Home Blog Page 2394

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 970-कालच्या तुलनेत रुग्णसंख्येत 1 हजार 5 ने वाढ

0

पुणे विभागातील 4 लाख 91 हजार 721 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 20 हजार 379 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.19 :- पुणे विभागातील 4 लाख 91 हजार 721 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 20 हजार 379 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 970 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 688 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.49 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 5 ने वाढ झाली आहे.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 32 हजार 867 रुग्णांपैकी 3 लाख 15 हजार 391 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 349 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.75 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 51 रुग्णांपैकी 45 हजार 791 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 607 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 653 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 455 रुग्णांपैकी 39 हजार 828 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 72 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 555 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 214 रुग्णांपैकी 44 हजार 186 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 345 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 683 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 792 रुग्णांपैकी 46 हजार 525 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 597 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 5 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 722 , सातारा जिल्ह्यात 94, सोलापूर जिल्ह्यात 120, सांगली जिल्ह्यात 50 तर कोल्हापूर जिल्ह्यात 19 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 599 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 524, सातारा जिल्हयामध्ये 817, सोलापूर जिल्हयामध्ये 171, सांगली जिल्हयामध्ये 73 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 14 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 26 लाख 18 हजार 390 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 20 हजार 379 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 18 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

वीजबिल सवलतीसाठी सोमवारी भाजपाचे वीजबिल होळी आंदोलन

0

पुणे-राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार असून नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकातदादा पाटील यांनी गुरुवारी केले.

आ.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा वीजबिलांच्या होळीचे आंदोलन राज्यात सर्वत्र करणार आहे.

ते म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प होऊन नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यावरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक इत्यादींना स्वतःहून पॅकेज द्यायला हवे होते. या सरकारने अजूनही जनतेला पॅकेज दिलेले नाही. उलट वीज कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे भरमसाठ वीजबिले आली. त्याबाबत रास्त सवलत देण्यासही सरकार तयार नाही. त्यामुळे भाजपाने या प्रश्नावर जनहितासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते सोमवारी वीजबिलांची होळी करून सरकारचे लक्ष वेधतील. जनतेने या आंदोलनाला पाठिंबा द्यावा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0

मुंबई, दि. 19 : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.

मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिवंगत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले. तसेच उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या रूपाने भारताला एक कणखर आणि धुरंधर नेतृत्व लाभले होते. त्या मुत्सद्दी राजकारणी तर होत्याच पण त्यांनी भारतीय जनतेच्या मनात विकासाभिमुख नेतृत्व म्हणून स्थान मिळवले होते. युद्ध, दुष्काळ, पूर अशा आपत्तींना तोंड देण्यासाठीही त्यांनी नवीन योजना आखल्या. त्यांच्या धडाडीमुळे आणि निर्णय क्षमतेमुळे भारताची जागतिक पातळीवर ताकदवान देश अशी प्रतिमा निर्माण झाली. भारतमातेच्या महान सुपुत्री दिवंगत इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार : राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान

0

मुंबई : राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कोविडमुळे स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री.मदान यांनी सांगितले की, राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. तत्पूर्वी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेची ही मतदार यादी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे.

भारतीय सैन्याची PoK मध्ये सर्जिकल स्ट्राइक ?

0

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर(POK) मध्ये सर्जिकल स्ट्राइक केली आहे. यात अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. भारताने POK मधील काही निवडक लॉन्च पॅडवर हल्ला केला.पीओकेमधील हा भारताची ही तिसरी मोठी कारवाई आहे.

सुरक्षा दलाच्या सूत्रांनी न्यूज एजेंसी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्य हिवाळ्यापूर्वी अनेक दहशतवादी भारतात पाठवण्याच्या तयारीत होते. या कारणामुळेच भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राइक केली.

गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता अचानक सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर म्हणजेच PoK मध्ये भारतीय सैन्याने एअर स्ट्राइक केल्याच्या बातम्या आल्या. परंतू, 10-15 मिनीटांनंतर या बातम्या काढून टाकण्यात आल्या आणि सांगण्यात आले की, भारताने PoK मध्ये पिनपॉइंट स्ट्राइक केली आहे. न्यूज एजेंसी पीटीआयने या पिनपॉइंट स्ट्राइकची माहिती दिली. यात निवडक दहशतवादी लॉन्चपॅड्स उद्धवस्त झाले. या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.

मागच्या वर्षी 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय वायुसेनेने 26 फेब्रुवारीला पीओकेमध्ये एअरस्ट्राइक केली होती. या एअरस्ट्राइकमध्ये वायुसेनेच्या 12 मिराज-2000 फाइटर जेटने बालाकोट, चकोटी आणि मुजफ्फराबादमध्ये बॉम्ब टाकले होते. यात 300 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले होते. वायुसेनेने या मिशनला ‘ऑपरेशन बंदर’नाव दिले होते.

18 सप्टेंबर 2016 ला जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी आर्मी कॅम्पवर हल्ला केला होता. यात 18 भारतीय जवान शहीद झाले होते. याला प्रत्युत्तर देण्यासाठी 29 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याने POK मध्ये 3 किमी आत जाऊन दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करुन सुखरुप परत आले होते. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा भारताने पीओकेमध्ये घुसून हल्ला केला होता. या कारवाईत 40-50 दहशतवादी मारले होते.

ट्रकमध्ये दारूगोळा घेऊन जम्मूहून श्रीनगरकडे जात होते दहशतवादी, सुरक्षादलांनी ट्रकच उडवला

0

श्रीनगर- चार दहशतवादी ट्रकमध्ये दारूगोळा घेऊन जम्मूहून श्रीनगरकडे जात होते. सुरक्षादलांना त्यांची माहिती मिळाली. नगरोटा येथील टोलनाक्यावर त्यांना अडवण्यात आले. सुरक्षारक्षकांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र त्यांनी सुरक्षादलांवर ग्रेनेडचा हल्ला केला. यानंतर सुरक्षादलांनी ट्रकच उडवून दिला आणि दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे.गुरुवारी सकाळी 4.50 वाजता चकमकीला सुरुवात झाली. दोन तासांतच दहशतवाद्यांना ठार केले. जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.जम्मू-काश्मीरचे DGP दिलबाग सिंह यांच्यानुसार, “जैशच्या चार दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री सांबा येथील आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी केली होती. जम्मू-श्रीनगर महामार्गावरून एका ट्रकमधून जात होते, पोलिसांनी नगरोटा टोलनाक्यावर त्यांना अडवले. दहशतवाद्यांनी पोलिसांवर ग्रेनेड हल्ला केला, यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर यंदाची ही दुसरी चकमकी आहे. जानेवारीत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ते देखील याचप्रमाणे ट्रकमध्ये लपले होते.”

आयजी विजयकुमार यांनी सांगितले की, दहशतवादी काश्मीर खोऱ्यातून जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यांना श्रीनगरला पोहचण्यापूर्वीच ठार केले. जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या नागरी निवडणुका अडथळा आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता.

तीन दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये जैशच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती

सोमवारी रात्री दिल्लीतील पोलिसांच्या विशेष सेलने दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. दोघांकडून काही महत्त्वाची कागदपत्रे आणि स्फोटके जप्त केली आहेत. अटक केलेले दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहेत. दोघेही जम्मू काश्मीरमधील बारामुला आणि कुपवाडा येथील आहेत. त्यांची व्हॉट्सअप ग्रुपवर पाकिस्तानशी चर्चा करत होत होती.

कोणत्याही राज्यात सीबीआय चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक

0

नवीदिल्ली -राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआय कोणत्याही राज्यात चौकशी सुरू करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारही संबंधित राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआय तपासणीला परवानगी देऊ शकत नाही. उत्तर प्रदेशातील भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अधिकाऱ्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना हे म्हटले.

राजस्थान, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब आणि मिजोरमने राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआयला तपास करू शकत नसल्याचे म्हटले आहे. या सर्व राज्यात भाजपचे सरकार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्वाचा आह.

कोर्टने DSPE अॅक्टचा हवाला दिला

दिल्ली विशेष पोलिस स्थिरीकरण (डीएसपीई) कायद्याचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सीबीआयच्या अधिकारावर निर्णय दिला. खंडपीठाने म्हटले की कलम -5 द्वारे राज्यांमध्ये सीबीआय चौकशी करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत, परंतु राज्य त्यास मान्यता देईपर्यंत सीबीआयला तपास करता येणार नाही. कोर्टाने म्हटले की, DSPE अॅक्टच्या कलम-6 अंतर्गत राज्य सरकारला आपल्या राज्यात सीबीआयला तपास करू द्यायचा का नाही, याचा अधिकार आहे.

यूपीच्या अधिकाऱ्यांनी याचिका दाखल केली होती

सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय फर्टिको मार्केटिंग अँड इंवेस्टमेंट प्रायवेट लिमिटेडशी संबंधित प्रकरात दिला आहे. फर्टिकोच्या फॅक्टरीमध्ये सीबीआयने छापा मारला होता. सीबीआय तपासात कोल इंडिया लिमिटेडसोबतच्या कराराअंतर्गत कोळशाचा काळाबाजार आढळला होता. या घोटाळ्यात राज्यातील दोन वरिष्ट अधिकारी सामील होते. त्याच अधिकाऱ्यांनी सीबीआय तपासाला आव्हान देत याचिका दाखल केली होती.

सोमवारपर्यंत वीज बिल माफ केले नाही तर…… मनसे

0

मुंबई -सोमवारपर्यंत वीज बिल माफ केले नाही तर राज्यात जनआंदोलन करु, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज वाढीव वीजबिलासंबंधित मनसे पदधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आंदोलनाचा निर्णय झाल्याची माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

बाळा नांदगावकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वाढीव वीजबिला विरोधात मनसेच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, वाढीव वीजबिलात माफ करण्याच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारने राज्यातील साडे अकरा कोटी जनतेची फसवणूक आहे. यामुळे जनतेमध्ये संतापाची भावना आहे. सरकारला ठिकाण्यावर आणण्यासाठी मनसेच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही नांदगावकरांनी केले आहे. तसेच सोमवारपर्यंत वीजबिल माफ केले नाही तर सोमवारनंतर जिल्ह्याजिल्ह्यात आंदोलनं होतील. तसंच, महावितरणचे कर्मचारी वीज कापण्यासाठी आल्यास मनसेचे कार्यकर्ते ग्राहकांसोबत असतील असा विश्वास त्यांनी दिला आहे.

पवार साहेबांच्या शब्दालाही सरकारमध्ये किंमत उरलेली नाही – बाळा नांदगावकर

यावेळी बोलताना बाळा नांदगावकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, वाढीव वीजबिल माफ करण्यात यावे यासाठी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर पवारांनाही निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी पवारांनी या संदर्भात राज्य सरकारशी चर्चा करु असे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतरही काहीच निर्णय झालेला नाही नाही. त्यामुळे पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही असे वाटतेय असे बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

0

जळगाव-राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसे हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहेत. माझ्या सान्निध्यात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत भेटण्यास येऊ नये असे अवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन याविषयी माहिती दिली होती. प्रकृती उत्तम असून खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यानंतर आता एकनाथ खडसे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

महाराष्ट्र सदनात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

0

नवी दिल्ली, दि. १९ : देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची जयंती आज महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात  साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त निधी पांडे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

अंध महिला भगिनींसमवेतआपुलकीची भाऊबीज!

0

पुणे – नाते बहिण – भावाचे ,प्रेम आणि विश्वासाचे ,बंध हे आपुलकीने जपण्याचे ही म्हण सार्थ करीत समाजाशी आपणही एकरूप आहोत, याचा सुखद अनुभव नांदेड फाटा येथील साई संस्थेच्या 40 अंध महिलांनी घेतला. निमित्त होते  अमित बागुल आणि मित्र परिवारातर्फे अंध महिला भगिनीसमवेत अनोख्या  भाऊबीज सोहळ्याचे. या   भाऊबीजमुळे ‘त्यांच्या’ आयुष्यात दाटलेला काळोख मात्र काही क्षण नाहीसा होऊन प्रसन्नतेचा, उत्साहाचा भाव ‘त्यांच्या ‘ चेहऱ्यावर प्रकाशमय झाला होता.एरवी आपल्या अंधकारमय जीवनावर मात करीत जगण्यासाठी धडपड करणाऱ्या या अंध महिलांना आपली काळजी घेणारे, कुटुंबाप्रमाणे मानणारे कुणीतरी आहेत, या विचारानेच त्यांच्या जगण्याची, आयुष्यातील काळोखावर मात करण्याची उमेद या अनोख्या भाऊबीज सोहळ्यातून वृद्धिंगत झाल्याचे आणि अनेक महिलांच्या प्रतिक्रियांतून दिसून आले.  तर अमित बागुल आणि मित्रपरिवाराने या अनोख्या भाऊबीज सोहळ्याचे नियोजन केले. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत हा  शब्द औक्षण करताना प्रत्येकजण देत होता आणि आमचे जीवन तुमच्यासारखे भाऊ असल्याने कधीच अंधकारमय नाही अशा भावना या भगिणींकडून व्यक्त होत होत्या. गाण्यांच्या भेंड्या आणि गप्पांमधून हा सोहळा आणखीनच रंगत गेला. याप्रसंगी ,अमित बागुल इम्तियाज तांबोळी, अभिषेक बागुल,, महेश ढवळे,संतोष पवार , बाबासाहेब पोळके, समीर शिंदे ,भरत तेलंग,धनंजय कांबळे , यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

“राजाचा जीव पोपटात तसा काहींचा जीव मुंबई महापालिकेत”- देवेंद्र फडणवीसांनी दिला इशारा …

0

मुंबई-भाजपाच्या मुंबई कार्यकारिणीची महत्वाची बैठक आज मुंबई पार पडली. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपा नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. या नव्या कार्यकारिणीच्या काळात मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. याद्वारे बिहारनंतर फडणवीस यांनी आता ‘मिशन मुंबई’ सुरु केले आहे.मुंबई भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करताना फडणवीस म्हणाले, “मला विश्वास आहे की या कार्यकारिणीच्या कार्यकाळातच मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल.”मुंबई पालिकेतील कारभारावर निशाणा साधतानाच फडणवीस यांनी मुंबईतील विविध प्रकल्पांवरूनही ठाकरे सरकारला लक्ष्य केले. सध्याच्या राज्य सरकारने प्रकल्पांना केवळ विरोध करण्यापलीकडे काहीच केले नाही. शेवटी प्रत्येक प्रकल्पात रोजगार मराठी माणसालाच मिळणार आहे. तरीही यांचे काम विकासविरोधी आहे आणि दुसरीकडे जनतेला विकास हवा आहे, असे नमूद करत मेट्रो कारशेडच्या बदललेल्या जागेवरून फडणवीस यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. केवळअहंकारासाठी मेट्रो कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून चार वर्षे मुंबईकरांना मेट्रो मिळणार नसून जनतेच्या पैशाचा चुराडा करण्याचा हा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा सवालच फडणवीस यांनी सरकारला केला. पूर्वी एक वाक्प्रचार होता, इच्छा तेथे मार्ग आता नवीन वाकप्रचार आला आहे आणि तो ‘टाइमपास तेथे कांजूरमार्ग’ असा आहे, असे म्हणत फडणवीस यांनी टोला लगावला. आमच्या सरकारच्या कार्यकाळात मुंबईचे सारे प्रकल्प मार्गी लागले. ट्रान्सहार्बर, कोस्टल रोड, वांद्रे-वर्सोवा सी-लिंक, रो-रो सेवा, बीडीडी चाळ व धारावी पुनर्विकास असे कितीतरी प्रकल्प त्यात सांगता येतील. सामान्य मराठी माणसाच्या हिताचे प्रकल्प आता मात्र थंड बस्त्यात गेले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

“राजाचा जीव पोपटात तसा काहींचा जीव मुंबई महापालिकेत”

“ज्या प्रकारे राजाचा जीव पोपटामध्ये तसा काही लोकांचा जीव मुबंई महापालिकेमध्ये आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. आपल्याला आता मुंबई महापालिकेचीच तयारी करायची आहे. भ्रष्टाचाराचं आगार असलेली ही महापालिकेची सत्ता २०२२ मध्ये उलथवून लावायची, अशा सूचनाही त्यांनी यावेळी कार्यकारिणीला केल्या. आम्ही दोस्ती पाळायच्या काळात महापालिका देऊन टाकली, पण आता नाही. भाजपा मुंबईमध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक बुथमध्ये राजकीय कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत, अशा सूचनाही यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.

राज्यात करोनाचे सर्वाधिक केसेस असतानाही मंत्री पाठ थोपटून घेतात

फडणवीस म्हणाले, “मला कधीकधी आश्चर्य वाटतं सरकारचे मंत्री नेते सर्वाधिक केसेस असतानाही स्वतःची पाठ कसे काय थोपटून घेतात. महाराष्ट्रात जी भीषण अवस्था आम्ही बघितली ती देशात कुठेही बघितली नाही. करोनाच्या काळात काही लोकांनी आपलं चांगलं करुन घेतलं. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम यांनी केलं. आधी आम्ही सरकारला या संकट काळात साथ देत होतो. आता मात्र यांची लक्तरं वेशीवर टांगायला सुरुवात करणार आहोत.”

करोनाच्या काळातील भ्रष्टाचारावर आम्ही पुस्तिका तयार करीत आहोत लवकरच ही पुस्तिका प्रकाशित करु आणि यांचा खरा चेहरा समोर आणू. यांना करोनाची चिंता नव्हती तर करोनाच्या नावाखाली पैसा कसा खाता येईल याची चिंता होती. लॉकडाउनच्या काळात भरमसाठ वीजबिलं आली त्यावेळी सरकारनं केंद्राची मदत घेऊन सांगितलं की, बिलामध्ये सवलत देऊ पण ऊर्जा मंत्र्यांनी काल सांगितलं की कोणालाही सवलत मिळणार नाही, अशा प्रकारे सरकारने गरिबांशी विश्वासघात केला, असा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला.

फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

✅ देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण,
देशातील सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात,
मग कोरोना नियंत्रणात आणण्याचे श्रेय कसे घेता?
आतापर्यंत टीका करायची नाही, हे ठरवून ठेवले होते. पण आता यांची लक्तरं वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही.

✅ लोकांना 200 ते 300 पटींनी अधिक विजेची बिलं आली.
सवलतीचा मोठा गवगवा केला गेला.
मंत्रिमंडळात निर्णय घेतले.
वारेमाप घोषणा झाल्या.
आता म्हणतात बिल भरा!
गरिबांसोबत मोठा विश्वासघात झाला आहे.

✅ हे सरकार केवळ बदल्या आणि भ्रष्टाचार करण्यात मग्न होते.
रोज मोदीजी यांना नावं ठेवायची आणि बोलघेवडेपणा. हे लोकांना आवडत नाही, अशांना लोकांची साथ कधी मिळत नाही.

✅ आपल्या सरकारच्या काळात मुंबईचे सारे प्रकल्प मार्गी लागले.
ट्रान्सहार्बर, कोस्टल रोड, बांद्रा-वर्सोवा सी-लिंक, रो-रो सेवा, बीडीडी चाळ, धारावी पुनर्विकास असे कितीतरी प्रकल्प.
सामान्य मराठी माणसाच्या हिताचे प्रकल्प आता थंड बस्त्यात.
नवी मुंबई विमानतळ, मेट्रोचे कितीतरी प्रकल्प, झोपडपट्टीवासियांना घरे असे कितीतरी प्रकल्प सांगता येतील.

✅ पूर्वी एक वाकप्रचार होता
इच्छा तेथे मार्ग
आता नवीन वाकप्रचार
टाईमपास तेथे कांजूरमार्ग

✅ केवळ अहंकारासाठी निर्णय.
त्यातून चार वर्ष मुंबईकरांना मेट्रो मिळणार नाही.
जनतेच्या पैशाचा चुराडा करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला.

✅ प्रकल्पांना केवळ विरोध करण्यापलीकडे यांनी काहीच केले नाही.
शेवटी प्रत्येक प्रकल्पात रोजगार मराठी माणसालाच मिळणार आहे. यांचे काम विकासविरोधी. जनतेला विकास हवा आहे.

✅ पोलिसांच्या बळावर हे आम्हाला दाबू शकणार नाही.
जे काम स्व. इंदिरा गांधी यांना जमले नाही, ते तुम्हाला जमणार का?
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नका.
काल ओरडणारे विचारवंत आज गप्प का आहेत?
सरकार बदलले की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या बदलते का?

✅ मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारी सत्ता बदलण्याची वेळ आली आहे.
डोक्यात सत्ता गेली की पतन अटळ आहे.
जनतेचा विचार करणारे लोक सत्तेत आणावी लागतील आणि हाच मुंबईचा संकल्प असला पाहिजे.

✅ हिंदुत्व बोलून सांगण्याचा विषय नाही.
तो कृतीतून दाखविण्याचा विषय आहे.

महेबूबा मुफ्तींसोबत काश्मीरची सत्ता उपभोगताना भाजपने आपले देशप्रेम खुंटीला टांगून ठेवले होते का?- बाळासाहेब थोरात

0

मुंबई -काँग्रेस पक्षाने या देशाच्या स्वातंत्र्याची लढाई लढली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे. इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे. देशप्रेम हे काँग्रेसच्या नसानसात आहे. स्वातंत्र्यांच्या लढ्यात ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये. महेबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केले, याचा ५२ वर्ष आपल्या मुख्यालयात तिरंगा न फडकवणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक फडणवीस आता विलाप करत आहेत. परंतु २०१७ साली याच महेबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याच्या विरोधात विधान केले होते, त्यावेळेला भाजप त्यांच्याबरोबर सत्तेत होता. काँग्रेसने यासंदर्भात त्यांचा राजीनामा मागितला होता तेव्हा मात्र भाजप सत्तेला चिकटून बसली होती. हेच त्यांचे स्ट्रॅटेजीक अलायन्स होते का? महेबूबा मुफ्तींसोबत काश्मीरची सत्ता उपभोगताना भाजपने आपले देशप्रेम खुंटीला टांगून ठेवले होते का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

थोरात म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी आहे, असे खोटे विधान केले आहे. काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी नाही. काँग्रेस पक्षाचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नाही. मात्र फडणवीस यांना काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी आहे असा साक्षात्कार झाला व त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसवर आरोप करण्याचा नादात आपण खोटे बोलत आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही. बोलण्याच्या अगोदर त्यांनी जरा माहिती घेतली असती तर बरे झाले असते असे थोरात म्हणाले.

सातत्याने खोटे बोलून जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करणे ही भाजप नेत्यांची जुनी सवय आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच सवयीला जागून पत्रकार परिषदेत काश्मीरबद्दल बोलताना पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे राज्यातील जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले पण भाजप नेत्यांची खोटे बोलण्याची सवय काही गेली नाही, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

काश्मीरमध्ये लोकशाही अस्तित्वात रहावी आणि भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर यावा यासाठी काँग्रेस पक्ष तेथील निवडणुकांमध्ये सहभागी झाला आहे. त्याचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

भाजपाच्या काळात महावितरणची थकबाकी 51 हजार कोटींच्या जवळपास पोहचली – नितीन राऊत

0

”करोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने ‘सरासरी’ कार्यक्षमता न दाखविल्याने व वीज बिलांची वसुली न केल्याने बसला आहे. भाजपा सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी 51 हजार कोटींच्या जवळपास पोचहली.” असा गंभीर आरोप राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यातील ग्राहकांना गेल्या काही महिन्यांपासून येणाऱ्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षात बसलेल्या भाजपाने महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ग्राहकांना वाढीव वीज बिलातून कोणताही दिलासा मिळणार नाही असं जाहीर केलं होतं. मीटर रिडींगप्रमाणे आलेलं बिल ग्राहकांनी भरलीच पाहिजे असंही राऊत म्हणाले होते.तर आता, ”करोना काळात वीज बिलं भरली न गेल्याने महावितरणची थकबाकी ९ हजार कोटींनी वाढून ऑक्टोबरमध्ये ५९,१०२ कोटींवर पोहचली. मार्च २० ला घरगुती ग्राहकांकडे असलेली १हजार३७४ कोटींची थकबाकी ही ४ हजार८२४ कोटींवर पोहचली. वाणिज्य ग्राहकांची ८७९ वरून १ हजार २४१ कोटींवर तर औद्योगिकची ४७२ वरून ९८२ कोटींवर पोहचली.” असं देखील नितीन राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, वीज वापरणारे हे जसे ग्राहक आहेत तसेच महावितरणही ग्राहक आहे. महावितरणला वीज बाहेरुन विकत घ्यावी लागते. विविध शुल्कही द्यावी लागतात. बिलाचे हप्ते पाडून देण्यात आले आहेत. तसंच पूर्ण बिल एकदम भरणाऱ्यांना सवलतही दिली आहे असं नितीन राऊत यांनी या अगोद म्हटलेलं आहे. तसेच, ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून मी पूर्ण प्रयत्न केले. मात्र केंद्र सरकारने यात मदत केली नाही. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे त्यामुळे आता सवलत देण्याचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटींच्या तोट्यात आहे. आता आम्ही कर्ज काढू शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.

तर, करोनाकाळातील वीजबिलांमध्ये सवलत देण्याचे जाहीर करून घूमजाव करणे, हा लाखो ग्राहकांचा विश्वासघात आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एसटी महामंडळाप्रमाणेच महावितरणलाही राज्य सरकारने न्याय द्यावा आणि किमान पाच हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केलेली आहे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 603 : कालच्या तुलनेत रुग्ण संख्येत 617 ने वाढ

0

पुणे विभागातील 4 लाख 90 हजार 122 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 19 हजार 374 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.18 :- पुणे विभागातील 4 लाख 90 हजार 122 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 19 हजार 374 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 603 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 649 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.37 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.दरम्यान कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 617 ने वाढ झाली आहे

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 32 हजार 145 रुग्णांपैकी 3 लाख 14 हजार 867 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 174 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 104 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.80 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 957 रुग्णांपैकी 44 हजार 974 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 337 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 646 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 335 रुग्णांपैकी 39 हजार 657 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 129 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 549 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 164 रुग्णांपैकी 44 हजार 113 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 369 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 682 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 773 रुग्णांपैकी 46 हजार 511 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 594 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 668 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 617 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 368 , सातारा जिल्ह्यात 65, सोलापूर जिल्ह्यात 97, सांगली जिल्ह्यात 43 तर कोल्हापूर जिल्ह्यात 44 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 994 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 420, सातारा जिल्हयामध्ये 231, सोलापूर जिल्हयामध्ये 216, सांगली जिल्हयामध्ये 71 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 56 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 26 लाख 5 हजार 411 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 19 हजार 374 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )