Home Blog Page 2101

अखेर 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार – शरद गोसावी

0

पुणे:दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

शरद गोसावी म्हणाले,४ ते ३० मार्च दरम्यान लेखी परीक्षा होणार असून १४ ते ४ मार्च तोंडी परीक्षा होईल अशी माहिती देण्यात आली आहे. ७० ते ८० गुणांच्या पेपरला अर्धा तास अधिक वेळ दिला जाणार असून ५० ते ६० गुणांच्या पेपरला १५ मिनिटं अधिक वेळ दिला जाईल.

10 वी ची तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारीपासून होणार आहे. कोविड १९ मुळे शाळा तिथं उपकेंद्र करण्यात येईल. एका वर्गात जास्तीत जास्त २५ विद्यार्थी बसतील अशी व्यवस्था असेल. सोशल डिस्टन्सिंगसाठी झिगझॅग पद्धतीने विद्यार्थ्यांना बसवले जाईल. असेही शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

यंदा बहिस्थ शिक्षक परीक्षक म्हणून न नेमता शाळेतील शिक्षक परीक्षक म्हणून काम पाहतील. बोर्डाच्या परिक्षेसाठी लसीचे 2 डोस घेणे बंधनकारक आहे. परीक्षा केंद्रांची संख्या चौपटीनं वाढविण्यात येतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पेपरसाठी अतिरिक्त वेळ दिला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.

वाझेला पुन्हा कामावर घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव-आदित्य यांचे निर्देश; माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांचा ईडीकडे दावा

0

“आम्ही सुद्धा पंतप्रधानांचे नाव घेतो”; परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई -पोलिस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावर दबाव टाकला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरूनच वाझेला पुन्हा सेवेत घेण्यात आले होते, असा दावा मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात केला आहे. पोलीस बदल्यांच्या याद्या अनिल देशमुख यांच्यासह मंत्री अनिल परब यांच्याकडून अंतिम होऊन यायच्या असाही आरोप केला आहे . यावर सेनेचे खासदार संजय राउत यांनी प्रतिक्रीया दिली आहे , ते म्हणाले ,’ आम्हीसुद्धा पीएम चे नाव घेतो-“परमबीर सिंह हे आरोपी आहेत. त्यांच्या वर खंडणीपासून अपहरणापर्यंत असे अनेक गुन्हे आहेत. मनसूख हिरेन प्रकरणात त्यांच्यावर कोणते आरोप लावले आहेत ते मला माहिती नाही. आरोपी आपल्या बचावासाठी अशी नावे घेत असतील. या आरोपांचे विरोधीपक्षाने भांडवल केले तरी याचा काही उपयोग नाही. आम्ही सुद्धा पंतप्रधानांचे नाव घेतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचेही नाव घेतले जात होते. कोण कोणाचे नाव घेतो याच्यावरुन काही बोध होत नाही,” असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणी ईडीने जानेवारी महिन्यात पुरवणी आरोपपत्र दाखल केलेले आहे. त्यामध्ये परमबीरसिंग यांनी हा दावा केलेला आहे. वाझेला पुन्हा पोलिस सेवेत सामावून घेण्यासाठी आपल्यावर थेट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा थेट दबाव होता. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडूनही सूचना करण्यात आल्या होत्या,’ असे परमबीर यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.

तुरुंगात वाझेचा छळ होतोय-असाही परमबीर चा दावा
वाझेचा तुरुंगात छळ केला जात आहे. त्याचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी दररोज शिव्याशाप, अंगझडती घेतली जाते. ठाणे येथील एका पोलिस उपायुक्त वाझेला भेटण्यासाठी तुरुंगात गेला होता. त्यानेही त्याच्यावर दबाव टाकला, असाही दावा परमबीर यांनी केला आहे.

जबाब बदलण्यासाठी वाझेवर देशमुखांचा दबाव
वाझेने सक्तवसुली संचालनालयासमोर दिलेला जबाब मागे घ्यावा यासाठी अनिल देशमुख यांनी दबाव आणला, असाही आरोप परमबीर यांनी केला आहे. निवृत्त न्यायमूर्ती के.यू. चांदीवाल यांच्या एकसदस्यीय आयोगासमोरील सुनावणीवेळी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी देशमुख आणि वाझे यांची भेट झाली होती. त्या वेळी वाझेवर जबाब मागे घेण्यासाठी देशमुख यांनी दडपण आणले, असे परमबीर यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

परमबीर हेच अँटिलिया स्फोटके-हिरेन हत्येचे मास्टरमाइंड : अनिल देशमुख
दरम्यान परमबीरसिंग हेच मुकेश अंबानी यांचे निवास अँटिलियासमोरील स्फोटके आणि ठाण्याचा व्यावसायिक मनसुख हिरेनच्या हत्येचे मास्टरमाइंड असल्याचा जबाब माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीकडे दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या पुरवणी आरोपपत्रातील जबाबात त्यांनी हा दावा केला आहे. माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेला आपण ओळखत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

“बदल्यांची यादी देशमुखांना अनिल परब देत होते, पण परबांना यादी कोण देत होतं?”

‘आप’ची सत्ता आल्यानंतर दिल्ली प्रमाणे मोफत वीज आणि पाणी देऊ -केजरीवाल

0

पणजी -आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एक मोठी घोषणा केली आहे. गोव्यात जर आम आदमी पार्टीची सत्ता आली तर, गोव्यात वीज आणि पाणी मोफत देऊ अशी घोषणा करण्यात आली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. ‘आप’ने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यात मोफत वीज आणि पाणी देण्याची घोषणा केली आहे. गोव्यातील जनतेने आम्हाला निवडून दिले तर दिल्ली प्रमाणे मोफत वीज आणि पाणी दिले जाईल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अनेक राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून, राजकीय पक्ष आता मतदारांना आश्वासन देताना पाहायला मिळत आहे. त्यापार्श्वभुमीवर केजरीवाल यांनी देखील गोव्यात मोफत वीज आणि पाणी देण्याची घोषणा देली आहे.

दरवर्षी दोन लाखांचा फायदा : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेला संबोधित करताना सांगितले की, जर त्यांचा पक्ष यावेळी गोव्यात सत्तेवर आला तर पाच वर्षांत प्रत्येकाला किमान दहा लाखांचा फायदा करुन दिला जाईल. असे देखील आश्वासन दिले आहेत.

37 प्रवाशांना घेऊन पुण्याहून गोव्याकडे जाणाऱ्या खासगी बसने अचानक घेतला पेट, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

0

पुणे-पुण्याहून 37 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसने भररस्त्यात अचानक पेट घेतला. मनिष ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली आहे. गुरुवारी पहाटे 4 वाजता वैभववाडी एडगांव घाडीवाडी नजीक ही घटना घडली आहे. या घटनेने वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली. या ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी हे थोडक्यात बजावले आहे. यामध्ये एक वृद्ध महिला जखमी झाल्याची माहिती आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. आता सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

मनिष ट्रॅव्हल्स ही बस पहाटेपुण्याहून गोव्याला निघाली होती.कुडाळ घाट उतरल्यानंतर एडगांव नजिक बस आली. यानंतर बसने अचानक पेट घेतला. बस चालकाच्या हे लक्षात आले आणि त्याने लगेच बस थांबवली. या बसमधील प्रवासी खाली उतरले. प्रवासी खाली उतरताच बसमधून धुराचे लोळ निघाले आणि बसने पूर्णपणे पेट घेतला.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर महामार्ग विभागाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच कुडाळ येथील अग्निशमन बंब घटनास्थळी पोबोतवे. अनेक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. या घटनेनंतर वैभववाडी एडगाव परिसरात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. सकाळी सात वाजता रस्ता मोकळा करत वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेचा तपास वैभववाडी पोलिस करत आहेत.

महान कलावंत काळाच्या पडद्याआड

0

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 2 :- “ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक गौरवशाली अध्याय संपला आहे. देखणं व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशकं अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रमेश देव यांच्या अभिनयानं मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचं काम त्यांनी केलं. सीमा आणि रमेश देव यांचं वास्तवातलं तसंच पडद्यावरचं दांपत्यजीवन महाराष्ट्रासाठी आदर्शवत होतं. त्यांच्या निधनाने एक महान कलावंत, आदर्श माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्याचं निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे. रमेश देव यांच्या कुटुंबियांच्या, रसिक चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. रमेश देव साहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली…,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रध्दांजली वाहिली.


सदाबहार, मनस्वी अभिनेता

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २:- मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाची छाप उमटवणारा, मनस्वी असा अभिनेता आपण आज गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी एक उत्तम कलावंत म्हणून आयुष्यभर कलाक्षेत्राची सेवा केली.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचा परवाच वाढदिवस होता. शुभेच्छांचा ओघ सुरू असतानाच त्यांचे आपल्यातून जाणे दुःखदायक आहे. रमेश देव यांनी मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. दोन्हीकडे आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहबंध होते. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही संधी आजमावली होती. चित्रपट सृष्टीत त्यांना आदराचे स्थान होते. देव कुटुंबीयांकडून कला क्षेत्राची अविरत सेवा सुरू आहे. दिवंगत रमेश देव हे कला क्षेत्रात दोन पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा आणि मार्गदर्शक असा दुवा होते. त्यांनी सदाबहार आणि मनस्वी कलाकार अशी प्रतिमा आयुष्यभर जपली. त्यांचे चित्रपट क्षेत्रातील योगदान विसरता येणार नाही असे आहे. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
0000

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

0

मुंबई- हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. चारच दिवसांपूर्वी ३० जानेवारी रोजी त्यांनी आपला ९३वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या मागे पत्नी सीमा देव आणी परिवार आहे. रमेश देव यांचे चिरंजीव अजिंक्य देव अभिनेता व दिग्दर्शक आहेत तर दुसरे चिरंजीव अभिनव हे दिग्दर्शक आहे.रमेश देव यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत २८५ हून अधिक हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट आणि ३० मराठी नाटकांमध्ये २०० हून अधिक शो केले. त्यांनी फीचर फिल्म्स, टेलिव्हिजन मालिका आणि २५० हून अधिक जाहिरात चित्रपटांची निर्मिती देखील केली. त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिका देखील दिग्दर्शित केल्या. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

रमेश देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये नायक, खलनायक अशा दोन्ही भूमिका साकारल्या. १९५१ साली त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पाटलाची पोर या चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. १९५६ साली राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधळा मागतो एक डोळा’ या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

रमेश देव हे अभिनेता तर होतेच पण ते निर्माता, दिग्दर्शक हि होते. त्यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ चा..असंख्य हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या . बॉलीवूड मधल्या राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्यापासून ते त्याहून जुन्या आणि अगदी अलीकडच्या सुपर हिरोंबरोबर देखील त्यांनी काम केलं. बहुतेक वेळा रमेश देव आणि त्यांच्या पत्नी सीमा देव हे दोघेही रसिकांना सिनेमाच्या पडद्यावर नुसते दिसलेच नाही तर भावले देखील . अगदी ब्लॅॅक अँँड व्हाईट सिनेमा असेल फ्युजी कलर सिनेमा असेल आणि नंतरचा सिनेमास्कोप असेल इस्टमन कलर असेल अशा नानाविध सिनेमात नाना विध भूमिका या दोहोंनी एकत्र रंगविल्या .बहुतेक चित्रपटात त्यांनी खलनायक सादर केला .“आनंद” आणि “तकदीर” या चित्रपटातील भूमिकांनी त्यांना चांगलीच लोकप्रियता दिली देव यांनी ‘आंधळा मागतो एक डोळा ’ (१९५६) या चित्रपटातून करमणूक उद्योगात पदार्पण केले. त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट “आरती” होता.

रमेश देव यांचं आडनाव खरे तर ठाकूर देव यांचे बालपण कोल्हापुरात गेले. राजर्षी शाहू महाराजांमुळे त्यांचं आडनाव देव झालं. रमेश देव यांचे वडील त्या काळचे प्रसिद्ध फौजदारी वकील होते. शाहू महाराजांनी दिलेल्या स्कॉलरशिपवरच ते वकील झाले होते. एकदा एका कामात त्यांनी महाराजांना मदत केली तेव्हा महाराज म्हणाले, “”ठाकूर, तुम्ही देवासारखे भेटलात. तुम्ही आता ठाकूर नाही – देवच!‘‘ आणि तेव्हापासून या परिवाराचे देव हेच आडनाव झालं. पु.ल.देशपांडे यांनी एका चित्रपटातील भूमिका नाकारली म्हणून रमेश देव यांना चित्रपटात संधी मिळाली. आपली आई, गुरू राजा परांजपे आणि पत्नी सीमा यांच्यामुळेच ‘रमेश देव’ ही वेगळी ओळख निर्माण झाली. रमेश देव हे दिसायला राजबिंडा होते.
१९५१ साली पाटलाची पोर या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राजा परांजपे दिग्दर्शित ‘आंधळा मागतो एक डोळा’ या १९५६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे त्यांना ओळख मिळाली होती. राजश्री प्रॉडक्शनचा आरती हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.१९५७ च्या सुमारास रमेश देव व सीमा (नलिनी सराफ) या दोघांचीही रूपेरी कारकीर्द सुरू झाली. ‘आलिया भोगाशी’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची सीमा यांच्याशी पहिली भेट झाली आणि त्यानंतर सहा वर्षांनी एक जुलै १९५३ ला त्यांचा विवाह झाला.रमेश देव आणि सीमा देव यांची ऑनस्क्रीन तसेच ऑफस्क्रीन या दोघांची केमिस्ट्री कायमच चांगली राहिली होती. रमेश देवांचे मराठी चित्रपटसृष्टीत फार मोठे योगदान आहे. एक काळ तर असा होता, की रमेश देव आणि त्यांची पत्नी सीमा देव चित्रपटात असतील तर तो हीट होणार अशी खात्री असायची. इंडस्ट्रीत वेळ पाळणारा नट म्हणूनच रमेश देव यांचं नाव घेतलं जात असे. रमेश देव यांनी अनेक चित्रपटात नायकाच्या भूमिका केल्या, पण ते उठून दिसले ते खलनायकी भूमिकेत. ‘भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच होता. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले. तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या. रमेश देव यांनी निर्माता, दिग्दर्शक अशा विविध प्रांतातही ठसा उमटवला. त्याचा ‘सर्जा’ हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट चांगलाच गाजला. अनेक हिंदी चित्रपटातही त्यांनी उत्तमोत्तम भूमिका केल्या. ऋषीकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ चित्रपटात राजेश खन्नाचा डॉक्टर मित्र खरोखरीच मनापासून रंगवला. त्यांच्या या भूमिकेला दादही मिळाली. अभिनेता म्हणून प्रस्थापित होवून रमेश देव यांनी एकाहून एक सरस चित्रपट दिले व आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळविले. संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टी तर रमेश देव यांना ‘कोल्हापुरी’ म्हणूनच ओळखत असे.

देवघर, भिंगरी, भैरवी, आधी कळस मग पाया, बाप माझा ब्रम्हचारी, एक धागा सुखाचा, क्षण आला भाग्याचा, प्रेम आंधळ असतं, सोनियाची पाऊले, आंधळा मागतो एक डोळा, येरे माझ्या मागल्या, आलिया भोगासी, आई मला क्षमा कर, राम राम पाव्हण, अवघाची संसार, पसंत आहे मुलगी, यंदा कर्तव्य आहे, सात जन्माचे सोबती, जगाच्या पाठीवर, आलय दर्याला तुफान, दोस्त असावा असा.
हिंदी चित्रपट. आनंद, आरती, मेरे अपने, आपकी कसम.

शरद पवारांनी एक प्रकारे राज्य सरकारला सल्लाच दिलाय ..आता सुधरा .. म्हणाले फडणवीस

0

मुंबई- वाईन विक्रीच्या निर्णयावर आज माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उतारे देताना शरद पवार यांनी केलेले विधान म्हणजे एक प्रकारे त्यांनी राज्य सरकारला सल्लाच दिलाय कि आता तरी सुधरा .. अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आणि यासंदर्भात बोलताना राज्य सरकारवर टीकाही केली आहे. “मला वाटतं की शरद पवारांच्याही हे लक्षात आलं आहे की हा निर्णय चुकला आहे. त्यांच्या लक्षात आलं आहे की समाजाच्या सर्व स्तरातून या निर्णयाला विरोध होत आहे. या निर्णयातून सरकारची अब्रू चालली आहे. जे काही डीलिंग करून या सरकारने काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला, त्यातून हे सरकार एक्स्पोज झालं आहे. त्यामुळे या सरकारला हा निर्णय मागे घ्यावाच लागेल. हे पवारांच्याही लक्षात आल्यामुळे त्यांनी सरकारला एक प्रकारे सल्लाच दिला आहे की सुधरा”, असं फडणवीस म्हणाले.

वाईन विक्रीचा निर्णय बदलला तरी वावगं ठरणार नाही -शरद पवारांचे महत्वपूर्ण विधान

0

मुंबई-वाईन विक्रीच्या विषयावर बोलताना शरद पवार म्हणाले की,’राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही. सरकारच्या निर्णयाला जर अनेक स्तरातून विरोध केला जात असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही. यामध्ये काही वावगं ठरणार नाही. असे शरद पवार म्हणाले आहेत.येथे माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते .

पुढे बोलताना पवार म्हणाले की, देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारुची विक्री होते. त्यामध्ये वाईनचा खप तुलनेने खूप कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यामध्ये होते. या जिल्ह्यामध्ये 18 वाईनरी आहेत 18 वाईनरी उत्पादन घेतात. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याविषयी राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल तर राज्य सरकारने निर्णय बदलला तरी वाईट वाटण्याचे कारण नाही. खरेतर वाईन आणि इतर मद्यांमधील फरक समजून घेण्याची भूमिका घ्यायला पाहिजे. ती घेतली नाही आणि याला विरोध असेल तर सरकारने या सर्व गोष्टीसंदर्भात वेगळा विचार केला तरी माझा विरोध नाही.’

खिरखिंडी येथील विद्यार्थ्यांना फायबर बोटीची व्यवस्था; जिल्हा प्रशासनाची माहिती

0

सातारा, दि. 2 : खिरखिंडी ता. जावली येथील विद्यार्थ्यांना अंधारी-कास ता. जावली येथील कसाई देवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे जाण्यासाठी प्रशासनाच्यावतीने फायबर बोटीची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

राज्यातील विविध प्रसार माध्यमात प्रकाशित झालेल्या बातमीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, सातारा, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, तहसीलदार जावली व गट विकास अधिकरी जावली यांनी मौजे खिरखिंडी येथे भेट दिली असून प्रत्यक्ष वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे.

जावली तालुक्यामध्ये कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या किनारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये मौजे खिरखिंडी हे गाव वसलेले आहे. सद्यस्थितीमध्ये गावामध्ये 7 कुटुंबे राहत असून गावाची लोकसंख्या 25 आहे. या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी आहे. त्या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मौजे अंधारी ता. जावली येथील हायस्कूलमध्ये जावे लागते.

सह्याद्री वाघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येत असलेल्या खिरखिंडी, आडोशी, माडोशी, रवंदी व कुसापूर या गावातील 70 कुटुंबाचे पुनर्वसन ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एकसाल सागाव या ठिकाणी वन्य विभागाने केले असून त्यासाठी 242 हेक्टर जमिन संपादित केली आहे. 70 कुटुंबापैकी 6 कुटुंबांनी जमिन ताब्यात घेतली नाही. ते एकसाल सागाव या गावी जावून जमिन ताब्यात न घेता परत आले आहेत. तसेच 1 कुटुंब यांनी जमिन ताब्यात घेतली असून ते परत खिरखिंडी येथे वास्तव्यास आले आहे. अशी एकूण 7 कुटुंबातील 25 लोक खिरखिंडी येथे राहतात. त्याच कुटुंबातील एकूण 8 मुले (4 मुले व 4 मुली) अंधारी येथील हायस्कूल ला शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात.

त्यासाठी मौजे खिरखिंडी गावातील 4 मुले व 4 मुली यांना घरापासून ते कोयना जलाशय किनारा पर्यंत येण्यासाठी 10 मिनिटे लागतात तेथून पुढे कोयना जलाशय ते शेंबडी मठ जलाशयातील 600 मिटर प्रवास बोटीने करावा लागतो. तेथून पुढे अंधारी येथील हायस्कूलला फळणी मार्गे पायी जाण्यासाठी साधारणत: एक तास इतका वेळ लागतो.

मौजे अंधारी ता. जावली येथील हायस्कूल हे अनिवासी हायस्कूल आहे. तथापी मौजे अंधारी येथे कसाईदेवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा अंधारी-कास ही निवासी आश्रमशाळा असून तेथे या विद्यार्थ्यांची निवासाची सोय होऊ शकते. तरीही हे विद्यार्थी निवासी राहत नाहीत. ते घरुनच येऊन-जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने त्यांना लाईफ जॅकेट पुरविण्यात आलेले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी फायबर बोटीची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदेश भाजपाचे नेते गावोगाव पोहचविणार-आ.चंद्रकांत पाटील

0

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशभरातील भारतीय जनता पार्टीच्या एक लाख ८० हजार नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा अर्थ सोप्या भाषेत समजून दिला. महाराष्ट्र भाजपाचे पदाधिकारी गावोगाव हा संदेश जनतेपर्यंत पोहचवतील,असे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात पक्षाचे पदाधिकारी या देशव्यापी संवाद उपक्रमात सहभागी झाले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, संजय कुटे, सुनील कर्जतकर, राज पुरोहित, जयप्रकाश ठाकूर, प्रदेश सरचिटणीस (मुख्यालय) अतुल वझे व प्रदेश चिटणीस संदीप लेले उपस्थित होते.
पाटील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बातचित करताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सोप्या शब्दात वेगवेगळ्या समाज घटकांना केंद्रीय अर्थसंकल्पाचा कसा लाभ होणार आहे हे सांगितले. शेतकऱ्यांना दीर्घकाळ उपयोगी पडणारा शेतकरी ड्रोनचा उपक्रम, ग्रामीण महिलांचे पाणी आणण्याचे कष्ट वाचविण्यासाठी प्रत्येक घराला नळाने पाणी देण्याची साठ हजार कोटींची योजना, ऐंशी लाख घरे असे विविध प्रस्ताव नरेंद्र मोदी यांनी नेते समजून दिले. क्रिप्टो करन्सी, डिजिटल बँकिंग असे विषयही समजून दिले. आता पक्षाचे नेते हा संदेश गावोगाव पोहोचवतील.

पुण्यात नवी नियमावली लागू

0

पुणे : कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सुधारित आदेश आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जारी केले आले आहेत. त्यानुसार १ फेब्रुवारीपासून शहरातील उद्याने, सर्व पर्यटनस्थळे नियोजित वेळेनुसार खुली करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे आठवडे बाजारही सर्व दिवस खुले राहणार आहेत.

शहरातील स्पा, सलून, ब्युटी पार्लर, मनोरंजन पार्क, थीम पार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क, रेस्टॉरंट, हॉटेल, सिनेमागृहे, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व उद्याने सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत खुली राहणार आहेत. खेळांशी निगडीत सर्व स्पर्धा स्टेडियम आसन क्षमतेच्या २५ टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत.

अंत्यविधी तसेच अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित नागरिकांच्या संख्येस कोणत्याही प्रकारचे निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. खुल्या जागेतील विवाह सोहळयांसाठी जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना आणि बंदिस्त जागेतील समारंभासाठी २०० लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी जाणा-या सर्व नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. तसेच, कोरोना प्रतिबंधक वर्तनाचे पालन करणे आवश्यक आहे.

माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

0

पिंपरी- माजी खासदार गजानन धरमसी बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. आज बुधवारी दुपारी चार वाजता बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 79 वर्षाचे होते. मागील तीन महिन्यांपासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. पोटाच्या विकारामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यामुळं त्यांची तब्येत बिघडत गेली. उद्या सकाळी 11वाजता निगडी इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.   पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना  उभी करण्यात बाबर यांचे मोठे योगदान होते .

असा होता राजकीय प्रवास
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते गजानन बाबर यांनी पिंपरीतील काळभोर नगर येथे शिवसेनेची पहिली शाखा सुरु केली. तिथून पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेच्या वाढीस सुरुवात झाली. गजानन बाबर यांना राजकारणातील एक अभ्यासू , लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जायचे. काळभोरनगर प्रभागातून तीन वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले. त्यानंतर हवेली तालुक्यातून त ते दोन वेळा आमदार म्हणून निवडणून आले. पुढे पूर्वीचा खेड लोकसभा मतदारसंघ रद्द झात्यानंतर तयार झालेल्या मावळ मतदार संघातून गजानन बाबर हे शिवसेनेचे पहिले खासदार म्हणून निवडून आले .  त्यानंतर त्यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर बाबर यांनी 2016मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु तेथेही मन न रमल्याने त्यांनी 2019 मध्ये पुन्हा शिवसेनेते प्रवेश केला होता.

मुंबईतील विविध विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

0

मुंबई, दि. 2 : मुंबईतील रहिवाश्यांच्या सोयी सुविधेसाठी सुरू असलेल्या विविध विकासकामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. ही कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

वरळी-शिवडी जोडरस्ता, नरिमन पॉईंट-कफ परेड जोडरस्ता, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, कलानगर जंक्शन आदी ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी आढावा घेऊन सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले.

बैठकीस आमदार सर्वश्री सदा सरवणकर, रवींद्र वायकर, अजय चौधरी, सुनील शिंदे, स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ, समाधान सरवणकर, श्रीमती श्रद्धा जाधव, रोहिणी कांबळे, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासु, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे म्हणाले, वरळी-शिवडी जोडरस्त्याच्या कामामुळे बाधित रहिवाश्यांचे योग्य स्थलांतर करण्यात यावे, पायाभूत आणि नागरी सोयी सुविधांना बाधा पोहोचल्यास त्या तात्काळ दुरूस्त करण्यात याव्यात, काम सुरू होण्यास विलंब असेल त्याठिकाणी बॅरिकेट्स लावू नयेत. नरिमन पॉईंट-कफ परेड प्रस्तावित जोड रस्त्यामुळे बधवार पार्क कोळीवाड्यातील रहिवाश्यांच्या बोटींच्या वाहतुकीस बाधा येणार नाही यासाठी त्यांच्या गरजा आणि अडचणी समजून घेण्याच्या सूचनाही श्री. ठाकरे यांनी केल्या.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना, नागरी सोयीसुविधा, जेथे शक्य आहे तेथे नागरी वने विकसित करणे, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड तसेच उड्डाणपुलांच्या खालील मोकळ्या जागेत सुशोभीकरण आणि नागरी सुविधा, कलानगर जंक्शन आणि स्थानिक रहिवासी संस्थांच्या परिसरात नागरी सुविधा तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक बेट तयार करून ते सुशोभित करणे, जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करावयाची सौंदर्यीकरणाची कामे आदींसंदर्भातही श्री.ठाकरे यांनी आढावा घेऊन योग्य नियोजनाबाबत निर्देश दिले.

‘बियरच्या चौपट अल्कोहोल वाईनमध्ये …म्हणाले डॉ. कल्याण गंगवाल

0

वाईन ही शंभर टक्के दारूच; आरोग्याला हानिकारक

सुपर मार्केट, किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय मागे घेण्याची मागणी

असे असते अल्कोहोलचे प्रमाण
वोडका – ४०-९५%
रम – ३६-५०%
व्हिस्की – ३६-५०%
टेकीला ५०-५१%
वाईन – १४-२४%
बियर – ४-८%

पुणे : वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण मोठे असते. वाईन शंभर टक्के दारूच असून, आरोग्याला अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या विरोधात विद्यार्थी, पालक, शिक्षक, महिला माता-भगिनी, सामाजिक कार्यकर्ते, साधुसंत, कीर्तनकार यांनी एकत्रित येऊन जनआंदोलन उभारण्याची गरज आहे, असे आवाहन शाकाहार व व्यसनमुक्ती चळवळीचे कार्यकर्ते सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी पत्रकार परिषदेत केले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने काही दिवसांपूर्वीच सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्री करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. कल्याण गंगवाल यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत निर्णयाचा निषेध केला व त्याविरोधात व्यापक चळवळ उभारण्याचे आवाहन केले.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “वाईन ही दारू नाही, हे वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने अतिशय चुकीचे आहे, हे एक डॉक्टर म्हणून नमूद करतो. सरकारमधील काही लोक निर्लज्जपणे वाईन दारू नसल्याचा चुकीचा प्रचार करत आहेत. आणखी एक दुर्दैवी योगायोग म्हणजे व्यसनमुक्तीसाठी आपली संपूर्ण हयात खर्ची घालणाऱ्या डॉ. अनिल अवचट यांच्या निधनादिवशीच सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनविण्याच्या दिशेने केलेली वाटचाल आहे.”

सरकारकडून व्यसनाधीनतेला प्रोत्साहन
“समाजाचे आरोग्य चांगले, सदृढ, व्यसनमुक्त असावे, यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असताना सरकारकडून दारूला प्रोत्साहन दिले जात आहे, हे अतिशय गंभीर आहे. सुशांतसिंह राजपूत आणि आर्यन शाहरुख खान प्रकरणातही राज्य सरकारने अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याना पाठीशी घालण्याचे चुकीचे काम केले आहे. वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण भरपूर असते. हळूहळू वाईन, हार्ड ड्रिंक, दारू, अंमली पदार्थ असे त्याचे व्यसन लागू शकते. वाईन सहजपणे उपलब्ध व्हायला लागली, तर शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी जातील. विक्रेत्यांकडून या किशोरवयीन मुलांना ग्राहक बनवण्याचा प्रकार वाढेल. हा प्रकार पाश्चिमात्य देशांत झाल्याचे आपल्याला दिसून येते. आणि भारताच्या दृष्टीने ही धोक्याची सूचना आहे,” असे डॉ. गंगवाल यांनी नमूद केले.

दारूने अनेक कुटुंब उद्ध्वस्त
मूठभर शेतकरी आणि सरकारमधील काही नेतेमंडळीच्या स्वार्थासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “महाराष्ट्रात गुन्हेगारीचे मूळ दारू हे आहे. ग्रामीण भागात महिलांचे, मुलांचे जीवन पर्यायाने कुटुंबे दारूने उद्ध्वस्त झालेली आपण पाहिली आहेत. समाजाची बिघडलेली ही घडी सुधारण्यासाठी गेली अनेक वर्षे माझ्यासह डॉ. अनिल अवचट, वसुधा सरदार, बंडातात्या कराडकर महाराज, डॉ. नरेंद्र दाभोलकर आदी लोकांनी स्वतःला वाहून घेतले आहे. या नव्या निर्णयाने कामगार, कष्टकरी, तरुण वर्ग दारूच्या आहारी जाण्याची भीती आहे. सरकारने यावर त्वरित विचार करून हा निर्णय रद्द केला पाहिजे.”

व्यापक जनआंदोलन उभारणार
“वाईनचा प्रचार व प्रसार राज्य सरकारने करू नये आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, यासाठी समाजाने एकत्रित येत व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज आहे. राज्यभरातील पालक, शिक्षक, माता-भगिनी, साधुसंत, कीर्तनकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी या निर्णयाचा निषेध करावा. व्यसनमुक्ती हीच खरी देशभक्ती आहे, हे आपण ध्यानात घ्यावे. येणाऱ्या पिढ्या बरबाद होण्यापासून वाचवायचे असेल, तर आज आपण याविरोधात आवाज उठवला पाहिजे. व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे,” असे आवाहन डॉ. गंगवाल यांनी केले.