Home Blog Page 2381

नृत्य दिग्दर्शक संदीप सोपारकर यांच्यासह कोविड योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

0

मुंबई, दि. ५ – लोकसेवेसाठी समर्पण हेच सर्वोत्कृष्ट कार्य आहे. कोणताही भेद न बाळगता समाजकार्य करणे हाच मनुष्याचा धर्म आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन कार्य केल्यास समाजात कुणीही उपेक्षित राहणार नाही. आर.के. एचआयव्ही एड्स संशोधन व सुरक्षा केंद्राने वैद्यकीय सुविधांसाठी गरजू आणि गरिब जनतेला मोबाईल मेडिकल व्हॅन अर्पण करून सामाजिक दायित्व सिद्ध केले असल्याची भावना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केल्या.

आर.के.एचआयव्ही एड्स संशोधन व सुरक्षा संस्थेमार्फत मुंबईतील २० झोपडपट्टी भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी “फिरते वैद्यकीय सेवा वाहनाचे”लोकार्पण आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आर.के.एचआयव्ही एड्स संशोधन व सुरक्षा संस्थेचे अध्यक्ष विनीत चोपरा, डॉ. धमेंद्र कुमार, जीआयसी संस्थेचे संचालक व व्यवस्थापक दीपक प्रसाद, सहायक व्यवस्थापक नामदेव कदम, वैद्यकीय संचालक विरेंद्र सहाय आदीसह संस्थेचे कोविड-19 काळात कार्य केलेले कोविड योद्धे यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ समाजसेविका राणी पोतदार, नृत्य दिग्दर्शक संदीप सोपारकर यांच्यासह कोविड योद्धांना राज्यपालांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, मुंबई आणि सूरत येथील विविध भागातील गरजू आणि गरीब लोकांना मोफत रूग्णसेवा व औषधी देण्यासाठी फिरते रूग्णसेवा वाहन आपल्या सामाजिक दायित्व निधीतून लोकांना समर्पित केले ही अभिनंदनीय बाब आहे. कोविड काळात संस्थेने एक करोड पेक्षा जास्त लोकांना अन्नदान केले आहे. या कामामुळे जे आत्मिक सुख मिळते ते कोणत्याही कार्यापेक्षा नेहमी मोठे असते. समाजकार्य मोठ्या प्रमाणात करत असताना अडचणी येतात मात्र, कार्य सातत्याने करीत राहिल्यास यशही प्राप्त होते. आपले समाजाप्रती असलेले कार्य असेच पुढेही सुरू राहिल, अशी आशा राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागपूर विमानतळावर स्वागत

0

नागपूर, दि. ५ :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री श्री.ठाकरे अमरावती जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहेत. यासाठी नागपूर येथून हेलिकॉप्टरने अमरावतीकडे रवाना झाले.

तत्पूर्वी, नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मुख्यमंत्री श्री.ठाकरे स्वागत केले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे विशेष विमानाने नागपूर येथे आले होते. या ठिकाणावरून अमरावतीकडे हेलिकॉप्टरने रवाना झालेत. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील शिवणी रसुलापूर हेलिपॅडवरून मौजे देऊळगव्हाण येथे पोहोचणार आहेत. याठिकाणी उतरून मुख्यमंत्री समृद्धी महामार्गाची पाहणी करतील.

त्यानंतर दुपारी सव्वाबारा वाजता हेलिकॉप्टरने औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील मौजे गोळवाडीकडे प्रयाण करतील. दोन वाजता गोळवाडी हेलिपॅड येथे आगमन व समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता औरंगाबाद येथून विमानाने मुंबईला प्रयाण करतील.

आज सकाळी साडेदहा वाजता नागपूर विमानतळावर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासह अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर यांनी देखील नांदगाव खंडेश्वरकडे प्रयाण केले.

विमानतळावरील मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या स्वागतासाठी खासदार कृपाल तुमाने, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, अप्पर पोलीस आयुक्त दिलीप झळके, सुनील फुलारी, उपायुक्त नरुल हसन, बसवराज तेली, जिल्हा पोलीस अधीक्षक ( ग्रामीण ) राकेश ओला, वरिष्ठ विमानतळ अधिकारी आबीद रूही, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर उपस्थित होते.

रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण रोखून रब्बीमध्ये सुरळीत वीजपुरवठा करा

0

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे महावितरणला निर्देश

मुंबई – सध्या रब्बी हंगाम महत्वाच्या टप्प्यात असून येत्या तीन महिन्यांत सिंचनासाठी सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण विविध उपाययोजना करून रोखण्यात यावे तसेच रोहित्र, ऑईल आणि इतर साहित्य पुरेशा प्रमाणात अतिरिक्त स्वरुपात ठेवण्यात यावे व त्याचा आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात यावा असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी दिले.

फोर्ट येथील महावितरणच्या कार्यालयात ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने रब्बी हंगामातील वीजपुरवठ्याबाबत आढावा घेत महावितरणच्या राज्यभरातील अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. असीमकुमार गुप्ता उपस्थित होते.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले की, रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते किती दिवसांत बदलणार किंवा दुरुस्त करणार, शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी, त्यासंदर्भातील मोबाईल क्रमांक आदींची माहिती स्थानिक पातळीवर देण्यात यावी. नादुरुस्त झालेले कृषिपंपांचे रोहित्र युद्धपातळीवर बदलण्याचे किंवा दुरुस्त करण्यात यावे. आवश्यक त्या ठिकाणी रोहित्रांची क्षमता वाढविण्यात यावी. अतिरिक्त स्वरुपात रोहित्र तसेच ऑईल व इतर साहित्याची कोणतीही कमतरता नाही. मात्र तरीही वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्यास निष्काळजीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद् कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

मागील सरकारच्या कालावधीत कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देणे बंद करण्यात आल्याने कृषिपंपांसाठी अनधिकृत वीजवापर वाढला आहे. त्यामुळे रोहित्र अतिभारित होऊन नादुरुस्त होण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. महाविकास आघाडी शासनाने नुकतेच नवीन कृषिपंप धोरण जाहीर केले असून त्याप्रमाणे लघुदाब, उच्चदाब वाहिन्यांसह सौरद्वारे कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्यात देण्यात येणार आहे. या धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले.

रोहित्र नादुरुस्त होण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी येत्या 31 डिसेंबरपर्यंत तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्यात यावा. प्रादेशिक कार्यालयस्तरावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करून दैनंदिन रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण, दुरस्ती किंवा बदलण्यात आलेले रोहित्र, ऑईलचा पुरवठा आदींची संकलीत माहिती दर आठवड्यात ऊर्जामंत्रालय, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व महावितरणच्या मुख्यालयात पाठविण्यात यावी, असे आदेश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले.

राज्यात शेतकऱ्यांना मागणीनुसार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करण्यात यावी. नक्षलग्रस्त भागातील नवीन वीजजोडण्यांसाठी निधीची मागणी करण्यात यावी. तसेच वनविभागाच्या जमिनीतून वीजयंत्रणा उभारण्याच्या परवानगीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात यावा आणि कमी दाबाने वीजपुरवठा होत असलेल्या भागात नवीन उपकेंद्र प्रस्तावीत करण्यासोबतच वीजवाहिन्यांचे अंतर कमी करून योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले. या बैठकीला महावितरणचे संचालक (संचालन) श्री. सतीश चव्हाणे, कार्यकारी संचालक (वितरण) श्री. अरविंद भादीकर आदींची उपस्थिती होती. तर व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहव्यस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक तसेच मुख्य अभियंता आदी वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.

मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासंदर्भात ९ डिसेंबरला घटनापीठासमोर सुनावणी

0

मुंबई: मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती मनाई मागे घेण्यासाठी घटनापीठाची स्थापना करून तातडीने सुनावणी करण्याच्या राज्य शासनाच्या मागणीला यश आले असून, येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता पाच सदस्यीय घटनापीठासमोर यासंदर्भात सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, याकरिता राज्यसरकारने २० सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करणारे चार अर्ज करण्यात आले होते. पहिला अर्ज ७ ऑक्टोबर, दुसरा अर्ज २८ ऑक्टोबर, तिसरा अर्ज २ नोव्हेंबर तर चौथा अर्ज १८ नोव्हेंबर रोजी करण्यात आला होता. मराठा आरक्षण प्रकरणी राज्य शासनाचे वरिष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी सरन्यायाधीशांसमक्ष तातडीने घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकताही विषद केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती श्री. रोहतगी यांनी सरन्यायाधीशांना केली होती. त्यावेळी या अर्जावर लवकरात लवकर विचार केला जाईल, असे सरन्यायाधीशांनी सांगितले होते. परंतु, अद्याप यासंदर्भात निर्णय झालेला नव्हता. अखेर राज्य शासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.

स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

0

मुंबई : कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्त्वाचा स्त्रोत आहे. मात्र, कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये बंद आहेत. तसेच रक्तदानात अग्रेसर असणाऱ्या बऱ्याच मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांच्याकडून वर्क फ्रॉम होम सुरु असल्यामुळे रक्त संकलनामध्ये अडचणी येत आहेत.

5 ते 7 दिवस पुरेल एवढाच साठा

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासन स्तरावरुन सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या महाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये १९ हजार ०५९ रक्ताच्या युनिट आणि प्लेटलेटच्या २ हजार ५८३ युनिट आणि मुंबईतील ५८ रक्तपेढ्यांमध्ये ३ हजार २३९ रक्ताच्या युनिट आणि ६११ प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. केवळ ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे.

या पार्श्वभुमीवर येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे.

जास्त शुल्क आकारणाऱ्या रक्तपेढ्यांकडून पाचपट दंड वसूल करणार

0

मुंबई, दि. 4 : राज्यात गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. नेमून दिलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क आकारल्यास त्याच्या पाचपट दंड आकारला जाईल. जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालकांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली. यासंदर्भात शासन निर्णयदेखील जाहीर करण्यात आला आहे.

राज्यामध्ये काही रक्तपेढ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे गैरप्रकार वारंवार होत असल्याच्या तक्रारी विविध निवेदनाद्वारे प्राप्त होत आहेत. यामध्ये थॅलेसिमिया रुग्णांना रक्त न देणे, त्यांचेकडून प्रक्रिया शुल्क घेणे, संकेतस्थळावर दररोजचा साठा न दर्शविणे, तसेच प्लाझ्मा रक्त पिशवीसाठी विहित रकमेपेक्षा अवाजवी रक्कम आकारणे अशा आशयाच्या तक्रारी/निवेदने प्राप्त होत आहेत.

राज्यात अशाप्रकारे गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय/राज्य संक्रमण परिषद/शासन यांचेकडून रक्त व प्लाझ्मा तसेच प्रक्रियेसाठी विहित केलेल्या दरापेक्षा अवाजवी रक्कम आकारणाऱ्या खासगी रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण संचालक यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद/राज्य रक्त संक्रमण परिषद/शासन यांनी विहित केलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जादा प्रक्रिया शुल्क आकारल्यास जादा आकारलेल्या प्रक्रिया शुल्काच्या पाचपट दंड केला जाईल. यापैकी जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येणार असून उर्वरित रक्कम राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

थॅलेसिमिया/हिमोफिलिया/सिकलसेल व रक्ताशी निगडीत इतर आजारी रुग्णांकडे मोफत रक्त मिळण्याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेने जारी केलेले ओळखपत्र असतानादेखील अशा रुग्णांना प्रक्रिया शुल्क आकारल्यास प्रक्रिया शुल्काच्या तीनपट दंड केला जाईल. यापैकी प्रक्रिया शुल्क संबंधित रुग्णास परत करण्यात येईल व उर्वरित रक्कम राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

सूचना फलकावर/संकेतस्थळावर पुरविलेल्या माहितीप्रमाणे रक्त उपलब्ध असताना देखील थॅलेसिमिया/हिमोफिलिया/सिकलसेल व रक्ताशी निगडीत इतर आजारी रुग्णांना कोणतेही सबळ कारण नसताना रक्त वितरण करण्यास नकार दिल्यास रुग्णास द्यावे लागलेले प्रक्रिया शुल्क अधिक 1000/- रुपये दंड आकारला जाईल. प्रक्रिया शुल्क रुग्णास परत करण्यात येईल.

ई रक्तकोष व राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तसाठा व अनुषंगिक माहिती न भरल्यास प्रतिदिन 1000 रुपये याप्रमाणे दंड आकारला जाईल. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तपेढीकडून जी माहिती भरणे अनिवार्य आहे, अशी माहिती न भरल्यास अथवा भरलेली माहिती अद्ययावत नसल्यास त्यासाठी विहित कालावधी संपल्यानंतरच्या कालावधीसाठी 500 रुपये प्रतिदिन दंड आकारला जाणार आहे.

दंडात्मक कारवाईपूर्वी संबंधित रक्तपेढीला नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मांडण्याची एक संधी देण्यात येईल. रक्तपेढीकडून वारंवार मार्गदर्शक तत्वे/ सूचनांचे उल्लंघन केले गेल्यास, अशा रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला कळविण्यात येईल व अशा रक्तपेढ्यांचा परवाना अन्न व औषध प्रशासनाकडून रद्द करण्यात येईल.

पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीत जयंत आसगावकर विजयी

0

            पुणे, दि. 04-  पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. जयंत दिनकर आसगावकर विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले. 
           श्री. आसगावकर यांना 25 हजार 985  मते मिळाली. 25 हजार 114 मतांचा कोटा होता. या मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे श्री. आसगावकर यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले, पदवीधर मतदार संघातून एकूण 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघातून 35 उमेदवार निवडणूक लढवीत होते. 

६ डिसेंबरला ड्राय डे…

0

मुंबई, दि. 4 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहर परिसरात मद्य विक्रीच्या किरकोळ अनुज्ञप्त्या बंद असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील दादर, शिवाजी पार्क, माहिम, धारावी, सायन, करी रोड स्टेशनपर्यंतचा सर्व भाग, वरळी सी फेस, वरळी कोळीवाडा ते संगम नगरपर्यंत हद्दीमधील भागात स्थित असणाऱ्या तसेच सायन कोळीवाडा, किंग्ज सर्कल, ॲन्टॉपहिल, वडाळा, शिवडी, काळाचौकी, भोईवाडा पर्यंत हद्दीमधील सर्व किरकोळ मद्य विक्रीच्या अनुज्ञप्त्या पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन करुत मद्य विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद  आहे.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 580

0

पुणे विभागातील 5 लाख 9 हजार 779 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 39 हजार 439 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि.4 :- पुणे विभागातील 5 लाख 9 हजार 779 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 39 हजार 439 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 580 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 80 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.50 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 45 हजार 533 रुग्णांपैकी 3 लाख 26 हजार 10 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 11 हजार 166 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 357 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.35 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 522 रुग्णांपैकी 49 हजार 155 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 642 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 725 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 362 रुग्णांपैकी 42 हजार 695 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 56 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 611 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 912 रुग्णांपैकी 44 हजार 803 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 409 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 700 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 110 रुग्णांपैकी 47 हजार 116 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 307 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 172 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 793, सातारा जिल्ह्यात 153, सोलापूर जिल्ह्यात 180, सांगली जिल्ह्यात 34 तर कोल्हापूर जिल्ह्यात 12 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण 1 हजार 614 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयात 1052, सातारा जिल्हयामध्ये 285, सोलापूर जिल्हयामध्ये 173, सांगली जिल्हयामध्ये 45 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 59 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 29 लाख 16 हजार 523 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 39 हजार 439 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 3 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

रेराच्या कारणाने बांधकामांची दस्त नोंदणी थांबविल्याने दुष्टचक्रात अडकलेल्या लाखो कुटुंबांना वाऱ्यावर सोडू नका -खर्डेकर यांची उपमुख्यमंत्र्यांना विनंती

0

पुणे -महापालिकेत समाविष्ट झालेली ११ गावे आणि एकूणच महापालिका लगतची सर्व ग्रामीण भागातील शेकडो,हजारो बांधकामांची रेरा नोंदणी नसल्याच्या कारणाने दस्त नोंदणी थांबविल्याने सुरु झालेल्या दुष्टचक्रात अडकून पडली आहेत .ज्याचा भयाण फटका केवळ बांधकाम व्यावसायिकच नव्हे तर अनेक कर्जपुरवठा करणाऱ्या संस्था ,बैंका आणि विशेष म्हणजे हि बांधकामे बुकिंग केलेली अगर त्यासाठी कर्ज घेतलेली लाखो कुटुंबातील व्यक्तींना थेट बसला आहे याकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष क्रियेटीव्ह फौन्डेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी वेधले आहे.

या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री यांच्या कडे एक विशिष्ट डेडलाईन ठरवून त्यापूर्वीच्या बांधकामाना रेरा ची अट शिथिल करून त्यांची दस्त नोंदणी सुरु करावी अशी मागणी केली आहे .या विषयी खर्डेकर यांनी सांगितले कि,पुणे महापालिकेच्या हद्दीत वाढ करुन उर्वरित २३ गावे पुणे मनपा त समाविष्ट करण्याबाबतची कार्यवाही राज्य सरकारने सुरु केली असल्याचे वाचनात आले.खरेतर ही गावे टप्प्याटप्प्याने समाविष्ट करणे संयुक्तिक ठरणार आहे,कारण एकतर कोरोनाच्या संकटामुळे पुणे शहरातील सर्व विकासकामे ठप्प झाली आहेत,अर्थचक्र थांबल्यामुळे राज्य सरकार देखील विकासासाठी निधी देण्यात असमर्थ असल्याचे दिसून येते.अगोदर घेतलेल्या ११ गावांना ही याचा फटका बसला आहेच.मात्र आत्ताचे निवेदन समावेश करावा किंवा नाही याच्याशी संबंधित नाही.पण आज आपण लक्ष वेधू इच्छितो ते ह्या गावां मधील अनधिकृत बांधकामां कडे.हजारो इमारती आज बांधून तयार आहेत.मात्र या इमारतीं मधील सदनिकेच्या दस्त नोंदणीचा विषय अतिशय गंभीर असून अनेक मंडळी रेरा च्या निर्णयाने उद्ध्वस्त होत आहेत.वस्तुतः दस्त नोंदणी थांबवणे कोणत्याही कायद्यात बसत नाही असे तज्ञांचे मत आहे..
तसे निकाल ही उच्च न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत.
एकवेळ यात अनधिकृत बांधकाम करणाऱ्याचा विचार करु नका पण ज्या हजारो नागरिकांनी फ्लॅट बुक केले,कर्ज काढले,हप्ते ही सुरु झाले त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे / या सामान्य नागरिकांना कोणीच वाली नाही आणि दस्त नोंदणी होत नसल्याने त्यांना कर्जाचे अंतिम disbursement ही होत नाही. रेराच्या नोव्हेंबरच्या पत्रामुळे ही वेळ आली आहे.
जर प्रामाणिकपणे अनधिकृत बांधकाम थांबवायचे असेल तर एक डेडलाईन ठरवून द्यावी की समजा ३१ डिसेंबर २०२० नंतर रेराच्या परवानगी शिवाय होणाऱ्या बांधकामांची नोंदणी होणार नाही.पण आज ज्या शेकडो इमारती ग्रामीण भागात उभ्या आहेत त्यांचे भविष्यच अधांतरी आहे.
ही बांधकामे होत असताना सर्वच यंत्रणांचे दुर्लक्ष होते हे उघडच आहे.
तरी गावे पुण्यात घेत असताना या विषयाचा गांभीर्याने विचार करावा व सदनिका खरेदीदारांना दिलासा द्यावा.ह्या बांधकामां वर हातोडा चालविण्याची कारवाई करणे राष्ट्रीय संपत्ती चे नुकसान करण्यासारखे आहे.यापूर्वी अनेक बांधकामे कधी गुंठेवारीत तर कधी दंड आकारुन नियमित केली आहेत.त्याच धर्तीवर गावांच्या समावेशापूर्वी ह्या बांधकामांबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.
बैठया घरांची ही खरेदी विक्री ची दस्तनोंदणी होत नाहीये हे ही त्रासदायक ठरत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे हवेली आणि मुळशी तालुक्यातील दस्त नोंदणी थांबवली आहे,उर्वरीत सर्वत्र फ्लॅट चे व तुकडा जमीनीचे दस्त केले जात आहेत. रहिवासी,औद्योगिक व शेती झोन मधील जमीन मिळकतींचे व नवीन बांधण्यात आलेल्या इमारतींच्या फ्लॅट मिळकतीचे खरेदी दस्तांची नोंदणी करण्यावर फक्त हवेली व मुळशीत घालण्यात आलेले निर्बंध अन्यायकारक आहेत.असे आपले स्पष्ट मत आहे.तरी या विषयात उपमुख्यमंत्र्यांनी मार्ग आढावा अशी विनंती संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

ॲमेनिटी स्पेसची विक्री करण्याचा अथवा त्या भाडे तत्वावर देण्याचा प्रयत्न तातडीने थांबवा-खा. वंदना चव्हाण

0

पुणे-ॲमेनिटी स्पेसची विक्री करण्याचा अथवा त्या भाडे तत्वावर देण्याचा प्रयत्न तातडीने थांबवावा यासाठी खासदार श्रीमती. वंदना चव्हाण यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. विक्रम कुमार यांना पत्राद्वारे निवेदन दिले.

पुणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष नागरी हिताच्या आणि सोयी-सुविधांसाठी आरक्षित असलेल्या ॲमेनिटी स्पेस उत्पन्नाच्या नावाखाली विक्री करण्याचा किंवा त्या भाडेतत्वार देण्याचा घाट घालत असल्याचे समजते. शहरीकरण वाढत असताना अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेल्यास शहरासाठी ही अत्यंत दुर्देवी आणि चुकीची घटना असेल. 

पुण्याची लोकसंख्या ४० लाखांवर पोचली आहे. तसेच राज्याच्या विविध शहरांतून पुण्यात स्थलांतरीत होणारया नागरिकांची संख्या वाढत आहे. लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेतला तर, वाढत्या पायाभूत सुविधांवरील ताण वाढत आहे. त्यासाठी अधिक सुविधा निर्माण करण्याची गरज वाढत आहे. तसेच शहराच्या सुनियोजीत विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची अंमलबजावणीही पुरेशा वेगाने होत नसल्याचे गेल्या तीन वर्षांतील महापालिकेतील कारभारावरून दिसून आले आहे. अशा परिस्थितीत नागरी सुविधांच्या जागा विकण्याचे प्रयोजन काय आहे, हे समजत नाही. 

पुण्याच्या विकास आराखड्यामध्ये मुळात क्रिडांगण, गार्डन, पार्क, शाळा, आरोग्यकेंद्रे, क्रिडा संकुल, भाजी मार्केट,  बालवाडी आदी विविध सुविधांसाठी जागा प्रचलित मानांकनापेक्षा कमी आहेत. सार्वजनिक उपयोगासाठी ॲमेनिटी स्पेसचा वापर व्हावा हा मूळ उद्देश ॲमेनिटी स्पेसचा आहे आणि तोच विसरून निर्णय घेणे योग्य ठरणार नाही; हे समाजहिताच्या विरोधात असेल.  विकास नियंत्रण नियमावलीनुसार (डिसी रूल) ॲमेनिटी स्पेसच्या जागांची विक्री करता येत नाही. तरीही महापालिकेने तसा प्रयत्न केल्यास पुणेकर म्हणून आमचा ह्या निर्णयाला कडाडून विरोध असेल. 

वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण, स्थलांतर लक्षात घेता नागरी सुविधा वाढविण्यावर व त्या विकसित करण्यावर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले पाहिजे. तसेच विकास आराखड्याची अंमलबजावणीही वेगाने केली पाहिजे. विकासकामांचे प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार नियोजन करावे, अतिरिक्त उधळपट्टी थांबवावी यामुळे खर्चात बचत होईल आणि तो निधी आवश्यक असलेल्या नागरी हिताच्या कामांसाठी वापरता येईल. त्यामुळे ॲमेनिटी  स्पेसची विक्री करण्याचा अथवा त्या भाडे तत्वावर देण्याचा प्रयत्न आपण तातडीने थांबवावा. 

अनेक वर्षांपासून मी ॲमेनिटी स्पेसचा ‘मास्टर प्लॅन’ करावा अशी मागणी प्रशासनाकडे करत आहे, परंतु याबाबत सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत ही शोकांतिका आहे. या निवेदनाद्वारे पुन्हा एकदा आपणांस विनंती करते की, ॲमेनिटी स्पेससाठीचा मास्टर प्लॅन तयार करावा, यासाठी एक लोकप्रतिनिधी व एक पुणेकर म्हणून मी आवश्यक ते सहकार्य निश्चित करेल. 

अहंपणामुळेच ही वेळ आली- एकनाथ खडसे

0

जळगाव– ‘पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली. पारंपरिक मतदारसंघही भाजपने यावेळी गमावले. हे भाजपच्या नेतृत्वाचे अपयश आहे. अहंपणामुळेच ही वेळ आली आहे,’ अशा शब्दांत खडसेंनी टीका केली.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल आज लागले. या निकालाबाबत एकनाथ खडसे यांनी सांगितले की, ‘या निवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर मतदारसंघातील जागा गेली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुणे मतदारसंघाची जागा गेली. एखादा व्यक्तू पक्षातून बाहेर पडल्यावर काय फरक पडतो हे आता चंद्रकांत पाटलांना कळेल. निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे. भाजपच्या नेतृत्वाने या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी’, असा घणाघात खडसेंनी केला.

महाराष्ट्रातील चित्र आता बदलतेय-शरद पवार

0

पुणे– ‘धुळे आणि नंदुरबारचा निकाल आश्चर्यकारक नाही. कारण त्या ठिकाणचे उमेदवार हे विद्यमान आमदार होते. त्यांनी पक्षांतर केल्यामुळे राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवली. यामुळे त्यांचा विजय खरा विजय म्हणता येणार नाही. मात्र इतर ठिकाणचा निकाल हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आणि गेल्या वर्षभरात केलेल्या कामाला मतदारांनी दिलेली पावती आहे’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली आहे.

पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. याविषयी प्रतिक्रिया देतांना पवारांनी भाजपला टोला लगावला आहे. ‘नागपूर पदवीधर मतदारसंघ 5 दशकांपासून भाजपकडे होता. गडकरी आणि फडणवीस यांच्याकडे ही जागा गेली अनेक वर्ष होती. पुण्यातील पदवीधर मतदारांनीही आम्हाला समर्थन दिलेले नव्हते. पण यावेळी पुण्याचा निकालही मोठ्या मतांनी स्पष्ट झाला आहे. हा बदल म्हणजे महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. या बदलाला महाराष्ट्रातील लोकांचा पाठींबा आहे, असे या निकालातून दिसते’ असे पवार म्हणाले आहेत.

देश चालवण्यासाठी लागणारे सातत्य राहुल गांधी यांच्यात नाही- शरद पवार

0

मुंबई– ‘राहुल गांधी यांच्यात देश चालवण्यासाठी लागणारे सातत्य नाही,’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान केले आहे. याशिवाय, पवारांनी अमेरिके माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकातून राहुल गांधींवर केलेल्या टीकेलाही अयोग्य म्हटले आहे.

‘सध्या देश राहुल गांधींचे नेतृत्व स्विकारण्यास तयार आहे का ?’ या प्रश्नावर पवार म्हणाले की, ‘याबाबत अनेक तर्क-वितर्क आहेत. सध्या त्यांच्यात(राहुल गांधी) सातत्याची कमतरता आहे.’ सध्या राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळेच, पवारांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकते.

राहुल गांधीवरील ओबामांची टीका अयोग्य

बराक ओबामा यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेवर शरद पवार म्हणाले की, ‘आपल्या देशातील नेत्यांबद्दल काहीही बोलू शकतो. पण, दुसऱ्या देशातील नेत्यांबाबत काही बोलणार नाही.इतकच म्हणेल की, राहुल यांच्यावर ओबामा यांनी केलेली टीका अयोग्य होती.’

काही दिवसांपूर्वी बराक ओबामा यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यात त्यांनी राहुल गांधीवर टीका करताना त्यांना नर्वस विद्यार्थी म्हणत, त्यांच्या आत्मविश्वासाची कमतरता असल्याचे म्हटले होते. यावरुन देशात खूप चर्चा झाली होती.

ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

0

मुंबई : युनेस्को आणि लंडन येथील वार्की फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर येथील जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांचे अभिनंदन केले आहे. पुरस्काराची बातमी समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्यांना दूरध्वनी करून त्यांचे कौतुक केले.

यावेळी  रणजितसिंह डिसले यांनी ग्रामीण भागात शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी ते करीत असलेल्या उपक्रमांची मुख्यमंत्र्यांना माहिती दिली तसेच तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करतो ते सांगितले.

क्यूआर कोडच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल घेऊन 140 देशांतील 12 हजार शिक्षकांतून त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 7 कोटी रुपये अशी पुरस्काराची मिळालेली रक्कम इतर देशातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच टीचर इनोव्हेशन फंडसाठी आपण वापरणार असल्याचे त्यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी शिक्षणासाठी दाखवलेल्या त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली. राज्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारणे व मुलांमध्ये शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी निश्चितपणे त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो आणि अशा उपक्रमशील शिक्षकांची राज्य तसेच देशाला खऱ्या अर्थाने गरज आहे, असेही मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलताना म्हणाले.