Home Blog Page 1989

वैष्णवी पाटीलसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे- लाल महालामध्ये लावणीची रिल्स केल्यामुळे शिवप्रेमींनी मोठा संताप व्यक्त केला होता.या प्रकरणी आता फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मराठी कलाकार वैष्णवी पाटीलसोबत इतर तीन जणांविरोधात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी राकेश विनोद सोनवणे यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी लाल महालात आरोपी वैष्णवी पाटील व तीच्या सोबत असलेली एक स्त्री व दोन पुरुष असे लाल महाल येथे येऊन लाल महालाच्या आतील मोकळ्या जागेत वैष्णवी पाटील हिने लावणी नृत्य केले. तिच्यासोबत असलेल्या पुरुषांपैकी दोन पुरुषांनी त्याचे मोबाईलमध्ये शुटींग करून त्याचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केला.यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी यावर आक्षेप घेतला होता. या प्रकरणात लाल महालाचे रखवालदार सोनवणे यांनी फिर्याद दिली. यावर बोलताना सोनवणे म्हणाले, मी त्यांना लावणी नृत्य व त्याचे शुटींग करण्यापासून रोखले होते. पण त्यांनी ते ऐकले नाही.

वैष्णवी पाटीलने मागितली माफी-

या सगळ्या प्रकरणावर वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये माफी मागत वैष्णवीने म्हणाली, ‘पुण्याच्या लाल महालात व्हिडीओ शूट करताना माझ्या मनात कोणतेही वाईट विचार नव्हते. गाणं सुंदर असल्याने त्यावर व्हिडीओ करावा असे माझ्या मनात आले. त्यामुळे मी त्यावर मी व्हिडीओ शूट केला. लाल महालात मी व्हिडीओ शूट केला ही माझ्याकडून चूक झाली आणि ती चूक मी मान्य करते. जितकेही शिवप्रेमी आहेत, जी जनता माझ्यावर प्रेम करते, माझ्या नृत्यावर प्रेम करते त्या सर्वांची मी माफी मागतें.’ असा व्हिडीओ वैष्णवीने पोस्ट करत माफी मागितली आहे.

लाल महालातील शुटींग -प्रशासक जबाबदार नाहीत काय ?

लाल महालात लावणीच्या शुटिंग वरुन वाद निर्माण झाला आहे. लाल महालातल्या मध्यवर्ती ठिकाणी संबंधित तरुणी लावणीवर आदाकारी करत असल्याचे एका व्हिडीओ मधून समोर आले आहे. या प्रकरावरती संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप घेतला आणि या प्रकरणी कलाकर आणि पालिका प्रशासाकावर कारवाई करण्याची संभाजी ब्रिगेडची आहे. दरम्यान या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. पुण्यातील लाल महालात तरुणी लावणीवर बेभान होऊन अदाकारी करताना व्हिडीओमधून दिसत आहे. यावर संभाजी ब्रिगेडकडून तीव्र आक्षेप करण्यात येत आहे, महाराष्ट्राच्या स्मृतीस्थळावर बिभत्स पद्धतीने गाणे वाजवले जाते, नृत्य केले जाते. मला पुण्याच्या पोलिस आयुक्तांना विनंती करायचीय, तुम्ही जातीने लक्ष घालून फरासखाना पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली 

भारतीय ब्राह्मण महासंघाने शरद पवारांसोबतच्या बैठकीला हजर न राहण्याचा निर्णय घेतलाय

पुणे-राज्यातील वाढता जातीय तेढ आणि ब्राह्मणविरोध असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज म्हणजेच शनिवारी, २१ मे रोजी ब्राह्मण संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.ब्राह्मण महासंघाने मात्र या बैठकीचे निमंत्रण नाकारले आहे. शरद पवारांनी मंत्री छगन भुजबळ आणि अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानांबाबत आधी भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

शरद पवार यांच्या या बैठकीला जायचे की नाही यावर ब्राह्मण संघटनांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. परशुराम सेवा संघ, ब्राह्मण महासंघ या संघटनांनी पवार यांचे निमंत्रण नाकारले असून या बैठकीला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ब्राह्मण महासंघाचा कोणताही पदाधिकारी या बैठकीला जाणार नसल्याचे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले आहे. तर अन्य संघटना या बैठकीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

आनंद दवे म्हणतात ,’ समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, गडकरी पुतळे, पुणेरी पगडी, संभाजी ब्रिगेड, श्रीमंत कोकाटे, बाबासाहेब पुरंदरे हे जुने विषय जरा बाजूला ठेवू. पण अगदी परवाच्या प्रकरणानंतर शरद पवार यांनी आमदार अमोल मिटकरी यांना त्यांचे वक्तव्य माघार घ्यायला सांगायला हवे होते. उलट दुसऱ्या दिवशी त्यांनी शाहू महाराज आणि ज्योतिष यांची गोष्ट सांगितली. त्याच व्यासपीठावर त्यांच्याच उपस्थितीत मंत्री छगन भुजबळ यांनी पुरोहित हे धंदा करतात (व्यवसाय नाही) हा शब्द वापरत पुन्हा टिंगल केली आणि आरक्षणाचं चुकीचं उदाहरणं दिलं.देवांचा बाप असल्याचा पण साक्षात्कार शरद पवार यांना अगदीच काल, परवा झाला. केतकी चितळे पूर्णतः चुकल्याचे मान्य आहे. आपण पण तिच्यावर टिकाच केली. पण शरद पवार यांनी जर केतकी यांना माफ करून गुन्हे मागे घेण्यास सांगितले असते तर ते खूप मोठे झाले असते. पण केतकी यांच्यावर २८ ठिकाणी गुन्हे दाखल केले, त्याच पोलिसांनी मिटकरी यांच्यावर मात्र एकही गुन्हा नोंदवला नाही. आपल्या आंदोलनानंतर राज्यभर समाज जागा झाला, पण तरीही त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली (दिवंगत माणसावर टीका करत नाहीत शक्यतो कोणीच)आपला शरद पवार यांना व्यक्तिगत काहीच विरोध नाही, त्यांच्या मतदार संघातील ब्राह्मण समाज सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याच फारसे ऐकीवात नाही. पण राजकीय फायद्यासाठी शरद पवार ब्राह्मण समाजाचा वापर करतातं हे निश्चित. त्यांनी आधी मिटकरी, भुजबळ यांच्या वक्तव्यांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी एवढीच अपेक्षा आहे. अर्थात ज्या ज्या वेळेस शरद पवार किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जातीय उल्लेख केले आहेत त्या वेळेस अन्य राजकीय पक्ष सुद्धा मूग गिळून गप्प असतात हे सुद्धा तितकच दुर्दैवी सत्य. त्यामुळे शरद पवार यांना सार्वजनिक व्यासपीठावर भेटण्याची ही वेळ नाही. त्यातून दुरावा आणखी वाढेल असे आम्हाला वाटते, असे दवे यांनी स्पष्ट केले.

लाल महालाच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकार नियुक्त प्रशासकाची -राष्ट्रवादीचे आंदोलन ही तर नौटंकी: भाजपा

पुणे- लाल महालाच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेची आहे. सध्या पालिकेत प्रशासक आहे. त्यावर राज्य सरकारचे नियंत्रण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आंदोलन ही नौटंकी आहे.म्हणजे हे आंदोलन राज्य सरकार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्याच विरोधात करत आहेत. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी ते ही नौटंकी करीत आहेत.असा आरोप करत भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी लालमहल येथे चित्रित केलेले लावणी नृत्य समाजमाध्यमात व्हायरल करुन भावना दुखावल्याप्रकरणी कठोर कारवाई करा अशी मागणी केली आहे. सदर प्रकारामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या असून आपण स्वतः या प्रकरणी लक्ष घालून तातडीने कारवाई करावी अशी मागणीहि भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन केली. आमदार माधुरी मिसाळ त्यांच्या सोबत होत्या.

ते म्हणाले,’ हिंदुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने आणि पराक्रमाने पावन झालेला लालमहल समस्त हिंदुंसाठी एक पवित्र स्थान आहे. ही केवळ एक वास्तू नसून हिंदवी स्वराज्याचा इतिहासाचे सोनेरी पर्व यात दडलेले आहे. त्यामुळे या वास्तुची गरिमा, पावित्र्य राखणे अत्यंत आवश्यकच आहे. समाजमाध्यमात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदर व्हिडिओ हा लालमहलमध्ये चित्रित केला गेला असून यात लावणीवर नृत्य केल्याचा प्रकार आहे. लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असली, तरी त्याचे सादरणीकरण करण्यासाठी वेगळी व्यासपीठे उपलब्ध आहेत. मात्र तरीही लालमहलमध्ये हा प्रकार घडला. हे जितके धक्कादायक आहे, तितकेच चीड आणणारेही.

मुळीक पुढे म्हणाले, नृत्य सादर केल्याप्रकरणी नृत्यांगनेवर कारवाई तर करावीच, शिवाय तीला आतमध्ये जाण्यास कोणी मदत केली? सुरक्षारक्षक काय करत होते? जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका काय? याचीही उत्तरे मिळवून योग्य ती कारवाई तातडीने करावी, अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे.

भारतीय तटरक्षक दलाने 218 किलो हेरॉईन केले जप्त

0

नवी दिल्‍ली-

मे 2022 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दोन भारतीय नौका तामिळनाडूच्या किनार्‍यावरून निघणार  आहेत आणि अरबी समुद्रात कुठेतरी त्यांना अंमली पदार्थांचा मोठा साठा मिळेल अशी माहिती गेल्या काही महिन्यांत गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीचे  बारकाईने विश्लेषण केल्यावर आढळून आली आणि त्यानंतर  महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मोहीम सुरु केली.

त्यानुसार, भारतीय तटरक्षक दलासह (ICG) महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची संयुक्त मोहीम 7 मे 2022 रोजी ऑपरेशन खोजबीन या सांकेतिक नावाने सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत, डीआरआय  अधिकार्‍यांसह तटरक्षक  जहाज सुजीतने आर्थिक क्षेत्राजवळ (Economic Zone) बारीक नजर ठेवली. खवळलेल्या  समुद्रात अनेक दिवस सतत शोधकार्य  आणि निरीक्षण केल्यानंतर, “प्रिन्स” आणि “लिटल जीझस” या दोन संशयित बोटी भारताच्या दिशेने जाताना दिसल्या. दोन्ही भारतीय बोटी भारतीय तटरक्षक दल आणि डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी 18 मे 2022 रोजी लक्षद्वीप बेटांच्या किनाऱ्याजवळ रोखल्या होत्या. या बोटीतील काही खलाशांची  चौकशी केली असता त्यांनी भर  समुद्रात त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात हेरॉईनचा साठा आला होता आणि त्यांनी तो दोन्ही बोटींमध्ये लपवून ठेवला असल्याची कबुली दिली. त्यानंतर  दोन्ही बोटी पुढील कार्यवाहीसाठी कोची येथे नेण्यात आल्या.

कोची येथील तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालयात दोन्ही बोटींची कसून झडती घेण्यात आली, ज्यामध्ये प्रत्येकी 1 किलो हेरॉईनची 218 पाकिटे जप्त करण्यात आली. एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार जप्तीची कारवाई सध्या डीआरआयकडून केली जात  आहे. विविध ठिकाणी शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

डीआरआय आणि भारतीय तटरक्षक दलाद्वारे या मोहिमेचे  काळजीपूर्वक नियोजन  आणि अंमलबजावणी करण्यात आली आणि गेले काही दिवस खवळलेल्या  समुद्रात देखरेख  ठेवण्यात आली. जप्त केलेले मादक पदार्थ उच्च दर्जाचे हेरॉईन असल्याचे आढळले असून  आंतरराष्ट्रीय अवैध बाजारपेठेत त्याची किंमत 1,526 कोटी रुपये आहे. अलीकडच्या काळात, डीआरआय आणि भारतीय तटरक्षक दलाने अमली पदार्थ तस्करीविरोधी काही महत्त्वाच्या कारवाया हाती घेतल्या आहेत.

गेल्या महिन्याभरात  डीआरआयने पकडलेला अमली पदार्थांचा हा चौथा मोठा साठा  आहे. यापूर्वी  डीआरआयने 20.04.2022 रोजी कांडला बंदरावर जिप्सम पावडरच्या व्यावसायिक आयात खेपेतून 205.6 किलो हेरॉईन, 29.04.2022 रोजी पिपावाव बंदरावर 396 किलो धागा (हेरॉईन सह ) आणि नवी दिल्ली विमानतळाच्या  एअर कॉम्प्लेक्स कार्गो  येथे 10.05.2022 रोजी 62 किलो हेरॉईन साठा जप्त केला होता. याचे एकूण मूल्य  आंतरराष्ट्रीय अवैध बाजारात अंदाजे 2500 कोटी रुपये आहे. 

एप्रिल 2021 पासून, डीआरआयने आंतरराष्ट्रीय अवैध  बाजारपेठेत अंदाजे 26,000 कोटी रुपये किमतीचे 3,800 किलो पेक्षा अधिक हेरॉईन जप्त केले आहे. यात सप्टेंबर 2021 मध्ये मुंद्रा इथून  3000 किलो हेरॉईन, जुलै 2021 मध्ये न्हावा शेवा बंदर येथे 293 किलो हेरॉईन, फेब्रुवारी 2022 मध्ये तुघलकाबाद, नवी दिल्ली येथे 34 किलो हेरॉईनचा समावेश आहे.  याशिवाय हवाई प्रवाशांकडूनही काही साठा जप्त करण्यात आला. याशिवाय  350 किलो पेक्षा जास्त कोकेन. ज्याची आंतरराष्ट्रीय अवैध बाजारपेठेत 3,500 कोटी रुपये किंमत आहे, ते डीआरआयने जप्त केले होते, ज्यात एप्रिल 2021 मध्ये तुतिकोरिन बंदरातील कंटेनरमधून जप्त केलेला 303 किलो कोकेन साठ्याचा समावेश आहे.

महसूल गुप्तवार्ता संचालनालय  आणि भारतीय तटरक्षक दलाचा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध  संयुक्त लढा  सागरी मार्गांद्वारे देशात अंमली पदार्थांचा ओघ रोखण्यात यशस्वी ठरला  आहे.

महानगरांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकू असा विश्वास आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

0

ठाणे: आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन महानगरांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकू असा विश्वास त्यांच्यात निर्माण करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शहापूर तालुक्यातील कोठारे येथील आश्रमशाळेच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शहापूर तालुक्यातील कोठारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन आणि शहापूर तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख आमदार दौलत दरोडा, वि.जा. व भ.ज. कल्याण समिती प्रमुख आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील, प्रकल्पस्तरीय आढावा समिती अध्यक्ष आशा मोरे, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहब दांगडे, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त महेंद्र वारभुवन, ठाण्याच्या अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शिक्षण हा आदिवासी बांधवांचा मूलभूत अधिकार

यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, आश्रमशाळांच्या केवळ चांगल्या इमारती उभ्या न करता तेथे आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देवून त्यांचे भविष्य घडले पाहिजे. आश्रमशाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांची पारदर्शकपणे भरती केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे आधुनिक शिक्षण देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान,तंत्रज्ञान विषयाशी मैत्री करून जागतिक घडामोडीदेखील समजून घेतल्या पाहिजे. शिक्षण हा आदिवासी बांधवांचा मूलभूत अधिकार असून तो मिळवून देण्याची आमची जबाबदारी असल्याची भावना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

शहापूरच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही

आदिवासी भागात कुपोषणाची समस्या कमी करण्याकरीता सकस आहारावर भर दिला पाहिजे. या भागातील मुला-मुलींना हा सकस आहार मिळवून देण्यासाठी पाऊले उचलण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शहापूर तालुक्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत असून यासंदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये मंत्रालयात आदिवासी विकास, जलसंपदा, गृहनिर्माण आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची बैठक घेवून पाणी प्रश्न आणि आदिवासी बांधवांना घरे देण्याबाबत मार्ग काढला जाईल. या भागाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रस्तावित योजनेला मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शहापूरच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आदिवासी भागात नर्सरी शिक्षण सुरू करण्याचा प्रयत्न- आदिवासी विकास मंत्री ॲड. पाडवी

आदिवासी विकासमंत्री ॲड पाडवी म्हणाले की, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरीता आदिवासी भागासाठी शिक्षण धोरण नव्याने करण्याची गरज असून त्यामध्ये लहानपणापासून मुलांना इंग्रजीचे ज्ञान देण्यासाठी भर द्यायची आवश्यकता आहे. या वर्षापासून आदिवासी भागात नर्सरी शिक्षण सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी येथे सांगितले. आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावतानाच आदिवासी भागातील मुलंमुली भारतीय प्रशासन सेवेत येण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आदिवासी विभागामार्फत विटभट्टी मजुरांना सक्षम करण्यासाठी योजना काढत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून मिळणारा निधी वाढवून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. शहापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी भरीव निधी दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन मिळावे- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले की, आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन मिळाले पाहिजे. जेणेकरून त्यांच्यातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आपले भविष्य करू शकेल. शहापूर तालुक्याच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार श्री.दरोडा यांनी मनोगत व्यक्त केले. शहापूर तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची त्यांनी माहिती दिली. कोठारे उपसा जलसिंचन योजनेसाठी निधी देण्याची मागणी यावेळी केली. आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव यांनी यावेळी प्रास्ताविक केले.

यावेळी विविध विभागांच्या माध्यमातून योजनांविषयी माहिती देणाऱ्या स्टॉलची पाहणी उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी केली. यावेळी उमुख्यमंत्री यांच्या हस्ते मोबाईल व्हेजिटेबल व्हॅन वितरण, गुणवंत विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बचत गट आणि वीटभट्टी व्यवसाय लाभार्थ्‍यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना तुला भविष्यात काय व्हायचं आहे अशी विचारणा उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला केली.

ढोल, लेझिम पथक आणि पारंपरिक आदिवासी नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी आभार मानले.

18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत ओमर सुमर व सेजल भुतडा यांना विजेतेपद

पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए एआयटीए 18वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात मुंबईच्या ओमर सुमर याने तर, मुलींच्या गटात नागपूरच्या सेजल भुतडा यांनी विजेतेपद संपादन केले. तर, दुहेरीत मुलांच्या गटात सार्थ बनसोडे व सिद्धार्थ मराठे यांनी तर, मुलींच्या गटात प्रिशा शिंदे व वैष्णवी चौहान यांनी विजेतेपद पटकावले.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात पाचव्या मानांकित मुंबईच्या ओमर सुमर याने सार्थ बनसोडेचा 3-6, 6-3, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 2तास मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये 2-2 अशी बरोबरी असताना सार्थने ओमरची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या ओमरने तिसऱ्या गेममध्ये सार्थची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये ओमरने सुरेख खेळ करत सार्थची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये ओमरने आपले वर्चस्व कायम राखत हा सेट 6-2 असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ओमर हा एनआयओएस मध्ये 12वी इयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असून बाऊन्स टेनिस अकादमीत प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. 
मुलींच्या गटात अंतिम फेरीत सातव्या मानांकित नागपूरच्या सेजल भुतडा हिने आठव्या मानांकित डेनिका फर्नांडोचा 7-5, 6-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सेजल ही रामनगर भरत विद्यालय शाळेत 9वी इयत्तेत शिकत असून एनडीएचए,नागपूर येथे प्रशिक्षक विशाल लांडगे व नवीन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे या वर्षांतील हे दुसरे विजेतेपद असून याआधी हैदराबाद येथे मागील आठवड्यात झालेल्या 16 वर्षांखालील स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.
दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत सार्थ बनसोडे व सिद्धार्थ मराठे यांनी साहिल तांबट व अर्णव कोकणे यांचा 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. साहिल तांबटला पायाला दुखापत झाल्यामुळे सामन्यातून माघार घेतली व त्यामुळे सार्थ बनसोडे व सिद्धार्थ मराठे यांना विजेते घोषित करण्यात आले. मुलींच्या गटात प्रिशा शिंदे व वैष्णवी चौहान या जोडीने सेजल भुतडा व अभिलिप्सा मल्लिक यांचा 6-4, 3-6, 10-8 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण वितरण स्पर्धा संचालक संदीप नुलकर आणि प्रणव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी: मुले: ओमर सुमर(महा)[5]वि.वि.सार्थ बनसोडे(महा)3-6, 6-3, 6-2;
मुली: सेजल भुतडा(महा)[7]वि.वि.डेनिका फर्नांडो(महा)[8]7-5, 6-2;
दुहेरी:अंतिम फेरी: मुले: सार्थ बनसोडे/सिद्धार्थ मराठे वि.वि.साहिल तांबट/अर्णव कोकणे[3] 6-3 सामना सोडून दिला;
मुली: प्रिशा शिंदे/वैष्णवी चौहान वि.वि.सेजल भुतडा/अभिलिप्सा मल्लिक 6-4, 3-6, 10-8.

वीजपुरवठ्यासाठी अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटल्या म्हणून महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

पिंपरी येथील घटनेत एकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल

पुणे: वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या विविध कामांसोबतच वीजपुरवठ्यात अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटल्याने महावितरणच्या जनमित्रास फांदीच्या लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. पिंपरीमधील कामगार भवन परिसरात गुरुवारी (दि. १९) दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कर्मचाऱ्यास मारहाण तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या पिंपरी विभाग अंतर्गत अजमेरा कॉलनी शाखा कार्यालयाचे जनमित्र श्री. रामेश्वर बळीराम वाघमारे हे सहकारी श्री. अशोक मुळे तसेच दुरुस्ती कामाच्या कंत्राटदाराचे दोन कर्मचारी यांच्यासमवेत पिंपरीमधील कामगार भवन परिसरात रोहित्राची पावसाळापूर्व तपासणी तसेच देखभाल व दुरुस्तीचे काम करीत होते.

दरम्यान या रोहित्राच्या बाजूलाच असणाऱ्या झाडाच्या फांद्यांचा रोहित्र व वीजयंत्रणेला स्पर्श होण्याचा संभव असल्याने फांद्या तोडणे आवश्यक असल्याचे दिसले. याबाबत त्यांनी सहायक अभियंता सौ. सुरेखा भारती यांना कळविले. त्यांच्या सूचनेनुसार वीजपुरवठ्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम सुरु केले. मात्र त्याचवेळी बाजूच्या गांधीनगर झोपडपट्टीतून एक इसम आला व स्वतःचे नागराज शंकर भांडेकर असे नाव सांगत फांद्या का छाटत आहे असे विचारत शिविगाळ करू लागला. महावितरणच्या गणवेशधारी कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र दाखवून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण काहीही समजून न घेता सदर इसम रोहित्राच्या कुंपणाच्या आत आला. त्यामुळे पुढील वाद व अनर्थ टाळण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले व दुरुस्तीचे साहित्य घेऊन तिथून निघाले. मात्र त्याचवेळी आरोपी भांडेकर याने जनमित्र श्री. वाघमारे यांच्या डोक्यावर, पायावर व पाठीवर झाडाच्या फांदीने मारहाण केली. यामध्ये श्री. वाघमारे जखमी झाले.

या मारहाणप्रकरणी नागराज शंकर भांडेकर (वय ४५) विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात कलम ३५३, ३२३, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन सामाजिक परिवर्तनाची चळवळ-शरद पवार

पुणे : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले सबंध जीवन दलित, अस्पृश्य, शेतकरी, कामगार, स्त्रियांसह समाजातील उपेक्षित घटकांना समान न्याय व सन्मानजनक वागणूक मिळावी, यासाठी समर्पित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे प्रतीक असून, त्यांचे जीवन खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तनाची चळवळ होती,” असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले.

ऍड. जयदेव गायकवाड लिखित  ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : प्रज्ञावंताचा संघर्ष’ या ग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे झाले. पद्मगंधा प्रकाशन व लोकशाहीसाठी समंजस संवाद आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ संपादक पत्रकार अरुण खोरे, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पद्मगंधा प्रकाशनचे अभिषेक जाखडे, मयूर गायकवाड, निकिता गायकवाड आदी उपस्थित होते.

ग्रंथ निर्मितीसाठी महत्वपूर्ण योगदानाबद्दल रवी मुकुल, पंडित कांबळे, नंदकुमार देवरे, अनुश्री भागवत, बालाजी एंटरप्रायजेसचे श्री दुधाने यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले. अरुण खोरे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले.

शरद पवार म्हणाले, ” समाजातील दलित, वंचित, अस्पृश्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच देशाच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेकदा संघर्ष करावा लागला. समर्पित भावनेने देशहितासाठी, प्रत्येक भारतीयाला समान अधिकार मिळण्यासाठी व समाजातील जातीनिर्मूलनासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या याच वैचारिक संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम ऍड. जयदेव गायकवाड यांनी या ग्रंथाद्वारे केले आहे. हा ग्रंथ सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराजांना अर्पण केला आहे, याचा आनंद वाटतो. जयदेव यांनी या दोन व्यक्तींची केलेली निवड व बाबासाहेबांचा जवळचा संबंध वाटतो.”

“कामगार, स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी अनेक कायदे केले. घटनेतही सर्वांना समान संधी, न्याय मिळेल यावर त्यांनी भर दिला. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे आजही देश एकसंध आहे. त्यांच्या विचारांवर चालण्याची गरज आहे. बाबासाहेबांवर प्रचंड लेखन विविध भाषेत झाले आहे. जवळ जवळ १८ खंडांचे बाबासाहेबांच्या विचारांचे ग्रंथ फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर अन्य राज्यांमध्येही महाराष्ट्र सरकारने केले आहे. तरीही आपण बाबासाहेबांना आपण न्याय देऊ शकत नाही. बाबासाहेब थोर विचारवंत, अर्थशास्त्रज्ञ होते. लंडन विद्यापीठात बाबासाहेबांनी वाचलेल्या प्रबंधाने खूप चर्चा झाली. कामगार हक्क, वेतन, रजा याचे निर्णय घेत त्यांनी कामगारांचे हित साधले. महात्मा फुलेंना दूरदृष्टी होती. त्याचा आदर्श बाबासाहेबांनी घेतला. जेथे अन्याय होतो तेथे संघर्षाची भूमिका त्यांनी घेतली. बाबासाहेबांची नोंद अन्य देशांनीही केली आहे,” असे शरद पवार यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
बाबा आढाव म्हणाले, “आपण एकमेकांना दुरुस्त करण्यापेक्षा समोर आलेल्या आव्हानांना पेलण्यासाठी सज्ज व्हायला हवे. बाबासाहेबांनी देशाला दिलेली घटना पाळली जातेय का, याचा विचार गरजेचे आहे. आजची परिस्थिती पाहता आपण हिटलरला वेगळ्या शब्दात परत आणतो आहोत का याचा विचार करावा. सतत इतिहास उगळण्यात स्वारस्य नाही. देशद्रोह, सेक्युलर शब्दांवर सध्या चर्चा सुरू आहे. यात तरुण कुठे आहेत? समाजाचे चिंतन काय सुरू आहे, ते साहित्यात कसे उतरते आणि कलेच्या क्षेत्रात कसे उतरते ते महत्वाचे आहे. तरुणांबरोबर संवाद वाढवायला हवा.”  
डॉ. भारत पाटणकर म्हणाले, “जातीभेदाच्या विचारांना आव्हान देण्याचे काम १३ व्या शतकात सुरू झाले. संत चोखामेळा, संत नामदेव यांनी क्रांतिकारी विचार मांडले. विचाराच्या क्षेत्रातील ठराविक जातींची बंदी त्यांनी उठवून लावली. त्याचे शिखर बाबासाहेबांनी गाठले. बाबासाहेबांच्या विचारांनी नेमके काय केले हे एकत्रितपणे मांडणारे हे पहिले पुस्तक आहे. बाबासाहेब फक्त बहुजन समाजाचे नाही, तर समस्त स्त्री, पुरुष, सर्व जाती धर्माचे नेते होते. जाती व्यवस्थेचा अंत करणे, अंतरात जाती संपवण्याचा इशारा बाबासाहेबांनी दिला आहे. चळवळी विचारांच्या स्तरावर असणे आवश्यक आहे.”

जयदेव गायकवाड म्हणाले, “दोन अडीच वर्षाच्या सखोल अभ्यासातून निर्मिलेल्या या ग्रंथाचे प्रकाशन पवार साहेबांच्या हस्ते होतेय, याचे समाधान वाटते. आंबेडकरी विचार समजून घेत तसे वागायला हवे. शब्द, चित्रांच्या पलीकडचे ते व्यक्तिमत्व आहे. तो एक विचार आहे. सवंग बाबासाहेब वाचताना त्यांच्यासोबत झालेले राजकारण कोणासोबत तरी मांडावे अशी गरज वाटू लागली. मग हा ग्रंथ लिहावा वाटला. बाबासाहेबांच्या विचारांचा सर्वंकष विचार करण्यासाठी खोलवर विचार करणे गरजेचे आहे.”

महागाईचे फटके : सीएनजी पुन्हा एकदा 2 रुपयांनी महाग

0

 दिल्ली-पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीपाठोपाठ आता सीएनजीच्या किमतीही भडकल्या आहेत. या वाढीमुळे इंद्रप्रस्थ गॅसने दिल्लीतील सीएनजीची किंमत 75.61 रुपये प्रति किलोपर्यंत केली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादसाठी सीएनजीची किंमत 78.17 रुपये प्रति किलो झाली आहे.पुण्यात सीएनजीच्या दरात तब्बल 2 रुपये 70 पैशांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. पुण्यात आता सीएनजी ८० रुपये झाला आहे.

त्याच वेळी, गुरुग्राममध्ये त्याची किंमत आता 83.94 रुपये प्रति किलो असेल. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडच्या म्हणण्यानुसार, दिल्ली-एनसीआरसह शहरांचे सीएनजी दर आज सकाळी 6 वाजल्यापासून बदलण्यात आले आहेत.

कानपूरमध्ये सीएनजी 87.40 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे
दिल्ली NCR व्यतिरिक्त, “कानपूर रु. 87.40, अजमेर रु. 85.88, करनाल रु. 84.27, मुझफ्फरनगर रु. 82.84 प्रति किलो” दराने गॅस उपलब्ध होईल.

सहा दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ
दिल्लीत गेल्या 6 दिवसांत दुसऱ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. यापूर्वी 15 मे रोजी सीएनजीच्या किमतीत 1 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

19 मे रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती
यापूर्वी १९ मे रोजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 3 रुपये 50 पैशांनी वाढ केली आहे. त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीतही ५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. महिनाभरात गॅसच्या दरात वाढ होण्याची ही दुसरी वेळ आहे.

फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनतर्फेससून रुग्णालयाला ‘एन्डोस्कोपी मशीन’चे हस्तांतरण

ससून सर्वोपचार रुग्णालय सामान्य रुग्णांसाठी आशास्थान : डॉ. विनायक काळे
पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज व त्यांचे सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशन यांच्या वतीने ससून सर्वोपचार रुग्णालयाला पचनसंस्था विकार निदान व उपचार यंत्र (एन्डोस्कोपी मशीन) हस्तांतरित करण्यात आले. 
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे संदीप खर्डेकर, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा पूजा मनीष आनंद, उद्योजक विजय बजाज, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, एन्डोस्कोपी तज्ज्ञ डॉ. विनय थोरात, विभागप्रमुख डॉ. आर. टी. बोरसे यांच्यासह मुकुल माधव फाउंडेशन व ससूनमधील डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थितीत होते.
डॉ. विनायक काळे म्हणाले, “गोरगरिबांसाठी असलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालयात दानशूरांच्या मदतीने अत्याधुनिक उपचार उपलब्ध होत आहेत. पुण्यासह राज्याच्या इतर जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने रुग्ण येथे उपचार घेतात. सर्वोत्तम सेवा देण्यासाठी आमचे सर्व डॉक्टर्स, नर्स आणि इतर सहयोगी स्टाफ मेहनत घेत असून, मुकुल माधव फाउंडेशन सारख्या संस्था पाठबळ देत आहेत. त्यातून ससूनकडे सामान्य रुग्ण आशास्थान म्हणून पाहत आहेत.”
काळे यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांचे विशेष आभार मानले. या अत्याधुनिक मशीनमुळे रुग्ण तपासणी अधिक जलद व अचूक होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे समाजातील अधिकाधिक रुग्णांना याचा नक्कीच लाभ होईल, असा विश्वास डॉ. काळे यांनी व्यक्त केला.
डॉ. विनय थोरात म्हणाले, “फाउंडेशनची आम्हाला कायमच मदत असते. जे उपचार परदेशात मिळतात; पुण्यातील अन्य रुग्णालयांत मिळत नाहीत, ते आता ससूनमध्ये मिळू शकतात. अत्याधुनिक व तंत्रज्ञानात्मक निदान व उपचार ससूनमध्ये माफक दरात उपलब्ध होताहेत, याची नोंद समाजाने घ्यायला हवी.”
संदीप खर्डेकर म्हणाले, “समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. मुकुल माधव फाउंडेशनशी माझा कोरोना काळात अधिक संबंध आला. या काळात फाउंडेशनने केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या स्वरूपाचे काम छाब्रिया दाम्पत्य करत आहे. ससून रुग्णालयाच्या अत्याधुनिकरणात त्यांची मोलाची भूमिका राहिली आहे.”

मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकारातून २०१८ मध्ये येथे पचनसंस्थाविकार निदान व उपचार केंद्राचे (एन्डोस्कोपी युनिट) ‘मोहिनी व प्रल्हाद छाब्रिया’ यांच्या स्मरणार्थ लोकार्पण झाले होते. सध्या या विभागात दरवर्षी २५०० ते ३००० हजार रुग्णांवर निदान व उपचार होत आहेत. या नव्या यंत्रामुळे रुग्णांना आणखी अत्याधुनिक सुविधा मिळेल, असे बोरसे यांनी नमूद केले.

पूजा आनंद यांनीही फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले. समाजातील दुर्लक्षित भागांना, घटकांना मोठी मदत रितू छाब्रिया फाउंडेशनच्या माध्यमातून करत असल्याचे त्यांनी सांगितले.
“ससून सर्वोपचार रुग्णालयात सामान्य रुग्ण येतात. त्यांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. पचनसंस्थेचे विकार वाढत आहेत. अशावेळी ही एन्डोस्कोपी केंद्र व मशिनरी देणे गरजचे वाटते. याचा उपयोग सर्वसामान्य रुग्णांना होतो आहे आणि ससूनमधील सर्व डॉक्टर्स व सपोर्ट स्टाफ त्याचा सुयोग्य वापर करत आहे, याचा आनंद वाटतो.”- रितू प्रकाश छाब्रिया, व्यवस्थापकीय विश्वस्त, मुकुल माधव फाउंडेशन

कोविड काळानंतर जे. जे. रुग्णालयात प्रथमच अवयवदान

0

ॲड. रिना बनसोडे यांनी जगाचा निरोप घेताना अवयवदानाचा दिला आदर्श

मुंबई,  :- कोविड-१९ नंतर मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयातील प्रथम अवयवदान जे.जे. रूग्णालयात काल करण्यात आले असून समाजसेविका ॲड. रिना बनसोडे यांनी अवयवदान करून जगाचा निरोप घेतला आणि समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे, ॲड. बनसोडे यांच्या अवयवदानाबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.

मुंबईच्या  अॅडव्होकेट रिना बनसोडे (वय ४३ वर्षे) यांनाजे. जे. रुग्णालयात १५ मे पासून उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मेंदू सर्जरी विभागप्रमुख  डॉ.वर्णन वेलहो यांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत होते.  काल १८ मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान डॉक्टरांनी श्रीमती बनसोडे यांना ब्रेन डेड घोषित केले होते. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना समाजसेवा विभागामार्फत  संपूर्ण माहिती देऊन अवयवदानाबद्दल अवगत करण्यात आले. अवयवदानासाठी  रुग्णाच्या नातेवाईकांनी सकारात्मकता दर्शविल्यानंतर अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि डॉ. संजय सुरासे, वैद्यकीय अधिक्षक आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या टिमने अवयवदानाची प्रक्रिया लगेचच सुरु केली. रुग्णाच्या किडनी, कॉर्निया, हृदय तसेच छोटे आतडे यांचे दान झाले. मुंबईमधील जे. जे. हॉस्पीटल, ग्लोबल हॉस्पीटल, कोकीलाबेन हॉस्पीटल, नानावटी हॉस्पीटल येथील गरजु रुग्णांना नियमानुसार हे अवयव देण्यात आले. विशेष म्हणजे मुंबईतील हे पहिलेच यशस्वीरित्या झालेले छोट्या आतड्याचे अवयव दान आहे. ज्या रुग्णालयात अवयवदान झालेले छोटे आतडे दिले त्या हॉस्पीटलमधील गरजू रुग्णाला छोटया आतड्याची अत्यंत आवश्यकता होती आणि हे छोटे आतडे लगेचच मिळाल्यानंतर शस्त्रक्रिया झाल्यामुळे त्या रुग्णास लाभ झाला असे सूत्रांनी सांगितले. झेडटीसीसीच्या नियम आणि मार्गदर्शक सुचनेनुसार कोवीड-१९ नंतर मुंबईमधील सार्वजनिक रुग्णालयामध्ये झालेले हे पहिलेच अवयवदान आहे. अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून आपल्या मृत्युनंतरही आपण इतरांचे जीवन वाचवू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण समाजसेविका असलेल्या अॅड. रिना बनसोडे यांनी जगाचा निरोप घेताना समाजासमोर  ठेवून गेल्या. त्यांच्या नातेवाईकांनीही या अवयवदानात मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.

एकाच घरातील 5 तरुणी तर दुसऱ्या घटनेत 4 मुलांचा बुडून मृत्यू

0

पुणे -जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनां मध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. भोर तालुक्यातील नऱ्हे गावात भाटघर धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या पाच तरुणींचा बुडून मृत्यू झाला आहे. तर दुसरी घटना खेड तालुक्यातील चासकमान धरणात घडली असून याठिकाणी पोहण्याकरिता पाण्यात उतरलेल्या चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. पोेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत भोर तालुक्यातील भाटघर धरणात पाच तरुणी गुरवारी दुपारी बारा वाजता पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेत एक मुलगी सुदैवाने बचावली आहे.

भाटघर धरणाच्या न-हे गावत लग्नाकरिता आलेल्या असताना त्या धरणाच्या तीरावर पोहण्यासाठी गेल्या असताना ही दुर्घटना घडली आहे. खुशबू लंकेश रजपूत (वय १९ रा. बावदन), मनीषा लखन रजपूत (वय २०), चांदणी शक्ती रजपूत (वय २१), पूनम संदीप रजपूत (वय २२, तिघी रा संतोषनगर हडपसर पुणे), मोनिका रोहित चव्हाण (वय २३) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, गुरवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला त्यावेळी ही घटना उघडकीस आली. रात्री पर्यंत चार मुलींचे मृतदेह मिळाले असून मनीषा लखन रजपूत हिचा मृतदेह अद्याप मिळालेला नसून शोधकार्य सुरु आहे. नरे गावातील कातकरी समाजाच्या तरुणांनी तीन मृतदेह बाहेर काढले आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील हे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. सह्याद्री सर्च अंड रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले आहे.घटनेची माहिती मिळताच,पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोहायला गेले अन् जीव गमावून बसले विद्यार्थी
खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथे चास कमान धरणाच्या जलाशयात पोहायला गेलेल्या सह्याद्री स्कूलच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. गुंडाळवाडी येथील तिवई हिल येथे सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल असून येथे निवासी विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी इ. १० च्या वर्गात शिक्षण घेते होते. उद्या पासून शाळेला सुट्टी लागणार असल्याने शिक्षकांसह ३४ विध्यार्थी सायं चार वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी व पोहण्याचा सराव करण्यासाठी तिवई हिलच्या पायथ्याशी असणाऱ्या चास कमान धरणाच्या जलाशयात गेले होते. शिक्षकांच्या सांगण्यानुसार काही विद्यार्थी कमरे एवढ्या पाण्यात उभे असताना एक मोठी लाट आल्याने या लाटेत ६ ते ७ विद्यार्थी पाण्यात ओढले गेले. या वेळी शिक्षकांनी तातडीने पोरांना वाचविण्यासाठी प्रयत्न करत काही विद्यार्थी तीरावर आणले मात्र. त्यातील ४ विद्यार्थी लाटे बरोबर खोल बुडाले.

स्वयंसहाय्यता गटांच्या शेतातील उत्पादनांचा तांदूळ आणि आंबा महोत्सव

0

नवी मुंबई, : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान – उमेदच्या राज्यभरातील स्वयंसहाय्यता गटांच्या शेतातील उत्पादनावर आधारित तांदूळ आणि आंबा महोत्सव दिनांक 20 ते 22 मे 2022 या कालावधीत पुणे विद्यार्थी गृहचे विद्याभवन, नेरूळ, नवी मुंबई येथे आयोजित केला आहे.

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांच्या शेतातील तांदुळाच्या विविध जाती, सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला हापूस, केशर, पायरी इत्यादी प्रकारचा आंबा या महोत्सवात उपलब्ध असेल. या महोत्सवामध्ये इंद्रायणी हातसडीचा, इंद्रायणी पॉलिश, दप्तरी, जय श्रीराम, सेंद्रिय ब्लॅक, वाईसार, खुशबू, चिमण साळ, भवाळ्या जिरेसाल या प्रकारच्या जातींचा तांदूळ या महोत्सवामध्ये प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. त्याचसोबत अवळाची उत्पादने, विविध प्रकारचे पापड, विविध मसाले, रोस्टेड गहू, नाचणीचे खाद्य पदार्थ, बांबू पासून तयार केलेल्या कलाकृती यासारख्या अनेक गोष्टी या महोत्सवात प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

या महोत्सवाचे उद्घाटन अभियानाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कोकण विभागीय उपसंचालक गणेश मुळे, पुणे विद्यार्थी गृहचे संचालक दिनेश मिसाळ, स्माइल फाउंडेशनच्या उमा धीरज आहुजा इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिनांक 20 मे 2022 रोजी सकाळी 12 वाजता होणार आहे.

नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाला उपस्थिती देऊन दर्जेदार व शुद्ध उत्पादने खरेदी करून ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाला हातभार लावण्याचे आवाहन अभियानाच्या उपसंचालक शीतल कदम यांनी केले आहे.

राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश संघाची विजयी सलामी

हरयाणा, मध्य प्रदेश संघांना पराभवाचा धक्का

पुणे / प्रतिनिधी : महाराष्ट्र, उत्तर प्रदेश संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करताना भारतीय रोलबॉल संघटना, राज्य रोलबॉल संघटना व पुणे जिल्हा रोलबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या १८ व्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली.

श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, म्हाळुंगे-बालेवाडी येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन साईचे संचालक डॉ. सुधांशू शेखर रॉय, पद्मश्री मुरलीकांत पेटकर, समालोचक सुनंदन लेले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंतरराष्ट्रीय रोलबॉल संघटनेचे संचालक सुर्यकांत काकडे, भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष मनोहरकांत, उपाध्यक्ष मनोज यादव, सचिव चेतन भांडवलकर, स्पर्धा अध्यक्ष संदीप खर्डेकर, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे, जिल्हा रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष गजानन थरकुडे, डॉ. शैलेश हडगावकर, सनी सांकला, श्रीपाद सपकाळ, महेश कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुलांच्या गटाच्या सलामीच्या लढतीत महाराष्ट्र संघांनी हरयाणा संघाला ११-४ असे पराभूत करताना विजय साकारला. महाराष्ट्र संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना मध्यंतराला ६-३ अशी आघाडी घेतली होती. महाराष्ट्र संघाकडून कर्णधार आदित्य गणेशवाडे यांने ५ गोल, अरिंजय कळकेरी व संजोग तापकीर यांनी प्रत्येकी २ गोल तर हर्षल घुगे व रोहन दाभाडे यांनी प्रत्येकी १ गोल केला. तर हरयाणा संघाकडून नवीन कुमारने ३ तर राहुल सिंग याने एक गोल करताना लढत देण्याचा प्रयत्न केला.

मुलांच्या गटातील उत्तर प्रदेश संघाने ओडिशा संघाला १८-० असे एकतर्फी पराभूत केले. उत्तर प्रदेश संघाने मध्यंतराला उत्तर प्रदेश संघाने १३-० अशी विजयी आघाडी घेतली होती. उत्तर प्रदेश संघाकडून मोहित कुमारने ४, हेमंत यादव ३, श्रेयस श्रीवास्तव, त्रिभुवन पटेल, देव कुमार, मिलिंद शर्मा यांनी प्रत्येकी २, तर प्रयाग गिरी, पुष्पम पटेल, विशाल शर्मा यांनी प्रत्येकी १ गोल करताना संघाला विजय मिळवून दिला.

मुलींच्या गटात उत्तर प्रदेश संघाने जम्मू काश्मीर संघाला ४-१ असे पराभूत करताना विजयी सलामी दिली. मध्यंतराला दोन्ही संघानी १-१ अशी बरोबरी साधली होती. उत्तर प्रदेश संघाच्या इशिका गुप्ताने दमदार खेळाचे प्रदर्शन करताना ३ तर क्रिष्णाक्षी कुमारने एक गोल करताना संघाला विजय मिळवून दिला. जम्मू काश्मीर संघाकडून सुविधा सरीनने १ गोल केला.

मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने मध्य प्रदेश संघाला ६-१ असे पराभूत करताना विजय साकारला. महाराष्ट्र संघाने मध्यंतराला ३-१ अशी आघाडी घेतली. लढतीत श्रुती भगतने ३, स्नेहल पाटील, वैभवी मगदूम व ऋतुजा रावल यांनी प्रत्येकी १ गोल केला. मध्य प्रदेश संघाकडून जिया जोशीने १ गोल करताना लढत देण्याचा प्रयत्न केला.

संक्षिप्त गोलफलक : मुले : महाराष्ट्र ११ – हरयाणा ४

महाराष्ट्र : आदित्य गणेशवाडे ५ (२.२७, १२.५७, १८.५६, २३.१५, २५.५०), संजोग तापकीर २ (४.११, ६.५०), अरिंजय कळकेरी २ (०.३०, १६.५६), हर्षल घुगे १ (२०.२९), रोहन दाभाडे (२२.५)

हरयाणा : नवीन कुमार ३ (९.१७, १३.५६, १८.४९), राहुल सिंग १ (२४.२३)

मध्यांतर : महाराष्ट्र ६ – हरयाणा ३

उत्तर प्रदेश १८ – ओडिशा ०

उत्तर प्रदेश : मोहित कुमार ४ (४.१०, ११.२९, १३.४२, १५.५५),हेमंत यादव ३ (०.११, २.१७, ५.०२), श्रेयस श्रीवास्तव २ (३.२७, ९.३४), त्रिभुवन पटेल २ (१.०८, १३.००), देव कुमार २ (१०.२०, १०.५३), मिलिंद शर्मा २ (२०.५६, २२.५६), प्रयाग गिरी १ (२६.१४), पुष्पम पटेल १ (२८.३८), विशाल शर्मा १ (२२.१६)

ओडिशा : ०

मध्यंतर : उत्तर प्रदेश १३ – ओडिशा ०

मुली : उत्तर प्रदेश ४ – जम्मू कश्मीर १

उत्तर प्रदेश : इशिका गुप्ता ३ (३.५०, ७.४०, ११.१५), क्रिष्णाक्षी कुमार १ (२.१५)

जम्मू –काश्मीर : सुविधा सरीन १ (५.१०)

मध्यंतर : उत्तर प्रदेश १- जम्मू काश्मीर १

महाराष्ट्र ६ – मध्य प्रदेश १

महाराष्ट्र : श्रुती भगत ३ (०.२६, १८.०२, २४.२०), स्नेहल पाटील १ (५.१४), वैभवी मगदूम १ (११.०२), ऋतुजा रावल १ (१०.३८)

मध्य प्रदेश : जिया जोशी १ (१.२०)

मध्यंतर : महाराष्ट्र ३ – मध्य प्रदेश १

९० कोटींच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एकास अटक

0

मुंबई, दि 19 : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची महसुली हानी करणाऱ्या करदात्यांविरोधात शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत  मे.एस.एस. सर्व्हिसेस या प्रकरणाचा तपास करून सुमारे 90 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार शशांक वैदय यांना अटक करण्यात आली असल्याचे वस्तू व सेवा कर विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

शशांक वैदय यांनी मे.एस.एस. सर्व्हिसेससह अन्य पाच बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे 88 कोटी रूपयांची खोटी बीजके जारी केली आहेत. त्यानुसार शासनाची सुमारे 16 कोटींची महसुली हानी केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. या प्रकरणाचा तपास करताना शशांक वैदय हे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणामध्ये वस्तू व सेवांचा पूरवठा न करता महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन केले गेले आहे. त्यामुळे शशांक वैदय या व्यक्तीस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने करचुकवेगिरी साठी दिनांक १८ मे २०२२ रोजी अटक केली आहे. या व्यक्तीचे कृत्य हे दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवाकर कायदा २०१७ नुसार तुरूंगवासास पात्र आहे. या व्यक्तीस अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने दि. ३१ मे २०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणामध्ये वस्तू व सेवांच्या पुरवठ्याशिवाय 17 कोटी रूपयांची बनावट बीजके देऊन, 3.09 कोटी रूपयांचा वस्तू व सेवा कर त्यांच्या प्राप्तकर्त्यांना स्थानांतरित करून 3.09 कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. तसेच करदाता मे.एस.एस. सर्व्हिसेसच्या मालक सायली परूळेकर या कोणताही व्यवसाय करीत नाहीत, असे तपासात लक्षात आले आहे.

या प्रकरणात अन्वेषण अधिकारी लीनता चव्हाण, सहाय्यक राज्यकर आयुक्त या प्रविण कुलकर्णी, राज्यकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत. सदर तपासासाठी अनिल भंडारी (भा.प्र.से), सहआयुक्त, अन्वेषण-क यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. लीनता चव्हाण या महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागात अटक कार्यवाही करणा-या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सदर कार्यवाहीसाठी रंजित हातोले, सुमेधकुमार गायकवाड आणि श्रीकांत पवार सर्व सहाय्यक राज्यकर आयुक्त आणि इतर राज्यकर निरीक्षक यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. या आर्थिक वर्षातील सलग दहाव्या अटक कार्यवाहीतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्यांना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे.