पुणे दि. 22: भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारक व पात्र उमेदवार निवडीसाठी छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी विहीत अर्हता धारक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा विभागाच्या https:///andrecordsrecruitment२०२१.in व https://mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर ९ डिसेंबर ते ३१डिसेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली होती.
३१ डिसेंबर २०२१ अखेर ऑनलाईन स्वरुपात स्विकारण्यात आलेल्या एकूण ७६ हजार ३७९ अर्जाचा डाटा विभागाकडे प्राप्त झाला आहे. डाटाची छाननी केल्यानंतर शैक्षणिक अर्हता धारण करीत नसलेल्या उमेदवारांनी अर्ज भरल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर एकाच विभागातून एकच अर्ज भरणे आवश्यक असताना काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याचे आढळले तसेच छायाचित्र व स्वाक्षरी देखील चुकीच्या पद्धतीने अपलोड केल्याचे दिसून आले.
विभागाने ऑनलाईन अर्ज स्विकृतीद्वारे प्राप्त अर्जामधुन अर्हता धारण करणारे व पात्र उमेदवार निवडीसाठी छाननी अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासंदर्भातील सविस्तर सुचना विभागाच्या https://mahabhumi.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
छाननी अर्ज ९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत अर्ज भरलेल्या उमेदवारांनाच भरता येतील. या उमेदवारांनी आपले विहीत शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्याचे प्रमाणपत्र छाननी अर्जामध्ये अपलोड करावयाचे आहे. तसेच जे उमेदवार विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणार नाहीत अशा उमेदवारांना परिक्षेस बसण्यास अपात्र ठरविण्यात येईल. छाननी अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात योग्य ती माहिती भरल्यानंतर त्यांच्या सदर अधिकृत बँक खात्यामध्ये भरलेल्या शुल्काचा परतावा करण्यात येणार आहे. याबाबत सर्व उमेदवारांनी सहकार्य करावे, असे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख एन. के. सुधांशु यांनी कळविले आहे.
पुणे दि. 22: गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचे मुख्य कार्यालय पुणे येथे स्थापन करण्याबाबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी निर्देश दिले आहेत. कार्यालयासाठी सर्व सोईसुविधायुक्त खासगी इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त श्रीमती संगिता डावखर यांनी केले आहे.
पुणे शहरामध्ये गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे मुख्य कार्यालय तातडीने सुरू करण्यात येणार आहे. या कार्यालयासाठीच्या इमारतींमध्ये सुर्व सुविधा आवश्यक असून वीज, पाणी, शौचालय, बाथरुम आदी सुविधा आवश्यक आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे यांच्या शासकीय दरानुसार इमारत भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या इच्छुक इमारत मालकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन स.नं.104/105, विश्रांतवाडी रोड, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे (दूरध्वनी 020-29706611) येथे संपर्क साधावा.
पुणे, दि. २२: भारत निवडणूक आयोगाने २०२२ च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. स्पर्धांसाठी १५ मार्च २०२२ पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत. स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
‘स्वीप’ कार्यक्रमाअंतर्गत ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत ५ प्रकारच्या स्पर्धा होत आहेत. यामध्ये प्रश्नमंजूषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तीचित्र स्पर्धांचा समावेश आहे.
व्हिडिओ, गाणे आणि घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रवेशिका भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीनुसार कोणत्याही अधिकृत भाषेत दिल्या जाऊ शकतात.
संस्थात्मक श्रेणी, व्यावसायिक श्रेणी आणि हौशी श्रेणी अशा तीन श्रेणींमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे. संस्थात्मक श्रेणीमध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा केंद्र किंवा राज्य सरकारच्या संबंधित कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थांना या संस्थात्मक श्रेणीमध्ये भाग घेता येईल. व्यावसायिक श्रेणीमध्ये गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र किंवा यासंबधी एखादे काम हा ज्या व्यक्तीचा उदरनिर्वाहाचा मुख्य स्त्रोत आहे अशी व्यक्ती व्यावसायिक म्हणून गणली जाईल. निवड झाल्यास, सहभागी स्पर्धकाला व्यावसायिक श्रेणी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
हौशी श्रेणीमध्ये व्यक्ती गायन/व्हिडिओ मेकिंग/भित्तिचित्र हा छंद म्हणून, सृजनाची आस म्हणून करते, परंतु तिच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत इतर कोणत्या तरी माध्यमांतून असतो तिला ‘हौशी’ म्हणून गणण्यात येईल. स्पर्धेसाठी तिन्ही गटात पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.स्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळhttps://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी. प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci.gov.in इथे ईमेल कराव्यात. ईमेल करतांना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. सर्व प्रवेशिका १५ मार्च २०२२ पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशीलांसह voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठवण्यात याव्या, असेही आवाहन जिल्हा निवडणूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
पुणेः सतारीवर छेडलेल्या तारांमधून निघाणारे मंजूळ स्वर… श्रवणीय स्वरांनी प्रफुल्लित झालेले वातावरण… सतारीवर फिरणारी बोटे आणि त्यातून अवतरलेल्या जादूई स्वरात शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, लावणी, भावगीत आणि कव्वाली एकण्याची संधी पुणेकरांनी मिळाली. प्रत्येक रागातील स्वर उलगडून दाखविणाऱ्या सुश्राव्य वादनामध्ये श्रोते तल्लीन झाले.
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्यावतीने ‘सतार गाई गाणे’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबईचे ज्येष्ठ सतारवादक चंद्रशेखर फणसे यांनी सतारवादन केले. डॉ. सुजाता भट (तानपुरा), विशाल गंडुततवार (तबला), विवेक परांजपे (सिंथेसायझर), गायक मकरंद पाटणकर, गायिका मनीषा निश्चल, प्रिती पेठकर, पल्लवी आनिखिंडी, मयुरा काळे, वैजू चांडवले, आणि योगिता बडवे यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे आयोजन किशोर सरपोतदार, साधना सरपोतदार व समन्वयक अजित कुमठेकर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरूवात पंडित रवीशंकर यांनी रचलेल्या तिलकशाम या रागाने झाली. त्यानंतर पंडित भिमसेन जोशी यांनी गायलेल्या रम्य ही स्वर्गाहून लंका या हिंडोल रागातील सतारवादनाने श्रोत्यांची मने जिंकली. सतारीवर सादर केलेल्या कवन, लावणी, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीतातील गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. अतिशय दुर्मिळ अशा भूपेश्वरी रागात सतारीच्या विविध रचनांनी रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. जुन्या हिंदी गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली. कायर्क्रमात प्रख्यात सतारवादक उस्ताद उस्मान भाई खान, सतारवादक आलोक फडके, कल्याणी देशपांडे, व्हायोलिन वादक अंजली सिंगडे-राव, आनंद सराफ, सचिन चपळगावकर, गौरी प्रधान आदी उपस्थित होते.
पुणे/ मुंबई– दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज हे पुण्याच्या आणि मुंबईच्या महापालिका निवडणूक प्रचारात उतरणार असल्याचे सूत्रांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. पुण्यातील भाजपाचा १०० पार चा नारा उलथवून लावण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची आघाडी निश्चित असल्याचे बोलले जाते आहे . या आघाडीत प्रचारासाठी पुणेकरांपुढे नेत्यांसह अभिनेते, अभिनेत्री यांची काही नावे पक्षाच्या काही नेत्यांपुढे असून त्यात सर्वात वरचे नाव प्रकाश राज असल्याचे समजते आहे. विजय पाटकर , प्रिया बेर्डे यांना पुण्यातच प्रचाराला थांबविले जाण्याची शक्यता आहे तर प्रकाश राज यांना मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी भाजपा विरोधी प्रचारासाठी पाचारण केले जाईल असे दिसते आहे. एकूणच अनेक हिंदी मराठी अभिनेते आणि अभिनेत्री यांचा समावेश प्रचार आघाडीत कसा करता येईल या संदर्भात विचार सुरु असल्याचे बोलले जाते.
अभिनेता प्रकाश राज हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधी आघाडी एकत्र करण्याच्या प्रयत्नांमध्ये प्रमुख व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास येत आहेत.रविवारी मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासोबत राव यांच्या भेटीदरम्यान ते उपस्थित होते .तेलुगू आणि इतर दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करणारे प्रकाश राज, समविचारी प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांची आघाडी तयार करण्यासाठी KCR च्या टीमचे प्रमुख सदस्य म्हणून पाहिले जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कडवे टीकाकार, अभिनेते तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) प्रमुखाचे प्रशंसक आहेत. राज यांचे अनेक नेत्यांशी चांगले संबंध असल्याने, KCR विविध पक्षांपर्यंत पोहोचण्यासाठी राज यांच्या मध्यस्थीचा मार्ग स्वीकारीत आहेत .
प्रकाश राज यांनी 2019 च्या निवडणुकीत बेंगळुरू सेंट्रल लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. तेलुगू चित्रपट उद्योगातील सर्वोच्च संस्था असलेल्या मूव्ही आर्टिस्ट असोसिएशन (MAA) च्या निवडणुकीत नुकताच त्यांचा पराभव झाला.धर्मनिरपेक्षता आणि विविधतेत एकता यावर ठाम विश्वास ठेवणारे प्रकाश राज यांनी 2014 पासून नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर कडवा हल्ला चढवण्यासाठी विविध मंचांचा वापर केला आहे . अनेक तेलुगु चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या या अभिनेत्याने ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC) 2020 च्या निवडणुकीत TRS ला पाठिंबा जाहीर केला होता.
नवी दिल्ली : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संसदेतील कामगिरी नेहमीच अव्वल असते असे म्हटले जाते . त्यामुळे त्या मागच्या सहा वर्ष संसदरत्न पुरस्कार पटकवत आहेत. यंदा देखील हा पुरस्कार सुप्रिया सुळे यांनाच मिळाला आहे. आता सुप्रिया सुळेंनी हा मानाचा पुरस्कार त्यांनी सगल ७ व्या वर्षी पटकवला आहे. चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई- मॅगॅझिनतर्फे संसदेतील खासदारांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. गतवर्षी देखील याच संस्थेने त्यांना संसद महारत्न पुरस्कार देऊन गौरविले आहे.बीजेडीचे अमर पटनायक यांच्यासह लोकसभेतील ८ आणि राज्यसभेतील ३ अशा एकूण ११ खासदारांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.क्रांतिकारी समाजवादी पक्ष (RSP) खासदार एन के प्रेमचंद्रन आणि शिवसेना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनाही त्यांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘संसद विशिष्ट रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत असून चालू यावर्षीही लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात १ जून २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ९२ टक्के उपस्थिती लावत १६३ चर्चांमध्ये सहभाग घेतला. तब्बल ४०२ प्रश्न त्यांनी उपस्थित केले, इतकेच नाही, तर ८ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत.लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना या फौंडेशनतर्फे २०१० पासून संसदरत्न हा पुरस्कार देण्यात येतो. देशाचे माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. गेल्या १२ वर्षांपासून संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येत असून आतापर्यंत ७५ खासदारांना तो देण्यात आला आहे. येत्या २६ फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय (पश्चिम बंगाल), काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा (अंदमान आणि निकोबार बेटे), आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार विद्युत बरन महतो (झारखंड), हीना विजयकुमार गावित (महाराष्ट्र) आणि सुधीर गुप्ता (मध्य प्रदेश) 17 व्या लोकसभेतील कामगिरीबद्दल त्यांना संसदरत्न पुरस्काराणे सन्मानित करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या शिष्टमंडळाला आश्वासन
बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक
पिंपरी / प्रतिनिधी-बेकायदेशीर दुचाकी व्यवसायाला कायदेशीर परवानगी नाही. याबद्दल मी परिवहन आयुक्त आणि व पोलिसांना योग्य ते आदेश दिले आहेत. बेकायदेशीर गोष्टींना आमचे समर्थन नाही. सरकार रिक्षाचालकांच्या बाजूने असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच महाराष्ट्र मध्ये २० लाख रिक्षा चालक – मालक असून रिक्षा चालकांचे प्रश्न अत्यंत बिकट झाले आहेत. त्याबद्दल मला जाणीव असून रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नाबद्दल लवकरच व्यापक बैठक लावणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई मंत्रालय येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांच्या नेते अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. या वेळी कृष्णा कराड रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गफारभाई नदाफ कार्याध्यक्ष रहीमभाई पटेल, सदाशिव तळेकर आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले की, रिक्षा चालक मालकांसाठी परिवहन विभागांतर्गत स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे. लॉकडाऊनमुळे रिक्षा चालक – मालक यांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामध्येच ओला उबेरची बेकायदेशीर दुचाकी सुरु झाल्याने रिक्षा व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. हे दुचाकीचे ऍप बंद करण्यात यावे. कोविडनंतर रिक्षावाल्यांचे प्रश्न आणि समस्या या बाबत व ईतर विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड, पुणे शहरामध्ये बेकायदेशीरपणे दुचाकी सुरु असून ओला उबेरच्या या बेकायदेशीर ॲप मुळे रिक्षा व्यवसायावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला आहे. रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधामध्ये रिक्षा चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्याच्याच निषेधार्था व विरोधात मोर्चा देखील काढला. कोविडमुळे अगोदरच मेटाकुटीला आलेल्या रिक्षाचालकांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. रिक्षा चालकांचे हप्ते थकले असून त्यांना हप्ते भरणे ही अवघड झाले आहे. या परिस्थितीत आलेल्या बेकायदेशीर दुचाकीमुळे आणखीन त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हे ऍप बंद झाले पाहिजे असे बाबा कांबळे या वेळी म्हणाले.
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र मोठ्यात संख्येने रिक्षा चालक मालक असून रिक्षाचालकांचे प्रश्न अत्यंत बिकट झाली आहे त्याबद्दल मला जाणीव असून मी रिक्षा चालक मालकांच्या प्रश्नाबद्दल लवकरच परिवहमंत्री, कामगार मंत्रित व संबंधित अधिकारी यांची बैठक लावणार आहे. कोरोड नंतर रिक्षाचालकांचे कर्जाचे हफ्ते थकले असून फायनान्स कंपनीकडून त्यांना त्रास दिला जात आहे. त्यांच्या प्रश्नाबद्दल देखील सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत – कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात सात मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल
कोल्हापूर -पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेणे आणि दबाव आणण्याचा प्रकार चालू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची १९७१ ची जमिनीची केस काढून पोलिसांनी त्यांचा प्रचंड छळ केला. अखेरीस त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पोलिसांचा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वापर करण्याचा हा प्रकार आम्ही सहन करणार नाही. आम्ही याच्याविरोधात लढा देऊ. जनताही अशा लोकांना धडा शिकवेल.असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले .
ते म्हणाले की, महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. उसाचे एफआरपीचे पैसे दोन तुकड्यात देण्याचा या सरकारचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणारा आहे. यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील असा धोका आहे. भारतीय जनता पार्टी या निर्णयाविरोधात टोकाचा संघर्ष करेल. त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने राजकारणासाठी सत्तेचा व पोलिसांचा दुरुपयोग चालविला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, २०१४ साली भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन केले. आम्ही हे सरकार आमच्या बळावर पाच वर्षे चालविले असते. पण शिवसेनेला सत्तेबाहेर राहणे अशक्य झाले काहीही करून सत्तेत घ्यावे यासाठी ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत होते, हे आदित्य ठाकरे यांनी विसरू नये. एसटीच्या संपाविषयी ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांना विविध शहरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एसटीच्या स्थानक व डेपोच्या जागा बळकावायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी संप चिघळवला आहे. सत्ताधारी आघाडीच्या सापळ्यात एसटी कर्मचारी अडकले आहेत.
दिशा सालियानच्या मृत्यूचे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल
दिशा सालियानच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले हे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल. यामध्ये कोण गुंतले आहे आणि कोण तुरुंगात जाणार हे स्पष्ट होईल, असे आ. चंद्रकांत पाटील म्हणाले . दिशा सालियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याचा आरोप एका पत्रकाराने निदर्शनाला आणला असता ते म्हणाले की, याबाबतीत काहीही राजकारण होत नाही. सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील, दूध का दूध – पानी का पानी होईल, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे. त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात सात मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो.
मुंबई : “समाजामध्ये बदल घडविण्याची ताकद नाटकांमध्ये असून महाराष्ट्राच्या या संतांच्या भूमीला नाटकांमधून विचारांचे बळ मिळाले असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचे’ राज्यस्तरीय उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, ज्येष्ठ रंगकर्मी नागेश भोसले आणि १९ केंद्रांमधील मान्यवर उपस्थित होते.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांवर कठीण परिस्थिती ओढावली होती, सर्वत्र नैराश्याचे वातावरण होते; या सर्व पार्श्वभूमीवर राज्य नाट्यस्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करुन आनंद महोत्सव साजरा करीत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही कला आणि कलावंतांशी जिव्हाळाचे नाते आहे. नाट्य कलेच्या माध्यमातून संस्कृती जतन करण्यासाठी राज्यातील प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्था, साखर कारखाने, बँका, दूधसंघामध्ये एक नाटक प्रयोग झाल्यास कलावंतांना त्यांच्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी आणि समाजप्रबोधन करण्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ मिळेल व यासाठी सहकार मंत्री यांनी सहकार्य करावे अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलाकार रंगभूमीला मिळाले असून यापुढेही हा ओघ कायम राहील असे बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले.
रंगकर्मींसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यावर भर देणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख म्हणाले, गेली सहा दशके राज्य नाट्य स्पर्धा महाराष्ट्रात सुरू आहे. इतका काळ अविरतपणे सुरू असलेली आणि नाट्यकलावंतांना ऊर्जा देणारी ही भारतातील एकमेव स्पर्धा आहे. कोविडच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली मात्र आता कोरोना साथ काही प्रमाणात नियंत्रणात आली असली, तरी अंतरनियमनासारखी काही पथ्ये आपल्याला पाळायची आहेत. याचे भान ठेवूनच ही हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धा आयोजित केली आहे. निर्बंधाखाली का होईना, ही स्पर्धा यंदा होत आहे याचा मनस्वी आनंद आहे.
समाजात काय घुसळण सुरू आहे, कोणत्या प्रकारचे विचारमंथन घडते आहे याचे दर्शन राज्य नाट्य स्पर्धा घडवत असते. समाजात जे सुरू आहे ते या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावर सादर होत असते. या स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांची शीर्षके जरी पाहिली तरी हे स्पष्ट होईल. शेकडो हौशी नाट्यसंघ, अनेक कलाकार, लेखक या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होत आहेत. या स्पर्धेतून पुढे येणाऱ्या गुणवंत कलाकारांसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्याचे आम्ही ठरवले आहे. कलाकारांमध्ये व्यावसायिकता यावी, यादृष्टीने अशा कार्यशाळेचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास आहे. राज्य शासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाट्य-कला क्षेत्रासाठी अनेक पातळ्यांवर कार्यरत आहे. येत्या काळात सिनेमा-नाटक-मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या क्षेत्रास उद्योगाचा दर्जा मिळाल्यास नाट्यकलावंताना शासनाकडून आवश्यक असणारे पाठबळ वाढेल, अशी आशा आहे. ही राज्य नाट्य स्पर्धा येता काही काळ नाट्यरसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. त्यांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री.देशमुख यांनी यावेळी केले.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, गेल्या साठ वर्षांत नाट्य-कलेच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे कलाकार राज्य नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आले आहेत. अशी ही महत्त्वाची स्पर्धा गेल्या वर्षी कोरोनामुळे होऊ शकली नव्हती. खरे तर कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे आपण एकप्रकारे कोंडून बसलो होतो. परंतु यंदा ही स्पर्धा होत आहे याचा आनंद आहे. स्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांचा आस्वाद नाट्यरसिक मनमुरादपणे घेतील असा विश्वास श्री.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, नाट्य कलेचा प्रसार व्हावा या हेतूने राज्य नाट्य स्पर्धेचा प्रारंभ झाला. गेल्या साठ वर्षांत या स्पर्धेच्या माध्यमातून तो हेतू प्रभावीपणे साध्य झाला आहे. कलाकारांसाठी महाराष्ट्र शासन निरनिराळे उपक्रम राबवत आहे. नाट्यप्रयोगांना अनुदान, नाट्य प्रशिक्षण शिबिर, वृद्ध कलावंतांना मानधन अशा विविध योजना सांस्कृतिक खात्यामार्फत राबविल्या जात आहेत. राज्य नाट्य स्पर्धा तर उदयोन्मुख कलाकारांसाठी मोठी संधी असते. या कलाकारांना नाट्यरसिकांनीही प्रोत्साहन द्यावे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री. यड्रावकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य त्यांनी केले तर सह संचालक मीनल जोगळेकर यांनी आभार मानले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धा घेता आली नव्हती. यंदाचे वर्ष हे स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने व आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होत आहे.सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धा हौशी मराठी, बाल, हिंदी, संगीत, संस्कृत, दिव्यांग बाल नाट्य अशा सहा विविध प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.
जवळपास तीन महिने अविरत चालणाऱ्या या स्पर्धांमधून एकूण ९५० संघ/संस्था भाग घेणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.
केन्द्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेच्या 25 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्री अर्थसंकल्प पश्चात चर्चा आणि भेटीगाठींसाठी सध्या दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आल्या असून त्या शहरातील उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी, वित्तीय बाजारात कार्यरत व्यक्ती आणि बँकांचे अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करत आहेत.
या बैठकीत एफएसडीसी अर्थात आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेच्या विविध नियमांविषयी तसेच जगातील आणि देशांतर्गत पातळीवर होत असलेल्या घडामोडींच्या दृष्टीकोनातून उभ्या ठाकणाऱ्या मोठ्या आर्थिक आव्हानांविषयी चर्चा करण्यात आली. केंद्र सरकार तसेच सर्व नियामकीय संस्थांनी वित्तीय संस्थांच्या आर्थिक स्थितीवर आणि कार्यावर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज आहे याकडे निर्देश करून, त्यातून मध्यम आणि दीर्घ मुदतीतील आर्थिक असुरक्षितता शोधता येऊ शकतील असा विचार मांडण्यात आला. आर्थिक क्षेत्राच्या भविष्यातील विकासासाठी तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्थैर्यासह समावेशक आर्थिक विकास घडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबद्दल या परिषदेत चर्चा करण्यात आली.
परिषदेच्या सदस्यांनी चलन व्यवस्थापनाशी संबंधित परिचालनविषयक समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने या बैठकीत विचारविनिमय केला. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या एफएसडीसीच्या उपसमितीने हाती घेतलेल्या उपक्रमांविषयी तसेच एफएसडीसीने याआधी घेतलेय निर्णयांवर काय कार्यवाही झाली याबद्दल देखील आजच्या बैठकीत माहिती देण्यात आली.
एफएसडीसीच्या या 25 व्या बैठकीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास, केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाचे सचिव आणि अर्थ सचिव डॉ.टी.व्ही.सोमनाथन, केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ, महसूल विभागाचे सचिव तरुण बजाज, अर्थविषयक सेवा विभागाचे सचिव संजय मल्होत्रा, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश सोहनी, केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे सचिव राजेश वर्मा, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागार डॉ.व्ही .अनंत नागेश्वरन, सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी, निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सुप्रतीम बंदोपाध्याय, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचे अध्यक्ष इंजेती श्रीनिवास, भारतीय विमा आणि नियामक विकास प्राधिकरणाच्या सदस्य टी.एल.अलामेलु तसेच अर्थ मंत्रालयातील वित्तीय व्यवहार विभागाच्या एफएसडीसीचे सचिव हे देखील उपस्थित होते.
आर्थिक स्थिरता राखण्यासाठीची यंत्रणाना संस्थात्मक स्वरूप देत त्यांना सशक्त करणे, आंतर-नियामकीय समन्वय वाढविणे तसेच आर्थिक क्षेत्राच्या विकासाला प्रोत्साहन देणे या उद्देशाने वित्त क्षेत्रातील विविध बाजार नियामकांशी चर्चा करून केंद्र सरकारने वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेची स्थापना केली आहे. नियामक संस्थांच्या स्वायत्ततेविषयी कोणताही पूर्वग्रह न बाळगता, ही परिषद मोठ्या वित्तीय समूहांसह अर्थव्यवस्थेचे विस्तारित आणि विवेकी पद्धतीने परीक्षण करते आणि आंतर-नियामकीय समन्वय तसेच आर्थिक क्षेत्राच्या विकासाविषयी असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करते. ही परिषद आर्थिक साक्षरता आणि आर्थिक समावेशकता यांच्यावर देखील लक्ष केंद्रित करते.
पुणे, दि. 22 फेब्रुवारी 2022: फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी तर्फे आयोजित व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत साखळी फेरी डेक्कन ऍव्हेंजर्स, टेनिसनट्स फेडल, एफसी बिटल्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला. फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत क गटात अभिजीत मराठे, आनंद कोटस्थाने, केतन जाठर, गोपीनाथ जयभाई, अनिरुद्ध भल्ला यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर डेक्कन ऍव्हेंजर्स संघाने मॉंट व्हर्ट प्रीस्टाईन 2 संघाचा 23-14 असा पराभव करून बाद फेरीत धडक मारली. ब गटात टेनिस नट्स फेडल संघाने डेक्कन आरएफ संघाचा 24-06 असा सहज पराभव करून आगेकूच केली. विजयी संघाकडून रवी कोठारी, माधव भट, दिपक पाटील, सी कुमार, वेंकटेश आचार्य, अजिंक्य पाटणकर, रवी कोठारी, नितीन सावंत यांनी सुरेख कामगिरी केली. अ गटात एफसी बिटल्स संघाने ओडीएमटी 2 संघावर 24-09 असा विजय मिळवत बाद फेरी गाठली. स्पर्धेत डेक्कन चार्जर्स, टायगर्स, एफसी जीएनआर, डेक्कन ग्लॅडिएटर्स, महाराष्ट्र मंडळ, लायन्स, ओडीएमटी 1 या संघांनी बाद फेरीत प्रवेश केला. निकाल: साखळी फेरी: डेक्कन ऍव्हेंजर्स वि.वि.मॉंट व्हर्ट प्रीस्टाईन 2 23-14(100अधिक गट: अभिजीत मराठे/आनंद कोटस्थाने वि.वि.जॉर्ज वरघसे/रमेश सुधाकर 6-2; 90अधिक गट: शिवाजी यादव/संतोष जयभाई पराभूत वि.मनिष टिपणीस/सचिन माधव 5-6(5-7); खुला गट: केतन जाठर/अभिजीत मराठे वि.वि.सतीश ओरसे/सोमनाथ पवार 6-1; खुला गट: गोपीनाथ जयभाई/अनिरुद्ध भल्ला वि.वि.रवी जौकनी/रवी मित्तल 6-5(7-4));टेनिस नट्स फेडल वि.वि.डेक्कन आरएफ 24-06(100अधिक गट: रवी कोठारी/ माधव भट वि.वि.आशिष धोंगडे/दिलीप धामणकर 6-2; 90अधिक गट: दिपक पाटील/सी कुमार वि.वि.श्रीनिवास रामदुर्ग/संदीप माहेश्वरी 6-1; खुला गट: वेंकटेश आचार्य/अजिंक्य पाटणकर वि.वि.समीर सावळा/राहुल मंत्री 6-2; खुला गट: रवी कोठारी/नितीन सावंत वि.वि.अमलेश आठवले/आशिष धोंगडे 6-1); एफसी बिटल्स वि.वि.ओडीएमटी 2 24-09(100अधिक गट: सुनील लोणकर/शैलेश पटवर्धन वि.वि.श्रीधर जे/कार्तिक श्रीधर 6-4; 90 अधिक गट: अशोक अगरवाल/रोहित शेवाळे वि.वि.पंकज खरे/शैलजा कुमार 6-3; खुला गट: अजिंक्य फडतरे/श्रेयस गजेंद्रगडकर वि.वि.राहुल पाटील/अमित बगाडे 6-1; खुला गट: सचिन साळुंखे/दिविजा गोडसे वि.वि.डीके कर्षन/कार्तिक श्रीधर 6-1).
पुणे, दि. २२ फेब्रुवारी २०२२: शेतकऱ्यांनी भरलेल्या चालू व थकीत कृषी वीजबिलांच्या रकमेतील तब्बल ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रातील वीज यंत्रणेच्या विविध कामांसाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला मोठा वेग आला आहे. आतापर्यंत पुणे जिल्हयात २११ कोटी ८२ लाख रुपयांचा कृषी आकस्मिक निधी जमा झाला असून १६ हजार ४४२ कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागाला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून वीजबिलांच्या भरण्यातील ६६ टक्के रक्कम कृषी आकस्मिक निधी म्हणून स्थानिक वीजविषयक कामांसाठी वापरण्याची तरतूद केली आहे. त्याचे चांगले फायदे आता दिसू लागले आहेत. ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात कृषी वीजबिले जशी भरली जातील तसा हा निधी देखील वाढत जाणार आहे. या निधीतून महावितरणकडून संबंधीत ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे सुरु झाली असून ग्रामीण भागात नवीन वीजजोडण्यांसह योग्य दाबासह दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होत आहे.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५३ हजार ५८४ शेतकऱ्यांनी कृषी धोरणातील थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग घेतला आहेत. त्यांनी चालू व थकीत वीजबिलांपोटी २७५ कोटी ७४ लाख रुपयांचा भरणा केला आहे. या रकमेमधून ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी १०५ कोटी ९१ लाख असे एकूण २११ कोटी ८२ लाख रुपये कृषी आकस्मिक निधीमध्ये जमा झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७ नवीन उपकेंद्र व ७ उपकेंद्रांची क्षमतावाढ या निधीमधून प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यातील २८ कोटी १२ लाख रुपये खर्चाचे ७ नवीन उपकेंद्र व चार उपकेंद्रांच्या क्षमतावाढीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यासह जिल्ह्यात ८४ कोटी ९५ लाख रुपये खर्चाच्या १५०६ विविध कामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. कृषी आकस्मिक निधीमधून आतापर्यंत ३७ कोटी ७३ लाख रुपये खर्चाचे १२५८ कामे सुरु करण्यासाठी कामाचा आदेश देण्यात आला आहे. त्यातील ९६३ कामे प्रगतीपथावर आहे तर २९५ विविध कामे पूर्ण झाली आहेत.
ग्रामीण भागात सुरु असलेल्या वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणामुळे आतापर्यंत पुणे जिल्ह्यात १६ हजार ४४२ कृषिपंपांना नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. कृषिपंपाच्या चालू व थकीत वीजबिलांचा सर्व शेतकऱ्यांनी भरणा केल्यास संबंधित ग्रामपंचायत व पुणे जिल्ह्याच्या प्रत्येकी ३३ टक्के कृषी आकस्मिक निधीमध्ये वाढ होत जाणार आहे. या निधीमधून नवीन उपकेंद्र, उपकेंद्रांची क्षमता वाढ किंवा अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर, नवीन वितरण रोहित्रे, नवीन वीजखांब व उच्चदाब, लघुदाब वाहिन्या आदी विविध कामे करण्यात येणार आहेत. तसेच थकबाकीदार शेतकऱ्यांनी येत्या ३१ मार्च २०२२ पर्यंत चालू वीजबिल व सुधारित थकबाकीतील ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ होणार आहे. थकबाकीमुक्ती सोबतच कृषी वीजबिलांचा नियमित भरणा करून कृषी आकस्मिक निधीच्या माध्यमातून ग्रामपंचायत व जिल्हाक्षेत्रातील वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी हक्काचा निधी मिळवावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांनी केले आहे.
नवी दिल्ली- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा 1967 अंतर्गत बेकायदेशीर घोषित केलेल्या शिख्स फॉर जस्टिस (एसएफजे) या संस्थेशी जवळचे संबंध असलेल्या परदेशस्थ “पंजाब पॉलिटिक्स टीव्ही” चे अॅप्स, संकेतस्थळ आणि समाजमाध्यम खाती प्रतिबंधित (ब्लॉक) करण्याचे आदेश दिले आहेत.
संबंधित वाहिनी, सध्या सुरू असलेल्या राज्य विधानसभा निवडणुकांदरम्यान सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी ऑनलाइन माध्यमाचा वापर करण्याचा प्रयत्न करत असल्याची गुप्तचर माहिती समोर आल्याने, मंत्रालयाने 18 फेब्रुवारी रोजी माहिती तंत्रज्ञान नियमांतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून पंजाब पॉलिटिक्स टीव्हीची “डिजिटल मीडिया संसाधने प्रतिबंधित केली.
प्रतिबंधित केलेले अॅप्स, संकेतस्थळ आणि समाजमाध्यम खात्यांच्या सामग्रीमध्ये जातीय तेढ आणि फुटीरतावाद भडकवण्याची क्षमता होती; आणि ते भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राज्याची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी हानिकारक असल्याचे आढळले. सध्या सुरू असलेल्या निवडणुकांची वेळ साधत त्यावर प्रभाव टाकण्यासाठी नवीन अॅप्स आणि समाजमाध्यम खाती सुरु केल्याचे उघड झाले आहे.भारतातील एकूण माहिती बाबतचे वातावरण सुरक्षित ठेवण्यासाठी आणि भारताच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतींना आळा घालण्यासाठी केन्द्र सरकार सतर्क आणि वचनबद्ध आहे.असे पीआयबी ने दिलेल्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.
श्राव्यसाहित्यात विश्वरूपी मानके निर्माण करणारी जगविख्यात ‘स्टोरीटेल’ नवं क्षितिज पेलण्यात अग्रेसर राहिली आहे. ‘सेक्रेड गेम्स’ या तुफान लोकप्रिय वेब मालिकेची मूळ कादंबरी आता ‘श्राव्यरूपात’ स्टोरीटेलने आपल्या रसिकांसाठी प्रकाशित केली आहे. यापूर्वी स्टोरीटेलने ‘वळू’ या प्रचंड लोकप्रिय चित्रपटाची रंजकदार पटकथा दस्तुरखुद्द अभिनेते लेखक गिरीश कुलकर्णी यांच्या आवाजात प्रकाशित केली होती. या प्रयोगाला मराठी रसिकांनी उदंड प्रतिसाद दिल्याने ‘सेक्रेड गेम्स’ची ऑडिओ निर्मिती करण्याचा उत्साह वाढला आहे. ‘सेक्रेड गेम्स’च्या ऑडिओबुकलाही रसिक पसंती देतील असा विश्वास स्टोरीटेलच्यावतीने प्रसाद मिरासदारांना वाटत आहे.
काटेकर ही व्यक्तिरेखा माहीत नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. मग तुम्ही ‘सेक्रेड गेम्स’ पाहिलेलं असो की नसो. ही सुप्रसिद्ध वेब सिरीज ज्या प्रसिद्ध कादंबरीवरून बनवण्यात आली, ती कादंबरी आता ‘स्टोरीटेल’ मराठीवर ऐकायला मिळणार आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद मृणाल काशीकर यांनी केला असून सुप्रसिद्ध वॉईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात ‘सेक्रेड गेम्स’ भाग १ व २ ची लज्जतदार कहाणी ऐकताना रसिकश्रोते रंगून जातात.
‘सेक्रेड गेम्स’ची नव्यानं ओळख करून द्यायला हवी का? हो, ही तीच ‘सेक्रेड गेम्स’ कादंबरी आहे, जी तुम्ही अतिशय गाजलेल्या वेब सीरिजच्या रुपात आतापर्यंत स्क्रीनवर पाहिली असेल. तुम्ही ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सिरीज पाहिलेली असली तरीही पुन्हा ऑडिओ रुपात ती ऐकण्याची एक वेगळीच मजा आहे. आणि जर तुम्ही ती पाहिलेली नसली, तर ‘स्टोरीटेलवर’ ऐकताना त्यातला एकूणएक प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर तरंगणार आहे. ‘सेक्रेड गेम्स’चा हा भन्नाट ऑडिओ फॉर्म अगदी प्रवास करताना, ड्राईव्ह करतानाही आपण निवांत ऐकू शकता! प्रख्यात भारतीय लेखक विक्रम चंद्रा यांची गाजलेली ‘सेक्रेड गेम्स’ ही क्राईम थ्रिलर कादंबरी ‘स्टोरीटेल’ मराठी ऑडिओबुक रुपात दोन भागांमध्ये प्रसिद्ध व्हाईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात नक्की ऐका.
‘सेक्रेड गेम्स’ उत्कंठाअधिक न ताणता स्टोरीटेलची फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सचा ‘साहित्यश्रवणानंद’ घेता येईल.
पुणे (शरद लोणकर) – भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ५० वर्षातले पुणे आणि अलीकडच्या ५ वर्षातले पुणे…असा एक विषय आता चर्चेला आणला आहे. हा विषय खरोखरच खूप महत्वपूर्ण आणि वैचारिक मंथन करायला लावणारा,आणि पुण्याचे आजचे स्वरूप आणि जुन्या पुण्याचे स्वरूप यात होत गेलेल्या बदलाबाबत चिंतन करायला लावणारा आहे. अर्थात चंद्रकांत दादांनी हा विषय जरी राजकीय दृष्ट्या छेडला असला तरी राजकीय पातळीवरून त्याबाबत त्याची राजकीय चर्चाही होईल.पण जुन्या पुण्यातली मंडळी मात्र ‘आमचे जुने पुणे च शानदार होते.आता मात्र बजबजपुरी झालीये अशीच उत्तरे देताना दिसतील.
खरे तर बीआरटी आली तेव्हा मोठमोठी सुंदर छायाचित्रे दाखवून,स्वप्ने दाखवून बीआरटी आणली गेली. जी आजही नुसती फेल गेली एवढेच म्हणता येणार नाही तर हीच बीआरटी पुण्याच्या वाहतुकीचा बट्ट्या बोळ करण्याचे एक कारणही ठरली.सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्याच्या नावाखाली जी आणली गेली होती. याच बीआरटी ने पुणे महापालिकेची सत्ता हि उलथाविली हे प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे .
मूळ विषय आहे तो ५० वर्षातल्या किंवा भाजपाची सत्ता येण्यापूर्वीच्या पुण्याचा.आणि सत्ता आल्यानंतरच्या पुण्याचा.जुनं पुणं टांगेवाल्यांचे, पेन्शरांचे पुणे..,आता गणेशोत्सव काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ची स्थापना होते तिथे असलेल्या कोतवाल चावडी सारख्या ऐतिहासिक खुणांचे पुणे. पहाटेपहाटे..प्र..भा..त..अशी आरोळी येणारे आणि सायंकाळी..संध्या ची वाट पाहणारे पुणे.पेशवे उद्यानात फुलराणीत बागडणाऱ्या,आणि हत्ती सिंह पाहून बागडणाऱ्या बाल चमूंचे पुणे,फुगेवाडीच्या जकात नाक्या पासून,सातारा रस्त्यावरील आताच्या पंचमी हॉटेल जवळील जकात नाक्यापर्यंत चे ,आणि शेवाळवाडीच्या जकात नाक्यापासून ते सिंहगड रस्त्यावरील आताच्या लोकमत ऑफिस जवळील जकात नाक्यापर्यंत चे पुणे ,व्यापाऱ्यांना टिम्बर मार्केट ते मार्केट यार्ड सारख्या जागा वास्तू देणारे पुणे,दुतर्फा भल्या मोठ्या झाडी असलेल्या जंगली महाराज रस्ता ,विद्यापीठ रस्ता ,फर्ग्युसन रस्ता, आणि मध्यावर असलेले भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, टीळक स्मारक मंदिर अशा सांस्कृतिक रंगात रंगलेले पुणे त्या पुण्यातही काही उणे नव्हते. नंतर कोतवाल चावडी हटविली गेली,लाल महाल उभारला गेला, अनेक ठिकाणी नाट्यगृहे जशी यशवंतराव चव्हाण ,अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले अशी नाट्यगृहे उभारली गेली.गणेश कला क्रीडा मंच उभारले गेले, बालेवाडी चे स्टेडियम उभारले गेले.गंज पेठेत महात्मा फुले स्मारक उभारले गेले. अगदी २००० सालापर्यंत पेशवेकालीन भुयारी यंत्रणेतील पाणी पुरवठा यंत्रणेचे पाणी हि वापरले जात होते. टांगे गेले , रिक्षा आल्या,सायकली गेल्या,टू व्हीलर आल्या.पण पुणे ठीक होते.सदाशिव पेठेत राहणारी मंडळी हि सुखात राहत होती.मगरपट्टा बहरला, औंध बाणेर आयटी पार्क आले.
पण पुण्याचे वाट्टोळे व्हायला सुरुवात झाली ती..महापालिकेच्या हद्दी वाढविण्याच्या निर्णयांनी..आणि पोटापाण्यासाठी आलेल्या लोंढ्यांनी हे शहर व्यापले,महापालिकेच्या हद्दीलगतच्या गावात राजकारण्यांनीच असंख्य जागा,मग त्या सरकारी असो वा अन्य कुठल्याही असो..या जागा बळकावून त्यावर बिल्डिंगा बांधून त्यांचा धंदा मांडला,या धंद्यातून त्यांनी पैसा मिळविला आणि राजकरणात भरारी घेऊ लागले ,आणि पुण्याची बजबजपुरी व्हायला येथूनच सुरुवात झाली. महापालिकेच्या हद्दीला ना लगाम कोणी ठेवला ,हद्द वाढविण्याचा हा घोडा जसा बेफाम सुटला तशी बजबजपुरी बेफाम वाढत गेली. त्यावर कडी म्हणून..जरी गरीब पोटापाण्यासाठी राबणाऱ्याच्या नावाखाली गुंठेवारी आणून या राजकारणी बिल्डरांना आणखी प्रोत्साहन दिले गेले. आणि टू व्हीलर नाही तर नौकरी नाही, काम धंदा नाही असे घोषवाक्य बनलेल्या या शहरात वाहतुकीच्या समस्येने उग्र रूप धारण केले. कात्रज सारख्या ठिकाणी जिथे कधी काळी कात्रज च्या तलावालगत जंगल होते, अगदी रानगव्यांचा जिथे वावर होता आणि जिथे याच महापालिकेने एक रान गवा पकडला देखील होता,तिथे चक्क मोठ मोठ्या इमारती उभ्या करून करोडो अब्जावधींचा धंदा केला गेला .जंगल, नाले नकाशावरून गायब केली गेली .आणि उभे केले गेले कॉंक्रिटचे साम्राज्य…जिथे रस्ते नाहीत, पाणी नाहीत तिथे आडवी तिडवी कॉंक्रीटच्या साम्राज्ये राजकारणी बिल्डरांच्या तुंबड्या तर भरत गेली पण पुण्याची तेवढीच वाट लावत गेली.
आता या ५ वर्षात जरी इथे भाजपची सत्ता आली असली तरी हि सत्ता हि त्याला लगाम घालू शकलेली नाही हे वास्तव आहे, मेट्रो येईल पण तरीही इथल्या वाहतुकीचा अजगराला पायबंद घालतां येईलच याची शाश्वती नाही.जोवर महापालिकेच्या हद्दीला लगाम घालता येत नाही आणि नव्या गावाचे नियोजन करण्यापूर्वी तिथे रस्ते, पायाभूत सोयी सुविधा होण्यापूर्वीच बांधकामांचा राक्षस हैदोस मांडेल अशा पुण्याच्या बजबजपुरीला रोखण्यासाठी काही उपाय योजना कोणी केलेली नाही या वास्तवाकडे जोवर दुर्लक्ष होत राहील तोवर तरी जुने पुणेच होते सोने असेच म्हणावे लागेल.