Home Blog Page 23

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते शिक्षक व पदवीधर प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध

पुणे, दि.३ : पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. त्याअंतर्गत विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या.

यावेळी अपर आयुक्त तुषार ठोंबरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर तसेच नोंदणीकृत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या कार्यक्रमांतर्गत आत्तापर्यंत पदवीधरसाठी २ लाख ७२ हजार ४४ तर शिक्षक मतदार संघासाठी ४४ हजार २१४ मतदारांनी नोंदणी केली असल्याचे सांगून विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, मतदार याद्या नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत १८ डिसेंबर २०२५ पर्यंत नमुना क्रमांक ७ व ८ मध्ये दावे व हरकती दाखल करता येतील. याद्वारे प्रारुप मतदार यादीतील नावांबाबत आक्षेप असल्यास दाखल करता येईल. विद्यमान यादीतून नाव वगळण्यासाठी अथवा नावात दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ७ सादर करावा लागेल. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या दावे व हरकतींवर सहायक मतदान नोंदणी अधिकारी ५ जानेवारी पर्यंत निकाल देतील. त्यानंतर १२ जानेवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची प्रक्रिया निवडणूक जाहीर होईपर्यंत सातत्याने सुरु राहणार असल्याचे डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी सांगितले.

सन २०२६ मध्ये पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त आहेत. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते मतदार नोंदणीचे काम सुरु असून सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पात्र मतदारांना नाव नोंदणीसाठी प्रवृत्त करावे, असे आवाहनही डॉ. पुलकुंडवार यांनी केले.

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहंस्तातरणाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

▪️ जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहंस्तांतरण प्रकरणाचा आढावा

पुणे, दि. 3: सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तातंरणाबाबत प्रलंबित प्रकरणांचा विचार करता प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, तसेच मानीव अभिहंस्तांतरण आदेश व प्रमाणपत्र निर्गमित केल्यानंतर मानीव अभिहसतांतरण दस्त म्हणजेच खरेदीखत ची लवकर नोंदणी व्हावी व त्यात एकसूत्रीपणा असावा याकरिता पुणे शहरातील एकूण 27 सह दुय्यम निबंधक कार्यालय पैकी 2-3 सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी यांना पदनिर्देशीत अधिकारी म्हणून करण्यात घोषित करण्यात येईल. त्याचं बरोबर नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यावर प्रशासन व पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे मानीव मानीव अभिहंस्तांतरण जिल्हास्तरीय समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर संजय राऊत, पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त पंकज पाटील, पुणे शहरचे प्रशासकीय अधिकारी मंगेश खामकर, पुणे ग्रामीणचे प्रशासकीय अधिकारी अनिल जगताप, महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था अपार्टमेंट्स महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, पुणे गृहनिर्माण सोसायटी फेडरेशनचे ॲड वसंत कर्जतकर आदी उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, महाराष्ट्र मालकी हक्काच्या संदनिकांबाबत (त्या बांधण्यास प्रोत्सहान देणे, त्याची विक्री, व्यवस्थापन व हस्तातरण यांचे नियमन करण्याबाबत) नियमन 1963 नुसार नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांबाबत संस्था नोदंणी झाल्यानंतर 4 महिने कालावधी पूर्ण होताच अभिहस्तांतरण पूर्ण करण्यात यावेत. तथापि याअनुषंगाने अद्यापही ठोस कार्यवाही होतांना दिसून येत नाही, त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अभिहस्तांतरण पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सर्वसमावेशकपणे कार्यवाही करावी. सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्थांचे अभिहस्तांतरण पूर्ण करण्यासाठी कायद्यानुसार गतीने कार्यवाही करुन प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावेत, विकासकानेही स्वत:हून पुढे येवून मानीव अभिहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही श्री. डुडी म्हणाले.

श्री. राऊत म्हणाले, पुणे शहराअंतर्गत एकूण पुणे शहरातंर्गत एकूण नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था २२ हजार ९५५ आहेत. मानीव अभिहस्तांतरण प्राप्त प्रस्ताव एकूण ६ हजार ५५३ पैकी निर्णय ६ हजार २२४ प्रकरणावर कार्यवाही करण्यात आली आहे. थेट विकसकाने अभिहस्तांतरण करुन दिलेल्या ३ हजार ५७ संस्थां आहेत. मानीव अभिहस्तांतरणबाबत अडीअडचणी आल्यास जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था कार्यालय तसेच पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही श्री. राऊत म्हणाले.

श्री. पटवर्धन म्हणाले, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहंस्तांतरणबाबत महासंघाच्या वतीने प्रशासनाला सहकार्य करण्यात येत आहे. समितीच्या वतीने नोंदणी व मुद्रांक विभागाकडे पाठपुरावा करुन याप्रकरणी एक खिडकी योजना आण्यात यावी, अशी सूचना श्री. पटवर्धन यांनी केली.

नवीन आधार ॲपमध्ये घरी बसून पत्ता-नाव बदलता येईल:मोबाइल नंबर बदलण्याची सुविधा सुरू; कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही

आता तुम्ही घरबसल्या आधार कार्डमध्ये नोंदणी केलेला मोबाइल नंबर बदलू शकता. सरकारने आधार ॲपमध्ये ही सुविधा सुरू केली आहे. तसेच, पत्ता, नाव आणि ईमेल आयडी अपडेट करण्याची सुविधा लवकरच सुरू होईल. नवीन डिजिटल सेवेची घोषणा आधारचे नियमन करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) या संस्थेने केली आहे.

या बदलांसाठी वापरकर्त्यांना कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता भासणार नाही. ॲपवर ओटीपी पडताळणी आणि फेस ऑथेंटिकेशनद्वारे सर्व काही बदलता येईल. या सेवेमुळे दुर्गम भागातील लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि स्थलांतरितांना सोपे होईल.
नवीन सेवा कशी काम करेल?

UIDAI नुसार, ॲपद्वारे आधारमधील अपडेट प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची किंवा प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता नाही. संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होईल.

जर तुम्ही ॲप डाउनलोड केले नसेल तर ते डाउनलोड करून सेटअप करावे लागेल. यासाठी पायऱ्या…

सर्वात आधी वापरकर्त्यांना AADHAAR ॲप डाउनलोड करावे लागेल.
येथे वापरकर्त्यांना आपला आधार क्रमांक टाकून लॉगिन करावे लागेल.
नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, त्याचे व्हेरिफिकेशन करावे लागेल.
पुढील वापरासाठी 6 अंकी लॉगिन PIN सेट करावा लागेल.
ॲपमध्ये मोबाइल नंबर कसा अपडेट होईल?

6 अंकी पिन टाकून आधार ॲपमध्ये लॉगिन करा.
खाली स्क्रोल करा, सेवांमध्ये ‘माय आधार अपडेट’ वर क्लिक करा.
सर्वात आधी मोबाइल नंबर अपडेट करण्याचा पर्याय दिसेल, क्लिक करा.
येथे आवश्यक तपशील वाचा, कंटिन्यू वर क्लिक करा.
सध्याचा मोबाइल नंबर टाका, ओटीपी (OTP) व्हेरिफाय करा.
नवीन मोबाइल नंबर टाका, ओटीपी (OTP) व्हेरिफाय करा.
फेस ऑथेंटिकेशन होईल, कॅमेऱ्यात पाहून एकदा डोळे मिटा आणि उघडा.
पेमेंट करण्याचा पर्याय दिसेल, ₹75 जमा केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.

आधार मोबाइल अपडेट का आवश्यक आहे?

आधार कार्ड ही देशातील सर्वात मोठी ओळख सेवा आहे, ज्यामध्ये 130 कोटींहून अधिक लोकांचा डेटा जोडलेला आहे. मोबाईल नंबर हा त्याचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण याच नंबरवर OTP द्वारे बँक खाते, सरकारी सबसिडी, आयकर पडताळणी आणि डिजीलॉकरसारख्या डिजिटल सेवांपर्यंत पोहोच मिळते.

जर क्रमांक जुना झाला किंवा हरवला तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आतापर्यंत तो अपडेट करण्यासाठी नोंदणी केंद्रात जावे लागत होते, जिथे बायोमेट्रिक पडताळणी आणि लांब रांगांचा त्रास होता. पण आता UIDAI डिजिटल पद्धतीने हे सोपे करणार आहे.

UIDAI ने गेल्या महिन्यात आधार ॲप लॉन्च केले होते

एक महिन्यापूर्वी UIDAI ने आधार कार्डचे नवीन मोबाईल ॲप लॉन्च केले होते. यात वापरकर्ता एकाच फोनमध्ये 5 लोकांचे आधार ठेवू शकतो. यात आधारची फक्त तीच माहिती शेअर करण्याचा पर्याय आहे, जी आवश्यक असते.

या ॲपमध्ये तुम्ही UPI मध्ये ज्या प्रकारे स्कॅन करून पेमेंट करता, त्याच प्रकारे आधार तपशील शेअर करू शकता. ॲपला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी यात फेस ऑथेंटिकेशनसारखी वैशिष्ट्ये जोडली गेली आहेत.

आधारच्या नवीन ॲपची वैशिष्ट्ये

फोनमध्ये आधार सोबत ठेवा: ई-आधार नेहमी सोबत राहील, कागदी प्रतीची गरज नाही.
फेस स्कॅन शेअरिंग: आयडी शेअर करण्यासाठी फेस स्कॅन करावे लागेल, पिन-ओटीपीप्रमाणे सुरक्षित.
सुरक्षित लॉगिन: बायोमेट्रिक प्रमाणीकरणाने ॲप उघडेल.
बहु-भाषा समर्थन: हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध.
ऑफलाइन वापर: इंटरनेट नसतानाही आधार पाहता येईल.

सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 21 व्या ‘सेवा कर्तव्य त्याग’ सप्ताह उपक्रमाचे उद्घाटन

0

समाजात बुद्धिभेद निर्माण करणे भाजपचे काम तर, एखाद्या गोष्टीवर ताबा मिळवणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम _ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ

पुणे _
प्रामाणिकपणा हा आपल्या देशाचा मूळ स्वभाव असून तो सध्या आपण विसरत चाललो आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) काम समाजात बुद्धिभेद निर्माण करणे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम एखाद्या गोष्टीवर ताबा मिळवणे आहे.आपला स्वाभिमान आपली भाषा ,धर्म, लिंग यात नाही तर इतिहासात आणि कर्तृत्ववात आहे. आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आपण समजून घेतला पाहिजे असे मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.

काँग्रेसचे माजी आमदार मोहनदादा जोशी यांच्या संकल्पनेतून काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या व यूपीएच्या अध्यक्षा खा. सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त २१ व्या ‘सेवाकर्तव्यत्याग’ सप्ताह या उपक्रमाचे आयोजन दि. २ ते ९ डिसेंबर २०२५ या कालावधीत करणात आले आहे. याचे उद्घाटन मंगळवारी एस.एम.जोशी फाउंडेशन सभागृह नवी पेठ, पुणे येथे करण्यात आले.काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार होते. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक आणि प्रदेश काँगेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहनदादा जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, संजय बालगुडे, श्रीरंग चव्हाण, कैलास कदम,अविनाश साळवे, सुनील मलके, वीरेंद्र कराड, चंद्रशेखर कपोते,अमीर शेख, हनुमंत पवार, अविनाश बागवे,काँग्रेस महिला शहराध्यक्ष स्वाती शिंदे, युवक काँग्रेस अध्यक्ष चेतन अग्रवाल, सौरभ अमराळे, लता राजगुरू उपस्थित होते.

सपकाळ म्हणाले, महात्मा गांधी यांना आपण राष्ट्रपिता म्हणतो कारण हा देश एकसंध कधी नव्हता पण गांधी यांनी भारत नावाचे स्पंदन निर्माण करून “राष्ट्र” नावाची संकल्पना सर्वांच्या मनात रुजवली. भारत या संकल्पनेला जन्म देण्याचे महत्वपूर्ण काम गांधी यांनी केले. राजकारणात सध्या सेवेचे नाही तर मेवा मिळवण्याचे खटाटेप सुरू आहे. सेवाच्या मागे मेवा आहे की भय आहे हे तपासून पहिले पाहिजे. जेल मध्ये गेल्यावर माणसाचे मानसिक संतुलन बिघडते कारण तिथे डांबून ठेवले जात कोणते स्वातंत्र्य मिळत नाही. त्यामुळे काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य दिले हे समजून घ्यावे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या योगदानाबाबत आपण विसरत आहे. सोनिया गांधी यांना अनेक अडचणी राजकारणात आल्यावर आल्या परंतु त्यावर त्यांनी मात केली. २२ वर्षाचा असताना त्या विवाह करून भारतात आल्या आणि २२ वर्ष संसार राजीव गांधी यांच्या सोबत केला. पण,त्यानंतर देखील देशाची सून म्हणून त्या अद्याप काम करतात याचा अभिमान देशवासीयांना वाटला पाहिजे.सोनिया गांधी एक विचार असून त्या त्याग, विचार संस्कृती पुढे घेऊन जात आहे. राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्याचे काही पडले नाही. काँग्रेस नेतृत्व आणि विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे ते काम करत आहे.राज्याचे मुख्यमंत्री हे समता, बंधुता, मूल्यांवर नांगर फिरवत आहेत.सगळ्या जातीत भांडणे लावली जात आहेत.राज्यघटना आणि लोकशाही फासावर लटकवण्याचे प्रकार सुरू आहेत.महाराष्ट्रातील सामाजिक व्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे मी त्यांची तुलना औरंगजेबाशी केली होती यात माझी जीभ काय घसरली.संविधान दिनाच्या दिवशी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना पकडण्यात आले त्यामुळे मी त्यांना जल्लाद म्हणालो. नथुराम, जल्लाद, औरंगजेब, गजनी असे शब्द आजच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलावे लागणे दुःखदायक आहे.मात्र,आज देखील मी माझ्या या शब्दाबाबत मतावर ठाम आहे असे त्यांनी ठणकावून सांगितले.

उल्हास पवार म्हणाले, पुणे हे सुशिक्षतांचे शहर असून लोकांना काँग्रेसने काय केले हे माहिती नाही असे नाही. धर्मांधता आणि जातीयवाद याचे विष मोठ्या प्रमाणात सध्या पेरले गेले असल्याने लोकांना कोणते भान राहिले नाही.भाजपच्या काळात अनेक गोष्टी नामशेष करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे हे जनतेच्या समोर आले पाहिजे. एनडीए मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असताना त्याच महत्वपूर्ण संस्थेजवळ बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभारण्याचा नेमका हेतू काय हे तपासले पाहिजे. भाजप जवळ सांगण्यासारखे त्यांच्या सत्ता काळातील काहीच नाही. देशाचे ऐक्य हे सर्वधर्म समभाव मध्ये आहे.

मोहनदादा जोशी म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यात नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर झंझावती दौरा करून ६५ पेक्षा अधिक जाहीर सभा घेतल्या. मुख्यमंत्री यांच्या विरोधात कोणी बोलण्याची हिंमत करत नसताना,त्यांचा पर्दाफाश करून खरा चेहरा लोकांसमोर आणला. पक्षात संघटन बांधणी मधून काँग्रेस कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचे काम हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत सत्ताधारी यांना संदेश देण्यासाठी यंदाच्या वर्षी या सप्ताहाची सुरवात महत्वपूर्ण राहील. काँग्रेस पक्षाचे पक्ष “पंजा” चिन्हे एक आठवड्यात पाच हजार दुचाकीवर लावले जाईल. पुण्याला जागतिक दर्जाचे शहर करण्यात काँग्रेसचे योगदान महत्त्वपूर्ण असून काँग्रेस काळातील मोठया प्रकल्पाची माहिती प्रचार करण्याकरिता “होय हे काँग्रेसने केले” ही प्रचार मोहीम होर्डिंग्जद्वारे राबविण्यात येत आहे. आतापर्यंतचे काँग्रेस पक्षाचे योगदान प्रत्येक पुणेकर यांना अभिमान वाटावा असे आहे. पुणे शहर उभे करण्याचे काम काँग्रेसने केले आहे याबाबत कार्यकर्त्यांनी प्रचार करावा.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘सेवाकर्तव्यत्याग’ सप्ताह या उपक्रमाचे संयोजक माजी आमदार मोहनदादा जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश अबनावे यांनी तर आभार प्रदर्शन गौरव बोराडे यांनी केले.

पुणे-अबु धाबी विमानसेवेला सुरुवात : मुरलीधर मोहोळ

  • आंतराष्ट्रीय संपर्क वाढविण्यासाठी आणखी एक पाऊल

पुणे : एअर इंडिया एक्सप्रेसने आजपासून पुणे–अबू धाबी थेट उड्डाण सेवा सुरू करत पुणे विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठून दिला आहे. शहराच्या वाढत्या जागतिक संपर्काच्या मागणीला प्रतिसाद देत सुरू करण्यात आलेली ही सेवा दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी रात्री २१:१० वाजता पुण्याहून अबू धाबीकडे रवाना होणार आहे. या नव्या मार्गामुळे पुण्याच्या नागरिकांसह व्यावसायिक, उद्योजक, विद्यार्थ्यांना आणि मध्यपूर्वेत कार्यरत असलेल्या हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुण्याला शिक्षण, आयटी, उत्पादन, स्टार्टअप्स, संशोधन, संरक्षण उद्योग आणि सांस्कृतिक वारसा या विविध क्षेत्रांत देश-विदेशात वेगळी ओळख आहे. अशा पार्श्वभूमीवर थेट आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांची उपलब्धता ही शहराच्या वाढत्या आर्थिक आणि औद्योगिक क्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. या नव्या उड्डाणामुळे परदेशी गुंतवणूक, व्यापार, पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना अधिक चालना मिळेल, ज्यामुळे पुण्याचे आंतरराष्ट्रीय पदचिन्ह आणखी विस्तारेल.

नवी सेवा सुरू झाल्यामुळे पुणे विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जा अधिक बळकट झाला असून, शहराच्या प्रगतीचा मार्ग अधिकच वेगाने खुला होत असल्याचे जाणवते. या कनेक्टिव्हिटीमुळे फक्त प्रवास सुकर होणार नाही तर जागतिक व्यापार, औद्योगिक संधी आणि नव्या बाजारपेठांमध्ये पुण्याच्या सहभागाला नवे दार खुले होणार आहे.

आंतरराष्ट्रीय कनेक्टिविटी वाढवायला आणखी प्राधान्य देणार: केंद्रीय मंत्री मोहोळ

या सेवेचे स्वागत करत केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे–अबू धाबी थेट उड्डाणाची सुरूवात ही शहराच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाची साक्ष देणारी आहे. मध्यपूर्वेशी कनेक्टिव्हिटी वाढल्याने व्यापार, उद्योग, पर्यटन, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. पुण्याच्या नागरिकांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील विमानतळ विकासाला आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीला अभूतपूर्व गती मिळाली आहे. पुणे विमानतळाच्या सर्वांगीण विस्तारासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत.”

संस्थेची संस्थाने झाली की चळवळ संपते : प्रा. मिलिंद जोशी

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे साहित्यप्रेमी भगिनी मंडळाला आदर्श संयोजक पुरस्कार प्रदान

पुणे : सरकारी यंत्रणांचा वापर करून संस्था ताब्यात घेणाऱ्या टोळ्यांचा सध्या सर्वत्र सुळसुळाट दिसून येत आहे. साहित्यसंस्था त्यांच्या केंद्रस्थानी आहेत. साहित्यबाह्य शक्तींना रोखण्यासाठी संस्थेतील कार्यकर्त्यांनी खंबीरपणे भूमिका घेऊन लढा उभारला पाहिजे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. 61 वर्षे अव्याहतपणे काम करून संस्थात्मक कार्याचा आदर्श वस्तूपाठ उभा केला आहे, अशा शब्दात त्यांनी साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचे कौतुक केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल साहित्यप्रेमी भगिनी मंडळाला आदर्श संयोजक पुरस्कार प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते आज (दि. 2) प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्ष अंजली कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला.

साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. मंदा खांडगे, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर यांची उपस्थिती होती. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम झाला.

प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले, एखाद्या पारंपरिक अथवा अभिमत विद्यापीठाने संशोधनाचे जे काम करायला हवे ते कोणत्याही पायाभूत सुविधा आणि अनुदानाशिवाय साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने केलेले आहे. मराठी साहित्यातील संशोधनाचे दालन या संस्थेच्या संशोधनात्मक प्रकल्पामुळे समृद्ध झाले आहे. ते पुढे म्हणाले, ज्या महाराष्ट्राला महात्मा गांधी यांनी कार्यकर्त्यांचे मोहोळ असे म्हटले होते त्या महाराष्ट्रात आज कुठे गेले कार्यकर्ते असा प्रश्न उपस्थित होताना दिसतो. संस्थात्मक कार्यासाठी कार्यकर्त्यांचा पुरवठा करण्याचे काम आजवर समाजातील मध्यमवर्गाने केले. आत्ममग्नतेमुळे मी आणि माझे या पलीकडे तो विचार करायला तयार नाही. त्यामुळे संस्थात्मक कार्याची मोठी हानी होत आहे. संस्थांची संस्थाने झाली की चळवळ संपते. संस्थात्मक कार्य करताना समाज मानस समजून घेत वेध-प्रबोध शक्तीचा वापर होणे आवश्यक आहे. समाजाने साहित्याभिमुख होणे गरजेचे असून सकारात्मकतेचा दीप सतत मनात ठेवून संस्थात्मक पातळीवर कार्य केल्यास ते यशस्वी होते.  

सत्काराला उत्तर देताना अंजली कुलकर्णी म्हणाल्या, साहित्यप्रेमी भगिनी मंडळ सातत्याने साहित्यिक उपक्रम राबवित आहे. या मंडळातर्फे गेली २८ वर्षे संशोधनात्मक कार्य अविरतपणे सुरू आहे हा संस्थेचा मानबिंदू आहे. डॉ. मंदा खांडगे यांच्या प्रयत्नाने सर्व साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे स्त्री साहित्य मुख्य प्रवाहात आणले गेले.

संस्थेच्या स्थापनेपासूनच्या आठवणी सांगत डॉ. मंदा खांडगे म्हणाल्या, एखाद्या संस्थेला उत्तम कार्यकर्ते लाभल्यास ती संस्था अवितरपणे कार्यरत राहू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे साहित्यप्रेमी भगिनी मंडळ होय.

सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविकात रंगत-संगत प्रतिष्ठानच्या वाटचालीची माहिती विशद करत पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली. मानपत्राचे लेखन प्रभा सोनवणे यांचे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित निमंत्रितांच्या कविसंमेलनात प्रभा सोनवणे, आश्लेषा  महाजन, शलाका माटे, मृणाल जैन, वासंती वैद्य, तनुजा चव्हाण, ऋचा कर्वे, यामिनी रानडे, आरती देवगावकर, नंदिनी चांदवले, कांचन सावंत, ज्योती देशपांडे यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.

शिवद्रोही भाजपा विरोधात आंदोलन,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक .

पुणे:- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास भंडारा येथे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी गमजा व टोपी चढवण्याचा निंदनीय प्रकार केला असून शिवभावनेला हा सरळ-सरळ धोका आहे. राज्यपाल, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार भाजपचे कुणीच शिवरायांचा मान राखताना दिसत नाही.
महाराष्ट्रात अशा शिवद्रोहाला कागदावर नाही तर रस्त्यावर उतरून उत्तर देणार असे सांगत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पुणे शहर तर्फे लाल महाल चौकात भाजपा विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.भाजपने वारंवार केलेला शिवद्रोह महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. छत्रपतींच्या अस्मितेचा प्रश्न आला की शिवसेना रस्त्यावर उतरणार असा इशारा यावेळी देण्यात आला .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून भाजपाच्या झेंड्यावर काळी शाई फेकण्यात आली यावेळी शिवप्रेमींनी एकसुरात घोषणा दिल्या
“छत्रपतींचा अपमान नाही सहेगा हिंदुस्थान!”
“शिवद्रोही भाजपा चा निषेध असो”
संपूर्ण लाल महाल परिसर घोषणांनी दणाणून गेला. पर्यटनासाठी आलेले नागरिकही स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभागी झाले आणि भाजपच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला.
शिवसेना सांगते
“छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्र कधीही माफ करणार नाही. जो शिवद्रोह करेल त्याला रस्त्यावर उतरून उत्तर देऊ!”

आंदोलनात शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, प्रशांत राणे, पंढरीनाथ खोपडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, कार्यालयीन सचिव मकरंद पेठकर, संघटक संतोष गोपाळ, विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण, संतोष भुतकर, प्रवीण डोंगरे, रूपेश पवार, अमर मारटकर, आरोग्य सेना समन्वयक रमेश क्षीरसागर, ग्राहक संरक्षण चे दिपक जगताप,महिला आघाडी च्या रोहिणी कोल्हाळ, पद्मा सोरटे, अंगणवाडी सेनेच्या गौरी चव्हाण,
शिवसैनिक वैभव दिघे, जुबेर शेख, अभिषेक जगताप, सूर्यकांत पवार, मोहन दिघे, निलेश वाघमारे, दत्ता करपे, संजय साळवी, रमेश परदेशी, संजय लाहोट, मिलिंद पत्की, राहुल शेडगे, प्रवीण रणदिवे, संतोष ढोरे, संजय वाल्हेकर, नागेश खडके, बकुळ डाखवे, जुबेर तांबोळी, निलेश पवार, अमित जाधव, सुधीर डाखावे, सुनील देवळेकर, मंगेश जाधव, प्रदीप विश्वासराव, अनिल जाधव, राजा गांजेकर, संतोष कांबळे, विनोद वांजले, शिवाजी मेलकेरी, प्रशांत काकडे, बंडू बोडके,
युवासेना सरचिटणीस परेश खांडके, विभाग संघटक सोहम जाधव, चिंतामणी मुंगी, वैभव कदम, निरज नांगरे, अक्षय हबीब, कैवल्य डोईफोडे
सहभागी झाले होते .


बुधवारी “हरित सेतू हटाव प्राधिकरण बचाव” आंदोलन

नागरिकांनी सहभागी व्हावे एनपीआरएफ फाउंडेशन चे आवाहन

पिंपरी, पुणे (दि. ०२ डिसेंबर २०२५) निगडी, आकुर्डी प्राधिकरण परिसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हरित सेतू प्रकल्पाअंतर्गत विविध विकास कामे सुरू आहेत. या प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून वाढवलेले देशी वृक्ष तोडण्यात येतील. त्यामुळे पर्यावरणाची हानी होईल. सर्व रस्ते छोटे करून पदपथ मोठे केले जात आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होऊन अनेक समस्या निर्माण होतील व अपघात होण्याची शक्यता आहे. हा हरीत सेतू प्रकल्प रद्द करावा, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी “निगडी प्राधिकरण रेसिडेंट फोरम फाउंडेशन” (एनपीआरएफ फाउंडेशन) या संस्थेच्या वतीने बुधवारी (दि.३ डिसेंबर), सायंकाळी पाच वाजता, हुतात्मा चौक, आनंद हॉस्पिटल जवळ, निगडी प्राधिकरण सेक्टर २६, २७ येथे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, या आंदोलनात परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
निगडी, आकुर्डी प्राधिकरण परिसरात हरित सेतू प्रकल्प करू नये यासाठी संस्थेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे येथील पदपथ मोठे आणि वाहतुकीचे रस्ते लहान होत आहेत. त्यामुळे ठीक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पार्किंग सुविधा नाही. पुढील काळात रुंद झालेल्या पदपथावर टपरी, पथारी, फेरीवाले, विक्रेत्यांचे अतिक्रमण होण्याची शक्यता आहे. या परिसरात रेल्वे स्टेशन, मोठ्या शाळा, महाविद्यालये, राज्य व केंद्र सरकारची, मनपाची अनेक कार्यालये आहेत. या परिसरात दिवसभर शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व कामगारांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. पिंपरी चिंचवड मधून रावेत, पुनावळे तसेच द्रुतगती महामार्गाकडे जाण्यासाठी येथे अहोरात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. अस्तित्वात असणारे रस्ते मुळातच कमी पडत आहेत. या परिसरात हरित सेतू प्रकल्प व्हावा अशी या परिसरातील कोणत्याही संस्था, संघटनांची व नागरिकांची मागणी नसताना देखील महानगरपालिकेचे हा प्रकल्प सुरू केला आहे. नागरिकांच्या गरजा, वाहतुकीची सध्याची परिस्थिती, परिसराची रचना याचा विचार केला नाही आणि खर्चिक, अनावश्यक प्रकल्प जबरदस्तीने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर गंभीर परिणाम होऊन अपघात होतील. या प्रकल्पाच्या विरोधात येथील नागरिकांनी वेळोवेळी निवेदने दिली आहेत. तरी महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी नागरिकांनी या आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन प्रशासना विरोधात निषेध नोंदवावा असेही आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

भाजप उमेदवार बोगस मतदान करुन घेत असल्याचा आरोप:फार्महाऊसवर EC ची धाड; बनावट ओळखपत्रे, शाई पुसण्याचे ‘केमिकल’ जप्त

0

बोगस मतदान करणाऱ्या 12 तरुणांना अटक

नागपूर _ मतदानाच्या दिवशी कामठी शहरात बोगस मतदानाचा मोठा कट उधळून लावण्यात आला आहे. नागपूर-कामठी रोडवर असलेल्या आशा हॉस्पिटलजवळील एका फार्महाऊसवर निवडणूक विभागाच्या पथकाने धाड टाकली असून, तेथे बोगस मतदानासाठी तयार करण्यात आलेली बनावट ओळखपत्रे आणि बोटावरील शाई पुसण्याचे द्रव्य (केमिकल) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय अग्रवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी भाजप उमेदवार अजय अग्रवाल हे यंत्रणेचा गैरवापर करून बोगस मतदान करवून घेत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक विभागाच्या पथकाने सुनील अग्रवाल यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर छापा टाकला. या कारवाईत पथकाला मोठ्या प्रमाणावर बनावट व्होटर आयडी कार्ड्स आणि बोटाला लावलेली शाई पुसण्यासाठी वापरले जाणारे संशयास्पद द्रव्य मिळून आले आहे. या फार्महाऊसवरूनच बोगस मतदानाचे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप करण्यात येत असून, घटनास्थळी सध्या मोठा गोंधळ सुरू आहे.

एकीकडे फार्महाऊसवर कारवाई सुरू असतानाच, दुसरीकडे कामठीतील ‘लाला ओळी’ परिसरातील मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 12 तरुणांना सतर्क नागरिक आणि पोलिसांनी रंगेहाथ पकडले. हे सर्व तरुण कन्हान येथील वाघधरे वाडी परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी धक्कादायक कबुली दिली. “आम्हाला प्रत्येकी 200 रुपये देऊन मतदान करण्यासाठी आणले होते,” असे या तरुणांनी सांगितले आहे. पोलिसांनी या सर्व 12 तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, एकाच वेळी फार्महाऊसवरील धाड आणि मतदान केंद्रावरील बोगस मतदारांची धरपकड यामुळे कामठीत राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. सुलेखा कुंभारे यांनी प्रशासनाला धारेवर धरले असून, भाजप उमेदवार अजय अग्रवाल यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

देशात मनमानी सुरू आहे!:राज ठाकरे यांचा मतमोजणी लांबणीवर टाकण्यावर संताप

मुंबई- देशात मनमानी सुरू आहे, अशा 4 शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाचा आजच्या निकालाने निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तबच झाले आहे, असे ते म्हणाले.

नागपूर खंडपीठाने मंगळवारी एका याचिकेवर सुनावणी करताना उद्याची मतमोजणी 21 तारखेपर्यंत लांबणीवर टाकली. कोर्टाच्या या निर्णयामुळे आता राजकीय पक्षांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राज ठाकरे यांनी केवळ 4 शब्दांत या निकालाचा समाचार घेतला आहे. देशात मनमानी सुरू आहे, असे ते म्हणालेत. त्यांच्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रोहित पवार म्हणाले, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी ही 3 डिसेंबरऐवजी 21 डिसेंबर रोजी एकत्रित करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने चिंता वाढली आहे. 21 डिसेंबरपर्यंत सर्वांनाच खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

आज उच्च न्यायालयाने निकाल पुढे ढकलण्यासंदर्भात दिलेला निकाल म्हणजे निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर केलेलं शिक्कामोर्तबच आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी नापसंती व्यक्त केली असली तरी निवडणूक आयोग पक्षाच्या दावणीला बांधला तर हेच होणार, हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये. राज्यात आज जो काही गोंधळ निर्माण झाला आहे त्यासाठी निवडणूक आयोगासह भाजपादेखील तेवढीच जबाबदार आहे, असे ते म्हणालेत.

निवडणूक आयोगाने मोठा घोळ घातला:निडवणुका पुढे ढकलण्याचा निर्णय अनाकलनीय, फडणवीस यांच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंचीही टीका

मुंबई- राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील अनागोंदीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला धारेवर धरत आयोगाचा हा निर्णय अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावत निवडणुका पुढे ढकलल्या. निवडणूक सरसकट पुढे ढकलणे योग्य नाही. आयोगाचा हा निर्णय अनाकलनीय आहे, असे ते म्हणालेत.

राज्य निवडणूक आयोगाने अनेक ठिकाणची स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक 20 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकली आहे. या प्रकरणी राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया येत असताना आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही आज होणाऱ्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकला आहे. यावर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी निवडणूक आयोगावर आगपाखड करताना म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने प्रचंड मोठा घोळ घातला आहे.

सरकारने या प्रकरणी नियमानुसार आपली बाजू सांगितली. पण आयोगाने ती ऐकली नाही. हे चुकीच्या पद्धतीने चालले आहे. ज्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने घोळ घातलात त्या प्रमाणे आता त्यांनी पुढे जावे. आगामी निवडणुका मोठ्या आहेत. हा घोळ राज्य निवडणूक आयोगाने संपवावा, अन्यथा आम्ही प्रचार करायचा आणि निवडणूक आयोगाने एक पत्रक काढून निवडणुका पुढे ढकलायच्या हे योग्य नाही. आयोगाने चुकीचा अर्थ काढून निवडणुका पुढे ढकलल्या. निवडणूक सरसकट पुढे ढकले योग्य नाही. आयोगाचा हा निर्णय अनाकलनीय आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपूर खंडपीठाने दिलेला निर्णय राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाला मान्य करावा लागतो. मी यापूर्वी अनेकदा आयोगाला अशा पद्धतीने निवडणूक लांबणीवर न टाकण्याची विनंती केली होती. पण नियमांचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. कारण, या संदर्भात कोणतीही हरकत किंवा तक्रार केली नव्हती. नियमांचा चुकीचा अर्थ काढून निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलली. किंबहुना निवडणूक पुढे ढकलायची होतीच, तर ज्या ठिकाणी आक्षेप होता, त्या ठिकाणच्या ढकलायच्या होत्या. यंदा पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे.

ते म्हणाले, निवडणूक लांबवणे, थांबवणे अथवा अशा पद्धतीचा घोळ घालणे योग्य नाही. त्याचे समर्थन कुणीही करू शकत नाही. कधीही सर्वपक्षीय बैठक नाही. विचारविनिमय नाही. हा एकप्रकारे जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार आहे. निवडणूक आयोगाच्या घोळामुळे हायकोर्टाने असा निर्णय दिला. यामुळे उमेदवारांची घोर निराशा झाली आहे. हे अजिबात योग्य नाही, असेही बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२६ मधील परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध

पुणे, दि. २: शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन २०२६ मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या http://mpsc.gov.in व http://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी कळविली आहे.

प्रस्तावित वेळापत्रकानुसार सन २०२६ मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-२०२५, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-२०२६, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा-२०२६ व महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा-२०२६ इत्यादी परीक्षा होणार आहेत, असेही कळविण्यात आले आहे.
0000

बदल घडविण्यासाठी शिक्षणपद्धती प्रयोगशील असणे गरजेचे-अॅड अभय आपटे

विद्या महामंडळ संस्थेच्या ६४ व्या वर्धापनदिनी व ‘लोकशिक्षण दिनानिमित्त पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार’ प्रदान सोहळा संपन्न
पुणे : आपल्या शिक्षणपद्धतीत आजही स्वतंत्र विचार करायला प्रवृत्त करणारी, व्यवसायिक दृष्टिकोन विकसित करणारी आणि नवीन कल्पनांना वाव देणारी दृष्टी नाही. आपण अजूनही फक्त पाट्या टाकणारी माणसं तयार करतो. नवीन शैक्षणिक धोरणे आली असली तरी ती बहुतांश कागदोपत्रीच राहिली आहेत. यात खरा बदल घडवायचा असेल तर शिक्षणपद्धती प्रयोगशील असणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग करण्यास संधी दिली पाहिजे, असे मत अॅड. अभय आपटे यांनी व्यक्त केले.  

विद्या महामंडळ संस्थेच्या ६४ व्या वर्धापनदिनी व ‘लोकशिक्षण दिनानिमित्त ‘पु. ग. वैद्य स्मृती पुरस्कार’ प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी आपटे प्रशालेच्या माजी विद्यार्थी बांधकाम व्यावसायिक तुषार केवटे यांना अॅड अभय आपटे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आपटे रस्त्यावरील संस्थेच्या सभागृहात सोहळा संपन्न झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम रानडे, कार्याध्यक्ष अमोल साने, कार्यवाह लिलाधर गाजरे आदी मान्यवर उपस्थित होते. मानचिन्ह, पुष्पगुच्छ, अकरा हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पुरस्काराला उत्तर देताना तुषार केवटे म्हणाले,  “ज्या शाळेत वाढलो, त्या शाळेकडून मिळणारा सन्मान हा सर्वात बहुमोलाचा असतो. मी शाळेत आल्यावर एक वाक्य पाहिले होते ‘मी नोकरी घेणारा नव्हे, तर देणारा होणार’. त्याचा खरा अर्थ मला इथे आल्यावर कळला. शिक्षकांनी मला केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यवसाय उभारणीची दृष्टी, स्पर्धेत टिकून राहण्याची तयारी आणि संकटाचे संधीमध्ये रूपांतर कसे करायचे याचे मौल्यवान धडे दिले. हीच शिकवण माझ्या प्रवासाची सर्वांत मोठी ताकद ठरली, असे त्यांनी नमूद केले.  

सुमेधा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. लिलाधर गाजरे यांनी प्रास्ताविक केले आणि प्रा. गौतम मगरे यांनी आभार मानले.

३९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये ७० परदेशी खेळाडूंसह १५,००० स्पर्धक धावणार

दि. ७ डिसेंबरच्या स्पर्धेची पूर्वतयारी पूर्ण

पुणे -देशातील पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन असणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा ३९ वे वर्ष साजरे करत असून, यंदा रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे तीन वाजता ४२.१९५ किमी च्या महिला–पुरुष पूर्ण मॅरेथॉन चा प्रारंभ सणस मैदानाजवळील हॉटेल कल्पना–विश्व येथून होईल. तसेच येथूनच महिला–पुरुष अर्ध मॅरेथॉन दहा किमी, पाच किमी व व्हीलचेअर स्पर्धांचा प्रारंभ होईल. यामध्ये केनिया, इथिओपिया, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, श्रीलंका येथील ७० हून अधिक परदेशी खेळाडूंसह एकूण ११ गटांत सुमारे १५००० हून अधिक धावपटू या स्पर्धेत भाग घेतील. याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मॅरेथॉन भवन येथे ’एक्सपो प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे.

यंदा गतविजेती खेळाडू ज्योती गवते, २०२३ सालचा द्वितीय क्रमांका चा विजेता केनियाचा सायमन मवॉगी धावपटू शिवाय सेनादल, रेल्वे, पोलीस, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट (ASI) बॉम्बे सॅपर्स, एसआरपीएफ, एनडीए, येथील अव्वल दर्जाचे धावपटू सहभागी होत आहेत. एम्स आंतरराष्ट्रीय  संस्थे तर्फे स्पर्धा मार्ग हा मान्यता प्राप्त आहे. विजेत्यांना पुणेमहानगर पालिकेतर्फे ३५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील.

स्पर्धा मार्गावर रविवार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सायकलोहोलिक्स या क्लबच्या ७५ सायकल पायलट्सचे MockDrill , पहाटे ४ ते ६ या वेळात घेतली. यावेळी ॲड सम्राट रावते, रोहन मोरे, सुमंत वाईकर आणि उमेश जाधव यांनी याचे नियंत्रण संपूर्ण स्पर्धा मार्गावर केले.

या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेचे ५० पंच, तांत्रिक अधिकारी, आणि २० मोटर  सायकल पायलट्स सहभागी होतील. संघटनेचे सचिव राजू कुलकर्णी यांचे नेतृत्वात  सर्वश्री  चंद्रकांत पाटील, विजय बेंगले, रोहित घाग, इ. आंतरराष्ट्रीय पंच काम करणार आहेत. त्यांना सुमंत वाईकर, रेस डायरेक्टर आणि वसंत गोखले, टेक्निकल रेस डायरेक्टर हे मार्गदर्शन करतील. यांचे मॉक ड्रिल शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी पहाटे ५ ते ७ या वेळात स्पर्धा मार्गावर होईल.  

या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धे चे ‘एक्सपो’ प्रदर्शन आणि टी शर्ट्स आणि बीब नंबर्स वाटप शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी सुरू होईल. या एक्स्पो चे उद्घाटन शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी मॅरेथॉन भवन मैदान येथे सकाळी १०.३० वाजता सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार आणि महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा नेहा दामले यांच्या हस्ते आणि अर्जुनपुरस्कार विजेते खेळाडू शकुंतला खटावकर, रेखा भिडे, स्मिता शिरोळे यादव, सुरेखा द्रविड, शांताराम जाधव, उमेश झिरपे, जॉईंट रेस डायरेक्टर गुरबंस कौर यांच्या उपस्थितीत होईल.

या मॅरेथॉन साठी वैद्यकीय पथकांची सुसज्ज यंत्रणा उभारण्यात आली असून सोसायटी ऑफ इमर्जन्सी मेडीसिंसचे डॉ. राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली ८० डॉक्टर्स व ३०० वैद्यकीय परिचारक व फिजिओ यामध्ये काम करतील. सणस मैदानावर एक छोटे २५ बेडचे मिनी हॉस्पिटल केले जाईल. ही कमिटी मॅरेथॉन रूट वर प्रत्येक किमी वर बूथ उभारून या सेवा पुरवितील. १०८ च्या अॅम्ब्युलन्स या साठी मार्गावर आणि प्रारंभ आणि रेस समाप्तीच्या ठिकाणी असतील. डॉ. सचिन लकडे, डॉ. प्रियांक जावळे, डॉ. मुनिंद्र सावंत, डॉ. सुमित जगताप, डॉ. शिवचरण गंधार, डॉ. नुपूर जाधव, डॉ. युवराज जगताप, डॉ. सत्यजित चव्हाण, डॉ.दीपक खैरनार हे या कमिटीत काम करीत आहेत.

मेडिकल कमिटी चे सेमिनार शनिवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते ७ मॅरेथॉन भवन येथे पार पडले त्याला वरील डॉक्टर्स उपस्थित होते. मॅरेथॉन शर्यती दरम्यान होणाऱ्या दुखापती, अपघात, तसेच हृदयाचा त्रास, शरीरातील पाणी कमी होणे या संदर्भात चर्चा झाली आणि त्यावर तातडीचे वैद्यकीय उपचार कसे करावेत याची चर्चा झाली.

सणस मैदान आणि संपूर्ण मार्गावर प्रत्येक किमी वर पिण्याचे पाणी, एक डॉक्टर आणि ३ नर्सिंग स्टाफ, १ अॅम्ब्युलन्स यांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक २.५ किमी वर, फिडींग बूथ, एनर्जी ड्रिंक, फळे, स्पंजिंग (वॉटर बूथ) आणि इतर सर्व व्यवस्था “वर्ल्ड अॅथलेटिक्स” आणि भारतीय अॅथलेटिक्स महासंघ, नवी दिल्ली यांच्या नियमांनुसार आणि अटींनुसार करण्यात आली आहे.

भारती नर्सिंग कॉलेज, संचेती फिजिओ कॉलेज,सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ,नवले हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, विश्वराज नर्सिंग कॉलेज, आरोग्यम वैद्यकीय पथक, नवी मुंबई यांची पथके यांचा समावेश यात आहे.

पॉवरफुल अल्ट्रा रनर्स, अहिल्यानगर रनर्स क्लब, बाणेर बालेवाडी रनर्स, सिंधू रनर्स, युनायटेड एंड्यूरोस, रनिंग पंटर्स, पीसीएमसी रनर्स – वाकड अँड पिंपळे सौदागर, नांदेड सिटी रनर्स, बावधन ब्रिज, पीसीएमसी रनर्स – चिंचवड, पीसीएमसी रनर्स – निगडी, एसपीजे स्पोर्ट्स क्लब अँड अॅकेडमी, फीट कव्हर ३६०, विश्व रनर्स, पुणे युनिवर्सिटी रनर्स, कोथरूड डेक्कन रनर्स, एबीसी रनर्स आदि पुण्यातील १७ हौशी धावपटू संस्थांनी प्रत्येक किमी वरील हायड्रेशन पॉईंट्स चे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी घेतली आहे. यांचे धावपटू रेसेस मध्ये भाग घेऊन स्पर्धेच्या यशात सुध्दा हातभार लावतील.

गेली चार वर्षे  सायकल पायलटींग व्यवस्था संपूर्ण मार्गावर ,शर्यत संपेपर्यंत, “सायक्लोहोलिक्स” पुणे संस्थेचे ५० सायकल पायलटस अॅड. सम्राट रावते यांचे नेतृत्वा खाली करतात. यावर्षी सुध्दा त्यांचे पथक येत आहे. पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटनेचे १० मोटर सायकल पायलट धावपटुंना मार्गदर्शक म्हणून स्पर्धे पुढे नियमा नुसार असतील.

          याशिवाय पुणे पोलीस व वाहतूक पोलीस यांचा चोख बंदोबस्त स्पर्धा मार्गावर राहणार असून पुणे महानगर पालिकेतर्फे संपूर्ण मार्गावर पुरेशी उजेड व्यवस्था करण्यात आलेली आहे.

३९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मधील विजेत्या धावपटूंना बांबू सोसायटी ऑफ इंडिया तर्फे बांबू पासून तयार केलेल्या ट्रॉफीज देण्यात येतील, ज्या “टीकाऊ आणि पर्यावरणीय जबाबदारी” चे प्रतीक असेल आणि हेच या वर्षीचे ध्येय वाक्य आहे.

स्पर्धा समाप्तीनंतर सर्व स्पर्धा पूर्ण केलेल्या स्पर्धकांना सणस मैदान येथे पूर्णत्त्व पदक (फिनिशर मेडल), चहा-पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था संयोजन समितीतर्फे करण्यात येणार आहे.

          या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सर्व स्पर्धा संपल्यानंतर सकाळी ८ वाजता सणस मैदान येथे संपन्न होईल. क्रीडाप्रेमी पुणेकरांनी स्पर्धेच्या वेळी स्पर्धा मार्गात सर्व स्पर्धक खेळाडूंचे जोरदार स्वागत करावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

राममंदिर झाले, आता राष्ट्रमंदिराची उभारणीसरसंघचालक डॉ. मोहन भागवत; आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञता पुरस्कार

पुणे, दिनांक २ डिसेंबर २०२५ : विश्वकल्याणाची पताका फडकविणारे श्रीराममंदिर उभे राहिले. आता पूर्वीपेक्षा अधिक भव्य, सामर्थ्यसंपन्न आणि सुंदर राष्ट्रमंदिर उभे करायचे आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित, आदित्य प्रतिष्ठान प्रस्तुत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्यात सरसंघचालक बोलत होते. यावेळी कांचीकामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी, आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर अभ्यंकर, अपर्णा अभ्यंकर उपस्थित होते. आपल्याच समाजाचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात उपकाराची अथवा अहंकाराची भावना नाही, असे मत कृतज्ञता पुरस्कार स्वीकारताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “संघाला संपूर्ण समाजाचे संघटन अभिप्रेत आहे. कारण समाज संघटित झाला तरच राष्ट्र वैभवसंपन्न होईल. राष्ट्र बलसंपन्न झाले तरच विश्वाला सुखशांती लाभेल. यातही देशाचे कल्याण संघच करेल, अशी आमची वल्गना नाही. तर समाज उभा राहिला तरच देश उभा राहील.” कठीण काळामध्ये समाजानेच संघाला साथ दिली, म्हणून संघ मोठा झाल्याचेही सरसंघचालक म्हणाले.

शंकर अभ्यंकर म्हणाले, “आक्रमणांमुळे जगातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या. मात्र संपूर्ण वसुंधरेलाच कुटुंब मानणारी भारताची हिंदू संस्कृती आजही टिकून आहे. भौतिक आक्रमणांबरोबरच आंतरिक आक्रमणही भारतावर झाले. ब्रिटिशांनी भारताचा ‘स्व’ मोडण्याचा प्रयत्न केला.” भारताची सनातन संस्कृती ही विश्वकल्याणासाठी मानवतेला मार्गदर्शक असून, हिंदू संस्कृतीच सर्वांचा स्वीकार करते, असे मत शंकराचार्यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, “अनेक भाषा, परंपरा, प्रांत असतानाही भारतात आधुनिक लोकशाही यशस्वी झाली आहे. कारण प्रजातंत्र हा सनातन धर्माचा भावच आहे. आज लोकशाहीला सामर्थ्यशाली करण्याची गरज असून, चांगल्या लोकांना बळ दिले पाहिजे.” कार्यक्रमात वैश्विक संत भारती महाविष्णू मंदिराच्या कोनशिलेचे अनावरण, ‘भारतीय उपासना’ या विश्वकोष खंडाच्या तिसऱ्या आवृत्तीचे आणि जितेंद्र अभ्यंकर कृत ‘पंढरीश’ या ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात रामायणावर आधारित ‘निरंतर’ या संगीत नाटिकेने झाली. सूत्रसंचालन डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी केले. जितेंद्र अभ्यंकर यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले.
  • स्वयंसेवकांनी प्राण ओतून संघ उभा केला
    अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, रक्ताचे पाणी करत स्वतः बीज बनत, संपूर्ण आयुष्य मातीत मिसळून संघाचा वटवृक्ष उभे करणारे डॉ. हेडगेवार, राष्ट्रासाठी आपले जीवन ओवाळून टाकणारे प्रचारक, ग्रामीण व दुर्गम भागात जीव धोक्यात टाकून कार्य करणारे गृहस्थी कार्यकर्ते आणि अक्षरशः प्राण ओतून संघ उभा करणाऱ्या स्वयंसेवकांप्रती ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. पराकोटीचे हाल, उपेक्षा सोसूनही स्वयंसेवक हसतमुखाने कार्य करतो. विश्वकल्याणाची भावना असलेल्या या संघशक्तीतून समाजाला कधीही उपद्रव होणार नाही, असेही सरसंघचालक म्हणाले.