मुंबई, दि. २१ – मराठी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट दिग्दर्शक, चांगले तंत्रज्ञ आणि कसदार अभिनेते आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दर्जेदार मराठी चित्रपटांना कान चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याची संधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मराठी चित्रपटाला जागतिक स्तरावर नेण्यात आपण यशस्वी होऊ असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी कान चित्रपट महोत्सवात व्यक्त केला.
कान फिल्म फेस्टिव्हलमधील इंडिया पॅव्हिलियनमध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या ‘जागतिक चित्रपट उद्योगात मराठी चित्रपटांचे स्थान’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ समीक्षक आणि अभ्यासक अशोक राणे, चित्रपट दिग्दर्शक मनोज कदम तसेच फिल्म मार्केटसाठी निवड करण्यात आलेल्या ‘ कारखानीसांची वारी ‘, ‘ तिचं शहर होणं ‘ आणि ‘ पोटरा ‘ या मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक अनुक्रमे अर्चना बोरहाडे, मंगेश जोशी, सिध्दार्थ मिश्रा, रसिका जोशी, समीर थोरात आणि शंकर धोत्रे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.
सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले, मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच विविध देशांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून मानाचे स्थान मिळाले पाहिजे. विशेषतः विविध देशांमध्ये संयुक्त चित्रपट निर्मितीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत हा महाराष्ट्र शासनाचा विविध योजना राबविण्यामागील व्यापक दृष्टिकोन आहे.
याच कार्यक्रमात कान चित्रपट महोत्सवासाठी निवड करण्यात आलेल्या मराठी चित्रपटांच्या माहितीपत्रकांचे तसेच बॉलिवूड म्युझियम या चित्रनगरीत सुरू करण्यात येणाऱ्या नव्या उपक्रमाच्या फोल्डरचे अनावरण सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, फिल्मसिटीचे महाव्यवस्थापकीय संचालक विवेक भिमानवार यांनी यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण आणि फिल्म सिटीची सविस्तर माहिती दिली. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.
यानंतर मंत्री श्री. देशमुख यांनी कान फिल्म मार्केटला भेट दिली आणि ए.आर. रेहमान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘ सिनेमा ऑफ फ्युचर ‘ या चित्रपटाच्या नव्या तंत्राच्या आविष्काराबाबत माहिती घेतली. मार्केटमधील कन्फडरेशन ऑफ इंडस्ट्रीजच्या बूथलाही त्यांनी भेट दिली.
मुंबई, दि.21 : भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या एकतिसाव्या पुण्यतिथीनिमित्त राजभवन येथे दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.
राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी राजभवनातील कर्मचारी व अधिकारी, तसेच राजभवन येथील पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली.
सुरुवातीला दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली. अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
पुणे, 21 मे 2022: फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 16वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात अनुष घनबहादूर, रुद्रसेन शिंदे, स्वर्णिम येवलेकर, अर्जुन परदेशी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली. फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अनुष घनबहादूर व रुद्रसेन शिंदे यांनी अनुक्रमे अथर्व जोशी व सिद्धांत थोरवे यांचा 9-3 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. स्वर्णिम येवलेकरने अर्णव चावलाचा 9-5 असा तर, अर्जुन परदेशी याने अरमान मुलचंदानीचा 9-1 असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले: अनुष घनबहादूर वि.वि.अथर्व जोशी 9-3;मिहीर कांतावाला वि.वि.जहान सिद्दीकी 9-5;आर्य कुचीभाटिया वि.वि.रौनक ललवानी 9-4;अर्जुन परदेशी वि.वि.अरमान मुलचंदानी 9-1;आदित्य भटवेरा वि.वि.राघव सरोदे 9-6;आरुष जोशी वि.वि.रोनित नागोरी 9-4;अनन्मय उपाध्याय वि.वि.प्रत्युश बगाडे 9-2;शान वरळीकर वि.वि.रोहन बजाज 9-3;रुद्रसेन शिंदे वि.वि.सिद्धांत थोरवे 9-3;स्वर्णिम येवलेकर वि.वि. अर्णव चावला 9-5.
पुणे, दि.21 : भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंचर येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, तहसीलदार रमा जोशी, सुभाषराव मोरमारे, सुहास बाणखेले, दत्ता थोरात मंगेश, बाणखेले युवराज बाणखेले आदी उपस्थित होते.
देशात संगणक क्रांती करण्याचे काम माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी केले, त्यामुळेच आज घरोघरी आधुनिक तंत्रज्ञान पाहावयास मिळत असल्याचे गृहमंत्री वळसे-पाटील यावेळी म्हणाले.
चंदिगड-रोडरेज प्रकरणी पतियाळा सेंट्रल जेलमध्ये गेलेले नवज्योत सिद्धू आता कैदी क्रमांक 241383 झाले आहेत. 34 वर्षे जुन्या एका प्रकरणात सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.कारागृहात गेल्यानंतर त्यांना हा कैदी क्रमांक देण्यात आला आहे.पहिले त्यांना वाचनालयाच्या आवारात ठेवण्यात आले होते. मात्र, नंतर कैदी क्रमांक देऊन 10 क्रमांकाच्या बॅरेकमध्ये हलवण्यात आले. येथे त्यांना खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या 8 कैद्यांसह ठेवण्यात आले आहे. बॅरेकमध्ये सिद्धू यांना सिमेंटच्या ओट्यावर झोपावे लागेल.शुक्रवारी संध्याकाळी 7.15 वाजता सिद्धूंना जेल नियमानुसार डाळ-रोटी देण्यात आली. मात्र, प्रकृतीचे कारण देत त्यांनी खाण्यास नकार दिला. त्यांनी फक्त सॅलड आणि फळे खाल्ले. त्याचवेळी, सिद्धूंचे कट्टर प्रतिस्पर्धी बिक्रम मजिठिया यांची बॅरेक सिद्धूपासून 500 मीटर दूर आहे. मजिठिया 11 क्रमांकाच्या बॅरेकमध्ये आहेत. ड्रग्ज प्रकरणात ते तुरुंगात आहेत. सिद्धू आणि मजिठिया यांच्या बॅरेकबाहेरही सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
तुरुंगात सिद्धूंना कैद्यांचे पांढरे कपडे घालावे लागणार आहेत. सिद्धू यांना तुरुंगात एक खुर्ची-टेबल, एक वॉर्डरोब, 2 पगड्या, एक घोंगडी, एक पलंग, तीन अंतर्वस्त्रे आणि बनियान, 2 टॉवेल, एक मच्छरदाणी, एक कॉपी-पेन, एक जोडे, 2 बेडशीट, दोन उशांचे कव्हर आणि 4 कुर्ते. पायजमा हे सामान देण्यात आले
सिद्धू यांना यकृताची समस्या आहे. याशिवाय पायात पट्टाही बांधलेला आहे. सिद्धू यांचे मीडिया सल्लागार सुरिंदर डल्ला यांनी सांगितले की, सिद्धू यांना गव्हाची अॅलर्जी आहे. ते गव्हाची रोटी खाऊ शकत नाहीत. ते बऱ्याच दिवसांपासून रोटी खात नव्हते. त्यामुळेच त्यांनी विशेष आहार मागितला आहे. याबाबतची माहितीही त्यांनी काल मेडिकलमध्ये दिली आहे
दिनक्रम सिद्धूंचा तुरुंगातील दिवस पहाटे 5.30 वाजता सुरू होईल. सकाळी ७ वाजता चहासोबत बिस्कीट किंवा काळे हरभरे दिले जातील. त्यानंतर सकाळी 8.30 वाजता नाश्ता होईल. ज्यामध्ये रोटी आणि डाळ किंवा भाजी मिळेल. त्यानंतर त्यांना कारखान्यात कामासाठी नेले जाईल. तेथे त्यांना दिवसभर काम करावे लागते. सायंकाळी 5.30 वाजता त्यांची सुटी होईल. संध्याकाळी 6 वाजता त्यांना जेवण मिळेल. सायंकाळी ७ वाजता त्यांना बॅरेकमध्ये बंद करण्यात येणार.
पुणे, 21 मे 2022: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित मित्तल ब्रदर्स व हेड इक्विपमेंट प्रायोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ओम दळवी मेमोरियल वन प्लस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात साहिल मोडक, राघव अगरवाल, अवधूत निलाखे, या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. महाराष्ट्र पोलीस जिमखाना, औंध येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात चुरशीच्या लढतीत साहिल मोडकने अरिहन गदियाचा टायब्रेकमध्ये 9-8(9-7) असा संघर्षपूर्ण पराभव केला. राघव अगरवालने वेद परदेशीचा 9-3 असा तर, अवधूत निलाखेने जय जाधवचा 9-0 असा सहज पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला. स्पर्धेचे उदघाटन ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे ट्रस्टी व स्पर्धा संचालक उमेश दळवी आणि औंधमधील जनसेवक नाना वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मारुती राऊत, एमएसएलटीए सुपरवायझर प्रणव वाघमारे, कल्पिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
बिहार, आसाम आणि कर्नाटक या तीन राज्यांत वादळ आणि पावसाने मोठा विध्वंस केला आहे वीज पडून आणि पुरामुळे 57 जणांना जीव गमवावा लागला आहे. आसाममध्ये परिस्थिती सर्वात वाईट आहे. येथे ब्रह्मपुत्रेला आलेला पूर आणि त्याच्या बाजूने वाहणाऱ्या नद्यांनी असा कहर केला आहे की, शेकडो गावांना जलसमाधी मिळाली आहे. त्याचबरोबर 7 लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला आहे. पिकेही नष्ट झाली आहेत.आसाममध्ये 500 हून अधिक लोकांना रेल्वे रुळांवर राहावे लागत आहे. येथे आतापर्यंत 15 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिहारमध्ये वीज पडून सर्वाधिक 33 मृत्यू झाले आहेत.
त्याचवेळी कर्नाटकातही 9 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. खराब हवामानामुळे दिल्लीहून आलेल्या 10 विमानांना अमृतसर विमानतळावर उतरावे लागले.बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी वादळ आणि वीज पडून 33 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. शनिवारी आणि रविवारी काही भागांत ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडू शकतो, असे राज्य हवामान विभागाचे म्हणणे आहे. कारण येथे आता मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला आहे.आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापनानुसार, राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये सुमारे 7.12 लाख लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. जमुनामुख जिल्ह्यातील दोन गावांतील 500 हून अधिक कुटुंबांनी रेल्वे ट्रॅकवर तात्पुरता निवारा केला आहे. एकट्या नागाव जिल्ह्यात 3.36 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत, तर कचर जिल्ह्यात 1.66 लाख, होजईमध्ये 1.11 लाख आणि दरंग जिल्ह्यात 52,709 लोक बाधित झाले आहेत.कर्नाटकात प्री-मॉन्सून सुरू झाल्याने परिस्थिती बिकट आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. खबरदारी म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. NDRFच्या चार तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.पावसामुळे 23 घरांचे नुकसान झाले आहे. महसूलमंत्री आर. अशोक म्हणाले की, हवामान खात्याने चिकमंगळूर, दक्षिण कन्नड, उडुपी, शिवमोग्गा, दावणगिरी, हासन आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी बंगळुरूमधील अनेक भागांना भेट दिली.
काँग्रेस म्हणजे फाटलेले आभाळ अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली होती. काँग्रेसला लागलेल्या गळतीवरून शिवसेनेने अग्रलेख लिहला होता. यावर बोलताना कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आमच्याकडे एक म्हण आहे. गिधाडाच्या शापने ढोर मरत नाही, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. आमच्या विरोधात कोण काय बोलते यांच्याशी आम्हाला काही नाही. काँग्रेसने देशासाठी अनेक बलिदान दिले आहे. मात्र ज्यांना बलिदान कळतच नाही, ज्यांचा आणि बलिदानाचा काही संबंध नाही अशा लोकांविषयी काय बोलणार असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.ज्यांना विचार नाही, बलिदानाची पार्श्वभूमी नाही अश्या शिवसेनेबाबात काय बोलणार असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विचारत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तर मी सामना वाचत नाही म्हणत शिवसेनेने काँग्रेसला सल्ला देण्याची गरज नाही असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. यामुळे मविआत सर्व काही आलबेल आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संघटनामध्ये भाजपला साथ दिली जात आहे. यामुळे कोण कोणाला बळ देत आहे हे सांगण्याची गरज नाही असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवरही निशाणा साधला आहे. आमचे नगरसेवक फोडत काँग्रेसवर कुरघोडी करण्याचे प्रकार मविआतील मित्र पक्ष करताय यावरही त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळात आमच्या मंत्र्यांसोबत दुजाभाव होतो असा आरोपही त्यांनी यावेळी लगावला आहे. केवळ भाजपला सत्ता मिळू नये म्हणून आम्ही या सरकारसोबत आलासे होतो. मात्र आता उलट भाजपला ताकद दिली जात आहे. असा टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.
सोबत रहाणारा दुश्मण नको आम्हाला देश वाचवायचा आहे, भाजप ज्या प्रकारे देश विकत आहे, कुठेतरी त्यांना थांबवणे गरजेचे आहे. आणि त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात सत्तेमत आलो. आमची भूमिका स्पष्ट आहे. दुश्मन समोर असला तर चालेल मात्र सोबत राहून घात नको, असा इशाराच त्यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना दिला आहे.
पुणे- लाल महालामध्ये लावणीची रिल्स केल्यामुळे शिवप्रेमींनी मोठा संताप व्यक्त केला होता.या प्रकरणी आता फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मराठी कलाकार वैष्णवी पाटीलसोबत इतर तीन जणांविरोधात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी राकेश विनोद सोनवणे यांनी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल रोजी लाल महालात आरोपी वैष्णवी पाटील व तीच्या सोबत असलेली एक स्त्री व दोन पुरुष असे लाल महाल येथे येऊन लाल महालाच्या आतील मोकळ्या जागेत वैष्णवी पाटील हिने लावणी नृत्य केले. तिच्यासोबत असलेल्या पुरुषांपैकी दोन पुरुषांनी त्याचे मोबाईलमध्ये शुटींग करून त्याचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केला.यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी यावर आक्षेप घेतला होता. या प्रकरणात लाल महालाचे रखवालदार सोनवणे यांनी फिर्याद दिली. यावर बोलताना सोनवणे म्हणाले, मी त्यांना लावणी नृत्य व त्याचे शुटींग करण्यापासून रोखले होते. पण त्यांनी ते ऐकले नाही.
वैष्णवी पाटीलने मागितली माफी-
या सगळ्या प्रकरणावर वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. या व्हिडिओमध्ये माफी मागत वैष्णवीने म्हणाली, ‘पुण्याच्या लाल महालात व्हिडीओ शूट करताना माझ्या मनात कोणतेही वाईट विचार नव्हते. गाणं सुंदर असल्याने त्यावर व्हिडीओ करावा असे माझ्या मनात आले. त्यामुळे मी त्यावर मी व्हिडीओ शूट केला. लाल महालात मी व्हिडीओ शूट केला ही माझ्याकडून चूक झाली आणि ती चूक मी मान्य करते. जितकेही शिवप्रेमी आहेत, जी जनता माझ्यावर प्रेम करते, माझ्या नृत्यावर प्रेम करते त्या सर्वांची मी माफी मागतें.’ असा व्हिडीओ वैष्णवीने पोस्ट करत माफी मागितली आहे.
लाल महालातील शुटींग -प्रशासक जबाबदार नाहीत काय ?
लाल महालात लावणीच्या शुटिंग वरुन वाद निर्माण झाला आहे. लाल महालातल्या मध्यवर्ती ठिकाणी संबंधित तरुणी लावणीवर आदाकारी करत असल्याचे एका व्हिडीओ मधून समोर आले आहे. या प्रकरावरती संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप घेतला आणि या प्रकरणी कलाकर आणि पालिका प्रशासाकावर कारवाई करण्याची संभाजी ब्रिगेडची आहे. दरम्यान या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. पुण्यातील लाल महालात तरुणी लावणीवर बेभान होऊन अदाकारी करताना व्हिडीओमधून दिसत आहे. यावर संभाजी ब्रिगेडकडून तीव्र आक्षेप करण्यात येत आहे, महाराष्ट्राच्या स्मृतीस्थळावर बिभत्स पद्धतीने गाणे वाजवले जाते, नृत्य केले जाते. मला पुण्याच्या पोलिस आयुक्तांना विनंती करायचीय, तुम्ही जातीने लक्ष घालून फरासखाना पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली
पुणे-राज्यातील वाढता जातीय तेढ आणि ब्राह्मणविरोध असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज म्हणजेच शनिवारी, २१ मे रोजी ब्राह्मण संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.ब्राह्मण महासंघाने मात्र या बैठकीचे निमंत्रण नाकारले आहे. शरद पवारांनी मंत्री छगन भुजबळ आणि अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानांबाबत आधी भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
शरद पवार यांच्या या बैठकीला जायचे की नाही यावर ब्राह्मण संघटनांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. परशुराम सेवा संघ, ब्राह्मण महासंघ या संघटनांनी पवार यांचे निमंत्रण नाकारले असून या बैठकीला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ब्राह्मण महासंघाचा कोणताही पदाधिकारी या बैठकीला जाणार नसल्याचे ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले आहे. तर अन्य संघटना या बैठकीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
आनंद दवे म्हणतात ,’ समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, गडकरी पुतळे, पुणेरी पगडी, संभाजी ब्रिगेड, श्रीमंत कोकाटे, बाबासाहेब पुरंदरे हे जुने विषय जरा बाजूला ठेवू. पण अगदी परवाच्या प्रकरणानंतर शरद पवार यांनी आमदार अमोल मिटकरी यांना त्यांचे वक्तव्य माघार घ्यायला सांगायला हवे होते. उलट दुसऱ्या दिवशी त्यांनी शाहू महाराज आणि ज्योतिष यांची गोष्ट सांगितली. त्याच व्यासपीठावर त्यांच्याच उपस्थितीत मंत्री छगन भुजबळ यांनी पुरोहित हे धंदा करतात (व्यवसाय नाही) हा शब्द वापरत पुन्हा टिंगल केली आणि आरक्षणाचं चुकीचं उदाहरणं दिलं.देवांचा बाप असल्याचा पण साक्षात्कार शरद पवार यांना अगदीच काल, परवा झाला. केतकी चितळे पूर्णतः चुकल्याचे मान्य आहे. आपण पण तिच्यावर टिकाच केली. पण शरद पवार यांनी जर केतकी यांना माफ करून गुन्हे मागे घेण्यास सांगितले असते तर ते खूप मोठे झाले असते. पण केतकी यांच्यावर २८ ठिकाणी गुन्हे दाखल केले, त्याच पोलिसांनी मिटकरी यांच्यावर मात्र एकही गुन्हा नोंदवला नाही. आपल्या आंदोलनानंतर राज्यभर समाज जागा झाला, पण तरीही त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली (दिवंगत माणसावर टीका करत नाहीत शक्यतो कोणीच)आपला शरद पवार यांना व्यक्तिगत काहीच विरोध नाही, त्यांच्या मतदार संघातील ब्राह्मण समाज सुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याच फारसे ऐकीवात नाही. पण राजकीय फायद्यासाठी शरद पवार ब्राह्मण समाजाचा वापर करतातं हे निश्चित. त्यांनी आधी मिटकरी, भुजबळ यांच्या वक्तव्यांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी एवढीच अपेक्षा आहे. अर्थात ज्या ज्या वेळेस शरद पवार किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जातीय उल्लेख केले आहेत त्या वेळेस अन्य राजकीय पक्ष सुद्धा मूग गिळून गप्प असतात हे सुद्धा तितकच दुर्दैवी सत्य. त्यामुळे शरद पवार यांना सार्वजनिक व्यासपीठावर भेटण्याची ही वेळ नाही. त्यातून दुरावा आणखी वाढेल असे आम्हाला वाटते, असे दवे यांनी स्पष्ट केले.
पुणे- लाल महालाच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिकेची आहे. सध्या पालिकेत प्रशासक आहे. त्यावर राज्य सरकारचे नियंत्रण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आंदोलन ही नौटंकी आहे.म्हणजे हे आंदोलन राज्य सरकार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्याच विरोधात करत आहेत. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी ते ही नौटंकी करीत आहेत.असा आरोप करत भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी लालमहल येथे चित्रित केलेले लावणी नृत्य समाजमाध्यमात व्हायरल करुन भावना दुखावल्याप्रकरणी कठोर कारवाई करा अशी मागणी केली आहे. सदर प्रकारामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या असून आपण स्वतः या प्रकरणी लक्ष घालून तातडीने कारवाई करावी अशी मागणीहि भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन केली. आमदार माधुरी मिसाळ त्यांच्या सोबत होत्या.
ते म्हणाले,’ हिंदुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या वास्तव्याने आणि पराक्रमाने पावन झालेला लालमहल समस्त हिंदुंसाठी एक पवित्र स्थान आहे. ही केवळ एक वास्तू नसून हिंदवी स्वराज्याचा इतिहासाचे सोनेरी पर्व यात दडलेले आहे. त्यामुळे या वास्तुची गरिमा, पावित्र्य राखणे अत्यंत आवश्यकच आहे. समाजमाध्यमात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदर व्हिडिओ हा लालमहलमध्ये चित्रित केला गेला असून यात लावणीवर नृत्य केल्याचा प्रकार आहे. लावणी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असली, तरी त्याचे सादरणीकरण करण्यासाठी वेगळी व्यासपीठे उपलब्ध आहेत. मात्र तरीही लालमहलमध्ये हा प्रकार घडला. हे जितके धक्कादायक आहे, तितकेच चीड आणणारेही.
मुळीक पुढे म्हणाले, नृत्य सादर केल्याप्रकरणी नृत्यांगनेवर कारवाई तर करावीच, शिवाय तीला आतमध्ये जाण्यास कोणी मदत केली? सुरक्षारक्षक काय करत होते? जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका काय? याचीही उत्तरे मिळवून योग्य ती कारवाई तातडीने करावी, अशी भारतीय जनता पक्षाची मागणी आहे.
मे 2022 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दोन भारतीय नौका तामिळनाडूच्या किनार्यावरून निघणार आहेत आणि अरबी समुद्रात कुठेतरी त्यांना अंमली पदार्थांचा मोठा साठा मिळेल अशी माहिती गेल्या काही महिन्यांत गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीचे बारकाईने विश्लेषण केल्यावर आढळून आली आणि त्यानंतर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने मोहीम सुरु केली.
त्यानुसार, भारतीय तटरक्षक दलासह (ICG) महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची संयुक्त मोहीम 7 मे 2022 रोजी ऑपरेशन खोजबीन या सांकेतिक नावाने सुरू करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत, डीआरआय अधिकार्यांसह तटरक्षक जहाज सुजीतने आर्थिक क्षेत्राजवळ (Economic Zone) बारीक नजर ठेवली. खवळलेल्या समुद्रात अनेक दिवस सतत शोधकार्य आणि निरीक्षण केल्यानंतर, “प्रिन्स” आणि “लिटल जीझस” या दोन संशयित बोटी भारताच्या दिशेने जाताना दिसल्या. दोन्ही भारतीय बोटी भारतीय तटरक्षक दल आणि डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी 18 मे 2022 रोजी लक्षद्वीप बेटांच्या किनाऱ्याजवळ रोखल्या होत्या. या बोटीतील काही खलाशांची चौकशी केली असता त्यांनी भर समुद्रात त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात हेरॉईनचा साठा आला होता आणि त्यांनी तो दोन्ही बोटींमध्ये लपवून ठेवला असल्याची कबुली दिली. त्यानंतर दोन्ही बोटी पुढील कार्यवाहीसाठी कोची येथे नेण्यात आल्या.
कोची येथील तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालयात दोन्ही बोटींची कसून झडती घेण्यात आली, ज्यामध्ये प्रत्येकी 1 किलो हेरॉईनची 218 पाकिटे जप्त करण्यात आली. एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींनुसार जप्तीची कारवाई सध्या डीआरआयकडून केली जात आहे. विविध ठिकाणी शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
डीआरआय आणि भारतीय तटरक्षक दलाद्वारे या मोहिमेचे काळजीपूर्वक नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात आली आणि गेले काही दिवस खवळलेल्या समुद्रात देखरेख ठेवण्यात आली. जप्त केलेले मादक पदार्थ उच्च दर्जाचे हेरॉईन असल्याचे आढळले असून आंतरराष्ट्रीय अवैध बाजारपेठेत त्याची किंमत 1,526 कोटी रुपये आहे. अलीकडच्या काळात, डीआरआय आणि भारतीय तटरक्षक दलाने अमली पदार्थ तस्करीविरोधी काही महत्त्वाच्या कारवाया हाती घेतल्या आहेत.
गेल्या महिन्याभरात डीआरआयने पकडलेला अमली पदार्थांचा हा चौथा मोठा साठा आहे. यापूर्वी डीआरआयने 20.04.2022 रोजी कांडला बंदरावर जिप्सम पावडरच्या व्यावसायिक आयात खेपेतून 205.6 किलो हेरॉईन, 29.04.2022 रोजी पिपावाव बंदरावर 396 किलो धागा (हेरॉईन सह ) आणि नवी दिल्ली विमानतळाच्या एअर कॉम्प्लेक्स कार्गो येथे 10.05.2022 रोजी 62 किलो हेरॉईन साठा जप्त केला होता. याचे एकूण मूल्य आंतरराष्ट्रीय अवैध बाजारात अंदाजे 2500 कोटी रुपये आहे.
एप्रिल 2021 पासून, डीआरआयने आंतरराष्ट्रीय अवैध बाजारपेठेत अंदाजे 26,000 कोटी रुपये किमतीचे 3,800 किलो पेक्षा अधिक हेरॉईन जप्त केले आहे. यात सप्टेंबर 2021 मध्ये मुंद्रा इथून 3000 किलो हेरॉईन, जुलै 2021 मध्ये न्हावा शेवा बंदर येथे 293 किलो हेरॉईन, फेब्रुवारी 2022 मध्ये तुघलकाबाद, नवी दिल्ली येथे 34 किलो हेरॉईनचा समावेश आहे. याशिवाय हवाई प्रवाशांकडूनही काही साठा जप्त करण्यात आला. याशिवाय 350 किलो पेक्षा जास्त कोकेन. ज्याची आंतरराष्ट्रीय अवैध बाजारपेठेत 3,500 कोटी रुपये किंमत आहे, ते डीआरआयने जप्त केले होते, ज्यात एप्रिल 2021 मध्ये तुतिकोरिन बंदरातील कंटेनरमधून जप्त केलेला 303 किलो कोकेन साठ्याचा समावेश आहे.
महसूल गुप्तवार्ता संचालनालय आणि भारतीय तटरक्षक दलाचा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध संयुक्त लढा सागरी मार्गांद्वारे देशात अंमली पदार्थांचा ओघ रोखण्यात यशस्वी ठरला आहे.
ठाणे: आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन महानगरांमधील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकू असा विश्वास त्यांच्यात निर्माण करावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शहापूर तालुक्यातील कोठारे येथील आश्रमशाळेच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शहापूर तालुक्यातील कोठारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या नुतन इमारतीचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन आणि शहापूर तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख आमदार दौलत दरोडा, वि.जा. व भ.ज. कल्याण समिती प्रमुख आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील, प्रकल्पस्तरीय आढावा समिती अध्यक्ष आशा मोरे, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहब दांगडे, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त महेंद्र वारभुवन, ठाण्याच्या अपर जिल्हाधिकारी वैदेही रानडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिक्षण हा आदिवासी बांधवांचा मूलभूत अधिकार
यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, आश्रमशाळांच्या केवळ चांगल्या इमारती उभ्या न करता तेथे आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देवून त्यांचे भविष्य घडले पाहिजे. आश्रमशाळांमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षकांची पारदर्शकपणे भरती केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे आधुनिक शिक्षण देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान,तंत्रज्ञान विषयाशी मैत्री करून जागतिक घडामोडीदेखील समजून घेतल्या पाहिजे. शिक्षण हा आदिवासी बांधवांचा मूलभूत अधिकार असून तो मिळवून देण्याची आमची जबाबदारी असल्याची भावना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
शहापूरच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही
आदिवासी भागात कुपोषणाची समस्या कमी करण्याकरीता सकस आहारावर भर दिला पाहिजे. या भागातील मुला-मुलींना हा सकस आहार मिळवून देण्यासाठी पाऊले उचलण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शहापूर तालुक्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत असून यासंदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये मंत्रालयात आदिवासी विकास, जलसंपदा, गृहनिर्माण आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची बैठक घेवून पाणी प्रश्न आणि आदिवासी बांधवांना घरे देण्याबाबत मार्ग काढला जाईल. या भागाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रस्तावित योजनेला मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शहापूरच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आदिवासी भागात नर्सरी शिक्षण सुरू करण्याचा प्रयत्न- आदिवासी विकास मंत्री ॲड. पाडवी
आदिवासी विकासमंत्री ॲड पाडवी म्हणाले की, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकरीता आदिवासी भागासाठी शिक्षण धोरण नव्याने करण्याची गरज असून त्यामध्ये लहानपणापासून मुलांना इंग्रजीचे ज्ञान देण्यासाठी भर द्यायची आवश्यकता आहे. या वर्षापासून आदिवासी भागात नर्सरी शिक्षण सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी येथे सांगितले. आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावतानाच आदिवासी भागातील मुलंमुली भारतीय प्रशासन सेवेत येण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी विभागामार्फत विटभट्टी मजुरांना सक्षम करण्यासाठी योजना काढत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केंद्र शासनाच्या आदिवासी विभागाकडून मिळणारा निधी वाढवून देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. शहापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी भरीव निधी दिला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन मिळावे- केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले की, आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन मिळाले पाहिजे. जेणेकरून त्यांच्यातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आपले भविष्य करू शकेल. शहापूर तालुक्याच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येवून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार श्री.दरोडा यांनी मनोगत व्यक्त केले. शहापूर तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची त्यांनी माहिती दिली. कोठारे उपसा जलसिंचन योजनेसाठी निधी देण्याची मागणी यावेळी केली. आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव यांनी यावेळी प्रास्ताविक केले.
यावेळी विविध विभागांच्या माध्यमातून योजनांविषयी माहिती देणाऱ्या स्टॉलची पाहणी उपमुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी केली. यावेळी उमुख्यमंत्री यांच्या हस्ते मोबाईल व्हेजिटेबल व्हॅन वितरण, गुणवंत विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बचत गट आणि वीटभट्टी व्यवसाय लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना तुला भविष्यात काय व्हायचं आहे अशी विचारणा उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला केली.
ढोल, लेझिम पथक आणि पारंपरिक आदिवासी नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आदिवासी विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी आभार मानले.
पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए एआयटीए 18वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात मुंबईच्या ओमर सुमर याने तर, मुलींच्या गटात नागपूरच्या सेजल भुतडा यांनी विजेतेपद संपादन केले. तर, दुहेरीत मुलांच्या गटात सार्थ बनसोडे व सिद्धार्थ मराठे यांनी तर, मुलींच्या गटात प्रिशा शिंदे व वैष्णवी चौहान यांनी विजेतेपद पटकावले. एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात पाचव्या मानांकित मुंबईच्या ओमर सुमर याने सार्थ बनसोडेचा 3-6, 6-3, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. 2तास मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये 2-2 अशी बरोबरी असताना सार्थने ओमरची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या ओमरने तिसऱ्या गेममध्ये सार्थची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये ओमरने सुरेख खेळ करत सार्थची पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस रोखली. या सेटमध्ये ओमरने आपले वर्चस्व कायम राखत हा सेट 6-2 असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ओमर हा एनआयओएस मध्ये 12वी इयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असून बाऊन्स टेनिस अकादमीत प्रशिक्षक केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या गटात अंतिम फेरीत सातव्या मानांकित नागपूरच्या सेजल भुतडा हिने आठव्या मानांकित डेनिका फर्नांडोचा 7-5, 6-2 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. सेजल ही रामनगर भरत विद्यालय शाळेत 9वी इयत्तेत शिकत असून एनडीएचए,नागपूर येथे प्रशिक्षक विशाल लांडगे व नवीन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे या वर्षांतील हे दुसरे विजेतेपद असून याआधी हैदराबाद येथे मागील आठवड्यात झालेल्या 16 वर्षांखालील स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. दुहेरीत मुलांच्या गटात अंतिम फेरीत सार्थ बनसोडे व सिद्धार्थ मराठे यांनी साहिल तांबट व अर्णव कोकणे यांचा 6-3 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. साहिल तांबटला पायाला दुखापत झाल्यामुळे सामन्यातून माघार घेतली व त्यामुळे सार्थ बनसोडे व सिद्धार्थ मराठे यांना विजेते घोषित करण्यात आले. मुलींच्या गटात प्रिशा शिंदे व वैष्णवी चौहान या जोडीने सेजल भुतडा व अभिलिप्सा मल्लिक यांचा 6-4, 3-6, 10-8 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण वितरण स्पर्धा संचालक संदीप नुलकर आणि प्रणव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचा सविस्तर निकाल: एकेरी: मुख्य ड्रॉ: अंतिम फेरी: मुले: ओमर सुमर(महा)[5]वि.वि.सार्थ बनसोडे(महा)3-6, 6-3, 6-2; मुली: सेजल भुतडा(महा)[7]वि.वि.डेनिका फर्नांडो(महा)[8]7-5, 6-2; दुहेरी:अंतिम फेरी: मुले: सार्थ बनसोडे/सिद्धार्थ मराठे वि.वि.साहिल तांबट/अर्णव कोकणे[3] 6-3 सामना सोडून दिला; मुली: प्रिशा शिंदे/वैष्णवी चौहान वि.वि.सेजल भुतडा/अभिलिप्सा मल्लिक 6-4, 3-6, 10-8.
पुणे: वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या विविध कामांसोबतच वीजपुरवठ्यात अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटल्याने महावितरणच्या जनमित्रास फांदीच्या लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. पिंपरीमधील कामगार भवन परिसरात गुरुवारी (दि. १९) दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कर्मचाऱ्यास मारहाण तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या पिंपरी विभाग अंतर्गत अजमेरा कॉलनी शाखा कार्यालयाचे जनमित्र श्री. रामेश्वर बळीराम वाघमारे हे सहकारी श्री. अशोक मुळे तसेच दुरुस्ती कामाच्या कंत्राटदाराचे दोन कर्मचारी यांच्यासमवेत पिंपरीमधील कामगार भवन परिसरात रोहित्राची पावसाळापूर्व तपासणी तसेच देखभाल व दुरुस्तीचे काम करीत होते.
दरम्यान या रोहित्राच्या बाजूलाच असणाऱ्या झाडाच्या फांद्यांचा रोहित्र व वीजयंत्रणेला स्पर्श होण्याचा संभव असल्याने फांद्या तोडणे आवश्यक असल्याचे दिसले. याबाबत त्यांनी सहायक अभियंता सौ. सुरेखा भारती यांना कळविले. त्यांच्या सूचनेनुसार वीजपुरवठ्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम सुरु केले. मात्र त्याचवेळी बाजूच्या गांधीनगर झोपडपट्टीतून एक इसम आला व स्वतःचे नागराज शंकर भांडेकर असे नाव सांगत फांद्या का छाटत आहे असे विचारत शिविगाळ करू लागला. महावितरणच्या गणवेशधारी कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र दाखवून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण काहीही समजून न घेता सदर इसम रोहित्राच्या कुंपणाच्या आत आला. त्यामुळे पुढील वाद व अनर्थ टाळण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद केले व दुरुस्तीचे साहित्य घेऊन तिथून निघाले. मात्र त्याचवेळी आरोपी भांडेकर याने जनमित्र श्री. वाघमारे यांच्या डोक्यावर, पायावर व पाठीवर झाडाच्या फांदीने मारहाण केली. यामध्ये श्री. वाघमारे जखमी झाले.
या मारहाणप्रकरणी नागराज शंकर भांडेकर (वय ४५) विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात कलम ३५३, ३२३, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.