Home Blog Page 2010

आघाडी सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला, पण भाजपा ओबीसींना २७ टक्के आरक्षण देईल-प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

कोल्हापूर -ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची फसवणूक केली असून पाठीत खंजीर खुपसला आहे. तथापि, आगामी निवडणुकीत भारतीय जनता पार्टी मात्र २७ टक्के तिकिटे ओबीसींना देऊन या समाजाला न्याय देईल, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बातचित करताना दिली.

आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होईल. भाजपा निवडणुकीसाठी सदैव सज्ज असतो. आम्ही निवडणूक लढवू आणि त्यामध्ये भाजपाची उमेदवारी देताना प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत एकूण जागांपैकी २७ टक्के जागांवर ओबीसींना तिकिटे देऊन भाजपातर्फे या समाजाला न्याय देऊ.

त्यांनी सांगितले की, काही काळापूर्वी सहा जिल्हा परिषदांच्या ओबीसी आरक्षित जागा रद्द होऊन पोटनिवडणुका झाल्या असता भाजपाने त्या खुल्या झालेल्या ओबीसींच्या जागेवर ओबीसींनाच तिकिटे देऊन निवडून आणले होते.

ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्च २०२१ रोजी ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केले. न्यायालयाने सांगितलेली ट्रिपल टेस्ट पूर्ण करून हे आरक्षण पुन्हा लागू करणे शक्य आहे. महाविकास आघाडी सरकारने त्यानुसार एंपिरिकल डेटा गोळा करून तिहेरी चाचणी पूर्ण केली असती तर ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा अस्तित्वात आले असते. पण हे सरकार केवळ चालढकल करत राहिले व परिणामी ओबीसी समाजाचे कायमचे नुकसान झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींची फसवणूक केली आहे.

त्यांनी सांगितले की, मुस्लिम समाजातील लोक समजूतदारपणे स्वतःहून मशिदीवरील भोंगे काढण्यास तयार असताना महाविकास आघाडी सरकार मात्र त्यांना भोंग्यांसाठी परवानग्या घेण्याचा आग्रह करत आहे. अशा प्रकारे वर्षभरासाठी कायमची परवानगी देता येत नाही तरीही पोलीस आग्रह धरत आहेत. आघाडी सरकारच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे समाजात तेढ निर्माण होत आहे व मुस्लिमांचे दीर्घकालीन नुकसान होत आहे.

ते म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रास्त मुद्दे मांडले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी त्यांची मागणी आहे. मोठ्या आवाजात हनुमान चालिसा वाजविण्याच्या त्यांच्या इशाऱ्याला सरकारकडून मिळणाऱ्या प्रतिक्रियेमुळे दोन समुदायांना वेगळा न्याय लावला जात आहे हे स्पष्ट होते.

हनुमान चालिसा म्हटले की, राजद्रोहाचा गुन्हा दाखल होणे हा काय प्रकार आहे, असा सवाल करून मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, बाबरी मशिद – राम जन्मभूमीच्या आंदोलनात हजारोंनी बलिदान केले, लाखो लोकांनी सत्याग्रह केला पण हिंदू समाज थांबला नाही. सरकारने याचा विसर पडू देऊ नये.

मोहोळ आणि रासनेंबद्दल वाढतेय नाराजी ?

पुणे- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी पाण्यासाठी गेल्या २६ मार्चला महापालिकेवर उगारलेले अस्त्र असो कि माजी आमदार ,भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पाण्याच्या समस्येसह अन्य प्रश्नांवर अवघ्या २/३ दिवसांपुर्वी महापालिका आयुक्तांचे दालन गाठलेले असो या पक्षाच्या दोन्ही जनहितासाठीच्या अॅॅकटीव्हीटींंकडे; तब्बल ५ वर्षे महापालिकेत पदाधिकारी राहिलेले, मुरलीधर मोहोळ आणि त्याखालोखाल सुमारे अडीच वर्षे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने या दोहोंनी पाठ फिरविल्याने, पक्षाने बलशाली बनविलेले हे दोन्ही माजी पदाधिकारी पक्षांतर्गत वादाच्या भोवऱ्यात सापडू शकणार आहेत असे सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार समजते आहे.

मितभाषी मोहोळांना नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रमांचे वेध लागलेले असतात, ते विविध ठिकाणी अशाच स्वतंत्र पद्धतीने आयोजित कार्यक्रमांत दिसतात,पण प्रत्यक्षात ते पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांची कामे करतात असे वाटत नाही तर रासने कधी कुठे फिरकतच नाहीत अशा स्थितीत या दोहोंकडून शहरातील आणि उपनगरांमधील जनहित ,कार्यकर्त्यांच्या अडचणी याकडे साफ आणि सर्रास दुर्लक्ष झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर पक्षातील स्थानिक ज्येष्ठ आणि सिनीअर नेत्यांच्या बैठकीस अगर कार्यक्रमांना अगर आंदोलनांना डावलण्यात या दोहोंनी कसर सोडलेली नाही असा आरोप हि होतो आहे. पाच वर्षे खऱ्या अर्थाने सत्तेत सहभागी झालेल्या या दोहोंच्या कामगिरीवर तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकीचे यश सामावलेले आहे. परंतु चुकलेल्या नियोजनाची चिंता न करता आपल्याच विश्वात रमणाऱ्या या दोहोंनी जणू काही भाजपा मध्येच सवता सुभा निर्माण केला आहे आणि प्रसंगी ते स्थानिक नेत्यांना ओव्हरटेक करू शकतात अशी स्थिती असल्याचे एकूणच वृत्त सूत्रांनी दिले आहे. शंभर माजी नगरसेवकांना आपापल्या वार्डात समस्यांना तोंड देताना प्रशासनाच्या राजकारणाशी सामना करावा लागतो अशा वेळी त्यांना या दोहोंनी बळ देण्याची गरज भासते परंतु त्यात हे रस दाखवीत नसल्याने त्यांच्याबद्दल नाराजी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

पुणे महापालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील-जगदीश मुळीक

पुणे-निवडणुका कधीही झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज आहे. पुणे महापालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

मुळीक म्हणाले, गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमांतून केलेली विकासकामे, पक्षाने कोरोना काळात केलेले सेवा कार्य, बूथ स्तरापर्यंतची भक्कम संघटनात्मक यंत्रणा आणि पुणेकरांचा विश्वास या जोरावर भाजपची महापालिकेत पुन्हा सत्ता येईल, असा विश्वास वाटतो.

मुळीक पुढे म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी सरकारला ट्रिपल टेस्ट पूर्ण करून हे आरक्षण पुन्हा लागू करणे शक्य होते. परंतु गेल्या दोन वर्षांत एंपिरिकल डेटा गोळा करून तिहेरी चाचणी पूर्ण करता आली असती. न्यायालयात ओबीसींची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली. महाविकास आघाडी सरकारच्या राजकीय उदासिनतेमुळे ओबीसींना राजकीय आरक्षण गमवावे लागले आहे. हा या समाजावर मोठा अन्याय झाला आहे.

राज ठाकरेंचा राजकारणासाठी वापर – राऊत

मुंबई-आज राज ठाकरेंचा वापर भाजपने राजकारणासाठी करून घेतला आहे, आणि हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. भोंग्याचा वाद हा धर्मिक आहे. नवहिंदुत्ववाद्यामुळे हिंदु धर्मातील सप्ताह आणि धर्मिक कार्यक्रम रद्द करावे लागलेत असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. मनसेच्या खांद्यावर बंदुक ठेवत भाजपने हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. असा आरोपही राऊतांनी केला. हिंदुंसाठी आजचा काळा दिवस आहे. आज शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये काकड आरती झाली नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांन वर्षे भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते..यामुळे अनेक भक्तांचा हिरमोड झाला असेही राऊत म्हणाले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी देखील पत्रकारांशी संवाद साधला होता. सकाळी बोलताना त्यांनी मनसेने समान नागरी कायद्याबद्दल बोलणे टाळावे, असे म्हटले होते.राज ठाकरेंच्या माध्यमातून भाजप हिंदू-हिंदूत भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनसेचे या आधीपासूनच मराठी मराठीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता हिंदु धर्मात वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मशिदीचे निम्मत करत मंदिरांना टार्गेट केले – राऊत

भारतीय जनता पक्षाने मनसेला पुढे आणत या प्रकरणी राज्यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मंदिरावर आज भोंगे न लागल्याने लाखो हिंदू बांधवाची गैरसोय झाली. मशिदीवरील भोंग्याचे निमित्त करून मंदिरावरील भोंगे उतरवण्याचे काम भाजप आणि त्यांचे उपवस्त्र असलेल्या मनसेने केले आहे.

हजारो मशिदीत आज अजान झालीच नाही, असे राज ठाकरे म्हणाले असेही खासदार संजय राऊतांनी म्हटले आहे. नियम सगळ्यांसाठी आहे, आणि याचा सर्वाधिक फटका कुणाला बसला असेल तर तो हिंदू धर्मिंयांना असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत केतन धुमाळ, सुजय महादेवन, गगनदीप वासू यांची आगेकूच   


पुणे, 4 मे 2022: एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाबा रॉड्रिक्स अँड सन्स आयटीएफ एस200(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत केतन धुमाळ, सुजय महादेवन, गगनदीप वासू या खेळाडूंनी आपापल्या गटातील मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली. 
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 35वर्षांवरील पुरुष गटात उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या केतन धुमाळ याने पाचव्या मानांकित संभाजी चव्हाणचे आव्हान 6-1, 6-1 असे संपुष्टात आणले. बिगरमानांकीत सुजय महादेवन याने दुसऱ्या मानांकित गणेश देवखिळेवर 6-2, 6-0 असा सनसनाटी विजय मिळवला.  45वर्षांवरील पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित नितीन कीर्तनेने सुजित कुमार टीपीला 6-0, 6-1 असे पराभूत केले.  अकराव्या मानांकित गगनदीप वासूने चौथ्या मानांकित राजीव अरोराचा 6-2, 6-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. 65वर्षांवरील गटात पाचव्या मानांकित एकनाथ किणीकरने चौथ्या मानांकित महेंदर कक्कडचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून आगेकूच केली. 
60वर्षांवरील पुरुष गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित दिपांकर चक्रवर्तीने श्रीकृष्ण कुलकर्णीचा 6-0, 6-1 असा तर, दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या मानांकित अनिल निगमने शिरीष नांदुर्डीकरचा टायब्रेकमध्ये 7-6(1), 6-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. 
निकाल: 35वर्षांवरील पुरुष एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:
केतन धुमाळ(भारत)वि.वि.संभाजी चव्हाण(भारत)[5]6-1, 6-1; अर्जुन उप्पल(भारत)[3]वि.वि.आदित्य अभ्यंकर(भारत)6-2, 6-4; 
सुजय महादेवन(भारत)वि.वि.गणेश देवखिळे(भारत)[2]6-2, 6-0; 
रवींद्रनाथ पांडे(भारत)[1]वि.वि.अभिषेक चव्हाण(भारत)6-2, 6-3; 40वर्षावरील पुरुष एकेरी: पहिली फेरी:
आदित्य खन्ना(भारत)[1]वि.वि.अमित किंडो(भारत)6-4, 6-2; 
रतिश रतुसारिया(भारत)वि.वि.प्रफुल नागवानी(भारत)6-4, 6-1; 
रवी कोठारी(भारत)वि.वि.यशेश मुखी(भारत)7-5, 4-6, 10-7;
सुरेंद्र अल्लम(भारत)[8]वि.वि.कल्पेश मकणी(भारत)6-1, 6-2; 
कौस्तुभ देशमुख(भारत)वि.वि.शांतीश परांजपे (भारत)6-4, 6-0; 
स्वरनदीप सिंग दोडी(भारत)[3]वि.वि.तुषार परदेशी(भारत)6-1, 6-1;
रमजान शेख(भारत)[5]वि.वि.नरेश कुमार अरोरा(भारत)6-0, 6-0;
45वर्षांवरील पुरुष एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:
नितीन कीर्तने(भारत)[1]वि.वि.सुजित कुमार टीपी(भारत)6-0, 6-1; 
गगनदीप वासू(भारत)[11]वि.वि.राजीव अरोरा(भारत)[4]6-2, 6-1; 
सुनील लुल्ला(भारत)[2]वि.वि.जयकिशन लखानी(भारत)[9]6-3, 6-2; 
पराग शहा(भारत)[7]वि.वि.गिरीश कुकरेजा(भारत)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रदर्शनाद्वारे शासनाच्या योजनांची उत्कृष्ट मांडणी- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

    पुणे, दि. ४: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुणे विभागीय प्रदर्शनाच्या माध्यमातून शासकीय योजनांची उत्कृष्ट प्रकारे मांडणी करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.

            जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी आज प्रदर्शनाला भेट दिली. त्यांनी प्रदर्शनाची मांडणी आणि प्रदर्शित महितीबद्दल जाणून घेतले. माहिती अत्यंत आकर्षक आणि सोप्या पद्धतीने  मांडण्यात आली असून नागरिकांना त्यामुळे योजना सहजतेने समजतील असे मत त्यांनी व्यक्त केले.          

            कोरोना असतानाही शासनाच्या विविध विभागांनी गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. या योजना व कामांचा आढावा उत्कृष्टपणे मांडण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी दिलेली भेट याचे द्योतक आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी यावेळी ३६० अंश सेल्फी घेतली.

 नागरिकांचा चांगला प्रतिसाद

            जिल्ह्याच्या विविध भागातील नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू पूर्वा दीक्षित हीने प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात  विकासाच्या दिशेने उचलेली पाऊले आणि शासनाने विविध विभागांना आर्थिक पाठबळ देण्याचे केलेले काम याची माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.

यासोबतच कला, क्रीडा व विविध क्षेत्रातील व्यक्तीनी प्रदर्शनाला भेट दिली व माहिती जाणून घेतली.

            कोरोना संकट काळातही सरकारने चांगले काम केले, गरीब, निराधार व वंचित घटकांसाठी अनेक चांगल्या योजनांच्या माध्यमातून आधार दिला. सरकारने दोन वर्षात सर्व घटकांचा विचार करून शासकीय योजनांची अंमलबजावणी केली आहे. शासनाची ही सर्व ठळक कामगिरी या प्रदर्शनातुन दिसून येत असल्याची प्रतिक्रिया अनेक सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली.

दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण

पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५ व्या) वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण नुकतेच झाले. यासोबतच ट्रस्ट संचलित लक्ष्मीबाई अभ्यासिकेचा शुभारंभ स्व-रुपवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने झाला. आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे सुमारे १२५ विद्यार्थी या अभ्यासिकेचा यावर्षी लाभ घेणार आहेत. 
दत्तमंदिर आणि दत्तभवन येथे झालेल्या कार्यक्रमाला श्री गिरनार संस्थानचे प्रमुख महंत प.पू. सोमनाथ बापू , राष्ट्रवादीचे नेते ,माजी उपमहापौर दीपक मानकर उपस्थित होते. तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, रघुनाथ येमूल गुरुजी, शाहीर हेमंत मावळे, पियुष शाह, स्व-रुपवर्धिनीचे संजय तांबट, अजय कदम, चंदन हायगुंडे, विनोद मोरे, ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख युवराज गाडवे, ज्येष्ठ विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. 
दत्तमहाराजांच्या सानिध्यात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची संधी मिळत असल्याने त्यांच्यामध्ये वेगळी उर्जा निर्माण होणार आहे. तसेच यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. दत्तमंदिराच्या माध्यमातून धार्मिकतेसोबत सामाजिकतेकडे या उक्तीप्रमाणे कार्य सुरु असून यामुळे मंदिरात मिळणारा निधी समाजासाठी वापरला जात असल्याची बाब कौतुकास्पद असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. 
अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रम देखील मोठया प्रमाणात राबविण्यात येणार आहेत. स्व-रुपवर्धिनीच्या सहकार्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि त्यासोबतच पुढील काळात सुसज्ज ग्रंथालय देखील देण्याचा प्रयत्न आहे. चांगल्या कार्याला धार्मिक अधिष्ठान देण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अभ्यासिकेत प्रवेशाकरिता संपर्क विनोद मोरे ८४५९३७८८९५, ७६२०५०२७०२ या क्रमांकावर संपर्क साधावा. अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.पराग काळकर यांनी आभार मानले.

जोपर्यंत भोंग्यांचा विषय पूर्ण निकाली लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार- राज ठाकरेंची भूमिका

मुंबई-मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आज पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली. आमच्या आंदोलनामुळे राज्यात आज 92 टक्के मशिदींमध्ये पहाटेची अजान भोंग्यांवरून झाली नाही, असा दावा राज ठाकरेंनी केला. तसेच, पुन्हा भोंग्यांवरून अजान झालीच तर आम्ही पुन्हा दुप्पट आवाजाने मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

विषय निकाली लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार

हा एक दिवसाचा विषय नाही. ४ तारीख पकडू नका. जोपर्यंत विषय निकाली लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार,” असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

कायद्याचे पालन आम्हीच करायचे का?

भोंग्यांबाबत आम्ही केवळ कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तरीदेखील आमच्यावरच कारवाई का केली जाते, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे. भोंग्यांचा मुद्दा हा धार्मिक नाही. आम्ही सामाजिक भूमिकेतून याला विरोध करत आहे. भोंग्यांचा त्रास सर्वांनाच होतो. त्यामुळे केवळ मशिदींवरील अनधिकृत भोंगे नव्हे तर मंदिरांवरीलही अनधिकृत भोंगे काढावेत, असेदेखील राज ठाकरे म्हणाले. मुंबईत 135 मशिदींकडून नियमांचे उल्लंघन मुंबईत आज 1440 पैकी 135 मशिदींवर पहाटे 5 वाजेच्या आत भोंग्यांवरून अजान झाली. त्यावर राज्य सरकार कारवाई करणार का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. काल आपली मुंबई पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्याशी चर्चा झाली. तेव्हा मशिदींच्या मौलवींशी आपली चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पहाटे 5 च्या आत अजान होणार नाही, असे देखील विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले होते. मग, अजान कशी झाली, नियम फक्त आमच्यासाठीच आहेत का, असेही प्रश्न राज ठाकरेंनी केले. आंदोलन सुरूच राहणार मनसेतर्फे भोंग्यांविरोधात करण्यात आलेले आंदोलन आजच्या पुरते मर्यादित नव्हते. जोपर्यंत सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे कायमचे उतरत नाही व ही सामाजिक समस्या कायमची संपत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असेदेखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे का?

महाराष्ट्र सैनिकांना, हिंदू बांधवांना हेच सांगायचंय ही हा एका दिवसाचा विषय नाही. हनुमान चालिसाशिवाय समजणार नसेल तर दुप्पट आवाजात वाजवा. मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलीस काय कारवाई करणार हे एकदा समजू दे. ते धर्माला घट्ट राहणार असतील तर आम्हालाही रहावं लागेल. ३६५ दिवस दिवसभरात चार, पाच वेळा लावणार असाल तर आम्हाला नाही ऐकायचंय. यांचा धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे का? पोलिसांनी हे भोंगे खाली आणले पाहिजेत. जी प्रार्थना करायची ती मशिदीत करा,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.हनुमान चालीसा वाजवणार म्हणजे वाजवणार, राज ठाकरेंचा इशारादिवसभर जी काही चार-पाच वेळा बांग दिली जाते त्यांची प्रार्थना म्हणतात ती जर परत त्यांनी दिली तर आमची लोकं त्या त्या वेळा हनुमान चालीसा वाजवणार म्हणजे वाजवणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन तुम्हाला करायचं असेल तर त्यांनी दिलेल्या डेसिबलचं पालन करावं लागेल. लोकवस्तीमध्ये ४५ ते ५५ डेसिबलपर्यंत स्पीकर लावू शकता. आम्हाला सणांसाठी दिवस बघून परवानगी देता आणि यांना ३६५ दिवस परवानगी देता ती कशासाठी? ४५ ते ५५ डेसिबल म्हणजे आमच्या घरचे मिक्सर जेवढे वाजतात तेवढा आवाज असं राज ठाकरे म्हणाले.

महापालिका ,झेडपी निवडणुकांच्या तारखा २ आठवड्यात जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम २ आठवड्यात जाहीर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं दिल्या आहेत. ओबीसी आरक्षणावरील अंतिम सुनावणीत हे आदेश देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टात विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर हे आदेश देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टात राज्य सरकार बाजू मांडण्यास कमी पडलं, असा आरोप चंद्रशेखर बावकुळे यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दोनआठवड्याच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याच निर्देश दिले आहेत. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनी असहमती दर्शविली होती. राज्य विधिमंडळात यासंदर्भातील कायदाही मंजूर करण्यात आला होता. मात्र, आता न्यायालयाने पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार काय पाऊल उचलणार, हे पाहावे लागेल.

आरक्षण विरहित प्रभाग रचना

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण विरहित प्रभाग रचना जाहीर केली होती. अंतिम प्रभाग रचना दुरुस्तीसह प्रसिद्धीचे वेळ आली असताना अचानक राज्य सरकारने ओबीसी आरक्षण नसल्यामुळे विधिमंडळात विधेयक कायद्याद्वारे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार आपल्याकडे घेतले होते. आता पावसाळा असल्याने जून किंवा जुलै महिन्यामध्ये निवडणुका घेणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने दाखल केले होते.

ओबीसी आरक्षण महत्त्वाचा मुद्दा

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाचे आरक्षण टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले नाही, तसेच ओबीसी आरक्षण बाबतही राज्य सरकार आपली स्पष्ट भूमिका मांडू शकत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपच्या वतीने करण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी समाजाला बांधून ठेवण्यासाठी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार आपल्याकडे घेत निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. परंतु आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार 15 दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे.

राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून सशर्त जामीन:माध्यमांशी बोलण्यास मनाई

0

मुंबई- अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 23 एप्रिलपासून राजद्रोहाच्या आरोपाखाली भायखळा तुरुंगात होते.30 एप्रिल रोजीच न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल 2 मेपर्यंत राखून ठेवला होता. न्यायालयाने त्यांना आता सशर्त जामीन मंजूर केला आहे.दोघांनाही 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे. सोमवारी वाढीव मुदतीमुळे मुंबईच्या दिवाणी व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. रोकडे यांची ऑर्डर पूर्ण होऊ शकली नव्हती.

न्यायालयाच्या या आहेत अटी…

  • राणा दाम्पत्याने चौकशीत सहभागी होत राहावे
  • अशा प्रकारचे आणखी कोणतेही वादविवाद करू नये
  • पुराव्यांशी छेडछाड करू नये
  • या संपूर्ण प्रकरणावर कोणतीही पत्रकार परिषद घेणार नाही
  • राणा दाम्पत्याविरुद्ध भादंविच्या कलम 15A, 353 तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय राणा दाम्पत्यावर 124A म्हणजेच देशद्रोहाचा गुन्हाही दाखल आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणाचे आवाहन केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राणा दाम्पत्याला 6 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीचा आदेश होता.

कायदा मोडण्याऱ्यांना साथ देणे आघाडी सरकारने बंद करावे -भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील

मुंबई-हनुमान चालिसा म्हणण्याची इच्छा व्यक्त केल्यावर महाविकास आघाडी सरकारने एक खासदार व एका आमदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असे सांगणाऱ्यांवर आघाडी सरकार कारवाईचा वरवंटा फिरवत आहे. महाविकास आघाडी सरकारने कायदा मोडणाऱ्यांना साथ देणे बंद करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी मंगळवारी केले.
आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीने संविधानाची चौकट ओलांडणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने लाऊड स्पीकरच्या वापरावर निर्बंध घातले आहेत, त्याचे पालन करावे असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देशासाठी कायदा असतो. त्याचे पालन करण्याचे आवाहन करणाऱ्या राज ठाकरे यांच्या विरोधात आघाडी सरकारने गुन्हा दाखल केला आहे. उलट या आदेशाचे उल्लंघन करून लाऊडस्पीकरचा वापर करणाऱ्यांच्यावर कारवाई टाळून राज्य सरकार कायदा मोडणाऱ्यांना साथ देत आहे. आघाडी सरकारची भूमिका कायद्याचे राज्य ही संकल्पना उधळून लावणारी व संविधानाचा अपमान करणारी आहे. सत्तेच्या जोरावर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना साथ देणे म्हणजे राज्यात अराजक निर्माण करणे आहे. भारतीय जनता पार्टी याचा निषेध करते.
महाविकास आघाडी सरकारने संविधानाचा आदर केलाच पाहिजे व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेच पाहिजे, अशी आपली मागणी आहे, असेही आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

राज ठाकरे भूमिकेवर ठाम…सोशल मीडियावर पत्रक प्रसिद्ध

मुंबई : भोंग्यांबाबत राज ठाकरेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा कालावधी आज संपणर आहे. त्यातच आज त्यांच्यावर औरंगाबादच्या सभेत नियमांचं उल्लंघन केल्यामुळं गुन्हा दाखल झाला आहे.यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणारे  पत्रक राजठाकरे यांनी सोशल मीडिया त  फेसबुक, ट्विटर वर मराठी, हिंदी इंग्रजी भाषेत पोस्ट केले आहे. 

काय म्हटलंय मनसेच्या पत्रकात?

माझ्या प्रिय देशवासीयांनी आणि हिंदू बांधव, भगिनी, मातांनो,

अक्षय्य तृतीया, दि. ३ मे २०२२

उद्या ४ मे. मशिदीवरचे भोंगे ४ मेपर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितलं होत. परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. या देशातल्या राज्य सरकारांतता प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देतोय. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध रुग्ण अशक्त व्यक्ती लहान मुले, विद्यार्थी यांना भोग्याच्या आवाजामुळे होणान्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे. त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की “रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल, परंतु ३६५ दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी ही रोज घ्यावी लागेल.”

ध्वनिक्षेपक किती क्षमतेने लावावा त्याबाबतच्या मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या आहेत. या मर्यादा मी तुम्हाला मुद्दामहून सांगत आहे. लोकवस्ती असेल त्या भागात कमीतकमी १० डेसिबल आणि जास्तीतजास्त ४५ ते ५५ डेसिबल आवाजात ध्वनिक्षेपक लावता येतो. लक्षात घ्या १० डेसिबल म्हणजे आपण कुजबुज करतो तो आवाज आणि ५५ डेसिबल म्हणजे आपल्या घरातल्या मिक्सरचा आवाज

प्रश्न असा आहे की, सर्व भोंगे हे अनधिकृत आहेत. भोंगेच कशाला, बहुतांश मशिदीही अनधिकृत आहेत. हे सरकार अनधिकृत मशिदीवरील भोग्यांना अधिकृत परवानग्या का आणि कशी देते? आणि जर परवानगी देणार असाल तर आम्हालाही हिंदू देवळांनाही भोंगे लावण्याची परवानगी द्यायला हवी. मुळात हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. देशातील सर्वधर्मीयाना ध्वनिक्षेपकामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. ही बाबच देशातल्या प्रत्येक सरकारला समजलीच पाहिजे. रस्त्यावर नमाजासाठी बसणं आणि वाहतूककोंडी करणं, हे कोणत्या धर्मात बसती म्हणूनच आमचे मुस्लिमधर्मियांना एवढंच सांगणे आहे की, हा सामाजिक विषय आहे. हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मनीच दिलं जाईल.

देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोग्यांवर हनुमान चालीसा लावावी. भोंग्यानचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू दे.

आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही.

कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की, या देशात, या राज्यात ‘कायद्याचं राज्य’ आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. त्यांनी अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर होणारे नमाज पठण यांना जबाबदार असलेल्या लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा.

हिंदूंच्या सणांना सायलन्स झोन, शाळा, रुग्णालय अशा सर्व प्रकारच्या अटीशर्तीच्या नावाखाली मर्यादा घालायच्या, परंतु मशिदींना कोणत्याही प्रकारच्या अटी घालायच्या नाहीत! भारतीय संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसते? म्हणूनच हिंदूंनो,

१. त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा.

२. सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत.

३. मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या १०० या क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांचा त्रासाबाबत तक्रार करावी. रोज करावी.

सामाजिक भान बाळगत ज्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्या मशिदींशी संबंधित लोकांच्या स्तुत्य निर्णयाचे मी स्वागत करतो. तसंच, जिथे भोंगे उतरवण्यात आले आहेत, त्या मशिदींच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही, याची हिंदू बांधवांनीही काळजी घ्यावी.

मला पूर्ण कल्पना आहे की, आपल्या देशात असे अनेक मुस्लिम नागरिक आहेत ज्यांना भोंग्यांचा त्रास होतो. पण कर्मठ धर्मगुरूंपुढे, कट्टर धर्मवाद्यांपुढे त्यांना बोलत येत नाही. ते असो. देशातल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनी भोंग्यांविरोधात काम सुरू करावे. हा विषय एका दिवसात सुटणारा नाही, याचीही मानसिक तयारी ठेवावी. देशातल्या सर्व राज्यकर्त्यांना हे भोंगे बंद पाडण्यास भाग पाडावे. आणि शेवटी एकच सांगतो, प्रत्येक राज्यातल्या नागरिकांनी आपापल्या सत्ताधारी राज्यकर्त्यांना हिंदूंची ताकद काय आहे; हे दाखवून द्यावे.

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी “सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत” हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.

देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल! हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे.

माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून

एकत्र या.

आता नाही, तर कधीच नाही.

‘पुरुष वेश्या’ मराठी कादंबरीचा नायक होणे क्रांतिकारी-डॉ. श्रीपाल सबनीस

 डॉ. माधवी खरात लिखित ‘जिगोलो’ कादंबरीचे प्रकाशन
पुणे : “आंबेडकरी साहित्य म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेला शिव्या घालणे नाही, तर त्यापलीकडे स्त्रीवादी प्रश्न, स्त्रीशी निगडित पुरुषाचे प्रश्न, स्त्रीच्या मादी असण्याचे प्रश्न, सन्मानाने जगण्याचे हक्क, माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा अशा कितीतरी गोष्टी आंबेडकरी साहित्यात असणे गरजेचे आहे. लैंगिकतेवर भाष्य करणारे साहित्य मराठी साहित्यात अभावाने दिसते. अशा प्रकारचे नाजूक विषय हाताळणे आणि पुरुष वेश्या हा मराठी कादंबरीचा नायक होणे हे क्रांतिकारी आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

फोरसाईट फाउंडेशन आणि चेतक बुक्स यांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी खरात यांच्या ‘जिगोलो’ कादंबरीचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, फोरसाईट फाउंडेशनचे डॉ. दिनकर खरात, चेतक बुक्सचे कुणाल हजारी, सुधीर भोंगळे आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “डॉ. खरात यांची कादंबरी विस्फोटक, स्त्री-पुरुषांच्या सेक्स आणि संवादाचा गुंता आहे. न बोलला जाणारा, चर्चेत न येणारा प्रश्न आहे. सांस्कृतिक दडपण, नीतिमत्ता यात अडकून पडलेल्या स्त्रीचे दुःख समोर येत नाही. पुरुष वेश्या सर्वत्र असून, ते चांगले की वाईट हे लेखिका सांगत नाही. वास्तव मांडण्याचा प्रयत्न आहे. सेक्ससाठी जातीपातीचे बंधन नाही. पुरुष बऱ्याचदा नीरस, रुक्ष व अरसिक वागतात. परिणामी, अनेक संसार उद्धवस्त होतात. या गुंत्यांविषयी उद्बोधन व्हायला हवे. राजकारण, समाजकारण सारेच नागवे होत असेल तर फक्त लैंगिक संबंध हाच विषय नैतिकता आणि संस्कृतीच्या नावाखाली लपवून ठेवले जात असतील, तर संस्कृती कशी जपली जाईल. संस्कृती तकलादू अधिष्ठानावर टिकत नसते. सेक्ससंदर्भातील कोंडी फोडणे काळाची गरज आहे.”
सुनिताराजे पवार म्हणाल्या, “जागतिकीकरणाने जग पुढे गेले असले, तरी अनेक नवे प्रश्न उद्भवले आहेत. वेश्या हा विषय येतो, तेंव्हा फार काही चांगल्या भावना मनात येत नाहीत. त्यातही पुरुष वेश्या हा विषय साहित्यात कदाचित पहिल्यांदाच येत असावा. आपली संस्कृती भोगावर नव्हे, तर त्यागावर आहे. त्यामुळे असे विषय आपल्या भुवया उंचावणारे वाटतात. पण हे सत्य आहे. लघु कथेतील मर्यादा कादंबरीत नसते. पैशाने समाधान विकत घेता येत नाही, हेच या कादंबरीतून समजते. अत्यंत बोल्ड विषय अत्यंत संयत पद्धतीने लेखिकेने मांडला आहे. हेच कादंबरीचे बलस्थान आहे. जोवर सामाजिक घुसळण होत नाही, तोवर त्यावर उपाय शोधले जाऊ शकणार नाही.”

डॉ. माधवी खरात म्हणाल्या, “स्त्रीच्या वेदना हजारो काळापासून खूप मोठ्या होत्या. पण हा विषय ठरवून घेतला नाही. ओघाने संपर्कात आलेल्या एका मुलाने माझी विचारांची पातळी बदलली. अशा मुलांची एजंसी त्यांच्यावर खूप काम करतात आणि खूप पैसे कमावतात. जगण्याची जीवनाची आगतिकता, जीवन एवढे खोल असते हे तेव्हा जाणवले. विसंगती जीवनाचा भाग असते. अनेक राष्ट्रांमध्ये ‘जिगोलो’ हा नवीन भाग नाही. मनातला सुसंस्कृतपणा कायम असतो. पण अपरिहार्यता त्यांना तिथे आणते.”

संजय आवटे म्हणाले, “एवढा नाजूक विषय लेखिकेने धीटपणे हाताळला याचे कौतुक वाटले. आपल्या दांभिक समाजात आपण ठरवून काही बोलत नाही. पण हा विषय महत्त्वाचा आहे. इंग्रजीत असे विषय आले आहेत. पण मराठीत असा विषय घेऊन ‘जिगोलो’ला नायक करणे ही मोठी गोष्ट आहे. मराठी साहित्यात प्रगल्भ विषय व मांडणी आणणे गरजेचे आहे. जर जगणे थेट आहे, तर लेखन का थेट नको. धीटपणे बोलले आणि मांडले पाहिजे. खुलेपणाने माणसे वाचता आले नाही, याबाबत बोलले गेले नाही, म्हणून साहित्य मागे राहिले आहे.”

बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. “साहित्यिकाने भूमिका घ्यायला हवी. तटस्थ राहणे हा भ्याडपणा आहे. समाजाला अराजकतेतून बाहेर काढून दिशा दर्शन करण्याचे काम साहित्यिकाने करावे,” असे त्यांनी सांगितले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ दिनकर खरात यांनी आभार मानले.

राष्ट्रीय सुरक्षा आणि देशातील नागरिकांचे संरक्षण याला मोदी सरकारचे सर्वोच्च प्राधान्य

0

नवी दिल्ली, 3 मे 2022

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज बेंगळूरू इथे एनएटीजीआरआयडी अर्थात राष्ट्रीय गुप्तचर ग्रीड परिसराचे  उद्‌घाटन केले. या उद्‌घाटन सोहोळ्यात उपस्थितांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले की दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही असे धोरण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पहिल्या दिवसापासूनच स्वीकारले आहे.

हवाला व्यवहार, दहशतवाद्यांना पैसा पुरविणे, बनावट चलन, अंमली पदार्थ, बॉम्बस्फोटाची धमकी, बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी आणि दहशतवादाशी संबंधित इतर कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक राष्ट्रीय माहितीकोष विकसित करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. महत्त्वाच्या माहितीसंदर्भातील अडथळे दूर करण्यात आल्यामुळे गुप्तचर यंत्रणा तसेच कायदेविषयक संस्था आता या माहितीचा उपयोग करून घेऊ शकतील असे ते म्हणाले. डाटा अनॅलिटिक्स तसेच माहिती तंत्रज्ञान यांच्या मदतीमुळे आता या संस्थांच्या सध्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठे परिवर्तन व्हायला हवे. एनएटीजीआरआयडी माहितीच्या विविध स्रोतांना जोडण्याची जबाबदारी पार पाडेल असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.

एनएटीजीआरआयडीच्या प्रणालीचे सतत आधुनिकीकरण होण्याची यंत्रणा त्यात समाविष्ट असायला हवी अशी अपेक्षा शाह यांनी व्यक्त केली. देशात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांच्या कार्यपद्धतीच्या माहितीचा कोष निर्माण करणारा एक अभ्यासगट एनएटीजीआरआयडी या संस्थेत असायला हवा असे ते म्हणाले.

या प्रणालीचा वापर करणाऱ्या संस्थांनी सावधानता आणि दक्षता बाळगावी आणि केवळ योग्य कारणांसाठीच या माहितीचा वापर करावा असे त्यांनी  वापरकर्त्या संस्थांना सांगितले. या प्रणालीतून प्राप्त माहितीचा वापर शक्य तितक्या अधिक प्रमाणात त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी केला जाईल हे देखील या संस्थांनी सुनिश्चित करावे असे ते म्हणाले. माहितीची गोपनीयता  आणि सुरक्षितता ही अत्यंत गंभीर बाब आहे यावर जोर देत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी, या प्रणालीच्या माध्यमातून कोणत्याही वेळी कोणत्याही नागरिकाची वैयक्तिक माहिती मिळविण्याचा बेकायदेशीर मार्ग उपलब्ध नसेल याची सुनिश्चिती करण्यासाठी आवश्यक नियम लागू करण्यात आले आहेत असे सांगून उपस्थितांना आश्वस्त केले.

जयंतीनिमित्त बेंगळूरू येथे बसवण्णा यांना अमित शाह यांनी वाहिली आदरांजली

0

नवी दिल्ली, 3 मे 2022

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बसव जयंतीनिमित्त आज बेंगळूरू येथे बसवण्णा यांना आदरांजली वाहिली. तसेच दुसऱ्या एका कार्यक्रमात शाह यांनी नृपतुंग विद्यापीठाचे उद्‌घाटन केले तसेच इतर विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि  पायाभरणी केली.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की,हे वर्ष स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे वर्ष आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याला 75 वर्षे झाली आहेत आणि देशातील लोकांनी आपापल्या पद्धतीने या राष्ट्र उभारणीमध्ये योगदान दिले आहे. या 75 वर्षांच्या प्रवासात देशाने अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीचे 75 वे वर्ष अनेक महत्त्वाच्या घटनांसह साजरे करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे युवकांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांविषयी जाणून घेऊन राष्ट्रभक्ती स्वतःमध्ये बिंबवत देशाला भविष्यात पुढे न्यावे. स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष म्हणजे निश्चय करण्याची वेळ आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने अशी शपथ घ्यायला हवी की मी येत्या 25 वर्षांत देशाच्या विकासात योगदान देईन आणि आपल्या भारताला स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत म्हणजे 2047 पर्यंत जागतिक पातळीवरील आघाडीचा  देश बनवून स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण करीन. ते म्हणाले की जेव्हा 130 कोटी लोक अशी शपथ घेतील तेव्हा देश 130 कोटी पावले पुढे टाकेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक प्रयत्न आणि प्रत्येक विचार हा देशाला प्रत्येक क्षेत्रात  जगामधील सर्वोत्तम देश कसा बनवता येईल याचसाठी असतो आणि त्यासाठीच त्यांनी अनेक उपक्रम सुरु करून ते निश्चयाने  राबविले देखील आहेत असे अमित शाह यांनी सांगितले.

 कलम 370 आणि 35अ यासारखे अनेक मुद्दे मोदी यांनी निकाली काढले असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सांगितले. औद्योगिक क्षेत्रात अनेक नव्या योजना राबवून आम्ही भारताला औद्योगिक केंद्र बनविण्यासाठी काम करतो आहोत.जर भारत उत्पादन क्षेत्रातील मोठे केंद्र होऊ शकला तर ते आपल्यासाठी दोन दृष्टींनी महत्त्वाचे आहे. एक म्हणजे 130 कोटी लोकसंख्येचा मोठा बाजार उपलब्ध असणे आणि दुसरे म्हणजे जर भारत उत्पादनाचे मोठे केंद्र बनला तर देशातील युवकांना देखील जास्त संधी उपलब्ध होतील असे त्यांनी सांगितले. अमित शाह म्हणाले की नरेंद्र मोदी सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये मोठे यश मिळविले आहे आणि त्यामुळे जेव्हा देश स्वातंत्र्यप्राप्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असेल तेव्हा तो जगातील सर्वोच्च स्थानी असेल आणि तेव्हा देशाची घोडदौड कोणीही रोखू  शकणार नाही यावर लोकांचा विश्वास वृद्धिंगत झाल्याचे शाह यांनी सांगितले.