमच्या तत्वाचे पालन करणारा भारत संपूर्ण जगाला आध्यात्मिक ज्ञान देऊन शांती स्थापित करू शकतो. तक्क्षशीला आणि नालंदासारख्या विद्यापीठाने संपूर्ण जगाला ज्ञानाचे दार उघडे करून दिले होते. आजच्या काळात प्रत्येकाला विज्ञानापेक्षा अधिक आध्यात्माची गरज आहे.”
“ शिक्षणाद्वारे प्रगती होते हे लक्षात ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी राष्ट्रीय शिक्षण प्रणाली आणून भारताल नवी दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी शिक्षणाचे स्वातंत्र्य दिले आहे. कोविड 19 च्या काळात संपूर्ण जगात मोठे परिवर्तन आले आहे. अशा वेळेस शिक्षण क्षेत्रात डिजिटल शिक्षण प्रणाली आल्यामुळे ते सोपे झाले आहे. विज्ञान आणि आध्यात्माच्या समन्वयाच्या आधारीत शिक्षण देणारी आपल्या संस्थेचे नेतृत्व हे सर्वोत्तम आहे. प्रगतीसाठी प्रत्येक वेळेस नवी कल्पना हवी असते जी आपल्या देशाकडे आहे.”
डॉ. विजय भटकर म्हणाले,“ 21 व्या शतकात आध्यात्मिक ज्ञानाच्या जोरावरच भारत विश्वगुरू म्हणून उदयास येईल. आत्मज्ञान, राजकारण आणि जय जगतचा संदेश विनोबा भावे यांनी संपूर्ण मानवजातीला दिला आहे. विश्वची माझे घरची प्रेरणेतून विश्वात शांतता प्रस्थापित होईल.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“विज्ञान आणि अध्यात्माला आपल्या जीवनात उतरविल्यास ते शांतीमय होईल. अध्यात्माला धार्मिक शास्त्र व अंधश्रध्दा म्हणून पाहू नये. अध्यात्माने मनला शांती मिळते. भारतीय संस्कृती, परंपरेचा आणि तत्वज्ञानाचा संदेशच संपूर्ण जगात शांती व सुख नांदेल.”
राहुल कराड म्हणाले,“ विज्ञान, अध्यात्म आणि तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी कल्याणासाठी करण्याची आज गरज आहे. तरूणांमध्ये विधायक मानसिकता रुजविण्याची गरज आहे.”
प्रा. मिलिंद पांडे यांनी वर्ल्ड पार्लमेंटची पार्श्वभूमी सांगून या पार्लमेंटच्या माध्यमातून समाजात शांतता निर्माण करण्यासाठी कोण कोणते उपाय केले पाहिजे. त्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे भूमिका काय असेल हे सांगितले. डॉ. एन.टी.राव यांनी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चालणार्या कार्याची माहिती दिली.
प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन व प्रा.डी.पी. आपटे यांनी आभार मानले.
दौंड तालुक्यात शेतकऱ्यांची लुट -कारवाईसाठी उपोषण (व्हिडीओ)
पुणे- दौंड तालुक्यातील गुऱ्हाळे चालविणाऱ्याना प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची साथ मिळत असल्याने त्यांनी शेतकऱ्यांची लुट चालविली असून अनेक नियमबाह्य कृतींचा सपाटा लावल्याचा आरोप करत शेतकरी राजा संघर्ष कृती समितीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. या समितीचे राजाभाऊ तांबे यांनी उपोषण सुरु असताना माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले ,आज महात्मा गांधी जयंती च्या दिवशी आम्ही हे उपोषण करत आहोत आणि जिल्हाधिकारी यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधतो आहोत. शेतकऱ्यांना येथील गुऱ्हाळ वाले मनमानेल त्या पद्धतीने कमी पैसे देवून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. या शेतकऱ्यांना किमान रुपये २९०० प्रती टन आणि त्यापुढेच भाव मिळाला पाहिजे ,येथील गुऱ्हाळ घरांवर जळण म्हणून प्लास्टिक,रबर, गुरांची कातडी, कोरोनाचे पीपीई कीट, मेडिकल वेस्टेज ,चपला अशे अविघातक पदार्थ वापरले जातात जे प्रदूषण कायद्याने गंभीर गुन्हे आहेत .गुल निर्मिती साठी वापरले जाणारे घातक केमिकल्स ,रसायन,रांगोळी ,आळ्या पडलेला गुल,निकृष्ट लॉलीपॉप,खराब झालेले चोकलेट,वापरले जातात अशा लोकांवर तात्काळ भा रतीय दंड संविधानातील तरतुदीप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. दौंड तालुक्यात अनेकांकडे 1 नाहीतर 2 ते ३ गुऱ्हाळे आहेत.लाईट एका साठी घेतली जाते आणि प्रत्यक्षात अन्य गुऱ्हाळाना ती बेकायदा दिली जाते.महावितरणाच्या अधिकार्यांशी त्यासाठी संगनमत केले जाते.गुऱ्हांळावरील मजुरांना वेठबिगारी प्रमाणे राबविले जाते.त्यांच्या साठी शौचालये उभारावीत ,त्यांना किमान वेतन मिळावे, प्रदूषण रोखण्यासाठी गुऱ्हांळानी उंच चिमणीचा वापर करावा .प्रत्येक गुऱ्हांळ मालकाने प्रती वर्षे १० फुट उंचीची २०० झाडे लावावीत अशा मागण्या आपण जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केल्याचे राजाभाऊ तांबे यांनी सांगितले.
देशातील कामगार उद्रेकाच्या मार्गावर – कामगार नेत्यांनी दिला जिल्हाधिकाऱ्यांना इशारा (व्हिडीओ)
पुणे- मोदी सरकारने कामगार कायद्यात बदल करून मालक धार्जिणी भूमिका स्पष्ट केल्याने ,आणि सामान्य कामगाराच्या रोजी रोटी चाच प्रश्न धनिकांच्या हाती सोपविला जाणार असल्याने देशातील ७० ते ८० टक्के कामगार उद्रेकाच्या दिशेने वाटचाल करत आहे . मोदी सरकारने केलेले कायदे महाराष्ट्रात अंमलात आणू नयेत अन्यथा केंद्रा विरोधात लढता लढता महाराष्ट्राच्या सर्कार्विरोधाठी लढावे लागेल असा इशारा आज कामगार नेते अजित अभ्यंकर यांनी ‘मायमराठी ‘ कडे आपल्या भावना व्यक्त करताना दिला. पुणे शहर आणि परिसरातील विविध कामगार संघांनी एकत्रित येऊन कृती समितीची स्थापना केली असून या कृती समितीचे अध्यक्षपद इंटक नेते कैलास कदम यांच्याकडे देण्यात आलेआहे .आज त्यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला घेरा घालण्यात आला . आजच्या या लढ्यात केवळ कामगार युनियन चे पदाधिकारी यांना सहभागी करवून घेण्यात आले होते .तरीही संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाला जणू वेढा पडला होता . यावेळी पहा कामगार नेते कैलास कदम यांचे झालेले भाषण ..आणि अभ्यंकर यांच्या शी ‘माय मराठी’ ने साधलेला संवाद
केंद्रातील मोदी सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करा-रमेश बागवे (व्हिडीओ )
पुणे-मोदी सरकारने देशातील शेतकरी व कामगार यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले आहे.
यासाठी केंद्रातील भाजप सरकारने तीन काळ्या कायद्यांच्या माध्यमातून शेतकरी, शेत मजूर व कामगार यांना उद्योगपतींचे गुलाम बनविण्यासाठी हे कायदे केले आहेत.असा आरोप करत याच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली गुलटेकडी मार्केटयार्ड येथे स्व. आण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘देशाचे पहिले पंतप्रधान पं.
जवाहरलाल नेहरू म्हणाले होते ‘प्रत्येक गोष्ट प्रतिक्षा करू शकते पण शेती नाही.’ भारत देशामध्ये
शेती व शेतकरी यांच्या विरोधात मोदी सरकारने मोठे षडयंत्र रचले आहे. शेतकरी, शेतमजूर व
कामगारांना उद्योगपतींचे गुलाम बनविण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने तीन काळे कायदे केले
आहे. देशातील शेतकरी, शेतमजूर, आडती, कामगार, कर्मचारी व लाखो लोकांचे या विधेयकामुळे
नुकसान होणार असून ते उद्योगपतींचे गुलाम होतील. त्याचप्रमाणे बाजारसमिती व्यवस्था
संपुष्टात येताच बाजार समितीमध्ये काम करणारे तसेच या व्यवस्थेवर काम करणारे प्रत्यक्ष व
अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. कोरोना
महामारीच्या आडून शेतकऱ्यांवरचे संकट मुठभर उद्योगपतींसाठी संधी म्हणून मोदींनी हा डाव केला असून शेतकरी, शेतमजूर व कामगार हे कधीही विसरणार नाही. त्यामुळे हे तीन काळे कायदे केंद्र सरकारने मागे घेतले नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.’’
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड म्हणाले की, ‘‘देशातील ६२
कोटी शेतकरी व कामगार तसेच २५० पेक्षा अधिक संघटना या काळ्या कायद्याच्या विरोधात
आवाज उठवित आहेत परंतु मोदी सरकार कुंभकर्णाची झोप घेऊन उद्योगपतींसाठी कानाडोळा करीत आहे. ६२ कोटी लोकांच्या जीवनाशी निगडीत हे विधेयक संसदेमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करून व खासदारांना धक्काबुक्की करून समंत करण्यात आले. नव्या कायद्यामुळे APMC म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती ही व्यवस्थाच नष्ट होणार आहे. शेती प्रधान असलेल्या या देशामध्ये
८६% शेतकऱ्यांकडे ५ एकर पेक्षा कमी जमिन आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आपला माल जवळच्या
बाजारातच विकावा लागतो कारण वाहतुकीचा खर्च परवडत नाही अशातच बाजार व्यवस्था नष्ट झाली तर त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
त्यामुळे या काळ्या कायद्याचा निषेध म्हणून काँग्रेस पक्ष देशभर रस्त्यावर उतरला आहे.’’
यानंतर पुणे महानगरपालिकेचे गटनेते आबा बागुल म्हणाले की, ‘‘शेतकऱ्यांच्या जवळच्या
भागातच बाजारव्यवस्था असल्यामुळे योग्य भाव मालाला मिळत होता. केंद्राने हा कायदा करून
उद्योगपतींसाठी नविन पायघड्या घातल्या आहेत. आपल्या व्यापारी मित्रांसाठीच मोदी हे देशाचे
पंतप्रधान म्हणून काम करीत आहेत. शेतकरी व कामगारांच्या विरोधात कायदे करून मोदी आपल्या व्यापारी मित्रांचे घर भरण्याचे काम करीत आहेत. याचा मी तीव्र निषेध करतो आणि काँग्रेस पक्ष तळागाळातील लोकांसाठी कायमच रस्त्यावर उतरला आहे आणि आताही उतरला आहे.’’
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, नगरसेवक अविनाश बागवे, लता राजगुरू,द. स. पोळेकर, राजेंद्र शिरसाट, सुनिल शिंदे, अशोक जैन, सोनाली मारणे,विशाल मलके, प्रकाश पवार, साहिल केदारी, शिलार रतनगिरी, विठ्ठल गायकवाड, ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, सतिश पवार, सचिन आडेकर, प्रविण करपे, विजय खळदकर, शोएब इनामदार, रमेश सकट, विजय मोहिते, शाबीर खान, शशांक पाटील, सुनिल पंडित, चेतन आगरवाल, प्रशांत सुरसे, राजू साठे, अमजितसिंग मक्कड, किशोर मारणे, अनुसया गायकवाड, सुरेखा खंडागळे, सीमा महाडिक, इंदिरा अहिरे, सुमन इंगवले, राधिका मखामले, कल्पना उनवने, विश्वास दिघे, योगेश भोकरे, हर्षद बोराडे, क्लेमेंट लाजरस, सचिन सावंत, विजय वारभुवन, केतन जाधव, सौरभ अमराळे, राजू गायकवाड, देविदास लोणकर, अकबर मणियार, भरत सुराणा, कृष्णा सोनकांबळे,
नितीन निकम, रावसाहेब खवळे, सुरेश चौधरी, भारत काळे, शंकर पाटील, इमाम हन्नुरे, स्वप्निल
नाईक, विकास चाबुकस्वार, धनंजय धेडे, रूक्मिणीबाई धेडे, रणजित वडागळे, संजय हामदोरे, हलीमा शेख, रामविलास माहेश्वरी आदी उपस्थित होते.
काव्यमित्र’कडून कोविड सेंटरमध्ये कार्यरत कोविड योद्ध्यांचा सन्मान
पुणे – कोरोना संसर्गाच्या काळात सेवा व त्याग भावनेतून कार्य करणाऱ्या कोवीड योद्धयांची दखल घेत पुण्यातील काव्यमित्र संस्थेने पुणे जिल्हा परिषद अंतर्गत हवेली पंचायत समिती व नऱ्हे ग्रामपंचायतीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथील कोवीड केअर सेंटरमध्ये कार्यरत डॉक्टर-नर्स-शिक्षक व कर्मचारी या सर्व कोविड योद्ध्यांचा पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्या हस्ते आणि ‘काव्यमित्र’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. या सन्मान कार्यक्रमास कवयित्री अनुजा कल्याणकर, कवी गणेश पुंडे, विलास कसबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कोविड केअर सेंटरमध्ये इन्चार्ज वंदना गवळी आणि नोडल ऑफिसर डॉ. बी एन आहेर यांच्यासह डॉ. तुषार जगताप, डॉ.अमित पाचेगावकर, डॉ प्रियंका सोनेकर तसेच गेल्या दोन महिन्यापासून कोवीड सेंटरवर कर्तव्य बजावणारे शिक्षक राहुलकुमार चव्हाण, संभाजी शिंदे, पोपट जाधव आणि सिंहगड कोविड केअर सेंटर, नऱ्हे येथे कार्यरत असणाऱ्या सर्व नर्सेस तसलीम मुजावर, अंजुम शेख, भाग्यश्री कांबळे, कांचन मोरे, फार्मासिस्ट दीपिका चोरडिया, ब्रदर विकास मोरे, स्वप्निल सोळुंके, छायाचित्रकार चंद्रकांत खंडागळे, गाणं काकडे तसेच सफाई कर्मचारी राजू या सर्वांना विशेष सन्मानपत्र बहाल करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी कोरोना संसर्गाच्या काळात डॉक्टरांसोबत सफाई कर्मचारी, पोलीस, शिक्षक आणि समाज या सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे मत व्यक्त केले. राजेंद्र सगर यांनी ‘काव्यमित्र’ संस्थेच्या सामाजिक कार्याचा आलेख सर्वांसमोर मांडला. उपस्थित मान्यवरांचा परिचय व स्वागत राहुल चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक संभाजी शिंदे यांनी केले. डॉ. बी. एन.आहेर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आभार पोपट जाधव यांनी मानले.
नराधमांना फाशीच दिली पाहिजे-अण्णा हजारे
पुणे-उत्तर प्रदेशमधील हाथरस गावामध्ये एका मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला, ही बाब मानवतेला कलंक फासणारी आहे. ही घटना म्हणजे केवळ एका मुलीची हत्या नसून अऱ्या अर्थाने मानवतेची हत्या आहे. या घटनेतील नराधमांना फाशीच दिली पाहिजे, कारण समाजात पुन्हा कोणाकडूनही असे कृत्य होऊ नये, असे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यासंदर्भात अण्णा म्हणाले की, आपला देश ऋषी मुनींचा देश आहे. जगात आपली संस्कृती श्रेष्ठ समजली जाते, असे असताना अशा घटनांमुळे आपली मान शरमेने खाली जात आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ज्यांनी कायदा-सुव्यवस्था सांभाळायची आहे. ती यंत्रणाच कमी पडत आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अण्णांनी व्यक्त केली आहे. असे कृत्य करणाऱ्या नराधमांना तातडीने न्याय प्रक्रिया पूर्ण करून फासावर लटकावले पाहिजे, असेही अण्णांनी म्हटले आहे.उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला होता. पीडित तरुणीवर दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. गेल्या 14 सप्टेंबर रोजी या तरुणीवर अत्याचार झाला होता. ज्यानंतर आरोपींनी तिला मारुन टाकण्याचा प्रयत्नही केला होता. चार तरुणांनी तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ कापली आणि मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला. या अत्याचारानंतर तरुणी बेशुद्ध झाली. ती मृत झाली आहे, असे समजून चौघे आरोपी तिला तसेच टाकून निघून गेले. मात्र, ती बचावली आणि सुरुवातीला उपचारांसाठी अलीगढच्या जे. एन. रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. सोमवारी तिची प्रकृती खालावल्याने दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात तिची प्रकृती आणखी ढासळली आणि मंगळवारी तिचा मृत्यू झाला. तर, हाथरस येथील घटनेनंतर बलरामपूर येथे सामूहिक बलात्कार व हत्येची आणखी एक घटना उजेडात आली आहे.
युपीतील अत्याचाराविरोधात युक्रांद चा ‘आक्रोश ‘(व्हिडीओ )
पुणे- उत्तरप्रदेशात वाढलेली गुन्हेगारी आणि असुरक्षित बनलेल्या महिला मुली आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार या पार्श्वभूमीवर तेथील अत्याचाराविरोधात युक्रांद ने आज पुण्यात जोरदार आक्रोश केला . सरकारच्या पाठबळावर च असे अत्याचार होऊ शकतात अन्यथा नाही असा पवित्रा घेत योगी सरकार वर टीकास्त्र सोडले .
मेधा कुलकर्णी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे-
कोथरुडच्या माजी आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्या सहजानंद सोसायटी येथील निवासस्थानातील जनसंपर्क कार्यालयाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी श्री. पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मेधाताईंचे अभिनंदन केले.
यावेळी कोथरुडचे भाजपा अध्यक्ष पुनित जोशी, संघटन सरचिटणीस सचिन पाषाणकर, पुणे शहर भाजपा चिटणीस अनिता तलाठी, रिपाइं (आ.) चे राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, यांच्यासह भागातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते मेधाताईंच्या कन्या वास्तुविशारद कल्याणी कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
जम्बो रुग्णालयात पाचशेहून अधिक रुग्ण झाले करोनामुक्त !
‘जम्बो’मधील ३१ दिवसांच्या लढाईनंतर ‘तिची’ करोनावर मात!
पुणे : एक गंभीर अवस्थेतील करोनाबाधित महिला पेशंटने तब्बल एकतीस दिवस करोनाविरुद्ध लढा देत अखेर करोनावर विजय मिळवला आहे. ही करोनाबाधित महिला COEP मैदानावरील जम्बो रुग्णालयात दाखल झाली होती. येथे आठ दिवस व्हेंटिलेटरवर असूनही इच्छाशक्ती व येथील सर्व करोना योद्धे यांच्या प्रयत्नांच्या जोरावर तिने करोनावर मात केली आहे. आज तिला डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा त्यांची सुरवातीची अवस्था पाहणाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या यवतच्या संगीता पांढरे या महिलेनी ही लढाई जिंकली आहे!
श्रीमती पांढरे या सीओईपी जम्बो रुग्णालयात ३१ ऑगस्ट रोजी दाखल झाल्या होत्या. श्वसनाचा त्रास होत असल्याने सुरवातीला त्यांना दहा दिवस थेट ऑक्सिजन बेडवर दाखल करण्यात आले. नंतर अत्यवस्थ झाल्याने त्यांना दहा दिवस आयसीयू बेडवर हलविण्यात आले. त्यापैकी आठ दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. मात्र श्रीमती पांढरे यांनी जिद्ध सोडली नाही. वीस दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा दिसू लागली. तेव्हा पुन्हा ऑक्सिजनचा आधार देत दहा दिवस जनरल वॉर्डमध्ये उपचार केल्यावर त्यांची प्रकृती स्थिर करण्यात आली. आणि अखेर तीस दिवसांच्या निकराच्या लढाईनंतर गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला… तेव्हा त्यांचे सर्व कुटुंबीय भावुक झाले होते…!
सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच कुटुंबीयांनी जम्बो कोविड सेंटरमधील सर्व करोना योद्धे आणि प्रशासनाला मनोमन धन्यवाद दिले. तसेच, एक करोनाबाधित दाम्पत्यही आज एकाच वेळी बरे होऊन जम्बोमधून घरी गेले. हे दिलासादायक चित्र आहे.
सातत्यपूर्ण देखभालीमुळे जम्बो रुग्णालयात बरे होऊन घरी सोडण्यात आलेल्या करोनामुक्तांच्या संख्येने आता पाचशेचा टप्पा ओलांडला आहे. आज (गुरुवारी) दहा रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे आतापर्यंत जम्बोमध्ये उपचार घेऊन करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५०० झाली आहे, असे अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो कोविड रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी सांगितले.
इतर व्याधी असणाऱ्या (कोमॉर्बिड) करोना रुग्णांना सर्व उपचार मिळावेत यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. जम्बो कोविड सेंटरमध्ये सहव्याधी रुग्णांवर आवश्यक उपचारांसाठी सर्वतोपरी प्रयत्न, तसेच मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तज्ञ डॉक्टर सातत्याने उपलब्ध ठेवण्यात येत आहेत. रक्तशुद्धीकरणाची सुविधेकरिता दहा डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लावा – आबा बागुल (व्हिडीओ)
पुणे- उत्तर प्रदेशात महिलांवर होणारे अत्याचार आणि त्या विरोधात उठणारे आवाज दडपण्याचा प्रकार हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून इथे तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे. आज राहुल गांधी यांच्याबाबत आणि पूर्वी प्रियांका गांधी यांच्याबाबत त्यांना अडविण्याचा केलेला पराक्र हा हुकुमशाही आणि दडपशाही स्पष्ट करणारा आहे .देशासाठी बलिदानाची मोठी परंपरा असलेल्या एवढ्या मोठ्या घराण्यातील व्यक्तींना पोलीस अशी वागणूक देतात तर अन्य नागरिकांचे काय होत असेल इथे मोदी सरकारने तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी असे ते म्हणाले.
राहुल गांधींसोबतच्या धक्काबुक्कीनंतर शरद पवार संतापले; म्हणाले..
मुंबई – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. राहुल गांधी यांना कलम 188 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याअगोदर हाथरसला पायी चालत जाणाऱ्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर या घटनेवर राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत तसेच अनेक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या प्रकारानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्विटरद्वारे निषेध करत संताप व्यक्त केला आहे. शरद पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत आणि कायदा हातात घेतला जातोय.’दरम्यान,राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते देखील पायी प्रवास करत होते. मात्र पोलिसांनी धक्काबुक्की केल्यानंतर तसेच राहुल गांधी यांची कॉलर पकडून त्यांना अटक केल्यानंतर देशासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार यादीत नावे नोंदवा : चंद्रकांतदादा पाटील
पुणे : पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपला प्रतिनिधी विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे. यासाठी जास्तीत जास्त पदवीधरांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
भाजप शहर चिटणीस सुनील माने यांच्या वतीने पदवीधर मतदार नोंदणी आपल्या दारी हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाचे उदघाटन चंद्रकांतदादा पाटील तसेच खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. भाजप शहर कार्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंतजी रासने, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, दत्ताभाऊ खाडे, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, भाजयुमोचे शहराध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर, महिला शहराध्यक्षा अर्चना पाटील, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष प्रसन्न जगताप, नगरसेवक अमोल बालवडकर, उमेश गायकवाड, उपाध्यक्ष गणेश कळमकर, योगेश बाचल, शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, कोथरुड मतदारसंघाचे अध्यक्ष पुनीत जोशी, भाजयुमोचे सरचिटणीस प्रतिक देसरडा आदी उपस्थित होते.
चंद्रकांत दादा म्हणाले, कोरोना मुळे पदवीधर मतदारांना प्रत्यक्ष मतदार यादीत नाव नोंदणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तरीही पदवीधर मतदार नोंदणीस म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. अशा परिस्थिती मध्ये सुनील माने यांनी सर्वसामान्यांच्या सोयीसाठ मोबाईल व्हॅन तयार केला आहे. घरोघरी जाऊन मतदार नोंदणी अभियान राबवल्याने मतदार नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद मिळेल.
खासदार बापट म्हणाले की, पदवीधर मतदार नोंदणी मोहीम यशस्वी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त मतदार नोंदणी कशी होईल याचा विचार करून सुनील माने यांनी हे अभियान सुरु केले आहे. यामुळे जनजागृती होऊन अधिक मतदारांची नोंद होईल. शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही आपल्या मनोगतातून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. पुणे पदवीधर मतदार संघाची जागा तिसऱ्यांदा मिळवण्यासाठी हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
सुनील माने म्हणाले, पदवीधर मतदार संघामध्ये जास्तीत जास्त मतदार वाढवण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन ठेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. ही मोबाईल व्हॅन डेक्कन, शिवाजीनगर,औंध, बोपोडी या भागातील सोसायट्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष कागदपत्रे स्कॅन करून मतदारांची नोंद करून घेईल. त्याचबरोबर मतदारांच्या नाव नोंदणीसाठी 9158483813 या व्हॉट्सऍप क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. यामुळे सर्वसामान्य मतदारांना नाव नोंदणी करणे सोपे जाईल.
