मुंबई -प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाले आहे. मुंबईत रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी जुहू येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला आहे. ते 69 वर्षांचे होते. बप्पी लाहिरी यांना संगीत क्षेत्रातील डिस्को किंग म्हटले जात होते. त्यांचे खरे नाव आलोकेश लाहिरी होते. बप्पी लाहिरी हे त्यांच्या संगीतासोबतच सोन्याचे दागिणे घालण्याच्या शैलीसाठी देखील ते ओळखले जात होते. 1980-90 च्या दशकात ते लोकप्रिय झाले होते. 2014 मध्ये पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती.
बप्पी लहरी यांना प्रकृतीविषयक अनेक त्रास सुरू होते. त्यांचा मृत्यू ओएसए म्हणजेच ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियामुळे मध्यरात्रीच्या सुमारास झाला, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. दीपक नामजोशी यांनी दिली.
मागील वर्षी बप्पी लहरी यांना करोना संसर्ग
दरम्यान, बप्पी लहरी यांना एप्रिल २०२१ मध्ये करोना संसर्गही झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
बप्पी लहरी कोण होते?
बप्पीदा यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ साली पश्चिम बंगालमध्ये झाला. वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी बॉलिवूमध्ये संगीत देण्यास सुरुवात केली. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगित देत त्यांनी करिअरची सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता वाढू लागली.
पुणे-छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून मातृ पितृ सन्मान शिकावा असे प्रतिपादन राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास वडघुले यांनी येथे केले.अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमहोत्सव सोहळ्याच्या तिसऱ्या सत्राच्या कार्यक्रमात लाल महाल, पुणे येथे आदर्श माता पित्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास वडघुले बोलत होते; शिवराय हा एक विचार आहे. या सर्वांगीण आदर्शवत असलेल्या शिवचरित्रातून आपण काय शिकावे तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवरायांनी त्यांच्या माता पित्यांचा केलेला आदर हा आजच्या काळात घेण्यासाठी सर्वात मोठा गुण आहे. बंगलोर वरून पत्नी आणि पुत्राच्या भेटीला आलेल्या शहाजी राजांचे आणि राष्ट्रमाता जिजाऊ या माता, पित्याचे जोडे डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून मातृ पितृ सन्मान शिकावा. आजच्या काळात एका बाजूला आधुनिकतेची कास धरत असतांना कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढत चाललेली दरी आपल्या कुटुंब व्यवस्थेला उधवस्त करते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा विपरीत परिस्थितीत कौटुंबिक संस्कार करून आदर्श पिढी घडविणाऱ्या माता पित्यांचा सन्मान आम्ही गेली अनेक वर्षे अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या माध्यमातून शिवजन्मोत्सवात करत आलो आहोत. देवाचीच रूपे असलेल्या या माय-बापांच्या सन्मानित करतांना आम्हाला अक्षरशः स्वर्गसुखाचा आनंद मिळत असतो अशी आमची भावना आहे. आज छत्रपती शिवराय आणि राष्ट्रमाता जिजाऊ असत्या तर त्यांनी आमच्या या उपक्रमासाठी आम्हाला निश्चितच शाबासकी दिली असती. या प्रसंगी आदर्श माता पिता विठ्ठल इंगवले -नंदाताई इंगवले, अनिल ताडगे- उज्वला ताडगे, बालमनी चिरमुल्ला-रामचंद्र चिरमुल्ला, अंकुश धगे- प्रभावती ढगे, उदय देसाई-आरती देसाई, अनिल वडघुले-छाया अनिल वडघुले, शेषराव ठोकरे- मंदाकिनी ठोकरे, श्रीमती सीताबाई कदम, वंदना नामदेव काशिद-नामदेव काशिद या माता पित्यांचा सन्मान करण्यात आला.
कोल्हापूर, दि.15: ‘सर्वांना घरे’ देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. कोल्हापूर शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा एकत्रित आराखडा लवकरात लवकर सादर करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी महानगरपालिकेच्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
शहरातील झोपडपट्टी धारकांना सातबारा देणे, झोपडपट्टीधारकांना पक्की घरे बांधून देण्याविषयी शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, करवीर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुदाम जाधव, तहसीलदार शीतल मुळे-भामरे, तहसीलदार सुनीता नेर्लीकर, महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक रामचंद्र महाजन, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत तसेच बांधकाम, नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कोल्हापूरातील राजेंद्रनगर, कसबा बावड्यातील मातंग वसाहत, संकपाळ नगर, दत्त मंदिर जवळील झोपडपट्टी, शिये पाणंद उलपे माळ, शुगर पाणंद (गोळीबार मैदान) तसेच शहरातील इतर ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचे प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषाप्रमाणे पुनर्वसन करण्याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी चर्चा केली. शहरातील सामान्य माणसांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजनेतून पक्की घरे देण्यासाठी प्रयत्नशील आहे. येथील झोपडपट्ट्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन व्हावे, यासाठी लागू नियमांमध्ये शिथिलता मिळण्याच्या दृष्टीने नगरविकास मंत्री व नगररचना विभागाच्या संचालकांसोबत बैठक घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी शहरातील झोपडपट्टी धारकांना ‘हक्काचे घर’ बांधून देण्याच्या दृष्टीने पुररेषा व अन्य बाबींचा विचार करुन अभ्यासपूर्ण अहवाल तयार करण्यात आला आहे. यानुषंगाने विविध विषयांवर पालकमंत्री श्री. पाटील यांनी अधिकारी व असोसिएशनच्या सदस्यांसोबत चर्चा केली.
परिख पूल परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गतीने उपाययोजना करा
परिख पूलाच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होते. या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गतीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.
यावेळी ते म्हणाले, परिख पुलाच्या ‘स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी’च्या अनुषंगाने सांडपाणी व्यवस्थापन व पावसाच्या पाण्याचा निचरा होवून वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर यांच्या तांत्रिक सल्ल्याने हा प्रश्न सोडवावा. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी च्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन, परिख पूलाशी संबंधित आवश्यक बाबींची माहिती दिली.
असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्यासह समिती सदस्यांनी परिख पूल सद्यस्थिती, आवश्यक बदल व अन्य अनुषंगिक बाबींची माहिती दिली.
मुंबई, दि. 15 : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र किंवा उपकेंद्र या पद्धतीने नियोजन करण्यात आले असून इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या 9613 तर इयत्ता दहावीसाठी परीक्षा केंद्रांची किंवा उपकेंद्रांची संख्या 21349 इतकी असेल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शालेय शिक्षण विभागाने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याने विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शाळांचे नियमित वर्ग न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुरूवातीस ऑनलाईन पद्धतीने व ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने नियमित वर्ग सुरू करण्यात आले. आता प्रचलित पद्धतीने राज्य मंडळाच्या परीक्षा होत असून बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरूवात देखील झाली आहे. प्रचलित पद्धतीने परीक्षा झाल्यास मुख्य परीक्षा केंद्रांची संख्या बारावीसाठी 2943 होती. तर, शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र यापद्धतीने नियोजन केल्याने बारावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या 9613 इतकी असणार आहे. प्रचलित पद्धतीने परीक्षा झाल्यास मुख्य परीक्षा केंद्रांची संख्या दहावीसाठी 5042 होती. तर, शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र यापद्धतीने नियोजन केल्याने दहावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या 21349 इतकी असेल. परीक्षेच्या नियोजनात बदल झाल्यामुळे बारावी आणि दहावीच्या परीक्षांसाठी अतिरिक्त परीक्षा उपकेंद्रांची संख्या 22969 इतकी असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन 15 किंवा त्यापेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास शाळा तेथे परीक्षा केंद्र अथवा उपकेंद्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारीत लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधीलच अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला असल्याने लेखी परीक्षेच्या 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे तर, लेखी परीक्षेच्या 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटे जादा वेळ देण्यात येणार आहे. इयत्ता बारावीसाठी किमान 40 टक्के प्रात्यक्षिकावर आधारित प्रात्यक्षिक परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून इयत्ता दहावीसाठी प्रात्यक्षिक प्रयोग/ गृहपाठावर आधारित मूल्यमापन करण्यात येत आहे. तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन व तत्सम मूल्यमापनात मूळ आराखडा विचारात घेऊन सुलभता ठेवण्यात येत आहे. इयत्ता बारावी व इयत्ता दहावी परीक्षेच्या प्रात्यक्षिक/ तोंडी/ अंतर्गत मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांना परीक्षापूर्व व परीक्षोत्तर संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधांबाबत शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय/ परीक्षा केंद्र/ परिरक्षक व संबंधित घटकांना विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आली आहे.
कोअर ऑफ सिग्नल्स ही भारतीय लष्कराची लढाऊ सहाय्यक शाखा आहे तसेच देशभरातील कठीण भूभागात तैनात भारतीय सैन्यासाठी माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान (ICT) मदत पुरवणारा विभाग आहे. कोअरचा 111 वा स्थापना दिन 15 फेब्रुवारी 2022 रोजी दक्षिण कमांडमधील सर्व सिग्नल युनिट्सद्वारे उत्साहात आणि कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.
लेफ्टनंट जनरल जे.एस. नैन, आर्मी कमांडर, सदर्न कमांड यांनी मेजर जनरल विवेक डोगरा, मुख्य सिग्नल अधिकारी ,सदर्न कमांड मुख्यालय आणि सर्व विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचारी तसेच टीम सदर्न स्टार्स सिग्नलर्सच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आणि राष्ट्र उभारणीसाठी त्यांच्या निस्वार्थी वृत्तीचे कौतुक केले. त्यांनी सिग्नलर्सची त्यांची अचूक दृष्टी, व्यावसायिक कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित परिचालन सक्षम करण्याच्या निर्धाराची प्रशंसा केली. दक्षिण कमांडला कोविड परिस्थितीत उद्भवणाऱ्या असंख्य आव्हानांवर मात करण्यास सक्षम बनवण्यासाठी कोअरच्या सर्व तुकड्यानी दळणवळण सहाय्य प्रदान केल्याबद्दल तसेच नाविन्यपूर्ण टेलि आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन्सचा अवलंब करण्यात मदत करून महामारीचा सामना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल प्रशंसा केली.
त्यांच्या स्थापना दिनानिमित्त, सदर्न स्टार सिग्नल्सने अनेक उपक्रम आयोजित करून आपल्या अष्टपैलुत्वाचे दर्शन घडवले. यातून त्यांच्या त्यांची व्यावसायिकता दिसून येते. आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट पुणे येथील उत्कृष्ट खेळाडूंशी संवाद, पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर खडकीच्या धाडसी जवानांचा सत्कार आणि स्थानिक अनाथाश्रमाला मदतीचा हात यांचा यात समावेश आहे. स्थापना दिन उपक्रमांचा एक भाग म्हणून तयार संदर्भासाठी पुणे आणि आसपासच्या इंटरसिटी ट्रेकिंग स्थळांचे अनोखे संकलन देखील तयार करण्यात आले आहे. 13 फेब्रुवारी 22 रोजी एक साहसी शिबिर आयोजित करण्यात आले होते ज्यात सायकल राइड आणि तिकोना किल्ल्यावर ट्रेकिंगचा समावेश होता.
सर्व अधिकारी , माजी सैनिक , नागरी कर्मचारी आणि सिग्नलच्या कुटुंबियांचे अभिनंदन करताना, आर्मी कमांडर म्हणाले की कोअर ऑफ सिग्नल्स “तीव्र चौकस” या बोधवाक्यासह राष्ट्र उभारणीसाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान यापुढेही देत राहील. !
पुणे, ता. १५ : चित्रपट आणि नाट्यनिर्मितीच्या शास्त्रशुद्ध आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) वतीने ‘भरतसृष्टी’ प्रकल्पाअंतर्गत ‘बी. व्होक फिल्ममेकिंग अँड ड्रामॅटिक्स’ हा या विषयातील देशातील पहिला वैकल्पिक (व्होकेशनल) पदवी अभ्यासक्रम जून २०२२ पासून सुरू करणार असल्याची घोषणा डीईएसच्या परिषद आणि नियामक मंडळाचे उपाध्यक्ष महेश आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.
डीईएसचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रमोद रावत, प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, उपप्राचार्य डॉ. आशीष पुराणीक, अभिनेते शरद पोंक्षे, योगेश सोमण, समन्वयक प्रशांत गोखले, माध्यमकर्मी गिरीश केमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्या पुरोहित म्हणाल्या, ‘या तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता दिली आहे. यूजीसीच्या वैकल्पिक अभ्यासक्रम धोरणानुसार सहा महिन्यांनंतर प्रमाणपत्र, एक वर्षानंतर पदविका, दोन वर्षांनंतर प्रगत पदविका आणि तीन वर्षांनंतर पदवी प्रदान केली जाणार आहे. कोणत्याही शाखेची बारावीची परीक्षा किंवा १०+२ समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतील. प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. पहिल्या वर्षी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. https://www.bmcc.ac.in/?page_id=4252 या वेबपेजवर सर्व माहिती उपलब्ध आहे.
पोंक्षे म्हणाले, ‘सिनेमा आणि नाट्य निर्मितीचे एकाच ठिकाणी प्रशिक्षण देणारा हा पहिलाच अभ्यासक्रम असेल. या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक आहे. त्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाईल. तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. प्रत्यक्ष काम केल्याशिवाय आणि प्रचंड कष्टाशिवाय यश मिळत नाही. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना वर्गातील शिक्षणाबरोबर विविध प्रकल्पांद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचा प्रयोग निश्चित यशस्वी होईल.’
सोमण म्हणाले, ‘या अभ्यासक्रमात चित्रपट नाट्यनिर्मिती बरोबरच पटकथालेखन्, दिग्दर्शन, छायांकन, संकलन, ध्वनी, प्रकाश योजना, निर्मिती, व्यवस्थापन आणि अभिनय यापैकी कोणत्याही एका क्षेत्रात प्रावीण्य मिळवता येईल. केवळ ग्लॅमर आणि पैशासाठी विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात येऊ नये. सिनेनाट्य सृष्टीचा ध्यास घेऊन या क्षेत्रातील नवीन ज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. त्यासाठी हा पदवी अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकेल.’
भरतसृष्टी प्रकल्प
बीएमसीसीच्या आवारात १५ हजार चौरस फूट जागेवर भरतसृष्टी हा प्रकल्प साकारला जात आहे. स्वरलता हा ध्वनीमुद्रण स्टुडिओ तर स्वरांकन या नियंत्रण कक्षामध्ये ध्वनी संस्करण करण्यात येणार आहे. विश्वदर्शन या मोठ्या स्टुडिओत विद्यार्थ्यांना आभासी विश्व निर्माण करता येणार आहे. संगीत रंगभूमीची परंपरा चालविणारे गंधर्व मंडळी आणि दादासाहेब तोरणे यांचे नाते जपणारे सरस्वती सिनेटोन हे कलादालन साकरण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके आणि ग.दि. मा. दालनांमधून चित्रपटसृष्टीचा वसा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अयोध्येचा राजा ह्या पहिल्या मराठी बोलपटाशी नाते जपणारे प्रेक्षागृह उभारण्यात येणार आहे. गुरुदत्त, राजा परांजपे, राजदत्त, राज कपूर अशा अनेक दिग्गज दिग्दर्शकांशी नाते जोडणारे गुरुराज कक्ष येथे असणार आहे. आपल्या परंपरांशी नाथ बांधून यंत्रणांशी सुसज्ज अशा भरतसृष्टीत व्हर्चुअल रिअलिटीमध्ये जगणार्या नव्या पिढीला चित्रपट-नाटक परंपरांची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. ही माहिती माध्यमकर्मी गिरीश केमकर यांनी दिली.
ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विक्रम गोखले, लेखक-रंगकर्मी अभिराम भडकमकर, ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे, योगेश सोमण, चिन्मयी सुमीत, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, प्रवीण तरडे, सचिन वाघ, दिग्पाल लांजेकर यांचा अभ्यास मंडळात समावेश आहे.
पुणे-रिक्षा चालकांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असताना ते सोडविण्याऐवजी त्यात आणखीन भर घालण्याचे काम राज्य व केंद्र सरकार करत आहे. बेकायदेशीर दुचाकी आणून रिक्षा चालकांच्या संकटात आणखीन भर घालण्याचे काम सरकारने केले आहे. तीन चाकाच्या सरकारचे रिक्षा चालकाकांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केला. तर केंद्र सरकार ओला, उबेर, भांडवलदार कंपन्यांना पाठीशी घालत असल्याचेही बाबा कांबळे म्हणाले.बेकायदेशीर दुचाकी बंद करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी पुणे व पिंपरीतील रिक्षा चालक मालकांनी पुणे आरटीओ कार्यालवर आंदोलन छेडले. सकाळी दहा वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या वेळी बाबा कांबळे बोलत होते,
रिक्षा चालकांच्या प्रश्नासाठी पुणे शहरातील सर्व संघटना पुणे येथे एकत्र,आल्या , मुळे २५ हजार रिक्षाचालक मालकांना एकत्र येऊन हा मोर्चा काढला पुणे आरटीओ समोर भव्य मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात आले,
” ट्रान्सफर कमिटीमध्ये ओला उबेर मधील टू व्हीलर बंद करण्याचा ठराव पारित करून या वरती ताबडतोब बंदी आणून ओला उबेर मधून टू व्हीलर बुकिंग केले जाणार नाही याची व्यवस्था केली जाईल,पुणे सायबर क्राईम ब्रँच यांच्यासोबत विभागाची बैठक सुरू असून कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने टू व्हीलर वाहतुकीबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून याबाबत कायदेशीर बाकीचा तपास केला जात आहे, मुक्त परवाना बंद करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला असून लवकरच मुक्त परवाना बंद होईल,, आश्वासन पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी मोर्चासमोर येऊन दिले,येत्या दोन दिवसात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करून लाखोच्या संख्येने एकत्र येऊन चक्काजाम करू असा इशारा देखील यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबासाहेब कांबळे , महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना किशोर चिंतामणी ,आम आदमी रिक्षा संघटना श्रीकांत आचार्य सल्लागा,संजय कवडे, पुणे शहर जिल्हा वाहतूक सेवा संघटना४ अंकुश नवले भाजपा वाहतूक आघाडी,फारुख बागवाले आशीर्वाद रिक्षा संघटना .अजिंक्य रिक्षा संघटना नितीन भुजबळ आदी प्रमुख संघटना यावेळी उपस्थित झाले होते, याप्रमाणे अंदाजे 22 रिक्षा संघटनांचा पाठिंबा मिळाला व या संघटना देखील सहभागी झाल्यात होत्या,
बाबा कांबळे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड पुणे शहरामध्ये बेकायदेशीरपणे दुचाकी सुरु असून ओला उबेरच्या या बेकायदेशीर ॲप मुळे रिक्षा व्यवसायावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला आहे. रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधामध्ये रिक्षा चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्याच्याच निषेधार्थ काही संघटनांनी बेमुदत रिक्षा बंदची हाक दिली. मात्र ही हाक म्हणजे अत्यंत चुकीची आहे. कोविडमुळे अगोदरच त्रस्त व मेटाकुटीला आलेल्या रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. रिक्षा चालकांचे हप्ते थकले असून त्यांना हप्ते भरणे ही अवघड झाले आहे. आपला उदरनिर्वाह कसा करायचा, मुलांचे शिक्षण, शाळा, महाविद्यालयाच्या फी अशा असंख्य प्रश्नांनी रिक्षा चालक त्रस्त आहेत. या परिस्थितीमध्ये रिक्षा बंद करून परत त्यांना आर्थिक फटका बसेल, असे बाबा कांबळे म्हणाले. केंद्र व राज्य सरकार हे गरिबांना एकमेकांमध्ये भांडवत आहे. उद्योजकांना मदत करत आहे. रिक्षा चालकांवरती अन्याय करत आहे. यामुळे बेकायदेशीर दुचाकी बंद झाली पाहिजे. रिक्षाचालक मालकांचे कल्याणकारी मंडळ स्थापन झाले पाहिजे. वाढिव दंड रद्द झाला पाहिजे. मुक्त रिक्षा परवाना बंद झाला पाहिजे. यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.
पुणे-कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दि. २२ मार्च २०२० रोजी शासनाने पहिला लॉकडाऊन घोषित केला. पहिला लॉकडाऊन घोषित केल्यानंतर पीएमपीएमएल बस संचलन अत्यावश्यक सेवा वगळता दि. २ सप्टेंबर २०२० पर्यंत पूर्णपणे बंद होते. निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता आल्यानंतर दि. ३ सप्टेंबर २०२० पासून पीएमपीएमएलची बससेवा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर दि. ३ एप्रिल २०२१ ते माहे मे २०२१ या कालावधीत पीएमपीएमएलला पुन्हा बस संचलन पूर्णपणे बंद ठेवावे लागले. दोन्ही लॉकडाऊन नंतर पीएमपीएमएल कडून कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळून बस संचलन सुरु करण्यात आले होते. पीएमपीएमएलची बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे असे वाटत असतानाच ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू लागल्याने दि. १० जानेवारी २०२२ पासून शासन निर्देशानुसार शाळा, कॉलेज बंद करण्यात आले तसेच निर्बंधही कडक करण्यात आले. त्यामुळे बस संचलनात पुन्हा कपात कपात करावी लागली. मात्र आता ओमिक्रॉनमुळे घालण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आल्याने व एकंदरीत जनजीवन पूर्वपदावर येत असल्याने पीएमपीएमएलची वाटचाल पहिल्या लॉकडाऊन पूर्वी असलेल्या दैनंदिन प्रवासी संख्येकडे व दैनंदिन उत्पन्नाकडे होऊ लागलेली आहे. लॉकडाऊन पूर्वी असलेली दैनंदिन प्रवासी संख्या व दैनंदिन उत्पन्न मिळवण्यासाठी पीएमपीएमएल प्रयत्नशील आहे. लॉकडाऊनपूर्वी दि. २४ फेब्रुवारी २०२० रोजी पीएमपीएमएलला १ कोटी ५० लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर म्हणजेच जवळपास २ वर्षांनी पीएमपीएमएलची दैनंदिन प्रवाशी संख्या ९ लाखांपर्यंत पोहोचली असून दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी एकूण १५४७ इतक्या बसेस संचलनात होत्या. तसेच या दिवशी महामंडळाला १ कोटी ५० लाख २२ हजार ३२६ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. प्रवाशांच्या सेवेत असलेल्या रातराणी, पुणे दर्शन व महिलांसाठी खास तेजस्विनी बससेवा या सर्व सेवा पूर्ववत सुरु करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊन नंतर प्रवाशी पीएमपीएमएल बस प्रवासाला प्राधान्य देत असून यामुळे दैनंदिन प्रवाशी संख्येसह दैनंदिन उत्पन्नात वाढ होऊन पीएमपीएमएलची बससेवा पूर्वपदावर येत आहे. पीएमपीएमएलची दैनंदिन प्रवासी संख्या ९ लाखांपर्यंत पोहोचली असून दैनंदिन उत्पन्नाच्या बाबतीत रुपये १ कोटी ५० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या पीएमपीएमएलच्या दररोज सुमारे १५४० पेक्षा जास्त बसेस मार्गावर संचलनात आहेत. जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी पीएमपीएमएल च्या बससेवेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
पुणे, दि. 15 :- पंजाबमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र, ‘सीआरपीएफ’ जवान अशोक इंगवले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. “तीन वर्षांपूर्वी १७ फेब्रुवारी २०१९ ला माझी आणि अशोकची भेट झाली होती. त्यावेळी त्याने पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांबद्दलच्या आठवणी सांगितल्या होत्या. त्याच्यासोबतची ती भेट आजही स्मरणात आहे. आज अशोकला वीरमरण आल्याचे समजून धक्का बसला व अतीव दुःख झाले. त्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
महाराष्ट्राच्या मातीला शौर्याची, धैर्याची, पराक्रमाची, बलिदानाची गौरवशाली परंपरा आहे. देशसेवेची ही परंपरा कायम राखत वीर जवान अशोक इंगवले यांनी देशाची एकता, अखंडता आणि लोकशाहीचे रक्षण करत असताना प्राणार्पण केले. देशाची सेवा बजावताना त्यांनी केलेल्या त्यागास, बारामतीच्या वीर सुपुत्रास सलाम,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीर जवान अशोक इंगवले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
पुणे दि.१५ : सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर होत आहेत. असे असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५०% आरक्षण प्राप्त झाले आहे. असे असले तरी महिला शासकीय स्तरावर, सामाजिक व आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने वेळोवेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, युवासेनाप्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पुण्यात दि. १७ फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी ४ ते सायं ७ यावेळेत अंबर हॉल, कोथरूड, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील शिबिराचे उद्घाटन शिवसेना उपनेत्या मीना कांबळी यांच्या हस्ते तर अध्यक्ष शिवसेना उपनेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे हे असणार आहेत. याशिबिरात संपर्कप्रमुख सचिन अहिर (दृक्श्राव्य माध्यमाद्वारे) शिवसेनेचे उपनेते शशिकांत सुतार, विशाखा राऊत, महिला संपर्कसंघटक तृष्णा विश्वासराव, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, युवासेना सक्रिय सदस्या तथा राज्य महिला आयोग सदस्य कु.सुप्रदा फातर्फेकर, युवासेना विस्तारक सूरज दामरे हे संघटनेच्या संदर्भात त्याचबरोबर महानगरपालिका निवडणूक, निवडणुकीत मतदारांशी संवाद, रोजगाराच्या संधी, नवीन उद्योग आणि व्यावसायिक उभारणी संदर्भात याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
या शिबिरास महिला पदाधिकारी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे नियोजन महिला शहर समन्वयक निर्मला केंडे, राधिका हरिश्चंद्रे, शहरसंघटक सविता मते, संगीता ठोसर, कल्पना थोरवे, पल्लवी जावळे, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, मनपा गटनेते पृथ्वीराज सुतार, युवासेना सहसचिव किरण साळी यांनी केले आहे.
पुणे : कोविड काळात बॅरिकेटिंग करुन शहरातील विविध भाग बंद केले, याला विरोध न करता गणेशोत्सव मंडळांनी देखील सहकार्य केले. त्यामुळे पुण्याचा अभिमान वाटतो. कोविड काळात केलेले काम हे आमचे कर्तव्यच आहे. प्रामाणिकपणे काम करणे आणि ते इतरांमध्ये रुजविण्याचा मी प्रयत्न केला, असे मत पुण्याचे सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी व्यक्त केले.
पुण्यातील अष्टविनायक गणपती मंडळांच्या वतीने सहपोलीस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांचा कोविड काळात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल तसेच त्यांची पोलीस महानिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल तुळशीबाग गणपती मंडळासमोर सन्मान करण्यात आला. यावेळी श्री कसबा गणपती सार्वजनिक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्री तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीम मंडळाचे प्रतिनिधी, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विकास पवार, उपाध्यक्ष विनायक कदम, कोषाध्यक्ष नितीन पंडित, केसरीवाडा गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे अनिल सकपाळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे संजय जावळे, अखिल मंडई मंडळाचे खजिनदार संजय मते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, फळांची परडी, उपरणे असे सन्मानाचे स्वरुप होते.
डॉ.रवींद्र शिसवे म्हणाले, माझ्या कामाच्या प्रवासातील पुण्याची तीन वर्षे चांगली होती. गणेशोत्सव मंडळांनी केलेला हा सन्मान मला संघर्षासाठी उर्जा निर्माण करणारा आहे. यापुढे देखील असेच सहकार्य मला गणेशोत्सव मंडळांकडून मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
श्रीकांत शेटे म्हणाले, कणखर व संयमीवृत्तीने योग्य नियोजन करणारे डॉ.रवींद्र शिसवे यांचे व्यक्तिमत्व आहे. गणेशोत्सवात आॅनलाईन पद्धतीने दर्शन कशा प्रकारे भक्तांना मिळेल, याचे मार्गदर्शन त्यांनी मंडळांना केले. यामुळे महाराष्ट्रासमोर आदर्श गणेशोत्सव कसा असावा, याचे उदाहरण ठेवले.
महेश सूर्यवंशी म्हणाले, कोविड काळात पोलीस आणि महानगरपालिकेने मोठी प्रशासकीय जबाबदारी पार पडली. महापालिकेने आखून दिलेल्या नियोजनानुसार पोलिसांनी त्याची अंमलबजावणी केली. कोविडचे संकट वाढू नये म्हणून पोलिसांनी रस्ते बंद करुन झोन तयार करण्याचे योग्य नियोजन केले. त्यात डॉ.रवींद्र शिसवे यांचा मोठा वाटा होता. तसेच गणेशोत्सव चांगुलपणाची स्पर्धा करीत साधेपणाने साजरे करुया, ही संकल्पना देखील त्यांनी राबविली,या असेही त्यांनी सांगितले. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.
भारतातील आणि परदेशातील चित्रपट निर्माते आणि चित्रपटसृष्टी ज्याची अत्यंत आतुरतेने प्रतीक्षा करत असतात असा माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला 17वा, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF-2022) 29 मे ते 4 जून, 2022 या कालावधीत फिल्म्स डिव्हिजन विभागाच्या मुंबई येथील संकुलात आयोजित केला जाणार आहे. 15 फेब्रुवारी 2022 ते 15 मार्च 2022 पर्यंत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया स्वीकारल्या जातील आणि चित्रपट निर्माते विविध स्पर्धा श्रेणींमध्ये आपले चित्रपट प्रविष्ट करण्यासाठी www.miff.in किंवा https://filmfreeway.com/MumbaiInternationalFilmFestival-MIFF या संकेतस्थळावर लॉग इन करू शकतील.
1 सप्टेंबर 2019 आणि 31 डिसेंबर 2021 दरम्यान पूर्ण झालेले चित्रपट मिफ्फ महोत्सवामध्ये (MIFF-2022) प्रवेशासाठी पात्र आहेत. महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपटाला सुवर्णशंख आणि 10 लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाईल. विविध श्रेणींमध्ये विजेत्या चित्रपटांना रोख रक्कम, रौप्य शंख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्रे दिली जातील. भारत “आझादी का अमृत महोत्सव” साजरा करत असल्यामुळे, यंदाच्या महोत्सवात India@75 या संकल्पनेवर आधारीत सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी विशेष पुरस्काराची घोषणा केली आहे. या महोत्सवामध्ये भारतातील नाॅन फीचर फिल्म क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तिमत्वाचा रोख रु. 10 लाख, स्मरणचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन प्रतिष्ठित व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला जाईल.
दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि नाॅन फीचर फिल्म असलेल्या चित्रपटांसाठीचा सर्वात मोठा महोत्सव, मिफ्फ माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागतर्फे आयोजित केला जात असतो आणि त्यात महाराष्ट्र सरकार सहभागी होते. हा चित्रपट महोत्सव जगभरातील निर्मात्यांसाठी एक पर्वणीच असते. स्पर्धा आणि बिगर-स्पर्धा विभागांव्यतिरिक्त, कार्यशाळा, तज्ञांचे मार्गदर्शन, खुला मंच आणि बीटूबी (B2B) सत्रांसारखी परस्परसंवादी सत्रे ही महोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
2020 मध्ये आयोजित, 16 व्या द्वैवार्षिक मिफ्फ महोत्सवाला अतिशय उत्साहात प्रतिसाद मिळाला होता, ज्यातून भारत आणि जगातील विविधरंगी समृध्द माहितीपट संस्कृती प्रदर्शित झाली होती. 16 व्या मिफ्फला (M8FF) भारत आणि परदेशातून विक्रमी 871 प्रवेशिका आल्या होत्या आणि भारत आणि जगाच्या इतर भागातून अनेक प्रमुख माहितीपट, ॲनिमेशन आणि लघुपट निर्मात्यांनी त्याला हजेरी लावली होती. ग्रँड ज्युरीमध्ये फ्रान्स, जपान, सिंगापूर, कॅनडा, बल्गेरिया आणि भारतातील प्रसिद्ध चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्त्वांचा त्यात समावेश होता.
अधिक माहितीसाठी महोत्सव संचालनालयाशी +91-22-23522252 / 23533275 आणि miffindia@gmail.com वर संपर्क साधता येईल.
मुंबई, दि. १५फेब्रुवारी २०२२:महावितरणने वीजग्राहकांकडील मीटरचे रीडिंग अचूक होण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये चुकीचे मीटर रीडिंग घेऊन महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या तसेच वीजबिल दुरूस्तीसाठी ग्राहकांना नाहक त्रास, मनस्ताप देणार्या राज्यातील सहा मीटर रीडिंग एजन्सीना महावितरणकडून बडतर्फ करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील २ तसेच औरंगाबाद, वसई, नांदेड व अकोला येथील प्रत्येकी एक अशा सहामीटर रीडिंग एजन्सीजविरुद्ध गेल्या चार दिवसांमध्ये थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे.
उर्जा मंत्रीनितीन राऊत यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे असे निर्देश दिले होते.त्यानुषंगाने महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दि. १ फेब्रुवारीला राज्यभरातील मीटर रीडिंग एजन्सीसोबत व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे थेट संवाद साधला होता. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व महावितरणच्या महसूलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रीडिंग घेण्यात हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सी विरुद्ध महसूलाचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई सोबतच एजन्सी व संबंधित कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी काळ्या यादीत टाकण्याची कठोर कारवाई करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता.
एजन्सीने केलेल्या मीटर रिडींगची पडताळणी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या पडताळणीमध्ये बारामती परिमंडलमधील परिमल एंटरप्रायजेस, पांडरे ता. बारामती (सासवड विभाग) व गणेश एंटरप्रायजेस, सादलगाव ता. शिरूर (केडगाव विभाग), कल्याण परिमंडलमधील सुप्रीम पॉवर सर्व्हीसेस, अंधेरी (वसई विभाग), नांदेड परिमंडलमधील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल, दहेली ता. किनवट (भोकर विभाग), औरंगाबाद परिमंडलमधील नंदिनी एंटरप्रायजेस (औरंगाबाद शहर विभाग २) आणि अकोला परिमंडलमधील अजिंक्य महिला बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था (अकोला शहर विभाग) या सहा एजन्सीद्वारे सुरु असलेल्या मीटर रीडिंगच्या कामात कुचराई होत असल्याचे आढळून आले. परिणामी या एजन्सी विरुद्ध थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु आहे.
या बडतर्फ एजन्सीकडून वीज मीटरचे चुकीचे रिडींग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा हेतुपुरस्सर शेरा देणे, महावितरणला अचूक रीडिंग घेत असल्याची खोटी माहिती देणे आदी प्रकार होत असल्याचे दिसून आले. यामुळे महावितरणच्या महसुली नुकसानीसोबतच वीजग्राहकांना देखील चुकीच्या वीजबिलांच्या दुरूस्तीसाठी मनस्ताप व त्रास झाल्याचे दिसून आले. त्याची गांर्भियाने दखल घेत याआधीच दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे महावितरणकडून मीटर रीडींग एजन्सीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे.तसेच इतर कंत्राटदारांना कामात कुचराई केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, दि. 15 : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निरा देवघर प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे तसेच, नीरा देवघरमधील ज्या पात्र प्रकल्पग्रस्तांनी सन २००८ मध्ये ६५ टक्के रक्कम भरली आहे त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. मंत्रालयातील दालनात नीरा देवघर प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक झाली. या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री श्री.वडेट्टीवार बोलत होते. आमदार संग्राम थोपटे, मदत व पुनर्वसनचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, उपसचिव धनंजय नायक, उपसचिव संजय धारूलकर, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, दूरदृश्यप्रणालीद्वारे अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्थेचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. मदत व पुनर्वसन मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, नीरा देवघर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित आहेत. २००८ मध्ये तत्कालीन मंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार ज्या पात्र प्रकल्पग्रस्तांनी ६५ टक्के रक्कम भरणा केली आहे अशा प्रकल्पबाधीतांचा प्रस्ताव शासनाकडे आठवड्याच्या आत सादर करावा. तसेच उर्वरीत पात्र प्रकल्पग्रस्तांची माहितीही सादर करण्यात यावी. पुनर्वसित गावठाणातील १८ नागरी सुविधा पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. ज्या प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करण्यात आलेले नाही त्यांच्या पर्यायी जमिन वाटपाचीही कार्यवाही तातडीने करावी. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पुनर्वसीत गावठाण मौजे मिरगावमध्ये प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या घराबाबतच्या प्रश्नाबाबत संवेदनशीलपणे कार्यवाही करण्यात यावी यामध्ये दोषी आढळणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्यात यावी. असे निर्देशही श्री.वडेट्टीवार यांनी दिले.
आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत पुरंदर तालुक्याचा प्रस्ताव सादर करावा
जुलै २०१९ व २०२० मध्ये पुरंदर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नदीपात्रालगतच्या शेतजमिनी व शासकीय मालमत्तांचे नुकसान झालेले आहे. तरी भविष्यात अशा प्रकारच्या आपत्तीमुळे नुकसान होवू नये यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी पुरंदर तालुक्यातील नदीपात्रालगतच्या पूरक्षेत्रातील गावांचे आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पातंर्गत प्रस्ताव सादर करावेत अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी बैठकीत दिल्या. या बैठकीला आमदार संजय जगताप उपस्थित होते.
पवना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिन वाटपाबाबतही न्यायालयाच्या निर्णयानंतर याबाबतीत माहिती घेवून हा प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.
मुंबई, दि. 15 :- महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार असून दि. 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन उपस्थित) उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, विधानपरिषद आणि विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे सदस्य वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, विधानमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते.
सन 2022-23 या वर्षाचा अर्थ संकल्प दि. 11 मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधकारक आहे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.