Home Blog Page 2097

जम्बो हॉस्पिटलबाबत तक्रारी ,पुरावे द्या ,चौकशी करून कारवाई करू -निव्वळ आरोप नको :उपमुख्यमंत्री

0

पुणे- किरीट सोमय्यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरबाबत केलेल्या आरोपांविषयी अजित पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोविड सेंटर्सच्या व्यवस्थेमध्ये सुरुवातीपासून पारदर्शकता ठेवली आहे. कुठेही चूक होणार नाही अशा सूचना दिल्या आहेत. जर कुणाचं तसं म्हणणं असेल त्यांच्याविरुद्ध पुरावे द्या, त्यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करू,निव्वळ आरोप कोणी करू नये ”, असं ते म्हणाले.आपल्याला या आरोप-प्रत्यारोपांमध्ये रस नसल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. “पुरावे देऊन हे आरोप सिद्ध झाले तर त्याबद्दलची कारवाई होईल. पण हल्ली मी बघतो की खूप काही आरोप केले जातात. ते कुठल्या स्तरावर जातायत, कशी माफी मागितली जाते, दिलगिरी व्यक्त केली जाते हे तुम्ही पाहाता. मी नेहमी सांगतो की मला या कुठल्याही गोष्टीमध्ये रस नाही. मला कामात रस आहे. आम्ही आपल्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, ती पार पाडण्याचं काम करतोय”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

(जम्बो हॉस्पिटल बाबत महापौर आणि महापालिका आयुक्त यांना आपण तक्रार देण्यास सांगितले आहे असे पीएमआरडीए ला भेट दिली तेव्हा किरीट सोमैय्या यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितले होते . मात्र या दोहोंनी याबाबत कोणत्याही प्रधीकृत ठिकाणी तोंडी देखील तक्रार केलेली नाही )

“आपल्याकडचे लोक कष्टाची कामं करण्यास तयार होत नाहीत”, उपमुख्यमंत्री 

पुण्यातील येरवड्यामध्ये शास्त्रीनगर भागात घडलेल्या दुर्घटनेमध्ये ५ बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. या इमारतीचं बांधकाम सुरू असून त्यावेळीच स्लॅबची जाळी कोसळून ही दुर्घटना घडल्याचंही स्पष्ट झालं. या संदर्भात आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी हे सर्व मजूर बिहारचे असून आपल्याकडी लोकं अशी कष्टाची कामं करायला तयार होत नसल्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली.“येरवडा दुर्घटनेत मरण पावलेले मजूर हे बिहार मधील होते. सुनिल टिंगरेंनी लक्षात आणून दिलं की या ठिकाणी ते काम तातडीने करून द्यायचं असल्यामुळे बिहारची ही टीम दिवसरात्र काम करत होती. त्यांना इथे येऊन ८ दिवसही झाले नव्हते. या मजूरांना कंत्राटावर घेण्यात आलं नव्हतं”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.“आपल्या भागातली लोकं अशा प्रकारचं कष्टाचं काम करण्यासाठी इतके तयार होत नाहीत, जेवढे मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागातली लोकं तयार होतात”, असं अजित पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारतीच्या स्लॅबची जाळी कोसळून सहा कामागारांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. 

सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सूरू होणार

0


शासनाच्या निर्देशानुसार क्रीडा स्पर्धांना परवानगी द्या-उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि.५:शासनाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार विविध क्रीडा स्पर्धाना २५ टक्के प्रेक्षक उपस्थितीत परवानगी देण्यात यावी आणि कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर उषा ढोरे, जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, नवीन रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आणखी काही काळ दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात लशीची दुसरी मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण वाढवावे. खासगी रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या गंभीर रुग्णांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यांना तातडीने उपचार मिळण्यासाठी रुग्णालयांना व्यवस्था करण्याचे निर्देश द्यावेत.

जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठी कोवॅक्सिन लसमात्राचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे. कोवॅक्सिन लशीचा पुरवठा होण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ज्येष्ठांना ग्रामीण भागात वर्धक मात्रा घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाण्यास अडचण येत असल्याने शिबिराच्या माध्यमातून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

बैठकीत श्री.राव यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कोविड परिस्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर २६.६० टक्के होता आणि ७ दिवसात ४५ हजार ७८८ नवीन रुग्ण आढळले आहेत. मागील आठवड्यापेक्षा हे प्रमाण ४४.७५ टक्क्यांनी कमी आहे. मागील आठवड्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत ३७ टक्के घट झाली आहे. जिल्ह्यात एकूण १ कोटी ६२ लाख ६७ हजार लसीकरण झाले आहे. ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या ३२ टक्के नागरिकांनी लशीची वर्धक मात्रा घेतली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीस आमदार अशोक पवार, दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, चेतन तुपे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, राजेश पाटील, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, कृष्ण प्रकाश, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे ‘जोडे मारो’आंदोलन

0

पुणे-बंडातात्या कराडकर यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केले. बंडातात्या कराडकर यांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील संत ज्ञानेश्वर पादुका चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बंडातात्या कराडकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला. या आंदोलनप्रसंगी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ ,अंकुश काकडे,राजलक्ष्मी भोसले,ॲड.रुपाली पाटील,प्रदीप देशमुख,सौ.मृणालिनी वाणी, ,महेश हांडे,किशोर कांबळे,गणेश नलावडे,अजिंक्य पालकर,मनोज पाचपुते आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रशांत जगताप म्हणाले कि,’ “संतांची भूमी” म्हणून संपूर्ण जगात महाराष्ट्राची ओळख आहे. वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे. संपूर्ण जगाला सद्भावनेचा, मानवतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायात बंडातात्या कराडकर यांच्यासारख्या वाईट प्रवृत्तींनी घुसखोरी केली आहे. वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन करण्याचा हा सुनियोजित कट असू शकतो. ही बाब वेळीच ओळखून अशा प्रवृत्तींना बाजूला करावे असे आवाहन प्रशांत जगताप यांनी केले. बोलणारी व्यक्ती आपल्याला दिसत असली तरी त्या व्यक्तीचा बोलविता धनी कोण आहे याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी नमूद केले. या आंदोलनास पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून बंड्यातात्या कराडकर यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने या तक्रारीची दखल घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

0

नवी दिल्ली, 4: ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला होता.

यावर्षीपासून राजपथावरील पथसंचलनात सामील झालेल्या राज्यांच्या चित्ररथाला आणि लष्करी मार्चिंग तुकडीला ऑनलाईन नोंदणीव्दारे मत देऊन जिंकविता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. त्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पंथसंचलन संपल्यानंतर MyGov या पोर्टलवर ऑनलाईन मत नोंदणी सुरू झाली होती. हे मतदान 31 जानेवारी 2022 च्या रात्रीपर्यंत सुरू होते.

असा होता महाराष्ट्राचा ‘जैव विविधता व राज्य मानके’ चित्ररथ

चित्ररथाच्या दर्शनी भागातील ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची 8 फूट उंच आणि 6 फूट रूंद पंखांच्या देखण्या प्रतिकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चित्ररथावर राज्यफुल ‘ताम्हण’चे रंगीत गुच्छ दर्शविण्यात आले. या फुलांवरील छोटया आकर्षंक फुलपाखरांच्या लोभस प्रतिकृतीही उठून दिसत होत्या. चित्ररथावर मोठया आकारातील ‘शेकरू’ हा राज्यप्राणी तसेच, युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेले ‘कास पठार’ दर्शविण्यात आले. या पठारावर आढळणारी विविध जैव विविधता दर्शविण्यात आले. ‘हरियाल’ पक्षाची प्रतिकृती, चित्ररथाच्या मागील भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिकृती आणि राज्यवृक्ष ‘आंबा’ ची प्रतिकृतीही उपस्थितांचे आकर्षण ठरले. माळढोक पक्षी, खेकडा तसेच, मासा, वाघ, आंबोली झरा, फ्लेमिंगो, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या प्रतिकृतींनीही उपस्थितांचे मन जिंकली होती.

‘मावज’ची ऑनलाईन मोहीम

महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने देखील या चित्ररथाला ऑनलाईन मतदान करण्यासंदर्भात आवाहन करण्यासाठी सर्व समाजमाध्यमांच्याद्वारे विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये महाराष्ट्राला सर्वांधिक 23 टक्के मते मिळाली होती. ऑनलाईन मतदानात उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात चुरस होती. सुरुवातीच्या टप्प्यात उत्तर प्रदेश 21 टक्के ऑनलाईन मते मिळवून आघाडीवर होता. महाराष्ट्रास या टप्प्यात 17 टक्के मते प्राप्त झाली होती. मात्र अंतीम टप्प्यात झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत महाराष्ट्राने 23 टक्के मते मिळवुन प्रथम क्रमांक पटकाविला. दुसरा क्रमांक उत्तर प्रदेश- (22 टक्के) तर, तिसरा क्रमांक हा जम्मु व काश्मीर- ( 13 टक्के ).सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व सचिव सौरभ विजय यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक बिभीषण चवरे यांच्या देखरेखीखाली या चित्ररथाची निर्मिती करण्यात आली. हा चित्ररथाची संकल्पना रेखाचित्र व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या तरूण मूर्तीकार व कलादिग्दर्शक यांनी केले होते. यावर्षीचा हा चित्ररथ नागपूरच्या ‘शुभ ॲड्स’ ने तयार केला आहे. संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे आणि राहूल धनसरे व त्यांच्या 30 मूर्तीकार व कलाकारांसह भव्य प्रतिकृतीचे काम प्रत्यक्ष दिल्लीतील रंगशाळेत पूर्ण केले होते.

बंडातात्या कराड यांचे विरुद्ध पुणे न्यायालयात खटला दाखल

0

पुणे- महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी बंडातात्या कराड यांच्याविरोधात पुणे न्यायालयात पहिला खटला दाखल केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी वकिलामार्फत बंडातात्यांविरुद्ध पुणेच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे खटला दाखल केला. या प्रकरणी न्यायालयाने दखल घेऊन आरोपींवर कडक शासन करावे, अशी मागणी करण्यात आली.

या प्रकरणात रुपाली ठोंबरे यांच्यावतीने अॅड विजयसिंह ठोंबरे, अॅड हितेश सोनार, ॲड दिग्विजयसिंह ठोंबरे व विष्णू होगे काम पाहत आहे. अॅड विजयसिंह ठोंबरे म्हणाले, “आज पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात सातारा येथील बंडुतात्या कराडकर यांनी राजकीय महिलांविषयी दिलेल्या वादग्रस्त आणि बदनामीकारक विधान केलं होतं. त्याविरोधात आज न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे. माझ्या पक्षकार रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीवरून आम्ही मानहानी आणि बदनामीचा फौजदारी खटला दाखल केलाय.”

विरोधी पक्षनेता सरकारला कशा प्रकारे वठणीवर आणू शकतो हे दरेकर यांनी दाखवून दिले – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस

0


हिवाळी अधिवेशनातील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
यांच्या संसदीय कामकाजाच्या अहवालाचे प्रकाशन

मुंबई, दि. ४ फेब्रुवारी – विरोधी पक्षनेते म्हणून प्रविण दरेकर यांनी हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत वेगवेगळ्या खात्यांमध्ये चाललेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचे काम केले आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी एक मोठी लढाई लढली. विरोधी पक्षनेता सरकारला कशा प्रकारे वठणीवर आणू शकतो, हे प्रविण दरेकर यांनी दाखवून दिले असे उदगार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशनातील विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या संसदीय कामकाजाच्या अहवालाचे प्रकाशन आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अतिशय प्रभावीपणे शेतकरी, कामगार, वंचित या विविध मुद्दयांच्या विषयांवर प्रचंड आवाज उठवला. इतकेच नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला. त्यांनी केलेले कामकाज या अहवालातून सामान्य माणसांपर्यंत घेऊन जाण्याचे काम ते करत आहेत. म्हणून मी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना मनापासून शुभेच्छा देतो, असे फडणवीस यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, यासंदर्भात सरकारला अक्षरक्ष: त्यांनी जेरीस आणले. त्यांची हिवाळी अधिवेशनातील विधानपरिषदेतील जी काही निवडक भाषणे आहेत, त्यावर आधारित हा अहवाल प्रकाशित झालाय ही अतिशय चांगली परंपरा आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

कोरोनामुळे फक्त पाच दिवसांच्या कालावधीत झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी शेतकरी, कामगार,वंचित यांना भेडसावणारे विविध विषय विधानपरिषदेत उपस्थित केले. दरेकर यांनी विधानपरिषदेत मांडलेल्या विविध प्रश्नामुळे ज्वलंत विषयांना वाचा फुटु शकली. सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी याची मोलाची मदत झाली. याच मुद्यापैकी ५० निवडक महत्त्वाच्या विषयांच्या भाषणांच्या मुददयांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला साखर संग्रहालय उभारणीचा आढावा

0

पुणे, दि. 4 : साखर आयुक्तालयात उभारण्यात येणाऱ्या जगाजिक दर्जाच्या साखर संग्राहलय उभारणीबाबत आज सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आढावा घेतला.

साखर आयुक्तालय येथे आज झालेल्या आढावा बैठकीला साखर आयुकत शेखर गायकवाड यांच्यासह साखर आयुक्तालयाचे संचालक तसेच वसंतदादा शुगर इंन्सीटयुटचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ऊस उत्पादन, साखर उत्पादन, गुळ, साखरेपासून बनणारे उपपदार्थ याबाबतची माहिती अभ्यागतांना मिळण्यासाठी आणि शेतकरी, पर्यटक, विद्यार्थी तसेच अभ्यासकांना माहितीसाठी साखर संग्रहालय उपयुक्तस ठरेल व देशासाठी मानबिंदु ठरेल, असा विश्वास सहकारमंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला.

ऊस गाळप हंगामाचाही आढावा

सहकारमंत्री श्री. पाटील यांनी राज्यातील ऊस गाळप हंगाम 2021-22 चाही आढावा घेतला. यामध्ये एफआरपी, विभागनिहाय तसेच साखर कारखानानिहाय गाळप याबाबतची माहिती घेतली. प्रादेशिक सहसंचालक यांनी आपल्या क्षेत्रातील माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी राज्यातील सर्व विभागांचे प्रादेशिक सहसंचालक उपस्थित होते.

रोग अन्वेषण विभागाच्या जैव सुरक्षा प्रयोगशाळा उभारणी प्रकल्पाचे रविवारी भूमीपूजन

0

पुणे दि.4: पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागातर्फे राज्यात पशुरोग निदानासाठी राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत औंध येथील रोग अन्वेषण विभाग येथे जैव सुरक्षा स्तर २ आणि ३ प्रयोगशाळा उभारणी प्रकल्पाचे भूमीपूजन आणि कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळा नवीन इमारत संकुलाचे उद्घाटन रविवार ६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.

कार्यक्रमाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.

राज्यात पशुरोग निदानासाठी रोग अन्वेषण विभाग ही शासनाची एकमेव राज्यस्तरीय प्रयोगशाळा कार्यरत आहे. प्रयोगशाळेस राष्ट्रीयस्तरावर पश्चिम विभागीय रोग निदान प्रयोगशाळेचा दर्जा प्राप्त आहे. प्रयोगशाळेत १० विभाग आहेत. प्रयोगशाळेद्वारे पशुरोगाचे वेळेत निदान करून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निष्कर्ष कळविल्यामुळे उपचार व रोग नियंत्रण सोईचे होते. यामुळे पशुपालकांचे होणारे नुकसान कमी होते. या प्रयोगशाळेत राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत जैव सुरक्षा स्तर प्रयोगशाळा उभारणी प्रकल्प मंजूर करण्यात आला असून त्यावर ७५ कोटी ६१ लाख रुपये खर्च होणार आहे. २०२२-२३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

पशुरोगाचे नेमके व अचूक निदान तातडीने होणार
जैव सुरक्षा स्तर दर्जाच्या प्रयोगशाळांची उपलब्धता झाल्याने राष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळांना ब्रुसेल्लॉसिस, लाळखुरकुत, एव्हियन इन्फलुएंजा, रेबीज आदींचे रोग नमुने निदानासाठी पाठवता येणार आहे. प्रयोगशाळेतील अद्ययावत उपकरणामुळे पशुरोगाचे नेमके व अचूक निदान तातडीने करणे शक्य होणार आहे. रोग निदान वेळेत केल्याने बाधीत पशुधनास वेळेत उपचार मिळतील आणि रोग प्रसारावर वेळेत नियंत्रण मिळवून पशुपालकाचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळावयास मदत मिळेल.

पर्यावरण व मानवी आरोग्य संरक्षणाच्या सुविधा
लाळखुरकुत, एव्हियन इन्फलुएंझा, अॅग्रॅक्स, ग्लँडर आदी रोग त्याचप्रमाणे पशुधनात नव्याने उद्भवणाऱ्या रोगांचे संक्रमण पशुधनातून मानवास होण्याची शक्यता असते. या रोगांच्या निदानासाठी नियंत्रित वातावरणाच्या प्रयोगशाळांची सुविधा उपलब्ध होणार आहे. जागतिक स्तरावरील विविध रोगांचा उद्गम प्राण्यामध्ये दिसून येतो. पर्यावरण व मानवी आरोग्य संरक्षणाच्या सुविधा व अत्याधुनिक उपकरणांनी अद्ययावत प्रयोगशाळेच्या वापरातून पशुरोग निदान चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळा
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ६१ कोटी २८ लाख रुपयाची तरतूद उपलब्ध करून पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेत आदर्श उत्पादन पद्धतीच्या मानकांचा (जी.एम.पी.) अवलंब करुन कुक्कुट व विषाणू लस उत्पादन प्रयोगशाळांची टर्न की आधारावर उभारणी करण्यात आली आहे.

या प्रकल्पामध्ये आदर्श उत्पादन पद्धतीच्या विविध मानकांचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रयोगशाळेतील वातावरण पूर्णपणे निर्जंतूक ठेवण्यात आले आहे. लस उत्पादनासाठी पोषक तापमानाचे नियमन करण्यात आले आहे. अंशतः स्वयंचलीत तत्वावर चालणारी अत्याधुनिक सयंत्रे व उपकरणे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. जेणेकरून उत्पादीत होणारी लस ही पूर्णपणे निर्जंतूक राहून लसीची गुणवत्ता उच्च प्रतीची असेल. प्रयोगशाळेतील सर्व कामकाज हे बिल्डींग मॅनेजमेंट सिस्टीम या केंद्रीय संगणक प्रणालीद्वारे नियंत्रित करण्याची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. कुक्कुट पक्ष्यातील मानमोडी, लासोटा, कोंबड्याची देवी, मरेक्स या तर शेळ्या-मेंढ्यातील देवी व पीपीआर या रोग देवी प्रतिबंधात्मक लसीचे उत्पादन घेण्यात येणार आहे.

या लसी अतिशय गुणवत्तापूर्ण होणार असल्याने शेतकऱ्यांकडील कोंबड्या आणि शेळ्या-मेंढ्यामध्ये संबंधित रोगाविरुध्द उच्च प्रतीची प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास मदत होईल, रोगप्रादूर्भाव रोखण्यास मदत होईल. त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ होण्यास व शेतकऱ्यांच्या आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होण्यास मदत होईल. या प्रयोगशाळाच्या उभारणीमुळे संस्थेत उत्पादित करण्यात येत असलेल्या कुक्कुट व शेळ्या-मेंढ्याच्या लसीच्या उत्पादनाची क्षमता ५ पटीने वाढून प्रतिवर्षी १२ कोटी ५० लाख लसमात्रा इतकी होणार आहे. उत्पादन क्षमतेमधील होणाऱ्या वाढीमुळे राज्याची लसींची गरज १०० टक्के भागून अतिरिक्त लसी राज्याबाहेर विक्रीसाठी उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.

चायना पीआर संघाने गतविजेत्या जपानला हरवले

0

चायना पीआर संघाने गतविजेत्या जपानला हरवले

पुणे :  चायना पीआर संघाने एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 फुटबॉल स्पर्धेत सर्वात सनसनाटी निकालाची नोंद करताना गतविजेत्या जपानचे आव्हान नियोजित आणि अतिरिक्त वेळेतील बरोबरीनंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये 4-3 गोलने संपुष्टात आणत अंतिम फेरीत प्रवेश केला.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झालेला उपांत्य फेरीचा सामना कमालीचा रंगला. अतिरिक्त वेळेनंतरही सामना 2-2 अशा बरोबरीत राहिला. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूट आऊटमध्ये चायना पीआर संघाने बाजी मारली. गोलरक्षक यु झु आणि कर्णधार वँग शानशान त्यांच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. चायना पीआर संघ आता नवव्या विजेतेपदापासून केवळ एक सामना दूर आहेत. जपान मात्र विजेतेपदाच्या हॅटट्रिकपासून वंचित राहिले.

जपानची सुरवात त्यांच्या लौकिकाप्रमाणे वेगवान झाली. त्यांनी पहिल्याच मिनिटाला हिनाटा मियाझावा हिने चायना पीआर संघाची गोलरक्षक यु झु हिच्या क्षमतेची कसोटी पाहण्यास सुरवात केली. मियाझावा हिच्या लांबवरून आलेल्या किकला अडवताना यु झु हिला आपले सर्वस्व पणाला लावावे लागले. पाठोपाठ जपानच्या रिको युएकी हिला गोल करण्याची सुवर्ण संधी साधता आली नाही. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला तिची किक बाहेर गेली. जपान आणि युएकीचे धारदार आक्रमण हे सुरवातीच्या खेळाचे आकर्षण ठरले होते. युएकीचा वेग कुठल्याही संघाच्या छातीत धडकी भरवणारा होता. जपानच्या रुका नोरीमात्सु हिने तिला सुरेख पास दिला. सहाव्या मिनिटाला मिळालेली ही संधीही वाया गेली. युएकीची किक गोलरक्षच यु झु हिने शिताफीने अडवली.

पहिल्या मिनिटापासून सुरु झालेला जपानाचा धडका पुढे वाढतच गेला. पयार्याने चायना पीआर संघावरील दडपण वाढत होते. युएकीचे आक्रमण कमी पजडले म्हणून जपानच्या साकी कुमागई आणि मना उवाबुची यांचेही सहा यार्डावरून गोल करण्याचे प्रयत्न फोल ठरले. जपानला 21 व्या मिनिटाला मिळालेली आणखी एक गोल करण्याची संधी गोलरक्षक यु झु हिने फोल ठरवली. हिनाटा मियाझावा हिच्या सुरेख पासवर पुन्हा एकदा युएकीने मारलेली किक यु झुने अडवली. या वेळी युएकीची दिशा योग्य होती, पण किकमध्ये तेवढा जोर नव्हता. गोलपोस्ट जवळ असल्याने त्याने किक काहिशी कमी वेगाने मारली. पण, यु झु हिने ती अचूक अडवली.

जपानला अखेर 26 व्या मिनिटाला चायना पीआरचा बचाव भेदण्याची संधी मिळाली. सामन्याच्या 26 व्या मिनिटासला पुन्हा एकदा हिनाटाकडून आलेला पास या वेळी युएकीने अफलातून हेडर करत सार्थ ठरवला. या वेळी यु झु हिचे प्रयत्न फोल ठरले. या गोल नंतर जपानच्या आक्रमणाला अधिकच धार आली. मध्यंतराला त्यांची आघाडी 1-0 अशी मर्यादित राहिली असली, तरी विश्रांतीपूर्वीच्या अखेरच्या मिनाटाला हिनाटाची जबरदस्त किक गोलपोस्टच्या अगदी जवळून बाहेर गेली.

गोल करण्याच्या संधी हुकल्यांची सल जपानला नक्कीच लागून राहिल. दुसऱ्या सत्राला सुरवात होत नाही, तो झिआओ युई हिने हिलेल्या सुरेख पासवर वु चेंगशू हिने गोल करून चायना पीआर संघाला बरोबरी साधून दिली. यानंतरही जपानचा धडाका काही थांबला नव्हता. तरी त्यांना आघाडी वाढवण्यात अपयश आले. हिनाटाचा आणखी एक प्रयत्न फोल ठरला. अपयशाने त्यांची पाठ सामन्याच्या अखेरच्या मिनिटापर्यंत सोडली नाही. सामन्याच्या  75 व्या मिनिटासला युएकीची किक बाहेर गेली. सामन्याच्या भरपाई वेळेतही युएकीचे प्रयत्न फोल ठरले. गोल करण्याच्या या अथक प्रयत्नांना जपानला 103 व्या मिनिटाला यश आले. युएकीनेच हा गोल करताना हासेगावा हिच्या फ्री-किकवर सुरेख गोल करून जपानला आघाडीवर नेले.

सामना येथेच संपला नाही. जपानच्या अथक प्रयत्नांना आज नशिबाची साथ नव्हती. युएकीचा हेडर द्वारे गोल करण्याचा आणखी एक प्रयत्न चायनान पीआरची गोलरक्षक यु झु हिने फोल ठरवला. सततच्या या अपयशाने जपानला निराश केले आणि परिणामी 119 व्या मिनिटाला त्यांना गोल स्विकारावा लागला. चायना पीआरची कर्णधार वँग  शानशान हिने झँग शिन हिचा पास सत्कारणी लावताना सुरेख गोल करत सामना टायब्रेकमध्ये नेला. संपूर्ण सामन्यात जपानच्या युएकी आणि हिनाटा यांच्या मध्ये चीनच्या भक्कम भिंतीप्रमाणे उभी राहिलेली गोलरक्षक यु झु हिने पेनल्टीमध्ये पहिली आणि पाचवी पेनल्टी अडवून चायना पीआर संघाला अंतिम फेरीत नेले. यापूर्वी आठवेळा विजेते असणाऱ्या चायना पीआर संघ 2008 नंतर प्रथमच अंतिम फेरीत पोचला आहे.

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी

0

मुंबई, दि. ४ :- कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने राज्य मंडळाच्या इ. दहावी व इ. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय प्रश्नपेढी विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रश्नपेढीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले.

मागील दोन वर्षात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. रिकाम्या जागा भरा, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न आदींच्या माध्यमातून परिक्षेचे स्वरूप कसे असेल हे विद्यार्थ्यांना लक्षात यावे, प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या सरावाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यादृष्टीने प्रश्नपेढी तयार करण्याची मागणी पालक संघटनांकडूनही सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर प्रश्नपेढी विकसित करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक ओझे कमी व्हावे यासाठी यावर्षी अभ्यासक्रम कमी करण्याबरोबरच परीक्षेची वेळ वाढवून देण्याचा निर्णयही मंडळामार्फत घेण्यात आला आहे.

परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्‍वास नक्कीच वाढेल, या हेतूने हे प्रश्‍नसंच तयार केले जात आहेत. या प्रश्नपेढ्या http://www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्रा.गायकवाड यांनी सांगितले.

…तर आणखी 17 जणांचा गेला असता जीव

0

पुणे-पुण्यातील येरवडा येथील शास्त्रीनगर परिसरात गुरुवारी रात्री एका बांधकाम सुरू असलेल्या मॉलचा लोखंडी स्लॅब कोसळून सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला. अन्य चार जण जखमी झाले असून, त्यातील तीन जण जीवन-मरणाच्या झोतात आहेत. वाचलेल्या मजुरांमध्ये 10 मिनिटांपूर्वी मृत झालेल्या मजुरांसोबत काम करणारे अनेक जण आहेत. हा अपघात काही वेळापूर्वी झाला असता तर आणखी 17 कामगार गाडले गेले असते आणि मृतांचा आकडा आणखी वाढला असता. आमच्या प्रियजनांना हे जग सोडून 12 तासांहून अधिक काळ झाला, परंतु त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी ना कंत्राटदार किंवा कंपनीतील कोणीही आलेला नाही, असा आरोप पीडितांनी केला आहे.

प्राथमिक तपासात हा मॉल बांधणाऱ्या कंपनीच्या अभियंत्यांचा निष्काळजीपणा समोर येत आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार कंपनीविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योग्यवेळी सापळा काढला असता तर अनेकांचे प्राण वाचू शकले असते, असे या अपघातातून बचावलेल्या मजुरांचे म्हणणे आहे. जाळीखाली अडकलेल्या मजुरांना आम्ही आमच्याकडे असलेल्या साधनांनी बाहेर काढले.

मृत्युमुखी पडलेले सर्व मजूर बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील रहिवासी होते. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मोहम्मद सोहेल अहमद, मोहम्मद मोबीन आलम, एमडी समीर, मसरूफ हुसेन आणि मुनीब आलम यांचा समावेश आहे. हे सर्वजण गेल्या एक वर्षापासून पुण्यात राहत होते. मजुरांच्या जखमा भरून काढत राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

या अपघातात आपला भाऊ सोहेल अहमद गमावलेला मोहम्मद अंजार म्हणाला, ‘मी माझ्या भावाशी शेवटची गोष्ट रात्री 10 वाजता बोलली होती. त्यानंतर आम्ही झोपणार होतो. त्यानंतर 11 वाजण्याच्या सुमारास फोन आला की भाऊ नाही राहिला. या ठिकाणी एकही अभियंता नव्हता, सुरक्षा नव्हती आणि पर्यवेक्षकही नव्हता. जाळीखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सुमारे एक तास लागला. आमची माणसे खाली गाडली गेली होती आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी कंपनीचा कोणताही कर्मचारी मदत करत नव्हता.

अपघातात आपला पुतण्या गमावलेला तहजीब आलम म्हणाला, “जर सापळा काढण्याचे काम घाईने केले असते तर या पाच जणांचा मृत्यू झाला नसता. जाळी काढण्यासाठी क्रेनचा वापर करायला हवा होता. कंपनीने कोणतीही मदत केलेली नाही.मोहम्मद अंजार पुढे म्हणाले, ‘यामध्ये सर्वात मोठी चूक इंजिनिअरची आहे. खांब बनवून काटेरी जाळी उभारली गेली असावी, त्याखाली खुर्चीचा वापर करण्यात आला असावा, मात्र त्यांनी लोखंडी पट्टीच्या साहाय्याने वेल्डिंग करून ही जाळी उभारली होती. यामुळेच हा अपघात झाला. 32 क्रमांकाचा बार कापण्यास वेळ लागणार होता.

मोहम्मद अंजार यांनी सांगितले की, दुर्घटनेच्या 10 मिनिटांपूर्वी बांधकामाच्या ठिकाणी 30 लोक काम करत होते. यातील 17 जण गोदामात बार आणि इतर बांधकाम साहित्य आणण्यासाठी गेले होते. हा अपघात काही वेळापूर्वी घडला असता तर त्यांनाही याचा फटका बसला असता आणि अनेकांचा मृत्यू झाला असता.

मृतदेह घरी पाठवण्याची व्यवस्था नाही
अपघातात आपले सहकारी गमावलेले अखिल राजा मूसाभाई म्हणाले, ‘आमच्या प्रियजनांचा मृत्यू झाला आहे, परंतु त्यांचे मृतदेह त्यांच्या घरी म्हणजेच बिहारमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली जात नाही. मृतांपैकी तिघे विवाहित होते. काहींना तीन तर काहींना दोन मुली आहेत. आता सर्वच अनाथ झाले असून त्यांच्या कुटुंबाला आधार देणारे कोणी नाही. विवाहित नसलेल्या दोन मजुरांचे वय 22 आणि 23 वर्षे होते. संपूर्ण कुटुंब चालवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. आमचे म्हणणे ऐकून किमान या गोरगरिबांच्या घरी मृतदेह पाठवण्याचे काम करावे, असे आवाहन आम्ही येथील सरकारला करतो.

पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले की, हा अपघात रात्री 10.45 ते 11 च्या दरम्यान झाला. आम्हाला मध्यरात्री याची माहिती मिळाली आणि रात्री गस्तीचे पथक सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. ही वाडिया ग्रुपची बांधकाम साइट आहे. येथे एक मॉल बांधला जात होता. ज्या स्टील फ्रेमवर्कखाली कामगार काम करत होते ते अचानक कोसळले आणि त्याखाली काम करणारे 10 कामगार त्यात गाडले गेले. त्यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी सुरक्षा निकषांकडे दुर्लक्ष करून हे काम केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. जे जखमी झाले आहेत किंवा जे घटनास्थळी उपस्थित होते त्यांचे जबाब घेऊन आम्ही गुन्हा नोंदवत आहोत.

पालिका अधिकाऱ्यांशीही बोललो आहोत. रात्री बांधकामासाठी वेगळी परवानगी घेतली होती का, याचाही तपास सुरू आहे. यामध्ये काही चूक आढळल्यास याप्रकरणी कडक कारवाई करण्यात येईल.

मजुरांना अमानुष वागणूक दिली – स्थानिक आमदार
स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट दिली.. कामगारांना अमानुष वागणूक दिल्याचे ते म्हणाले. त्यांना 24 तास काम करायला लावले जात होते. बांधकाम करताना निष्काळजीपणा झाला आहे, त्यामुळे या प्रकरणातील जबाबदारांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आगामी विधानसभा अधिवेशनात कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून कामगारांच्या सुरक्षेबाबत कठोर कायदे करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

शिवसेना पदाधिकाऱ्याची घरात घुसून हत्या; आधी तीन गोळ्या घातल्यानंतर कुऱ्हाडीने केले वार

0

यवतमाळ –जिल्ह्यातील भांबराजा येथील एका शिवसेना पदाधिकाऱ्याची निघ्रृण हत्या करण्यात आलीय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या सुनील डिरवे (Sunil Divare Shoot Dead) यांची राहत्या घरात घुसून तीन व्यक्तींनी हत्या केलीय. आधी डिवरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला नंतर कुऱ्हाडीने त्यांच्यावर वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. तीन अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून डिवरेंवर आधी तीन गोळ्या झाडल्या त्यानंतर कुऱ्हाडीने डिवरे यांच्यावर वार केले.

हा धक्कादायक घटनाक्रम गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घडलाय. ४० वर्षीय सुनील डिवरे हे स्थानिकांमध्ये अत्यंत लोकप्रिय लोकप्रितिनिधी होते. ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकही होते. डिवरे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी पंचक्रोशीमध्ये वाऱ्यासारखी परसली आणि त्यांच्या घराजवळ गर्दी जमा झाली.

पिंपळे गुरव येथील जलतरण तलाव 50 टक्के क्षमतेने 5 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुला

0

पुणे दि.4: पिंपळे गुरव येथील जलतरण तलाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्या सरावासाठी 2 फेब्रुवारीपासून खुला करण्यात आला आहे. त्याचबरोबर 5 फेब्रुवारीपासून 50 टक्के क्षमतेने सर्वांसाठी हा जलतरण तलाव खुला करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहाय्यक क्रीडा आयुक्त सुषमा शिंदे यांनी दिली.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने चालविण्यात येणारे सर्व जलतरण तलाव बंद ठेवण्यात आले होते. राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार जलतरण तलाव सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेचा पिंपळे गुरव जलतरण तलाव 50 टक्के क्षतजेने सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. जलतरण तलावावर कोरोनाचे सर्व नियम पाळून तसेच कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत याची खात्री करूनच प्रवेश देण्यात येईल, अशी माहितीही श्रीमती शिंदे यांनी दिली.
0000

भाजप आमदार नितेश राणे यांना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

0

जामिनासाठी अर्ज दाखल करणार

सिंधुदुर्ग-शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे हे दोन दिवसांपासून पोलिस कोठडीत आहेत. आता 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नितेश राणे यांचे वकील आज सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहेत. या याचिकेवर शनिवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले की, सुनावणीनंतर लगेचच पोलिसांना नितेश राणेंच्या कोठडीत वाढ करायची होती. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे. संतोष परब यांच्यावर हल्ला करण्यामागे काही आर्थिक व्यवहार होता का, याचाही शोध घ्यायचा आहे. त्यासाठी नितेश राणे यांना पोलिस तपासासाठी पुण्याला न्यावे लागणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या पोलिस कक्षाचा विस्तार करावा, असे सरकारी वकील म्हणाले.

तसेच नितेश राणे यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी मुख्य आरोपी सचिन सातपुते याला संतोष परब यांचा फोटो पाठवला होता. मात्र नितेश राणे ते मान्य करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे नितेश राणे यांना आठ दिवसांची पोलिस कोठडी हवी आहे, असेही सरकारी वकिलांनी सांगितले.

वीजमीटरचे १०० टक्के अचूक रीडिंग घ्या अन्यथा कठोर कारवाई अटळ

0

महावितरणचे अध्यक्ष श्री. विजय सिंघल यांचा इशारा

मुंबईदि. ०४ फेब्रुवारी २०२२: कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व महावितरणच्या महसुलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रिडींग घेण्यात हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीज विरुद्ध महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाईसोबतच संबंधित कर्मचाऱ्यांविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी दिला.

राज्यभरातील क्षेत्रीय प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंते, अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते आणि उपविभागीय अधिकारी यांचेसमवेत मुख्यालयातून आज व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे, कार्यकारी संचालक (देयके व महसूल) श्री. योगेश गडकरी उपस्थित होते. या बैठकीस महावितरणचे सुमारे ७०० अभियंता व अधिकारी उपस्थित होते.

महावितरणच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधताना अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल म्हणाले की, ग्राहकांनी वापरलेल्या युनिटप्रमाणेच वीजबिलाची आकारणी करण्याची जबाबदारी महावितरणची आहे. त्यासाठी फोटो मीटर रीडिंगसाठी स्वतंत्र मोबाईल अप तयार करण्यात आले आहे व रीडिंग घेण्याची प्रक्रिया सोपी व वेगवान केलेली आहे. प्रत्येक मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीजना चांगला मोबदला दिला जातो. तरीही मीटरचे चुकीचे रिडींग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा शेरा देणे आदी प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. असे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

श्री. विजय सिंघल म्हणाले, शहरी व ग्रामीण भागातील  सर्व ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग शंभर टक्के अचूकतेने घेतले पाहिजे. यामध्ये हयगय केल्यास महावितरणच्या महसुलाचे नुकसान होते. सोबतच बिल दुरूस्तीचा वीजग्राहकांना नाहक मनस्ताप व त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे केवळ एक नोटीस पाठवून रीडिंग एजन्सी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. या फेब्रुवारी महिन्यात १०० टक्के अचूक मीटर रिडींग घेण्यात अपयशी  ठरलेल्या सर्व संबंधितांविरूध्द  कारवाई करण्याचे निर्देशही श्री. सिंघल यांनी यावेळी दिले.

या बैठकीत संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी मीटर रीडिंगकडून होणाऱ्या चुका व सदोष रीडिंग टाळण्यासाठी उपाययोजना सांगितल्या. ते म्हणाले, राज्यातील प्रत्येक मीटर रिडींग एजन्सीच्या कामगिरीची नोंद माहिती व तंत्रज्ञानाच्या प्रणालीमध्ये घेण्यात येत आहेत. त्या आधारे तसेच दर महिन्याच्या चुकीच्या रीडिंगच्या सरासरीप्रमाणे संबंधित रीडिंग एजन्सीला आर्थिक दंड केला जाणार आहे. तरीही सुधारणा न झाल्यास फौजदारी कारवाईसह काळ्या यादीत टाकण्यात येईल व अशा एजन्सी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये पुन्हा काम मिळणार नाही असे श्री. संजय ताकसांडे यांनी स्पष्ट केले.