Home Blog Page 2134

लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच एन्ट्री – सकाळी नव्या निर्बंधाबाबत चर्चा : उप मुख्यमंत्री

0

दोन लसमात्रा न घेणाऱ्यांना शासकीय व खाजगी आस्थापनात प्रवेश नाही – येत्या ३० जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंदउपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: आठव्या इयत्तेपर्यंत शाळा बंद राहील, २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविल्या शिवाय कुठेही कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही ,मास्क हि नाही आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकलात तर १००० रुपये दंड अशी निर्बंध्ये सांगत आता उद्या सकाळी ९ वाजता मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होईल तेव्हा अन्य उपाय योजना आणि निर्बंध याबाबत निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे स्पष्ट केले

जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी अशा सर्व आस्थापनांमध्ये कोविड लशीच्या दोन मात्रा न घेणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये आणि ३० जानेवारी २०२२ पर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवाव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार  यांनी दिले.

विधान भवन येथे आयोजित पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. बैठकीस गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जि.प.अध्यक्षा निर्मला पानसरे,  पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, ओमीक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोविड संसर्गाची स्थिती बिकट होत आहे. १०५ देश, भारतातील २३ राज्ये आणि राज्यातील ११ ठिकाणी ओमीक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरात एकाच दिवसाचा पॉझिटीव्हीटी दर १८ टक्के आला आहे. या पार्श्वभूमीवर  ३० जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीचे वर्ग बंद राहतील, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहील. १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येत असल्याने नववी आणि दहावीचे वर्ग सुरू ठेवावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.

दोन लसमात्रा नाही तर प्रवेश नाही
नव्या प्रकारच्या कोविड विषाणूचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वाढविणे नितांत गरजेचे आहे. नागरिकांना लसीकरणासाठी प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात आले आहे. तरीदेखील बऱ्याच नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली नसल्याने जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि खाजगी अशा सर्वच आस्थापनांमध्ये ‘दोन लसमात्रा नाही तर प्रवेश नाही’ या नियमाचे बंधन घालण्यात यावे. उपहारगृहे, मॉल्स, दुकाने, सिनेमागृहे, नाट्यगृहे तसेच इतर आस्थापना चालकांनी लशीच्या दोन मात्रेशिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

मुखपट्टी नसेल दर दंड निश्चित
कोविडपासून बचावासाठी मुखपट्टीचा (मास्क) उपयोग आवश्यक आहे. त्यामुळे मुखपट्टी न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करण्यात यावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यामुळे विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने थुंकणाऱ्यांना १००० रुपये दंड आकारण्यात यावा आणि या निर्देशाचे कठोरतेने पालन करावे, असेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले. कोविड नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांनी थ्री प्लाय किंवा एन ९५ प्रकारच्या मुखपट्टीचा वापर करावा, अन्य प्रकारची मुखपट्टी (मास्क) सुरक्षित नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असल्याने त्याचा उपयोग टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘ओमीक्रॉनच्या उपचार पद्धतीबाबत लवकरच निर्णय-आरोग्यमंत्री राजेश टोपे’
ओमीक्रॉनचा संसर्ग झाल्यास बाधित व्यक्तीचा विलगीकरण कालावधी आणि उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना देण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. संसर्ग वाढल्यास लागणारे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याविषयीदेखील केंद्र सरकारशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. कोविडचा संसर्ग वाढल्यास उपचारासाठी आवश्यक औषधांची उपलब्धता तातडीने करून देण्यात येईल. पात्र नागरिकांनी लशीची दुसरी मात्रा त्वरीत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. पुणे जिल्ह्याने लसीकरणाचा दीड कोटींचा टप्पा ओलांडला आहे. लशीच्या पहिल्या मात्रेचे १०४ टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे ७४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ओमीक्रॉनचे ११३ रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, चेतन तुपे, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, यशदाचे महासंचालक एस.चोक्कलिंगम, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी उपस्थित होते.

पाषाण-पंचवटी ते कोथरुड बोगद्यासाठी ७२ लाख ७० हजार रुपये खर्च करून नेमणार सल्लागार

0

पुणे-पाषाण-पंचवटी ते कोथरुडला जोडणार्या प्रस्तावित बोगद्याच्या कामासाठी पूर्व-व्यवहार्यता अभ्यास (प्री-फीजिबिलिटी स्टडी) आणि पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन (एन्हायर्नमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट) अहवाल तयार करण्यासाठी मोनार्च सर्व्हेअर अण्ड इंजिनिअरिंग कन्सलटंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यासाठी आणि सल्लागार शुल्कापोटी ७२ लाख ७० हजार रुपये देण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.रासने म्हणाले, ‘कोथरुडमधील सुतारदरा ते पाषाण पंचवटी दरम्यान बोगदा तयार करून त्यातून रस्ता काढण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. या बोगद्याचा समावेश शहराच्या विकास आराखड्यात करण्यात आलेला आहे. कोथरुड, औंध, बाणेर, पाषाण परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे.’रासने पुढे म्हणाले, ‘पाषाण-पंचवटी ते कोथरुड दरम्यानच्या प्रस्तावित बोगद्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’च्या (डीआरडीओ) हद्दीमध्ये ड्रोनद्वारे सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महापालिकेची या संपूर्ण मार्गाच्या आखणीसाठी तयारी सुरू आहे. प्रस्तावित बोगद्याचा मार्ग निश्चित झाल्यानंतर संरक्षण आणि वन विभागाच्या जागांसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. स्थायी समितीने आज पूर्व-व्यवहार्यता अभ्यास आणि पर्यावरणीय परिणाम मूल्यांकन अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीस मान्यता देण्यात आली.’

महापालिका सेवकांच्या घरभाड्यात वाढ नाही

महापालिकेतील सेवक आणि सुरक्षा रक्षकांना मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या सदनिकांची भाडेवाढ न करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याची माहिती रासने यांनी दिली.रासने म्हणाले, ‘महापालिका कर्मचार्यांच्या वेतनातून दरमहा घरभाड्याची कपात करण्यात येते. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या कपातीत दुप्पट वाढ होणार होती. परंतु या सदनिकांची दुरावस्था झाली असल्यामुळे प्रस्तावित वाढ अन्यायकारक ठरणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या इमारतींमध्ये भाडेपट्टयाने राहात असलेल्या सर्व सेवकांची सहाव्या वेतन आयोगाप्रमाणेच घरभाड्यात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.’

बाणेर पीएमपीएमएल बस चार्जिंग स्टेशनमध्ये एक कोटी पंचवीस लाख रुपयांची विद्युतविषयक विकासकामे

बाणेर येथील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस चार्जिंग स्टेशनमध्ये सुमारे एक कोटी पंचवीस लाख रुपयांची विद्युतविषयक विकासकामे करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. ‘पीएमपीएमएल बस चार्जिंग स्टेशनला वीज पुरवठा करणे आणि विद्युत विषयक कामांसाठी आवश्यक असणार्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी आठ निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी सर्वात कमी दर असणार्या निविदेला मान्यता देण्यात आली.’

बाळासाहेब ठाकरे नाट्यगृहात विद्युतविषयक कामे

‘कोथरुड येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने नव्याने नाट्यगृहाची इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतील विद्युत विषयक कामे करण्यासाठी सुमारे ७५ लाख ८५ हजार रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. इन डोअर फीटिंग, पंखे, वॉटर कुलर, पॉइंट वायरिंग, केबल टाकून विद्युत व्यवस्था, पी. ए. सिस्टिम बसविणे अशाप्रकारची कामे करण्यात येणार आहेत.

कोरोना नियंत्रणावर राज्य सरकारचे काम संथ गतीने, कामाची गती वाढवा; भारती पवारांनी टोचले कान

0

मुंबई-महाराष्ट्रात कोरोना नियंत्रणाचे काम संथ गतीने सुरू असून त्यात गती आणावी असा सल्ला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिला. केंद्राकडून सर्व प्रकारची मदत करण्यात आली. राज्याने केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जात आहेत. तरीही राज्यात कोरोना नियंत्रणाच्या कामाला गती मिळालेली नाही. यासोबत, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्या लॉकडाउनचे अधिकार सुद्धा केंद्राने राज्यांना दिले आहेत असे भारती पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे देशभर रुग्णांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात तर ही संख्या तीन पटीने वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने विविध राज्यांचा आढावा घेतला. त्यावरूनच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पत्रकार परिषद घेत संक्षिप्त माहिती दिली.मी महाराष्ट्रातूनच असल्याने राज्यातील परिस्थितीची जाणीव आहे. त्याच अनुषंगाने आधीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा झाली. सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला. परंतु, कोरोना नियंत्रणासाठी ज्या गतीने काम व्हायला हवे त्या गतीने काम होत नाही असे भारती पवार यांनी सांगितेल आहे.राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जात आहेत. कोरोनाच्या लसींचा पुरवठा सुद्धा करण्यात आला. तसेच केंद्र सरकारने कोरोना नियंत्रणासाठी निधी सुद्धा दिला. आता त्या निधीचा वापर कसा होतो हे राज्य सरकारवर विसंबून आहे. यात केंद्र सरकार कुठे कमी पडत आहे हे सांगावे. असे आव्हान सुद्धा राज्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिले.दरम्यान, प्रत्येक राज्यावर केंद्राचे बारकाईने लक्ष आहे. सर्व राज्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. अशात महाराष्ट्रात राजकीय आरोप केले जात नाहीत. असेही भारती पवार यांनी स्पष्ट केले

महाराष्ट्र खंबीर…

महाराष्ट्राचे हित, स्वाभिमान कुठल्याही परिस्थितीत जपला पाहिजे. रयतेचे हित सर्वोच्च मानून राज्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार प्रमाण मानून दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. या दोन वर्षांच्या काळात सरकारला साथ, सहकार्य दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या राज्यातील तमाम बंधुभगिनी, मातांचे, युवा मित्रांचे आभार!

अजित पवार
उपमुख्यमंत्री

सत्तास्थापनेनंतर दोन वर्षांच्या काळात राज्यावर कोरोना, अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळासारखी अनेक नैसर्गिक संकटे आली. कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर झाली. त्याचा उद्योग, व्यापार, अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. संकटे किती मोठी असली तरी महाराष्ट्र कधी खचला नाही. कुणापुढे झुकला नाही. संकटे जितकी गंभीर.. तितका महाराष्ट्र खंबीर… हा इतिहास आहे. महाराष्ट्राने आजवर प्रत्येक संकटाचा यशस्वी मुकाबला केला. महाविकास आघाडी सरकारनेही ती परंपरा कायम ठेवली. राज्यातील प्रत्येकाला सोबत, विश्वासात घेऊन सर्वांच्या मदतीने, सहकार्याने, एकजुटीने राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाचा मुकाबला करून त्यावर मात केली. प्रत्येक महाराष्ट्रवासीयाला याचा अभिमान आहे.
गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोनाचे संकट अभूतपूर्व होते. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, फार्मासिस्ट, सफाई कामगार, पोलीस, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, राज्यातल्या प्रत्येक नागरिकाने जिवाची जोखीम पत्करून कोरोनाविरोधी लढ्यात अमूल्य योगदान दिले आहे. या तमाम कोरोनायोद्ध्यांचे मी कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. मनापासून धन्यवाद देतो. आपला त्याग, योगदान महाराष्ट्र कायम लक्षात ठेवेल हा विश्वास देतो.
राज्यातील सत्तास्थापनेला आता दोन वर्षे होत आहेत. या दोन वर्षांच्या कालावधीत अनेक संकटांच्या बरोबरीने आर्थिक आव्हानेही उभे राहिली. या आव्हानांचा सामना करताना राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही, राज्यातली विकासकामे थांबणार नाहीत. विकासाची प्रक्रिया अखंड, निरंतर सुरू राहील, याची संपूर्ण काळजी घेण्यात आली. रस्ते, रेल्वे, मेट्रो, कोस्टलरोड, उड्डाणपुलांसारख्या पायाभूत प्रकल्पाची कामे गतिमान करण्यात आली. पायाभूत प्रकल्पांच्या निर्मितीबरोबरच नागरिकांचे रोजचे जगणे सुसह्य होईल, यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. धोरणे आखून अंमलबजावणी करण्यात आली.
राज्यातील लोकप्रतिनिधींना जनतेची सेवा करता यावी यासाठी बळ देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले. विधिमंडळात निवडून येणारे लोकप्रतिनिधी राज्यातील कोट्यवधी जनतेचे प्रतिनिधित्व करतात. या विधानसभा, विधानपरिषद सदस्यांच्या स्थानिक विकास निधीत दोन वर्षात 1 कोटींवरून 4 कोटी रुपयांची भरभक्कम वाढ करण्यात आली. देशातील खासदारांचा निधी गोठवण्यात आला असताना राज्य सरकारने आमदार विकास निधीत वाढ करून स्थानिक विकास निधीची गरज व महत्त्व अधोरेखित केले.

शेतकरी कर्जमुक्ती योजना
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019ची यशस्वी अंमलबजावणी केली. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 दरम्यान कर्ज घेतलेल्या व 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत तसेच पुनर्गठण केलेल्या सर्व शेतकर्‍यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले. कर्जदार शेतकर्‍यांकडे किती जमीन आहे (अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक) अशी अट न ठेवता बँका व सेवा सहकारी संस्थांमार्फत घेतलेले दोन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात आले.

बिनव्याजी पीककर्ज
पीककर्जाची वेळेत परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी 3 लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याची योजना लागू केली. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना आणली. शेतकर्‍यांना कृषिपंप वीज जोडणी देण्याकरिता महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल उपलब्ध करून दिले.
थकीत वीजबिलात शेतकर्‍यांना 33 टक्के सूट, उर्वरित थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा भरणा मार्च 2022 पर्यंत केल्यास उर्वरित 50 टक्के रकमेची अतिरिक्त माफी. 44 लाख 37 हजार शेतकर्‍यांना मूळ थकबाकी रकमेच्या 66 टक्के या प्रमाणात एकूण 30 हजार 411 कोटी रुपयांची थकबाकी माफ केली.

आपत्तिग्रस्तांच्या मदतीसाठी पॅकेज
राज्य सरकारने अतिवृष्टी, महापुराने नुकसान झालेल्या राज्यातील आपत्तिग्रस्तांच्या मदतीसाठी या वर्षी 10 हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे. गेल्या वर्षी 11 हजार 500 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी दीड हजार कोटी रुपये आर्थिक मदतीच्या स्वरूपात, तीन हजार कोटी रुपये पुनर्बांधणीच्या कामांसाठी उपयोगात आणले जात आहेत उर्वरित सात हजार कोटी रुपये आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना, आपत्ती सौम्यीकरणाच्या कामासाठी खर्च केले जात आहेत.
आपत्तिग्रस्त बांधवांना एनडीआरएफच्या निकषांच्या पुढे जाऊन सानुग्रह अनुदान म्हणून प्रतिकुटुंब 10 हजार रुपये, दुकानदारांसाठी 50 हजार रुपये, टपरी धारकांसाठी 10 हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे. घर पूर्णपणे पडले असल्यास दीड लाख रुपये, घराचे पन्नास टक्के नुकसान झाले असल्यास 50 हजार रुपये, घराचे 25 टक्के नुकसान असल्यास 25 हजार, अंशत: नुकसान झालेल्या घरासाठी किमान 15 हजार रुपयांची मदत दिली जात आहे.
अतिवृष्टी, दरड कोसळण्यासारख्या दुर्घटनांमध्ये मृत्यू पावलेल्या बांधवांच्या वारसांना एसडीआरएफच्या निकषांनुसार 4 लाख रुपये, मुख्यमंत्री रीलिफ फंडातून 1 लाख रुपये, ज्यांच्या नावावर सातबारा आहे अशा शेतकर्‍यांसाठी गोपीनाथ मुंडे अपघात विमा रकमेतून 2 लाख रुपये, प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेले 2 लाख रुपये आर्थिक मदत दिली जात आहे.

कोविड प्रतिबंधासाठीचे निर्णय
कोविडविरोधी लढ्याला आर्थिक बळ देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 30 टक्के निधी ‘कोविड’वरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी, इतर व्यवस्थेसाठी खर्च करण्याची परवानगी जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली. याद्वारे राज्यभरातून कोविडविरोधी लढ्याला 3 हजार 300 कोटी रुपये एवढा निधी यासाठी उपलब्ध केला. आमदार स्थानिक विकास निधीतून एक कोटीचा निधी ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजनांसाठी आपापल्या मतदारसंघात खर्च करण्यास आमदारांना परवानगी देण्यात आली.
‘कोरोना’ संकटकाळात जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने अन्न सुरक्षा योजनेंतर्गत राज्यातल्या सात कोटी लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ देण्यासाठी 90 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
आरोग्य सेवेसाठी तरतूद
आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी, राज्याच्या अर्थसंकल्पात 7 हजार 500 कोटी रुपये घोषित करण्यात आले असून, येत्या तीन वर्षांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. महानगरपालिका, नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये दर्जेदार आरोग्य सेवांसाठी पाच वर्षात 5 हजार कोटी रुपये, त्यापैकी 800 कोटी रुपये या वर्षी उपलब्ध करण्यात येत आहेत. कर्करोगाच्या निदानासाठी राज्यभर 150 रुग्णालयांमध्ये सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, तसेच अमरावती व परभणी येथेही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत. सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या 100 जागांना केंद्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मान्यताही मिळाली आहे.

शिवभोजन थाळीचा आधार
राज्यातील एकही गरीब, गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी ‘शिवभोजन थाळी योजना’ लागू केली. कोरोना निर्बंधकाळात राज्यात दररोज दोन लाख शिवभोजन थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले. त्यासाठी 75 कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले.

सामाजिक न्याय विभागातर्फे मदत
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्यावतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्रपुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन या पाच योजनांच्या राज्यातील 35 लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी 1 हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य आगाऊ दिले. त्यासाठी 961 कोटी रुपये थेट बँक खात्यात वर्ग करण्यात आले.
राज्यातील 12 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दीड हजारांप्रमाणे 180 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. घरकाम करणार्‍या राज्यातील 25 लाख नोंदणीकृत घरेलू कामगारांना कोरोना संकटकाळात 375 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. राज्यातील 5 लाख नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे 75 कोटी रुपये, तर 12 लाख परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे 180 कोटींची मदत राज्य सरकारकडून देण्यात आली.

राज्याच्या रस्ते विकासावर भर
नांदेड ते जालना हा 200 कि.मी. लांबीच्या 7 हजार कोटी रुपये अंदाजित खर्चाचा द्रुतगती जोड महामार्ग, पुण्याबाहेरून चक्राकार मार्गाची (रिंग रोड) उभारणी, 170 कि.मी. लांबीच्या 26 हजार कोटी रुपये अंदाजित खर्चाचे काम, रायगड जिल्ह्यातील रेवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी या 540 कि.मी. लांबीच्या 9 हजार 573 कोटी खर्चाच्या सागरी मार्गाचे काम, ग्रामीण सडक विकास योजनेंतर्गत ग्रामीण रस्ते विकासाची 40 हजार कि.मी. लांबीची कामे हाती पूर्णत्वास नेण्यात येत आहेत.

रेल्वे विकासालाही गती
पुणे-नाशिक या मध्यम अतिजलद रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात येत असून या मार्गाची प्रस्तावित लांबी 235 कि.मी., गती 200 कि.मी. प्रतितास, अपेक्षित खर्च 16 हजार 39 कोटी रुपये आहे.

ग्रामविकासातून प्रगतीला गती
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकूल योजनांसाठी 6 हजार 829 कोटी 52 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईच्या विकासाचे प्रकल्प
शिवडी-न्हावा शेवा प्रकल्प सप्टेंबर 2022 मध्ये पूर्ण करण्याचे तसेच वरळी ते शिवडी उड्डाणपुलाचे काम 3 वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 40 हजार कोटी खर्चाचा व 126 कि.मी. लांबीच्या विरार ते अलिबाग प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. ठाणे कोस्टल रोडचे काम सुरू असून 15 कि.मी. लांबीच्या या मार्गासाठी 1 हजार 250 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वसई ते कल्याण या जलमार्गावर वाहतूक सुरू करण्याचे नियोजन.
वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतूचे काम वेगाने सुरू आहे. वांद्रे-वर्सोवा-विरार सागरी सेतूचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. गोरेगाव-मुलुंड लिंकरोडच्या कामासही गती देण्यात येत आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून ते 2024 पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. वरळी, वांद्रे, धारावी, घाटकोपर, भांडुप, वर्सोवा व मालाड येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्याबरोबरच मिठी, दहिसर, पोईसर व ओशिवरा नद्या पुनरुज्जीवित करण्यात येत आहे.

महिला व बालविकासाच्या योजना
राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेंतर्गत गृहखरेदीची नोंदणी कुटुंबातील महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत देण्याचे विचाराधीन आहे. ग्रामीण विद्यार्थिनींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना कार्यान्वित केली आहे. राज्य परिवहन महामंडळास पर्यावरणपूरक दीड हजार सीएनजी व हायब्रीड बस, मोठ्या शहरात महिलांना प्रवासासाठी तेजस्विनी योजनेत विशेष महिला बस उपलब्ध करण्यात येत आहेत.
महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 3 टक्के नियतव्यय राखीव. राज्य राखीव पोलीस दलाचा राज्यातील पहिला स्वतंत्र महिला गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बहुजन कल्याणासाठी प्रयत्नशील
महाज्योती, सारथी व बार्टी या संस्थांना प्रत्येकी 150 कोटी रुपये, श्री. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासाठी 100 कोटी रुपये, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळास 50 कोटी रुपये, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळास 100 कोटी रुपये, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाला 100 कोटी रुपये, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींकरिता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकूल योजना राबवण्यात येत आहे.

मंदिरांचे जतन व संवर्धन
राज्यातील धूतपापेश्वर मंदिर (ता. राजापूर, जि. रत्नागिरी), कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), एकविरा माता मंदिर, कार्ले (ता. मावळ, जि.पुणे), गोंदेश्वर मंदिर (ता. सिन्नर, जि. नाशिक), खंडोबा मंदिर, सातारा (ता. जि. औरंगाबाद), भगवान पुरुषोत्तम मंदिर, पुरुषोत्तमपुरी (ता. माजलगाव, जि.बीड), आनंदेश्वर मंदिर, लासूर (ता. दर्यापूर, जि. अमरावती), शिव मंदिर, मार्कंडा (ता. चामोर्शी, जि.गडचिरोली), या मंदिरांचे जतन, संवर्धन करण्यासाठी 101 कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

तीर्थक्षेत्र विकास आणि स्मारके
श्रीक्षेत्र परळी वैजनाथ (ता.परळी, जि.बीड), श्रीक्षेत्र औंढा नागनाथ (ता.औंढा, जि. हिंगोली), श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक), श्रीक्षेत्र भीमाशंकर (ता. खेड, जि. पुणे) या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरिता विशेष निधी उपलब्ध करण्यात आला आहे. श्रीक्षेत्र जेजुरी गड (ता. पुरंदर, जि. पुणे), श्रीक्षेत्र बिरदेव देवस्थान, श्रीक्षेत्र निरा नृसिंहपूर (ता. इंदापूर, जि. पुणे), आरेवाडी (ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली) या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांकरिताही निधीची तरतूद केली आहे.
श्रीक्षेत्र मोझरी आणि श्रीक्षेत्र कौंडण्यपूर (ता. तिवसा, जि. अमरावती), संत गाडगेबाबा निर्वाणभूमी, वलगाव (ता.जि. अमरावती) येथे मूलभूत सुविधा आराखड्यांकरिता, श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी गड (ता. कळवण, जि. नाशिक), संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर, त्र्यंबकेश्वर (ता.त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक), श्रीक्षेत्र भगवानगड (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), श्रीक्षेत्र नारायण गड व श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड (ता. पाटोदा, जि. बीड) या तीर्थक्षेत्रांच्या विकासाकरिता भरीव निधी उपलब्ध करण्यात येत आहे.
मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड, पाली व सिद्धटेक या श्रद्धास्थानांच्या विकासासाठी अष्टविनायक तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत निधीची उपलब्धता केली आहे. संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थान श्रीक्षेत्र नरसी नामदेव (ता.जि. हिंगोली) तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी निधी देण्यात येत आहे. संत बसवेश्वर महाराजांच्या स्मरणार्थ मंगळवेढा, जि. सोलापूर येथे स्मारक उभारण्यात येत आहे. श्रीक्षेत्र पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशिम) विकास निधी उपलब्ध केला आहे. बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेमध्ये 10 कोटी रुपयांची भर टाकण्यात आली आहे.

रस्त्यांची कामे
केंद्र सरकारचे रस्ते परिवहन, महामार्ग मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) व महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून राज्यात रस्ते विकासाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. पुणे शहरातील कात्रज चौक उड्डाणपूल तसेच, इंद्रायणी नदी ते खेड मार्गाचे सहा पदरीकरण, शिक्रापूर ते न्हावरा सुधारित रस्ता, न्हावरा ते आढळगाव उन्नतीकरण झालेला रस्ता, खेड घाट रस्त्याची, राज्य महामार्ग 60 वरील खेड-सिन्नर रस्त्यावरील नारायणगाव बायपासची पुनर्रचना, तसेच इतर राष्ट्रीय महामार्गावरील कामांचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले असून, या रस्त्यांच्या कामांनी वेग घेतला आहे.
केंद्र सरकारच्या सहकार्याने पुण्यात कात्रज जंक्शन येथे 170 कोटी खर्चून सहा पदरी उड्डाणपुलाची उभारणी, आढळगाव ते जामखेड महामार्गाच्या दोन लेनच्या चौपदरीकरणासाठी 400 कोटी रुपये मंजूर असून या 62.77 कि.मी. मार्गाचे दोन लेनमध्ये चौपदरीकरण कामाचे भूमिपूजन झालं आहे. नगर-सोलापूर 516 (अ) या नवीन चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची निविदा निघाली आहे. नगर सोलापूर व आढळगाव ते जामखेड हे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग विकासाला दिशा देणारे ठरणार आहेत.

महाराष्ट्राची अविरत घोडदौड
महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य राहिले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, स्वातंत्र्योत्तर जडणघडणीत केंद्रस्थानी राहून महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक, सहकार चळवळींचे नेतृत्व महाराष्ट्राने केले आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राने नेहमीच मोलाचा वाटा उचलला आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर अथक, निरंतर चालत राहण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांवरच महाराष्ट्राची वाटचाल राहिली आहे. तो विचार, वारसा, परंपरा पुढे नेण्याचे कार्य राज्यातील महाविकास आघाडी सरकार करत आहे.
महाविकास आघाडी सरकार दोन वर्षांपूर्वी एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत स्थापन झाले. स्थापनेपासून दोन वर्षांच्या कालावधीत राज्यासमोरील प्रत्येक आव्हानावर मात करण्याचा, जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांवर खरे उतरण्याचा, जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने निष्ठापूर्वक, प्रामाणिकपणे केला व त्यात यशही मिळाले. कृषी, उद्योग, वीज, व्यापार, शिक्षण, सहकार, साहित्य, कला, नाट्य, संस्कृती, पर्यटन अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम राहावे; राज्यातल्या नागरिकांमध्ये एकता, समता, बंधुतेची भावना वाढावी, सर्व समाजघटकांना विकासाची समान संधी उपलब्ध व्हावी, महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील प्रत्येकजण प्रयत्नशील आहे. जनतेची सरकारला मनापासूनची साथ, सहकार्य मिळत आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्रवासी समस्त बंधु-भगिनींचे, युवक मित्रांचे आभार मानतो.

शब्दांकन : संजय देशमुख,
उपमुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी

महिला स्वच्छतागृहे सुधारा .. रुपाली चाकणकरांनी महापालिका आयुक्तांना दिला कडक इशारा

0

महापालिकेत ,प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात आणि आस्थापनेत महिला सुरक्षा समिती हवीच ..अन्यथा … रुपाली चाकणकर

पुणे: जिथे १० कर्मचारी आहेत मग ते पुरुष असो वा स्त्री तिथे तिथे महिला सुरक्षा समिती हवीच पुणे महापालिकेत तसेच महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाने आणि पुण्यातील प्रत्येक खाजगी आस्थापनांनी याची वेळीच नोंद घ्यावी अन्यथा …. कारवाई होणारच .. असा इशारा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे

 पुणे महानगरपालिकेत आज राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी भेट दिली.जिल्ह्यातील महिलांच्या समस्या सोडवण्याची सुरुवात चाकणकर यांनी केली. महापालिका महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींवर रुपाली चाकणकर यांनी लक्ष देत संबंधित महिलांना न्याय देण्यासाठी त्यांनी कमिटी देखील तयार केली आहे. सोबतच, जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातही तिथल्या महिला अधिकाऱ्यांना महिलांच्या समस्येबाबत कारवाई करण्यासाठी कमिटी गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयात अशा प्रकारची कमिटी नसेल तर ५० हजार रुपये दंड करण्यात येईल, असा कडक पावित्रा चाकणकर यांनी घेतला आहे.शिवाय, जिल्ह्यातील महिला स्वच्छतागृहांबाबतही चाकणकर यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. महिला स्वच्छतागृहांमध्ये केअर टेकर जर महिला नसेल, पुरुष केअर टेकरकडून कोणत्याही प्रकारचा त्रास दिला गेला असेल तर त्या महिलांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल करावी. महिला स्वच्छतागृहांना सुधारलं जाईल असंही त्या म्हणाल्यात. तेजस्विनी या महिला स्पेशल बसमधून कधीही कोणत्याही पुरुषानं प्रवास करणं चालणार नाही. तसं आढळल्यास महिला आयोग, pmpml कार्यालय यांच्याकडे तक्रार दाखल करता येईल. pmpml मध्ये मोठ्या प्रमाणावर अनुकंप तत्वावर महिला कर्मचारी आहेत.स्वारगेट, हडपसर, कात्रज, कोथरूड या प्रमुख चार ठिकाणी महिला स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय दयनीय आहे. त्या ठिकाणी संबंधित pmpml अधिकाऱ्यांनी लक्ष घालून स्वच्छतागृह वापरण्यायोग्य करून घ्यावीत, कचरा साफ करून घ्यावा असे आदेश देण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे, कामावरून काढून टाकण्याच्या, काम न मिळण्याच्या, करिअर संपण्याच्या भीतीनं महिला त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत नाहीत. या सगळ्या मुद्द्यांचीही काळजी घेत घटना हाताळल्या जातील. असा विश्वास चाकणकर यांनी दिला.खासगी किंवा सरकारी यंत्रणेत किंवा कंपनीत काम करणाऱ्या महिलांवरील अत्याचाराबाबत त्या-त्या क्षेत्रीय कार्यालयात त्या तक्रार दाखल करू शकतील. त्यांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. त्रास देणारी वरिष्ठ महिला अधिकारी असेल तरी ती आरोपीच आहे, म्हणून तिच्यावरही कारवाई केली जाईल. कंपनीचा दोष आढळल्यास कंपनी टर्मिनेट करण्यात येईल. त्रास देणारे अधिकारी, बॉस यांना त्यांच्या पदावरून हात धुवावा लागेल. महिला समस्या, त्रास, अत्याचार यांबाबत राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर आक्रमक पावित्र्यात आहेत.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

0

मुंबई- आता राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, सोमवारी त्यांनी मुंबई आणि नवी मुंबईतील विकासकामांची केली पाहणी केली होती.

“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या,” असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 1,71,830;गेल्या 24 तासात 37, 379 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

0

नवी दिल्ली -आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालांनुसार भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अंतर्गत गेल्या 24 तासांत लसीच्या  जवळपास  1 कोटी (99,27,797)  मात्रा देण्यात आल्या असून आतापर्यन्त एकूण 146 कोटी 70  लाख (146,70,18,464) मात्रा देण्यात आल्या आहेत. 1,57,38,732 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या 24 तासांत 11,007  रुग्ण बरे झाल्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येत (महामारीच्या आरंभापासून ) वाढ होऊन ती संख्या 3,43,06,414 झाली आहे.परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.13 % इतका आहे.भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 1,71,830 आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.49 % आहे.देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 11,54,302 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आत्तापर्यंत एकूण 68.24 कोटींपेक्षा जास्त (68,24,28,595 ) चाचण्या केल्या आहेत.देशभरात चाचणी क्षमता वाढवली जात असताना, देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.05 % आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.24 % इतका नोंदविण्यात आला आहे.

भाजप खासदार मनोज तिवारी यांनाही कोरोनाची लागण

0

नवी दिल्ली: देशात महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वाधिक कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्ण सापडत आहेत.दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता भाजप खासदार मनोज तिवारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.भाजप नेते मनोज तिवारी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्यास सांगितले

जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वर्चस्व राष्ट्रवादीचेच पण ….राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या कंद यांनी मात्र विजय मिळविला .

0

पुणे: जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वर्चस्व राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा एकदा यश मिळवलं आहे. मात्र, सुरेश घुले यांच्या पराभवामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का बसला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विकास दांगट यांनी विद्यमान संचालक व राष्ट्रवादीचेच ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के यांचा पराभव केला आहे.पुणे जिल्हा बँकेच्या 14 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. तर उर्वरीत 7 जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक लक्ष्य लागून राहिलेल्या ‘क’ सहकारी बँका व पतसंस्था गटाकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान आज मंगळवारी अल्पबचत भवानात मतमोजणीत पार पडली. यामध्ये भाजपचे उमेदवार प्रदिप कंद 405 तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश घुले यांना 391 मते मिळाली आहेत.विद्यमान संचालक सुरेश घुले यांचा पराभव हा अजित पवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी घुले यांचा पराभव केला आहे. घुले यांच्या विजयासाठी स्वत: अजित पवार मैदानात उतरले होते. कंद यांना जागा दाखवून द्या, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं. मात्र, त्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला नसल्याचं दिसून आलं आहे. कंद यांना ४०५ आणि घुले यांना ३९१ मते मिळाली. कंद यांना बारामतीमधूनच निर्णायक ५२ मते मिळाली आहेत.

जिल्हा बँकेची निवडणूक एकूण २१ जागांवर झाली. त्यापैकी १४ जागा आधीच निवडून आल्या आहेत. त्यात राष्ट्रवादीचे ११, काँग्रेसचे २ व भाजपच्या एका संचालकाचा समावेश आहे. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, संग्राम थोपटे, संजय जगताप, दिलीप मोहिते, रमेश थोरात, संजय काळे, आप्पासाहेब जगदाळे, माऊली दाभाडे, रेवनाथ दारवटकर, प्रविण शिंदे, संभाजी होळकर, दत्तात्रेय येळे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळं ही बँक पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार हे आधीच स्पष्ट झाले होते.उर्वरित सात जागांवर झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. त्यापैकी तीन जागांवर सुनील चांदेरे, अशोक पवार व विकास दांगट हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळं बँकेच्या संचालक मंडळात राष्ट्रवादीची संख्या १४ झाली आहे. तर, उर्वरित सात जणांमध्ये इतर पक्षांचे सदस्य आहेत.

मुंबई आणि ठाण्यानंतर औरंगाबादेतही देणार पाचशे चौरस फूटाच्या घरांना मिळकत कर माफी -पुण्याचे काय ?

0

मुंबई- मुंबई आणि ठाण्यात पाचशे चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. ही याेजना राज्यातील सर्वच शहरांमध्ये टप्प्याटप्प्याने राबवण्यात येईल. औरंगाबाद महापालिकेच्या क्षेत्रातही ही योजना राबवता येईल, अशी माहिती राज्याचे उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी साेमवारी औरंगाबादेत दिली.

१५ ते १८ वयाेगटातील मुला-मुलींच्या लसीकरणाचा प्रारंभ साेमवारी औरंगाबादेत पालकमंत्री देसाईंच्या हस्ते झाला. या वेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. राज्य सरकारने मुंबई-ठाण्याबाबत निर्णय घेतल्यानंतर आता राज्यातील सर्वच शहरांमधून करमाफीचा निर्णय घेण्याबाबत मागणी जाेर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ‘औरंगाबादसाठीही असा निर्णय घेतला जाणार का?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा देसाई म्हणाले, ‘मुंबईने यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. हळूहळू इतर शहरांसाठीदेखील अशाच प्रकारचा निर्णय घेतला जाईल.’

दरम्यान, राज्यातील इतर शहरांमधील घरांना करमाफीचा निर्णय झाल्यास औरंगाबादेतील सिडको-हडकोवासीयांसह अनेक छोट्या गरीब आणि मध्यमवर्गीय वस्त्यांना दिलासा मिळू शकतो. मनपा क्षेत्रात ८०० ते १००० चौरस फुटांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या घरांना व मालमत्तांना ही सूट मिळावी यासाठी आम्ही पाठपुरावा करत असल्याचे राजेंद्र दाते पाटील यांनी सांगितले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोना

0

नवी दिल्ली-दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोना झाला आहे. केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. संसर्ग झाल्याची माहिती मिळताच त्यांनी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. अरविंद केजरीवाल पंजाब आणि उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाचा प्रचार करत आहेत. सोमवारी केजरीवाल यांनी डेहराडूनमध्ये सभा घेतली होती.

केजरीवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, त्यांना संक्रमणाचे सौम्य लक्षण आहेत आणि सध्या ते घरीच क्वारंटाइन झाले आहेत. केजरीवा यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

 ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सौम्य लक्षणं आहेत. स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनीही कृपया स्वतःला विलगीकरणात ठेवा आणि स्वतःची चाचणी करून घ्या.’

दिल्लीमध्ये सोमवारी कोरोनाची 4,099 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. रविवारच्या तुलनेत 28 टक्क्यांनी जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कोविड-19 मुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. संसर्गाचं प्रमाण 6.46 टक्क्यांवर पोहोचले आहे.

निवडणुकांपूर्वी कारवाईचा बडगा आयकर विभागाचे ACE बिल्डर्स ग्रुपवर ४० ठिकाणी छापे

0

अखिलेश यादव यांचे जवळचे मित्र आहेत ACE बिल्डर्सचे मालक अजय चौधरी

नवी दिल्ली -उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या आणखी एका मित्राच्या घरावर तसेच कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. ACE ग्रुपचे CMD अजय चौधरी यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ACE ग्रुप दिल्ली, नोएडा आणि आगरा यासह 40 ठिकाणी आयकर विभागाने छापा टाकला आहे.

ACE बिल्डर्सचे मालक अजय चौधरी हे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे जवळचे मित्र आहेत. दिल्ली आणि NCR तील दिग्गज बिल्डर्स अजय चौधरीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डर्स अजय चौधरींच्या कार्यालयावर मोठी छापेमारी करण्यात आली आहे. यापुर्वी देखील उत्तर प्रदेशमध्ये आयकर विभागाने कारवाई केली होती. कन्नौज येथील अखिलेश यादव यांचे जवळचे मित्र आणि एमएलसी पुष्पराज जैन पंपी यांच्यावर देखील आयकर विभागाने छापा टाकला होता.


समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आयकर विभागाच्या छाप्यावरुन आपली प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, अनेक जण आम्हाला सांगत होते की, निवडणुकांपूर्वी समाजवादी पार्टीच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी त्यांच्यावर आयकर विभागाची छापेमारी करण्यात येणार आहे. त्यावरुन अखिलेश यांनी भाजपवर टीकास्त्र केले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काही महिन्यांवरच आली असता, समाजवादी पार्टीवर होणाऱ्या कारवाईमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे अभिवादन

0

मुंबई, दि. 3 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपस्थितांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 स्त्री शिक्षणाच्या अध्वर्यू क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले आहे. तसेच महिला व बालविकास विभागाच्या वतीने साजरा करण्यात येणारा ‘सावित्री उत्सव’ आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीने साजरा करण्यात येत असलेल्या ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानालाही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, क्रांतिज्योति सावित्रीबाई यांचे स्त्री शिक्षणासाठीचे योगदान चिरंतन असे आहे. सावित्रीबाईंच्या कर्तृत्वामुळेच स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्ग खुला झाला. या शिक्षित पिढ्यांतून आलेल्या अनेक माता-भगिनी, विदुषींनी आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत मोठा आणि अभिमानास्पद असा वाटा उचलला आहे. आपल्या कर्तबगारीने महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. यापुढेही स्त्रीशिक्षण, महिला सक्षमीकरण यात राज्य अग्रेसर राहील यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यासाठी सावित्रीबाईंच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान, गौरव वाढेल याकरिता अनेकविध योजना, उपक्रम राबवण्यावर भर राहील हेच त्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.

सर्व महापालिकांच्या आवश्यक बैठका ऑनलाइन पद्धतीनेच घ्या!

0

मुंबई -आता महाराष्ट्र सरकारने सर्वच महानगरपालिकांना त्यांच्या बंधनकारक तसेच वैधानिक सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे आदेश दिले आहेत.मुंबईसह राज्यात ओमायक्रॉन आणि कोरोना रुग्णांची संख्या दिवेंदिवस झपाट्याने वाढत आहे. शासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन मोठ्या प्रमाणातील एकत्रिकरण टाळण्यासाठी काही निर्बंध जारी केले आहेत. यानुसार, मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या बैठका, (बंधनकारक आणि वैधानिक) महासभा, स्थायी समिती व इतर समित्यांच्या बैठका व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्यमातून/ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्या.

यासोबतच, एका महिन्यांनंतर राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. यानंतरच पुढील निर्णय कळविला जाईल असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मुंबईत 10 वी, 12 वी वगळता शाळा बंद

मुंबईत कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पहिली ते नववी पर्यंतच्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 31 जानेवारीपर्यंत या शाळा बंद राहतील. तर 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग खुले राहतील. यासोबतच, लसीकरणासाठी 15 वर्षांपुढील विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागणार आहे.

महाविकास आघाडी सरकारमुळे मराठी अधिकाऱ्यांचे नुकसान – भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची टीका

0

पुणे-राज्य सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांना आयएएस दर्जा देण्यासाठीच्या प्रक्रियेतील बैठकीस राज्यातील तीन वरिष्ठ अधिकारी वेळेत पोहोचले नाहीत व त्यामुळे मराठी अधिकाऱ्याची आयएएस होण्याची संधी हुकल्याची घटना धक्कादायक आहे. आघाडी सरकारच्या बेफिकीरमुळे मराठी अधिकाऱ्यांचे नुकसान होत असून मराठीच्या मुद्द्यावर आवाज उठविणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचे याबद्दल काय म्हणणे आहे, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी केला.
ते म्हणाले की, राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना नामनिर्देशनाने आयएएस दर्जा मिळविण्याची संधी असते. कामाचे चांगले वार्षिक अहवाल असलेल्या अधिकाऱ्यांना परीक्षा आणि मुलाखतीचे टप्पे ओलांडून आयएएस होता येते. त्यासाठी राज्याकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावे लागतात आणि उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यात केंद्रातील अधिकाऱ्यांसोबत राज्यातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना सहभागी व्हावे लागते. डिसेंबर २०२१ मध्ये अशा एका संधीच्या वेळी राज्यातील मुख्य सचिव आणि दोन वरिष्ठ सचिव मुलाखतीच्या टप्प्यासाठी वेळेत गेले नाहीत व त्यामुळे संबंधित मराठी अधिकाऱ्याची आयएएस होण्याची संधी हुकली. आता पुन्हा ही प्रक्रिया पार पडेल तोपर्यंत थांबावे लागेल. महाविकास आघाडी सरकारचा एकूण कारभार बेफिकीरीचा आहे आणि या सरकारचे अधिकाऱ्यांवर नियंत्रण नाही यामुळे ही समस्या निर्माण झाली.
त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना आयएएस अधिकारी होण्याची संधी मिळण्यासाठी मुळात राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे वेळेत प्रस्ताव पाठविणे आवश्यक असते. अशा पात्र अधिकाऱ्यांचे २०२० चे प्रस्ताव २०२१ संपले तरीही पाठविले नसल्याची आपली माहिती आहे. अशा दिरंगाईमुळे मराठी अधिकाऱ्यांना संधी मिळण्यास विलंब होतो. याची जबाबदारी असलेल्या सचिवांवर महाविकास आघाडी सरकारचे नियंत्रण नाही आणि आघाडी सरकारच्या बेफिकीरीचाही वरिष्ठ अधिकारी फायदा उठवत आहेत.

राज्याकडून वेळेत प्रस्ताव पाठवले नाहीत किंवा राज्याचे सचिव मुलाखतीची परीक्षा घेण्यासाठी वेळेत उपस्थित राहिले नाहीत तर आयएएसमधील मराठी टक्का वाढविण्याची संधी आपणच हातची घालवतो. पण त्याची चिंता आघाडी सरकारला विशेषतः मराठीच्या मुद्द्यावरून आवाज उठविणाऱ्या शिवसेनेलाही नाही. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानाही मराठी अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे, असेही ते म्हणाले.