पुणे- तुम्हाला ठाऊक आहे , तुम्ही कुठे कुठे कसे आणि किती वाहतुकीचे नियम तोडलेत ? या प्रश्नांचे उत्तरे तुम्ही आता ठाम पणे देऊच शकत नाहीत .रस्तोरस्ती लावलेले सी सी टीव्ही गुन्हेगारांना पकडण्यासाठी तर आहेतच पण सर्वात आधी ते दुचाकी चालविताना नियम कळत नकळत पणे ज्यांच्याकडून तोडले जातील त्यांना पकडणार आहेत . सर्वात कहर म्हणजे यंदाच्य नोव्हेंबर २०२१ या महिन्यात देखील असंख्य दुचाकी चालकांवर हेल्मेट परिधान केले नसल्याचे असंख्य गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून आता दंड वसुलीसाठी पोलिसांनी लोक अदालतिचे आयोजन केले आहे.
म्हणजे पहा …लोक अदालत म्हणजे पुन्हा वर जनतेच्या सोयीसाठी .. असाच अविर्भाव आहे. हेल्मेट ची सक्ती करण्याच्या विरोधात जर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आंदोलने केलेली आहेत . हेल्मेट सक्ती करू नये , आणि हेल्मेट न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करू नये हि तर राष्ट्रवादी सह कॉंग्रेस आणि शिवसेनेची हि भूमिका आहे मग तर आता महाविकास आघाडीचे सरकार असताना , राष्ट्रवादीचे गृहमंत्री असताना पुण्यात हेल्मेट परिधान केले नाही म्हणून हि छुपी वसुली का केली जाते आहे ? खरे तर याची उत्तरे अंकुश काकडे, प्रशांत जगताप ,शांतीलाल सुरतवाला आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांनी दिली पाहिजेत .
राजकीय लोक हेल्मेट सक्ती आणि सक्ती विरोधातील आंदोलने जणू काही सोयी नुसार करतात कि काय ? असे वाटण्याजोगीच हि स्थिती आहे .
एकीकडे असे वास्तव असताना पुण्यातील सोशल वर्कर असलेले प्रसिद्ध वकील चेतन भुतडा यांनी मात्र दुचाकी स्वरांना वेगळाच सल्ला दिला आहे ..पहा ऐका ते काय म्हणाले आहेत ते त्यांच्याच शब्दात …
मुंबई : रस्त्याने गाडी चालवताना अनेक वेळा तुम्ही हे पाहिलं असेल की, पोलिस वाहनांना थांबवतात आणि त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करतात आणि तुमच्याकडे वाहनांशीसंबंधीत कागदपत्र नसेल, तर पोलिस तुमच्यावरती कारवाई करतात.
परंतु तुम्ही हे बऱ्याचदा पाहिले असेल की, पोलिस बाईक किंवा कारची चावी काढून घेतात किंवा गाडीच्या चाकामधील हवा काढतात. परंतु तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की, वाहतूक पोलिस चेकिंग करताना वाहनाची चावी काढून घेऊ शकत नाही. त्यांना हे करण्याचा कायद्याने अधिकार दिलेला नाही.
यासंदर्भात कायदा काय सांगतो जाणून घ्या
पोलिसांना तुमच्या चाव्या हिसकावण्याचा अधिकार आहे का?
ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्याला चेकिंग दरम्यान तुमच्या गाडीची चावी काढण्याचा अधिकार नाही. याशिवाय ते तुमच्या गाडीच्या टायरची हवाही देखील काढू शकत नाहीत किंवा तुमच्याशी गैरवर्तन करू शकत नाहीत. एखाद्या ट्रॅफिक पोलिसाने तुमच्याशी असे केले तर तुम्ही पुरावा म्हणून त्या घटनेचा व्हिडीओ बनवावा.
मग तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडे यासंदर्भात तक्रार करू शकता, कारण मोटार वाहन कायदा 2019 अंतर्गत वाहतूक पोलिसांना असा कोणताही अधिकार देण्यात आलेला नाही.
अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसाची बाजू घेतली तर काय करायचे?
यानंतरही पोलिस स्टेशन किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गैरवर्तन करणाऱ्या वाहतूक पोलिसाची बाजू घेतल्यास हे प्रकरण हायकोर्टात नेऊ शकता. जर तुम्ही दारिद्र्यरेषेखालील असाल आणि तुमच्याकडे बीपीएल कार्ड असेल, तर कायद्याचे जाणकार वकील तुम्हाला मोफत सल्ला देतील. त्यानंतर हायकोर्ट त्या वाहतूक पोलिसाला आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समन्स काढेल.
तपासणीच्या नावाखाली गुंडगिरी करता येणार नाही
हे जाणून घ्या की मोटार वाहन कायदा 2019 कोणत्याही वाहतूक पोलिसाला चेकिंगच्या नावाखाली गुन्हा करण्याचा अधिकार देत नाही. अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरी तो तुमच्याशी गैरवर्तन करू शकत नाही आणि तुमच्या गाडीची चावी काढू शकत नाही.
विशेष म्हणजे, एका आरटीआयला उत्तर देताना हरियाणा पोलिसांनी म्हटले आहे की, वाहतूक पोलिस हाताचा इशारा देऊन तुमचे वाहन थांबवू शकतात परंतु ते तुमच्या गाडीच्या चावीला हात लावू शकत नाही. हे लक्षात घ्या की, तुमच्याकडे कोणतेही कागदपत्र नसले तर, पोलिस त्यासंदर्भात तुमच्यावरती दंड आकारु शकतात, तुमची गाडी थांबवू शकतात. परंतु तुमच्या गाडीला नुकसान पोहोचवू शकत नाही.
पुणे दि.4: कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणातून रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी एक जानेवारीपासून कुकडी डावा कालव्यात तर २५ डिसेंबरपासून डिंबे उजवा कालवा, घोड शाखा कालवा व पिंपळगाव जोगे कालव्यात तर मिना शाखा कालव्यात २० डिसेंबरपासून पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
सिंचनभवन येथे झालेल्या बैठकीला आमदार अशोक पवार, रोहित पवार, अतुल बेनके, संजय शिंदे, बाळासाहेब आजबे, दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते.
कुकडी प्रकल्पामध्ये ३ डिसेंबर २०२१ रोजी २३.८९ टीएमसी (८०.५१ टक्के) पाणी उपलब्ध आहे. या पाण्यातून बाष्पीभवन, पिण्याचे पाणी, आरक्षण, विभागणी साठा, इत्यादीसाठी लागणारे पाणी वजा करता रब्बी हंगाम नियोजनासाठी १५.२० टीएमसी पाणी नियोजनासाठी उपलब्ध आहे.
प्रकल्पातील उपलब्ध पाण्यातून प्रकल्पातील सर्व कालव्याचे एक आवर्तन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कालवानिहाय रब्बी आवर्तन सुरू करण्याच्या तारखाही ठरविण्यात आल्या. कुकडी डावा कालवा १ जानेवारी २०२२, डिंभे उजवा कालवा, घोड शाखा कालवा, पिंपळगाव जोगे डावा कालवा २५ डिसेंबर २०२१ व मिना शाखा कालव्यातून २० डिसेंबर २०२१ रोजी आवर्तन सुरू करण्यात येईल. याबरोबरच डिंभे डावा कालवा, मिना पुरक कालवा हे कालवे आणि कुकडी, मिना व घोड नदीवरील कोल्हापूरी पद्धतीचे बंधाऱ्याचे आवर्तन आवश्यकतेनुसार सोडण्याचाही निर्णय घेण्यात आला.
कुकडी प्रकल्पातील कालव्यांची “माझा कालवा माझी जबाबदारी” उपक्रमांतर्गत स्वच्छता केल्याने कालव्यांची वहनक्षमता वाढली आहे. अशा परिस्थितीत आवर्तनादरम्यान पुरेशा दाबाने पाणी मिळणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी या पाण्याचा उपयोग काटकसरीने व कार्यक्षमतेने करावा, असे आवाहन जलसंपदामंत्री श्री. पाटील यांनी केले. कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता सं. मा. सांगळे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
बैठकीस कालवा सल्लागार समितीचे सदस्य घनश्याम शेलार, देवदत्त निकम, अशोक घोडके,सुदाम पवार, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास राजपूत, मुख्य अभियंता हेमंत धुमाळ, हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता सं. मा. सांगळे, उपायुक्त नंदीनी आवडे, उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार, कर्जतचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे आदी उपस्थित होते.
पिंपरी, : – देशातील महिला शेतक-यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी, सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रीय महिला किसान आयोगाची स्थापना करावी. तसेच खेळाचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधांसाठी राष्ट्रीय खेळ विकास आयोग स्थापन करावे अशी दोन खासगी विधेयक शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडली आहेत.
खासदार बारणे यांनी या खासगी विधेयकात म्हटले आहे की, देशातील 50 टक्के लोकसंख्या शेतीवर आधारित आहे. त्यात महिला शेतक-यांची संख्याही मोठी आहे. महिला शेतक-यांचा आवाज ऐकला जात नाही. प्रगतशील भारताचे स्वप्न साकर करण्यासाठी महिला शेतक-यांचा आवाज ऐकण्याची गरज आहे. महिला शेतक-यांना मुख्य प्रवाहात आणणे, आधुनिक शेतीसंबंधी ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. त्यातून महिला शेतकरी सशक्त होतील. यासाठी राष्ट्रीय महिला किसान आयोगाची स्थापना करावी. त्याचे मुख्यालय दिल्लीत असावे. कृषीमंत्री आयोगाचे अध्यक्ष असावेत. पाच सदस्यांपैकी दोन महिला, शेती क्षेत्रातले तज्ज्ञ आणि दोन सदस्य केंद्र सरकारने नेमावेत.
महिला शेतक-यांचे कल्याण, महिला अधिकारांची माहिती असलेल्या शेतक-यांची नियुक्ती करावी. आयोगाने शेतकरी महिलांच्या कल्याणासाठी योग्य पाऊले उचलावीत. सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचवाव्यात. महिलांच्या सुरक्षेसंबंधी तरतूद केलेल्या सर्व उपाययोजनांमध्ये सुधारणा करावी. महिलांच्या शेतीसंबंधित अधिकाराचे संरक्षण करावे. त्यांना अधिकारापासून वंचित करणा-यांची चौकशी करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी या विधेयकद्वारे केली.
खेळाचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधांसाठी राष्ट्रीय खेळ विकास आयोगाची स्थापना करण्याबाबतही खासदार बारणे यांनी एक खासगी विधेयक मांडले आहे. भारतासारख्या महाकाय देशात प्रतिभा संपन्न लोकांची कमतरता नाही. असे असतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ संपन्न देश म्हणून आपण पुढे येऊ शकलो नाहीत. एक-दोन खेळ सोडून इतर खेळात आपली प्रतिभा समोर येत नाही. भारत सरकारने 2024 मध्ये होणा-या ऑलिंपिकमध्ये 50 पदके मिळविण्याच्या उद्देशाने ‘लेट्ल प्ले’, ‘खेलो इंडिया’, ‘द पंचायत युवा क्रीडा आणि खेळ’ असे विविध कार्यक्रम सुरु केले आहेत. 100 लोकांमधून केवळ 1 जण खेळाकडे करिअर म्हणून पाहतो. खेळ रोजगार मिळवून देऊ शकेल अशा दृष्टीने खेळाचा विचार केला जात नाही. आई-वडील मुलांना करिअरसाठी खेळाची निवड करण्याकरिता प्रोत्साहन देत नाहीत. आपल्याकडे अनेक प्रतिभावन क्रिकेटपट्टू आहेत. पण, इतर खेळामध्ये चमक दाखविणारे मोजकेच खेळाडू आहेत. देशाची मोठी लोकसंख्या असतानाही सुविधांअभावी ऑलिंपिकमध्ये पदक विजेत्यांमध्ये सर्वांत खाली राहतो. प्रशिक्षकांची कमतरता आहे. देशातील खेळाचा सर्वांगीण विकास, ग्रामीण क्षेत्रातील महिला खेळाडूंशी संबंधित प्रश्नांवर लक्ष देण्यासाठी, भारताला खेळप्रधान देश बनविण्यासाठी राष्ट्रीय खेळ विकास आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी या खासगी विधेयकातून केली.
पुणे- पुणे महानगरपालिका आणि पुणे सिटी कनेक्ट यांचा लाईट हाऊस प्रकल्पाचे उद्घाटन येत्या सोमवारी (६ डिसेंबरला) होणार आहे. महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या विशेष प्रयत्नांतून हा उपक्रम राबविला जाणार आहे.या लाईट हाऊसच्या माध्यमातून सॉफ्टवेअर टेस्टिंग, हार्डवेअर, डिजिटल मार्केटिंग, स्पोकन इंग्लिश, टॅली, ॲनिमेशन, फोटोग्राफी, मोबाईल रिपेअरिंग, फॅशन डिझायनिंग असे अनेक कोर्स शिकविले जाणार आहेत, अशी माहिती सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.शहरातील अल्प उत्पन्न गटातील तरुण-तरुणी तसेच सुशिक्षित बेरोजगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळावी, यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण भूमिका बजाविणार आहे. सोमवार पेठेतील पालिकेच्या भोलागिरी प्राथमिक शाळेत दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार असून पालिका आयुक्त विक्रम कुमार हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
मुलांच्या गटात एकेरीत तानपात निरुद्रोणने, तर दुहेरीत ऋषील खोसला यांना विजेतेपद
पुणे: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात जपानच्या सारा साईतो हिने एकेरी व दुहेरी गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, मुलांच्या गटात एकेरीत थायलंडच्या तानापत निरूद्रोण याने एकेरीचे विजेतेपद पटकावले. एकेरीत मुलींच्या गटात जपानच्या तिसऱ्या मानांकित साईतो हिने भारताच्या वैष्णवी आडकरचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 6-0 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 1तास 55 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये वैष्णवीने सुरेख सुरुवात करत साराची दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-0 अशी आघाडी घेतली. पण पिछाडीवर असलेल्या साराने जोरदार कमबॅक करत पाचव्या व नवव्या गेममध्ये वैष्णवीची सर्व्हिस रोखली व सामन्यात बरोबरी साधली. त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये साराने आपला खेळ उंचावत आपल्या बिनतोड सर्व्हिसच्या जोरावर हा 7-6(4) असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. दुसऱ्या सेटमध्ये साराने आक्रमक खेळ करत वैष्णवीला कमबॅक करण्याची फारशी संधी दिली नाही. या सेटमध्ये साराने दुसऱ्या, चौथ्या गेममध्ये वैष्णवीची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-0 असा सहज जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. सारा ही अरातो ज्युनियर हायस्कूलमध्ये अकरावी इयत्तेत शिकत असून मॅट टेनिस अकादमीत प्रशिक्षक हायतो मतसुदा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. विजेतेपदानंतर सारा म्हणाली की, वैष्णवी ही उत्कुष्ट खेळाडू आहे. सामन्यात सुरुवातीला मला लय मिळाली नाही व त्यामुळे पहिल्या सेटमध्ये 0-4 फरकाने मी पिछाडीवर होते. पण पुढच्याच गेमला मी वैष्णवीची सर्व्हिस रोखली व बॅकहँड आणि फोरहँडचा सुरेख संगम साधत सामन्यात पुनरागमन केले. पुण्यात ही स्पर्धा खेळून मला आनंद झाला आहे. तसेच, एमएसएलटीए व डेक्कन जिमखाना तर्फे पुरविण्यात आलेल्या सर्व सुविधा उत्तम होत्या. वैष्णवी यावेळी म्हणाली की, गेले तीन आठवडे सातत्याने 22 सामने खेळले असून तसेच काल सलग तीन सामने खेळल्यामुळे माझी दमछाक झाली होती. त्यामुळे तंदरुस्तीचा अभाव आजच्या सामन्यावर जाणवला. मुलांच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित थायलंडच्या तानापत निरूद्रोण याने कोरियाच्या अव्वल मानांकित वोबिन शिनचा 4-6, 6-2, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत मुनी अनंत मणी व ऋषील खोसला या भारताच्या जोडीने कझाकस्तानच्या मॅक्स बात्युटेंको व आरतुर खैरदिनोव्हयांचा 4-6, 6-2, 10-6 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात अंतिम फेरीत जपानच्या सारा साईतो हिने तैपैईच्या यु-युन लीच्या साथीत कझाकस्तानच्या आरझुन सेगदिकोव्हा व जपानच्या होनोका उमेदा यांचा 6-4, 6-1असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धतील एकेरी गटातील विजेत्या तानापत निरूद्रोणला एमव्ही देव स्मृती करंडक व 100गुण, तर उपविजेत्या वोबिन शिनला करंडक व 60 गुण देण्यात आले. तर, दुहेरी तील विजेत्या जोडीला करंडक व 75 गुण, उपविजेत्या जोडीला करंडक व 45 गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आयकर विभागाचे आयुक्त सुरेश यादव, माजी आशियाई विजेते व डेव्हिस कप खेळाडू संदीप किर्तने, गद्रे मरिनचे सरव्यवस्थापकआश्विन जंगम, एमएसएलटीएचे मानद सचिव व एआयटीएचे सहसचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखानाचे सहसचिव गिरीश इनामदार हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, क्लबच्या फायनान्स विभागाचे सचिव मिहीर केळकर, आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: मुले: तानापत निरूद्रोण(थायलंड)[3] वि.वि.वोबिन शिन(कोरिया)[1] 4-6, 6-2, 6-3;मुली: सारा साईतो(जपान)[3]वि.वि.वैष्णवी आडकर(भारत) 7-6(4), 6-0; दुहेरी गट: अंतिम फेरी: मुनी अनंत मणी(भारत)/ऋषील खोसला(भारत) वि.वि.मॅक्स बात्युटेंको(कझाकस्तान)/आरतुर खैरदिनोव्ह(कझाकस्तान) 4-6, 6-2, 10-6;मुली: यु-युन ली(तैपैइ)/सारा साईतो(जपान) वि.वि.आरझुन सेगदिकोव्हा(कझाकस्तान)/होनोका उमेदा(जपान) 6-4, 6-1.
मुंबई- ४ नोव्हेंबर २०२१ रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे.
हा तरुण कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असून त्याने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत त्यामुळे या रुग्णाचा आजार एकूण सौम्य स्वरूपाचा असून तो सध्या कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत आहे.
या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरूणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या शिवाय आणखी निकटसहवासितांचा शोध घेण्यात येत आहे.
या दरम्यान झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही तथापी डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.
आज सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ३८३९ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या १७,१०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली आहे.
आज सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेल्या सर्व ३८३९ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली असून इतर देशांमधून आलेल्या १७,१०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची आर टी पी सी आर तपासणी करण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबर पासून आता पर्यंत ८ प्रवासी कोविड बाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.
सुदर्शन मित्र मंडळ व फर्ग्युसन रोड नागरी व्यापारी संघटनेतर्फे ममता फाऊंडेशनला १०० किलो धान्य व खाद्यपदार्थ
पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवाला जनआंदोलनांची मोठी परंपरा आहे. सद्य:स्थितीत प्रबोधनाच्या कार्यासाठी, गणेश मंडळांचे व्यासपीठ उपयुक्त ठरत आहे. अनेक गणेश मंडळांकडून बाप्पाचा प्रसादरुपी असलेले साहित्य व धान्य सामाजिक संस्थांना पोहोचविण्याचे काम केले जात आहे. असाच सहभाग गणेश मंडळांनी सामाजिक कार्यात घ्यायला हवा. तसेच त्या कार्यात सातत्य देखील राखायला हवे. यामुळे वंचितांना आधार देताना, मंडळांची प्रतिमा सुद्धा उजळते आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते व गणेशोत्सवाचे अभ्यासक आनंद सराफ यांनी व्यक्त केले.
सुदर्शन मित्र मंडळ संस्था आणि फर्ग्युसन रोड नागरी व्यापारी संघटनेतर्फे ममता फाऊंडेशन या संस्थेला १०० किलो धान्य व खाद्यपदार्थांची भेट देण्यात आली. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमाला नगरसेविका प्रा.ज्योत्स्ना एकबोटे, युवा भारतीचे अध्यक्ष रामदास मारणे, व्यापारी संघटनेचे संदीप कुदळे, हर्षद वैद्य, कमलेश यादव, मंडळाचे अध्यक्ष शाम मारणे, दत्ता वाळके, अमर शर्मा, अभिजीत धुमाळ, सतीश पिल्ले, ॠषिकेश कोंढाळकर, मयुर उत्तेकर, निखील बटवाल, सागर शिंदे, शेखर यादव, तुषार पाटील, उदय पुरंदरे, इमरान शेख, दिलीप चव्हाण, निलेश धुमाळ आदी उपस्थित होते. संदीप कुदळे यांनी त्यांची मुलगी आर्या कुदळे हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आनंद सराफ यांच्या संस्थेला ५ हजार रुपयांची देणगी दिली.
आनंद सराफ म्हणाले, जीवन सुंदर आहे, त्याला आपण आणखी सुंदर करायला हवे, असा संदेश सामाजिक संस्थांतून दिला जातो. नैराश्याच्या वाटेने न जाता आनंदमय प्रकाशाच्या वाटेने जाण्याकरीता संस्थेतील मुलांना शिकविले जाते. त्याला गणेश मंडळांचा देखील आता हातभार लागत आहे.
प्रा.ज्योत्स्ना एकबोटे म्हणाल्या, सत्कार समारंभ, भोजनाचे कार्यक्रम हे आप्त-स्वकियांमध्ये मोठया प्रमाणात केले जातात. मात्र, एखाद्या सामाजिक संस्थेला मदत देण्याकरीता मोठे मन लागते. आपल्या आजूबाजूला अनेक गरजू संस्था व नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना मदत करणे हे आपण आपले कर्तव्य समजले पाहिजे. सत्कार आणि भोजन समारंभांपेक्षा सामाजिक संस्थांना मदत देणे, हे मोलाचे कार्य आहे, असेही त्यांनी सांगितले. संदीप कुदळे यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे : अयोध्येमध्ये कारसेवा करताना हुतात्मा झालेल्या कोठारी बंधूंना आणि भारताच्या सिमेवर हुतात्मा जवान व कारगिल विजय दिनाच्या स्मरणार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल सिंहगड भागातर्फे रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ५ डिसेंबर रोजी एकाच वेळी ११ ठिकाणी सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत रक्तदान शिबीरे होणार आहेत.
करुनी दान रक्ताचे, ॠण फेडू समाजाचे या उक्तीप्रमाणे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले जाते. यंदा सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी सोसायटी, वांजळे जलतरण तलाव, आनंद मारुती मंदिर आनंदनगर, अनुश्री हॉल माणिकबाग, लक्ष्मीनारायण मंदिर नांदेड गाव, काळभैरवनाथ मंदिर न-हे, भिडेवाडी क्लब हाऊस अभिरुची मॉलच्या मागे, जगताप मनपा शाळा हिंगणे खुर्द, मोफत वाचनालय राजयोग सोसायटी रोड, वस्ताद हरिभाऊ पोकळे शाळा धायरी, भैरवनाथ मंदिर वडगाव बुद्रुक अशा ११ ठिकाणी रक्तदान शिबीरे होणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
मुंबई, दि. ४: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे करण्यात येत असलेल्या तयारीसह थेट प्रक्षेपण व्यवस्थेची त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबांचे निवास असलेले राजगृह आणि परळ येथील बीआयटी चाळ या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार यांनी नुकतीच पाहणी केली.
यंदाच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे सोमवार दिनांक ६ डिसेंबर २०२१ रोजी चैत्यभूमी येथे होणाऱ्या शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते सकाळी १० कालावधीमध्ये केले जाणार आहे. सोबत विविध समाजमाध्यमांवरही हे प्रक्षेपण पाहून अभिवादन करता येणार आहे. त्यासाठी यूट्यूब:https://bit.ly/6december21YT/ फेसबूक: ttps://bit.ly/6december21FB / ट्विटर: https://bit.ly/6december21TT या लिंकचा उपयोग करता येईल.
दादर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्यभूमी स्मारक आहे. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. त्यानिमित्ताने चैत्यभूमी परिसरात रंगरंगोटी, दिवाबत्ती, पुष्प सजावट आदी कामे केली जातात. तसेच, डॉ. बाबासाहेबांचे निवास असलेले राजगृह आणि परळ येथील बीआयटी चाळ या ठिकाणी देखील अनुयायी भेट देत असल्याने तेथेही व्यवस्था करण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे ही सर्व कामे पूर्णत्वास आली आहेत.
कोविड-१९ विषाणू संसर्ग नियंत्रणात आला असला तरी कोविडच्या ओमायक्रॉन या नवीन प्रकाराचा धोका निर्माण झाल्याने दक्षता बाळगणे आवश्यक झाले आहे. ओमायक्रॉन हा अत्यंत वेगाने संक्रमित होणारा कोविड विषाणू प्रकार असल्याने, नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे धोक्याचे ठरू शकते. या पार्श्वभूमीवर देशभरातील अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे न येता आपापल्या घरी राहून तसेच स्थानिक परिसरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन शासनाकडून आणि प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता देखील अनुयायांना अभिवादन करता यावे यासाठी चैत्यभूमीवरील शासकीय मानवंदना व पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन करण्यात येणार आहे.
दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून महापरिनिर्वाणदिनी सकाळी ७.४५ ते सकाळी १० या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना व हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० तसेच दुपारी १२.५० वाजता दर दहा मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या मुंबई केंद्राद्वारे देण्यात आली आहे.
नाशिक, दिनांक 3 डिसेंबर, 2021 : मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे उद्घाटन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादाजी भुसे, प्रमुख पाहुणे जावेद अख्तर, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील,उदघाटक विश्वास पाटील, डॉ.दादा गोऱ्हे,रामचंद्र साळुंखे, खासदार श्रीनिवास पाटील, शुभांगीणी राजे गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले, सदानंद मोरे, उत्तम कांबळे, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीपाल सबनीस, हेमंत टकले, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, मिलिंद कुलकर्णी,प्राचार्य प्रशांत पाटील, संजय करंजकर, दिलीप साळवेकर, स्वानंद बेदरकर यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले, साहित्य संमेलनाच्या इतिहासात नाशिकचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल अशी अजोड कामगिरी नाशिकने केली आहे. मुंबई येथे १९३८ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भूषविले होते आणि त्यांनी ‘लेखकांनी हातात लेखण्या न घेता बंदुका घ्या’ असा सल्ला तुम्हा मंडळींना दिला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चळवळीला अनुलक्षूण सावरकरांनी साहित्य मंचावरून आपले विचार मांडले हे लक्षात येते. पुढील काळात संमेलनाध्यक्षपदाचा मान तात्यासाहेब शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांना लाभला. मराठी भाषेतले दुसरे ज्ञानपीठ त्यांना मिळाले आहे, हे मी आपणास सांगितले पाहिजे असे नाही. तात्यासाहेबांनी मडगाव,गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेची होणारी आबाळ सगळ्यांच्या लक्षात आणून दिली होती.
साहित्यकांबद्दल बोलताना स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले नाशिकचा माणूस दुसऱ्याला भरभरून देत असतो. उदारता हा नाशिककरांचा गुण आहे. त्या बळावरच आम्ही तुमचे स्वागत करीत आहोत. साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवा असतो. शासनाने तो दिला पाहिजे असेच माझे मत आहे. तुम्ही मंडळी राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन कथा, कादंबऱ्या रचत असता. वात्रटिकांसाठी राजकीय पुढाऱ्याइतका मसाला तुम्हाला कोणी पुरवत नाही. तरीसुद्धा साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय नेत्याने असू नये असे काहींना वाटते, ते मला उचित वाटत नाही. तुम्ही तुमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवा. ‘राज्यकर्त्यांनो तुम्ही चुकता आहात’ हे सांगण्याचा तुमचा अधिकार आम्ही मान्य करतो. मी एक वाचक आहे. सार्वजनिक जीवनात मी फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांनी वाटचाल करीत असतो. महात्मा फुल्यांनी दुसर्या साहित्य संमेलनाचे निमंत्रण १८८५ साली नाकारले होते. त्यांचे म्हणणे होते की “साहित्यकारांनी जातीनिर्मुलनाची भूमिका घेतली पाहिजे.” ते म्हणत असत.
पुढे छगन भुजबळ म्हणाले, फुले म्हणायचे ” इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो.” आता लोक म्हणतात, “ईडीपिडा टळो आणि लोकशाही बलवान होवो” शाहु महाराजांचे नाशिकवर विशेष प्रेम होते. बाबासाहेबांनी नाशिकच्या दादासाहेब गायकवाडांना लिहिलेल्या पत्रांचा महाग्रंथ राज्य शासनाने २१ व्या खंडाच्या रुपाने प्रसिद्ध केलेला आहे. आमच्या नाशिकच्या महाराजा सयाजीरावांची कीर्ती त्रिखंडात गाजलेली आहे. त्यांनी सयाजी विजय मालेतून प्रकाशित केलेले बुद्धचरित्र वाचून बाबासाहेब बुद्धाकडे वळले. त्यांनी या मालिकेत प्रकाशित केलेली ३०० हुन अधिक पुस्तके पुन्हा प्रकाशित व्हायला हवीत असे माझे मत आहे. इतकी ती मोलाची आहेत. त्यांनीच १९०५ साली भारतात शिक्षण प्रथम सक्तीचे, सार्वत्रिक आणि मोफत केले. आधुनिक गुजरात सयाजीरावांनी घडवला, हे सांगताना मला अभिमान वाटतो.
महात्मा फुल्यांनी जाती निर्मूलनाचा विषय संमेलनात घेत नाही म्हणून या साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाकारले होते. आज त्यांचा लहानसा अनुयायी छगन भुजबळ या मंचावरुन तुमचे स्वागत करतो आहे. हा बदल लक्षात तर घ्याल की नाही? नारळीकर- ठालेपाटील आणि भुजबळ एका मंचावर साहित्य सोहळा साजरा करीत आहेत. हा काळ आर्टीफिशियल इंटीलिजन्सचा आहे. आम्ही नाशिककरांनी तुमच्यासाठी सर्व स्वागताची तयारी केली आहे.
त्यातून कुठे काही उणे भासल्यास ते आमचे आहे. ते आमच्याकडे देऊन जा असे आवाहन देखील त्यांनी केले.
साहित्य संमेलनाची सांस्कृतिक-साहित्यिक पर्वणी मनाला उभारी देणारी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. यंदाचे हे ९४ वे संमेलन नाशिकच्या पवित्र भूमीत आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नगरीत साहित्य संमेलन होत आहे, याचा विशेष आनंद आहे. जगावर आलेले कोरोना महामारीचे संकट परतवून लावत असताना आता आपल्याला आपलं जगणं पुन्हा नव्या दमाने, जोमाने पूर्वपदावर आणायचे आहे. त्यासाठी साहित्य संमेलनाची ही सांस्कृतिक-साहित्यिक पर्वणी महत्त्वाची आणि मनाला उभारी देणारी ठरेल, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्य संमेलनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
राज्याचे भाषा व उद्योग विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छा संदेश या कार्यक्रमात वाचून दाखवला. या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, ‘माझा मराठीची बौलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके!’ असे सांगणाऱ्या विश्वमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे हे ७२५ वे म्हणजेच सप्तशताब्दी रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मराठी भाषेचा विकास हा आपला सर्वांचाच ध्यास आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, शिक्षणातही मराठीला स्थान मिळावे असे आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. मराठी केवळ भाषा नाही. ती संस्कृती आहे. या भूमिकेतून मराठी मुलुख एकत्र रहावा यासाठी महाराष्ट्रपुत्रांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राणांची आहुती दिली. या हुतात्म्यांचे स्मरण करणेही आपले कर्तव्य आहे. या सर्व हुतात्म्यांना माझे त्रिवार वंदन.
यंदाचे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. महाराष्ट्राने ज्ञान-विज्ञानाचा वसा प्रयत्नपूर्वक जतन केला आहे. मराठी साहित्य विश्वानेही मनोरंजन, विरंगुळा याच बरोबर वाचकांच्या जाणीवा प्रगल्भ करण्याची भूमिका जाणीवपूर्वक स्वीकारली आहे. समाजातील अनिष्ट प्रथा-परंपरावर प्रबोधनात्मक असा घाव घालण्याचे धारिष्ट्यही दाखवले आहे. असा वैज्ञानिक वारसा जपणाऱ्या वाटचालीत संमेलनाचे अध्यक्षपद जगद्वविख्यात खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर भूषवणार आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
जगद्गगुरू संत तुकोबारायांच्या ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. शब्दांची शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवांचे जीवन’ या ओळींप्रमाणे हे अक्षरांचे अक्षय धन लुटण्यासाठी आपण दरवर्षी एकत्र येत असतो. या संमेलनाच्या संयोजनाचा मान दुसऱ्यांदा पटकावणारे नाशिककर गोदाकाठचा हा मेळा संस्मरणीय करतीलच. पण या संमेलनातून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांसह, आपल्या लेखन प्रयोगांतून मराठीला आणखी समृद्ध, संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांना मानवंदना दिली जाईल. यातून मराठीतील विविध साहित्यिक प्रवाहांतील नव्या दमाच्या प्रतिभावंताना प्रेरणा मिळेल. या सगळ्या प्रयत्नांतून नानाविध प्रतिभेचे, सर्जनशील असे अनेक लिहिते हात पुढे येतील अशी अपेक्षा आहे. साने गुरूजींच्या ‘..जगाला प्रेम अर्पावे’ असे सांगणाऱ्या या मराठीत विज्ञानेश्वर घडावेत, अभिरूची संपन्न महाराष्ट्र घडावा, हीच आकांक्षा आहे. संमेलनात प्रकाशित करण्यात येणाऱ्या मराठी विज्ञान साहित्याचा इतिहास या स्मरणिकेच्या प्रकाशनास तसेच संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीला मनःपूर्वक शुभेच्छा या संदेशातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिल्या साहित्य संमेलनाला शुभेच्छा
‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’चे 94 वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ नाशिक येथे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानकथा लेखक आदरणीय डॉ. जयंत नारळीकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याचे समजून आनंद झाला. नाशिकच्या ‘लोकहितवादी मंडळा’च्या सहकार्यातून, जिल्ह्याचे पालकमंत्री, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय श्री. छगन भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित सर्व सन्माननीय साहित्यिक, साहित्यरसिक बंधू-भगिनींचे सर्वप्रथम मी मन:पूर्वक स्वागत करतो. आडगावच्या भुजबळ ज्ञाननगर आवारात उभारलेल्या कवीवर्य कुसुमाग्रजनगरीत 3 ते 5 डिसेंबर 2021 पर्यंत चालणाऱ्या या संमेलनाच्या आयोजनात सहभागी सामाजिक, शैक्षणिक, वाचन व ग्रंथ चळवळीतील संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू-भगिनींचे अभिनंदन करतो. आभार मानतो. संमेलन यशस्वितेसाठी शुभेच्छा देतो.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही आपली गौरवशाली सांस्कृतिक परंपरा आहे. जगभरातील मराठी साहित्यिक, मराठी भाषा प्रेमींसाठी संमेलन ही आनंदपर्वणी असते. आपल्या आवडत्या साहित्यिकांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी यानिमित्तानं रसिकांना उपलब्ध होत असते. साहित्य क्षेत्रातील घडामोडींचा वेध घेत भविष्यातील वाटचालीची आखणी केली जाते. साहित्य चळवळीला दिशा, ऊर्जा देण्यात संमेलनं महत्त्वाची भूमिका बजावत असतात. साहित्यसंवाद, कथाकथन, कवीसंमेलनं, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्थानिक, नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचं काम संमेलनाच्या माध्यमातून होतं. साहित्य संमेलनाध्यक्षांचं भाषण हे नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहीलं आहे. राज्याच्या, देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीला दिशादर्शन करण्याची ताकद संमेलनाध्यक्षांच्या भाषणात असते. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानकथा लेखक डॉ. जयंत नारळीकर हे संमेलनाध्यक्ष असल्याने त्यांचे विचार महाराष्ट्राच्या साहित्य चळवळीला विज्ञानवादाकडे नेणारे ठरतील, हा विश्वास आहे.
मराठी भाषा प्राचीन, साहित्यश्रेष्ठ आहे. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू सारख्या ग्रंथांनी मराठी भाषा बाराव्या शतकाच्या आधीपासून अस्तित्वात असल्याचे सिद्ध केले आहे. तद्नंतर साहित्यिकांच्या प्रत्येक पिढीनं आपल्या साहित्यकृतीनं मराठी भाषा समृद्द करण्यात मोलाचं योगदान दिलं. साहित्यिक वि. स. खांडेकर, कवीवर्य कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांनी मराठीला ज्ञानपीठ पुरस्कारानं अलंकृत केलं. लाडकं व्यक्तिमत्वं पु. लं. देशपांडे यांनी महाराष्ट्र कायम हसत ठेवला. कवयित्री शांता शेळके, बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यकृतींनी स्त्रीसाहित्याचा झेंडा उंच केला. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी, विज्ञानवादी, विचारांनी मराठी साहित्याला नवी दृष्टी दिली. गेल्या काही दशकात महाराष्ट्राच्या गावखेड्यातून, वाड्या-तांडे-वस्त्यांवरुन तिथल्या जगण्याशी, भाषा-बोलींशी नातं सांगणारे युवा साहित्यिक पुढे आले. त्यांनी त्यांच्या अनुभवातून, बोलीतून मराठी साहित्यरसिकांना वेगळं जग दाखवलं. महाराष्ट्राचं अंतरंग साहित्यकृतीतून मांडणारे अनेक साहित्यिक आज राज्याच्या गावखेड्यात लिहिते झाले आहेत. आपापल्या परीनं मराठी भाषा समृद्ध करीत आहेत. या ग्रामीण युवा साहित्यिकांचं मी विशेष अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या गावखेड्यातल्या ग्रामजीवन बोलीभाषेतून साहित्यबद्ध करण्याचा वसा या युवा साहित्यिकांनी कायम ठेवावा, असं आवाहन करतो.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सुधारणांच्या प्रत्येक लढ्याचं नेतृत्वं महाराष्ट्रानं केलं आहे. हे लढे लढण्यात, पुढे नेण्यात मराठी साहित्यिक व साहित्य चळवळ कायम अग्रस्थानी होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी करण्यात साहित्यिकांचं अनन्यसाधारण योगदान आहे. समाजातील अनेक महत्वाच्या मुद्यांवर मराठी साहित्यिकांनी यापूर्वी आपली मते वेळोवेळी मांडली आहेत. तो स्पष्टवक्तेपणा अलिकडे अभावाने दिसतो. साहित्यिकांनी महत्वाच्या मुद्यांवर ठोस भूमिका घेऊन विचार मांडावेत. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कृतीशील व्हावे, ही नागरिकांची, साहित्यरसिकांची अपेक्षा असते. अलिकडच्या काळात साहित्यिक मंडळी कुठल्याही विषयावर व्यक्त होताना दिसत नाहीत. व्यक्त होणं जाणीवपूर्वक टाळलं जातं. ही बाब लोकशाहीसाठी हानीकारक, साहित्य रसिकांचा अपेक्षाभंग करणारी आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्यिकांना विविध विषयांवर व्यक्त व कृतीशील करण्याचे प्रयत्न होतील. मराठी भाषेला विज्ञानवादाकडे नेले जाईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी कार्यक्रम आखला जाईल, सीमाभागातील मराठीभाषक गावांच्या महाराष्ट्रात सामील होण्याच्या लढ्याला बळ देण्याचं काम होईल. संमेलन तीन दिवसांचे असले तरी मराठी भाषेचा गौरव वाढवण्यासाठी आपण वर्षभर प्रयत्नशील राहू, अशी अपेक्षा व्यक्त करतो. 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद…
अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेत माय मराठीचाही समावेश आहे – उद्घाटक विश्वास पाटील
नाशिक ही गुणवंताची, बुध्दीवंतांची भूमी असून साहित्याच्यादृष्टीने रत्नांची खाण आहे. जगात सर्वात जास्त ज्या दहा भाषा बोलल्या जातात. त्यात आमची माय मराठी आहे असे प्रतिपादन संमेलनाचे उदघाटक व साहित्यिक विश्वास पाटील यांनी यावेळी केले. त्या भाषेचे शेक्सपिअर वि. वा. शिरवाडकर हे होते. त्यांचे विशाखा हे महाकाव्य होते. जिल्ह्यातील विविध साहित्यिकांची उदाहरण देताना तात्यासाहेब हे माझे अजिंठा होते तर कानेटकर हे वेरूळ होते .असे सांगून पानिपत लिहिल्यानंतर तात्यासाहेब ती मी ज्या टेबलावर लिहिली त्याचे अवलोकन करण्यासाठी ते मिरजेत आले होते असे सांगून त्यांनी शिवरायांच्या स्मृती जपल्या पाहिजेत अशी अपेक्षाही व्यक्त करून यारी आणि दिलदारीमध्ये नाशिकचा हात कोणीही धरणार नाही असेही ते म्हणाले.
संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकरांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे व्यक्त केले मनोगत
सर्वप्रथम आजच्या महत्वाच्या प्रसंगी मला माझे विचार मांडायला संधी दिलीत याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो. तसेच माझे भाषण आपल्या पसंतीस उतरले नाही तर त्याबाबत आधीच दिलगिरी व्यक्त करतो.
कुठल्याही भाषेतले साहित्य ती भाषा वापरणाऱ्या समाजातील घडामोडींनी प्रभावित झालेले असते. साहित्याचा कोणताही विषय असो, ते लिहिणारा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही. एखाद्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत “ह्या पुस्तकातील घटना व पात्रे काल्पनिक असून त्यांचा प्रत्यक्षाशी काहीही संबंध नाही.” इत्यादी विधाने सापडतात. त्यांनी कायद्याचे समाधान होत असेल, पण लेखकाने आत्मपरीक्षण केल्यास त्याला अशा विधानात तथ्य नसल्याचे आढळून येईल. परंतु याचा अर्थ असा नव्हे की , सामाजिक घडामोडींचे संपूर्ण प्रतिबिंब साहित्यात उमटते. एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल तर समाजाचे बहुतेक पैलू त्यात उमटतात. परंतु काही महत्त्वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्या बाबतीत तिला असमृद्ध समजले पाहिजे. अशा मानदंडाद्वारे आपण असे म्हणू शकतो की, इंग्रजी भाषा मराठी भाषेपेक्षा अधिक समृद्ध आहे.
मराठीचे अपूर्णत्व सर्वांत जास्त जर कुठे जाणवत असेल तर ते विज्ञान – साहित्याबाबतीत. विसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हटल्यास चूक ठरणार नाही. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक – आइन्स्टाइन बोर यांचा पुंजवाद हे दोन महत्त्वाचे मूलभूत सिद्धान्त ह्या शतकाच्या पहिल्या पंधरा वर्षात भौतिकशास्त्राला मिळाले. अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा ह्या शतकात चालू झाल्या. वर्षानुवर्षे न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणकयंत्रे ह्या शतकाच्या उत्तरार्धात निघाली. विश्वाचे विराट दर्शन आणि अणूच्या अंतरंगाचे सूक्ष्म दर्शन मानवाला आज पाहायला मिळत आहे. जीवशास्त्राच्या मुळाशी असलेला डी.एन.ए. रेणू शास्त्रज्ञांना सुमारे सहा दशकांपूर्वी गवसला. विज्ञानाची ही गरुडझेप तंत्रज्ञानाच्या रूपाने मानवीजीवन अधिक प्रगत, विकसित करायला कारणीभूत ठरली .
– जयंत नारळीकर,संमेलनाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक
साहित्य समंलेनाच्या माध्यमातून सर्व भाषा एकत्र आल्या पाहिजेत – जावेद अख्तर
भाषेमुळे संवादातील अडथळे दूर होतात. संस्कृती जोपासण्यासाठी भाषा हि सेतू सारखे काम करते, साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सर्व भाषा व प्रादेशिक भाषा एकत्र आल्या पाहिजेत. जो जनतेशी संवाद साधतो तोच खरा मोठा लेखक असून, मराठी भाषा हि अत्यंत समृद्ध वारसा लाभलेली भाषा असून देशातील पहिल्या महिला डॉक्टरही मराठी आहे असे नमूद करून साहित्यिकांनी प्रामाणिपणे काम केले पाहिजे असे आपल्या मनोगतात यावेळी प्रसिद्ध साहित्यिक, पटकथाकार, लेखक व कवी जावेद अख्त्तर यांनी यावेळी केले.
पुणे- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केलीय. तसेच पुणे महानगरपालिकेच्या कामाचं कौतुक केलंय. यावेळी त्यांनी सध्या नेते आणि नोकरशाहा जिल्ह्याजिल्ह्यामध्ये खंडणीचं काम करत आहेत, असा गंभीर आरोप केला. ते पुणे शहर भाजपाच्या नवीन इमारतीतील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय, तर दुसरीकडे महाराष्ट्रात वसुली हा एकमेव धंदा आहे. वसुलीशिवाय काहीच होत नाही. भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे. इथली नोकरशाही संपुष्टात येत आहे. महाराष्ट्राच्या नोकरशाहीला देशातील सर्वोत्तम नोकरशाही म्हटलं जायचं. त्या नोकरशाहीला राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराने पोखरून टाकलं. आता नेते आणि नोकरशाहा जिल्ह्याजिल्ह्यामध्ये खंडणीचं काम करत आहेत आणि सामान्य माणसाचा विचार करायला कुणी तयार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात वसुली सुरू आहे.”
मोदींच्या नेतृत्वाखाली वॅक्सिन तयार झाले नसते तर काय झाले असते? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, मोदींनी सर्व वैज्ञानिकांना सोबत घेऊन, कंपन्यांना ऍडवान्समध्ये पैसे दिले. आणि वॅक्सिन तयार केली. दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने आम्ही इतके डोस दिले म्हणून सांगत होते, पण हे सर्व डोस त्यांना मोदींनी दिले असल्याचे स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.”
पुण्यात शिवसेना नावालाही उरली नाही. भाजपने पुढच्या 25 वर्षाचा विचार करून त्यादृष्टीने विकासकामे केली आहेत. आमचे पुणेकरांना वचन आहे, जर पुन्हा सत्ता आली तर पुण्याला देशात प्रथम क्रमांकाच केल्याशिवाय राहणार नाही. असा असे वचन त्यांनी पुणेकरांना दिले आहे.यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ”महापालिकेवर भाजपचा भगवा अन् आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही” असा विश्वास भाषणातून व्यक्त केला .
फडणवीस म्हणाले, उदघाटनाला आलेल्या नागरिकांची ही गर्दी पाहून भाजप महानगरपालिकेवर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही. मला अलीकडे भाजपचा भगवा असं स्पष्टपणे सांगावे लागते. कारण आमचा भगवा असं सांगणारे आजकाल भगव्यासोबत प्रतारणा करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.’कार्यालयाचे उद्घाटन असल्याने कार्यकर्ते स्वतः आले आहेत, जर आम्हाला शक्तीप्रदर्शन करायचे असेल तर पुण्यातील एकही मैदान पुरणार नाही. जे सावरकरांचा अपमान करतात. त्यांना महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, सावरकरवादी आहोत, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार चालतो असेही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.”
पुणे महापालिका भाजपच्या ताब्यात आल्यावर कामे झाली
”जनतेच्या मनात, पुणेकरांच्या मनात केवळ भाजप आहे. कारण भाजपने केलेला विकास त्यांनी बघितला आहे. वर्षानुवर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात ही पालिका होती. पण पुणेकरांच्या हिताची कामे झाली नाही. कोरोनाच्या काळात नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानंतर भाजपचे कार्यकर्ते लोकांची सेवा करत होते. पुणे महानगरपालिकेने कोरोना काळात खूप मोठे कार्य केले असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.”
नाशिक – मराठी साहित्यासाठी काम करताना या गोदेच्या काठावर अधिक सुंदर लिहीण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील यांनी केले आहे.अखिल भारतीय साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नाॅलेज सिटी नाशिक येथे उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील म्हणाले की, साहित्य संमेलन मला एका चमत्कारा सारखे वाटते. पावसाचा व्यत्यय असतांना वाघासारखे पुढे येऊन छगन भुजबळ यांनी दिवस रात्र काम करून हे सर्व संमेलन स्थळ उभं केलं. यामागे कुसुमाग्रज, वसंत कानेटकरांच्या भूमीची प्रेरणा आहे. नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ आहे तात्यासाहेब यांचे घर हे माझ्यासाठी अजिंठा तर कानेटकरांचे घर हे वेरूळ असल्याचे सांगत यामध्ये पानिपत ही कादंबरी महत्वाची आहे असे त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले की, साहित्य संमेलन मला एका चमत्कारा सारखे वाटते. पावसाचा व्यत्यय असतांना दिवस रात्र काम करून हे सर्व संमेलन स्थळ उभं केलं. यामागे कुसुमाग्रज, वसंत कानेटकरांच्या भूमीची प्रेरणा आहे. नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ आहे तात्यासाहेब यांचे घर हे माझ्यासाठी अजिंठा तर कानेटकरांचे घर हे वेरूळ असल्याचे सांगत यामध्ये पानिपत ही कादंबरी महत्वाची आहे असे त्यांनी सांगितले.काळाराम मंदिर सत्याग्रह, दादासाहेब गायकवाड यांचे कार्य या नाशिक नगरीत होत. नाशिक या भूमीत अनेक महत्वाचे व्यक्तिमत्व घडले असल्याने या भूमीला विशेष महत्व आहे. यारी आणि दिलदारी यात नाशिकचा हात कोणी धरू शकत नाही. राजकीय दृष्ट्या देखील अतिशय महत्त्वाची भूमी आहे हे सांगताना त्यांनी पहिल्या मुख्यमंत्रीपदावेळचा किस्सा सांगितली. ते म्हणाले की,नव्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार? भाऊसाहेब हिरे की यशवंतराव चव्हाण? यांच्यात थोडक्यात हिरे यांची संधी हुकली, चव्हाण साहेबांचं कर्तृत्व असं की चव्हाण साहेबांनी हिमालयाला थक्क करेल असं कर्तृत्व दिल्लीला दाखवलं. तेव्हा हेच नाशिक पुढे झालं आणि नाशिकहून यशवंतराव चव्हाणांना निवडून दिलं होतं. खऱ्या अर्थी यारी आणि दिलदारी ही नाशिककरांकडून शिकायला हवी असं विश्वास पाटील म्हणाले.नाशिकमध्ये साहित्याची परंपरा अतिशय मोठी आहे.कोरोनाच्या काळात अनेक कवी लेखकांचे दुःखद निधन झाले याच दुःख वाटते. शिवरायांच्या स्मृती आपल्याला जतन करायला हव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले.महाराष्ट्रसाठी, मराठीमाती साठी अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे शाहीर, अनेक साहित्यिक, लेखक यांनी रस्त्यावर येऊन जो संघर्ष उभा केला होता त्याची आठवण देखील संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील यांनी यावेळी मांडली. विश्वास पाटील पुढे म्हणाले की, साहित्य संमेलन घ्यावे की नाही यावर प्रत्येक वर्षी प्रश्न उपस्थित केले जातात. जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, राजकीय पक्षांच्या नावावर, भोंदू बाबांच्या नावावर जर लोक एकत्र येत असतील तर मराठी भाषेसाठी एकत्र आले तर काय हरकत आहे असा सवाल देखील यावेळी विश्वास पाटील यांनी उपस्थित केला.
नाशिक : तब्बल आठशे वर्षांपासून आपल्याकडे मराठीत महिला साहित्यिक आहेत, तेव्हा विदेशात कोणी कविता लिहीत नव्हतं आपण यावर आभिमान बाळगला पाहिजे असे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभचे प्रमुख पाहुणे गीतकार, लेखक जावेद अख्तर यांनी व्यक्त केले.आपल्याकडे मुक्ताबाईनी मराठीत आठशे वर्षांपुर्वी लिखाण केलं आणि हे जगात कुठेच झालं नाही, 200 वर्षांपूर्वी विदेशात महिला पुरुषांच्या नावाने लेख, कविता लिहायच्या.मात्र मराठीत पहिली लेखीका आणि पहिली महीला डॉक्टर झाली. मिराबाईंनी 400 वर्षापुर्वी लिखाण केलं पण हिंदीच्या आधी मराठी लिखाण एका महिलेने मराठीत केलं असे जावेद अख्तर म्हणाले.
त्यांनी सांगीतलं की, मला काही मित्र मराठी पहिल्यांदा मराठी नाटक पाहायला घेऊन गेले तेव्हा मला कुणीतरी जोरदार चापट मारल्यासारखं वाटलं, ते नाटक होतं विजय तेंडुलकर यांचं शांतता कोर्ट चालू आहे, मला या महान लेखकाबद्दल काही माहिती नव्हतं याची मला लाज देखील वाटली.
जावेद अख्तर पुढे म्हणाले की, मराठीतील महान कवी तोच आहे जो जनतेशी संवाद साधतो, त्यामुळे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव हेच मराठीचे सर्वांत मोठे साहित्यिक आहेत आणि आपण त्यांच्यावर आभिनान बाळगला पाहिजे असे अख्तर म्हणाले. मराठी संतानी त्यांचं साहित्य सोप्या भाषेत, सर्वांना समजेल अशा भाषेत साहित्य लिहिलं. त्यांनी आपलं तत्त्वज्ञान झाडलं नाही तर लोकांशी संवाद साधला असे ते म्हणाले.पुढे जावेद अख्तर म्हणाले की, भाषेच्या बाहेर देखील एक जग आहे, त्यामुळे भाषा ही एकमेकांना जोडणारा दुवा असली पाहिजे मात्र अनेक वेळा आज या भाषेमुळेच एकमेकांमध्ये दुरावा येतो, असे व्हायला नको असे ते म्हणाले.
मराठी साहित्याच्या दरबारात येण्याची संधी मिळाली ही अतिशय आनंदाची बाब असून या मातीला मी प्रणाम करतो. मातृभाषा आपल्याला भूतकाळातून वर्तमानात आनते असे मत देखील त्यांनी यावेळी मांडले यावेळी ते म्हणाले की, लेखक जेव्हा सर्वसामान्य नागरिकाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही बाब समाजातील काही लोकांना रुचत नाही हे योग्य नाही. आपलं परखड मत समाजापुढे मांडल्यावर पूर्वी काही लोक दोषी मानत होते. आता तर देशद्रोही ठरविले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केले.साहित्य आणि राजकारण याच नातं काय हा प्रश्न नेहमीच उभा राहतो. मात्र साहित्य आणि राजकारण याच घनिष्ठ नातं आहे.पुढे प्रमुख पाहुणे जावेद अख्तर म्हणाले की लोकशाही व्यवस्थेसाठी कुठलाही बंधनात न वावरनारे अतिशय महत्वाचे असुन साहित्यिकांनी राजकारणाच्या दबावाला बळी पडू नये. त्यांनी मुक्तपणे साहित्य लिहावे असे मत त्यांनी व्यक्त केले. कुठल्याही कवि लेखककावर अन्याय होत असेल तर सर्व लेखकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. जो बात कहते डरते है सब तु वो बात लिखजो बात कहते डरते है सब तु वो बात लिखइतनी अंधेरी न थी रात पहले लिख- असे म्हणत जावेद अख्तर यांनी लेखकांना निर्भीडपणे लिहीण्यासाठी साद घातली.
मराठी साहित्य संमेलनात होणारे वाद टाळून, संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे- प्रा. कौतिकराव ठाले-पाटील
यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर येऊ शकले नाही याची उणीव भासत आहे. साहित्य महामंडळाने संहिता बदलली त्यातून नवीन अध्यक्ष निवडण्यात आले. या संमेलनात अध्यक्ष हजर राहू शकले यांनी यामुळे संमेलनास वेगळी किनार लाभली. त्यामुळे यापुढे अध्यक्ष निवडीबाबत विचार करावा लागणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.ते म्हणाले की, तरुण साहित्यिकांना बोलत करणं हा साहित्य संमेलनाचा प्रयत्न आहे.समाज स्थितीशील राहिला नाही गतिशील झाला आहे. हळुवार का होईना बदल होत आहे हा बदल समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.साहित्य संमेलनाच्या साहित्यिक मेजवाणीचा लाभ नागरिकांना घ्यावा विविध कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच नाशिकचं संमेलन इतकं वेठीस धरलं गेलं त्याचा मला खेद वाटतो. आपल्याला असलेल्या प्रश्नांची उत्तरे चर्चेतून मिळू शकतात. त्यामुळे वादविवाद टाळावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
पुणे- भाजपने आपल्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शहराचे केलेले विद्रुपीकरण, पायदळी तुडवीलेले सर्व नियम आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार व त्यांच्या प्रशासनाने घेतलेली ‘बघ्या ‘ ची भूमिका यावरूनच महापालिकेत सुरु असलेली भाजपची दादागिरी स्पष्ट होते असा आरोप करत आज राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपवर जोरदार टीका केली .
यासंदर्भात जगताप यांनी असे म्हटले आहे कि,’ पुणे महानगरपालिकेतील सत्ताधारी व राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी करण्यात आले. या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाबद्दल आम्ही भाजपचे अभिनंदन करतो तसेच शुभेच्छा देतो. परंतु, या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने जे नियम पायदळी तुडवले आहेत, पुणेकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे, त्याकडे मात्र अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. याचे उत्तर भाजपने पुणेकरांना देण्याची गरज आहे.पुणे महानगरपालिका परिसरात भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याबद्दल आम्ही भाजपचे अभिनंदन करतो व शुभेच्छा देतो. परंतु, या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपने महानगरपालिका परिसरात, महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर, महानगरपालिका इमारतीच्या चारही बाजूला होर्डिंग्स लावून या परिसराचे विद्रुपीकरण करण्याचे काम केले आहे. ज्या महानगरपालिकेत सत्तेत आहोत, त्या परिसरातील विद्रुपीकरण रोखणे तर दूरच उलट स्वत:च विद्रुपीकरण करण्यातच धन्यता मानणारा भाजप शहरातील विद्रुपीकरण कसे रोखणार, हा खरा पुणेकरांचा प्रश्न आहे. तसेच, भाजपकडून आपल्या परिसराचे विद्रुपीकरण केले जात असताना महानगरपालिका आयुक्त व प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असतील, तर यावरून महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपची दादागिरी आपल्या सहज लक्षात आल्याशिवाय राहत नाही. याबाबत ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणाऱ्या भाजपने थोडे अंतरंगात डोकावून पाहण्याची गरज आहे.तसेच, देशातील विविध राज्यांत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने प्रवेश केला आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात या नव्या व्हेरिएंटची धास्ती आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार हा व्हेरिएंट राज्यात प्रवेश करू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी काही निर्बंध घातले जात आहेत. मात्र, अशा परिस्थितीत भाजपने हा कार्यक्रम घेत एकप्रकारे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात घालण्याचाच प्रयत्न केला आहे. किंबहुना हा नवा व्हेरिएंट पुण्यात प्रवेश करणार नाही, याचे स्वप्न भाजप नेत्यांना पडले असावे, त्यामुळेच त्यांची वर्तणूक अशी बेफिकीरीची दिसून येत आहे. आधीच पुणेकरांना कोरोनामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागला असताना भाजप नेत्यांनी आपण या संकटात भर का टाकत आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे. ईश्वर भाजप नेत्यांना असा विचार करण्याची सद्बुद्धी देवो, असेही प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे .