Home Blog Page 2370

म्हाडा वसाहतीच्या गृहनिर्माण संस्थांना सेवाशुल्कावर सूट देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. 16 : म्हाडा वसाहतीच्या 56 गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून  वाढीव सेवाशुल्कावर सूट देण्यासाठी शासन सकारात्मक असून यासाठी गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार तातडीने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

वर्षा निवासस्थान येथे म्हाडा वसाहतीच्या गृहनिर्माण संस्थांना सेवाशुल्कावर सूट देण्यासंदर्भात बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर, आमदार मंगेश कुंडाळकर, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी  राजीव निवतकर, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

निवासी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनीच्या थकीत सेवाशुल्कात सवलत देण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार अभय योजना तयार करून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा. तसेच भोगवटदार वर्ग -2 जमिनीचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करण्याची स्थगिती उठवून कार्यवाही सुरू करण्यात यावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

बैठकीत स्वदेशी मिल कंपाऊडमधील कामगारांच्या घराबाबत व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचे तसेच नेहरूनगर म्हाडा वसाहतीतील पोलिसांच्या सेवानिवासस्थानाच्या अनुषंगानेही चर्चा झाली.

दहशत निर्माण करून गोळीबार करणाऱ्या आरोपीस अटक

0
  • भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी.

पुणे- पूर्ववैमनस्यातून भांडणाचा राग मनात धरून एकावर गोळीबार करून फरार झालेल्या कुख्यात गुन्हेगार गणेश पवार याच्या टोळीतील दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सातारामधील सुरूस फाटा येथे सापळा लावून अटक केली आहे. सोन्या कांबळे आणि विशाल सोमवंशी अशी या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश पवार आणि त्याच्या टोळीने एकास गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर संबंधितास कोयत्याने व हाताने मारहाण करीत तेथील परिसरात दगडफेक करून स्थानिकांच्या मनात दहशत निर्माण केली. शनिनगर परिसरात गुरुवारी हा प्रकार घडला होता. या प्रकरणी सिद्धीकी मोला शेख (रा. शनिनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश पवार व त्याच्या टोळी विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याच्या तपास पथकातील पोलिस अंमलदार सर्फराज देशमुख आणि सचिन पवार यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की, पवार आणि सोन्या कांबळे यांनी गोळीबार केला आहे. कांबळे आणि विशाल सोमवंशी हे सातारा भागातील सुरूस फाटा येथे पळून गेले आहेत. त्यानुसार तेथे सापळा लावण्यात आला होता. तेव्हा त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

कांबळे याने गणेश पवार याच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचे तपासात पुढे आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, पोलिस अंमलदार संतोष भापकर, सोमनाथ सुतार, रवींद्र भोसले, अभिजित जाधव, गणेश शेंडे, राहुल तांबे आणि विक्रम सावंत यांनी ही कारवाई केली.

सरपंचपदाच्या सर्व आरक्षण सोडती रद्द; निवडणुकीनंतर नव्याने होणार आरक्षण सोडत – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

0

मुंबई, दि. 16 : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सरपंचपदासाठी झालेल्या आरक्षण सोडती रद्द करण्यात आल्या असून ही प्रक्रिया निवडणूक मतदानानंतर नव्याने घेण्यात येणार आहे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले.

11 डिसेंबर 2020 रोजीच्या पत्रानुसार सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर म्हणजेच 15 जानेवारी 2021 नंतर घेण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि, काही जिल्ह्यांमध्ये मात्र सरपंचपदासाठीच्या आरक्षण सोडती याआधीच झाल्याचे निदर्शनास आले आहे. या झालेल्या सोडतीही आता रद्द करण्यात आल्या असून त्याही आता निवडणुकीनंतर नव्याने घेण्याबाबतचे आदेश आज 16 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.

गैरप्रकारांना पायबंद बसण्याकरिता निर्णय

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, सरपंचपदाच्या आरक्षणानंतर संबंधित जातीच्या दाखल्यांची पडताळणी वेळेत न होणे, जातीचा दाखला अमान्य होणे तसेच बनावट प्रमाणपत्र सादर करणे इत्यादी कारणांमुळे निवडणूक रद्द करून पुनश्च नव्याने निवडणूक घेणे क्रमप्राप्त ठरते. या पार्श्वभूमीवर या बाबींचा सारासार विचार करून सरपंच आरक्षण सोडतीबाबत एकसमान धोरण असणे व होणाऱ्या गैरप्रकारांना पायबंद बसण्याकरिता तसेच योग्य व्यक्तीस न्याय मिळण्याच्या अनुषंगाने शासनाने ज्या जिल्ह्यांमध्ये सरपंचपदाची आरक्षण सोडत कार्यक्रम यापूर्वी राबविण्यात आला आहे त्या जिल्ह्यात सदर प्रक्रिया रद्द करून नव्याने सरपंच आरक्षण सोडत घेण्याबाबत निर्णय घेतला आहे. आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान कार्यक्रम 15 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. निवडणूक निकालाची अधिसूचना 21 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध होणार आहे. सबब सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच सरपंच व उपसरपंच यांची निवड निवडणूक मतदानानंतर शक्यतो लवकरात लवकर तथापि 30 दिवसांच्या आत राबविण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील तसेच राज्यातील कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर माहे मार्च 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली अशा ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मधील दि. 29 सप्टेंबर, 2020 रोजीच्या सुधारणेन्वये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच 11 डिसेंबर 2020 रोजीच्या पत्रान्वये राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे. तथापि, राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची उद्घोषणा होण्यापूर्वी काही जिल्ह्यांमध्ये सरपंचपदाची आरक्षण सोडत काढलेली होती व अद्यापही बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नाही. हा सर्व सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आता निवडणुकीनंतर होईल.

राज्यपालांनी केला प्लाझ्मा, रक्तदात्यांसह, पोलिस, अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सत्कार

0

मुंबई, दि. 16 : देशात कोरोनाच्या केसेस एकावेळी दरदिवशी ९४,००० मिळत होत्या. आज हीच संख्या ३०,००० पेक्षाही कमी झाली आहे. या संकट काळात आरोग्य कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी यांसह सामान्य माणसांनी आपापल्या परीने खूप मोठे योगदान दिल्यामुळेच देश कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्याच्या निर्णायक स्थितीत आला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

कोरोना काळात अनेकदा रक्तदान व प्लाझ्मा दान करून लोकांना जीवनदान देणाऱ्या जनसामान्य कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रात निरपेक्षतेने कार्य करणाऱ्या ३४ कोरोना योद्ध्यांचा बुधवारी राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे हृद्य सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीतर्फे आयोजित कोरोना योद्ध्यांच्या या सत्कार सोहळ्यामध्ये पत्रकार, संपादक, अन्नधान्य व मास्क वितरण करणारे समाजसेवी, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन व पोलीस कर्मचारी यांचा देखील स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष व पत्रकार राजेंद्र साळसकर, बांधकाम व्यावसायिक राहुल हजारे तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी आहार तज्ज्ञ डॉ.नुपूर कृष्णन, रेल्वे कामगार नेते डॉ. जनार्दन देशपांडे, पनवेलच्या निर्भीड लेखचे संपादक कांतीलाल कडू, पुरुषोत्तम पवार, मानसिंग चव्हाण, संजय कदम, सुरेश ढोमे, संत गाडगेबाबा धर्मशाळा ट्रस्टचे विश्वस्त हेमंत सामंत, सरस फाऊंडेशनचे अध्यक्ष, पंकज मेहतर, स्वाती जाधव, नितीन कोलगे, राजीव काळे, गणेश आमडोस्कर, थेलेसेमिया निर्मूलन कार्यकर्ते जयराम सुधाकर नाईक, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत म्हात्रे, रक्तदाते प्रशांत घाडी, विक्रम यादव, किरण म्हात्रे, विश्वास दाते, दीपक घाडीगावकर, हनुमंत कुमार, साईनाथ गवळी, शशिकांत मुबरे, संदेश पुरळकर, गणेश बाळकृष्ण शिंदे, जयकुमार सातलेकर, रविंद्र कदम, गजानन नार्वेकर, अग्निशमन कर्मचारी भावेश  पवार, अमृता चव्हाण, ऋषीकेश साबळे, संजय कुलकर्णी, विकास येवले व संतोष शेते यांचा यावेळी कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.

नागपूर येथील डॉ.आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या आर्थिक अनियमिततेच्या चौकशीचे निर्देश

0

मुंबई, दि. 16 : सामाजिक न्याय विभागांतर्गत २०१७ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान संस्थेच्या कारभारात प्रचंड अनियमितता आढळल्याने याबाबतची चौकशी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

मंत्रालय येथे संस्थेच्या संचालक मंडळाची आढावा बैठक श्री.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

बैठकीदरम्यान सन २०१८-१९ चा लेखापरीक्षण अहवाल संचालक मंडळापुढे ठेवण्यात आला. TACS & कंपनी या सनदी लेखापाल संस्थेने केलेल्या लेखापरीक्षणा (२०१८-१९) मध्ये संचालक मंडळाने त्रुटींचे निरीक्षण नोंदवले.

संस्थेला मागील ३ वर्षात दिलेल्या १६ कोटी रुपये खर्चाचा हिशोब समाधानकारक नसल्याचे सनदी लेखापाल यांच्या अहवालात दिसून आले. यामध्ये निविदा प्रक्रिया न राबविता कामे देणे अथवा निविदा प्रक्रिया चुकीची राबविणे, खर्चाच्या देयकांवर संबंधितांच्या स्वाक्षऱ्या नसणे किंवा त्यासोबतचे व्हाऊचर न ठेवणे, खर्चाचा मेळ न लागणे, सनदी लेखापाल यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन न देणे या बाबी समोर आल्याने श्री.मुंडे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

या  प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी प्रधान सचिव, सामाजिक न्याय यांच्या अध्यक्षतेखाली  चौकशी समिती नेमण्यात यावी व चौकशी समितीमध्ये आयुक्त, समाज कल्याण, पुणे व महासंचालक, बार्टी यांचा समावेश करावा. तसेच समितीने एक महिन्यात चौकशी अहवाल दिल्यानंतर तो पुढील संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येऊन त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश श्री.मुंडे यांनी दिले आहेत.

संचालक मंडळाच्या बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री विश्वजीत कदम, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, ‘बार्टी’चे महासंचालक धम्मज्योती गजभिये, उपसचिव दिनेश डिंगळे उपस्थित होते.

एचसीएमटीआरचा खर्च १० पटीने वाढण्याची प्रशसान वाट पाहत आहे का? आबा बागुलांचा सवाल

0

पुणे- १९८७ साली आखणी केलेल्या वर्तुळाकार मार्गाचा खर्च अजून १० पटीने वाढण्याची वाट प्रशासन पाहत आहे का असा सवाल करत या उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार रस्त्याची (एच.सी.एम.टी.आर.) फेर निविदा तातडीने काढण्यात यावी अशी मागणी महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.

१९८७ च्या विकास आराखडयामध्ये एच.सी.एम.टी.आर रस्त्याची आखणी करण्यात आली होती.सदर रस्ता करणेबाबत अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत असून अनेक लेखी पत्रे दिलेली आहेत.शहरातील वाहतूक समस्येमुळे अपघाताचे व मृत्युचे प्रमाण वाढत असून मृत पावलेल्या कुटुंबियांचे अतोनात नुकसान होत आहे. वाहतूकीचा समस्या सोडविणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. सदर प्रकरणी मुख्य सभेपुढे देखील लेखी प्रश्न दिलेले आहेत. एच.सी.एम.टी.आर रस्ता शहराच्या वाहतूकीच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा असून यामध्ये बीआरटी मार्ग देखील आहेत. तसेच एच.सी.एम.टी.आर रस्त्याची जे.एम. झाली असून कन्सलटंट देखील नेमण्यात आला आहे. एच.सी.एम.टी.आर रस्ता करणेसाठी बहुतांशी जागेचे भूसंपादन देखील झालेले आहे.

शहरासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या याप्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागून निविदा प्रक्रिया देखील राबविण्यात आली होती. ही निविदा जादा दराने आल्याने रदद करण्यात आली. या प्रकल्पाचे पैसे टप्याटप्याने देण्यात येणार असून ३ वर्षात रस्ता करण्यात येणार होता. सदर प्रकल्प तातडीने मार्गी लागणे आवश्यक असून या प्रकल्पाचा सदयस्थितीतील खर्च दहा पटीने वाढल्यावर प्रशासन निविदा प्रक्रिया राबविणार का ? असा प्रश्न उभा आहे. शहरात दैनंदिन अपघाताची संख्या वाढत असून मृत्युचे प्रमाण वाढत आहे.

शहरातील अत्यंत महत्वाचा एच.सी.एम.टी.आर.योजनेबाबत महापालिका आयुक्त यांचे दालनात बैठक झाली असून योवळी आबा बागूल यांनी विचारणा केली असता आयुक्तांना प्रशासनाकडून एच.सी.एम.टी.आर योजनेची सर्व माहिती देणेबाबत ठरले होते. परंतु प्रशासनाने अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. वास्तविक सदर प्रकल्पासाठी मुख्य सभा व स्थायी समिती यांची मान्यता झाली आहे, निविदा मागविली आहे, असे असताना प्रशासन उदासीन असल्याने शहरात वाहतूक समस्या उदभवून प्रदूषणात वाढ होत आहे. एकदा निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर त्याची फेरनिविदा मागविणे क्रमप्राप्त ठरते. सदर निविदा प्रक्रिया अद्याप रद्द झालेली नाही.
सदर महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेणेसाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे असून एच.सी.एम.टी.आर रस्ता करणेसाठी प्रशासनाने राबविलेल्या निविदेची फेरनिविदा तातडीने काढावी अशी मागणी आबा बागुल यांनी केली आहे.

वर्षा बंगल्याच्या नुतनीकरणासाठी भरमसाठ खर्च झाल्याचे वृत्त तथ्यहीन

0

मुंबई, दि १६ : मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या नुतनीकरण कामासाठी सुमारे ९२ लाख रुपयांची  कामाची निविदा काढण्यात आली असून यावर ८९ लाख ९० हजार रुपयांचे काम आत्तापर्यंत करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.

काही माध्यमांमध्ये वर्षा निवासस्थानासाठी ३ कोटी २६ लाख रुपये खर्च झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे मात्र केवळ ९१ लाख ८७ हजार रुपयांच्या मर्यादेत काम होत आहे.

मलबार हिलवरील वर्षा तसेच इतर मंत्र्यांचे बंगले हे खूपच जुने झाले असून आवश्यक ती दुरुस्ती व नूतनीकरण गरजेचे होते असे सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे.

बोगस विक्री बिले निर्गमित प्रकरणी न्यायालयीन कोठडीस मुदतवाढ

0

मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी बोगस विक्री बिले निर्गमित करणे व त्याद्वारे 185 कोटीहून अधिक रकमेचा बोगस Input Tax Credit इतर कंपन्यांना उपलब्ध करुन देणे, या आरोपाखाली दिलीप रामगोपाल टिबरेवाल यांस अटक केली होती. आरोपीस न्यायालयाने 5 डिसेंबर 2020 पर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या विरोधात श्री.टिबरेवाल यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज करुन आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. सदर अर्जावर सुनावणी होऊन अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने श्री.टिबरेवाल यांचा जामीन अर्ज फेटाळला असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत दि.18 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

सदर आदेश पारित करताना न्यायालयाने, अशा प्रकारच्या गुन्ह्यात जामीन अर्जाचा विचार करताना, ‘व्यक्तिगत स्वातंत्र्य, जामीन मिळाल्यास त्याचे होणारे सामाजिक व आर्थिक परिणाम आणि तपास यंत्रणांना तपासासाठी लागणारा आवश्यक कालावधी’ या साऱ्यांचा समतोल राखणे गरजेचे असल्याचे मत नोंदविले आहे. तसेच न्यायालयीन कोठडीत असताना श्री.टिबरेवाल यांचा पुढील जबाब नोंदविण्यासाठी न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना परवानगी दिली आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत ‘जल आराखडा’ तयार करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

0

मुंबई, दि. 16 : जलजीवन मिशनमध्ये राज्य शासनाचा 50 टक्के सहभाग असून राज्याच्या ग्रामीण भागात घराघरातील नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविणे हे राज्य शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाण्याबाबतचे कालबद्ध नियोजन करणे आवश्यक आहे. पाण्याचे नियोजन करीत असताना नैसर्गिक, कृत्रिम पाणीसाठे याबाबतचा जल आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जलजीवन मिशन अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव संजय कुमार, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, जलजीवन मिशनच्या संचालक श्रीमती आर.विमला यांच्यासह विभागाचे अन्य अधिकारी आणि गडचिरोली, ठाणे, चंद्रपूर, रत्नागिरी, नांदेड, सिंधुदुर्ग, जळगाव, लातूर, रायगड, नाशिक, अहमदनगर, वर्धा, जालना, कोल्हापूर या जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, 31 मार्च 2021 पर्यंत ठरविण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करीत असताना प्रत्येक जिल्ह्याची पाण्याबाबतची परिस्थिती कशी आहे, पाण्याची उपलब्धता कशी आहे, पाण्याचे स्त्रोत कसे आहेत याबाबत प्रत्येक जिल्ह्याचा पाणी साठवणूक आराखडा तयार करण्यात यावा. जेणेकरुन या आराखड्यानुसार जेथे पाण्याची उपलब्धता आहे त्या गावांतील नळ पाणी पुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करता येतील आणि जेथे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नाहीत तेथे जिल्हानिहाय पाणी साठवणूक आराखडा तयार करून हा आराखडा पुढील बैठकीत सादर करण्यात यावा. जलजीवन मिशन अभियानाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या योजना या गावातील पाण्याचे स्त्रोत, तसेच पाण्याचे उद्भव लक्षात घेऊनच तयार करण्यात यावेत.

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी या योजनेसाठी उपलब्ध असून यासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही. पाणी पुरवठा हा राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येक कुटुंबाला नळातून पाणी मिळणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. जलजीवन मिशन अभियानापूर्वी राज्यामध्ये राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित होती. याअंतर्गत 3,400 योजना अपूर्ण आहेत. या अपूर्ण योजनांची कामेही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राधान्याने पूर्ण करावीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात अनेकदा वेगवेगळ्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू असते. त्यामुळे अनेकदा जीवनावश्यक योजनांच्या अंमलबजावणीची कामे थांबवली जातात. हे योग्य नसून याबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा करून मार्ग काढावा. जीवनावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला इतर कोणत्याही कामासाठी नियुक्त करू नये, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

कोल्हापूर जिल्ह्याचे नळ जोडणीचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण

कोल्हापूर जिल्ह्याने सन 2020-21 या वर्षी देण्यात आलेले नळ जोडणीचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण केल्याने या जिल्ह्याचे आणि संबंधित अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. कोल्हापूर जिल्ह्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून इतर जिल्ह्यांनीही पुढाकार घेऊन देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केले.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील म्हणाले, राज्यात 142.36 लाख कुटुंब असून प्रत्येक कुटुंबाला नळाने पिण्याचे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट येत्या चार वर्षात पूर्ण करायचे आहे. सन 2020-21 या वर्षामध्ये 43.51 लाख नळजोडणीच्या उद्दिष्टासह 9 जिल्ह्यांमध्ये 100 टक्के घरांना नळाने पाणी पुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, केंद्र शासनामार्फत सन 2009-10 पासून सुरु असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व वाड्या/वस्त्यांना 40 LPCD नुसार पेयजल सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत होत्या. जल जीवन मिशनच्या कार्यरत मार्गदर्शन सूचनांनुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाना सन 2024 पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे 55 LPCD  प्रमाणे गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

कसबा मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

0

पुणे- कसबा पेठ मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास आज प्रारंभ झाला. महात्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्या जवळ या अभियानास प्रारंभ करण्यात आला.कसबा मतदार संघाचे क्षेत्र समन्वयक बाळासाहेब मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले. ते पुढे म्हणाले शिवसेना पक्षाचे विचार जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविणे तसेच नागरिकांना पक्षाची भूमिका समजून सांगणे, जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून आगामी महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे अधिक नगरसेवक निवडून आणणे हा मुख्य हेतू या सदस्य नोंदणी मागे आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना शहर कार्यालयाचे सचिव मकरंद पेठकर, आणि माजी शहर प्रमुख रामभाऊ पारीख यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे, महापालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेविका संगीता ठोसर, नगरसेविका पल्लवी जावळे, स्वाती ढमाले, सविता मते, पद्मा सोरटे, स्वाती कथलकर, कस्तूरी पाटिल,प्रज्ञा सोनकर, युवराज पारिख,सागर पेटाडे, राजेश बारगुजे, किशोर रजपूत,जवान बासुंदीवाले,बकुळ डाखवे,नागेश खडके, नंदू काळे, हेमंत पवार,चंदन साळुंखे ,गनी पठान,हर्षद मालुसरे, उमेश गालिंदे, सागर भोसले, प्रवीण डोंगरे,वसंत कशाले,जितेंद्र निजामपुरकर, अजय परदेशी,राहुल जेटके, सनी गवते, राजेश मोरे, हनुमंत दगडे, राजन नायर, युवराज शिंगाडे, युवराज जाधव, विजय ठकार व इतर सर्व शिवसैनिक उपस्थित होते.हे अभियान पुढील १० दिवस चालू राहणार असून नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन बाळासाहेब मालुसरे यांनी केले आहे.

दहापेक्षा जास्त भाजप आमदार नाराज, लवकरच ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील; जयंत पाटील

0

मुंबई-भाजपमधील दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा धक्कादायक खुलासा राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. एका वृत्त वाहिणीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासून भाजपमधील काहीजण आमच्याशी चर्चा करत आहेत. भाजपमध्ये त्यांना योग्य स्थान दिलं जात नसल्याने ते नाराज आहेत. ते सर्व आमदार राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक असून, लवकरच त्यांना पक्षप्रवेश होईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

भाजपची धमकी अन माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी मुश्रीफ म्हणाले की, राजीव आवळे हे जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार आहेत. पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी पक्षातून राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपने धमक्या देऊन त्यांचा पक्षप्रवेश करुन घेतला. आवळे यांच्यापासून सुरुवात होत आहे. यापुढे अनेकजण भाजपमधून राष्ट्रवादीत येतील, असे मुश्रीफ म्हणाले.

शेतक-यांशी चर्चा करुन लवकरात लवकर कृषि कायद्यात बदल करावा – दया सिंग(अध्यक्ष ऑल इंडीया पीस मिशन)

0

पुणे-केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात विविध राज्यातले शेतकरी बांधव तसेच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी तळ ठोकून आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी केंद्र सरकारने आणलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 20 हून अधिक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ही करण्यात आला आहे. केंद्र सरकारने एक पाउल मागे घेउन हे कायदे रद्द करुन शेतक-यांशी चर्चा करुन एक नविन कायदा आणण्यात यावा अशी मागणी ऑल इंडीया पीस मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दया सिंग यांनी पत्रकार परिषदेत केली.

दया सिंग म्हणाले कि, केंद्र सरकारने 20 सप्टेंबर 2020 रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले. त्या कायद्यांना शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि त्यासाठीचं हे आंदोलन सुरू आहे. खरं तर पंजाबमधील शेतकरी कायदे मंजूर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजे सप्टेंबरपासून आंदोलन करत आहेत. मात्र ऑक्टोबर महिन्यात या आंदोलनानं आक्रमक रूप घेतलं आणि आता हे आंदोलन देशाच्या राजधानीच्या सीमेवर पोहोचलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या आंदोलनाची गंभीर दखल घेत चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. आज भारत सोडून शेजारील देशांची अवस्था आपण पाहत आहोत. अन्न न पिकवल्यामुळे आज तिकडे अराजकता माजली आहे. त्यामुळे भारतात अशी अराजकता माजू नये म्हणून लवकरात लवकर शेतक-यांशी चर्चा करुन यावर तोडगा काढण्यात यावा अन्यथा परिस्थिती आणखीण भिषण होऊ शकते असे दया सिंग म्हणाले.

४९ वा विजय दिनाच्या निमित्ताने विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते निवृत्त सैनिकांचा सन्मान

0

मुंबई- – आजच्याच दिवशी १९७१च्या युद्धावेळी पाकिस्तानच्या तब्बल ९३ हजार सैनिकांनी भारतीय सैन्याचा पराक्रम पाहून शरणागती पत्करली होती आणि भारताचा विजय झाला होता. त्यामुळे आजचा १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येते. आज ४९ वा विजय दिवसाच्या निमित्ताने निवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला. सैनिक फेडरेशनतर्फे शिवाजी मंदिर दादर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारत मातेच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या बहादूर सैनिकांना नमन आणि सर्व जवानांना विजय दिनाच्या हार्दीक शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन विजय दिवस साजरा केला. निवृत्ती सैनिकांच्या ज्या समस्या असतील त्या सैनिकांच्या समस्येसाठी मी आपल्या पाठीशी आहे असेही दरेकर यांनी सांगितले.
यावेळी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष व निवृत्त ब्रिगेडिअर सुधीर सावंत, मुंबईचे अध्यक्ष सुभाष दरेकर यावेळी उपस्थित होते.
सैनिकांविषयी तज्ञ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा खूप दिवस महत्वाचा आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट आली, तेव्हा शत्रू देशाला सैनिकांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. सैनिकांचा सन्मान जपण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. देशातील सैनिकांना हिंम्मत आणि धैर्य देण्याचं काम त्यांनी केले. आपण जेव्हा आपला सण आपल्या कुटुंबियांसोबत साजरा करत असतो, तेव्हा देशाचा सैनिक सीमेची रक्षा करत असतो. त्यांची पत्नी, मुले, आई संपूर्ण कुटुंब त्यांच्याशिवाय सण साजरा करतात. याप्रसंगी मी तुमच्या सोबत आहे अशी भावना व्यक्त करण्याचे काम पंतप्रधान मोदी नेहमी करत आहेत, असेही विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
सैनिक आपली अनेक वर्ष देशाच्या सेवेसाठी देतो, परंतु निवृत्त झाल्यानंतर त्यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण होतात. मुलांच्या शाळेचा प्रश्न, राहत्या घराचा प्रश्न, नोकरीचा प्रश्न त्यादृष्टीने राज्य सरकारकडून कायमस्वरुपी योजना तयार करण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकार आणि फेडरेशन मिळून या योजना राबवण्याची गरज आहे. त्यामुळे निवृत्त सैनिकांच्या कल्याणासाठी ठोस गोष्टी करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
निवृत्त सैनिकांसाठी मुंबईत कार्यालय झाले तर सैनिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, त्यांच्या विविध समस्यांना गती येईल असे सांगतानाच दरेकर यांनी आजच्या दिवसाच्या निमित्त आपल्या आमदार निधीतून १५ लाख रुपयाचा निधी देण्याची घोषणा केली.
यावेळी सैन्यातील काही निवृत्त अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष व निवृत्त ब्रिगेडिअर सुधीर सावंत, मुंबईचे अध्यक्ष सुभाष दरेकर यावेळी उपस्थित होते.

पुणे विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 625

0

पुणे विभागातील 5 लाख 23 हजार 786 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 5 लाख 50 हजार 790 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे,दि.16 :- पुणे विभागातील 5 लाख 23 हजार 786 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 50 हजार 790 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 625 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 379 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.10 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 53 हजार 216 रुग्णांपैकी 3 लाख 35 हजार 861 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 804 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 551 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.09 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 231 रुग्णांपैकी 50 हजार 373 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 114 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 753 रुग्णांपैकी 44 हजार 797 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 288आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 668 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 280 रुग्णांपैकी 45 हजार 250 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 307 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 723 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 310 रुग्णांपैकी 47 हजार 505 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 112 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 693 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 696 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 509 , सातारा जिल्ह्यात 59, सोलापूर जिल्ह्यात 104, सांगली जिल्ह्यात 12 तर कोल्हापूर जिल्ह्यात 12 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 38 आहे. पुणे जिल्हयामध्ये 707, सातारा जिल्हयामध्ये 112, सोलापूर जिल्हयामध्ये 150, सांगली जिल्हयामध्ये 41 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 28 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 30 लाख 98 हजार 39 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 50 हजार 790 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 15 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

अभिषेक माने आणि श्रृती ब्रह्मभट्ट ठरले ‘मिस अ‍ॅंड मिस पुणे एलिट’ स्पर्धेच्या दुस-या पर्वाचे विजेते

0

पुणे: ‘मिस्टर अँड मिस पुणे एलिट’ स्पर्धेच्या दुस-या पर्वाचे विजेत्यांचा किताब अभिषेक माने आणि श्रृती ब्रह्मभट्ट यांना मिळाला आहे. चिराग वैद्य आणि लावण्या पति प्रथम उपविजेते झाले तर विपुल पाटील आणि श्रुती येवले या द्वितीय उपविजेते झाले. स्टारस्ट्रीम एंटरटेंनमेंटच्या वतीने आयोजित केलेल्या या सौंदर्य स्पर्धेमध्ये १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

स्पर्धेला ज्यूरी म्हणून फेमिना मिसेस स्टालिस्टा स्वाती सराफ, मिस महाराष्ट्र एलिट रिया मेहिंदिरत्ता, प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. जावेद खान, फिटनेस मॉडेल आणि अभिनेते गौरव सिपानी यांनी स्पर्धेचे ज्यूरी म्हणून काम पाहिले. यावेळी प्रिया राणा, कॉस्मोग्लिट्जच्या डिजायनर ममता मंगलाणी, लॅक्मे अ‍ॅकाडमी खराडी आणि नक्षत्र द रॉयल वेडींग तसेच प्रणल ऑर्गनाझेनचे प्रतिनिधी, सेलेब्रिटी फोटोग्राफर अर्णब घोष, शिवानी नागरे, उपस्थित होते.

स्टारस्ट्रीम एंटरटेंनमेंटच्या डायरेक्टर सोहेल सय्यद म्हणाले की, तरुण आणि तरुणींना सक्षम बनविणे आणि सकारात्मक स्व-प्रतिमा विकसित करण्याची संधी देणे हे आमच्या कंपनीचे लक्ष आहे. आम्ही तरुण पिढीला त्यांची कौशल्ये आणि वकृत्व क्षमता जोपासण्याची संधी उपलब्ध करुन देत आहोत. या स्पर्धेद्वारे आयुष्यभर आठवणी निर्माण करणार्‍या संधींची पूर्तता आणि अनुभव देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात मदत करतो. पुण्यात दुस-यांदा मिस्टर अँड मिस एलिट स्पर्धा आयोजित होत आहे. प्रश्नोत्तरांची फेरी, परिचय फेरी, रॅम्प वॉक आणि टॅलेंट राऊंड अशा विविध प्रक्रियेतून विजेत्यांची निवड केली गेली. विजेत्यांना रोख पारितोषिक, पोर्टफोलिओ शूट, ब्रँड शूट, मॉडेलिंग असाईनमेंट, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळाले.