Home Blog Page 2128

70 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा छडा :दोन व्यावसायिकांना अटक

0

मुंबई- विभागाच्या नवी मुंबई सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 70 कोटी रुपयांच्या  वस्तू आणि सेवा कराचा समावेश असलेल्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा छडा लावला आहे. यामध्ये 14 हून अधिक व्यावसायिक कंपन्यांचा समावेश असून मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पुणे आणि नागपूर शहरांमध्ये त्यांचे जाळे पसरले आहे. त्यांनी वस्तू किंवा माल  न पुरवता  385 कोटींहून अधिक रुपयांच्या बोगस पावत्या जारी केल्या होत्या.

मुंबई सीजीएसटी विभागाच्या केंद्रीय गुप्तवार्ता  विभागाकडून  मिळालेल्या माहितीनुसार  कारवाई करत या  अधिकाऱ्यांनी दोन व्यावसायिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकांपैकी एक मेसर्स ओम्निपोटेंट इंडस्ट्रीज लिमिटेडचा संचालक आहे ज्याने अलीकडेच पब्लिक इश्यू आणला होता आणि दुसरा  मेसर्स श्री बिटुमॅक्स ट्रेडिंगचा मालक आहे.

बिटुमेन, अॅस्फाल्ट, ऑइल शेल आणि टार सँड इत्यादींच्या व्यापारासाठी दोन्ही संस्था जीएसटी बरोबर नोंदणीकृत आहेत आणि सीजीएसटी  कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तू किंवा सेवा न मिळवता अनुक्रमे 20.75 कोटी रुपये आणि 11.31 कोटी रुपयांचे  इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) फसवणुक करून मिळवले आहे किंवा इतरांना दिले आहे.  या दोन्ही कंपन्या अस्तित्वात नसलेल्या संस्थांकडून बनावट आयटीसी मिळवत होत्या आणि ते या नेटवर्कमधील  इतर कंपन्यांना देत होत्या. इतर 12 कंपन्यांनी  38 कोटी रुपयांच्या बनावट आयटीसीचा लाभ घेतला आहे किंवा इतरांना दिला आहे.

संचालक आणि मालक दोघांनाही सीजीएसटी  कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत कलम 132  चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आणि आज वाशी इथल्या प्रथम वर्ग  न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.  त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली  आहे. मोठ्या प्रमाणावर अधिकार असलेल्या या उद्योगांना नोव्हेंबर 2021 मध्ये पब्लिक लिस्टिंग मिळाले होते  आणि बनावट आयटीसी नेटवर्कमधून मिळवलेल्या  निधीचा  इतर आर्थिक लाभांसाठी  गैरवापर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पुढील तपास सुरु  आहे आणि इतर सक्तवसुली  संस्थांना देखील त्यांच्या बनावट व्यवहारांची माहिती दिली जाईल.

सीजीएसटी मुंबई विभागाने  सुरू केलेल्या विशेष कर चुकवेगिरी विरोधातील मोहिमेचा हा  एक भाग आहे. या विशेष मोहिमेमध्ये, अधिकाऱ्यांचा एक प्रशिक्षित गट  बनावट आयटीसी  नेटवर्क आणि कर चुकवेगिरीचा छडा लावण्यासाठी  डेटा अनॅलिटीक्स  आणि नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करत आहे.गेले  चार महिने सुरु असलेल्या या मोहिमेदरम्यान, 500 हून अधिक करचुकवेगिरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ज्यात 40 जणांना अटक करण्यात आली आहे, 4550 कोटी रुपयांची कर चुकवेगिरी आढळून आली आहे. आणि 600 कोटी रुपये कर वसूल करण्यात आला आहे.

अलीकडेच 3.01.2022 रोजी, ठाणे सीजीएसटी  आयुक्तालयाच्या अधिकार्‍यांनी एका पिता-पुत्र जोडीला 22 कोटी रुपयांचे बनावट आयटीसी  नेटवर्क चालवल्याबद्दल अटक केली होती. 5.1.2022 रोजी, मुंबई सेंट्रल आयुक्तालयाच्या अधिकार्‍यांनी मेसर्स नूर टिंबरचा मालक असलेल्या लाकूड व्यापाऱ्याला  अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून 5.47 कोटी रुपयांचे  बनावट आयटीसी मिळवल्याबद्दल अटक केली होती.

मुंबई विभागाचे  अधिकारी डिजिटल अर्थव्यवस्थेशी संबंधित व्यवसाय व्यवहार जसे की ऑनलाइन गेमिंग, नॉन फंगीबल टोकन्स, ई-कॉमर्स सारख्या संभाव्य कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यवहारांचे  बारकाईने विश्लेषण करत आहेत. अलीकडे, सीजीएसटी  मुंबई विभाग  आणि क्रिप्टो चलन एक्सचेंज  वझीरएक्सने करचुकवेगिरी केल्याचे देखील आढळून आले आणि तपासादरम्यान 49.2 कोटी रुपये जीएसटी वसूल  करण्यात आला.   येत्या काळात  फसवणूक करणार्‍याविरुद्ध  तसेच करचुकवेगिरी विरोधातील  मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे मुंबई विभागाच्या सीजीएसटी आणि सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त राजीव गर्ग यांनी म्हटले आहे.

बोनालासाहेब , खूप झालं तुमचं – सेनेचा कडक इशारा

0

अगोदर उड्डाणपूल उभारायचे अन नंतर मेट्रोच्या नावाने तेच पाडायचे ..बस करा हे धंदे

भविष्यातील वाहतूकींचे नियोजन करुनच उड्डणपूलाचे बांधकाम करा – शिवसेना

पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन

पुण्याचे सिंगापूर करण्याचे स्वप्न दाखवून आणलेल्या बीआरटी ने सांगा काय दिवे लावले ?

पुणे, दि. ८ जानेवारी – बीआरटी सुरेख कशी, सुंदर कशी ? याचे माध्यमांतून असंख्य फोटो प्रसिद्ध करवीत प्रत्यक्षात मात्र वाहतुकीचा बट्ट्याबोळ करणाऱ्या महापालिकेच्या श्रीनिवास बोनाला यांना सेनेने सणसणीत इशारा दिला आहे , सिंहगड रस्त्यावर उड्डाणपूल जरूर उभारा , पण तो उभारताना आहे तो रस्ता त्या कामासाठी काही अंशी बंद करून नागरिकांचे हाल करू नका , किंवा उद्या मेट्रोचा आराखडा आणून पुन्हा हा उड्डाण पूल पाडू नका … खूप झालं आता तुमचं.. राज्य सेनेचे आहे …अगोदर नागरिकांना पर्याय द्या आणि नंतर का तो योग्य निर्णय घ्या असा स्पष्ट शब्दात इशारा आज येथे शिवसेना शहरप्रमुख शहरप्रमुख संजय मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडून देण्यात आला . महापालिकेच्या प्रकल्प मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.एकीकडे हजार कोटीवर खर्च करून आणलेली बीआरटी आणि शेकडो कोटींचे सायकल ट्रेक बांधून प्रशासनाने खाजगी वाहनांची गळचेपी करत शहरात वाढत चाललेली वाहतूक कोंडी अधिकाधिक तीव्र करून त्यावर ताव मारण्याचेच प्रकार केले आहेत याकडेयावेळी लक्ष वेधण्यात आले .

सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून अजूनही पर्यायी मार्गांची कामे पूर्ण होवू शकली नाहीत. त्यामुळे पर्यायी मार्गाची कामे आधी पूर्ण करून नंतरच उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात करावी, या मागणीसाठी शिवसेना शहरच्या वतीने संतोष हॉल येथे निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले. शिवसेना खडकवासला विधानसभा मतदार संघाचे समन्वयक मनीष जगदाळे यांनी या आंदोलनाला पुढाकार घेतला.

शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, शहरातील बहुतांश उड्डाणपुलांचा आराखडा हा चुकीचाच असल्याचा प्रत्यय वाहनचालकांना येतो आहे. वाहतूक नियोजनकारांना एक तर आराखडा तयार करता येत नाही किंवा तयार करण्यात आलेल्या आराखड्यात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून बदल करण्यात असल्याने शहरातील उड्डाणपुलांमुळे वाहतूककोंडी वाढल्याचेच चित्र आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावर मेट्रो आणि इतर वाहतूक व्यवस्थेचा विचार करून पुढील किमान ५०-१०० वर्षाचा विचार करून उड्डाणपूल तयार करण्यात यावा या मगणीसाठी आंदोलन करण्यात आले.

गजानन थरकुडे म्हणाले की, भविष्यातील आव्हानांचा विचार करून उड्डाणपुलाचे नियोजन करणे अपेक्षित असताना, पालिका प्रशासन यांच्याकडून याबाबत कोणतेही नियोजन ना करता काम सुरू करण्यात आले आहे. पर्यायी रस्ते अजूनही रखडले असून त्यावरून वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे आधी पर्यायी रस्ता करा, मगच उड्डाणपुलाचे काम सुरू करा, अशी मागणी आम्ही करत आहोत.

शिवसेना खडकवासला समन्वयक मनीष जगदाळे म्हणाले, पुणे महापालिकेकडून सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत उड्डाणपूलाचे काम चालू करण्यात येणार आहे. या कामामुळे सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिंहगड रस्त्यास पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण करुन हा रस्ता वाहतूकीस खुला करावा. रस्ता वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत उड्डाणपूलाचे काम सुरु करुन नये, अशी मागणी जगदाळे यांनी केली आहे.

यावेळी शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, मनिष जगदाळे, उपजिल्हाप्रमुख महेश मते, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, शाखाप्रमुख रमेश देसाई, संघटक प्रसाद गिजरे, समन्वयक राजाभाऊ चव्हाण, विभागप्रमुख महेश पोकळे, वैभव हनमघर, सतीश पंधारे, अनंत घरत, राजू पायगुडे, कल्पेश वाजे, सुनील जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

हज यात्रेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारी 2022 पर्यंत-कोविड साथीवर मात करण्यासाठी पूर्वकाळजी, प्रतिबंध आणि प्रार्थना आवश्यक

0

हज यात्रेच्या दृष्टीने कोविड साथीवर मात करण्यासाठी पूर्वकाळजी, प्रतिबंध आणि प्रार्थना आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक कामकाज मंत्री आणि राज्यसभेचे उपनेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले. ते आज मुंबईत हज हाऊसमध्ये एका प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. जनतेच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणारा असा हजयात्रा 2022 साठी प्रक्रियेचा सुधारित आराखडा तयार झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. हजयात्रेची प्रक्रिया 100% डिजिटल/ऑनलाइन झाल्यामुळे त्यात पारदर्शकता येईल, तसेच ती सर्वांना सहजसाध्य, परवडण्याजोगी आणि सोयीस्कर होईल असा विश्वासही नक्वी यांनी व्यक्त केला.

यात्रेसाठी अर्ज करण्याकरिता 31 जानेवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी भाविक ऑनलाइन पद्धतीने तसेच ‘हज मोबाईल ऍपच्या’ माध्यमातून अर्ज करत आहेत. या ऍपची सुधारित आवृत्ती जारी करण्यात आली असून, त्यात वारंवार विचारले जाणारे प्रश्न, अर्ज भरण्याविषयी माहिती, संबंधित चित्रफिती आदी गोष्टींची नव्याने भर घालण्यात आली आहे. हज 2022 साठी आतापर्यंत 51,000 पेक्षा अधिक व्यक्तींनी अर्ज केले असून त्यामध्ये ‘मेहराम विना’ प्रवास करण्याच्या श्रेणीतील 1,000 हून अधिक स्त्रियांचा समावेश आहे.

यात्रेसाठी पात्र भाविकांची निवड करण्यासाठी ‘पूर्ण लसीकरणाच्या’ निकषाबरोबरच, भारत आणि सौदी अरेबियाच्या सरकारांनी कोरोनाविषयक दक्षतेच्या अधीन राहून ठरवून घेतलेल्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेतला जाईल, असे नक्वी यांनी स्पष्ट केले.

हज 2022 साठी प्रवास सुरु करण्याच्या ठिकाणांची संख्या 21 ऐवजी 10 इतकीच ठेवण्यात आली आहे. अहमदाबाद, बेंगळुरू, कोचीन, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि श्रीनगर या ठिकाणांहून यात्रा सुरु करता येणार आहे. यापैकी प्रत्येक ठिकाणाहून प्रवास सुरु करण्यासाठी प्रदेश ठरवून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, दमण-दीव आणि दादरा नगरहवेली या भागातील यात्रेकरूंनी मुंबईतून प्रवास सुरु करावयाचा आहे.

हज यात्रेकरूंना डिजिटल आरोग्यकार्ड, ‘इ-मसीहा’ नावाची आरोग्य सुविधा आणि सामानाशी संबंधित इ-सुविधा पुरवण्यात येत असून यामुळे त्यांना मक्का-मदिना येथील निवास आणि वाहतूक व्यवस्थविषयीही माहिती मिळू शकणार आहे. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याकरिता उभय देशांमध्ये प्रशिक्षणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

2020 आणि 2021 मध्ये ‘मेहराम विना म्हणजे पुरुष सोबत्याविना’ श्रेणीत यात्रा करण्यासाठी 3000 हून अधिक स्त्रियांनी अर्ज केले होते. त्यांना 2022 मध्ये यात्रा करण्याची इच्छा असल्यास त्यांचे अर्ज हज 2022 साठीही पात्र ठरतील. या श्रेणीतून प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना लॉटरी प्रक्रियेतून सवलत दिली जाईल, अशी माहिती नक्वी यांनी दिली.

मंत्रालयाच्या सहसचिव निगार फातिमा, यांच्यासह हज समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद याकूब शेख तसेच विविध रुग्णालयांतील विशेषज्ञ, बँका व विमान कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रशिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी आयोजित या दोन-दिवसीय कार्यक्रमात विविध राज्यांतील 550 प्रशिक्षकांनी ऑनलाइन माध्यमातून किंवा प्रत्यक्ष भाग घेतला आहे. कोरोना साथीने उभी केलेली आव्हाने लक्षात घेऊन आरोग्य आणि स्वच्छता यावर हा कार्यक्रम आधारित आहे. यानंतर हे प्रशिक्षक देशभरातील प्रशिक्षण शिबिरांतून हज यात्रेकरूंना प्रशिक्षण देतील.

राज्यात दिवसा जमाव बंदी, रात्री नाईट कर्फ्यू – उद्यापासून कडक निर्बंध

0

मुंबई-राज्यात ओमायक्रॉनचा कहर सुरू झाल्याने पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्यात उद्यापासून कडक निर्बंध घालण्यात आले असून स्विमिंग पुल, जीम, स्पा पूर्णपणे बंद, शाळा कॉलेजही १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये, मॉल, शॉपिंग मॉल, मैदाने, उद्याने, चित्रपटगृह, केश कर्तनालय, सरकारी आणि खासगी कार्यालये आदींसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे.

  • उद्या मध्यरात्रीपासून राज्‍यात नवे नियम लागू.
  • सकाळी ५ ते रात्री ११ राज्‍यात जमावबंदी लागू
  • रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत राज्‍यात नाईट कर्फ्यू
  • मैदाने उद्‍याने पर्यटन स्‍थळे बंद राहणार
  • रेस्‍टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्‍के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू राहणार
  • २ डोस पूर्ण झालेल्‍यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येणार
  • राज्‍यातील शाळा आणि कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार
  • खासगी कंपन्यांमध्ये २ डोस घेतलेल्‍यांनाच परवानगी
  • खासगी कार्यालये ५० टक्‍के क्षमतेने सुरू राहतील
  • लग्‍नासाठी ५० तर अंत्‍यसंस्‍कारासाठी २० लोकांनाच परवानगी
  •  हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
  • लग्‍न समारंभांसाठी ५० तर अंत्‍यसंस्‍कारासाठी २० लोकांनाच परवानगी
राज्यातील 15 हून अधिक मंत्री तर जवळपास 100 आमदारांना कोरोना

राज्यातील 15 हून अधिक मंत्री तर जवळपास 100 आमदारांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर आता मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्‍यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली आहे. अनेक मंत्र्यांना कोरोनाची बाधा झाल्याने या आठवड्यातील होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली होती.

महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकरला ब्राँझपदक

0

पुणे: महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकर हिने ३९ व्या वरिष्ठ आणि २३ वी खुली स्प्रिंट राष्ट्रीय रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत दोन हजार मीटर शर्यतीत महिलांच्या सिंगल स्कल्समध्ये ब्राँझपदक मिळवले.

रोइंग फेडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने आणि आर्मी रोइंग नोड व महाराष्ट्र रोइंग असोसिशनच्या सहयोगाने आर्मी रोइंग नोड येथे ही स्पर्धा सुरू आहे. राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. स्पर्धेचे संयोजन महाराष्ट्र रोइंग असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णानंद हेबळेकर , सचिव संजय वळवी, उपाध्यक्ष नरेन कोठारी, स्मिता यादव यांनी केले. 
या स्पर्धेतील महिलांच्या सिंगल स्कल्समध्ये मध्य प्रदेशच्या खुसप्रीत कौरने ९ मिनिटे ३७.४ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. उत्तर प्रदेशची किरण देवीने ९ मिनिटे ४४.८ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक मिळवले. 

मृण्मयीने ९ मिनिटे ५३.४ सेकंद वेळ नोंदवून ब्राँझपदकाची कमाई केली.

निकाल – महिला – सिंगल स्कल्स – खुसप्रीत कौर (९ मि. ३७.४ से., मध्य प्रदेश), किरण देवी (९ मि. ४४.८ से., उत्तर प्रदेश), मृण्मयी साळगावकर (९ मि. ५३.४ से., महाराष्ट्र).

डबल स्कल्स – अविनाश कौर – किरण (८ मि. २८.० से., हरियाणा), प्रिया देवी – एच. तेनदेनथोइ देवी (८ मि. ३९.६ से., मणिपूर), रेष्माकुमारी मिन्झ – सोनालिका दास (८ मि. ५४.८ से.)

कॉक्सलेस पेअर – सोनाली स्वैन – रितू कुडी (८ मि. ४३.२ से., ओडिसा, ज्योती कुश्वाहा –रुक्मणी डांगी (९ मि. ०३.६ से., मध्य प्रदेश), ए. बिमोला चानू – वाय. नांदेश्वरी देवी (९ मि. २५.९ से., मणिपूर).

कॉक्सलेस फोर – अर्चा ए., वर्षा के. बी, रोस मारिया, मीनाक्षी वाय. एस. (केरळ, ८ मि. ०३.५ से.), अस्मिता करकेट्टा, झारना हस्ती, दीपिका, मंजुला (ओडिसा, ८ मि.०३.९ से.), तमिल सेल्वी एस., रोस मास्टिका मेरिल, लावण्या नाम्बियार, बागवती आर. (तमिळनाडू, ८ मि. ०४.३ से.).

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ शुक्रवारी चित्रपटगृहांत

0

समाजातील वास्तववादी घटनांचे दर्शन घडवण्यात अग्रेसर असणाऱ्या निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर पुन्हा एकदा आपल्या आगामी चित्रपटाद्वारे सत्य परिस्थिती मांडण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज चहूबाजूला मांजरेकरांच्या नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा या आगामी मराठी चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. शीर्षकापासून लुकपर्यंत सर्वच बाबतीत मराठीपासून हिंदी सिनेसृष्टीपर्यंत सर्वच ठिकाणी हा चित्रपट चर्चेत आहे. उत्सुकता वाढवणाऱ्या टायटलला कुतूहल जागवणाऱ्या मोशन पोस्टरची जोड दिल्यानंतर आता नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाचं नवं पोस्टर आणि धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, यात वास्तववादी चेहऱ्यांचं दर्शन घडत आहे. पुढील शुक्रवारी १४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

नुकतंच रिलीज करण्यात आलेलं नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा या चित्रपटाचं नवं पोस्टर चित्रपटातील विविध व्यक्तिरेखांचं दर्शन घडवणारं आहे. हे पोस्टर चित्रपटातील काळ आणि वातावरणाची झलक दाखवणारं आहे. ‘काँक्रिटच्या जंगलातील उद्ध्वस्त अस्तित्व’ ही पोस्टरवरील टॅगलाईन दाहकतेची जाणीव करून देणारी आहे. विविध वयोगटातील चेहरे नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाच्या पोस्टरवर पहायला मिळतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्या मनातील वेदना आणि विचार सांगण्यासाठी पुरेसे आहेत. या चित्रपटातील काळ जवळपास तीन दशकांपूर्वीचा आहे. त्या काळी झालेल्या गिरणी कामगारांच्या संपाचा, संपकरी आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनावर झालेला भीषण परिणाम, त्यांची  विदारक परिस्थिती, त्यांनी सहन केलेल्या वेदना, संपामुळं पूर्णत: वाताहत झालेली पिढी आणि त्याचे समाजात उमटलेले पडसाद नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चामध्ये पहायला मिळणार आहेत. पोस्टरवर दिसणारे सर्व चेहरे त्या भीषण परिस्थितीचं वास्तव दाखवणारे आहेतच, पण त्यासोबतच तीन पिढ्यांचं प्रतिनिधीत्वही करणारे आहेत. ‘अठरा वर्षांवरील प्रेक्षकहो, दम असेल तरच थेटरात येऊन बघायचं…’ ही पोस्टरवरील ओळही लक्ष वेधून घेते. प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम, शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मिरा शाह, उमेश जगताप, गणेश यादव, अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर, ईशा दिवेकर आदी कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

गिरणी कामगारांच्या संपानंतर जगण्यासाठीची धडपड, हार न मानण्याचा मराठी बाणा, त्या वेळेचं ज्वलंत चित्र आणि ज्येष्ठ लेखक जयंत पवार यांच्या धारदार लेखनशैलीद्वारे कथेमध्ये निर्माण झालेल्या हृदयभेदी नाट्यानं मांजरेकरांना आकर्षित केलं होतं. त्यातून नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा‘  या चित्रपटाची निर्मीती झाली.

अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची निर्मिती तसेच वितरण करणाऱ्या ‘एन एच स्टुडिओज’ या भारतातल्या अग्रगण्य निर्मिती संस्थेने ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या मराठी चित्रपटाच्या प्रस्तुतीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘एन एच स्टुडिओज’ मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र हिरावत व श्रेयांस हिरावत यांनी केली असून सहनिर्मिती ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’च्या विजय शिंदे यांनी केली आहे. नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चाला हितेश मोडक यांनी संगीत व पार्श्वसंगीत दिलं आहे. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करण बी. रावत यांनी केली आहे.

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चित्रपट १४ जानेवारीला राज्यभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे

स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर क्रिकेट करंडक स्पर्धेत अमर इलेव्हन संघाची विजयी सलामी

0

पुणे, दि.8 जानेवारी 2022: अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजीत स्वर्गीय बल्लाळ चिपळूणकर क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत रवी तलवार(31 धावा व 2-13)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर अमर इलेव्हन संघाने आदिनाथ क्रिकेट क्लब संघाचा8 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत झंकार बाजीकर(2-8), रवी तलवार(2-13), प्रशांत उत्तेकर(1-4)यांच्या अफलातून गोलंदाजीपुढे आदिनाथ क्रिकेट क्लबचा 64 धावांवर कोसळला. यात अथर्व कदम 12, श्रेयश जगदाळे 11, आदित्य जाधव नाबाद 10 यांनी थोडासा प्रतिकार केला. हे आव्हान अमर इलेव्हन संघाने 4.5षटकात 2बाद 67 धावा करून पूर्ण केले. रवी तलवारने गोलंदाजी प्रमाणे फलंदाजीतही कमाल दाखवत 17 चेंडूत 4चौकार व 2षटकारासह 31 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. रवीला मयूर गोखलेने नाबाद 18 धावा करून साथ दिली 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरीआदिनाथ क्रिकेट क्लब: 17.2षटकात सर्वबाद 64 धावा(अथर्व कदम 12, श्रेयश जगदाळे 11, आदित्य जाधव नाबाद 10, झंकार बाजीकर 2-8, रवी तलवार 2-13, प्रशांत उत्तेकर 1-4)पराभूत वि.अमर इलेव्हन: 4.5षटकात 2बाद 67 धावा(रवी तलवार 31(17,4×4,2×6), मयूर गोखले नाबाद 18, योगेश कोडगिरे 1-15);सामनावीर-रवी तलवार; अमर इलेव्हन संघाचा 8गडी राखून विजय.

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

0

नाशिक, दि. ८ – ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता येत्या १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा १७ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या. तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा ह्या दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ३१ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या.

राज्यात ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव अधिक झाल्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षक आणि विद्यार्थी यांची रुग्णसेवेसाठी गरज भासू शकते हे लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीस विद्यापीठाच्या कुलगुरू, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त श्री. विरेंद्र सिंग, संचालक, डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक, डॉ. अजय चंदनवाले, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

हुतात्म्यांचे स्मरण हे आपले कर्तव्यच – आ. चंद्रकांतदादा पाटील.

0


पुणे-आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत, देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहो यासाठी हजारो सैनिकांनी हौतात्म्य पत्कारले, अश्या वीरांच्या स्मृती जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.उद्यम विकास सहकारी बँकेच्या देशातील युद्ध स्मारकांची माहिती देणाऱ्या कॅलेंडरच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बँकेचे प्रभारी अध्यक्ष शिरीष कुलकर्णी, माजी अध्यक्ष व संचालक संदीप खर्डेकर, दिलीप उंबरकर,पांडुरंग कुलकर्णी, तज्ज्ञ संचालक महेंद्र काळे, मनोज नायर,गोकुळ शेलार व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे इ उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतरही देशाची अखंडता खंडित करण्याचे व हिंदुस्थानाचा भुभाग बळकविण्याचे अनेक प्रयत्न झाले मात्र भारत मातेच्या वीर सुपुत्रांनी प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन देशाच्या सीमांचे रक्षण केले. अश्या हुतात्मा वीर सैनिकांच्या स्मारकांवर आधारित दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना समाधान लाभले असेही मा. चंद्रकांतदादा म्हणाले. उद्यम विकास सहकारी बँक दर वर्षी सामाजिक विषयांवर आधारित दिनदर्शिका प्रकाशित करत असते, यावर्षी देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना सैनिकांच्या बलिदानाचे प्रतीक असलेल्या युद्ध स्मारकांची माहिती देणारी दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा संकल्प केला व त्यानुसार माहिती संकलित करुन दिनदर्शिका तयार केल्याचे संचालक संदीप खर्डेकर म्हणाले. उद्यम बँकेकडे 142 कोटींच्या ठेवी असून 9 शाखां मधून पुणे व पिंपरी चिंचवड येथे कारभार चालतो असे बँकेचे प्रभारी अध्यक्ष शिरीष कुलकर्णी म्हणाले.5 लाखा पर्यंतच्या ठेवी संरक्षित असून ग्राहकाभिमुख सेवा हे आमचे वैशिष्ट्य असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे यांनी सांगितले.

किसान सभेचे नेते कॉम्रेड विलास बाबर यांचा भाजपामध्ये प्रवेश

चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून स्वागत आणि शुभेच्छा

पुणे–अखिल भारतीय किसान सभा तथा सुकाणू समितीचे निमंत्रक कॉम्रेड विलास बाबर यांनी आज पुण्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन पक्षात स्वागत केले, आणि शुभेच्छा दिल्या. यावेळी पाथरीचे माजी आमदार मोहनराव फड, महानगर जिल्हाध्यक्ष आनंदराव भरोसे, सोनपेठ तालुकाध्यक्ष सुशील रेवडकर, परभणीचे सुभाष शिंदे, अमोल अंजनडोहकर आदी उपस्थित होते.

बाबर यांच्या पक्षप्रवेशानंतर माननीय चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विलास बाबर हे शेतकरी नेते असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते नेहमीच आक्रमक भूमिका मांडतात. माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी काम करावे, यासाठी शुभेच्छा दिल्या.

पक्षप्रवेशानंतर विलास बाबर म्हणाले की, “शेतकऱ्यांचा प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष केला. पण महाविकास आघाडीने अनैसर्गिक आघाडी करुन, जे सरकार बनवले, त्या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर करुन ठेवले आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात सातत्याने होत आहे. माननीय नरेंद्र मोदी यांनीही शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून तीन कृषी कायदे तयार केले होते. पण त्याला विरोध होत असल्याने मोदीजींनी मन मोठे करुन हे कायदे मागे घेतले.‌ त्यामुळे शेतकऱ्यांसाठी माननीय नरेंद्र मोदीजी एवढं विशाल मन दाखवतात, तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न निर्माण होतो की, माननीय मोदीजी शेतकऱ्यांसाठी समर्पित होऊन काम करतात, तर त्यांना आपण साथ का देऊ नये. त्यामुळे या विचारातूनच आज भारतीय जनता पक्षाचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळेल ते काम करणार, असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पुरंदर विमानतळासाठी जुन्या जागेचा प्रस्ताव असेल तर बोला – आ. चंद्रकांतदादा पाटील यांचे महाविकास आघाडीला खुले आव्हान

0

पुणे-देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात पुरंदर विमानतळासाठी सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या होत्या. पण महाविकास आघाडी सरकारने जुना प्रस्ताव बास्नात गुंडाळून नवीन प्रस्ताव पाठवला. त्यातील तांत्रिक अडचणींमुळे हा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाने नाकारला. त्यामुळे जुन्या जुन्या जागेचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारला मान्य आहे का? असा सवाल प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, पुरंदर विमानतळासाठी कोणाच्याही हितसंबंध न जोपासता सर्वांनी प्रयत्न करावेत, त्यासाठी दर शुक्रवारी यासंदर्भात शासकीय पाठपुरावा घेण्यासाठी बैठक घ्यावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

पुरंदर विमानतळासंदर्भात क्लब ऑफ इन्फ्यूएन्सरच्या वतीने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित चर्चासत्रानंतर पाटील माध्यमांशी बोलत होते. या बैठकीला खा. गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आ. सिद्धार्थ शिरोळे, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, खा. सुप्रिया सुळे, उद्योजक सुधीर मेहता, प्रशांत गिरबाने, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक पराग करंदीकर, सकाळचे संपादक सम्राट फडणीस, लोकमतचे संपादक विजय बावीसकर, एअर मार्शल भूषण गोखले, सकाळच्या कार्यकारी संपादिका शितल पवार आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पुरंदर विमानतळाच्या प्रस्तावास मान्यता देऊन, त्यासाठीच्या सर्व परवानग्या मिळवल्या होत्या. पण यानंतर यास विरोध असल्याचे भासवून, महाविकास आघाडी सरकारने हा प्रस्ताव बासनात गुंडाळून ठेवला, आणि तांत्रिक त्रुटींसह नवीन प्रस्ताव पुढे पाठवला. परिणामी नवीन प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाने नाकारला. या नवीन प्रस्तावात कुणाचे हितसंबंध जपले गेले होते, ते सर्वांनाच माहित आहे.

ते पुढे म्हणाले की, आता नवीन प्रस्ताव जरी नागरी उड्डाण मंत्रालयाने नाकारला असला, तरी जुना प्रस्तावाची मान्यता अद्याप रद्द झालेली नाही. त्यामुळे जुन्या जागेचा प्रस्ताव मंजूर असल्याचा ठराव राज्य सरकारने करुन, तो पुनर्विचारासाठी केंद्राकडे पाठणार आहात का? असा सवाल श्री.‌पाटील यांनी उपस्थित केला.

पुण्यातील विमानतळाबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, नवीन विमानतळ उभारण्यास किमान दहा वर्षाचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे जुन्या विमानतळाच्या सुविधा वाढविण्याची गरज आहे. यासाठी महापालिका, पीएमआरडीए यांच्यासह सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

पुरंदर विमानतळासाठी क्लब ऑफ इन्फ्लूएन्सरने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करुन श्री.‌पाटील म्हणाले की, पुरंदर विमानतळ ही काळाची गरज आहे.‌ त्यामुळे यासाठी पुढाकार घेणाऱ्या क्लब ऑफ इन्फ्लूएन्सरचे कौतुक केले पाहिजे. पण त्याचबरोबर शासकीय स्तरावर दर आठवड्याच्या जिल्हा नियोजन आढावा बैठकीत या विषयाचा अंतर्भाव करावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसेच पुरंदर विमानतळासाठी भारतीय जनता पक्षाकडून आ. सिद्धार्थ शिरोळे हे याचा पाठपुरावा करतील, जेव्हा कधीही गरज असेल, तेव्हा मीदेखील स्वतः दिल्लीत ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करेन अशी ग्वाही श्री. पाटील यांनी यावेळी दिली

हिम्मत असेल तर बहुमताच्या जोरावर माझा ठराव फेटाळून दाखवा… अश्विनी कदमांचे स्थायी अध्यक्ष रासनेंना थेट आव्हान

0

मुंबई, ठाणे औरंगाबाद मध्ये कर माफी मग पुण्यालाच काय प्रॉब्लेम आहे ?

अश्विनी कदम यांचा स्थायी समिती अध्यक्ष ,महापौर आणि आयुक्तांना थेट सवाल

पुणे- ५०० चौरस फुटा पर्यंतच्या घरांना मुंबई , ठाणे येथे मिळकत कर माफी देण्यात आली आहे आणि त्यांनतर आता औरंगाबाद मध्येही हि प्रक्रिया सुरु झाली आहे अशा स्थितीत, कोरोनाच्या महामारीत देखील ज्या पुण्याने महापालिकेला बक्कळ उत्पन्न मिळवून दिले त्या पुणे महापालिकेचा काय प्रॉब्लेम आहे असा थेट सवाल राष्ट्रवादीच्या नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी नितीन कदम यांनी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांना केला आहे. आणि स्वतः पुढे येऊन पुण्यातही ५०० फुट आकाराच्या घरांना करमाफी द्यावी असा प्रस्ताव सादर केला आहे . आता बहुमताच्या जोराव हा प्रस्ताव फेटाळनार काय ? असाही सवाल त्यांनी केला आहे.

मुंबई मनपाने पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना मिळकत कर माफ करून सवलत दिली आहे. त्याच धर्तीवर पुणे मनपाने सुद्धा शहरातील पाचशे स्क्वेअर फिट पर्यंतच्या घरांना मिळकत कर माफ करून सवलत द्यावी या आशयाचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये दिला आहे.राष्ट्रवादी अर्बन सेलच्या अश्विनी कदम (नगरसेविका) व लक्ष्मी ताई दुधाने (नगरसेविका) यांच्या वतीने सदरचा प्रस्ताव देण्यात आला आहे. २४ तास पाणी पुरवठा करतो असे सांगत लोकांच्या कडून मागील पाच वर्षांमध्ये पुणे मनपाने मिळकत करांमध्ये व पाणीपट्टी मध्ये दुपटीपेक्षा जास्तीने वाढ करून वसुलही केली आहे आहे .. एकीकडे अपुऱ्या नागरी सुविधा, वाढता भ्रष्टाचार व या मिळकत करीत करांच्या वसुलीसाठी अवलंबलेली सावकारी पद्धत यातून सर्वसामान्य पुणेकर धास्तावलेला आहे. अशा परिस्थितीत सदरचा प्रस्ताव मान्य करून पुणे मनपाने नागरिकांना दिलासा द्यावा हीच मागणी आहे.असे अश्विनी नितीन कदम यांनी म्हटले आहे.

100 नवीन सैनिकी शाळांमुळे मुलींना सशस्त्र दलात भरती होण्याच्या अधिक संधी उपलब्ध : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

0

नवी दिल्ली -“100 नवीन सैनिकी शाळा सुरू करण्यामुळे मुलींना सशस्त्र दलात सामील होण्याची आणि राष्ट्रीय सुरक्षेत योगदान देण्याची संधी मिळेल,” असे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.  आज  8 जानेवारी 2022 रोजी आयोजित केलेल्या सैनिक शाळांवरील वेबिनारमध्ये संरक्षणमंत्री राजनाथसिंह अध्यक्ष म्हणून उपस्थितांना संबोधित करत होते.  श्री राजनाथ सिंह म्हणाले, “सशस्त्र दलांमध्ये महिलांचे योगदान वाढविण्यावर सरकारचा विश्वास आहे आणि त्या दिशेने अनेक पावले उचलण्यात आली आहेत, ज्यामध्ये सैनिकी शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा करणे आणि महिला अधिकाऱ्यांना संरक्षण दलांमध्ये परमनंट कमिशन देणे यांचा समावेश आहे.  नवीन सैनिक शाळा स्थापन करण्याचा निर्णय मुलींना त्यांचे देशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रोत्साहित करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सैनिकी शाळांचा विस्तार ही घोषणा मुलांच्या मूलभूत शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि देशाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी, सरकारने गेल्या सहा-सात वर्षांत घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी एक असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी  नमूद केले.  संरक्षण  आणि सैनिकी  शाळांतील शिक्षण यांचे  एकत्रीकरण आगामी काळात राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी आकांक्षा त्यांनी व्यक्त केली.  ‘सैनिक’ हे एकता, शिस्त आणि भक्तीचे प्रतीक असले तर ‘शाळा’ हे शिक्षणाचे केंद्र असल्याने मुलांना सक्षम नागरिक बनविण्यात सैनिकी शाळा मोलाची भूमिका बजावत असतात, असे ते म्हणाले.

यावेळी  भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ऍप्लिकेशन्स अँड जिओ-इन्फॉरमॅटिक्स (BISAG-N) च्या सहकार्याने सुरू केलेल्या https://sainikschool.ncog.gov.in या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. 12 ऑक्टोबर 2021 पासून त्यावर  नोंदणी सुरू करण्यात आली आहे. आजपर्यंत 137 अर्जदारांनी   वेब पोर्टलवर नोंदणी केली आहे.

मुख्यमंत्री हॉलीडेमुड मध्ये तर गृहमंत्री विकेंडमुड मध्ये ..चित्रा वाघ संतापल्या

0

मुंबई-भाजपा आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी आशिष शेलार यांना फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. आशिष शेलार यांनी याप्रकरणी पत्र लिहून पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केली आहे. शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देत एक अज्ञात इसम अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यामध्ये कशाप्रकारे अंधाधुंदी चालू असल्याचे आपण पाहत आहे. त्यामुळे २४ तासांच्या आत आशिष शेलार यांना ज्याने धमकी दिली आहे त्याच्या मुसक्या आवळा. शेलार आणि त्यांच्या परिवारातील सदस्याला काही झाले तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर असणार आहे,” अशी प्रतिक्रिया भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. चित्रा वाघ यांनी यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

“आशिष शेलार आणि त्यांच्या परिवाराविरोधात विखारी भाषा वापरत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देऊन कित्येक तास उलटले तरी कायदा सुव्यवस्था सुस्त पडली आहे. मुख्यमंत्री महोदय तुम्ही सरकार काय तालिबान्यांना चालवायला दिले आहे का? राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहे. त्यामुळे राज्यामध्ये सरकार नावाची कोणती गोष्ट शिल्लक आहे का? मुख्यमंत्री स्वतः हॉलिडे मूडमध्ये आहेत तर गृहमंत्री विकेंड मूडमधून बाहेर आलेले नाहीत.

भाजप आमदार आशिष शेलार यांना कुटुंबियांसह जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

0

मुंबई-भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरुन धमकी देण्यात आली आहे. शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी एक अज्ञात इसम देत असून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर आशिष शेलार यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना शुक्रवारी पत्र लिहून तक्रार केली आहे. दोन्ही मोबाइल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती आशिष शेलार यांनी पोलिसांना केली आहे.

याबाबत आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते. नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयासह इतर ठिकाणाची दहशतवादी जैश ए मोहम्मद संघटनेकडून रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. संघ मुख्यालयासह रिझर्व्ह बँक इतर संवेदनशिल भागाची रेकी केल्याचे पुढे आले आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी या भागात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. सुरक्षेची पूर्ण व्यवस्था केली आहे. या प्रकरणाचा क्राइम ब्रँच तपास करत आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

दरम्यान, गेल्या महिन्यात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना डिसेंबर महिन्यात धमकीचे पत्र आले होते. या पत्रात किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.