Home Blog Page 2435

कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचा सुरेश ग्यान विहार युनिव्हर्सिटीशी सहकार्य करार

0

पुणे :शैक्षणिक आदानप्रदान ,संशोधन आणि शैक्षणिक सुविधांसाठी कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा  सुरेश ग्यान विहार युनिव्हर्सिटी(जयपूर )शी सहकार्य  करार झाला आहे. कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे पुणे स्थित संस्थापक सदस्य राकेश मित्तल यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
  कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक सदस्य राकेश मित्तल आणि  सुरेश ग्यान विहार युनिव्हर्सिटी(जयपूर )चे संचालक  कनिष्क शर्मा  यांनी या सहकार्य करारावर सह्या केल्या.  

 टोंगा देशातील  कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीशी सहकार्य करार करणारे  सुरेश ग्यान विहार युनिव्हर्सिटी हे  ‘नॅक’ च्या वतीने ग्रेड ए  श्रेणीचे  एक्रिडिटेशन असणारे विद्यापीठ आहे. जयपूर परिसरात शैक्षणिक सुविधा केंद्र,अल्प मुदतीचे शैक्षणिक अभ्यासक्रम,विद्यार्थी -प्राध्यापक आदान प्रदान,पी एच डी संशोधन सुविधा,आंतरराष्ट्रीय परिषदांचे आयोजन,शैक्षणिक साधनांचे आदान प्रदान  अशा अनेक बाबतीत ही दोन्ही विद्यापीठे पुढाकार घेणार आहेत.    राकेश मित्तल म्हणाले,’बदलत्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यापीठे एकत्र येवून नवे उपक्रम,शैक्षणिक सुविधा देवू इच्छित आहेत. या सहकार्य करारानुसार  पी एच डी करु इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांना ६० ते ७२ तासांचे कोर्स वर्क  सुरेश ग्यान विहार युनिव्हर्सिटी मध्ये पूर्ण करता येईल’.

आरेची जागा राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस मंजुरी

0

मुंबई, दि. 8 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार आरे दुग्ध वसाहत (दुग्धव्यवसाय विकास विभाग) च्या ताब्यातील 328.90 हेक्टर व वन विभागाच्या ताब्यातील 40.46 हेक्टर जमीन ही भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4 अन्वये राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस आज मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

आरे दुग्ध वसाहत येथील जमीन ही राखीव वन म्हणून घोषित करावी याबाबत दिनांक 2 सप्टेंबर 2020  रोजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी संबंधितांना निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज दुग्ध व्यवसाय विभाग व वन विभाग यांच्याकडून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4 ची प्राथमिक अधिसूचना व मनोदय घोषित करण्याची अधिसूचना काढण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार प्राथमिक अधिसूचनेस मंजुरी प्रदान केली आहे. त्यानंतर चौकशी होऊन भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 20 ची अंतिम अधिसूचना काढण्यात येईल, असेही वनमंत्र्यांनी सांगितले.

प्राथमिक अधिसूचनेनुसार वन जमाबंदी अधिकारी (कोकण) नवी मुंबई हे या जमिनीवरील हक्क, स्वरूप, व्याप्ती याबाबत चौकशी करतील तर त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्याकडे अपील करता येईल, अशी माहितीही श्री.राठोड यांनी दिली.

एनएचएम’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन सुसूत्रीकरण लागू करण्याचा निर्णय

0

मुंबई, दि. ८ : राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन सुसूत्रीकरण लागू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याचा राज्यातील सुमारे २२ हजार ५०० कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. विशेष म्हणजे अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या ५९७ संवर्गातील पदांचे एकत्रीकरण करून त्याचे ६९ संवर्गात रुपांतर करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनाचा लाभ दि. १ एप्रिल २०१८ पासून मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात २००७ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरूवात झाली. त्याअंतर्गत सुरू असलेल्या कार्यक्रमनिहाय पदांची निर्मिती होत गेली आणि त्यासाठी कार्यक्रमनिहाय वेगवेगळे वेतन ठरत गेले. त्यानुसार ५९७ संवर्ग कार्यरत होते. त्या सर्वांचे एकत्रीकरण करताना शैक्षणिक अर्हता, कर्तव्ये, अनुभव आदी बाबी विचारात घेऊन विविध कार्यक्रमातील पदांचे संलग्नीकरण करून ६९ संवर्गात त्याचे रुपांतर करण्यात आले.

राज्यातील सर्व भागांमध्ये विशेषज्ञ पदांचा अपवाद वगळता प्रत्येक पदाचे वेतन समान असावे, किमान वेतन कायद्याचे पालन करावे, शहरी भागातील कर्मचाऱ्यांचे वेतन ग्रामीण भागापेक्षा जास्त नसावे आदी बाबी विचारात घेऊन वेतन सुसूत्रीकरण करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

सुधारित वेतन रचनेनुसार सुमारे २२ हजार ५०० कर्मचाऱ्यांना लाभ होणार असून १२ हजार कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा लाभ होईल. त्यांचे वेतन १ एप्रिल २०१८ रोजी १५ हजार ५०० इतके निश्चित करण्यात आले आहे. अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना फरकापोटी २४२.५३ कोटी रुपये अदा करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२७ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

0

मुंबई दि. 8 : महाराष्ट्र शासनच्या अधिसूचनेद्वारे शासनाच्या 7 वर्ष मुदतीच्या एकूण रुपये 1000 कोटींच्या  रोखे  विक्रीची सूचना दिली आहे. विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी व शतींच्या अधीन राहील. तसेच राज्य शासनाच्या क्र. एलएनएफ. 10.19 / प्र.क्र. 10/अर्थोपाय, दिनांक 16 मे, 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींचे अधीन राहील.

कर्जाचा उद्देश. कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधिच्या खर्चासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी करण्यात येईल.  भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 293 (3) अन्वये कर्ज उभारणीस केंद्र शासनाची अनुमती घेण्यात आली आहे. कार्यप्रणाली :- शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व बँक, फोर्ट, मुंबई 400 001 द्वारे दिनांक 16 मे, 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचना क्र. एलएनएफ. 10.19/प्र.क्र. 10 / अर्थोपाय, परिच्छेद 6.1 मध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल.

अस्पर्धात्मक बिडर्सला प्रदान, राज्यशासनाच्या सर्वसाधारण अधिसूचना क्रमांक एलएनएफ. 10.19/ प्र.क्र.10/ अर्थोपाय, दिनांक 16 मे, 2019 मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त 1 टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.

लिलावाचा दिनांक व ठिकाण – भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 13 ऑक्टोबर, 2020 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 13 ऑक्टोबर, 2020 रोजी खालीलप्रमाणे संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकींग सोल्यूशन (ई – कुबेर) सिस्टीमनुसार सादर करण्यात यावेत: (अ) स्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकींग सोल्यूशन (ई – कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करण्यात यावेत. (ब) अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकींग सोल्यूशन (ई – कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 वाजेपर्यंत सादर करण्यात यावेत.

लिलावाचा निकाल- लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 14 ऑक्टोबर, 2020 रोजी करण्यात येईल.

अधिदानाची कार्यपद्धती यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 14 ऑक्टोबर, 2020 रोजी रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येईल.

कर्जरोख्याचा कालावधी- कर्जरोख्याचा कालावधी 7 वर्षांचा असेल. रोख्याचा कालावधी हा दिनांक 14 ऑक्टोबर, 2020 रोजीपासून सुरू होईल.

परतफेडीचा दिनांक- 14 ऑक्टोबर, 2027  रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परतफेड करण्यात येईल. व्याजाचा दर -अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दराएवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक 14 एप्रिल आणि 14 ऑक्टोबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.

कर्जरोख्याची पात्रता – शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकींग विनियम अधिनियम, 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. कर्जरोखे हे पुनःविक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील. असे वित्त विभागाच्या 8 ऑक्टोबर  2020 च्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यास शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

0

मुंबई, दि. 8 : राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात लवकरच वाढ करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. त्यामुळे शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

राज्यात मुंबई, नागपूर, नांदेड आणि उस्मानाबाद अशी चार शासकीय आयुर्वेद महाविद्यालये असून यातील पदव्युत्तर विद्यार्थी निवासी योजनेंतर्गत सेवा बजावत आहेत. राज्यातील शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांना विद्यावेतन दिले जाते. तसेच त्यात दर तीन वर्षांनी वाढ करण्यासंबंधी आढावा घेण्यात येतो. मात्र मे 2020 मध्ये आयुर्वेद वगळता केवळ शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांना रुपये 10 हजार एवढे विद्यावेतन दिल्याने, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रतिमाह रुपये 5 हजार एवढ्या विद्यावेतनात काम करावे लागत होते. त्यामुळे शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनासंदर्भात प्रश्न निर्माण झाला होता.

याबाबत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी आपले गाऱ्हाणे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री यड्रावकर यांच्याकडे मांडले होते. वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री यड्रावकर यांनी यातून लवकरच तोडगा काढण्यात येईल असे सांगितले होते. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या समन्वयातून निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य विकास कर्जरोखे २०२० ची परतफेड

0

मुंबई दि. 8 :  महाराष्ट्र शासन, वित्त विभाग  अधिसूचना क्र.एलएनएफ -10.17/प्र.क्र .61/ अर्थोपाय दि. 3 नोव्हेंबर 2017 अनुसार 6.81 % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज  रोखे, 2020  (नोव्हेंबर ) अदत्त शिल्लक रकमेची दि. 7 नोव्हेंबर 2020 पर्यंत देय असलेल्या व्याजासह दि. 7 नोव्हेंबर, 2020 रोजी (दि. 8 नोव्हेंबर 2020 रोजी रविवार सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने) सममूल्याने परतफेड करण्यात येईल. “परक्राम्य संलेख अधिनियम, 1881″ अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुट्टी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. 8 नोव्हेंबर, 2020 पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, 2007 च्या उप-विनियम 24 (2) व 24 (3) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बॅकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलासह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप – कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास / त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बैंक खात्याच्या संबधित तपशिलाच्या / इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, 6.81 % महाराष्ट्र राज्य विकास कर्ज  रोखे, 2020 ( नोव्हेंबर ) च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात 20 दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस खालीलप्रमाणे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

“प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली. ” भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबद्ध डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोवितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणाऱ्या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात / उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील अशी माहिती वित्त विभागाच्या 8 ऑक्टोबर 2020 रोजीच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 58 हजार 895

0

पुणे विभागातील 3 लाख 90 हजार 226 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित
4 लाख 61 हजार 507 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.8 :- पुणे विभागातील 3 लाख 90 हजार 226 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 61 हजार 507 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 58 हजार 895 इतकी आहे. कोरोनाबाधित एकुण 12 हजार 386 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.68 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.55 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा-
पुणे जिल्हयातील कोरोना बाधित एकूण 2 लाख 99 हजार 353 रुग्णांपैकी 2 लाख 58 हजार 858 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 33 हजार 636 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 859 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.47 टक्के आहे.

सातारा जिल्हा-
सातारा जिल्हयातील कोरोना बाधित एकूण 40 हजार 195 रुग्णांपैकी 31 हजार 740 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 155 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 300 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा-
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधित एकूण 35 हजार 725 रुग्णांपैकी 28 हजार 675 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 814 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 236 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा-
सांगली जिल्हयातील कोरोना बाधित एकूण 39 हजार 969 रुग्णांपैकी 33 हजार 360 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 132 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 477 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा-
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधित एकूण 46 हजार 265 रुग्णांपैकी 37 हजार 593 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 158 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 514 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ-
कालच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 732 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 363, सातारा जिल्ह्यात 438, सोलापूर जिल्ह्यात 301, सांगली जिल्ह्यात 451 तर कोल्हापूर जिल्ह्यात 179 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 241 रुग्णांचा समावेश आहे. यात पुणे जिल्हा 2 हजार 373, सातारा 511, सोलापूर 241, सांगली 816 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 300 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण-
आजपर्यत विभागामध्ये एकुण 20 लाख 47 हजार 112 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 61 हजार 507 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 7 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

ग्राम युवा विकास समितीच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

0

पुणे,दि.8: नेतृत्व गुण असणाऱ्या तरुणांना एकत्र करुन प्रत्येक गावात ‘ग्राम युवा विकास समिती’ स्थापन करावी. या समितीमार्फत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

नेहरु युवा केंद्राच्या वतीने जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर, राज्य संचालक प्रमोद हिंगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय संचालक श्री.कार्तिकेयन, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान तसेच राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी व समिती सदस्य उपस्थित होते. यावेळी ‘कोविड-19 आपत्ती निर्मुलन कार्य अहवाल’ चे प्रकाशन तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत युवकांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘संपर्क अभियान’ चे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या हस्ते झाले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, युवा शक्तीचा उपयोग ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि विधायक कार्यासाठी होणे आवश्यक आहे. ग्राम युवा विकास समिती मार्फत गावांमधील विकास योजनांना गती देता येवू शकते. याकामी नेहरु युवा केंद्राने जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग व सर्व ग्रामपंचायतींचे सहकार्य घ्यावे.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा दुसरा टप्पा 14 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. या टप्प्यात युवा केंद्राच्या माध्यमातून जनसंपर्क व जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी नियोजन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोरोना बाधित रुग्ण अधिक असणाऱ्या शहरा नजीकच्या व महामार्गालगतच्या गावांमध्ये जनजागृतीवर युवा केंद्राने भर द्यावा. घराबाहेर पडणाऱ्या युवक व नागरिकांमुळे घरातील ज्येष्ठ व गंभीर आजाराच्या रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबद्दल माहिती पोहोचवावी. नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत होणाऱ्या कला प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये आदिवासी प्रशिक्षण व संशोधन केंद्राचा सहभाग घ्यावा. तसेच जलजागृती व जलसंवर्धन उपक्रमासाठी पाणी फौंडेशन चे सहकार्य घेऊन हा उपक्रम व्यापक स्वरुपात राबवावा,असे सांगून जिल्ह्यातील राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थींचा सहभाग विविध शासकीय कार्यक्रमांत घेण्यासाठी नियोजन करा, असेही डॉ.देशमुख यांनी सूचित केले.

राज्य संचालक प्रमोद हिंगे म्हणाले, ग्राम युवा विकास समितीच्या माध्यमातून ग्राम विकास साधण्यास मदत होईल. तसेच युवकांच्या आशा,आकांक्षा, समस्या जाणून घेणे शक्य होईल.

समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी युवा केंद्राचा वार्षिक आराखड्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

1 हजारपेक्षा अधिक कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार

0

मायमर मेडिकल कॉलेज व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाचे कार्य कौतुकास्पद 
पुणे, 8 ऑक्टोबर: मावळ तालुक्यातील एकमेव कोविड समर्पीत रूग्णालय ‘मायमर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयातील’ डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी येथील एक हजार पेक्षा अधिक कोविड रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना बरे केले आहे.
 या संदर्भात मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे म्हणाल्या की, रुग्णालयात मध्यम ते अति तीव्र स्वरूपातील कोविड रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा आहे. येथे 365 सुसज्ज बेड असून त्यातील 148 बेड हे ऑक्सिजन, 16 व्हेंटिलेटर आणि अतिदक्षतेसाठी  20 बेड आहेत. तसेच, गर्भवती कोविड रूग्ण महिंलांसाठी प्रसूतिची सोय व स्वतंत्र ऑपरेशन थिएटर्सची सुविधा करण्यात आली आहे. अशा रुग्णांना ऑक्सिजनची अधिक गरज भासते हे लक्षात ठेवून हॉस्पिटलने अद्यायावत लिक्विड ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वयित केली आहे. तसेच, येथील डॉक्टरांतर्फे रुग्णांच्या नातेवाईकांना उपलब्ध बेड व व्हेंटिलेटरची माहिती दिल्या जाते. याच प्रमाणे कोविड आजारातून बरे झालेल्या रुग्णांकरीता विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे.
नॉन कोविड रुग्णांसाठी संपूर्ण वैद्यकीय सेवा, पात्र लाभार्थी रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व इतर रुग्णांसाठी माफक दरात डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी सेवा देतात. येथील सर्व कर्मचारी, नर्सेस व डॉक्टरतर्फे दिल्या जाणार्‍या सेवेबद्दल व्यवस्थापनाच्या वतीने कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड नागरे, वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश घैसास व प्राचार्य डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता यांनी कौतुक केले.
ग्रामीण  क्षेत्रातील रुग्ण मदतीसाठी 02114-308380/308423/8087099040 या नंबरवर संपर्क साधू शकतात.

नृत्यांगना विशाखा काळेच्या आत्महत्येमागे कारण काय ? …हडपसर पोलिसांचा तपास सुरु …

राज्यात ६ कलाकारांच्या आत्महत्या

पुणे-नृत्य कलावंत असलेल्या तरूणीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. हडपसर भागातील   गोंधळेनगर भागात मंगळवारी सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. विशाखा काळे (वय २४, रा. नटराज कॉलनी, गोंधळे नगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या  तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.आत्महत्येमागील नेमके कारण पोलिस शोधत आहेत. वैकुंठ स्मशानभूमीत काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.महाराष्ट्राची लोकधारा, गर्जा महाराष्ट्र, महाराष्ट्राची गौरव गाथा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून काळे लावणी सादर केली आहे. कोरोना काळात हातात कुठलंच काम नसल्याचे अनेक कलाकारांची घरची परिस्थिती हलाखीची बनली आहे. अनेक लोककलावंतांची हीच हालत असल्याचे कलाकारांचे म्हणणे आहे. आतापर्यंत राज्यात ६ कलाकारांनी आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखा या नृत्य कलावंत होत्या. विविध कलावंत संघटनाच्या त्या सदस्या होत्या.त्या आई-वडिल आणि   बहिणीसह गोंधळे नगर भागात राहत होत्या. विशाखा  आणि त्यांची बहिण   इव्हेंट मॅनेजमेंट आणि नृत्याचे कार्यक्रम करीत असत. दरम्यान, विशाखा यांचा गतवर्षी नोंव्हेंबर महिन्यात अपघात झाला आणि   त्यानंतर त्यांना कार्यक्रमात सहभागी होता येत नव्हते. त्यामुळे त्या मागील   काही महिन्यापासून नैराश्यात होत्या. दरम्यान, विशाखा यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी दि. ६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तीच्या कुटुंबियांना तीने आत्महत्या   केल्याचे आढळून आले.  या घटनेची माहिती कुटुंबियांनी हडपसर पोलिसांना दिली.

धनंजय जाधव यांची भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड

0

पुणे : माजी नगरसेवक धनंजय जाधव यांची भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजपाचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी नियुक्तीचे पत्र धनंजय जाधव यांना दिले. पुणे शहरात पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासाठी धनंजय जाधव यांच्या राजकीय वाटचालीच्या अनुभवाचा उपयोग होईल, असे जगदीश मुळीक यांनी पत्राद्वारे सांगितले.
धनंजय जाधव यांनी विविध संघटनांवर काम केले आहे. पॉवरलिफ्टिंग असोसिएशन पुणे जिल्ह्याचे ते अध्यक्ष म्हणून काम पाहतात. द हिंदू फाउंडेशनचे ते अध्यक्ष असून संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य केले जाते. तसेच पुणे जिल्यातील नामांकित पुणे श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे मागील दहा वर्षे संस्थेच्या माध्यमातून आयोजन करण्यात येते. प्रथमच पेसापालो वर्ल्ड कपचे देशात आणि पुण्यात चार दिवस आयोजन धनंजय जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आले होते. याशिवाय कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. पुण्यात प्रथमच राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करून ८५० खेळाडू २८ राज्यातून सहभागी झाले होते.

महाविकास आघाडी सरकारने कृषी विधेयकाला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्हा भाजपतर्फे निदर्शने…

0


पुणे-नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना मर्जीनुसार माल विकण्याचे स्वातंत्र्य देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठीच ३ विधेयके तयार केली असून या विधेयकाला विरोधी पक्ष विरोध करत आहे.राज्यात महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला स्थगिती दिली आहे.याचा विरोध करण्यासाठी आज पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिलेल्या निर्णयाची प्रत जाळून तीव्र निदर्शने केली…
यावेळी या आंदोलनाला माजी मंत्री बाळा भेगडे ,पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, जालिंदर कामठे, धर्मेंद्र खांडरे, आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केद्र सरकारने दोन विधेयकांच्या माध्यमातुन कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवुन आणण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. २०२२ पर्यंत शेतक-याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने केंद्र सरकार ठोस पावले उचलत आहे. कृषीप्रधान देशातील शेतक-यांच्या जीवनाशी दिशा आणि दशा या दोन्हीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणा-या या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत.परंतु २०१९ मध्ये काँग्रेसने जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी खुली बाजारपेठ करण्याचा आश्वासन दिल होत पण या विधेयकाचा श्रेय नरेंद्र मोदींना जाईल म्हणून काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष या विधेयकाला विरोध करत आहे. येत्या पंधरा दिवसात जर महाविकास आघाडी सरकारने या विधेयकाला जी स्थिगिती दिली आहे ती उठवली नाही तर भारतीय जनता पक्ष जिल्ह्यातील चौकाचौकात रास्तारोको आंदोलन करेल असा इशारा माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी यावेळी दिला.

शेतक-यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव देणे तसेच शेतक-यांचे उत्पन्न वाढवुन त्यांचा जीवनस्तर उंचावण्याचे ध्येय मोदी सरकारने ठेवले आहे. या उद्देशाने पंतप्रधान मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली शेतक-यांच्या खांद्याला खांदा लावून भारत सरकार, कृषी मंत्रालय आणि कृषी तज्ञ यांनी हे धेय पूर्ण करण्याचा विडाच उचलला आहे.पण या तीन चाकी सरकारने या विधेयकाला विरोध करून आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात आहो असं जाहीर केलं आहे.महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. असं मत पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी व्यक्त केलं..यावेळी राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

टिळेकर आणि आंदोलकांच्या पाठीशी ओबीसी मोर्चा-योगेश पिंगळे

0

पुणे- गेली ४ वर्षे पुण्यात सातत्याने पुरेसा पाउस होतो आहे, धरणे ओसंडून भरत आहेत ,पाण्याच्या वितरणासाठी जे काही व्यवस्थापन करून द्यायचे ते माजी आमदार टिळेकर यांनी त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत आणि ‘त्या’ नगरसेविकांनी आपल्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत उपलब्ध करून दिलेले असताना ,जिथे पाणी सलग आठवडाभर दररोज ४ तास मिळत होते तिथे गेल्या काही दीड वर्षापासून आठवड्यातून एकदा पाणीपुरवठाच बंद ठेवला जातो आहे. काही भागात तर अप्वेली कधीही मनमानेल पद्धतीने पाणीपुरवठा केला जातो आहे . मुबलक पाणी असतांना अशा पद्धतीने अधिकारी जर मनमानी करून लोकप्रतिनिधींची गळचेपी करत असतील तर कोणाला कसा जाब विचारायचा ? पाण्याच्या प्रश्नावरून माजी आमदार टिळेकर आणि भाजपच्या ‘त्या’ नगरसेविकांनी आंदोलन केले आहे. त्यांच्या आम्ही सदैव पाठीशी राहू असे सांगत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश पिंगळे यांनी महापालिका आणि पोलिसी कारवाईचा निषेध केला आहे.

मनसेने उघडले कसबा गणपतीचे मंदिर: मनसे आक्रमक पवित्र्यात …

0
  • सरकारने आता भक्तांचा अंत पाहू नये देवळे उघडावीत व देव मुक्त करावेत अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल – मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांचा इशारा

पुणे – महाराष्ट्र शासनाचा धिकार करत … आज मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेत .. पुण्यात सर्वात प्रथम ,पुण्याचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले कसबा गणपती चे मंदिर भाविकांसाठी खुले केले .सरकारने आता भक्तांचा अंत पाहू नये देवळे उघडावीत व देव मुक्त करावेत अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल  हा इशारा यावेळी मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला.या आंदोलनात मनसे नेते बाबू वागसकर,विजयराव तडवलकर, प्रल्हाद गवळी , राम बोरकर ,हेमंत बत्ते, सुनील कदम , राहुल गवळी , नरेंद्र तांबोळी , प्रशांत मते ,गणेश नायकवडी ,सचिन काटकर ,राजेंद्र वेडेपाटील , किशोर चिंतामणी , गणेश भोकरे , राकेश क्षीरसागर , गोकुळ अडागळे अविनाश जाधव ,  अभिजित येनपुरे ,उदय गडकरी , अतुल जाधव ,अनुप जाधव , प्रवीण सिरसागर, शन्कर पवार , आकाश धोत्रे आदी मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी शिंदे म्हणाले ,’ स्वतःला हिंदुत्त्ववादी समजणारी  आणि हिंदुत्त्ववाच्या नावावर मते मागणारी आणि आत्ता सत्ताधारी असलेली शिवसेना सत्तेत असताना आणि मुख्यमंत्री सेनेचा असताना सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवत  असल्याचे दिसत आहे.सरकारने महसुला साठी मद्यालये उघडली मात्र कोरोनचे नाव करून देवालये उघडायला घाबरते आहे; कोरोना काय फक्त देवळातच आहे का ? महाराष्ट्रातील  देवालये न उघडण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या वर नक्की कोणाचा दबाव आहे ? हे आता कोणी सांगण्याची गरज नाही.तथाकथित हिंदू विरोधी विचाराची दोन्ही कॉंग्रेसरुपी सहकारी आणि सत्तेसाठी मम म्हणणारी सेना हे आज च चित्र आहे .
महाराष्ट्रात सर्व व्यवसाय सुरु झाले आहेत. मद्यालये, हॉटेल , दुकाने इतकेच नाही तर जे खाऊन थुकल्या नंतर करोना होऊ शकतो पसरू शकतो तो गुटखा हि सगळी कडे मिळू लागला आहे . मात्र करोना होईल किंवा पसरेल म्हणून मंदिरे बंद ठेवण्यास सरकार भाग पडत आहे. गेल्या महिन्यातच महाराष्ट्रातील देवस्थानाची प्रमुख मंडळी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे याना भेटली होती. त्या नंतर राजठाकरेंनी सरकारला मंदिरे सुरु करावीत हि मागणी देखील केली होती . परंतु अंतर्गत दबावा पोटी सरकार मंदिरे उघडू देत नाही . म्हणूनच आज मनसेने पुण्याचे ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपतीचे देऊळ आज उघडले व देवळात जाऊन प्रतीकात्मक होम करीत देवाला व नागरिकांना करोना मधून लवकरात लवकर मुक्त कर व करोना मुळे आलेली बेकारी व महागाई यातून जनतेची सुटका कर हे साकडे घातले. सरकारने आता भक्तांचा अंत पाहू नये देवळे उघडावीत व देव मुक्त करावेत अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होईल  हा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांनी दिला.

पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 59 हजार 519

0

पुणे विभागातील 3 लाख 85 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित
4 लाख 57 हजार 775 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.7 :- पुणे विभागातील 3 लाख 85 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 57 हजार 775 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 59 हजार 519 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 12 हजार 271 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.68 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.32 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा-
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 96 हजार 990 रुग्णांपैकी 2 लाख 56 हजार 485 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 33 हजार 691 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 814 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.36 टक्के आहे.

सातारा जिल्हा-
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 757 रुग्णांपैकी 31 हजार 229 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 255 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा-
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 35 हजार 424 रुग्णांपैकी 28 हजार 434 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 768 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 222 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा-
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 518 रुग्णांपैकी 32 हजार 544 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 514 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा-
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 86 रुग्णांपैकी 37 हजार 293 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 291 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 502 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ-
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 805 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 739, सातारा जिल्ह्यात 312, सोलापूर जिल्ह्यात 183, सांगली जिल्ह्यात 358 तर कोल्हापूर जिल्ह्यात 213 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 46 रुग्णांचा समावेश आहे. यात पुणे जिल्हा 2 हजार 880, सातारा 476, सोलापूर 322, सांगली 583 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 785 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण-
आजपर्यत विभागामध्ये एकुण 20 लाख 26 हजार 172 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 57 हजार 775 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 6 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )