Home Blog Page 2151

पॅनएक्स-21 (PANEX-21) चे पुणे येथे उद्घाटन

0

पुणे, 20 डिसेंबर 2021 

पॅनएक्स -21 (PANEX-21) हा एक बहु- राष्ट्रीय-बहु -संस्थांचा सहभाग असलेला  सराव 20 ते 22 डिसेंबर 2021 दरम्यान पुणे येथे आयोजित करण्यात आला असून बिमस्टेक  राष्ट्रांसाठी आपत्ती व्यवस्थापन बाबींमध्ये सामायिक क्षमता विकसित करणे हा याचा उद्देश  आहे. या सरावात भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड मधील  प्रतिनिधी आणि विषय तज्ञ उपस्थित आहेत.  

स्वयंसहाय्यता गटांना 1,000 कोटी रुपये पंतप्रधान करणार हस्तांतरित, सुमारे 16 लाख महिलांना होणार याचा लाभ

0

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 डिसेंबर 2021 ला प्रयागराजला भेट देणार असून सुमारे 2 लाख महिला  सहभागी होणार असलेल्या एका कार्यक्रमाला पंतप्रधान  उपस्थित राहणारा आहेत. 

महिला सबलीकरणासाठी  प्रामुख्याने उपेक्षित स्तरावरच्या महिलांना आवश्यक कौशल्ये,प्रोत्साहन आणि संसाधने पुरवत त्याद्वारे  महिला सबलीकरणासाठीच्या  पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला अनुसरत या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे.

महिलांना सहाय्य करणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान, स्वयंसहाय्यता गटांच्या बँक खात्यात  1,000 कोटी रुपये हस्तांतरित करणार असून  सुमारे 16 लाख महिलांना याचा लाभ होणार आहे. दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत हे हस्तांतरण करण्यात येणार असून  80,000 स्वयंसहाय्यता गटांना समुदाय गुंतवणूक निधी ( सीआयएफ) म्हणून प्रत्येकी  1.10 लाख रुपये आणि 60,000 स्वयंसहाय्यता गटांना फिरता निधी म्हणून प्रत्येकी 15,000 रुपये प्राप्त होणार आहेत.

या कार्यक्रमात 20,000 व्यवसाय समन्वयक सखींना (B.C – सखी) पहिल्या महिन्याचा 4,000  रूपयांचा स्टायपेंड पंतप्रधान हस्तांतरित करून त्यांना प्रोत्साहन देणार आहेत. या B.C सखी, तळाच्या स्तरावर दारापर्यंत वित्तीय सेवा पुरवण्याचे काम सुरु करताच  त्यांना सहा महिन्यासाठी 4,000 रुपयांचा स्टायपेंड देण्यात येतो. याद्वारे त्यांना कामात स्थैर्य  मिळून त्यानंतर त्यांच्या व्यवहाराद्वारे कमिशन मिळवण्याला त्यांची  सुरवात होईल.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेच्या  1 लाखाहून अधिक लाभार्थींनाही पंतप्रधान सुमारे 20 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करणार आहेत. या योजने अंतर्गत मुलींच्या जीवनातल्या विविध टप्यात  काही अटींसह रक्कम हस्तांतरित करण्यात येते. प्रती लाभार्थी 15,000 रुपये रक्कम हस्तांतरित करण्यात येते. मुलीच्या जन्माच्या वेळी (2000 रुपये ), एक वर्षाच्या सर्व  लसी पूर्ण झाल्यावर रुपये (1000 रुपये), पहिलीत प्रवेश केल्यानंतर (2000रुपये ), सहावीत प्रवेश केल्यानंतर (2000 रुपये ), नववीत प्रवेश केल्यानंतर (3000रुपये ), दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी/पदविका प्रवेशावेळी( 5000 रुपये ) असे याचे स्वरूप आहे .

पंतप्रधान पूरक पोषण संदर्भातल्या 200 हून अधिक उत्पादन युनिट्सची पायाभरणी करणार आहेत.स्वयं सहाय्यता गटांकडून या युनिट्सन निधी  दिला जात आहे  आणि  सुमारे 1 कोटी रुपये प्रती युनिट  खर्चून याचे बांधकाम केले जात आहे. ही युनिट एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत राज्याच्या 600  प्रभागाना  पूरक पोषण आहार  पुरवतील. 

बँकांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी – पालकमंत्री सतेज पाटील

0

कोल्हापूर: सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे.  नागरिकांच्या बचत ठेवींचे संरक्षण करण्यासाठी बँकांनी आपल्या तंत्रज्ञानात सुधारणा करण्याबरोबरच ठेवीदारांसाठी अभियानाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.

अग्रणी जिल्हा कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहामध्ये झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक हेमंत खेर, अग्रणी जिल्हा प्रबंधक गणेश शिंदे, भारतीय रिझर्व बँकेचे आर्थिक समावेशनचे व्यवस्थापक विश्वजीत करंजकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक रवी शिवदास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त याहया खान पठाण नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक आशुतोष जाधव, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक माने तसेच विभाग प्रमुख व जिल्ह्यातील सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक व महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक उपस्थित होते.

यावेळी नाबार्डद्वारे तयार केलेल्या संभाव्य वित्त आराखड्याच्या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तिकेमुळे जिल्हा अग्रणी बँकेला जिल्ह्याची वार्षिक पतपुरवठा योजना तयार करण्यास गती मिळेल, असे मत या वेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्यातील सर्व बँकांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना यांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना मिळवून द्यावा. शासकीय योजनांची माहिती देवून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या सहकार्याने अग्रणी जिल्हा बँकेने जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करावे. यात सर्व बँकांचे प्रतिनिधी, उद्योग व कंपन्यांचे प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी यांचा समावेश करावा. काही खासगी बँका नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देत नसल्याचे आढळून आल्याबद्दल पालकमंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली.

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, जिल्ह्यातील अन्य तालुक्यांसह आजरा, गगनबावडा, चंदगड, गडहिंग्लज, शाहुवाडी, भूदरगड, राधानगरी या दुर्गम तालुक्यात बचत गट, नोंदणीकृत शेतकरी उत्पादक गट तसेच संयुक्त जबाबदारी गट (जेएलजी) निर्माण करून या तालुक्यातील नागरिकांना प्राधान्याने लाभ मिळवून द्यावा. जेणेकरून येथील नागरिकांबरोबरच या भागाचा विकास साधता येईल. गायी-म्हैशींसाठी घेतलेल्या बँक कर्जावरील विम्याच्या हप्त्याची रक्कम कमी व्हावी, अशी मागणी बँक प्रतिनिधींनी केली असता यासाठी प्रस्ताव सादर करुन पाठपुरावा करण्याबाबत त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे तालुकानिहाय क्षेत्र, रब्बी व खरीप पिकाखालील क्षेत्र, उद्योग क्षेत्र यासह जिल्ह्यातील पशुधनाची तालुकानिहाय सविस्तर माहिती अद्ययावत करावी जेणेकरून जिल्ह्याची सद्यस्थिती कळेल व पुढील काळात जिल्ह्याच्या विकासासाठीचे नियोजन करणे सोपे होईल, असे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, बँकांनी उद्योग व कृषी क्षेत्रासाठी प्राधान्याने कर्ज पुरवठा करावा. तसेच बचत गटांना व्याज परतावा योजनेचा लाभ मिळवून द्यावा, असे सांगून शासनाच्या योजनांचा लाभार्थ्यांना चांगल्या प्रकारे उपयोग करुन द्यावा, असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, जिल्ह्यामध्ये 30 सप्टेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत 11 लाख 83 हजार 984 खाती उघडण्यात आली आहेत. 8 लाख 59 हजार 695 खात्यामध्ये रू-पे कार्ड प्रदान करण्यात आली आहेत. प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 6 लाख 18 हजार 977 खाती, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत 2 लाख 27 हजार 229, अटल विमा योजनेअंतर्गत 2021-22 मध्ये 8 हजार 581 खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजने अंतर्गत शिशू, किशोर, तरुण या सर्व योजनांमध्ये सप्टेंबर 2021 अखेर 53 हजार 540 लोकांना वित्त पुरवठा केला असून त्यांना 511 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या सर्व योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी  केले.

कोल्हापूर जिल्ह्याकरीता पीक कर्जाचे वार्षिक उद्दिष्ट  2 हजार 720 कोटी रुपयांचे देण्यात आले होते. त्यापैकी खरीप हंगामाकरिता 1 हजार 360 कोटी इतके उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. 30 सप्टेंबर 2021 अखेर 1 हजार 475 कोटी रुपये वाटप झाले आहे. खरीप हंगामासाठी 108 टक्के उद्दिष्ट पूर्तता झाली असून रब्बी हंगामाचे देखील उद्दीष्ट लवकर पूर्ण करण्याच्या सूचना  जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी  यावेळी  सर्व बँकर्सना केल्या.

वार्षिक पतपुरवठा आराखडा वर्ष 2021-22 चा आढावा घेताना अग्रणी जिल्हा प्रबंधक गणेश शिंदे म्हणाले, जिल्ह्याकरीता प्राथमिक क्षेत्रासाठी 10 हजार 210 कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 30 सप्टेंबर 2021 अखेर जिल्ह्याच्या एकूण उद्दिष्टापैकी 4 हजार 934 कोटी (48 टक्के वार्षिक) रूपये इतकी उद्दिष्टपूर्तता झाली आहे. जिल्हयामध्ये 30 सप्टेंबर 2021 अखेर 33 हजार 155 कोटी रूपयांच्या ठेवी आहेत तर जिल्ह्यात एकूण 25 हजार 876 कोटी रुपये  इतक्या कर्जाची शिल्लक आहे.

पीएम स्वनिधी योजनेंतर्गत जिल्ह्यात पथविक्रेत्यांना कर्ज वाटपाचे काम प्रगतीपथावर असून आज अखेर 9 हजार 788 अर्ज मंजूर करून आता पर्यंत 9 हजार 326 खात्यामध्ये 9.33 कोटी रुपये रक्कम वाटप केल्याचे अग्रणी जिल्हा प्रबंधक गणेश शिंदे यांनी  सांगितले.

सन 2022-23 करिता कोल्हापूर जिल्ह्याचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा (पीएलपी-2022-23) एकुण 10 हजार 725 कोटी रुपयांचा असून यामध्ये प्रामुख्याने शेती, शेतीपुरक क्षेत्रासाठी 4 हजार 941.57 कोटी, सूक्ष्म/लघु/मध्यम उद्योगांसाठी 4 हजार 070.38 कोटी आणि इतर प्राथमिक क्षेत्रासाठी  1 हजार 713.04 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत, अशी माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

मोरोक्को, कॉस्टरिका, अझरबैजान, नायजेरियाच्या राजदूतांनी भारतीय उद्योजकांना केले गुंतवणूक करण्याचे आवाहन

0

ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे ‘बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड’ व आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

पुणे : ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे (जीआयबीएफ) आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रावेळी मोरोक्को, कॉस्टरिका, अझरबैजान, नायजेरियाच्या राजदूतांनी भारतीय उद्योजकांना त्यांच्या देशात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. या देशांमध्ये उद्योग विस्ताराच्या मोठ्या संधी असून, तेथील पायाभूत सुविधा, नियम, उद्योगाच्या संधीविषयी मोरोक्कोचे राजदूत मोहम्मद मलिकी, कॉस्टरीकाचे राजदूत क्लॉडीओ अनसोरेना, अझरबैजानचे राजदूत डॉ. मोहम्मद मालिकी, नायजेरियाचे उच्चायुक्त अहमद सुले यांच्या वतीने ख्रिस्तोफर केके यांनी माहिती दिली. 
हिंजवडी येथील हॉटेल रमाडा प्लाझा येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे होत्या. यावेळी  ‘जीआयबीएफ’चे अध्यक्ष जितेंद्र जोशी, समन्वयिका दीपाली गडकरी आदी उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे व राजदूतांच्या हस्ते उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. उद्योगावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात चारही देशांच्या राजदूतांनी त्यांच्या देशातील उद्योगांच्या संधींविषयी माहिती दिली. 
चौघांचेही खास पुणेरी पगडी घालून स्वागत केल्यांनतर ते भारावून गेले. प्रसंगी मान्यवरांच्या ‘बिझनेस टायकून’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले. इंडिया-मोरोक्को बिझनेस अँड कल्चरल कौन्सिल, इंडिया-कॉस्टरिका बिझनेस अँड कल्चरल कौन्सिल, इंडिया-अझरबैजान बिझनेस अँड कल्चरल कौन्सिल, इंडिया-नायजेरिया बिझनेस अँड कल्चरल कौन्सिल या चार कौन्सिलची स्थापना करण्यात आली. व्यावसायिक, उद्योजक, चेंबर्स, विविध देशांचे दूतावास यांना एका व्यासपीठावर आणुन उद्योग क्षेत्राची प्रगती करण्याचा ‘जीआयबीएफ’चा उद्देश असल्याचे डॉ. जितेंद्र जोशी यांनी सांगितले. नीलकमल आंचन यांनी सूत्रसंचालन केले. दीपाली गडकरी यांनी आभार मानले.
“प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना पर्यावरण, हवामान बदल आणि शाश्वत विकासाच्या मुद्यांवरही आपण भर दिला पाहिजे. कार्बन उत्सर्जन थांबवण्याच्या प्रयत्नात सर्व घटकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम जागतिक स्तरावरील उद्योगांना एकत्रित आणून शाश्वत विकासासाठी पुढाकार घेत आहे,” असे प्रतिपादन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

मोहम्मद मलिकी यांनी भारतीय उद्योजकाना मोरोक्कोत उद्योग उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाते. व्यापाराच्या प्रक्रिया, प्रणाली सुलभ असून, तंत्रज्ञान, उत्पादन, ऊर्जा, ऑटोमोबाईल, मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स, हरित ऊर्जा क्षेत्रात चांगल्या संधी असल्याचे नमूद केले. कॉस्टरिका हे जगभरातील उद्योजकांसाठी एक नामांकित केंद्र बनत असल्याचे क्लॉडीओ अनसोरेना यांनी सांगितले.
डॉ. मोहम्मद मालिकी म्हणाले की, आयात-निर्यात, तसेच उत्पादन क्षेत्रातील उद्योगांसाठी अझरबैजान चांगला पर्याय आहे. येथे गुंतवणुकीसाठी उद्योजकांना सुलभ प्रक्रिया उपलब्ध आहे. पेट्रोलियम उत्पादनासाठी प्रसिद्ध नायजेरियामध्ये जागतिक स्तरावर व्यापाराच्या मोठ्या संधी असून, कृषी, तेल, गॅस, शिक्षण, उत्पादन, जलशुद्धीकरण क्षेत्रात गुंतवणुकीला वाव असल्याचे ख्रिस्तोफर केके यांनी सांगितले.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर. एन. कूपर सर्वसाधारण रुग्णालयाला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

0

मुंबई, दि. 20 : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर.एन.कूपर सर्वसाधारण रुग्णालयाला एम.एस (ऑर्थोपेडिक्स), एम.एस (ओटो-रिनो-लेनोरालॉजी), एम.डी. (फार्माकोलॉजी), एम.एस (ऑपथॅलमोलॉजी), एम.डी (ॲनेस्थेसिऑलॉजी) हे पाच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत मान्यता देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

या मान्यतेनुसार एम.एस (ऑर्थोपेडिक्स), एम.एस (ओटो-रिनो-लेनोरालॉजी), एम.डी. (फार्माकोलॉजी), एम.एस (ऑपथॅलमोलॉजी), एम.डी (ॲनेस्थेसिऑलॉजी) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अनुक्रमे 4,3,6,1 आणि 4 प्रवेशक्षमतेची परवानगी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने दिल्यानंतर शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात या दोन्ही रुग्णालयाला  प्रत्येक शाखेसाठी मंजूर प्रवेशक्षमतेनुसार प्रवेश देता येणार आहे

ऐश्वर्या बच्चन यांची दिल्लीतील ईडी कार्यालयात 5 तास झाली चौकशी

0

अमिताभ बच्चन यांनाही या प्रकरणी ईडी नोटीस देऊन बोलावणार असल्याच्या वृत्ताने खळबळ

नवी दिल्ली-आज बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला दिल्लीतील ईडी कार्यालयात बोलवण्यात आले होते. ऐश्वर्या दिल्लीतील लोकनायक भवन येथील ईडी कार्यालयात दुपारी दोन दरम्यान कार्यालयात हजर झाली होती. त्यानंतर तिची तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली असून, ईडीची चौकशी संपली आहे.जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियांना या चौकशीला सामोरे जावे लागल्याचे समजते आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आधीच प्रश्नांची यादी तयार केली होती. पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. या नेत्यांमध्ये अभिनेते, खेळाडू, व्यापारी अशा प्रत्येक वर्गातील प्रमुख व्यक्तींची नावे आहेत. या लोकांवर करचुकवेगिरीचा ठपका असल्याचे समजते आहे. याबाबत कर अधिकारी तपास करत आहेत.

महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनही तपासात झाला आहे सामिल
पनामा पेपर्स प्रकरणाची अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश केला आहे. या प्रकरणात महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनही ईडी कार्यालयात पोहोचला होता. त्याने ईडीच्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्रेही दिली आहेत. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच त्याचे वडील अमिताभ बच्चन यांनाही या प्रकरणी ईडी नोटीस देऊन बोलावणार आहे

बच्चन कुटुंबाचे नाव का?
2016 मध्ये, ब्रिटेनमध्ये पनामाच्या लॉ फर्मचे 11.5 कोटी टॅक्स डॉक्युमेंट लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. भारताबद्दल बोलायचे झाले तर जवळपास 500 जणांची नावे समोर आली होती. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश आहे. एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. यापैकी तीन बहामासमध्ये, तर एक व्हर्जिन आयलंडमध्ये होती. या 1993 मध्ये तयार करण्यात आल्या. या कंपन्यांचे भांडवल 5 हजार ते 50 हजार डॉलर्स दरम्यान होते, परंतु या कंपन्या त्या जहाजांचा व्यवसाय करत होत्या, ज्यांची किंमत कोट्यावधी होती.ऐश्वर्याला यापूर्वी एका कंपनीची डायरेक्टर बनवण्यात आले होते. नंतर तिला कंपनीची शेअर होल्डर डिक्लेयर करण्यात आले. कंपनीचे नाव अमिक पार्टनर्स प्रायव्हेट लिमिटेड होते. त्याचे मुख्यालय व्हर्जिन आयलँड्सवर होते. ऐश्वर्याव्यतिरिक्त वडील के. राय, आई वृंदा राय आणि भाऊ आदित्य राय हे देखील त्यांचे कंपनीत भागीदार होते. ही कंपनी 2005 मध्ये स्थापन झाली. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 2008 मध्ये ही कंपनी बंद पडली होती.

भरती परीक्षा गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे -आ.चंद्रकांतदादा पाटील

0

कोल्हापूर – राज्यातील सरकारी नोकरभरतीच्या पेपरफुटीची आणि परीक्षांमधील घोटाळ्यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी समर्थन केले. या घोटाळ्यांचे धागेदोरे राज्य सरकारपर्यंत जात असल्याने सीबीआयनेच याची चौकशी करणे योग्य ठरेल, असे ते म्हणाले.

कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, आरोग्य विभाग, म्हाडा आणि आता शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्यांचे धागेदोरे राज्य सरकारपर्यंत जात असल्याने त्याची चौकशी करण्यास त्याच्या वर असलेली संस्था पाहिजे. जे आरोपी तेच न्यायाधीश असे होऊ शकत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेली सीबीआय चौकशीची मागणी योग्य आहे. भाजपा ही मागणी लावून धरेल.

ते म्हणाले की, राज्यपालांनी सांगितल्या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक घ्यायची असते. पण महाविकास आघाडीने तीन वेळा अशी निवडणूक टाळली. या सरकारने राज्यपालांचे कुलगुरू नियुक्तीचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षणमंत्र्यांसाठी नवे पद निर्माण करून त्याचा दर्जा कुलगुरुंच्या वरती असावा असाही निर्णय या सरकारने घेतला. ज्या कारणांसाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते त्यापैकी आता कोणतेही बाकी नाही. तथापि, इंदिरा गांधी यांनी किंवा काँग्रेसने ज्या प्रकारे अनेकदा विविध राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली त्या पद्धतीने भाजपाचे नेतृत्व निर्णय घेत नाही.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्यातील उद्योग पळविल्याचा मोघम आरोप करू नये तर निश्चित माहिती दिली तर त्याचे उत्तर देता येईल, असे त्यांनी सांगितले.

पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करा या मागणीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर आगामी विधिमंडळ अधिवेशनात भाजपा आवाज उठवेल, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

जपानीज एन्सेफलिटीस लसीकरण मोहीम जानेवारीत राबवणार – सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास

0

मुंबई दि. २० : राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, वर्धा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांत जानेवारी महिन्यात जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केले. या चार जिल्ह्यांतील एक ते पंधरा वर्षांपर्यंतच्या सुमारे बावीस लाख एकशे तेवीस मुलांना ही लस दिली जाणार आहे.

जपानीज एन्सेफलिटीस प्रतिबंधात्मक लसीकरण जानेवारी महिन्यात केले जाणार आहे. मोहिमेची पूर्वतयारी करण्यासाठी राज्य कृती दलाची बैठक गोकुळदास तेजपाल रुग्णालयातील मंथन सभागृहात झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

या बैठकीस आरोग्य विभागाचे आयुक्त एन. रामास्वामी, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, नगरविकास विभाग उपसचिव विद्या हम्पया, ग्राम विकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी, सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव रा. भा. गायकवाड, सल्लागार डॉ. राजीव कुमार, डॉ. राज जोटकर आदी उपस्थित होते.

डॉ. व्यास यांनी सांगितले की, जपानीज एन्सेफलिटीस आजाराचा मृत्यूदर तीस टक्के आसपास आहे. आजारामुळे मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वरील चार जिल्ह्यांतील सर्व पात्र मुलांचे लसीकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जावेत.

डॉ. अर्चना पाटील यांनी लसीकरणाची गरज, मोहिमेसाठी केली जाणारी तयारी याबाबत माहिती दिली. डॉ.सचिन देसाई यांनी मोहिमेबाबतच्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

बैठकीस कक्ष अधिकारी सा. दा. मुकदाडवार, आदिवासी विभागाचे कक्ष अधिकारी स. श्री. खांडेकर, शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी आदी उपस्थित होते.

टीईटी परिक्षा घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत -विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0


मुंबई, दि. २० डिसेंबर- टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आज त्याच्या मेव्हण्याकडे आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडले असून ही धक्कादायक बाब आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून या परीक्षांमध्ये गोंधळ सुरु आहे. असा धक्कादायक प्रकार महाराष्ट्रात कधी झाला नव्हता, त्यामुळे या गंभीर प्रकरणाची प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी आणि याप्रकरणाचे धागेदोरे मंत्रालयपर्यंत पोहोचले आहेत का याचा लेखाजोखा जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे. या सरकारचे वसुली करणे हाच एकमेव कार्यक्रम सध्या सुरु आहे. ज्या परिक्षा विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवितात त्याचमध्ये जर भ्रष्टाचार होत असतील तर सरकारने त्याचे प्रायाश्चित घेतले पाहिजे. अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना केली.

‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत मूल्यसाखळी वाढविण्याचा प्रयत्न करा-कृषी मंत्री दादाजी भुसे

0

पुणे दि.२०: बाळासाहेब ठाकरे कृषी व्ययसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत (स्मार्ट) शेतकरी कंपन्यांनी महिला सभासदांना पूर्णतः सहभागी करून पारदर्शकपणे व्यवहार करावे आणि मूल्यसाखळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत अल्पबचत भवन येथे आयोजित अहमदनगर, पुणे व सोलापूर येथील प्रथम टप्प्यात मंजूर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषी आयुक्त तथा प्रकल्प संचालक धीरज कुमार उपस्थित होते.

श्री.भुसे म्हणाले, शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. शेतमालाची गुणवत्ता वाढविण्याचीदेखील गरज आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येत आहे. शेतकरी कंपन्यांनी तो यशस्वी केल्यास इतर शेतकऱ्यांनाही त्यातून प्रेरणा मिळेल. प्रकल्पातून मिळणारा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत जाईल याची दक्षता घ्यावी आणि प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले, एकेकाळी देशाला महाराष्ट्राने सहकाराची संकल्पना दिली. सहकार क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी सहकाराचे तत्व रुजवले आणि अनेक संस्था यशस्वीपणे उभ्या केल्या. याच धर्तीवर शेतकरी कंपनी स्थापित करून त्याचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी ‘स्मार्ट’ प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. शेतकरी संघटित झाले आणि प्रकल्पाची साखळी उभी राहिली तर मोठ्या उद्योजकांशी स्पर्धा होऊन शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो.

शेतकरी कंपनीच्या माध्यमातून नव्या कल्पना पुढे येत आहेत. बाजारात मागणीपेक्षा उपलब्धता जास्त झाली तर दर कमी होतात. अशावेळी साठवणूक करून दर वाढल्यावर बाजारात उपलब्ध केल्यास जास्त लाभ मिळतो. त्यासाठी साठवणूक सुविधा, प्रतवारी, शीतगृह, शेतमालावर प्रक्रिया, पॅकेजिंग आदी बाबींचा विचार या योजनेत केला आहे. पुढील वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याने कंपनीत ३० टक्के महिला संचालकांची अट ठेवण्यात आली आहे, असे श्री.भुसे यांनी सांगितले.

धीरज कुमार म्हणाले, प्रकल्पासाठी सुरुवातीस ५ हजार प्रस्ताव प्राप्त झाले, त्यापैकी ५०० प्रकल्पांची निवड पहिल्या टप्प्यात करण्यात आली. शेतकरी उत्पादक कंपन्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. शेतकऱ्यांनी मूल्य साखळीची ओळख करून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतकरी संघटित झाल्यास त्याला जास्त लाभ मिळविता येईल.

उत्पादनाची गुणवत्ता चांगली असल्यास बाजार मिळणे शक्य होते. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. शासकीय मदतीसोबत शेतकरी कंपनीत पारदर्शकता आणि सर्वांचा समान सहभाग महत्वाचा आहे. राज्यातून अनेक यशस्वी शेतकरी कंपन्या तयार होण्यासाठी कृषी विभागातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे यांनी ‘स्मार्ट प्रकल्पाची ओळख व मूल्यसाखळी विकास’, आत्माचे संचालक किसान मुळे यांनी ‘स्मार्ट व प्रकल्प अहवाल तयार करणे’ आणि ‘स्मार्ट’ समन्वयक जीवन बुंदे यांनी प्रकल्पासंबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे याबाबत मार्गदर्शन केले.

विभागीय सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेविषयी माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.

कार्यशाळेला ‘स्मार्ट’ प्रकल्पात सहभागी १११ संस्था आणि  शेतकरी उत्पादक गटातील सदस्य, महिला प्रतिनिधी तसेच त्या संस्थांचे नोडल अधिकारी व खरेदीदार आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ठळक वैशिष्ठ्ये

  • प्रत्येक शेतकरी कंपनीकडून एक महिला प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले होते, अशा ६० महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
    *कार्यशाळेचे उद्घाटन करण्याचा मान मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांना दिला.
    *स्वतःचे स्वागत स्वीकारण्याऐवजी श्री.भुसे यांनी प्रत्येकी दोन महिला व पुरुष शेतकऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि त्यांना मंचावर स्वतःशेजारी बसविले.

राज्यस्तरीय महिला शेतकऱ्यांचे चर्चासत्र

0

महिला शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील: कृषी मंत्री दादाजी भुसे

पुणे दि.२०: राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या दूर करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदल करण्यात येतील. महिला शेतकरी आणि शेतमजूर यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

राज्य शासनाच्यावतीने २०२२ हे महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून साजरे केले जाणार असून त्याअंतर्गत धोरणनिश्चितीसाठी राज्यस्तरीय महिला शेतकऱ्यांचे चर्चासत्र कृषी आयुक्तालयातील पद्मश्री सभागृहात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रंसगी कृषी आयुक्त धीरज कुमार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, ‘बायफ’च्या प्रकल्प संचालक राजश्री जोशी, कृषीरत्न महिला शेतकरी सुनंदा सालोटकर आदी उपस्थित होते.

श्री.भुसे म्हणाले, शेतीतील कल्पक तसेच नवीन प्रयोगांची माहिती महिला शेतकऱ्यांना व्हावी यासाठी ‘आत्मा’मार्फत शेतपाहणी, कृषी सहलींसाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद केली जाईल. जेणेकरुन त्यातून महिलांना नवीन प्रयोगांसाठी प्रोत्साहन मिळू शकेल. महिला शेतकरी, शेतमजुरांसाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांमध्ये ३० टक्के प्रमाण राखीव असून कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगामध्येही महिलांसाठी ३० टक्के राखीव प्रमाण ठेवण्यात येईल.

महिला शेतकऱ्यांनी पिकवलेला कृषीमाल, प्रक्रिया केलेले पदार्थ आदी ग्राहकांना प्राधान्याने मिळावेत यासाठी महिलांच्या स्टॉलला अग्रक्रमाचे ठिकाण देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. महिलांकडून निर्मित पदार्थ, कृषीमालाला ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु. जिथे जिथे शासकीय जागा असेल तेथे शेतमाल विक्रीसाठी शेतकरी, महिला शेतकरी, बचत गट यांना प्राधान्य दिले जाईल.

महिलांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ७/१२ वर महिलांचे नाव असणे गरजेचे असून महिलांचे नाव लावण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. शासनाने ७/१२ वर महिलांचे नाव लावण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. शेती व्यवसायाशी निगडीत क्षेत्रात महिलांना संधी देण्याची शासनाची भूमीका आहे. शेतकरी आणि शेतमजूर महिलांचा सन्मान तसेच त्यांचा शेतीतील सहभाग वाढविण्यासाठी हे चर्चासत्र उपयुक्त ठरेल असेही श्री. भुसे म्हणाले.

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत बोलताना ते म्हणाले, पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा, उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचनासाठी राज्य शासनाने ८० ते ८५ टक्के अनुदान देण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. ‘विकेल ते पिकेल’ या योजनेला अधिक गती देण्यासाठी शेतमालाचे मूल्यवर्धन, ग्रेडींग, पॅकेजींग तसेच निर्यातीसाठीची प्रक्रिया, थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची व्यवस्था याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यात ३५० अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असून त्यानंतर ते संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक ते सर्व सहाय्य करतील.

शेतीच्या सुधारणेसाठी बाजारव्यवस्था निर्माण करणे, कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडित राज्य शासन, केंद्र शासनाच्या पोकरा, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आदी सर्व योजना एकाच छताखाली आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.

सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणासाठी कृषी विभागाची एक स्वतंत्र शाखा तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्याअंतर्गत सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण कमीत कमी खर्चात होईल याकडे लक्ष देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

२ हजार ४५० कोटी रुपयांची पिकविम्याची नुकसान भरपाई
अवकाळी पाऊस, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले शेतकऱ्यांची नुकसानभरपाईसाठी राज्य शासन सर्व ते प्रयत्न करत असून शेतकरी, राज्य शासन आणि केंद्र शासनाचा हिस्सा मिळून एकूण २ हजार ३१४ कोटी रुपये विम्याचा हप्ता म्हणून कंपन्यांना दिले होते. त्या बदल्यात आतापर्यंत राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे विमा कंपन्यांकडून २ हजार ४५० कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे, अशी माहितीही कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिली.

यावेळी कृषी आयुक्त धीरज कुमार म्हणाले, महिला शेतकरी अत्यंत कल्पक आहेत. त्या खूप कष्टातून पुढे आल्या आहेत. शेतीमध्ये ७०-८० टक्के महिला काम करतात परंतू त्यांच्या नावावर प्रत्यक्षात २० टक्क्यांच्या आसपास शेती आहे. हे चित्र बदलले पाहिजे.

या कार्यशाळेत दूरदृष्यप्रणालीद्वारे कृषी सचिव एकनाथ डवले, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) प्रकल्प संचालक इंद्रा मालो, नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, भुवनेश्वर येथील आयसीएआर-इन्स्टिट्यूट वूमन इन ॲग्रीकल्चरच्या प्रकल्प संचालक डॉ. चैत्राली म्हात्रे, बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे आदी सहभागी झाले.

इंद्रा मालो, राहिबाई पोपेरे, डॉ. चैत्राली म्हात्रे, राजश्री जोशी, सुनंदा सालोटकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात राज्यभरातील महिला शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त करुन शेतीसंबंधी अनुभव सांगितले तसेच महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

जातीच्या दाखल्यासाठी विशेष मोहीम

0

पुणे दि.20: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मागासवर्गीय प्रवर्गातील एक लाख विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जातीचा दाखला मिळवून देण्यात येणार आहे.

या मोहिमेअंतर्गत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २० ते ३१ डिसेंबर या काळात जातीचे दाखले मिळण्यासाठी सर्व शिक्षण संस्थांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.
000

आता मतदान कार्डाला आधारकार्डशी जोडणे बंधनकारक- कायदा लोकसभेत आज मंजूर;ठेकेदारांसाठी नागरी छळवादाचा आरोप

0

आधार कार्डे नाहीत पण मतदार कार्डे आहेत अशांचा मतदानाचा अधिकार हिरावणार

नवी दिल्ली -निवडणूक संशोधन विधेयक 2021 हा कायदा लोकसभेत आज मंजूर करण्यात आला आहे. निवडणूकीत बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी या कायद्यांतर्गंत आता मतदान कार्डाला आधार कार्ड लिंकची तरतुद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडाळाने गेल्या आठवड्यात बुधवारी निवडणूक संशोधन कायद्याला मंजूरी दिली होती.दरम्यान आधार कार्ड भाजपा सरकारच्या अगोदर घेतलेला निर्णय असला तरी आधार कार्ड करणे ते अन्यत्र जोडणे ,या सह कागदपत्रे करणे असली जिकिरीची कामे केवळ ठेकेदारांच्या भल्यासाठी सुरु असलेला नागरी छळवाद असल्याचा आरोप होतो आहे. एक तर लोकांना नौकरी ,काम धंदा द्यायचा नाही आणि अशा अटी शर्तीत त्यांना जाचक कारभार करयचा यामुळे खऱ्याखुऱ्या भारतीयांना नाहक मनस्ताप भोगावा लागतो आहे .

दरम्यान कायदा मंत्री किरण रिजिजू आज लोकसभेत एक बिल पास केले आहे. ते म्हणाले की, या कायद्याला विरोध करण्यासाठी सदस्यांनी दिलेली कारणमीमांसा म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच असल्याचे किरण रिजिजू म्हणाले.


निवडणूक संशोधन विधेयकाला अनेक पक्षांनी विरोध दर्शवला आहे. त्यात काँग्रेस आघाडीवर असून, त्यापाठोपाठ तृणमूल, एमआयएम, आरएसपी, बसपा अशा काही पक्षांनी या कायद्याला विरोध केला आहे. हे विधेयक विचारार्थ संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. विरोधी पक्षांनी याला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध असल्याचे म्हटले आहे. तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे आणि गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन भाजपकडून केले जात असल्याचा देखील आरोप केला जात आहे.


मतदार यादी अधिक पारदर्शक व्हावी आणि बनावट मतदार काढून टाकता यावेत यासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याची शिफारस केली होती. मतदार ओळखपत्राशी आधार लिंक केल्याने एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्र ठेवता येणार नाही.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाला साजेसे स्मारक भव्यदिव्य स्वरुपात उभारावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई, दि. २० :- वढु बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वत: मंजुरी दिली. छत्रपती संभाजी महाराजांचे साकारण्यात येणारे स्मारक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे, भव्य दिव्य असले पाहिजे. या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन, त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या वढु बुद्रुक ता. हवेली, जि. पुणे येथील स्मारकाच्या उभारणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अशोक पवार, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, ग्राम विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव (व्हीसीद्वारे), जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (व्हीसीद्वारे), पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (व्हीसीद्वारे), पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख (व्हीसीद्वारे), वढूचे माजी सरपंच अनिल शिवले, अंकुश शिवले उपस्थित होते.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्राची अस्मिता आहेत. स्वराज्याच्या रक्षणासाठी, विस्तारासाठी त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे स्मारक वढु बुद्रुक येथे उभारण्यात यावे. हे स्मारक उभारताना त्याला ‘हेरिटेज’ टच असावा, स्मारकाचे काम करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या समकालीन वास्तूरचनांचा आधार घ्यावा. वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी, त्यावर नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी लाखो नागरिक येतात. येथे दर्शनासाठी येणाऱ्या चाहत्यांची योग्य सोय व्हावी, याची काळजी घेण्यात यावी. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपून परिसराच्या विकासाचे काम, सर्वांच्या संमतीने, सर्वांना सोबत घेऊन भव्यदिव्य स्वरुपात करण्यात यावे. या स्मारकाची उभारणी भव्यदिव्य करण्यासाठी स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात यावी. या क्षेत्रातील तज्ञ मंडळी तसेच सर्वसामान्यांकडून येणाऱ्या चांगल्या सूचनांचे स्वागत करुन त्याचा अंतर्भाव सुधारित आराखड्यात करण्यात यावा. स्मारक उभारणीचे काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन सर्वांना विश्वासात घेऊनच काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

खराडीमध्ये अपार्टमेंटच्या दोन इमारतींमध्ये तब्बल ९१ लाख रुपयांची वीजचोरी; गुन्हा दाखल

0

पुणे: घरगुती व वाणिज्यिक इमारतींच्या बांधकामांसाठी दिलेल्या वीजजोडण्यांची महावितरणकडून नियमित तपासणी सुरु आहे. या तपासणीमध्ये खराडी येथे बांधकाम सुरु असलेल्या गॅलेक्झी अपार्टमेंटमधील दोन इमारतींसाठी अनधिकृत केबलद्वारे थेट वीजपुरवठा घेऊन सुरु असलेली तब्बल ९१ लाख ३५ हजार ३४५ रुपयांची वीजचोरी शुक्रवारी (दि. १७) महावितरणच्या पथकाने उघडकीस आणली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, नगररोड विभाग अंतर्गत वडगाव शेरी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिलीप मदने यांच्यासह सहायक अभियंता सचिन पुंड व अस्मिता कोष्टी तसेच जनमित्र गणेश सुरसे व विठ्ठल कोकाटे यांच्या पथकाने शुक्रवारी खराडी परिसरात बांधकाम सुरु असलेल्या काही इमारतींच्या वीजजोडण्यांची तपासणी केली. यामध्ये इऑन आयटी पार्कजवळील गॅलेक्झी वन व टू या अपार्टमेंटच्या बांधकामासाठी दिलेल्या वीजजोडणीची तपासणी करण्यात आली. खराडी येथील रोशन रमेश दुसाने या ग्राहकाच्या नावे महावितरणकडून तीन फेज व १४ किलोवॅट क्षमतेची ही वीजजोडणी देण्यात आली आहे. पथकाच्या तपासणीमध्ये मात्र या वीजजोडणीच्या सहाय्याने आणखी ४० मीटर लांबीची एक अनधिकृत केबल टाकून गॅलेक्झी वन व टू या इमारतींसाठी विजेची मोठी चोरी सुरु असल्याचे निदर्शनास आले. या अपार्टमेंटच्या दोन्ही इमारतींचे बांधकाम पूर्णत्वास गेले असून दोन्ही इमारतींमधील सुमारे ३० फ्लॅटमधील रहिवासी, कॉमन वापरासाठी पाण्याच्या मोटर्स, दोन लिफ्टस्, पार्किंग लाईट इत्यादींसाठी वीजचोरी सुरु असल्याचे व त्यासाठी कोणतीही अधिकृत व स्वतंत्र वीजजोडणी घेतलेली नाही असे तपासणीमध्ये आढळून आले.

महावितरणने वीजचोरीच्या प्रकाराचा पंचनामा करून वीजचोरीसाठी वापरण्यात आलेली केबल व इतर साहित्य जप्त केले. पंचनाम्यानंतर अनेक फ्लॅटस्, लिफ्ट, पाण्याची मोटर व इतर कारणांसाठी एकूण २,११,४३३ युनिटची म्हणजे ९१ लाख ३५ हजार ३४५ रुपयांची वीजचोरी झाल्याचे आढळून आले. गॅलेक्झी अपार्टमेंटमधील वीजचोरीच्या प्रकाराची पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत तसेच कार्यकारी अभियंता श्री. अशोक जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली. या वीजचोरी प्रकरणी महावितरणकडून तक्रार दाखल केल्याप्रमाणे चंदननगर पोलीस ठाण्यात वीजजोडणीधारक रोशन रमेश दुसाने या ग्राहकाविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५, १३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.