पुणे, दि, 29 : खासदार गिरीश बापट यांची आज पुणे विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. प्रवाशांचे प्रश्न सोडविणारी ही उच्चस्तरीय समिती मानली जाते. खा.श्रीरंग बारणे,खा. धैर्यशील माने, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा.श्रीनिवास पाटील, खा.डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बापट यांची या समितीच्या अध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आली. समितीची ही बैठक व्हर्च्युअल पद्धतीने झाली. या बैठकीत रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत विशेषतः पुणे नाशिक लोहमार्ग, पुणे लोणंद लोहमार्गावरील भूसंपादन व त्यामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा झाली. उपस्थित खासदारांनी त्यांच्या भागातील प्रश्न मांडले.
पुढील काळात रेल्वेचे विभागीय प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पाठपुरावा करण्याचे आश्वासन बापट यांनी यावेळी दिले. पुणे विभागाअंतर्गत सातारा सांगली कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा समावेश होतो.
विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी खा.बापट
माजी नगरसेविकेच्या पतीची लॉ कॉलेज रोडवरील ऑफिसमध्ये आत्महत्या
पुणे- माजी नगरसेविका नीता परदेशी-रजपूत यांच्या पतीने त्याच्या लॉ कॉलेज रस्त्यावरील ऑफिसामध्ये मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून, त्याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
जयंत रजपूत (रा. खजिनाविहार) असे आत्महत्या केलेल्या नगरसेविकेच्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मित गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
, जयंत यांच्या पत्नी नीता परदेशी या गेल्या वेळी काँग्रेस पक्षाकडून पालिकेची निवडणूक लढवली होती. त्या नगरसेविका राहिल्या आहेत. त्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन देखील होत्या. जयंत यांचे लॉ कॉलेज रस्त्यावरील कांचन गल्लीत ऑफिस आहे. त्यांची बारामतीत औषध कंपनी आहे. ते व्यवसायिक आहेत.जयंत रजपूत यांचे औषधाचे कारखाने हिमाचल प्रदेश तसेच पुण्यात आहेत. काल रात्री ते उशिरापर्यंत घरी आले नाही. तसेच मोबाईलही उचलत नसल्याने त्यांचा मुलगा कार्यालयात आला. कार्यालय आतून बंद होते. त्यामुळे त्याने मागील बाजूने जाऊन पाहिले. तेथील लाकडी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर जयंत रजपूत यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.त्यांनी तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टर तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता़ त्यांनी डेक्कन पोलिसांना याची माहिती दिली़ डेक्कन पोलीस अधिक तपास करीत आहेत.
महिंद्राने दाखल केली नवी ट्रिओ झॉर इलेक्ट्रिक 3-व्हीलर कार्गो
बेंगळुरू-: महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. या 19.4 अब्ज डॉलर उलाढाल असणाऱ्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने भारतात ट्रिओ झॉर हे नवे इलेक्ट्रिक 3-व्हीलर कार्गो मॉडेल दाखल केल्याचे आज जाहीर केले आहे. या मॉडेलची किंमत 2.73 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली, नेट ऑफ FAME 2 व स्टेट सबसिडीज) आहे. ट्रिओ झॉर ही प्रसिद्ध ट्रिओ सुविधेवर आधारित आहे आणि त्यामध्ये 3 प्रकार उपलब्ध आहेत – पिकअप, डेलिव्हरी व्हॅन व फ्लॅट बेड. ही वाहने भारतातील निवडक शहरांमध्ये महिंद्रा स्मॉल कमर्शिअल डीलरशिपमध्ये डिसेंबर 2020 पासून उपलब्ध होतील.
ट्रिओ झॉर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. देखभालीसाठी प्रति किमी केवळ 40 पैसे* इतका कमी खर्च येत असल्याने सध्याच्या डिझेल कार्गो 3-व्हीलर्सच्या तुलनेत हे वाहन दरवर्षी 60,000+ रुपये बचत करते*. हे वाहन 8kW इतकी या उद्योगातील सर्वोत्तम** पॉवर आणि 42 Nm टॉर्क इतके श्रेणीतील सर्वोत्तम*** टॉर्क देते. 550 किलो पेलोड हेही ट्रिओ झॉरचे श्रेणीतील सर्वोत्तम*** वैशिष्ट्य आहे.
वाहन दाखल केल्याबाबत, महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवन गोएंका म्हणाले, “महिंद्राच्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त, आम्ही स्वच्छ, हरित व तंत्रज्ञानाने जोडलेल्या भविष्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रेरित आहोत. सर्वत्र कनेक्टिविटी देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करण्यामध्ये जगभरात आघाडी घेण्यासाठी भारताकडे मोठी क्षमता आहे, असे मला वाटते. ट्रिओ सुविधेतून, नवे तंत्रज्ञान व मेक इन इंडिया याद्वारे आमची आत्मनिर्भर भारतसाठीची बांधिलकी दिसून येते. सर्वदूर डिलेव्हरी देण्यासाठी ट्रिओ झॉर स्वच्छ, शाश्वत व किफायतशीर सेवा देणार आहे.“
या निमित्ताने, महिंद्रा इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू यांनी सांगितले, “ट्रिओ या प्रसिद्ध 3-व्हीलर सुविधेने भारतीय रस्त्यांवर 35 दशलक्ष किमीहून अधिक प्रवास करणारे 5,000+ समाधानी ग्राहक मिळवून अगोदरच सर्वदूर वाहतूक सुविधा दिली आहे. ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याच्या हेतूने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रिओ झॉर विकसित केली आहे आणि ती ग्राहकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी 3 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. ट्रिओ झॉर दरवर्षी 60,000+ रुपयांपर्यंत ग्राहकांना बचत करण्याची सुविधा देणार आहे, तसेच यामुळे ग्राहकांना त्यांच्या अपेक्षा व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहे आणि सर्वदूर डिलेव्हरी देणे शक्य करणार आहे.”
ट्रिओ झॉरची ठळक वैशिष्ट्ये:
1. दरवर्षी 60,000 रुपयांहून अधिक इतकी सर्वाधिक बचत (वि. डिझेल कार्गो):
· डिझेल कार्गो 3 व्हीलर्सच्या तुलनेत इंधनाच्या खर्चामध्ये प्रति किमी 2.10 रुपये बचत
· देखभालीसाठी प्रति किमी केवळ 40 पैसे*, या तुलनेत डिझेल 3 व्हीलरसाठी 65 पैसे, इतका कमी खर्च येत असल्यानेअधिक बचत
2. आकर्षक कामगिरी:
· 8kW ही उद्योगातील सर्वोत्तम* पॉवर आणि 42Nm इतके श्रेणीतील सर्वोत्तम** टॉर्क
· बूस्ट मोड: उच्च वेगासह वाहन चालवण्याचा उत्तम अनुभव घ्या आणि झटपट टर्नअराउंड टाइम नोंदवा
· आधुनिक IP67-रेटेड मोटरमुळे धूळ व पाणी शिरण्यापासून संरक्षण
· 550 kgs हा श्रेणीतील सर्वोत्तम** पेलोड – इलेक्ट्रिक 3 व्हीलर्समध्ये श्रेणीतील सर्वात उंच पेलोडमुळे उत्पन्न मिळवण्याच्या अधिक संधी
· 125 km या सर्टिफाइड ड्रायव्हिंग रेंजमुळे दररोज अधिक ट्रिप करा
3. आधीपेक्षा सुरक्षित व स्थिर:
· डिझेल व इलेक्ट्रिक कार्गो 3 व्हीलर्सच्या तुलनेत, 2216 mm इतका या उद्योगातील सर्वात लांब व्हीलबेस असल्याने सुरक्षित व स्थिर राइड
· डिझेल व इलेक्ट्रिक कार्गो 3 व्हीलर्सच्या तुलनेत 30.48 cm इतक्याया उद्योगातील सर्वात लांब टायरमुळे खड्डे सहज चुकवा
4. सर्व अपेक्षा पूर्ण करणारे 3 प्रकार:
· तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार पिकअप, डेलिव्हरी व्हॅन व फ्लॅट बेड यातून योग्य प्रकार निवडा
5. आधुनिक लिथिअम-आयन बॅटरी:
· बॅटरीचे आयुष्य 1.50 लाख किमीहून अधिक असल्याने देखभाल-मुक्त राइड
· सुलभपणे चार्जिंग: ट्रिओ झॉर चार्ज करणे हे मोबाइल फोन चार्ज करण्याइतके सोपे आहे. त्यासाठी केवळ 15AMP सॉकेटची गरज आहे.
6. न थकता वाहन चालवणे:
· ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे सहजपणे वाहन चालवा. विन-क्लच, आवाजमुक्त व कंपनेमुक्त राइडचा आनंद घ्या.
· 675 mm इतक्या श्रेणीतील सर्वोत्तम ट्रे लोडिंग उंचीमुळे डिझेल कार्गो 3 व्हीलरच्या तुनेलत लोडिंग व अनलोडिंग कालावधी कमी करा
7. NEMO मोबिलिटी सुविधेसह कनेक्टेड व कार्यक्षम फ्लीट मॅनेजमेंट:
· वाहनाची रेंज, वेग, ठिकाण, इ. दुरूनच पाहण्यासाठी क्लाउड-आधारित कनेक्टेड
8. स्टायलिश ड्युएल टोन, ड्रायव्हर-सेंट्रिक डिझाइन:
· खास ड्युएल टोन बाह्यभाग असणारे आधुनिक डिझाइन वाहन अधिक आकर्षक बनवते
· गंजमुक्त, डेंट-रेझिस्टंट, मोड्युलर एसएमसी पॅनेलमुळे उत्तम अनुभव, सुलभ दुरुस्ती व रिप्लेसमेंट
· अर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या ड्रायव्हर केबिनमुळे व सीटमुळे अधिक आरामदायी
9. अन्य वैशिष्ट्ये: टेलिमॅटिक्स युनिट व जीपीएस, विंडस्क्रीन व विपिंग सिस्टिम, स्पेअर व्हील प्रोव्हिजन, ड्रायव्हिंग मोड – एफएनआर (फॉरवर्ड, न्युट्रल, रिव्हर्स), इकॉनॉमी व बूस्ट मोड, लॉकेबल ग्लोव्ह बॉक्स, 12 V सॉकेट, 15-amp ऑफ-रोड चार्जर, हझार्ड इंडिकेटर, रिव्हर्स बझर
10. उत्तम वॉरंटी व आफ्टरसेल्स:
· ट्रिओ झॉरबरोबर 3 वर्षे/80,000 किमी अशी स्टँडर्ड वॉरंटी मिळेल
· भारतातील 140+ डीलरशिपचे व्यापक जाळे वेळेवर आफ्टर सेल्स सर्व्हिस दिली जाईल याची दक्षता घेते
राज्यपालांवर कुत्सित टीका करणे जाणत्या राजाला शोभत नाही
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांचा शरद पवार यांना टोला
मुंबई-घटनात्मक पदावर असलो तरीही आपण जनतेला उत्तरदायी आहोत, या उदात्त भावनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या वर्षभराच्या कामाचा अहवाल प्रसिद्ध करून लोकप्रतिनिधींकडे पाठविला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावर कुत्सितपणे उत्तर पाठविले आहे. असा दृष्टिकोन जाणत्या राजाला शोभत नाही, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी लगावला आहे.
आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राज्यपालांनी पाठविलेल्या कार्यअहवालावर शरद पवार यांनी पाठविलेल्या अभिप्रायाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. पुस्तकात एखाद-दुसरा प्रसंग वगळता शपथविधी स्वागत समारंभ दीक्षांत समारंभ सोहळे, उच्चपदस्थ गाठीभेटी सांस्कृतिक कार्यक्रम छायाचित्र आहेत, असे शरद पवार यांनी पत्रात म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. हा अहवाल पाहिला तर त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या २८ नोव्हेंबरच्या तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ३० डिसेंबरच्या शपथविधीची छायाचित्रे आहेत. शरद पवार यांना ही छायाचित्रे खटकतात की, त्यांना आता सध्याच्या परिस्थितीमुळे असे सरकार सत्तेवर आणल्याचाच पश्चात्ताप होतो, हे त्यांनी सांगितले पाहिजे. पण त्यासाठी त्यांनी राज्यपालांच्या अहवालाचा आधार घेऊ नये.
ते म्हणाले की, संपूर्ण अहवालात अनेक मान्यवरांसोबतच्या भेटींची छायाचित्रे आहेत पण आपले छायाचित्र मान्यवर नेत्यांप्रमाणे दिसत नाही, हे जाणवल्यामुळे व्यथित होऊन शरद पवार यांनी असे पत्र लिहिले का, असा प्रश्न पडतो.
त्यांनी सांगितले की, शरद पवार ज्यांना अन्य छायाचित्रांमधील एखाददुसरा प्रसंग म्हणतात त्यामध्ये मा. राज्यपालांनी रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन करणे, पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणे, नंदूरबार जिल्ह्यात आदिवासींसोबत नृत्याचा ठेका धरणे, जालना येथे पन्नास हजार विद्यार्थ्यांसाठीच्या माध्यान्ह भोजन प्रकल्पाचे लोकार्पण करणे अशी अनेक छायाचित्रे आहेत. अशी अन्य छायाचित्रे शरद पवार यांना दिसली नाहीत, हे आश्चर्य आहे. जनराज्यपाल या वार्षिक कार्य अहवालात ग्राम संपर्क हा वेगळा विभाग आहे. या अहवालात राजभवनातील सर्व कर्मचाऱ्यांचा फोटोसह राजभवन परिवार म्हणून आस्थेने उल्लेख केलेला आहे. हे सर्व शरद पवार यांना दिसले नाही, हे सुद्धा विशेष आहे.
ते म्हणाले की, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना मंदिरे उघडण्याबद्दल लिहलेले पत्र हे ऑक्टोबर महिन्यातील आहे व हा वार्षिक अहवाल सप्टेंबर महिन्यापर्यंतचा आहे. या कालावधीचेही जाणत्या राजाला भान राहिले नाही आणि ते अहवालात पत्र शोधत राहिले, हे आश्चर्यकारक आहे.
सत्ताधा-यांची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही,भाजप जशास तसे उत्तर देण्यास सज्ज-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
पेणमध्ये भाजपची भव्य जाहिर निषेध सभा
पेण – एखाद्या घटनेचा राजकीय स्वार्थासाठी भांडवल करून घेणे हि सुनिल तटकरेंची वृत्ती असून गेली २० ते २५ वर्षात विरोधकांना वेळोवेळी अडचणीत आणण्याचे काम ते करीत असून त्यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल हे निर्विवाद सत्य आहे. प्रामाणिकपणे निवडून आलेल्या लोकप्रतिनीधींना सत्तेचा गैरवापर करीत पोलीस यंत्रणेला चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यास भाग पाडणे या विरोधात भाजप रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पेणमध्ये आयोजित निषेध मोर्चा प्रसंगी दिला.
१६ ऑक्टोबर रोजी पेण न. प. च्या स्थायी समितीच्या सभेत नरदासचाळ येथील सांडपाण्याचा निचरा समस्या निवारण प्रश्नी गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी मुख्याधिकारी यांना जाब विचारला यावरून मुख्याधिकारी यांनी गटनेत्याच्या विरोधात पेण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला परंतु पोलीस यंत्रणेने कोणतीही शहानिशा न करता ३५३ गुन्हा दाखल केल्याने जनतेच्या प्रश्नासंबंधी जाब विचारणाऱ्या लोकप्रतिनिधींनवर गुन्हा दाखल करणे हे निषेधार्ह असून या विरोधात आज २९ ऑक्टोबर रोजी वैकुंठ निवास येथून निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या वेळी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचे न. प. कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर रायगडचे माजी पालकमंत्री आमदार रविद्र चव्हाण, आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकुर, आमदार निरंजन डावखरे, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर, पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील, पनवेल मनपा स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, सभापती मोनिका महानवर, सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, हेमलता म्हात्रे, सुशीला घरत, भाजप जिल्हाध्यक्ष अँड. महेश मोहिते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, रिपाई कोकण अध्यक्ष जगदिश गायकवाड, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, चिटणीस बंडू खंडागळे, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रविण दरेकर म्हणाले कि, सुडाचे राजकारण करत असताना तटकरे यांनी पोलीस यंत्रणेवर दबाव टाकल्याने पोलिसांनी सारासार विचार न करता रात्रौ १२.३० वाजता माजी मंत्री आमदार रविशेठ पाटील यांच्या घराची झाडाझडती घेतली हे निव्वळ रविशेठ पाटील यांना बदनाम करण्यासाठी आपण कुठल्याही थराला जाऊ शकतो हे तटकरेंनी या घटनेवरुन सिद्ध करून दाखविले असून या प्रकरणाचा जाब येत्या विधानसभा अधिवेशनात सरकारला विचारणार असल्याचे प्रविण दरेकर यांनी सांगितले.
तटकरेंशी राजकीय मैत्री करणारे इतर पक्षांचेही अस्तित्व संपविण्याचे काम ते करीत असून शिवसेनेचे जिल्ह्यात ३ आमदार असून सुद्धा पालकमंत्री पद राष्ट्रवादीला गेले आहे, तसेच शासकीय कार्यक्रमाच्या आमंत्रांवरून शिवसेनेच्या आमदारांनी तक्रार दिली असून ही शिवेसनेसाठी शोकांतिका आहे. आगामी काळात तटकरे भाजपाला १ नंबर राजकीय क्षत्रू मानतात आम्ही पण तटकरेंना जशास तसे उत्तर देऊ असे शेवटी दरेकर यांनी स्पष्ट केले.
हा प्रश्न फक्त एका नगरपालिकेशी मर्यादित नाही तर रायगड जिल्ह्याच्या भविष्याशी निगडित आहे. भारतीय जनता पार्टी राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे आणि सुदैवाने विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता हा याच रायगडच्या मातीतला आहे त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारची दडपशाही आम्ही खपवून घेणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यात हे सरकार सत्तवेर आले तेव्हाच लोकशाहीचा खून झाला. शिवसेना भाजपच्या युतीला लोकांनी मत दिली असून देखील हे अनैसर्गिक सरकार स्थापन केल. श्रीवर्धन बँक बुडविली, गोरेगाव अर्बन बँक बुडवली गेली, पेण अर्बन बँक बुडाली हे सर्व बँक बुडवणारे तटकरे यांचे साथीदार असल्याचा आरोप दरेकर यांनी यावेळी केला. तटकरे यांच्या सुतार वाडी ची झाडाझडती तुम्ही करणार आहात का असा सवालही त्यांनी रायगड पोलिसांना यावेळी केला.
या मोर्चात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता तसेच पेणमधील व्यापारी, फळ विक्रेते, दुकानदार, भजीवाले यांनी दुकाने बंद ठेऊन बंदमध्ये सहभाग घेतला.
चारचाकी वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांकाबाबत आवाहन
पुणे दि 29 : प्रादेशिक परिवहन कार्यालय,पुणे या कार्यालयात लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे.वाहनांची मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठया प्रमाणात इच्छूकांची गर्दी होते. त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो व बऱ्याच वेळा नागरिकांनाही याचा त्रास होतो. नागरिकांचा होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने तो मिळावा यासाठी चारचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरुन हवे असतील त्यांनी दि.3.नोव्हेंबर 2020 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्ज कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डी.डी. पत्याचा पुरावा, ओळखपत्र,पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वत: जमा करावा. हा डी.डी.‘R.T.O. Pune’ यांच्या नावे नॅशनलाईज/शेड्यूल्ड बँकेचा पुणे येथील असावा. त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहिल.(डी.डी.एक महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा)
अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 5 अ मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची सांक्षाकित प्रत सादर करणे आवश्यक असेल. (उदा.लाईटबील,टेलीफोन बील, इत्यादी) तसेच अर्जासोबत अर्जदाराने त्याचे फोटो ओळखपत्र (उदा.आधारकार्ड,/निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/ पासपोर्ट/पॅनकार्ड इत्यादी) ची साक्षांकित प्रत सादर करावी.
एकाच क्रमांका करीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 नंतर कार्यालयीन नोटिस बोर्डवर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जास्त रक्कमेचा एकच डी.डी. दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा. हा डी.डी.किमान 301 रुपयांपेक्षा जास्त तसेच डी.डी. ‘R.T.O. Pune’ यांच्या नावे नॅशनलाईज शेड्यूल बँकेचा पुणे येथील असावा. डी.डी.Pune.R.TO.या नावाने असल्यास तो बाद समजण्यात येईल.(दुपारी 3 वाजलेनंतर डी.डी.स्विकारले जाणार नाहीत) त्याच दिवशी दुपारी 4 वाजता सहकार सभागृह, प्रादेशिक परिवहन कार्यालय,पुणे येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तींसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रक्कमेचा डी.डी. सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही. अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही.
आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज तसेच प्रतिनिधी येणार असल्यास प्रतिनिधीचे प्राधिकारपत्र याचा नमूना कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
घटता घटे रुग्णांची संख्या : आज पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 22 हजार 279
पुणे विभागातील 4 लाख 63 हजार 429 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 4 लाख 99 हजार 630 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि.29 :- पुणे विभागातील 4 लाख 63 हजार 429 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 99 हजार 630 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 22 हजार 279 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 13 हजार 922 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.75 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 21 हजार 398 रुग्णांपैकी 3 लाख 1 हजार 116 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 12 हजार 576 आहेत. कोरोनाबाधित एकूण 7 हजार 706 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.40 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.69 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 45 हजार 790 रुग्णांपैकी 40 हजार 772 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 500 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 726 रुग्णांपैकी 35 हजार 7 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 286 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 433 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 44 हजार 755 रुग्णांपैकी 41 हजार 247 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 880 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 628 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 961 रुग्णांपैकी 45 हजार 287 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 37 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 637 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 385 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 737, सातारा जिल्ह्यात 230, सोलापूर जिल्ह्यात 165, सांगली जिल्ह्यात 185 तर कोल्हापूर जिल्ह्यात 68 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 2 हजार 243 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 204 ,सातारा जिल्हयामध्ये 555, सोलापूर जिल्हयामध्ये 195, सांगली जिल्हयामध्ये 255 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 34 अशा रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 23 लाख 41 हजार 375 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 99 हजार 630 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 28 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी परिपूर्ण अर्ज विहीत वेळेत समितीकडे सादर करावा
मुख्य समन्वयक धम्मज्योती गजभिये
पुणे, दि. 29: शैक्षणिक वर्ष 2020-21 या शैक्षणिक वर्षात ज्या अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत त्यांचे अर्ज वैधता प्रमाणपत्र समितीकडे सादर केलेल नाहीत, त्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरावा व मुळ कागदपत्रांसह संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीकडे सादर करावे तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज विहीत वेळेत समितीकडे सादर करावे व ज्या प्रस्तावामध्ये समितीकडून अर्जदारास त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत त्या त्रुटींची पुर्तता अर्जदाराने संबंधित समितीकडे करावी, याबाबत काही तांत्रिक व इतर अडचणी आल्यास helpdesk@barti.in व टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 18002330444, तसेच 9404999453/9404999452 या हॉटसॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था तसेच राज्य जात पडताळणी समितीचे मुख्य समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.
राज्यात ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ‘पक्षी सप्ताह’
मुंबई, दि. २९ : पक्षी हा निसर्गाच्या जैविक साखळी व जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक आहे. त्या अनुषंगाने पक्षांबाबत जनसामान्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी पक्षी सप्ताह साजरा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य वन्यजीव मंडळांच्या १५ व्या बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने राज्यात यावर्षीपासून ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
राज्यात पक्षी सप्ताह साजरा करावा व पक्षांबाबत जागृती व्हावी यासाठी पक्षीप्रेमी व संघटना प्रयत्नशील होत्या. त्यामुळे हा विषय राज्य वन्यजीव मंडळाच्या १५ व्या बैठकीत चर्चेला आला होता. वन्यजीव साहित्य निर्मितीत ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते मारुती चितमपल्ली यांचा ५ नोव्हेंबर हा जन्मदिवस तर पक्षी अभ्यास शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ.सलीम अली यांची जयंती १२ नोव्हेंबरला असते. या दिवसांचे औचित्य साधून हा पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
या सप्ताहामध्ये कोविड-१९ रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या सर्व सुचनांचे अनुपालन करून पक्षांचे महत्त्व, स्थलांतर व अधिवास, संरक्षण, संर्वधन याबाबत जागृती करण्यात येईल. तसेच ऑनलाईन पक्षी छायाचित्र प्रदर्शन, पक्षी छायाचित्र स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात येतील. पक्षी निसर्ग माहिती पत्रके, पुस्तके, भित्तीपत्रके आदि साहित्यही उपलब्ध करुन दिले जाईल. वन विभागाच्या समन्वयाने हा सप्ताह साजरा करण्यात येईल, अशी माहिती श्री.राठोड यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या ऊसाचा मोबदला अधिकाधिक कसा मिळेल यासाठी कटिबद्ध
नांदेड :- मागील २४ वर्षे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने इथल्या शेती आणि शेतकऱ्यांप्रती जी विश्वासार्हता जपली त्याच विश्वासार्हतेच्या बळावर आपण कारखान्याच्या रौप्य महोत्सवी गळीत हंगामाचा शुभारंभ केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या योगदानातून हा कारखाना आजवर विविध गुणवत्तेसह सुरु आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगला दर कसा मिळेल यासाठी आम्ही विश्वस्त या नात्याने अधिक कटिबद्ध असून सदैव प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. ते भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना लि. लक्ष्मीनगरच्या रौप्य महोत्सवी गळीत हंगाम शुभारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या गळीत हंगामाच्या शुभारंभासाठी राज्याचे सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्ननागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ आणि मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, उपाध्यक्ष कैलास दाड आदींची यावेळी उपस्थिती होती. भाषणाच्या सुरवातीला त्यांनी स्व. डॉ. शंकरराव चव्हाण व स्व. पतंगराव कदम यांच्या स्मृतींना उजाळा दिला. डॉ. विश्वजीत कदम यांनी पतंगराव कदम यांचा वारसा समर्थपणे चालविला असून त्यांच्या कामाची कार्यपद्धती अतिशय चांगली असून या युवा नेत्याचे मराठवाड्याकडून कौतूक व्हावे, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी त्यांना मी निमंत्रण दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझा युवा सहकारी म्हणून मला अभिमान असल्याचेही त्यांनी गौरोउद् गार काढले.
इथल्या कृषिक्षेत्रावर स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे मोठे ऋण आहेत. त्यांनी शेतीसाठी विविध प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करुन दिले. यातूनच नांदेडमधल्या शेतकऱ्यांनी समृद्धता साध्य केली. अशोक चव्हाण यांनीही त्यांची धुरा समर्थपणे सांभाळली असून माझ्यासारख्या अनेक युवा नेतृत्वाला त्यांनी घडविल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. उत्पादन खर्च जर कमी करायचा असेल तर ठिबक शिवाय पर्याय नसल्याचे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना उच्च कृषि तंत्रज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले. नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी आमदार अमर राजूरकर व कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी मनोगत व्यक्त केले.
मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जलद पुनर्विकासाकरिता नवीन मार्गदर्शक सूचना देण्याचा निर्णय
मुंबई -शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासाकरिता 11 सप्टेंबर 2019 चा शासन निर्णय रद्द करून नवीन मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या मार्गदर्शक सूचनांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल.
- विकासक नोंदणी व विकासक पात्रतेसंदर्भातील नवीन मार्गदर्शक सुचना (guidelines) /निकष गृहनिर्माण विभागाच्या स्तरावर नव्याने निश्चित करुन निर्गमित करण्यात येतील.
- उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास योजनेमधील मालक/विकासक यांनी भाडेकरु/रहिवाशी यांचे 1 वर्षाचे भाडे आगाऊ जमा करण्यासाठी एस्क्रो खाते (Escrow Account) उघडणे बंधनकारक व पुढील उर्वरित कालावधीचे भाडे देखील याचप्रमाणे प्रकल्प पुर्ण होईपर्यंत दरवर्षी आगाऊ जमा करणे मालक/विकासकास बंधनकारक राहिल.
- उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाच्या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी दक्षता समितीची स्थापना करणे. सदर समितीमध्ये संबंधित इमारतींच्या ना-हरकत प्रमाणपत्र धारक यांनी नेमलेला वास्तुविशारद यांचा नव्याने समावेश.
- म्हाडा अधिनियम, 1976 मधील कलम-103 (ब) अन्वये भुसंपादित केलेल्या मालमत्तेचा पुनर्विकासास चालना देण्यासाठी मार्गदर्शक सूचना.
- उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 3 ते 5 वर्षाची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.
धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा मागविणार
धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्याची निविदा प्रक्रीया रद्द करून नव्याने निविदा मागविण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
धारावी प्रकल्पाचा विकास करण्यासंदर्भात 16 ऑक्टोबर 2018 रोजी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. त्यानुसार सध्या सुरू असलेली धारावी पुनर्विकासाची निविदा प्रक्रीया रद्द करण्याबाबत सचिव समितीने निर्णय घेतला होता. या निविदेच्या अटी व शर्तींमध्ये योग्य त्या फेर दुरुस्त्या करून नव्याने निविदा मागविण्याबाबत सचिव समितीचा निर्णय आज कायम करण्यात आला. या प्रस्तावाच्या अंमलबजावणी काही फेरबदल करावयाचे झाल्यास मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येणार आहे. धारावी पुनर्विकासाबाबत 2 निविदादारांच्या निविदा सचिव समितीसमोर ठेवण्यात आल्या होत्या. या प्रकल्पासाठी रेल्वेच्या जागेच्या हस्तांतरणाबाबत मुद्दा उपस्थित झाला होता. महाधिवक्ता यांनी दिलेल्या अभिप्रायावर सचिव समितीने निर्णय घेऊन ही निविदा प्रक्रीया रद्द करण्याचे ठरविले होते.
माजी सैनिक, विधवांकरिता घरपट्टी मालमत्ता कर माफीसाठी बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना
मुंबई-
राज्यातील कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफीच्या योजनेस बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
संरक्षण दलातील शौर्यपदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना नागरी भागातील घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्याची तरतूद नगर विकास विभागाने केली आहे. त्याचप्रमाणे ग्रामविकास विभागाने देखील ग्रामीण भागातील अशा माजी सैनिकांच्या विधवांना एकच निवासी इमारतीस करातून माफी देण्याची तरतूद केली आहे.
मात्र, नागरी व ग्रामीण क्षेत्रातील सर्वच सैनिकांना मालमत्ता करातून सवलत देण्याची तरतूद नसल्याने अशी मागणी करण्यात येत होती. या दोन्ही विभागांच्या योजनांचे एकत्रिकरण करून त्याला मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्यात आले असून यामुळे नागरी व ग्रामीण भागातील माजी सैनिकांना मालमत्ता करातून देखील सूट मिळेल.
मंत्रालयात रंगला ‘शतदा प्रेम करावे’ कार्यक्रम
मुंबई, दि. 28 : कोरोना संकटाच्या कालावधीत मनामनावर दाटलेले मळभ शरद पौर्णिमेच्या कालावधीतील शारदीय चांदण्यांच्या स्पर्शाने दूर करत मंत्रालयात ‘शतदा प्रेम करावे’ हा काव्यवाचनाचा कार्यक्रम रंगला.
मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी कल्याण समितीच्या वतीने मंत्रालयात परिषद सभागृह येथे या काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कोरोना संकटात दिसलेले भाव-भावनांचे विश्व, मानवी मनाचे कंगोरे, ताणतणाव आणि आनंदाचे क्षण यावर आधारित जगण्यावर प्रेम करायला शिकविणाऱ्या कवितांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या काव्यवाचनाचा उद्देश फक्त मनोरंजनाकरिता नव्हता तर कोरोना काळात सर्वांच्याच मनावर आलेले मळभ दूर करणे हा होता.
अजय भोसले, अंजली मोटळकर, मच्छिंद्र डवले, स्वप्ना चव्हाण, मीनल जोगळेकर, यांच्यासह श्री. विवेक दहिफळे, मंगल नाखवा, स्वाती महांगरे, दिवाकर मोहिते, रवींद्र पानसरे, प्रवीण मुंडे, सतीश जोंधळे, प्रशांत साजणीकर, जयश्री सिंगलवार, सचिन देवडराव, अमोल उगलमले, संजय जाधव, अतुल कुलकर्णी, सतीश मोघे, अभय जावळे या मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कविता यावेळी सादर केल्या. मनाला उभारी देण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाले. अशा भावना कवी व कवयित्री यांनी व्यक्त केल्या.
लॉकडाऊनच्या कालावधीत कोरोनासारख्या महामारीशी संघर्ष करीत असताना मंत्रालयातील उपहारगृहातील कर्मचाऱ्यांनी मंत्रालयात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चहा, नाश्ता, गरम पाणी तसेच आवश्यकतेनुसार जेवणाची सोय करणे अशी कामे नियमितपणे व आपुलकीने पार पाडली. त्यानिमित्त सुरेंद्र अंबिलपुरे, परशुराम सितप, संदिप चिकणे, भरत वाजे, पद्माकर परवडी, श्रीधर यरगट्टीकर व शिवाजी आव्हाड यांचा गुलाब पुष्प, शर्ट, मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.
सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव श्री. सतीश जोंधळे म्हणाले, मंत्रालयीन उपहारगृहातील कर्मचाऱ्यांच्या वेदना, समस्या अनुभवल्या आहेत. सकाळी 4.30 वाजल्यापासून ते मंत्रालयात उपस्थित राहून जीव ओतून काम करीत असतात. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी तीन ते चार महिने घरी न जाता मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा पुरविल्या. त्यांचा हा सत्कार कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल कोरोना योद्धा म्हणून केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी वित्त विभागाच्या सहाय्यक कक्ष अधिकारी कवयित्री स्वप्ना चव्हाण यांनी एप्रिल 2020 चे पूर्ण वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून दिल्याबद्दल त्यांचा वित्त विभागाचे सहसचिव श्री.दहिफळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री.धनावडे, श्री. विजय चौधरी, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रा.ना. मुसळे, जलसंपदा विभागाचे अवर सचिव श्रीमती सुशिला पवार तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
महागाई च्या विरोधात मनसे ची अलका चौकात निदर्शने (व्हिडीओ)
पुणे- महागाई च्या विरोधात मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज अलका चौकात निदर्शने करण्यात आली
यावेळी अजय शिंदे म्हणाले कि, जीवनावश्यक वस्तू सरासरी 30 ते 50 % नी महाग झाली आहे तर भाजीपाला आणि कांदा 100 % नी महाग झाला आहे कोणतीही भाजी 120 रु किलो कांदा 80 ते 100 रु इतका महाग झाला आहे तेल सरासरी 30 ते 40 रु ने तर डाळी आणि कडधान्ये सुद्धा अशाच पद्धतीने महाग झाले आहे चहा पावडर सरासरी 50 ते 60 रु ने किलो मागे महाग झाली आहे सरकार हो जनतेने जगायचं कसं ? हा प्रश्न आहे
प्रचंड महागाई वाढत असताना राज्य सरकार महागाई कमी करण्यासाठी कोणत्याच पातळीवर सरकार काम करत नाही. सरकार मधील प्रमुख मंडळी हा केंद्राचा विषय हा समित्यांचा विषय असे म्हणून टोलवा टोलवी करत आहेत काही मंत्री तर परवडत नसेल तर खाऊ नका असे सल्ले देत आहेत .अस काम करणारया सरकारला जाग करण्यासाठी आणि महागाई कमी करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलने रस्त्या रस्त्या वर करू हा इशारा सरकारला देण्यासाठी मनसेने आज निदर्शन केली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेने पदाधिकारी उपस्थित होते निदर्शनाची दखल न घेतल्यास सरकार ला सळो की पळो करण्याचा इशारा याठिकाणी देण्यात आला .
यावेळी पुणे शहर अध्यक्ष अजयभाऊ शिंदे, उपशहर अध्यक्ष हेमंत बत्ते, प्रल्हाद गवळी, राम बोरकर, विभाग अध्यक्ष सुनिल कदम, सुधीर धावडे, प्रशांत मते, आशिष देवधर, वाहतूक पुणे शहर अध्यक्ष किशोर चिंतामणी, विभाग सचिव रमेश जाधव, आकाश धोत्रे, अभिषेक थिटे प्रभाग अध्यक्ष मनोज ठोकळ, महेश शिर्के, लक्ष्मण काते , कुलदीप घोडके, योगेश महिंद्रकर , बाळासाहेब शिंगाडे, शाम ताठे, सचिन काटकर, प्रवीण मिसाळ, उदय गडकरी, अभिषेक येनपुरे, जेमा चव्हाण, विनोद गायकवाड, राहुल कदम, पिंटू रसाळ, आदी पदाधिकारी उपस्थिती होते..
कांदा उत्पादक क्षेत्रातील व्यापाऱ्यांसाठी साठा करण्याची मर्यादा चारपट वाढवा
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची केंद्रीय व्यापारमंत्र्यांकडे मागणी
मुंबई-
कांद्याचा साठा करण्यावरील निर्बंधांच्या विरोधात नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांनी बंद घोषित केल्यामुळे शेतकऱ्यांचा हजारो टन कांदा विक्रीविना पडून आहे तसेच ग्राहकांनाही समस्यांचा सामना करावा लागत आहे. शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी कांदा उत्पादक क्षेत्रातील घाऊक विक्रेत्यांसाठी कांदा साठवणीची मर्यादा सध्याच्या २५ टनावरून वाढवून १०० टन करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय व्यापारमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे बुधवारी पत्राद्वारे केली.
मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने कांद्याचा साठा करण्यावर निर्बंध लागू केले आहेत व घाऊक विक्रेत्यांना २५ टन आणि किरकोळ व्यापाऱ्यांना २ टन साठा करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाच्या विरोधात नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांनी बंद घोषित केला आहे. त्यामुळे कांद्याचे लिलाव बंद होऊन शेतकऱ्यांवर परिणाम होत आहे. शेतकरी आणि ग्राहकांचे हित ध्यानात घेऊन कांद्याचे लिलाव लवकर सुरू होणे गरजेचे आहे. यासाठी कांद्याचा साठा करण्याच्या क्षमतेत बदल करून कांदा उत्पादक क्षेत्रातील घाऊक व्यापाऱ्यांसाठी १०० टन साठ्याची परवानगी देण्यात यावी. महाराष्ट्राच्या बाहेरच्या व्यापाऱ्यांना ३० टनापर्यंत साठ्याची परवानगी द्यावी आणि किरकोळ व्यापाऱ्यांना १० टनाची मर्यादा ठरविणे व्यावहारिक होईल.
त्यांनी पत्रात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यात शेतकरी त्यांचा हजारो टन कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेऊन आले आहेत. त्याचप्रमाणे हजारो टन कांदा शेतकऱ्यांकडील कांदा चाळीतही आहे. कांद्याचे लिलाव बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे कांद्याचा साठा करण्याची मर्यादा वाढविणे आवश्यक आहे, जेणेकरून व्यापारी कांद्याची खरेदी करू शकतील.
त्यांनी आपल्या पत्रात महत्त्वाचा मुद्दा मांडला की, ग्राहकांच्या हितासाठी नाशिकमध्ये खरेदी केलेला कांदा व्यापाऱ्यांना बाजारात आणणेही आवश्यक आहे. तसेच कांद्याचा पुरवठा सुरळीत होईल, यासाठी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने कांद्याच्या वितरणावर लक्ष ठेवणे व गरज पडेल तर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
( मुकुंद कुलकर्णी )
कार्यालय सचिव
