Home Blog Page 2211

आता रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११ पर्यंत सुरू राहणार

0

मुंबई, दि. 19 :- कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून आता रेस्टॉरंट रात्री १२:०० वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११:०० पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोविडसाठी लागू असलेली मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन नागरिकांना आणि आस्थापनांना करावे लागणार आहे. पूर्णपणे लसीकरण, गर्दीच्या क्षमतेवर निर्बंध, हे परिस्थिती नुसार लागू राहील.

सध्या सणासुदीचे दिवस आहेत दुकाने, रेस्टॉरंट, हॉटेल इत्यादी सार्वजनिक ठिकाणी लोकांची जास्त गर्दी होण्याची शक्यता लक्षात ठेवून हा वेळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासनातर्फे जारी एका पत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, पुर्वी लावलेल्या निर्बंधांमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नसून फक्त रेस्टॉरंट, खाद्य पदार्थ पुरविणारे यांच्यासाठीच रात्री १२:०० पर्यंत आपले आस्थापन चालू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे इतर आस्थापना ११:०० वाजेपर्यंत चालू राहतील. स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये स्थानिक आवश्यकतेनुसार निर्बंध लाऊ शकते किंवा सवलत देऊ शकते असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिले आहे.

मेट्रोचे लोखंडी बॅरीकेड अंगावर पडल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

0

पुणे – बसची वाट पाहत थांबलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या अंगावर मेट्रोचे लोखंडी बॅरीकेड पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात मेट्रोचे काम पाहणाऱ्या यू. आर. सी कंपनीसह ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारूती लक्ष्मण नवस्कर (६४, रा. कोथरूड) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा मयूर नवस्कर यांनी तक्रार दिली आहे. ही घटना ९ सप्टेंबर रोजी वनाज बसस्टॉपवर घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, ९ तारखेला ज्येष्ठ नागरिक पिरंगूट येथे जाण्यासाठी वनाज बसस्थानकावर बसची वाट पाहत थांबले होते.

या दरम्यान तेथे मेट्रोच्या कामाकरीता लावण्यात आलेले लोखंडी बॅरीकेड ज्येष्ठाच्या अंगावर पडले. यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षेत हयगय केल्याप्रकरणी पोलिसांनी सुरक्षा पुरविणाया ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड करीत आहेत.

बिबवेवाडीतील ‘ईएसआयसी ‘ रुग्णालय विस्तारीकरणाची उर्वरित प्रक्रिया तातडीने सुरू करणार

0


पुणे, ता. १९ ऑक्‍टोबर – बिबवेवाडीतील ‘राज्य कामगार विमा योजना’ (ईएसआयसी) रुग्णालय विस्तारीकरणाची उर्वरित प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आश्वासन केंद्रीय श्रम आणि कामगार मंत्री डॉ. भूपेंद्र यादव यांनी दिले. आमदार माधुरी मिसाळ यांनी आज मंत्रालयात यादव यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.  
मिसाळ पुढे म्हणाल्या, ‘राज्य शासनाच्या अखत्यारित ससून सर्वोपचार रुग्णालय हे एकमेव मोठे सर्वसाधारण रुग्णालय शहरात आहे. पुणे आणि लगतच्या जिल्ह्यांतील रुग्णांच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे त्यावर मोठा ताण येतो. नवीन सर्वसाधारण रुग्णालयाच्या निर्मितीसाठी मोठी जागा आवश्यक होती. बिबवेवाडीत ‘ईएसआयसी’कडे १६.५ एकर जागा उपलब्ध असल्याने या जागेत पाचशे खाटांचे सर्वसाधारण रुग्णालय व्हावे यासाठी मी गेल्या दहा वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे.’  
मिसाळ पुढे म्हणाल्या ‘या प्रस्तावाला ‘ईएसआयसी’ने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी मान्यता दिली. त्यानुसार पहिल्या टप्पात नवीन एकशे वीस खाटांसाठी विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता दुसर्या टप्प्यात आणखी तीनशे ऐशी खाटा वाढविण्यात येणार आहेत. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञांची वाढती गरज लक्षात घेऊन या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालय सुरू करण्यावरही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.’

बीव्हीजीच्या सेंद्रिय कृषी निविष्ठांचे शेतकऱ्यांच्या हस्ते अनावरण

0

पुणे (प्रतिनिधी) : बीव्हीजीच्या सेंद्रिय कृषी निविष्ठांचे पारगाव तर्फे आळे (ता.जुन्नर) फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने नुकतेच अनावरण करण्यात आले. यावेळी बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड, फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रशांत टट्टू , रामदास चव्हाण,  बीव्हीजी ॲग्रोटेकचे अरुण बारगजे, अनिकेत येवले, दिलीप डुंबरे , बापू लोखंडे सचिन काफरे व राज्याच्या विविध भागातील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी गायकवाड यांनी सेंद्रिय शेतीचे महत्व उपस्थित  शेतकऱ्यांना समजावून सांगितले. ते म्हणाले, ” जगभरात विविध प्रकारच्या विषाणू संक्रमणाचा काळ सध्या सुरु आहे. विषाणूजन्य रोगांचा मुकाबला करण्यासाठी मानवी आरोग्य मजबूत असणे गरजेचे आहे. मानवी आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सकस आहाराची गरज आहे. मानव जातीला सकस आहार देण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे काळाची गरज आहे. देशभरात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी बीव्हीजीने पुढाकार घेतला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून सेंद्रिय कृषी निविष्ठा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.”

टट्टू म्हणाले, ” रासायनिक औषधांच्या वारेमाप वापराने शेतीची उत्पादकता कमी झाली आहे. त्याचबरोबर उत्पादीत होणारा शेतमाल मानवी आरोग्यास धोकादायक आहे. या पुढच्या काळात मानवी आयुर्मान वाढवण्यासाठी सेंद्रिय शेतीचाच अवलंब करावा लागणार आहे. बीव्हीजीने राज्यात सेंद्रिय शेतीची चळवळ उभी केली आहे. त्यांच्या चळवळीत राज्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवणे ही काळाची गरज आहे.

अतुल रुणवाल मेमोरियल डेक्कन जिमखाना टेनिस सोशल स्पर्धेत 130 खेळाडू सहभागी

0

पुणे, 19 ऑक्टोबर 2021: डेक्कन जिमखाना टेनिस विभागातर्फे आयोजित अतुल रुणवाल मेमोरियल डेक्कन जिमखाना टेनिस सोशल स्पर्धेत 130 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. हि स्पर्धा डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर 23 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. 
डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे यांनी सांगितले की, क्लबचे सदस्य अरुण रुणवाल यांचे कोरोनामुळे निधन झाले असून त्यांच्या स्मरणार्थ हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच, हि स्पर्धा 40, 50, 60, 70 and 80 वर्षावरील पुरुष एकेरी व दुहेरी या गटात होणार आहे. 
स्पर्धेसाठी धनंजय सुमंत यांची स्पर्धा संचालक म्हणून तर, तेजल कुलकर्णी यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.   

पाकिस्तानला धडा शिकवावाच लागेल -केंद्रीय मंत्री रामदास आठवले

0

पुणे : “आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (आठवले) भक्कम साथ आहे. ‘रिपाइं’ची सोबत असताना भाजपने राज ठाकरे यांच्या नादाला लागून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (मनसे) युती करू नये. राज ठाकरे सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेत असल्याने भाजपाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे भाजपने मनसेच्या सोबत जाणे योग्य होणार नाही,” असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपला दिला.
पुण्यातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले विविध विषयांवर बोलत होते. यावेळी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र कांबळे, असित गांगुर्डे, ब्राह्मण आघाडीचे ऍड. मंदार जोशी, मातंग आघाडीचे हनुमंत साठे, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड. आयुब शेख, माजी शहराध्यक्ष अशोक कांबळे, अशोक शिरोळे, युवक अध्यक्ष शैलेश चव्हाण, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, सचिव बाबुराव घाडगे, माहिपाल वाघमारे, मोहन जगताप, श्याम सदाफुले आदी उपस्थित होते.


रामदास आठवले म्हणाले, “पाकिस्तानकडून वारंवार भारताला त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले करून सामान्यांचा, जवानांचा बळी जातोय. अशावेळी त्यांच्यासोबत क्रिकेट सामना होणे योग्य नाही. जय शहा आणि अन्य लोकांनाही चर्चा करून भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज असून, त्याबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलणार आहे.”
“जनधन, उज्वला आणि मुद्रा योजनाअंतर्गत मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा झाला आहे. आवास योजनेत अनेकांना पक्की घरे मिळाली आहेत. आयुष्यमान भारत योजनेत सव्वा दोन लाखाच्या वर लोकांना लाभ झाला आहे. जात-धर्म न पाहता नरेंद्र मोदी यांनी या योजना सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. त्यातून जातीभेद वाढणार नाही, तर ज्या जाती अधिक मागास आहेत, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे सोयीचे होणार आहे. दलितांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यांना आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे,” असेही त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांना अजून मुख्यमंत्री असल्याचा भास होतो, यावर आठवले म्हणाले, त्यांना तसा भास होतो, तर दोन वर्षांनंतरही उद्धव ठाकरे यांना आपण अजूनही मुख्यमंत्री नाहीत, असे वाटते, अशी मिश्किल टिपण्णी केली. भाजप मनसेच्या नादाला लागल्यास ‘रिपाइं’ भाजपचा नाद सोडेल का, असे विचारल्यावर ‘आम्ही त्यांचा नाद सोडला तरी ते आमचा नाद सोडणार नाहीत,’ असे आठवले म्हणाले. स्वतंत्र चिन्हावर लढायचे की, भाजपच्या हे अजून ठरले नाही. मात्र, एकत्र निवडणूक लढवणार असून, मागासवर्गीय आरक्षण पडल्यास पुण्यात महापौर आणि मुंबईत उपमहापौर रिपाइंला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिल्याचेही त्यांनी नमूद केले. संजय सोनावणे यांनी प्रास्ताविक केले. तर महिपाल वाघमारे यांनी आभार मानले.

आयकर विभागाच्या छाप्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही फरक पडणार नाही, असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच आयकर विभाग, ईडी, सीबीआय यासारख्या यंत्रणांकडून सुरू असणाऱ्या चौकशीमागे केंद्राचा कोणताही हात नाही, असं स्पष्टीकरण देखील रामदास आठवले यांनी यावेळी दिलं आहे.

पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ले करण्याचा डाव रचला जातोय. तिथे काम करणार्‍या मजुरांवर आतंकवादी हल्ले सुरू आहेत. अनेकजण उद्योग करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये येत असतात त्यांना आतंकवादी ठार मारत आहेत, असं रामदास आठवले यांनी सांगितलं. तसेच पाकिस्ताचे फार लाड करून चालणार नाही. पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे, असं मतही रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

भारत पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ नये-

भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळू नये असे माझ्या पक्षाचे मत आहे. खेळामध्ये राजकारण आणू नये हे जरी खरे असले तरी अशा परिस्थितीत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळू नये असे माझे मत आहे, असंही रामदास आठवले यांनी म्हणाले.

आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही-

आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपचे नुकसान होऊ शकते. त्यांचा परप्रांतियांचा मुद्दा भाजपला नुकसानकारक ठरेल. भाजपने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, आम्ही भाजपचा नाद सोडला तर ते आमचा नाद सोडणार नाहीत, असा इशारा देखील त्यांनी या वेळी दिला आहे.

दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

0

पुणे, 19 ऑक्टोबर 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित दोशी इंजिनियर्स करंडक आंतरक्लब 25 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत सौरभ नवले(120धावा) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीच्या जोरावर व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत चौथ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.  
व्हेरॉक क्रिकेट अकादमीच्या मैदानावरील लढतीत प्रथम फलंदाजी करताना व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने 50षटकात 6बाद 340धावाचे आव्हान उभे केले. यात सौरभ नवलेने 103चेंडूत 14चौकारांच्या व 3षट्काराच्या साहाय्याने 120 धावांची शतकी खेळी केली. सौरभ व किरण मोरे(71धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी 151 चेंडूत 167 धावांची खेळी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मिझान सय्यद 40, टिळक जाधव 19, मनोज यादव नाबाद 15 यांनी धावा काढून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. हे आव्हान ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाला पेलवले नाही व त्यांचा डाव 35.2षटकात सर्वबाद 153 धावावर कोसळला. यात अनिकेत नलावडे 45, प्रज्वल घोडके 32, प्रथमेश बाजारी 18, वैभव पाटील 12 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. व्हेरॉक संघाकडून राहुल वारे(4-23), कपिल गायकवाड(2-34), अॅलन रॉड्रिक्स(2-34), ओंकार राजपूत(1-24) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला 187धावांनी विजय मिळवून दिला. 
पूना क्लब मैदानावरील सामन्यात केडन्स क्रिकेट अकादमी संघाने पूना क्लब संघाचा  7 गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला. केडन्स क्रिकेट अकादमीच्या शुभम हरपाळे(5-26), इझान सय्यद(4-47) यांच्या आक्रमक गोलंदाजीपुढे पूना क्लब संघाचा डाव 41.1षटकात सर्वबाद 203 धावावर संपुष्ठात आला. पूना क्लब संघ 8.5षटकात 7बाद 16धावा असा अडचणीत असताना फलंदाजीस आलेल्या ओंकार आखाडेने 138चेंडूत 13चौकार व 1षट्काराच्या मदतीने 126धावांची धडाकेबाज शतकी खेळी केली. ओंकारला हर्ष ओसवालने 60चेंडूत 7चौकारांच्या मदतीने 43 धावा काढून चांगली साथ दिली. या दोघांनी आठव्या गड्यासाठी 145 चेंडूत 135धावांची भागीदारी केली. याच्या उत्तरात केडन्स क्रिकेट अकादमी संघाने हे आव्हान 45.4षटकात 3बाद 204धावा करून पूर्ण केले. यात अथर्व धर्माधिकारी नाबाद 68, ऋषिकेश मोटकर 43, अथर्व काळे नाबाद 42, दिग्विजय पाटील 25 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. पूना क्लबकडून राजकमल चौहान(1-34), अमेय मुजुमदार(1-38), ओंकार आखाडे(1-39)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामनावीर शुभम हरपाळे ठरला. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी: 50षटकात 6बाद 340धावा(सौरभ नवले 120(103,14×4,3×6), किरण मोरे 71(98,2×4,4×6), मिझान सय्यद 40(30,3×4,1×6), टिळक जाधव 19, मनोज यादव नाबाद 15, अजित बागाडी 3-69, प्रथमेश बाजारी 1-62) वि.वि.ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी: 35.2षटकात सर्वबाद 153 धावा(अनिकेत नलावडे 45(54,4×4,1×6), प्रज्वल घोडके 32(42), प्रथमेश बाजारी 18, वैभव पाटील 12, राहुल वारे 4-23, कपिल गायकवाड 2-34, अॅलन रॉड्रिक्स 2-34, ओंकार राजपूत 1-24);सामनावीर-सौरभ नवले; व्हेरॉक संघ 187धावांनी विजयी;
पूना क्लब: 41.1षटकात सर्वबाद 203 धावा(ओंकार आखाडे 126(138,13×4,1×6), हर्ष ओसवाल 43(60,7×4), शुभम हरपाळे 5-26, इझान सय्यद 4-47, सिद्धेश वरगंटे 1-47) पराभूत वि. केडन्स क्रिकेट अकादमी: 45.4षटकात 3बाद 204धावा(अथर्व धर्माधिकारी नाबाद 68(135,3×4), ऋषिकेश मोटकर 43(46,8×4), अथर्व काळे नाबाद 42(56,3×4), दिग्विजय पाटील 25, राजकमल चौहान 1-34, अमेय मुजुमदार 1-38, ओंकार आखाडे 1-39);सामनावीर शुभम हरपाळे; केडन्स 7 गडी राखून विजयी. 

विवाह समारंभ व अन्य शुभ कार्यासाठी उपस्थितीतांची मर्यादा वाढवावी : संदीप खर्डेकर

0

पुणे : कोरोनाच्या त्रिसूत्रीच्या नियम पालनाचे बंधन घालून त्वरित शुभकार्यातील उपस्थितीचे हे बंधन शिथिल करावे अशी मागणी पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे क्रिएटिव्ह फाउंडेशन अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी एका निवेदानाव्दारे केली आहे.

या निवेदनात खर्डेकर यांनी असे म्हटले आहे कि,’आता संपूर्ण राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मॉल, दुकाने, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळ,बाजार, चित्रपटगृह, नाट्यगृह सगळेच खुले होत आहे आणि मुक्त वातावरणात सामान्य नागरिक श्‍वास घेत असून कोरोनाच्या संकटातून मुक्त होत सर्वत्र नवचैतन्य संचारत आहे. अश्या परिस्थितीत एखाद्या व्यक्ती च्या जीवनात एकदाच येणार्‍या आनंदाच्या क्षणांना मात्र बंधन घालण्यात आले आहे. मग तो विवाह समारंभ असो किंवा साखरपुडा, बारसं असो वा डोहाळजेवणं, मंगळागौर यासारखे कार्यक्रम मात्र 100 किंवा 200 लोकांच्या उपस्थितीत बंधनकारक करणे हे अन्यायकारक असून सर्वकाही नॉर्मल होत असताना हे उपस्थिती चे बंधन देखील शिथिल करणे गरजेचे आहे. एखाद्या आनंदाच्या प्रसंगाला 100/200 ची जरी अट असली तरी कमी उपस्थितीत, कार्यालय भाड्यासह भोजनाच्या दरापर्यंत सर्वच महाग पडत आहे.

तळजाईत महापालिकेकडून कोणतीही वृक्षतोड झालेली नाही,सुरु नाही,प्रस्तावित नाही – महापालिकेचे अधिकृत स्पष्टीकरण

0

पुणे- तळजाई रक्षणाच्या नावाने होणारी आंदोलने , महापालिका करत असलेल्या वृक्षतोडीच्या तथाकथित बातम्या या सर्वांवर आज अखेरीस महापालिका प्रशासनाने मौन सोडून स्पष्टीकरण दिले असून महापालिकेकडून तळजाई येथे कोणत्याही प्रकारची वृक्ष तोड जैव विविधता उद्यान विकसीत करण्यासाठी झालेली नाही ,सुरु नाही आणि प्रस्तावित देखील नसल्याचा खुलासा केला आहे . दरम्यान वृक्ष तोड हि राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या वन विभागात होत असल्याच्या बातम्यांकडे महापालिकेने लक्ष वेधले असून त्याशी महापालिकेचा संबध नसल्याचे हि म्हटले आहे .आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या आदेशान्वये उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी याबाबतचे अधिकृत स्पष्टीकरण प्रसिद्धीसाठी पीआरओ मार्फत माध्यामाना पाठविले आहे . या महापालिकेच्या दाव्यामुळे तळजाई बाबत झालेली आंदोलने हि सारी दिशाभूल करणारी होती हे स्पष्ट होणार आहे.

या प्रसिद्धी पत्रकात उद्यान अधीक्षक यांनी असे म्हटले आहे कि ,’पुणे पेठ पर्वती स.नं. ६७ ते ७३ तळजाई टेकडी येथे जैव विविधता उद्यान विकसीत करणे या कामासाठी पुणे महानगरपालिकेने नेमलेल्या आर्किटेक्ट यांनी सादर केलेल्या आराखड्या मध्ये
स.नं. ६७ ते ७३ पर्वती मधील एकूण १०७ एकर क्षेत्राचा समावेश आहे. १९८७ च्या डीपी नुसार याठिकाणी हिल टॉप हिल स्लोप झोनचे आरक्षण कायम ठेवण्यात आले होते. जागेच्या ताब्याची प्रक्रिया स्थायी समिती ठ.क्र. ६३७ दि. ०६.०८.२००२ प्रमाणे सुरु करण्यात आली. मनपाचे ताब्यात आलेल्या मिळकतींवर अतिक्रमण होऊ नये म्हणून, तसेच सदरच्या जागेचा नागरिकांना उपयोग होण्याकरीता वृक्षारोपण, जॉगिंग ट्रॅक व खेळाचे मैदान इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. सदरच्या ठिकाणी मनपाचे ताब्यात असलेल्या व ताब्यात येणाऱ्या मिळकतींचा एकत्रित सुनियोजित विकास होण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेने आर्कीटेक्ट आनंद उपळेकर यांची या प्रकल्पाचे आर्किटेक्ट म्हणून नेमणूक केलेली आहे.
सदरच्या प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत हिल टॉप हिल स्लोप झोन तथा प्रस्तावित असलेले व शासनाचे निर्णयानुसार प्रलंबित असलेल्या आरक्षणाकरीता विकास नियंत्रण नियमावलीतील अनुज्ञेय तरतुदींना अनुसरून कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.
प्रकल्पामध्ये बांबू उद्यान, नक्षत्र उद्यान, जैव विविधता उद्यान, फ्लॉवर गार्डन, अरोमा गार्डन, स्पायसेस गार्डन, नाना नानी पार्क, फॅमिली गार्डन, रानमेवा उद्यान, रोपवाटीका, मुलांकरीता साहसी खेळ, महिलांकरीता खेळाची जागा, पाण्याची तळी, मुलांसाठी ग्रीन स्कूल, सेंद्रिय शेती, पक्षी निरीक्षण केंद्र, सोलर रुफ पार्किंग इत्यादी सोयी सुविधा करण्यात येणार असून, मोठ्या प्रमाणावर स्थानिक/भारतीय वृक्षांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले असून, उद्याने विकसित करताना अस्तित्वातील कोणतीही स्वदेशी प्रकारची वृक्ष न काढता विकसन करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदरच्या प्रकल्पातील मिळकतीमधील दुर्मिळ वृक्ष तसेच स्थानिक/भारतीय वृक्ष संपदा जपण्याचा मनपाचा पूर्णपणे प्रयत्न राहणार आहे.
पुणे महानगरपालिकेकडून सदरच्या प्रकल्पा अंर्तगत करण्यात आलेल्या विकसनामध्ये कोणतीही स्थानिक/भारतीय जातीची वृक्ष काढण्यात आलेले नाहीत. सदरच्या प्रकल्पालगत मे. शासनाच्या वन विभागाच्या मिळकतीमध्ये वन विभागाकडून ग्लिरिसीडीया(उंदीर मारी) या परदेशी जातीची वृक्ष काढून, त्याजागी स्वदेशी प्रकारची वृक्ष लावण्याचे काम चालू आहे. या वन विभागाच्या जागेतील वृक्ष तोडीच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या असून, पुणे महानगरपालिकेचा प्रस्तावित प्रकल्प व वन विभागाची मिळकत दोन्ही तळजाई टेकडी येथे असल्याने त्या बातम्यांमधून निश्चित कोणत्या मिळकतीमध्ये वृक्ष तोड झाली आहे, याबाबत स्पष्टता होत नाही. पुणे महानगरपालिकेच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या अनुषंगाने कोणतीही वृक्ष तोड पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही.

पुणे महानगरपालिकेच्या प्रस्तावित प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक/भारतीय जातीचे वृक्ष लावण्याचे नियोजन असल्याने विविध पक्षी, फुलपाखरू यांचा अधिवास निर्माण होऊन पर्यावरणातील सर्व घटकांचे संवर्धन करण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहे.
सदरच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉक्रीटीकरण करण्यात येणार नसून प्रकल्पामध्ये विकसित करण्यात येणारे जॉगिंग ट्रॅक मातीचे करण्याचे नियोजन आहे. तसेच काही पाथवे हे नैसर्गिक बाबी वापरून करण्याचे नियोजन आहे. नागरीकांसाठी तयार करण्यात येणारे गझीबो, पॅगोडा हे नैसर्गिक मटेरियल वापरून करण्याचे प्रस्तावित आहे. सदरच्या प्रकल्पातील नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये वाढ करून प्रकल्पामध्ये सर्व अत्यावश्यक सोयी सुविधा निर्माण करून शहरातील सर्व स्तरातील नागरीकांना त्यांच्या आरोग्य व मनोरंजन याकरीता येथील नैसर्गिक साधन संपत्तीचा लाभ मिळावा या उद्देशाने सदरच्या प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत आहे. सदरच्या प्रकल्पाचे प्रकल्प अहवालास मान्यता मिळणेकरीता स्थायी समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून स्थायी समितीचे आदेशानुसार स्थायी समितीसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे. प्रस्तुत प्रकल्पाच्या सादरीकरणानंतर स्थायी समितीच्या निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येऊन मुख्य सभा यांची मान्यता प्राप्त होण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यानुसार मुख्य सभा यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्राप्त मान्यतेच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात येईल .

कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगा -केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा पुणे महापालिकेला सवाल

0

पुणे- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज पुणे महानगरपालिकेला भेट दिली. कोरोनाच्या काळात महापालिकेने केलेले काम आणि कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याबाबत विविध प्रश्न विचारत माहिती घेतली आणि त्यांनी आढावाही घेतला. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,  पदाधिकारी आणि महापालिकेचे वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.देशात कोरोनाची दुसरी लाट अजून संपली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन येत्या काळात आणखी सतर्कता बाळगावी लागेल असेही आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले. कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या सामना करण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाय योजना केल्या असून जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोना उपचारांबाबतच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. असेही त्यांनी सांगितले

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. पवार यांनी सांगितले की, पुणे महापालिकेने शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून कोविड काळात उत्तम काम केले आहे. राज्यातील इतर महानगरपालिकांनी अशी योजना राबवावी. ‘जंम्बो’ कोविड सेंटर उभारुन रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यात आल्या. महानगरपालिकेने कोविड प्रतिबंधक लसीबाबत प्रभावी जनजागृती केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले. तसेच कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेनं स्वतःच्या अर्थसंकल्पातून मदत केली याबाबत राज्यमंत्री डॉ. पवार यांनी महापालिकेचं अभिनंदन केले.

 कोरोना प्रतिबंधक लसीकरण (corona vaccination) मोहिमेत लहान मुलांच्या (१८ वर्षांखालील) लसीकरणाबाबत अद्याप अंतिम निर्णय केंद्राच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेला नाही़ तसेच लहान मुलांच्या लसीकरणासाठी आणखी किती काळ लागेल हे आज निश्चित सांगता येणार नाही, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी सोमवारी स्पष्ट केले. दरम्यान लहान मुलांच्या लसीकरणासाठी सुरक्षितेतच्या चाचण्या सध्या सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.”पुणे जिल्ह्याने आतापर्यंत एक कोटी लसीकरण पूर्ण केले आहे. येथील रुग्ण संख्या वाढू नये यासाठी केंद्र सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे. लहान मुलांच्या बाबतीत विशेष खबरदारी घेतली जात असून त्यांच्या लसीकरण चाचण्या सुरू आहेत. आता जरी कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली असली तरी महापालिकेकडून जनजागृती प्रभावीपणे राबवली जात आहे. सणासुदीच्या काळात काळजी घेण्याचे आवाहनही केले जाते. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 220 कोटींचा निधी आलेला आहे असेही पवार यावेळी म्हणाल्या आहेत.’

पुस्तकांचं बदलतंय रूप ……

पुस्तकं हातात घेऊन वाचणं हा छंद अनेकांना आजही असला तरीही आताच्या पिढीला कानात हेडफोन लावून हीच पुस्तकं सहज ऐकता येतील अशा ऑडिओबुक्सची निर्मिती देशात विविध संस्थाद्वारे करण्यात येत असून हजारोंच्या संख्येने आज आपल्या इथे हे साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. ऑडिओबुक्सच्या माध्यमातून आपल्याला हवी हवीशी वाटणारी पुस्तकं कधीही, कुठेही उपलब्ध झाल्याने फक्त तरुण पिढीचं नव्हे तर अनेक पुस्तकप्रेमींचा याकडे कल पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर पुस्तकांच्या विश्वात आमूलाग्र बदल घडून ऑडिओबुक्स नव्या पर्वाची नांदी असल्याचे आपल्याला पहायला मिळत आहे. याच ऑडिओबुक्सच्या विश्वात आघाडीवर असलेल्या स्टोरीटेल मराठीने महाराष्ट्रात लॉकडाऊन दरम्यान हजारो पुस्तकांचे ऑडिओबुक्समध्ये रूपांतर केलं. यासाठी पन्नासहून अधिक मराठी कलाकारांनी या ऑडिओबुक्सना आपला आवाज देत ही पुस्तकं डिजिटलबद्ध केली आहेत. यानिमित्ताने अशाच काही कलाकारांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न….

पुस्तकं संस्कृती जतन करण्यासाठी ‘ऑडिओ बुक’ हा उत्तम पर्याय!
– अभिनेते सचिन खेडेकर

मला पुस्तकं वाचण्याची आवड आहे म्हणून खरंतर मी हे केलं, मी काही व्हाईस आर्टिस्ट नाही, पण मला ती ऑडिओबुक्सची एकूण कल्पनाच आवडली. आता वाचन संस्कृती कमी होतेय, वाचकांना चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही, किंवा वेळ मिळत नाही हे जे कारण आहे त्याला ऑडिओबुक्स हा उत्तम पर्याय आहे म्हणून खरंतर हे करावंसं वाटलं. मला नट म्हणून किंवा मराठी भाषेचा भक्त म्हणून ते करायला आवडतं. मला एका बाजून असंही वाटतं कि हा माझ्यादृष्टीने भाषा टिकविण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे, आपली पुस्तकं टिकवण्याचा ऑडिओबुक्स हा चांगला मार्ग आहे असं मला वाटतं. आणि मी जी स्टोरीटेलसाठी पुस्तकं वाचली आहेत ती मला मनापासून आवडली आहेत म्हणूनच मी ती वाचली आहेत. ऑडिओबुक्स ऐकण्यातून आपला छंदही जोपासला जाऊन लोकांना चांगलं ऐकण्याची सवयही लागेल असे मला वाटते.

ऑडिओबुक्स हे प्रेक्षकांना इनव्हॉल्व करणारं माध्यम– अभिनेता ललित प्रभाकर

एकतर पूर्णपणे नवीन माध्यम. इथे फक्त तुम्ही ऐकू शकता आणि त्या ऐकण्यातूनच तुम्हाला तुमची गोष्ट इमॅजिन करायची असते. मला वाटते कि ऑडिओ बुक्स हे खूप पावरफुल्ल माध्यम आहे, जे प्रेक्षकांनाही चॅलेंज करतं, इन्व्हॉल करून घेतं. कारण त्यांना त्या गोष्टी इमॅजिन कराव्या लागतात, नुसत्या ऐकून गोष्टी सोडून चालत नाहीत. प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्या इमॅजीननुसार बघू शकते. ऑडिओ बुक्समध्ये एकच गोष्ट मी जेव्हा बोलतो, साकारतो किंवा प्रेझेन्ट करतो तेव्हा ती ऐकणाऱ्या प्रत्येकापर्यंत वेगवेळी पोहचते आणि दिसते, मला वाटतं कि हि खूपच कमाल गोष्ट आहे स्टोरीटेल या ऍपची आणि त्यासाठीच मी खूप उत्सक होतो. मला असं वाटतं कि अभिनेता म्हणून मला माझा रियाझ करण्यासाठी आणि लर्न करण्यासाठी अश्या काही गोष्टी करत राहणं खूप गरजेचं असतं. मला एकाच वेळी आठ दहा कॅरेकटर्स प्ले करायचे होते आणि त्यातून माझं कॅरेक्टर वेगळं, शिवाय गोष्टही कळली पाहिजे असं सगळं करायचं होतं. हे सगळं आम्हाला चित्रपट – मालिकेत काम करताना करायची सवय नसते, आम्ही काम करताना एकच कॅरेक्टर करीत असतो. मात्र इथे हे सगळं करताना कलाकार म्हणून अधिक कस लागते, तुम्हाला थोडं पुश करावं लागतं स्वतःला.

ऑडिओ बुक्स रसिकांसाठी पर्वणी!– अभिनेता उमेश कामत

ऑडिओबुक रेकॉर्ड करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो, कारण माझा पहिला अनुभवच खूप विलक्षण होता. मी माझा पहिला ऑडिओ ड्रामा ६१ मिनिट्स रेकॉर्ड केला त्याचा रिस्पॉन्स आणि एकंदर त्याच्या रेकॉर्डिंग प्रोसेस मजेदार होती. सो जेव्हा माझ्याकडे ६१ मिनिट्स हि ऑडिओ कथा रेकॉर्डिंगसाठी आली तेव्हा मी खूपच एक्ससाईट, खूप पॉझिटिव्ह होतो. एकतर मला ती गोष्ट फार आवडली होती. मला सस्पेन्स आणि थ्रिल्लर गोष्टी फार आवडतात तश्याच रोमँटिक गोष्टीही आवडतात. त्यातलीच हि एक आयटी क्राईमच्या संदर्भातील गोष्ट स्टोरीटेल मराठी कडून विचारण्यात आली आणि ती मी वाचल्यानंतर मजा आली. मला जसं वाचताना पुढे काय पुढे काय होणार याची उत्सुकता होती, तीच उत्सुकता रेकॉर्डिंग करतानाही होती. सर्वच कॅरेक्टर्स खूप इंटरेस्टिंग होती. हा माझ्यासाठी खूप मस्त अनुभव होता. मी स्वतः रेकॉर्ड करताना त्या व्यक्तिरेखा खूप एन्जॉय केल्या आणि मला असं वाटतंय गोष्ट इतकी इंटरेस्टिंग झाली आहे कि ती लोकांना नक्की ऐकायला आवडेल. आणि मला असं वाटतंय सध्याच्या काळात आपलं ट्रॅव्हलिंग टायमिंग इतकं असतं, प्रत्येक वेळेला टिव्ही पाहणं किंवा सध्याच्या काळात चित्रपट, नाट्यगृहे बंद आहेत त्यामुळे स्टोरीटेल जी ऑडिओबुक्स तयार करताहेत ती मराठी रसिकांसाठी एक पर्वणीआहे असे मला वाटते आहे. सगळ्या प्रकारच्या कथा, लघुकथा, कादंबऱ्या, ऑडिओ सिरीज अश्या मुबलक ऑडिओबुक्सचा खजिना आपल्या सगळ्यांसाठी आहे, त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा.

वाचनाची हॅबिट ऑडिओबुक्स मुळे पूर्ण करता येते!– अभिनेता आस्ताद काळे

मी ऑडिओ बुक करण्यासाठी खूपच उत्सुक होतो. मला डबिंग या क्षेत्रात काहीतरी सुरु करण्याची इच्छा होती. नशिबाने स्टोरीटेल हा चांगला प्लॅटफॉर्म आर्टिस्ट्ससाठी उपलब्ध झाला आहे. तुम्ही नट असलात तरी ह्या माध्यमात तुमचा चेहरा किंवा अभिनय दिसणार नाही, फक्त वाचिक अभिनयावर सगळं निभावून न्यायाचे आहे, हे चॅलेंज मला स्वतःहून स्वीकारायचं होत आणि हि संधी स्टोरीटेलने दिल्याने खरंतर मी खूप खुश झालो आहे. मला ऑडिओ बुक करायला खूप मजा आली. कारण जवळ जवळ सात आठ पात्र वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये एकमेकांशी बोलताहेत, एकाचवेळी चारपाच लोक बोलताहेत, या सगळ्या प्रकारे आवाज मॉड्युलेट करणं, प्रत्येकाचा लहेजा, पीच, वाणी वेगळी असणं हे सगळं मॅनेज करीत हे करण्याचा अनुभव खूपच मजेदार आणि चॅलेंजिंग अनुभव होता. माझ्या पिढीच्या आणि कामासाठी सतत प्रवास करणाऱ्यांना आपली वाचनाची हॅबिट ऑडिओबुक्समुळे पूर्ण करता येते. वाचनाचा अखंड आनंद ऐकण्यातून मिळविण्याची संधी ऑडिओबुक्स देतात.

ऑडिओबुक्स मनोरंजन आणि ज्ञानाचे उत्तम साधन!– अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी

आवाज आणि त्याचा वापर आणि गोष्ट सांगणे हे मला एक अभिनेत्री म्हणून खूप चॅलेंजिंग वाटते. ऑडिओबुक्स हे नुसतं एकच माध्यम असं आहे ज्याच्यातून तुम्हाला पूर्ण वातावरण, पात्र उभं करायचं असतं. गोष्ट सांगणं हि अगदी मूलभूत कला आहे, अभिनेता अभिनेत्री म्हणून त्यात तुमचा हातखंडा असणं फार गरजेचं असतं. ऑडिओबुक ध्वनिमुद्रणाचा अनुभव अर्थातच खूप मजेशीर होता कारण तुम्ही एका बंद स्टुडिओत असता, पण तुम्हाला ती सगळी जी सिच्युएशन आहे ती तुम्हाला क्रिएट करायची असते. त्यात जो थरार असेल, भीती असेल, प्रेम प्रसंग असेल, जे काही भाव आहेत ते सगळे त्या स्टुडिओच्या आत फक्त माईक आणि तुम्ही आणि तुमची जी संहिता असते त्याच्या मार्फत तयार करायचे असते. त्यामुळे मला फार मजा येते. मला अनेकदा असे वाटते कि आपण जेव्हा ते करीत असतो, आपणच आपल्याला ऐकत असतो, आणि आपल्याला सुधारत असतो आणि ते अगदी मेडिटेटिंग आहे. मला वाटते आहे स्टोरीटेल खूप चांगली संधी देतेय ऑडियन्सला सुद्धा. अनेकदा आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला वाचायला मिळत नाही. आपण गाडी चालवीत असताना, प्रवास करताना, स्वयंपाक करीत असताना, घरातील कामं करत असताना आपण वाचू शकत नसलो तरी ऐकू शकतो आणि त्यामुळे हि खूप चांगली संधी असते. अगदी नावाजलेल्या लेखकांच्या कथा कादंबऱ्यांपासून ते अगदी नव्या दमाच्या होतकरू लेखकांनी लिहिलेली मालिकांपर्यंत अगदी इरॉटिका पासून ते थरारचित्त गोष्टी, सस्पेन्स हे सगळं ऑडिओबुकमध्ये स्टोरीटेलवर आहे. ज्यांची जी आवड आहे, त्यांच्यासाठी तिथं सर्व उपलब्ध असल्याने तुम्ही इतर तुमच्या कामात व्यस्त असता तेव्हा इअर फोन लाऊन ऐकू शकता आणि आसपासच्या लोकांना कळणार नाही. हे उत्तम साधन आहे मनोरंजन आणि ज्ञानाचेही असे मला वाटते आहे.

ऑडिओबुक नेस्ट जनरेशनचं अपरिहार्य गॅजेट!– गौतमी देशपांडे

मला खूप दिवसांपासून ऑडिओबुकसाठी काम करण्याची इच्छा होती, आणि मला जेव्हा विचारलं आणि ऑडिओबुक बद्दल सांगितलं तेव्हा मी खूपच एक्सईट होते, ती कथाही तशी नवीन होती, खूप छान आणि गोड होती त्यामुळे मी ती वाचण्यासाठी खूप उत्सुक होते. हा माझ्यासाठी पहिला आणि छान अनुभव होता. मी फार पूर्वी कॉलेजमध्ये असताना नाट्यवाचन स्पर्धा केल्या आहेत पण कधी प्रोफेशनल ऑडिओबुक साठी काम केले नव्हते. पण खूप बरं वाटलं, कम्पलीटली नाट्यरूपात ते छान रेकॉर्ड झालं आहे. मी आणि ललितने ते केलं आहे. खूप मजा अली ते करताना आणि खूप छान अनुभव होता. अशी अनेक ऑडिओबुक्स प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची खरच इच्छा आहे. लोकांनी या ऑडिओबुक्सचा आनंद घ्यावा कारण आताच्या काळातली सुंदर कथा आहे. प्रत्येक बेस्ट फ्रेंड मुलगा, मुलगी कि कथा ऐकताना स्वतःला रिलेट करू शकेल. त्यामुळे प्रत्येकाने हे ऑडिओबुक ऐकून त्याचा आस्वाद घ्यावा.

पन्नासहून अधिक लोकप्रिय कलाकारांच्या आवाजात ऑडिओबुक्स!– प्रसाद मिरासदार, मराठी पब्लिशिंग, स्टोरीटेल

स्टोरीटेलने गेल्या चार वर्षांपासून मराठी ऑडिओबुक्स क्षेत्रात एक नवी क्रांती आणली आहे. दोन हजारहून अधिक मराठी ऑडिओबुक्स, त्यातील शंभरहून अधिक लोकप्रिय आणि अभिजात पुस्तके प्रकाशित केली आहेत. यातील अनेक ऑडिओबुक्स पन्नास हून अधिक लोकप्रिय अभिनेत्यांच्या आवाजात रेकॉर्ड करणे हा एक विक्रमच आहे! या सर्वांमुळे मराठीत ऑडिओबुक्स प्रकाशन व्यवसाय रूजतो आहे आणि दिवसेंदिवस वाढतो आहे. अनेक मराठी कलावंत उत्तम पुस्तके वाचायला स्वतःहून पुढाकार घेत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे!

गरीब कामगारांचे पगारही खाणारी महापालिका अशी प्रतिमा बनवू नका – नितीन कदम

0

पुणे- गेली ३ महिने पगार न झाल्याने आर्थिक तणावाखाली काम करणाऱ्या महापालिकेतील एका महिलेला हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप करत , गोरगरीब कामगारांचे पगार देखील खाणारी महापालिका अशी पुणे महापालिकेची प्रतिमा बनवू नका असा स्पष्ट इशारा देत नुसत्या बड्या बड्या बाता मारणारे सत्ताधारी कामगारांच्या पोटावर ही मारत असल्याचा घणाघात राष्ट्रवादीचे नितीन कदम यांनी केला आहे.

ते म्हणाले ,’ कंत्राटी पद्धतीने असलेल्या सुरक्षारक्षक महिलेला तीन महिने पगार न मिळाल्यामुळे आलेल्या दडपणामुळे ऑन ड्युटी असताना आला हृदयविकाराचा झटका आला. गणेश कला क्रिडा येथे कार्यरत असलेल्या या महिलेला गेले तीन महिने पगार झाल्यामुळे घरातील आर्थिक परिस्थिती मध्ये प्रचंड दडपण आले होते त्यामुळेच तीन साडेतीनच्या दरम्यान तिला हृदयविकाराचा झटका आला. त्यांना भारती हॉस्पिटल येथे दाखल केले असता तातडीने उपचार मिळाल्यामुळे जीव वाचला. परंतु पगार न झाल्यामुळे आर्थिक अडचणीमुळे पुढील उपचार मिळणे जिकिरीचे झाले आहे.कोट्यावधी खर्चाचे मोठे मोठे प्रकल्पांचे पुणेकरांना स्वप्न दाखवणाऱ्या सत्‍ताधारी भाजपच्या पुणे महानगरपालिकेच्या कारभाराचे यामुळे वाभाडे निघाले आहे.

महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक -आयुक्तांना रिपब्लिकनचा घेरावो

0

पुणे – गेली कित्येक वर्षे महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक आणि बेकायदेशीर पिळवणूक करणाऱ्या पुण्याच्या महापालीकेविरोधात आता आवाज उठू लागला आहे . महापालिकेच्या विविध खात्यात ठेकेदारा मार्फत काम करणारे ४ हजार कर्मचारी यांना वेळेवर पगार होत नाही म्हणून रिप्ब्लिकन पक्षा च्या वतीने आज आयुक्तांना घेराव घालण्यात आला. अखेरीसमहापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या दालनात बैठक बोलवली या बैठकी मधे आयुक्त यांनी पुढिल दोन दिवसात सुरक्षा रक्षक यांचे पगार होतील व पुढिल आठवडा मधे इतर सर्व खात्या मधिल कर्मचारी यांचे पगार होतील हे आश्वासन दिले.
तसेच जे ठेकेदार वेळेवर पगार करत नाही त्यांना काळ्या यादीत टाकायचे आदेश दिले व पुढिल महिण्यात या पद्धती मधे एक नियमावली करून ते मान्य करुन प्रत्येक कर्मचारी यांचा महिन्या च्या ७ तारखे च्या आत त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असे आश्वासनही त्यांनी दिले
स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने , गटनेत्या फरझाना शेख, नगरसेविका हिमालीताई कांबळे, शहराध्यक्ष संजय सोनवणे , राज्याचे सहसचिव बाळासाहेब जानराव , अशोक कांबळे, अशोक शिरोळे,नगरसेवक अयुब शेख, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे , शैलेश चव्हाण, वसंतराव बनसोडे , महिला अध्यक्ष शशीकला वाघमारे व सर्व पदाधीकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महापालिका कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान

0

पुणे- पुणे महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी सेवकांना पुढील पाच आर्थिक वर्षांसाठी मूळ पगार, महागाई भत्ता आणि ग्रेड पे यावर एकत्रित ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान देण्यासाठी महापालिकेच्या मान्यताप्राप्त कामगार संघटनांसाठी करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘सानुग्रह अनुदानासंदर्भातील संघटनांबरोबरचा पाच वर्षांचा करार या वर्षी संपुष्टात आला. त्यामुळे सन २०२१-२०२२ ते सन २०२४-२०२५ या कालावधीतील आर्थिक वर्षांसाठी प्रशासनाने संबंधित संघटनांबरोबर नवीन करार करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच सानुग्रह अनुदानासह दर आर्थिक वर्षी अनुक्रमे सतरा हजार, एकोणीस हजार, एकवीस हजार, तेवीस हजार आणि पंचवीस हजार जादा रक्कम अतिरिक्त सानुग्रह अनुदान म्हणून अदा करण्यासाठी करार करण्यासाठी आणि फक्त या आर्थिक वर्षासाठी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये कोविड प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.’

रासने पुढे म्हणाले, ‘महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी, शिक्षण विभागामधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बालवाडी शिक्षिका, सेविका, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांना सानुग्रह अनुदाना योजनेचा लाभ मिळणार आहे.’

फुरसुंगी, उरुळी देवाची पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर

फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती रासने यांनी दिली.

रासने म्हणाले, ‘या दोन्ही गावांतील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी सन २०१७ पासून तुकाई टेकडी फुरसुंगी येथे ३३ एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प, या प्रकल्पाला पाणीपुरवठा करणारी लष्कर जलकेंद्रापासूनची मुख्य जलवाहिनी, अंतर्गत वितरण नलिका, तेरा साठवण टाक्या आदी विकासकामे सुरू आहेत. या गावांचा नुकताच महापालिकेच्या हद्दीत समावेश झाल्याने पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहेत. या ठिकाणची पाणीपुरवठ्याची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली.’

राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आशियाई सिंह खंदकासाठी निधी

कात्रज येथील महापालिकेच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आशियाई सिंह खंदक उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या निकषानुसार खंदक उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व करांसहित सुमारे तीन कोटी सहा हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याशिवाय रॉयल्टी आणि चाचणीचा खर्च अनुक्रमे ३४ हजार आणि ८४ हजार रुपये इतका होणार आहे.’

आरोग्य विभागातील करार पद्धतीतील सेवकांना मुदतवाढ

कोरोना विषाणू संसर्गामुळे येणार्या संभाव्य तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागातील करार पद्धतीतील सेवकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, महापालिकेच्या आरोग्य विभागात वर्ग एक ते चार मध्ये सेवकांची एकूण मान्यता पदांची संख्या सोळाशे एकोणसत्तर इतकी आहे. मात्र केवळ आठशे ऐशी सेवक कार्यरत आहेत. म्हणजेच रिक्त पदांची संख्या सातशे एकोणनव्वद इतकी मोठी आहे. कोविड रुग्णालय आणि फ्ल्यू क्लिनिक सेंटरचा वाढता ताण वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांवर येतो.’

रासने पुढे म्हणाले, ‘त्यामुळे कंरार पद्धतीने सेवेत असलेल्या बधिरीकरण तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, ज्युनिअर नर्स, सेवक, आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, दंतशल्यचिकित्सक अशा एकूण ७३ सेवकांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.’

डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्यासाठी सल्लागार नियुक्तीस मान्यता

शहराच्या विविध भागांतील मान्य विकास आराखड्यातील डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्याच्या उद्देशाने विविध टप्प्यांवरील कामे पूर्ण करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘बालेवाडी येथील मुळा नदीकाठच्या २४ मीटर डी. पी. रस्ता आणि बाह्य वळण रस्ता ते ज्युपिटर हॉस्पिटलजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूल, मुंढव्यातून जाणारा २४ मीटरचा रस्ता, कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द, उंड्रीतून जाणारे १८ मीटर आणि २४ मीटरचा रस्ता विकसित करण्यासाठी प्रकल्पांसाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती करणे, भूसंपादन करणे, पाठपुरावा करणे आणि सुलभ व सुरक्षित वाहतुकीसाठी विविध उपाययोजना करणे आदी विकासकामे करण्यासाठी आज मान्यता देण्यात आली.’

रासने म्हणाले, ‘शहरातील विकास आराखड्यातील रस्ते ताब्यात आलेल्या जागेनुसार आणि उपलब्ध तरतुदीनुसार दरवर्षी टप्प्याटप्प्याने विकसित केले जातात. रस्ते विकसनाचा खर्च, तुलनेने कमी उपलब्ध तरतूद आणि जागा ताब्यात घेताना जागा मालकांची रोख मोबदल्याची मागणी अशा कारणांमुळे डी. पी. रस्ते आणि पूल विकसित करण्यात मर्यादा येतात. अशा परिस्थितीत रस्ते विकसन खासगी सहभागातून करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाअंतर्गत रस्त्यांच्या जागा एफएसआय आणि टीडीआर यांच्या मोबदल्यामध्ये ताब्यात घेता येत आहेत.’

रासने म्हणाले, ‘रस्ते विकसनाचा खर्च विकसकास किंवा ठेकेदारास क्रेडिट नोट स्वरूपात देण्याचे प्रस्तावित करण्यात येते. ही क्रेडिट नोट पुणे महापालिकेकडे असलेल्या बांधकाम परवानगी शुल्काच्या अंतर्गत वापरता येते. तसेच ती क्रेडिट नोट हस्तांतरणीय असते, या वर्षी ११ रस्ते आणि दोन उड्डाणपूलांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. पीपीई अंतर्गत रस्ते विकसित करण्याच्या तरतुदींना गेल्या वर्षी मुख्य सभेने आणि स्थायी समितीने मान्यता दिली होती. या प्रस्तावामुळे महापालिकेला थेट गुंतवणूक न करता क्रेडिट नोटच्या बदल्यात रस्त्यांची व पुलांची कामे विकसित करण्यात येणार आहेत.’

सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी संयुक्त समिती स्थापन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. १८ : – सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. त्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात यावी. जेणेकरून प्रश्न, अडचणींच्या सोडवणुकीसाठी विभागनिहाय आढावा घेऊन निर्णय घेणे सुलभ होईल, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज  मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपल्या मागण्या सादर केल्या. या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टांक, प्रदेशाध्यक्ष जयसिंग कछवा आदींचा समावेश होता.

यावेळी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत निश्चितच सकारात्मक विचार करण्यात येईल. यातील प्रलंबित, प्रश्न अडचणींच्या सोडवणुकीसाठी समिती स्थापन करण्यात यावी. या समितीमध्ये संघटनेचे पदाधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश करण्यात यावा. या समितीने प्रलंबित प्रश्न, अडचणींचा आढावा घेऊन, त्यांच्या सोडवणुकीसाठी पर्याय, शिफारशी कराव्यात. ज्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे शक्य आहे, ते मार्गी लावण्याचे प्रस्ताव, पर्यायही सादर करावेत.

यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले, तसेच मुख्यमंत्री श्री. ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री. पटोले यांचा सत्कारही करण्यात आला.