Home Blog Page 2099

पुण्यातील दुर्घटनेच्या चौकशीचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

0

मृत्यू पावलेल्या पाच कामगारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मृत कामगारांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत

पुणे , दि. 4 :- पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या  दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.

12.23 कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवेगिरी प्रकरणी दाम्पत्याला अटक

0

मुंबई – मुंबई क्षेत्राच्या सीजीएसटी ठाणे आयुक्तालयाच्या करचुकवेगिरीविरोधी विभागातील अधिकार्‍यांनी 12.23 कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवेगिरीप्रकरणी दाम्पत्याला अटक केली आहे. तपशीलवार माहिती शोधून काढल्यानंतर आणि माहिती विश्लेषणाच्या आधारे, मेसर्स डेटालिंक कन्सल्टन्सी या ठाणे स्थित कंपनीचे व्यवहार संशयास्पद असल्याचे निश्चित झाल्यानंतर या कंपनीविरोधात चौकशी सुरू करण्यात आली. ही कंपनी विविध उच्चपदस्थ कंपन्यांना मनुष्यबळ पुरवत असल्याचे तपासात समोर आले. या कंपनीने ग्राहकांकडून जीएसटी  जमा केला होता, मात्र हा जमा केलेला जीएसटी एका वर्षापेक्षा जास्त काळ सरकारी तिजोरीत जमा केला नाही, यामुळे कंपनीने सीजीएसटी कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे.

पती (50 वर्षे) आणि पत्नी (48 वर्षे) असे या कंपनीचे दोन भागीदार असलेल्या या दाम्पत्याला 03.02.2022 रोजी अटक करण्यात आली. सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 132(डी) चे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आणि प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ठाणे यांच्यासमोर या दाम्पत्याला हजर करण्यात आले. दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दोषी सिद्ध झाल्यास, या दाम्पत्याला 5 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. ठाण्याचे सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्त राजन चौधरी यांनी ही माहिती दिली.

या प्रकरणी केलेली ही कारवाई, कर चुकवणारे आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध सीजीएसटी मुंबई क्षेत्राने सुरू केलेल्या करचुकवेगिरीविरोधी मोहिमेचा एक भाग आहे. या मोहिमेदरम्यान सीजीएसटी ठाणे आयुक्तालयाने आतापर्यंत 1023 कोटी रुपयांची करचुकवेगिरी शोधून काढली असून  17 कोटी रुपये वसूल केले आहेत आणि गेल्या पाच महिन्यांत 6 जणांना अटक केली आहे.

सीजीएसटी विभाग डेटा मायनिंग, डेटा अॅनालिसिस आणि नेटवर्क अॅनालिसिस साधनांचा वापर करून संभाव्य कर चुकवणाऱ्या आणि फसवणूक करणार्‍यांचा शोध घेत आहे. प्रामाणिकपणे अनुपालन करणाऱ्या करदात्यांसाठी अन्यायकारक स्पर्धा निर्माण करणाऱ्या   सेवा क्षेत्र आणि डिजिटल अर्थव्यवस्थेसह अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रातील कर चुकवणार्‍यांना लक्ष्य करण्यासाठी, विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. विभाग येत्या काही दिवसांत आणि महिन्यांत ही करचुकवेगिरी विरोधातील  मोहीम अधिक तीव्र करणार आहे.

पुण्यात बांधकाम सुरु असलेल्या इमारत दुर्घटनेत झालेल्या जिवितहानी बद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

0

पुण्यात बांधकाम सुरु असलेल्या इमारत दुर्घटनेत झालेल्या जिवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विट संदेशात म्हटले आहे :
“पुण्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारत दुर्घटनेत झालेल्या जिवितहानीमुळे तीव्र दु:ख झाले. पिडित कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करतो. दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो.

तुळशीबाग राममंदिरात गणेशजयंतीनिमित्त गणेशयाग

0

श्रीरामजी संस्थान तुळशीबागतर्फे आयोजन
पुणे : श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिराच्या परिसरात दत्तमंदिरासमोरील सभामंडपात हा याग पार पडला. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले यांच्या हस्ते याग करण्यात आला. 

यावेळी संस्थानचे भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होते. विरेंद्र कुंटे गुरुजी यांसह ब्रह्मवृंदांनी यागाचे पौरोहित्य केले. रंगावलीतून श्रीगणेशाचे चित्र देखील रेखाटण्यात आले होते. 
तुळशीबाग मंदिर परिसरातील गणेशाचे मंदिर गणेश जयंतीनिमित्त फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच विद्युतरोषणाई देखील करण्यात आली होती. मुख्य राममंदिराशेजारी असलेल्या गणेश मंदिरात गणरायाच्या विलोभनीय मूर्तीचे दर्शन घेण्याकरीता भाविकांनी हजेरी लावली.

गणेशस्तुतीच्या मंगल स्वरांत ‘दगडूशेठ’ मंदिरात गणेशजन्म सोहळा संपन्न (व्हिडीओ)

0

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने आयोजन ; मंदिरावर कामधेनू प्रतिमा व पुष्पआरास पुणे : पार्वतीच्या उदरी गणेश जन्मला…बाळा जो जो रे… च्या मंगल स्वरांत पाळणा म्हणत महिलांनी गणेशजन्म सोहळ्यात सहभाग घेत गणेशाचरणी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया च्या निनादाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात दुपारी १२ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात मोठ्या उत्साहात गणेशजन्म सोहळा संपन्न झाला.

मंदिरावर केलेली कामधेनू प्रतिमांची आणि विविधरंगी फुलांची आकर्षक आरास अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच खुलला. गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत आरोग्यसंपन्न भारताकरीता गणेशचरणी प्रार्थना केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने माघ शुद्ध चतुर्थीला विनायक अवतार असलेला गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात सिद्धार्थ गोडसे तन्वी गोडसे यांसह शारदा गोडसे, संगीता रासने, ज्योती सूर्यवंशी, मृणालिनी रासने, मालन चव्हाण यांच्या हस्ते गणेशजन्माचे पूजन झाले. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण यांसह कार्यकर्ते देखील उपस्थित होते. अर्चना भालेराव, सुवर्णा इनामदार, राधिका बावकर, संध्या अवचट, हेमलता डाबी यांनी गणेश गीत गणेश जपमाळ, गणपतीचा गजर, अथर्वशिर्ष म्हटले. शुक्रवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत प्रख्यात गायक अवधूत गांधी यांनी श्रीं चरणी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. स्वराभिषेकातून हरिनामाचा गजर, अभंग, भजन, गोंधळातील गण, शाहिरी गण, गोंधळ, गवळण, जुगलबंदी आणि भैरवी या विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना यानिमित्ताने मिळाली. सकाळी ८ ते ११ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत गणेश याग होतो आहे . नगरप्रदक्षिणा सायंकाळी ६.३० वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरापर्यंत चांदीच्या पालखीतून काढण्यात येईल . तेथे पादुका पूजन होऊन आणि गणपती मंदिरात नगरप्रदक्षिणेची सांगता होईल . रात्री ८ वाजता श्रीगणेशाची मंगलआरती आणि रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 6 मृत्यू

0

पुणे – बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना येरवडामधील शास्त्रीनगरमध्ये असलेल्या गल्ली क्रमांक आठमध्ये गुरुवारी 3 तारखेला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेत तीन कामगार जखमी झाले आहेत. तर सुमारे दहा कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. स्लॅबचा ढिगारा आणि सळयांमध्ये अडकलेल्या कामगारांना पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून बाहेर काढण्यात आले. काही कामगार या सळयांमध्ये अडकल्याने सळया कापून त्यांना बाहेर काढल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. शास्त्रीनगर चौकतील वाडिया बंगला गेट नंबर आठ येथील नवीन इमारतीचा स्लॅब भरण्याचे काम सुरु होते. काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या चार ते सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व जवानांनी कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले.

मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात येत आहेत. तर जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. बांधकाम सुरू असताना कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली खबरदारी बांधकाम प्रकल्पावर घेण्यात आली होती की नाही याचा पोलिस तपास करत आहे. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्वरित पोलिस घटनास्थळी पोहोचले व बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला असून तिघे जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरु आहे. स्लॅब नेमका कशामुळे कोसळला व कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली खबरदारी या ठिकाणी घेण्यात आली होती का नाही? याचा तपास सुरू आहे.
विजयसिंह चव्हाण, पोलिस निरीक्षक (गुन्हे) येरवडा पोलिस ठाणे

‘दगडूशेठ’ ला स्वराभिषेक, गणेश जागर आणि जन्म सोहळा (व्हिडीओ)

0

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच आज ४ फेब्रुवारी २०२२ रोजी बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला. मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक ,स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत आळंदी येथील संत परंपरा असलेले प्रसिद्ध कीर्तनकार ,प्रवचनकार ,कलावंत गायक अवधूत गांधी यांनी श्रीं चरणी स्वराभिषेक अर्पण केलं . स्वराभिषेकातून हरिनामाचा गजर ,अभंग ,भजन ,गोंधळातील गण ,शाहिरी गण,डफया ,गोंधळ ,गवळण ,जुगलबंदी ,आणि भैरवी या विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली . . श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने मंदिराला कामधेनू गायीचं सुंदर विलोभनीय असे प्रतीक आणि आकर्षक सजावटीचा फुलांची आरास व विद्युतरोषणाई साकारली आहे मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. यावेळी गणेशाची मंगलआरती होईल. नगर प्रदक्षिणा सायंकाळी ६. वाजता श्रीं ची मागाल आरती रात्री ८. वाजता तर, रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. मंदिराला फुलांसह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ८९ कोटींचा निधी

0

मुंबई, दि. 3 : पर्यटनस्थळांवर विविध उपाययोजना करण्यासाठी शासनाने सन २०२१-२२ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ८९ कोटी ४९ लाख १९ हजारांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत पर्यटनस्थळांच्या सौंदर्यीकरणासह पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या अनुषंगाने जिल्हास्तरावरील नवीन कामांना निधी उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या माध्यमातून राज्यातील विविध 115 स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास करून पर्यटकांसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.

राज्यात कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना सर्वाधिक रोजगार निर्मिती क्षमता असलेल्यांपैकी या क्षेत्राकडे पर्यटकांना आकर्षित करून त्यांच्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असल्याचे पर्यटन मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईतील शांतीवन (रॉक) उद्यान, गार्डन भांडुपेश्वर तलाव, मढ येथील पुरातन किल्ले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, छोटा काश्मिर, ठाणे जिल्ह्यातील खिडकाळी शिवमंदीर, रायगड जिल्ह्यातील नेरळ, किहीम येथील डॉ.सलीम अली पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र, उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ, मौजे साखर येथील सूर्याजी मालुसरे यांचे समाधीस्थळ, घागरकोंड येथील झुलता पूल, दर्या सारंग कान्होजी आंग्रे समाधी परिसर, उंबरखिंड येथील शिवतीर्थ समरभूमी, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नदुर्ग किल्ला, भाट्ये समुद्र किनारा, आरे-वारे समुद्र किनारा, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सिंधुदूर्ग किल्ला, नाशिक जिल्ह्यातील कुसुमाग्रजांचे स्मारक, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ, अहमदनगर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थळ, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगड, सातारा जिल्ह्यातील पांचगणी, अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर, औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा प्रवेश रस्ता, परभणी जिल्ह्यातील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आदींसह राज्यातील विविध 115 ठिकाणी सुशोभिकरण, नवीन उपक्रम राबविणे तसेच पर्यटकांसाठी सुविधा निर्मिती केली जाणार आहे.

व्याघ्रदर्शनासाठी ‘ताडोबा’ हे जागतिकस्तरावर सर्वोत्तम ठिकाण व्हावे यासाठी एकात्मिक पर्यटन आराखडा सादर करावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई, दि. ३ : ‘ताडोबा’ हे वाघ बघण्याचे जागतिकस्तरावरचे सर्वोत्तम स्थळ व्हावे यादृष्टी पर्यावरणाचे रक्षण करत पर्यटन विकासाचा एकात्मिक आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन विभागास दिल्या. यासाठी आवश्यक असणारा निधीही टप्प्या टप्प्याने उपलब्ध करून दिला जावा असेही ते यावेळी म्हणाले.

आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन वाढीच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मदत व पनुर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, अपर मुख्यसचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वन‍ विभागाचे प्रधान सचिव वेणु गोपाल रेड्डी, प्रभारी वनबल प्रमुख वाय.एल.पी.राव, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने  ताडोबा अंधारी  व्याघ्र प्रकल्पाचे  क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, यांच्यासह वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

पर्यावरणाचे रक्षण करतांना नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन विकासाला कशी चालना देता येईल याचा विचार करावा असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की,  चंद्रपूर शहरालगत व्याघ्रसफारी आणि वन्यजीव बचाव केंद्र निर्मितीच्या प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रकल्पाचे  परिपूर्ण नियोजन करावे, येथे वनीकरण कार्यक्रमातून वृक्ष लागवड करण्यात यावी जेणेकरून वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास मिळू शकेल. वन अकादमीनजीक जे वन्यजीव रेस्क्यु सेंटर प्रस्तावित करण्यात आले आहे त्यास सेंट्रल झु ॲथॉरिटीची मंजूरी मिळालेली आहे. याला जोडूनच व्याघ्र सफारी करण्याचेही प्रस्तावित आहे. या दोन्ही प्रकल्पाचे परिपूर्ण नियोजन करण्यात येऊन अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात यावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

वैयक्तिक सोलर कुंपण

मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसेच शेत पिकांचे नुकसान टाळण्यासाठी बफर क्षेत्रातील शेतकऱ्यांना वैयक्तिक सोलर कुंपण वितरीत करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी लवकरात लवकर सादर करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ताडोबा भवन

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत असेलेली तीन कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी ताडोबा भवनाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.  यासाठी एकूण १८ कोटी रुपयांची आवश्यकता असून या वित्तीय वर्षात ३ कोटी तर उर्वरित निधीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात यावी, असे  निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रानतळोधी, कोळसा या गावाचे पुनर्वसन करण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा करण्यात आली. यासाठी एकूण ६४ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. चालू व येणाऱ्या आर्थिक वर्षात तरतूद करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

राज्य वन्यजीव मंडळाच्या १७ व्या बैठकीत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंधारी अभयारण्याचा क्षेत्र विस्तार करण्यास  व हे क्षेत्र गाभा क्षेत्रात समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या विस्तारीकरणाचा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे सादर करण्यात येणार असून या प्रस्तावास मंजूरी मिळाल्यानंतर कारवा गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. यासाठी ७० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे, अशी माहिती ही बैठकीत देण्यात आली.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर व बफर क्षेत्रातील बांबूला फुलोरा येण्यास सुरुवात झाली असून यासंबंधीचा नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. यात बांबू कुपांची कामे, जाळरेषेचा विस्तार,  अतिरिक्त अग्नि संरक्षक मजूर लावणे, बिनतारी संदेशन यंत्रणेचे बळकटीकरण करणे, बांबू बिया गोळा करून सीड बॉल तयार करणे अशा विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठीही निधीची तरतूद करण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री यांनी दिले.

अजितदादांनी पुरवला चोपदारांच्या लेक अन् जावयाचं हट्ट !

0

अजितदादांनी केलेल्या आपुलकीच्या चौकशी अन् जिव्हाळ्याच्या संवादानं…

उपमुख्यमंत्री कार्यालयाचे चोपदार झाले कृतार्थ तर, लेक अन् जावई भारावले…

मुंबई, दि. ३ :- उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी, करड्या शिस्तीसाठी, वेळेच्या काटेकोर नियोजनासाठी प्रसिध्द आहेत. अजितदादांकडे सध्या अर्थसंकल्प तयारीच्या बैठका सुरू आहेत. सकाळी आठ वाजताच अजितदादा मंत्रालयात येतात आणि बैठकांमध्ये व्यस्त असतात. करड्या शिस्तीच्या, कार्यक्रमांमध्ये व्यस्त असलेल्या अजितदादांचं अनोखं रुप मंत्रालयातील उपस्थितांनी काल अनुभवलं. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अजितदादांनी त्यांच्या कार्यालयातील चोपदारांच्या मुलगी आणि जावयाची उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याची इच्छा पूर्ण केली. चोपदार विलास मोरे यांची मुलगी आणि जावयाला फक्त भेट दिली नाही, तर दिलखुलास संवाद साधला. संवाद साधताना अजितदादांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. मुंबईत कुठे राहता. कुठल्या शाळेत शिकलात. अमेरिकेत कधी गेलात. अमेरिकेत कुठे राहत होता. तिथं कामाची वेळ, स्वरूप कसं असतं. तिथं छोट्या बाळाला कोण सांभाळतं, असे प्रश्न विचारले. लग्न कसं जमलं, लव्ह की अरेंज मॅरेज ? हा प्रश्नही दादांनी विचारला. दोघांच्या घरच्यांचीही दादांनी आपुलकीनं चौकशी केली. अजितदादांच्या जिव्हाळ्याच्या वागण्यानं निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चोपदार विलास मोरे कृतार्थ झाले, तर त्यांची लेक आणि जावई अक्षरश: भारावून गेले होते.

त्याचं झालं असं की, उपमुख्यमंत्री कार्यालयात विलास मोरे हे चोपदार पदावर कार्यरत आहेत. त्यांनी सेवाकाळत सचोटीनं सेवा केली. येत्या काही दिवसात ते सेवानिवृत्त होत आहेत. चोपदार विलास मोरे यांची मुलगी स्नेहा हिचं चार वर्षापूर्वी गणेश साळुंखे यांच्याशी लग्न झालं. त्यांचे जावई आयटी कंपनीत अमेरिकेत नोकरीला होते. हे दाम्पत्य अमेरिकेत स्थायिक होतं, मात्र कोरोनामुळं ते पुन्हा भारतात परत आले आहेत, आणि इथूनंच काम करत आहेत. विलास मोरे यांच्या मुलीची आणि जावयाची, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याची अनेक दिवसांपासून इच्छा होती. ही इच्छा ते वारंवार मोरे यांच्याकडं व्यक्त करत होते.

लेकीचा आणि जावयाची इच्छा अजितदादांना सांगण्याची चोपदार विलास मोरे यांची हिंमत होत नव्हती. चोपदारांनी परवा हिंमत करुन त्यांच्या मुलीला आणि जावयाला आपल्याला भेटायचं आहे, असं अजितदादांना सांगितलं. त्यावर अजितदादांनी तात्काळ होकार दिला. वेळापत्रक व्यस्त असूनही दुसऱ्या दिवशीच भेटायला बोलवलं. दादांची परवानगी आणि वेळ मिळाल्यानंतर चोपदारांची मुलगी स्नेहा आणि जावई गणेश यांनी काल अजितदादांची भेट घेतली. अजितदादांनी सुध्दा आपुलकी, जिव्हाळ्यानं त्यांच्याशी संवाद साधला. वैयक्तिक, कौटुंबिक चौकशी केली. मुलगी व जावयाच्या कर्तबगारीबद्दल अजितदादांनी चोपदार विलास मोरे यांचंही कौतुक केलं. अजितदादांनी केलेलं कौतुक तसंच लेकीचा, जावयाचा हट्ट अजितदादांनी पुरवल्यामुळं सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले चोपदार विलास मोरे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते, तर त्यांची लेक आणि जावई अजितदादांच्या अपुलकीमुळं अक्षरश: भारावून गेले होते.

PMPML कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसाठी राष्ट्रवादीचे महापालिकेसमोर आंदोलन

0

पुणे -PMPML कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीच्या मागणीसाठी आज या कर्मचाऱ्यांना घेऊन राष्ट्रवादी ने महापालिका भवनासमोर आंदोलन केले . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेस मानवी साखळीद्वारे घेराव करून हे आंदोलन करण्यात आले.महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या सौ दिपाली प्रदीप धुमाळ, कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे,रवींद्र माळवदकर, प्रदीप देशमुख,सोमनाथ शिंदे,किरण थेऊरकर,सुनील नलावडे,राजेंद्र कोंडे,हरीश ओहोळ,कैलास पासलकर आदींसह PMPML युनियन चे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या संदर्भात जगताप म्हणाले,’इतिहासात पहिल्यांदाच आज पुणे महानगरपालिकेला मानवी साखळीद्वारे घेराव घालण्यात आला. PMPML कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठीपुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून PMPML कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय करण्याचं धोरण सत्ताधाऱ्यांनी अवलंबले आहे. वर्षानुवर्षे पुणेकरांची सेवा करणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांची पदोन्नती सत्ताधारी भाजपने केली नाही. सभागृहात चर्चा करूनही PMPML कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रुजू करणे याकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. संपूर्ण शहर कोरोनाच्या संकटाशी लढा देत असताना PMPML कामगारांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली मात्र या कोरोना काळातील सेवेचे वेतनही महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिले नाही. यावर कळस म्हणजे PMPML च्या खासगीकरणाची चाचपणी सुरू केली. पुणे शहराच्या विकासात PMPML कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे, असे असतानाही कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. कोरोनाच्या काळात बसेस बंद असतानाही ठेकेदारांना तब्बल १६० कोटी रुपये देणारे सत्ताधारी भाजप कर्मचाऱ्यांच्या वेतानाच्यावेळी मात्र हात आखडता घेतात. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी द्वारे संपूर्ण महापालिकेस घेराव घातला होता. एक खासदार, सहा आमदार, महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, PMPML वरील संचालक भाजपचे असतानाही कर्मचाऱ्यांवर अन्याय होतोय याचा अर्थ भाजपला कर्मचाऱ्यांच्या हिताची पर्वा नाही, त्यांना फक्त ठेकेदाराचे कल्याण करायचे आहे. असे यावेळी प्रशांत जगताप यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहराध्यक्ष व सभागृहातील सदस्य या नात्याने प्रशांत जगताप यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला की येत्या ७ दिवसांत PMPML कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू न झाल्यास पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर, कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या या अक्रोशाने भाजप नेत्यांचे रस्त्यावर फिरणेही अशक्य होईल. यासोबतच पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आल्यास पहिल्याच बैठकीत PMPML कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे अश्वासन त्यांनी कामगार बांधवांना दिले.

बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होऊ शकत नाही :सभागृह नेते गणेश बिडकरांचा राष्ट्रवादीला टोला

0

राज्य सरकारने सत्तेचा वापर करून केलेल्या प्रभाग रचने विरोधात कायदेशीर लढा देणार

पुणेकर जगताप यांना जागा दाखवतील: महापौरांच्या प्रतिमेची राष्ट्रवादीला भीती

पुणे-राज्यात असलेल्या सत्तेचा गैरवापर महाविकास आघाडी कसा करत आहे, हे प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुणेकरांच्या लक्षात आले आहे. पालिकेत सत्ता मिळविण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत महाविकास आघाडीने नियमबाह्य पद्धतीने प्रभाग रचना केली तरी येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत पुणेकर मतदार त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा समाचार घेतला. निवडणुकीच्या निकालानंतर जगताप यांचा भ्रम निश्चित दूर होईल, असा दावा बिडकर यांनी केला.

पावणेदोन मिनिटांनी सुरू होते आहे पत्रकार परिषद


प्रभाग रचना करताना टेकडीमुळे तयार होणारी नैसर्गिक हद्द तोडून विचित्र प्रभाग जोडावा लागत असेल, तर सरळमार्गी राजकारण करून आपल्याला जिंकता येणार नाही हेच जगतापांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले का? काही महिन्यांपासून आघाडीची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीने आता थेट स्वबळावर लढण्यास समर्थ असून, १२२ जागांवर विजय मिळवू असा दावा शहराध्यक्ष जगताप करत आहेत, ही संख्या पुणे महानगरपालिकेची नाही तर पिंपरी चिंचवड आणि अन्य स्वराज्य संस्थांमधील असेल, असा टोला बिडकर यांनी लावला. जाती धर्माचे राजकारण करून आपण जिंकू असा समज जगताप यांनी करून घेतला आहे. मात्र त्यांना माहीत नाही सुज्ञ पुणेकर जाती- धर्मावर मतदान करत नाही. तो काम बघतो, आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्रजी यांचे काम पाहिले आहे, चार वर्षात पळणारी मेट्रो पहिली आहे.
स्वबळाची भाषा करणारे जगताप हे विसरतात की राज्यात तसेच देशात सत्ता असून ही त्यांचा आकडा कधी ६० च्या वर गेलेला नाही. ‘बेडूक फुगवला म्हणून तो हत्ती होत नाही’, असेही बिडकर म्हणाले. मागच्या पंचवार्षिक मध्ये प्रशांत जगताप हे महापौर असताना त्यांच्या पक्षाचा महापालिकेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. त्याची पुनरावृत्ती होऊन परत नाचक्की होऊ नये, यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न चालू आहे. निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाही त्यामुळेच भाजप मधील नगरसेवक आपल्याकडे येण्यास इच्छूक असल्याच्या घोषणा जगताप करत आहेत. पुढील २४ तासात राष्ट्रवादीने ८० उमेदवारांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान सभागृह नेते बिडकर यांनी दिले. पुणेकर फक्त विकासाला मतदान करतात. थापाड्यांना नाही. टेंडरमधल्या टक्केवारीसाठी आरडाओरड करणाऱ्यांना जनता जागा दाखवते. शहराच्या विकासासाठी भकास आघाडी नको, की भ्रष्टवादी राष्ट्रवादी नको, म्हणनूच पुणेकरांनी ठरवले आहे. पुण्यासाठी पर्याय एकच, ‘यंदा परत कमळच..’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कायदेशीर लढा देणार

सत्तेचा चुकीचा वापर करून महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचना केली आहे. याविरोधात कायदेशीर लढा देणार असल्याचे सभागृह नेते बिडकर यांनी स्पष्ट केले. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या प्रभागांवर हरकती आणि सूचना नोंदविण्यात येणार असून त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यास भाग पाडू असा निर्धार बिडकर यांनी व्यक्त केला.

चार दिवस डेक्कन क्वीन रद्द

0

पुणे : मुंबई विभागात ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान ७२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान ठाणे ते दिवा स्थानका दरम्यान ५ व सहाव्या मार्गिकेचे काम केले जाईल.

त्यामुळे मुंबईला येणाऱ्या जवळपास ५० गाड्या रद्द केले असून यात पुणे स्थानकावरून धावणाऱ्या डेक्क्न, डेक्कन क्वीन एक्सप्रेस चार दिवसांठी करिता रद्द करण्यात आली आहे. तसेच पुण्याहून धावणारी कोयना एक्सप्रेस देखील रद्द झाली आहे.

४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान पुणे -मुंबई डेक्कन एक्सप्रेस रद्द झाली तर ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस धावणार नाही. तर ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द झाली आहे. यासह ४ व ५ फेब्रुवारी रोजी हेंद्राबाद -मुंबई एक्सप्रेस ही पुण्यापर्यंतच धावेल तर हुसेनसागर एक्सप्रेस देखील पुण्यापर्यंतच धावणार आहे.

हडपसर टर्मिनलसाठी २१ कोटी, तर पुणे स्थानकासाठी ३१ कोटी मंजूर

0

पुणे : हडपसर रेल्वे टर्मिनलसाठी २१ कोटी, तर पुणे स्थानकावरील यार्ड रिमोल्डिंग व फलाटाच्या विस्तारीकरणासाठी जवळपास ३१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

बहुचर्चित पुणे-नाशिक सेमी हायस्पीड कॉरिडॉरसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १ हजार रुपये मंजूर झाले आहे. यासह पुणे-मिरज-लोंढा मार्गासाठी सर्वाधिक म्हणजे जवळपास १५६६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तसेच बारामती-लोणंदसाठी देखील १ हजार रुपये देऊन हेड खुले करण्यात आले आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याला रेल्वेसाठी जवळपास ११ हजार ९०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रेल्वे अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर दिला गेला आहे. पुण्यासाठी हा अर्थसंकल्प चांगला ठरला आहे. पुणे-मिरज-लोढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी व विद्युतीकरणासाठी कॅपिटल व ईबीआर असे मिळून जवळपास १५६६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे दुहेरीकरणाच्या कामाला गती येईल.

हडपसर टर्मिनलचा विकास
पुणे स्थानकावर होणाऱ्या गाड्यांच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी हडपसर टर्मिनल उभे केले जात आहे. तीन फलाटांच्या विकासासह २ नवे स्टेबलिंग लाईन तयार केली जाणार आहे. तसेच नवे आरआरआय केबिन तयार करण्याचे नियोजन आहे. या २१ कोटींत हडपसर स्थानकाचा कायापालट होणार आहे.

पुणे स्थानकाचे यार्ड रिमोल्डिंग होणार
पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमोल्डिंग व फलाटाच्या विस्तारीकरणासाठी जवळपास ३१ कोटी रुपये मंजूर झाले आहे. यात पुणे स्थानकावरील दोन, तीन व सहा या क्रमांकांचे फलाट २४ डबे बसतील इतक्या लांबीचे होतील. त्यामुळे आता गाड्यांना होम सिग्नलवर थांबावे लागणार नाही.

डिबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ३२१ कोटींचे अनुदान जमा – प्रकल्प संचालक इंद्रा मालो

0

मुंबई, दि. 3 : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली आहेत त्यांना तात्काळ अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरु झाली असून चार दिवसांत 321 कोटी रुपयांहून अधिक अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. यासंदर्भात कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश दिले होते. त्याची अंमलबजावणी करुन सन 2021-22 या चालू आर्थिक वर्षासाठी पोकरामध्ये विविध बाबींसाठी 600 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती, प्रकल्प संचालक इंद्रा मालो यांनी दिली.

श्रीमती इंद्रा मालो म्हणाल्या, पोकरा प्रकल्पाअंतर्गत सर्व अर्ज व पुढील प्रक्रिया डीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन होत आहे. विदर्भ व मराठवाड्यातील ४२१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५१४२ गावांमध्ये ६ वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रू. ४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता सन २०२१-२२ मध्ये एकूण १३५० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर आहे. पोकरा प्रकल्पांतर्गत  शेततळी, ठिबक संच, फळबाग लागवड यासह विविध वैयक्तिक लाभाच्या बाबी, तसेच शेतीसाठी सोयीसुविधा व कृषि प्रक्रिया उद्योगांसाठी शेतकरी गटांना लाभासाठी, पाण्याच्या ताळेबंदावर आधारित मृद व जलसंधारणाची कामे अशा विविध बाबींसाठी अनुदान व निधी देण्यात येतो.

पोकराअंतर्गत ६५ हजार १९८ वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना २९१.५७ कोटी, तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या व गटांच्या २८८ कृषी व्यवसायांसाठी २८.२९ कोटी, तर मृद व जलसंधारणाच्या १७८ पूर्ण झालेल्या कामांसाठी १.७६ कोटी रुपये अनुदान संबंधितांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले आहे.

ज्या शेतकऱ्यांना प्रकल्पाअंतर्गत लाभांसाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे त्यांनी त्वरीत कामे पूर्ण करून आपली देयके (बिले) ऑनलाईन अपलोड करावीत. त्यांचे अनुदान त्वरित अदा करण्यात येईल. तसेच, जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरावरील कृषी अधिकाऱ्यांनी आपल्याकडील प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा करून अनुदान मागणी पाठवावी, असे आवाहनही प्रकल्प संचालक इंद्रा मालो यांनी केले.