Home Blog Page 2074

मुंबई बॉम्ब स्फोटातील गुन्हेगारांसोबत हातमिळवणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी-आमदार मंगल प्रभात लोढा

0

महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालय पथकाने (ईडी) कारवाई करत त्यांना अटक केली आहे. मुंबई बॉम्ब स्फोटातील गुन्हेगारांसोबत हातमिळवणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक झाली आहे. या संदर्भात बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, १९९३ रोजी मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटातील गुन्हेगार आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी जमीन खरेदी केली असून या संदर्भात त्यांना अटक होणे ही दुर्दैवी बाब आहे. गुन्हेगारांसोबत हातमिळवणी करणाऱ्या आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाऊ नये आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लोढा यांनी केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्या दहशतवाद्यांनी मुंबई बॉम्बस्फोटात २५७ निष्पाप मुंबईकरांना ठार मारले आणि हजारो लोकांना जखमी केले अश्या गुन्हेगारांसोबत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे संबंध होते. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना देशवासी कधीच माफ करणार नाहीत. हा देशाच्या सुरक्षेशी निगडित मुद्दा आहे, या प्रकरणात सर्व पक्षांनी राजकारण सोडून केंद्रीय यंत्रणांना सहकार्य करावे असे मत लोढा यांनी व्यक्त केले.

भीमाशंकर यात्रेच्या नियोजनाचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

0

पुणे दि.23: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे १ मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेसाठी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वय ठेवत नियोजन करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री क्षेत्र भीमाशंकर यात्रा नियोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, आंबेगावचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, आंबेगावच्या तहलिसदार रमा जोशी, खेडच्या तहसीलदार वैशाली वाघमारे, उपअभियंता एस.एस. पटाडे, पोलीस निरीक्षक सतिश गुरव, किशोर वागज यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते.

२६ व २७ फेब्रुवारी रोजी शनिवार, रविवार सुट्टी आहे १ मार्च रोजी महाशिवरात्र होणार आहे. सलग सुट्ट्या आल्या असल्याने भीमाशंकर यात्रेला मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी प्रत्येक विभागात समन्वय असावा. सर्व विभागांचा समन्वयासाठी नियंत्रण कक्ष असणार आहे. नियंत्रण कक्षामुळे नियोजन सुलभ होईल, असेही खराडे म्हणाले.

बैठकीत पार्कींग व क्रेन सुविधा, मिनी बसेस व खाजगी वाहन सुविधा, स्वच्छता व पाणीपुरवठा, आरोग्य आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक विक्रेते, उत्पादने यांच्यासाठी सुविधा, वीज व्यवस्था, वनविभागाशी सबंधित सुविधा, रस्ते विकास, एसटी नियोजन, पोलीस यंत्रणा तसेच दर्शन व्यवस्था व यात्रा नियोजन आदी सुविधांचा आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी श्री. कोडलकर, श्री.चव्हाण व तहसीलदार श्रीमती जोशी यांनी यात्रा नियोजनाबाबत सादरीकरण केले. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

खादी व ग्रामोद्योगी उत्पादित वस्तुंचे राज्यस्तरीय प्रदर्शन

0

पुणे दि.23: स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने २५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत खादी व ग्रामोद्योगी उत्पादित वस्तुंचे राज्यस्तरीय प्रदर्शनाचे शेतकी महाविद्यालय आवारातील हातकागद संस्थेत आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यात खादी व ग्रामोद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामीण कारागीरांनी उत्पादित केलेल्या खादी वस्त्र व ग्रामोद्योगी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगामार्फत पीएमईजीपी बँकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस अंतर्गत तरतूद आहे.

प्रदर्शनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अन्शु सिन्हा यांच्या हस्ते २५ फेब्रुवारीला सकाळी ११.३० वाजता होणार आहे. संपूर्ण राज्यांतून ग्रामोद्योगी उत्पादक सहभागी होणार आहेत. ग्रामोद्योग उत्पादनांची विक्री करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण वासीयांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले त्यांच्या सत्यशोधक विचारांचे स्मरण

0

मुंबई, दि. 23 :-‘मी कुणाचा गुरु नाही, माझा कुणी शिष्य नाही’ हे सांगणाऱ्या संत गाडगेबाबांनी जीवनातील प्रत्येक बाबीकडे चिकित्सक, डोळसपणे बघण्याचा संदेश दिला. संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतीबा फुले यांच्यासारख्या महामानवांचे सुधारणावादी, सत्यशोधक विचार, लोकसेवेचे कार्य त्यांनी समर्थपणे पुढे नेले. प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे मोठे योगदान आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले आहे.

संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संत गाडगेबाबांचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “संत गाडगेबाबा हे विज्ञानवादी विचारांचे कृतीशील संत, समाजसुधारक होते. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता, अनिष्ठ रुढी-परंपरांच्या निर्मुलनासाठी त्यांनी जीवनभर कार्य केलं. कुष्ठरुग्णांसह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांची सेवा केली. स्वत: चिंध्या पांघरल्या. जाणीवपूर्वक गरीबीत जगले, मात्र, सर्वसामान्यांसाठी शाळा, धर्मशाळा, घाट, रुग्णालये, अनाथालये, अन्नछत्रांसारख्या सेवांची उभारणी केली.

संत गाडगेबाबा हे सत्यशोधक विचारांचे क्रांतिकारी समाजसुधारक होते. अडाणी राहू नका. अंधश्रद्धा ठेवू नका. कर्ज काढू नका. व्यसन करु नका. जातीभेद-अस्पृश्यता पाळू नका. माणसात देव शोधा, दीन-दुबळे, रंजले-गांजले, अनाथ-अपंगांची सेवा करा, अशा सोप्या भाषेत त्यांनी समाजप्रबोधनाचं कार्य केले. संत गाडगेबाबा हे कृतीशील संत होते. प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या उभारणीत संत गाडगेबांच्या विचारांचं, कार्याचं मोठे योगदान आहे. त्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करूया,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

पुण्यात दि. २६ व २७ ला विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

0

पुणे, दि२३ फेब्रुवारी २०२: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ४४ वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाचे शनिवारी (दि. २६) व रविवारी (दि. २७) येथील बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती व सुत्रधारी कंपनी अंतर्गत वित्त व लेखा, मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान, औद्योगिक संबंध, जनसंपर्क, विधी, सुरक्षा व अंमलबजावणी आदी विभागातील अधिकाऱ्यांच्या या संघटनेच्या दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी (दि. २६) रोजी सकाळी ११ वाजता महावितरणचे संचालक (वित्त) श्री. रवींद्र सावंत यांच्याहस्ते होईल. महापारेषणचे संचालक (मानव संसाधन) श्री. सुमीत गमरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून महानिर्मितीचे संचालक (वित्त) श्री. बाळासाहेब थिटे, महावितरणचे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनात कंपनी व संघटनेसमोरील वाटचाल व आव्हाने, प्रस्तावित धोरणे व कायदे आदींवर विचारमंथन होणार आहे. तसेच ध्येयधोरणांसंदर्भात ठराव व चर्चा, पतसंस्थेची विशेष सर्वसाधारण सभा, कार्यशाळा, केंद्रीय कार्यकारीणी निवडणूक कार्यक्रम होणार आहे.

आयोजनासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री. सुनील पाठक, पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. सतीश तळणीकर, संघटनेचे सरचिटणीस श्री. मनोज ठवरे, संघटन सचिव श्री. संजय खाडे, पुणे-बारामती परिमंडलाचे अध्यक्ष श्री. संजय चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. विजय गुळदगड, सचिव श्री. सतीश फडतरे, विविध आयोजन समित्या, पदाधिकारी व सदस्य परीश्रम घेत आहेत.

नवाब मलिक यांना 14 दिवसांची कोठडी देण्याची ईडीची मागणी

0

मुंबई-अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने नवाब मलिक यांचे नाव घेतले होते. ईडीने त्यांना सकाळी 7.45 वाजता मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी नेले होते.ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक चौकशीत अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते, त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली आहे. मलिकांना अटक केल्यानंतर ईडीच्या पथकाने त्यांना रुग्णालयात नेले आहे, जिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले आहे

नेमके काय आहे प्रकरण –

महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अंडरवर्ल्डशी असलेल्या कथित संबंधांबद्दल सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. नवाब मलिक यांची कुर्ल्यातील जमिनीच्या संदर्भात चौकशी केली जात आहे, जी त्यांनी अनेक वर्षांपूर्वी कवडीमोल दरात विकत घेतली होती, असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्यावर केला. काय आहे हे प्रकरण? 

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह डी-कंपनीच्या सात जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. हे लोक भारतात होत असलेल्या दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा दावा तपास संस्थेने केला आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दावा आणि अल कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध आहेत.अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याचा कट आखला जात असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसाही गुंतवला असल्याचा संशय होता. त्यानंतर ईडीने दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडीने मुंबईत छापादेखील मारला होता. ईडीने दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक केली. तो सध्या ईडी कोठडीत आहे.   अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरविरोधात २०१७ मध्ये ठाणे पोलिसात पैसे उकळल्याचा गुन्हा दाखल झाला होता. ठाणे पोलिसांनी त्यावेळी त्याला बेड्याही ठोकल्या होत्या. तेव्हापासून इक्बाल कासकर तुरुंगात आहे. ईडीने कोर्टात सांगितले की, इक्बाल कासरकर डी गँगचा सदस्य आहे. तो लोकांना धमकावून वसूली करतो. भारतातील सेलेब्रिटींना धमकावून इक्बाल पैशांची वसूली करतो. दाऊदच्या नावाखाली तो लोकांना कोट्यवधी रुपयांना लुबाडत असल्याचेही सांगण्यात आले. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी मुंबईत छापेमारी केली होती. यामध्ये दाऊदचे नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींचा समावेश होता. दाऊद आणि त्याच्याशी संबंधित मालमत्ता खरेदी करणारे, व्यवहार करणारे राजकारणी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती ईडीच्या रडारवर आले होते.या कागदपत्रांच्या आधारे एनआयएने (NIA) नुकताच गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. ईडी छोटा शकीलचा मेहुणा सलीम याची चौकशी करत आहे. बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने सलीम अनेक वेळा पाकिस्तानात गेल्याचा संशय एजन्सींना आहे. तो दाऊद आणि शकीलच्या सांगण्यावरून मुंबईत काम करतो, असा ईडीचा विश्वास आहे. ईडी त्याच्या बँक खाते आणि संपत्तीची माहिती गोळा करत आहे. ईडीला संशय आहे की हे लोक खंडणी, सेटलमेंट आणि ड्रग्सद्वारे पैसे जमा करतात आणि त्याचा वापर दहशतवादी कारवाया किंवा हवालाद्वारे देशविरोधी कारवायांसाठी करतात. ईडी त्यांच्या मनी ट्रेलचा शोध घेत आहे.दरम्यान, दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने आतापर्यंत 6 जणांचे जबाब नोंदवले आहेत. याच प्रकरणी ईडीने 2 बिल्डरांना समन्स पाठवले असून, त्यांचे जबाबही नोंदवले जाणार आहेया संपूर्ण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपींनी डिजिटल वॉलेट आणि डार्कनेटचा वापर करून पैसे इकडे तिकडे ट्रान्सफर केले आहेत. या संपूर्ण प्रणालीचा वापर २०१९ च्या सुमारास सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. खंडणी, ड्रग्ज, रिअल इस्टेट आणि सट्टेबाजीमध्ये अंडरवर्ल्ड अजूनही भारतात सक्रिय असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले

कोर्टातील सुनावणीचे अपडेट्स…

  • कोर्टात सुनावणीदरम्यान, नवाब मलिक यांनी कोर्टाला सांगितले की, त्यांना समन्स बजावण्याच्या बहाण्याने पहाटे घरी आलेल्या ईडीच्या टीमने त्यांना कसे ताब्यात घेतले आणि नंतर समन्सच्या प्रतीवर सही करण्यास सांगितले.
  • यानंतर, ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला सांगितले की, 3 फेब्रुवारी 2022 रोजी दाऊद इब्राहिम कासकरविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. विविध दहशतवादी कारवाया आणि मनी लाँड्रिंगमध्ये त्यांचा सहभाग आहे. दहशत निर्माण करण्यासाठी निधी उभारून अनधिकृतपणे मालमत्ता मिळवण्यातही त्यांचा सहभाग आहे.
  • ASG ने पुढे माहिती दिली की, दाऊदची बहीण हसिना पारकर यांचे निधन झाले आहे. ती येथील दाऊदच्या कारवायांवर नियंत्रण ठेवत होती. पैसा जमवून तिने भरपूर संपत्ती कमावली होती. कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडमध्ये त्यांनी मालमत्ता घेतली होती.
  • ASG: पुढे म्हणाले की, त्याने मालमत्ता कशी मिळवली हे आम्ही (ईडी) सिद्ध करू. मुनिरा आणि मरियम या संपत्तीच्या खऱ्या मालक आहेत. एएसजीने पुढे सांगितले की ही मालमत्ता वडिलोपार्जित मालमत्ता आहे. तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेची ती एकमेव मालक होती.
  • एएसजीने पुढे सांगितले की, हसिना पारकरचा सहकारी सलीम पटेल यांना अतिक्रमण काढण्यासाठी आणि जमीन विकू नये म्हणून पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यात आली होती. 1993 च्या बॉम्बस्फोटात सरदार खानचाही सहभाग होता.
  • एएसजीने पुढे सांगितले की मुनिरा आणि तिच्या बहिणीने मालमत्तेतील त्यांचे हक्क विकण्यासाठी कोणतेही मुखत्यारपत्र दिलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सवरून त्यांना समजले की सरदार खानने ही मालमत्ता विकली होती. सरदार खान हा या जमिनीचे भाडे घेणाऱ्याचा भाऊ आहे.
  • ASG:: मुनिरा आणि तिच्या बहिणीला समजले की ही मालमत्ता नवाब मलिक यांना त्यांच्या एका कंपनीद्वारे विकली गेली.
  • ASG:: मुनिरा यांनी ईडीला सांगितले की त्यांना मालमत्तेसाठी कोणतेही पैसे मिळालेले नाहीत. मालमत्तेच्या योग्य मालकांना एकही रुपया दिला गेला, हे दाखवण्यासाठी काहीही नाही. सलीम पटेल यांनी बेकायदेशीरपणे मालमत्ता विकली.
  • ASG: हसिना पारकरने नंतर नवाब मलिक यांना 55 लाख रुपयांना संपत्तीचे अधिकार हस्तांतरित केले. आमच्याकडे पीएमएलए कायद्याच्या कलम 19 ची अट पूर्ण करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत.
  • ASG: हसिना पारकरने नंतर नवाब मलिक यांना 55 लाख रुपयांना संपत्तीचे अधिकार हस्तांतरित केले. या मालमत्तेची खरी किंमत 3.3 कोटी होती, मात्र ती केवळ 50 लाखांमध्ये खरेदी करण्यात आली. पॉवर ऑफ अॅटर्नीद्वारे बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी करण्यात आली होती. आता त्यांना ही मालमत्ता विकसित करायची आहे. पीएमएलए कायद्याच्या कलम 19 ची अट पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे मलिकांविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत.
  • ASG: पॉवर ऑफ अॅटर्नी असलेले आणि हसिना पारकरचे नियंत्रण असलेल्या सलिन पटेल यांनी आरोपीच्या मालकीच्या एका कंपनीला मालमत्ता विकली.
  • ASG: मलिक यांच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचे सांगत अनिल सिंग यांनी न्यायालयाकडे 14 दिवसांची कोठडी मागितली आहे.

गुंठेवारी नियमीतीकरण अडथळ्यांबाबत अधिवेशनात आवाज उठवणार

0

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा

पुणे- गुंठेवारी नियमीतीकरण करण्याच्या विषयात राज्य सरकारने चुकीचे धोरण अवलंबिले असून, नियमितीकरणासाठी अवाजवी दंड शुल्क आकारले जात आहे, त्यामुळे आगामी अधिवेशनात याप्रश्नी आवाज उठवणार, असल्याचा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. गुंठेवारी नियमीतीकरणासह विविध विषयांवर आज आ.‌पाटील यांनी पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.

२००१ सालच्या गुंठेवारी कायद्यानुसार राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची बांधकामे गुंठेवारी नियमित करण्याचा अधिनियम एकमताने मान्य केला.मात्र या संदर्भात ऑक्टोबर २०२१ मध्ये राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीनुसार गुंठेवारीतील बांधकामे नियमित करण्याचे आदेश काढले. मात्र बहुतांश गावांमध्ये गुंठेवारी मध्ये झालेली बांधकामे ही ९ मीटरच्या आतील रस्त्यांवर आहेत. त्यामुळे नियमीतीकरणासाठी अत्यल्प प्रस्ताव दाखल झाले आहेत. तसेच यासाठीचा प्रशमन शुल्क अवाजवी असून, त्यामुळे गुंठेवारी नियमित करणाचा लाभ सर्वसामान्य नागरीकांना घेता येत नाही. त्यामुळे शासनाने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली असा समज झाला आहे.

या बैठकीला महापौर मुरलीधर आण्णा मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, महिला मोर्चा अध्यक्षा नगरसेविका अर्चना पाटील, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की,”गुंठेवारी हा अतिशय चिंतेचा विषय झाला असून; राज्य सरकारने नियमीत करताना चुकीचे धोरण अवलंबिले असून, अनेकांना खरेदी केलेल्या घरांचा लाभ घेता येत नाही आहे. कारण महाविकास आघाडी सरकारने गुंठेवारीचे नियमीतीकरण करण्यासाठी जे दंडात्मक शुल्क आकारले आहे, ते अतिशय अवाजवी असून, ते सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून यावर आवाज उठवून, सरकारचे लक्ष वेधून घेऊ.”

शिक्षक भरतीवर बोलताना आ. पाटील पुढे म्हणाले की, “शिक्षक भरतीच्या विषयात राज्य सरकारने जे धोरण निश्चित केले आहे. त्यातील धारणा स्पष्टतेसाठी शिक्षण आयुक्तांकडे अनेक दिवसांपासून फाईल धुळखात आहे. त्यामुळे इंग्लिश माध्यमिक शाळा सोडून इतर शाळांमधील शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून करावी लागेल, अशी आग्रही मागणी केली. त्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे.” तसेच शिपाई आणि क्लार्क पदाच्या भरतीसाठी मंत्रालयात पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

म्हातोबानगर मधील रस्त्याचा प्रश्नावर बोलताना आ. पाटील म्हणाले की, कोथरूड मतदारसंघातील म्हातोबानगरमधील रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. हा‌ प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने दोन्ही विकासकांनी ही मान्यता दिली असून, महापालिकेनेही रस्त्याचा आराखडा बदलून करण्यास मान्यता दिली आहे. त्यामध्ये संरक्षण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी)साठी मी स्वतः दिल्लीत पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, इतर महापालिकेप्रमाणे शिक्षण मंडळाच्या स्वयत्तेचा प्रश्न ही आयुक्तांनी मान्य केल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच, मध्यान्ह भोजनाचा विषयावरही या बैठकीत चर्चा झाली असून, १५ मार्चनंतर शाळांमधून मध्यान्ह भोजन सुरू करण्यास आयुक्तांनी होकार दिल्याचेही यावेळी आ. पाटील यांनी स्पष्ट केले.

आता पुढचा नंबर अनिल परब यांचा – किरीट सोमय्या

0

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सकाळपासून नवाब मलिक यांची चौकशी केली जात होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई केली जात आहे. त्यानंतर आता ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. या अटकेनंतर भाजप नेते किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मलिकांनंतर पुढचा नंबर हा अनिल परबांचा असेल असे सोमय्या म्हणाले आहेत.

नवाब मलिकांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये बोलताना ते म्हणाले की, अनिल देशमुखनंतर आता नवाब मलिक यांना अटक झाली आहे. आता तिसरा नंबर अनिल परब यांचा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी कितीही दादागिरी केली तरी आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्रातील सर्व भ्रष्टाचार बाहेर काढणार असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीतील नेत्यावर सातत्याने विविध आरोप केले जात आहेत. यामध्ये किरीट सोमय्या हे आघाडीच्या नेत्यांवर विविध भ्रष्टाचाराचे आरोप करताना दिसतात. याला मविआकडून देखील सडेतोड उत्तर दिले जाते. दरम्यान आता ईडीकडून नवाब मलिकांना अटक करण्यात आली आहे.

शरद पवार, उपमुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते सिल्व्हर ओकवर, यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार मंत्री

0

मुंबई- राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेते सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

दरम्यान, मलिकांवरील अटकेच्या कारवाईमुळे सरकारच्या अडचणीत वाढ झाल्याने या बैठकीत नवाब मलिकांवर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. पहाटेच ईडीची टीम नवाब मलिक यांच्या घरी पोहोचली होती. त्यानंतर सकाळी सातवाजेपासून चौकशी केल्यानंतर मलिक यांना दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास अटक केली.

जामीनासाठी उच्च न्यायालयात जाऊ शकतात नवाब मलिक

0

मुंबई-राज्यातील अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मलिकांना अटक केली याचा अर्थ नक्कीच ईडीकडे त्यांच्या विरोधात सबळ पुरावे असतील. जामीन मिळवण्यासाठी मलिक उच्च न्यायालयात सुद्धा जाऊ शकतात अशी प्रतिक्रिया कायदेतज्ज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली. यासोबतच, मलिक यांच्या विरोधात झालेली कारवाई राजकीय सूड बुद्धीने तर झालेली नाही ना याचा तपास न्यायालयाला करावा लागेल असेही ते पुढे म्हणाले.

जामीनासाठी हायकोर्टातही जाऊ शकतात मलिक

उज्ज्वल निकम यांनी एका माध्यमाशी संवाद साधताना मलिकांची पुढची दिशा काय असू शकते याची माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मलिक यांना ईडीकडून कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी हे पाहावे लागेल. यानंतर ईडी कस्टडी मिळत असेल तर ती न्यायलयीन कोठडीत बदलता येईल. किंवा न्यायालयीन कोठडी असल्यास जामीनासाठी अर्ज करता येईल. यासाठी ते हायकोर्टात सुद्धा जाऊ शकतात. पण, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, ईडीला मलिकांची कोठडी घेण्यासाठी कोर्टात तसे सबळ पुरावे आणि युक्तिवाद मांडावे लागणार आहेत. अटक केली याचा अर्थ त्यांच्याकडे काही सबळ पुरावे असतीलच असे म्हणता येईल. दरम्यान, या अटकेमागे किंवा एकूणच कारवाईच्या मागे काही राजकीय हेतू आहे का याचा तपास देखील न्यायालयाला करावा लागणार आहे. मलिकांची पुढील कारवाई पूर्णपणे न्यायालयाच्या निकालावर विसंबून असेल असेही उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.

तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक

0

मुंब- राज्य सरकारमधील अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने त्यांचे नाव घेतले होते. ईडीने त्यांना सकाळी 7.45 वाजता मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी नेले होते.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक चौकशीत अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते, त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली आहे. मलिकांना अटक केल्यानंतर ईडीच्या पथकाने त्यांना रुग्णालयात नेले आहे, जिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात आहे.

जबरदस्तीने मला ईडी कार्यालयात आणले – मलिक
कोर्टात सुनावणीदरम्यान, नवाब मलिक कोर्टाला सांगितले की, त्यांना समन्स बजावण्याच्या बहाण्याने पहाटे घरी आलेल्या ईडीच्या टीमने त्यांना कसे ताब्यात घेतले आणि नंतर समन्सच्या प्रतीवर सही करण्यास सांगितले. यानंतर, ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला सांगितले की, 3 फेब्रुवारी 2022 रोजी दाऊद इब्राहिम कासकरविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. विविध दहशतवादी कारवाया आणि मनी लाँड्रिंगमध्ये त्याचा सहभाग आहे. दहशत निर्माण करण्यासाठी निधी उभारून अनधिकृतपणे मालमत्ता मिळवण्यातही त्याचा सहभाग आहे. एएसजीने पुढे माहिती दिली की दाऊदची बहीण हसिना पारकर यांचे निधन झाले आहे.

ती येथील दाऊदच्या कारवायांवर नियंत्रण ठेवत होती. पैसा जमवून त्याने भरपूर संपत्ती कमावली होती. कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडमध्ये त्यांनी मालमत्ता घेतली होती. एएसजी पुढे म्हणाले की, त्यांनी मालमत्ता कशी मिळवली हे मी (ईडी) सिद्ध करू. मुनिरा आणि मरियम या संपत्तीच्या खऱ्या मालक आहेत. एएसजीने पुढे सांगितले की ही मालमत्ता वडिलोपार्जित मालमत्ता आहे. तिच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेची ती एकमेव मालक होती.

शरद पवारांची उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा, गृहमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री यांच्यात मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा येथे बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत नवाब मलिक यांच्या अटकेच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे मानले जात आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नवाबच्या अटकेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.

झुकेंगे नहीं लडेंगे और जितेंगे! – मलिक

तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यावेळी त्यांनी माध्यमांना व्हिक्टरी साईन दाखवली. झुकेंगे नहीं लडेंगे और जितेंगे, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली. नवाब मलिक यांचे जेजे रुग्णालयात मेडिकल होईल. त्यानंतर न्यायालयात सुनावणी होईल, अशी माहिती आहे.

ईडी कार्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त
मिळालेल्या माहितीनूसार, ईडीचे पथक मलिकांच्या निवासस्थानी पहाटे 5 ते 6 दरम्यान गेले होते. त्यानंतर 7 वाजेदरम्यान पथक मलिकांच्या घरातून बाहेर पडले आणि 7.45 वाजता ईडीचे पथक कार्यालयात हजर झाले. यादरम्यान ईडीने आपल्या सोबत सीआरपीएफची एक टीम देखील सोबत आणली होती. मलिकांनी ईडीने चौकशीसाठी नेल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी

दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरची आज ईडी कोठडी संपणार आहे. त्यापूर्वी मलिकांना ईडीने चौकशीसाठी नेले आहे. मिळालेल्या माहितीनूसार, इकबाल कासकरने चौकशीदरम्यान, नवाब मलिकांचे नाव घेतल्याचे कळते. ईडी सध्या दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी करत आहे. याचप्रकरणी कासकरला सात दिवस ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, कासकर आणि मलिक या दोघात झालेल्या जमीन व्यवहाराचे काही पुरावे ईडीला मिळाले आहेत. याप्रकरणी ईडीने आणखी दोन बिल्डरांना देखील समन्स बजावले आहे.

“महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर दुकानांवर मराठीच पाट्या…”, उच्च न्यायालयानं व्यापारी संघटनांना फटकारलं ! आणि दंड हि ठोठावला

0

व्यापारी संघटनांची याचिका फेटाळून लावली 

मुंबई -मराठी पाट्यांविषयी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला थेट मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणाऱ्या व्यापारी संघटनेला न्यायालयानं फटकारलं आहे. यासंदर्भात व्यापारी संघटनेनं दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायालयानं त्यांच्या विरोधात राज्य सरकारच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला न्यायालयानं देखील योग्य ठरवलं आहे. राज्य सरकारने जानेवारी महिन्यामध्ये जारी केलेल्या शासन आदेशांनुसार राज्यातील सर्व दुकानांवर इतर भाषांसोबतच मराठी भाषेत देखील पाट्या लावण्याचे निर्देश दिले होते.

राज्य सरकारने १२ जानेवारी रोजी मंत्रिमडळात मराठी पाट्यांविषयी निर्णय घेतला होता यानुसार, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तींचे विनियमन) अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या-मोठ्या दुकानावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत.

या निर्णयाला व्यापारी संघटनांनी विरोध दर्शवला होता. त्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश देताना व्यापारी संघटनेनं दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. “व्यापाऱ्यांना महाराष्ट्रात व्ययसाय करायचा असेल तर सरकारच्या एकसमानतेबाबतचा निर्णय मान्य करायला हवा. शिवाय या निर्णयाने इतर भाषा वापरण्यास मनाई केलेली नाही”, असं न्यायालयाने नमूद केलं आहे.

दरम्यान, व्यापाऱ्यांनी केलेली याचिका न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंड लावून फेटाळली. मराठी भाषा मरणासन्न झाली आहे आणि मराठी शाळा बंद होत असताना व्यापाऱ्यांवर अशा प्रकारे मराठी फलकांची सक्ती केली जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता.

शरद पवारांचे राजकारण जातीयवादी -आ. चंद्रकांत पाटलांचा थेट आरोप

अनिल देशमुखांच्या बाबतीत आता आवाज कमी झाला तसा नवाब मालिकांबाबतही होईल ?

पुणे- पवार साहेबांचा नेहमीच प्रयत्न समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा राहिला, कधी ते मराठा विरुध्द अमराठा करतात ,तर कधी ते अल्प संख्याक विरुध्द अन्य असा निर्माण करतात हे त्यांचे ५० वर्षे चाललेले राजकारण सगळ्या समाजला माहिती आहे, नवाब मलिक प्रकरणी त्यांनी केलेले वक्तव्य यामुळे कदाचित मुस्लीम समाजामध्ये त्यांच्याबद्दल बरे मत होईल पण त्यांनाही माहिती आहे हे सर्व मतांसाठी चाललेले आहे असा स्पष्ट आरोप आज येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला , नवाब मालिकांवर इडी ने केलेल्या कारवाई नंतर शरद पवार यांनी मुस्लीम म्हटले कि दाऊद शी संबध जोडायचा प्रयत्न करण्याचे राजकारण करायचे काय ? अशा स्वरूपाचा प्रश्न उपस्थित केला होता यावर आ. पाटील यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे .आज पुणे महापालिकेतील विविध प्रश्नांबात आयुक्त विक्रम कुमार यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते .भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत यावे म्हणून पुणे पोलीस ठाण्यात नेले जाते असा आरोप पुन्हा पुन्हा करत यांनी 50 वर्षात काय केले? असा प्रश्न देखील पुन्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज केला .पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात …

 “महाविकास आघाडीने अनिल देशमुखांच्या बाबतीत सुरुवातीला बोलताना आता आवाज कमी झाला. आता अनिल देशमुख कोण असा ते प्रश्न विचारत आहेत. तसे होऊ देऊ नका. एखादी चौकशी सुरु असल्याने त्याच्यावर टिप्पणी करणे योग्य नाही. सुरुवातीला आरोप केले जातात. छगन भुजबळ दोन वर्षे आत होते पण कोणत्या कोठडीत होते कोणालाचा पत्ता नव्हता. आता अनिल देशमुख कुठे आहेत हे पण माहिती नाही. त्यामुळे आरोप क्षीण होतील, असे आता नवाब मालीकांबाबत होऊ देऊ नका असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

नवाब मलिकांवर निव्वळ राग काढण्याचे काम सुरू; पूर्वसूचना न देता घेऊन जाणे ही नियमांची पायमल्ली -जयंत पाटील

0

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली असून नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम कदाचित चालू झालेलं दिसत आहे अशी टीका केली आहे. ते म्हणाले की, “हा सत्तेचा दुरुपयोग करण्याचा आणखी प्रकार आहे, कोणतीही, सूचना ने देता पहाटे सहा वाजता येऊन ईडी स्वतःच पोलीस आणत राज्यातील मंत्र्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता घेऊन जाणं ही नियमांची पायमल्ली आहे”.“अलीकडे नवाब मलिक यांनी काही प्रकरणं बाहेर काढली होती, त्याची प्रतिक्रिया म्हणून त्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचं काम करण्याचा प्रयत्न काही लोकं करत आहे. नेमकं कोणते प्रकरण आहे याबद्दल माहिती नाही, गेल्या काही वर्षात असं प्रकरणही दिसत नाही. नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम कदाचित चालू झालेलं दिसत आहे,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया..“मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचं…”

0

मुंबई-जे-जे भाजपच्या विरोधात बोलतात. त्यांच्यावर राज्यातच नव्हे तर देश पातळीवर देखील ईडीचा धाक दाखवून कारवाई केली जाते. नवाब मलिकांवर कारवाई केली जाईल याची कल्पनाही नव्हती. नवाब मलिक हे विरोधात बोलत असल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी दिली आहे.

ईडीने मलिकांना चौकशीसाठी बोलावल्यानंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कधीना-कधी हे होणारच होते. हे काही नवीन नाही. मलिकांवर कारवाई होईल याची कल्पनाही मला नव्हती. मलिक हे गेल्या काही दिवसांपासून, विरोधात बोलत असल्याने त्यांचा आवाज बंद करण्यासाठी मुद्दामुन ही कारवाई करण्यात आल्याचे शरद पवार म्हणाले.“काही झालं तर आणि विशेषकरुन मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घेतलं जातं. मी राज्याचा मुख्यमंत्री असतानाही असा आरोप झाला होता. त्यावेळीही असंच वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. त्याला आता २५ वर्ष झाली. पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, लोकांना त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करण्याचं काम सुरु आहे. जे लोक केंद्र सरकारविरोधात तसंच विरोधात वापरल्या जाणाऱ्या तपास यंत्रणांविरोधात जे भूमिका मांडतात त्यांना हा त्रास देण्याचा प्रयत्न असून तेच घडलं आहे,” असंही शरद पवार म्हणाले.