Home Blog Page 2135

न्यू इंग्लिश स्कूलचा १४२ वा वर्धापनदिन साजरा

0

पुणे, ता. ३ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेचा १४२ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने पारितोषिक वितरण समारंभ आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. माजी विद्यार्थी गौरव कोंडे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत, त्यातून निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते असे मत कोंडे यांनी व्यक्त केले. शिक्षक विनायक रामदासी यांना उपक्रमशील शिक्षक आणि ललिता गोळे यांना कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले.

शाला समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, प्रबंधक डॉ. सविता केळकर, मुख्याध्यापिका दर्शना कोकरे यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका अनिता भोसले यांनी स्वागत, योगेश पाटील यांनी सूत्रसंचालन आणि उपशालाप्रमुख सुधीर विसापुरे यांनी आभार प्रदर्शन केले.  

पुण्यात 12 दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा

0

दिव्यांग व्यक्तींच्या विवाहांना अर्थसहाय्य योजनेसाठी राज्य सरकार सकारात्मक – धनंजय मुंडे

दिव्यांगांची युडीआयडी कार्ड नोंदणी अधिक व्यापक करणार – राजेश टोपे

            पुणे, दि. 3: दिव्यांग व्यक्तींचे जीवन सामान्य व्यक्तिप्रमाणे सुखकर व्हावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग जोडप्यांच्या लग्नासाठी त्यांना विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या 12 दिव्यांग जोडप्यांच्या विवाह सोहळ्यास श्री.मुंडे यांच्यासह आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रियाताई सुळे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            या विवाह सोहळ्यांसाठी खासदार सुळे यांनी पुढाकार घेतला होता. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच, पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्यावतीने या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात लग्न सोहळा अनुभूती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या खासदार सुळे यांचे यावेळी श्री. मुंडे आणि श्री. टोपे यांनी कौतुक केले.

दिव्यांग नोंदणी व युडीआयडी राज्यव्यापी मोहीम अधिक व्यापक करणार : मंत्री राजेश टोपे

            दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करून त्यांना आवश्यक असलेले दिव्यांग ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) देण्यासाठी 12 डिसेंबर 2021 ते 12 मार्च 2022 या दरम्यान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

            दिव्यांग व्यक्तींना राज्य व केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कार्ड असणे अनिवार्य आहे. त्यामुळे या विशेष मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त नोंदणीसाठी ही मोहीम राज्यभरात अधिक व्यापक पद्धतीने राबिविली जाईल तसेच आरोग्य विभाग यासाठी आवश्यक सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी माहिती याप्रसंगी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

            श्रीमती सुळे म्हणाल्या, मंत्री श्री. मुंडे आणि आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या सहकार्यामुळे या लग्न सोहळा उत्कृष्ट पद्धतीने होऊ शकला. यापुढे अशा प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम राज्यभरात राबवले जाणार आहेत.

            सावित्रीबाईं फुले यांना अभिवादन आणि संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका मंगल कार्यालयात आयोजित या सामुदायिक विवाह सोहळ्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करून सर्व नवदाम्पत्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. सोहळ्यात मास्क वापरण्यासह कोविड विषयक नियमांचेही पालन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केलेले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विजय कान्हेकर, अभिजित राऊत, दिपिका शेरखाने तसेच सर्वच आयोजकांचे उत्कृष्ट नियोजनाबद्दल सर्वांनीच कौतुक केले.

पुण्यात गुंठेवारी सुरु : निर्णयाचे – प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून स्वागत

0

पुणे -मनपा प्रशासनाने आज पुण्याचे महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांना गुंठेवारी संबंधीचे सादरीकरण केले व येत्या आठवड्यात गुंठेवारी अंतर्गत नियमितिकरण करण्यास सुरुवात होत आहे, ह्या निर्णयाचे मी स्वागत करतो व सकारात्मक भूमिका घेणाऱ्या प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो असे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.महाराष्ट्र गुंठेवारी विकास ( नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण ) अधिनियम 2001 ) व यात सुधारणा करण्यासाठी 15 मार्च 2021 रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या अधिनियमातील काही मुद्द्यां बाबतीत राज्यातील विविध महापालिका प्रशासनाने काही स्पष्टीकरण / खुलासा राज्य सरकार कडून मिळावा असे पत्र लिहिले होते. पुणे मनपा ने देखील याबाबत राज्य सरकार कडून आदेश निर्गमित व्हावे यासाठी पत्रव्यवहार केला होता. या सर्व विषयात भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील व प्रवक्ता संदीप खर्डेकर सातत्याने शासनाकडे व मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते . दिनांक 18 ऑक्टोबर रोजी राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने सुधारित अधिनियम निर्गमित केले व त्या आदेशानुसार गुंठेवारी पद्धतीने झालेला विकास नियमित करण्यासाठी सुधारित प्रशमन शुल्क व सुधारित विकास शुल्क निश्चित केला आहे. त्यामुळे त्वरित गुंठेवारी ची प्रकरणे दाखल करून घ्यावीत व शासनाच्या दिशानिर्देशानुसार गुंठेवारी नियमितिकरण आभावी त्रस्त नागरिकांना दिलासा द्यावा अशी भूमिका मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडली होती. ह्या सर्व विषयात पुणे मनपा स मोठ्या प्रमाणावर महसूल मिळणार असून विकासकामांसाठी अधिक निधी उपलब्ध होणार आहे.. तरी आता प्रशासनाने त्वरित प्रकरणे दाखल करून घेऊन छाननी करून नियमितिकरण करावे आणि सामान्यांना दिलासा देताना लालफितीशाहीत न अडकवता ठराविक मुदतीत हे नियमितिकरण करावे अशी सूचना देखील आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.

महापौर मोहोळ

१० जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्करना बुस्टर डोस:२८३८ रुग्णांपैकी, ३४० रुग्णालयात , १०१ रुग्ण गंभीर तर ८१ रुग्ण ऑक्सिजनवर -महापौरांची माहिती

0

पुणे : दिवसभरात पुण्यात तब्बल ४४४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात जेमतेम सातशेवर असलेली ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या दोन हजार आठशेवर जाऊन पोचली आहे.त्यामुळे येता काही चार दिवसात पुणेकरांना नव्या निर्बंधांना सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.पालकमंत्री अजित पवार यांची उद्या आढावा बैठक होणार आहेत.या बैठकीत पुण्यातील स्थितीबाबत सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर निर्बंधाबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यातील रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात सुमारे साडेसातशे रूग्ण होते. रूग्णवाढीचा दर स्थिर होता.मात्र, रूग्णांचे आकडे रोजच वाढू लागल्याने केवळ सहा-सात दिवसात हा आकडा दोन हजार ८३८ वर पोचला आहे.पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २८३८ रुग्णांपैकी १०१ रुग्ण गंभीर तर ८१ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शहरातील स्थितीचा आढावा घेतला. रूग्ण वाढतील असे गृहीत धरून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तयारी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.महापौर मोहोळ म्हणाले, ”२७ डिसेंबरपासून रूग्ण वाढू लागले आहेत.गेल्या आठ दिवसांत रूग्णसंख्या चौपाटीने वाढली आहे.जवळपास रोज ८० ते ८५ टक्के दोन्ही डोस घेतलेले लोक कोरोना बाधित होत आहेत. सौम्य लक्षणे आहेत पण दोन्ही डोस झालेल्या लोकांनाही कोरोनाची लागण होत आहे.”

रूग्णसंख्या वाढत असली तरी केवळ तीनशेचाळीस रूग्णांना रूग्णालयात जाऊन उपचाराची गरज पडल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले. महापालिकेकडे चार हजार रेमिडिसिव्हीर इंजेक्चनचा साठीआहे. एक हजार ८०० बेड उपलब्ध आहेत.दर मिनिटला नऊ हजार ५०० लिटर ऑक्सिजन तयार करण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.जम्बो हॉस्पिटलमध्ये तयारी सुरू आहे.गरज पडली तर केवळ आठ दिवसात पूर्ण क्षमतेचे हे हॉस्पिटल सुरू करता येऊ शकते, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या पुण्यात बैठक होणार असून त्यानंतर नवे नियम व निर्बंधाबाबत निर्णय होऊ शकतो,असे महापौर मोहोळ यांनी सांगितले. नागरीकांनी नियमांचे पालन करीत काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले.

पुणे- सातारा रस्त्यावर दोन टोल नाक्यांवर पाच वर्षे बेकायदेशीरपणे टोल वसुली : रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला दोन आठवड्यात खुलासा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग चारच्या पुणे सातारा क्षेत्रात दोन टोल नाक्यांवर मागील पाच वर्षे बेकायदेशीरपणे टोल वसुली केली जात आहे, असा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेत कंत्राटदार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला दोन आठवड्यात खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले 

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी केलेल्या याचिकेवर न्या अमजद सय्यद आणि न्या अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने सीबीआय, राज्य सरकार आणि अमंलबजावणी संचालनालयाला नोटीस बजावली आहे. पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर सहा लेनचे बांधकाम पूर्ण झालेले नाही.

तसेच केंद्र सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार सहा पदरी मार्ग पूर्ण होईपर्यंत टोलवसुली करण्याला मनाई केली आहे असे याचिकादारांकडून सांगण्यात आले. यामध्ये कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार आणि नियमांचे उल्लंघन झाले आहे असा आरोप त्यांनी केला. सीबीआयने याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी राज्य सरकारकडे आठ महिन्यांपूर्वी परवानगी मागितली होती. मात्र अद्याप ही परवानगी दिलेली नाही असेही सांगण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग 4 च्या टप्प्यात पुणे-सातारा विभागात हवेली येथील खेडशिवापूर आणि जावळी तालूक्यातील आणेवाडी या दोन ठिकाणी सन 2010 मध्ये टोल वसूल करण्याचे कंत्राट रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि कंपनीला 24 वर्षे करारावर देण्यात आले. त्यावेळी या टोलवसुलीतून चार पदरी रस्ता अडीच वर्षात सहा पदरी करण्याची अटही घालण्यात आली होती. याचिकेवर पुढील सुनावणी ता 24 रोजी होणार आहे.

मुंबई बँक निवडणुकीत प्रविण दरेकर यांचे वर्चस्व-सहकार पॅनेलने सर्व २१ जागा पटकाविल्या

0

 

सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांच्या विश्वासामुळे निर्विवाद विजय
-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

मुंबई, दि. ३ जानेवारी- मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवित सर्वच्या सर्व २१ जागांवर दमदारपणे विजयी झाले आहेत. प्रविण दरेकर यांच्या सहकार पॅनेल सर्व २१ जागांवर विजयी झाले आहेत. यातील १७ जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. तर, उर्वरीत चार जागांची मतमोजणी आज पार पडली. या चारही जागांवर सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळविला आहे. मुंबईतील सहाकारी चळवळीतील कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा सहकार पॅनेलवर मोठ्या प्रमाणावर सार्थ विश्वास दाखविल्यामुळे हा विजय मिळाल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी दिली आहे.
आज चार जागांसाठी झालेल्या मतमोजणीत दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले. मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघातून विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव केला. विठ्ठल भोसले यांना १८ मते तर सुखदेव चौगुले यांना १६ मते मिळाली. प्राथमिक ग्राहक मतदार संघात पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुरुषोत्तम दळवी यांना १३१ मते तर कमलाकर नाईक यांना ५९ मते मिळाली. तर, महिला सहकारी संस्था मतदार संघ जयश्री पांचाळ यांना ३३२ मते तर, शालिनी गायकवाड यांना १८८ मते मिळाली.
भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून अनिल गजरे यांना तब्बल ४ हजार मते मिळाली तर, यलाप्पा कुशाळकर यांना ३५० मते मिळाली. प्रविण दरेकर यांच्या पॅनेलमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या उमेदवारांचा समावेश होता. तर, शिवसेना बंडखोरांनी चार ठिकाणी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली.
मुंबई बँकेत अभिजीत घोसाळकर, सुनिल राऊत, अभिजीत अडसूळ, शिल्पा सरपोतदार हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. तर, निवडणुकीतून शिवसेना बंडखोर उमेदवार सुजाता पाटेकर, संजना घाडी आणि स्नेहा कदम यांनी माघार घेतली. तर कमलाकर नाईक यांनी बंडखोरी कायम ठेवली. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
जनतेच्या विश्वासाचा विजय
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
मुंबईतील सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आमच्या नेतृत्वावर व सहकार पॅनेलवर विश्वास टाकत २१ पैकी २१ जागा निवडून दिल्या आहेत. त्याबद्दल मी सर्व मुंबईकरांचे, सहकार चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सर्व मुंबईकर, सहकार चळवळीतील कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, सर्व मुंबईकरांनी जाती-धर्माच्या पलीकडे व पक्षाच्या पलीकडे जाऊन मुंबई बँकेच्या हितासाठी, उत्कर्षासाठी आमच्या सहकार पॅनेलवर विश्वास दाखवला. येणाऱ्या काळात मुंबई बँकेच्या माध्यमातून मुंबई बँकेला ताकद, उर्जितावस्था देत महाराष्ट्रात मुंबई बँकेचे मुंबईसह महाराष्ट्रात सर्वोच्च स्थान राहील, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला.

बिनविरोध विजयी झालेले १७ उमेदवार
नागरी सहकारी बँक
१) आमदार प्रविण यशवंत दरेकर
२) संदीप सीताराम घनदाट
पगारदार सहकारी संस्था
३) आमदार प्रसाद मिनेश लाड
नागरी सहकारी पतसंस्था
४) शिवाजीराव विष्णू नलावडे
गृहनिर्माण संस्था
५) आमदार सुनील राजाराम राऊत
६) अभिषेक विनोद घोसाळकर
मजुर सहकारी संस्था
७) आमदार प्रविण यशवंत दरेकर
८) आनंदराव बाळकृष्ण गोळे
औद्योगिक सहकारी संस्था
९) सिद्धार्थ तात्यासाहेब कांबळे
१०) विष्णू गजाभाऊ घुमरे
इतर सहकारी संस्था
११) नंदकुमार मानसिंग काटकर
१२) जिजाबा सीताराम पवार
व्यक्तिगत (वैयक्तिक)
१३) सोनदेव बाळाजी पाटील
महिला राखीव मतदार संघ
१४) शिल्पा अतुल सरपोतदार
१५) कविता प्रकाश देशमुख
अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ
१६) विनोद दामू बोरसे
इतर मागासवर्गीय मतदार संघ
१७) नितीन धोंडीराम बनकर
आजच्या मतमोजणीत विजयी झालेले उमेदवार
भटक्या जाती,विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघ
१८) अनिल गजरे
महिला सहकारी संस्था मतदारसंघ
१९) जयश्री ताई पांचाळ
मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदार संघ (होलसेल कंझ्यूमर्स)
२०) विठ्ठलराव भोसले
प्राथमिक ग्राहक संस्था मतदार संघ
२१) पुरुषोत्तम दळवी


 
 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘सावित्री उत्सव’ साजरा

0

मुंबई, दि. 3 :  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज ‘सावित्री उत्सव’ म्हणून महिला व बाल विकास विभागाच्या राज्यभरातील सर्व कार्यालय व  अंगणवाड्यांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळत उत्साहात साजरी करण्यात आली.

जयंतीनिमित्त बोलताना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, भारताच्या इतिहासावर ज्यांची अमीट छाप आहे अशा स्त्री रत्न म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. भारतीय स्त्री ने आज जी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याचे श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाचा प्रारंभ करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. सावित्रीबाई फुले यांची जयंती गेल्या वर्षीपासून महिला व बाल विकास विभागातर्फे सावित्री उत्सव म्हणून साजरी केली जात आहे. सावित्रीबाई फुले यांच्या शिकवणीनुसार मी आणि माझा विभाग महिलांच्या उत्थानासाठी कार्यरत असल्याचे ॲड.ठाकूर त्यांनी सांगितले.

सावित्री उत्सव साजरा करताना राज्यातील सर्व अंगणवाड्यांमधे कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले. अंगणवाडी व प्रकल्प स्तरावर प्रतिमा पूजन, अभिवाचन, जनजागृती कार्यक्रम, प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा असे कार्यक्रम घेण्यात आले. १०० टक्के लसीकरण करणाऱ्या व पोषण माह मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या बिट मधील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. माझी कन्या भाग्यश्री योजनेनूसार एक किंवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन करणाऱ्या जोडप्यांना गौरविण्यात आले. कोरोना काळात एकल झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य योजना राबविण्यात येत आहेत. आज अनाथ बालकांच्या घरी भेटही महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. विविध खेळात देशपातळीवर प्राविण्य प्राप्त केलेल्या मुलींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

0000

मिळकतकर विभागानेही केली विक्रमी कमाई महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 1 हजार 303 कोटी जमा

0

पुणे – महापालिकेच्या बांधकाम विभागापाठोपाठ मिळकतकर विभागानेही विक्रमी कमाई केली आहे. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत तब्बल 1 हजार 303 कोटींचा महसूल जमा झाला आहे.सुमारे सात लाख 71 हजार मिळकतधारकांनी हा कर जमा केल्याची माहिती मिळकतकर संकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत घटले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मागील दोन वर्षांपासून मिळकतकर वसुलीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यात, कर आकारणी न झालेल्या मिळकतती शोधणे, वापरात बदल झालेल्या मिळकती शोधणे, कर न भरणाऱ्या मिळकती सील करणे तसेच नियमित कर वसुलीसाठी प्रयत्न करणे यामुळे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचा कर वाढण्यास मदत झालेली आहे.

त्यात, गेल्या दहा दिवसांत सुमारे 1,300 मिळकती सील करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे मागील महिनाभरात सुमारे 100 कोटींचा महसूल जमा झाला आहे. तर, या नऊ महिन्यांत सुमारे 47 हजार नवीन मिळकतींची कर नोंदणी झाल्याने सुमारे 334 कोटींचा महसूल मिळाला आहे. तर, वापरात बदल केलेल्या 51 हजार मिळकती शोधल्या असून त्याद्वारेही 114 कोटींचा महसूल तिजोरीत मिळकतकराच्या रूपाने जमा झाला आहे. तर, आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांतही जास्तीत जास्त कर वसुलीचे उद्दिष्ट असल्याचे कानडे यांनी सांगितले.

पीएमडीटीए मानांकन वरिष्ठ व हौशी टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अमित शर्मा, सूर्यप्रताप निंबाळकर, राहुल कोठारी विवेक खडगे यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

0

पुणे, 3 जानेवारी 2022: टेनिस एसेस यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या संलग्नतेने पीएमडीटीए मानांकन वरिष्ठ व हौशी टेनिस स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत सूर्यप्रताप निंबाळकर, राहुल कोठारी, अमित शर्मा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

एसेस स्पोर्ट्स अरेना टेनिस कोर्ट उंड्री येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत एकेरीत सूर्यप्रताप निंबाळकरने आपली विजयी मालिका कायम ठेवत नितीन सावंतचा 6-1 असा तर, विवेक खडगेने रतिश रितुसारियाचा 6-2 असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली. अमित शर्मा याने रवी कोठारीचा  6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आपले आव्हान कायम ठेवले. राहुल कोठारीने अंकित कापसेला 6-2 असे पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली. 

दुहेरीत उपांत्य फेरीत सुनील लुल्लाने आदित्य व्यासच्या साथीत अभिषेक चव्हाण व संजय सेठी या जोडीचा 6-3 असा तर, दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत रवी कोठारी व राहुल कोठारी यांनी अमित शर्मा व रतीश रितुसरिया यांचा 6-3 अशा सारख्याच फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.  

निकाल: एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:

सूर्यप्रताप निंबाळकर वि.वि.नितीन सावंत 6-1

विवेक खडगे वि.वि.रतिश रितुसारिया 6-2

अमित शर्मा वि.वि.रवी कोठारी 6-4; 

राहुल कोठारी वि.वि.अंकित कापसे  6-2; 

दुहेरी: उपांत्य फेरी:

सुनील लुल्ला/आदित्य व्यास वि.वि.अभिषेक चव्हाण/संजय सेठी 6-3;

रवी कोठारी/राहुल कोठारी वि.वि.अमित शर्मा/रतीश रितुसरिया 6-3.   

मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

0

मुंबई, दि. ३ : कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यासाठी १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. याअनुषंगाने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी आढावा घेतला. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगून कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. आता १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरणास प्रारंभ झाला असल्याने सर्व शाळांनी नियोजन करून या वयोगटातील विद्यार्थ्यांचे तातडीने लसीकरण करून घ्यावे. जेथे अद्यापही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले नसेल तेथे त्यांनीही तातडीने लस घ्यावी. शाळांमध्ये कोविडसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून गर्दीचे उपक्रम टाळावेत. शाळेमध्ये गर्दी टाळण्यासाठी ५० – ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवावी. प्रात्यक्षिके गर्दी टाळून घ्यावीत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शक सूचनांचे पालन, लसीकरण आदींबाबत दक्षता घ्यावी. विद्यार्थी अथवा शिक्षक/ कर्मचारी कोविड संक्रमित झाल्याचे लक्षात आल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील निर्णय घ्यावेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन वर्ग अथवा शाळा गरजेनुसार बंद ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.

शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे पहिल्यांदाच लसीकरण होत असल्याने शाळांनी गर्दी टाळून योग्य नियोजन करावे. विद्यार्थी अथवा शिक्षक कोविड संक्रमित झाल्यास ती वर्गखोली सॅनिटाईज करून मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. बहुतांश जिल्ह्यांत १५ ते २० तारखेपर्यंत नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबत शालेय शिक्षण विभाग दक्ष आहे. राज्यात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ६५ लाख २३ हजार ९११ इतकी असून सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली.

या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका/नगरपालिकेचे शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी, गट शिक्षणाधिकारी आदी ऑनलाईन उपस्थित होते

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

0

आंबेगाव, शिरूर तालुक्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा

            पुणे 3: कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्यासोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना करा, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिले.

            शासकीय विश्रामगृह येथे गृहमंत्री श्री. वळसे पाटील यांनी आंबेगाव तसेच शिरूर परिसरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, आंबेगाव उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, शिरूर उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख उपस्थित होते.

            श्री. वळसे पाटील म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना अधिक वेगाने राबवाव्या लागणार आहेत. कोरोना चाचण्या व उपचार सुविधांवर भर देण्यासोबच नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. लसीकरणचा वेग वाढवावा. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचेही अत्यंत काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. औषधाचा पुरेसा साठा, उपचारसुविधा, मनुष्यबळ उपलब्धता, चाचण्यांचे प्रमाण लसीकरण स्थितीचाही त्यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कोरोना परिस्थिती, लसीकरण आणि तिसऱ्या लाटेबाबत करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मिशन मोडवर लसीकरण मोहीमेसाठी गावनिहाय लसीकरण प्लॅन तयार करण्याच्या आणि  कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

            श्री. आयुष प्रसाद म्हणाले, प्रत्येक गावात लसीकरण केंद्र सुरू करून सरपंच, ग्रामसेवक तसे सर्व यंत्रणांचा सहभाग घ्यावा. शालेय विद्यार्थ्यांच्या लसीकरण, हॉस्पीटल, औषधोपचार तसेच इतर व्यवस्थेबाबतही त्यांनी माहिती दिली.

            आंबेगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत श्री. कोडलकर यांनी तर शिरूर तालुक्यातील उपाययोजनेबाबत संतोषकुमार देशमुख यांनी माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवडी न्हावाशेवा सी लिंकची पाहणी

0

प्रकल्पाचे ६५ टक्के काम पूर्ण; डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण सी लिंकचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

मुंबई, दि. ३ – मुंबई शहराला नवी मुंबई शहर आणि रायगड जिल्ह्याशी जोडणाऱ्या शिवडी न्हावाशेवा पारबंदर प्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला. आज या प्रकल्पात ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची यशस्वीरीत्या उभारणी करण्यात आली. नगरविकास मंत्री स्पीड बोटीतून या कामाची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचेसह खासदार राजन विचारे, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवडी आणि न्हावाशेवा या दरम्यान उभारण्यात येत असलेला पारबंदर मार्ग हा भारतातील सगळ्यात मोठा पारबंदर मार्ग आहे. तब्बल २२ किलोमीटर लांबीचा असा हा पारबंदर (सी लिंक) प्रकल्प असून १८ हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. आज या प्रकल्पात ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची उभारणी करण्यात आली. टाटा प्रोजेक्ट्स- देवू जेव्ही यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात येत असून असे ३२ गाळे बसवून हा ७.८१ किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या गाळ्याच्या फॅब्रिकेशनचे काम जपान, दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम, म्यानमार या देशात करण्यात आले असून १८० मीटर एवढ्या लांबीच्या अजस्त्र गर्डर तयार करण्यात आले आहे. या संपूर्ण स्ट्रक्चरचे लोंचिंग करण्यासाठी एका खास बार्जची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवाजी नगर येथील इंटरचेंजचे काम देखील करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम जवळपास ६५ टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

मुंबई-नवी मुंबई दरम्यानचे अंतर कमी होणारठाणे-रायगड जिल्हे एकमेकांना जोडले जाणार – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

शिवडी न्हावाशेवा पारबंदर प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबई या शहरातील अंतर कमी होणार असून ते २० मिनिटात कापता येणे शक्य होणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील चिरले पर्यंत हा पारबंदर प्रकल्प जाणार असल्याने ठाणे आणि रायगड हे जिल्हे देखील एकमेकांना जोडले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मोठी मदत होणार असून त्याद्वारे जेएनपीटी बंदरातून होणारी वाहतूक अधिक वेगवान होणार असल्याचे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

या गाळ्यांच्या लॉचिंगसाठी कारंजा येथे विशेष जोडणी यार्ड  तयार करण्यात आले असून तिथे जोडणी करून ते समुद्रात नेण्यात येतात. त्यासाठी खास बार्ज तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अतिशय नियोजनबद्धरित्या हे महाकाय गाळे लाँच करण्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.

आज करण्यात आलेल्या ह्या कामामुळे हा पारबंदर प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.

१५ ते १८ वयोगटाचा कोरोना लसीकरणाचा सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ…

0

पुणे-पुणे महानगरपालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांना करोना प्रतिबंधक लस देण्यास सोमवारी सुरुवात झाली. महानगपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असून त्यासाठी आवश्यक असलेल्या लसींचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुकर व्हावे, यासाठी पालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागातील ४० केंद्र सुरू करण्यात आली आहेत. लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांचे स्वागत सभागृह नेते बिडकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. करोनावर मात करण्यासाठी या वयोगटातील मुलांसह ज्या नागरिकांचा अद्यापही पहिला आणि दुसरा डोस शिल्लक आहे, त्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन बिडकर यांनी यावेळी केले.

लस घेण्यासाठी आलेल्या या मुलांमध्ये लसीकरणाबाबतची उत्सुकता ही प्रचंड सकारात्मकता देणारी होती. या लसीकरणासाठी प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक ते नियोजन करण्यात आलेले आहे. -गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका

शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटलमध्ये महापौरांच्या उपस्थितीत प्रारंभ

महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे महापालिका हद्दीत १५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरणाचा प्रारंभ महापालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटलमध्ये करण्यात आला. पुणे शहरात ४० लसीकरण केंद्रांवर नव्या वयोगटासाठी कोवॅक्सिन लस उपलब्ध करण्यात आली आहे.

‘१५ ते १८ वयोगटातील लाभार्थ्यांमध्ये लसीकरणासाठी उत्स्फूर्तपणा दिसला हे खूप आशादायक चित्र आहे. लाभार्थ्यांची ही सकारात्मकता लसीकरणाला चांगला वेग देईल हा विश्वास वाटतो. महापालिकेची लसीकरण यंत्रणाही पूर्ण क्षमतेने सज्ज असून वेगाने आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कमीत कमी कालावधीत लस देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असेल’-मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

ग्राहकाने मास्क न घातल्यास, दुकानदारांना दहा हजारांचा दंड म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी..!- आमदार मंगलप्रभात लोढा

0

ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदारांकडून ‘१० हजारांचा दंड’ या निर्णयाला भारतीय जनता पार्टी व्यापारी सेलचा विरोध

मुंबई-
ग्राहकाने दुकानात मास्क न वापरल्यास ग्राहकास फक्त रु. ५०० दंड परंतु संबंधित दुकान अथवा आस्थापनेला १० हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व्यापारी सेलच्या शिष्टमंडळाने मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांची भेट घेऊन केली. ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदारांना दहा हजारांचा दंड म्हणजे पद्धतशीर लूटच असून हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी आहे अशी खरमरीत टीका आमदार श्री. लोढा यांनी यावेळी केली.

दुकानदारांना दहा हजार रुपये दंड आकारण्याचा राज्य सरकारचा हा निर्णय अन्यायकारक असून या निर्णयामुळे दुकानदारांना मोठा आर्थिकफटका बसणार आहे. तसेच लहान दुकानदारांची गैरसोय होणार आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराचे नवे कुरण निर्माण होईल याकडेही भाजपा व्यापारी सेलच्या शिष्टमंडळाने लक्ष वेधले.

या निर्णयामुळे छोट्या दुकानदारांना दुकान बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही कारण दंडाची रक्कम दुकानदाराच्या कमाईपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या नियमांत सुधारणा करून दुकानदारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आमदार श्री. लोढा यांनी व्यक्त केली. यावेळी स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट, अजय पाटील, मुंबई भाजपा व्यापारी सेलचे अध्यक्ष जयेश जरीवाला, जयेश जोशी, अल्पेश शहा, प्रदीप शर्मा, सवेश प्रतापसिंह आदी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी या निर्णयाबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी दिली.

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाकरीता ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. 3 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 9 डिसेंबर 2021 पासून करण्यात आली आहे. इच्छुक  उमेदवारांनी 7 जानेवारी 2022 अर्ज करावे. सामायिक ऑनलाईन प्रवेश परीक्षा रविवार, 16 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत घेण्यात येणार आहे, असे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा 2022 च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता पूर्णपणे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई व भारतीय प्रशासकीय पूर्व प्रशिक्षण केंद्रे नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद व कोल्हापूर येथील प्रवेश परीक्षेसाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या जाहिरातीत नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून www.siac.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन (Online) अर्ज मागवण्यात येत आहेत.  राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापना सन 1976 साली झाली असून महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांचा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत टक्का वाढावा या उदात्त हेतूने करण्यात आली. ही संस्था  महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येते. सन 1956 पासून आजतागायत संस्थेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे व संस्थेत प्रशिक्षण घेतलेले शेकडो विद्यार्थी देशातील वेगवेगळ्या राज्यात व परदेशात देखील भारतीय प्रशासकीय सेवेत सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, अशी माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई चे संचालक डॉ.खुशपत जैन यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

00000