Home Blog Page 21

धर्मजागरण विभागाच्या कार्यालयाचे पुण्यात भूमिपूजन

कार्यावरील विश्वासामुळेच संघाला भरभरून साहाय्य”

पुणे, ४ डिसेंबर
समाजासाठी आणि देशासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते निःस्वार्थीपणे गेली शंभर वर्षे काम करत आहेत. या कार्यामुळेच संघाबद्दल समाजामध्ये विश्वास निर्माण झाला आहे. या विश्वासामुळे समाज संघाला भरभरून साहाय्य करत आहे, असे प्रतिपादन संघाच्या अखिल भारतीय धर्मजागरण गतिविधीचे समन्वयक शरदराव ढोले यांनी केले.

धर्मजागरण गतिविधीचे अखिल भारतीय कार्यालय पुण्यात बांधले जाणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन ढोले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश उर्फ नाना जाधव, महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, पर्वती भागाचे संघचालक अॅड. चंद्रशेखर कुलकर्णी, ज्येष्ठ कार्यकर्ते दिवाकर पांडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मित्रमंडळ सोसायटीमध्ये ‘अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान’तर्फे मुद्रिका बंगला येथे हा कार्यालय बांधकाम प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

धर्मजागरण विभागाचे काम देशभरात वाढत आहे. त्यामुळे कार्यालयांचीही गरज निर्माण झाली आहे. पुण्यात कार्यालयाची जी इमारत तयार होईल त्यात अध्ययन, संशोधन, संस्था सक्षमीकरण, कार्यकर्ता प्रबोधन, कार्यकर्ता प्रशिक्षण अशा अनेक योजना चालवल्या जातील. प्रशिक्षणाचे अनेक विषय या कार्यालयाच्या माध्यमातून सुरू केले जातील, अशी माहिती ढोले यांनी दिली.

संघ प्रेरणेतून चालणाऱ्या संस्थांना जो निधी किंवा ज्या वास्तू देणगीरूपाने दिल्या जातात, त्यांचा उपयोग योग्य त्याच कारणांसाठी होतो, हा विश्वास समाजात निर्माण झाला आहे. समाजाला बरोबर घेऊनच संघ यापुढेही काम करत राहील, असेही ढोले यांनी सांगितले.

कै. वासुदेवराव आणि कै. कमलताई गोखले या दाम्पत्याच्या दातृत्वाबद्दलची माहिती अॅड. चंद्रशेखर कुलकर्णी यांनी दिली. गोखले यांनी त्यांचा मित्रमंडळ सोसायटीतील बंगला अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठानला देणगी स्वरूपात दिल्यामुळेच त्या जागी नवी वास्तू साकारत आहे, असे कुलकर्णी म्हणाले.

सेवा आणि समाजोपयोगी उपक्रम चालावेत या अपेक्षेने जी वास्तू देणगी स्वरूपात देण्यात आली आहे, त्याच अपेक्षेप्रमाणे या वास्तूचा उपयोग केला जाईल, असा विश्वास प्रा. नाना जाधव यांनी व्यक्त केला. नितीन कमळापूरकर, शिरिष किराड, हेमंत हरहरे यांनीही मनोगत व्यक्त केले. मिलींद वाईकर यांनी सूत्रसंचालन केले.

पिंपरी चिंचवडच्या वैभवाला शब्दांच कोंदण – वर्षा उसगावकर

पिंपरी चिंचवड वैभव काव्य संग्रहामधून संस्कृतीचे दर्शन – डॉ. श्रीपाद जोशी

पिंपरी चिंचवड काव्य संग्रहाचे प्रकाशन

पिंपरी, पुणे (दि. ०४ डिसेंबर २०२५) पिंपरी चिंचवड वैभव काव्यसंग्रहा मधून शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक प्रतिभेची सर्वांना माहिती, ओळख होते. या काव्य संग्रहाने शहराविषयी शब्दांचे कोंदण निर्माण केले आहे. या माध्यमातून स्थानिक साहित्यिकांशी संभाजी बारणे यांनी योग्य समन्वय साधून व्यासपीठ उपलब्ध केले; ही विशेष कौतुकाची बाब आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा तसेच मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने संभाजी बारणे यांच्या संकल्पनेतून आणि राजन लाखे संपादित “पिंपरी चिंचवड वैभव” काव्यसंग्रहाचे प्रकाशन बुधवारी (दि.३ डिसेंबर) वर्षा उसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, डॉ. अभय कुलकर्णी, अशोक पगारिया, माजी नगरसेविका मनिषा पवार, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष राजन लाखे, संभाजी बारणे, कांचन जावळे, प्रभाकर ओव्हाळ, सागर बारणे, विशाल बारणे आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले, सध्या संस्कृतीची साठवणूक सुरू आहे. भौतिक साधनांद्वारे संस्कृतीचे जतन करता येत नाही. त्यासाठी गावागावातील लोककला, साहित्य, काव्य, कलावंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, कामगार ही त्या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदणारी सामाजिक वीण महत्त्वाची आहे. यालाच आपण संस्कृतीची श्रीमंती म्हणू शकतो. संस्कृती ही संज्ञा खूप व्यापक असून बारणे आणि लाखे यांनी पिंपरी चिंचवड वैभव काव्य संग्रहाद्वारे शहराच्या सांस्कृतिक ऐश्वर्याचे दर्शन घडविले आहे असे डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले.
भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक साहित्य, क्रीडा, शिक्षण, समाजकारण, राजकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये वाढवली पाहिजे. शहरांमध्ये प्रतिभावंतांची मांदियाळी तयार होत आहे. पिंपरी चिंचवड शहरातून अनेक कलाकार घडले आणि त्यांनी राज्य, राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. बारणे आणि लाखे यांनी सादर केलेला काव्यसंग्रह नव साहित्यिकांना प्रेरणा देणारा आहे असे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड वैभव काव्य संग्रहासाठी शहरातील कवींकडून त्यांच्या स्वलिखित कविता मागविण्यात आल्या होत्या. एकूण १५२ कविता प्राप्त झाल्या त्यामधून ९६ कवितांचा समावेश या काव्य संग्रहामध्ये करण्यात आला आहे, असे राजन लाखे यांनी सांगितले‌.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कवयित्री सुरेखा कटारिया, अकीला इनामदार, कमल सोनजे, मंगला पाटसकर, प्रा. सुभाष आहेर, डॉ. निळकंठ मालाडकर, सिताराम नलगे, रमेश पिंजरकर आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच फिरोज मुजावर यांनी नृत्याविष्कारतून गणेश स्तुतीचे सादरीकरण केले. ऋचा राजन यांनी गणेश वंदना गायली. सूत्रसंचालन गणेश लिंगाडे यांनी तर संभाजी बारणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास साहित्यिक, कवी, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या’ चुकांची जबाबदारी फडणवीस टाळतात कशी..?

निवडणूक आयोगाची निर्मिती’च् सरन्यायाधीशांना बाजूला करून भाजप’ने मनमानीपणे केली…!
— वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे दि – ३ डिसें
‘पंतप्रधान, विरोधीपक्ष नेता व सरन्यायाधीशांच्या’
मुख्य निवडणूक आयोग निवडीच्या ‘त्रिसदस्य समिती’तुन
न्यायव्यवस्थेचे प्रतिनिधि असलेल्या ‘देशाच्या सरन्यायाधीशां’ना वगळून, केंद्रीय मंत्री अमित शहांना घेऊन ‘पंतप्रधान मोदी व शहां’नी नियुक्त केलेल्या मुख्य निवडणूक आयोगाची निर्मिती’च् मुळात भाजप’ने मनमानी पणे केल्याने, राज्य निवडणूक आयोगाच्या वारंवार व कदाचित जाणीवपूर्वक होणाऱ्या चुकांची नैतिक जबाबदारी भाजप ला टाळता कशी येईल (?) असा सवाल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला. ते म्हणाले की, सहकार व गृह खात्यात अमित शहांच्या हाताखाली काम केलेल्या ज्ञानेश कुमार यांना भाजप करीता अनुकूल पावले उचलण्यासाठीच् ‘मुख्य निवडणूक आयुक्त’ करून आयोगाची निर्मिती केल्याचे आरोप अनेक बाबींद्वारे सिद्ध होतात व त्या आरोपांना पृष्टी मिळणारे निर्णय व घटना देखील समोर येत आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने सर्व प्रथम, “उमेदवारी अर्ज ॲानलाईन भरण्याचा” फतवा काढला होता. त्यावर गदारोळ झाल्याने व तांत्रिक अडचणी आल्याने पुन्हा तो मागे घेऊन “ॲाफ लाईन अर्ज भरण्याचा” निर्णय जाहीर केला..!
तसेच, प्रचार संपण्याची मुदत सर्व प्रथम ३० नोव्हेंबर सायं ५ वा. पर्यंत होती, मात्र नंतर १ डिसेंबर रात्री १० पर्यंत वाढवली,
तसेच अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात देखील अक्षम्य विलंब का केला गेला… (?) या सर्व गोंधळा मागे काय धोरण होते (?)
निवडणूकींचा जाहीर केलेला कार्यक्रमात वरील जाणीव पुर्वक बदल कोणास फायदा होण्यासाठी केले काय…?
मतदान तब्बल १८ दिवस पुढे ढकलल्या मुळे ऊमेदवारांचा वाढीव खर्च सरकार वा निवडणूक आयोग देणार आहे काय..?
आयएएस नियुक्ती असलेला स्वायत्त निवडणूक आयोग, आपल्या दिशाहीन व गोंधळलेल्या अवस्थेचे जाणीव पुर्वक प्रदर्शन करत व वेड्याचे सोंग घेत, कुणा उमेदवार वा सत्ता पक्षास प्राप्त परिस्थितीचा फायदा पोहोचवत आहे काय (?) असे सवाल उपस्थित करून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी “आयएएस दर्जाच्या प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता व विश्वासार्हता” जाणीव पुर्वक धोक्यात आणली जात असल्याचा आरोप ही सत्ताधारी भाजप’वर केला.
स्थानिक नगर परिषदेच्या निवडणूकांचे ‘मतदान व निकालां’चा स्थगिती निर्णय राज्य निवडणूक आयोगात २९ तारखेला झाल्याची माहीती आहे. मात्र निर्णय जाहीर होण्यास विलंब का झाला (?) निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांशी गुफ्तगू करत होता काय वा परीस्थितीचा अंदाज घेत होता (?) या बाबत महाराष्ट्र काँग्रेस’ तर्फे आयोगास जाब विचारणारे निवेदन सर्वप्रथम आपण स्वतः (३० ता. रात्रीच) जारी केल्याचे ही त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोग केंद्र व राज्यातील सत्ताधीशांच्या तालावर नाचतोय हा काँग्रेस’चा पहील्या पासून आरोप असून.. वोट चोरी, बोगस व दुबार मतदार.. हे सर्व प्रकरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीच सर्वप्रथम बाहेर काढले असल्याचे पुस्ती त्यांनी जोडली.

राज ठाकरे 20 वर्षांनंतर संजय राऊतांच्या घरी

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. विशेष म्हणजे, तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे राऊतांच्या घरी आल्याने या भेटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी राज ठाकरेंनी राऊतांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस करत त्यांना काही काळ सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

संजय राऊत यांना नुकतेच एका गंभीर आजाराचे निदान झाले असून, डॉक्टरांनी त्यांना सार्वजनिक जीवनापासून दूर राहून विश्रांती घेण्यास सांगितले आहे. याबाबत संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज दुपारी राऊत यांचे निवासस्थान गाठले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये साधारण 25 ते 30 मिनिटे चर्चा झाली.

या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांचे बंधू आणि आमदार सुनील राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, “संजय राऊत आजारी पडल्यापासून राज ठाकरे सतत माझ्या संपर्कात होते. संजय यांच्या उपचारांसाठी त्यांना अमेरिकेला नेले पाहिजे का? किंवा अन्य कोणते वैद्यकीय उपचार केले पाहिजेत? याबाबत राजसाहेब सतत फोनवरून विचारपूस आणि मार्गदर्शन करत होते. आज 20 वर्षांनंतर ते आमच्या घरी आले, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.”

भेटीदरम्यान राज ठाकरे यांनी संजय राऊत यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. ” तुझा ज्याप्रकारचा आजार आहे, त्यानुसार तुला राहावे लागेल. लोकांमध्ये न जाता दीड-दोन महिने आराम करावा,” असा मोलाचा सल्ला राज ठाकरेंनी संजय राऊतांना दिल्याची माहिती सुनील राऊत यांनी सांगितले.

पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांकडून विचारपूसआजारपणानंतरही राऊतांची तोफ धडाडली

दरम्यान, संजय राऊत यांच्या आजारपणाची दखल पक्षभेद विसरून सर्वच स्तरांतून घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊतांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन करून राऊतांच्या प्रकृतीची चौकशी केली. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दूरध्वनीवरून संपर्क साधत राऊत यांना आरोग्याबाबत विचारपूस केली होतीप्रकृतीत सुधारणा होताच संजय राऊत पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत. गत सोमवारी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली, ज्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या पत्रकार परिषदेत आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. आजारपण असूनही त्यांचा राजकीय बाणा कायम असल्याचे यावेळी दिसून आले.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ-प्रारुप मतदार यादीनुसार दोन लाख ७२ हजार पदवीधरांची व ४४ हजार शिक्षकांची नावनोंदणी

पुणे, दि.३ : पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नव्याने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीनुसार पुणे विभागात २ लाख ७२ हजार ६१ पदवीधरांची तर ४४ हजार २३३ मतदारांची नोंदणी झाली आहे.

या २०२५ च्या कार्यक्रमांतर्गत प्रारुप मतदार यादीनुसार पदवीधर मतदार संघासाठी पुणे जिल्ह्यात ५४ हजार ८१० मतदार नोंदणी, सातारा-३५ हजार ८७९, सोलापूर- ३० हजार ४७२, कोल्हापूर- ८० हजार १८०, सांगली- ७० हजार ७२० अशी एकूण २ लाख ७२ हजार ६१ इतकी नोंदणी झाली आहे. तर शिक्षक मतदार संघासाठी पुणे- ९ हजार ७७८, सातारा- ८ हजार ४९२, सोलापूर- ११ हजार १९८, कोल्हापूर ८ हजार ६३१ व सांगली- ६ हजार १३४ अशी एकूण ४४ हजार २३३ मतदारांची नोंदणी झाली आहे.

२०२० मध्ये पदवीधर मतदार संघासाठी ४ लाख २० हजार ८९६ इतकी तर शिक्षक मतदारांची ७२ हजार १९० इतकी नोंदणी होती. गेल्या निवडणुकीपेक्षा यावर्षी आतापर्यंत कमी मतदार नोंदणी झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीची प्रसिद्धी व जागृती करुन जास्तीत जास्त पात्र मतदारांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.

मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम:
या कार्यक्रमांतर्गत १८ डिसेंबर २०२५ पर्यंत मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या पदनिर्देशित अधिकारी किंवा संबंधित विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दावे व हरकती दाखल करता येतील. नवीन नाव नोंदणीचा दावा दाखल करण्यासाठी पदवीधरांना नमुना क्रमांक १८ व शिक्षकांना नमुना क्रमांक १९ द्वारे याच कालावधीत दावा दाखल करता येईल. प्रारुप मतदार यादीतील नावांबाबत आक्षेप असल्यास नमुना क्रमांक ७ व यादीतील नोंदीमध्ये दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८ दाखल करता येईल.

दावे व हरकतींचा कालावधी संपल्यानंतर ५ जानेवारी २०२६ रोजी दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करणे व छपाईची कार्यवाही करण्यात येईल. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या यादीची अंतिम प्रसिद्धी १२ जानेवारी २०२६ रोजी केली जाणार आहे.

दिव्यांगांच्या पद सुनिश्चितीसाठी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना-तुकाराम मुंढे

• प्रक्रियेसाठी एकसमान कार्यपद्धती निश्चित

मुंबई, दि. ०३ : दिव्यांग व्यक्तींना शासकीय, निमशासकीय सेवेत नियुक्ती आणि पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षणाचा कायदेशीर हक्क प्रभावीपणे मिळावा, यासाठी पदसुनिश्चिती प्रक्रियेसाठी एकसमान कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे. पदसुनिश्चिती प्रक्रिया अधिक शास्त्रीय आणि पारदर्शक करण्याच्या हेतूने तज्ज्ञ समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो दिव्यांग उमेदवारांसाठी रोजगार, सर्व स्तरांवर समान संधी सुनिश्चित होण्यास मदत होणार असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.सचिव तुकाराम मुंढे म्हणाले, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पदसुनिश्चिती प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय, निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच स्वायत्त संस्था आणि महामंडळांमधील मंजूर पदांचा सखोल आढावा घेऊन दिव्यांग व्यक्ती कोणत्या पदांवर कार्यक्षमतेने काम करू शकतील, हे ओळखणे आता बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक मंत्रालयीन विभागात यासाठी तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन करेल.

प्रत्येक मंत्रालयीन विभागाच्या या समितीत अंध-अल्पदृष्टी, श्रवणदोष, अस्थिव्यंगता, स्वमग्नता, विशिष्ट शिक्षण अक्षमता व मानसिक आजार अशा विविध प्रवर्गांतील किमान एका तज्ज्ञाचा समावेश असेल. समितीचे अध्यक्ष त्या विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव राहतील.

समिती सहाय्यक तंत्रज्ञानातील विकास, जागतिक रोजगार मानके आणि पदांच्या जबाबदारीचे स्वरूप लक्षात घेऊन विभागातील पदांची योग्यतापरीक्षण करण्यासोबतच पदसाखळीतील सर्व स्तरांचा विचार करून पदसुनिश्चिती प्रस्ताव सादर करणार आहे. दिव्यांगांसाठी सुयोग्य नसलेल्या पदांना सूट दिली जात असल्यास, ती जास्तीत जास्त तीन वर्षेच वैध राहणार असून त्याचे पुनरावलोकन अनिवार्य असल्याचे सचिव मुंढे यांनी सांगितले.
सचिव मुंढे म्हणाले, प्रत्येक विभागाने दरवर्षी 1 जानेवारी रोजी पदसुनिश्चितीची अद्ययावत स्थिती त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आणि तिची प्रत आयुक्त, दिव्यांग कल्याण तसेच दिव्यांग कल्याण विभागास सादर करणे बंधनकारक राहील. तसेच सरळसेवा भरती व पदोन्नती करताना संबंधित भरती यंत्रणेकडे तीन वर्षात एकदा पदसुनिश्चितीचा आढावा घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने निर्गमित केला असून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महावितरण नेहमीच दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पाठीशी:संचालक राजेंद्र पवार यांची ग्वाही

दिव्यांग दिन उत्साहात साजरा

मुंबई, दि. ०३ डिसेंबर २०२५: दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहायक उपकरणे पुरवण्याच्या उपक्रमात महावितरणने आत्तापर्यंत राज्यभरातील ४९ दिव्यांग कर्मचाऱ्यांना दुचाकी उपलब्ध करुन दिल्या आहेत. तर आगामी सुमारे ५ हजार तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत नियमानुसार ४१२ जागा दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती देतानाच महावितरण व्यवस्थापन नेहमीच दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी दिली.

महावितरणचे मुख्यालय असलेल्या मुंबईतील प्रकाशगड येथे दिव्यांग दिनानिमित्त बुधवारी (दि. ०३ डिसेंबर) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र पांडे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. संचालक श्री. पवार म्हणाले, आज दिव्यांगजन सर्वच क्षेत्रात स्वकृर्तृत्वाने यशाची उत्तुंग भरारी घेत आहेत. तीव्र इच्छाशक्ती व अढळ विश्वासाच्या बळावर न्युनगंडावर मात करण्याचे आवाहन त्यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांना केले. तर दिव्यांग कर्मचाऱ्यांशी कोणताही भेदभाव न करण्याची शपथ घेऊन संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

महावितरणमध्ये कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्यांचे दैनंदिन कामकाज अधिक सुकर व्हावे, यासाठी अधिक खबरदारी घेण्यात येते. त्यांना दिव्यांग भत्ता नियमितपणे दिला जातो. चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत येण्याचा कोणी प्रयत्न करीत असल्यास, अशा बाबी तत्काळ निदर्शनास आणून देण्याबाबत संचालक पवार यांनी सूचित केले.

जगभरातील विख्यात दिव्यांग लेखकांची पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन मुख्य कार्यालयात कार्यरत २३ दिव्यांग कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या वतीने परेश बोरकर आणि रोहिणी साठे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यवस्थापनाबाबत कृतज्ञता व्यक्त करताना सुविधांसंदर्भातच्या अपेक्षा दिव्यांग कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. या मागण्यांची तातडीने पुर्तता करण्याच्या सूचना संचालक पवार यांनी संबंधितांना दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ व्यवस्थापक प्रणाली निमजे यांनी केले. तर सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांनी आभार मानले.

पुणे महावितरणच्या रास्तापेठ येथील परिमंडल कार्यालयात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभारी मुख्य अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड यांच्या हस्ते परिमंडलातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. गायकवाड म्हणाले, दिव्यांग कर्मचारी आपल्या व्यंगांवर मात करुन कामात कायम अग्रेसर असतात. त्यांच्या संघर्षातून इतरांनाही प्रेरणा मिळते.महावितरणमध्ये दिव्यांगांसाठी असलेल्या सुविधा व सवलती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तर दिव्यांगांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याची ग्वाहीही मुख्य अभियंता यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमास उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे यांच्यासह दिव्यांग कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सूत्रसंचालन महेश कारंडे यांनी केले. 

राष्ट्रीय सहकारी संस्थांमध्ये वाढला महाराष्ट्राचा सहभाग-केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची राज्यसभेत माहिती

नवी दिल्ली/पुणे : ‘राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड’ (एनसीईएल), ‘राष्ट्रीय सहकारी सेंद्रिय लिमिटेड’ (एनसीओएल) आणि ‘भारती बीज सुरक्षा व सेवा लिमिटेड’ (बीबीएसएसएल) या तीन महत्त्वाच्या राष्ट्रीय सहकारी संस्थांमध्ये महाराष्ट्राचा सहभाग वाढत असून, त्याचा थेट लाभ राज्यातील शेतकरी व सहकारी संस्थांना होत असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज राज्यसभेत दिली. डॉ. अनिल बोंडे यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.

मोहोळ म्हणाले, “देशातील आठ लाख सहकारी समित्यांपैकी सव्वा दोन लाख समित्या महाराष्ट्रात आहेत. देशाच्या सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे. एनसीईएल, एनसीओएल, बीबीएसएसएल या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठा विस्तार होत आहे. ‘एनसीईएल’ आणि ‘एनसीओएल’मध्ये राज्यातील अनुक्रमे अकराशे आणि तीनशेहून अधिक सहकारी संस्था सामील असून, बीबीएसएसएलशी पाच हजारांहून अधिक संस्था जोडल्या गेल्या आहेत.”

महत्त्वाचे मुद्दे

  • ‘एनसीओएल’ने ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषी मिशन’अंतर्गत 11 संस्थांसोबत सामंजस्य करार
  • त्यामुळे सेंद्रिय हरभरा, तूर आणि इतर कृषी उत्पादनांच्या खरेदीस चालना
  • ‘एनसीईएल’मार्फत सहकारी संस्थांकडून केळी, कांदा, हळद, अनार आणि द्राक्ष यांसारख्या उत्पादनांची निर्यात
  • ‘बीबीएसएसएल’चे पारंपरिक बियाण्यांचे संरक्षण, संवर्धन आणि त्यांच्या प्रसारासाठी टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारण्यावर मोठे काम

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकारातून समृद्धी या धोरणानुसार आणि गृह व सहकारमंत्री अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात सहकार क्षेत्राला मजबूत आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली जात आहेत. या बहुराज्य सोसायट्यांना सक्षम करत त्याचे सकारात्मक परिणाम गावपातळीवरील संस्थांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. राष्ट्रीय सहकारी संस्थांमुळे उत्पादनांना बाजारपेठ, निर्यात संधी, सेंद्रिय शेतीला चालना आणि स्थानिक बियाण्यांचे संरक्षण शक्य होत असल्याने शेतकऱ्यांना थेट फायदा होत आहे’.

मुरलीधर मोहोळ
केंद्रीय सहकार राज्यमंत्री

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाहतुकीत बदल

पुणे, दि. ३ : पेरणे (ता. हवेली) पेरणे येथे १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता पुणे-अहिल्यानगर महामार्ग क्र.६० वर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ३१ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ५ वा. पासून ते १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२:०० वा. पर्यंत दोन्ही बाजूकडील वाहतुकीत बदलाचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

याअंतर्गत चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी-येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अहिल्यानगर कडून पुणे-मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावरा फाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर या मार्गे पुण्याकडे जातील.

पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारी जड वाहने खराडी बाह्यवळण येथून हडपसरवरुन पुणे-सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे न्हावरा, शिरुर-अहिल्यानगर मार्ग अशी वळविण्यात येतील. तसेच सोलापूर महामार्गावरुन आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने, ट्रक, टेम्पो आदी माल वाहतूक हडपसर, मगरपट्टा, खराडी बाह्यवळणमार्गे विश्रांतवाडीहून आळंदी व चाकण येथे जातील.

मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणारी कार, जीप आदी हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्गे अहिल्यानगरकडे जातील, मुंबई व ठाणे कडून येणारी अनुयायांची वाहने मुंबई-पुणे महामार्गावरुन देहूरोड-निगडी-चऱ्होली-आळंदी-मरकळ-तुळापूर फाटा (लोणीकंद) अशी वळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले आहे.

पुणे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन अहवालाचे जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते विमोचन

पुणे, दि. ३ : जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेला जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन तसेच शाश्वत विकास ध्येये जिल्हा प्रगतीमापन अहवाल जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले.
यावेळी प्रादेशिक सहसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय सुनील जाधव, उपायुक्त नियोजन संजय मरकळे, उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रियांका बोकील, तसेच जिल्हा सांख्यिकी आणि जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, पुणे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन तसेच शाश्वत विकास ध्येये जिल्हा प्रगतीमापन अहवाल प्रशासनाला धोरणनिर्मितीत, विकास आराखडा तयार करतांना प्राधान्यक्रम ठरवितांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. जिल्ह्याच्या सातत्यपूर्ण व सर्वांगीण विकासासाठी अशा अभ्यासपूर्ण दस्तऐवजांची आवश्यकता आहे, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाने संकलित केलेल्या आकडेवारीच्या आधारे तयार केलेला हा अहवाल जिल्ह्यातील विविध शासकीय, निम शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, संशोधक व विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल, असेही श्री. डुडी म्हणाले.
पुणे जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन आणि शाश्वत विकास ध्येये जिल्हा प्रगतीमापन अहवाल
पुणे जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीचे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाश्वत विकास ध्येये निर्देशकांच्या अनुषंगाने झालेल्या कामगिरीचे सर्वसमावेशक चित्र उभे राहते. जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन हा जिल्ह्याच्या लोकसंख्या, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, रोजगार यांसह विविध क्षेत्रांतील स्थितीचे प्रतिबिंब दर्शवणारा महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो.
दरम्यान, शाश्वत विकास ध्येये जिल्हा प्रगतीमापन अहवाल हा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार निर्धारित केलेल्या निर्देशकांचे मापन करून जिल्ह्याची प्रगती, आव्हाने आणि भविष्यकालीन दिशा स्पष्ट करतो. अहवालात दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्वच्छ पाणी व स्वच्छता, उद्योग व नवोन्मेष, शाश्वत शहरे, हवामान कृती इत्यादी महत्त्वाच्या ध्येयांवरील जिल्ह्याची स्थिती विषद करण्यात आली आहे.

“फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नाही; नागरिकांचा जीव वाचवणे हेच सर्वोच्च उद्दिष्ट” — डॉ. नीलम गोऱ्हे

“खाजगी बस, अवजड वाहने आणि वाहतूक शिस्तीसाठी कठोर नियम; अपघात कमी करण्याचा निर्धार”

पुणे, ३ डिसेंबर २०२५ : पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तसेच हिंजवडी परिसरातील वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांबाबत तातडीची समीक्षा करण्यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २ डिसेंबर २०२५ रोजी विधानभवन, मुंबई येथे आढावा बैठक घेतली.या बैठकीस पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी,श्रीमती अर्चना गायकवाड, पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. संदेश चव्हाण, पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.स्वप्निल भोसले आणि परिवहन विभागाचे सहाय्यक प्रादेशिक अधिकारी श्री. युवराज पाटील हे उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी बैठकीत व्यक्त केले की, “फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नाही; नागरिकांचा जीव वाचवणे हेच सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.” वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याचे त्यांनी निर्देश दिले.

खासगी बस वाहतूक व्यवस्थेत शिस्तबद्धता

खासगी बस चालकांच्या वर्तनातील ढिसाळपणा आणि वाहतुकीत निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन खासगी बस वाहतूक व्यवस्थेसाठी प्रमाणित व स्वतंत्र कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करणे, प्रत्येक बसमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य करणे, चालकाचा बॅज क्रमांक स्वच्छपणे प्रदर्शित करणे आणि विद्यार्थ्यांसह कंपनी कर्मचार्‍यांना नेणाऱ्या बस चालकांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करणे ही महत्त्वाची पावले लागू करण्याचे सांगितले.

तसेच, मद्यधुंद चालकाविरुद्ध प्रवाशांना लगेच डिजिटल माध्यमातून तक्रार नोंदविता येईल अशी सोपी व तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अवजड वाहनांवरील नियंत्रण आणि सुरक्षा

अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची शक्यता लक्षात घेऊन सर्व डंपर, मिक्सर आणि अवजड वाहनांवर रिव्हर्स व्ह्यू कॅमेरा अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले. गर्दीच्या वेळात ‘नो-एन्ट्री’ चा काटेकोरपणे अंमल होईल यासाठी नवीन वेळापत्रक तयार करून त्याचे नियमित पुनरावलोकन करण्याचे सांगितले.
याशिवाय, आरएमसी प्लांट परिसरात वेग नियंत्रणासाठी गस्त वाढविणे आणि अशा वाहनांवरील नियमभंग रोखण्यासाठी कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले.

वाहतूक नियंत्रण, सुरक्षा मोहिमा आणि अंमलबजावणी

अपघात रोखण्यासाठी वाहतूक सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या मोहिमांना प्राधान्य देण्यात आले. नियमित ब्रेथ अॅनालायझर तपासणी, ब्लॅक स्पॉटवरील प्रकाशयोजनांची तपासणी, थर्मोप्लास्टिक रोड मार्किंगचे दुरुस्ती काम, रात्री उशिरा आणि पहाटे विशेष ड्रंक ड्रायव्हिंग मोहिमा राबविणे, हेल्मेट सक्ती आणि लेन कटिंगवर कठोर कारवाई हे उपाय तातडीने अमलात आणण्याचे ठरले.

अल्पवयीन वाहनचालकांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच पालकांनाही जबाबदार धरण्याचे निर्देश दिले. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील गर्दीची व अपघातग्रस्त ठिकाणे घोषित करून तेथे विशेष पथकांचे वेळोवेळी उपक्रम (ड्राइव्ह) राबविण्याचे ठरविण्यात आले.

जनजागृती आणि सार्वजनिक सहभागाचे महत्त्व

वाहतूक शिस्तीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी सायकलस्वारांना रिफ्लेक्टरचा अनिवार्य वापर, आयटी कंपन्यांना ‘फ्लेक्सी टाईम’ आणि ‘वर्क फ्रॉम होम’चा विचार करण्याबाबत आवाहन, तसेच रेडिओ आणि सोशल मीडियाद्वारे व्यापक वाहतूक-जागरूकता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.
वाहतूक नियमभंगाची माहिती नागरिकांकडून थेट व्हॉट्सअॅपद्वारे संकलित करण्यासाठी संयुक्त मोहीम राबविणे आणि सोपी ऑनलाईन तक्रार प्रणाली तयार करून ती सर्वांसाठी उपलब्ध करणे याचाही विशेष उल्लेख केला.

अपघातग्रस्त कुटुंबीयांना भावनिक आधार

डॉ. गो-हे यांनी आपल्या कर्तव्याच्या पलिकडे जाऊन गंभीर अपघातातील मृतकांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना विमा दावा प्रक्रियेमधून जलद मदत मिळावी यासाठी विभागाने आवश्यक ते साहाय्य करावे, असे आवाहन केले. अपघातग्रस्त कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी संवेदनशील भूमिका घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

सुरक्षित वाहतुकीसाठी सामूहिक प्रयत्नांचा आग्रह

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या वाहतूक समस्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी नागरिक, पोलीस, परिवहन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी समन्वयाने कार्य करणे अत्यावश्यक असल्याचे डॉ. गो-हे यांनी स्पष्ट केले. सर्व निर्देशांची तत्काळ अंमलबजावणी करून तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले.

नवरगावच्या मथुरा ताई प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर प्रशासनाची तत्काळ मदत

मुंबई, दि. ३ डिसेंबर २०२५ : नवरगाव (ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) येथील ७२ वर्षीय मथुरा ताई यांच्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीबाबत टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ मदतीचे निर्देश दिले. उपसभापतींच्या सूचना मिळताच जिल्हा प्रशासनाने त्वरेने प्रत्यक्ष भेट देऊन विविध शासकीय योजनांतून आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे.

इ.स. १९७२ मध्ये देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मथुरा ताई यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने देशभर तीव्र संताप उसळला होता. या प्रकरणामुळे महिलांवरील अत्याचारासंदर्भातील कायद्यात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. आज ७२ वर्षांच्या झालेल्या मथुरा ताई अर्धांगवायूने पीडित असून त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी बातमी पाहताच जिल्हाधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधून मथुरा ताईंना आर्थिक, वैद्यकीय व सामाजिक पातळीवर त्वरित मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाने खालीलप्रमाणे मदत जाहीर केली आहे:

जिल्हा प्रशासनाने केलेली मदत :

  • इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना : १५०० रुपये प्रतिमाह मंजूर
  • अंत्योदय अन्न योजना (रेशन कार्ड रूपांतर) : १० किलो गहू + २५ किलो तांदूळ प्रतिमाह
  • पंतप्रधान आवास योजना : घरकुल मंजूर; पहिला हप्ता वितरित
  • ८ लाख रुपये आर्थिक सहाय्य : (४ लाख रुपये कर्मचारी कल्याण निधीतून) — संपूर्ण रक्कम मुद्दत ठेव; दरमहा अंदाजे ५००० रुपये व्याज मिळण्याची व्यवस्था
  • आदिवासी सबलीकरण व स्वाभिमान योजना : जमिनीचे प्रस्तावित प्रकरण प्रक्रिया मार्गावर
  • स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वस्तू व आर्थिक मदतीसाठी समन्वय साधला
  • नियमित भेटी आणि देखरेखीसाठी संपर्क अधिकारी नियुक्त

मथुरा ताईंच्या अर्धांगवायू स्थितीचा विचार करून आवश्यक फिजिओथेरपी, औषधोपचार आणि अपंगत्वासंदर्भातील उपकरणे उपलब्ध करून देण्याचेही निर्देश उपसभापतींनी दिले आहेत.

चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या तत्पर कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत, “मथुरा ताईंना पुढील काळातही आवश्यक सर्व शासकीय व सामाजिक मदत नियमितपणे मिळेल यासाठी माझ्याकडून सतत पाठपुरावा केला जाईल,” असा निर्धार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन  ८ ते १४ डिसेंबर कालावधीत नागपूर येथे पार पडणार

विधानभवनामध्ये  विधानसभा आणि विधानपरिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची  बैठक संपन्न

मुंबई, दि. ३ :-   महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. ८ ते  रविवार १४  डिसेंबर २०२५  या कालावधीत नागपूरमध्ये  पार पडणार  आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

विधानभवन येथे आयोजित विधानमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील,संस्कृतीकार्य मंत्री आशिष शेलार, सर्वश्री आमदार सुधीर मुनगंटीवार,अनिल परब, प्रसाद लाड,भास्कर जाधव, सुनील प्रभु, जितेंद्र आव्हाड, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, दीपक केसरकर, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे  व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दिनांक 13 डिसेंबर शनिवार आणि 14 डिसेंबर रविवार या सुट्टीच्या कालावधीत सभागृहाचे कामकाज होणार आहे
बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा  करण्यात आली.

इस्त्राईलमध्ये “नूतनीकरण बांधकाम” क्षेत्रात हजारो रोजगार संधी– राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत ऑनलाईन अर्ज सुरू

पुणे, दि. ०३ : राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळामार्फत (NSDC) इस्त्राईलमध्ये “नूतनीकरण बांधकाम” (Renovation Construction) या क्षेत्रातील मोठ्या प्रमाणातील भरती प्रक्रिया सुरू झाली असून प्लॅस्टरींग काम – १००० जागा, सिरॅमिक टायलिंग – १००० जागा, ड्रायवॉल कामगार – ३०० जागा आणि राजमिस्त्री – ३०० जागा या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदांसाठी २५ ते ५० वयोगटातील, इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असलेले तसेच किमान तीन वर्षांचा नूतनीकरण बांधकाम क्षेत्रातील अनुभव असलेले उमेदवार पात्र ठरणार आहेत. उमेदवाराने यापूर्वी इस्त्राईलमध्ये काम केलेले नसावे तसेच त्यांचा जीवनसाथी, पालक किंवा मुले सध्या इस्त्राईलमध्ये काम करत नसावीत किंवा तेथील रहिवासी नसावेत, अशी अट घालण्यात आली आहे.

भरतीसंबंधी सर्व सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रिया maharashtrainternational.com या संकेतस्थळावरील Latest Jobs या विभागात उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करून या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक महाविद्यालयांनी ही माहिती अधिकाधिक उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन सहायक आयुक्त सु.रा. वराडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा.

देशातील तरुणांच्या हाताला काम न देणे हा राष्ट्रद्रोह-प्रा. भारत पाटील

मता प्रतिष्ठान आयोजित फुले-आंबेडकर व्याख्यामालेत मार्गदर्शन

पुणे: “जुने आदर्श घेऊनच नवी पिढी पुढे जाईल. मात्र, आधीच्या पिढीने संवादाची दारे उघडी ठेवावीत. सद्यस्थितीत तरुणांमधील वाढती बेकारी, व्यसनाधीनता, गुन्हेगारी गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. त्याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. देशातील तरुणांच्या हाताला काम न देणे हा खरा राष्ट्रद्रोह आहे,” असे मत माध्यम तज्ञ प्रा. भारत पाटील यांनी केले.

महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठान संचालित ग्रंथालय व वाचनालयातर्फे महात्मा फुले वाड्यात आयोजित फुले-आंबेडकर व्याख्यानमालेत ‘तरुणांमधील वाढती बेकारी, व्यसनाधीनता आणि उद्रेक’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पथारी पंचायतचे नेते काशिनाथ नखाते होते.

प्रा. भारत पाटील म्हणाले, “व्यसनाची व्याख्या बदलली असून, मोबाईल हे नवे व्यसन बनले आहे. त्या उद्योगाचेही केंद्रीकरण होत असून, त्यावर लक्ष जाऊ नये म्हणून जातीजातीत भांडणे लावून दिली जात आहेत. यामध्ये कोवळी मुले भक्ष्यस्थानी पडत आहेत. उच्च शिक्षणात कमालीची घट झाली आहे. दहावी, बारावीनंतर विद्यार्थी, शाळा सोडल्याचा दाखला आणायलाही जात नाहीत. ही पिढी निराशेच्या गर्तेत जात आहे. रिकामे हात, रिकामे मेंदू यामुळे नवी पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यातून उद्रेक होण्याचा धोका वाढला आहे. नेपाळ आणि बांगलादेश ही त्याची उदाहरणे आपल्याला दिसत आहेत.”

काशिनाथ नखाते यांनी शासकीय धोरणांवर टीका केली. एका बाजूला रोजगार निर्मिती करायची नाही आणि दुसऱ्या बाजूला, स्वयंरोजगारांना अटकाव करायचा. याची दखल समाजाने घेतली नाही, तर बेरोजगारांचा उद्रेक होईल, असे त्यांनी परखडपणे मांडले. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये न्यायालय न आणता, लवाद निर्माण केला आहे. लवाद हे सरकारी अपत्य असल्याची टीका त्यांनी केली.

कार्यक्रमाची सुरुवात फुले यांच्या अखंडाने झाली. प्रास्ताविक भाषणात ओंकार मोरे यांनी आजचा बेरोजगार युवक द्विधा मनस्थितीत असल्याचे सांगितले. आदर्शांना समाजासमोर, उभे करायचे आहे, पण उपाशी पोटी, तो भरकटत आहे, त्यातून त्याचा उद्रेक होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली. शारदा वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे हारुण मुजावर यांनी आभार मानले.