पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला संबोधित केले. या भाषणात मोदींनी तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली यावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, मोदी सरकारला असे कायदे करण्याचा अधिकार नव्हता. हे फक्त मोदींच्या अहंकाराचे समाधान करण्यासाठी केले गेले, त्यामुळे 700 शेतकरी मरण पावले.मोदींनी अहंकार बाजूला ठेवून राज्यघटनेनुसार काम केले असते तर हा कायदा झाला नसता, ना शेतकरी एवढे मरण पावले असते . हा निर्णय उशिराने घेण्यात आला आहे. मी नेहमीच म्हणत आलो की लोक रस्त्यावर उतरले की हे सरकार घाबरते. हा सर्व शेतकऱ्यांचा विजय आहे.विरोधक पहिल्या दिवसापासून हे तीनही कृषी कायदे असंवैधानिक असल्याचे सांगत आहेत.
नामांकनाचा अंतिम प्रस्ताव बनवण्याचे काम पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत प्रगतिपथावर – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट हा महाराष्ट्राचा सैनिकी स्थापत्य व गनिमी कावा युद्धनीती आणि कोकणातील कातळशिल्पे या संकल्पना जागतिक वारसा म्हणून प्राथमिक अवस्थेत युनेस्कोने स्वीकार केला आहे, ही महाराष्ट्र शासनासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. या नामांकनाचा अंतिम प्रस्ताव बनवण्याचे काम सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत प्रगतिपथावर असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
श्री. देशमुख म्हणाले की, सागरी किल्ल्यांच्या विकासाचा व जागतिक नामांकनाचा प्रस्ताव आणि मुंबईतील किल्ल्यांचा विकास कार्यक्रम प्रगतीपथावर आहे.युनेस्को द्वारा जागतिक वारसा दिन जरी 18 एप्रिल रोजी केला जात असला तरी त्या काळात शैक्षणिक संस्था बंद असल्याने प्राचीन वारसा संबंधी जनजागृती मुख्यतः नवीन पिढीत व्हावी यासाठी भारत सरकार संस्कृती मंत्रालय यांच्याद्वारे जागतिक वारसा सप्ताह नोव्हेंबरमध्ये साजरा केला जातो. आजतायगत महाराष्ट्र शासना द्वारे संरक्षित एकही स्मारक युनेस्को द्वारा जागतिक वारसा म्हणून घोषित झालेले नव्हते. आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आणि कोकणातील कातळशिल्पे या संकल्पनाचा जागतिक वारसा म्हणून युनेस्कोकडून स्वीकार झाल्याने आपल्या समस्त महाराष्ट्रवासियांसाठी अभिमानाची बाब आहे.

कोविड महामारीच्या काळात निधीची उपलब्धता, कामगारांचा तुटवडा, बांधकाम साहित्याची ने आण करण्यातील अडथळे आणि हे साहित्य वाहतूक उपलब्धतेतील समस्या , कोविड संबंधित सर्व नियम पाळून संवर्धन कार्य चालू ठेवणे अशा अनेक आव्हानांचा सामना करीत पुनश्च संचालनालयाने संवर्धन कामांना सुरुवात केलेली आहे राजगड, साल्हेर, मुल्हेर, अंकाई,टंकाई, खर्डा, गाळणा इत्यादी किल्ल्यांवर तर सिंदखेड राजा येथील स्मारके, भीमाशंकर सुंदर नारायण नीरा नरसिंगपूर येथील मंदिरांचे जतन संवर्धन आता प्रगतिपथावर आहे. येथील संग्रहालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळातील संग्रहालयाच्या अंतर्गत सजावटीचे काम प्रगतिपथावर आहे . सातारा येथील शस्त्र संग्रह, नागपूर व औंध येथील चित्र संग्रह इत्यादींच्या हाय रेझोल्यूशन फोटोग्राफीचे काम याच काळात पूर्ण झाले असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असणारे पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचलनालय हा जागतिक वारसा सप्ताह आपल्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच प्रादेशिक संग्रहालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करीत आहे. या कार्यक्रमांमध्ये स्मारकामध्ये व संग्रहालयामध्ये तज्ज्ञांद्वारे हेरिटेज वॉक, वारसा स्वच्छता अभियान, निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा चित्रकला व शिल्पकलेचे प्रात्यक्षिके, तसेच प्राचीन इतिहास व वारशासंबंधी व्याख्याने प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन माध्यमांद्वारे सादर केली जातील.
कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील
इचलकरंजी-शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहे, अशी खंत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ते इचलकरंजी येथे पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आपल्याला असे वाटते की, तीन कृषी कायद्यांमुळे शेतीमालाला चांगला भाव मिळणार होता आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख येणार होते. पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेश या राज्यातील प्रत्येकी छोट्या भागातील शेतकऱ्यांच्या गटांनी या कायद्यांना विरोध केला तरी बाकी संपूर्ण देशात शेतकरी आणि त्यांच्या संघटनांना हे कायदे मान्य होते. एका छोट्या समुहाला कायद्यांचे महत्त्व पटवून देण्यात अपयश आले. एक विशिष्ट गट संपूर्ण देशभर या विषयावरून अस्वस्थता निर्माण करत होता. सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही या शेतकऱ्यांचे आंदोलन चालू राहिले. अखेरीस कायदे मागे घेण्याचा निर्णय झाला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे कसे आहेत, हे पुन्हा एकदा समजाऊन सांगून ते अंमलात आणावेत.
त्यांनी सांगितले की, कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना बाजार समितीसोबतच बाहेर हवे तेथे माल विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार होते. त्यामुळे स्पर्धा वाढून त्याला चांगला भाव मिळणार असताना त्याला विरोध करण्यासारखे काहीही नव्हते. कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळतो व अशी शेती राज्यात अनेक ठिकाणी यापूर्वीच राबविली जात आहे.
एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी कामगार आंदोलन करत असताना खासगीकरणाचा प्रस्ताव आणणे म्हणजे कामगारांच्या जखमेवर मीठ चोळणे आहे. सार्वजनिक हितासाठी सरकारनेच एसटी चालवायला हवी आणि जनहितासाठी एसटीचा तोटाही सरकारने सहन करायला हवा, असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागांपैकी कोल्हापूरसाठी भाजपाने उमेदवार म्हणून अमल महाडिक यांच्या नावाची शिफारस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे केली आहे. भाजपा, ताराराणी आघाडी व जनसुराज्य यांची एकत्रित मते ध्यानात घेता भाजपा ही जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरु होईपर्यंत संघर्ष चालूच राहील-खासदार गिरीश बापट
पुणे – शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे काम प्रत्यक्ष चालू होईपर्यंत आंदोलन चालूच राहील, असा इशारा खासदार गिरीश बापट यांनी आज (शुक्रवारी) दिला.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरु करण्याच्या मागणीसाठी औंध येथील ब्रेमेन चौकात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनीता वाडेकर, भाजपचे शहर सरचिटणीस राजेश पांडे, सुनील माने, नगरसेवक आदित्य माळवे, नगरसेवक राजेश येनपुरे, माजी महापौर दत्ता गायकवाड, दत्ताभाऊ खाडे, रवींद्र साळेगावकर, प्रतुल जागडे आदी सहभागी झाले होते.
शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे काम सुरु करण्यासाठीच्या सर्व कामांची पूर्तता झालेली आहे. ९८ टक्के जमिनीचे संपादनही झालेले आहे. केंद्र सरकारकडून सर्व ती मदत मिळत असूनही काम सुरु का करण्यात येत नाही? असा सवाल खासदार गिरीश बापट यांनी केला. गेल्या आठवड्यात पीएमआरडीएच्या प्रशासनाला पक्षातर्फे निवेदन देऊन आठ दिवसांत काम सुरु करावे अशी मागणी केली होती. या आठ दिवसांत प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नसल्याने आज आंदोलन करण्यात आले आणि हे काम प्रत्यक्षात सुरु होईपर्यंत विविध मार्गाने आंदोलन केले जाईल, असा इशारा खासदार बापट यांनी दिला.
शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो कामाबाबत प्रशासनात गांभीर्यच दिसत नाही, असा आरोप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केला. विद्यापीठ चौकातील वाहतुकीची कोंडी दूर व्हावी याकरिता मेट्रोचे काम गतीने सुरू होणे गरजेचे आहे. विद्यापीठातील उड्डाणपूल, तिसरा मेट्रो मार्ग याकरिता खासदार गिरीश बापट यांच्या सूचनेवरून भाजपने संपूर्ण सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. पुढच्या २५, ३० वर्षाच्या नियोजनाच्या आराखड्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे आणि राज्य सरकार मात्र हे काम अडवतय हे निषेधार्ह आहे. लाखो लोकांच्या सोयीसाठी मेट्रोचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी खासदार बापट संघर्ष करीत आहेत. माझ्यासह शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि भाजपचे कार्यकर्ते बापट यांच्या पाठीशी उभे आहोत आणि पुढेही उभे राहतील, अशी ग्वाही आमदार शिरोळे यांनी दिली.
नारायण राणे यांनी सेवा क्षेत्रासाठी विशेष पत आधारित भांडवल अनुदान योजना केली सुरु
नवी दिल्ली-केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सेवा क्षेत्रासाठी विशेष पत आधारित भांडवल अनुदान योजनेची आज गुवाहाटी इथे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग ईशान्य परिषदेच्या दुसऱ्या दिवशी, सुरुवात केली. यावेळी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही योजना सेवा क्षेत्रातील उद्योगांच्या तंत्रज्ञानाशी संबंधित गरजा पूर्ण करण्यात मदत करेल. एससी-एसटी एमएसएमईला संस्थात्मक कर्जाद्वारे प्रकल्प, यंत्रसामुग्री आणि सेवा उपकरणे खरेदी करण्यासाठी 25% भांडवली अनुदानाची यात तरतूद आहे. तंत्रज्ञान अद्यायावतीकरणार कोणतेही विशिष्ट क्षेत्रासंबंधी निर्बंधही टाकलेले नाहीत.
राणे यांनी ईशान्येकडील अनुसूचित जाती/जमाती उद्योजकांचा सत्कार केला आणि तरुणांना नोकरी शोधणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे बनण्यासाठी उद्योजक होण्याचे आवाहन केले. तरुणांच्या यशस्वी उद्योजक होण्याच्या प्रवासात एमएसएमई मंत्रालय कोणतीही कसर सोडणार नाही, अशी ग्वाही राणे यांनी दिली. एमएसएमई क्षेत्राची सर्वसमावेशक वाढ केवळ ईशान्येकडील योगदानानेच पूर्ण होते यावर त्यांनी भर दिला. त्यांनी नमूद केले की भारत सरकारची अनुकूल धोरणे आणि एमएसएमई मंत्रालयाद्वारे, विशेषत: समाजातील उपेक्षित घटकांसाठी राबवण्यात येणार्या विविध योजना/कार्यक्रम या क्षेत्राला तिची पूर्ण क्षमता ओळखण्यास मदत करत आहेत.
राणे यांनी एनएसआयसी प्रशिक्षण केंद्र, गुवाहाटी येथील यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रेही दिली. एमएसएमई मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित प्रदर्शन केंद्रातील एससी-एसटी उद्योजकांच्या स्टॉलला त्यांनी भेट दिली. अशा उपक्रमांमुळे एमएसएमई उद्योजकांना, विशेषत: महिला आणि अनुसूचित जाती/जमाती उद्योजकांना त्यांचे कौशल्य/उत्पादने दाखवण्याची आणि विकासासाठी नवीन संधी निर्माण करण्याची, आत्मनिर्भरता मिळविण्याची संधी मिळते असे ते म्हणाले.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुण्यात साखर वाटून शेतकरी आंदोलनाचा जल्लोष…
केंद्र सरकार’ने तीन कृषी कायदे मागे घेऊन सरकार शेतकऱ्यांसमोर झुकले…!! – संभाजी ब्रिगेड
पुणे -शेतकऱ्यांनी दीड वर्ष आंदोलन करून ७०० शेतकऱ्यांनी स्वतःचे प्राण देऊन आंदोलन यशस्वी केल. केंद्र सरकार अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्यांच्या आंदोलनाला घाबरून आज शेतकरीविरोधी ३ काळे कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल तमाम शेतकऱ्यांचे अभिनंदन करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुण्यात साखर वाटून जल्लोष करण्यात आला.
या वेळी ब्रिगेड चे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले ,’केंद्र सरकारच्या आडमुठे धोरणामुळे ७०० शेतकरी शहीद झाले. उत्तर प्रदेश आणि पंजाब च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने शेतकरी विरोधी कायदे पाठीमागे घेतलेले आहेत. परंतु केंद्र सरकारने अधिवेशनामध्ये अधिकृत हे कायदे रद्द करावेत, फसवू नये. जे शेतकरी आंदोलनात शहीद झाले त्यांच्या कुटुंबाला केंद्र सरकारने मोबदला देऊन कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करुन घ्यावे.अशी केंद्र सरकारला संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती वजा मागणी आहे. दिड वर्षानंतर मोदी सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. परंतु त्यामध्ये शेतकऱ्यांचे हित असल्यामुळे सरकारच्या या निर्णयाचं अभिनंदनही आम्ही करतो आहे.
संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांच्या समवेत यावेळी पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष महादेव मातेरे, मराठा सेवा संघाचे दौंड तालुकाध्यक्ष समीर मोहिते, किर्तीकुमार घोरपडे, दिलीप सावंत, रणजित खंडागळे, नंदकिशोर मोहिते, डाॕ. खंडू जगताप, तापकीर व नितीन वाघेरे आदी शेतकरी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वसामान्य जनतेची ताकद काय असते त्याचे हे उदाहरण -उद्धव ठाकरे
कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
मुंबई-कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात की, शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन. जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो.
असो, आता सरकारला उपरती झाली, आणि हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीनं या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलं आहे शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे. केंद्राने यापुढं असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात.
महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय – उपमुख्यमंत्री अजित पवार
शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारनं करावा
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हे तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली आहे. लवकरच याबाबतची संविधानिक प्रक्रियाही सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारनं करावा, ही मागणीही लवकर मान्य व्हावी असेही त्यांनी म्हटले आहे.
या निर्णयाबद्दल अजित पवार यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे. योग्य निर्णयाबद्दल मा. पंतप्रधान महोदयांचे आभार. शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे अभिनंदन. शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.”
डॉ. अमोल कोल्हे (खासदार, शिरूर लोकसभा मतदारसंघ)
‘देर आये दुरूस्त आये’ अशी माझी प्रतिक्रिया आहे. केंद्र सरकारने तीनही कायदे मागे घेतले आहेत ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. शेतकऱ्यांनी दिर्घकाळ दाखवलेल्या एकजूटीचा हा विजय आहे. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करतोय.
मोहन जोशी (काँग्रेस नेते)
या देशात गांधी विचारच चालणार हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. राजकीय फायदा लक्षात घेऊन भाजपा सरकारने गुरूनानक जयंती व ऊत्तर प्रदेशच्या निवडणूका या पार्श्वभूमीवर हा कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय जनतेला आता भाजपाचा कावा समजलेला आहे. त्यांना आता कुठेच थारा मिळणार नाही
वसंत मोरे (मनसे, पुणे शहराध्यक्ष)
मोदी सरकारला उशीरा सुचलेले हे शहाणपण आहे. आता सरकारचं अभिनंदन करावं का आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली द्यावी हा मोठा प्रश्न आहे. केंद्र सरकारचे अनेक निर्णय फसले आहेत, त्यातलाच एक नोटाबंदी करणे हा देखील होता.
अजित अभ्यंकर (कामगार नेते)
रद्द झालेले कृषी कायदे अत्यंत अन्यायी होते. हे कायदे मोठ्या उद्योगपतीसांठी फायद्याचे होते. याच्यामुळे शेतकऱ्यांनी जीवाचे आकांताने यासाठी विरोध केला. संपूर्ण कामगार चळवळीने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. हा शेतकऱ्यांचा विजय आहे. शेतकऱ्यांसमोर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आहे.
‘पराभवाच्या भीतीनंच कृषी कायदे मागे घेण्याचा मोदी सरकारचा निर्णय’; विरोधकांचे वार
नवी दिल्ली : ‘केंद्र सरकारनं तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू’ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी केली. सोबतच, शेतकरी आंदोलकांना आपलं आंदोलन मागे घेत आपापल्या घरी परतण्याचं आवाहनही मोदींनी केलंय. यानंतर लगेचच विरोधी पक्षांकडूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीत पराभवाच्या भीतीनंच भाजप सरकारनं हा निर्णय घेतल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलंय.
आंदोलन अजून थांबवणार नाही – राकेश टिकैत– गेल्या एका वर्षापासून शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणारे राकेश टिकैत यांनी हे आंदोलन अजूनही थांबवणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
सत्याग्रहाच्या मार्गानं अहंकाराची मान झुकवली- राहुल गांधी
‘देशाच्या अन्नदात्यांनी सत्याग्रहाच्या मार्गानं अहंकाराची मान झुकवली. अन्यायाविरुद्ध विजयाच्या शुभेच्छा’ असं म्हणत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आपला एक जुना व्हिडिओही शेअर केला आहे. यात ‘मोदी सरकारला एक दिवस तीनही कृषी कायदे मागे घ्यावे लागतील, हे माझे शब्द जपून ठेवा’ असं म्हणताना ते दिसत आहेत. या व्हिडिओ सहीत आपला शब्द खरा ठरल्याचं राहुल गांधींनी सूचवलंय.
पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पराभवाच्या भीतीने कायदे मागे -खा. संजय राऊत
“गेल्या दीड वर्षापासून काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातले शेतकरी आंदोलन करत होते. सरकारची भूमिका सुरुवातीपासूनच आडमुठेपणाची होती. काही झाले तरी झुकणार नाही, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही अशी त्यांची भूमिका होती. शेतकऱ्याच्या आंदोलनाकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. या काळात अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आले. लाठ्या आणि गोळ्या चालवल्या तरीही शेतकरी हटला नाही. शेतकऱ्यांना दशतवादी, खलिस्तानी, पाकिस्तानी अशा उपाध्या देण्यात आल्या. पण शेतकऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेवर देशातील जनतेच्या भावना सुद्धा त्यांच्यासोबत होत्या. अखेर पंतप्रधानांना काळे कायदे मागे घ्यावे लागले,” असे संजय राऊत म्हणाले.
“यात राजकारण आहेच. पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाच्या पायाखालची वाळू सरकत आहे. शेतकरी संतप्त आहे. ते आपले पराभव करतील या भीतीने हे कायदे मागे घेतले असावेत. तरीही उशीरा का होईना पंतप्रधानांनी देशाचा आवाज ऐकला आणि पहिल्यांदाच मन की बात देशाच्या भावनेशी जोडली गेली आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो,” असे संजय राऊत यांनी म्हटले.
“१३ राज्यातली पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा जो दारूण पराभव झाला त्यानंतर सर्वात आधी पेट्रोलचे दर कमी करण्यात आली. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाची आग पसरत जाईल म्हणून हे कायदे मागे घेतले आहे. ही राजकीय पावले असली तरी हा शहाणपणा त्यांना सूचला त्याचे कौतुक आहे. शेतकऱ्यांचा विजय झाला आहे. शेतकऱ्यांच्या निमित्ताने या देशातले विरोधक प्रथमच एकवटले आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले,” असे राऊत म्हणाले.
केंद्र सरकारने तीनही नवीन कृषी कायदे घेतले मागे-पंतप्रधानांनी केली घोषणा
नवी दिल्ली-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा आज सकाळी केली. आज देशाला संबोधित करताना आपल्या 18 मिनिटांच्या भाषणात ते म्हणाले की, सरकारने तीनही कृषी कायदे चांगल्या हेतूने आणले आहेत, परंतु आम्ही शेतकऱ्यांना हे समजावून सांगू शकलो नाही.आम्ही चांगल्या हेतूने कायदा आणला, पण त्याचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही.
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार !
आज देव- दीपावलीचे पवित्र पर्व आहे. आज गुरु नानक देव यांचे देखील पवित्र पावन प्रकाश पर्व आहे. मी जगातील सर्व लोकांना आणि सर्व देशवासीयांना या पवित्र पर्वाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देत आहे. यावेळी मला ही बाब देखील अतिशय सुखद वाटत आहे की दीड वर्षाच्या अंतरानंतर करतारपुर साहिब मार्गिका आता पुन्हा खुली झाली आहे.
मित्रांनो,
गुरु नानकजी म्हणाले आहेत- ‘विच्च दुनिया सेव कमाइए ता दरगाह बैसन पाइए’
म्हणजेच जगामध्ये सेवेच्या मार्गाचा अंगिकार केल्यानेच जीवन सफल होत असते. आमचे सरकार याच सेवाभावनेसह देशवासीयांचे जीवन सुकर बनवण्याच्या कामामध्ये गुंतलेले आहे. न जाणो कित्येक पिढ्या जी स्वप्ने प्रत्यक्षात येण्याची वाट पाहत होती, ती स्वप्ने पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयास आज भारत करत आहे.
मित्रांनो,
आपल्या पाच दशकांच्या सार्वजनिक जीवनात मी शेतकऱ्यांच्या समस्यांना, त्यांच्यासमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांना अतिशय जवळून पाहिले आहे, त्यांचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच 2014 मध्ये जेव्हा मला देशाने पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्याची संधी दिली तेव्हा आम्ही कृषी विकास, शेतकऱ्यांचे कल्याण यांना सर्वोच्च प्राधान्य दिले.
मित्रांनो,
देशातील 100 पैकी 80 शेतकरी हे लहान शेतकरी आहेत या वस्तुस्थितीची अनेक लोकांना जाणीवच नाही. या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. अशा लहान शेतकऱ्यांची संख्या 10 कोटीपेक्षा देखील जास्त आहे, यावरून तुम्ही कल्पना करू शकता. जमिनीचा हा लहानसा तुकडा हा त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जगण्याचा एकमेव आधार असतो. हेच त्यांचे आयुष्य असते आणि जमिनीच्या या लहानशा तुकड्याच्या आधारावरच ते आपला आणि आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असतात. पिढ्यान पिढ्या कुटुंबात होणाऱ्या वाटणीमुळे या जमिनीचा आकार आणखीनच लहान होत जात आहे.
म्हणूनच देशातील लहान शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठीच आम्ही बियाणे, विमा, बाजार आणि बचत या सर्वांवर चहु बाजूने काम केले आहे. सरकारने चांगल्या दर्जाच्या बियाण्यांसोबतच नीम कोटेड युरिया, मृदा आरोग्य पत्रिका, सूक्ष्म जलसिंचन यांसारख्या सुविधांच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांशी आणखी जवळीक निर्माण केली. आम्ही 22 कोटी मृदा आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांना दिल्या आहेत. आणि या शास्त्रीय अभियानामुळे कृषी उत्पादनात देखील वाढ झाली आहे.
मित्रांनो,
आम्ही कृषी विमा योजना अधिक प्रभावी बनवली आहे. शेतकऱ्यांना तिच्या कक्षेत आणले आहे. आपत्तीच्या काळात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहजपणे नुकसान भरपाई मिळावी यासाठी जुने नियम देखील बदलले. यामुळे गेल्या चार वर्षात आमच्या शेतकरी बांधवांना एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भरपाई मिळाली आहे. आम्ही लहान शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांसाठी विमा आणि पेन्शनच्या सुविधा देखील सुरु केल्या आहेत. लहान शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी थेट त्यांच्या बँक खात्यात एक लाख 62 हजार कोटी रुपये जमा केले, थेट त्यांच्या खात्यामध्ये..
मित्रांनो,
शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या मोबदल्यात पिकांचा योग्य भाव मिळावा यासाठी देखील अनेक पावले उचलण्यात आली. देशाने आपल्या ग्रामीण बाजाराच्या पायाभूत सुविधा बळकट केल्या. आम्ही एमएसपीमध्ये तर वाढ केलीच त्यासोबतच विक्रमी संख्येने सरकारी खरेदी केंद्रांची स्थापना केली. आमच्या सरकारने केलेल्या खरेदीने गेल्या अनेक दशकातील खरेदीचे विक्रम तोडले आहेत. देशातील एक हजारपेक्षा जास्त बाजारांना ई-नाम योजनेच्या माध्यमातून जोडून आम्ही शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कोणत्याही ठिकाणी विकण्याचा एक मंच उपलब्ध करून दिला आहे. आणि त्यासोबतच देशभरातील कृषी मंडयांच्या आधुनिकीकरणावर देखील आम्ही कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत.
मित्रांनो,
आज केंद्र सरकारचा कृषी अर्थसंकल्प पूर्वीच्या तुलनेत पाच पटीने वाढला आहे. दर वर्षी सव्वा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च शेतीवर केला जात आहे. एक लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधीच्या माध्यमातून गाव आणि शेताच्या जवळच साठवणूक, त्याची व्यवस्था, कृषी उपकरणे यांसारख्या अनेक सुविधांचा विस्तार या सर्व गोष्टी अतिशय वेगाने होत आहेत.
लहान शेतकऱ्यांचे सामर्थ्य वाढवण्यासाठी दहा हजार एफपीओ, शेतकरी उत्पादन संघटना बनवण्याची मोहीम सुरू आहे. याव्यतिरिक्त देखील सात हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. सूक्ष्म जलसिंचन निधीच्या तरतुदीला देखील दुप्पट करून ती दहा हजार कोटी रुपये करण्यात आली आहे. आम्ही कृषी कर्ज देखील दुप्पट केले आहे जे या वर्षी 16 लाख कोटी रुपये होईल. आता पशुपालक शेतकऱ्यांमधील मत्स्य पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील किसान क्रेडीट कार्डचे फायदे मिळू लागले आहेत. म्हणजेच आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक असलेले प्रत्येक पाऊल उचलत आहे. एकामागोमाग एक पावले उचलत आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी, त्यांची सामाजिक स्थिती बळकट व्हावी यासाठी पूर्णपणे प्रामाणिकपणाने काम करत आहे.
मित्रांनो,
शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याच्या या महाअभियानाच्या माध्यमातून देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले. देशातील शेतकर्यांना विशेषत: छोट्या शेतकर्यांना अधिक बळ मिळावे, त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि त्यांना शेतमाल विकण्याचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध व्हावेत, हा यामागे उद्देश होता. देशातील शेतकरी, देशातील कृषी तज्ज्ञ, देशातील कृषी अर्थतज्ज्ञ, देशातील शेतकरी संघटना वर्षानुवर्षे सातत्याने ही मागणी करत होते. यापूर्वीही अनेक सरकारांनी यावर विचारमंथन केले होते, यावेळीही संसदेत चर्चा झाली, विचारमंथनही झाले आणि हे कायदे आणण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक शेतकरी संघटनांनी या कायद्यांचे स्वागत केले आणि त्या कायद्यांना पाठिंबा दिला. आज मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो.
मित्रांनो,
आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशातील कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, गावातील गरिबांच्या उज्वल भविष्यासाठी, पूर्णपणे प्रामाणिकपणाने, संपूर्णपणे शेतकऱ्यांप्रती समर्पित भावनेने, चांगल्या हेतूने हे कायदे आणले होते. मात्र इतकी पवित्र, निव्वळ शुद्ध हेतूने आणलेली, शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट, आम्ही प्रयत्न करूनही काही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही.
भले ही शेतकर्यांचा एकच वर्ग विरोध करत असला तरी आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. कृषी अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी यांनीही त्यांना कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आम्ही त्यांना अत्यंत नम्रतेने, मोकळ्या मनाने समजावत राहिलो. वैयक्तिक आणि सामूहिक संवादही अनेक माध्यमांतून सुरू राहिला. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात त्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही.
त्यांनी कायद्यातील ज्या तरतुदींवर आक्षेप घेतला, त्या बदलण्याचेही सरकारने मान्य केले. हे कायदे दोन वर्षांसाठी स्थगित करण्याचाही प्रस्ताव आम्ही ठेवला होता. याच दरम्यान हा विषय माननीय सर्वोच्च न्यायालयातही गेला. या सर्व गोष्टी देशासमोर आहेत, त्यामुळे त्याच्याबद्दल अधिक तपशीलात मी जाणार नाही.
मित्रांनो,
आज देशवासीयांची क्षमा मागताना मला प्रामाणिकपणाने आणि शुद्ध अंतःकरणाने सांगावेसे वाटते की, कदाचित आमच्या तपश्चर्येत काही कमतरता राहिली असावी त्यामुळे दिव्याच्या प्रकाशासारखे सत्य आम्ही शेतकर्यांना समजावून सांगू शकलो नाही.
आज गुरु नानक देवजींचा प्रकाश पर्व हा पवित्र सण आहे. ही वेळ कोणालाही दोष देण्याची नाही. आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे की, आम्ही तीनही कृषी कायदे मागे घेण्याचा, रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही तीनही कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू.
मित्रांनो,
मी माझ्या सर्व आंदोलक शेतकरी मित्रांना विनंती करतो, आज गुरु पर्वचा पवित्र दिवस आहे. आता तुम्ही तुमच्या घरी परत जा, तुमच्या शेतात परत जा, तुमच्या कुटुंबाकडे परत जा. चला नवीन सुरुवात करूया. चला पुन्हा नव्याने पुढे जाऊया.
मित्रांनो,
आज सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शून्य खर्च शेती म्हणजेच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, देशाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने पीक पद्धतीत बदल करण्यासाठी, एमएसपी अधिक प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठीच्या, अशा सर्व विषयांवर, भविष्य लक्षात घेऊन निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारचे प्रतिनिधी असतील, शेतकरी असतील, कृषी शास्त्रज्ञ असतील, कृषी अर्थतज्ज्ञही असतील.
मित्रांनो,
आमचे सरकार शेतकर्यांच्या हितासाठी काम करत राहिले आहे आणि यापुढेही करत राहील. गुरु गोविंद सिंह जी यांनी मांडलेल्या भावनेने मी माझे भाषण समाप्त करतो –
‘देह सिवा बरु मोहि इहै सुभ करमन ते कबहूं न टरों।‘
हे देवी, मला असे वरदान दे की, सत्कर्म करण्यापासून मी कधीही मागे हटणार नाही. जे काही केले ते शेतकऱ्यांसाठी केले, मी जे काही करतो आहे ते देशासाठी करतो आहे. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने याआधीही मी माझ्या मेहनतीमध्ये कोणतीही कमतरता ठेवली नव्हती. आज मी तुम्हाला हा विश्वास देतो की, तुमची स्वप्ने पूर्ण व्हावीत, देशाची स्वप्ने साकार व्हावीत यासाठी मी आता अधिक मेहनत करेन.
तुम्हाला खूप खूप धन्यवाद !
नमस्कार!
अनिल देशमुखांचा प्रत्येक दिवस आणि तासाची किंमत आज न उद्या नक्कीच वसूल होईल – शरद पवार
नागपूर -‘मी हे सांगतोय, तुम्ही कितीही छापे टाकले, कितीही अटक केली तरी आम्हाला सामान्यांना सोबत घेऊन तुम्ही (भाजप) महाराष्ट्रात कधीच जिंकणार नाही. तुम्हाला शंभर टक्के पराभवाला सामोरे जावे लागेल. तुम्ही अनिल देशमुख यांना तुरुंगात टाकले, त्यांच्या प्रत्येक दिवसाची आणि प्रत्येक तासाची किंमत आज ना उद्या नक्कीच वसूल होईल.असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नागपूर येथे केले. शरद पवार यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या बहाण्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
ईडी, सीबीआयच्या ताज्या कारवाईवर शरद पवार म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस असो, काँग्रेस असो की शिवसेना, विविध सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून आमच्या मित्रपक्षांना त्रास दिला जात आहे.’पवार पुढे म्हणाले की, ‘देशात सूडाचे राजकारण केले जात आहे. सत्तेचा वापर सन्मानासह करावा लागतो. मात्र या लोकांचे पाय जमिनीवर नाहीत आणि सत्ता डोक्यात गेली आहे. हे जे काही होत आहे त्याचा परिणाम आहे.’त्यांनी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, सत्ता हातातून गेल्यामुळे काही लोक अस्वस्थ आहेत. दररोज केंदद्राला लिस्ट पाठवतात आणि त्यांचा तपास करण्याची मागणी करतात.
शरद पवार म्हणाले, एकनाथ खडसे भाजपमध्ये होते. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यांच्या पत्नीला ईडीने बोलावले. त्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले. हे लोक शिवसेनेचे संजय राऊत यांच्या विरोधात काहीही करू शकले नाहीत, म्हणून त्यांच्या पत्नीला बोलावून, जबाब घेतला आणि त्यांना त्रास दिला. अजितदादांच्या विरोधात काहीही करता न आल्याने राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्राचे अल्पसंख्याक समाज मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही छापे टाकण्यात आले, मात्र काहीही सापडले नाही. अशी किती उदाहरणे सांगू, त्यांना (भाजप) महाराष्ट्र सरकार हातातून गेले हे सहन होत नाही.
अमित शाह यांचा पुणे दौरा पुढे ढकलला
पुणे- महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना येत्या २६ नोव्हेंबर रोजी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत काही कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते . मात्र हा दौराच आता पुढे ढकलण्यात आल्याचे भाजपचे शहर प्रमुख जगदीश मुळीक यांनी कळविले आहे.
शाह यांच्या उपस्थितीत गणेश क्रिडा कला मंच, स्वारगेट येथे पुणे शहर भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता तसेच शाह वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूटला भेट देणार होते . संविधान दिनाचे औचित्य साधून पुणे महापालिकेच्या विस्तारीत नवीन इमारतीत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शाह यांच्या हस्ते करण्यात येणार होते तसेच महापालिका भवनातील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तयार केले जाणार असून, त्याचे भूमिपूजन शाह यांच्या हस्ते होणार होते.
पवारांचे निमंत्रण नाकारल्याची होती दिवसभर चर्चा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांना पुणे भेटीत पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते परंतु अमित शाह यांच्या दौऱ्यामध्ये इन्स्टिट्यूटला भेट देण्याचा उल्लेख नसल्याचे वृत्त काही प्रसार माध्यमांनी देऊन शरद पवारांचे निमंत्रण नाकरले अशा स्वरूपाचे वृत्त आज चालविले होते .
१२१२ मावळ्यांचा इतिहास काळाच्या पडद्याआड राहुल सोलापूरकर यांची भावना
एमआयटीतर्फे पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली
पुणे, १८ नोव्हेंबरः“छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील १२१२ मावळ्याचा नवा इतिहास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने अर्ध्यावर राहिला आहे. त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत शिवचरित्रावर कार्य केले आहे. परंतू या मावळ्यांचा इतिहास आता कायमच काळाच्या पडद्या आड राहिल.” अशी भावना ज्येष्ठ मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी शिवशाहीर यांना श्रध्दांजली वाहतांना व्यक्त केली
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती आणि माईर्स एमआयटी शिक्षण समूहातर्फे कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत श्री ज्ञानेश्वर सभागृहमध्ये ज्येष्ठ विचारवंत, थोर साहित्यिक, नाटककार, इतिहासकार व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंन्तराव गाडगीळ, डॉ.संजय उपाध्ये आणि अश्विनी घैसास हे उपस्थित होते.
राहूल सोलापूरकर म्हणाले,“शिवछत्रपतींनी उभे केलेले २८४ किल्यांचे साम्राज्य बाबासाहेबांनी सुवर्ण अक्षरात लिहून ठेवले आहे. त्यात एक विशेष गोष्ट लक्षात येते ती म्हणजे महाराजांनी कोणत्याही किल्यावर स्वतःचे नाव लिहून ठेवलेले नाही. रायगडावर जो उल्लेख सापडतो तो म्हणजे ज्याने हा किल्ला निर्माण केला त्या संदर्भातील आहे. अशाप्रकारे इतिहासातील अत्यंत सुक्ष्म अध्ययन बाबासाहेब करीत असे. त्यांचे शिवसृष्टी निर्मितीचे स्वप्न पूर्ण करू. तसेच. जगभरातील बर्याच विद्यापीठांमध्ये शिवरायांवर अध्ययन केले जाते याचे श्रेय त्यांना जाते. सध्या देशातील नव्या पाठ्यक्रमांमध्ये शिवरायांचे १६ धडे अभ्यासक्रमात आणले आहेत.”
“बाबासाहेबांच्या जीवनात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. परंतू शिवरायांची प्रेरणा घेऊन त्यांनी सहनशीलतेच्या जोरावर त्याचा सामना केला.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड,“ आपल्यातून जाणता राजा जाणे ही मनाला वेदना देणारी घटना आहे. वसुधैव कुटुम्बकम भाषा बोलणारे बरेच आहे परंतु प्रत्यक्षात साकारणारे मोजकेच आहेत. त्यातील हे एक होते. राजा शिवछत्रपती हा त्यांचा जीवनाचा श्वास आणि ध्यास होता. आयुष्यभर त्यांनी शिवछत्रपतींच्या कार्याची ओळख सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविली. शिवसृष्टी उभारण्याच्या त्यांच्या कार्यात संस्थेतर्फे योगदान देऊ. तेे थोर तपस्वी, योगी आणि ऋषी होते. त्यांच्या जीवनाचा आदर्श घेऊन तरूणांनी वाटचाल करावी. संस्थेतर्फे राजता राजा छत्रपती शिवाजी महाराज जीवन संदेश या पुस्तकांच्या १० हजार प्रती मोफत वाटणार आहोत.”
प्रा. पी.बी. जोशी म्हणाले,“महाराष्ट्रातील जनतेच्या घराघरात शिवचरित्र पोहचविणारे बाबासाहेब यांनी आपले संपूर्ण जीवन छत्रपतींसाठी अर्पण केले होते. त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी माझ्याकडून सर्वप्रकारे मदत करेल.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ शिवशाहीर बाबासाहेंबाचा वारसा पुढे कसा नेता येईल यावर विचार होणे गरजेचे आहे. त्यांनी केलेल्या प्रत्येक कार्याचे जतन करुन तरुणांना ते उपलब्ध करून दयावे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन मी जीवनाची वाटचाल करीत आहे.”
पं. वसंतराव गाडगीळ,“दिशा आणि काळ यांच्या मर्यादा भेदून बाबासाहेबांनी अमूल्य असे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याचे जतन होण्यासाठी एमआयटी संस्थेने शिवशाहीर नावाचे अध्यासन सुरू करण्याची विनंती केली.”
प्रा.डॉ.एस.एन.पठाण, अश्विनी घैसास आणि डॉ. संजय उपाध्ये यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्याबरोबच त्यांच्याशी आलेले अनुभव सर्वांना सांगून श्रध्दांजली वाहिली.
यावेळी संस्थेचे विश्वस्त, संचालक, कुलगुरू, कुलसचिव, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले.
यंत्रणांनी समन्वयातून आळंदी यात्रा यशस्वी करावी : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
कोविड संकट अद्याप टळलेले नाही याचे भान राखण्याचेही आवाहन
पुणे दि. 18: कोविडचे संकट अजून टळलेले नाही याचे भान राखून आरोग्य, आपत्तीव्यवस्थापन, महावितरण, पोलीस, नगरपालिका, पंचायत समिती आदी सर्वच विभागांनी योग्य समन्वय ठेऊन आळंदी यात्रा उत्साहात पार पडेल याचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. वयस्क तसेच सहव्याधी असलेल्या भाविकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याच्यादृष्टीने यात्रेत सहभागी होण्याचे टाळावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या कार्तिकी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ॲड. विकास ढगे पाटील, अभय टिळक, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदींसह विविध शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी, वारकरी संप्रदायचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. देशमुख यावेळी म्हणाले, दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाणारी आळंदी यात्रा गेल्यावर्षी कोविडच्या संकटामुळे प्रतिबंधित स्वरुपात साजरी करावी लागली. यंदा कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे प्रतिबंध हटवण्यात आले आहेत. मात्र, अजूनही जिल्ह्यात दररोज अडीचशेहून अधिक नवीन कोविड रुग्ण निष्पन्न होत असून सध्या 2100 च्या वर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 400 रुग्ण अतिदक्षता विभागात तर दोनशेहून अधिक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे कोरोना अजून संपला नाही याचे भान राखावे लागेल. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय भाविकांनी यात्रेत सहभागी होऊ नये असा संदेश वारकरी संघटना आणि देवस्थानने द्यावा, असेही त्यांनी सुचवले.
यात्रेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयाच्या ठिकाणी आवश्यक तो औषधांचा साठा पुरवावा. कोविड चाचणीसाठी अधिकाधिक ॲन्टिजेन चाचणी किट उपलब्ध करुन द्यावेत. चाचणी करण्यासाठी विशेष पथकांची आणि मनुष्यबळाची नेमणूक करावी. आळंदी शहराच्या हद्दीबाहेरच्या परिसरात तात्पुरते ‘कोविड केअर सेंटर’ (सीसीसी) सुरू करावे. आढळून आलेल्या कोविड रुग्णांना ‘सीसीसी’ आणि अन्य कोविड रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करावी.
डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात घेऊन डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीची ठिकाणे, पाणी साठणाऱ्या जागांचा शोध घेऊन उपाययोजना कराव्यात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालय आणि औंध येथील जिल्हा रुग्णालयातील खाटा राखून ठेवाव्यात. कोणत्याही साथीच्या आजारांचा उद्रेक होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये आणि स्वच्छतेचे योग्य नियोजन करावे. गर्दीच्या जवळ, दिंड्यांलगत फिरती शौचालये ठेऊन त्याठिकाणी पाणी, वीजेची व्यवस्था तसेच मनुष्यबळाची नेमणूक करावी. महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने वीज पुरवठा आणि वीज यंत्रणा सुरळीत राहील तसेच कोणतीही दुर्घटना होणार नाही याबाबत सर्व त्या उपाययोजना कराव्यात. दिंड्यांना गॅसचा पुरवठा तसेच केरोसीन पुरवठ्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
पोलीस विभागाने गर्दी नियंत्रण तसेच अनुचित दुर्घटना घडू नये याठी उपाययोजना कराव्यात. धोकादायक इमारतींमुळे दुर्घटना घडू नये यासाठी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. नदीमध्ये स्नान करणारे भाविक पाहता आपत्तीव्यवस्थापन विभागाने राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) 10 जणांचे एक पथक आणि आवश्यक संख्येने बोटी तैनात कराव्यात. आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आपली अग्नीशमन वाहने सतर्क ठेवावीत, आदी सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यात्रेच्या माध्यमातून ‘माझी वसुंधरा’ तसेच ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अभियानांचा संदेश चांगल्या पद्धतीने पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.
उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी यात्रेच्या अनुषंगाने केलेल्या आणि करावयाच्या उपाययोजनांबाबतची माहिती दिली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि पंचायत समितीच्या सहायक गट विकास अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात केलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने माहिती सादर केली. या यात्रेसाठी सुमारे 30 टक्के भाविक संख्या नगरपरिषद हद्दीत तर 70 टक्के भाविक संख्या पंचायत समिती हद्दीत मुक्काम करते या दृष्टीकोनातून योग्य नियोजन करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
बैठकीस पोलीस, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्नीशमन दल आदी यंत्रणांचे अधिकारी यांच्यासह वारकरी महामंडळचे उपाध्यक्ष डी. डी. भोसले पाटील, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा समितीचे ह.भ.प. मारुती कोकाटे आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ बोधचिन्ह स्पर्धेसाठी मुदतवाढ
9 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार
पुणे दि.18: आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र चे आकर्षक आणि विषयाशी निगडीत बोधचिन्ह तयार करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या स्पर्धेस मुदवाढ देण्यात आली असून स्पर्धेसाठी 9 डिसेंबर 2021 पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहे.
यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये संचालनालयातर्फे स्पर्धा जाहीर करण्यात आली होती. त्यात प्राप्त 400 प्रवेशिकांपैकी एकही बोधचिन्ह निकषानुसार योग्य नसल्याने ही स्पर्धा नव्याने जाहीर करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी 1 नोव्हेंबरपर्यंत बोधचिन्ह सादर करावयाची होती. या मुदतीत वाढ करण्यात येऊन 9 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत.
बोधचिन्ह तयार करताना क्रीडा विद्यापीठाचे उद्दीष्ट, ध्येय आणि दृष्टीकोन लक्षात घेणे आवश्यक आहे. क्रीडा क्षेत्रात कुशल मनुष्यबळ, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगती साधण्यासाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्र हे भारतात प्रथमच होत असल्याने त्यास जगभरातून प्रसिद्धी मिळणार आहे. या बाबी लक्षात घेता विद्यापीठाचे बोधचिन्ह आकर्षक असणे आवश्यक आहे. बोधचिन्ह स्पर्धेचे नियम व अटी शासनाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे.
