मुंबई -ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे. महाराष्ट्रातील सर्व ओबीसींना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणारे पत्र नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. ओबीसी समाजावर राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात अन्याय होत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात बहुजनांवर अन्याय होणे योग्य नाही, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की, 2017 पासून ओबीसी आरक्षणाला महाराष्ट्रात ग्रहण लागलेले आहे. ते आजही संपलेले नाही. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ओबीसींना आरक्षण मिळावे आणि आता होणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाने व्हायला हव्यात. त्या दृष्टीकोनातूनच मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेवर जाण्यासाठी सर्वपक्षीयांना आवाहन केलंय. पण आधी शिवबंधन बांधा मग आम्ही तुमची उमेदवारी घोषित करु, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. सेनेच्या भूमिकेने संभाजीराजेंची अडचण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, उमेदवारी देण्याचा अधिकार सेनेला आहे. सेना ज्या व्यक्तीला उमेदवारी देईल. त्यांना आमचा पाठिंबा राहिल. संभाजीराजेंबद्दल आदर आहे. शिवसेनेच्या निर्णयाला आमचे समर्थन राहिल.
ओबीसींचा राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आजही तोडगा निघालेला नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण टिकावं यासाठी राज्य सरकारकडून प्रचंड प्रयत्नही सुरु आहेत. पण राज्य सरकारला त्यामध्ये हवं तसं यश मिळताना दिसत नाहीय. राज्यात दोन महिन्यांपूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे ओबीसी समाजातील नेते आक्रमक झाले आहेत.
समर्पित आयोगाच्या सदस्यांनी रविवारी (२२ मे) विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या तेव्हा त्यांना संघटनांच्या नाराजीचा सामना करावा लागला. ओबीसी आरक्षण देण्यात दिरंगाई हाेत असल्याबद्दल बहुतांश लाेकांनी नाराजी व्यक्त केली. इम्पिरिकल डेटा तातडीने गोळा करण्याची मागणी करत ८३ पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सदस्यांसमोरच निवेदन फाडून फेकले.
नागपूर,दि.22:स्वातंत्र्याचा लढा असो वा दुष्काळ, कोरोना सारखी महामारी असो वा देशावर आक्रमण. सामान्यांच्या पोटाची भूक भागवणारा एक कारखाना या देशातील श्रमशक्ती अर्थात शेतकरी सदैव चालवीत असतो. या श्रमशक्तीचा सन्मान करण्याचे महान कार्य फेटरी येथील जनतेने केले असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय,युवक व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.
महाराष्ट्रात सर्व ठिकाणी या श्रमशक्तीचा सन्मान म्हणून शेतकऱ्यांचे पुतळे उभे राहिले पाहिजे, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वातंत्र्य संग्रामात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. देशभक्तीने प्रेरित होऊन अनेक शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यासोबत देशाला अन्न धान्याचा पुरवठा नियमित चालू ठेवला. कोरोना महामारीच्या काळात सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झाले असतांना शेतकऱ्यांचा व्यवसाय नियमित होता. अशा शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आला आहे. असेच पुतळे राज्यातही उभारुन शेतकऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना निर्माण केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
मंत्री सुनील केदार यांच्या प्रेरणेतून ‘देशाचा पोशिंदा शेतकरी’ हा पुतळा ग्रामपंचायत फेटरी येथे उभारण्यातआला. या पुतळ्याचे अनावरण आज त्यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते. कृष्णा इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायंन्स, कराडचे कुलगुरु वेदप्रकाश मिश्रा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी मंत्री रमेश बंग, कृषी व पशुसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, शिक्षण व अर्थ सभापती भारती पाटील, महिला व बालकल्याण सभापती उज्वला बोढारे, नागपूर (ग्रामीण) पंचायत समितीच्या सभापती रेखा वर्टी, जिल्हा परिषद सदस्य कुंदा राऊत, ममता धोपटे, दिनेश बंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अहमद शेख, पंचायत समिती सदस्य रुपाली मनोहर, प्रिती अखंड, माहुरझरीचे सरपंच संजय कुंटे यावेळी उपस्थित होते.
देशाची आर्थिक घडी बसविण्यात शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांनी कष्टाने हा देश उभा केला आहे. या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांना मानाचे स्थान मिळावे हा यामागचा उद्देश असल्याचे श्री. केदार म्हणाले
सुनील केदार यांच्या प्रेरणेतून उभारण्यात आलेला शेतकरी पुतळा राज्यातील पहिला प्रयोग असावा, असे कृष्णा इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायंन्स, कराडचे कुलगुरु वेदप्रकाश मिश्रा यांनी सांगितले. कष्टकरी व सेवाभावी शेतकऱ्यांचा पुतळा येथे उभारण्यात आला. याबाबत शेतकरी वर्गात अभिमानाची बाब असून एक नवचैतन्य त्यांच्यात निर्माण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
1971 च्या लढ्यात माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’ चा नारा देवून देशभक्तीची भावना देशवासियांच्या मनात रुजविली होती, त्यांचे स्मरण यावेळी होत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीची वाट मिळून प्रेरणा मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषद सदस्य कुंदा राऊत व मान्यवरांनी यावेळी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फेटरीचे सरपंच धनश्री ढोमणे यांनी केले. या कार्यक्रमास परिसरातील सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई, दि. २२ मे – पक्ष कोणताही असला तरी गोरगरिबांची सेवा करणे, तळागाळातील समाजाच्या उन्नतीसाठी काम करणे हे मानवजातीचे परमकर्तव्य आहे. त्यांना ताकद देणे, मदत करणे हे आमचे सर्वांचे कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या भावनेतून मी या सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहिलो, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. श्री भागवत परिवार मुंबई आणि श्री ताडकेश्वर गौसेवा ट्रस्ट यांच्या वतीने ठाकूर व्हीलेज मुंबई येथे २५ आदिवासी जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा ताडकेश्वर महादेव गौशाळा, जानुपाडाजवळ, ठाकूर व्हीलेज, कांदिवली (पूर्व) येथे रविवारी पार पडला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहून वधूवरांस शुभाशीर्वाद दिले आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्याप्रसंगी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या पवित्र सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी आदिवासी भागातील गरीब आणि विवाहेच्छुक तरुणांचा विवाह करून देण्याचे पवित्र कार्य करण्यासाठी सगळ्यांचे अभिनंदन. या मोहिमेसाठी माझी काही मदत लागल्यास मी त्यासाठी कायम तयार आहे. या विवाह झालेल्या तरुणांना पुढील आयुष्यासाठी काही सहकार्य लागल्यास त्यासाठी मी तयार आहे, असे दरेकर यांनी सांगितले. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश दरेकर, विरेन्द्र याग्निक, सत्यप्रकाश गोयल, एसीपी संजय पाटील, त्यागीजी, राहुल टांगरी. निशा परुळेकर, सुनील सिंघल. दिलीप उपाध्याय, लकी यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई – कै. पं. रामदास कामत, किर्ती शिलेदार, आशालता वाबगावकर या संगीत नाट्य क्षेत्रातील दिग्गजांना श्री. गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधी व इव्हेंट एनीथिंग अँड एवरीथिंग च्या सहकार्याने आयोजित स्वर वंदना या कार्यक्रमाद्वारे नुकतीच सांगीतिक मानवंदना देण्यात आली!
रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथील पु ल *देशपांडे अकादमीच्या तिसऱ्या मजल्यावरील थिएटर मध्ये आयोजित या कार्यक्रमास
श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीचे अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, धी गोवा हिंदू असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पै काकोडे ,चेअरमन डॉ.अशोक आमोणकर , कार्यकारिणी सदस्य सुरेश पालेकर,सचिव भूषण जॅक,
ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष डॉ.अजित गुंजीकर, समिती सदस्य सुनील रेगे, मिलिंद राजाध्यक्ष, दीपक पंडित, सुभाष कामत, क्रिकेटपटू रवी मांद्रेकर, जान्हवी पणशीकर, तरंगिणी खोत, मुकुंद सराफ, सुनील उल्लाळ, चित्रा नाबर – केरकर, अभय कुलकर्णी, शरद विचारे ,दीपक पडते,रविंद्र ढवळे, विश्वास महशब्दे, शीतल करदेकर आदी दिग्गज तसेच मोठ्या संख्येने चाहता वर्ग उपस्थित होता! आशालता यांची ‘अर्थशून्य भासे मज हा’ (मत्स्यगंधा)आणि ‘वद जाऊ कुणाला शरण'(सौभद्र) मानसी फडके ,’तु सुखकर्ता तु दु:खहर्ता’ (आरती) आणि ‘तव भास अंतरा’ (मत्स्यगंधा) नुपूर गाडगीळ यांनी सादर केली. पं. रामदास कामत यांची ‘श्रीरंगा कमला कांता'(होनाजी बाळा) , ‘स्वकर शपथ वचनी वाहिला’ (संशयकल्लोळ), ‘तम निशेचा सरला'(ययाती आणि देवयानी) ‘देवाघरचे ज्ञात कुणाला ‘( मत्स्यगंधा ) ही गाणी धनंजय म्हसकर यांनी सादर केली. तर ‘चंद्रिका ही जणू’ (मानापमान), ‘कोण तुजसम सांग मज गुरूराया’ (सौभद्र) , ‘गोय तुझी याद येता'(कोकण गीत)निनाद जाधव यांनी सादर केली! किर्ती शिलेदार यांची गाणी ‘मजवरी तयाचे प्रेम खरे'( संशयकल्लोळ)मानसी फडके,’अगा वैकुंठाच्या राया'(कान्होपात्रा )मानसी फडके आणि जोहार मायबाप जोहार (कान्होपात्रा )व ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ (ययाती आणि देवयानी) नुपूर गाडगीळ यांनी सादर केली.
अतिशय चपखल व उत्तम नाट्यगीत सादरीकरणाने या तीनही दिग्गजांच्या आठवणींना उजाळा मिळाला; तो सुभाष सराफ यांच्या अभ्यासपूर्ण ओघवत्या निवेदनाने आणि राजेंद्र भावे ( व्हायोलिन) ,सुहास चितळे( तबला) ,ओमकार अग्निहोत्री( हार्मोनियम ) यांच्या अचुक वाद्यसाथीने ! आठवणीने बहरलेली ही स्वरवंदनेची संध्याकाळ अविस्मरणीय अशी ठरली
योगशाळा एम फिटनेस आणि योगथेरपीच्यावतीने योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अॅक्वाथॉन या अॅक्वा योगा कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : वृक्षासन…गरुडासन…नटराजासन…पश्चिमोत्तानासन…ताडासन या सोबतच एरोबिक्स आणि पाण्यातील सूर्यनमस्कार अशी विविध आसने पाण्यात करुन भारताची प्राचीन संस्कृती असलेल्या योगाचे महत्त्व सांगण्यात आले. डोळ्यांना शितल अनुभूती देणाऱ्या योगप्रकारांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. योगशाळा एम फिटनेस आणि योगथेरपीच्या वतीने योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अॅक्वाथॉन या अॅक्वायोगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालगंधर्व रंगमंदिरातील नांदे जलतरण तलावात योगाची प्रात्यक्षिके करण्यात आली. सोनाली मगर मोरे आणि मनाली मगर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही योगासने करण्यात आली. सोनाली मोरे म्हणाल्या, पाण्यामध्ये करण्यात येणारा योग हा आपल्या शरिरासाठी अतिशय उपयुक्त आहे. अॅक्वा योगामुळे शरिराचा तोल सांभाळण्याची क्षमता वाढते. शरीराची लवचिकता वाढून पोटाचे आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात. पाण्यामध्ये शरीराचे वजन जाणवत नसल्याने व्यायामप्रकार अधिक चांगल्या पद्धतीने करता येतात, असेही त्यांनी सांगितले.
आपला समाज आणि देश झपाट्याने बदलतो आहे. आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करतो आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारतात सोसायटींचा स्वयंपुनर्विकास ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वास्तू विशारद चंद्रशेखर प्रभू यांनी केले. तसेच आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरुडच्या विकासाच्या संकल्पाला साथ देण्यासाठी कोथरूड मधील सोसायटींना पुनर्विकास करायचा असेल, तर त्यांना मोफत मार्गदर्शन करणार असल्याची घोषणा ही त्यांनी यावेळी केली.
कोथरूड मधील सर्व सोसायटी आणि अपार्टमेंट मधील नागरिकांच्या कायदेविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने सर्व सोसायटी आणि अपार्टमेंट मधील रहिवाशांचे एकत्रिकरण करुन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. चंद्रशेखर प्रभू बोलत होते.
या कार्यक्रमास भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ चंद्रकांतदादा पाटील, पुण्याचे खासदार गिरीश बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सहकार विभागाचे माजी आयुक्त चंद्रकांत दळवी, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, अॅड. मिताली सावळेकर, मोहना नातू यांच्या सह भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कोथरुडमधील विविध सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मा. श्री. चंद्रशेखर प्रभू म्हणाले की, आज पुनर्विकासापेक्षा स्वयंपुनर्विकास अतिशय गरजेचं आहे. कारण बिल्डरच्या माध्यमातून सोसायट्यांचा पुनर्विकास होताना, नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. त्यामुळे सोसायटीच्या रहिवाशांवी पुनर्विकासाऐवजी स्वयंपुनर्विकासाकडे वळले पाहिजे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा मंत्र दिला आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारतात सोसायटींचा स्वयंपुनर्विकास ही काळाची गरज आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, मुंबईत अनेक सोसायट्यांना स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून स्वतःच स्वतःचा विकास करुन घेत आहेत. पुण्यात ही विशेष करुन कोथरुड मध्येही अनेक सोसायट्या पुनर्विकासाच्या टप्प्यावर आहेत. त्यामुळे त्यांनी पुनर्विकासाऐवजी स्वयंपुनर्विकासाकडे वळले पाहिजे. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून क्रांतीकारी पाऊल पुढे टाकले आहे. कोथरुडच्या विकासाच्या त्यांच्या संकल्पाला साथ म्हणून कोथरूड मधील कोथरूड मधील सोसायटींना पुनर्विकास करायचा असेल, तर त्यांना मोफत मार्गदर्शन करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले की, आज पुण्यातील अनेक सोसायट्या पुनर्विकासासाठी प्रयत्नशील आहेत. पण बहुतांश सोसायट्यांचे डिम कन्व्हेयन्स झाले नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बिल्डरकडून सोसायट्यांची स्थापना करुन घेऊन डिम्ड कन्व्हेयन्ससाठी प्रयत्न करावेत.
ते पुढे म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळाच्या अखेरिस वर्ग २ च्या जमिनी एक करण्याचा निर्णय झाला होता. यासाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. पण याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे याला पुन्हा तीन वर्षांची मुदतवाढ मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, माझ्या कोथरुड मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रॉपर्टी कार्ड विषयात काम करायला सुरु केल्यानंतर अनेक विविध समस्यांची जाणीव झाली. या सोडविण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे गावांच्या विकासासाठी पंचायत राजची संकल्पना जशी अंमलात आली. त्याचं पद्धतीने शहरातील सोसायट्यांमधील रहिवासी कुटुंबांची संख्या लक्षात घेऊन, त्या सोडविण्यासाठी काम करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खा. गिरीश बापट म्हणाले की, पानशेतच्या पूरानंतर पुण्याचं स्वरुप बदलले. वाडा संस्कृतीची जागा फ्लॅट संस्कृतीने घेतली. त्याअनुषंगाने मूलभूत सुविधांसाठी सोसायट्यांची गरज अधोरेखित झाली. अन् हे महत्व ओळखूनच पुण्यात गृहनिर्माण सोसायट्या अस्तित्वात आल्या. या सोसायट्यांचे वातावरण चांगले राहण्यासाठी, त्यांच्या समस्या वेळीच सोडविल्या पाहिजेत.असे त्यांनी यावेळी सांगितले.
कोथरुड मधील सोसायटीतील नागरिकांचे विधी विषयक प्रश्न सोडविण्यासाठी आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती अॅड.मिताली सावळेकर यांनी दिली. कार्यक्रमाचे स्वागतपर प्रास्ताविक कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. संदीप बुटाला यांनी केले. अॅड. मोहना नातू यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास कोथरूड मधील २२५ सोसायटीचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते. यावेळी सोसायटी आणि अपार्टमेंट मधील कायदेविषयक समस्या सोडविण्यासाठीच्या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप यावेळी करण्यात आले.
मुंबई, दि. २२ मे – मलिक यांचा थेट संबंध दाऊदशी प्रस्थापित झालाय. बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जागा घेतल्यायत, व्यवहार केलेत, हे कोर्टात सिद्ध झाले आहे. दाऊदशी संबंध प्रस्थापित झालेत अशा प्रकारचा मंत्री नवाब मलिक आज तुमच्या मंत्रिमंडळात आहे, याची लाज, शरम वाटत नाही. आणि नवाब राहिला दूर पहिले दाऊदचे बघा अशा प्रकारचे बोलण्याचे धाडस केवळ संजय राऊत करू शकतात, असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. दाऊद जीवंत आहे की नाही हे पाहा, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, दाऊद जीवंत आहे की नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांच्यासारख्या जबाबदार खासदाराने करणे हे बरोबर नाही. संजय राऊत यांना दाऊद याच्याबद्दल काही माहिती असेल तर त्यांनी ती द्यावी. दाऊदला फरफटत आणण्याची ताकद नरेंद्र मोदी सरकारमद्धेच आहे. आणि त्यांनी ते दाखवून दिले आहे. ३७० कलम या देशात रद्द होऊ शकत नाही, रक्ताचे पाट वाहतील, असे बोलणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे. रक्ताचा एक थेंबही या देशात सांडला नाही. त्यामुळे ती क्षमता, धमक, ताकद मोदी सरकारमद्धेच आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. आपल्याला बोलण्याचा नैतिक अधिकार तेव्हाच निर्माण होईल, जेव्हा दाऊदशी संबंध असलेल्या नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी कराल. पहिले त्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा कारण तो दाऊदशी संबंधित आहे, हे सिद्ध झालेले आहे. म्हणजे आपले ठेवायचे झाकून आणि नको तो सल्ला देण्याचे काम संजय राऊत करतायत. लोकांना सर्व काही समजते, असे दरेकर यांनी सांगितले.
तूर्तास स्थगित केलेल्या अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत खुलासा केला. मनसेच्या अयोध्या दौऱ्याबाबत मुद्दाम वातावरण तापवले गेले. अन्यथा युपीच्या एका खासदाराची त्यांच्याच मुख्यमंत्र्यांना विरोध करण्याची हिम्मत कशी काय होते?, असा सवाल राज ठाकरेंनी केला. तसेच, या विरोधाची रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली, असा आरोपही त्यांनी केला.
माझ्या दौऱ्याला विरोध नेमका का होतोय, याबाबत मुंबईसह युपीतूनही माहिती मिळवली, तेव्हा आपल्याला हा अडकवण्याचा ट्रॅप आहे, हे मला समजले, असे राज ठाकरे म्हणाले. समजा मी हट्टाने अयोध्या दौऱ्याला जायचे असे ठरवलेच तर मनसैनिकांसह हजारो हिंदु बाधव दौऱ्यावर आले असते. दौऱ्यात आपल्याला कुणी डिवचले असत तर मनसैनिकही अंगावर धावले असते. त्यानंतर मनसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना केसेसमध्ये अडकवून तुरुंगात सडवले गेले असते. राज्यात ऐन निवडणुक असतानाच आपल्यावर कारवाईचा फास आवळला गेला असता. हा सर्व ट्रॅपच असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मात्र, यादरम्यान राज ठाकरेंनी कोणत्याही पक्षाचे वा व्यक्तीचे नाव घेतले नाही. त्यामुळे राज ठाकरे यांचा रोख नेमका शिवसेनेवर होता की भाजपवर यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.राज ठाकरे यांनी आपल्या आजाराबाबतही सभेत माहिती दिली. पायांना त्रास होत असल्यामुळेच मला पुणे दौरा अर्धवट सोडावा लागला. माझ्या हीपबोनवर एक तारखेला शस्त्रक्रिया होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
अफजल खानच्या कबरीसाठी फंडिंग
एमआयएमचा माणूस औरंगजेबाच्या कबरीवर गेल्यानंतर महाराष्ट्र खवळेल, अशी मला आशा होती. मात्र, महाराष्ट्र थंड होता. विजापूरहून शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आलेल्या अफझल खानची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. या कबरीचा विस्तार आता 10 ते 15 हजार फुटांपर्यंत झाला आहे. तेथे अफजलखानच्या नावाने मशिदही बांधली जात आहे. त्यासाठी फडिंग येत आहे. फडींग करणाऱ्या या औलादी महाराष्ट्रात असूनही आपण थंड कसे, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
उत्तर भारतीयांना मारहाण केल्याप्रकरणी राज ठाकरेंनी माफी मागावी. अन्यथा त्यांना युपीत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा युपीचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिला आहे. त्यावर राज ठाकरे यांनी गुजरातमधील एका घटनेची आठवण ब्रिजभूषण सिंह यांना करुन दिली. काही वर्षांपुर्वी गुजरातमध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्यानंतर शेकडो युपी, बिहारच्या कामगारांना ठार मारण्यात आले. त्यानंतर काही बचावलेले कामगार मुंबईत आले. गुजरातमधील या घटनेवरून ब्रिजभूषण कोणाकडे माफीची मागणी करणार, असा सवाल राज ठाकरेंनी केला. तसेच, एवढ्या वर्षांनंतर उत्तर भारतीयांची आठवण कशी झाली, असा सवाल करत हे राजकारण समजून घ्या, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
अनेकांना अयोध्या वारी खुपली
अनेकांना माझी अयोध्या वारी खुपली. त्यामुळेच आपल्याला त्यात अडकवण्याचा आराखडा रचला गेला. मात्र, मला अयोध्येत केवळ राम मंदिराचे दर्शन घ्यायचे नव्हते. बाबरी मशिदीचे आंदोलन झाल्यानंतर अयोध्येत काही कारसेवकांचीही जाळून हत्या करण्यात आली होती. ती जागाही मला पाहायची होती. मात्र, मला विरोध करुन काहींनी हिंदुत्वाचेच नुकसान केले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
मातोश्री मशिद आहे का?
मी हनुमान चालिसा म्हणण्याचे आवाहन केल्यानंतर राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट धरला. मातोश्री म्हणजे मशिद होती का?, असा सवाल करत राज ठाकरेंनी राणा दाम्पत्यावरही टीका केली. तसेच, मनसेचे हिंदुत्व हे केवळ आंदोलनासाठी नव्हे तर रिझल्ट देणार आहे. मात्र, मुख्यमंत्री कोणाच हिंदुत्व खरे आणि कोणाचे खोटे, अशी पोरकट भाषा करत आहे. त्यांनी रिझल्ट दाखवावा. उद्धव ठाकरेंच्या अंगावर आंदोलन केल्याची एक तरी केस आहे का? ते कोणती भूमिकाच घेत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली.
मुख्यमंत्री गांधी आहेत का?
मुख्यमंत्री म्हणतात, औरंगाबादचे संभाजी नगर असे नामांतर करण्याची आवश्यकता काय? पण मुख्यमंत्री आहेत तरी कोण? ते वल्लभभाई पटेल आहेत की महात्मा गांधी?, असा सवाल राज ठाकरेंनी केला. औरंगाबादचे नामांतर करायचे असते तर आतापर्यंत झाले असते. मात्र, शिवसेनेला केवळ राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर करायचा आहे. त्यामुळेच हा मुद्दा सतत पेटता ठेवला जात आहे, असा आरोप राज ठाकरेंनी केला. मुख्यमंत्र्यांच्या अशा राजकारणामुळेच औरंगाबादेत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करुन एमआयएमचा खासदार निवडून आला. हेच एमआयएमचे नेते औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होत आहे आणि आपल्या राज्यकर्त्यांना याची लाजही वाटत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली. शिवसेनेमुळेच एमआयएम वाढत आहे, असा आरोपही त्यांनी केला
मोदींकडे 3 मागण्या
शरद पवार म्हणतात अफजल खान शिवाजी महाराजांना मारण्यासाठी नव्हे तर राज्य विस्तारासाठी आला होता. आता तरी पवारांनी असे राजकारण बंद करावे, असे राज ठाकरे म्हणाले. तसेच, पंतप्रधान मोदींकडे माझ्या तीनच मागण्या आहेत. देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणा, समान नागरी कायदा लागू करा आणि, या माझ्या मागण्या असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
शरद पवारांना टोला
आपल्या सभांना हॉल, सभागृह पुरवडत नाही. एसपी कॉलेजनेही आपल्याला सभेसाठी हॉल देण्यास नकार दिला. आम्ही कोणालाच सभागृह देत नाही, असे कॉलेजने सांगितले. त्यामुळे आम्हाला नाही तर ते सभागृह आता कोणालाच नाही, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला. तसेच, पुण्यात मैदानावर जाहीर सभा घ्यायची होती. मात्र, पावसाची शक्यता होती. म्हटल आता निवडणुका नाही तर उगीच भिजत सभा कशाला घ्यायच्या, असा खोचक टोलाही राज ठाकरेंनी शरद पवारांना टोला लगावला.
भोंग्यांसाठी आंदोलन सुरुच राहिल
मशिदींवरील भोंग्यांसाठी आंदोलन केल्यानंतर मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आता मशिदींवरील भोंग्याचा आवाज कमी करण्यासाठी प्रशासन मशिदींच्या व्यवस्थापकांसोबत चर्चा करत आहे. म्हणजेच ज्यांनी कायद्यांचा आग्रह धरला त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांचा छळ केला जात आहे. तर, बेकायदा वागणाऱ्यांसोबत राज्य सरकार चर्चा करत आहे. हे कोणते कायद्याचे राज्य, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
आदित्य ठाकरेंवर टीका
आज महाविकास आघाडी पाहून बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असता, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले होते. त्यावरही राज ठाकरे यांनी टिका केली. असे वक्तव्य करुन बाळासाहेब ठाकरेंची प्रतिष्ठा कमी करु नका. तुम्हाला बाळासाहेब ठाकरे तरी समजले आहेत का, असा सवाल त्यांनी केला.
पुणे, 22 मे 2022: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित मित्तल ब्रदर्स व हेड इक्विपमेंट प्रायोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या ओम दळवी मेमोरियल वन प्लस करंडक चॅम्पियनशीप सिरीज 12 वर्षांखालील राष्ट्रीय मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात युगंधर शास्त्री, आरव मुळ्ये, अंशुल पुजारी, रतन कुबसाद या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र पोलीस जिमखाना, औंध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम पात्रता फेरीत अव्वल मानांकित युगंधर शास्त्रीने वेदांत जोशीचा 6-4, 7-5 असा तर, दहाव्या मानांकित आरव मुळ्ये याने पाचव्या मानांकित नमन शहाचा 6-0, 6-1 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. रतन कुबसाद याने तेराव्या मानांकित पुरंजय कुतवळचा 6-3, 6-0 असा पराभव केला. स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:युगंधर शास्त्री[1] वि.वि.वेदांत जोशी[12] 6-4, 7-5;अंशुल पुजारी[2] वि.वि.आश्रित माज्जी[16] 6-1, 4-6, 6-4;सय्यम पाटील[3]वि.वि.प्रजित मादीरेड्डी[9] 6-3, 6-3;नीरज जोर्वेकर[4] वि.वि.अंश रामाणी 6-1, 6-1;आरव मुळ्ये[10] वि.वि.नमन शहा[5] 6-0, 6-1;रतन कुबसाद वि.वि.पुरंजय कुतवळ[13] 6-3, 6-0;रुद्र मेमाने वि.वि.आदिनाथ कचरे 1-6, 6-1, 6-2;तनिश पाटील[8] वि.वि.विवान मल्होत्रा 6-4, 6-1.
पुणे, 22 मे 2022: मुंबई उपनगर टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व सुहाना प्रायोजितएमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10वर्षांखालील टेनिस सर्किट या स्पर्धेच्या मुंबई लीग स्पर्धेत मुलींच्या गटात समीक्षा शेट्टी हिने तर, मुलांच्या गटात आरव शहा या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.
प्रकटेनिस अंधेरी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या दोन दिवसीय स्पर्धेत मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित तमन्ना नायरने शनाया सिंगचा 6-0 असा तर, पाचव्या मानांकित समीक्षा शेट्टी याने चौथ्या मानांकित हर्षा देशपांडेचा 6-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अव्वल मानांकित सृष्टी सूर्यवंशीने सहाव्या मानांकित रुमी गादियाचे आव्हान 6-0 असे संपुष्ठात आणले. मुलांच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत पंधराव्या मानांकित आरव शहाने चौथ्या मानांकित नीव शेठचा 6-2 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. निकाल: मुली: उपांत्यपूर्व फेरी: सृष्टी सूर्यवंशी[1] वि.वि.रुमी गादिया[6]6-0; समीक्षा शेट्टी[5]वि.वि.हर्षा देशपांडे[4] 6-3;मायरा शेख[3] वि.वि.ख्याती मनीष 6-0; तमन्ना नायर[2]वि.वि.शनाया सिंग 6-0; मुले: उप-उपांत्यपूर्व फेरी: अधिराज दुधाने[1] वि.वि.विद्युत सुंदर[14] 6-2; यशवंतराजे पवार[8] वि.वि.शिवन त्यागी 6-3; वीर चतुर[3] वि.वि. आरुष खन्ना 6-0; कबीर गुंडेचा[9] वि.वि.श्लोक आळंद 6-3;तक्षिल नागर[5] वि.वि.वीर गायकवाड[10] 6-4; आरव शहा[15] वि.वि.नीव शेठ[4] 6-2; सोहम राठोड[7] वि.वि.अर्जुन सैनी 6-0; आरव छल्लाणी[2] वि.वि.दिव्यांग रसगोत्रा 6-0.’
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतला आंबेगाव तालुक्यातील विविध योजनांचा आढावा
पुणे दि.22: येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जांचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या.
घोडेगांव येथील आंबेगांव पंचायत समिती कार्यालयात गृहमंत्री वळसे पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण विभाग व ग्रामपंचायतींच्या प्रशासकिय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे ,कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, समाज कल्याण समितीचे माजी सभापती सुभाष मोरमारे, घोडेगांवच्या सरपंच क्रांतीताई गाढवे आदी उपस्थित होते.ग्रहमंत्री वळसे पाटील म्हणाले, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन येणारे बियाणे चांगल्या दर्जाचे असावे. शेतकऱ्यांच्या मागणी नुसार खते,बियाणे व इतर निविष्ठा वेळेत मिळतील, याबाबत दक्षता घ्यावी. आदिवासी भागातील पाणी टंचाई असलेल्या गावात पाण्याचे टॅंकर सुरुच ठेवावेत. पंचायत समिती मधील बांधकाम,शिक्षण,आरोग्य अशा विविध विभागामधील रिक्त जागांचा आढावा घेऊन त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिले.
रोजगार हमी योजना, रमाई आवास योजनेचाही आढावा घेण्यात आला. तसेच घरकुल योजनांचाही आढावा घेण्यात आला. संजय गांधी निराधार योजना गरजूंपर्यंत पोहोचवावी व लवकरच संजय गांधी निराधार योजनेची तालुकास्तरीय समिती तयार करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.२०२१-२२ च्या नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाई वाटपाबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.
यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे , उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालींदर पठारे, घोडेगांव ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक नंदु वनवे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अनिल गिते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुरेश पटाडे, घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने
मुंबई- पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर १८.४२ रुपये इतका वाढविला होता आणि आज तो ८ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी करदेखील १८ रुपये २४ पैशांनी वाढविले आणि आता ६ रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेल्या अबकारी कराइतकी कपात केल्यासच खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे असे मुख्यमंत्री म्हणतात.
पुणे, 22 मे 2022: फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज एआयटीए चॅम्पियनशीप सिरीज 16वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात अनिकेत चोभे, अमोघ दामले, साहिल कोठारी, अर्जुन किर्तने या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला. फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम पात्रता फेरीत संघर्षपूर्ण लढतीत साहिल कोठारी याने दुसऱ्या मानांकित आशुतोष कवडेकरचा टायब्रेकमध्ये 2-6, 7-6(4), 6-1 असा पराभव करून आगेकूच केली. अव्वल मानांकित अनिकेत चोभेने आनंद विहारीचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.अमोघ दामलेने चौदाव्या मानांकित नीव कोठारीचा 7-5, 6-2 असा तर, चौथ्या मानांकित शार्दूल खवळेने आर्यन चांदनखेचा 3-6, 6-2, 7-6(3) असा तीन सेटमध्ये पराभव केला. निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:अनिकेत चोभे [1] वि.वि.आनंद विहारी 6-2, 6-3;साहिल कोठारी वि.वि.आशुतोष कवडेकर[2] 2-6, 7-6(4), 6-1;अमोघ दामले वि.वि.नीव कोठारी [14] 7-5, 6-2;शार्दूल खवळे [4] वि.वि.आर्यन चांदनखे 3-6, 6-2, 7-6(3);अर्जुन किर्तने वि.वि.मिहीर कांतावाला 6-4, 6-3;पियुश जाधव वि.वि.आरुष जोशी 6-1, 6-0;अद्विक नाटेकर [6] वि.वि.नील केळकर [16] 6-2, 6-3.
: केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आज 22 मेपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे. यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे.
मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता इतके महसुली उत्पन्न कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारत होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती.
जमाते इस्लामी हिंद ,पुणे कडून ईद मिलन आणि परिसंवादाचे आयोजन पुणे : जमाते इस्लामी हिंद ,पुणे या संघटनेकडून शनिवारी ईद मिलन कार्यक्रम आणि ‘धर्म, अधर्म आणि धार्मिकता ‘ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला.शनिवार, दिनांक २१ मे २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम गांधी भवन, कोथरूड येथे झाला. युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, ख्रिश्चन धर्मगुरू रेव्हरंड चित्रलेखा जेम्स आणि जमाते इस्लामी हिंदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तौफीक अस्लम खान हे या परिसंवादात सहभागी झाले. डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘ धर्माच्या नावाखाली वाह्यात गोष्टी सांगीतल्या जातात, त्यामुळे धर्म लांब जातो. माणसाला जोडतो, तो धर्म, आणि माणसाला माणसापासून तोडतो, तो अधर्म होय. भारताच्या भूमीत बंधूभाव आहे. सर्व धर्मात सच्चाई आहे, त्यामुळे धर्मांतराची गरज नाही. सर्व धर्मातील चांगल्या कल्पना आपण भारतीयांनी स्वीकारल्या पाहिजेत. भोंग्यावरुन वाद घालणे हा वाह्यातपणा आहे, जणू इतर सर्व प्रश्न संपले आहेत. हिंदू – मुस्लीम एकता होणे गरजेचे असून त्यासाठी त्यांना एकत्र आणणारे कार्यक्रम झाले पाहिजेत. द्वेष वाढवून देश टिकणार नाही. तौफीक अस्लम खान म्हणाले, ‘ जोपर्यंत शिक्षण होत नाही, तोपर्यंत प्रगती, जागृती होणार नाही. सर्व धर्मांची माहिती होण्यासाठी भेटीगाठी होत राहिल्या पाहिजेत.देशात द्वेष भरला जात आहे. देशच नव्हे तर जग आपले मानले पाहिजे. भारतातील विविधता हीच मोठी शक्ती आहे. चित्रलेखा जेम्स म्हणाल्या, ‘ शाश्वत जीवन जगायचे असेल इतरांचा कळवळा आला पाहिजे.ज्याला इतरांचा कळवळा येणार नाही, त्याला धर्म कळणार नाही. देवावर आपण जेवढे प्रेम करतो, तेवढे शेजाऱ्यांवर केले पाहिजे.येशू ख्रिस्ताने संवेदनशीलता, प्रेम शिकवले.वाचनातून परिवर्तन होते, त्यामुळे वाचन करीत राहिले पाहिजे. भारतातील आजच्या परिस्थितीत धार्मिकतेचा अर्थ परिपूर्ण न्याय हा असला पाहिजे. डॉ. भागवत गुरुजी यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. परिसंवाद झाल्यानंतर शिरखुर्म्याचा आस्वाद घेवून कार्यक्रमाचा समारोप झाला. करीमुद्दीन शेख यांनी आभार मानले