Home Blog Page 2194

संविधान दिवस व स्वच्छ भारत अभियान जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

0

पुणे-नेहरू युवा केंद्र पुणे युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार, पुणे महानगरपालिका, पुणे आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्येमानाने आज पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन आणि आर्ट गॅलरी येथे संविधान दिवस व आजादी चा अमृत महोत्सव निमित्त आयोजित स्वच्छ भारत अभियान दिनांक १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आयोजित कार्यक्रमात उत्तम काम केलेल्या पुणे महानगर पालिका क्षेत्रिय कार्यालय, युवा मंडळ संस्था, स्वयंसेवक यांचा सन्मान जिल्हा स्तरीय पुरस्काराने नेहरू युवा केंद्र च्या वतीने संविधान दिनाचे अवचित्य साधून आयोजित केला होता. श्री यशवंत मानखेडकर उप संचालक नेहरू युवा केंद्र पुणे यांनी या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात नेहरू युवा केंद्र पुणे ने केलेल्या कामाचा सविस्तर अहवाल सादर केला. या मध्ये नेहरू युवा केंद्र संघटन मुख्यालयाने नेहरू युवा केंद्र पुणे कार्यालयास ८२५१ किलोग्राम चे पुणे जिल्ह्यामध्ये सिंगल वापर प्लास्टिक गोळा करण्याचे लक्ष दिले होते परंतु नेहरू युवा केंद्र पुणे संपूर्ण पुणे जिल्ह्यात संस्था युवा मंडळे, महानगरपालिका यांच्या माध्यमातून ४९४५९ किलोग्राम प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची पर्यावरण पूर्वक विल्हेवाट लावण्यात आली. हेच कार्य आपल्या सर्वांच्या माध्यमातून साध्य झाले असे त्यांनी सांगितले. तसेच संविधान दिवसाचे महत्त्व त्यांनी सांगितले व संविधान हे कशा प्रकारे जन-माणसापर्यंत पोहचले पाहिजे या बद्दल माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते यांच्या विचारांना उजाळा दिला. तसेच यांनी संविधान प्रास्ताविकतेचे वाचन केले.
आम्रपाली चव्हाण यांनी वी पुणेकर संस्था ने पुणे महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय व रेल्वे, जनरल पोस्ट ऑफिस या सरकारी यंत्रना तसेच मोह्ल्हा कामिटी, शाळा महाविद्यालय द्वारे समन्वय करून स्वच्छ भारत अभियान कालावधीत ३३७२४ किलोग्राम प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची पर्यावरण पूर्वक विल्हेवाट कश्या लावण्यात आली या विषयी सांगीतले.
या कार्यक्रमात स्वच्छ भारत जिल्हा स्तरीय पुरस्कार वारजे – कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, शिवाजी नगर – घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, येरवडा क्षेत्रीय कार्यालय, वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय, कोथरूड – बावधन क्षेत्रीय कार्यालय, कसबा – विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका पुणे त्याच बरोबर जनरल पोस्ट ऑफिस पुणे, तसेच महाविद्यालय पुना कॉलेज पुणे, बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी पुणे, S.N.D.T. कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे, यशस्वी एज्युकेशन सोसायटीचे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) व युवा मंडळ संस्था मध्ये वी पुणेकर संस्था पुणे, मॅजिक बस इंडिया फाउंडेशन पुणे, एकता योग साधना ट्रस्ट पुणे, स्पोर्ट इंडी पुणे, ग्रामीण तंत्रज्ञान संस्था नाव्हारे शिरूर, मुकेश प्रतिष्ठान पुणे, महाएनजीओ फेडरेशन, संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड आणि व्यक्ती विशेष श्रीमती शामला देसाई, आम्रपाली चव्हाण स्वच्छता कन्या, स्वप्नील शिंदे, श्रीमती प्राजक्ता माने, राजेस चीव्हे, राज देशमुख याच बरोबर राष्ट्रीय युवा स्वयंसेवक, विलास फड, कु. सुचिता अदाते, बजरंग बोरकर, इतर स्वयंसेवक चंकी दिनेश पांडे, दत्ता भालशंकर, समीर पौलस्ते यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अजित देशमुख उपायुक्त घन कचरा विभाग, पुणे महानगरपालिका यांनी क्षेत्रीय कार्यालयांनी केलेले कचरा व्यवस्थापन व पुणे शहराची स्वच्छता विषयी योजनांची माहिती दिली. पुणे शहर स्वच्छ व सुंदर या अभियानात मदत करणाऱ्या संस्थांचे अभिनंदन केले. यानंतर आण्णा बोधडे, उप आयुक्त पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांनी संविधाचे महत्व सांगितले व लोक सह्भातून आपण कश्या प्रकारे शहरांना स्वच्छ ठेवू शकतो या विषयी मार्गदर्शन केले.
संविधान प्रचारक क्रांती खोब्रागडे IRSउपायुक्त आयकर विभाग व जीवन बच्चाव IRS संयुक्त आयुक्त आयकर विभाग यांनी संविधानाची ची मुल्ये व स्वच्छता या विषयी मार्गदर्शन केले. या नंतर संविधान दिवसानित्त संविधान प्रचारक जीवन बच्चाव, क्रांती खोब्रागडे, अण्णा बोधडे, संदीप आखाडे, अश्विनी जाधव, सरस्वती शिंदे, भक्ती भावे, सुनील जयस्वाल यांना यांना संविधान प्रचारक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा प्रकाश कुमार मानुरे, संचालक, नेहरू युवा केंद्र संगठन महाराष्ट्र व गोवा राज्य यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात शहरांना जर स्वच्छ ठेवायचे असेल तर स्थानिक लोक सहभागातून राजकीय व शासकिय या सर्वाच्या सहकार्याने आपण शहरांना कचरा मुक्त कशा प्रकारे करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले तसेच संविधानामुळे मानवी हक्कांना किती महत्त्व आलेले आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली. भारताचे दोन महापुरूष महात्मा गांधीची यांच्या मुळे मिळालेले स्वातंत्र्य व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते यांनी दिलेले संविधान यामुळे आज देश यशस्वीपणे प्रगती करीत आहे अशी माहिती दिली. या कार्यक्रमात मान्यवर म्हणून पराग मते, वी पुणेकर संस्था पुणे अध्यक्ष उद्योजक, आशाताई राऊत उपायुक्त भांडार विभाग स्वच्छ भारत अभियान समन्वयक, डॉ केतकी गाडगे आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका, शामलाताइ देसाई PMC APEX समिती व NSCC अध्यक्ष,राज देशमुख वी पुणेकर संस्था सलागार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्वप्नील शिंदे नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

निवासी, आश्रमशाळा सुरू होणार १ डिसेंबरपासून – बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

0

मुंबई, दि.३० : बहुजन कल्याण विभागांतर्गत संस्थामार्फत सुरु असलेल्या राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, विद्यानिकेतन व ऊसतोड कामगाराच्या मुला-मुलीसाठी चालविल्या जाणाऱ्या निवासी, अनिवासी आश्रमशाळांमधील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वीचे वर्ग व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग असलेल्या आश्रमशाळा  १ डिसेंबर रोजी सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी व शहरी भागातील महापालिका हदीतील इयत्ता चौथीचे वर्ग असलेल्या शाळा दि. ०१ डिसेंबर, २०२१ पासून सुरु करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे.

त्यास अनुसरून या विभागाच्या अंतर्गत असलेल्या राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील आश्रमशाळा तसेच (वसतीगृहासह) सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.  शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवासी व अनिवासी आश्रमशाळांनी, कार्यवाही करावी, अशा सूचनाही मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी केल्या आहेत.

शाळांना स्मारके करायला हवीत-राज्यमंत्री आमदार बच्चू कडू

0

पुणे : गरीबी हा विषय कोणाच्याही शिक्षणामध्ये आडवा येऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवे. समाज मन व शासन धोरण जेव्हा चांगले निर्णय घेते, तेव्हा राष्ट्रउभारणी होते. स्वातंत्र्यानंतर देखील ७० ते ८० वर्षात चांगले शिक्षण नाही, हे दु:ख आहे. त्यामुळे स्मारके उभी करायची तर शाळांना स्मारक केले पाहिजे. राष्ट्रउभारणीसाठी प्रत्येकाची ज्ञानाची तहान भागवायला हवी, असे मत राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागा तर्फे हुजूरपागा इंग्लिश मिडियम स्कूल लक्ष्मी रस्ता या शाळेच्या सौ. शोभाताई रसिकलाल धारिवाल इंग्लिश मिडियम स्कूल अशा नामकरण समारंभाचे आयोजन सोसायटीच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी आर.एम.धारिवाल फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारिवाल, प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर, सोसायटीच्या मुख्य विश्वस्त जयश्री बापट, अध्यक्षा रेखा पळशीकर, उपाध्यक्षा हिमानी गोखले, सचिव वरदेंद्र कट्टी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोनशिला व नामफलक अनावरण करण्यात आले. शोभा धारिवाल यांनी या शाळेसाठी प्रमुख देणगी दिली आहे.

बच्चू कडू म्हणाले, शिक्षण, आरोग्य आणि शेतकरी याविषयीचा कार्यक्रम प्रत्येक सरकारने राबवायला हवा. अनेकदा सरकार असे राबविताना दिसत नाही. आपल्याला जर स्मारके उभी करायची असतील, तर शाळांना स्मारके केली पाहिजेत. आमदार, व्यापारी व कामगारांच्या मुलांसाठीच्या शाळांमध्ये व शिक्षणामध्ये प्रचंड विषमता आहे. प्रत्यक्षात प्रत्येक शिक्षकाचे काम सैनिकाप्रमाणे आहे. शिक्षणसंस्था व शिक्षक देशाच्या अंतर्गत मजबुतीकरीता कार्य करतात, असेही त्यांनी सांगितले.

शोभा धारिवाल म्हणाल्या, मराठीसह इंग्रजी माध्यमाकडे आता हुजूरपागा वाटचाल करीत आहे. आताची युगाची ही गरज असून आरोग्य आणि शिक्षण या आपल्यासाठी महत्वाच्या बाबी असणे गरजेचे आहे. त्यामध्ये आमचे फाऊंडेशन काम करते. मुलींच्या शिक्षणाकरीता मदतीसाठी आम्ही कायम तत्पर आहोत, असेही त्या म्हणाल्या. दिनकर टेमकर म्हणाले, आजच्या काळात पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमाकडे आहे. त्यामुळे मुली आता हुजूरपागेसारख्या नामांकित संस्थेत इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊ शकतात. तसेच येथील विद्यार्थीनी जागतिक स्तरावर नाव उंचावतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

जयश्री बापट म्हणाल्या, तब्बल १३७ वर्षांपासून स्त्री शिक्षणाची गरज ओळखून हुजूरपागा शिक्षण देण्याचे काम करीत आहे. लोकमताच्या विरोधात जाऊन मुलींसाठी हायस्कूल सुरु करण्याचे क्रांतिकारी पाऊल तेव्हा संस्थेने उचलले होते. भारतातील हे दुसरे मुलींचे हायस्कूल आहे. हुजूरपागेने आजपर्यंत चांगले बदल स्विकारले आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळा ही गरज ओळखून याची सुरुवात करीत आहोत.

रेखा पळशीकर म्हणाल्या, शिक्षण क्षेत्रातील १३७ वर्षांचा वारसा पुढे सुरु ठेवण्याचे काम सुरु आहे. समाजसुधारकांनी आम्हाला दिलेला वारसा सांभाळणे तसेच अवघड आहे, पण आम्ही तो वारसा सुरु ठेवला आहे. आता हुजूरपागेमध्ये मराठी व इंग्रजी माध्यमाचे शिक्षण एकाच प्रांगणात मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रियदर्शनी पुरोहित यांनी सूत्रसंचालन केले.

नवाब मलिक यांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही – विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांचे प्रत्युत्तर

0


सांगली, दि. ३० नोव्हेंबर – नवाब मलिक यांना आम्ही घाबरण्याचे काही कारण नाही. आम्ही घाबरलो असतो तर त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा टाकला नसता. त्यांना वाटते की त्यांना आम्ही घाबरतो. पण त्यांना आम्ही भीकही घालत नाही व घाबरत नाही. त्यांनी काय बाहेर काढायचे ते काढावे. असल्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, असा पलटवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्यावर आज केला.
नवाब मलिक यांनी प्रविण दरेकर यांच्यावर टीका करताना दरेकर घाबरलेले आहेत. त्यांचे गौडबंगाल मी बाहेर काढणार आहे, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांशी बोलताना केले होते. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, आम्ही घाबरण्याचे काही कारण नाही. आम्ही कुठच्या गाड्यांतून फिरतो, काय करतो, त्याच्यासाठी नवाब मलिक यांच्या घरातून तर पैसे आणत नाही. कोणत्याही बँकेचा पैसा कोणाला व्यक्तिगत वापरता येत नाही. बँकेची बदनामी तुम्ही करता हे योग्य नाही. एक वेळ आमची बदनामी करा, आमच्यावर टीका करा. आम्ही ती सहन करू. पण एखाद्या आर्थिक संस्थेची बदनामी होते तेव्हा तेथील खातेधारकांवर परिणाम होतो व एकंदर संस्थेच्या विश्वासाहर्तेवर परिणाम होतो असेही दरेकर यांनी स्ष्ट केले.

ईडीच्या माध्यमातूनच नारायण राणे भाजपमध्ये गेले-मलिकांचा राणेंवर निशाणा

0

पुणे-अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि सचिन वाझेच्या चौकशीसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येणार आहे, असा दावा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नवाब मलिक यांनी परमबीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांवरही गंभीर आरोप केले आहेत. अँटेलियाबाहेर स्फोटके ठेवण्याचे कारस्थान परमबीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांनी रचल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. सगळे प्रकार राजकीय हेतून झाले आहेत. अँटेलियाबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट परमबीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांनी मिळून रचला, असा त्यांनी दावा केला आहे.

‘ईडीच्या माध्यमातून राणे भाजपामध्ये गेले’
ईडीबाबत देखील भविष्यात मोठा धमाका करणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले. ‘ईडीच्याबाबतीत आमचा शोध सुरू आहे. भविष्यात त्याबाबत मोठा धमाका होणार आहे. केंद्र सरकार म्हणेल तसे विभाग चालतो. राणेंना आलेल्या ईडीच्या नोटिशीचे काय झाले हे कुणाला माहितीच नाही. ईडीच्या माध्यमातून नारायण राणे भाजपमध्ये गेले. ईडीच्या माध्यमातून गुजरातमधील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस सोडली. बंगालमध्ये टीएमसी सोडून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा घरवापसी झाली. ईडीच्या यंत्रणेचा गैरवापर होतच आहे असेही नवाब मलिक यांनी म्हटले.

‘बाते कम काम ज्यादा’ ही महाविकास आघाडी सरकारची भूमिका

नवाब मलिक यांनी यावेळी राज्य सरकारच्या कामकाजाचा आढावा माध्यमांसमोर मांडला. महाविकास आघाडी सरकारचा प्रचार आणि प्रसिद्धीबाबत चर्चा सुरु आहे. मात्र सरकारची भूमिका बाते कम, काम ज्यादा, अशी असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.सरकार सत्तेत आल्यावर सर्वप्रथम मागील सरकारच्या काळात प्रलंबित शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर करून राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला. सरकार सत्तेत आल्यानंतर दुर्दैवाने तीन महिन्यातच देशात कोरोनाचे संक्रमण झाले. मात्र यात देशभरात जी दुर्दैवी परिस्थिती आपण पाहिली तशी परिस्थिती राज्य सरकारने राज्यात निर्माण केलेली नाही. यासाठी कोविड सेंटर्स, टेस्टींगमध्ये वाढ, ऑक्सिजन साठा अशा सर्व गोष्टींचा पुरवठा राज्य सरकारने वेळोवेळी केल्याचे मलिक म्हणाले. गुजरात राज्यात रुग्ण संख्या लपवण्यात आली, उत्तर प्रदेशमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकडं नसल्याने मृतदेह गंगेत सोडण्यात आले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.महाविकास आघाडी सरकारने विकासाची कामे कोविडमध्ये थांबवली, मात्र कोणतेही प्रकल्प रद्द केले नाहीत. शिवाय विविध धोरणांवर भर देण्यात आली असे त्यांनी सांगितले. तसेच राज्यात कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून स्किल्स युनिव्हर्सिटी सुरु करण्यात आली आहे. बेरोजगारी ही मोठी समस्या असल्याने राज्य सरकारने ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून बेरोजगारांचा फायदा करुन देण्याचा विचार केला आहे. ही नवी योजना राज्यात बेरोजगारी संपविण्यासाठी राबविण्यात येईल, असे नवाब मलिक म्हणाले.पुढे राजकीय परिस्थितीवर बोलताना मलिक म्हणाले की, राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असे भाजपचे नेते सांगत होते. मात्र माजी मुख्यमंत्री काल म्हणाले की, आता आम्ही राज्य सरकार पाडणार नाही तर हे सरकार पडल्यास आम्ही नवे सरकार देऊ. त्यामुळे हे सरकार पडणार नाही असे ते आता कुठेतरी ते स्वीकारत आहेत, असा टोला मलिक यांनी लगावला. २०२४ साली हे सरकार पुन्हा राज्यात सत्तेत येईल. मुख्यमंत्री महोदयांना विश्वास आहे की हे सरकार केवळ पाच वर्षांसाठी नाही तर २५ वर्षांसाठी एकत्र आले आहे, असे सांगत मलिक यांनी महाविकास आघाडी सरकारमधील एकजुटीची भावना माध्यमांपुढे मांडली.

निवृत्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार पदावर नियुक्ती

0

मुंबई, दि. ३० : नुकतेच मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले श्री. सीताराम कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले.

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत

0

राज्य सरकारने केली आश्वासनाची पूर्तता

मुंबई, दि. ३०  – मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याच्या आश्वासनाची राज्य शासनाने पूर्तता केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण ३४ कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे.

सदर कुटुंबाना १० लाख रूपये देण्याची घोषणा मागील शासनाच्या कालावधीत करण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ १५ कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रूपये देण्यात आले होते. मागील शासनाचे हे आश्वासन हे शासन पूर्ण करेल, या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी १० लाख रूपये देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समन्वयकांना दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ कोटी ६५ लाख रूपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे. आजवर शासनाची मदत न मिळालेल्या १९ वारसांना प्रत्येकी १० लाख तर यापूर्वी ५ लाख रूपये मिळालेल्या १५ वारसांना प्रत्येकी आणखी ५ लाख रूपये या निधीतून दिले जातील.

शासनाची आर्थिक मदत मिळणाऱ्या ३४ कुटुंबियांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालना ३, बीड ११, उस्मानाबाद २, नांदेड २, लातूर ४, पुणे ३, तर अहमदनगर, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. मराठा समाजाच्या मागणीनुसार सदरहू निधी निर्गमित केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात विसंवाद -महापौरांची टीका

0

पुणे- राज्याचे मुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेले उपमुख्यमंत्री यांच्यात विसंवाद असल्याची मालिका कोरोना काळात सातत्याने आपल्यासमोर उलगडली असून यामुळे सांस्कृतिक क्षेत्रासह अनेक विषयांवर प्रश्नांची जंत्री उभी राहिल्याची टीका पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे . पुण्यात एवढ्यात शाळा सुरु होणार नाहीत असा निर्णय घेतल्यानंतर पुण्याचे महापौर मोहोळ यांनी ऐका माध्यमांशी संवाद साधताना काय म्हटले आहे .

पुण्यात जिओ ,व्होडाफोन-आयडिया ला 5 G चाचणीचे परवाने आणि स्पेक्ट्रम चे झाले वाटप

0

पुणे  30 नोव्हेंबर २०२१:

दूरसंचार विभाग (डीओटी) 27.05.2021 रोजी, पुणे येथे 5G चाचणी करिता परवाना आणि स्पेक्ट्रम वाटप खालीलप्रमाणे केलेले आहे

Vodafone Idea Limited(VIL) पुणे (शहरीसाठी) आणि चाकण (ग्रामीणसाठी) Ericsson सोबत तंत्रज्ञान भागीदार आहे.
Reliance Jio Infocomm Ltd(R-Jio) पुणे (शहरीसाठी)  Nokia सोबत तंत्रज्ञान भागीदार आहे.
 

२५.११.२०२१ रोजी, महाराष्ट्र, परवाना सेवा क्षेत्र (दूरसंचार विभाग,DoT), 5G साठी दूरसंचार  विभागामधील, श्री विश्वनाथ केंदुरकर, ITS,महाराष्ट्र परवाना सेवा क्षेत्र ,दूरसंचार विभाग प्रमुख, श्री जयकुमार एन. थोरात संचालक, श्री विनय जांभळी संचालक आणि श्री बदावथ नरेश ,सहाय्यक विभागीय अभियंता यांचा समावेश असलेली सुकाणू समिती यांनी पुणे येथील रामी ग्रँड हॉटेल येथील प्रात्यक्षिक स्थळाला भेट दिली

दूरसंचार विभाग ने 5G नेटवर्क चाचण्या आणि वापर प्रकरणांसाठी mmWave बँडमध्ये 26 GHz आणि 3.5 GHz स्पेक्ट्रमचे वाटप केले आहे. प्रात्यक्षिका दरम्यान दूरसंचार विभाग टीमला असे आढळून आले की VIL ने 3.5 GHz वर 1.2 Gbps पेक्षा जास्त, 26 GHz वर सुमारे 4.2 Gbps पेक्षा जास्त वेग गाठला आहे.

एरिक्सन, नोकिया सारख्या विविध तंत्रज्ञान भागीदारांकडून तसेच इकोसिस्टम प्लेयर्स आणि भारतीय स्टार्ट-अप्स L&T स्मार्ट वर्ल्ड अँड कम्युनिकेशन, एथोनेट, विझबी , ट्वीक लॅब्स यांनी काही उपयुक्त प्रकरणे महाराष्ट्र परवाना सेवा क्षेत्र, दूरसंचार विभाग टीमला खालीलप्रमाणे प्रात्यक्षिक आणि मूल्यमापन करण्यात आले:

दूरस्थ निदान: देशाच्या दुर्गम भागात आरोग्य सेवा अतिशय महत्त्वाची आहे. उच्च डेटा गती, कमी विलंब (मिलीसेकंदमध्ये) आणि 5G ची विश्वासार्हता यामुळे शहरी केंद्र/रुग्णालयात स्थानिक किंवा जागतिक स्तरावर असलेला डॉक्टर दुर्गम ग्रामीण ठिकाणी असलेल्या रुग्णावर अल्ट्रासाऊंड स्कॅन करू शकतो . डॉक्टर जॉयस्टिक हलवतात आणि ग्रामीण आरोग्य पर्यवेक्षकांना अल्ट्रासाऊंड स्कॅनरला विशिष्ट दिशेने हलवण्यासाठी विशेष हॅप्टिक ग्लोव्हजमध्ये हालचालींच्या सूचना मिळतात . शेवटी डॉक्टरांनी योग्य प्रिस्क्रिप्शन(औषधीयोजना) म्हणून निदान आणि सूचना दिल्या जातात. हे देशाच्या दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी 5G ची ताकद दाखवते. हे भारतासारख्या देशांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे ज्यामध्ये डॉक्टर आणि रुग्णांचे प्रमाण खूपच कमी आहे.
स्मार्ट कन्स्ट्रक्शन : बांधकामाधीन बोगद्याचे डिजिटल ट्विन तयार केले गेले आहे ज्यामध्ये 4K HD कॅमेरे बांधकाम साइट्सच्या आत ठेवलेले आहेत आणि डिजिटल ट्विनसह एकत्रित केले आहेत. याचा उपयोग कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, ऑपरेशन्सचे निरीक्षण आणि रिमोट पर्यवेक्षण, रिमोट टीमद्वारे कर्मचाऱ्यांना तज्ञ मार्गदर्शनासाठी केला जातो. डिजिटल ट्विन हे वास्तविक-जगातील अस्तित्व किंवा प्रणालीचे आभासी प्रतिनिधित्व आहे. जे लागू असेल तेथे वास्तविक-जगातील अस्तित्वाचे अनुकरण, अंदाज वर्तणूक आणि नियंत्रित करण्याचे साधन प्रदान करण्यासाठी आरशासारखे कार्य करते. अशा प्रकारे साइट पर्यवेक्षकांना व्हर्च्युअल ऑनलाइन वातावरण आणि सूचनांसह रिमोट लोकेशन तज्ञांकडून कुशलतेने मार्गदर्शन केले जाऊ शकते.
कनेक्टेड आणि मॉनिटर कामगार: कामगार उत्पादकता सुधारण्यासाठी, आरोग्य अनुपालन आणि नियमितता आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, 5G तंत्रज्ञानामुळे जलद आपत्कालीन प्रतिसाद आणि सुरक्षित कार्य परिस्थिती शक्य करण्यासाठी स्मार्ट कामाची जागा शक्य आहे. फेसमास्कचे पालन करणे, नो-गो झोनपासून दूर राहण्यासाठी लोकांच्या हालचालींचा मागोवा घेणे, लोकांची गणना करणे त्यामुळे गर्दी रोखणे सहज शक्य आहे. कार्यालयातील मोक्याच्या ठिकाणी स्थापित केलेल्या एकाधिक कॅमेऱ्यांमधून व्हिडिओ प्रवाह, व्हिडिओ विश्लेषण सर्व्हरला प्रदान केला जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) आरोग्य आणि सुरक्षा अनुपालनासाठी मानवी हालचाली ओळखेल, हे मास्क, हेल्मेट, यंत्रसामग्रीची हालचाल, झोन निर्बंध इ. वापरण्याचे अनुपालन ओळखेल.
सार्वजनिक सुरक्षितता: यामध्ये 4K HD व्हिडिओ कॅमेरे 5G नेटवर्कद्वारे चालतात  आणि रिअल टाइम अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म आणि कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) क्षमतांसह एकत्रित केल्याने  शहरांमध्ये सार्वजनिक सुरक्षितता सुधारण्यात कशी मदत होऊ शकते हे प्रदर्शित केले. उदाहरणार्थ रात्रीच्या वेळी विशिष्ट भागात महिलांची सुरक्षा, सार्वजनिक ठिकाणी संशयित सामान टाकणे इत्यादी… दूरस्थपणे निरीक्षण केले जाऊ शकते आणि कृत्रिम बुद्धिमत्ता(AI)  तंत्रज्ञानाद्वारे सतर्क केले जाऊ शकते. हा L&T स्मार्ट सिटी प्रकल्पाचा एक भाग आहे यामध्ये वेगवान 5G तंत्रज्ञानाचा फायदा होईल आणि शहराचे सुरक्षा वातावरण कार्यक्षम रीतीने राखण्यात मदत होईल .
स्मार्ट आणि कनेक्टेड आरोग्य (संपूर्ण रुग्णवाहिका कनेक्टिव्हिटी): रुग्णवाहिकेवर 5G स्मार्ट आणि कनेक्टेड आरोग्य प्रात्यक्षिक दाखवते की रुग्णाला त्वरीत हॉस्पिटलमध्ये नेले जात असताना निदान सुरू करण्यासाठी, तज्ञांची मते आणि पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी “गोल्डन अवर” चा वापर कसा करावा. – आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयाकडे जाण्याचा मार्ग. हे तंत्रज्ञान रुग्णवाहिकेतील पॅरामेडिकला रुग्णालयातील आपत्कालीन डॉक्टरांशी व्हिडिओ संपर्क स्थापित करण्यास सक्षम करते. रुग्णवाहिकेतील ऑनलाइन ईसीजी रुग्णालयाच्या मध्यवर्ती ठिकाणी रुग्णाच्या दिशेने जात असताना त्याचे निरीक्षण करण्यात आले. डॉक्टर शरीराच्या सर्व जीवनावश्यक गोष्टींचा अभ्यास करू शकतात आणि पॅरामेडिकला प्रथमोपचाराबद्दल सूचना देऊ शकतात किंवा आवश्यक असल्यास रुग्णवाहिकेला दुसऱ्या वैद्यकीय सुविधेकडे मार्गदर्शन करू शकतात. यामुळे गंभीर रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी गोल्डन अवरमध्ये आपत्कालीन उपचार शक्य होतील.
ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टीम: यामध्ये  ड्रायव्हरच्या सतर्कतेवर नजर ठेवली जाते – तो झोपलेला, तंद्रीत इ. कृत्रिम बुद्धिमत्ता(AI) विश्लेषण वापरून जवळच्या वास्तविक वेळेत चेहरा ओळख केली जाते. व्हिडिओ फीड कमांड सेंटर कर्मचाऱ्यांना सुरक्षितता सूचना/ अलार्म वितरित करण्यास सक्षम करते किंवा अपघात ,अवांछित सुरक्षा घटना टाळण्यासाठी थेट ड्रायव्हरला हस्तक्षेप करण्यास सक्षम करते. 5G सह ऑटोमोटिव्ह OEM साठी अशी वैशिष्ट्ये डिझाइन करणे आणि ग्राहकांना प्रवासी , व्यावसायिक वाहनांमध्ये या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये प्रवेश करणे शक्य आहे.
OTT इन्फोटेनमेंट: या वापराच्या बाबतीत, मागील सीटच्या कारच्या अनुभवाला 5G सह एक नवीन फिलीप मिळते आणि  कारच्या आत HD सामग्री स्ट्रीमिंग सक्षम करते. हे तुमच्या आवडत्या गेमिंग, OTT सामग्रीचे स्ट्रीमिंग, स्पोर्ट फीड इत्यादी असू शकते.
एरियल ट्रॅफिक मॅनेजमेंट (UTM) (ड्रोनसाठी): हे वापर प्रकरण ग्राउंड कर्मचाऱ्यांसाठी,5G नेटवर्कद्वारे नियंत्रित ड्रोन वापरून शोध, बचाव कार्य दर्शवते आणि HD व्हिडिओ देखील प्रदान करते. सार्वजनिक सुरक्षा, कायद्याची अंमलबजावणी, वैद्यकीय वितरण करणारे अनुप्रयोग यासाठी याचा वापर करता येऊ शकतो.
फुल बॉडी मोशन कॅप्चर सिस्टम सोल्यूशन्स: ऍथलेटिक कामगिरीचे निरीक्षण IMU द्वारे केले जाते आणि विशेष सेन्सर्सने हात, मांड्या, पाय इत्यादींवर पट्टे बसवले जातात . प्रात्यक्षिक प्रकरणात हे क्रिकेटच्या वेगवान गोलंदाजाचे संरेखन देते आणि सुधारणा सुचवते. क्रिकेट कोचिंग सेंटर एका वेळी अनेक महत्त्वाकांक्षी गोलंदाजांवर सतत लक्ष ठेवून सुधारणा सुचवू शकते . तज्ज्ञ देखील दूरस्थपणे विश्लेषण आणि मार्गदर्शन करू शकतात. 5G नेटवर्कवर डेटा प्रवाहित केल्याने ते एक स्वयंपूर्ण प्रणाली तयार करते जी विश्लेषणासाठी क्लाउडवर डेटा प्रसारित करते आणि दीर्घकालीन सुधारणा देते.

आरटीपीसीआर आणि आरएटी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचा केंद्राचा राज्यांना सल्ला

0

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर 2021

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कोविड-19 च्या नव्या ओमिक्रॉन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सार्वजनिक आरोग्य विषयक सज्जतेविषयी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्च स्तरीय बैठक झाली. नवीन ओमिक्रॉन विषाणूची बाधा झालेले रूग्ण काही देशात सापडले आहेत.त्यामुळे आपल्या देशामध्ये सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. यावेळी नीति आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही.केे. पॉल उपस्थित होते.

या बैठकीमध्ये  ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल, आयसीएमआरचे डॉ. बलराम भार्गव,  संचालक डॉ. सुजीत के. सिंग, परराष्ट्र व्यवहार खात्याचे प्रतिनिधी, राज्य हवाई सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे संबंधित वरिष्ठ अघिकारी सहभागी झाले होते.

कोविड-19 चा नवीन प्रकार लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुधारित मार्गदर्शक तत्वे आणि सल्ले राज्यांना सामायिक केले आहेत. याचा पुनरूच्चार करून केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांनी आता ढिलाई देवून उपयोग नाही. आपल्या राज्यांत येणा-या आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर कडक नजर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. विमानतळे, बंदरे आणि रस्ते मार्गांनी सीमा ओलांडून देशात अनेक जण येतात, त्यांच्यावर करडी नजर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यांना देण्यात आलेल्या विशेष सूचना –

  • आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे निरीक्षणाचे काम प्रभावीपणे करावे – ज्या देशांमध्ये या विषाणूचा प्रसार झाला आहे, त्या देशांमधून येणा-या सर्व प्रवाशांना ‘जोखीम असलेले’ प्रवासी समजून त्या सर्व प्रवाशांचे पहिल्या दिवशी चाचणीसाठी नमूने घेतले जावेत. तसेच त्यांची आठव्या दिवशी पुन्हा एकदा चाचणी करणे गरजेचे आहे. ‘जोखीम असलेल्या’ देशातल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्यांना विमानतळावर थांबण्याची व्यवस्था करावी. ज्या प्रवाशांना देशात आल्यानंतर त्याला जोडूनच विमानाने जावे लागणार असेल (कनेक्टिंग विमानाने प्रवास करायचा असेल ) तर त्यांनी आधी तिकीट काढू नये असा सल्ला देण्यात आला आहे.
  • जनुकीय क्रमनिर्धारण  तपासण्यासाठी सर्व पॉझिटिव्ह नमुने आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत त्वरित पाठविण्याचे निर्देश  देण्यात आले आहेत. राज्यांनी पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कांतील व्यक्तींची  माहिती जमा करण्याचे आणि 14 दिवस त्याचा पाठपुरावा करण्याचे काम हाती घेण्यास सांगितले आहे.
  • चाचण्यांची व्याप्ती वाढविणे – चाचणीच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यात याव्यात आणि चाचणीच्या मार्गदर्शक तत्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी. आरटी-पीसीआरचा गुणोत्तर लक्षात घेवून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पुरेशा चाचण्या होत असल्याचे सुनिश्चित करावे.
  • रोगाचा प्रसार होणारी स्थाने -हॉटस्पॉटस्चे प्रभावी निरीक्षण – अलिकडच्या काळामध्ये पॉझिटिव्ह प्रकरणे ज्या भागातून जास्त आहे, त्या क्षेत्रांचे वरचेवर निरीक्षण करण्यात यावे. जनुकीय क्रमनिर्धारण यासाठी सर्व नमूने ताबडतोब  आयएनएसएसीओजी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश
  • ‘जोखीम असलेल्या’देशातून आलेल्या प्रवाशांच्या निवासीस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन ‘गृह विलगीकरणाची प्रभावी पालन केले जात आहे की नाही, याचे नियमित निरीक्षण करणे. तसेच आठव्या दिवशी चाचणीनंतर निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांची माहितीही राज्य प्रशासनाच्या प्रत्यक्ष देखरेखी खाली घेतली जावी.
  • आरोग्य विषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ सुनिश्चित करणे – आरोग्य विषयक पायाभूत  सुविधांची व्याप्ती वाढविण्यासाठी तयारी सुनिश्चित करण्यात यावी. (यामध्ये अतिदक्षता विभाग, ऑक्सिजनसुविधेची खाट, व्हँटिलेटर इत्यादींची उपलब्धता) ईसीआरपी-दोन लागू करणे, ग्रामीण भाग आणि बालरूग्णांवर लक्ष केंद्रीत करणे, औषधे, ऑक्सिजन सिलेंडर यांचा पुरवठा विनाखंड होईल हे सुनिश्चित करणे तसेच मंजूर झालेल्या पीएसए प्रकल्पांचे काम लवकर सुरू करणे.
  • सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या तपशीलांसह पॉझिटिव्ह प्रवाशांच्या सूचीसाठी सर्व एपीएचओ यांच्याबरोबर समन्वय साधणे आणि सर्वांवर पाळत ठेवण्यासाठी त्यांच्याबरोबर चांगले सहकार्य ठेवणे.
  • राज्य प्रशासन, इमिग्रेशन अधिकारी, एपीएचओ, बंदर आरोग्य अधिकारी आणि लँड बॉर्डर क्रॉसिंग ऑफिसर (एलबीसीओ) यांच्यामध्ये प्रभावी आणि योग्यवेळी समन्वयावर भर देणे.
  • नवीन मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून होत आहे.  आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ही तत्वे लागू करतानाच त्यांची अंमलबजावणी सुरळीत होणे सुनिश्चित करण्यासाठी बीओआय अर्थात इमिग्रेशन विभाग , एपीएचओ, पीएचओ आणि इतर संबंधित अधिका-यांसमवेत बैठका घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  • देशात होणाऱ्या कोविड प्रसाराचा मागोवा घेण्यासाठी राज्यांनी पाळत ठेवणे, दक्षता बाळगणे गरजेचे आहे. त्यासाठी दैनंदिन निरीक्षण, तसेच अगदी अलिकडच्या काळात पॉझिटिव्ह अहवाल आलेले रूग्ण नेमके कोणत्या भागातले  आहेत, याकडे लक्ष देणे आवश्यक  आहे.
  • प्रसार माध्यमांना साप्ताहिक संवाद कार्यक्रमातून जनतेबरोबर सामायिक केल्या जाणा-या सर्व परिस्थितीविषयी पुरावे, शास्त्रीय आधार असलेली माहिती नियमित प्रसारित करण्यावर पुन्हा भर देण्यात यावा.

कोविड-19 चा जो नवीन प्रकार उदयाला आला आहे, त्याला ‘महामारी अंतर्गतमहामारी’असे संबोधन देवून डॉ. व्ही.के पॉल म्हणाले, देशाने कोविड-19 चे ज्याप्रकारे व्यवस्थापन केले आहे, त्या ज्ञानाने देश आता समृद्ध झाला आहे.  सर्वांनी कोविड योग्य वर्तनाचे पालन निरंतर करण्याचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले. मोठ्या प्रमाणात एकत्रित जमणे, मेळावे घेणे टाळण्याबरोबरच लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. कोविड-19 विरोधात शक्तिशाली कवच म्हणजे लसीकरण आहे, त्यामुळेच ‘हर घर दस्तक’ योजनेतून लसीकरण मोहिमेत 100 टक्के पहिली मात्रा देण्याचे लक्ष्य साध्य केले पाहिजे. तसेच लसीकरणाचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी दुसरी मात्रा देण्यावरही लक्ष दिले पाहिजे. यासाठी लसीकरण मोहिमेचा कालावधी 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याचे त्यांनी  सांगितले. राज्यांनी लसीकरणाचा वेग आणि व्याप्तीही वाढवावी, असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे.

ओमिक्रॉनचा विषाणू आरटीपीसीआर आणि आरएटी या चाचण्यांमुळे पकडणे शक्य आहे. त्यामुळे कोणालाही विषाणूचा संसर्ग झाला आहे, हे जितक्या लवकर समजेल तितके चांगलेच आहे. त्यामुळे राज्यांनी चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, असा सल्ला देण्यात आला आहे. राज्यांनी चाचण्यांच्या कामाचा एक भाग म्हणजे, जोखीम नसलेल्या देशांतल्या प्रवाशांच्याही चाचण्या करण्याचा सल्ला दिला आहे. लसीकरण वाढविणे तसेच कोविड योग्य वर्तन ठेवणे याबरोबर मोठ्या संख्येन एकत्र जमण्याचे टाळण्यावर भर देण्यात यावा, असेही बैठकीत सांगण्यात आले.

भक्ती, ज्ञान आणि कर्माच्या साहाय्याने चारित्र्यसंपन्न समाज घडवा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

पुणे दि.३०: भक्ती, ज्ञान आणि कर्माने स्वतः चारित्र्यवान होत चारित्र्यसंपन्न समाज आणि विश्वबंधुत्वाची भावना प्रस्थापीत करण्याचे कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी विश्व शांती विद्यापीठ पुणे येथे आयोजित २६ व्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड, सुनील देवधर,  कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, संस्थेच्या सरचिटणीस स्वाती चाटे आदी उपस्थित होते .

श्री.कोश्यारी म्हणाले, भारतात अनेक ऋषिंनी काळाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या विचारांनी समाजाला जागृत करण्याचे कार्य केले आहे. या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून देशाला वैभवशाली करता येईल. भारतीय विचारांच्या आधारे एमआयटी संस्थेने संस्कृतीच्या जागराचे सुरू केलेले कार्य मार्गदर्शक आहे.

साधू-संत, क्रांतिकारी यांचा त्याग आणि बलिदान आपल्याला देशभक्तीसाठी प्रेरित करणारे आहे. आपल्या ऋषीमुनींचे ज्ञान, वसुधैव कुटुंबकम आणि एकं सत चे तत्व जगाला मार्गदर्शक आहे. बौद्धिक, अध्यात्मिक आणि शारीरिक शक्तीच्या समन्वयाने जगात संतुलन स्थापित होईल, अन्यथा बलशाली राष्ट्रे इतरांवर वर्चस्व प्रस्थापित करतील.

ज्ञानेश्वरीत मांडलेले गीतेतील ज्ञान अद्भुत आहे. विश्वबंधुत्वाची कल्पना माणसाला जोडणारी आहे. अध्यात्माला कर्माची जोड देण्याचा गीतेत मांडलेला विचार ज्ञानेश्वरांनी सुंदरपणे मांडला आहे. व्याख्यानमालेच्या माध्यमातून हे विचार समाजापर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ.विश्वनाथ कराड म्हणाले, भारताची संस्कृती आणि ज्ञान विश्वाला मार्गदर्शक आहे. भारत ही ज्ञान-विज्ञानाची भूमी आहे. अध्यात्म आणि विज्ञानाचा सुंदर समन्वय इथे आहे. याच भारतीय  विचारांच्या प्रेरणेने संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

श्री.देवधर, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ.राहुल कराड यांनी यावेळी विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात प्र.कुलगुरू मिलिंद पांडे यांनी व्याख्यानमालेविषयी   माहिती दिली.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते योगशिक्षक मारुती पाडेकर यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अ आणि ब वर्ग पदासाठीची प्रक्रिया सुरु – अमित देशमुख

0

मुंबई, दि. 30 :  वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागामार्फत 1 हजार 584 पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अ आणि ब वर्ग पदासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज दिली.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत वर्ग 1 ते वर्ग 4 या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याबाबतची आढावा बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव प्रकाश सुरवसे, अवर सचिव संतोष  देशमुख, आयुषचे संचालक डॉ. कोहली यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, राज्यात अजूनही कोविडचा धोका टळलेला नसून शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांमध्ये सतत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत ही मोठी पदभरती आहे. आतापर्यंत या विभागामार्फत एकूण 1 हजार 584 वर्ग अ आणि ब पदासाठीचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आले आहे. यापैकी 1 हजार 269 पदे वैद्यकीय शिक्षण कक्षाची आहेत. या पदांपैकी बहुतांश पदासाठी आयोगामार्फत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून भरतीची प्रक्रिया सुरु आहे.

वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील रिक्त पदे सध्या 50 टक्क्यांपर्यंत भरण्याबाबतची मंजुरी मिळालेली आहे. तर वर्ग 4 मधील पदे वैद्यकीय शिक्षण विभागच्या अखत्यारित येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना कंत्राटी पद्धतीने भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी याबाबत कार्यवाही करुन ही पदे तातडीने भरावी. तसेच वर्ग-3 संदर्भात मंजूर पदापैकी 50 टक्के पदे भरण्याची परवानगी राज्य शासनाची असल्याने याबाबतची जाहिरात कालबद्ध वेळेत प्रसिद्ध करुन या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी. वर्ग 1 ते वर्ग 4 ची पदभरती वेळेत झाल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येणार नाही. याशिवाय तदर्थ पदोन्नती, निम्न वेतनश्रेणीतील पदे उन्नत करण्यासाठी आवश्यकत त्या बाबी विभागीय निवड समितीसमोर मांडून वेळेत त्याबाबत निर्णय घेण्याला गती देण्यात यावी असेही वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

साने गुरुजी यांच्या कार्यावर आधारित कला – साहित्य संवाद आयोजनासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेणार -सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

0

मुंबई, दि. 30 : साने गुरुजी यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांच्या कार्यावर आधारित कला- साहित्य संवाद आयोजनासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पुढाकार घेईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक अंतर्गत येणाऱ्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या प्रकल्पांसंदर्भातील बैठक आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.संजय मंगो, कार्याध्यक्ष अमेय तिरोडकर, साने गुरुजी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या अध्यक्षा कवयित्री नीरजा, साने गुरुजी आंतरभारती कलाभवनचे अध्यक्ष युवराज मोहिते, आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले की, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या अंतर्गत आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य विभाग या केंद्राबरोबर संयुक्त विद्यामाने साने गुरुजी यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कला – साहित्य संवाद आयोजनासाठी प्रयत्न करेल. दरवर्षी ट्रस्टमार्फत 24 डिसेंबर या साने गुरुजी यांच्या जन्मदिवसापासून ते 31 डिसेंबर या कालावधीत कला- संवाद कसा आयोजित करण्यात येईल याबाबतचा प्रस्ताव आंतररभारती अनुवाद सुविधा केंद्रामार्फत पाठविण्यात येईल.

मराठीतील उत्तम साहित्याचे अनुवाद जगभरात पोहोचवण्यासाठी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहे. मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी हा प्रयत्न असून यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग मदत करेल. याशिवाय लेखकांना लेखनासाठी निवासी फेलोशिप दिली जावी असा प्रस्ताव देण्यात आला असता याबाबतही राज्य शासन सकारात्मक विचार करेल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

राज्यात राष्ट्रीय स्तरावरील ‘बोट रेस’ स्पर्धेचे आयोजन करणार – क्रीडामंत्री सुनील केदार

0

मुंबई, दि. 30 : राज्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील बोट रेस स्पर्धेचे जानेवारी, फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात येणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

बोट रेस संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी  ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्यासह क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

क्रीडामंत्री सुनील केदार म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरील जास्तीत-जास्त संघ बोट रेस या स्पर्धेमध्ये सहभागी होतील यासाठी विभागाकडून प्रयत्न करण्यात येतील. ही स्पर्धा सिलिंक, गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी आयोजित करण्याकरिता भारतीय नौदल यांच्यासोबतही बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

ज्या ठिकाणी स्पर्धा घेणे सोईस्कर होईल अशा ठिकाणी जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. अशा प्रकारच्या विविध क्रीडा स्पर्धाच्या माध्यमातून देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ राज्यात सुरु करण्यात आले आहे. याची माहितीही या निमित्ताने क्रीडा प्रेमींना होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी बोट रेस स्पर्धेसाठी सैनिक फेडरेशन कडून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.

ओव्हल मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना

ओव्हल मैदान येथील काही भाग सर्वसामान्य गरीब, कष्टकरी खेळांडूना  फुटबॉल व अन्य खेळांसाठी आरक्षित करण्याबाबत क्रीडा आयुक्त यांना प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना  क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिल्या. यावेळी आमदार भाई जगताप व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुण्यातील 1 ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा नाही होणार एवढ्यात सुरु

0

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा सावध पवित्रा 

१५ डिसेंबर ला बैठक घेऊन करणार निर्णय 

पुणे : राज्य सरकारने उद्या 1 डिसेंबर पासून राज्यातील पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबई महापालिकेने 1 डिसेंबरऐवजी 15 डिसेंबरपासून शाळा सुरु  करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता पुणे महापालिकेनं देखील पुण्यातील 1 ली ते ७ वी पर्यंतच्या शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्याचा  निर्णय घेतल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 15 डिसेंबर ला बैठक घेऊन पुढील नियोजन केले जाईल, असे ही महापौर म्हणाले.

शाळा सुरु करण्यासंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या बैठक झाली. या बैठकीत पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू  संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.त्यामुळे पुण्यातील शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंदच ठेवण्याचा  निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

राज्य सरकारने 1 डिसेंबरपासून पहिली ते चौथी शाळा सुरु करण्याची घोषणा केली आहे. मात्र, पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. असे महापौरांनी सांगितले. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत प्रशासनात संभ्रम असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अखेर पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात चर्चा झाल्यानंतर पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण झालेली आहे. मात्र, ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे.