अधिकाधिक उद्योग भागीदारांना पुरवठा साखळीशी जोडण्यासाठी भारतीय रेल्वे निरंतर प्रयत्नरत आहे आणि उद्योजकांना व्यवसाय करणे सुलभ व्हावे यासाठी रेल्वेने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे केवळ प्रक्रिया पारदर्शक, कार्यक्षम आणि सुलभ झाल्या नाहीत तर उद्योगांना रेल्वेसाठी व्यवसाय करण्यासाठीचा खर्चही कमी झाला आहे.
विक्रेत्यांच्या सुविधेसाठी एक खिडकी ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून अर्ज दाखल करणे, शुल्क भरणा आणि अंतिम मंजूरी देण्यात येत आहे. यामुळे विक्रेत्यांना विविध कार्यालयांशी संपर्क करण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत झाली आहे.
यादिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत रेल्वेने संशोधन अभिकल्पक आणि प्रमाणक संघटनेने (RDSO) विक्रेता अर्ज शुल्कात कपात केली आहे. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशिवाय इतरांसाठी पूर्वी 2.5 लाख रुपये तर, एमएसएमईंसाठी 1.5 लाख रुपये शुल्क होते. यात कपात करुन 2.5 लाख रुपयांवरुन 15000 रुपये आणि 1.5 लाख रुपयांवरुन 10000 रुपये करण्यात आले आहे. एमएसएमईंना प्रोत्साहन देण्यासाठी ही विशेष तरतूद करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे उद्योगासाठी लागणारा खर्च कमी होऊन मेक इन इंडिया अभियानाला चालना मिळेल. तसेच रेल्वेला पुरवठा साखळीत मोठ्या प्रमाणात उद्योजक मिळतील.
एअर इंडियाच्या धोरणात्मक नियोजनबद्ध निर्गुंतवणूक व्यवहारांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. केंद्र सरकारला, या व्यवहारातील भागीदार मेसर्स टॅलस प्रायव्हेट लिमिटेड (मेसर्स टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी) कडून 2,700 कोटी रुपयांची किंमत मिळाली आहे. तसेच, 15,300 कर्ज, एअर इंडिया आणि AIXL कडेच ठेवण्यात आले आहे. एअर इंडियाचे सर्व शेअर्स या कंपनीच्या नावे करण्यात आले आहेत.
इथे हे ही सांगणे औचित्याचे ठरेल की मेसर्स टॅलस प्रायव्हेट लिमिटेड ने एअर इंडियाच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी सर्वाधिक बोली लावल्यामुळे या बोलीला केंद्र सरकारने मंजूरी दिली होती. त्यानुसार, बोली जिंकणाऱ्या कंपनीला 11 ऑक्टोबर 2021 रोजी, इरादापत्र देण्यात आले होते. तसेच समभाग खरेदी करार, 25 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आला होता. त्यानंतर, या व्यवहारातील भागीदार, (M/s Talace Pvt Ltd) एअर इंडिया आणि केंद्र सरकारने एकत्रित बसून या व्यवहारासाठीच्या सर्व अटी शर्ती पूर्ण केल्या. यात अॅंटी ट्रस्ट बॉडीज, नियामक, कर्जदाता संस्था आणि तिसऱ्या पक्षांकडून मंजूरी मिळवण्याचाही समावेश होता. दोन्ही बाजूंच्या परस्पर सहमतीने या अटी शर्ती निश्चित करण्यात आल्या होत्या.
मुंबई -मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरांसह तब्बल 27 नगरसेवकांनी काँग्रेसला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.राज्यात एकीकडे तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आहे. पण असे असले तरीही काँग्रेसचे मालेगाव महापालिकेतील 27 नगरसेवकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सर्वच नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मात्र, एकत्र सत्तेत असताना देखील राष्ट्रवादीने अशा प्रकारे नगरसेवकांना पक्ष प्रवेश दिल्याने काँग्रेसमध्ये मात्र आता नाराजी दिसून येत आहे.
पुणे, 27 जानेवारी 2022: चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अव्वल मानांकित टेनिसपटू रामकुमार रामनाथन याला वाईल्ड कार्ड प्रदान करण्यात आले असून त्याला एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश मिळणार आहे. चौथ्या पर्वातील ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथे 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2022 या कालावधीत रंगणार आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये बहरेन, मानामा येथील एटीपी स्पर्धेत रामकुमार याने विजेतेपद पटकावले होते आणि अव्वल 200 खेळाडूंच्या यादीत आपले स्थान निश्चित केले होते. 2017 मध्ये जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या डोमिनिक थीमचा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. टाटा ग्रुप प्रायोजित व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)च्या वतीने आयोजित दक्षिण आशियातील एकमेव250 स्पर्धा असलेल्या या स्पर्धेत सलग चौथ्या वर्षी रामकुमार सहभागी होत आहे. टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेचे स्पर्धा संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, मुख्य ड्रॉमध्ये भारतीय खेळाडूंना थेट प्रवेश देताना आणि स्पर्धेतील पहिले वाईल्ड कार्ड रामकुमारला प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. रामकुमार याने नुकतीच लक्षवेधी कामगिरी केली आहे आणि स्पर्धेतील तो लोकप्रिय चेहरा आहे. भारतीय खेळाडूंचे प्रोत्साहन मिळावे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे ही आमची या स्पर्धेत प्रति कटिबद्धता आहे. या स्पर्धेच्या गेल्या काही मालिकेत आमच्या भारतीय खेळाडूंनी सुरेख कामगिरी बजावली आहे आणि यावर्षी देखील त्याची पुनरावृत्ती करतील. 27 वर्षीय चेन्नईचा रामकुमार हा या वाईल्ड कार्डद्वारे मुख्य ड्रॉमध्ये खेळणार असून युकी भांब्रिचा देखील समावेश त्यात आहे. आयएमजी यांच्या मालकीच्या आणि राईज वर्ल्डवाईड संचलित देशांतील सर्वात जुन्या क्रीडा क्षेत्रातील स्पर्धांपैकी एक असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत यावर्षी अनेक दिग्गज खेळाडू सहभागी झाले असून यामुळे विजेतेपदासाठी अधिक चुरस पाहायला मिळणार आहे. स्पर्धेत जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानी असलेल्या ऍस्लन कारास्तेव, लॉरेन्झो मुसेत्ती आणि गतवर्षीच्या मालिकेतील विजेता जेरी व्हेसली यांसारख्या अव्वल 100 खेळाडूंमधील सात खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी रामकुमार रामनाथन म्हणाला की, आयोजकांच्या वतीने वाईल्ड कार्डद्वारे थेट मला स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश दिल्याने मला खुप आनंद झाला आहे. तसेच यावर्षी अनेक मानांकित खेळाडूंचा समावेश असल्यामुळे कडवे आव्हान समोर असणार आहे. पण तरीही मी स्पर्धेत उत्तम खेळ करेल. गतवर्षी भारतात टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा आणि इतर स्पर्धा होऊ शकल्या नाहीत त्यामुळे आम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, भारतीय खेळाडूंच्या दृष्टीने ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे.गतवर्षी टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धा होऊ शकली नाही, परंतु यावर्षी पुन्हा ही स्पर्धा होत आहे याचा आम्हाला आनंद झाला आहे. तसेच, रामकुमारची कारकीर्द फार जवळून पाहिली आहे, वर्षभरात त्याने सर्वोत्तम खेळ केला आहे. याशिवाय डेव्हिस चषक स्पर्धेचा देखील तो एक भाग होता. त्याची मागील कामगिरी पाहून यावर्षी नक्कीच तो लक्षवेधी कामगिरी करेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. तसेच, एकेरी गटाबरोबरच रामकुमार दुहेरीत रोहन बोपन्नाच्या साथीत मुख्य ड्रॉ मध्ये खेळणार आहे.
पुणे -शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे पुण्याच्या माजी महापौर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस कमल व्यवहारे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शहराध्यक्ष रमेश बागवे होते.
यावेळी बोलताना माजी महापौर कमल व्यवहारे म्हणाल्या की, ‘‘१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर राज्यघटना तयार करण्यासाठी त्यावेळचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी मसुदा स्थापन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्याचे अध्यक्ष केले. २६ जानेवारी १९५० ला संविधान अंमलात आणले. या संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. अल्पसंख्यांकाना त्यांच्या स्वत:च्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचे अधिकार मिळाले. या संविधानानुसार देशाचा कारभार चालतो. संविधानाने सर्व जाती धर्मांना समानतेचा अधिकार दिलेला या संविधानाचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे.’’
यावेळी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी, वीरेंद्र किराड, नगरसेवक अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, अजित दरेकर, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, मुख्तार शेख, अमीर शेख, अनिल सोंडकर, संगीता तिवारी, पूजा आनंद, विशाल मलके, भुषण रानभरे, भिमराव पाटोळे, शिवाजी बांगर, बाळासाहेब मारणे, ॲड. शाबीर खान, द. स. पोळेकर, राजेंद्र भुतडा, सचिन आडेकर, प्रविण करपे, शिलार रतनगिरी, अनुसया गायकवाड, अंजली सोलापूरे, नरेश नलावडे, वाल्मिक जगताप, भरत सुराणा, संदिप आटपाळकर, ॲड. नितीन परतानी, चैतन्य पुरंदरे, साहिल राऊत, ॲड. निलेश बोराटे, संदिप आटपळकर, सौरभ अमराळे, उस्मान तांबोळी, परवेज तांबोळी, मयूर भोकरे, प्रशांत सुरसे, सुरेश कांबळे आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
झेंडावंदन नंतर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस भवन येथून अभिवादन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष व प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंना भेट देवून थोर स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले. काँग्रेस भवन – शनिवार वाडा – हुतात्मा कर्णिक स्मारक (मजूरअड्डा) – महात्मा फुले मंडई – केशवराव जेधे यांचे घर, शुक्रवार पेठ – सुभाषचंद्र चौक, तांबोळी मशीद – अरुणा असफ अली चौक, नाना पेठ तर शेवट हिन्दू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या साखळीपीर तालीम, नाना पेठ येथे सभेने या अभिवादन फेरीची सांगता झाली.
सांगता सभेच्या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘‘देशभक्ती म्हणजे फक्त स्वातंत्र्य चळवळीत जे इग्रजांविरुध्द्व लढले असा आपण समजतो पण इतिहासात अशी विविध उदाहरण आहेत ज्यात प्रत्यक्ष इंग्रजांविरुध्द न लढता सर्व सामान्य लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. नाना पेठेतील किराणा माल दुकानदारांनी स्वातंत्र्य लढ्यात ज्यांना तुरुंगवास होत होता त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना मोफत राशन दिले होते. राष्ट्रीयत्व व भारतीयत्व याचा संबंध नसणारे आज सत्तेवर आहेत व ते आज देशभक्ती शिकवत आहेत ही आजच्या काळाची शोकांतिका आहे असे परखड मत मांडले.’’
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने संविधानाचा जागर मांडत पुण्यातील ज्या ऐतिहासिक ठिकाणांना वारसा लाभला आहे तिथे त्या वास्तू व क्रांतिकारकांच्या कार्याची कर्तृत्वाची माहिती असणाऱ्या फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच भाई चोरगे, मेहरबान पठाडे, रवी शिंदे, अन्सारी बाबा सयद, सदाशिव शिर्के, शिवाजी शिर्के, चंदू नेपाळी, ज्ञानोबा झेंडे, सीताराम घल, भाई बेलीकर, सीताराम जाधव, श्री हरी भाऊ धनावडे, भाई टिळेकर, अंबूबाई टिळेकर या स्वातंत्र्यसैनिकांच्या घराला तोरण बांधण्यात आले.
अभिवादन फेरी दरम्यान मेरे देश की धरती, मेरा रंग दे बसंती चोला ही गाणी काफिला या लोकायतच्या सांस्कृतिक आघाडीने घेतली. तसेच जाती पाती सोडा देशाला वाचवा, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सगळयांना सांगणार अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, अभय छाजेड, राष्ट्रवादी पक्षाचे गणेश नलावडे, शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे, लोकायतचे निश्चय साधना उपस्थित होते. अभिवादन फेरीचे सूत्रसंचालन स्वप्नील फुसे यांनी केले तर प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांनी केले.
मुंबई-राज्यातील सुपर मार्केटस आणि किराणा दुकानांमध्ये वाइन मिळण्याचा मार्ग झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक दुकानांमध्ये वाइन विक्री करता येऊ शकणार आहे. राज्य सरकारने वाईन विकण्याची परवानगी दिली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.या प्रस्तावाला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. भाजपचे नेते प्रविण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयावरुन जोरदार टीका केली आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पीत आहे, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे नवाब मलिक म्हणाले. तसेच वाईन विक्री करण्यासाठी हजार फुटांपेक्षा कमी दुकानाला परवानगी देण्यात येणार नाही. परंतु जे सुपरमार्केट आहे. त्या दुकानात वाईन विकण्याची परवानगी देण्यात आली असे नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
मुंबई- देशातील 1.2 लाख कोटी रुपयांच्या विमान उद्योगात यावर्षी मोठा बदल झाला आहे. सरकारी कंपनी एअर इंडिया 27 जानेवारी 2022 पासून खासगी झाली आहे. टाटा सन्सने अधिकृतपणे एअर इंडिया ताब्यात घेतली आहे. यानंतर टाटा देशातील दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी बनली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एअर इंडिया हस्तांतरित करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
सोशल मीडियावर दिली माहिती
निर्गुंतवणूक विभागाच्या सचिवांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. त्यात ते म्हणाले की, एअर इंडियाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आज पूर्ण झाली असून हा करार आता बंद झाला आहे. त्याचा संपूर्ण हिस्सा टेल्स प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. यानंतर चंद्रशेखरन म्हणाले की, एअर इंडिया टाटा समूहाकडे आल्याने या करारामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. आम्ही आता जागतिक दर्जाची विमानसेवा बनवण्यासाठी काम करणार आहोत.
एअर इंडियाच्या कार्यालयात पोहोचले चंद्रशेखरन बैठकीनंतर चंद्रशेखरन थेट एअर इंडियाच्या नवी दिल्लीतील कार्यालयात पोहोचले. दुसरीकडे देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक बँकांच्या गटासह कोणत्याही प्रकारच्या कर्जाच्या गरजेसाठी तयार आहे. बँकेने सांगितले की ते एअर इंडियाला आवश्यकतेनुसार खेळते भांडवल आणि इतरांसाठी कर्ज देईल.
त्याचवेळी, एअर इंडियाची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर अनेक महत्त्वाची उड्डाणे आहेत. अशा परिस्थितीत नवीन व्यवस्थापनामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळू शकतील, असे म्हणता येईल.
टाटा समूहाने म्हटले आहे की, सुरुवातीला ते 5 फ्लाइट्समध्ये मोफत अन्न पुरवेल. तथापि, एअर इंडिया सध्या टाटा समूहाच्या बॅनरखाली उड्डाण करणार नाही. ज्या फ्लाइट्समध्ये मोफत जेवण उपलब्ध असेल त्यामध्ये दोन मुंबई-दिल्ली फ्लाइट्स AI864 आणि AI687, AI945 मुंबई ते अबुधाबी आणि AI639 मुंबई ते बंगळुरू यांचा समावेश आहे. याशिवाय मुंबई-न्यूयॉर्क मार्गावर चालणाऱ्या फ्लाइटमध्ये मोफत जेवणही मिळणार आहे. टाटा समूहाने सांगितले की, नंतर मोफत अन्न टप्प्याटप्प्याने वाढवले जाईल.
एअर इंडियाची सुरुवात कशी झाली, ती टाटांकडून सरकारकडे आणि सरकारकडून पुन्हा टाटाकडे कशी आली ते जाणून घेऊ या. संपूर्ण विमान वाहतूक उद्योग कसा बदलणार आहे आणि त्याचा प्रवाशांना कसा फायदा होणार आहे.
1932 मध्ये झाली एअर इंडियाची सुरुवात एअर इंडियाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर ते एप्रिल 1932 मध्ये सुरू झाले. त्याची स्थापना उद्योगपती जेआरडी टाटा यांनी केली होती. त्यावेळी नाव होते टाटा एअरलाइन्स. जेआरडी टाटा यांनी 1919 मध्ये वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी छंद म्हणून पहिल्यांदा विमान उडवले, पण हा छंद एक आवड बनला आणि जेआरडी टाटा यांनी पायलटचा परवाना घेतला.
15 ऑक्टोबर 1932 रोजी पहिले उड्डाण 15 ऑक्टोबर 1932 रोजी एअरलाइनचे पहिले व्यावसायिक उड्डाण झाले. त्यानंतर अहमदाबाद-कराची मार्गे मुंबईला जाणारे एकमेव इंजिन असलेले ‘हेवीलँड पुस मॉथ’ विमान होते. त्यावेळी विमानात एकही प्रवासी नव्हता, मात्र 25 किलो पत्रे होते. ही पत्रे लंडनहून इम्पीरियल एअरवेजने कराचीत आणली होती. हे एअरवेज ब्रिटनचे राजेशाही विमान होते. त्यानंतर 1933 मध्ये टाटा एअरलाइन्सने प्रवाशांसह पहिले उड्डाण घेतले. टाटांनी दोन लाख रुपये खर्चून ही कंपनी स्थापन केली होती.
Tata Group onboards Air India
Formal handover by Government of India following all requisite approvals
Mumbai, Delhi 27th January, 2022 : The Tata Group today announced the completion of the transaction for purchase of Air India from the Government of India. The Tata Group takes over management and control of the airline, starting today.
The transaction covers three entities – Air India, Air India Express and AI SATS. Air India is India’s flag carrier and premier full service airline. Air India Express is a low-cost carrier. AI SATS provides a comprehensive suite of ground handling and cargo handling services.
On this occasion, Mr. N. Chandrasekaran, Chairman, Tata Sons Pvt. Ltd. said – “We are excited to have Air India back in the Tata group, and are committed to making this a world-class airline. I warmly welcome all the employees of Air India, Air India Express and AI SATS to our Group, and look forward to working together.
We are thankful to the Government of India and its various departments for the successful completion of this important transaction.”
The formal handover today follows the announcement which had earlier been made in October 2021, of the Tata group having been selected by the Government as the new owner of the airline.
पुणे, दि. २७ जानेवारी २०२२:कृषिपंप वीजबिलांच्या मूळ थकबाकीमध्ये सुमारे ६६ टक्क्यांपर्यंत सवलत घेऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी येत्या मार्च २०२२ पर्यंत संधी आहे. या ऐतिहासिक संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच गाव व जिल्ह्यामध्ये नवीन वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणास हातभार लावावा असे आवाहन महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी केले.
मुळशी तालुक्यातील वरवे खुर्द येथील गावकऱ्यांशी बुधवारी (दि. २६) कृषी धोरणाबाबत संवाद साधताना मुख्य अभियंता श्री. तालेवार बोलत होते. दरम्यान प्रजासत्ताकदिनी पुणे परिमंडल अंतर्गत मुळशी- १७, मंचर- २३ व राजगुरुनगर विभागातील १८ अशा एकूण ५८ गावांमध्ये ग्राहक संवाद व मेळावे आयोजित करून कृषी धोरणाची माहिती देण्यात आली. तसेच शेतकऱ्यांचा कृषी धोरणात सहभाग वाढवावा असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी लोकप्रतिनिधींना लेखी पत्राद्वारे केले आहे. हे पत्र देखील लोकप्रतिनिधींना सुपुर्द करण्यात आले.
वरवे खुर्द येथील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी कृषी धोरणाची माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील ४१ हजार ७२२ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला असून १५ हजार ८६६ शेतकरी थकबाकीमुक्त झालेले आहेत. सोबतच कृषी ग्राहकांनी भरलेल्या चालू व थकीत वीजबिलांमधील प्रत्येकी ३३ टक्के रक्कम संबंधीत ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. त्यातून नवीन उपकेंद्र, उपकेंद्र रोहित्रांची क्षमतावाढ, वितरण रोहीत्र, लघु व उच्चदाब वीजवाहिन्या आदी वीजयंत्रणेची उभारणी करणे, कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देणे, दिवसा वीजपुरवठा आदी कामे करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीसोबतच गावातील व जिल्ह्यातील वीज यंत्रणेच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. तालेवार यांनी केले. यावेळी उपकार्यकारी अभियंता नवनाथ घोटुळे, सरपंच नीलेश भोरडे व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
येत्या मार्चपर्यंत सध्याच्या सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे. या तरतूदीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी प्रजासत्ताक दिनापासून पुणे परिमंडलामध्ये ग्राहकसंवाद व मेळाव्यांच्या आयोजनास सुरवात करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना वीजबिलांबाबत काही शंका व तक्रारी असल्यास त्याचेही ताबडतोब निराकरण करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी पुणे परिमंडलामध्ये ५८ गावांमध्ये ग्राहक संवाद व मेळावे आयोजित करून धोरणाची माहिती देण्यात आली. कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे (राजगुरुनगर), हेमचंद्र नारखेडे (मंचर) व माणिक राठोड (मुळशी) यांच्यासह सर्व उपविभागांचे अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध गावांमध्ये कृषी धोरणाबाबत जनजागृती केली. तसेच तहसील व पंचायत समितीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना धोरणाची माहिती देण्यात आली.
पुणे २७ जानेवारी २०२२ – स्पोर्टिफिकेशन ऑळ इंडिया या विषयाअंतर्गत ऑटोमोबाईल उत्पादन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या टाटा मोटर्सने सलग चौथ्या वर्षी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेला आर्थिक पुरस्कार दिला आहे. ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. भारतातील प्रवासी वाहतुकीसाठी सर्वात सुरक्षित अशा हॅचबॅक श्रेणीतील टाटा अल्ट्रोज गाडीचा दुसरा वर्धापदन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने टाटा मोटर्स पुन्हा एकदा टेनिसशी जोडले गेले आहेत. दक्षिण आशियात होणारी महाराष्ट्र ओपन ही जशी सर्वात जुनी स्पर्धा, तशी भारताच्या गतिशील क्रांतीमध्ये गेली ७५ वर्षांहून अधिक काळ टाटा मोटर्स आघाडीवर आहे. स्मार्ट, शाश्वत आणि एकात्मता अशा विविघ गुणधर्माशी जवळीक साधणारी अनेक वाहने टाटा मोटर्सने निर्माण केली. ज्यात कार, स्पोर्टस युटिलिटी वाहने, ट्रक, बस आणि संरक्षण वाहनांचा समावेश आहे. टाटा मोटर्सबाबत बोलताना विक्री आणि विपणन तसेच ग्राहक सेवा शाखेचे उपाध्यक्ष राजन अंबा म्हणाले, ‘भारतात एक उत्तम क्रीडा संस्कृती आहे. भारताने क्रीडा क्षेत्रात बलशाली व्हावे अशीच आम्ही कायम इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेसाठी सलग चौथ्या वर्षी आर्थिक पुरस्कार देण्याची संधी मिळाल्याने आम्ही आनंदी आहोत. या वर्षी आमची टाटा अल्ट्रोज ही गाडी दुसरा वर्धापनदिन साजरा करत आहे. या स्पर्धेतील खेळाडूंप्रमाणेच टाटा अल्ट्रोझने लाखो भारतीयांनी मने जिंकली आहेत. या स्पर्धेशी जोडले गेल्याचा आम्हाला खूप फायदा होईल. या स्पर्धेत नेहमीच सर्वोत्तम टेनिस खेळले जाते. या वर्षी देखिल ते खेळले जाईल यात शंका नाही.’ महाराष्ट्र लॉन टेनस संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धेची मालकी आयएमजीकडे असून, राईज वर्ल्डने त्याला सहकार्य केले आहे. ही स्पर्धा २००२ ते २००४ दरम्यान चेन्नई येथे झाली तेव्हा देखिल टाटा कंपनीने आर्थिक पुरस्कार दिला होता. ही स्पर्धा २०१८ मध्ये महाराष्ट्रात घेण्याचा निर्णय झाला, तेव्हापासून टाटा मोटर्सने या स्पर्धेसाठी दिलेल्या पाठिंब्याबाबत आम्हाला आनंद होत आहे. क्रीडा स्पर्धा आणि टाटा समीह यांचा समृद्ध वारसा आहे. त्यांच्या सततच्या सहभागाबद्दल आणि या प्रवासाचा एक भाग राहिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांनी सांगितले.
पुणे, दि.27 जानेवारी 2022: अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित स्वर्गीय अण्णा नेवरेकर(सर) स्मृती करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत आदिनाथ क्रिकेट क्लब संघाने चंद्रोज् संघाचा पराभव करत स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अभिग्यान कुंडूच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर आदिनाथ क्रिकेट क्लब संघाने चंद्रोज् संघाचा 12 धावांनी पराभव करत स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. पहिल्यांदा खेळताना आदिनाथ क्रिकेट क्लब संघाने 20 षटकात 7 बाद 208 धावा केल्या. अभिग्यानने केवळ 59 चेंडूत 18 चौकार व 15 षटकारांसह 174 धावांची दमदार खेळी केली. 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चंद्रोज् संघाने उत्कृष्ट कामगिरी केली मात्र विजय मिळवू शकला नाही. गगनदिप पलाहेने 68 चेंडूत 16 चौकारांसह दमदार 112 धावा केल्या. स्वरूप तवाडरे व यश उसघारे यांच्या अचूक गोलंदाजीने चंद्रोज् संघाचा डाव 20 षटकात 8 बाद 196 धावांत रोखला. अभिग्यान कुंडू सामनावीर ठरला. स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी: आदिनाथ क्रिकेट क्लब- 20 षटकात 7 बाद 208 धावा(अभिग्यान कुंडू 174(59, 18×4, 15×6), पार्थ सोनावणे 3-5, श्रिराग पिल्ले 3-67) वि.विचंद्रोज्- 20 षटकात 8 बाद 196 धावा(गगनदिप पलाहे 112(68, 16×4, 1×6), स्वरूप तवाडरे 2-31, यश उसघारे 1-24) सामनावीर- अभिग्यान कुंडूआदिनाथ क्रिकेट क्लब संघाने 12 धावांनी सामना जिंकला.
पुणे, दि. २७:- महिला सक्षमीकरण कार्यासाठी केंद्र शासनाकडून दरवर्षी ८ मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या ‘नारी शक्ती पुरस्कार-२०२१’ साठी पात्र महिला आणि संस्थांनी ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईनरित्या अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांना सर्व क्षेत्रामध्ये सहभाग घेण्याच्या उद्देशाने प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच भारतीय युवक-युवतींना समाज व राष्ट्र निर्माण यामध्ये महिलांच्या योगदानाचे महत्त्व समजण्यासाठी नारी शक्ती पुरस्कार देण्यात येतो. विशेषत: दुर्बल घटकातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांना आणि सामाजिक संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो.
पुरस्कारासाठी इच्छुक पात्र महिला व सामाजिक संस्थांनी आवश्यक कागदपत्रासह ३१ जानेवारी २०२२ पर्यंत www.wcd.nic.in किंवा www.awards.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतील. पुरस्काराचे स्वरुप दोन लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे आहे.
पुरस्कारासाठी महिला व सामाजिक संस्थानी अर्ज करावेत. वैयक्तिक पुरस्कारासाठी महिलांचे वय १ जुलै २०२१ रोजी वय २५ वर्षे पूर्ण झालेले असावे. एखादी सामाजिक संस्था अर्ज करु इच्छित असेल तर महिलांसाठी आर्थिक व सामाजिक क्षेत्रामध्ये ५ वर्ष कामाचा अनुभव आवश्यक राहील. यापूर्वी हा पुरस्कार मिळालेल्या महिलांनी किंवा सामाजिक संस्थांना अर्ज करता येणार नाही.
महिलांसाठी सर्वसाधारण परीस्थितीमध्ये आर्थिक सामाजिक सक्षमीकरणाठी संबंधित क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या महिलांना व सामाजिक संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांनी महिलांना निर्णायक भूमिका घेण्यासाठी प्रोत्साहन दिलेले असावे, पारंपारिक व अपारंपरिक क्षेत्रामध्ये महिलांना कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन दिलेले असावे. ग्रामीण महिलांना मुलभुत सेवा पुरविण्याच्या उददेशाने कार्य केलेले असावे. महिलांना विज्ञान, औद्योगिक, खेळ, कला, संस्कृती, आरोग्य व स्वास्थ शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण प्रोत्साहित केलेले असावे आदी पात्रता व निकष पुरस्कारासाठी आहेत, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी कळविले आहे. **
पुणे-परशुराम सेवा संघ पुणे जिल्हा आयोजित ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, प्रवचनकार डॉ. सचिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्त सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या ‘डावी विषवल्ली’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यांत आले. या कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत दादा पाटील परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधवजी भांडारी, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक अॅड. प्रसन्न जगताप, नगरसेवक जयंत भावे नगरसेवक श्रीकांत जगताप आर पी आय चे राष्ट्रीय निमंत्रक श्री मंदारभाऊ जोशी ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले डाव्यांनी सतत खोटे बोलून देशाच्या युवा पिढीचे मेंदू पोखरायचे काम केले अशा पुस्तकांमुळे डाव्यांचा खोटारडेपणा उघडा पडला असून सातत्याने सांगितलेल खोट कस चुकीच होत हे आता नव्या पिढीला पटल्याने देशभरातून डावे हद्दपार होत असल्याचे दिसते. असे असले तरी अर्बन नक्षलवादाच्या भूमिकेतून डावे सतत देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून या परिस्थितीचा विचार करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. माधवराव भंडारी म्हणाले डाव्यांना जनतेच्या प्रश्नांना खितपत ठेवण्यात रस आहे गरीब हा नेहमी गरीबच राहावा त्याच्या उद्धाराचा विचार डावी विचारसरणी कधीच करत नाही त्यामुळेच देशभरातील जनतेने डाव्या विचारसरणीला नाकारले आहे. डॉ सच्चीदानंद शेवडे म्हणाले या पुस्तकाचे मुळ लेखक डॉ राजीव मिश्रा असून याचा मराठी अनुवाद केला असून या माध्यमातून डाव्यांचा काळा इतिहास मराठी जनतेसमोर मांडण्याचा हा प्रयत्न आहे ज्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे नावीन्य प्रकाशन च्या वतीने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री ऋषिकेश सुमंत, स्वप्नील कुलकर्णी दत्तात्रय कुलकर्णी शिवप्रसाद मुळे सागर मांडके मंदार डबीर माधुरी कुलकर्णी संकेत जोशी ज्योती पाठक ऋषिकेश गालफडे अभिषेक समुद्र कांचन कुलकर्णी राहुल होशिंग आशिष गोडबोले आदींनी परिश्रम घेतले.
भारताच्या इतिहासाचे फाळणीपूर्व आणि फाळणीनंतर असे दोन भाग होतात. फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताची सुरुवात हिंसाचाराने झाली. याच हिंसाचाराने देशात आता पाळेमुळे रुजविली आहेत. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम भारतातील कोणत्या न कोणत्या भागात अशांतता असतेच. संकटे, मग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, सतत येत असतात. भारतातील अनेक राज्यांना भेट देऊन, तेथील अनुभव प्रसिद्ध माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ‘अस्वस्थ दशकाची डायरी’त लिहिले आहेत. मन अस्वस्थ करणारा हा अनुभव आता आपल्याला ‘स्टोरीटेल’च्या ‘ऑडिओबुक्सद्वारे श्राव्यरूपात खुद्द अविनाश धर्माधिकारी यांच्याच आवाजात ऐकता येणार आहे.
अस्वस्थ दशकाची डायरी’ हे पुस्तक लिहिणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांचा प्रवास माजी सनदी अधिकारी ते चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक असा आहे. प्रशासकीय सेवेत असताना लोकाभिमुख प्रशासनाचे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वीपणे राबविले. स्वेच्छा निवृत्वृतीनंतर चाणक्य मंडल सारख्या संस्थेतून त्यांनी कित्येक सक्षम अधिकारी घडविले आहेत. युवकांचे प्रेरणास्थान, उत्तम वक्ता, विचारवंत, अशी ही त्यांची आणखी काही रूपं आहेत. ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ हे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे. राज्य शासनाचा उत्कृष्ट ग्रंथाचा पुरस्कार या पुस्तकाला लाभला आहे.
‘देशाचा कार्यकर्ता’ होण्याचे स्वप्न वयाच्या सोळाव्या वर्षी पाहिल्यावर ज्ञानप्रबोधिनीचा कार्यकर्ता म्हणून काम चालू होते आणि मुक्त पत्रकारिताही सुरू होती. सामान्य लोकांपासून नेत्यांपर्यंत सर्वांशी बोलून त्यावर मुख्यत: ‘माणूस’ साप्ताहिकात ते लेखन करायचे. पंजाब, आसाम, काश्मीर व दिल्लीतील राजकारण, शहाबानो प्रकरण, गुजरातमध्ये पेटलेले राखीव जागांविरोधी आंदोलन आणि महाराष्ट्रातली शेतकरी चळवळ, अयोध्या विवाद या सर्वांवर त्यांनी जे अभ्यासपूर्ण लेखन केले, त्यातूनच त्यांचे पहिले पुस्तक ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ आकाराला आले आहे. ‘अस्वस्थ दशकाची डायरी’ या पुस्तकाबद्दल प्रख्यात जेष्ठ लेखिका दुर्गा भागवत म्हणाल्या आहेत, “केवळ साहित्यिक व्हायच्या हौसेने केलेले हे लेखन नाही. तरीदेखील याची गणना उत्तम ललित लेखनात करता येईल”, अशी कोैतुकाची थाप त्यांनी दिलेली आहे.
अनेक दिग्गजांनी प्रशंसा केलेल्या ‘अविनाश धर्माधिकारी यांच्या ‘अस्वस्थ दशकाची डायरी’मधील आर्त अनुभव ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.
अविनाश धर्माधिकारी लिखित ‘अस्वस्थ दशकाची डायरी’चे ऑडिओबुक स्टोरीटेलवर ऐकण्यासाठील लिंक
पुणे-भारतीय सर्कस सध्या आर्थिक अडचणीतून जात असून करोना संकटामुळे त्यात भर पडली आहे. गेली दीड वर्षे करोना परिस्थितीमुळे सर्कसचे प्रयोग बंद होते. आता प्रेक्षकांची निम्मी क्षमता नियमानुसार ठेवण्यात आली असून महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने सर्कस उद्योगाला करोनाकाळानिमित्त वार्षिक आर्थिक मदत देण्याचे मान्य केले या बद्दल आम्ही आभारी आहोत, अशा भावना रॅम्बो सर्कसचे पार्टनर सुजित दिलीप यांनी व्यक्त केल्या.
रॅम्बो सर्कस ही पुण्याची सर्कस असून ३१ वर्षांपूर्वी २६ जानेवारी १९९१ रोजी प्रजासत्ताक दिन निमित्त पी. टी. दिलीप यांनी रॅम्बो सर्कस सुरु केली. रॅम्बो सर्कसचा ३१वा वाढदिवस आज सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक बस स्टँड समोर, फन टाईम मल्टिप्लेक्सच्या मागे चालू असणाऱ्या रॅम्बो सर्कस मध्ये साजरा केला गेला. प्रारंभी भारतीय सर्कसचे संस्थापक विष्णुपंत छत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. विदुषकांच्या हस्ते व सर्कस कलावंतांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात केक कापण्यात आला. या प्रसंगी सर्व सर्कस कलावंत व विदुषकांनी हातात छोटे तिरंगी झेंडे घेऊन सर्कस मध्ये ‘भारत माता कि जय’, ‘सर्कस चिरायू हो’ अशा घोषणा देत सर्कस बँड सह फेरी मारली.
प्रारंभी ‘सर्कस विश्व’ आणि ‘वर्ल्ड ऑफ सर्कस’ या पुस्तकांचे लेखक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ‘सर्कस ही कला जिवंत राहिली पाहिजे व त्यासाठी मोठ्या शहरांमध्ये मध्यवर्ती भागात नाममात्र दरात मैदाने उपलब्ध झाली पाहिजेत तसेच पुण्यात सर्कस म्युझियम ही साकारले जावे’ असे ते म्हणाले. सर्कस कलावंतांतर्फे विदुषक विजू यांनी सर्वांना धन्यवाद देऊन ‘सर्कसचा वाढदिवस म्हणजे आम्हा प्रत्येक सर्कस कलावंतांचा वाढदिवस आहे’ असा सांगून या वाढदिवस निमित्त आलेल्या सर्वांना धन्यवाद दिले. सर्कस मित्रमंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी सर्कसमध्ये प्राण्यांना परवानगी मिळावी अशी मागणी केली. सर्कस मित्रमंडळाचे सचिव प्रवीण तरवडे यांनी सर्कस कलावंतांना शासनाने पेन्शनची व्यवस्था करावी अशी मागणी केली. शासनाने २६ नोव्हेंबर हा भारतीय सर्कसचा जन्मदिवस अधिकृतपणे साजरा करावा असे एॅड आनंद धोत्रे म्हणाले. रॅम्बो सर्कसचे पुणेकरांशी भावनिक नाते असून दरवर्षी या सर्कसमध्ये एड्स ग्रस्त मुले, अनाथ व अपंग मुले यांना मोफत सर्कस दाखवली जाते याबद्दल पुणे शहर कॉंग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी नंदकुमार बानगुडे, सागर आरोळे, श्रुति तिवारी, वाजिद भाई आदी मान्यवर उपस्थित होते. श्रुति तिवारी यांनी आभार प्रदर्शन केले. राजू मॅनेजर यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. सर्कस रिंगमध्ये झालेल्या कार्यक्रमास उपस्थितीत प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. सर्वांना मास्क वापरणे सक्तीचे केले होते. तसेच सर्कस तंबूत जाताना सॅनिटायझरचा वापर होत होता.
रॅम्बो सर्कसचे रोज दुपारी ३.३० आणि सांयकाळी ६.३० असे दोन शो होतात. तिकिट दर १५० रु, २५० रु, ३५० रु व ५०० रु असून पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था आहे. सर्कसमध्ये ६० कलावंत असून ७०० प्रेक्षक क्षमता आहे. सध्याच्या नियमानुसार ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जातो. सर्कसमध्ये फ्लायिंग ट्रापिज, डबल बॉलन्स, कॉमिक जगलिंग, लॅडर बॉलन्स, नावाव पट्टी, कॅनडाल, रोला बोला, बेबी रोप, वाटर शो, स्टिक बॉलन्स, क्यूब, डॉग शो, रिंग डान्स, क्लाऊन, लॅशो, गारमन वेल्स, एरियाल, सायकल स्पेशल, सायकल एक्रोबॅट्स, रिंग ऑफ डेथ आणि फिनाले इत्यादी मनोरंजक खेळ व कसरती सादर केल्या जातात. सर्कसचा मुक्काम फेब्रुवारी अखेर पर्यंत सिंहगड रोड येथे असणार आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन देण्याचा अर्ज फेटाळला आहे. तसेच जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांचा कालावधी सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने हि आता जामीन अर्ज फेटाळून लावला आहे .शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी नितेश राणे यांचा जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकीलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर अखेर नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आज सुप्रीम कोर्टात त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली.शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. त्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आहे..
काय आहे प्रकरण?
18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे.