Home Blog Page 2140

माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचे रिव्हॉल्व्हर चोरीला गेल्याने खळबळ

0

पुणे-माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष,पुणे रमेश बागवे (Pune Congress President Ramesh Bagwe) यांच्या कारचा दरवाजा बनावट चावीने उघडून त्यातील एक लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर अज्ञात चोरट्याने (Revolver Theft) चोरुन (Pune Crime) नेले.यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.पुणे कॅणटोंमेंट विधानसभा मतदार संघाचे बागवे हे माजी आमदार आहेत . अगदी थोड्या मतांनी गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला मात्र या मतदार संघासह पुण्यात कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातही मातंग समाजाचे वरिष्ठ नेते म्हणून ते परिचित आहेत .

याप्रकरणी रमेश बागवे (Ramesh Bagwe) यांनी खडक पोलीस (Khadak Police Station) ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोहियानगर, गंज पेठ (Lohiyanagar, Ganj Peth) ते भवानी पेठेतील (Bhawani Peth) अरुणकुमार वैदय स्टेडियम (Arunkumar Vaidya Stadium Pune) दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे. नेमका चोरीचा हा प्रकार कसा घडला, याबाबत बागवे यांना समजू शकलेले नाही. त्यांनी आपले रिव्हॉल्व्हर (Revolver) कारमधील ड्रायव्हर सीटचे शेजारील सीटच्या मागील कप्प्यामध्ये ठेवले होते. चोरट्याने बागवे यांच्या कारची बनावट चावी तयार करुन किंवा कारचा दरवाजा उघडून कारमधील सीटमागील कप्प्यात ठेवलेले 1 लाख रुपयांचे रिव्हॉल्व्हर चोरुन (Pune Crime) नेले. खडक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

माजी गृह राज्यमंत्री बागवे यांच्या कारमधून रिव्हॉल्व्हर चोरीला गेल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली असून पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.

सिद्धार्थ-कश्यपसोबत स्पृहाची टेस्टी ‘कॅाफी’

0

जिच्या केवळ सुगंधानंच मन प्रफुल्लीत होतं, शरीराला आलेला थकवाही परागंदा होतो ती म्हणजे कॅाफी… पूर्वीपेक्षा आजच्या जनरेशनमध्ये कॅाफी वेगवेगळ्या कारणांमुळं पॅाप्युलर आहे. कॅाफीचा सुगंध, फेसाळता भलामोठा कॅाफी मग, मोठ्या कलाकुसरीनं त्यात चितारलं जाणारं बदामाचं पान-डिझाईन्स आणि जिवलग व्यक्तीचा सहवास… म्हणजे अर्थातच डेट असं काहीसं तरुणाईमध्ये कॅाफीचं समीकरण बनलं आहे. १४ जानेवारीला रसिकांना चित्रपटगृहांमध्ये कॅाफी’चा स्वाद चाखायला मिळणार आहे. गोड चेहऱ्याची आणि कवी मनाची अभिनेत्री अशी ओळख असणारी स्पृहा जोशी रसिकांसाठी लज्जतदार कॅाफी’ घेऊन आली आहे. तिच्या जोडीला आहेत सिद्धार्थ चांदेकर आणि कश्यप परुळेकर… त्यामुळं प्रत्येकालाच या कॅाफी’ची चव चाखण्याचा मोह नक्कीच होणार आहे.

‘तन्वी फिल्म्स’ची प्रस्तुती असलेल्या कॅाफीची निर्मिती कैलास सोरारी आणि विमला सोरारी यांनी केली असून  या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केलं आहे. आजवर नेहमीच विविधांगी विषयांवर चित्रपट बनवणारे नितीन यावेळी प्रेक्षकांसाठी लज्जतदार कॅाफी’ घेऊन आले आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना अनोखी प्रेमकथा पहायला मिळणार आहे. प्रेम आणि कॅाफीचा सुखद संगम या चित्रपटाच्या निमित्तानं घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कॅाफी जशी थोडी गोड, थोडी कडवट असते तशीच लव्हस्टोरीही असते. प्रेमाची अनुभूती झाल्यावर येणारी जवळीक, एकमेकांची ओढ, तास न तास चालणाऱ्या गप्पा, एकमेकांबाबत जाणून घेण्याची उत्सुकता ही प्रेमाची गोड बाजू मानली, तर द्विधा मन:स्थिती, छोटया मोठया कुरबुरी आणि प्रेमातील अडथळ्यांसारख्या कडवट बाजूही अनुभवायला मिळतात. याच कारणांमुळं कॅाफी’ हा चित्रपट आजवर पाहिलेल्या प्रेमकथांपेक्षा एक वेगळी लव्हस्टोरी सांगणारा ठरणार आहे. त्यामुळंच ‘इट्स नॅाट अ लव्ह स्टोरी… इट्स अ स्टोरी ऑफ लव्ह…’ असं ‘कॉफ़ी’ चित्रपटाचं वर्णन सार्थ ठरेल. या चित्रपटात उत्साही, हरहुन्नरी आणि नेहमी प्रसन्न असणारा सिद्धार्थ दिसेल. कश्यपनं साकारलेल्या कॅरेक्टरचा स्वभाव मात्र काहीसा गंभीर आणि समजूतदार असल्याचं पहायला मिळेल. या दोघांना सांभाळून घेणारी लव्हेबल स्पृहा या चित्रपटाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे.

कथा-पटकथा मच्छिंद्र बुगडे यांनी लिहीली असून, मच्छिंद्र यांनीच नितीन यांच्या साथीनं संवादलेखनही केलं आहे. नितीन यांनी अशोक बागवे यांच्यासोबत या चित्रपटासाठी गीतलेखनही केलं असून, त्यांना तृप्ती चव्हाण यांनी संगीतसाज चढवला आहे. आय. गिरीधरन यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे, तर संकलन राहुल भातणकर यांचं आहे. हरिश आईर यांनी कलादिग्दर्शनाची, तर संजय कांबळे यांनी कार्यकारी निर्मात्यांची जबाबदारी चोख बजावली आहे.

१४ जानेवारीला या लज्जतदार कॉफीचा आस्वाद चित्रपटगृहांत घेता येणार आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण

0

प्रवरानगर – भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचे जेष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नात देखील उपस्थिती लावली होती. तर नुकतेच पार पडलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील विखे पाटलांनी हजेरी लावली होती. आज त्यांनी कोरोना चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन देखील विखे यांनी केले आहे.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी ट्विट करत सांगितले आहे की, आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोविड टेस्ट करावी व काळजी घ्यावी. असे ट्विट विखे यांनी केले आहे.


कालीचरणला अखेर बेड्या पडल्या …

0

महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महाराज म्हणविणाऱ्या कालीचरणला अखेर आज अटक करण्यात आली आहे. कालीचरणविरोधात महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कालीचरणला अटक करण्यात आली. छत्तीसगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई झाली.

काही दिवसांपूर्वी रायपूर येथे झालेल्या धर्मसंसद कार्यक्रमात कालीचरणने राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे कौतुक केले होते. या वक्तव्यावरुन कालीचरण महाराजाविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतरही महाराजाने आपले वादग्रस्त वक्तव्य करणे सुरुच ठेवले होते.

रायपूर, अकोला आणि पुण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून छत्तीसगड पोलिसांकडून कालीचरणचा शोध सुरु होता. त्यासाठी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातही छत्तीसगड पोलिसांनी शोध घेतला होता. त्यानंतर खजुराहो येथील बागेश्वर धाम येथील एका घरातून कालीचरणला अटक करण्यात आली.

कोण आहे कालीचरण आठवी पर्यंतच झाले शिक्षण

छत्तीसगढची राजधानी रायपुरमध्ये धर्मसंसद कार्यक्रमाच्या दरम्यान राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या विरुद्ध अपशब्द बोलणारे कालीचरण महाराष्ट्रातील अकोल्यातील शिवाजीनगर या भागात राहतात. कालीचरणचे खरे नाव अभिजीत धनंजय सराग असे असुन तो भावसार समाजाचा आहे. एका साधारण कुंटुंबात जन्मलेल्या अभिजीत सराग यांचे वडिल धनंजय सराग यांचे अकोल्यातील जयन चौक या परिसरात एक मेडिकल शॉप होते.48 वर्षीय कालीचरण महाराज यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. विशेष म्हणजे महाराजांचे शिक्षण फक्त आठवीपर्यंत झाले आहे. त्यांच्या नातेवाईकांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी शालेय शिक्षण कमी घेतले असले तरीही त्यांनी धार्मिक शिक्षण मोठ्या प्रमाणात घेतले आहे

मराठीसह हिंदीवर देखील चागंले प्रभूत्व

कालीचरण महाराज यांचे कुंटुंब गरीब असल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना इंदूर येथे आपल्या मावशीकडे पाठवले होते. त्यामुळे महाराजांचे मराठी सोबतच हिंदीवर देखील चांगले प्रभूत्व आहे.

इंदूरमध्ये अनेक वर्ष भय्यूजी महाराजांसोबत राहिले
इंदूरमध्ये असल्याकारणाने कालीचरण हे भय्यूजी महाराज यांच्या आश्रमामध्ये जायचे, जेणेकरुन कालीचरण आणि भय्यूजी महाराज यांच्यात चागंली मैत्री झाली. या आश्रमातून कालीचरण यांनी महाराज ही उपमा मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या काही वर्षातच ते मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले.

कालीचरण आपल्या कपाळावर नेहमी लाल ठिपका लावतात. कालीचरण नेहमी आपले केस उघडे ठेवतात आणि कपाळावर एक मोठा लाल ठिपका ठेवतात. ते सहसा लाल रंगाचे कपडे घालतात. सोशल मीडियावर त्यांच्या नावाने अनेक पेजेस तयार करण्यात आली असून त्यांचे लाखो फॉलोअर्स देखील आहेत.

निवडणुकीच्या रिंगणात महाराज
कालीचरण 2017 साली अकोलामध्ये नगरपालिका निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत महाराजांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर या महाराजांनी पुन्हा 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय़ घेतला होता. मात्र काही कारणास्तव त्यांनी निवडणूक लढवली नाही.

शिव तांडव स्त्रोतपासून चर्चेत
कालीचरण महाराज दरवर्षी अकोल्यात होणाऱ्या कांवड़ जत्रेत भाग घेतात. गेल्या वर्षी महाराजांनी मध्य प्रदेशात शिव तांडव स्त्रोत म्हटले होते. तेव्हापासून कालीचरण महाराजांना प्रसिद्धी मिळाल्याचे समजते. शिव तांडव गायिलेला तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी देखील कालीचरण महाराजांचा तो व्हिडिओ शेअर केला होता.

डॉ. शर्वरी इनामदार यांना आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत चार सुवर्ण

0

इस्तांबुल (टर्की) येथील आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धा ः महिलांच्या ५७ किलो गटात (खुल्या) कामगिरी 

पुणे : इस्तांबुल (टर्की) येथे सुरू असलेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी चार सुवर्णपदक पटकाविले. ३८ वर्षीय डॉ. शर्वरी यांनी महिलांच्या ५७ किलो गटात (खुल्या) कजाकिस्तान वर मात करत ही कामगिरी केली. त्यांनी स्क्वॅटमध्ये १३० किलो वजन उलचून अव्वल क्रमांक पटकावला. यानंतर बेंच प्रेसमध्ये ७० किलो वजन उचलून बाजी मारली. डेडलिफ्टमध्ये १५० किलो आणि एकूण ३५० किलोसह सुवर्णयश मिळवले.
यापूर्वी गोव्यातील मडगाव येथील श्री मनोहर पर्रिकर इन्डोअर स्टेडियममध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी ५७ किलो गटात ब्रेंच प्रेसमध्ये ७० किलो उचलून सुवर्णपदक पटकाविले होते. या स्पर्धेतूनच त्यांची आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली होती. डॉ. इनामदार या त्यांचे पती वैभव इनामदार यांच्या सोबत सराव करतात. तसेच आहार आणि व्यायाम कसा असावा याची तयारी त्या स्वतःच करतात.
डॉ. शर्वरी इनामदार म्हणाल्या, ‘आशियाई स्पर्धेसाठी भरपूर मेहनत केली होती. मागील तीन वर्षे कसून सराव केल्यानंतर मिळालेल्या मेहनतीचे हे फळ आहे. सामान्य महिला देखील आपल्या व्यवसाय आणि घर सांभाळून आवडत्या क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करू शकतात. त्यामुळे महिलांनी मर्यादित न राहता स्वतःच्या क्षमता जाणून घेऊन पुढे यावे.’
वैद्यकीय व्यवसायात नावलौकिक मिळवणाऱ्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी पॉवरलिफ्टिंगमध्ये देखील स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कुटुंबातील दैनंदिन कामे, रुग्णांची देखभाल अशा रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून त्यांनी सलग चार वेळा ‘स्ट्राँग वूमन’ हा किताब जिंकला आहे. अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळविले आहे. शिवाय २०१८मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक जिंकले आहे.

कालीचरण सह भाजपच्या माजी नगरसेवकावर पुण्यात गुन्हा दाखल

0

पुणे-भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे केल्याप्रकरणी तथाकथित कालिचरण महाराज आणि भाजपाचे माजी नगरसेवक आणि समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह सहा जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.मिलिंद रमाकांत एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक बाबूलाल नागपुरे, कालिचरण (रा. अकोला), कॅप्टन दिगेंद्रकुमार (रा. राजस्थान), नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. खडक पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सोमनाथ दादा ढगे यांनी याबाबत फिर्याद दिली. १९ डिसेंबर रोजी शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानात हा कार्यक्रम आयोजित केला होता. समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे शिवप्रतापदिन आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी हजर राहून आरोपींनी मुस्लीम व ख्रिश्चन धर्माच्या नागरिकांच्या भावना दुखावल्या जातील. तसेच, धार्मिक श्रद्धांचा अपमान व हावभाव करून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, असे भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे केली.
सूत्रसंचालन करताना नंदकिशोर एकबोटे यांनी इतरांच्या भाषणांचा त्यांच्या बोलण्यात पुन्हा थोडक्यात उल्लेख करून तेथे जमलेल्या लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आरोपींनी केलेल्या भाषणाच्या क्लिपची पडताळणी केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. खडक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गाडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

भारतीय लष्कराने मध्यप्रदेशातल्या महू इथे उभारली क्वांटम प्रयोगशाळा

0

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2021

नव-नव्या तंत्रज्ञान डोमेन क्षेत्रात भारतीय लष्कर स्थिर तरीही लक्षणीय प्रगती करत आहे. राष्ट्रीय सुरक्षा सचिवालय  परिषदेच्या (एनएससीएस) च्या सहकार्याने लष्कराने मध्य प्रदेशातल्या महू इथे टेलीकम्युनिकेशन इंजिनीयरिंग लष्करी महाविद्यालयात, क्वांटम प्रयोगशाळा उभारली आहे. या विकसित होणाऱ्या महत्वाच्या क्षेत्रात संशोधन आणि प्रशिक्षणासाठी   ही प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी महूला द नुकत्याच दिलेल्या भेटी दरम्यान त्यांना या सुविधेबाबत माहिती देण्यात आली.  

भारतीय लष्कराने उद्योग आणि शिक्षण जगताच्या सक्रीय सहाय्याने  याच संस्थेत कृत्रिम बुध्दिमत्ता केंद्रही उभारले आहे. यामध्ये सायबर रेंज आणि सायबर सुरक्षा प्रयोगशाळांच्या द्वारे सायबर युद्धासंदर्भात प्रशिक्षण दिले जात आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम अर्थात विद्युतचुंबकीय स्पेक्ट्रम मध्ये लष्कराच्या भागीदारीची कल्पना, विद्युतचुंबकीय स्पेक्ट्रम आणि राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातल्या गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयोजित केलेल्या  चर्चासत्रात  करण्यात आली. तेव्हापासून भारतीय लष्कराच्या तंत्रज्ञान संस्थाना कृत्रिम बुद्धीमत्ता, क्वांटम आणि सायबर यासारख्या क्षेत्रात गुंतवणुकीला चालना देण्यात येत आहे.

क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या संशोधनामुळे अति प्रगत दूरसंवाद क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर भारतीय लष्कराच्या सध्याच्या क्रिप्टोग्राफी प्रणालीचे पोस्ट क्वांटम क्रिप्टोग्राफी मध्ये परिवर्तन  होणार आहे. क्वांटम की डीस्ट्रीब्युशन, क्वांटम कम्युनिकेशन, क्वांटम कम्प्युटिंग आणि पोस्ट क्वांटम क्रिप्टोग्राफी ही महत्वाची क्षेत्रे आहेत.  

आयआयटी सारख्या शैक्षणिक संस्था, संरक्षण संशोधन आणि विकास  संस्था,  संरक्षण संस्था, कॉर्पोरेट कंपन्या,स्टार्ट अप्स,उद्योग क्षेत्र यांना सहभागी करून घेत बहु हितधारक दृष्टीकोन अवलंबत, नागरी लष्करी यांचा समन्वय साधत आत्मनिर्भर भारताला मोठे बळ देणारा उपक्रम म्हणून हे उत्तम उदाहरण आहे.प्रकल्पासाठी,  पुरेश्या आर्थिक पाठबळासह विशिष्ट  कालमर्यादेवर आधारित उद्देश ठरवण्याच्या दिशेने काम करण्यात आले असून ते जलद गतीने होईल .

10 कोटीहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम होणार हस्तांतरित

0
आतापर्यंत 1.6 लाख कोटीपेक्षा अधिक सन्मान रक्कम शेतकरी कुटुंबाना करण्यात आली हस्तांतरित

तळापर्यंतच्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधानांची निरंतर कटीबद्धता आणि निर्धाराला अनुसरत हा हप्ता होणार जारी

351 शेतकरी उत्पादन संस्थाना 14 कोटी रुपयांहून अधिक रक्कमही पंतप्रधान करणार जारी, 1.24 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना होणार याचा लाभ

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2021-तळापर्यंतच्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी निरंतर कटीबद्धता आणि निर्धार जारी राखत पंतप्रधान नरेंद्र मोदी,प्रधान मंत्री किसान सन्मान निधी  (पीएम –किसान) योजनेचा दहावा हप्ता 1 जानेवारी 2022 ला दुपारी 12:30 ला दूरदृश्य प्रणालीद्वारे जारी करणार आहेत. यावेळी 10 कोटीहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित होणार आहे.

पीएम-किसान योजने अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाला, चार महिन्यांच्या अंतराने 2000 रुपयांचे तीन हप्ते असे वार्षिक 6000/- रुपये देण्यात येतात.लाभार्थींच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा होते. या योजनेत 1.6 लाख कोटीपेक्षा जास्त सन्मान रक्कम शेतकरी कुटुंबाना आतापर्यंत हस्तांतरित करण्यात आली आहे.

या कार्यक्रमात सुमारे 351 शेतकरी उत्पादन संस्थाना  (एफपीओ)14 कोटी रुपयांहून अधिक रक्कमही पंतप्रधान जारी करणार असून  1.24 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यावेळी पंतप्रधान,  शेतकरी उत्पादन संस्थांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधित करणार आहेत.

केंद्रीय कृषी मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट

0

पुणे, दि.२९:- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी खडकी येथील दिव्यांग सैनिकांच्या क्विन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भेट देवून माहिती जाणून घेतली.

यावेळी लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया, मेजर जनरल इंद्रजीत सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल बाली आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी येथील दिव्यांग सैनिकांशी संवाद साधला. हिंमत हारू नका, खचू नका, मेहनत करा, निराश होऊ नका. आपले मनोबल उच्च असून स्पर्धा परीक्षांची चांगली तयारी करा. आपल्यांपैकी काहींनी खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावली असून समाजापुढे आदर्श आहात. आपल्यातील कौशल्यांना वाव द्या, असे आवाहन करत त्यांनी सैनिकांचे कौतुक केले.

३१ डिसेंबर: गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

0

मुंबई, दि. २९ : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ओमायक्रॉन  विषाणू संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. याचे संक्रमण नागरिकांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्यासाठी गृह विभागाने ३१ डिसेंबर, २०२१ (वर्ष अखेर) व नूतन वर्ष २०२२ चे स्वागत अत्यंत साधेपणाने करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

कोरोनाच्या अनुषंगाने दि. ३१ डिसेंबर, २०२१ रोजी व दि. १ जानेवारी २०२२ रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत शक्यतो घरीच साधेपणाने साजरे करावे.  राज्यात  २५ डिसेंबर पासून रात्री ९:०० ते सकाळी ६:०० वाजेपर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे पालन करण्यात यावे.

कोविड-१९ च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. ३१ डिसेंबर, २०२१ व नूतन वर्ष, २०२२ चे स्वागताकरिता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना बंदिस्त सभागृहात उपलब्ध आसनक्षमतेच्या ५०% पर्यंत तर खुल्या जागेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपलब्ध क्षमतेच्या २५% च्या मर्यादेत उपस्थित राहण्यास परवानगी असेल. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सुरक्षित अंतर राखले जाईल. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६० वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. तसेच ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरीकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही गृहविभागाने दिल्या आहेत.

विशेषतः मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी इत्यादी ठिकाणी देखील नागरिकांनी गर्दी करु नये. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करू नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.

कोविड-१९ व विशेषत्वाने ओमायक्रॉन या विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरविकास विभाग, मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर अनुपालन करणे बंधनकारक राहील, असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली गॅॅरंटी:मध्यवर्ती पेठांतील रस्ते किमान तीन वर्षे सुस्थितीत राहतील:दिलेल्या मुदतीत होणार रस्ते पूर्ववत

0

पुणे-मध्यवर्ती पेठांतील महत्त्वाचे रस्ते आधी दिलेल्या मुदतीत म्हणजेच २० जानेवारीपर्यंत पूर्ववत होतील आणि पुढील तीन वर्षे ते सुस्थितीत राहून कोणत्याही प्रकारची खोदाई करावी लागणार नाही अशी ग्वाही म्हणजेच गॅॅरंटी स्थायी समितीचे अध्यक्ष नगरसेवक हेमंत रासने यांनी दिली.

सदाशिव पेठ-शनिवार पेठ या प्रभागाला एक एकक मानून विविध प्रकारची विकासकामे खात्यांतर्गत समन्वयातून पूर्ण करण्यासाठी आयुक्त विक्रम कुमार यांच्या समवेत १३ नोव्हेंबरला या भागातील समस्या आणि विकासकामांची माहिती घेण्यासाठी दौरा आयोजित केला होता. प्रभागातील समस्या लक्षात घेऊन प्रभागाचा विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यानुसार विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, अधिक्षक अभियंता संतोष तांदळे, पाणीपुरवठा विभागाचे नंदकिशोर जगताप, क्षेत्रिय अधिकारी आशिष महादलकर, पथ विभागाचे देडगे, पाटील, अर्धापुरे, ड्रेनेज विभागाचे फड, उमेश गोडगे, गांगुर्डे यांच्या सह स्मार्टसिटी विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकी नंतर रासने पत्रकारांशी बोलत होते.

मध्यवर्ती पेठांच्या भागात मुख्य बाजारपेठ असल्याने, तेथे दररोज मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे गेली पंचेचाळीस वर्षे या भागातील पाणीपुरवठा आणि मैलापाण्याचे वहन करणार्या वाहिन्या बदलताना मर्यादा येत होत्या. कोविडमुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बाजारपेठ बंद होती. त्या काळात समान पाणीपुरवठा, मैलापाणी वहन, एमएनजीएल पुरवठा, इंटरनेट कंपन्या यांच्या वाहिन्या आणि केबल्स टाकण्याची विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात आली. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात खोदाई करावी लागल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली होती. या पूर्वी निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची दुरावस्था होत होती. आता सर्व प्रमुख रस्ते पूर्ववत करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे.

रासने पुढे म्हणाले, विविध विकासकामांसाठी रस्ते खोदाईची बहुसंख्य कामे पूर्ण करण्यात आली आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत वाहतूक नियंत्रण व्यवस्थेची (ट्रॅफिक सिग्नल) या परिसरातील २४ कामे नव्याने सुरू झाली आहेत. ती १० जानेवारी पर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर दहा दिवसांत रस्ते पूर्ववत होतील. पुढील काळात रस्त्यांवर वाहतुक सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्या साठी आवश्यक निधीची तरतुद करण्यात आली आहे.

रासने म्हणाले, महात्मा फुले मंडईसमोरील मेट्रोचे काम, दक्षिणमुखी मारूती मंदिर चौकातील रस्त्याची कामे, शनिवारवाड्याच्या पिछाडीचा भाग, शुक्रवार पेठ, सुभाष नगर, बाजीराव रस्ता परिसरातील समान पाणीपुरवठा योजनेसंदर्भातील विकासकामे, हिराबाग चौकातील वर्षानुवर्षे पडलेली बेवारस वाहने उचलणे आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सदाशिव पेठ, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता परिसरातील रस्ता डांबरीकरणाची कामे टप्प्‌याटप्प्याने हाती घेण्यात आली असून, ती २० जानेवारीपर्यंत पूर्ण होतील.

हिराबाग चौक ते स्वारगेट ठरणार अपवाद

रासने म्हणाले, हिराबाग चौक ते स्वारगेट या रस्त्यावर समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३० जानेवारी पर्यंतची मुदत खात्याने मागितली. त्यामुळे टिळक रस्त्यावरील हिराबाग ते स्वारगेट हा अपवाद वगळता सर्व विकासकामे २० जानेवारी पर्यंत पूर्ण होतील.

२६ जानेवारीला पादचारी दिन-येत्या प्रजासत्ताकदिनी म्हणजेच २६ जानेवारीला पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. या वेळेला लक्ष्मी रस्ता समाधान चौक, उंबऱ्या मारुती चौक, टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, शनिपार, नगरकर तालीम असा पादचारी मार्गाचा विस्तार करण्यात आला आहे, असेही रासने यांनी सांगितले.

गुरुवारी पद्मावती परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा

0

पुणे, दि. २९ डिसेंबर २०२१ : महावितरणच्या पद्मावती विभाग अंतर्गत पद्मावती उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचे मोठे पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बदलण्याचे पूर्वनियोजित काम करण्यात येणार असल्याने गुरुवारी (दि. ३०) सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पद्मावती, गंगाधाम, बिबवेवाडी, मार्केटयार्ड परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र पर्यायी व्यवस्थेच्या वीजपुरवठ्यात काही तांत्रिक बिघाड झाल्यास या भागातील वीजपुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे.

      महावितरणच्या पद्मावती उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रॉन्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे तो बदलणे अत्यावश्यक झाले आहे. नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर उपलब्ध झाला असून तो बसविण्याचे पूर्वनियोजित काम गुरुवारी (दि. ३०) सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी या उपकेंद्रातील २२ केव्ही उच्चदाबाच्या तीन वीजवाहिन्यांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. हा पर्यायी वीजपुरवठा दुरुस्ती कामाच्या कालावधीत सुरळीत राहण्यासाठी महावितरणकडून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु तांत्रिक कारणास्तव त्यात बिघाड झाल्यास मात्र त्यानंतर सायंकाळी ६ वाजेपर्यंत बिबवेवाडी ते गंगाधाम एम्पोरियम, आदिनाथ सोसायटी ते महावीर सोसायटी, कुमार सिद्धांचल, मार्केटयार्ड, महर्षीनगर, वसंतबाग सोसायटी, अटल सोसायटी, सिटी प्राईड परिसरात वीजपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात असा प्रसंग उद्भवल्यास वीजपुरवठा बंदच्या कालावधीत ग्राहकांनी सहकार्य करावे अशी विनंती महावितरणकडून करण्यात आली आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे’ हा विचार समाजात रुजवा-अविनाश महातेकर

0

मुरलीधर मोहोळ, सुनीता वाडेकर, परशुराम वाडेकर यांचा जाहीर सत्कार

पुणे : “समाजातील कित्येक समस्या सोडवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामान्य लोकांची ताकद बनले. आयुष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करण्याचा प्रेरणादायी विचार त्यांनी समाजाला दिला. त्यामुळे डॉ. आंबेडकर एका विशिष्ट जातीपुर्ते मर्यादित न राहता, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे’ आहेत, हा विचार समाजात रुजवण्याची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे,” असे माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी व्यक्त केले.

संंविधान सन्मान समिती, आंबेडकरी पक्ष-संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भुमिपुजन तसेच प्रवेशद्वारावर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविण्यात पुढाकार घेऊन त्याची पुर्तता करणारे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. 
महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार होते. यावेळी ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, सभागृह नेते गणेश बीडकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. विजय खरे, नगरसेविका फरझाना शेख, आंबेडकरी नेते राहुल डंबाळे, ‘रिपाइं’चे ऍड. मंदार जोशी, महिला नेत्या संगीता आठवले, शशिकला वाघमारे आदी उपस्थित होते.

अविनाश महातेकर म्हणाले, “अस्पृश्यतेच्या जोखडातून समाजाला बाहेर काढत समाज घडवण्यासाठी बाबासाहेबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. बाबासाहेबांनी देशाला राज्यघटना दिल्यानंतर ही त्यांचे नेतृत्व स्विकारण्यास विलंब झाला. अनेक अरिष्ठ परंपरा विरोधात बाबासाहेब अविरत लढले. समाजातील सामान्य घटकांना न्याय मिळवून देण्याची त्यांची प्रमाणिक भुमिका होती. जागतिक पातळीवर सर्वात जास्त आंबेडकर यांची स्मारके उभारण्यात आली आहेत. मात्र आता पुढच्या पिढीमध्ये त्यांचे विचार पेरणे ही तितकेच गरजेचे आहे.”

डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले, “भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आंबेडकरांचा पुतळा उभारणे हा ऐतिहासिक क्षण आहे. समाजात आंबेडकरी पुतळ्यांना विरोध का होतो, हेच कळत नाही. सिम्बायोसिसजवळ उभारलेल्या आंबेडकर स्मारकावेळी आम्हालाही प्रचंड त्रास सहन करावा लागला. आंबेडकर फक्त महामानव न राहता ते विश्वमानव कसे होतील, याचा विचार आपण केला पाहिजे. समाजातील अज्ञान, दारिद्र्य नष्ट करण्यासाठी शिक्षण हाच उपाय आहे.”

परशुराम वाडेकर म्हणाले, “लहानांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रेम करत आलो आहे. आंबेडकरांबद्दल कृतज्ञता म्हणून सर्वांच्या साथीने ५० वर्षानंतर का होईना महानगरपालिकेत बाबासाहेबांचा पुतळा बसला, याचा आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले आणि डॉ. आंबेडकर या महापुरुषांचे पुतळे असणारी ही एकमेव पालिका असणार आहे. ज्या पालिकेने बाबासाहेबांना मानपत्र देण्यास नकार दिला, त्याच पालिकेत बाबासाहेबांचा पुतळा बसविण्यात आला आणि ही ऐतिहासिक घटना आमच्या हातून घडली, याचा आनंद आहे.”
राहुल डंबाळे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. बाळासाहेब जानराव, डॉ. विजय खरे, गणेश बिडकर यांनीही मनोगते व्यक्त केली. सुत्रसंचालन दिपक मस्के यांनी केले. आभार शैलेंद्र चव्हाण यांनी मानले.

केंद्रीय मंत्री नारायण राणेंविरुध्द सुडबुध्दीने कारवाईचा सरकारचा डाव- विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

0


मुंबई, दि. २९ डिसेंबर – केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्या विरोधात सूडबुध्दीने कारवाई करुन त्यांना जेरीस आणण्याचा महाविकास आघाडी सरकार पुरस्कृत पोलिसांचा नियोजनबद्ध कार्यक्रम दिसत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.
प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, विधानभवनाच्या पाय-यांवर जो प्रकार झाला तो निंदनीय आहे. ज्याचा देवेंद्र फडणवीसजींनी सुध्दा याबाबत सभागृहात आपली भूमिका मांडली. पण तोच राग मनात ठेवून सरकारच्या दबावामुळे पोलिस नितेश राणे यांच्याविरुध्द कारवाई करीत आहेत. ज्या दिवशी उपमुख्यमंत्री , राज्यमंत्री आणि पालक मंत्री कणकवलीत होते, त्याच दिवशी माझ्या माहितीप्रमाणे काही करून या ठिकाणी नितेश राणे यांना ताब्यात घ्यावी अशा प्रकारची सूचना दिल्याची सूत्रांची माहिती असल्याचेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.
तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुध्दा नोटीस पाठवायची व त्यांच्याविरुध्द दबाव निर्माण करायचा असा सरकार पुरस्कृत पोलिसांचा कार्यक्रम असल्याची टीका करताना दरेकर म्हणाले की, झालेल्या हल्ल्याचे समर्थन आम्ही करत नाही, जे आरोपी असतील त्यांना पकडा व दोषींवर कारवाई करा. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होत असून ती बॅंक सतिश सावंत यांच्या ताब्यातून ती राणे यांच्याकडे पर्यायाने भाजपाकडे जाईल अशी आघाडी सरकारला भीती आहे.
त्यामुळे सगळ्या सरकारी यंत्रणांचा दबाव आणत पोलिसांचा वापर करणे जेणेकरुन राणे यांना एका ठिकाणी अडकवून ठेवावे व त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर केल्यास आपल्याला निवडणुकीच्या दृष्टीने मोकळे रान मिळेल आणि असणारी सत्ता अबाधित ठेवता येईल अशा प्रकारचा सरकार पुरस्कृत कार्यक्रम असल्याचा आरोपही दरेकर यांनी यावेळी केला.

खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

0

पुणे-

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. सुप्रिया आणि त्यांचे पती सदानंद या दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता, त्यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नसुन, खबरदारी म्हणून ते विलगीकरण जाणार आहेत. संपर्कात आलेल्यांना आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन देखील सुळे यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत सांगितले आहे की, सदानंद आणि मी, आम्हा दोघांची COVID-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आमच्यात कोणतीही लक्षणे नाहीत. आमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने स्वतःची चाचणी घ्यावी ही विनंती. काळजी घ्या. असे आवाहन त्यांनी केले आहे.