Home Blog Page 24

३९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये ७० परदेशी खेळाडूंसह १५,००० स्पर्धक धावणार

दि. ७ डिसेंबरच्या स्पर्धेची पूर्वतयारी पूर्ण

पुणे -देशातील पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन असणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा ३९ वे वर्ष साजरे करत असून, यंदा रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे तीन वाजता ४२.१९५ किमी च्या महिला–पुरुष पूर्ण मॅरेथॉन चा प्रारंभ सणस मैदानाजवळील हॉटेल कल्पना–विश्व येथून होईल. तसेच येथूनच महिला–पुरुष अर्ध मॅरेथॉन दहा किमी, पाच किमी व व्हीलचेअर स्पर्धांचा प्रारंभ होईल. यामध्ये केनिया, इथिओपिया, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, श्रीलंका येथील ७० हून अधिक परदेशी खेळाडूंसह एकूण ११ गटांत सुमारे १५००० हून अधिक धावपटू या स्पर्धेत भाग घेतील. याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मॅरेथॉन भवन येथे ’एक्सपो प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे.

यंदा गतविजेती खेळाडू ज्योती गवते, २०२३ सालचा द्वितीय क्रमांका चा विजेता केनियाचा सायमन मवॉगी धावपटू शिवाय सेनादल, रेल्वे, पोलीस, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (ASI) बॉम्बे सॅपर्स, एसआरपीएफ, एनडीए, येथील अव्वल दर्जाचे धावपटू सहभागी होत आहेत. एम्स आंतरराष्ट्रीय  संस्थे तर्फे स्पर्धा मार्ग हा मान्यता प्राप्त आहे. विजेत्यांना पुणेमहानगर पालिकेतर्फे ३५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील.

स्पर्धा मार्गावर रविवार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सायकलोहोलिक्स या क्लबच्या ७५ सायकल पायलट्सचे MockDrill , पहाटे ४ ते ६ या वेळात घेतली. यावेळी ॲड सम्राट रावते, रोहन मोरे, सुमंत वाईकर आणि उमेश जाधव यांनी याचे नियंत्रण संपूर्ण स्पर्धा मार्गावर केले.

या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेचे ५० पंच, तांत्रिक अधिकारी, आणि २० मोटर  सायकल पायलट्स सहभागी होतील. संघटनेचे सचिव राजू कुलकर्णी यांचे नेतृत्वात  सर्वश्री  चंद्रकांत पाटील, विजय बेंगले, रोहित घाग, इ. आंतरराष्ट्रीय पंच काम करणार आहेत. त्यांना सुमंत वाईकर, रेस डायरेक्टर आणि वसंत गोखले, टेक्निकल रेस डायरेक्टर हे मार्गदर्शन करतील. यांचे मॉक ड्रिल शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी पहाटे ५ ते ७ या वेळात स्पर्धा मार्गावर होईल.  

या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धे चे ‘एक्सपो’ प्रदर्शन आणि टी शर्ट्स आणि बीब नंबर्स वाटप शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी सुरू होईल. या एक्स्पो चे उद्घाटन शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी मॅरेथॉन भवन मैदान येथे सकाळी १०.३० वाजता सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा नेहा दामले यांच्या हस्ते आणि अर्जुनपुरस्कार विजेते खेळाडू शकुंतला खटावकर, रेखा भिडे, स्मिता शिरोळे यादव, सुरेखा द्रविड, शांताराम जाधव, उमेश झिरपे, जॉईंट रेस डायरेक्टर गुरबंस कौर यांच्या उपस्थितीत होईल.

या मॅरेथॉन साठी वैद्यकीय पथकांची सुसज्ज यंत्रणा उभारण्यात आली असून सोसायटी ऑफ इमर्जन्सी मेडीसिंसचे डॉ. राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली ८० डॉक्टर्स व ३०० वैद्यकीय परिचारक व फिजिओ यामध्ये काम करतील. सणस मैदानावर एक छोटे २५ बेडचे मिनी हॉस्पिटल केले जाईल. ही कमिटी मॅरेथॉन रूट वर प्रत्येक किमी वर बूथ उभारून या सेवा पुरवितील. १०८ च्या अॅम्ब्युलन्स या साठी मार्गावर आणि प्रारंभ आणि रेस समाप्तीच्या ठिकाणी असतील. डॉ. सचिन लकडे, डॉ. प्रियांक जावळे, डॉ. मुनिंद्र सावंत, डॉ. सुमित जगताप, डॉ. शिवचरण गंधार, डॉ. नुपूर जाधव, डॉ. युवराज जगताप, डॉ. सत्यजित चव्हाण, डॉ.दीपक खैरनार हे या कमिटीत काम करीत आहेत.

मेडिकल कमिटी चे सेमिनार शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते ७ मॅरेथॉन भवन येथे पार पडले त्याला वरील डॉक्टर्स उपस्थित होते. मॅरेथॉन शर्यती दरम्यान होणाऱ्या दुखापती, अपघात, तसेच हृदयाचा त्रास, शरीरातील पाणी कमी होणे या संदर्भात चर्चा झाली आणि त्यावर तातडीचे वैद्यकीय उपचार कसे करावेत याची चर्चा झाली.

सणस मैदान आणि संपूर्ण मार्गावर प्रत्येक किमी वर पिण्याचे पाणी, एक डॉक्टर आणि ३ नर्सिंग स्टाफ, १ अॅम्ब्युलन्स यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक २.५ किमी वर, फिडींग बूथ, एनर्जी ड्रिंक, फळे, स्पंजिंग (वॉटर बूथ) आणि इतर सर्व व्यवस्था “वर्ल्ड अॅथलेटिक्स” आणि भारतीय अॅथलेटिक्स महासंघ, नवी दिल्ली यांच्या नियमांनुसार आणि अटींनुसार करण्यात आली आहे.

भारती नर्सिंग कॉलेज, संचेती फिजिओ कॉलेज,सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ,नवले हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, विश्वराज नर्सिंग कॉलेज, आरोग्यम वैद्यकीय पथक, नवी मुंबई यांची पथके यांचा समावेश यात आहे.

पॉवरफुल अल्ट्रा रनर्स, अहिल्यानगर रनर्स क्लब, बाणेर बालेवाडी रनर्स, सिंधू रनर्स, युनायटेड एंड्यूरोस, रनिंग पंटर्स, पीसीएमसी रनर्स – वाकड अँड पिंपळे सौदागर, नांदेड सिटी रनर्स, बावधन ब्रिज, पीसीएमसी रनर्स – चिंचवड, पीसीएमसी रनर्स – निगडी, एसपीजे स्पोर्ट्स क्लब अँड अॅकेडमी, फीट कव्हर ३६०, विश्व रनर्स, पुणे युनिवर्सिटी रनर्स, कोथरूड डेक्कन रनर्स, एबीसी रनर्स आदि पुण्यातील १७ हौशी धावपटू संस्थांनी प्रत्येक किमी वरील हायड्रेशन पॉईंट्स चे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी घेतली आहे. यांचे धावपटू रेसेस मध्ये भाग घेऊन स्पर्धेच्या यशात सुध्दा हातभार लावतील.

गेली चार वर्षे  सायकल पायलटींग व्यवस्था संपूर्ण मार्गावर ,शर्यत संपेपर्यंत, “सायक्लोहोलिक्स” पुणे संस्थेचे ५० सायकल पायलटस अॅड. सम्राट रावते यांचे नेतृत्वा खाली करतात. यावर्षी सुध्दा त्यांचे पथक येत आहे. पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेचे १० मोटर सायकल पायलट धावपटुंना मार्गदर्शक म्हणून स्पर्धे पुढे नियमा नुसार असतील.

          याशिवाय पुणे पोलीस व वाहतूक पोलीस यांचा चोख बंदोबस्त स्पर्धा मार्गावर राहणार असून पुणे महानगर पालिकेतर्फे संपूर्ण मार्गावर पुरेशी उजेड व्यवस्था करण्यात आलेली आहे.

३९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मधील विजेत्या धावपटूंना बांबू सोसायटी ऑफ इंडिया तर्फे बांबू पासून तयार केलेल्या ट्रॉफीज देण्यात येतील, ज्या “टीकाऊ आणि पर्यावरणीय जबाबदारी” चे प्रतीक असेल आणि हेच या वर्षीचे ध्येय वाक्य आहे.

स्पर्धा समाप्तीनंतर सर्व स्पर्धा पूर्ण केलेल्या स्पर्धकांना सणस मैदान येथे पूर्णत्त्व पदक (फिनिशर मेडल), चहा-पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था संयोजन समितीतर्फे करण्यात येणार आहे.

          या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सर्व स्पर्धा संपल्यानंतर सकाळी ८ वाजता सणस मैदान येथे संपन्न होईल. क्रीडाप्रेमी पुणेकरांनी स्पर्धेच्या वेळी स्पर्धा मार्गात सर्व स्पर्धक खेळाडूंचे जोरदार स्वागत करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

राममंदिर झाले, आता राष्ट्रमंदिराची उभारणीसरसंघचालक डॉ. मोहन भागवत; आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञता पुरस्कार

पुणे, दिनांक २ डिसेंबर २०२५ : विश्वकल्याणाची पताका फडकविणारे श्रीराममंदिर उभे राहिले. आता पूर्वीपेक्षा अधिक भव्य, सामर्थ्यसंपन्न आणि सुंदर राष्ट्रमंदिर उभे करायचे आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित, आदित्य प्रतिष्ठान प्रस्तुत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्यात सरसंघचालक बोलत होते. यावेळी कांचीकामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी, आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर अभ्यंकर, अपर्णा अभ्यंकर उपस्थित होते. आपल्याच समाजाचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात उपकाराची अथवा अहंकाराची भावना नाही, असे मत कृतज्ञता पुरस्कार स्वीकारताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “संघाला संपूर्ण समाजाचे संघटन अभिप्रेत आहे. कारण समाज संघटित झाला तरच राष्ट्र वैभवसंपन्न होईल. राष्ट्र बलसंपन्न झाले तरच विश्वाला सुखशांती लाभेल. यातही देशाचे कल्याण संघच करेल, अशी आमची वल्गना नाही. तर समाज उभा राहिला तरच देश उभा राहील.” कठीण काळामध्ये समाजानेच संघाला साथ दिली, म्हणून संघ मोठा झाल्याचेही सरसंघचालक म्हणाले.

शंकर अभ्यंकर म्हणाले, “आक्रमणांमुळे जगातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या. मात्र संपूर्ण वसुंधरेलाच कुटुंब मानणारी भारताची हिंदू संस्कृती आजही टिकून आहे. भौतिक आक्रमणांबरोबरच आंतरिक आक्रमणही भारतावर झाले. ब्रिटिशांनी भारताचा ‘स्व’ मोडण्याचा प्रयत्न केला.” भारताची सनातन संस्कृती ही विश्वकल्याणासाठी मानवतेला मार्गदर्शक असून, हिंदू संस्कृतीच सर्वांचा स्वीकार करते, असे मत शंकराचार्यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, “अनेक भाषा, परंपरा, प्रांत असतानाही भारतात आधुनिक लोकशाही यशस्वी झाली आहे. कारण प्रजातंत्र हा सनातन धर्माचा भावच आहे. आज लोकशाहीला सामर्थ्यशाली करण्याची गरज असून, चांगल्या लोकांना बळ दिले पाहिजे.” कार्यक्रमात वैश्विक संत भारती महाविष्णू मंदिराच्या कोनशिलेचे अनावरण, ‘भारतीय उपासना’ या विश्वकोष खंडाच्या तिसऱ्या आवृत्तीचे आणि जितेंद्र अभ्यंकर कृत ‘पंढरीश’ या ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात रामायणावर आधारित ‘निरंतर’ या संगीत नाटिकेने झाली. सूत्रसंचालन डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी केले. जितेंद्र अभ्यंकर यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले.
  • स्वयंसेवकांनी प्राण ओतून संघ उभा केला
    अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, रक्ताचे पाणी करत स्वतः बीज बनत, संपूर्ण आयुष्य मातीत मिसळून संघाचा वटवृक्ष उभे करणारे डॉ. हेडगेवार, राष्ट्रासाठी आपले जीवन ओवाळून टाकणारे प्रचारक, ग्रामीण व दुर्गम भागात जीव धोक्यात टाकून कार्य करणारे गृहस्थी कार्यकर्ते आणि अक्षरशः प्राण ओतून संघ उभा करणाऱ्या स्वयंसेवकांप्रती ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. पराकोटीचे हाल, उपेक्षा सोसूनही स्वयंसेवक हसतमुखाने कार्य करतो. विश्वकल्याणाची भावना असलेल्या या संघशक्तीतून समाजाला कधीही उपद्रव होणार नाही, असेही सरसंघचालक म्हणाले.

पीएमआरडीएचा अनधिकृत आरएमसी प्लॅन्टवर हातोडा; जांबेतील ‘मिलेनियम प्लॅन्ट’ सीलबंद

– फौजदारी गुन्हे दाखल करण्याची चेतावणी; इतर प्लॅन्टधारकांना परवानगीचे आवाहन

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)ने अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. नियमबाह्यपणे सुरू असलेल्या रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लॅन्टविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, या कारवाईची सुरुवात मुळशी तालुक्यातील मौजे जांबे येथील ‘मिलेनियम आरएमसी प्लॅन्ट’वर धडक कारवाई करून झाली.

पीएमआरडीएच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने १ डिसेंबर २०२५ रोजी या अनधिकृत प्लॅन्टवर कारवाई करताना पोकलेन मशीनच्या सहाय्याने प्लॅन्टचे लोखंडी पत्राशेड व आरसीसी वॉल तोडले. त्यानंतर संपूर्ण प्लॅन्ट सीलबंद करण्यात आला. परवानगीशिवाय हा प्लॅन्ट पुन्हा सुरू केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर नियोजन अधिनियम 1966 (एमआरटीपी) अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी कडक ताकीद मिलेनियम प्लॅन्ट व्यवस्थापनाला देण्यात आली आहे. या कारवाईनंतर परिसरातील इतर अनधिकृत आरएमसी प्लॅन्टवरही लवकरच हातोडा पडणार आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आणि पोलिस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. कारवाईत सह-आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, तहसीलदार आशा होळकर, तसेच शाखा अभियंते प्रशांत चौगले, शशिभूषण होले, ऋतुराज सोनवणे, दीपक माने आणि अमित खेडकर यांनी सहभाग घेतला. सह-आयुक्त डॉ.दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत कार्यरत सर्व आरएमसी प्लॅन्टधारकांनी आवश्यक परवानगी घेऊनच बांधकाम व्यवसाय सुरू करावेत, असे आवाहन केले आहे.

नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपा महायुतीचे ‘पैसा फेक तमाशा देख’ वगनाट्य रंगले..

0

काँग्रेसचे १६५ नगराध्यक्षपदांचे उमेदवार, काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी प्रचार सभाही गाजवल्या..

पुणे दि. २ डिसेंबर २०२५

नगरपालिका निवडणुकीत भाजपा महायुती या सत्ताधारी पक्षांनी सर्व नियम धाब्यावर बसवत आदर्श आचार संहितेचा सर्रास भंग केला. या निवडणुकीत लोकशाही व संविधानांची पायमल्ली करण्यात आली. गैरप्रकारच्या २५ नाही तर २५ हजारांपेक्षा जास्त तक्रारी झाल्या पण त्या निवडणूक आयोगापर्यंत किती पोहचल्या हा गंभीर प्रश्न आहे. आजच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे ‘पैसा फेक तमाशा देख’, वगनाट्य रंगले, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

पुणे येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आजच्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत सर्वत्र पैशांचा सुळसुळाट होता, दादागिरी व दडपशाही केली, बोगस मतदार दिसून आले. भाजपा, शिंदेसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व नियम पायदळी तुडवले. सत्ताधारी महायुतीने गाव तिथं बारा भानगडी, करून ठेवल्या आहेत. लोकशाही व संविधानाची पायमल्ली करण्यात आली.

काँग्रेसचे १६५ नगराध्यक्षपदांचे उमेदवार…
या निवडणुकीत काँग्रेस पक्ष दिसला नाही या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, काँग्रेस पक्ष पंजा या पक्षाच्या चिन्हावर १६५ नगराध्यक्षपदांसाठी रिंगणात उतरलेली आहे. प्रचारातही काँग्रेस नेत्यांनी विविध भागात प्रचार सभा घेतल्या आहेत. मी स्वतः राज्यभर ६५ प्रचार सभा घेतल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस निवडणुकीत नव्हती या आरोपात काहीही तथ्य नाही. काँग्रेस व विरोधी पक्षांचे नगराध्यक्ष व नगरसेवक विजयी झाले तरी पुन्हा फोडाफोडीचा प्रकार सत्ताधारी करणार नाहीत कशावरून, पण खरा प्रश्न आपली लोकशाही कोणत्या दिशेने जात आहे हा आहे आणि हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

भाजपाला रावणापेक्षा जास्त अहंकार..
छत्रपती शिवाजी महाराजांना भाजपाची टोपी व गमछा घातल्याबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा व त्यांचे नेते महापुरुष व देवांपेक्षाही स्वतःला श्रेष्ठ समजतात, ते देवाचे अवतार आहेत. भाजपाला रावणापेक्षा जास्त अहंकार झाला आहे, असा टोलाही हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला..

पुण्यातील मालधक्का चौकातील एमएसआरडीसीची जागा पुन्हा सार्वजनिक हितासाठी; ताबा शासनाकडे आणण्यासाठी तातडीचा पाठपुरावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. २ डिसेंबर २०२५ :
पुणे स्टेशनलगत मालधक्का चौकातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ताब्यातील महत्त्वपूर्ण जागा पुन्हा शासनाकडे हस्तांतरित करून ती जनहितासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तातडीचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित विभागांना याबाबत ठोस मार्गदर्शक सूचना दिल्या.

ही जागा पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. त्यानंतर ती एमएसआरडीसीकडे हस्तांतरित झाली आणि पुढे खाजगी विकासकास ६० वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आली होती. मात्र शासनाने ही प्रक्रिया स्थगित केली असून विकासकाने यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

“सदर जमीन ही सार्वजनिक हिताची असून ती पुन्हा शासनाच्या ताब्यात येणे आवश्यक आहे. प्रथम कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नंतर जनहिताचा अंतिम निर्णय घ्यावा,” असे डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत सांगितले.

उपलब्ध जागेबाबत दोन महत्त्वाच्या मागण्या सध्या शासनापुढे आहेत—

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून ‘आंबेडकर भवन’ विस्तारीकरणासाठी, तर ससून रुग्णालयाकडून कर्करोग रुग्णालयासाठी.

या बाबत शासनाचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असून जागा सार्वजनिक उपयोगासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले. तसेच कायदेशीर प्रक्रिया मार्गी लावल्यानंतर नागरिकांकडून सूचना व हरकती मागवून, त्याआधारे विकास आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीस अपर मुख्य सचिव (नगरविकास) असीम गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, महाव्यवस्थापक श्रीमंत पाटोळे, तसेच पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून शैलेंद्र मोरे, दीपक गायकवाड, निखिल दुर्गाई, जीवन घोंगडे, आनंद घेडे, नीता अडसुळे, स्वाती गायकवाड, अर्चना केदारी उपस्थित होते.
तर शिवसेनेतर्फे संदीप शिंदे, मिलिंद अहिरे, सुधीर कुरूमकर यांनी सहभाग नोंदवला.

ही बैठक जागेचा ताबा शासनाकडे आणून तिचा योग्य, पारदर्शक आणि सार्वजनिक हिताचा उपयोग निश्चित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरली.

मुदत संपल्यानंतर 33 हजार मतदार आले कुठून? मुंबईच्या मतदार यादीवरून आदित्य ठाकरेंचा संताप

मुंबई -महानगरपालिकेच्या 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत अक्षम्य चुका आणि बोगस मतदारांचा भरणा असल्याचे समोर आले आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “आमचे आमदार सुनील शिंदे यांचे नाव यादीत तब्बल 7 वेळा, तर माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे नाव 8 वेळा आले आहे. हा काय सावळागोंधळ सुरू आहे? निवडणूक आयोग म्हणजे एखादी सर्कस झाली आहे का?” असा संतप्त सवाल विचारत, मतदार यादीत 33 हजार बोगस मतदान घुसवल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.

पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी आयोगाचा भोंगळ कारभार पुराव्यानिशी मांडला. ते म्हणाले, “यादीत आमचे आमदार सुनील शिंदे यांचे नाव सात ठिकाणी आले आहे. गंमत म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचे वय आणि फोटो वेगळा आहे, पण व्यक्ती तीच आहे. श्रद्धा जाधव, खासदार अनिल देसाई आणि ज्योती गायकवाड यांचीही नावे दुबार आली आहेत. विशेष म्हणजे, या दुबार नावांमध्ये मराठी मतदारांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.” हा योगायोग आहे की सुनियोजित कट, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

आदित्य ठाकरे यांनी आणखी एक गंभीर मुद्दा मांडला. “नियमानुसार 1 जुलै 2025 नंतर मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करता येत नाहीत. असे असतानाही, या यादीत तब्बल 33 हजार नवीन मतदार कसे काय आले?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, 5 लाख 86 हजार लोकांची दुबार नोंदणी असून, ज्या मृत व्यक्तींचे डेथ सर्टिफिकेट जमा केले आहे, त्यांची नावेही यादीतून वगळण्यात आलेली नाहीत. यामुळे त्यांच्या नावावर ‘प्रॉक्सी वोटिंग’ (बोगस मतदान) करण्याचा डाव आहे का? अशी शंका त्यांनी उपस्थित केली.

मतदार यादी तपासणीसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांवरही (BLO) आदित्य ठाकरेंनी ताशेरे ओढले. “ज्यांना धड लिहिता-वाचता येत नाही, असे लोक मतदार तपासणी करत आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे मुंबईकरांची थट्टा सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. आम्ही BMC, राज्य आणि केंद्र निवडणूक आयोगाला विचारात आहोत तुम्ही काय करत आहात? थट्टा करत आहात, तुम्ही सर्कस करत आहात. हा घोळ तुम्हीच घातलेला आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला.

या सर्व प्रकाराविरोधात आम्ही स्वतः 3 ते 4 हजार हरकती नोंदवल्या आहेत. निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी आम्ही पत्र दिले असून, या विरोधात मोठी जनचळवळ उभी करू, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिरातर्फे ‘दत्तगुरू दिनदर्शिका’ प्रकाशन  

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्यावतीने १२८ वा दत्तजयंती उत्सव ; भक्तीगीतांचा कार्यक्रम
पुणे : बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या १२८ व्या दत्तजयंती उत्सवानिमित्त  मंदिरासमोर श्री दत्त कलामंच येथे आयोजित कार्यक्रमात ट्रस्टच्या   दिनदर्शिकेचे प्रकाशन स्वामी मकरंदनाथ यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी युवा गायक विराज कदम, सावनी सोमवंशी, क्षितिजा साळुंखे व गिरीजा साळुंके यांच्या भक्तिसंगीत कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्राचार्य उदय शेठ, सीए अमोल दातार, ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उप उत्सव प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, राजेंद्र बलकवडे आदी उपस्थित होते.

स्वामी मकरंदनाथ महाराज म्हणाले, दिनदर्शिकेचे प्रकाशन अनेकजण करतात, परंतु या ट्रस्टच्या  दिनदर्शिकेचे विशेष महत्व याकरिता या मध्ये प्रत्येक हिंदू सण आणि वाराचे महत्व सांगितले आहे. त्याचा उपयोग प्रत्येकाला नक्कीच होईल. यावेळी त्यांनी कार्यक्रमात गायन करणाऱ्या युवा कलाकारांचे विशेष कौतुक देखील केले.

स्वामी कृपा कधी करणार… निघालो घेवून दत्ताची पालखी अशा भक्तीगीतांनी दत्त मंदिराचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. संगीताच्या सुरावटींसोबतच भाविकांच्या टाळ्यांचा आणि “जय गुरुदत्त” घोषाने वातावरण भक्तीमय झाले. तर युवा कलाकारांनी सादर केलेल्या सुरेल भक्तिगीतांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.

आमच्यात एकमत असते तर आम्ही वेगळ्या पक्षांत असतो?शिंदेंशी मतभेद आहेतही आणि नाहीतही:मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

शिंदेंशी कोणतेही वाद नाहीत, पण…

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील कथित मतभेद राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेत. या दोन्ही नेत्यांनी यापूर्वी अनेकदा आपल्यात मतभेद असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. पण त्यानंतरही या चर्चेला पूर्णविराम मिळत नाही. आज अखेर फडणवीसांनी या मुद्यावर सविस्तर उत्तर दिले. पण त्याचवेळी आमच्यात एकमत असते तर आम्ही वेगवेगळ्या पक्षात असतो का? असा सवालही केला. त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. पण त्यानंतरही त्यांनी एकमेकांची भेट घेतली नव्हती. फडणवीस हे शिंदे तयार होण्यापूर्वीच तासभर अगोदर हॉटेलातून निघून गेले. त्यानंतर शिंदे बाहेर पडले. या घटनेमुळे महायुती सरकारमधील 2 बड्या राजकीय पक्षांचे नेतृत्व करणाऱ्या या नेत्यांत काही मतभेद आहेत का? असा प्रश्न माध्यमांत व राजकीय वर्तुळात चर्चिला गेला. त्यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘साम’ वृत्तवाहिनीशी साधलेल्या संवादात सविस्तर उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, माझ्यात व एकनाथ शिंदे यांच्यात कोणतेही वाद नाहीत. आपल्या घरातही दोन भावांची मते काहीअंशी वेगवेगळी असतात. ती मते एक नसतात. दोन्ही भाऊ प्रखरतेने आपापली मते मांडत असतात. तसेच काही गोष्टींवर आमचे एकमत होत नाही. सगळ्या गोष्टींवर आमचे एकमत असते तर आम्ही वेगवेगळ्या पक्षांत का राहिलो असतो? आम्ही एकच पक्ष असतो. पण आम्ही वेगवेगळे पक्ष आहोत. व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आम्ही एकत्रच आहोत आणि आम्ही एकत्रच राहणार आहोत.

एखाद्या निवडणुकीत काही गोष्टी घडल्या की लगेच मतभेद झाले असे काहीही नसते. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. निवडणुका आल्या की आम्ही तुमच्यावर गोष्टी लागू असे करता येत नाही, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत तुम्हाला एकनाथ शिंदे व अजित पवार काही ठिकाणी एकत्र दिसले. तर काही ठिकाणी भाजप व एकनाथ शिंदे एकत्र आहेत. काही ठिकाणी आम्ही तिघेही एकत्र होतो. या निवडणुकीत सर्वच प्रकारची समीकरणे दिसून आली. कारण, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाजप आपल्या मित्रपक्षांना केव्हाच सोडणार नसल्याचेही जोर देऊन सांगितले. आमच्या मित्रांना आमच्यासोबत ठेवण्याचा निर्णय हा सर्वस्वी आमचा आहे. भाजपची ताकद वाढली असली तरी माझे मत आहे की, महाराष्ट्रात आजही आम्हाला दोन्ही मित्रांची गरज आहे. 2029 मध्येही आ्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार आहोत. आम्ही आमची ताकद वाढवतच राहू. पण ताकद वाढली म्हणून मित्रांना सोडून देणार नाही, असे ते म्हणाले.

नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा रडीचा डाव; बुलढाण्यात सत्ताधारी पक्षाकडून बोगस मतदान, कठोर कारवाई करा: हर्षवर्धन सपकाळ

बुलढाण्यात शिंदेसेनेच्या आमदाराची दादागिरी; भ्रष्ट मार्गाचा अवलंब; कारवाई करण्यास पोलिसांचीही चालढकल.

मुंबई/बुलढाणा, दि, २ डिसेंबर..

नगरपालिका निवडणुकीच्या मतदानात सत्ताधारी भाजपा महायुती रडीचा डाव खेळत आहे. निवडणुका निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे पण बुलढाण्यासह राज्याच्या विविध भागात तरी तसे होताना दिसत नाही. ग्रामीण भागातून गाड्यांमध्ये भरून लोकांना बुलढाण्यात आणून बोगस मतदान केले पण पोलीस व प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली. बोगस मतदान करणारे व त्यांना तसे करावयास लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

नगरपालिकेच्या मतदानावेळी राज्यात अनेक ठिकाणी गैरप्रकार पाहण्यास मिळाले. यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बुलढाण्यात ग्रामीण भागातून गाड्या भरून बोगस मतदार आणण्यात आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदार पकडल्यानंतर स्थानिक आमदाराच्या लोकांनी पोलिसांशी हुज्जत घातली आणि पोलिसही किरकोळ कारवाई करतो असे सांगतात, ही लोकशाहीची थट्टा आहे. सत्ताधारी किती भ्रष्ट आहेत व गुंडगिरी करतात हे त्यांनी आज पुन्हा दाखवून दिले. काँग्रेसला वातावरण पोषक आहे पण सत्ताधारी भाजपा महायुती रडीचा डाव खेळत आहे. सत्ताधाऱ्यांनी काहीही केले तरी काँग्रेसचा विजय होणार असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

बुलढाणा नगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि केवळ दीड तास उलटत नाही तोच बोगस मतदान करण्यासाठी सुरूवात झाली. प्रभाग क्रमांक १५ साठी गांधी प्राथमिक शाळा येथे मतदान केंद्र आहे. येथे असलेल्या वैभव देशमुख नामक व्यक्तीच्या नावावर कोथळी तालुका मोताळा येथील एकाला बोगस मतदान केल्यानंतर पकडले. त्याच्यासोबत आणखी एकजण होता. कोथळी, इब्राहिमपूर येथून अनेक लोक बोगस मतदान करण्यासाठी आणण्यात आले. घाटाखालून गाड्या भरून बुलढाण्यामध्ये बोगस मतदार आणले होते, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचा रडीचा डाव; बुलढाण्यात सत्ताधारी पक्षाकडून बोगस मतदान, कठोर कारवाई करा: हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाला हाताशी धरून मोदी हुकुमशाही आणीत आहेत . कॉंग्रेसची निदर्शने, गदारोळामुळे लोकसभा तहकूब

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाला हाताशी धरून मोदी हुकुमशाही आणीत आहेत असा आरोप करत कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांनी संसद संकुलातील मकर गेटसमोर सलग दुसर्या दिवशी देखील निदर्शने केली जायत सोनिया गांधी प्रियांका गांधी, राहुल गांधी , खर्गे आदी नेते मांडली सहभागी झाली होती. दरम्यान संसदेतील गदारोळामुळे लोकसभा ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. गोंधळ दूर करण्यासाठी सभापती ओम बिर्ला यांनी दुपारी ३ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ही बैठक सभापतींच्या दालनात होणार आहे.
काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल म्हणाले की, सरकारने संसदेत एसआयआर आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पुढे यावे.

ते म्हणाले, “सरकारने पुढे येऊन चर्चेसाठी सहमती दर्शविली पाहिजे. हे अगदी सोपे आहे. जेव्हा संपूर्ण विरोधी पक्ष चर्चेची मागणी करत असेल, तेव्हा त्यांना असे करण्यापासून काय रोखत आहे? सरकारच्या भूमिकेमुळे मागील अधिवेशन पूर्णपणे वाया गेले.”

संसदेत सलग दुसऱ्या दिवशीही एसआयआरविरुद्ध विरोधकांचा निषेध सुरूच आहे. लोकसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू होताच सर्व विरोधी खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. काही खासदार वेलमध्ये पोहोचले. यादरम्यान, अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवला, परंतु विरोधकांनी २० मिनिटे व्होट चोर- गड्डी सोड’ अशी घोषणाबाजी सुरूच ठेवली.

यानंतर, कामकाज प्रथम दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान, राज्यसभेतही विरोधकांचा निषेध आणि घोषणाबाजी सुरूच आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी निदर्शने आवश्यक आहेत.” तत्पूर्वी, संसद संकुलातील मकर द्वारसमोर विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता निदर्शने केली. त्यांनी सरकारने तातडीने एसआयआरवर चर्चा करावी अशी मागणी केली.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (1 डिसेंबर) दोन्ही सभागृहांमध्ये SIR आणि मतचोरीच्या आरोपाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला होता. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत सांगितले होते की, सरकार SIR आणि निवडणूक सुधारणांवर चर्चा करण्यास तयार आहे. विरोधकांना आवाहन केले की त्यांनी यावर कोणतीही कालमर्यादा लादू नये.

सूत्रांनुसार, विरोधकांनी असा युक्तिवाद केला आहे की, चर्चेत ‘एसआयआर’ शब्दाऐवजी सरकारने ‘निवडणूक सुधारणा’ (Electoral Reform) किंवा इतर कोणत्याही नावाचा वापर करून विषय कामकाजात सूचीबद्ध करावा. सरकार या युक्तिवादावर सहमत होऊ शकते. ती यावर आपली भूमिका कामकाज सल्लागार समितीमध्ये (Business Advisory Committee) मांडेल.

पहिल्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 3 विधेयके सादर केली, त्यापैकी मणिपूर वस्तू आणि सेवा कर विधेयक (दुसरी सुधारणा), 2025 हे विधेयक मंजूर झाले. इतर दोन विधेयके, केंद्रीय उत्पादन शुल्क (सुधारणा) विधेयक आणि आरोग्य सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षा उपकर मंजूर झाले नाहीत.

‘आयआयएम बंगळुरू’चे इन्क्युबेशन ‘समावेश’कडून पूर्ण

क्षमता-वृद्धी, संघटनात्मक विकास आणि परिणामाधारित फ्रेमवर्क विकसित करण्यासाठी प्रशिक्षण

पुणे: ग्रामीण भागातील विद्यार्थी व स्थलांतरीत युवकांसाठी कार्यरत ‘समावेश’ संस्थेने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) बंगळुरूच्या ‘एनएसआरसेल’मार्फत वर्षभराचे इन्क्युबेशन यशस्वीपणे पूर्ण केले हे. हा एक मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम असून, यामध्ये संस्थेची क्षमता-वृद्धी, संघटनात्मक विकास आणि परिणामाधारित फ्रेमवर्क विकसित करण्यावर भर दिला गेला. त्यातून संस्थेच्या कार्याची व्याप्ती आणि प्रभाव अधिक परिणामकारक होणार आहे.

कागदपत्रांची पूर्तता, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि उच्च शिक्षणातील प्रवेश या तीन मुद्द्यांवर ‘समावेश’ संस्थेचे काम केंद्रित आहे. गेल्या वर्षभरात (२०२४–२५) ११३० हून अधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे शैक्षणिक मार्गदर्शन, २५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या, ५०० पेक्षा अधिक तरुणांना आवश्यक कागदपत्रांची पूर्ततेसाठी सहाय्य केले आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांत शिष्यवृत्तीवर जाण्यासाठी मार्गदर्शन केले गेले. याची दखल घेत आयआयएम बंगळुरूच्या ‘एनएसआरसेल’च्या इन्क्युबेशनसाठी ‘समावेश’ची निवड केली गेली.

याबाबत बोलताना ‘समावेश’चे संस्थापक ॲड. प्रविण निकम यांनी सांगितले की, सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या ‘समावेश’ला या उपक्रमामुळे अधिक बळकटी मिळाली आहे. ‘आयआयएम’ने आम्हाला १२ महिन्यांसाठी मार्गदर्शन केले. संस्थेचे फ्रेमवर्क, उपक्रमाची बांधणी, संस्थेच्या कामाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने करावयाच्या गोष्टी याविषयी शिकता आले. मूलभूत विषयांवर काम करणाऱ्या आठ संस्थांची या इन्क्युबेशनसाठी निवड करण्यात आली होती. त्यात ‘समावेश’चा समावेश होता. या संस्थेचे  सहाय्य आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच ‘समावेश’ला होईल. अधिक सजगतेने आणि जागरूकतेने काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

‘समावेश’विषयी बोलताना ॲड. प्रविण निकम म्हणाले, “२०११ मध्ये पुण्यात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी स्थलांतर झालेल्या काही तरुण युवकांनी ग्रामीण भागातील युवकांच्या उच्च शिक्षणातील समस्या जाणून सुरू केलेला हा सामाजिक उपक्रम आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. विविध संधी, त्यासाठी असणाऱ्या विविध प्रवेश परीक्षा किंवा मग विविध करिअरच्या वाटा निवडत असताना साह्यभूत असणाऱ्या शिष्यवृत्त्या आणि त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे याविषयी स्थलांतरित युवकांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे त्यांना चांगल्या विद्यापीठांमध्ये शिकता येत नाही. या अशा सर्व प्रश्नांवर उपाय म्हणून ‘समावेश’ कडून तीन वेगवेगळ्या उपक्रमांतर्गत काम केले जाते.

भर दुपारी हिराबाग चौकात टेम्पोच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

पुणे-टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात भरधाव टेम्पोच्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आरिबा अर्षद आली कुरेशी (वय २४, रा. फेअर ग्रेस सोसायटी, न्यू मोदीखाना, लष्कर, पुणे) असे आहे. याप्रकरणी टेम्पोचालक विश्वंभर दशरथ सोनवणे (वय ६२, रा. मारुतीनगर, वडगाव शेरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भर दुपारी अडीच वाजता हा अपघात झाला .

आरिबाचे वडील अर्शदअली अख्तरअली कुरेशी (वय ५५) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरिबा टिळक रस्त्यावरून स्वारगेटकडे दुचाकीने जात असताना हिराबाग चौकात भरधाव टेम्पोने तिच्या दुचाकीला धडक दिली.या अपघातात आरिबा गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक बी. पी. शिरसट8459908657 या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

संचार साथी ॲपद्वारे सरकार हेरगिरी करू इच्छिते:प्रियांका गांधींचा आरोप

सरकारने काल सांगितले होते- मोबाईलमध्ये प्री-इंस्टॉल असेल; आज म्हटले- डिलीट करू शकता
नवी दिल्ली- दूरसंचार विभागाचे (DoT) संचार साथी ॲप सर्व मोबाईल फोनमध्ये प्री-इन्स्टॉल करणे अनिवार्य करण्याच्या आदेशावर राजकीय वाद वाढला आहे. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी मंगळवारी सांगितले की, हे पाऊल लोकांच्या गोपनीयतेवर थेट हल्ला आहे. सरकार प्रत्येक नागरिकावर पाळत ठेवू इच्छिते. प्रियंका गांधी म्हणाल्या,हा केवळ फोन टॅपिंगचा मुद्दा नाही. ते संपूर्ण देशाला हुकूमशाहीकडे नेत आहेत. संसद चालत नाहीये कारण सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा होऊ देत नाहीये.त्यांनी सांगितले की, सायबर फसवणुकीची तक्रार करण्यासाठी प्रणाली आवश्यक आहे, परंतु सरकारचा ताजा आदेश लोकांच्या खासगी आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप करण्यासारखा आहे. प्रियंका यांनी सांगितले की, हे एक हेरगिरी करणारे ॲप आहे. काँग्रेस या मुद्द्यावर बैठक घेईल आणि आपली रणनीती ठरवेल.

यावर केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, हे अनिवार्य नाही. वापरकर्त्याला हवे असल्यास ते हे डिलीट करू शकतात. यापूर्वी सरकारने सांगितले होते की, सर्व मोबाईल फोनमध्ये प्री-इन्स्टॉल करणे अनिवार्य आहे.

काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनीही सरकारच्या या आदेशावर टीका केली आहे. तर, काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी मंगळवारी या मुद्द्यावर सभागृह स्थगितीची नोटीस दिली.

काँग्रेस खासदार शशी थरूर- संचार साथी ॲप उपयुक्त असू शकते, परंतु ते ऐच्छिक असावे. ज्याला गरज असेल, तो स्वतः ते डाउनलोड करू शकेल. लोकशाहीत कोणतीही गोष्ट जबरदस्तीने लागू करणे ही चिंतेची बाब आहे. सरकारने माध्यमांद्वारे आदेश जारी करण्याऐवजी जनतेला या निर्णयामागील तर्क काय आहे, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे.
काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल- हा सामान्य लोकांच्या गोपनीयतेवर (प्रायव्हसीवर) थेट हल्ला आहे. मदतीच्या नावाखाली भाजप लोकांच्या खासगी माहितीपर्यंत पोहोचू इच्छित आहे. भारतात आम्ही पेगासससारखी प्रकरणे पाहिली आहेत. आता हे ॲप लावून देशातील लोकांवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काँग्रेस खासदार रेणुका चौधरी- गोपनीयतेचा (प्रायव्हसीचा) अधिकार संविधानाच्या कलम 21 अंतर्गत प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. संचार साथी ॲप लोकांच्या स्वातंत्र्यावर आणि गोपनीयतेवर (प्रायव्हसीवर) थेट हल्ला आहे.
CPI-M खासदार जॉन ब्रिटास- मोबाईलमध्ये हे ॲप टाकणे लोकांच्या गोपनीयतेचे थेट उल्लंघन आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 2017 च्या पुट्टास्वामी निर्णयाच्या विरोधात आहे. हे ॲप काढताही येत नाही, म्हणजे 120 कोटी मोबाईल फोनमध्ये ते अनिवार्य केले जात आहे.
आता प्रत्येक मोबाईलमध्ये असेल सायबर सिक्युरिटी ॲप

खरं तर आता प्रत्येक नवीन स्मार्टफोनमध्ये सायबर सिक्युरिटी ॲप ‘संचार साथी’ प्री-इंस्टॉल (आधीपासून डाउनलोड केलेले) मिळेल. केंद्र सरकारने सोमवारी स्मार्टफोन कंपन्यांना आदेश दिला आहे की त्यांनी स्मार्टफोनमध्ये सरकारी सायबर सेफ्टी ॲप आधीपासून इंस्टॉल करून विकावे.

रॉयटर्सच्या अहवालानुसार, या आदेशात ॲपल, सॅमसंग, विवो, ओप्पो आणि शाओमी यांसारख्या मोबाईल कंपन्यांना 90 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हे ॲप वापरकर्ते डिलीट किंवा डिसेबल करू शकणार नाहीत. जुन्या फोनवर सॉफ्टवेअर अपडेटद्वारे हे ॲप इन्स्टॉल केले जाईल.

तथापि, हा आदेश सध्या सार्वजनिक करण्यात आलेला नाही, तर निवडक कंपन्यांना खाजगीरित्या पाठवण्यात आला आहे. यामागे सरकारचा उद्देश सायबर फसवणूक, बनावट IMEI नंबर आणि फोनची चोरी थांबवणे हा आहे.संचार साथी ॲपमुळे आतापर्यंत 7 लाखांहून अधिक हरवलेले किंवा चोरी झालेले मोबाईल परत मिळाले आहेत. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ‘बनावट IMEI मुळे होणारी फसवणूक आणि नेटवर्कचा गैरवापर रोखण्यासाठी हे ॲप आवश्यक आहे.’

संचार साथी ॲप काय आहे, ते कशी मदत करेल?

संचार साथी ॲप हे सरकारने तयार केलेले सायबर सुरक्षा साधन आहे, जे 17 जानेवारी 2025 रोजी लॉन्च झाले होते.
सध्या हे ॲपल आणि गुगल प्ले स्टोअरवर ऐच्छिक डाउनलोडसाठी उपलब्ध आहे, परंतु आता नवीन फोनमध्ये ते आवश्यक असेल.
हे ॲप वापरकर्त्यांना कॉल, मेसेज किंवा व्हॉट्सॲप चॅट रिपोर्ट करण्यास मदत करेल.
IMEI नंबर तपासणी करून चोरी झालेले किंवा हरवलेले फोन ब्लॉक करेल.
डुप्लिकेट IMEI नंबरमुळे सायबर क्राईम वाढत आहे

भारतात 1.2 अब्जाहून अधिक मोबाईल वापरकर्ते आहेत, जे जगातील सर्वात मोठे मार्केट आहे, परंतु बनावट किंवा डुप्लिकेट IMEI नंबरमुळे सायबर क्राईम वाढत आहे. IMEI हा 15 अंकी एक युनिक कोड असतो, जो फोनची ओळख पटवतो.

गुन्हेगार ते क्लोन करून चोरीचे फोन ट्रॅक होण्यापासून वाचवतात, फसवणूक करतात किंवा काळ्या बाजारात विकतात. सरकारचे म्हणणे आहे की हे ॲप पोलिसांना डिव्हाइस शोधण्यात मदत करेल. सप्टेंबरमध्ये DoT ने सांगितले होते की 22.76 लाख डिव्हाइस शोधले गेले आहेत.

ॲपलच्या धोरणात थर्ड पार्टी ॲपला परवानगी नाही

उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे की, आधी चर्चा न झाल्यामुळे कंपन्या चिंतेत आहेत. विशेषतः ॲपलची अडचण वाढू शकते, कारण कंपनीचे अंतर्गत धोरण कोणत्याही सरकारी किंवा थर्ड-पार्टी ॲपला फोनच्या विक्रीपूर्वी प्री-इन्स्टॉल करण्याची परवानगी देत नाही.

यापूर्वीही ॲपलचा अँटी-स्पॅम ॲपबाबत दूरसंचार नियामक मंडळाशी संघर्ष झाला होता. उद्योग तज्ञांचे मत आहे की ॲपल सरकारशी वाटाघाटी करू शकते किंवा वापरकर्त्यांना ऐच्छिक सूचना देण्याचा सल्ला देऊ शकते. मात्र, अद्याप कोणत्याही कंपनीने या आदेशाबद्दल कोणतीही टिप्पणी केलेली नाही.

वापरकर्त्यांना थेट फायदा मिळेल

वापरकर्त्यांना थेट फायदा मिळेल. चोरीचा फोन असल्यास, IMEI तपासणी करून तो त्वरित ब्लॉक करता येईल. फसवणुकीचे कॉल रिपोर्ट केल्याने घोटाळे कमी होतील, परंतु ॲप डिलीट न झाल्यामुळे गोपनीयता गट प्रश्न विचारू शकतात.

वापरकर्त्याचे नियंत्रण कमी होईल. भविष्यात ॲपमध्ये अधिक वैशिष्ट्ये जोडली जाऊ शकतात, जसे की उत्तम ट्रॅकिंग किंवा AI-आधारित फसवणूक शोध. DoT चे म्हणणे आहे की यामुळे दूरसंचार सुरक्षा पुढील स्तरावर जाईल.

फडणवीस सरकारकडून PM मोदींची फसवणूक:खासदार सुप्रिया सुळे यांचा दावा; निवडणूक प्रक्रियेतील सावळ्या गोंधळावरही टीका

पुणे–पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुणीतरी सांगितले पाहिजे की महाराष्ट्रामध्ये इतक्या वेळेस नरेंद्र मोदी आले आणि पारदर्शक कारभाराच्या नावाने त्यांनी मते मागितली आहेत. महाराष्ट्र सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फसवणूक सुरू आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्यावर जर कोणी आरोप करत असेल की आमच्याकडे पैसे नाही तर हे खरं आहे. आमच्याकडे काळा पैसा नाही. आम्ही काही पैसा वाटून निवडून आलेलो नाही. आम्ही जनतेच्या सेवेसाठी इथे आलेलो आहोत काही पैशाचा खेळ करण्यासाठी नाही, हा काही व्यवहार नाही. हे राजकारण आहे. इथे जर लोकं पैशाचा गैरवापर करत निवडून येत असतील आणि त्याचा सत्तेतील लोकांना सार्थ अभिमान असेल तर हे कुठल्याही लोकशाहीसाठी घातक आहे हा विषय मी हिवाळी अधिवेशनात मांडणार आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नीलेश राणे यांचे मी कौतुक करते त्यांचे मी जाहीर आभार मानते.ते नव्या पिढीचे राजकारणी आहेत. ते जर पारदर्शक कारभारासाठी लढत असतील तर तो लढा ते देताय ही अभिमानाची गोष्ट आहे. कारण पैशावर निवडणूक झाली तर ज्यांच्याकडे सर्वाधिक पैसा आहे ते निवडून येतील आणि खरे लोकांची कामे करणारी लोकं निवडून येणार नाहीत.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रियेमध्ये पैशाचा होणारा गैरवापर, सत्तेचा होणारा गैरवापर, उमेदवारी अर्ज दाखल न करुण घेणे हा जो विस्कळितपणा आणि गोंधळ महाराष्ट्रात यापूर्वी कधीच झाला नाही. हे आपले दुर्देव आहे की एवढं मोठे बहुमत या सरकारला दिले आहे. निवडणूक आयोगाबद्दल सर्वच जण विरोधात बोलत आहेत.
आयोगाने आता तरी जागे व्हावे

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक पुढे का गेली हे माहिती नाही. पण असे चित्र दिसून येत आहे की मतांसाठी पैशाचा वापर होत आहे हे हानिकारक आहे, हे चुकीचे आहे. माझी निवडणूक आयोगाला हात जोडून विनंती आहे की आता तरी जागे व्हा आणि हे सर्व बंद करा.

‌‘परंपरा‌’ : अभिजात  कलांचे  आश्वासक सादरीकरण

गांधर्व महाविद्यालय, पुणे आयोजित वि. वि. द. स्मृती समारोहाची सांगता   

पुणे : भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या तिसऱ्या पिढीतील कलाकारांनी गायन, वादन आणि नृत्य कलेचा वारसा जपत, तो पुढे नेत अभिजात परंपरेचे आश्वासक दर्शन घडविले.

निमित्त होते भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे गांधर्व महाविद्यालय, पुणे आणि गांधर्व महाविद्यालय, नॉर्थ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. विनायकबुवा पटवर्धन आणि पं. त्तात्रय विष्णू पलुस्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय वि. वि. द. स्मृती संगीत समारोहाचे. शनिवार आणि रविवारी गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात ‌‘परंपरा‌’ या समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे यंदाचे 26वे वर्ष होते. समारोहाला ज्येष्ठांसह युवा पिढीनेही मोठ्या संख्येने हजेरी लावत अभिजात शास्त्रीय संगीताविषयीची असलेली गोडी दर्शविली.

महोत्सवाची सुरुवात ख्यातनाम गायक व संगीततज्ज्ञ पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे नातू अभेद शौनक अभिषेकी यांच्या गायनाने झाली. अभेद यांनी राग श्याम कल्याणमधील रामाश्रय झा रचित दोन बंदिशी सादर केल्या. गंभीर परंतु मधुर समजल्या जाणाऱ्या या रागाचे सौंदर्य त्यांच्या गायनातून उमटले. त्यानंतर त्यांनी राग अभोगीमधील एक रचना सादर केली.

यानंतर ज्येष्ठ कथक नृत्यगुरू पंडिता मनिषा साठे यांची नात सर्वेश्वरी साठे यांनी नृत्याविष्काराची सुरुवात तेजस्विनी साठे यांनी रचलेल्या शिवधृपदाने केली. मनिषा साठे यांच्या नृत्यशैलीची खासियत दर्शविणारा झपताल सादर करून तीश्र, चतश्र जातीचा तत्‌‍कार, फर्माईशी चक्रदार परण, राधा परण सादर केले. दादा गुरू पंडित गोपीकृष्ण यांची पारंपरिक रचना, शांभवी दांडेकर यांच्याकडून आत्मसात केलेले नृत्य यासह अभिनय दर्शविणारे नरसिंह अवताराचे सादरीकरण रसिकांना विशेष भावले.

रविवारच्या सत्राची सुरुवात सारंग कुलकर्णी यांच्या सरोद वादनाने झाली. त्यांनी नटभैरव रागात पारंपरिक पद्धतीने आलाप जोड सादर करत रूपक व दृत तीन तालातील दोन बंदिशींचे सौंदर्य उलगडताना रागाची मांडणी व बारकावे वादनातून ऐकविले.

पंडित राम मराठे यांची परंपरा जपत प्राजक्ता मराठे बिचोलकर यांनी आपल्या गायन मैफलीची सुरुवात राग कोमल रिषभ आसावरीने केली. त्यानंतर जौनकली या जोड रागाचे सौंदर्य उलगडत आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांना भुरळ घातली.

सायंकाळच्या सत्राची सुरुवात पंडित सुचेता भिडे-चापेकर यांची नात सागरिका पटवर्धन यांच्या नृत्याविष्काराने झाली. गणेशवंदना, पंचजाती आलारिपू सादर केल्यानंतर तिने मराठी शब्द आणि कर्नाटक नृत्यशैलीचा अनोखा संगम दर्शविणारी गणेशाच्या तांडव नृत्याची रचना सादर केली. शहाजी राजे भोसले रचित ‌‘पाहिले कृष्णा‌’ या रचनेवर सुंदर नृत्य करून ‌‘सांगती खोटे त्या गवळणी‌’ या नृत्यगंगेतील रचनेवर नृत्याविष्कार दर्शविला. ‌‘अरसिक किती हा शेला‌’ या नाट्यपदावर साकारलेली नृत्यरचना रसिकांना भावली. ‌‘गोप-गोपीका-कृष्ण-यशोदा‌’ यांच्यातील अनोख्या प्रेमसंबंधावरील रचना दर्शविताना तिने आपल्या नृत्याभिनय कौशल्याचे दर्शन घडविले.

देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचा संगीत वारसा जपणाऱ्या शिल्पा पुणतांबेकर आणि सावनी दातार-कुलकर्णी यांच्या जुगलबंदीने कार्यक्रम अधिक खुलत गेला. त्यांनी राग भूपमधील पणजोबा भास्करबुवा बखले यांच्या हस्ताक्षरात जपलेल्या ‌‘सुने बोल बोलत नाही‌’, ‌‘झांज मंदिरवा बाजे‌’ या बंदिशी प्रभावीपणे सादर केल्या. 

‌‘परंपरा‌’ समारोहाची सांगता भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा वारसा जतन करणारे त्यांचे नातू विराज श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने झाली. त्यांनी मालकंस रागातील ‌‘पग पग लागन रे‌’, ‌‘मुख मोड मोड मुस्कात जात‌’ या बंदिशी सादर करून सादरीकरणाची सांगता ‌‘अगा वैकुंठिच्या राया‌’ या प्रसिद्ध भक्तीरचनेने केली.

कलाकारांना स्वरूप दिवाण, सिद्धेश बिचोलकर, यशवंत थिटे, अमेय बिच्चू, अविनाश दिघे (संवादिनी), समीर पुणतांबेकर, प्रणव गुरव, गीत इनामदार, आशय कुलकर्णी, कौशिक केळकर, स्वप्नील भिसे, (तबला), अर्पिता वैशंपायन (गायन), सुनील अवचट (बासरी) यांनी साथसंगत केली.

वसंत दत्तात्रय पलुस्कर, इंद्रनील चितळे, प्रसाद नगरकर, मृदुला दाबके-जोशी, इन्कम टॅक्सचे प्रिंसिपल कमिशनर अभिनय कुंभार, रवींद्र आपटे, आरती आपटे, गौरी शिकारपूर, राजेंद्र जावळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत प्राचार्य पंडित प्रमोद मराठे आणि उपप्राचार्या परिणिता मराठे यांनी केले. सूत्रसंचालन मंजिरी धामणकर, निरजा आपटे यांनी केले