पुणे असं आहे की इथं प्रत्येकाला सेटल व्हावं वाटतं. पण मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेष करून मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला लगावला आहे.
‘एकजण म्हणतो मी पुन्हा येईन दुसरा म्हणतो मी परत जाईन पण तुम्हाला बोलवले कुणी होते’ असे म्हणत अजित पवारांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पुणे विधान भवन येथे अजित पवारांच्या हस्ते चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पाटील यांच्या विधानाचा समाचार घेत अजित पवार म्हणाले की, लोकांनी पाच वर्षासाठी निवडून दिलं आहे. कोथरुडची कामे व्हावीत अपेक्षा आहे. उद्या लोकं कामे घेऊन गेले तर मी परत जाणार आहे सांगतील. मग आले कशाला? कोल्हापुरलाच थांबायचे होते, असे म्हणत अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
समाजसेवक कै. बाळासाहेब उर्फ तात्या कुदळे यांच्या स्मृती फलकाचे शानदार समारोहात अनावरण
पुणे- कार्यकर्त्यांच्या कामाची ,जिव्हाळ्याने जाण ठेवणाऱ्या नेत्यांची आज राजकीय क्षेत्राला गरज आहे , टी जाण पुण्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर ठेवतात हे त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळाले असे गौरौवदगार येथे राष्ट्रवादी चे शिरूर चे खासदार डॉ . अमोल कोल्हे यांनी येथे काढले. केळेवाडी तील सामाजिक कार्यकर्ते कै. बाळासाहेब उर्फ तात्या कुदळे यांच्या स्मृतीफलकाचे अनावरण काल संध्याकाळी डॉ. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.माजी उपमहापौर दीपक मानकर
श्रीमती अलकाताई कुदळे, नगरसेविका छाया मारणे, वैशाली मराठे, दत्ताभाऊ सागरे, हर्षवर्धन मानकर, करण मानकर, चंद्रकांत कुदळे, समीर कुदळे, नाना कुदळे व कुदळे परिवार या प्रसंगी उपस्थित होते.कुदळे परिवार तर्फे आलेल्या पाहुणायचे स्वागत करण्यात आले. खा. अमोल कोल्हे व दीपक मानकर यांचे स्वागत कुदळे परिवाराच्या वतीने चंद्रकांत कुदळे, समीर कुदळे, नाना कुदळे यांच्या हस्ते घोंगडी,महात्मा फुलेंची पगडी, काठी व प्रतापगड ची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आले. दीपक मानकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले.. बाळासाहेब कुदळे हे खऱ्या अर्थाने माझे सेनापती होते. त्यांच्या नाम फलकाचे उदघाटन करण्याची वेळ येईल असे वाटले नाही. सदैव हनुमान नगर मध्ये सर्वांसाठी धावून जात असत, प्रत्यकाच्या अडचणीत उभे राहून त्या अडचणीचे निवारण करायचे. बाळासाहेब कुदळे यांची पत्नी श्रीमती अलकाताई कुदळे या प्रसंगी मानकारांनी शब्द दिले ” मी पण आपला एक मुला सारखा आहे, काही अडचण आपल्याला आली तर खंबीर पणे आपल्या पाठीशी उभे राहून आम्ही ती दूर करू. आपली सेवा ही माऊलीची सेवा समजून आपल्या सेवेत उपस्थित राहू. अमोल कोल्हे म्हणाले, दीपक भाऊ यांनी भौनिक होऊन आपले विचार व्यक्त केले. त्यावरून मी समजलो बाळासाहेब कुदळे किती महान आदर्श व्यक्ती होती. त्यांनी या कोरोना च्या काळात सर्वांना आपले समजून त्यांची सेवा केली हे खूप मोठे कार्य आहे, अस्या थोर व्यक्ती ला मी वंदन करतो. खूप कमी लोकं असतात जे आपले कुटुंबा पेक्षा अनेकांच्या कुटुंबियांना आपले समजून त्यांची सेवा करतात, त्याच्या मदतीला धावून जातात, त्यातले हे बाळासाहेब कुदळे. आज या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची मानकरांनी मला जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. या प्रसंगी हनुमान नगर येथील अनेक जेष्ठ मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्थावीक’ सुनील वडवेराव यांनी केले तर आभार चंद्रकांत कुदळे यांनी मानले.
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांवर आपली मोहोर उमटवणाऱ्या ‘खिसा’ या मराठी शॉर्टफिल्मची ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अधिकृत निवड झाली आहे. हा महोत्सव १६ ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान गोव्यात होणार आहे. पी.पी. सिने प्रॉडक्शन, मुंबई आणि लालटिप्पा निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रीतम मोरे यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे लेखन कैलास वाघमारे यांचे आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण विदर्भातील अकोला येथे झाले आहे. इस्तंबूल फिल्म अवॉर्ड्स २०२० मध्ये ‘खिसा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट पटकथा हे पुरस्कार मिळाले. तर अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या १० व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवातही ‘खिसा’ने सर्वोत्कृष्ट पटकथेच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले. तुर्कस्थानातील इस्तंबूल येथे मार्च २०२१ मध्ये होणाऱ्या आयएफएच्या वार्षिक लाइव्ह स्क्रीनिंग मेळाव्यात प्रतिष्ठित अशा गोल्डन स्टार पुरस्कारासाठी ही शॉर्टफिल्म पात्र ठरली असून डब्लिन इंटरनॅशनल शॉर्ट अँड म्युझिक फेस्टिव्हल २०२० मध्ये ‘खिसा’ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी नामांकन मिळाले आहे. या फेस्टिवलमध्ये या शॉर्टफिल्मचे प्रीमिअर ऑनलाईन स्क्रिनवर दाखवण्यात येणार आहे. मुंबई इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हलमध्येही ‘खिसा’ ने सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताच्या पुरस्कार मिळवला आहे. कॅनडाच्या मॉन्ट्रियल इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हल, २६ व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, डायोरोमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, अर्जेंटिनाच्या डायोरोमा इंडी शॉर्ट्स अवॉर्ड्स, ब्युनोस आयर्स, येथील महोत्सवांत ‘खिसा’ची अधिकृत निवड करण्यात आली आहे. २८ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत धर्मशाळा येथे होणाऱ्या धर्मशाळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही या शॉर्टफिल्मची निवड झाली होती. या वेळी या शॉर्टफिल्मचे वर्ल्ड प्रीमिअरही होणार होते मात्र सध्या सुरु असलेल्या महामारीमुळे या महोत्सवाचे आयोजन ऑनलाईन करण्यात आले. ललित कला अकादमीतर्फे ५४ वा राष्ट्रीय अकादमी पुरस्कार पटकावणारे राज प्रीतम मोरे आपल्या ‘खिसा’ या पहिल्या चित्रपटाबद्दल सांगतात, ”खिसा ही कथा देशाच्या सामाजिक वातावरणावर आणि खेडेगावातील आजही संकुचित असलेल्या दृष्टिकोनावर भाष्य करणारी आहे. महाराष्ट्रातील एका लहान गावात इतर मुलांच्या खिशापेक्षा मोठा खिसा शिवून घेणाऱ्या मुलाची खिशात न मावणारी कथा म्हणजे ‘खिसा’ मन हेलावून टाकणारी ही कथा आहे.” या शॉर्टफिल्ममध्ये कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, श्रुती मधीदीप, डॉ. शेषपाल गणवीर आणि वेदांत श्रीसागर यांच्या भूमिका असून याला पारिजात चक्रवर्ती यांचे संगीत लाभले आहे. संकलनाची धुरा संतोष मैथानी यांनी सांभाळली असून सिमरजितसिंह सुमन यांनी फोटोग्राफीचे दिग्दर्शन केले आहे.
पुणे : कोथरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण कोल्हापूर ला परत जाणार असं आज पुण्यात बोलताना सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ कोथरुड विधानसभेसाठी इच्छुक होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी हसत हसत कोल्हापूर ला जाणार अशी टिप्पणी केली असली तरी, हे बोलताना देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आणि विरोधकांनाही हे सांगून टाका की, आपण कोल्हापूर ला परत जाणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आपल्या भाषणातून त्यांनी मोहोळ यांची तारीफ केली .मात्र ते मेधा कुलकर्णी , मोहोळ ,खा. बापट यांपैकी कुणावर नाराज आहेत कि महापालिकेच्या कारभारावर नाराज आहेत म्हणून हे वक्तव्य त्यांनी केले हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही .
पुणे- देशातील तरुणाईच्या कल्पनाशक्तीचा वापर करून रोजगार निर्मिती करण्यासाठीची राज्याची स्टार्टअप पॉलिसी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने केली. मागील चार वर्षात देशातील सर्वाधीक स्टार्टअप, विशेषत: शेती उद्योग व विपणनातील सर्वाधिक स्टार्टअप हे महाराष्ट्रात सुरू झाले. यामुळे आपल्याकडील तरुण शेतकरी शेतीमाल जागतिक पातळीवर स्पर्धा करू लागला आहे. याचे सर्व श्रेय डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. महापौर मुरलीधर मोहोळ अध्यक्ष असलेल्या कोथरूड येथील संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा अटल संस्कृती गौरव पुरस्कार पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेता गणेश बिडकर, गायिका पद्मजा फेणाणी, वैशाली माशेलकरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की भारत देशाला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे अटलजी. देशातील शास्त्रज्ञांनी अणुसज्जता अगोदरच केली होती. परंतू अमेरिकेच्या दबावाखाली अणु चाचणी केली नव्हती. आपल्याशिवाय जगाचे चालू शकणार नाही, हे ओळखणार्या अटलजींनी अणुचाचणी केली. डॉ. माशेलकरांनी विज्ञानाचा वापर मानवजातीसाठी कसा करता येउ शकतो, यासाठी त्यांनी महात्मा गांधीजीच्या शाश्वत विचाराची कास धरली. देशातील महत्वाच्या निर्णयाकरिता माशेलकर कमिटी स्थापन करावी लागली, याचे कारण त्यांची जबाबदारीने काम करायची वृत्ती. यामुळे अटलजींनी देखिल त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात डॉ. माशेलकर यांच्यावर विश्वास टाकला होता. देशातील तरुणाईकडे प्रचंड कल्पनाशक्ती आहे. या कल्पनाशक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून दिले, तर पुढच्या काळात रोजगार स्टार्टअपच्या माध्यमातून होईल. राज्याने डॉ. माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली देशातील पहिली स्टार्टअप पॉलिसी तयार झाली. त्यांच्या स्टार्ट पॉलिसीमुळे राज्यात सर्वात अधिक स्टार्टअप सुरू झाले. ऍग्री बिझनेसमध्ये सर्वाधिक स्टार्टअप झाले. आज शेतातील माल थेट जागतिक पातळीवर जाउ लागला, सर्वाधीक रोजगार निर्माण झाला याचे श्रेय डॉ. माशेलकर यांच्याकडे जाते.
डॉ. माशेलकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, आयुष्यात अनेक पारितोषिक मिळाली आहेत. परंतु हा अटल पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. युगपुरूष अटलजींच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचे महत्वच वेगळे आहे. अटलजींचे प्रेरणादायी नेतृत्व, त्यांचे मार्गदर्शन मला सीएसआयआरमध्ये असताना मिळाले. सीएसआयआर चे नेतृत्व करताना त्यांनी मला स्वातंत्र्य दिले, पाठींबा दिला. त्यामुळे सीएसआयआर संस्था जगामध्ये दहा क्रमांकांमध्ये आलो. यावेळी डॉ. माशेलकर यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या आठवणी सांगितल्या. परंतू शिक्षकांना प्रतिष्ठा देण्याबाबत त्यांचे स्वप्न अपुर्ण राहीले, ते पुर्ण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
महापौर मुरलीधर मोहोळ हे सर्व विषयांना चांगला न्याय देतात. कोरोना काळातही टीका होत असताना संयमाने त्यांनी परिस्थिती हाताळली. मागील तीन वर्षांपासून ते उत्तमोत्तम व्यक्तिमत्वांना हा पुरस्कार देतात असे चंद्रकांत पाटील या वेळी बोलताना म्हणाले.
जगात काहीही घडले तरी पुणेकर त्याचे नाते पुण्याशी जोडतो – गिरीष बापट
गिरीष बापट म्हणाले, जगात काहीही घडले तरी आम्ही त्याचे नाते पुण्याशी जोडतो. बायडेन अध्यक्ष झाले, तर म्हणतात ते पुण्याचेच होते, पुर्वीचे भिडे, इंदिरा गांधी येथील हुजूरपागा शाळेत शिकल्याचे सांगतात. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले , त्यांचे काका पुण्यातच राहातात, असे पुणेकर आहेत, डॉ. माशेलकर हे गोव्याचे असले तरी त्यांची नाळ पुण्याशी जोडले आहे. त्यांच्या हातून उत्तमोत्तम कार्य घडेल, ही शुभेच्छा.
उपस्थितांचे स्वागत मुरलीधर मोहोळ, मोनिका मोहोळ, सुनील महाजन यांनी केले. सुनील महाजन यांनी आभार मानले. भार्गवी चिरमुले आणि नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघ यांचा या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार सोहोळ्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित गीत नया गाता हूँ हा गीत, संगीत आणि नृत्यावर आधारित दृक-श्राव्य कार्यक्रम झाला. संवाद पुणे निर्मित या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी अटलजींच्या रचना तर अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी नृत्यरचना सादर केल्या. नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांचे होते.
मुंबई- चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्र महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याच्या धास्ती घेतलेल्या राज्य सरकारने आता या क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देवून कोट्यवधीची आर्थिक गुंतवणूक करणारे धोरण आणत जात असले तरीहि यामध्ये बड्या कंपन्यांना पायघड्या घातल्या जातील आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या स्थानिक मराठी मातीतल्या चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राची मोठी गळचेपी होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. काही दिवांपूर्वीच उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत येवून चित्रपट क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या निर्माते आणि उद्योजकांना “आमच्याकडे चला. तुम्हाला हव्या तेवढ्या पायाभूत सुविधा देतो”. असे आवाहन केले होते.यामुळे महाराष्ट्रात एकच वाद निर्माण झाला होता. आता जवळ- जवळ आपला चित्रपट उद्योग हा उत्तर प्रदेशाला निघाल्यात जमा असल्याची चर्चा तेव्हा झडली गेली होती. याची लगेच दखल राज्य सरकारने घेतली. अन् त्यानुसार राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रपट नगरीच्या प्रशासनाला तातडीने चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देणारे नवीन धोरण तयार करण्याचे आदेश दिले होते.याबाबत दि.११ डिसेंबर रोजी अधिकृत बैठक ही झाली होती. त्यानुसार याबाबतचे धोरण आता अंतिम टप्प्यात असून लवकरच या धोरणाचा मसुदा मंत्रिमडळासमोर मान्यतेसाठी येण्याची शक्यता आहे. परंतु सध्या आर्थिक अडचणींत असलेल्या मराठी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्राला या धोरणात खूपच नगण्य स्थान देण्यात आलेले आहे. असे जाणकारांचे मत आहे. साधारणपणे पाचशे ते एक हजार कोटीची गुंतवणूक करणाऱ्या संस्थां आणि कंपन्या यामध्ये आपला सहभाग घेवू शकतात. असे या फिल्म उद्योग धोरणाचे प्रारूप तयार केले असल्याचे समजते. त्यामूळे एक तर अमेझॉन, रिलायन्स , रामोजी फिल्म सिटी , Netflix अथवा विदेशातील चित्रपट उद्योगातील मोठ्या कंपन्या या क्षेत्रात पैसे गुंतवणूक करू शकतात. महाराष्ट्रातील एकही मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माता आपले या उद्योगात पैसे गुंतवणूक करू शकणार नाही.हे स्पष्ट झाले आहे. जे गुंतवणूकदार स्वतः जमीन खरेदी करून चित्रपट सृष्टी उभी करीत असेल त्यांना मालमत्ता करात मोठी सवलत मिळणार आहे. वीज बिल,पाणी बिल,मनोरंजन कर सवलत, आदी ऊद्योग क्षेत्राला ज्या – ज्या सवलती मिळत आहेत.अगदी तशा सर्व सवलती या क्षेत्रात गुंतवणुक करणाऱ्यां उद्योगपतींना आणि निर्मात्यांना मिळणार असल्याचे कळतेसांगण्यात येते . या धोरणामध्ये जी.एस. टी सवलत देण्यात आलेली असून .चित्रपट नगरीमध्ये ज्या कंपन्या पायाभूत सुविधा करिता कोट्यवधी रुपये गुंतवणुक करणार आहे.त्यांना सवलातीमध्ये अनेक वर्षाच्या करारावर जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कळते.सध्या या खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने “विशेष लक्ष” घालून जेवढ्या बाहेरच्या कंपन्यांना सवलती देता येतील तेवढे प्रयत्न केलेला आहे.मात्र यामुळे मराठी चित्रपट सृष्टीची पुन्हा एकदा गळचेपी होणार आहे.अशी भीती निर्माण झाली आहे.
पुणे-महापारेषणच्या रास्तापेठ जीआयएस (Gas Insulated Substation)132 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये शनिवारी (दि. 26) सकाळी 8 वाजेपासून ते रविवारी (दि. 27) रात्री 8 वाजेपर्यंत पूर्वनियोजित देखभाल दुरुस्तीचे विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे महावितरणच्या एकूण 6 उपकेंद्रांचा वीजपुरवठा 36 तास बंद राहणार असल्याने या उपकेंद्रांसह शहरातील मध्यवर्ती परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
महापारेषणच्या 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद राहणार असल्याने महावितरणला सुमारे 60 ते 65 मेगावॉट विजेचे भारव्यवस्थापन करावे लागणार आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत तसेच शनिवारी व रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने विजेची मागणी कमी राहणार आहे. तथापि विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्यास किंवा पर्यायी व्यवस्थेमधील वीजवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास शहराच्या मध्यवर्ती परिसरात चक्राकार पद्धतीने दीड ते दोन तासांचे भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. मात्र ही परिस्थिती उद्भवूच नये यासाठी मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी तांत्रिक आढावा घेतला असून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सतर्क राहून युद्धपातळीवर प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी संबंधितांना केल्या आहेत.
महाराष्ट्रातील पहिले जीआयएस 132 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र नऊ वर्षांपूर्वी महापारेषणकडून रास्तापेठ येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. या उपकेंद्रातील पूर्वनियोजित मेनबस व गॅस चेंबर तसेच इतर तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे कामे तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनात दि. 26 ते 27 रोजी करण्यात येणार आहे. या उपकेंद्राचा वीजपुरवठा 36 तास बंद राहणार असल्याने महावितरणच्या रास्तापेठ, पद्मावती व पर्वती विभाग अंतर्गत कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, रास्तापेठ, भवानी पेठ, नाना पेठ, जुना मोदी खाना, कॅम्पचा काही परिसर, गुलटेकडी, गंजपेठ, सॅलिसबेरी पार्क, घोरपडे पेठ, डायस प्लॉट, लोहियानगर, हाईडपार्क, महर्षीनगर, मुकुंदनगर या परिसरामध्ये महावितरणच्या इतर उपकेंद्रांद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज आहे. तथापि भारव्यवस्थापन शक्य न झाल्यास किंवा पर्यायी व्यवस्थेमधील वीजपुरवठ्यात तांत्रिक अडचण उद्भवल्यास नाईलाजास्तव चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण व महापारेषणकडून करण्यात आले आहे.
पुणे, दि. 25:- राज्याची क्रीडाविषयक कामगिरी आणखी उंचावण्यासाठी भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिली.
क्रीडामंत्री सुनील केदार म्हणाले, राज्याची क्रीडा विषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार कोच/प्रशिक्षक तसेच, खेळाडू निर्माण व्हावेत, हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे. क्रीडा हा शिक्षणाचा अविभाज्य भाग असून क्रीडा व शैक्षणिक गुणवत्ता महत्त्वाची असल्याने क्रीडा क्षेत्राला गतिमानतेने पुढे नेण्यासाठी क्रीडा वैद्यकशास्त्र व पूरक बाबींमध्ये आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. क्रीडाविषयक प्रगत अभ्यासक्रम राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक यांना करता यावेत यासाठी क्रीडा विद्यापीठ असणे आवश्यक आहे, असेही श्री. केदार म्हणाले.
क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आवश्यक अधिनियम प्रारुप तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती असे सांगून श्री. केदार म्हणाले, या समितीने सादर केलेल्या अधिनियम प्रारुप विधेयकास विधि व न्याय विभागाच्या मान्यतेनंतर मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ प्रारुप विधेयकास मंत्रिमंडळासमोर मान्यताही देण्यात आली आहे. विधानमंडळ अधिवेशनात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अधिनियम महाराष्ट्र मंजूर करण्यात आला आहे.
राज्यात पुण्यातील बालेवाडी येथे सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल सुरु आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने होत असते. यामुळे हे विद्यापीठ सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात कार्यान्वित करण्यात येणार आहे व नंतरच्या कालावधीत या विद्यापीठाकरीता स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येईल. यासाठी अनावर्ती खर्च रु. २०० कोटी व विद्यापीठ कॉर्पस फंडसाठी रु.२०० कोटी याप्रमाणे एकूण रु.४०० कोटी खर्च अपेक्षित असल्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
यावेळी आमदार अशोक पवार, शिक्षण तज्ञ डॉ. जवाहर सुरीशेट्टी, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते.
क्रीडा विद्यापीठ मिशन :
संशोधन, प्रशिक्षण व कौशल्य विकास यामधील गुणवत्ता गाठण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ तयार करणे.
क्रीडा विद्यापीठ दृष्टिकोन (व्हिजन) :
खेळ व तंदुरुस्तीच्या विकासासाठी पूरक यंत्रणा तयार करणे.
क्रीडा विद्यापीठ ध्येय (मोटो) : क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करुन महाराष्ट्र व भारत हे क्रीडा क्षेत्रात प्राधान्य देणारे ठिकाण म्हणून परिचित व्हावे.
क्रीडा विद्यापीठ उद्दिष्टे : भारतामधील अव्वल खेळाडूंना अद्ययावत वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेऊन पाठिंबा देणे. क्रीडा कामगिरीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन करणे. प्रशिक्षित क्रीडा व्यावसायिकांचा विकास करणे. क्रीडा क्षेत्रात रोजगार निर्मिती करणे. क्रीडा प्रशिक्षक व संबंधितांना नियमित प्रशिक्षण उपलब्ध करुन देणे. आधुनिक स्पर्धात्मक खेळांबरोबरच पारंपरिक देशी खेळांचा विकास करणे. समाजातील दुर्बल घटकांना क्रीडा नैपुण्यासाठी विशेष प्राधान्याने संधी उपलब्ध करुन देणे. खेळाडू, क्रीडा तज्ञ, क्रीडा वैद्यक तज्ञ, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा प्रशासक इत्यादींच्या सहकार्याने खेळाचा दर्जा उंचावणे. अल्प व मध्यम मुदतीचे अभ्यासक्रम सुरु करुन उत्तम दर्जाचे क्रीडा मार्गदर्शक तयार करणे.
पुणे-भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगीतले आहे की, गेल्या ६ वर्षांमध्ये म्हणजेच २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील शेतकरी सुखी, समाधानी आणि सुरक्षित व्हावा यासाठी त्यांनी अनेक योजना राबविल्या. या देशामध्ये शेतकऱ्यांचं दुखणं ओळखलं ते फक्त मोदींजींनी. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुळशी तालुकाच्या भूगाव येथे आज भव्य शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी खासदार गिरीश बापट, माजी मंत्री बाळा भेगडे, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी आदी वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेअंतर्गत देशाच्या 9 कोटी शेतकऱ्यांनां 18 हजार कोटी रुपये वाटप करण्यासंबंधातील कार्यक्रमच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळेस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांची माहीती देत त्याचे महत्व पटवून दिले. पाटील म्हणाले , देशात कृषी कायद्याविरोधात कुठलीही नाराजी नाही. कारण दिल्ली वगळता देशभरात मध्यप्रदेश,कर्नाटक, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा आंध्र प्रदेश अशा कुठल्याही ठिकाणी शेतकरी आंदोलन करण्यात आलेले नाही. महाराष्ट्रातही काँग्रेसने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांचे कार्यकर्ते वगळता कोणीही रस्त्यावर उतरले नाहीत. देशभरातील शेतकरी कधीच रस्त्यावर उतरला नव्हता आणि आता देखील तो या कायद्याविरोधात उतरणार नाही असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
पंजाबमधील शेतकऱ्यांचा गैरसमज केला जातोय. दिल्लीतील आंदोलनापाठीमागे राजकीय स्वार्थ दडलेला आहे हे ज्यांच्या लक्षात आले आहे ते आता तिथून पळ काढत आहेत हे देखील पाटील यांनी नमूद केले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खताचा भ्रष्टाचार थांबावा,पाण्याची व्यवस्था व्हावी,पिक विमा मिळावा तसेच साखरेचे उत्पादन वाढल्यामुळे शेतकरी इथेनॉलकडे वळावा यासाठी भांडवल दिले. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी हे कायदे केले. देशातील मूठभर शेतकरी कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरत आहेत, जर सर्व शेतकऱ्यांना कृषी कायदा अन्यायकारक वाटला असता तर देशभर आंदोलन झाले असते. परंतु, दिल्लीच्या सीमेवरील शेतकरीआंदोलन हे पूर्वग्रहदूषित आणि राजकीय हेतूने करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चर्चा करा असे अनेकदा म्हणत आहेत.
कांग्रेसच्या दुटप्पीपणाच्या संस्कृतीवर प्रहार करताना चंद्रकांत पाटील यांनी सांगीतले की, दुटप्पीपणा हा काँग्रेसचा पहिल्यापासूनच स्थायीभाव आहे. शेतकरी, मराठा आरक्षण, ओबीसी, धनगर आरक्षणासह विविध मुद्द्यांवर काँग्रेसचे नेते हे ठरवून वेगवेगळे भाष्य करत गैरसमज निर्माण करण्याचे काम करत आहेत. हा तर त्यांचा धंदाच आहे, अशी टीका देखील पाटील यांनी यावेळी केली.
मुंबई दि. 25:- लोकमान्य टिळकांनी त्यांच्या गीतारहस्य या ग्रंथात भगवद्गीतेचा अर्थ कर्मयोगानुसार सांगितला आहे. त्यांनी भगवद्गीतेवर केलेल्या भाषणांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या संपूर्ण पिढीला प्रेरित केले. आज कर्म करण्याची मोठी आवश्यकता आहे. यासाठी परिश्रम, त्याग करणे गरजेचे आहे.आत्मनिर्भर भारताचे धेय साकारण्यासाठी देशाला टिळकांच्या कर्मयोगाची गरज आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यास यांच्या वतीने मैसूर असोसिएशन सभागृह, माटुंगा येथे गीता जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, भगवद्गीतेमध्ये भक्तियोग, संन्यास योग, कर्मयोग आणि ज्ञान योगाबद्दल सांगितले आहे. थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांना भगवद्गीतेने प्रेरणा दिली. गीता ग्रंथ वाचत असताना प्रत्येक वेळी नवीन अनुभव येत असतो. गीतेने मनुष्यमात्राला यशस्वी, सुखी, शांत आणि तृप्त जीवनाचा शाश्वत मार्ग दाखविला आहे. गीता जगाकडे व जीवन मार्गाकडे पाहण्याची मूलभूत अध्यात्मपर दृष्टी देणारा ग्रंथ आहे. आजच्या कलयुगामध्ये कर्मयोगाची नितांत गरज आहे.
दिनकर स्मृती न्यास संस्थेचे कार्य अतिशय चांगले आहे. यापुढेही या संस्थेने आपले कार्य निरंतरपणे चालू ठेवावे. या संस्थेच्या पुढील कार्यासाठी राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी 5 लाख रुपये देणगी दिल्याची घोषणा यावेळी केली .
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन तसेच दीपप्रज्वलन करुन करण्यात आली.
यावेळी संस्थेच्या वतीने राज्यपाल श्री. कोश्यारी यांना भगवद्गीतेचा हिंदी अनुवाद असलेला ग्रंथ भेट म्हणून देण्यात आली. रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यासचे नीरज कुमार,वरिष्ठ रंगकर्मी मुजीब खान , मुंबई विद्यापीठाचे माजी हिंदी विभागप्रमुख रतन कुमार पाण्डेय,उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आर पी सिंह ,चित्रपट निर्देशक पंकज नारायण, लोकमान्य टिळक स्वराज भूमी स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश सिलम यावेळी उपस्थित होते.
पुणे विभागातील 5 लाख 33 हजार 160 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 5 लाख 58 हजार 540 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि.25 :- पुणे विभागातील 5 लाख 33 हजार 160 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 58 हजार 540 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 856 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 524 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.46 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 59 हजार 90 रुग्णांपैकी 3 लाख 42 हजार 708 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 730 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 652 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.44 टक्के आहे. सातारा जिल्हा सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 906 रुग्णांपैकी 51 हजार 448 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 707 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 751 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 643 रुग्णांपैकी 45 हजार 801 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 146 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 696 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हा सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 452 रुग्णांपैकी 45 हजार 539 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 186 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 727 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 449 रुग्णांपैकी 47 हजार 664 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 87 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 791 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 605 , सातारा जिल्ह्यात 58, सोलापूर जिल्ह्यात 91, सांगली जिल्ह्यात 13 तर कोल्हापूर जिल्ह्यात 24 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण – पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 647 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 410, सातारा जिल्हयामध्ये 143, सोलापूर जिल्हयामध्ये 49, सांगली जिल्हयामध्ये 21 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 24 रुग्णांचा समावेश आहे. पुणे विभागातील सर्व्हेक्षण आजपर्यत विभागामध्ये एकुण 32 लाख 23 हजार 977 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 58 हजार 540 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 24 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )
पुणे- भूमिपूजन झाल्यावर महापालिकेने वेळेत आणि योग्य काम केले पाहिजे असे स्पष्ट निर्देश देत :कोरोना जातो आहे,पण अजून गेलेला नाही , अशा अवस्थेत रस्त्यांवर सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी काळ्जी वाढविणारी आहे असे प्रतिपादन आज येथे राष्ट्रवादी चे खासदार , अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केले . कोरोनाच्या काळात येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश कदम आणि परिवाराने केलेल्या कामाचा गौरव करून त्यांनी आज .बिबवेवाडी तील सुखसागर नगर 1 येथे कात्रज कोंढवा रोड ते गंगा ओशन सोसायटी पर्यंत ४०० मिमी व्यासाची स्वतंत्र पाण्याची नलिका टाकणे ,तसेच महावीर नगर ते प्रेरणा हॉस्पिटल पर्यंत ३०० मिमी व्यासाची स्वतंत्र नलिका टाकणे, सुखसागर नगर भाग 2 करीता कात्रज कोंढवा रोड ते खंडोबा मंदिर पर्यंत ४०० मिमी पाण्याची एक्स्प्रेस नलिका टाकणे या सह विविध कामाचे भूमिपूजन केले .यावेळी नगरसेवक प्रकाश कदम यांनी ‘ कोणी कोणाचे कार्य आणि कला चोरू शकत नाही असे सांगत आपल्या विरोधकांना गर्भित इशारा दिला .
पुणे- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका, स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा अहवाल हा पारंपारिक तसेच डिजिटल स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळ -जवळ संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीमध्ये प्रदर्शित करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व नागरी पुरवठा छगन भुजबळ , आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहनिर्माणमंत्रीजितेंद्र आव्हाड, ग्रामविकासमंत्री हसनजी मुश्रीफ, कामगार व राज्य उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्यायमंत्री .धनंजय मुंडे साहेब, अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोरोनाच्या अडचणीच्या काळात केलेल्या आरोग्य विषयक कामाची दखल घेऊन कौतुक केले तसेच पुणे शहरात काम करत असताना ज्या काही अडचणी येतील त्यासाठी शासनाकडून नक्कीच सहकार्य लाभेल असे सांगितले. तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील करोना काळामध्ये केलेल्या कामाचे कौतुक करून आरोग्य संदर्भामध्ये येणाऱ्या अडचणींवर नक्कीच शासनाच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल व त्या संदर्भात मतदारसंघांमध्ये भेट देण्यात येईल असेही आश्वासित केले.
अश्विनी नितीन कदम (नगरसेविका) एक क्लीक वर अहवाल आपण आपल्या मोबाईल वर पाहू शकाल तसेच इतरांना सोशल मीडिया द्वारे आपण पाठवू शकाल .अहवाल वाचण्यासाठी दिलेली लिंक आपल्या इंटरनेट ब्राउजर वर टाईप करून पाहू शकाल. http://ashwininitinkadam.dreamdzire.in
पुणे- केंद्राचे नवे कायदे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून मुक्त करणारे आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. पण फक्त राजकारणासाठी मोदी सरकार शेतकरीविरोधी असल्याचे चित्र रंगवले जात आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले. पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , आ. सिद्धार्थ शिरोळे , आ. राहुल कुल, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक , भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, बाबुराव पाचर्णे, दिलीप कांबळे, मांजरीचे सरपंच शिवराज अप्पा घुले आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले , सध्याच्या बाजार समितीच्या व्यवस्थेत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते. मोदी सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांची या पिळवणुकीपासून मुक्तता होणार आहे. मात्र केवळ राजकीय स्वार्थासाठी या कायद्याबाबत शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. कंत्राटी शेती बाबतचा कायदा २००६ पासून महाराष्ट्रात आहे. मात्र कंत्राटी शेतीतून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची एकही तक्रार आलेली नाही. त्यावेळी हा कायदा करणारे आज नव्या कायद्यांना विरोध करीत आहेत. मोदी सरकारने नव्या कायद्यात कंत्राटी शेतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. यावेळी फडणवीस यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांचा विस्ताराने आढावा घेतला. ते म्हणाले की , मोदी सरकारने साखरेची किमान खरेदी किंमत निश्चित केली. याचा फायदा कोट्यवधी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना झाला. इथेनॉल वापराला प्रोत्साहन दिल्यामुळे यापुढील काळात साखर कारखाने उसाला चांगला भाव देऊ शकणार आहेत. राज्य सरकारने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना काहीच मदत केली नाही , असेही ते म्हणाले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सामान्य शेतकऱ्यांचा फायदा करून देणारे अनेक क्रांतीकारी निर्णय मोदी सरकारने गेल्या ६ वर्षांत घेतले आहेत. साखर निर्यातीसाठीचे अनुदान ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणारे सरकार देशाने प्रथमच पाहिले आहे. नव्या कृषी कायद्यांमुळे सामान्य शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याने काही मूठभर मंडळी या कायद्यांना विरोध करत आहेत . मात्र शेतकरी वर्ग या प्रचाराला बळी पडणार नाही.
पुणे- पुणे महापालिकेत समाविष्ट होणार असलेल्या २३ गावांच्या विकासासाठी निधीची आकांडतांडव कशासाठी असा सवाल करीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुणे शहर आणि जिल्ह्यावर बारकाईने लक्ष आहे ,विरोधकांनी त्याची काळजी करू नये ,जे भाजपचे नेते ओरड करत आहेत त्यांनी , भाजपच्या स्थानिक आमदारांनी या समावेशाचे स्वागत केले आहे याकडे आज राष्ट्रवादी चे खासदार ,अभिनेते डॉ . अमोल कोल्हे यांनी लक्ष वेधले आहे. याशिवाय कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी ‘ हे काम रखडण्या मागे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत ते ओळखावे असेही मत प्रदर्शित केले .आज सकाळी डॉ. अमोल कोल्हे हे बिबवेवाडी तील सुखसागर नगर 1 येथे कात्रज कोंढवा रोड ते गंगा ओशन सोसायटी पर्यंत ४०० मिमी व्यासाची स्वतंत्र पाण्याची नलिका टाकणे ,तसेच महावीर नगर ते प्रेरणा हॉस्पिटल पर्यंत ३०० मिमी व्यासाची स्वतंत्र नलिका टाकणे, सुखसागर नगर भाग 2 करीता कात्रज कोंढवा रोड ते खंडोबा मंदिर पर्यंत ४०० मिमी पाण्याची एक्स्प्रेस नलिका टाकणे या सह विविध कामाच्या भूमिपूजनासाठी येथे आले होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी या बाबी स्पष्ट केल्या . कात्रज ते देहूरोड बायपास वरील नवले ब्रिज येथे सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत हे देखील त्यांनी स्पष्ट केले . नगरसेवक प्रकाश कदम, मगराज शेठ राठी ,प्रतिक कदम,माजी नगरसेविका भारती कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.