Home Blog Page 2208

राज्यातील ११३ नगरपंचायतींसाठी २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या

0

मुंबई, दि. 18: राज्यभरातील 113 नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, 30 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

श्री. मदान यांनी सांगितले की, एप्रिल 2020 ते मे 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 88, डिसेंबर 2021 मध्ये मुदत समाप्त होणाऱ्या 18 आणि 7 नवनिर्मित अशा एकूण 113 नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 1 नोव्हेंबर 2021 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 23 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. 29 नोव्हेंबर 2021 रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. मतदान केंद्रांची यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 30 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशीही माहिती श्री. मदान यांनी दिली.

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होणाऱ्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे अशी: ठाणे- मुरबाड व शहापूर, पालघर- तलासरी, विक्रमगड, मोखाडा, रायगड- खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित), रत्नागिरी- मंडणगड, दापोली, सिंधुदुर्ग- कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ, देवगड- जामसंडे, पुणे- देहू (नवनिर्मित), माळेगांव (ब्रुद्रुक) (नवनिर्मित), सातारा- लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी, सांगली- कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ, सोलापूर- माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित), नाशिक- निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, धुळे- साक्री, नंदुरबार- धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी, जळगाव- बोदवड, औरंगाबाद- सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित), परभणी- पालम, बीड- केज, शिरूर- कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ, उस्मानाबाद- वाशी, लोहारा बु., नांदेड- हिमायतनगर, नायगाव, अर्धापूर, माहूर, हिंगोली- सेनगाव, औंढा-नागनाथ, अमरावती- भातकुली, तिवसा, धारणी, नांदगाव-खंडेश्वर, बुलडाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी, वाशीम- मानोरा, मालेगाव, नागपूर- हिंगणा, कुही, भिवापूर, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, भंडारा- मोहाडी, लाखनी, लाखांदूर, गोंदिया- सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी, चंद्रपूर- सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, गडचिरोली- मुलचेरा, एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड. एकूण- 113.

बार्टीने अनुसूचित जातीतील बेरोजगारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यावे-ज.मो.अभ्यंकर

0

बार्टी व समाज कल्याणच्या विविध योजनांचा आढावा

पुणे दि.18: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) येथे राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी बार्टी संस्थेमार्फत अनुसूचित जातीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांचा आढावा घेतला.

यावेळी समाज कल्याण चे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य आर. डी. शिंदे, श्री. के. आर. मेढे, बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार आदी उपस्थित होते.श्री. अभ्यंकर म्हणाले, अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी बार्टीने विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देतानाच अनुसूचित जातीतील पदवी, पदविका धारक, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी आदी शिक्षण घेतलेल्या बेरोजगार विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करावे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार जिल्हानिहाय माहिती संकलित करून त्यांना विविध क्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून द्यावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान शिष्यवृत्ती योजनांची उत्पन्नाची मर्यादा शिथिल करावी. बार्टीने संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रमाला अधिक गती द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

श्री. अभ्यंकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. बार्टीतील विविध योजना व उपक्रमांची माहिती श्री. गजभिये यांनी दिली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती आयुक्त डॉ. नारनवरे यांनी दिली.

बैठकीला बार्टी व समाज कल्याण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील १५ वर्षांची ब्लू प्रिंट तयार करा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 18 : आदिवासी – जनजातींच्या तसेच अनुसूचित क्षेत्रातील लोकांच्या विकासासाठी ‘पेसा’ हा अतिशय महत्त्वपूर्ण कायदा असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील 15 वर्षांचा विकास आराखडा तयार करावा व तो सर्व अनुसूचित क्षेत्र असलेल्या राज्यात राबवावा. आदिवासी विकास विषयक प्रश्नांची सोडवणूक करताना पंचायती राज विभागासह, आदिवासी विकास विभाग, वन विभाग व महसूल विभाग यांनी आपापसात समन्वय ठेवावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

पेसा (पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल्ड एरियाज) कायदा १९९६ च्या अंमलबजावणीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाने केंद्रीय जनजाती विकास मंत्रालयाच्या सहकार्याने विज्ञान भवन नवी दिल्ली येथे एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्राला राजभवन, मुंबई येथून दूरस्थ माध्यमातून संबोधित करताना राज्यपाल कोश्यारी बोलत होते.

केंद्रीय पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह, केंद्रीय जनजाती कार्यमंत्री अर्जुन मुंडा, पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, विविध विभागांचे सचिव, तसेच अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी चर्चासत्राला उपस्थित होते.

पेसा हा अनुसूचित क्षेत्रातील आदिवासींच्या सशक्तीकरणासाठी अतिशय प्रभावी कायदा असून महाराष्ट्रात २०१४ नंतर यापूर्वीच्या राज्यपालांनीही पेसा अंतर्गत किमान १५ महत्वपूर्ण कायदे व सुधारणा केल्यामुळे अनुसूचित क्षेत्रांत ग्रामविकासाला नवी दिशा मिळाली तसेच महिलांचा सहभाग अभूतपूर्व असा वाढला, असे राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

आदिवासी प्रतिभावान, पर्यावरणस्नेही व अभावात देखील आनंदी राहणारा समाज आहे. या समाजाला आधिकाधीक विकासप्रक्रियेत सामावून घेणे गरजेचे आहे. या दृष्टीने आदिवासींच्या समस्या समजून घेण्यासाठी अधिकारी व लोक प्रतिनिधींनी त्यांच्यात राहणे आवश्यक असल्याचेही श्री.कोश्यारी यांनी नमूद केले.

पेसा कायदा लागू असलेल्या सर्व राज्यांनी एक दुसऱ्याच्या यशस्वी उपक्रमांचा अभ्यास करावा. आदिवासी समाजाने देशाला क्रीडापटू, एव्हरेस्ट चढून जाणारे गिर्यारोहक दिले असून ही त्यांची शक्ती जगविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे असेही राज्यपालांनी सांगितले.

केंद्रीय पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, सर्व राज्यांनी पेसा कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. राज्यांनी पेसा नियम राज्यपाल मुख्यमंत्री व संबंधितांशी चर्चा करून तयार करावे, असे त्यांनी सांगितले.

‘ग्राम स्वराज्य’हीच पेसा कायद्याची मुख्य संकल्पना असून पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले पाहिजे तसेच अशासकीय संस्थांना देखील सोबत घेतले पाहिजे, असे केंद्रीय जनजाती विकास मंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितले.

राष्ट्रीय ग्राम विकास व पंचायत राज संस्थेच्या महानिदेशक यांनी सादरीकरणात महाराष्ट्र राज्यात राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली पेसा अंतर्गत चांगले काम झाले असल्याबद्दल यावेळी प्रशंसा केली.

0000

ग्रामपंचायत पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

0

पुणे, दि. 18: राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये 22 नोव्हेंबर 2021 (सोमवार) पर्यंत सुधारणा करण्यात येईल. तहसिलदारांनी निवडणूकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक 22 नोव्हेंबर 2021 (सोमवार) आहे.

उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे 30 नोव्हेंबर (मंगळवार) ते 6 डिसेंबर (सोमवार) या कालावधीत आणि सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत या वेळेत सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 7 डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी 11 वाजल्यापासून होईल आणि छाननी संपेपर्यंत ही प्रक्रीया चालेल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 9 डिसेंबर (गुरुवार) असून वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येऊन अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.मतदान 21 डिसेंबर (मंगळवार) रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत राहील. मतमोजणी 22 डिसेंबर (बुधवार) रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्या ठिकाणी व वेळेनुसार होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 27 डिसेंबर 2021 (सोमवार) पर्यंत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.जिल्ह्यात वेल्हे तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींमधील 65 जागा, भोर 71 ग्रामपंचायती 121 जागा, पुरंदर 16 ग्रा.पं.-27 जागा, दौंड 6 ग्रा.पं.-6 जागा, बारामती 10 ग्रा.पं.-13 जागा, इंदापूर 6 ग्रा.पं.-8 जागा, जुन्नर 31 ग्रा.पं.-55 जागा, आंबेगाव 33 ग्रा.पं.-55 जागा, खेड 36 ग्रा.पं.-49 जागा, शिरुर 8 ग्रा.पं.-12 जागा, मावळ 15 ग्रा.पं.-19 जागा, मुळशी 35 ग्रा.पं.च्या 63 जागांसाठी तर हवेली तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीच्या 10 जागा अशा एकूण 317 ग्रामंपचायतीतील 503 जागांसाठी पोट निवडणूक होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

हिंजवडी मेट्रोचे काम सुरु होण्यापूर्वी वाहतूक नियोजन केले जावे- आमदार सिद्धार्थ शिरोळे

0

पुणे – शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सुरू होत असतानाच मार्गावरील २३ किलोमीटरच्या वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली जावी, अशा मागणीचे पत्र पालकमंत्री अजित पवार यांना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिले आहे.

पुण्यातून बाहेर पडणारी आणि बाहेरुन पुण्यात येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोच्या मार्गाच्या कामामुळे वाहतुकीची समस्या वाढण्याची शक्यता आहे. संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खाजगी वाहने, अवजड वाहने, पीएमपीच्या बसगाड्या, दुचाकी वाहने याचे २३ किलोमीटर मेट्रो मार्गावरील वाहतुकीचा नियोजन आराखडा करणे गरजेचे आहे, असे आमदार शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.

या वाहतूक नियोजनाचा आराखडा करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आदी संबंधित प्रशासकीय अधिकारी, टाटा सिमेन्सचे प्रशासकीय अधिकारी यांची एकत्रित बैठक बोलवावी. या बैठकीत मी स्वतःही सहभागी होईन आणि सुरळीत वाहतुकीसाठी उपाययोजना सुचवेन, असे आमदार शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या विरोधात कारवाई करु नये

0

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई, दि. १८ नोव्हेंबर- मुंबई बॅंकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व विधानपरिषदेचे विरोध पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करु नये असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी पोलिस विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती (मुंबै) सहकारी बँकेतील कथित अनियमिततेसंदर्भात मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या विरोधात करण्यात आलेल्या एका तक्रारीवरुन एफआयर दाखल करण्यात आला होता. सदर एफआयआरनुसार पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेने केलेल्या तपासावरुन १८ जानेवारी २०१८ रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिका-यांकडे यासंदर्भातील सी- समरी अहवाल आर्थिक गुन्हा शाखेने दाखल केला होता. याप्रकरणी तक्रारदाराने समाधान व्यक्त करुन यासंदर्भात आता आपली कुठलीही तक्रार नसल्याचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिका-यांकडे सांगितले होते. परंतु सी समरी अहवालाच्या विरोधात पंकज कोटेजा यांनी याचिका दाखल करुन या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती न्यायदंडाधिका-यांकडे केली होती. कोटेजा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिका-यांनी १६ जून २०२१ रोजी सी समरी अहवाल रद्द केला व याप्रकरणाचा पुढील तपास करण्याचे आदेश तपास अधिका-यांना दिले होते. परंतु अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिका-यांच्या या निर्णयाला मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, आमदार प्रविण दरेकर यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु सदर पुनर्विचार याचिका सत्र न्यायालयाने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी फेटाळून लावली होती. सत्र न्यायालयाच्या आदेशाला जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष, आमदार प्रविण दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करत आव्हान दिले. उच्च न्यायालयात रिट याचिका प्रलंबित असेपर्यंत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार सुरु असलेली मुंबई बँकेच्या विरोधातील तपासाला स्थगिती देण्याची मागणी प्रविण दरेकर यांनी उच्च न्यायालयात रिट याचिकेमार्फत केली होती. आज या रिट याचिकेवर सुनावणी झाली असताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. संदिप शिंदे यांनी दरेकर यांच्याविरुध्द कठोर कारवाई न करण्यादे आदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत.या संदर्भातील पुढील सुनावणी २ डिसेंबर रोजी होणार आहे.
प्रविण दरेकर यांच्यावतीने अँड. अखिलेश चौबे यांनी तर सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रकाश शेट्टी यांनी आज उच्च न्यायालयात बाजू मांडली.

कर नाही तर डर कशाला…
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

विधीमंडळाच्या सभागृहात विरोधी पक्षनेता म्हणून महाविकास आघाडी सरकारचे मी वाभाडे काढत आहे व सरकारचा गैरकारभार समोर आणत असल्यामुळे पोलिस यंत्रणांवर दबाव टाकून मला कसे अडकवता येईल, याचा केविलवाणा व दुर्दैवी प्रयत्न सरकारकडून होत आहे. पण माझ्या विरोधातील कोणत्याही चौकशीला मी सामोरे जाण्यास तयार आहे. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या विरोधातील तक्रारी संदर्भात कायदयानुसार जी प्रक्रिया आहे. त्या पार पाडाव्यात, माझी नेहमीच त्यासाठी सहकार्याची भूमिका आहे. या माध्यमातून सरकार फक्त शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करतेय, परंतु ज्याला कर नाही त्याला डर कशाला अशी प्रतिक्रिया मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, आमदार प्रविण दरेकर यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत मुंबई बॅंकेच्या संचालक मंडळाने बॅंकेला प्रगतीकडे नेले व नफ्यामध्ये आणले. नाबार्ड, आरबीआय यांच्या निकषांचे पालन करुन मुंबई बॅंक सर्वोत्तम बँक केली. त्यामुळे कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत असे स्पष्ट करतानात ते म्हणाले की, पोलिसांनी जो सी समरी अहवाल दिला होता, त्याच पोलिसांच्या सी समरीवर आक्षेप घेण्यात आला, त्यामुळे आता पोलीस सांगणार का आम्ही केलेला रिपोर्ट चुकीचा होता असेही दरेकर यांनी सांगितले.

पुणे महापालिकेला १ कोटीची टोपी घालण्याचा प्रयत्न उघडकीस -(मुख्य सभा पहा -व्हिडीओ)

0

पुणे- बोगस पूर्वगणन पत्रक , बोगस निविदा सर्वच कागदपत्रांची बोगस फाईल बनवून महापालिकेला तब्बल १ कोटी रुपयांची टोपी घालण्याचा प्रयत्न ‘गोल्डन गैंग ‘ ने केल्याचे गेल्या ८ नोव्हेंबरला उघड होऊनही अद्याप यावर फारशी वेगाने कारवाई होत नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे .

स्मशान भूमीतील न केलेल्या कामांची बिले सादर करून हे १ कोटी काढण्याचे प्रकार अंतिम टप्प्यात फाईल बिल अदा करण्याच्या मंजुरीवर असताना उघड झाली याबाबत आज मनसे चे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी आवाज उठविला त्याच बरोबर अरविंद शिंदे, दिपाली धुमाळ , अविनाश बागवे पृथ्वीराज सुतार आदींनी याबाबत प्रश्नाला धारेवर धरत कारवीची मागणी केली तर सभागृहनेते गणेश बिडकर यांनी हि आता आयुक्तांकडून कडक कारवीची अपेक्षा आहे असे सांगत त्यासाठी त्यांना सोमवार पर्यंतचा अवधी दिला . अतिरिक्त आयुक्त खेमनार यांनी यावेळी नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे देत असा १ कोटीची टोपी घालण्याचा प्रकार उघड झाल्याचे आपल्या खुलाशात काबुल केले . आणि आपण या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधून , खातेनिहाय चौकशीही करत असल्याचे स्पष्ट केले .

पहा नेमके आजच्या मुख्य सभेत झाले तरी काय ?

पहा महापालिकेची मुख्य १८ नोव्हेंबर २०२१ ची मुख्य सभा कृपया सुरुवातीला १८ ऑक्टोबर अशी तारीख व्हिडीओवर चुकून पडली आहे . ते लक्षात येताच पुढे तारीख आजची बरोबर दुरुस्त केलेली आहे . दिलगीर आहोत )

महाविकास आघाडी मुख्याध्यापकांच्या मागण्यांनुसार शैक्षणिक धोरणात सकारात्मक बदल करेल

0

पुणे : शिक्षणाची परंपरा अबाधित ठेवत शिक्षक वेळप्रसंगी खिशातून पैसे खर्च करून पटसंख्या टिकविण्यासाठी प्रयत्न करतात. शिक्षक भरती, वेतन, अनुदान,शिपायांच्या रिक्त जागा, कमी वेतन, संचमान्यतेतील समस्या, आधारकार्ड जुळवणी अशा अनेक अडचणी मुख्याध्यापक व शिक्षकांना आहेत. या मागण्या येत्या अधिवेशनात मांडून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. अभ्यासपूर्ण पद्धतीने हे प्रश्न सोडवून महाविकास आघाडी मुख्याध्यापकांच्या मागण्यांनुसार शैक्षणिक  धोरणात सकारात्मक बदल करेल, असे प्रतिपादन आमदार अतुल बेनके यांनी केले. 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ यांच्या ६० व्या हीरक महोत्सवी राज्यस्तरीय शैक्षणिक अधिवेशनाचे आयोजन पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन ओझर, जुन्नर येथील श्री क्षेत्र विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या सांस्कृतिक भवनात झाले. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन, महामंडळाच्या फेसबुक, यु टूब पेजचे अनावरण आणि अँपचे उद्घाटन  मान्यवरांच्या हस्ते झाले. 
कार्यक्रमाला अधिवेशनाचे अध्यक्ष मुख्याध्यापक डॉ.आर.डी. कदम, पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, विघ्नहर देवस्थान ट्रस्ट ओझरचे गणेश कवडे, माजी आमदार भगवान साळुंके, महामंडळाचे अध्यक्ष जे.के.पाटील, सचिव शांताराम पोखरकर, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, सचिव सुरेश कांचन, चंद्रकांत मोहोळ, महेंद्र गणपुले, सुभाष माने, अरुण थोरात, ज्ञानेश्वर म्हात्रे, आदिनाथ थोरात, हनुमंत कुबडे, तबाजी वागदरे, नंदकुमार सागर, प्रा.अविनाश ताकवले, मधुकर नाईक, प्रसाद गायकवाड, शिवाजी किलकिले आदी उपस्थित होते. या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून साधारण १५०० ते २००० माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. ज्ञानेश्वर  म्हात्रे यांनी १ लाख रुपयांची देणगी दिली. 
अतुल बेनके म्हणाले, कोविड काळात शिक्षकांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. याशिवाय मतदानापासून ते स्वयंपाकापर्यंत सर्व कामे करण्याकरिता शिक्षक पुढे असतात. महाराष्ट्रातील नव्या पिढीला सुसंस्कृत, सुशिक्षित करण्याकरिता शिक्षक नेहमी पुढाकार घेतात. शिक्षण संस्थाना लाईटबील व्यावसायिकरित्या नाही तर वेगळ्या कमी दराने आकारण्यात येत आहे. ज्यांना जादा बिल येत  असेल,त्यांनी महावितरणाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. 
डॉ.आर.डी.निकम म्हणाले, इंग्रजीसोबत मराठी माध्यमाच्या शाळा टिकवायच्या  असतील, तर सरसकट अनुदान मिळण्याची आवश्यकता आहे. वेतन त्रुटी, पोषण आहार हा अनेक समस्या आहेत. शासन, शिक्षक, पालक व विद्यार्थी या सर्वांशी मुख्याध्यापक समन्वय आढतात. त्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची आहे. 
जे.के.पाटील म्हणाले, शिक्षण व्यवस्था कठीण काळातून जात आहे. ऑनलाईन पद्धती असली, तरी वर्गातील अध्यापनाला पर्याय नाही. शिक्षक भरती, अनुदान, पेन्शन अशा अनेक समस्या आपल्यासमोर आहेत. त्यामुळे ता सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे. 

हरिश्चंद्र गायकवाड म्हणाले, शिक्षण क्षेत्र, मुख्याध्यापक, शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याकरिता महामंडळाची स्थापना करण्यात आली. शिक्षणातील प्रश्न सोडवून शिक्षण क्षेत्राला योग्य दिशा देण्याचे काम करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. 

सांस्कृतिक मंत्र्यांनी मराठी चित्रपट निर्मात्यांच्या मागण्या कालच केल्यात मान्य

0

मुंबई, दि. १७ नोव्हेंबर २०२१

मराठी चित्रपट निर्मात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच कोरोना महामारीच्या संकटामुळे चित्रपट निर्माते व रंगकर्मी यांचे मोठे नुकसान झाले झाले. परंतु महाराष्ट्र विकास आघाडी सरकार मराठी चित्रपट निर्मात्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील व त्यांना सर्व ती ताकद देऊ, असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

मराठी चित्रपट निर्मात्यांची बैठक टिळक भवन येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना सांस्कृतीक कार्य मंत्री अमित देशमुख म्हणाले की, चित्रपटांना उद्योगाचा दर्जा देण्याचा राज्य सरकारचा विचार असून त्यादृष्टीने काम सुरु आहे. उद्योगाचा दर्जा मिळाल्यास अनेक सवलतीही मिळतील. नाशिकमध्ये चित्रनगरी निर्माण करण्याचा सरकारचा विचार आहे तसेच विदर्भातही एक चित्रनगरी उभा रहावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. आज ज्या मागण्यांचे निवेदन दिले आहे त्या सर्व मागण्या तत्वतः मान्य असून चित्रपटांना अनुदानही दिले जाईल व इतर मागण्यांवरही निर्णय घेतला जाईल. चित्रपट व नाट्यगृहांना परवानगी देताना ५० टक्के प्रक्षेकांची परवानगी दिली आहे ती १०० टक्के देण्यासाठी प्रयत्न करु. एकपडदा चित्रपटगृहाबद्दल एक सर्वंकष धोरण ठरवले जात आहे तसेच मल्टिप्लेक्समध्ये ५० टक्के मराठी चित्रपट प्रदर्शित करावेत यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन देशमुख यांनी दिले.

या बैठकीला प्रदेश काँग्रेसच्या सांस्कृतीक सेलच्या अध्यक्षा विद्या कदम, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस देवानंद पवार, सचिव राजाराम देशमुख, तजेला बगाडे, यशवंतसिंग, विष्णु शिंदे, देवेंद्र मोरे, बाळासाहेब गोरे, विजय राणे, शिरीष राणे, रमेश साळगावकर, विकास तांबे, शारदा जगताप, फरजाना डांगे, दाऊद सैय्यद, जेसाभाई मोटवाणी आदी उपस्थित होते.

‘गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका असून त्यांना विशेष सुरक्षा द्या’, देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

0

मुंबई-भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका असून, त्यांना विशेष सुरक्षा द्या. अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र देखील पाठवले आहे.

त्यात म्हटले आहे की, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका आहे. बहुजनांच्या बाजूने उभे राहिल्याने यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्याने हल्ला करत आहेत. लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेने दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

विरोधक असो वा सत्ताधारी ज्याचा जिवास धोका त्याला संरक्षण दिल पाहिजे आणि म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी, असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांच्या जीवास काही बर वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असेल. पडळकरांना तात्काळ सुरक्षा द्या, असे या पत्रात म्हटले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे देखील पत्राद्वारे ही मागणीस करण्यात आली आहे.

सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने पडळकरांच्या गाडीवर हल्ला केला होता. तर सांगलीमध्ये देखील पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करत प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पडळकर हे एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही. असा इशारा देखील पडळकरांनी दिला आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयात शुक्रवार पासून पुस्तक प्रदर्शन आणि भाषांतर कार्यशाळा -राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि फर्ग्युसनचा संयुक्त उपक्रम

0

पुणे, दिनांक १७ नोव्हेंबर : ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’ ही केंद्र सरकारची पुस्तक प्रकाशन संस्था आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या वतीने महाविद्यालयाच्या ग्रंथालयात १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंग परदेशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

परदेशी पुढे म्हणाले, या निमित्ताने तीन दिवसांची राष्ट्रीय भाषांतर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातून निवडक 15 ते 20 तज्ज्ञ भाषांतरकार सहभागी होणार आहेत. नॅशनल बुक ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतील सुमारे 20 ते 25 पुस्तकांचे भाषांतर ह्या कार्यशाळेच्या दरम्यान होणार आहे.

प्रदर्शन आणि कार्यशाळेचे उद्घाटन, शुक्रवार, (दि. १९ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयातील अँफी सभागृहात होणार आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, आकाशवाणीचे माजी संचालक डॉ. सुनील देवधर, सरहद संस्थेचे अध्यक्ष श्संजय नहार, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या कार्यशाळेमध्ये भाषांतर करताना येणाऱ्या भाषिक अडचणी, सामाजिक-सांस्कृतिक अडचणी यांचा सामना कसा करायचा, भाषिक प्रश्‍नांवर मार्ग कसे काढायचे याची चर्चा होणार आहे.

भाजपाने शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्रीपद देऊन सत्तेत सहभागी व्हावे – रामदास आठवलेंनी भाजपाला घातली गळ

0

पुणे- या पूर्वी देखील अनेकदा केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपाने पुन्हा युती करावी असं बोलून दाखवलेलं आहे. शिवसेनेने भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन करावं, अजूनही वेळ गेली नाही, असंही त्यांनी या अगोदर बोलून दाखवलेलं आहे.आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असताना यानिमित्त सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून त्यांना आदरांजली अर्पण केली जात आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील आज बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. पण यावेळी या आपल्या मनातील महायुतीसाठी त्यांनी भाजपाला गळ घातली आहे .आणि त्यांनी शिवसेना-भाजपा आणि आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन व्हावे, अशी मनोकामना देखील व्यक्त केली.

“शिवसेना-भाजपा-आरपीआय महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करणे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली ठरेल ; त्यासाठी शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपाला ५० टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करावे.” असं रामदास आठवले यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याने भाजपा मध्ये चैतन्य उसळेल : सभागृहनेते गणेश बिडकर

0

पुणे, ता. १७ – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २६ नोव्हेंबरला पुणे शहराच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेतील सभागृहनेते गणेश बिडकर यांनी माहिती दिली आहे .या दौऱ्याने भाजपा मध्ये आणखी जोमाने चैतन्य उसळेल असेही ते म्हणाले.

बिडकर म्हणाले, सहकार मंत्री म्हणून पदभार स्विकारल्या नंतर शाह पहिल्यांदाच पुणे भेटीवर येणार आहेत. महापालिका निवडणुकाही लवकरच होणार आहेत त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सकाळी शाह वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. संविधान दिनाचे औचित्य साधून पुणे महापालिकेच्या विस्तारीत नवीन इमारतीत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच महापालिका भवनातील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तयार केले जाणार असून, त्याचे भूमिपूजन शाह यांच्या हस्ते होणार आहे.

बिडकर पुढे म्हणाले, शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा दुपारी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात शाह यांचे प्रमुख मार्गदर्शन मिळणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदार प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, माजी खासदार संजय काकडे, अनिल शिरोळे, प्रदीप रावत, माजी आमदार योगेश टिळेकर, मेधा कुलकर्णी, बापू पठारे, दिलीप कांबळे, विजय काळे यांची उपस्थिती असणार आहे.

राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांचा पुणे जिल्हा दौरा

0

            पुणे दि. 17 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर हे उद्या दि. 18 नोव्हेंबर रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे दि. 18 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 11 वाजता आगमन होईल. सकाळी 11.30 वाजता बार्टीचे महासंचालक यांच्यासोबत अनुसूचित जातीच्या राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आढावा बैठक. दुपारी 12.30 वाजता समाज कल्याण आयुक्त यांच्यासोबत आयोगाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील पदे भरण्याबाबत चर्चा. दुपारी 3 वाजता अनुसूचित जमातीच्या विविध संघटनेच्या पदाधिकारी, शिष्टमंडळांसोबत बैठक आणि त्यानंतर सोयीनुसार शासकीय विश्रामगृह येथून मुंबईकडे प्रयाण असा त्यांचा दौरा आहे.

लोणावळा आणि सासवडला देशपातळीवर पुरस्कार जाहीर

0

यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले अभिनंदन

पुणे, दि. 17 :- केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-2021, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरे मध्ये जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवड या शहरांना 9 नोव्हेंबर रोजी देशपातळीवर सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येत्या 20 नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

जुन्नर, शिरूर, लोणावळा, सासवड, जेजुरी, इंदापूर या शहरांनादेखील कचरा मुक्त शहरे म्हणून केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे पुरस्कृत करण्यात येणार आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नगर परिषदांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेने पर्यटकांमुळे होणाऱ्या कचऱ्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती आकारणी करत दंड आकारला. व्यापारी, पर्यटन व सार्वजनिक ठिकाणी लीडचे झाकण असलेले जोड डब्बे (ट्वीन बिन) लावले. यामुळे शहरात उघड्यावर पडणारा कचरा कमी करण्यास मदत झाली. लोणावळा शहरात घरगुती कचरा हा वेगळा केला जातो. ओला, सुका, घातक आणि प्लास्टिक तसेच घातक व सॅनिटरी कचरा विलगीकृत घेतला जातो. कचरा विलागिकरणाचे प्रमाण हे 100 टक्के आहे. शहरातील नागरिक हे स्वत:ही घरचे घरी किचन वेस्ट पासून खत तयार करतात.

शहरातील सांडपाणी प्रक्रियेसाठी नगरपरिषदेमार्फत एसटीपी प्रकल्प आणि एफएसटीपी प्रकल्प डोंगरगाव येथे बांधण्यात आला आहे. एकूण 40 शौचालयांपैकी 10 शौचालये ताराकिंत शौचालये म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्या तारांकित शौचालयामध्ये नेहमी मिळणाऱ्या सुविधांपेक्षा जास्त सुविधा जसे हँड वॉश, हॅड ड्रायर, सॅनिटरी नॅपकिन, इनसायनरेटर मशीन अशा अनेक सुविधा देण्यात येतात.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सासवड नगरपरिषदेमार्फत घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा 100 टक्के संकलित केला जातो. प्लॅस्टीक बंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी करताना नागरिकांना अल्पदरात पुर्नवापरयोग्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील जुन्या कचऱ्यावर 100 टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या.

कचरा डेपोमध्ये येणाऱ्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे पुनर्वापर करण्यात येते. नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते. तसेच शासनाच्या ‘हरित ब्रॅण्ड’ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

हागणदारी मुक्त गाव योजनेअंतर्गत 600 लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात आली आहेत. शहराला ओडीएफ डबल प्लस दर्जा प्राप्त झाला. सासवड नगरपरिषदेने शहरामध्ये 6 हजारहून अधिक वृक्षांची लागवड व जोपासना केलेली आहे. प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने सणांच्या दिवसांमध्ये पर्यावरणपूरक मुर्ती निर्माल्य संकलन कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत.