Home Blog Page 2139

शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला तरच देश सामर्थ्यवान होईल-अनिल घनवट

0

पुणे, ता. ३० डिसेंबर : ‘मोदी सरकारने शेतकरी हिताचे कायदे आणले. परंतु ते शेतकर्यांना समजावून सांगण्यात आम्ही कमी पडलो. काही लोकांनी सुधारणांना विरोध करीत चांगला विचार हाणून पाडला. त्याचे दुष्पपरिणाम भोगावे लागतात. अजूनही वेळ गेलेली नाही. सर्व समाज पाठिंबा देईल असे कृषी विषयक दूरगामी धोरण मांडले पाहिजे. नेमक्या कोणत्या दिशेने जायचे याचा विचार केला पाहिजे. शेतकर्याच्या खिशात पैसा आला तरच सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढून देश सामर्थ्यवान आणि शेतकरी समृद्ध होईल. त्यासाठी पक्षीय मतभेद विसरून हा लढा लढला पाहिजे, असे मत शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांनी व्यक्त केले.

प्रदेश भाजपच्या बुध्दिजीवी प्रकोष्टच्या वतीने सुशासन दिनाच्या निमित्ताने ‘अटलजी ते मोदीजी : कृषी क्षेत्रातील सुधारणा’ या विषयावर शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल घनवट यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी अध्यक्षस्थानी होते. माजी खासदार प्रदीप रावत, शरदराव लोहोकरे, संस्कृती सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.

घनवट म्हणाले, कृषी कायदे हा क्रांतिकारक निर्णय आहे. आंदोलन उभे राहिले कायदे मागे घ्यावे लागले. यात काही चुका झाल्या. कायदे लागू होण्यासाठी चर्चा झाली पाहिजे होती. बुद्धिजीवींनी पंजाब, हरियाणा मधील जनतेची दिशाभूल केली. राजकीय इच्छाशक्ती नसल्याने यापूर्वी शेतकरी हिताचे कायदे झाले नाही. ते धाडस अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविले. शेती सुधारणांचा विषय सुरू झालेला विषय विझू द्यायचा नाही, चांगले पाऊल तात्पुरते मागे घेतले आहे. पुन्हा एकदा कायदे लागू करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत.

घनवट पुढे म्हणाले, शेती मालाला रास्त भाव द्यावा, शेतीला तंत्रज्ञान आणि व्यापाराचे स्वातंत्र्य द्यावे, बीटी कपाशीला परवानगी द्यावी, शेतकर्यांना सुलभ दराने कर्ज द्यावे, किसान क्रेडिट कार्डसारख्या योजना राबवाव्यात, रस्ते, पाणी अशा मूलभूत सेवांचा विकास करावा, कृषिपूरक उद्योगांना बळ द्यावे आणि कृषी क्षेत्रात संशोधनाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामुळे या क्षेत्राला चांगले दिवस येऊ शकतील.

भांडारी म्हणाले, ‘ज्या वर्गाने अनेक वर्षे राज्य केले त्यांची भाषा समाजवादाची असली, परंतु भूमिका साम्राज्यवादी आहे. त्यांना मोजक्या बारा-पंधरा कुटुंबांच्या हातात बारा कोटी जनेतेची सत्ता कायम ठेवायची आहे. दुसरा वर्ग ज्याला प्रगतीची गंगा प्रत्येका पर्यंत पोहोचू नये असे वाटते. माणूस गरीब, अशिक्षित आणि विकासापासून दूर राहिला तरच तो क्रांती करायला येईल असे या वर्गाचे मत आहे. त्यामुळे या वर्गानी शेतकर्यांच्या हिताच्या कायद्यासाठी विरोध केला. ही लढाई नुसती विचारांची नाही तर विचारांच्या आकलनाची आहे. त्यामुळे ती लोकांपर्यंत न्यायला पाहिजे.’

रावत म्हणाले, शेतकर्यांच्या हितासाठी कायदे आणले देशाच्या सुरक्षिततेसाठी मागे घेत आहे याचा आशय मोठा आहे. फार थोडे हितसंबंधी राजकीय अजेंडा असणार्या लोकांनी आंदोलन चालवले होते. त्यामुळे स्वाभाविक चिंता निर्माण झाली आहे. भारतीय संविधानाची राखण करण्याची गरज निर्माण झाली आहे. पंतप्रधानांनी डबल डिजिट इकॉनॉकी निर्माण करण्याचा रोडमॅप ठेवला आहे. जोपर्यंत शेतीमध्ये स्ट्रक्‍चरल रीफॉर्म येत नाही तोपर्यंत ते स्वप्न राहील. केवळ काही हितसंबंधी विरोध करतात त्यामुळे थांबून चालणार नाही. मोठी लढाई लढावी लागणार आहे. परसेपशनची लढाई आहे. जनता आणि शेतकर्यांना सुधारणा समजावून सांगितल्या पाहिजेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नसरापूर येथे रोजगार मेळावा-४११ सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांची निवड

0

पुणे, दि.३० : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पुणे जिल्हा परिषद आणि भोर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भोर तालुक्यातील नसरापूर येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात कंपन्यांकडून रोजगारासाठी ४११ युवक- युवतींची पहिल्या फेरीत निवड करण्यात आली आहे.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत आणि दीन-दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतर्गत नसरापूर येथील कुंभारकर लॉन्स मंगळवारी (२८ डिसेंबर) रोजी हा रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात भोर, पुरंदर, वेल्हा तालुक्यातील ७४० युवक- युवतींनी नोंदणी करून मुलाखती दिल्या. या मेळाव्यात २३ कंपन्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोदवला. या कंपन्यांमार्फत नोंदणी केलेल्या बेरोजगार युवक-युवतीपैकी ४११ विद्यार्थ्यांची मुलाखतीच्या प्रथम फेरीमध्ये निवड करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू , दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना- ‘उमेद’च्या राज्याच्या अभियान व्यवस्थापक श्रीमती अनिता कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष्य श्री. रणजीत शिवतारे, ‘उमेद’च्या जिल्हा अभियान व्यवस्थापक श्रीमती त्रिवेणी भोंदे, जिल्हा व्यवस्थापक श्रीमती सोनाली अवचट, भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, वेल्हे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. विशाल शिंदे, भोर, वेल्हा,पुरंदर तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

१५ ते १८ वयोगटासाठी शहरात ५ लसीकरण केंद्रे : महापौर मोहोळ

0
  • १५ ते १८ वयोगटासाठीचे कोरोना लसीकरण नियोजन पूर्ण
  • ५ केंद्रांवर ३ जानेवारीपासून होणार लसीकरण सुरु

पुणे (प्रतिनिधी)

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार पुणे मनपा हद्दीतील १५ ते १८ वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाचे नियोजन केले असून या वयोगटासाठी शहरात ५ स्वतंत्र लसीकरण केंद्राचे नियोजन केल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. यासाठी १ जानेवारीपासून कोविन पोर्टलवर नोंदणी सुरु होत असल्याचेही महापौर मोहोळ म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यास अनुसरून पुणे महापालिकेचे नियोजन पूर्ण झाले आहे. याबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, नवीन लाभार्थी वयोगटासाठी कोवॅक्सिन लस देण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या दृष्टीने लशीचा मुबलक साठा उपलब्ध करण्यात येत आहे. शहरातील सर्व भागातील लाभार्थ्यांना लस घेता यावी, यासाठी शहरात पहिल्या टप्प्यात ५ स्वतंत्र लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करताना पुणे महापालिकेने उत्तम कामगिरी केली होती, तशीच कामगिरी या वयोगटासाठीही करण्याचा प्रयत्न आहे’.

‘२००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले या लसीकरणासाठी पात्र ठरले असून लाभार्थ्यांना नव्या वर्षाच्या पाहिल्याच दिवशी लसीकरण नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे कोविन हे पोर्टल किंवा एप्लिकेशन वापरावे लागणार आहे. यात ५० टक्के ऑनलाईन आणि ५० टक्के ऑफलाईन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. शिवाय लसीकरणाला येताना लाभार्थ्यांकडे आधारकार्ड/ओळखपत्र आवश्यक असणार आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

लसीकरणासाठी सुरू होणारी स्वतंत्र केंद्रे

१) कै. दशरथ बळीराम भानगिरे दवाखाना, महंमदवाडी, हडपसर
२) कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
३) कै. जयाबाई सुतार दवाखाना, कोथरूड
४) भारतरत्न स्व. राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा
५) कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना, वडगाव खुर्द

हिंदुत्ववादी विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर -विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

0


मुंबई, दि. ३० डिसेंबर – नसीरुद्दीन शाहसारख्या अभिनेत्याने जातीय विद्वेष निर्माण करण्याचे काम करू नये. हिंदुस्तानात अशा प्रकारे ताकद दाखवण्याचे दुर्दैवी काम कोणी करू नये. जेणेकरून जातीय तेढ निर्माण होईल. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांना आव्हान देण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याला जशास ते उत्तर देण्यात येईल असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे की, मोघलांचे राष्ट्रनिर्मितीतले योगदान विसरले जाते. मोघलांनीच ऐतिहासिक स्मारके निर्माण केली. आम्ही मुस्लिम २० कोटी आहोत. आम्ही २० कोटी लढू. त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी हा इशारा दिला आहे.

भरदिवसा बँका लुटल्या जात असतील तर यापेक्षा भयंकर दुसरे काहीही नाही -प्रविण दरेकर

0


केंद्रीय अर्थमंत्री, राज्यमंत्री यांच्याशी याबाबत दरेकर बोलणार
मुंबई, दि. ३० डिसेंबर – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. बँका या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. भरदिवसा बँकेमध्ये घुसून, गोळीबार करून पैसे लुटले जात असतील, तर याच्यापेक्षा भयंकर दुसरे काहीही नाही, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.
दहिसर येथील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या पार्श्वभूमीवर स्टेट बॅंकेच्या शाखेला भेट देण्यासाठी दरेकर गेले होते, त्याप्रसंगी प्रसारमध्यमांशी दरेकर बोलत होते. दरेकर पुढे म्हणाले की, दरोडेखोरांनी आत घुसून गोळीबार केला. कॅशरच्या गल्ल्यातील पैसे काढत पोबारा केला. दरेकर यांनी पोलिसांचेदेखील अभिनंदन केले कारण पाच-सहा तासात दरोडेखोरांना त्यांनी पकडले. बँक अशा पद्धतीने जर लुटायला लागले, तर या शहराची आर्थिक घडीच उद्ध्वस्त होईल. या बॅंकेला एक गार्ड असण्याची आवश्यकता होती. कारण स्टेट बँक देशातील मोठी बँक आहे. परंतु बँकेची धोरणे जर कर्मचाऱ्यांच्या, ग्राहकांच्या जीवावर येणार असतील तर ती बदलण्याची आवश्यकता आहे, असेही दरेकर म्हणाले. याबाबतची विनंती केंद्रीय अर्थमंत्री, राज्यमंत्री यांना करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच राज्याचे गृहमंत्री वळसे पाटील यांची बैठक लावून आज बँकांच्या शाखा अशा प्रकारे गोळीबार करून लुटल्या जात असतील तर ते अत्यंत चिंताजनक, धोकादायक आहे. म्हणून आणखी कडक आणि गतीने काय करता येईल यासंबंधी गृहमंत्र्यांशी बोलणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नातून कोथरूडमध्ये साकारले लाईटहाऊस

0

माजी केंद्रीय मंत्री, खा. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे (प्रतिनिधी)-

‘लाईटहाऊस ही नागरिकांना स्वत:च्या पायावर उभी करणारी अभिनव योजना पुणे महानगर पालिकेच्या वतीने राबवण्यात येत असून पुणेकर नागरिकांना मुलभूत सुविधा देण्याबरोबरच याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी योजना राबवाव्यात, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पुण्याच्या महापौरांमध्ये दूरदर्शीत्त्व आहे, अशा शब्दात पाटील यांनी महापौर मोहोळ यांचा गौरवही केला.

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नातून आणि पुणे महानगरपालिका व पुणे सिटी कनेक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूडच्या आयडियल कॉलनी येथे लाईट हाऊस प्रकल्प साकारला असून याचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आणि पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी उपमहापौर सुनीता वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, पुणे सिटी कनेक्टचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, मंजुश्री खर्डेकर, अल्पना वरपे, डॉ. श्रध्दा प्रभुणे, वृषाली चौधरी, स्वप्नाली सायकर, नगरसेवक जयंत भावे, कोथरूड विधानसभा भाजप अध्यक्ष पुनीत जोशी यांची उपस्थिती होती.

पाटील पुढे म्हणाले, लाईटहाऊस येथून शिक्षण घेऊन तंत्रकुशल झालेल्या युवकांना व्यवसाय सुरु करण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देता येईल का? उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येऊ शकते? याचा विचारही महापालिका आणि महापौरांनी केल्यास अधिक उत्तम होईल’. खा. जावडेकर म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या कौशल्य विकास योजने अंतर्गत भारत संपूर्ण जगाला तंत्रकुशल मनुष्यबळ पुरवेल, याची खात्री आहे. तंत्रकुशल व्यक्तींची मागणी जागतिक स्तरावर आहे, त्यामुळे हा उपक्रम सुरु करून तरुण वर्गाला रोजगाराभिमुख शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याचे काम पुणे महापालिका करत आहे. त्यासाठी मी पुण्याच्या महापौरांचे आणि पुणे महापालिकेचे विशेष अभिनंदन करतो’.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘पुण्यातील प्रत्येक नागरिकाला उत्तम नागरी सुविधा पुरवणे, हे महापालिकेचे ध्येय आहे. केवळ भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे इतकेच महापालिकेचे ध्येय नसून पुणेकरांचे जीवनमान सर्वांगाने उन्नत व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पुणे शहरातील तरुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी लाईट हाऊस ही संकल्पना आकाराला आलेली आहे.ब्हे पुण्यातील ११वे लाईट हाऊस आहे’.

‘लाईट हाऊसच्या माध्यमातून, मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना चांगले करियर करायची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. ४० विविध अभ्यासक्रम या लाईट हाऊसच्या माध्यमातून चालवले जातात. शहरातील साडेतीन लाख तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना तंत्रकुशल बनवण्याचे आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. हा प्रकल्प या कार्यात निश्चितच उपयोगी ठरत आहे. पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेलाच अनुसरून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कोथरूड येथील लाईट हाऊसला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभल्यामुळे १०० ते १५० क्षमता असणाऱ्या या लाईट हाऊसची क्षमता वाढवून ४५० विद्यार्थी एका बॅचमध्ये शिकू शकतील एवढी करण्यात आलेली आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले. कार्यक्रमाचे आभार नगरसेविका हर्षाली माथवड यांनी मानले.

आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्याची घटक पक्षांमध्ये चढाओढ-आ.चंद्रकांतदादा पाटील

पुणे-राज्यातील सत्ताधारी आघाडीतील घटकपक्षांमध्ये आघाडीतून आधी कोणी बाहेर पडायचे आणि भारतीय जनता पार्टीसोबत सरकार कोणी स्थापन करायचे याची चढाओढ सुरू झाली आहे. पण गेल्या दोन वर्षांत आघाडीतील घटकपक्षांनी सामान्यांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिलेला त्रास ध्यानात घेता, पक्षाचे कार्यकर्ते कोणत्याही घटक पक्षासोबत जाण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ते म्हणाले की, राज्यात गेले दोन दिवस जे घडत आहे ते आघाडीतील घटकपक्षांमध्ये बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन करण्यासाठी चालू झालेल्या चढाओढीचा परिणाम आहे. तथापि, गेल्या २६ महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचा सामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा तसेच भाजपा कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा, त्यांना केसेसमध्ये अडकवण्याचा आणि भाजपा आमदारांना विकासासाठी निधी नाकारण्याचा इतिहास आहे. तो पाहता यांच्यापैकी कोणासोबत जाण्याची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही. अर्थात याविषयीचा निर्णय पक्षाचे केंद्रीय नेतृत्व घेईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत येण्याची ऑफर दिली होती, या शरद पवार यांच्या दाव्याविषयी एका पत्रकाराने विचारले असता मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मा. मोदीजींनी ऑफर दिली होती हे सांगायला शरद पवार यांना इतका वेळ का लागला, हा प्रश्न आहे. अशी ऑफर मिळाली असती तर ती नाकारण्याइतका राजकीय असमंजसपणा पवारांचा नाही. पण त्यांचा इतिहास खरे बोलण्याचा नाही.

त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारकडून भाजपा कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करणे व त्यांना अडकविण्याचा प्रयत्न चालू आहे. केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी आघाडी सरकारचे तोंड फुटले. आता दादागिरी करून आ. नितेश राणेंच्या बाबतीत दुसरा प्रयत्न चालू आहे. पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. राणे त्यांना पुरुन उरतील.

भाजपा आणि शिवसेनेत अंतर वाढविण्याच्या कामाची शरद पवारांनी जाहीर कबुली दिली आहे.
त्यानंतरही शिवसेनेला पवारांबद्दल प्रेम असेल तर ते त्यांना लखलाभ होवो, असा टोला त्यांनी हाणला.

ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा विधिमंडळात ठराव झाला असला तरी त्यामागे सरकारची ओबीसी आरक्षणापेक्षा स्वतःच्या नेतृत्वाची काळजी आहे. लगेच निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते प्रचारासाठी उपलब्ध असणार नाहीत. एकमेव नेता उपलब्ध होणार नसेल तर निवडणुका पुढे ढकला याला अधिक महत्त्व देऊन ठराव झाला. तथापि, राज्य निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काम करण्याची भूमिका पाहता या ठरावाचा किती परिणाम होईल याची शंका आहे.

त्यांनी सांगितले की, विधिमंडळाच्या पाच दिवस चाललेल्या हिवाळी अधिवेशात सामान्य लोकांच्या हिताचे एकही काम सरकारने केले नाही. केवळ ३२००० कोटींच्या पुरवण्या मागण्या मंजूर करून घेणे आणि घाईघाईत १९ विधेयके मंजूर करून घेणे हे काम या सरकारने केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला विधानसभा अध्यक्ष निवडणूक नकोच होती त्यामुळे त्यांनी प्रयत्न केल्याचा फार्स केला.

हर्षवर्धन पाटलांना करोनाची लागण

0

पुणे-भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांनी स्वतः ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. महत्वाचं म्हणजे हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार ठाकरे यांचा विवाहसोहळा २८ तारखेला मुंबईत पार पडला. या लग्नसोहळ्याला अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती. पाटील यांना करोनाची लागण झाल्यानं या विवाहसोहळ्यातील पाहुण्यांना देखील करोनाची बाधा होण्याची शक्यता आहे.

“सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी ही विनंती,” असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय

धोकादायक आणि जीर्ण पूलांची कामे करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

0

मुंबई, दि. ३० – राज्यातील धोकादायक आणि जीर्ण पूलांची कामे करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून, नव्याने उभारण्यात येणारे पूल आणि दुरुस्ती करावयाच्या पुलांच्या कामांचे नकाशे, आराखडे महिनाभरात विभागाकडे सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज दिले.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील धोकादायक व जीर्ण पुलांचा विषय उपस्थित झाला होता. त्या अनुषंगाने राज्यातील अशा सर्व पुलांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे यांचेसह नांदेड, औरंगाबाद, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे मंडळाचे मुख्य अभियंते आणि अधिक्षक अभियंते उपस्थित होते.

राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर असलेल्या ज्या पुलांच्या कामाकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे ते पूल आणि ज्या पुलांची कालमर्यादा संपुष्टात आली आहे, अशा सर्व पुलांचे स्ट्रकचरल ऑडिट करण्याच्या सूचना यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. नवीन पूल बांधत असताना त्या-त्या भागातील सर्वाधिक पर्जन्यमान लक्षात घेणे गरजेचे असून पुलाची उंची पूर पातळीपेक्षा अधिक असेल याकडे लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पुलाचे डिझाईन करत असताना बंधारा टाईप पूल बांधल्यास त्यामाध्यमातून जलसंधारणाचा हेतू देखील सफल होणार असल्याने त्यादृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.

पुढील काळात पुलांची उभारणी करताना त्यात सौंदर्यदृष्टी, वापरकर्त्यांसाठी सुविधा यासह पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विचार करावा आणि सौरउर्जेची निर्मिती करण्यासारख्या संकल्पनेवरही अभियंत्यांनी अभ्यास करण्याच्या सूचना देऊन रस्ते किंवा पूल बांधणी करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी केले. कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच फायबर कॉंक्रिट तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक विभागात किमान एका पुलाची उभारणी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली. कोकणात अतिवृष्टी, महापुरामुळे नुकसान झालेल्या पुलांची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मुंबई उपनगर जिल्ह्यांर्तगत शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. 30 : मुंबई उपनगर जिल्ह्यांर्तगत सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांच्या अधिनस्त चार शासकीय वसतिगृह असून या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या राहण्याची, भोजनाची मोफत सुविधा आहे. या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना मासिक निर्वाहभत्ता, स्टेशनरी रक्कम देण्यात येते. या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून वसतिगृहाच्या प्रवेशाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

वसतिगृहातील रिक्त जागा पुढीलप्रमाणे : मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मुलुंड (गुणवंत विद्यार्थ्याचे वसतिगृह) या वसतिगृहात केवळ कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरिता व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता 100 असून रिक्त जागा 45 आहेत.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, कांदिवली (गुणवंत विद्यार्थ्यांचे वसतिगृह) हे केवळ कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता 100 असून रिक्त जागा 70 आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे शासकीय वसतिगृह, जोगेश्वरी येथे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता 150 असून रिक्त जागा 92 आहेत.

संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृह, चेंबूर येथे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकरिता असलेले वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता 150 असून रिक्त जागा 110 आहेत.

या चार वसतिगृह प्रवेशासाठी एकूण विद्यार्थी मंजूर क्षमता 500 असून रिक्त जागा 317 आहेत.

या वसतिगृह प्रवेशासाठीची पात्रता :-

विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा, विद्यार्थ्याचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त नसावे. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता उत्पन्न मर्यादा रुपये 2 लाख पर्यंत तर  इतर जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्याकरिता उत्पन्नांची मर्यादा रु. 1 लाखापर्यंत दिली आहे.

विद्यार्थ्याचा प्रवेश महाविद्यालयात निश्चित झालेला असावा, मागासवर्गीय विद्यार्थ्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, केवळ कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याकरिता असलेल्या (गुणवंत विद्यार्थ्याचे वसतिगृह) वसतिगृहाच्या प्रवेशाकरिता 55 टक्के पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास असलेल्या विद्यार्थ्यांनाच वसतिगृहात प्रवेश देण्यात येतो. केवळ पदविका अभ्यासक्रमानंतर पदविकेच्या द्वितीय वर्षास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना वसतिगृहात द्वितीय वर्षास प्रवेश देण्यात येतो.

जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहीत कालावधीमध्ये अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी केले आहे.

महावितरणच्या ७६ टक्के वीजबिलांचा भरणा ‘ऑनलाइन’

0

गेल्या आठ महिन्यांत ऑनलाइनद्वारे ३५ हजार ४५३ कोटींचा महसूल

मुंबई, दि. ३० डिसेंबर २०२१: नव्या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या महावितरणला ग्राहकांनी कॅशलेस बील भरण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे. सद्यस्थितीत एकूण वीजबिलांच्या रकमेपैकी तब्बल ७६ टक्के रकमेचा दरमहा भरणा करण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाइनचा पर्याय निवडला आहे. तर गेल्या आठ महिन्यांमध्ये एकूण ३५ हजार ४५३ कोटी  रुपयांच्या (७५.६ टक्के) वीजबिलांचा सुरक्षित ऑनलाइन भरणा केला आहे. तर गेल्या नोव्हेंबरमध्ये ४ हजार ६३६ कोटी रुपयांचा (७६ टक्के) भरणा करून ऑनलाइन सेवेचा लाभ घेतला आहे.

महावितरणकडून सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी सर्व प्रकारची सेवा डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये लघुदाब ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅप तसेच उच्चदाब ग्राहकांसाठी स्वतंत्र पोर्टलची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे प्रामुख्याने दरमहा वीजबिलांचा भरणा ऑनलाइन करण्यासोबतच महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा देखील लघु व उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहेत.

लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी १० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीजबिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. तर यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणचे अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल अॅपची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे बिल भरणा, चालू व मागील वीजबिल पाहणे, पावती पाहणे, एकाच खात्यातून अनेक वीजजोडण्यांचे बिल भरणे यासह इतर सर्व ग्राहक सेवा उपलब्ध आहेत. गेल्या एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत एकूण १२ हजार ७८९ कोटी ५२ लाख रुपयांच्या (५३ टक्के) वीजबिलांचा घरबसल्या ऑनलाइन भरणा केला आहे. तर गेल्या नोव्हेंबरमध्ये  ग्राहकांनी एका क्लिकवर १६३७ कोटी ६ लाख रुपयांचा सुरक्षित भरणा केला आहे.

उच्चदाब वीजग्राहकांसाठी दरमहा वीजबिल आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे व ते अनिवार्य देखील आहे. त्यामुळे महावितरणच्या २० हजार ८७४ उच्चदाब वीजग्राहकांकडून दरमहा १०० टक्के म्हणजे सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या वीजबिलांचा भरणा आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे करण्यात येत आहे. गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण १ लाख ६२ हजार ३४१ उच्चदाब ग्राहकांनी २२ हजार ६६४ कोटी रुपयांचा (१०० टक्के) भरणा ऑनलाइनद्वारे केला आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव धनादेश बाऊन्स होणे, तो वटण्यास उशिर होणे किंवा अन्य अडचणी येणे आदी पूर्वीचे अडथळे पूर्णतः दूर झाले आहेत.

गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये महावितरणच्या सर्वच परिमंडलातील उच्च व लघुदाबाच्या  ग्राहकांनी एकूण वीजबिलांच्या रकमेपैकी तब्बल ४ हजार ६३६ कोटी (७६ टक्के) रकमेचा ऑनलाइनद्वारे भरणा केला आहे. यामध्ये पुणे परिमंडलात ८९५ कोटींच्या (८० टक्के) वीजबिलांचा भरणा केला आहे. त्यानंतर भांडूप परिमंडलातील  ग्राहकांनी ८३४ कोटी (८४.३० टक्के) तर कल्याण परिमंडलामध्ये  ग्राहकांनी ५७३ कोटी १५ लाखांच्या (७७.३४ टक्के) बिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे.

उर्वरित परिमंडलांमध्ये         एकूण वीजबिलांच्या रक्कमपैकी ऑनलाईनद्वारे भरलेली रक्कम व त्याची टक्केवारी औरंगाबाद परिमंडलात  ३०७.४१ कोटी (८४.४ टक्के), लातूर-  ५९.९२ कोटी (४९.१ टक्के), नांदेड- ४४.८६ कोटी (४७.८ टक्के), जळगाव-  ११८.४४ कोटी (६१.२ टक्के), कोकण-  ७२.४६ कोटी (५८.९९ टक्के), नाशिक- ३४० कोटी (७३.३ टक्के), अकोला-  ५०.४० कोटी (४६.३ टक्के), अमरावती-  ६५.२८ कोटी (४७.९ टक्के), चंद्रपूर-  ८०.११ कोटी (६४.५ टक्के), गोंदिया- ४८.३३ कोटी (६२.८ टक्के), नागपूर-  ३२३.५७ कोटी (६९.४ टक्के), बारामती- ५.११ ४२५.३८ कोटी (७६.९ टक्के) आणि कोल्हापूर परिमंडलामध्ये ३१९ कोटी रुपयांच्या (७३.२ टक्के) वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला आहे.

लघुदाब वीजग्राहकांना ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास ०.२५ टक्के (रू.५००/-पर्यंत)  सूट प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये देण्यात येत आहे. तसेच क्रेडिट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्यांयाद्वारे ‘ऑनलाइन’द्वारे होणारा बिल भरणा आता नि:शुल्क आहे. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात असला तरी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. लघुदाब ग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवर वीजबिल भरण्याची सुरक्षित व सोयीची ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; राणे पुत्र 4 दिवसांपासून बेपत्ता

0

सिंंधुदुर्ग -न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्टात गेल्या दोन दिवसांपासून नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु होती. अखेर कोर्टाने शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?
शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्याशी नितेश राणे यांचा संबंध असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. त्यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु करण्यात आला होता.

राणे समर्थक-शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने
दरम्यान, नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर निर्णय येणार असतानाच दुसरीकडे सिंधुदुर्गात राणे समर्थक व शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. कणकवलीत राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मायमराठीतील साहित्यकृतींना राष्ट्रीय सन्मान मिळणे अभिमानास्पद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. ३० : – मराठी भाषा अभिजात आहेच. या आपल्या मायमराठीत वैविध्यपूर्ण साहित्यकृतींमधून आणखी समृद्ध प्रवाह आणण्याचे महत्त्वाचे काम लेखक, साहित्यिक मोठ्या उमेदीने करत असतात. त्यांच्या या लेखन प्रवासाला साहित्य अकादमी पुरस्कारामुळे आणखी बळ मिळते, असे नमूद करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लघुकथाकार किरण गुरव, कादंबरीकार प्रणव सखदेव आणि संजय वाघ यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची राष्ट्रीय साहित्य संस्था अर्थात साहित्य अकादमीचे विविध भाषांतील साहित्यकृतींसाठीचे पुरस्कार आज जाहीर झाले. यामध्ये किरण गुरव यांना ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ या लघुकथासंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार, प्रणव सखदेव यांना ‘काळे करडे स्ट्रोक्स’ कादबंरीसाठी साहित्य अकादमी युवा पुरस्कार आणि संजय वाघ यांना ‘जोकर बनला किंगमेकर’ या कादबंरीसाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. या सर्वांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार, कसदार अशा साहित्यामध्ये मराठी साहित्यकृतींनी भर घालण्याचे महत्त्वाचे योगदान या सर्वांनी दिले आहे. माय मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आपण जागर सुरु केला आहे. या प्रयत्नात पुरस्कार प्राप्त साहित्यकृतींमधून मराठीच्या अंगभूत वैशिष्ट्यांचीही चर्चा होत राहील. त्यादृष्टीने या साहित्यकृती राष्ट्रीय स्तरावर पोहोचणे महत्त्वाचे आहे. हे यश उदयोन्मुख लेखकांसाठी प्रेरणा देत राहील आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

अन्न व औषध विभागाच्या स्थलांतरास खा.बापट यांचा विरोध

0



पुणे,दि.30 ( प्रतिनिधी ) : अन्न व औषध विभागाची प्रशासकीय कार्यालये मोशी येथे हलविण्यास खासदार गिरीश बापट यांनी विरोध दर्शविला असून ही कार्यालये शहराच्या मध्यवर्ती परिसरात हलवावीत. अशी मागणी त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे.
पालिकेने त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी सूचनाही बापट यांनी गुरूवारी एका निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.त्यात म्हटले आहे की, गुरुवार पेठेत असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागाच्या कार्यालयाचे औंधला झालेल्या स्थलांतरामुळे विक्रेत्यांसह व्यावसायिकांची गैरसोय झाली आहे. सध्या नव्याने औंध येथील कार्यालय मोशी येथे पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही शहराच्या विरुद्ध दिशेला स्थलांतरीत करण्याबाबत प्रशासनाची कार्यवाही सुरु असल्याचे समजते.
पुणे शहरात मोठ्या प्रमाणात असलेले छोटे मोठे खाद्य विक्रेते, हॉटेल, ढाबे, हातगाड्या त्यांना आवश्यक असणारे परवाने तसेच त्यांची तपासणी व आपल्या विभागात असणाऱ्या विविध कामानिमित्त नागरिकांना वेळोवेळी औंध कार्यालयात ये-जा करावे लागते. त्यामुळे मोशी येथे सदर प्रशासकीय कार्यालय स्थलांतरीत झाल्यास नागरिकांचा आर्थिक व वेळेचा अपव्यय होणार असून त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रयोगशाळा आणि गोडाऊन वगळता अन्न व औषध प्रशासन विभागाचे कोणतेही प्रशासकीय कार्यालय मोशी येथे स्थलांतरीत करू नये अशी नागरिकांची मागणी आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करता अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रशासकीय कार्यालये पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणे आवश्यक आहे.
तरी शहरातील लाखो व्यावसायिकांसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रशासकीय कार्यालये मोशी येथे स्थलांतरीत न करता पुणे शहरात मध्यवर्ती भागातच सुरु ठेवावीत. एका पत्रकाद्वारे खा.बापट यांनी ही माहिती दिली.

पंतप्रधान मोदी मास्क लावा सांगतात पण ते स्वत: मास्क लावत नाहीत, म्हणून आम्हीही मास्क लावत नाही- संजय राऊत

0

नाशिक- येथे आयोजित एका विवाह सोहळयास उपस्थित असलेल्या संजय राऊत यांना आपण मास्क का वापरत नाही असा सवाल केला असता त्यांनी मास्क न वापरण्याबाबत अजबच उत्तर दिले आहे. पंतप्रधान मास्क लावा सांगतात पण स्वत: मास्क लावत नाहीत. त्यामुळे आम्ही पंतप्रधान मोदींचे ऐकतो आणि आम्ही मास्क लावत नाही, असे म्हणत शिवेसेना खासदार संजय राऊत यांनी थेट मोदींवर टीका केली आहे.

देशभरात विशेषत: महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण दुपटीने वाढू लागले आहेत. ही चिंतेची बाब आहे. आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनीही टास्क फोर्सची बैठक घेतली. सध्या रात्रीचे निर्बंध लावण्यात आले आहेत.

दिवसाच्या निर्बंधांपर्यंत वेळ येऊ नये, अशी सर्वांची इच्छा आहे. कारण दिवसाचे निर्बंध आले तर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे अर्थचक्र हे अडकून पडेल. नोकरी, धंदा, काम, रोजगार या सर्वांवर मोठे संकट येऊ शकते. ते यावे असं वाटत नसेल तर प्रत्येकाने आपआपल्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे असेही संजय राऊत म्हणाले.