Home Blog Page 2098

चायना पीआर संघाने गतविजेत्या जपानला हरवले

0

चायना पीआर संघाने गतविजेत्या जपानला हरवले

पुणे :  चायना पीआर संघाने एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 फुटबॉल स्पर्धेत सर्वात सनसनाटी निकालाची नोंद करताना गतविजेत्या जपानचे आव्हान नियोजित आणि अतिरिक्त वेळेतील बरोबरीनंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये 4-3 गोलने संपुष्टात आणत अंतिम फेरीत प्रवेश केला.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झालेला उपांत्य फेरीचा सामना कमालीचा रंगला. अतिरिक्त वेळेनंतरही सामना 2-2 अशा बरोबरीत राहिला. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूट आऊटमध्ये चायना पीआर संघाने बाजी मारली. गोलरक्षक यु झु आणि कर्णधार वँग शानशान त्यांच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. चायना पीआर संघ आता नवव्या विजेतेपदापासून केवळ एक सामना दूर आहेत. जपान मात्र विजेतेपदाच्या हॅटट्रिकपासून वंचित राहिले.

जपानची सुरवात त्यांच्या लौकिकाप्रमाणे वेगवान झाली. त्यांनी पहिल्याच मिनिटाला हिनाटा मियाझावा हिने चायना पीआर संघाची गोलरक्षक यु झु हिच्या क्षमतेची कसोटी पाहण्यास सुरवात केली. मियाझावा हिच्या लांबवरून आलेल्या किकला अडवताना यु झु हिला आपले सर्वस्व पणाला लावावे लागले. पाठोपाठ जपानच्या रिको युएकी हिला गोल करण्याची सुवर्ण संधी साधता आली नाही. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला तिची किक बाहेर गेली. जपान आणि युएकीचे धारदार आक्रमण हे सुरवातीच्या खेळाचे आकर्षण ठरले होते. युएकीचा वेग कुठल्याही संघाच्या छातीत धडकी भरवणारा होता. जपानच्या रुका नोरीमात्सु हिने तिला सुरेख पास दिला. सहाव्या मिनिटाला मिळालेली ही संधीही वाया गेली. युएकीची किक गोलरक्षच यु झु हिने शिताफीने अडवली.

पहिल्या मिनिटापासून सुरु झालेला जपानाचा धडका पुढे वाढतच गेला. पयार्याने चायना पीआर संघावरील दडपण वाढत होते. युएकीचे आक्रमण कमी पजडले म्हणून जपानच्या साकी कुमागई आणि मना उवाबुची यांचेही सहा यार्डावरून गोल करण्याचे प्रयत्न फोल ठरले. जपानला 21 व्या मिनिटाला मिळालेली आणखी एक गोल करण्याची संधी गोलरक्षक यु झु हिने फोल ठरवली. हिनाटा मियाझावा हिच्या सुरेख पासवर पुन्हा एकदा युएकीने मारलेली किक यु झुने अडवली. या वेळी युएकीची दिशा योग्य होती, पण किकमध्ये तेवढा जोर नव्हता. गोलपोस्ट जवळ असल्याने त्याने किक काहिशी कमी वेगाने मारली. पण, यु झु हिने ती अचूक अडवली.

जपानला अखेर 26 व्या मिनिटाला चायना पीआरचा बचाव भेदण्याची संधी मिळाली. सामन्याच्या 26 व्या मिनिटासला पुन्हा एकदा हिनाटाकडून आलेला पास या वेळी युएकीने अफलातून हेडर करत सार्थ ठरवला. या वेळी यु झु हिचे प्रयत्न फोल ठरले. या गोल नंतर जपानच्या आक्रमणाला अधिकच धार आली. मध्यंतराला त्यांची आघाडी 1-0 अशी मर्यादित राहिली असली, तरी विश्रांतीपूर्वीच्या अखेरच्या मिनाटाला हिनाटाची जबरदस्त किक गोलपोस्टच्या अगदी जवळून बाहेर गेली.

गोल करण्याच्या संधी हुकल्यांची सल जपानला नक्कीच लागून राहिल. दुसऱ्या सत्राला सुरवात होत नाही, तो झिआओ युई हिने हिलेल्या सुरेख पासवर वु चेंगशू हिने गोल करून चायना पीआर संघाला बरोबरी साधून दिली. यानंतरही जपानचा धडाका काही थांबला नव्हता. तरी त्यांना आघाडी वाढवण्यात अपयश आले. हिनाटाचा आणखी एक प्रयत्न फोल ठरला. अपयशाने त्यांची पाठ सामन्याच्या अखेरच्या मिनिटापर्यंत सोडली नाही. सामन्याच्या  75 व्या मिनिटासला युएकीची किक बाहेर गेली. सामन्याच्या भरपाई वेळेतही युएकीचे प्रयत्न फोल ठरले. गोल करण्याच्या या अथक प्रयत्नांना जपानला 103 व्या मिनिटाला यश आले. युएकीनेच हा गोल करताना हासेगावा हिच्या फ्री-किकवर सुरेख गोल करून जपानला आघाडीवर नेले.

सामना येथेच संपला नाही. जपानच्या अथक प्रयत्नांना आज नशिबाची साथ नव्हती. युएकीचा हेडर द्वारे गोल करण्याचा आणखी एक प्रयत्न चायनान पीआरची गोलरक्षक यु झु हिने फोल ठरवला. सततच्या या अपयशाने जपानला निराश केले आणि परिणामी 119 व्या मिनिटाला त्यांना गोल स्विकारावा लागला. चायना पीआरची कर्णधार वँग  शानशान हिने झँग शिन हिचा पास सत्कारणी लावताना सुरेख गोल करत सामना टायब्रेकमध्ये नेला. संपूर्ण सामन्यात जपानच्या युएकी आणि हिनाटा यांच्या मध्ये चीनच्या भक्कम भिंतीप्रमाणे उभी राहिलेली गोलरक्षक यु झु हिने पेनल्टीमध्ये पहिली आणि पाचवी पेनल्टी अडवून चायना पीआर संघाला अंतिम फेरीत नेले. यापूर्वी आठवेळा विजेते असणाऱ्या चायना पीआर संघ 2008 नंतर प्रथमच अंतिम फेरीत पोचला आहे.

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी

0

मुंबई, दि. ४ :- कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने राज्य मंडळाच्या इ. दहावी व इ. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले.

मागील दोन वर्षात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. रिकाम्या जागा भरा, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न आदींच्या माध्यमातून परिक्षेचे स्वरूप कसे असेल हे विद्यार्थ्यांना लक्षात यावे, प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या सरावाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यादृष्टीने प्रश्नपेढी तयार करण्याची मागणी पालक संघटनांकडूनही सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर प्रश्नपेढी विकसित करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक ओझे कमी व्हावे यासाठी यावर्षी अभ्यासक्रम कमी करण्याबरोबरच परीक्षेची वेळ वाढवून देण्याचा निर्णयही मंडळामार्फत घेण्यात आला आहे.

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्‍वास नक्कीच वाढेल, या हेतूने हे प्रश्‍नसंच तयार केले जात आहेत. या प्रश्नपेढ्या http://www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्रा.गायकवाड यांनी सांगितले.

…तर आणखी 17 जणांचा गेला असता जीव

0

पुणे-पुण्यातील येरवडा येथील शास्त्रीनगर परिसरात गुरुवारी रात्री एका बांधकाम सुरू असलेल्या मॉलचा लोखंडी स्लॅब कोसळून सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. अन्य चार जण जखमी झाले असून, त्यातील तीन जण जीवन-मरणाच्या झोतात आहेत. वाचलेल्या मजुरांमध्ये 10 मिनिटांपूर्वी मृत झालेल्या मजुरांसोबत काम करणारे अनेक जण आहेत. हा अपघात काही वेळापूर्वी झाला असता तर आणखी 17 कामगार गाडले गेले असते आणि मृतांचा आकडा आणखी वाढला असता. आमच्या प्रियजनांना हे जग सोडून 12 तासांहून अधिक काळ झाला, परंतु त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी ना कंत्राटदार किंवा कंपनीतील कोणीही आलेला नाही, असा आरोप पीडितांनी केला आहे.

प्राथमिक तपासात हा मॉल बांधणाऱ्या कंपनीच्या अभियंत्यांचा निष्काळजीपणा समोर येत आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार कंपनीविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योग्यवेळी सापळा काढला असता तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते, असे या अपघातातून बचावलेल्या मजुरांचे म्हणणे आहे. जाळीखाली अडकलेल्या मजुरांना आम्ही आमच्याकडे असलेल्या साधनांनी बाहेर काढले.

मृत्युमुखी पडलेले सर्व मजूर बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील रहिवासी होते. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मोहम्मद सोहेल अहमद, मोहम्मद मोबीन आलम, एमडी समीर, मसरूफ हुसेन आणि मुनीब आलम यांचा समावेश आहे. हे सर्वजण गेल्या एक वर्षापासून पुण्यात राहत होते. मजुरांच्या जखमा भरून काढत राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

या अपघातात आपला भाऊ सोहेल अहमद गमावलेला मोहम्मद अंजार म्हणाला, ‘मी माझ्या भावाशी शेवटची गोष्ट रात्री 10 वाजता बोलली होती. त्यानंतर आम्ही झोपणार होतो. त्यानंतर 11 वाजण्याच्या सुमारास फोन आला की भाऊ नाही राहिला. या ठिकाणी एकही अभियंता नव्हता, सुरक्षा नव्हती आणि पर्यवेक्षकही नव्हता. जाळीखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सुमारे एक तास लागला. आमची माणसे खाली गाडली गेली होती आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी कंपनीचा कोणताही कर्मचारी मदत करत नव्हता.

अपघातात आपला पुतण्या गमावलेला तहजीब आलम म्हणाला, “जर सापळा काढण्याचे काम घाईने केले असते तर या पाच जणांचा मृत्यू झाला नसता. जाळी काढण्यासाठी क्रेनचा वापर करायला हवा होता. कंपनीने कोणतीही मदत केलेली नाही.मोहम्मद अंजार पुढे म्हणाले, ‘यामध्ये सर्वात मोठी चूक इंजिनिअरची आहे. खांब बनवून काटेरी जाळी उभारली गेली असावी, त्याखाली खुर्चीचा वापर करण्यात आला असावा, मात्र त्यांनी लोखंडी पट्टीच्या साहाय्याने वेल्डिंग करून ही जाळी उभारली होती. यामुळेच हा अपघात झाला. 32 क्रमांकाचा बार कापण्यास वेळ लागणार होता.

मोहम्मद अंजार यांनी सांगितले की, दुर्घटनेच्या 10 मिनिटांपूर्वी बांधकामाच्या ठिकाणी 30 लोक काम करत होते. यातील 17 जण गोदामात बार आणि इतर बांधकाम साहित्य आणण्यासाठी गेले होते. हा अपघात काही वेळापूर्वी घडला असता तर त्यांनाही याचा फटका बसला असता आणि अनेकांचा मृत्यू झाला असता.

मृतदेह घरी पाठवण्याची व्यवस्था नाही
अपघातात आपले सहकारी गमावलेले अखिल राजा मूसाभाई म्हणाले, ‘आमच्या प्रियजनांचा मृत्यू झाला आहे, परंतु त्यांचे मृतदेह त्यांच्या घरी म्हणजेच बिहारमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली जात नाही. मृतांपैकी तिघे विवाहित होते. काहींना तीन तर काहींना दोन मुली आहेत. आता सर्वच अनाथ झाले असून त्यांच्या कुटुंबाला आधार देणारे कोणी नाही. विवाहित नसलेल्या दोन मजुरांचे वय 22 आणि 23 वर्षे होते. संपूर्ण कुटुंब चालवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. आमचे म्हणणे ऐकून किमान या गोरगरिबांच्या घरी मृतदेह पाठवण्याचे काम करावे, असे आवाहन आम्ही येथील सरकारला करतो.

पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले की, हा अपघात रात्री 10.45 ते 11 च्या दरम्यान झाला. आम्हाला मध्यरात्री याची माहिती मिळाली आणि रात्री गस्तीचे पथक सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. ही वाडिया ग्रुपची बांधकाम साइट आहे. येथे एक मॉल बांधला जात होता. ज्या स्टील फ्रेमवर्कखाली कामगार काम करत होते ते अचानक कोसळले आणि त्याखाली काम करणारे 10 कामगार त्यात गाडले गेले. त्यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी सुरक्षा निकषांकडे दुर्लक्ष करून हे काम केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. जे जखमी झाले आहेत किंवा जे घटनास्थळी उपस्थित होते त्यांचे जबाब घेऊन आम्ही गुन्हा नोंदवत आहोत.

पालिका अधिकाऱ्यांशीही बोललो आहोत. रात्री बांधकामासाठी वेगळी परवानगी घेतली होती का, याचाही तपास सुरू आहे. यामध्ये काही चूक आढळल्यास याप्रकरणी कडक कारवाई करण्यात येईल.

मजुरांना अमानुष वागणूक दिली – स्थानिक आमदार
स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट दिली.. कामगारांना अमानुष वागणूक दिल्याचे ते म्हणाले. त्यांना 24 तास काम करायला लावले जात होते. बांधकाम करताना निष्काळजीपणा झाला आहे, त्यामुळे या प्रकरणातील जबाबदारांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आगामी विधानसभा अधिवेशनात कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून कामगारांच्या सुरक्षेबाबत कठोर कायदे करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

शिवसेना पदाधिकाऱ्याची घरात घुसून हत्या; आधी तीन गोळ्या घातल्यानंतर कुऱ्हाडीने केले वार

0

यवतमाळ –जिल्ह्यातील भांबराजा येथील एका शिवसेना पदाधिकाऱ्याची निघ्रृण हत्या करण्यात आलीय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या सुनील डिरवे (Sunil Divare Shoot Dead) यांची राहत्या घरात घुसून तीन व्यक्तींनी हत्या केलीय. आधी डिवरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला नंतर कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. तीन अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून डिवरेंवर आधी तीन गोळ्या झाडल्या त्यानंतर कुऱ्हाडीने डिवरे यांच्यावर वार केले.

हा धक्कादायक घटनाक्रम गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडलाय. ४० वर्षीय सुनील डिवरे हे स्थानिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय लोकप्रितिनिधी होते. ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकही होते. डिवरे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी पंचक्रोशीमध्ये वाऱ्यासारखी परसली आणि त्यांच्या घराजवळ गर्दी जमा झाली.

पिंपळे गुरव येथील जलतरण तलाव 50 टक्के क्षमतेने 5 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुला

0

पुणे दि.4: पिंपळे गुरव येथील जलतरण तलाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या सरावासाठी 2 फेब्रुवारीपासून खुला करण्यात आला आहे. त्याचबरोबर 5 फेब्रुवारीपासून 50 टक्के क्षमतेने सर्वांसाठी हा जलतरण तलाव खुला करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहाय्यक क्रीडा आयुक्त सुषमा शिंदे यांनी दिली.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने चालविण्यात येणारे सर्व जलतरण तलाव बंद ठेवण्यात आले होते. राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार जलतरण तलाव सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेचा पिंपळे गुरव जलतरण तलाव 50 टक्के क्षतजेने सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. जलतरण तलावावर कोरोनाचे सर्व नियम पाळून तसेच कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत याची खात्री करूनच प्रवेश देण्यात येईल, अशी माहितीही श्रीमती शिंदे यांनी दिली.
0000

भाजप आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

0

जामिनासाठी अर्ज दाखल करणार

सिंधुदुर्ग-शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे हे दोन दिवसांपासून पोलिस कोठडीत आहेत. आता 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नितेश राणे यांचे वकील आज सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहेत. या याचिकेवर शनिवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले की, सुनावणीनंतर लगेचच पोलिसांना नितेश राणेंच्या कोठडीत वाढ करायची होती. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यामागे काही आर्थिक व्यवहार होता का, याचाही शोध घ्यायचा आहे. त्यासाठी नितेश राणे यांना पोलिस तपासासाठी पुण्याला न्यावे लागणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या पोलिस कक्षाचा विस्तार करावा, असे सरकारी वकील म्हणाले.

तसेच नितेश राणे यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी मुख्य आरोपी सचिन सातपुते याला संतोष परब यांचा फोटो पाठवला होता. मात्र नितेश राणे ते मान्य करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे नितेश राणे यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी हवी आहे, असेही सरकारी वकिलांनी सांगितले.

वीजमीटरचे १०० टक्के अचूक रीडिंग घ्या अन्यथा कठोर कारवाई अटळ

0

महावितरणचे अध्यक्ष श्री. विजय सिंघल यांचा इशारा

मुंबईदि. ०४ फेब्रुवारी २०२२: कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व महावितरणच्या महसुलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रिडींग घेण्यात हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीज विरुद्ध महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाईसोबतच संबंधित कर्मचाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी दिला.

राज्यभरातील क्षेत्रीय प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते आणि उपविभागीय अधिकारी यांचेसमवेत मुख्यालयातून आज व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे, कार्यकारी संचालक (देयके व महसूल) श्री. योगेश गडकरी उपस्थित होते. या बैठकीस महावितरणचे सुमारे ७०० अभियंता व अधिकारी उपस्थित होते.

महावितरणच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधताना अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल म्हणाले की, ग्राहकांनी वापरलेल्या युनिटप्रमाणेच वीजबिलाची आकारणी करण्याची जबाबदारी महावितरणची आहे. त्यासाठी फोटो मीटर रीडिंगसाठी स्वतंत्र मोबाईल अप तयार करण्यात आले आहे व रीडिंग घेण्याची प्रक्रिया सोपी व वेगवान केलेली आहे. प्रत्येक मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीजना चांगला मोबदला दिला जातो. तरीही मीटरचे चुकीचे रिडींग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा शेरा देणे आदी प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. असे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

श्री. विजय सिंघल म्हणाले, शहरी व ग्रामीण भागातील  सर्व ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग शंभर टक्के अचूकतेने घेतले पाहिजे. यामध्ये हयगय केल्यास महावितरणच्या महसुलाचे नुकसान होते. सोबतच बिल दुरूस्तीचा वीजग्राहकांना नाहक मनस्ताप व त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे केवळ एक नोटीस पाठवून रीडिंग एजन्सी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. या फेब्रुवारी महिन्यात १०० टक्के अचूक मीटर रिडींग घेण्यात अपयशी  ठरलेल्या सर्व संबंधितांविरूध्द  कारवाई करण्याचे निर्देशही श्री. सिंघल यांनी यावेळी दिले.

या बैठकीत संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी मीटर रीडिंगकडून होणाऱ्या चुका व सदोष रीडिंग टाळण्यासाठी उपाययोजना सांगितल्या. ते म्हणाले, राज्यातील प्रत्येक मीटर रिडींग एजन्सीच्या कामगिरीची नोंद माहिती व तंत्रज्ञानाच्या प्रणालीमध्ये घेण्यात येत आहेत. त्या आधारे तसेच दर महिन्याच्या चुकीच्या रीडिंगच्या सरासरीप्रमाणे संबंधित रीडिंग एजन्सीला आर्थिक दंड केला जाणार आहे. तरीही सुधारणा न झाल्यास फौजदारी कारवाईसह काळ्या यादीत टाकण्यात येईल व अशा एजन्सी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये पुन्हा काम मिळणार नाही असे श्री. संजय ताकसांडे यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या पाचव्या टप्प्यांतर्गत सुमारे 50.38 लाख मेट्रिक टन धान्याचे वाटप

0

केन्द्राने टप्पा – एक ते पाचमधे अन्न अनुदाना अंतर्गत अंदाजे  2.6 लाख कोटी रुपये किमती इतके एकूण सुमारे 759 लाख मेट्रीक टन अन्नधान्य राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना वितरित केले

नवी दिल्ली- केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री,  अश्विनी कुमार चौबे यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात माहिती दिली की, 31 जानेवारी 2022 पर्यंत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून उपलब्ध अहवालानुसार, आतापर्यंत सुमारे  50.38 लाख मेट्रिक टन अन्नधान्य प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएम-जीकेएवाय) अंतर्गत टप्पा 5 मध्ये वितरीत करण्यात आले आहे. पीएम-जीकेएवाय अंतर्गत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (एनएफएसए) अंतर्गत देशातील सुमारे 80 कोटी लाभार्थी समाविष्ट आहेत.  त्यांच्या मासिक एनएफएसए अन्नधान्यांपेक्षा आणि त्याहून अधिक दरमहा 5 किलो प्रति व्यक्ती या प्रमाणात अतिरिक्त मोफत अन्नधान्य प्राप्त करण्यास पात्र आहेत. 

दरम्यान, पीएम-जीकेएवाय योजनेच्या अंमलबजावणीसाठी, देशात कोविड-19 महामारीचा उद्रेक झाल्यापासून, म्हणजे टप्पा – एक ते पाचमधे, अन्न अनुदाना अंतर्गत अंदाजे  2.6 लाख कोटी रुपये किमती इतके एकूण सुमारे 759 लाख मेट्रीक टन अन्नधान्य राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना विभागाने वितरित केले.

49.7 कोटी रुपयांची बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट तयार करणाऱ्या बोगस कंपन्याचे जाळे केले उघड

0

मुंबई-केंद्रीय वस्तू आणि सेवा कर – सीजीएसटी कार्यालयाच्या दक्षिण विभागाने, सराफा बाजारात सुमारे 1650 कोटी रुपयांची बनावट बिले बनवणाऱ्या बोगस कंपन्यांचे एक जाळे उघडकीस आणले आहे. या कंपन्यानी, 49.7 कोटी रुपयांची बनावट आयटीसी देखील तयार केली होती.या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून, मुंबईतील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

अटक करण्यात आलेली व्यक्ती, कर्नाटका ज्वेलर्स, मेसर्स बालाजी एंटरप्राईजेस आणि मेसर्स किस्मत एंटरप्रायझेस यांसारख्या अनेक बनावट कंपन्यांची खोटी बिले तयार करत असे. या तिन्ही बोगस कंपन्यांनी 29.4 कोटी रुपयांची बनावट आयटीसी तयार केल्या आणि दुसरी कंपनी गजमुखी सराफा व्यापाऱ्याला जारीही केल्या. या बनावट आयटीसीचे 29.4 कोटी रुपयांचे बिल, पुढे मेसर्स गोल्डन सराफा व्यापाऱ्याच्या नावाने पाठवण्यात आले. मात्र या सगळ्या व्यवहारात, प्रत्यक्षात कोणत्याही वस्तू अथवा माल/सेवांचे व्यवहार झालेच नाहीत. गोल्डन बुलियन (सराफा व्यापारी) ला या आधीच अटक करण्यात आली आहे.

या व्यवहारांच्या सखोल तपासातून असे निष्पन्न झाले की, अटक झालेली व्यक्ती, पैसे मिळवण्यासाठी  मुंबई, बेळगाव, बिकानेरसह अनेक ठिकाणांहून अशा बोगस कंपन्यांच्या नावाने खोटे व्यवहार करत होती. या संदर्भात मिळालेले प्रत्यक्ष पुरवले आणि या व्यक्तीने दिलेल्या कबुलीजबाबानंतर, त्याला सीजीएसटी कायद्याच्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली  आहे तसेच, याच कायद्यातील, कलम 132(1)(b), कलम 132(1)(c) आणि कलम 132(5)  अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल म्हणजेच 3 फेब्रुवारी 2022 रोजी त्याला जिल्हाधिकारी कार्यालयात हजर करण्यात आल्यावर, न्यायाधीशांनी त्याला 14  दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या संपूर्ण जाळ्यात सामील असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सीजीएसटी कार्यालयाच्या मुंबई विभागाने सुरु केलेल्या, करचुकवेगिरी विरोधी मोहिमेचा भाग म्हणून ही संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत, सीजीएसटी मुंबई, दक्षिण क्षेत्र कार्यालयाने, आतापर्यंत सुमारे 570 कोटी रुपयांची करचुकवेगिरी उघडकीस आणली असून, सुमारे 7 कोटी रुपये वसूल केले आहेत, तसंच गेल्या पाच महिन्यांत एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.

करचुकवेगिरी करणाऱ्या संभाव्य लोकांचा शोध घेण्यासाठी सीजीएसटी विभाग, डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषणाचा वापर करत आहे तसेच इतर कर अधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवूनही कारचोरी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. येत्या काही काळात, करचुकवेगिरी विरुद्धची ही मोहीम, विभागातर्फे अधिक तीव्र केली जाणार आहे.

९० टक्के सबसिडीवर ओबीसी व ओपन गटातील शेतकऱ्यांना पशुधन वाटपाचा पथदर्शी प्रकल्प सुरू

0

नागपूर,दि.4: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी जिल्हा स्तरावर अनेक योजना आहेत. मात्र परंपरेने गोपालक असणाऱ्या इतर मागास वर्गीय (ओबीसी) व सर्वसामान्य गटातील (ओपन) पशुपालकांचा रोजगार बळकट करण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी पुढाकार घेतला आहे.  नागपूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत आज त्यांच्याहस्ते 950 गाय गट व 1360 शेळी गट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका शानदार सोहळ्यामध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हा खनिज प्रतिष्ठानद्वारे प्राप्त निधीमधून 90 टक्के अनुदानावर ही मोहीम राबविली जाणार आहे. आजपासून या मोहिमेचा शुभारंभ झाला असून या मोहिमेअंतर्गत खात्रीलायक दहा लिटर दूध देणाऱ्या साहिवाल, गीर, राठी, सुरती, महेसाणा आदी प्रजातीच्या गाईंचे वाटप केले जाणार आहे. तर शेळी गटांमध्ये संगमनेरी, उस्मानाबादी, जमनापुरी बकऱ्यांचा पुरवठा केला जाणार आहे.

कळमना येथे आज झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेअंतर्गत निवड समितीमार्फत निवडण्यात आलेले गोपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील सहा महिने याठिकाणावरुन निश्चित करण्यात आलेल्या पुरवठादारांमार्फत निर्धारीत प्रजातीच्या गायी आणि बकऱ्यांचा पुरवठा केला जाणार आहे. पुरवठा करण्यात येणाऱ्या गायी व बकऱ्या यांचा विमा काढण्यात आला असून खरेदीपासून 30 दिवसांपर्यंत जनावर दगावल्यास नवीन जनावर देण्यात येणार आहे. विक्री करण्यात येणाऱ्या सर्व गायी व बकऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. यासाठी पदुंम विद्यापीठ जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे तज्ज्ञ कार्यरत आहेत.

आज सकाळी कळमना येथील बाजार समितीच्या आवारात अन्य राज्यातून व विविध ठिकाणावरुन आयात करण्यात आलेल्या गुरांना विक्रीसाठी सज्ज करण्यात आले होते. सकाळी काही वेळ खरेदी विक्री सुरु होती. ना.सुनील केदार याठिकाणी आल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, सभापती तापेश्वर वैद्य, उज्वला बोढारे, नेमावली माटे, भारती पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अहमद शेख, उपसभापती प्रकाश नागपूरे, दूधराम सव्वालाखे, अवंतिका लेकुरवाडे, महाराष्ट्र पशुसंवर्धन विद्यापीठाचे अधीष्ठाता डॉ. आशिष पातुरकर, डॉ.मंजुषा पुंडलिक, जिल्हा पशुसंर्वधन अधिकारी शिला बनकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी संबोधित करताना सुनील केदार यांनी आजचा दिवस क्रांतीकारी असून नागपूर जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यास अन्य जिल्ह्यातही अशा पद्धतीने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील. आतापर्यंत जेव्हांही दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला, त्यावेळी पशूधन शेतकऱ्याच्या मदतीला धावून आले आहे. शेतकऱ्यांनी पशूधनाचा योग्य सांभाळ करण्यासोबतच त्यांचा विमा काढण्याचा योजनेकडे देखील लक्ष वेधावे. शेळी, मेंढी, कोंबडी पर्यंत सर्वांचाच विमा काढला जातो. विमा संदर्भात कोणताही तंटा निर्माण झाल्यास गावपातळीवर समितीमार्फत सोडविल्या जाऊ शकतो. महाराष्ट्रात विविध योजना पशूसंवर्धन विभागात आहे. राष्ट्रीय गोकुल अभियानाअंतर्गत दोनशे गायींचा गट, राष्ट्रीय पशूधन अभियानाअंतर्गत पाचशे शेळांचा प्रकल्प, एक हजार कोबंड्याचा प्रकल्प अशा मोठ्या प्रकल्पांकडे लक्ष वेधने आर्थिक व सामूहीक हिताचे ठरणारे आहे. आज महाराष्ट्रात दरदिवशी अन्य राज्यातून एक कोटी अंडी आयात करावी लागते. त्यामुळे कुक्कुटपालन किती मोठा व्यवसाय आहे हे लक्षात येईल. परंतू योजनेचा लाभ घ्यायचा त्यासाठी पुढे पुढे करायचे व नंतर पिंजरे खाली ठेवायचे, हे चालणार नाही. त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या नव्या योजनेत ज्यांना गोपालन, गौरक्षण, दुधाळ जनावरांचे संगोपन आणि दुधाच्या व्यवसायाची जाणीव आहे. अशाच लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे धोरण अवलंबविले आहे. यातून गरजूंना रोजगार निर्मिती व्हावी हेच धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पशूसंवर्धन विभागामार्फत नवनव्या योजना राबविण्यासाठी केंद्रशासनाकडे देखील प्रस्ताव टाकला असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर येथे मंडईमध्ये बकरा मार्केट लावून दुबईमध्ये बकरे पाठविण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. गुरांच्या लसीबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केला होता. जिल्हा परिषदेत कालबद्धमर्यादेत लसीकरण मोहीम गुरांसाठी आखली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात सध्या सुरु असलेल्या पशूसंवर्धन दवाखान्यामध्ये वाढ करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी संबोधित केले. राज्यात ओबीसी आणि ओपन मधील लाभार्थ्यांना वाटप होण्याचे हे पहिले उदाहरण असून जिल्हा परिषदेने जिल्ह्याच्या सर्वकष विकासासाठी 30 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे. स्वयंरोजगार हा उद्देश या प्रस्तावाचा असून तो मान्य करण्यात यावा. तसेच गुरांचे कालबद्ध लसीकरण करण्याबाबत धोरण ठरावे, अशी मागणी केली. यावेळी सभापती तापेश्वर, वैद्य, दुधराम सव्वालाखे यांची समयोचित भाषणे झालीत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद ठाकरे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री.रेवसकर यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. अभय भालेराव यांनी मानले.

खबरदार ..शहरी गरीब योजना बंद कराल तर … दिपाली धुमाळांनी दिला इशारा

0

पुणे- कुणाच्या तरी दबावाखाली येऊन महापालिकेने गरिबांच्या आरोग्यासाठी, उपचारासाठी असलेली शहरी गरीब योजना बंद केली तर खबरदार .. त्याची फळे तुम्हाला लगेचच भोगावी लागतील , महिलांचा ,गरीबांचा उद्रेक तुम्हाला धडा शिकवेल असा इशारा महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी दिला आहे .

त्या म्हणाल्या,’गोरगरिबांची शहरी गरीब योजना बंद करून सल्लागार आणि इन्शुरन्स कंपन्या यांचे पोट भरण्यासाठी ही योजना बंद पाडण्याचा हा उद्योग सुरू आहे असे म्हटले तरी वावगे होणार नाही. शहरी गरीब योजनेत एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले नागरिक व झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक हे याचा लाभ घेतात.कोरोना काळ आल्यापासून मागील एक वर्ष लॉकडाऊन मुळे सर्व धंदे दुकाने जवळपास बंद होती दुकाने उघडली तरीदेखील व्यवसाय जसा हवा तसा कोणालाही करता आला नाही त्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे

त्या पुढे म्हणाल्या,”आर्थिक उत्पन्न हे दरवर्षी नागरिकांचे बदलत असते एक नागरिक सोसायटीमध्ये राहतो म्हणून त्यांनी शहरी गरीब योजनेचा लाभ घ्यावयाचा नाही असे म्हणणे चुकीचे आहे सोसायटी मध्ये दोन खोल्यांचे फ्लॅट मध्ये राहणारा नागरिक देखील आजच्या काळात नोकरी गमावून बसला आहे किंवा त्याचा व्यवसाय पूर्वी जसा होता, तसा आता होत नाही ही परिस्थिती सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे जोपर्यंत पुणे महापालिकेचे दवाखाने सक्षम होत नाहीत तोपर्यंत शहरी गरीब योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबवली पाहिजे व तिचा विस्तार केला पाहिजे असे माझे मत आहे

शहरी गरीब योजनेचा लाभ काही सोसायटीमध्ये राहणारे नागरिक घेत आहेत म्हणून ही योजनाच बंद करा हे चुकीचे आहे शहरी गरीब योजनेची आजपर्यंत हजारो खऱ्या खुऱ्या गरजवंतांना मदत झाली आहे. पुणे महापालिकेची एकंदरीत आरोग्य यंत्रणा, प्रथमिक आरोग्य केंद्र व दवाखान्याची स्थिती सक्षम नाही पुणे महापालिकेची सर्वसामान्यांपर्यंत पोहचलेली आणि यशस्वी ठरलेली शहरी गरीब ही एकमेव योजना आहे. आरोग्यावर एकूण बजेटच्या 6 टक्के खर्च करणे बंधनकारक आहे, ते पुणे महापालिका करत नाही. शहरी गरीब योजनेसाठी केलेला अत्यावश्यक खर्च पुणे महापालिकेने केला पाहिजे पुणेकरांचे कररूपी पैसे पुणेकरांसाठी वापरले जावेत या योजनेतील अटी, नियम यांचे पालन झाले पाहिजेच ते प्रशासनाने सक्षमपणे करावे.पण असा योजनाच बंद करण्याचा बेमुर्वतखोरीचा निर्णय घेऊ नये .असेही आवाहन त्यांनी सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना केले आहे. महापालिकेच्या शहरी गरीब योजनेला बंद पाडण्यासाठी उद्योग केलेल्यांनी आपण कुठे कसे दौरे केलेत आपल्या खाली किती अंधार आहे हे तपासून पाहावे असे जाहीर आवाहनदेखील आता करण्यात येऊ लागले आहे . जनतेतूनसुद्धा या बाबत आता पडसाद उमटू लागले आहेत. या योजनेतून लोक हॉस्पिटल मध्ये उपचार घेतात .सहली अभ्यास दौरे सारखी थेरंं करत नाहीत. असेही येथे अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.

परिवर्तन रॅलीद्वारे काँग्रेस फुंकणार पुणे महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग.

0

पुणे-उद्या शहरात परिवर्तन रॅली काढून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कॉंग्रेस महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.

याबाबत कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी असे सांगितले कि,’आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. डिजीटल सभासद नोंदणीच्या अभियानामार्फत पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना भेटून काँग्रेस पक्षाचे सभासद करीत आहेत. उद्या ५ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांचा पुणे दौरा आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. गेली ५ वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. या ५ वर्षात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुणेकरांची अपेक्षा भंग केली. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पुणे महानगरपालिकेमध्ये परिवर्तन करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे विद्यापीठ चौक ते काँग्रेस भवन पर्यंत ‘‘परिवर्तन रॅली’’ आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व आघाडी संघटना व विभागाचे प्रमुख व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर काँग्रेस भवनच्या पटांगणामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्‍यास काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, आजी-माजी आमदार, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

     या मेळाव्‍यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रोत्साहन व उर्जा मिळणार आहे. या मेळाव्‍याच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. असे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी या पत्रकाद्वारे सांगीतले आहे.

पुण्यातील दुर्घटनेतील मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

0

जखमींना तत्काळ उपचार, कुटुंबियांना मदतीचे निर्देश

मुंबई, दि. ४:- पुण्यात येरवडा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने झालेल्या मजुरांच्या मृत्यूवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील जखमींना चांगले उपचार मिळावेत तसेच मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत त्यांनी यंत्रणांना निर्देश दिले आहेत.

इमारतींचे बांधकाम तसेच अन्य कामांच्या ठिकाणीही जीवितहानी होऊ नये, यासाठीच्या सुरक्षा उपाय योजनांची खबरदारी घेण्यात यावी. त्याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. दुर्घटनेतील जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे.

पुण्यातील दुर्घटनेच्या चौकशीचे उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

0

मृत्यू पावलेल्या पाच कामगारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मृत कामगारांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत

पुणे , दि. 4 :- पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या  दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.

12.23 कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवेगिरी प्रकरणी दाम्पत्याला अटक

0

मुंबई – मुंबई क्षेत्राच्या सीजीएसटी ठाणे आयुक्तालयाच्या करचुकवेगिरीविरोधी विभागातील अधिकार्‍यांनी 12.23 कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवेगिरीप्रकरणी दाम्पत्याला अटक केली आहे. तपशीलवार माहिती शोधून काढल्यानंतर आणि माहिती विश्लेषणाच्या आधारे, मेसर्स डेटालिंक कन्सल्टन्सी या ठाणे स्थित कंपनीचे व्यवहार संशयास्पद असल्याचे निश्चित झाल्यानंतर या कंपनीविरोधात चौकशी सुरू करण्यात आली. ही कंपनी विविध उच्चपदस्थ कंपन्यांना मनुष्यबळ पुरवत असल्याचे तपासात समोर आले. या कंपनीने ग्राहकांकडून जीएसटी  जमा केला होता, मात्र हा जमा केलेला जीएसटी एका वर्षापेक्षा जास्त काळ सरकारी तिजोरीत जमा केला नाही, यामुळे कंपनीने सीजीएसटी कायदा 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे.

पती (50 वर्षे) आणि पत्नी (48 वर्षे) असे या कंपनीचे दोन भागीदार असलेल्या या दाम्पत्याला 03.02.2022 रोजी अटक करण्यात आली. सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 132(डी) चे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आणि प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ठाणे यांच्यासमोर या दाम्पत्याला हजर करण्यात आले. दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दोषी सिद्ध झाल्यास, या दाम्पत्याला 5 वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. ठाण्याचे सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्त राजन चौधरी यांनी ही माहिती दिली.

या प्रकरणी केलेली ही कारवाई, कर चुकवणारे आणि फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध सीजीएसटी मुंबई क्षेत्राने सुरू केलेल्या करचुकवेगिरीविरोधी मोहिमेचा एक भाग आहे. या मोहिमेदरम्यान सीजीएसटी ठाणे आयुक्तालयाने आतापर्यंत 1023 कोटी रुपयांची करचुकवेगिरी शोधून काढली असून  17 कोटी रुपये वसूल केले आहेत आणि गेल्या पाच महिन्यांत 6 जणांना अटक केली आहे.

सीजीएसटी विभाग डेटा मायनिंग, डेटा अॅनालिसिस आणि नेटवर्क अॅनालिसिस साधनांचा वापर करून संभाव्य कर चुकवणाऱ्या आणि फसवणूक करणार्‍यांचा शोध घेत आहे. प्रामाणिकपणे अनुपालन करणाऱ्या करदात्यांसाठी अन्यायकारक स्पर्धा निर्माण करणाऱ्या   सेवा क्षेत्र आणि डिजिटल अर्थव्यवस्थेसह अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रातील कर चुकवणार्‍यांना लक्ष्य करण्यासाठी, विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. विभाग येत्या काही दिवसांत आणि महिन्यांत ही करचुकवेगिरी विरोधातील  मोहीम अधिक तीव्र करणार आहे.